Namaskar!!! Internetchya mahitijaalatil tumha aamha sarvani kuthetari kevhatari vachalela marathitala theva ekatra swaroopat punha tumachyasrakhya marathi premi lokansamor sadar karnyahca ek prayatna... Tumha sarvana awadel ashi aasha aahe, ani awadlyas punha ya ha!!
Tuesday, January 31, 2012
Tuesday, January 17, 2012
लता मंगेशकर ह्यांचे पत्र
'रंग माझा वेगळा' हा भटांचा कवितासंग्रह वाचून लता मंगेशकर ह्यांनी पाठवलेले पत्र येथे सादर आहे.
रंग माझा वेगळा - लता मंगेशकर ह्यांचे पत्र
प्रिय सुरेश भट यांस सस्नेह नमस्कार.
'रंग माझा वेगळा' हा तुमचा कवितासंग्रह तुम्ही अगत्यपूर्वक मला वाचण्यासाठी दिला त्याबद्दल आभारी आहे. तुमच्या कविता वाचायला सुरवात केली आणि एका बैठकीतच सगळा संग्रह मी वाचून काढला. तुमच्या कविता वाचताना सहज जे विचार मनात आले ते तुम्हाला लिहून कळवावे असे वाटले; म्हणून हे पत्र लिहीत आहे.
तुमच्या कवितांमागे वेगवेगळ्या प्रेरणा आहेत। काही कविता देशात घडणाऱ्या राजकीय आणि सामाजिक संघर्षाच्या प्रसंगी लिहिल्या गेल्या आहेत. या कवितांमधून तुमच्या देशभक्तीचा, मायदेशाविषयीच्या, तुमच्या उत्कट भावनेचा आविष्कार झाला आहे. या कवितांतली 'उषःकाल होता होता काळरात्र झाली! अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली!' ही कविता मला अतिशय आवडली. देश स्वतंत्र झाला. पण स्वातंत्र्याबरोबर आपली जी सुखस्वप्ने साकार व्हायला हवी होती ती तशी झाली नाहीत. उलट स्वातंत्र्योत्तर काळामध्ये देशात अनेक दुष्ट प्रवृती मोकाट सुटल्या आणि सामान्य माणूस साध्या सुखाला, साध्या आनंदालाही वंचित झाला. यामुळे संवेदनक्षम कविमनात उसळलेला प्रक्षोभ या कवितेत अतिशय परिणामकारक रीतीने प्रकट झाला आहे. इथे तुमची चीड, तुमचे दुःख, तुमची वेदना अगदी अस्सलपणे जाणवते आणि ती काळजाला जाऊन भिडते. या सुंदर कवितेबद्दल तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच.
तुमच्या कवितासंग्रहातला दुसरा भाग आहे तो गीतांचा। मी कविता आवडीने वाचते. गीतांशी तर गाण्यामुळे हरघडी संबंध येतो. गीते वाचताना मला ती त्यातल्या काव्यकल्पनांमुळे जशी आकर्षून घेतात तसे त्यात दडलेले 'गाणे'ही मला सारखे जाणवत राहते.'वाजवी मुरली देवकिनंदन', 'आज गोकुळात रंग खेळतो हरी', सखि मी मज हरपुन बसले ग',मालवून टाक दीप चेतवून अंग अंग' ही तुमची गीते वाचताना मला त्यातले काव्य तर आवडलेच; पण त्याची 'गेयता' ही मला हृदयंगम वाटली. काव्य आणि गीत यांना जोडणारा धागा गेयता हाच आहे. गीताची शब्दरचना निर्दोष असली, नादमधुर मृदू व्यंजनांनी युक्त असली, तर असे गीत चाल बसवण्याच्या दृष्टीने संगीतदिग्दर्शकाला प्रेरणा देते आणि गायकालाही ते गीत गाताना मनाला थोडे समाधान वाटते. 'आज गोकुळात रंग खेळतो हरी', 'मेंदीच्या पानवर', मालवून टाक दीप चेतवून अंग अंग' ही तुमची गीते ध्वनीमुद्रिकेसाठी गाताना मला हे समाधान आणि आनंद फार मोठ्या प्रमाणात लाभला. चांगल्या गीताची माझ्या दृष्टीने एक कसोटी आहे. गीत इतके चांगले 'बांधलेले' असावे की ते 'बांधले' आहे हेही कुणाच्या ध्यानात येऊ नये. तुमची गीते रचनेच्या दृष्टीने इतकी देखणी व बांधेसूद आहेत की, ती ह्या कसोटीला निश्चित उतरतात. गीत कोणते आणि काव्य कोणते; गीतकाराला कवी मानावे की नाही, या वादात माझ्यासारखीने पडू नये. पण उत्तम गीत हे मुळात उत्तम काव्यही असावे लागते, ह्याबद्दल सहसा कुणाचा मतभेद होईल असे वाटत नाही. तसेच पाहिले तर ज्ञानदेवांसारख्या महाकवीची 'मोगरा फुलला', 'पैल तो गे काऊ कोकताहे','धनु वाजे घुणघुणा' किंवा 'रुप पाहता लोचनी' ही गीतेच आहेत ना? पण त्यातले काव्य अस्सल नाही असे कोण म्हणेल? 'मालवून टाक दीप' हे तुमचे गीत उत्तम काव्य म्हणूनही तितकेच परिणामकारक आहे. 'बोल रे हळू उठेल चांदण्यावरी तरंग' यासारखी त्या गीतातली रम्य आणि नाजूक कल्पना गीत गाऊन झाल्यावरही दीर्घकाळ माझ्या मनात तरळत राहिली.
तुमच्या या संग्रहातला सर्वात चांगला वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे तो अर्थात गझल शैलीतील कवितांचा। तुमचे व्यक्तिमत्त्व, तुमच्या व्यथा, तुमच्या वेदना, जीवन जगताना तुम्हाला आलेले कटु अनुभव, या साऱ्यांचा अर्क तुमच्या गझलवजा कवितांत उतरला आहे. उर्दू कवींच्या गझला तुम्ही मनःपूर्वक वाचल्या आहेत. इतकेच नव्हे तर गझलांची जी एक 'खासियत' असते ती तुम्ही स्वतःमध्ये उत्तम मुरवली आहे. एक प्रकारची बेहोषी, बेफिकिरी, जगाबद्दलची पूर्ण उपेक्षा, आपल्याच भावविश्वात रमून राहण्याची वृत्ती, तीव्र एकाकीपणा, आणि अंतःकरणात सलत राहिलेल्या दुःखाची जिवापाड जपणूक-
दुभंगून जाता जाता मी अभंग झालो!
चिरा चिरा जुळला माझा, आत दंग झालो!
किरण एक धरुनी हाती मी पुढे निघालो!
अन् असाच वणवणतांना मी मला मिळालो!
सर्व संग सुटले, माझा मीच संग झालो...
.... ..... .....
आता मजेने बोलतो भेटेल त्या दुःखासवे!
सांभाळूनी घेती मला माझी इमाने आसवे
.... .... ....
केव्हातरी दात्यापरी आयुष्य हाका मारते
मीही असा भिक्षेकरी ज्याला न काही मागवे!
तुमच्या कवितांमध्ल्या काही कल्पना विलक्षण नाजूक आणि सुंदर आहेत, अशा कल्पना माझ्या कायम ध्यानात राहून गेल्या आहेत!
मनांतल्या मनात मी तुझ्यासमीप राहतो!
तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो!
तसा न राहिला आता उदास एकटेपणा
तुझीच रूपपल्लवी जिथे तिथे करी खुणा
कसा हवेत मी तुझ्यासवे सळाळतो
.... .... ......
अशीच येथली दया हवेत चांचपायाची
अशीच जीवनास या पुन्हा क्षमा करयाची
.... ..... ......
असेच निर्मनुष्य मी जिथेतिथे असायचे
मनात सूर्य वेचुनी जनांत मावळायचे!
..... ..... .......
मग सुटेल मंद मंद वासंतिक पवन धुंद
माझे आयुष्य तुझ्या अंगणात टपटपेल!
गझल म्हटल्यावर त्यातल्या भावनांचे हे स्वरूप प्रथम मनात उभे राहते। गझलेची ही विशिष्ट वृत्ती तुम्ही पूर्णपणे आत्मसात केली आहे. उर्दू गझल भरपूर वाचण्यात एक धोका असा होता की, तुमच्या कविता या उर्दू किंवा फारसी गझलांचे नुसते अनुकरण होणेही शक्य होते. तथापि तुमच्या बाबतीत तसे ते झाले नाही. तुमच्या या प्रकारच्या कविता अगदी तुमच्या स्वतःच्या आहेत. गझल वाचनामुळे तुमची विशिष्ट कवीवृत्ती सिद्ध झाली असे म्हणण्यापेक्षा, मुळ तुमची मनोवृत्ती गझलेच्या भावविश्वाशी मिळतीजुळती असल्यामुळे गझल शैलीतील कवितेचे माध्यम भावाविष्कारासाठी तुम्ही निवडले, असे म्हटल्यास ते अधिक बरोबर होईल. उर्दू गझल मीही पुष्कळ वाचले आहेत. म्हणूनच तुमच्या या कवितांचा अस्सलपणा मला सारखा जाणवत राहिला. त्यांतली वेदना सच्चेपणाने जिवाला भिडत राहिली.
तुमच्या या कवितांत एकही कविता अशी नाही की, ज्यातली एखादी तरी ओळ, एखादी तरी भावना, एखादी तरी कल्पना सतत स्मरणात राहात नाही! अशा ओळी, भावना, कल्पना द्यायच्या म्हटल्या तर कितीतरी लिहावे लागेल, पण त्यातल्या त्यात काही ओळी लिहिल्याशिवाय मला राहावतच नाही:
माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी
माझियासाठी न माझ्या पेटण्याचा सोहळा!
... .... .... ....
स्वप्न माझे भंगले अन् गीत माझे संपले
हाय! बाजारांत माझा हुंदका आणू नका!
'जन्माच्या वेळीचे सावध पान पान','कार्याचा बंद कापूर', स्वप्नदेशी अनावर झालेली नीज' अशा कोमल आणि काव्यमय शब्दचित्रांचा ठसा मनावर एकदा उमटला की, तो कधी पुसून जात नाही।
तुमचा कवितासंग्रह वाचताना एक विचार राहून राहून मनात येत होता. काव्य असो की गाणे असो, त्यात बुद्धीच्या चपल आणि तल्लख विलासापेक्षा भावनेचा जिवंत जिव्हाळा हाच शेवटी आपल्या मनाला जाऊन भिडतो आणि नंतर दीर्घकाळ तिथे रेंगाळत राहतो. मी अनेक कवींची काव्ये वाचली आहेत, आणि अनेक गायकांचे गाणे ऐकले आहे.बौद्धिक चमत्कृतीची कसरत करून गायिलेले गाणे किंवा केवळ तल्लख बुद्धिविलास दाखवणारे काव्य हे रसिकाला चकित करते. स्तिमित करते, थक्क करते पण जे गाणे किंवा जे काव्य कलवंताच्या हृदयातून उत्फूर्तपणे प्रकट होते, ते ऐकणाऱ्याच्या काळजाचा ठाव घेते. त्यात भपका नसेल, डामडौल नसेल, ऐट नसेल, पण त्यातली उत्कटता, सरलता आणि प्रांजळपणा हा सरळ आपल्या हृदयात प्रवेश करतो. आपल्या संतकवींचे कितीतरी काव्य असे उत्कट आणि हृदयस्पर्शी आहे. आपल्या बालकवींच्या काव्यात हे साधेपणाचे सौंदर्य होते. उर्दू कवींमध्ये मीर हा याच प्रकारचा कवी होऊन गेला. गायनाच्या संदर्भात बोलायचे झाले तर आपल्याकडच्या शास्त्रीय गायकांमध्ये बडे गुलाम अलीखाँसाहेब यांच्या गाण्यात हा भावनेचा जिव्हाळा होता. चित्रपट संगीत गाणाऱ्या कलावंतामध्ये सहगल हा या जातीचा कलावंत होता. त्याच्यापाशी डोळे दिपवणारी बौद्धिक चमत्कृती नव्हती; पण तो जे गाई ते रसिकांच्या हृदयाचा तत्काळ वेध घेई. तुमच्या कवितेबद्दल मला हेच म्हणावेसे वाटते. या कविता वाचताना त्यातल्या दुःखाची, वेदनेची कळ ही वाचकालाही जाणवण्याइतकी निश्चित प्रभावी आहे. या कवितांत बुद्धीला दिपवणारे चमत्कार नसतील; पण भावनेचा जिवंत जिव्हाळा, मनाचा निर्मळ प्रांजळपणा त्यात खचित आहे. आणि त्याचे मोल फारच मोठे आहे.
असो. पत्र लांबले. पण तुम्ही ज्या स्नेहभावनेने तुमचा कवितासंग्रह मला वाचायला दिला, त्याच मनमोकळेपणाने मी हा संग्रह वाचताना जे जे काही मला जाणवले ते तुम्हाला लिहून कळवले आहे. आज प्रसिद्ध होणाऱ्या मराठी कवितासंग्रहांमध्ये तुमचा हा संग्रह आपल्या स्वतंत्र वैशिष्ट्यामुळे निश्चित ठळकपणाने उठून दिसेल. त्याचा 'रंग वेगळा' आहे हे तर खरेच; पण तो रंग अस्सलही आहे. कारण, तुमच्या हृदयातले रक्त त्यात मिसळलेले आहे!
- लता मंगेशकर
Sunday, January 15, 2012
Pulanche Prastavik
रंग माझा वेगळा - प्रास्ताविक पु लं देशपांडे
भाग - २ आपल्याला जे जाणवले ते अधिकाधिक लोकांना जाणवावे, ही भटांची ओढ मला
मोलाची वाटते. त्यांची कविता दुर्बोधतेकडे झुकत नाही. ती कविता ज्या असंख्य
हृदयात ओतावी त्या हृदयांची संख्या ते कुठल्याही अटींनी मर्यादित करीत
नाहीत. ' साधीसुधी ही माणसे माझ्या कवित्वाची धनी' असे
ते केवळ उपचार म्हणून म्हणत नाहीत. त्या साध्यासुधा माणसाशी साधायच्या
संवादाचे मोल मोठे वाटते. एकच तुकारम किंवा एकच गालिब अनपढांपासून ते
पंडितांपर्यंत सर्व थरांतल्या आणि सर्व दर्जांच्या बुध्दिमत्तेच्या
आस्वादकांना नाना प्रकारांनी भेटत असतो.तो प्रकार कुठला असेना, पण त्यातले
काहीतरी जाणवल्याशिवाय त्या कवितेशी संवादच सुरु होत नाही. कवितेतली
दुर्बोधता सापेक्ष मानली तरी सुबोधता हा दुर्गुण मानायला नको.
वनस्पतिशास्त्रज्ञाला चारचौघांपेक्षा फूल अधिक कळत असेल, पण त्याचे रंग आणि
गंध प्रथम सामान्य माणसासारखे त्याला आकर्षित करत नाहीत असे थोडेच आहे?सुरेश भटांची कविता आजच्या नवकवितेच्या एका निराळ्या वातावरणातही आपले अंगभूत सौंदर्य घेऊन प्रगटली आहे. नाना प्रकारच्या भाववृत्तींचा इथे फुलोरा आहे. 'निराशेचा गाव आंदण आम्हासी' म्हणणा-या संतांची निराशाही त्यांच्या कवितेतून दिसते. अशा एका क्षणी तेही
'भोवताली हिंडती ही माणसे प्रेतांपरी।
काय ह्या गावातसुध्दा एकदा होती घरे?'
असा उदास करणारा प्रश्न विचारीत येतात. असा प्रश्न काय त्यांना
एकट्यालाच पडतो? जगताना आपल्या संवेदना बोथट होऊ न देता जगणा-या सगळ्यांनाच
आज पडणारा हा प्रश्न आहे. मुंबईसारख्या विराटपुरीत राहणा-या माणसाला
भोवतालचे दैन्यदु:ख पाहण्याचे टाळत टाळत जगावे लागते. एखाद्या क्षणी
स्वत:चे डोळे असून न पाहता आणि कान असून न ऐकता कंठावे लागणारे जिणे आठवले
की, त्या हिंडणा-या प्रेतातले आपणही एक आहोत याची जाणीव होते. त्या
प्रश्नाला लाभलेले काव्यरूप त्यालाही अधिक उत्कटतेने अस्वस्थ करून जाते.
असले नाना प्रकारच्या भावनांचे तरंग उठवणे हेच कलेचे कार्य असते. ते तरंग
आहार-निद्रा-भय-मैथुनाच्या पलीकडच्या जीवनाचे स्मरण देऊन जातात. चांगले
साहित्य माणसाला अंतर्मुख करते. ज्या गलबल्यात आपल्याला जावे लागते त्यातून
दूर पळून जाणा-या माणसाची सुटका नाही. त्यात पुरुषार्थही नाही. सुरेश
भटांची वृत्ती पळून जाणा-यांतली नाही. जगताजगता क्षणभर त्रयस्थ होणा-याची
आहे. जीवनाच्या नाटकात भूमिका करताकरता क्षणभर प्रेक्षक होणा-याची आहे.
खेळताखेळता तो आपलाच खेळ पाहणा-याची आहे. कलावंताचे 'स्व'-तंत्रपण ते हेच!
ही वृत्ती, ' गुंतुनी गुंत्यात सार्या, पाय माझा मोकळा'
ह्या ओळीत भटांनी व्यक्त केली आहे. जीवनाच्या ह्या खेळाचा कुणी अर्थ काढू
नये. तसा त्याला स्वत:चा असा अर्थ नाही. पण खेळाचा आनंद आहे.
जिंकण्या-हारण्याचे सुखदु:ख आहे. कधी नाजूक बंधने आहेत. त्या बंधनात गुंतणे
आहे. त्यातून सुटणे आहे. तुटणे आहे. हे सारे माणसाने निर्माण केले आहे. पण
हा सारा खेळ आहे याची जाणीव ठेऊन जगणे ह्या लेकुरंच्या गोष्टी नव्हेत!
सुरेश भटांची कविता वाचताना आनंद वाटतो तो या खेळात आपल्याला पडणारे प्रश्न
त्यांच्या कवितेतून नेमके शब्दरूप लेवून प्रकटताना, अर्थात नित्य
व्यवहारातल्या प्रश्नांपलीकडले प्रश्नही सगळ्यांनाच पडतात असे नाही. सुरेश
भटांनी विचारलेला ' हे खरे ही ते खरे?' हा प्रश्न सनातन
आहे. जीवनाच्या या विराट स्वरूपाकडे क्षणभर थबकून पाहण्याची बुध्दी
होणा-यांना हा प्रश्न नेहमीच पडतो. सुरेश भटांसारख्या प्रतिभावंत कवीला हा
प्रश्न पडलेला पाहून अशा लोकांना त्या कवीशी अधिक जवळीक साधल्याचा आनंद
होतो. जीवनात गवसलेल्या आत्मसंतोषापेक्षा न गवसल्याच्या रुखरुखीतूनच काव्य
जन्माला येते.काय ह्या गावातसुध्दा एकदा होती घरे?'
ही अलौकिक रुखरुखच काव्यनिर्मितीमागली मुख्य प्रेरणा असते. कुणी ती शब्दांच्या चिमटीत पकडू पाहतो, कुणी रंगरेषांतून धरू लागतो. हे वेड गतानुगतिकतेतून जाणा-याला कळत नाही. आणि कळत नाही म्हणून रुचत नाही मग :
'हालती पालीपरी ह्या जिभा
सारखी माझ्यावरी थुंकी उडे!'
सारखी माझ्यावरी थुंकी उडे!'
हा अनुभव कलावंताला भोगावा लागतो. गडकर्यांनी जिला दीड वितीची दुनिया म्हटले आहे, तिच्यातच सगळ्यांना जगायचे आहे. पण त्या दुनियेतही कुणाच्या तरी डोळ्यातले चांदणे वेचण्याचे क्षण लाभलेले असतात. त्याच दुनियेत ' अमृतमय मी, अमृतमय तू, तनमन अमृत बनते ग' असा अनुभव लाभतो. सुरेश भटांच्या 'दिवंगताच्या गीता'तली ही ओळ मला फार महत्त्वाची वाटली. तसा तो आला नसता, नव्हे तो येत असतो याची जाणीव सुरेश भटांच्या काव्यातून उमटली नसती, तर त्यांच्या करुण गाण्याची रडगाणी झाली असती. त्यांची कविता ही एक कारुण्य जोपासण्याचा किंवा अश्रूंची आरास मांडण्याचा षौक झाला असता.
ही जाणीव आहे म्हणूनच सुरेश भट हे केवळ वैयक्तिक सुखदु:खाच्या अनुभूतींना फुंकर घालीत बसणारे कवी नाहीत. आजच्या समाजातले रगडणारे आणि रगडले जाणारे ह्या द्वंद्वाची त्यांना जाणीव आहे. 'तसू तसू दु:खे घेऊन जोजवीत बसणा-यांची आत्मवंचना ज्याची त्याला गाडणार आहे', यावर त्यांचा विश्वास आहे. त्यांचे गीत हे त्यांची वैयक्तिक दु:खे गात फुटावे असे त्यांना वाटत नाही. त्या गीतात 'दु:ख संतांचे भिनावे' अशी त्यांना ओढ आहे. असल्या व्यापक दु:खाची जाणीवच कवीला ख-या अर्थाने 'कवी' ही पदवी प्राप्त करून देत असते. समान दु:खांच्या अनुभूतीतून माणूस माणसाच्या अधिक जवळ येतो. त्यांनी तुकारामाला उद्देशून-
'तुझे दु:ख तुझे नाही
तुझे दु:ख अमचे आहे!'
असे म्हटले आहे. सुरेश भटांची कविता वाचताना त्यातल्या दु:खाच्या
अनुभूती आस्वादकालाही आपल्या वाटतात. संवाद सुरू होतो. इथेच भटांचे यश
आहे. मराठी कवितेच्या प्रांतात भटांना असली आपुलकी आजही लाभली आहे. यापुढे
हा आप्तवर्ग खूप वाढेल अशी प्रसादचिन्हे आहेत.तुझे दु:ख अमचे आहे!'
'हाय तरीही बाजारी माझी तोकडी पुण्याई
नाही अजून तेवढी माझ्या शब्दांना कल्हई'
नाही अजून तेवढी माझ्या शब्दांना कल्हई'
असे जेव्हा सुरेश भट म्हणतात तेव्हा त्यातला उपरोध लक्षात घ्यायला हवा. ही भटांची तक्रार मानू नये! पितळ उघडे पडण्याची भीती असणार्यांना कल्हईची गरज पडावी! इथला सुवर्णकण बावनकशी आहे!
'माझीया मस्तीत मी जाई पुढे
मात्र बाजारु कवाडे लावती !'
बाजारू कवाडे लावली तरी आज अनेक अंत:करणांची कवाडे सुरेश भटांच्या
कवितांसाठी उघडली गेली आहेत. आणखीही उघडली जाणारच आहेत. दीड वीत छातीच्या
माणसांनादेखील आपल्या छातीची रुंदी आणखी खूप वाढावी अशी ओढ नसते असे आपण का
मानावे? तसा एखादा क्षण येऊन त्या चातकाने चोच वासली तर त्या चोचीत धार
टाकण्याचे काम कवीलाच करावे लागेल, ह्याची जाणीवही भटांना आहे. म्हणूनच ते
वैयक्तिक अहंकाराने नव्हे, तर जो 'अमृताचा वसा' त्यांनी हाती धरला आहे
त्यामागच्या कर्तव्याच्या जबाबदारीने म्हणतात की, ' आज मी जे गीत गातो ते उद्या गातील सारे!'
त्या उद्याची वाट न पाहता त्यांची गीते आजच लोक गाऊ लागले आहेत. काहीतरी
मनात शिरल्याखेरीज कोण कशाला गाईल? आणि अशी कानातून किंवा डोळ्यांतून मनात
शिरलेली गीते कधी व्यर्थ का असतात?मात्र बाजारु कवाडे लावती !'
दुनियेतील बाजारू कवाडे नाहीशी करण्याचे सामर्थ्य आणि दु:खाचे देखणेपण पाहण्याची ताकद असल्या गाण्यातूनच मिळत असते!
- पु.ल.देशपांडे.
Friday, January 13, 2012
Pulanche Prastavik
सुरेश भट - मराठीतील एक नावाजलेले कवी, मराठी गझलकार.
सुरेश भटांचा एक प्रसिद्ध कवितासंग्रह आहे रंग माझा वेगळा... ह्या कविता संग्रहाला पु लं सारख्या मान्यवराची प्रस्तावना लाभली आहे. पुलंचे अष्टपैलू लिखाण प्रस्तावने पासून वंचित कसे राहील.. आपल्या सर्वांसाठी रंग माझा वेगळा ह्या भटांच्या कवितासंग्रहाची पुलंनी लिहिलेली प्रस्तावना येथे देत आहे...
रंग माझा वेगळा - प्रास्ताविक पु लं देशपांडे
भाग - १ सुरेश भटांची कविता एके दिवशी मला अचानक भेटली. आणि नवकविBhaतेच्या या जमान्यात नुसत्या निरनिराळया रंगांचेच नव्हे, तर निराळ्या अंतरंगाचे दर्शन घडले. त्या कवितेचा बाज आणि साज हा सर्वस्वी निराळा नव्हता. पण प्रसादगुणाशी फरकत घेतलेल्या आधुनिक कवितेच्या युगात या हृदयीचे त्या हृदयी घातल्यासारखी ही कविता एकदम मनात शिरली. मुंबईच्या जीवघेण्या उकाड्यात राहणाऱ्या माणसाच्या अंगावरून दैवयोगाने किंवा निर्सगाच्या एखाद्या चमत्कारामुळे दक्षिण वायूची शीतल झुळुक जावी, तशी ही कविता अंगावरून गेली. या कवितेतले फुललेपण मोहक होते. कळ उमटवून जाण्याची तिची ताकद ही मोठी होती. आणि त्या कवितेत सुगंधासारखे गाणे दडलेले होते. हे गाणे अंगभूत होते. कुणीतरी गायल्यामुळे त्या कवितेचे गाणे झाले नव्हते. कवितेला गाण्याची सक्ती नसावी. तशी तिला कसलीच सक्ती नसावी. किंबहुना, आजकाल कानावर जी गीते पडतात ती तर बळजबरीने सुरांच्या चरकातून पिळून काढल्यासारखी वाटतात. त्या गीतांना गात गात हिंडण्याची अंतरी ओढ नसते. ते शब्द सुरांसाठी तहानलेले नसतात. त्यांत सूर कोंदलेले नसतात. कोंबलेले असतात. गीतात सुरांतून उमटण्याचा अपरिहार्यपणा असावा लागतो. त्याउलट काही कविता अत्यंत समंजसपणाने गाण्यापासून आपण होऊन दूर राहिलेल्या असतात.त्यांचे व्यक्तिमत्त्वच असे असते की, सुरांचा त्यांना नुसता भार व्हावा. चांगली नवकविता अशी जाणूनबुजून गाण्यापासून दूर राहिली. तिच्या स्वभावातच गाणे नव्हते. तरीही ती कविता असते. गाणे आणि कविता यांचे अतूट नाते नाही. जसे प्रासनुप्रास किंवा यमक यांचे नाही तसेच. पण म्हणून गाणे होऊन प्रकटणार्या कवितेचे दिवस संपले असे मानू नये किंवा गाणे होऊन प्रगटल्यामुळे तिचा दर्जा दुय्यम झाला अशाही गैरसमजात राहू नये.
एक काळ असा होता, की कविता कानावाटेच मनात शिरायची, कवी कविता गाऊन दाखवीत. मुद्रणकला आली आणि कवितेचा छापील ठसा डोळ्यापुढे येऊ लागला. ती आता मूकपणाने डोळ्यावाटे मनात शिरू लागली. मनातल्यामनात कविता वाचायची पद्धत तशी अलीकडली. ठशातून कागदावर उमटणार्या अक्षरांमुळे तोडांतून उमटणा-या नादातून होणारा संस्कार नाहीसा झाला. एका परिमाणाची वजाबाकी झाली. हे उणेपण घालवण्याचा र. कृ. जोशी यांच्यासारख्या कवीने त्या अक्षरांना चित्ररूप देऊन प्रयत्न केला. गीतांनी सुरांतून उमटावे तसे त्यांच्या कवितांना त्यांनी चित्राक्षरातून उमटवण्याचा प्रयत्न केला. जोशी चित्रकार असल्यामुळे त्यांनी मोठ्या सहजतेने चित्ररूपातून कविता प्रगटवली. भटांची कविता गाता येते. ते काही गायनकलापारंगत गायक नाहीत. पण अंतःकरणात मात्र सुरांचा झरा आहे. एका अर्थी ते भारतीय संगीतकलेचा पध्दतशीर अभ्यास केलेले गायक नाहीत हे चांगले आहे. अजाणतेपणे काही सूर त्यांच्या मनात वसतीला उतरतात. फुलाला चित्रकलेचा डिप्लोमा असावा लागत नाही. ज्या मातीतून ते रूजून फुलते तिथेच ते रंग दडलेले असतात. भटांच्या मनोभूमीत निसर्गतःच सूर दडलेले आहेत. ज्यांची कविता अशीच गात गात फुटते असे माझ्या आवडीचे बा.भ.बोरकर हे कवी आहेत. हा पिंडाचा धर्म आहे. पु.शि.रेग्यांना भेटणारे शब्द जसे फुलपाखरांसारखे त्यांच्या अवतीभवती हिंडत असल्यासारखे वाटतात, तसे सुरेश भटांच्या भोवती सूर हिंडत असावेत. मनात फुलत जाण्या-या कवितेने या सुरांच्या गळ्यात गळा घालून केव्हा गायला सुरवात केली, हे सुरेश भटांनाही कळत नसावे. म्हणूनच त्यांच्या गीतांना चाली देणार्या संगीत दिग्दर्शकंच्या गुणवत्तेविषयी मला आदर असूनही सुरेश भट त्या गीताबरोबर जन्माला आलेल्या चालीत जेव्हा आपली कविता गाऊ लागतात त्यावेळी ते गीत आणि गाणे एक होऊन जाते. कुणीही कुणावर मात करण्यासाठी येत नाही. वरपांगी अत्यंत अस्ताव्यस्त दिसणारा हा कवी, त्यातही ती कविता आणि त्याचे ते गाणे हे तिन्ही घटक त्या कवितेच्या संपूर्ण आस्वादाला आवश्यक असावेत असे वाटायला लागते. हे एक विलक्षण अद्वैत आहे.
सुरेश भटांना गझलेचे फार मोठे आकर्षण आहे. कारण 'गझल' हे केवळ वृत्त नसून ती एक वृती आहे. एव्हढेच नव्हे; तर तिच्यात एक सूक्ष्म आणि सुंदर निवृतीही आहे. स्वार्थाच्या बाजारात धडपडण्याला आपण चुकीने प्रवृती मानीत आलो आहोत.क्षणभर निवृत्त मनाने जगाकडे पाहता आल्याशिवाय खरी या प्रवृत्तीची गोडी कळत नाही. जीवनात नुसतेच चार उंदीर उड्या मारीत धावत सुटणे म्हणजे प्रवृत्त जीवन जगणे नव्हे. निव्वळ जगण्यासाठी म्हणून करावी लागणारी धावपळ कुणाला सुटली आहे? पण काही क्षण त्या धावपळीचा अन्वयार्थ लावण्यासाठी काढावे लागतात. असा एखादा क्षण कवितेला जन्म देऊन जातो. त्यातूनच मग आजूबाजूच्या दगडधोंड्यांच्या पलीकडे दिसायला लागते. न कळत ते पहात राहण्याचा, शोधत राहण्याचा छंद जडतो. आणि मग आपले नाते निराळ्याच ठिकाणी जडते. बिलंदरपणाने जगणार्या माणसांत असा माणूस कलंदर ठरतो. ही कलंदरी सहजसाध्य नसते किंवा तिचे सोंगही आणून भागत नाही. ती अनुभूती जेव्हा कवितेतून उमटते, त्यावेळी तिचा अस्सलपणा आणि नकलपणा बरोबर ओळखता येतो.
सुरेश भट जेव्हा ' मागता न आले म्हणुनी राहीलो भिकारी' म्हणतात, त्यावेळी त्या न मागण्याच्या वृत्तीमुळे लाभलेली श्रीमंती त्यांना गवसली आहे हे उमजते. लाचारांचा आचारधर्म पाळला नाही म्हणून त्यांना दु:ख नाही, तर अपार आनंद आहे. आणि सुरेश भटांशी ज्यांचा परिचय आहे त्यांना त्यांच्या फाटक्या खिशाचा हेवा वाटावा अशी वस्तुस्थिती आहे. कवीचे काव्य आणि त्याचे खाजगी जीवन यांची सांगड घालायचा कुणी आग्रह धरू नये. माणूस चोवीस तास एकच भाववृत्ती घेऊन जगत नसतो. काव्यातल्या कलंदरीचा, सौंदर्याचा, चांगल्या आनंदाचा ध्यास प्रत्यक्ष जीवनात घेऊन जगणारा कवी भेटला की अधिक आनंद वाटतो एवढेच. निखळ साहित्य समीक्षेत 'सुरेश भटांची कविता' एवढाच चर्चेचा विषय असावा. माझ्या सुदैवाने मला सुरेश भटांचा स्नेह लाभला. त्यामुळे त्यांची कविता ऐकताना आणि वाचताना सुरेश भट नावचा एक मस्त माणूस मला निराळा काढता येत नाही, ही एक वैयक्तिक मर्यादा मानवी.
सुरेश भटांचा हा कलंदरपणा लोभसवाणा आहे. कारण कवितेइतकेच त्यांचे कविता ऐकणार्यांवर म्हणजे जीवनातल्या व्यवहारी धडपडीपलीकडे काही पाहू इच्छिणार्यांवर, ते जाणून घेण्याची तळमळ असणार्यांवर प्रेम आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी काव्य गायनाच्या कार्यक्रमातून ते ज्या तबियतीने विदग्ध समाजापुढे आपली कविता गातात, तितक्याच मस्तपणाने उमरावतीतल्या रिक्षेवाल्यांच्या अड्ड्यांवरही गातात. रसिकांच्या मळ्यांना पडणारी कुंपणेही त्यांच्या मनाला पटत नाहीत. तशी ही उर्दू शायरीची खास परंपरा आहे. गावात मुशायरा असला की, उर्दू शायरीच्या सर्व थरांतल्या शौकिनांची तिकडे झुंबड उडते. हा हा म्हणता गावातला तहसीलदार आणि टांगेवाला मैफिलीतले मानिंद होऊन बसतात.
सुरेश भटांच्या कवितेत पंडित-अपंडित दोघांना हलवण्याचे सामर्थ्य आहे. गझलेमध्ये नाट्याचा मोठा अंश असतो, तसे या गीतप्रकाराचे नाटकातल्या स्वगताशी फार जवळचे नाते आहे.एखादी अकल्पित कलाटणी श्रोत्यांना मजेदार धक्का देऊन जाते. गीतातल्या ओळींच्या डहाळ्यांना अनपेक्षित रीतीने मिळणारे झोके धुंदी आणत असतात. शब्दचमत्कृती असते. कल्पनांचे बेभान उड्डाण असते. सुरेश भटांच्या गझलांमधून उर्दू शायरीशी नाते जुळवणार्या अशा गोष्टी आढळतात. पण उर्दू शायरीत जी कित्येकदा शब्दांची आतषबाजी कवितेला गुदमरवून टाकते ते प्रकार त्यांच्या कवितेत होत नाही. उगीचच उर्दू-फारसी शब्दांची पेरणी करून आपल्या कवितेला गझलेच्या बाह्यांगाशी जुळवले नाही. आकर्षण वाढवायला त्यांनी उगाचच उर्दू भाषेचा सुरमा घालून आपली गझल नटवली नाही. अशा प्रकारे उर्दू शेरोशायरीची नक्कल करणारी गीते आणि शेर मराठीत लिहिले गेले आहेत. असल्या फारसी-उर्दू पोशाखाची सुरेश भटांना गरज वाटली नाही. कारण ज्या अनुभूतीतीने त्यांची कविता उमलते त्या अनुभूतीशी इमान ठेवणे त्यांनी महत्त्वाचे मानले. मानले म्हणण्यापेक्षा ती वृत्तीच त्यांच्या मनातून गझल उमटवीत आली. मराठीत माधव ज्युलियनांच्या नंतर लुप्त होत गेलेल्या या काव्यप्रकाराचा जीर्णोध्दार करावा, हा हेतू कधीही नव्हता. एक तर कुठलाही काव्यप्रकार रूढ करावा असा संकल्प सोडून कविता रचणार्या कवीविषयी मला चिंताच वाटत असते. मग तो वृत्तात लिहिणारा असो की मुक्तछंदात! कवितेने जन्माला येताना आपला छंद,वृत्त, जाती जे काही असेल ते घेऊन प्रगट व्हावे. इथे प्रश्न असतो तो मनात उत्कटत्वाने काय सलते आहे याचा! आत खळबळ कसली उडाली आहे हे महत्त्वाचे. सहजतेने उमटलेल्या शार्दुलविक्रीडिताला हट्टाने रचलेल्या मुक्तछंदापेक्षा जुनेपणाचा शेरा मारून खाली ढकलण्याचे कारण नाही. वाल्मिकीचा शोक मंदाक्रांतेतून न प्रकटता अनुष्टुभातून का प्रकटला याला कारण नाही. आणि कालिदासाच्या यक्षाचा विरह अनुष्टुभातून न प्रकटता मंदाक्रांतेतून आला म्हणून काही बिघडले नाही! कवीच्या अंतःकरणातून उमटलेल्या वेदनेची प्रत आपल्याला जाणवली कशी हे महत्त्वाचे! दुबळ्या हाती तलवार आली म्हणून त्याला शूर म्हणू नये, तसे समर्थहाती लेखणी आली म्हणून सामर्थ्य उणे मानू नये.
क्रमशः
- पु लं देशपांडे.
Tuesday, January 3, 2012
नुतनवर्षाभिनंदन !!!
नमस्कार मित्रांनो,
तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!! येणारे नवीन वर्ष आपणा सर्वांसाठी आनंद, सुख, समाधान, शांती आणि प्रगती आणणारे असावे. थोडक्यात जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात....
तसे २०११ चे वर्ष फार काही हिरावून घेवून गेले.. संगीत, नाट्य आणि सिने जगताच्या रसिकांचे डोळे पाणावले तसे टेक्नो फ्रिक लोकांचेही पाणावले... आणि ही कधी न भरून निघणारी खळगी तयार झालीत. कित्येकांचे नावे घेवू, संगीत जगतातील पंडीत भीमसेन जोशी, त्यांचे शिष्य माधव गुडी आणि श्रीकांत कुलकर्णी, श्रीनिवास खळे, जगजीत सिंग, पंडीत भूपेन हजारिका, उस्ताद सुलतान खान ... नाट्य जगताचे प्रभाकर पणशीकर, सत्यदेव दुबे आणि रसिका जोशी... सिने जगताचे देव आनंद, शम्मी कपूर... क्रिकेटमधील नवाब पतौडी... चित्रकार मकबूल फिदा हुसेन... व्यंगचित्रकार मारिओ मिरांडा... साहित्यिक इंदिरा गोस्वामी, श्रीलाल शुक्ला... कवयित्री वंदना विटणकर... सत्यसाईबाबा...
शास्त्रज्ञ डॉ. पी. के. अय्यंगार... राजकारणी पी. सी. अलेक्झांदर...छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष.. चित्रपट निर्माते मणी कौल... आणि स्टीव्ह जॉब...
हे सगळे लोक २०११ वर्षाने आपल्यापासून हिरावून घेतले... पिकली पाने ती कधीतरी गळणारच... पण हा तर चक्क सडाच पडलाकी, तोही आपापल्या क्षेत्रामधे उच्च कामगिरी केलेल्यांचा... ह्या सर्वांची उणीव जगाला नक्कीच भासेल..
ह्या सर्व नावाजलेल्या व्यक्तींना सादर प्रणाम करून, त्यांचे आशीर्वाद मागत आपणही नवीन वर्षाचे स्वागत करुया....
आपला लोभ कायम रहावा ही सदिच्छा :)
नुतनवर्षाभिनंदन !!!
तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!! येणारे नवीन वर्ष आपणा सर्वांसाठी आनंद, सुख, समाधान, शांती आणि प्रगती आणणारे असावे. थोडक्यात जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात....
तसे २०११ चे वर्ष फार काही हिरावून घेवून गेले.. संगीत, नाट्य आणि सिने जगताच्या रसिकांचे डोळे पाणावले तसे टेक्नो फ्रिक लोकांचेही पाणावले... आणि ही कधी न भरून निघणारी खळगी तयार झालीत. कित्येकांचे नावे घेवू, संगीत जगतातील पंडीत भीमसेन जोशी, त्यांचे शिष्य माधव गुडी आणि श्रीकांत कुलकर्णी, श्रीनिवास खळे, जगजीत सिंग, पंडीत भूपेन हजारिका, उस्ताद सुलतान खान ... नाट्य जगताचे प्रभाकर पणशीकर, सत्यदेव दुबे आणि रसिका जोशी... सिने जगताचे देव आनंद, शम्मी कपूर... क्रिकेटमधील नवाब पतौडी... चित्रकार मकबूल फिदा हुसेन... व्यंगचित्रकार मारिओ मिरांडा... साहित्यिक इंदिरा गोस्वामी, श्रीलाल शुक्ला... कवयित्री वंदना विटणकर... सत्यसाईबाबा...
शास्त्रज्ञ डॉ. पी. के. अय्यंगार... राजकारणी पी. सी. अलेक्झांदर...छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष.. चित्रपट निर्माते मणी कौल... आणि स्टीव्ह जॉब...
हे सगळे लोक २०११ वर्षाने आपल्यापासून हिरावून घेतले... पिकली पाने ती कधीतरी गळणारच... पण हा तर चक्क सडाच पडलाकी, तोही आपापल्या क्षेत्रामधे उच्च कामगिरी केलेल्यांचा... ह्या सर्वांची उणीव जगाला नक्कीच भासेल..
ह्या सर्व नावाजलेल्या व्यक्तींना सादर प्रणाम करून, त्यांचे आशीर्वाद मागत आपणही नवीन वर्षाचे स्वागत करुया....
आपला लोभ कायम रहावा ही सदिच्छा :)
नुतनवर्षाभिनंदन !!!