Thursday, May 31, 2012

हरिविजय - अध्याय ३


अध्याय ३

श्रीगणेशाय नमः ॥  श्रीकुलदेवतायै नमः ॥श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥
जय जय अनंतब्रह्मांडनायका ॥ चतुराननाचिया निजजनका ॥ चोघांसीही नव्हे आवांका ॥ तुझें स्वरुप वर्णावया ॥१॥
साही जणें वेडीं होती ॥ अठरांची खुंटली गती ॥ चौघीजणी तटस्थ पाहती ॥ स्वरुपस्थिति न वर्णवे ॥२॥
पांचां नुरेचि ठाव ॥ चारी सहजचि जाहलीं वाव ॥ चौदाजणींची ठेव ॥ न चले स्वरुप वर्णावया ॥३॥
शिणल्या बहुत चौसष्टी ॥ आठजणी बहुत कष्टी ॥ अकराही हिंपुटी ॥ स्वरुप तुझें वर्णितां ॥४॥
आणीक बारा देखण्या ॥ सोळाजणी चतुर शाहाण्या ॥ आणि चौघी डोळेमोडण्या ॥ लाजोनियां तटस्थ ॥५॥
पंचविसां जाहली वाव ॥ तिघांचें नुरेचि नांव ॥ दोन्ही म्हणणें भाव ॥ हेंही तेथें विरालें ॥६॥
चहूं मुखांचा वर्णितां भागला ॥ पांचां मुखांचा तटस्थ राहिला ॥ सहा मुखांचा दडाला ॥ कपाटामाजी जाऊनि ॥७॥
सहस्त्र मुखांचा वर्णितां देख ॥ तोही जाहला तळीं तल्पक ॥ थोरथोरांसी पडले अटक ॥ एक मुखें काय वर्णूं ॥८॥
जीमूतींचें बिंदू किती ॥ हेही एक वेळां होय गणती ॥ निराळीं पायीं वेंघती ॥ परी तुझी स्थिति अगम्य ॥९॥
होईल पृथ्वीचें वजन ॥ गणवेल सिंधूचें जीवन ॥ अवनीवरी किती तृण ॥ मोजवेल गणितां तें ॥१०॥
अंबर आहे किती विती ॥ हेंही गनवेल रमापती ॥ परी तुझे गुण निश्चिती ॥ न वर्णवती कोणातें ॥११॥
असो आतां पूर्वानुसंधान ॥ द्वितीयाध्याय संपतां पूर्ण ॥ कंसें देवकीचे गर्भ वधून ॥ साही टाकिले बंदिशाळे ॥१२॥
पाप जाहलें उत्कट जाण ॥ गांजिले गाई ब्राह्मण ॥ यावरी क्षीरसागरीं जगज्जीवन ॥ काय करिता जाहला ॥१३॥
अनंतासी म्हणे अनंत ॥ चला अवतार घेऊं त्वरित ॥ करुं दुष्‍टांचा निःपात ॥ संत भक्त रक्षूं पैं ॥१४॥
तंव बोले धरणीधर ॥ मी न घें आतां अवतार ॥ पूर्वीं मी जाहलों सौमित्र ॥ कष्ट फार भोगितले ॥१५॥
हांसोनि बोले द्विसहस्त्रनयन ॥ अष्टविंशति अयनें उपोषण ॥ निराहार घोर अरण्य ॥ तुम्हांसवें सेविलें जी ॥१६॥
आतां आपणांचे अवतरावें ॥ अवतारनाटय दाखवावें ॥ गोब्राह्मण सुखी रक्षावे ॥ प्रतिपाळावे साधुजन ॥१७॥
टाकोनि कपट कुटिलभाव ॥ स्वामीसी हांसे भोगिराव ॥ बोले कौतुकें रमाधव ॥ शेषाप्रती स्वानंदें ॥१८॥
तूं माझा प्राणसखा ॥ समरभूमीचा पाठिराखा ॥ तुजविण भक्तटिळका ॥ अवतार मी न घेंचि ॥१९॥
तूं माझें निजांग पूर्ण ॥ तूं सखया माझा निजप्राण ॥ तुजविण मज एक क्षण ॥ न गमेचि जिवलगा ॥२०॥
तूं जाहलासी पूर्वीं लक्ष्मण ॥ लंकेसी केलें रणकंदन ॥ बहुत सेवा करुन ॥ मज तुवां तोषविलें ॥२१॥
आतां तूं पुढें जाय सत्वर ॥ होईं माझा ज्येष्‍ठ सहोदर ॥ मी तूझी आज्ञा पाळीन निर्धार ॥ बळिभद्र होईं तूं ॥२२॥
वडील बंधु तूं होईं देवकीच्या गर्भीं जाऊनि राहीं ॥ मी योगमायेस लवलाहीं ॥ पाठवितो तुजमागें ॥२३॥
कंसें वधिलें गर्भ सकळ ॥ तुज योगमाया काढील ॥ मग गोकुळीं नेऊनि ठेवील ॥ रोहिणीच्या निजगर्भीं ॥२४॥
माया जाईल यशोदेच्या उदरा ॥ मग मी येईन मथुरापुरा ॥ देवकीचा गर्भवोवरा ॥ माझा अवताररुप होय ॥२५॥
उपजतांचि गोकुळीं येईन ॥ मग तुम्ही आम्ही खेळों दोघे जण ॥ गोरक्षमिषें संपूर्ण ॥ दैत्य तेथील संहारुं ॥२६॥
करुन साष्टांग नमन ॥ पुढें चालिला संकर्षण ॥ देवकीच्या उदरीं येऊन ॥ गर्भ राहिला सातवा ॥२७॥
दिवसेंदिवस गर्भ वाढे ॥ मंदिरीं परम प्रकाश पडे ॥ जैसा पळेंपळ सूर्य चढे ॥ उदयाद्रीहूनि पश्चिमे ॥२८॥
वसुदेवाप्रती देवकी बोले ॥ सहा वेळां मी गर्भिणी जाहलें ॥ परी नवल वाटतें ये वेळे ॥ या गर्भाचें मजलागीं ॥२९॥
वाटे पृथ्वी उचलीन ॥ कीं आकाशा धीर देईन ॥ सप्त समुद्र सांठवीन ॥ नखाग्रीं मज वाटतसे ॥३०॥
घेऊन नांगरमुसळ ॥ मीच मर्दीन कंसदळ ॥ दैत्य मारावे समूळ ॥ मनामाजी वाटतसे ॥३१॥
वसुदेव म्हणे ते क्षणीं ॥ न कळे ईश्वराची करणी ॥ येवढा तरी वांचोनी ॥ विजयई हो का सर्वदा ॥३२॥
तों लागला सातवा मास ॥ निद्रा आली देवकीस ॥ वसुदेवही सावकाश ॥ निद्रार्णवीं निमग्न ॥३३॥
तंव ती हरीची योगमाया ॥ तिची ब्रह्मांदिकां न कळे चर्या ॥ इच्छामात्रें महत्कार्या ॥ ब्रह्मांड हें रचियेलें ॥३४॥
ब्रह्मा विष्णु शिव तीन्ही ॥ गर्भी आलीं बाळें तान्हीं ॥ परी एकासी नेत्र उघडूनी ॥ स्वरुप पाहों नेदीच ॥३५॥
आत्मसुखाचा समुद्र ॥ त्यांत पहुडले जीव समग्र ॥ परी चाखों नेदी अणुमात्र ॥ गोडी तेथींची कोणातें ॥३६॥
हे चैतन्याची बुंथी ॥ हे अरुपाची रुपकर्त्री ॥ ब्रह्मांडींचे पुतळे नानागती ॥ एका सूत्रें नाचवी पैं ॥३७॥
इनें निर्गुण गुणासी जाहली पतिव्रता ॥ ब्रह्मांड रचिलें तत्त्वतां ॥ इच्छामात्रेंकरुनियां ॥३९॥
शेजे निजवूनि भ्रतार ॥ सृष्टी घडी मोडी समग्र ॥ समाचार अणुमात्र ॥ कळों नेदी पतीचें ॥४०॥
हे कौटाळीण निर्धारीं ॥ नसतींच दैवतें उभीं करी ॥ जीव पाडिले अघोरीं ॥ नाना योनीं हिंडवी ॥४१॥
धरील कोणी स्वरुपाची चाड ॥ त्यावरी घाली नसतें लिगाड ॥ पुढें स्वर्गसुख करी आड ॥ तेंचि गोड दाखवी ॥४२॥
गोड तें कडवट केलें ॥ कडवटा गोडपण दाखविलें ॥ अहंकारामद्य जीवा पाजिलें ॥ वेडे केले सर्वही ॥४३॥
आतां असो हे मायाराणी ॥ इची विपरीतचि करणी ॥ तिनें देवकीचा गर्भ काढूनी ॥ गोकुळासी पैं नेला ॥४४॥
कैसा नेला काढुनी ॥ ब्रह्मादिकां न कळे करणी ॥ रोहिणी वसुदेवाची पत्‍नी ॥ नंदागृहीं होती ते ॥४५॥
कंसाचिया भयें जाण ॥ नंदगृहीं राहिली लपोन ॥ तिच्या पोटीं नेऊन ॥ गर्भ घातला ते क्षणीं ॥४६॥
निजले ठायीं गर्भ ॥ पोटांत घातला स्वयंभ ॥ परम तेजस्वी सुप्रभ ॥ सूर्य जैसा तेजस्वी ॥४७॥
जागी जाहली रोहिणी ॥ तों सात मासांची गर्भिणी ॥ म्हणे कैसी जाहली करणी ॥ चिंता मनीं वर्तत ॥४८॥
पुरुष नसतां गर्भ राहिला ॥ परम चिंताक्रांत ते अबला ॥ नंदयशोदेस कळला ॥ समाचार सर्व तो ॥४९॥
जीवीं झोंबला चिंताग्नी ॥ तों आकाशीं वदली देववाणी ॥ चिंता करुं नको रोहिणी ॥ वसुदेवाचा गर्भ असे ॥५०॥
पोटा येतो भोगींद्र ॥ उतरील पृथ्वीचा भार ॥ ऐकतां हें उत्तर ॥ सुख जाहलें समस्तां ॥५१॥
लोकापवाद सर्व हरला ॥ चिंतेचा डाग धुतला ॥ तों बळिराम जन्मला ॥ नवमास भरतांचि ॥५२॥
प्रकाशला सहास्त्रकिरण ॥ तैसा बाळ देदीप्यमान ॥ नंदें जातक वर्तवून ॥ बळिभद्र नाम ठेविलें ॥५३॥
ऐसा उपजला अहींद्र ॥ तों यशोदा जाहली गरोदर ॥ हरिमायेनें अवतार ॥ तेथें घेतला तेधवां ॥५४॥
यशोदा गर्भिणी जाहली ॥ इकडे कथा कैसी वर्तली ॥ देवकी पाहे घाबरली ॥ तों गर्भ नाहीं पोटांत ॥५५॥
नेणों कैसी जाहली करणी ॥ सांगे वसुदेवा लागोनी ॥ म्हणे गर्भ न पडेची धरणीं ॥ गेला जिरोनि पोटांत ॥५६॥
वसुदेव म्हणे ते वेळां ॥ कंसधाकें गर्भ जिरला ॥ न कळे ईश्वराची कळा ॥ कंसास कळला समाचार ॥५७॥
दूत सांगती कंसातें ॥ गर्भ जिरला तेथिंचा तेथें ॥ कंस म्हणे आतां आठव्यातें ॥ बहुत जपा सर्वही ॥५८॥
देवकी होतांचि गर्भिण ॥ जागा नेत्रीं तेल घालून ॥ आठव्याची आठवण ॥ विसरुं नका सर्वथा ॥५९॥
देवकीउदरींचा आठवा ॥ निजध्यास बसला कंसभावा ॥ जनीं वनीं आघवा ॥ आठवा आठवा आठवत ॥६०॥
जागृतीं सुषुप्तीं स्वप्नीं ॥ आठवा दिसे ध्यानीं मनीं ॥ आठवा दिसे भोजनीं ॥ आठवा शयनीं सोडीना ॥६१॥
भूमि दिसे आठव्याऐसी ॥ आठवा दिसे आकाशीं ॥ आठव्यानें व्यापिलें त्यासी ॥ दिवसनिशी आठवा ॥६२॥
क्षीरसागरीं श्रीहरी ॥ क्षीराब्धिसुतेसी आज्ञा करी ॥ पद्माक्षि तूं क्षितीवरी ॥ क्षितीपाळउदरीं अवतरें ॥६३॥
वैदर्भदेशींचा भीमक राजा ॥ तयाची तूं होय आत्मजा ॥ तात्काळ चालली कमळजा ॥ नमस्कारुनि हरीतें ॥६४॥
जगद्वंद्य स्वयें आपण ॥ प्रवेशाला मथुरापट्टण ॥ देवकीचे गर्भी येऊन ॥ राहता जाहला कौतुकें ॥६५॥
गर्भवासा आला भगवंत ॥ म्हणतां हांसतील साधुसंत ॥ लीलावतारी जगन्नाथ ॥ जन्ममृत्यु त्या कैंचा ॥६६॥
ज्याचें करितां स्मरण ॥ जाय जन्ममृत्यु खंडोन ॥ तो राहिला गर्भीं येऊन ॥ कल्पांतींही घडेना ॥६७॥
उगाच लौकिकभाव ॥ दाविली मृत्युलोकींची टेव ॥ तो ब्रह्मानंद स्वयमेव ॥ जन्म मृत्यु त्या कैंचा ॥६८॥
क्षीरसागरींहून हरि आला ॥ तरी तो ठाव काय ओस पडिला ॥ तो तैसाचि संचला ॥ लक्ष्मीशेषांसमवेत ॥६९॥
अनंत रुपें अनंत नामें ॥ अनंत अवतार अनंत कर्में ॥ अनंत लीला घनश्यामें ॥ भक्तांलागीं दाविल्या ॥७०॥
अनंत ब्रह्मांडें अनंत शक्ती ॥ अनंत युगींच्या अनंत कीर्ती ॥ अनंत रुपें अनंत मूर्ती ॥ अतर्क्य गति वेदशास्त्रां ॥७१॥
असो लौकिक विचार देख ॥ गर्भीं आला लक्ष्मीनायक ॥ कंसासी लाविला धाक ॥ देखिला नसतां सर्वदा ॥७२॥
देवकी जाहली गर्भिणी ॥ तेज न माये गगनीं ॥ खेद कांहीं न वाटे मनीं ॥ सुखेंकरुनि डुल्लत ॥७३॥
पोटा आला विदेही हरी ॥ देवकी नाहीं देहावरी ॥ जनीं वनीं दिगंतरीं ॥ अवघा मुरारी दिसतसे ॥७४॥
वसुदेव म्हणे देवकीप्रती ॥ तुज चिंता कां न वाटे चित्तीं ॥ आठव्याची कैसी गती ॥ होईल ते न कळे पां ॥७५॥
कंस जपतो बहुत ॥ आठव्याचा करावया घात ॥ यावरी देवकी बोलत ॥ प्रतिउत्तर काय तेव्हां ॥७६॥
भुजा पिटोनि बोले वचन ॥ कंसास मारीन आपटोन ॥ मुष्टिकचाणूरांचा प्राण ॥ क्षणमात्रें घेईन मी ॥७७॥
हांक फोडोन गर्जे थोर ॥ उतरीन पृथ्वीचा भार ॥ करुनि दैत्यांचा संहार ॥ बंदिशाळा फोडीन मी ॥७८॥
आणीं वेगें धनुष्यबाण ॥ युद्ध करीन मी दारुण ॥ जरासंध रथीं बांधोन ॥ सत्रा वेळां आणीन मी ॥७९॥
भस्म करीन कालयवन ॥ रचीन द्वारकापट्टण ॥ सकळ नृपां शिक्षा लावून ॥ पट्टरानी आणीन मी ॥८०॥
हांक फोडिली क्रोधें थोर ॥ जिवें मारीन भौमासुर ॥ निवटीन कौरवभार ॥ निजभक्तकैवारें ॥८१॥
मी भक्तांचा सारथि होईन ॥ दुष्ट सर्व संहारीन ॥ मी ब्रह्मानंद परिपूर्ण ॥ अवतरलों पृथ्वीवर ॥८२॥
वसुदेवासी चिंता वाटे ॥ ही गर्जते येवढ्या नेटें ॥ जरि बाहेर मात प्रकटे ॥ तरी अनर्थ होईल पां ॥८३॥
वसुदेव बोले वचन ॥ देवकी धरीं आतां मौन ॥ येरी म्हणे कैंची देवकी पूर्ण ॥ ब्रह्म सनातन मी असें ॥८४॥
स्त्री पुरुष नपुंसक ॥ त्यांहूनि वेगळा मी निष्कलंक ॥ सकळमायाचक्रचाळक ॥ कर्ता हर्ता मीच पैं ॥८५॥
मी सर्वद्रष्टा अतींद्रिय ॥ मी अज अव्यय निरामय ॥ अजित अपार निष्क्रिय ॥ आनंदमय वर्तें मी ॥८६॥
मी प्रळयकाळाचा शास्ता ॥ मी आदिमायेचा नियंता ॥ मी चहूं वाचांपरता ॥ मायानिमिंता मीच पैं ॥८७॥
मीच सगुण मीच निर्गुण ॥ मीच थोर मीच लहान ॥ देव दैत्य निर्मून ॥ पाळिता हर्ता मीच पैं ॥८८॥
ऐसें देवकी बोलोन ॥ मागुती धरिलें मौन ॥ तों आकाशीं देव संपूर्ण ॥ गजर करिती दुंदुभींचा ॥८९॥
अवतरेल आतां भगवंत ॥ करील दुष्‍टांचा निःपात ॥ देव मिळोनि समस्त ॥ गुप्त मथुरेंत उतरले ॥९०॥
ब्रह्मादिक आणि चंद्र ॥ बंदिशाळे पातळे समग्र ॥ देवकीस प्रदक्षिणा करिती सुरवर ॥ एक नमस्कार घालिती ॥९१॥
उभे ठाकूनि बद्धांजली ॥ गर्भस्तुति आरंभिली ॥ जय सच्चिदानंद वनमाळी ॥ देवकीजठरगर्भा ॥९२॥
जय हरे नारायणा गोविंदा ॥ इंदिरावर आनंदकंदा ॥ सर्वेशा मुकुंदा परमानंदा ॥ परमपुरुषा परज्ञा ॥९३॥
पद्मजजनका पुरातना ॥ पंकजनेत्रा परमपावना ॥ पद्मवल्लभा पशुपतिजीवना ॥ पयोब्धिवासा परेशा ॥९४॥
पतितपावना पंकजधारका ॥ कमनीयरुपा निष्कलंका ॥ कमळस्वरुपा कमलानायका ॥ किल्बिषमोचका कमलेशा ॥९५॥
कर्ममोचका करिवरतारणा ॥ कैवल्यनिधि कैटभभंजना ॥ करुणाकरा कामविहीना ॥ काळनाशना काळात्मया ॥९६॥
आदिकेशवा विश्वभूषणा ॥ विश्वंभरा वेदपाळणा ॥ वेदपुरुषा वेदस्थापना ॥ विश्वाधीशा विश्वपते ॥९७॥
अनंतेवषा अनंतवदना ॥ अनंतनामा अनंतनयना ॥ अनंतपाणि अनंतचरणा ॥ अनंतकल्याणा नमोस्तु ते ॥९८॥
अव्ययरुपा अपरंपारा ॥ आगण्युआ अगुणा अगोचरा ॥ अनामा असंगा अक्षरा ॥ आदिकारणा आत्मया ॥९९॥
अमानुइषा अविद्याछेदना ॥ आनंदरुपा आनंदसदना ॥ अभेदा अबोधी अमळपूर्णा ॥ आदिमूळा अव्यक्ता ॥१००॥
सर्वतीता सर्वज्ञा ॥ गुणसागरा गुणज्ञा ॥ आम्ही सकळ सुर तवाज्ञा ॥ पाळोनियां राहतों ॥१॥
ऐसी स्तुति करुनि जाणा ॥ देव पावले अंतर्धाना ॥ आनंद न माये मना ॥ सुरवरांच्या तेधवां ॥२॥
कंसास रात्रंदिवस ॥ लागला आठव्याचा निजध्यास ॥ आठही प्रहर तयास ॥ आठवावयास दुजें नाहीं ॥३॥
दूतींप्रती पुसे कंस ॥ गर्भास किती जाहले मास ॥ त्या म्हणती संपावयास ॥ नवमासां अवधि थोडी हो ॥४॥
आपण येऊन कंसासुर ॥ उभा राहे देवकीसमोर ॥ तंव ते आनंदरुप साचार ॥ चिंता अणुमात्र नाहींच ॥५॥
नासाग्रीं ठेवून दृष्टी ॥ कृष्णरुप पाहे सृष्‍टी ॥ कृष्णरुप पाहे पाठीं पोटीं ॥ बोलतां ओठीं कृष्णचि ये ॥६॥
कृष्णरुप आसन वसन ॥ कृष्णरुप अन्न पान ॥ कृष्णरुप दिसे सदन ॥ भूषण संपूर्ण कृष्णरुप ॥७॥
पृथ्वी आप तेज वायु निराळ ॥ कृष्णरुप दिसे सकळ ॥ स्थावर जंगम निर्मळ ॥ घननीळरुप दिसतसे ॥८॥
पुढें उभा कंस देख ॥ परी निर्भय देवकी सुरेख ॥ महेशापुढें मशक ॥ तैसा कंस भासतसे ॥९॥
इंद्रापुढें जैसा रंक ॥ कीं ज्ञानियापुढें महामूर्ख ॥ कीं केसरीपुढें जंबुक ॥ का सूर्यापुढें खद्योत पैं ॥११०॥
कीं हंसापुढें बक ॥ कीं कोकिळेपुढें काग ॥ कीं विप्रासमोर मांग ॥ तैसा खळ उभा तेथें ॥११॥
कीं नामापुढें पाप देख ॥ कीं वेदांतापुढें चार्वाक ॥ कीं शंकरापुढें मशक ॥ कीं मीनकेतन उभा जैसा ॥१२॥
कीं पंडितापुढें अजापाळक ॥ कीं श्रोतियापुढें हिंसक ॥ कीं वासुकीपुढें मूषक ॥ लक्षणें पाहूं पातला ॥१३॥
अग्नीपुढें जैसें तृण ॥ कीं ज्ञानियापुढें अज्ञान ॥ कीं महावातासी आडवें पूर्ण ॥ जलदजाल जैसें कां ॥१४॥
ऐसा कंस देवकीपुढें ॥ तीस न्याहाळूनि पाहे निवाडें ॥ तंव तें चतुर्भुज रुपडें ॥ शंखचक्रयुक्त दिसे ॥१५॥
न दिसे स्त्रियेची आकृती ॥ परम देदीप्यमान विष्णुमूर्ती ॥ आरक्तनेत्र सुदर्शन हातीं ॥ ऊर्ध्व करुनि उभी असे ॥१६॥
मुरकुंडी कंसाची वळली ॥ शस्त्रें हातींचीं गळालीं ॥ बोबडी तोंडासी पडली ॥ हांक फोडिली भयें तेव्हां ॥१७॥
आरडोनियां कंस पळे ॥ थरथरां कांपे वाटे अडखळे ॥ पिशाचवत संचरलें ॥ गृहामाजी आपुलिया ॥१८॥
कंस तेव्हां शस्त्र घेऊनी ॥ रागें आपटीत मेदिनीं ॥ आठव्यास जिवें मारुनी ॥ टाकीन मी निर्धारें ॥१९॥
आठव्यानें मज व्यापिलें ॥ त्यास मी गिळीन सगळें ॥ कंस रागें फिरवी डोळे ॥ आल्यागेल्यावरी पैं ॥१२०॥
आतां श्रीकृष्णाचा जन्मकाळ ॥ पाहों आले निर्जर सकळ ॥ दुंदुभिनादें निराळ ॥ दुमदुमलें तेधवां ॥२१॥
विमानांची जाहली दाटी ॥ वाव नाहीं नभापोटीं ॥ करिती दिव्य सुमनवृष्‍टी ॥ आनंद पोटीं न समाये ॥२२॥
वर्षाऋतु श्रावणमास ॥ बुधाष्टमी कृष्णपक्ष ॥ अवतरला कमलदलाक्ष ॥ रोहिणी नक्षत्र ते दिवशीं ॥२३॥
सोमवंशीं अवतार ॥ म्हणोनि साधिला चंद्रपुत्रवार ॥ जाहला शशीचा उद्धार ॥ दशा आली वंशासी ॥२४॥
मध्यरात्रीं अष्टमीस ॥ देवकीपुढें परमपुरुष ॥ चतुर्भुज हृषीकेश ॥ निमासुर डोळस पैं ॥२५॥
आठां वर्षांची मूर्ती ॥ असंभाव्य पडली दीप्ती ॥ तेजें दश दिशा उजळती ॥ तेथें लपती शशिसूर्य ॥२६॥
पदकमळींचा आमोद सेवावया ॥ भ्रमरी जाहली क्षीराब्धितनया ॥ सर्वकाळ न विसंबे पायां ॥ कृपण जैसा धनातें ॥२७॥
भागीरथी चरणीं उद्भवली ॥ सागरीं ते एक जाहली ॥ परी न विसंबे निजमुळीं ॥ कदाकाळीं तुटेना ॥२८॥
अरुणबालार्कसंध्याराग ॥ दिव्य रत्‍नांचे काढिले रंग ॥ तैसे तळवे आरक्त सुरंग ॥ श्रीरंगाचे शोभती ॥२९॥
चंद्र क्षयरोगें जाहला कष्टी ॥ मग राहिला चरणांगुष्ठीं ॥ कीं दशधा होऊनि दाही बोटीं ॥ सुरवाडला शशी तो ॥१३०॥
वज्र ध्वज पद्म अंकुश ॥ ऊर्ध्वरेखा चक्र पदीं विशेष ॥ सामुद्रिक चिन्हें सुरस ॥ काय अर्थ सुचविला ॥३१॥
साधकास ऊर्ध्वरेखा ॥ ऊर्ध्वमार्ग दावी देखा ॥ सत्त्वशीळा प्रेमळ भाविका ॥ ऊर्ध्वसंकेत दावीतसे ॥३२॥
विद्यामदें जाहले जे मस्त ॥ कोणास न लेखिती गज उन्मत्त ॥ त्यांसी आकर्षावया वैकुंठनाथ ॥ क्षमांकुश धरी पदीं ॥३३॥
पद्म कां धरिलें पायीं ॥ पद्मा वसे तया ठायीं ॥ आणिकांतें प्राप्त नाहीं ॥ घोर तप आचरतां ॥३४॥
अहंकार पर्वत थोर ॥ भक्तांस बाधक जड फार ॥ तो फोडावया वज्र ॥ हरीनें पायीं धरियेलें ॥३५॥
कीं तें चरणलक्षण जहाज ॥ वरी विशाळ भक्तिध्वज ॥ भक्त तारावया अधोक्षज ॥ सदा उदित वाट पाहे ॥३६॥
जीव शरण येती जडरुप ॥ त्यांचें छेदावया सर्व पाप ॥ चक्र पायीं देदीप्य ॥ तेज अमूप झळकतसे ॥३७॥
प्रपदें दिसती विमल ॥ घोटी त्रिकोण सोज्ज्वळ ॥ इंद्रनीळमणि सुढाळ ॥ परी उपमे पुरेना ॥३८॥
तळवे आरक्त विराजती ॥ कीं बहु श्रमली सरस्वती ॥ म्हणोनि घ्यावया विश्रांती ॥ तळवां राहिली हरीच्या ॥३९॥
विश्वाचीं पापें किती हरावीं ॥ म्हणोनि श्रमली जान्हवी ॥ शुभ्र वांकीरुप जाहली बरवी ॥ म्हणोनि सत्कवि वर्णिती हो ॥१४०॥
कालिंदी कृतांताची भगिनी ॥ ऐसें बोलिजे सर्वजनीं ॥ तो अपवाद चुकवावयालागूनी ॥ मांडया सुनीळ झाली ते ॥४१॥
ऐसी हरिपदीं त्रिवेणी सुरंग ॥ अज्ञानच्छेदक दिव्य प्रयाग ॥ अक्षयवट सुरंग ॥ ध्वजांकुश तेचि पैं ॥४२॥
चरणीं सुरवाडले प्रेमळ ॥ तेच तेथें पूर्ण मराळ ॥ वांकींवरी रत्‍नें तेजाळ ॥ तपोधन तपती ते ॥४३॥
प्रयागीं मोक्ष ठेवितां देह ॥ येथींच्या श्रवणें होय विदेह ॥ भावें माघमासीं निःसंदेह ॥ त्रिवेणीमाधव सेविजे ॥४४॥
त्या प्रयागीं जातां कष्ट ॥ हा ध्यानींच होतो प्रगट ॥ या प्रयागीं नीलकंठ ॥ क्षेत्रसंन्यास घेत पैं ॥४५॥
वांकी नेपुरें तोडर ॥ करिती दैत्यांवरी गजर ॥ पोटर्‍या जंघा सुकुमार ॥ श्यामसुंदर दिसती पैं ॥४६॥
कीं ते सरळ कर्दळी स्तंभ ॥ कीं गरुडपाचूंचे उगवले कोंभ ॥ कीं शोधूनियां सुनीळ नभ ॥ जानु जंघा ओतिल्या ॥४७॥
कीं मिळोनि सहस्त्र सौदामिनी ॥ शीतळ होऊनि पीतवसनीं ॥ जडल्या चंचळपण टाकूनी ॥ हरिजघनीं सर्वदा ॥४८॥
कटीं मेखळेचें तेज आगळें ॥ दिव्य रत्‍नें मिरवती सुढाळें ॥ कीं एकहारी सूर्यमंडळें ॥ हरिजघनीं जडलीं पैं ॥४९॥
नाभि वर्तुळ गंभीर ॥ जैसा कां बालभास्कर ॥ तेथें उद्भवला चतुर्वक्‍त्र ॥ सृष्टीचिये आदिकाळीं ॥१५०॥
उदरीं त्रिवळी सुकुमार ॥ कौस्तुभतेजें झांके अंबर ॥ वैजयंती मुक्ताहार ॥ चरणांगुष्ठापर्यंत पैं ॥५१॥
वक्षःस्थळीं श्रीवत्सलांछन ॥ सव्यभागीं शोभायमान ॥ वामभागीं श्रीनिकेतन ॥ वास्तव्यस्थळ श्रीचें पैं ॥५२॥
शंख चक्र गदा पद्म ॥ चतुर्बाहु उत्तमोत्तम ॥ कीं धर्मार्थमोक्षकाम ॥ चारी पुरुषार्थं उभारिले ॥५३॥
पांघुरला जो पिंताबर ॥ जडितपल्लव मनोहर ॥ कीं तेणें रुपें सहस्त्रकर ॥ अवतरला भासतसे ॥५४॥
चांदणें शोभे शुद्ध निराळीं ॥ तैसी उटी आंगीं शोभली ॥ कीं इंद्रनीळा गवसणी घातली ॥ काश्मीराची सुरंग ॥५५॥
कंबुकंठ विराजमान ॥ नासिक सरळ सुहास्यवदन ॥ मंदस्मित झळकती द्शन ॥ चंद्रतेज उणें पैं ॥५६॥
कीं सर्वही आनंद मिळोन ॥ हरिमुखीं वसती अनुदिन ॥ त्रैलोक्यसौंदर्य विसांवोन ॥ तेथेंच गोळा जाहलें ॥५७॥
कुंडलें तळपती मकराकार ॥ तेजें लखलखिलें अंबर ॥ मज वाटे शशिदिनकर ॥ हरिश्रोत्रीं लागले ॥५८॥
कुंडलांची दिव्य दीप्ती ॥ गंडस्थळीं झळके ज्योती ॥ कुंडलांस कर्ण शोभविती ॥ कर्णाची दीप्ती विशेष ॥५९॥
कृष्णतनूच्या सुरवाडे ॥ अलंकारांसी प्रभा चढे ॥ कपाळीं टिळक निवाडे ॥ मृगमदाचा सतेज ॥१६०॥
कल्पांतीचा सूर्य प्रगटला ॥ तैसा मुकुट तेजागळा ॥ वरी दिव्य मणि मिरवला ॥ तो वर्णिला नवजाय ॥६१॥
बाहुदंडीं कीर्तिमुखें ॥ हस्तकंकणें दिव्य सुरेखें ॥ मुद्रिकांचें तेज झळके ॥ चपळेहूनि विशेष ॥६२॥
ऐसा एकाएकीं बंदिशाळे ॥ देवकी देखे घनसांवळें ॥ जिवाचें निंबलोण केलें ॥ हरीवरुनि तेधवां ॥६३॥

आनंद न माये अंबरीं ॥ म्हणे भक्तवत्सला श्रीहरी ॥ तूं माझिया निजोदरीं ॥ पुत्र होवोनि अवतरें ॥६४॥
तूं विश्वंभर बहु थोर ॥ परी लोक म्हणती माझा पुत्र ॥ ऐसा होईं तूं राजविनेत्र ॥ आळी माझी पुरवावी ॥६५॥
हरी म्हणे ते वेळ ॥ मी बाळक होईन अवलीळा ॥ परी मज सत्वर गोकुळा ॥ नेऊनियां घालावें ॥६६॥
तेथें माझा प्राणमित्र ॥ ज्येष्ठ बंधु बळिभद्र ॥ मग दोघेही येऊ साचार ॥ दर्शनालागीं तुमच्या ॥६७॥
ऐसें बोलून जगज्जीवन ॥ हास्यवदनें अवलोकून ॥ आपुली योगमाया घालून ॥ देवकीसी मोहिलें ॥६८॥
सच्चिदानंद घननीळ ॥ देवकीपुढें जाहला बाळ ॥ तीस वाटलें केवळ ॥ माझें उदरीं जन्मला ॥६९॥
पहिला प्रताप विसरली ॥ बाळ देखोन घाबरली ॥ असंभाव्य प्रभा पडली ॥ बंदिशाळे न समाये ॥१७०॥
रात्र जाहली दोन प्रहर ॥ वसुदेवासी उठवी सुंदर ॥ म्हणे शब्द जाईल बाहेर ॥ तरी कंस धांवेल पैं ॥७१
कोठें तरी कृष्ण लपवावा ॥ बाहेर तर्क कळों न द्यावा ॥ मौनेंचि हृदयीं धरावा ॥ तरीच लाभेल कृष्ण हा ॥७२॥
वसुदेव लावलाहें धांविन्नला ॥ श्रीकृष्ण हृदयीं धरिला ॥ म्हणे कोठें लपवूं याला ॥ हा झांकिला नवजाय ॥७३॥
सूर्य काय मुष्टींत झांके ॥ चंद्र न लपे कदा काखे ॥ ऐरावत शक्राचा देखें ॥ लपे कैसा पर्णकुटीं ॥७४॥
सिंधु न माये रांजणीं ॥ बोचक्यांत न लपे कदा अग्नी ॥ मेरु काखेसी घालूनी ॥ कोणा लपवे सांग पां ॥७५॥
मूर्खांमाजी पंडित ॥ अभाग्यांत श्रीमंत ॥ क्लीबांमाजी प्रतापवंत ॥ शूर कैसा झांके पां ॥७६॥
लवणाचा घट थोर ॥ आवरुं न शके गंगापूर ॥ वानरांमाजीं रघुवीर ॥ कदाकाळीं झांकेना ॥७७॥
भूतांमाजी शंकर ॥ किरडांमाजी धरणीधर ॥ रंकामाजी राजेंद्र ॥ कदा झांकिला जाईना ॥७८॥
कस्तुरी चोरिली चोरें ॥ परी परिमळें हाट भरे ॥ तैसा कृष्ण न झांके वो सुंदरे ॥ लपवितां कोठेंही ॥७९॥
बाहेर प्रकटतां मात ॥ तात्काळ होईल अनर्थ ॥ ज्यासी द्रव्यकूप सांपडत ॥ तेणें लोकातें न सांगावें ॥१८०॥
तों हळूच बोले देवकी बोला ॥ हा अयोनिसंभव पुतळा ॥ यास नेऊन घाला गोकुळा ॥ भय तुम्हांला कदा नाहीं ॥८१॥
तंव वसुदेव म्हणे ॥ पदीं श्रृंखला द्वारीं रक्षणें ॥ लोहारें ठोकूनि घणे ॥ कुलुपें कपाटें दृढ केलीं ॥८२॥

मध्यरात्रीं पर्जन्यकाळ ॥ यमुनेसी पूर असे तुंबळ ॥ बेडी वाजे खळखळ ॥ द्वारपाळ जागे पैं ॥८३॥
घन वर्षतो मंदमंद ॥ वसुदेव जाहला सद्गद ॥ हृदयीं धरिला ब्रह्मानंद ॥ चैतन्यधन श्रीकृष्ण ॥८४॥
अवलोकिता श्रीकृष्णवदन ॥ बेडी तुटली न लागतां क्षण ॥ ज्यांचे करितांच स्मरण ॥ भावबंधन निरसे पैं ॥८५॥
नवल वाटलें वसुदेवा ॥ घेवोनि चालिला वासुदेवा ॥ माय धांवोनि तेधवां ॥ वदन विलोकी पुत्राचे ॥८६॥
पुन्हां बाळा दावी वदन ॥ आसुवें भरले तेव्हां नयन ॥ कृष्ण करी हास्यवदन ॥ मातेकडे पाहोनियां ॥८७॥
तो चहूं दारवंटा ते वेळे ॥ दृढ कुलुपें ठोकिले खिळे ॥ जावळी येता घननीळें ॥ पायें स्पर्शिलीं कपाटें ॥८८॥
तात्काळ उघडलीं चारीं द्वारें ॥ रक्षक व्यापिले निद्राभरें ॥ वसुदेव चालिला त्वरें ॥ कोणी दुसरें आढळेना ॥८९॥
वर्षती पर्जन्याच्या धारा ॥ तों फणींद्र धांविन्नला त्वरा ॥ विशाळ फळा ते अवसरा ॥ कृष्णावरी उभारिला ॥१९०॥
खालीं पिता नेत राजीवनेत्र ॥ भोगींद्र वरी जाहला छत्र ॥ वेगें पावला यमुनातीर ॥ तों महापूर भरलासे ॥९१॥
मागें पुढें वसुदेव पाहे ॥ म्हणे येथें करावें काय ॥ उदकामाजी लवलाहें ॥ बाळ घेवोन संचरला ॥९२॥

जों जों उचली कृष्णातें ॥ तों तों जीवन चढे वरुतें ॥ स्पर्शावया जगज्जीवनातें ॥ यमुनेतें आल्हाद ॥९३॥
वरी उचलितां माधवा ॥ आकंठ उदक जाहलें वसुदेवा ॥ वसुदेव म्हणे कमळाधवा ॥ वैकुंठपति धांवें कां ॥९४॥
तंव श्रीकृष्णें दक्षिणचरण ॥ तात्काळ बाहेर काढून ॥ स्पर्शिलें यमुनाजीवन ॥ जाहली पावन तेणें ते ॥९५॥
परमसुखें यमुना सवेग ॥ तात्काळ जाहली दोन भाग ॥ जैसा स्त्रिया करिती भांग ॥ क्षणमात्र नलगतां ॥९६॥
वसुदेव उतरुन यमुना ॥ तात्काळ आला नंदभवना ॥ तंव यशोदेसी जाहली कन्या ॥ परी ते कांहीं नेणेचि ॥९७॥
ते योगमाया हरीची पूर्ण ॥ तिनें निद्रिस्त केले सकळ जन ॥ यशोदेशी न कळे वर्तमान ॥ कन्यारत्‍न पुढें तें ॥९८॥
कपाटें मोकळीं सर्वही ॥ वसुदेव प्रवेशला अंतर्गृहीं ॥ कृष्णा ठेवूनि लवलाही ॥ कन्या वेगें उचलिली ॥९९॥
पुत्र ठेवूनि कन्या नेली ॥ कोणासी न कळे गोकुळीं ॥ वसुदेव तेच वेळीं ॥ बंदिशाळे पातला ॥२००॥
वसुदेव परम ठकला ॥ कृष्ण हातींचा दूर टाकिला ॥ माया आणितां श्रृंखला ॥ पायीं दृढ तैसीच ॥१॥
कपाटें तैसींच सकळिक ॥ द्वारीं जागती सेवक ॥ मायेसी घेतां अटक ॥ सर्व जाहली पूढती ॥२॥
हिरा ठेवूनि आणिली गार ॥ सूर्य देऊनि घेतला अंधकार ॥ पाच देऊनि निर्धार ॥ कांच घरा आणिली ॥३॥
परीस देऊनि घेतला खडा ॥ पंडित देऊनि आणिला वेडा ॥ चिंतामणि देऊनि रोकडा ॥ पलांडू घेतला वळेंचि ॥४॥
अमृत देऊनि घेतली कांजी ॥ कल्पवृक्ष देऊनि घेतली भाजी ॥ कामधेनु देऊनि सहजी ॥ अजा घेतली पालटें ॥५॥
निजसुख देऊनि घेतलें दुःख ॥ कस्तूरी देऊनि घेतली राख ॥ सोनें देऊनि सुरेख ॥ शेण जैसें घेतलें ॥६॥
हंस देऊनि घेतला काग ॥ विप्र देऊनि घेतला मांग ॥ मुक्त देऊनि सुरंग ॥ गुंज जैसी घेतली ॥७॥
देवोनियां रायकेळें ॥ घेतलीं अर्कीचीं फळें ॥ ज्ञान देऊनि घेतलें ॥ अज्ञानत्व जैसें पैं ॥८॥
तैसें वसुदेवें केलें ॥ कृष्ण ठेवूनि मायेसी आणिलें ॥ तंव ते कन्या कोल्हाळें ॥ रडतां कळलें रक्षकां ॥९॥
चहूंकडून सेवक धांवत ॥ राया देवकी जाहली प्रसूत ॥ येरु उठिला त्वरित ॥ पिशाचवत धांवतसे ॥२१०॥
बिडालक धांवे मूषकावरी ॥ तैसा आला बंदिशाळेभीतरी ॥ कोठें गे आठवा अरी ॥ म्हणोनियां धीट बोलत ॥११॥
तों देवकी म्हणे बंधु ॥ करुं नको येवढा वधु ॥ देवकी रडे करी खेदु ॥ काकुळती येतसे ॥१२॥
देवकी वोसंगा घेऊनि बैसली ॥ कंस ओढीत तये वेळीं ॥ पुत्र कीं कन्या नाहीं ओळखिली ॥ रात्रिभागीं तेधवां ॥१३॥
रागें भोवंडी दुराचारी ॥ आपटावी जंव शिळेवरी ॥ तंव ते महाशक्ति झडकरी ॥ गेली अंबरी निसटूनियां ॥१४॥
सहस्त्र कडकडती चपला ॥ तैसा प्रलय तेव्हां वर्तला ॥ कंस भयभीत जाहला ॥ म्हणे वैरी गेला हातींचा ॥१५॥
कंस जंव वरतें पाहे ॥ तंव ते महाशक्ति तळपत आहे ॥ तेज अंबरीं न समाये ॥ बोले काय कंसासी ॥१६॥
अरे मूढा दुराचारा ॥ महामलिना खळा निष्ठुरा ॥ तुझा वैरी पामरा ॥ पृथ्वीवरी वाढतसे ॥१७॥
ऐकतांच ऐसें वचन ॥ धगधगलें कंसाचें मन ॥ शक्ति गेली अदृश्य होऊन ॥ कंस आला मंदिरासी ॥१८॥
श्रोतीं व्हावें सादर ॥ पुढें कथा मनोहर ॥ गोकुळा गेला जगदुध्दार ॥ परिसा चरित्र तयाचें ॥१९॥
श्रीकृष्णकथा मुक्तमाळा ॥ सभाग्य श्रोते हो घाला गळां ॥ ब्रह्मानंद श्रीकृष्ण पुतळा ॥ धन्य गोकुळा करील तो ॥२२०॥
तुमच्या हृदयगोकुळीं ॥ शांतियशोदेजवळी ॥ शेजे पहुडला वनमाळी ॥ पुराणपुरुष तो पहा ॥२१॥
ब्रह्मानंद म्हणे श्रीधर ॥ धन्य तें गोकुळ पवित्र ॥ जेथें अवतरला यादवेंद्र ॥ त्रिभुवनसुंदर जगदात्मा ॥२२॥
या अध्यायाचें निरुपण ॥ कंस येऊनि आपण ॥ माया आपटावी जों धरुन ॥ तंव ते हातींची निसटली ॥२३॥
इति श्रीहरिविजयग्रंठ ॥ संमत हरिवंशभागवत ॥ विचक्षण परिसोत संत ॥ तृतीयध्याय गोड हा ॥२२४॥

श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

Wednesday, May 30, 2012

हरिविजय - अध्याय २

अध्याय २
श्रीगणेशाय नमः ॥  श्रीकुलदेवतायै नमः ॥श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥

जय जय यदुकुळकमळ दिनकरा ॥ दुरितकाननवैश्वानरा ॥ दितिसुतमर्दन्समरधीरा ॥ इंदिरावरा गोविंदा ॥१॥
द्विसहस्त्रवक्‍त्र द्विसहस्त्रनयन ॥ तो अनंत बोलका विचक्षण ॥ रसना जाहल्या चिरोन ॥ दोन सहस्त्र तयाच्या ॥२॥
मग लाजोनि चक्षुःश्रवा ॥ शय्या तुझी जाहला रमाधवा ॥ निगम बोलका बरवा ॥ नेति म्हणोनि तटस्थ ॥३॥
व्यासवाल्मीकांच्या शिणल्या गती ॥ तटस्थ राहिला बृहस्पती ॥ पंचाननाची कुंठित मती ॥ गुण तुझे वर्णावया ॥४॥
तुझे गुणलक्षण चिदाकाश ॥ तेथें व्यासादिक उडती राजहंस ॥ भेदीत गेले आसमास ॥ ज्यांच्या मतीस सीमा नाहीं ॥५॥
त्यांच्या पाठीमागें शलभ ॥ भेदीत गेले जी नभ ॥ त्यांची गति न ठाके स्वयंभ ॥ परी आत्मशक्ती उडावें ॥६॥
न कळोनि निराळाचा अंत ॥ शक्तीऐसें द्विज क्रमीत ॥ तैसा हरिप्रताप अद्‌भुत ॥ परी यथामति वर्णावा ॥७॥
नृपें अर्गजाचें गृह केलें ॥ दुर्बळें मृत्तिकेचें रचिलें ॥ परी साउलीचें सुख न्यून आगळें ॥ नसेचि जैसें सर्वथा ॥८॥
म्हणोनि श्रीहरीचे गुण ॥ वर्णावे सांडूनि अभिमान ॥ आतां ऐसें पूर्वानुसंधान ॥ पूर्वाध्यायीं काय जाहलें ॥९॥
पृथ्वी प्रजा ऋषिजन ॥ कमलोद्भवासी आले शरण ॥ आक्रोशें करिती रुदन ॥ पीडिलें जाण दैत्यांनीं ॥१०॥
इंद्रादि देव प्रजा समस्ता ॥ सवें घेऊनि चालिला विधाता ॥ जेथें असे आपुलां जनिता ॥ क्षीराब्धिशायी सर्वेश ॥११॥
क्षीराब्धीचा महिमा देखतां दृष्‍टीं ॥ वर्णितां न सरे वर्षें कोटी ॥ तेथें सर्वांसमवेत परमेष्ठी ॥ पैलतीरीं उभा ठाके ॥१२॥
त्या क्षीराब्धीचें मध्यपीठ ॥ तेथें प्रभाकर विशाळ बेट ॥ लक्षानुलक्ष गांवें सुभट ॥ लांब रुंद शोभतसे ॥१३॥
तेथें निर्विकल्पवृक्ष लागले ॥ चिदाकाश भेदूनि गेले ॥ त्या छायेचें सुख आगळें ॥ शिवविरिंचींसी दुर्लभ ॥१४॥
दिव्य नवरत्‍नीं विराजित ॥ मध्यें मंडप शोभिवंत ॥ लक्ष योजनें लखलखित ॥ ओतप्रोत तितुकाचि ॥१५॥
सूर्यप्रभेसी आणिती उणें ॥ ऐसे जेथें प्रभामय पाषाण ॥ गरुडपाचूंच्या ज्योती पूर्ण ॥ प्रभामय विराजती ॥१६॥
पद्मरागाचे तोळंबे स्वयंभ ॥ वरी दिव्य हिर्‍यांचे खांब ॥ निळ्यांची उथाळीं सुप्रभ ॥ उपमा नाहीं तयांतें ॥१७॥
जें कां जांबूनद सुवर्ण ॥ त्याचीं तुळवटें लंबायमान ॥ आरक्त माणिकांचे दांडे जाण ॥ सरळ सुवाड पसरिले ॥१८॥
शुद्ध पाचूंच्या किलच्या वरी ॥ अभेदें जोडिल्या कळाकुसरी ॥ दिव्य मुक्तांचा पंक वरी ॥ अक्षय दृढ जडिलासे ॥१९॥
जैसे पंक्तीं बैसले गभस्ती ॥ तैशा चर्या समान झळकती ॥ नाना चक्रें ओप देती ॥ दिव्य रत्‍नें अनेक ॥२०॥
मध्यें शिखराचा जो कळस ॥ भेदूनि गेला महदाकाश ॥ सहस्त्र सूर्यांचा प्रकाश ॥ एकसरां तळपतसे ॥२१॥
निळ्याच्या मदलसा जडित ॥ वरी मुक्तांचे राजहंस खेळत ॥ रत्‍नपुतळ्या गात नाचत ॥ असंख्यात प्रभा त्यांची ॥२२॥
दाही अवतार मूर्तिमंत ॥ स्तंभांप्रती शोभले जडित ॥ त्रैलोक्यरचना समस्त ॥ प्रतिमा तेथें साजिर्‍या ॥२३॥
मंडपाचे अष्टकोनी ध्वज ॥ सहस्त्रविजांऐसे तेजःपुंज ॥ तळपतां तेणें सतेज ॥ ब्रह्मांड समग्र जाहलें ॥२४॥
अनंत ब्रह्मांडांच्या स्थितिगती ॥ रेखिल्या अनंत मूर्ती अनंत शक्ती॥ त्या मंडपाची पाहतां स्थिती ॥ चंद्र सूर्य खद्योतवत ॥२५॥
ऐसा मंडप लक्ष योजन ॥ तितुकाच उंच रुंद चतुष्कोण ॥ चिंतामणींचीं सोपानें पूर्ण ॥ चहूंकडे सतेज ॥२६॥
तयावरी जो तल्पक ॥ शुभ्र सतेज भोगिनायक ॥ जैसा रजताचल निष्कलंक ॥ असंभाव्य पसरला ॥२७॥
असंभाव्य ज्याचें शरीर ॥ मंचक योजनें साठी सहस्त्र ॥ चतुष्कोण मावे परिकर ॥ निजांगींच शेषाच्या ॥२८॥
ठायीं ठायी उशा बहुवस ॥ निजांगाच्या करी शेष ॥ सहस्त्रफणांचीं छत्रें विशेष ॥ प्रभा न माये निराळीं ॥२९॥
ऐसा शेष जाहला पलंग ॥ वरी पहुडला श्रीरंग ॥ लक्षार्ध योजनें अव्यंग ॥ शेषशायी परमात्मा ॥३०॥
इंद्रनीळाचा मेरु पहुडला ॥ कीं परब्रह्मरस ओतिला ॥ भक्तांलागीं आकारला ॥ नीलजीभूतवर्ण पैं ॥३१॥
योजनें पन्नास सहस्त्र ॥ सगुण लीलाविग्रही श्रीधर ॥ श्रोते म्हणती यास आधार ॥ कोठें आहे सांग पां ॥३२॥
तरी ब्रह्मांडपुराणींची कथा अवधारा ॥ नारद गेला होता क्षीरसागरा ॥ तो पाहून आला सर्वेश्वरा ॥भृगूचिया आश्रमाप्रती ॥३३॥
तेणें वर्णिलें हें ध्यान सुरेख ॥ ऐका नारदमुखींचा श्लोक ॥ पहुडला ब्रह्मांडनायक ॥ क्षीरसागरीं कैसा तो ॥३४॥
श्लोक ॥ लक्षार्धयोजनोपेतं विग्रहं कामरुपिणम् ॥ सर्वाश्चर्यमयं देवं शयानं शेषतल्पके ॥१॥टीका ॥ यालागीं लक्षार्ध योजनें प्रमाण ॥ पहुडला नीलजीमूतवर्ण ॥ कोटी मदन ओंवाळून ॥ नखांवरुन सांडिजे ॥३५॥
घनश्याम कमलनयन जें मायातीत शुद्ध चैतन्य ॥ जें पूर्णब्रह्म सनातन ॥ क्षीरसागरीं पहुडलें ॥३६॥
श्रीवत्सांकितभूषण ॥ हृदयीं कौस्तुभप्रभा घन ॥ मुक्तामाळा विराजमान ॥ वैजयंती आपाद ॥३७॥
कल्पांतींचे सहस्त्र आदित्य ॥ तैसी दिव्य मूर्ति प्रकाशवंत ॥ परम जाज्वल्य कुंडलें तळपत ॥ मकराकार उभयकर्णीं ॥३८॥
कल्पांतींच्या सहस्त्र विजा पूर्ण ॥ तैसा मुकुटप्रकाश गहन ॥ सरळ नासिक विशाळ नयन ॥ धनुष्याकृति भृकुटिया ॥३९॥
अनंत ब्रह्मांडींचें सौंदर्य एकवटलें ॥ संतापनाशक हें रुप ओतिलें ॥ कीं कैवल्यसुख गोळा जाहलें ॥ क्षीरसागरीं प्रत्यक्ष ॥४०॥
कौस्तुभतेजें क्षीरसागर ॥ लखलखिला देदीप्यमान सुंदर ॥ नाभि वर्तुळ गंभीर ॥ बालदिवाकरप्रकाश जैसा ॥४१॥
शंख चक्र गदा पद्म ॥ परम उदार घनश्याम ॥ जो अनंत पुराण पुरुषोत्तम ॥ पूर्णकाम सर्वेश ॥४२॥
चहूं भुजीं कीर्तिमुखें ॥ मणगटीं हस्तकटकें सुरेखें ॥ दशांगुलीं मुद्रिकांचें तेज फांके ॥ असंभाव्य न वर्णवे ॥४३॥
नाभिस्थानीं दिव्य कमळ ॥ त्यांत चतुर्मुख खेळे बाल ॥ सहस्त्र वरुषें कमलनाळ ॥ शोधितां अंत न सांपडे ॥४४॥
सहस्त्र विजांचा एक भार ॥ तैसा नेसला पीतांबर ॥ त्या सुवासें अंबर ॥ परिपूर्ण धालें हो ॥४५॥
हरितनूचा सुवास पूर्ण ॥ जाय ब्रह्मांड भेदून ॥ कटीं मेखला विराजमान ॥ दिव्य रत्‍नीं झळकतसे ॥४६॥
माजी क्षुद्रघंटांची दाटी ॥ अंगीं दिव्य चंदनाची उटी ॥ श्यामवर्ण जगजेठी ॥ चंदन जैसा वरी शोभे ॥४७॥
सांवळें सूर्यकन्येचें नीर ॥ त्यावरी भागीरथीचें शुभ्र ॥ कीं नीळवर्ण अंबर ॥ त्यावरी चांदणें पौर्णिमेचें ॥४८॥
नभाचे गाभे काढिले ॥ तैसे जानुजघन शोभले ॥ चरणीं तोडर खळाळे ॥ वांकी नेपुरें रुणझुणती ॥४९॥
कोटी चंद्र एकवटले ॥ चरणनखीं सुरवाडले ॥ कीं स्वशरीराचीं करुनि दहा शकलें ॥ दशांगुळीं जडिलीं हो ॥५०॥
दिव्य मुक्तपल्लव रुळत ॥ ऐसा दुजा पीतांबर झळकत ॥ पांघरलासे दीननाथ ॥ शेषशायी परमात्मा ॥५१॥
अंगींच्या प्रकाशशिखा पूर्ण ॥ जाती सप्तावरण भेदून ॥ ज्याच्या श्यामप्रभेनें घन ॥ अद्यापि सांवला दिसतसे ॥५२॥
क्षीरसागरींचा श्याम प्रकाश पडला ॥ तोचि हा नभासी रंग चढला ॥ हेचि सुनीळता डोळां ॥ अद्यापि वरी दिसतसे ॥५३॥
क्षीरसागरीं जगदुद्धार ॥ मंदस्मितवदन सुंदर ॥ दंतपक्तींच्या तेजें थोर ॥ कोटिसूर्य प्रकाशले ॥५४॥
सर्व आनंदाचें सदन ॥ मिळोनि ओतिलें हरीचें वदन ॥ एवढी प्रभा देदीप्यमान ॥ परी तीव्र नव्हे सर्वथा ॥५५॥
तें तेज शांत सोज्ज्वळ॥ तीक्ष्ण नव्हे परम शीतल ॥ परी स्थूळ दृष्‍टीचें बळ ॥ पहावया तेथें चालेना ॥५६॥
तेथें प्रत्यक्ष लक्ष्मीस दर्शन ॥ आदर्शबिंबवत विधीस जाण ॥ माध्यान्हींचा सूर्य पूर्ण ॥ तैसा ऋषीसी दिसतसे ॥५७॥
मानवी भक्तांचिये ध्यानीं ॥ प्रगटे साक्षात येऊनी ॥ यालागीं क्षीरसागरींचें रुप नयनीं ॥ कोणासही न पाहवे ॥५८॥
ज्ञानदृष्‍टीं जे पाहत ॥ त्यांसी जवळी आहे भगवंत ॥ अभक्तांसी न दिसे सत्य ॥ कोटी वर्षें शोधितां ॥५९॥
असो आतां त्या अवसरीं ॥ क्षीरसागराच्या ऐलतीरीं ॥ बद्धांजलि करुनि निर्धारीं ॥ सुरवर उभे ठाकले ॥६०॥
पुढें मुख्य आधीं परमेष्ठी ॥ इंद्रादि देव उभे त्यापाठीं ॥ जयजयकाराच्या बोभाटीं ॥ ऋषी गर्जती ते वेळीं ॥६१॥
ॐ नमो आदिनारायणा ॥ लक्ष्मीनारायणा मनमोहना ॥ महाविष्णु मधुसूदना ॥ कैटभारी केशवा ॥६२॥
जय जय वैकुंठपीठविहारा ॥ शेषशायी विश्वंभरा ॥ पुराणपुरुषा रमावरा ॥ धांवें त्वरें ये वेळीं ॥६३॥
जय जय वेदोद्धारका ॥ कूर्मरुपा सृष्‍टिपाळका ॥ नमो सकळदैत्यांतका ॥ दीनरक्षका दीनबंधो ॥६४॥
जय जय हिरण्यकशिपुमर्दना ॥ नमो त्रिविक्रमा बलिबंधना ॥ ब्राह्मणकुलपालना ॥ नमो श्रीधरा गोविंदा ॥६५॥
नमो पौलस्तिकुलकाननदहना ॥ नमो मीनकेतनारिहृदयजीवना ॥ नमो चतुर्दशलोकपालना ॥ पीतवसना माधवा ॥६६॥
जय जय कमळनयना कमळावरा ॥ कमळशयना कमळवक्‍त्रा ॥ कमळनाभा कमळछत्रा॥ कमळधरा कमलाप्रिया ॥६७॥
जय जय विश्वपाळणा ॥ विश्वव्यापका विश्वकारणा ॥ विश्वमतिचालका विश्वजीवना ॥ विश्वरक्षणा विश्वेशा ॥६८॥
जय जय लक्ष्मीकुचकुंकुमांका ॥ जय सकळदेवविस्तारका ॥ जय सकळदेवपाळका ॥ सकळदेवदीक्षागुरो ॥६९॥
नमो निर्जरललाटपट्टलेखना ॥ नमो सनकसनंदनमनोरंजना ॥ नमो दानवकुलनिकृंतना ॥ भवभंजना भवहृदया ॥७०॥
नमो मायाचक्रचालका ॥ नमो अज्ञानतिमिरांतका ॥ नमो वेदरुपा वेदपाळका ॥ वेदस्थापका वेदवंद्या ॥७१॥
नमो भवगजपंचानना ॥ नमो पापारण्यकुठारतीक्ष्णा ॥ नमो त्रिविधतापदाहशमना ॥ अनंतशयना अनंता ॥७२॥
नमो दशावतारचरित्रचाळका ॥ नमो अनंतवेषधारका ॥ नमो अनंतब्रह्मांडनायका ॥ जयदुध्दारका जगत्पते ॥७३॥
नमो सर्गस्थित्यंतकारका ॥ नमो कैवल्यपददायका ॥ अज अजित सर्वात्मका ॥ करुणालया सुखाब्धे ॥७४॥
नमो जन्ममरणरोगवैद्या ॥ सच्चिदानंदास्वसंवेद्या ॥ मायातीता जगद्वंद्या ॥ भेदाभेदातीत तूं ॥७५॥
नमो षड्‌विकाररहिता ॥ नमो सकलषड्‌गुणालंकृता ॥ नमो अरिषड्‌वर्गच्छेदक प्रतापवंता ॥ शब्दातीता निरंजना ॥७६॥
वृषभाचे नाकीं वेसणी ॥ घालूनि भोवंडी अखंड धरणी ॥ तैसे तुझ्या सत्तेंकरुनी ॥ सकळ देव वर्तती ॥७७॥
तुझें शिरीं धरुनि शासन ॥ वर्ततों तुझी आज्ञा पाळून ॥ ऐसें असतां दैत्यीं विघ्न ॥ पृथ्वीवरी मांडिलें ॥७८॥
कंसचाणूरादि दैत्य माजले ॥ काळयवनें यज्ञ मोडिले ॥ जरासंधें थोर पीडिलें ॥ बंदी घातले धर्मिष्‍ठ नृप ॥७९॥
मारिले गाई ब्राह्मण ॥ विष्णुभक्तां ओढवलें विघ्न ॥ धर्म टाकिले मोडून ॥ पृथ्वी संपूर्ण गांजिली ॥८०॥
ऐशियासी काय विचार ॥ तूं दयार्णव जगदुद्धार ॥ ऐसें बोलोनि विधि सुरवर ॥ तटस्थरुप पाहती पैं ॥८१॥
तों क्षीरासागराहूनी ॥ उठली अंतरिक्षध्वनी ॥ नाभी नाभी म्हणोनी ॥ चिंता मनीं करुं नका ॥८२॥
मी यादवकुळीं अवतार ॥ घेऊन करीन दुष्‍टसंहार ॥ तुम्हीं देव समग्र ॥ यादव होऊनि येइंजे ॥८३॥
आणिक जे उपदेव सकळ ॥ त्यांहीं गोकुळीं व्हावें गोपाळ ॥ ऋषीं वत्स व्हावें सकळ ॥ मी पाळून उद्धरीन ॥८४॥
धर्म समीर सहस्त्रनयन ॥ अश्विनौदेव दोघे जण ॥ यांहीं कुंतीउदरीं अवतरुन ॥ भूमारहरण करावें ॥८५॥
बृहस्पतीनें व्हावें द्रोण ॥ द्यावें पांडवांसी विद्यादान ॥ अग्नीनें व्हावें धृष्टद्युम्न ॥ पांचाळाचे निजयागीं ॥८६॥
कलह माजवावया आधीं ॥ पार्वतीनें व्हावें द्रौपदी ॥ लक्ष्मी रुक्मिणी त्रिशुद्धी ॥ वैदर्भउदरीं अवतार ॥८७॥
बळिभद्र होईल संकर्षण ॥ वसुदेव देवकी दोघेंजण ॥ मी त्यांच्या पोटीं अवतरोन ॥ करीन पावन तयांसी ॥८८॥
जें तीन जन्मपर्यंत ॥ त्यांहीं तप केलें बहुत ॥ तें फळा आलें समस्त ॥ मी होईन सुत तयांचा ॥८९॥
ऐसी अंतरिक्षीं होतां ध्वनी ॥ देवीं जयजयकार करुनी ॥ नमस्कार साष्टांग घातला धरणीं ॥ आनंद मनीं न समाये ॥९०॥
ते शब्द देवांस कैसे वाटले ॥ कीं सुखाचे सागर लोटले ॥ कीं चातकासी ओळले ॥ मेघ जैसे आकाशीं ॥९१॥
जन्मवरी दरिद्रें पीडिला ॥ त्यासी धनाचा कूप सांपडला ॥ कीं मरे तयासी जोडला ॥ सुधासिंधु अकस्मात ॥९२॥
कीं जननी चुकोनि गेली ॥ ते बाळकासी जैसी भेटली ॥ कीं तृषाक्रांतें देखिली ॥ भागीरथी अकस्मात ॥९३॥
कीं जन्मांधासी आले नयन ॥ कीं रोगिया जोडलें दिव्य रसायन ॥ कीं वणव्यांत जळतां पूर्ण ॥ अद्‌भुत धन वर्षला ॥९४॥
कीं वांचवावया लक्ष्मण ॥ हनुमंतें आणिला गिरि द्रोण ॥ वानर सुखावले देखोन ॥ तैसेच देव हर्षले ॥९५॥
कीं अयोध्येसी आला रघुनाथ ॥ देखोनि आनंदला भरत ॥ तैसेच देव समस्त ॥ ब्रह्मानंदें कोंदले ॥९६॥
आनंद जाहला सकळां ॥ देव पावले स्वस्थळा ॥ चिंतेचा दुष्काळ गेला ॥ सुखसोहळा वाटे ॥९७॥
इकडे यदुवंशीं शूरसेन ॥ त्यासी जाहलें पुत्रनिधान ॥ आनकदुंदुभि नाम पूर्ण ॥ वासुदेव तोचि जाण पां ॥९८॥
वसुदेवाच्या जन्मकाळीं ॥ देवीं दुंदुभी वाजविल्या निराळीं ॥ आनकदुंदुभि नाम ते वेळीं ॥ वासुदेवासी ठेविलें ॥९९॥
दुंदुभी वाजवावयाचें कारण ॥ याचे पोटीं वासुदेव आपण ॥ अवतरेल हें जाणून ॥ देवीं दुंदुभी वाजविल्या ॥१००॥
याचें उदरीं अवतरेल वासुदेव ॥ म्हणोन नांव ठेवविलें वसुदेव ॥ त्याचा आरंभिला विवाह ॥ मथुरेमाजी गजरेंसीं ॥१॥
उग्रसेन मथुरानाथ ॥ कंस दुरात्मा त्याचा सुत ॥ परी तें पितृरेत नव्हे निश्चित ॥ अन्यवीर्य मिसळलें ॥२॥
उग्रसेनाची स्त्री पतिव्रता । परमसात्विक शुचिस्मिता ॥ एक दैत्य आला अवचिता ॥ तेणें उचलोन ते नेली ॥३॥
अरण्यांत नेऊन बळें ॥ सती भोगिली चांडाळें ॥ मग दैत्य म्हणे ते वेळे ॥ पुत्र तुज होईल ॥४॥
मग सती काय बोले बोल ॥ तुझा पुत्र जो का होईल ॥ त्यासी श्रीकृष्ण वधील ॥ आपटोन क्षणमात्रें ॥५॥
सती देखोनि क्रोधायमान ॥ दैत्य पळाला टाकून ॥ त्यावरी कंस दुर्जन ॥ पुत्र जाहला तोचि पैं ॥६॥
सदा पितयासी द्वेषी ॥ देखों न शके मातेसी ॥ यादवांसी उपहासी ॥ संगतीसी राहूं नेदी ॥७॥
बापास मागें लोटून ॥ स्वइच्छें राज्य करी आपण ॥ विष्णुभक्त गाई ब्राह्मण ॥ त्यासी आणूनि जिवें मारी ॥८॥
दैत्य जे का दुष्‍ट दुर्जन ॥ तेच केले आपुले प्रधान ॥ गांवांतून गेले सज्जन ॥ अधर्म पूर्ण वर्तला ॥९॥
नरकींचे राहणार किडे ॥ त्यांसी दुर्गंधीच बहु आवडे ॥ विष्ठा देखोनि सुरवाडे ॥ काक जैसा दुरात्मा ॥११०॥
जो मद्यपी दुर्जन त्यासी नावडे तत्त्‍वज्ञान ॥ दिवाभीतालागून ॥ नावडे दिन सर्वथा ॥११॥
शशी नवडे तस्करा ॥ सत्संग नावडे पापी नरा ॥ हिंसकाचिया अंतरा ॥ दया कैंची उद्भवे ॥१२॥
कृपणासी नावडे धर्म ॥ स्त्रीलुब्धा नावडे सत्कर्म ॥ निंदकासी नावडे प्रेम ॥ भजनमार्ग सर्वथा ॥१३॥
कीर्तन नावडे भूतप्रेतां ॥ दुग्ध नावडे नवज्वरिता ॥ टवाळासी तत्त्वतां ॥ जपानुष्ठान नावडे ॥१४॥
तैसें कंसें मथुरेस केलें॥ धर्म सत्कर्म बुडालें ॥ दैत्य अवघे मिळाले ॥ कंसाभोंवते सर्वदा ॥१५॥
मुष्टिक आणि चाणूर ॥ केशी प्रलंब अघासुर ॥ जळासुर दुराचार ॥ असुरासुर पापात्मा ॥१६॥
कागासुर आणिक खर ॥ शल तोशल धेनुकासर ॥ परम निर्दय अरिष्टासुर ॥ व्योमासुर महाक्रोधी ॥१७॥
परम सुंदर लोकमान्या ॥ उग्रसेनासी जाहली कन्या ॥ देवकी नामें परम धन्या ॥ सर्वलक्षणीं युक्त जे ॥१८॥
जैसा शुक्लपक्षींचा चंद्र ॥ तैसा ते वाढे सुकुमार ॥ देखोनियां उपवर ॥ वसुदेव वर नेमिला ॥१९॥
निजभारेंसी शूरसेन ॥ मथुरेसी आला करावया लग्न ॥ सामोरे जाऊन कंस उग्रसेन ॥ सीमांतपूजा त्या केली ॥१२०॥
परम सुंदर वसुदेव वर ॥ पुढें भेरी धडकती चंद्रानना थोर ॥ मुखद्वयाचे गंभीर ॥ मृदंग वाद्यें गर्जती ॥२१॥
मुखवायूचें लागतां बळ ॥ सनया गर्जती रसाळ ॥ झल्लरी टाळ घोळ ॥ पणव ढोल गर्जती ॥२२॥
तंत वितंत घन सुस्वर ॥ चतुर्विध वाद्यांचा गजर ॥ लोक पहावया येती समग्र ॥ वसुदेव वर कैसा हें ॥२३॥
जानवशासी घर ॥ दिधलें विशाळ सुंदर ॥ देवकप्रतिष्‍ठा करुनि सत्वर ॥ लग्नघटिका घातली ॥२४॥
मिरवत आणिला वसुदेव ॥ अंबरीं हर्षले सकळ देव ॥ याच्या पोटीं अवतरेल वसुदेव ॥ सत्य शब्द हा एक ॥२५॥
ज्याच्या पोटीं येईल जगज्जीवन ॥ त्याची पूजा करी उग्रसेन ॥ यथाविधि पाणिग्रहण ॥ केलें बहुत आनंदें ॥२६॥
दोन सहस्त्र दासी आंदण ॥ दिधले लक्ष एक वारण ॥ पवनवेगी तरंग सहित आभरण ॥ दोन लक्ष दीधले ॥२७॥
मिरवावया दोघें वधूवरेम ॥ वरात काढिली कंसासुरें ॥ रथावरी बैसविलीं ओहरें ॥ आपण धुरे सारथी जाहला ॥२८॥
पुढें होती वाद्यांचे गजर ॥ दारुनळियांचे भडिमार ॥ चंद्रज्योती चंद्राकार ॥ तेजें अंबर प्रकाशे ॥२९॥
आपण कंस जाहला सारथी ॥ पुढें वेत्रपाणी लोकांस सारिती ॥ रथ चालवावया वाव करिती ॥ कंसाच्या चित्तीं सुख वाटे ॥१३०॥
तों अकस्मात तये वेळीं ॥ देववाणी गर्जे निराळीं ॥ लोक तटस्थ सकळी ॥ वाद्यें राहिलीं वाजतां ॥३१॥
म्हणे रे कंसा निर्दैवा ॥ खळा धरितोस बहुत हावा ॥ परी देवकीचा पुत्र आठवा ॥ तुज वधील निर्धारें ॥३२॥
ऐसें ऐकतां श्रवणीं ॥ कंस दचकला अंतःकरणीं ॥ म्हणे आतां कासयाची भगिनी ॥ टाकूं वधोनि येधवां ॥३३॥
वेणीसी देवकी धरिली ॥ आसडोनि रथाखालीं पाडिली ॥ जैसी रंभा ताडिली ॥ शुंडादंडें वारणें ॥३४॥
कीं कमळिणी सुकुमार ॥ धक्का लागतां होय चुर ॥ कीं शिरसफूल अरुवार ॥ क्षणमात्रे कुंचुंबे ॥३५॥
कंसें शस्त्र उपसिलें ॥ देवकीच्या मानेवरी ठेविलें ॥ करुणास्वरें ते वेळे ॥ देवकी बोले बंधूसी ॥३६॥

अरे तूं कंसा माझा बंधु प्रसिद्ध ॥ काय देखिलासी सख्या अपराध ॥ कां रे करितोसी माझा वध ॥ बंधुराया सुजाणा ॥३७॥
बा रे तूं माझ्या कैवारिया ॥ कां कोपलासी कंसराया ॥ म्हणोनि देवकी लागे पायां ॥ करुणास्वरें रुदन करी ॥३८॥
हिंसकें धरिली जेवीं गाय ॥ कंठीं सुरी घाली निर्दय ॥ कीं व्याघ्रें महापापियें ॥ हरिणी ग्रीवें धरियेली ॥३९॥
करुणास्वरेम आक्रंदे सुंदर ॥ परी न सोडीच दुराचार ॥ विदेहकन्या नेतां दशकंधर ॥ न सोडी जैसा दुरात्मा ॥१४०॥
देखोन देवकीची करुणा ॥ अश्रू आले जनांच्या नयना ॥ परम खेद उग्रसेना ॥ दुःखार्णवीं बुडतसे ॥४१॥
म्हणे रे कंसा चांडाळा ॥ कां वधिसी माझी वेल्हाळा ॥ माझ्या गळ्याची चंपकमाळा ॥ रुळत पडली भूतळीं ॥४२॥
माज्या हृदयींचें दिव्य रत्‍न ॥ लज्जापंकीं गेलें बुडोन ॥ माझें सुढाळ मुक्त जान ॥ दावाग्नींत पडियेलें ॥४३॥
माझी सुकुमार सुमनकळी ॥ पडली जनांच्या पायांतळीं ॥ कंबरीवरी पडली धुळी ॥ म्लान मुख दिसतसे ॥४४॥
तुटली शिरींची मुक्ताजाळी ॥ विजवरा पडिला भूमंडळीं ॥ वदनचंद्रा लागली धुळी ॥ मुक्तें विखुरलीं कंठींचीं ॥४५॥
जाहला एकचि हाहाकार ॥ रडती समस्त नारीनर रथाखालीं शुरसेनकुमर ॥ उडी टाकोनि पातला ॥४६॥
येऊन धरी कंसाचा हात ॥ म्हणे स्त्री वधितां पाप बहुत ॥ या पापासी नाहीं गणित ॥ धर्मशास्त्रीं बोलिलें ॥४७॥
एक रथभरी वधितां किडे ॥ एक मेषवधाचें पाप घडे ॥ शत मेष मारितां पडे ॥ एक वृषभहत्या पैं ॥४८॥
शत वृषभ वधिले ॥ एक गोहत्येचें पाप घडलें ॥ शंभर गोवधांहून आगळें ॥ ब्रह्महत्येचें पाप पैं ॥४९॥
शत ब्रह्महत्यांचें पाप जाण ॥ एक स्त्रीहत्येसमान ॥ कंसराया तूं परम सुजाण ॥ स्त्रीदान मज देईं ॥१५०॥
कंस म्हणे इचा पुत्र देख ॥ माझिया जीवाचा घातक ॥ मी ईस वधीन आवश्यक ॥ म्हणोनि शस्त्र उचलिलें ॥५१॥
वसुदेव घेईं भाक ॥ जो मज सुत होईल देख ॥ तो तुज देईन निःशंक ॥ त्रिवाचा हें सत्य पैं ॥५२॥
भाक देऊनि ते वेळीं ॥ सोडविली ते वेल्हाळी ॥ अश्रु वाहती नेत्रकमळीं ॥ अधोवदनें स्फुंदत ॥५३॥
सोहळ्यामाजी अनर्थ । जैसें दुग्धामाजी सैंधव पडत ॥ कीं दिव्य आन्नामाजी कालवत ॥ विष महादुर्धर ॥५४॥
कीं सुमनशेजे अरुवारी ॥ पहुडला दिव्य मंदिरीं ॥ तों तें घर आंगावरी ॥ अकस्मात पडियेलें ॥५५॥
कीं द्रव्याचा घट लाधला ॥ म्हणोनि कर आंत घातला ॥ तों तेथें भुजंग प्रकटला ॥ तेणें डंखिलें क्षणमात्रें ॥५६॥
साधावया जातां निधान ॥ तों विवशी पडे गळां येऊन ॥ कीं उपजतां वैराग्यतत्त्वज्ञान ॥ प्रारब्ध आडवें धांवत ॥५७॥
तैसें कंसें केलें ते वेळा ॥ कैंचे साडे कैंचा सोहळा ॥ भगिनी शालक उभयतांला ॥ बंदिशाळे रक्षिलें ॥५८॥
श्रृंखला घालून उभयतांप्रती ॥ रक्षण दृढ ठेवी भोंवतीं ॥ जैसे चंदनासी रक्षिती ॥ महाभुजंग सर्वदा ॥५९॥
ऐसी कंसें केली करणी ॥ तंव देवकी जाहली गर्भिणी ॥ परम चिंता वाटे मनीं ॥ तंव ते प्रसूत जाहली वो ॥१६०॥
जाहला प्रथमचि पुत्र ॥ परम सुंदर सुनेत्र ॥ बाळ घेऊनि पवित्र ॥ मुख पाहिलें वसुदेवें ॥६१॥
मग वसुदेव बोले वचन ॥ बाळा तुजला आलें रे मरण ॥ देवकीचे आसुवें नयन ॥ भरले तेव्हां सद्गद ॥६२॥
वसुदेव म्हणे प्रणाम ॥ कंसासी दिधलें भाकदान ॥ देवकी म्हणे नेऊन ॥ अवश्य द्यावें स्वामिया ॥६३॥
वसुदेवें उचलिलें बाल ॥ भडभडां वाहे अश्रुजळ ॥ तों कंसासी कळलें तात्काळ ॥ आणवी बाळ क्षणमात्रें ॥६४॥
तों देवकी म्हणे वसुदेवा ॥ तुम्हीं पुत्र तेथें न्यावा ॥ जरी कृपा आली बंधुवा ॥ तरी एवढें सोडील ॥६५॥
बाळ घेवोनि वसुदेव चालिला ॥ परम मुखचंद्र उतरला ॥ पायीं तैसीच श्रृंखला ॥ वाजे खळखळां चालतां ॥६६॥
श्मश्रुकेश बहु वाढले ॥ नखांचे गुंडाळे वळले ॥ आंग परम मळलें ॥ शेणें घोळिलें मुक्त जैसें ॥६७॥
कीं केतूनें व्यापिला दिनकर ॥ कीं राहूनें आच्छादिला क्षीराब्धिपुत्र ॥ तैसा वसुदेव पवित्र ॥ जातां दिसे म्लान पैं ॥६८॥
मागें पुढें रक्षिती सेवक ॥ कंसापाशीं आणिलें बाळक ॥ रायापुढें ठेविलें देख ॥ शूरसेनसुतें ते वेळीं ॥६९॥
बाळक सुंदर देखिला ॥ कंसासी स्नेह दाटला ॥ मग प्रधानासी ते वेळां ॥ काय बोलिला कंस तो ॥१७०॥
म्हणे जो आठवा होईल सुत ॥ तोचि आमुचा शत्रु निश्चित ॥ हो कासया वधावे सात ॥ याचे यास असोत हे ॥७१॥
कंस म्हणे वसुदेवा ॥ हा आपुला तुम्हीं बाळ न्यावा ॥ मुख्य आम्हांसी आठवा द्यावा ॥ तो मीच वधीन स्वहस्तें ॥७२॥
ऐसें ऐकतांचि उत्तर ॥ परतला शूरसेनकुमार ॥ मनीं म्हणे नवल थोर ॥ खळासी उपजला सद्भाव ॥७३॥
म्हणे गोड कैसें जाहलें हालाहल ॥ जातवेद कैसा जाहला शीतळ ॥ पन्नगाच्या मुखींचें गरळ ॥ सुधारसतुल्य जाहलें ॥७४॥
पाषाणाचें हृदय द्रवलें ॥ वृश्चिकें साधुपण धरिलें ॥ कंटकशेजे निवालें ॥ आंग आजी वाटतें ॥७५॥
मद्यपियासी उपजलें ज्ञान ॥ हिंसक जाहला दयाघन ॥ महाकृपणें सकल धन ॥ दान आजि दीधलें ॥७६॥
व्याघ्रें धरिली आजि शांती ॥ खळासि उपजली हरिभक्ती ॥वज्रधार निश्चिती ॥ नम्र आजि वाटतसे ॥७७॥
वसुदेव वेगें ते वेळे ॥ प्रवेशला हो बंदिशाळे ॥ देवकीपाशीं बाळ दिधलें ॥ सांगितलें वर्तमान ॥७८॥
देवकीसी संतोष वाटला ॥ जैसा प्राण जातां परतला ॥ तंव तो नारद ते वेळां ॥ येतां जाहला कंससभे ॥७९॥
नारदातें कंसें पूजिलें ॥ सकळ वर्तमान निवेदिलें ॥ नारद म्हणे भुललें ॥ चित्त कां तुझें कंसराया ॥१८०॥
तुवां सोडिलें वसुदेवसुता ॥ परि तुझा शत्रु कोणता ॥ आठांपासून उफराटें गणितां ॥ तरी पहिलाच शत्रु तुझा ॥८१॥
दुसरा कीं तिसरा चौथा ॥ शत्रु तुझा रे तत्त्वतां ॥ आठांमध्यें तुझ्या घाता ॥ प्रवर्तेल कोण तो न कळे ॥८२॥
ऐकोन ब्रह्मसुताचें वचन ॥ कंसें तुकाविली मान ॥ सरडा कंटकवृक्षीं बैसोन ॥ ग्रीवा जैसी हालवी ॥८३॥
नारद हितशत्रु होय ॥ हित सांगोन करवी क्षय ॥ बाळहिंसा करितां पाहें ॥ अल्पायुषी होय तो ॥८४॥
कुलक्षय होऊनि राज्य बुडे ॥ ऐसे नारद सांगे निवाडे ॥ कंसासी ते बुद्धि आवडे ॥ म्हणे बरवें कथिलें जी ॥८५॥
कंस क्रोधें धांविन्नला ॥ बंदिशाळेमाजी आला ॥ जैसा तस्कर संचरला ॥ धनाढ्याचें निजगृहीं ॥८६॥
कीं देवघरीं रिघे श्वान ॥ कीं मूषकबिळीं व्याळ दारुण ॥ कीं होमशाळेमाजी मळिण ॥ अत्यंज जैसा पातला ॥८७॥
कीं हरिणीचें पाडस सुकुमार ॥ न्यावया आला महाव्याघ्र ॥ कीं गोवत्स देखोनि सुंदर ॥ वृक जैसा धांविन्नला ॥८८॥
ऐसा बंदिशाळेमाजी आला ॥ देवकीसी काळच भासला ॥ बाळ हृदयीं दृढ धरिला ॥ आच्छादिला निजपल्लवें ॥८९॥
कोठें गे कोठें बाळ ॥ म्हणोनि बोले चांडाळ ॥ देवकी म्हणे तूं स्नेहाळ ॥ बंधुराया सुजाणा ॥१९०॥
ओंटी पसरी म्लानवदन ॥ येवढें दे मज पुत्रदान ॥ म्हणोनि धरिले चरण ॥ निर्दयाचे तेधवां ॥९१॥
कंसें बळें हात घालूनी ॥ बाळ धरिला दृढ चरणीं ॥ येरी आरडत पडे धरणीं ॥ केळी जैसी चंडवातें ॥९२॥
द्वारीं होती चंड शिळ ॥ तिजवरी निर्दयें आपटिलें बाळ ॥ तें छिन्नभिन्न जाहलें तात्काळ ॥ पक्व फळासारिखें ॥९३॥


दुर्जनाची कैंची दया ॥ वाटपाड्यासी कैंची माया ॥ उपरति पैशून्यवादिया कदाकाळीं नव्हेचि ॥९४॥
ऐसें मारुन तें बाळ ॥ निघोन गेला कंस खळ ॥ मागुती गरोदर झाली ते वेल्हाळ ॥ दुसर्‍यानें प्रसूत जाहली ॥९५॥
स्वयें येऊन आपण ॥ तेंही मारिलें आपटून ॥ तिसरें जाहलें सगुण ॥ तेंही मारिलें क्षणार्धें ॥९६॥
चौथें पांचवें सहावें नेटें ॥ तेंही लाविलें मृत्युवाटे ॥ वसुदेवाचें दुःखें हृदय फुटे ॥ म्हणे कर्मं मोठें दुर्धर ॥९७॥
कंसें सहा गर्भ वधिले ॥ पाप असंभाव्य सांचलें ॥ गाई विप्र भक्त गांजिले ॥ थोर मांडिलें पाप पैं ॥९८॥
आतां श्रीहरि क्षीरसागरीं ॥ यावरी कैसा विचार करी ॥ तें कथाकौतुक चतुरीं ॥ सेविजे सादर होवोनियां ॥९९॥
श्रीकृष्णकथाकमळ सुकुमार ॥ सज्जन श्रोते त्यावरी भ्रमर ॥ माजी पद्यरचना केसर ॥ अतिसुवासें सेविजे ॥२००॥
कीं कृष्णकथा दुग्ध सुरस ॥ सज्जन तुम्ही राजहंस ॥ सेवा होवोनि सावकाश ॥ निद्रा आळस टाकूनि ॥१॥
कीं हे कथा सुधारस सुंदर ॥ तुम्ही संत श्रोते निर्जर ॥ हें अमृतपान करिता दुर्धर ॥ जन्ममरण तुटे पैं ॥२॥
स्वर्गींचें अमृत देव प्राशिती ॥ तो नाश पावती कल्पांतीं ॥ त्यांसी आहे पुनरावृत्ती ॥ जन्मपंक्ति सुटेना ॥३॥
तैसी नव्हे ही कथा ॥ पुनरावृत्ति नाहीं कल्पांता ॥ ब्रह्मानंदपद ये हाता ॥ तेथींच्या अर्था पाहतां हो ॥४॥
ब्रह्मानंदकृपेच्या बळें ॥ हें ग्रंथजहाज चाले ॥ भक्तीचें शीड वरी लाविलें ॥ दयावातें फडकतसे ॥५॥
ब्रह्मानंदरुप साचार ॥ तुम्ही संत श्रोते निर्धार ॥ वारंवार श्रीधर ॥ चरण वंदी प्रीतीनें ॥६॥
या अध्यायाचें अनुसंधान ॥ वसुदेवाचें जाहलें लग्न ॥ कंसें येऊनि आपण ॥ बाळें मारिलीं सहाही ॥७॥
इति श्रीहरिविजयग्रंथ ॥ संमत हरिवंश भागवत ॥ चतुर परिसोत संत ॥ द्वितीयाध्याय गोड हा ॥२०८॥


॥श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ 

Monday, May 28, 2012

हरिविजय - अध्याय १


अध्याय १




श्रीगणेशाय नमः ॥  श्रीकुलदेवतायै नमः ॥श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥
ॐ नमोजी जगद्‌गुरु उदारा ॥ श्रीमद्भीमातीरविहारा ॥ पुराणपुरुषा दिगंबरा ॥ ब्रह्मानंदा सुखाब्धे ॥१॥
तूं सकळश्रेष्‍ठ साचार ॥ तूंचि आदि मायेचा निजवर ॥ ब्रह्मा विष्णु महेश्वर ॥ तिघे पुत्र निर्मिले ॥२॥
अनंत ब्रह्मांडें त्यांहातीं ॥ तूंचि घडविसी जगत्पती ॥ सकळ देव वर्तती ॥ तुझिया सत्तेकरुनियां ॥३॥
तूंचि जाहलासी गजवदन ॥ चतुर्दश विद्यांचें भुवन ॥ महासिद्धि कर जोडून ॥ सदा तिष्‍ठती तुजपुढें ॥४॥
जय अनंतकल्याणवरदमूर्ती ॥ त्रैलोक्यभरित तुझी कीर्ती ॥ सुरासुर तुज नमिती ॥ श्रीगणपति दयार्णवा ॥५॥
अरुणसंध्यारागरत्‍नज्योती ॥ कीं उगवला बाळगभस्ती ॥ तैसी गणपति तुझी अंगकांती ॥ आरक्तवर्ण दिसतसे ॥६॥
कीं शेंदुरें चर्चिला मंदाराचळ ॥ परम तेज झळके सोज्ज्वळ ॥ विशाळ उदर दोंदिल ॥ माजी त्रिभुवन सांठवलें ॥७॥
दुग्धसमुद्रीं ओपिलें ॥ कीं निर्दोष यश आकारलें ॥ तैसें शुभ्र वस्त्र परिधान केलें ॥ ध्यानीं मिरवलें भक्तांच्या ॥८॥
विनायकरिपूचें कटिसूत्र ॥ तळपे विराजमान विचित्र ॥ जांबूनद सुवर्ण पवित्र ॥ त्याचे अळंकार सर्वांगी ॥९॥
जैसा पौर्णिमेचा नक्षत्रनाथ ॥ तैसा एक दंत झळकत ॥ कीं सौदामिनी लखलखित ॥ मेघमंडळावेगळी ॥१०॥
परशु अंकुश इक्षुदंड ॥ पाश गदा दंतखंड ॥ पंकज आणि कोदंड ॥ अष्‍ट हस्तीं आयुधें ॥११॥
गणपति तुझें नृत्य देखोन ॥ सदाशिव सदा सुप्रसन्न ॥ सकळ देव टाळ घेऊन ॥ उभे राहती नृत्यकाळीं ॥१२॥
धिमकिटि धिमकिटि तकधा विचित्र ॥ रागगौलता संगीतशास्‍त्र ॥ नृत्यकळा देखोनि देवांचे नेत्र ॥ पातीं हालवूं विसरले ॥१३॥
गंडस्थळींचा दिव्य आमोद ॥ त्यावरी रुणझुणती षट्‌पद ॥ सव्यभागीं देवांचे वृंद ॥ वाम भागीं दानव पैं ॥१४॥
अष्‍टसिद्धि चामरें घेऊनी ॥ वरी वारिती अनुदिनीं ॥ श्रृंगी भृंगीं मृदंगी दोनी ॥ वाद्यकळा दाविती ॥१५॥
सुरासुर पाहती नृत्यकौतुक ॥ जेथें जेथें तुटे थाक ॥ मान तुकाविती ब्रह्मादिक ॥ तालसंकेत देखतां ॥१६॥
हस्तसंकेत दावी गणपती ॥ तडित्प्राय मुद्रिका झळकती ॥ सर्व अळंकारांची दीप्ती ॥ पाहताम भुलती शशिसूर्य ॥१७॥
ऐसा तूं महाराज गणनाथ ॥ तुझें कोणा वर्णवे महत्त्व ॥ आरंभिला हरिविजयग्रंथ ॥ पाववीं हा सिद्धीतें ॥१८॥
जैसा अर्भक छंद घेत ॥ पिता कौतुकें लाड पुरवीत ॥ तैसी येथें पदरचना समस्त ॥ गजवदना पुरवीं तूं ॥१९॥
तुझें नाम घेतां गणपती ॥ विघ्ने बारा वाटा पळती ॥ जैसा प्रकटतां झंजामारुत ॥ जलदजाल वितुळे पैं ॥२०॥
मृगेंद्र येतो ऐकतां कानीं ॥ मातंगा पळतां थोडी मेदिनी ॥ कीं हरिनामघोष ऐकतां कानीं ॥ दूरी पळती भूतें प्रेतें ॥२१॥
कीं जागा देखोनि घरधनी ॥ तस्कर पळती तेच क्षणीं ॥ तैसें तुझें नाम घेतां वदनीं ॥ विघ्नें पळति गजवदना ॥२२॥
देवा तुझें स्तवन न करवे ॥ आकाशा गवसणी न घालवे ॥ जलनिधि कैसा सांठवे ॥ मुंगीचिया उदरांत ॥२३॥
पृथ्‍वीचें वजन न करी कोणी ॥ मुष्‍टीं न माये वासरमणी ॥ ब्रह्मांड विदारिता वायु बांधोनी ॥ पालवीं कोणा आणवे ॥२४॥
ऐसा तूं सिद्धिविनायक ॥ तुज दुसरा नसे नायक ॥ तुझ्या कृपेनें सकळिक ॥ शब्दब्रह्म आकळे ॥२५॥
आतां नमूं वागीश्वरी ॥ परा पश्यंती मध्यमा वैखरी ॥ चहूं वाचांची ईश्वरी ॥ कमलोद्भवतनया जे ॥२६॥
अंबे तुझी कृपा जोडे ॥ तरी मुकाही वेदशास्त्र पढे ॥ तूं स्नेहें पाहसी पाषाणाकडे ॥ तरी तो होय महामणी ॥२७॥
मात तुझेनि वरदानें ॥ जन्मांधही पारखी रत्‍नें ॥ रंक ते होती राणे ॥ कृपेनें तुझ्या सरस्वती ॥२८॥
तूं कविमानसमांदुसरत्‍न ॥ सकल मातृकांचें निजजीवन ॥ अंबे तुझें चातुर्य देखोन ॥ रमा उमा लज्जित ॥२९॥
तुझें सौंदर्य देखोनि गाढें ॥ मन्मथ होवोनि राहिलें वेडें ॥ अष्‍टनायिका तुजपुढें ॥ अधोवदन पाहती ॥३०॥
तूं बोलसी जेव्हां वागीश्वरी ॥ दंततेजें झळके धरित्री ॥ तेथींचे खडे निर्धारीं ॥ पद्मराग पैं होती ॥३१॥
अंबे तुझे जेथें उमटती चरण ॥ तेथें लोळे वसंत येऊन ॥ त्या सुवासा वेधून ॥ भ्रमर तेथें रुंजती ॥३२॥
तुझ्या आंगींच्या सुवासेंकरुनी ॥ दाही दिशा गेल्या भरोनी ॥ परब्रह्मीं उठली जे ध्वनी ॥ आदिजननी तेचि तूं ॥३३॥
तप्तसूर्या जैसें सुरंग ॥ तैसें जननि तुझें सर्वांग ॥ पंकजनेत्र सुरेख चांग ॥ अधर बिंबासारिखे ॥३४॥
सरळ नासिका विशाळ भाळ ॥ कर्णीं ताटंकांचा झळाळ ॥ कीं शशि सूर्य निर्मळ ॥ कर्णीं येऊन लागले ॥३५॥
कर्णीं मुक्तघोंस ढाळ देती ॥ गंडस्थळीं दिसे प्रदीप्ती ॥ कीं नक्षत्रपुंज एकत्र स्थिती ॥ कर्णीं लागती शारदेच्या ॥३६॥
गळां मोतियांचे दिव्य हार ॥ शुभ्र कंचुकी शुभ्र वस्त्र ॥ आपादमस्तकावरी समग्र ॥ दिव्य अलंकार झळकती ॥३७॥
आरुढली हंसासनी ॥ दिव्य वीणा हातीं घेऊनी ॥ आलाप करितां मधुर ध्वनी ॥ सुरासुर आयकोनि तटस्थ ॥३८॥
सुरासुर गण गंधर्व ॥ सिद्ध चारण मुनिपुंगव ॥ अंबे तुझ्या चरणीं भाव ॥ धरिती सर्व आदरें ॥३९॥
श्रीधर निजभावेंकरुन ॥ जननि तुज अनन्यशरण ॥ माझ्या जिव्हाग्रीं राहोन ॥ हरिविजयग्रंथ बोलवीं ॥४०॥
गणेशसरस्वतीचें स्तवन ॥ वदविलें जेणें दयेंकरुन ॥ तो ब्रह्मानंद श्रीगुरु पूर्ण ॥ त्याचे चरण वंदुं आतां ॥४१॥
तो ब्रह्मानंद पिता निश्चितीं ॥ सावित्री तयाची शक्ती ॥ ही तों आदिपुरुष मूळप्रकृति ॥ माता पिता वंदिलीं ॥४२॥
ब्रह्मचर्य गृहस्थाश्रम करुन ॥ वानप्रस्थही आचरुन ॥ संन्यासदीक्षा घेऊन ॥ त्रिविध आश्रम त्यागिले ॥४३॥
पंढरीये भीमातटीं ॥ समाधिस्थ वाळवंटीं ॥ पूर्णज्ञानी जैसा धूर्जटी ॥ तापसियांमाजी श्रेष्‍ठ ॥४४॥
ज्यासी बाळपणापासून ॥ परनारी मातेसमान ॥ परद्रव्य पाहे जैसें वमन ॥ आनंदघनस्वरुप पैं ॥४५॥
कामादिक षड्‌वैरी ॥ जेणें लोटोनि घातले बाहेरी ॥ ज्याच्या कृपावलोकनें निर्धारीं ॥ ज्ञान होय प्राणियां ॥४६॥
जें निस्सीम वेदांतज्ञान ॥ तें ज्यास करतलामलक पूर्ण ॥ वंदिले तयाचे चरण ॥ ग्रंथारंभीं आदरें ॥४७॥
गुरुपद सर्वांत श्रेष्‍ठ ॥ त्याहून नाहीं कोणी वरिष्‍ठ ॥ कल्पवृक्ष म्हणावा विशिष्‍ट ॥ तरी कल्पिलें पुरवी तो ॥४८॥
मातापितयांसमान ॥ जरी म्हणावा सद्‌गुरु पूर्ण ॥ ती उपमा येथें गौण ॥ न घडे जाण सर्वथा ॥४९॥
ज्या ज्या जन्मा जाय प्राणी ॥ तेथें मायबापें असती दोनी ॥ परी सद्‌गुरु कैवल्यदानी ॥ तो दुर्लभ सर्वदा ॥५०॥
जरी अनंत पुण्यांच्या राशी ॥ तरीच भेटी सद्‌गुरुसी ॥ नाहीं तरी व्यर्थ नरदेहासी ॥ येऊनि सार्थक काय केलें ॥५१॥
श्रीगुरुवांचोनि होय ज्ञान ॥ हें काळत्रयीं न घडे पूर्ण ॥ आत्मज्ञानावांचून ॥ सुटका नव्हे कल्पांतीं ॥५२॥
श्रीरामावतार परिपूर्ण ॥ तोही धरी वसिष्‍ठाचे चरण ॥ श्रीकृष्ण ब्रह्म सनातन ॥ अनन्यशरण सांदीपना ॥५३॥
व्यास नारदासी शरण रिघे ॥ इंद्र बृहस्पतीच्या पायां लागे ॥ उमा शिवासी शरण रिघे ॥ आत्मज्ञानप्राप्तीसी ॥५४॥
शुक नारद प्रल्हाद ॥ वाल्मीक वसिष्‍ठादि ऋषिवृंद ॥ इतुकेही गुरुपद कमळींचा आमोद ॥ भ्रमर होऊनि सेविती ॥५५॥
उद्धव अर्जुनादिक भक्त ॥ गुरुभजनीं रतले समस्त ॥ अपरोक्षज्ञान प्राप्त ॥ सद्‌गुरुवांचूनि न घडे ॥५६॥
दुग्धींच नवनीत असे ॥ हें आबालवृद्ध जाणतसे ॥ परी मंथनाविण कैसें ॥ हातीं सांपडे सांग पां ॥५७॥
उगेंचि दुग्ध घुसळिलें ॥ अवघा वेळ जरी शोधिलें ॥ परी तें हातवटीवेगळें ॥ नवनीत न सांपडे ॥५८॥
जेथें जेथें प्राणी बैसत ॥ तेथें तेथें निधाने असती बहुत ॥ परी अंजन नेत्रीं न घालितां सत्य ॥ न सांपडती खणितांही॥५९॥
नेत्र उत्तम सतेजपणीं ॥ परी नुगवतां वासरमणी ॥ जवळी पदार्थ असोनी ॥ न दिसे नयनीं प्राणियां ॥६०॥
तैसें सदगुरुसी शरण न रिघतां ॥ अपरोक्षज्ञान परी नुगवतां वासरमणी ॥ जवळी पदार्थ असोनी ॥ न दिसे नयनीं प्राणियां
॥६०॥
तैसें सदगुरुसी शरण न रिघतां ॥ अपरोक्षज्ञान न लागे हाता ॥ यालागीं ब्रह्मानंदासी तत्त्वतां॥ शरण अनन्य मी असें ॥६१॥
श्रीगुरुराया तूं समर्थ ॥ हा हरिविजय आरंभिला ग्रंथ ॥ शेवटासी पावो ययार्थ ॥ तुझ्या वरें करुनियां ॥६२॥
तूं मेघ वर्षसी दयाळ ॥ तरीच हें ग्रंथरोप वाढेल ॥ साधकचातक तृप्त होतील ॥ भक्तीची ओल बहु होय ॥६३॥
माता करी प्रतिपाळ ॥ तों तों वाढों लागे बाळ ॥ तुझ्या कृपेविण बोल ॥ न बोलवे सर्वथा ॥६४॥
जोंवरी नाहीं वाजविता ॥ तों पांवा न वाजे सर्वथा ॥ सूत्रधार न हालवितां ॥ काष्ठपुतळा नाचेना ॥६५॥
ऐसें ऐकोनि श्रीगुरुनाथा ॥ म्हणे सिद्धी पावेल सकळ ग्रंथ ॥ आतां वंदूं श्रोते संत ॥ जे कृपावंत सर्वदा ॥६६॥
जे चातुर्यार्णवींचीं रत्‍नें ॥ कीं शांतिभूमीचीं निधानें ॥ की भक्तिवनींचीं सुमनें॥ विकासली साजिरीं ॥६७॥
कीं ते वैराग्यअंबरीचें दिनकर ॥ कीं अक्षय विज्ञानानंदचंद्र ॥ कीं अपरोक्षज्ञान्समुद्र ॥ न लागे अंत कोणातें ॥६८॥
कीं ते प्रेमगंगेचे ओघ ॥ कीं ते स्वानंदसुखाचे मेघ ॥ अखंड धारा अमोघ ॥ वर्षती मुमुक्षुचातकां ॥६९॥
कीं ते श्रवणामृताचे कुंभ ॥ कीं ते कीर्तनाचे अचल स्वयंभ ॥ कीं ते स्मरणाचे सुप्रभ ॥ ध्वजचि पूर्ण उभारले ॥७०॥
कीं ते हरिप द्मींचे भ्रमर ॥ कीं विवेकमेरुचीं श्रृंगें सुंदर ॥ कीं ते क्षमेचें तरुवर ॥ चिदाकाशीं उंचावले ॥७१॥
कीं ते मननजळींचे मीन ॥ कीं ते भवगजावरी पंचानन ॥ कीं परमार्थाचीं सदनें पूर्ण ॥ निर्मळ शीतळ सर्वदा ॥७२॥
कीं ते दयेचें भांडार ॥ की उपरतीचें माहेर ॥ कीं कीर्तीची जहाजें थोर ॥ भक्तिशीड फडकें वरी ॥७३॥
कीं ते परलोकींचें सोयरे सखे ॥ कीं ते अंतकाळींचे पाठिराखे ॥ वैकुंठनाथ ज्यांचे भाके ॥ गुंतोनि तिष्ठे त्यांपाशी ॥७४॥
ऐसें ते महाराज संत ॥ जे सकळांवरी कृपावंत ॥ जे दीनवत्सल भेदरहित ॥ आपपर नेणती जें ॥७५॥
देवांसमान म्हणावे संत ॥ हे गोष्‍टीच असंमत ॥ देव जैसी भक्ति देखती सत्य ॥ होती तैसे प्रसन्न ॥७६॥
जे सेवा करिती बहुत ॥ त्यांस उत्तम फळ देत ॥ जे भजन न करिती यथार्थ ॥ त्यांवरी देव कोपती ॥७७॥
त्यांस दरिद्र आणोनी ॥ प्राणियांसी पाडिती अधःपतनीं ॥ तैसी नव्हे संतांची करणी ॥ समसमान सर्वांतें ॥७८॥
सर्वांवरी दया समान ॥ एक उत्तम एक हीन ॥ हें न देखतीच संत पूर्ण ॥ जन वन समान तयांसी ॥७९॥
एकाचें करावें कल्याण ॥ न भजे त्यांचे अकल्याण ॥ देवांचें कर्तृत्व पूर्ण ॥ संत समान सर्वांतें ॥८०॥
जैसा कायेचा विचार होतसे ॥ तैसी तैसी छाया दिसे ॥ आपण बैसतां छाया बैसे ॥ उठतां उभी ती होय ॥८१॥
जैसी काया तैसी छाया ॥ याच प्रकारें देवांची क्रिया ॥ तैसी नव्हे संतांची चर्या ॥ समसमान सर्वांसी ॥८२॥
वरकड जनांसमान संत ॥ ऐसी बोलतांचि मात ॥ तो पावेल अधःपात ॥ दुष्टबुद्धि दुरात्मा ॥८३॥
समुद्र आणि सौंदणी ॥ तारागण आणि वासर मणी ॥ काचोटी आणि महामणी ॥ मेरु मशक सम नव्हे ॥८४॥
थिल्लर आणि गोदावरी ॥ राजा आणि दरिद्री ॥ योगी आणि दुराचारी कैसे समान होती पैं ॥८५॥
कस्तुरी आणि कोळसा ॥ केसरी आणि म्हैसा ॥ मनुष्य आणि महेशा ॥ कैसी साम्यता होईल ॥८६॥
सुपर्ण आणि वायस ॥ पाषाण आणि परीस ॥ बाभळ आणि सुरतरुस ॥ समानत्व कदा नव्हेचि ॥८७॥
तैसे संत आणि इतर जन ॥ जे लेखिती समसमान ॥ ते नरदेहासी येऊन ॥ पशू जैसे मूढ पैं ॥८८॥
असो ऐसा संतांचा महिमा ॥ वर्णूं न शकती शिव ब्रह्मा ॥ संतसंगाच्या सुखाची सीमा ॥ न करवेचि कवणातें ॥८९॥
ते संत महाराज सज्जन ॥ ग्रंथारंभीं तयांसी नमन ॥ श्रीवेदव्यास जगद्‌भूषण ॥ सत्यवतीसुत पैं ॥९०॥
ज्याचिया मुखकमळापासून ॥ चिद्रस द्रवला परिपूर्ण ॥ त्या वाङ्‌मय अमृतेंकरुन ॥ त्रिजग जाण धालें हो ॥९१॥
कीं एकमुखाचा ब्रह्मदेव ॥ कीं साक्षात्‌ द्विबाहु रमाधव ॥ कीं भाललोचन शिव ॥ स्वयमेव अवतरला ॥९२॥
तो महाराज कृष्णद्वैपायन ॥ अवतरला लोकहिताला गून ॥ सदा निगमकमलविकास पूर्ण ॥ व्यास चंडांशु देखतां ॥९३॥
जो वसिष्‍ठाचा पणतू होय ॥ शक्तीचा पुत्र निःसंशय ॥ त्या परशरसुताचें पाहें ॥ महत्त्व कोणा वर्णवे ॥९४॥
ऐसा तो शुकतात पूर्ण ॥ सत्यवतींचें हृदयरत्‍न ॥ त्या जगद्‌गुरुचे चरण ॥ प्रेमभावें वंदिले ॥९५॥
नमूं तो वाल्मीक आतां ॥ जो शतकोटिग्रंथकर्ता ॥ जो नारदकृपेनें तत्त्वतां ॥ श्रीरामकथा बोलिला ॥९६॥
ज्याच्या गोत्रीं जन्मलों स्पष्‍ट ॥ नमूं तो स्वामी श्रीवसिष्‍ठ ॥ ज्ञान ज्याचें अतिवरिष्‍ठ ॥ शांतिक्षमेचा सागरु जो ॥९७॥
दर्भावरी जेणें पृथ्वी धरिली ॥ रविसमान ज्याची शाटी मिरवली ॥ कमंडलु ठेवूनि भूमंडळीं ॥ कुंभोद्भव नेला साक्षीतें ॥९८॥
ही कथा सांगावी समस्त ॥ तरी विशेष वाढेल ग्रंथ ॥ ऐसा तो वसिष्‍ठमुनि समर्थ ॥ नसे अंत ज्ञाना ज्याच्या ॥९९॥
जेणें उपदेशिला रघुनाथ ॥ तो बृहद्वासिष्‍ठ श्रेष्‍ठ ग्रंथ ॥ छत्तीस सहस्त्र श्लोक निश्चित ॥ वाल्मीकमुनिकृत पैं ॥१००॥
जो सूर्यवंशाचा आदिगुरु ॥ जो ऋषींमाजी महामेरु ॥ ज्याचें कुळीं व्यासमुनीश्वरु ॥ रमानाथचि अवतरला ॥१॥
त्याच्या उदरीं चिद्रत्‍न ॥ जन्मला शुक गुणनिधान ॥ तेणें भागवताचें श्रवण ॥ परीक्षितासी जान करविलें ॥२॥
नमूं तो स्वामी शुक ॥ जेणें जिंकिले अरि कामादिक ॥ ज्याचें तपस्तेज अधिक ॥ तमांतक दूसरा ॥३॥
शुक असतां शुद्धवनीं ॥ छळूं आली रंभेची भगिनी ॥ ती निस्तेज होऊनि ते क्षणीं ॥ गेली लाजोनि स्वर्गातें ॥४॥
ज्याच्या मुखीं श्रीभागवत ॥ प्रकटला दिव्य ग्रंथ ॥ जेणें उद्धरिला अभिमन्युसुत ॥ भागवतधर्म सांगोनियां ॥५॥
बहु पुराणें बहु ग्रंथ ॥ त्यांत मुकुटरत्‍न भागवत ॥ जैसा सकळांत मुख्य वैकुंठनाथ ॥ तैसाचि ग्रंथ पूज्य हा ॥६॥
जैसा देवांमाजी सहस्त्रनयन ॥ कीं द्विजांमाजी सुपर्ण ॥ कीं तारागणांमाजी अत्रिनंदन ॥ तैसें जाण भागवत ॥७॥
भोगियांमाजी धरणीधर ॥ कीं तपियांत श्रेष्‍ठ पिनाकधर ॥ कीं नवग्रहांमाजी दिनकर ॥ श्रेष्‍ठ जैसा विराजे ॥८॥
कीं हरींमाजी हनुमंत ॥ कीं बोलक्यांमाजी अंगिरासुत ॥ कीं शास्त्रांमाजी वेदांत ॥ मुख्य जैसें मान्य पैं ॥९॥
आश्रमांत चतुर्थाश्रम पूर्ण ॥ कीं क्षेत्रांमाजी आनंदवन ॥ कीं शस्त्रांमाजी सुदर्शन ॥ तैसें जाण भागवत ॥११०॥
कीं वनचरांमाजी हरि थोर ॥ कीं धनुर्धरांमाजी रघुवीर ॥ कीं धातूंमाजी शातकुंभ सुंदर ॥ तैसेंचि जाण भागवत ॥११॥
त्याहीमाजी दशम ॥ केवळ हरिलीला उत्तम ॥ बोलिला व्याससुत परम ॥ हृद्गत गुह्य जें कां ॥१२॥
दशम आणि हरिवंश ॥ अनेक पुराणींच्या कथा विशेष ॥ बोलिले कवि महापुरुष ॥ श्रीकृष्णलीलामृत पैं ॥१३॥
तितुकियांचा जो मथितार्थ ॥ तो हा हरिविजय ग्रंथ ॥ दुजा नाहीं विपरीतार्थ ॥ सत्य सत्य त्रिवाचा ॥१४॥
ऐका हो श्रोते सादर ॥ संपलिया रामअवतार ॥ पृथ्वीवरी दैत्य थोर ॥ मागुती सैरा माजले ॥१५॥
कंस चाणूर मुष्टिक ॥ अघ बक केशी प्रलंबादिक ॥ शिशुपाळ वक्रदंत चैद्यनायक ॥ जरासंध माजला ॥१६॥
जरासंधाच्या बंदिशाळे ॥ बावीस सहस्त्र राजे पडिले ॥ भौमासुर माजला बळें ॥ लोक पीडिले चतुर्दश ॥१७॥
बाणासुर काळयवन ॥ करिती पृथ्वीचें कंदन ॥ गायी आणि ब्राह्मण ॥ टाकिती मारुन दुरात्मे ॥१८॥
कौरव दुष्ट माजले ॥ राक्षस पुन्हां जन्मले ॥ कलींचे स्वरुप सगळें ॥ दुर्योधन जन्मला ॥१९॥
कंस आणि काळयवन ॥ मोडिती ब्राह्मणांचीं सदनें ॥ जो करी विष्णुभजन ॥ त्यासी मारुन टाकिती ॥१२०॥
न चाले अनुष्ठान तप ॥ राहिले ऋषींचे ध्यान जप ॥ वर्तूं लागलें थोर पाप ॥ धरा कंप जाहला ॥२१॥
गायीच्या स्वरुपें धरित्री ॥ उभी ठाकली ब्रह्मयाच्या द्वारीं ॥ हांक फोडोनि आक्रोश करी ॥ बुडालें बुडालें म्हणतसे ॥२२॥
मज न सोसावे दैत्यभार ॥ पाप वर्तलें अपार ॥ सकळ विष्णुभक्त द्विजवर ॥ पीडिले फार दैत्यांनीं ॥२३॥
ऐसी पृथ्वी आक्रंदतां ॥ जवळी आला जगत्पिता ॥ पृथ्वीस म्हणे तूं आतां ॥ चिंता न करीं येथोनी ॥२४॥
जैसे पर्जन्यकाळीं गंगेचे पूर ॥ तैसे आले ऋषींचे भार ॥ ब्रह्मयासी म्हणती विप्र ॥ अनर्थ थोर मांडला ॥२५॥
एक म्हणती कंसे गांजिलें ॥ एक म्हणती काळयवनें पीडिलें ॥ एक म्हणती यज्ञ मोडिले ॥ भौमासुरें चांडाळें ॥२६॥
एक म्हणती कन्या धरोनी ॥ गेला भौमासुर घेऊनी ॥ स्त्रिया भ्रष्टविल्या दैत्यांनीं ॥ ऐसें पाप अवनीं वर्तत ॥२७॥
अवघ्या प्रजा येऊन ॥ ब्रह्मयापुढें करिती रुदन ॥ तो कोल्हाळ ऐकोन ॥ विस्मित जाहला परमेष्‍ठी ॥२८॥
देवांसमवेत सहस्त्रनयन ॥ तोही आला न लागतां क्षण ॥ वंदिले विष्णुपुत्राचे चरण ॥ अतिप्रीतीं ते वेळीं ॥२९॥
ब्रह्मा म्हणे सहस्त्रनेत्रा ॥ आतां जावें क्षीरसागरा ॥ गार्‍हाणें सांगावें जगदुध्दारा ॥ तरीच कार्य साधेल ॥१३०॥
आतां देव ऋषि प्रजानन ॥ सांगातें घेऊनि चतुरानन ॥ क्षीरसागरा जाऊन ॥ कैसें स्तवन करतील ॥३१॥
कैसा क्षीरसागरींचा महिमा ॥ कोणे रीतीं तेथें परमात्मा ॥ शौनकादि विप्रोत्तमां ॥ सूत सांगे कथा हेचि ॥३२॥
परीक्षितीसी सांगे व्यासनंदन ॥ जनमेजयासी सांगे वैशंपायन ॥ तेंच प्राकृत भाषेंत पूर्ण ॥ श्रीधर सांगे श्रोतयां ॥३३॥
ब्रह्मानंदरुप तुम्ही श्रोते ॥ कथा ऐका सावधचित्तें ॥ जे ऐकतां समस्तें ॥ कलिकिल्मिषें भस्म होती ॥३४॥
इति श्रीहरिविजय ग्रंथ ॥ सम्मत हरिवंश भागवत ॥ चतुर संत श्रोते ऐकोत ॥ प्रथमाध्याय गोड हा ॥१३५॥

॥श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

Sunday, May 27, 2012

Benefits of reading Shree HariVijay Grantha

श्री हरिविजय ग्रंथ पठण फलश्रुती  

अध्याय १. :- संकटाशी सामना करण्याचे धैर्य येईल.
अध्याय २. :- विवेक जागृत होईल व आपल्यावरील  संकट टळेल.
अध्याय ३. :- या अध्यायाचे नित्य पठण कृष्णाष्टमीस केल्याने स्मरणशक्ती वाढेल.
अध्याय ४. :- अभक्ष्य भक्षणाचा व दुषित अन्न घेतल्याचा दोष जाईल.
अध्याय ५. :- कृष्णभक्ती वाढेल, अपत्यांना सुख प्राप्त होईल.
अध्याय ६. :- क्षमाशीलता व आनंद प्राप्त होईल.
अध्याय ७. :- सत्याप्रियता वाढेल; धनलोभ व कृपणता दूर होईल.
अध्याय ८. :- देवतांबद्दलची भेदबुद्धि दूर होऊन भगवंताची कृपा होईल.
अध्याय ९. :- कृष्णाध्यानातील अडथळे दूर होतील. पापक्षय होऊन बंधनातून सुटका होईल.
अध्याय १०. :- कामक्रोधादी विकारांवर जय मिळवण्यास साहाय्य होईल.
अध्याय ११. :- गुप्त शत्रूंचा उपद्रव होणार नाही; सर्पाचे भय राहणार नाही.
अध्याय १२. :- अवघड कार्य करण्यास लोकांचे सहकार्य मिळेल; संकट दूर होईल.
अध्याय १३. :- मनातील पशुत्व व हीन वृत्ती नष्ट होतील.
अध्याय १४. :- संकुचित विचार, द्वेष, मत्सर आदी विकार कमी होतील.
अध्याय १५. :- माता व पुत्र यांचा विरह संपेल. दुर्लभ संतसमागम प्राप्त होईल.
अध्याय १६. :- घरात अन्नाचा तुटवडा पडणार नाही.
अध्याय १७. :- ब्रह्महत्येचे पातक नष्ट होईल. दांपत्य-प्रेमातील वितुष्ट दूर होईल, पाप व्यभिचार घडणार नाही.
अध्याय १८. :- त्यागबुद्धी वाढेल, मोह-ममता कमी होईल.
अध्याय १९. :- अडलेले कार्य सिद्ध होईल.
अध्याय २०. :- विद्या व विनय यांचा लाभ होईल.
अध्याय २१. :- लोकांचे दु:ख दूर करण्याचे सामर्थ्य प्राप्त होईल, दररोज एकदा या प्रमाणे सहा महिने वाचावा.
अध्याय २२. :- हट्टी व्याधींचा त्रास कमी होईल; संकटात युक्ती सुचेल.
अध्याय २३. :- कुमारिकांना चांगला पती मिळेल, गृहकालः दूर होतील.
अध्याय २४. :- क्षमा, धैर्य, आनंद, संतोष यांचा विकास होईल.
अध्याय २५. :- धनशुद्धी व मन:शुद्धी होईल.
अध्याय २६. :- ऐहिक संकटातून पार पडून सुख प्राप्त होईल.
अध्याय २७. :- शत्रूंवर विजय मिळवणे सोपे होईल.
अध्याय २८. :- शंकर प्रसन्न होईल.
अध्याय २९. :- सख्यभक्तीचा लाभ होऊन निस्पृहता राहील.
अध्याय ३०. :- गृह्सौख्यःची वाढ होईल आणि रजोगुण कमी होऊन सत्वगुण भक्ती उपजेल.
अध्याय ३१. :- या अध्यायाचे सहा महिने रोज एकदा मनात वाचन केले तर हनुमंताची उपासना सफल होईल; इष्टप्राप्ती होईल.
अध्याय ३२. :- श्रीकृष्णावर भक्ती जडेल व त्याची कृपा प्राप्त होईल.
अध्याय ३३. :- दीर्घोद्योग सफल होईल, राजसत्तेची कृपा होईल.
अध्याय ३४. :- श्रीकृष्णाचे साहाय्य मिळून दुष्टांपासून संरक्षण होईल.
अध्याय ३५. :- पूर्वकर्मापासून  मुक्ती मिळेल व धैर्य प्राप्त होईल.
अध्याय ३६. :- सर्वाभूती परमेश्वराची अनुभूती येईल व योगमार्गात प्रगती होईल.

Saturday, May 26, 2012

How to do the Parayana of Harivijay?

श्री हरिविजय  ग्रंथ पारायण

Shri HariVijay Grantha has 36 Adhyayas in all having total 8139 oovis in it. This Grantha depicts the complete Life-time story of Shri Krishna. प्रत्येक चातुर्मासात हा कुठे कुठे लावला जातोच. लावला जातो म्हणजे याचे पठण केले जाते. कुठल्याही मराठी महिन्याच्या प्रतिपदेपासून रोज एक अध्याय याप्रमाणे छत्तीस दिवस म्हणजे पुढल्या महिन्याच्या षष्ठीपर्यंत हा 'श्री हरिविजय' ग्रंथ पठण / पारायण करता येतो. हरिविजय हा मोठ्या चवीने वाचल्यास श्रीकृष्ण दर्शनाची प्रेमळ अनुभूती वाचकांना घेता येईल हे सुबुद्ध वाचकांनी ध्यानात ठेवले तर त्यांना ह्या ग्रंथाचा खरा आस्वाद घेता येईल. रोज चार अध्याय याप्रमाणे नऊ दिवसात ग्रंथ पूर्ण करण्याचीही परंपरा आहे. वाचकांनी आपल्या बुद्धी शक्तीनुसार ते ठरवावे. ह्या ग्रंथाच्या वाचनाने आनंदाच्या दाही दिशा आपल्यापुरत्या विस्तारल्या जातात असा अनुभव हा ग्रंथ निश्चितपणे देतो. मंगलाचरण म्हणून ग्रंथ पठणास प्रारंभ करावा.
मंगलाचरणम
जयति सिंदुरवदनो देवो यत्पाद्पन्कजस्मरणं ।। वासरमणिरिव तमसां राशिं नाशयति विघ्नानां ।।१।। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्र वस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डीतकरा या श्वेतपद्मासना ।। या ब्रह्माच्युतशङ्करप्रभुतिभिर्देव्यै सदा वन्दिता ।। सामां पातु सरस्वती भगवती नि:शेषजाद्यापहा ।।२।। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं ।। यत्कृपा तमहं वन्दे परमानन्दमाधवम् ।।३।। नारायणं  नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम ।। देवीं सरस्वतीम् व्यासं ततो जयमुदीरयेत् ।।४।। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ।। देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं ।।५।। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर्: गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ।।६।। सर्वेपिसुखिन: सन्तु सर्वे सन्तु निरामया: । सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्र्चित दु:खमाप्नुयात ।।७।।
।। श्रोत वक्ता श्रीपांडुरंग: समर्थ: ।। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ।।
पार्वतीपते हर हर महादेव ।। सीताकांतस्मरण जय जय राम ।।

Sunday, May 6, 2012

Powada on Baji Prabhu Deshpande

चौक १
जयोऽस्तु ते श्रीमहन्‌मंगले शिवास्पदे शुभदे ।
स्वतंत्रते भगवति त्वामहम् यशोयुतां वंदे ॥१॥
स्वतंत्रते भगवती या तुम्ही प्रथम सभेमाजीं ।
आम्ही गातसों श्रीबाजीचा पोवाडा आजी ॥२॥
चितूरगडिंच्या बुरुजानो त्या जोहारासह या ।
प्रतापसिंहा प्रथितविक्रमा या हो या समया ॥३॥
तानाजीच्या पराक्रमासह सिंहगडा येई ।
निगा रखो महाराज रायगड की दौलत आयी ॥४॥
जरिपटका तोलीत धनाजी संताजी या या ।
दिल्लीच्या तक्ताचीं छकलें उधळित भाऊ या ॥५॥
स्वतंत्रतेच्या रणांत मरुनी चिरंजीव झाले ।
या ते तुम्ही राष्ट्रवीरवर या हो या सारे ॥६॥
चाल
घनदाट सभा थाटली । गर्जना उठली ।
घोर त्या कालीं । जय छत्रपतींचा बोला ।
जय स्वतंत्रतेचा बोला । जय भवानी की जय बोला ।
तुम्ही मावळे बोल हर हर महादेव बोला ।
चला घालुं स्वांत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥१॥
चौक २
हर हर गर्जुनि वीर मावळे सर्व सज्ज असती ।
परंतु कोठें चुकले बाजी यांत कां न दिसती ॥१॥
हाय हाय तो म्लेंछासंगें घडित बसे साची ।
स्वदेशभूच्या पायासाठीं बेडी दास्याची ॥२॥
ऐकुनियां शिवहृदय हळहळे म्हणे दूत हो जा ।
बोधुनि वळवा वीर बाजि तो तुम्ही राष्ट्रकाजा ॥३॥
चाल
शिवदूत तेधवां जाती । बाजिला वदती ।
सोड रे कुमती । कां म्लेंच्छ कसाई भजसी ।
कां दास्य-नरकिं तूं पचसी । कां जिणें तुच्छ हें नेसी ।
स्वदेश नाहीं, स्वराज्य नाहीं, धिक या देहाला ।
चला घालुं स्वातत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥२॥
चौक ३
बाजीराया म्लेंछ सबळ हा दोष न काळाचा ।
ना देवाचा ना धर्माचा किंवा नशिबाचा ॥१॥
देशद्रोही चांडाळांचा भरला बाजार ।
गुलमगिरी जे देती त्यांसी निष्ठा विकणार ॥२॥
तुम्हीच ना स्वातंत्र्य चिरियलें या पोटासाठीं ।
तुम्हीच ना रे भूमातेच्या नख दिधलें कंठीं ॥३॥
चाल
हो सावध बाजीराया । दास्यिं कां काया ।
झिजविशी वाया । तुज भगवान्‌ श्री शिवराजा ।
स्वातंत्र्य प्राप्तिच्या काजा । बोलावी तिकडे जा जा ।
देशभक्तिची सुधा पिउनि घे प्रायश्चित्ताला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥३॥
चौक ४
शिवदूताचे बोल ऐकतां बाजी मनिं वदला ।
काळसर्प मीं कसा उराशी मित्र म्हणुनि धरिला ॥१॥
घरांत शिरला चोर तया मी मानुनिया राजा ।
बंड बोलिलों शिवरायाच्या परमपूत काजा ॥२॥
माता माझी कष्टविली मीं राजनिष्ठ त्यासी ।
या पाप्यानें युद्ध मांडिलें देशरक्षकांशीं ॥३॥
चाल
जा सांगा शिवभूपाला । अशा अधमाला ।
राजनिष्ठाला । त्वां आधीं शतधा चिरणें ।
तुज करवीं घडतां मरणें । पावेन शुद्धि मग मानें ।
तुझ्या करींच्या तरवारीच्या घेइन जन्माला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥४॥
चौक ५
देशभूमिच्या कसायासि कां इमान मी देऊ ।
भाकरि देतो म्हणुनि तयाच्या चाकरीस राहूं ॥१॥
कवणाची भाकरी बंधु हो चाकरि कवणाची ।
भाकर दे भूमाता चाकरि तिच्या घातकांची ॥२॥
राज्य हिसकलें देश जिंकला त्या पर अधमाशीं ।
राजनिष्ठ मी राहुनि कवण्या साधित नरकासी ॥३॥
चाल
ही गुलामगिरिची गीता । राजनिष्ठता ।
ह्यापुढें आतां । मद्देशचि माझा राजा ।
तो प्राण देव तो माझा । मी शरण शिवा सांग जा ।
राख उडाली प्रदीप्त बाजी वैश्वानल ठेला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥५॥
चौक ६
लोट धुळीचा सुटला अवचित दीन शब्द उठला ।
लगट करुनि शिद्दिनें पन्हाळा गड वेढुनि धरिला ॥१॥
लक्ष्मीचे मृदु कमल शारदा सुंदरिचा वीणा ।
स्वतंत्रतेचा कलिजा अडके गडांत शिवराणा ॥२॥
अफझल्याच्या वधा स्मरोनी फाजल सुत त्याचा ।
करितो पण कीं शिवभूपाला जिवंत धरण्याचा ॥३॥
चाल
बापासि तुझ्या जो खडे । चारि रोकडे ।
जाशि त्याकडे । जीवंत धरुं तरि साचा ।
जीवंत पवन धरण्याचा । अभ्यास आधिं कर याचा ।
खुशाल हरिणा मग तूं धावें धरण्या वणव्याला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥६॥
चौक ७
बाजि लागला शिवभूपाच्या थोडा कानाला ।
हातीं भाला एक मावळा गडाखालिं आला ॥१॥
शिद्दि पाहतां चुकुनि हात तरवारीला गेला ।
दाबुनि त्याला मुजरा केला धीट नीट वदला ॥२॥
शिवाजि राजा जिवंत येतो तुमच्या गोटाला ।
उद्यां सकाळीं करुं गड खालीं कळवी तुम्हांला ॥३॥
चाल
ऐकुनी शिद्दि बहु फुगला । रिपूजन भुलला ।
परस्पर वदला । अजि खान, खानखानाजी ।
हुए शिकस्त मराठे हैं जी । फिर लढना क्यौं कर आजी ।
चलो शराब उडायें ताजी । आप लेवजी, नहीं आप लेवजी ।
आप गाजि आप तो रणगाजी । झिंगविला अरि सर्प फुंकुनी पुंगी गुंगविला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥७॥
चौक ८
गुगवोनि अरि सर्प शिवा गारोडि गडावरि तो ।
प्रहर रात्र उलटतां मराठी जादू मग करितो ॥१॥
कृष्णपक्षिच्या काळ्या काळ्या रात्रीं त्या दडल्या ।
गर्द झाडिला भिउनि चांदण्या बाहेरि न पडल्या ॥२॥
अशा तमीं किलकिलें दार का तटावरी झालें ।
बाजि निघाले श्री शिव आले आले शत भाले ॥३॥
भाला खांद्यावरी मराठा घोडयावरि स्वारी ।
भरतां घोडा थै थै नाचे तोंचि शीळ झाली ॥४॥
चाल
वीर हो टाच घोडयाला । बाण हा सुटला ।
हटविणें त्याला । रिपु तुडवित व्हा व्हा पार ।
चौक्यासि तुम्हा दावील । काजवा चोर कंदील ।
गेला गडतळ गेला सत्तर मैल भूप आला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥८॥
चौक ९
तुरी शिद्धिच्या हातीं देउनि सुटता शिवनृपती ।
अब्रह्मण्यम् कितिक भाबडीं भोळिं भटें वदतीं ॥१॥
अब्रह्मण्यम् यांत कायरे दोष कोणता तो ।
आला ठक ठकवाया उलटा भला ठकविला तो ॥२॥
साप विखारी देश जननिला ये घ्याया चावा ।
अवचित गांठुनि फसवुनि भुलवुनि असाच ठेचावा ॥३॥
चाल
ये यथा प्रपद्यंते माम् । भजाम्यहं तान् ।
तथैव; धीमान् । भारतीं कृष्ण वदला हें ।
अधमासि अधम या न्यायें । रक्षिलें राष्ट्र शिवरायें ।
राष्ट्ररक्षका सावध हो रिपु हुडकित तुज आला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥९॥
चौक १०
हात जोडितों पाया पडतों बाजि तुझ्या राया ।
गड अवघड रांगणा तिथें तुम्ही जाणें या समया ॥१॥
राष्ट्रदेविचा हस्त कुशल तूं तरि लाखों भाले ।
अम्हासारिखे मिळतील; चिरतिल चरचर रिपु सारे ॥२॥
जाऊं काय मी बाजि मृत्युमुखिं ढकलुनि तुम्हाला ॥
कधीं शिवा जातिचा मराठा मृत्यूला भ्याला ॥३॥
चढा गड तुम्ही यशोदायिनी तोफ पांच करा ।
तोंवरि लढवूं गनीम अडवूं खिंड करुं निकरा ॥४॥
चाल
वसुदेव तूंचि शिवराया । कंस कपटा या ।
करुनियां वाया । स्वातंत्र्य कृष्ण चिन्मूर्ती ।
जा घेउनि अपुल्या हातीं । गड गोकुळांत नांदो ती ।
गडीं चालला शिव तो खिंडित दीन शब्द उठला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥१०॥
चौक ११
आले आले गनीम खिंडिंत चवताळुनि आले ।
झाले झाले सज्ज मराठे सरसावुनि भाले ॥१॥
संख्या दुप्पट रिपुची, परि ते निकरानें लढती ।
हर हर गर्जुनि समर रंगणीं तुटोनियां पडती ॥२॥
खङगाचे खणखणाट त्या मधिं शर सणसण येती ।
मारण मराणावीण नेणती वीर रणीं रंगती ॥३॥
चाल
तो हर हर एकचि झाला । वदति रे चला ।
म्लेंछ हा हटला । चला चढवा नेटाचा हल्ला ।
वीरश्रीचा करा रे हल्ला । निकराचा चालु द्या हल्ला ।
मारित हाणित हटवित म्लेंछा खिंडिपार केला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपुवरी घाला ॥११॥
चौक १२
म्लेंछ हटवितां बाजी वळुनी गडाकडे पाहे ।
श्री शिव चाले मागे बघुनियां वीर गर्जताहे ॥१॥
गडांत जाईल राष्ट्रदेविचा जिवलग शिवराणा ।
तोंवरि लढवूं खिंड शूर हो हा अपुला बाणा ॥२॥
त्या वाण्याच्या आधिं रणांगणि जरी घडे मरणें ।
पुनर्जन्म घेउनी तत्क्षणीं पुनः पुन्हा लढणें ॥३॥
चाल
रघुराया रावणहरणा । कंसमर्दना ।
भो जनार्दना । लाडक्या देश जननीचे ।
स्वातंत्र्य रक्षणीं साचे । हे प्राण दान जरि अमुचे ।
पवित्र हे जरि त्वत्प्रिय हे जरि दे तरि सुयशाला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥१२॥
चौक १३
आले आले गनीम चालुनि पुनरपि तों आले ।
झाले जाले सज्ज पुनरपी उठावले भाले ॥१॥
दीन दीन रण शब्दा हर हर महादेव भिडला ।
भिडला ओष्ठीं दंत मस्तकीं खङग वक्षिं भाला ॥२॥
हल्ला चढवित परस्परावरि पुनः पुन्हा लढती ।
नटती योद्धे समरभाजनीं वीररसा लुटिती ॥३॥
चाल
कचरला मराठी भाला । बाजि तों आला ।
तोलुनी धरिला । रणिं रंग पुन्हा ये साचा ।
गर्जती मराठे रिपुचा । घ्या सूड म्लेंच्छ मत्तांचा ।
उगवावा सूड देशाचा । आणि सूड स्वातंत्र्याचा ।
भोसका कटयारी बरच्या । करा माळा रिपुच्या आंतडयाच्या ।
लावा उटया त्यांच्या रक्ताच्या । त्याचा मस्तक चेंडू साचा ।
समररंगणीं चेंडूफळीचा डाव भरा आला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥१३॥
चौक १४
डाव उलटला म्लेंच्छावरी तो पुन्हा परत हटला ।
जय झाला परि वीर मराठा बहुतांशी पडला ॥१॥
तिकडे गडिंच्या तोफा अजुनी पांच कां न सुटती ।
वीर मराठे सचिंत आशाबद्ध सर्व बघती ॥२॥
तशांत घेउनि ताजी टोळी फाजलखां येतो ।
धन्य बाजिची; पुन्हा उसळुनी अशनी सम पडतो ॥३॥
खिंड तोफ तिज मधुनी सुटला गोळा श्री बाजी ।
रणीं तळपतो वीरश्रीचा रणनवरा बाजी ॥४॥
चाल
तों गोळी सूं सूं आली । अहो त्या काळीं ।
मर्मिं ती घुसली । श्री बाजी विव्हळ पडला ।
मागुती कांहिंसा उठला । बेहोष वीर परि वदला ।
तोफे आधीं न मरे बाजी सांगा मृत्यूला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥१४॥
चौक १५
थांबा बाजी जखम तरि पुरी बांधूं द्या थांबा ।
हर हर रणिंचा ऐकुनि वीरा उसळुं नका थांबा ॥१॥
जखम कुठें रे असे फक्त मी तृषाक्रांत थोडा ।
रिपुरक्ताते पितों घटघटा सोडा मज सोडा ॥२॥
खरी जखम भू-आईस माझ्या, फोडी हंबरडा ।
ओढुनि अरिची अंतडी बांधुया पट्टि तिला सोडा ॥३॥
भले मराठे लढा तसेची आलो मी सोडा ।
प्रखर आपुली भूक शमविण्या रिपु नरडी फोडा ॥४॥
चाल
होईल तोफ शिवबाची । क्षणीं दो क्षणिंची ।
तोवरी साची । खिंड लढवाची ।
फेडाया ऋण या भूचें । अजि उष्ण बिंदु रक्ताचे ।
द्या मुद्दल मोजुनि साचें । व्याज तिला स्वातंत्र्य देउनी फेडा कर्जाला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥१५॥
चौक १६
काय वाजलें ? बाजीराया बार न गडिं झाला ।
शिला कोसळे, पान सळसळे, पक्षी ओरडला ॥१॥
लढा तरी मग वीर चला हो रणांत घुसलों मी ।
रक्तें मढवूं लढवूं खिंडिची तसू तसू भूमी ॥२॥
शपथ तुम्हाला वृक्ष, पक्षि, जल, शिला तेज, वारे ।
मरतां आम्ही तोफेपूर्वी लढा तुम्ही सारे ॥३॥
देहबंध तो तुटला बाजीराय धरे पडला ।
वीरवराचा विव्हल आत्मा नयनाशीं भिडला ॥४॥
चाल
तों बार धडाधड झाले । प्राण परतले ।
हास्य मुख केलें । हा पहिला बार शिवाचा ।
हा दुसरा स्वतंत्र्याचा । हा तिसरा चवथा साचा ।
बार पांचवा धडाडला जय गर्जुनि प्राण दिला ।
चला घालुं स्वातंत्र्य संगरीं रिपूवरीं घाला ॥१६॥
चौक १७
दिव्य द्युतिचा चकचकाट आकाशीं कोंदटला ।
रथ श्रीमती स्वतंत्रतेचा भूवरती आला ॥१॥
ऊठ चितोडा ऊठ देविला उत्थापन द्याया ।
प्रतापसिंहा प्रथित विक्रमा उठि मंगल समया ॥२॥
भूमातेच्या तान्ह्या उठि कां वीतचिंत व्हाना ? ।
असे कुशल रांगण्यांत तुमचा जिवलग शिवराणा ॥३॥
स्वांतत्र्याचा पोवाडा हा ऐकाया आलां ।
उठा सर्व स्वातत्र्यवीरवर जयमंगल बोला ॥४॥
चाल
श्री स्वतंत्रता भगवती । बाजिला नेती ।
आपुल्या रथीं । गंधर्व तनन तैं करिती ।
दुंदुभी नभीं दुमदुमती । श्री बाजी स्वर्गा जाती ।
करी चराचर विश्व बाजिच्या जयजयकाराला ।
चला घालुं स्वांत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥१७॥
चौक १८
चला मराठे रणीं पहुडले जे आणिक सुर ते ।
पावन खिंडिंत बसून तीसह जाति नभः पंथें ॥१॥
श्री बाजीचें रक्त पेरिलें खिंडिंत त्या काळा ।
म्हणुन रायगडिं स्वातंत्र्याचा थोर वृक्ष झाला ॥२॥
अहो बंधु हो पूर्वज ऐसे स्वतंत्र रणगाजी ।
स्वतंत्र त्या पूर्वजां शोभतां वंशज कां आजी ॥३॥
विनवि विनायक समजुनि घ्यावें यांतिल अर्थाला ।
चरण घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥४॥
स्वदेश नाहीं स्वराज्य नाहीं धिक् या देहाला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥५॥