Wednesday, June 29, 2011

Shivlilamrut - Adhyay 12

अध्याय बारावा
श्रीगणेशाय नमः ॥

ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रवर्ण ॥ ब्रह्मचारी गृहस्थ वानप्रस्थ पूर्ण ॥ स्त्री बाल वृद्ध तरुण ॥ सर्वी शिवकीर्तन करावे ॥१॥
शिवस्मरण नावडे अणुमात्र ॥ तो अत्यंजाहूनि अपवित्र ॥ तो लेइला वस्त्रे अलंकार ॥ जेवी प्रेत श्रृंगारिले ॥२॥
तेणे भक्षिले जे अन्न ॥ जैसे पशु भक्षिती यथेष्ट तृण ॥ जैसे मयूराअंगी नयन ॥ तैसेचि नेत्र तयाचे ॥३॥
वल्मीकछिद्रवत कर्ण ॥ द्रुमशाखावत हस्त चरण ॥ त्याची जननी व्यर्थ जाण ॥ विऊनी वांझ जाहली ॥४॥
जो शिवभजनाविण ॥ तो जावो समुद्रांत बुडोन ॥ अथवा भस्म करो वडवाग्न ॥ का सर्प डंखो तयासी ॥५॥
तरी श्रवणी धरावी आवडी ॥ जैसी पिपीलिका गुळासी न सोडी ॥ अर्ध तुटे परी न काढी ॥ मुख तेथूनि सर्वदा ॥६॥
की चुकला बहुत दिवस सुत ॥ तेवढाचि पोटी प्रीतिवंत ॥ त्याची शुभवार्ता ऐकता अकस्मात ॥ धावती जेवी मातापिता ॥७॥
अमृताहूनि व्राड ॥ गोष्टी लागती कर्णासी गोड ॥ तैसे कथाश्रवणी ज्याचे न पुरे कोड ॥ सर्व टाकोनि जाईजे ॥८॥
गावासी गेला प्राणनाथ ॥ प्रिया पतिव्रता वाट पाहात ॥ तो पत्र आले अकस्मात ॥ धावे श्रवण करावया ॥९॥
निर्धनासी सापडे धन ॥ की जन्मांधासी आले नयन ॥ की तृषेने जाता प्राण ॥ शीतळ जीवन मिळाले ॥१०॥

ऐसे ऐकावया कथा पुराण ॥ धावावे सर्व काम टाकून ॥ चिंता निद्रा दूर करून ॥ श्रवणी सादर बैसावे ॥११॥
वक्ता पंडित चातुर्यखाणी ॥ नमावा तो सद्गुरु म्हणोनी ॥ की हा शंकरचि मानूनी ॥ धरिजे पूजनी आदर ॥१२॥
सुरभीच्या स्तनांतूनि अवधारा ॥ सुटती जैशा सुधारसधारा ॥ तैसा वक्ता वदता शिवचरित्रा ॥ कर्णद्वारे प्राशिजे ॥१३॥
वक्ता श्रेष्ठ मानावा अत्यंत ॥ न पुसावे भलते पाखंडमत ॥ नसते कुतर्क घेवोनि चित्त ॥ न शिणवावे सर्वथा ॥१४॥
न कळे तरी पुसावे आदरे ॥ सांगेल ते श्रवण करावे सादरे ॥ उगेच छळिता पामरे ॥ तरी ते पिशाचजन्म पावती ॥१५॥
वक्त्यासी छळिता अवधारा ॥ तरी दोष घडे त्या नरा ॥ पुराणिकावेगळे नमस्कारा ॥ न करावे सभेत कोणासी ॥१६॥
मध्येचि टाकूनि कथाश्रवण ॥ उगाचि गर्वै जाय उठोन ॥ तरी अल्पायुषी जाण ॥ संसारी आपदा बहु भोगी ॥१७॥
कुटिल खळ पापी धूर्त ॥ तो मुख्य श्रोता न करावा यथार्थ ॥ दुग्ध पिता सर्वांगी पुष्ट होत ॥ परी नवज्वरिता विषवत ते ॥१८॥
तैसा श्रवणी बैसोन ॥ कुतर्क घेवोनि करी कथाखंडण ॥ त्याचे व्यर्थ गेले श्रवण ॥ नरकासी कारण पुढे केले ॥१९॥
कथेत न बोलावे इतर ॥ मन करावे एकाग्र ॥ कथेची फलश्रुति साचार ॥ तरीच पावती बैसता ॥२०॥

वस्त्रे अलंकार दक्षिणासहित ॥ वक्ता पूजावा प्रीती अत्यंत ॥ धन देता कोश बहुत ॥ भरे आपुला निर्धारे ॥२१॥
रत्ने देता बहुत ॥ नेत्र होती प्रकाशवंत ॥ अलंकारे प्रतिष्ठा अत्यंत ॥ श्रोतयांची वाढतसे ॥२२॥
एवं पूजिता षोडशोपचार ॥ तेणे तुष्टमान होय उमावर ॥ जे जे पदार्थ अर्पावे साचार ॥ त्यांचे कोटिगुणे प्राप्त होती ॥२३॥
त्यासी कदा नाही दरिद्र ॥ शेवटी स्वपदा नेईल भालचंद्र ॥ कुथेसी येता पाउले टाकी निर्धार ॥ पापसंहार पदोपदी ॥२४॥
मस्तकी उष्णीष घालूनि ऐकती ॥ तरी जन्मांतरी बाळपक्षी होती ॥ म्हणाल उष्णीष काढिता नये सभेप्रती ॥ तरी मुख्य पल्लव सोडावा ॥२५॥
जे विडा घेवोनी ऐकती ॥ तरी यमकिंकर त्यांसी जाचिती ॥ नाना यातना भोगविती ॥ मूळ व्यासवचन प्रमाण हे ॥२६॥
एक बैसती उगेचि श्रवणी ॥ निद्रा मोडावी बहुत प्रकारेकरूनी ॥ अंतर सद्गद नेत्री यावे पाणी ॥ मग निद्रा कैची स्पर्शेल ॥२७॥
वरी जीवन काय व्यर्थ लावून ॥ जैसे एकांती द्रव्य आपुले पूर्ण ॥ तेथे घडता जागरण ॥ निद्रा न ये प्राणिया ॥२८॥
निद्रा लागली दारुण ॥ तरी उभे ठाकावे कर जोडून ॥ निद्रा न ये तो उपाय करून ॥ मुख्य श्रवण करावे ॥२९॥
वक्त्याहूनि उंच आसन तत्त्वता ॥ तेथे न बसावे धरूनि अहंता ॥ हे न मानिती ते काग तत्त्वता ॥ जगपुरीष भक्षिती ॥३०॥

जे बैसती वीरासन घालून ॥ ते होती वृक्ष अर्जुन ॥ पाय पसरिती त्यांसी सूर्यनंदन॥ शुष्ककाष्ठे झोडी बळे ॥३१॥
जे सांगताही न ऐकती ॥ बळेचि जेठा घालूनि बैसती ॥ त्यांसी यमदूत बांधोनि नेती ॥ नेऊनि टाकिती नरककुंडी ॥३२॥
जो श्रवणी निजे दाटून ॥ तो उपजे अजगर होऊन ॥ बैसे नमस्कार केलियावाचून ॥ वंशवृक्ष होय तो ॥३३॥
कथेत बोले भलत्या गोष्टी ॥ तो मंडूक होय सदा वटवटी ॥ हर्षे टाळिया न वाजवी हटी ॥ होय कष्टी संसारी ॥३४॥
जे शिवकीर्तन हेळसिती ॥ ते शतजन्मी सारमेय होती ॥ दुरुत्तरे बोलती निश्चिती ॥ जन्मायेती सरड्याच्या ॥३५॥
जे श्रवणी न होती सादर ॥ ते अन्य जन्मी होती सूकर ॥ जे इच्छेदिती शिवचरित्र ॥ ते वृकयोनी पावती ॥३६॥
वक्त्यासी देता आसन ॥ शिवसन्निध बैसे जावोन ॥ वस्त्रे देता अन्न ॥ प्राप्त होय तयाते ॥३७॥
करिता कथापुराणश्रवण ॥ भक्ति वैराग्य ये आंगी पूर्ण ॥ यदर्थी कथा सुगम जाण ॥ जेणे अनुताप उपजे मनी ॥३८॥
दक्षिणेकडे ग्राम एक अमंगळ ॥ त्याचे नाव मुळीच बाष्कळ ॥ सर्वधर्मविवर्जित केवळ ॥ स्त्रीपुरुष जारकर्मी ॥३९॥
धर्म नाहीच अणुमात्र ॥ अनाचारी परम अपवित्र ॥ जपतपविवर्जित अग्निहोत्र ॥ वेदशास्त्र कैचे तेथे ॥४०॥

वेद आणि शास्त्र ॥ हे विप्राचे उभय नेत्र ॥ एक नाही तरी साचार ॥ एकाक्ष तयासी बोलिजे ॥४१॥
वेदशास्त्र उभयहीन ॥ तो केवळ अंधचि जाण ॥ असो त्या नगरीचे लोक संपूर्ण ॥ सर्वलक्षणी अपवित्र ॥४२॥
तस्कर चाहाड आणि जार ॥ मद्यपी मार्गघ्न दुराचार ॥ मातापितयांचा द्रोह करणार ॥ एवं सर्वदोषयुक्त जे ॥४३॥
त्या ग्रामींचा एक विप्र ॥ नाम तयांचे विदुर ॥ वेश्येसी रत अहोरात्र ॥ कामकर्दमी लोळत ॥४४॥
त्याची स्त्री बहुला नाम ॥ तीही जारिणी अपवित्र परम ॥ एके जारासी असता सकाम ॥ भ्रतारे जपोनि धरियेली ॥४५॥
जार पळाला सत्वर ॥ तीस भ्रतारे दिधला मार ॥ यथेष्ट लत्ता मुष्टिप्रहार ॥ देता बोले काय ते ॥४६॥
म्हणे तू झालासी जार ॥ मीही तेचि करिते निरंतर ॥ मग बोले तो विप्र विदुर ॥ तुवा द्रव्य अपार मिळविले ॥४७॥
ते द्रव्य दे मजलागून ॥ मी देईन वारांगनेसी नेऊन ॥ ती म्हणे मी देऊ कोठून ॥ ऐकता मारी पुढती तो ॥४८॥
मग तिचे अलंकार हिरोनी घेत ॥ घरची सर्व संपत्ति नेत ॥ ते वारांगनेसी देत ॥ तेही समर्पी जाराते ॥४९॥
ऐसे दोघेही पाप आचरत ॥ तो विदुर विप्र पावला मृत्य ॥ यमदूती नेला मारीत ॥ बहुत जाचिती तयाते ॥५०॥

कुंभीपाकादि परम दुःख ॥ भोगूनिया तो शतमूर्ख ॥ मग विंध्याचळाच्या दरीत देख ॥ भयानक पिशाच जाहला ॥५१॥
आळेपिळे आंगासी देत ॥ हिंडे क्षुधातृषापीडित ॥ रक्तवर्ण अंग त्याचे समस्त ॥ जेवी शेंदूर चर्चिला ॥५२॥
वृक्षासी घेत टांगून ॥ सवेंचि हात देत फिरे वन ॥ रक्तपिती भरोन ॥ सर्वांग त्याचे नासले ॥५३॥
कंटकवन परम दुर्धर ॥ न मिळे कदा फळमूळ आहार ॥ आपुल्या पापाचे भोग समग्र ॥ भोगी विदुर विप्र तो ॥५४॥
इकडे बहुला धवरहित ॥ एक होता तियेसी सुत ॥ तो कोणापासोनि झाला त्वरित ॥ ते स्मरण नाही तियेसी ॥५५॥
तव आले शिवरात्रिपर्व ॥ गोकर्णयात्रेसी चालिले सर्व ॥ नानावाद्ये वाजती अभिनव ॥ ध्वज पताका मिरविती ॥५६॥
शिवनामे गर्जती दास ॥ वारंवार करिती घोष ॥ कैचा उरेल पापलेश ॥ सर्वदा निर्दोष सर्व जन ॥५७॥
त्यांच्या संगती बहुला निघत ॥ सवे घेवोनि धाकटा सुत ॥ गोकर्णक्षेत्र देखिले पुण्यवंत ॥ झाले पुनीत सर्व जन ॥५८॥
बहुलेने स्नान करून ॥ घेतले महाबळेश्चराचे दर्शन ॥ पुराणश्रवणी बैसली येऊन ॥ तो निरूपण निघाले ॥५९॥
जी वनिता जारीण ॥ तीस यमदूत नेती धरोन ॥ लोहपरिघ तप्त करून ॥ स्मरगृहामाजी घालिती ॥६०॥

ऐसे बहुला ऐकोनी ॥ भयभीत झाली तेचि क्षणी ॥ अनुताप अंगी भरोनी ॥ रडो लागली अट्टाहासे ॥६१॥
मग पुराणिकासी समस्त ॥ आपुला सांगे वृत्तांत ॥ झाले जे जे पापाचे पर्वत ॥ ते निजमुखे उच्चारी ॥६२॥
अंतकाळी यमकिंकर ॥ ताडण करितील मज अपार ॥ ते वेळी मज कोण सोडविणार ॥ दुःख अपार सोसू किती ॥६३॥
स्वामी माझे कापते शरीर ॥ काय करू सांगा विचार ॥ गळा पाश घालूनि यमकिंकर ॥ करिती मार तप्तशास्त्रे ॥६४॥
नानापरी विटंबिती ॥ असिपत्रवनी हिंडविती ॥ उफराटे बांधोनि टांगिती ॥ नरककुंडी अधोमुख ॥६५॥
ताम्रभूमी तापवून ॥ त्यावरी लोळविती नेऊन ॥ तीक्ष्ण शस्त्रे आणोन ॥ पोटामाजी खोविती ॥६६॥
तीव्र धूम्र करून ॥ वरी टांगिती नेऊन ॥ भूमीत मज रोवून ॥ तप्तशरे मार करिती ॥६७॥
तप्तशूळावरी घालिती ॥ पायी चंडशिळा बांधिती ॥ महानरकी बुडविती ॥ सोडवी कोण तेथूनी ॥६८॥
बहुलेसी गोड न लागे अन्न ॥ दुःखे रडे रात्रंदिन ॥ म्हणे मी कोणासी जाऊ शरण ॥ आश्रय धरू कोणाचा ॥६९॥
कोण्या नरकी पडेन जाऊन ॥ मग त्या ब्राह्मणाचे धरी चरण ॥ सद्गुरु मज तारी येथून ॥ आले शरण अनन्य मी ॥७०॥

मग गुरु पंचाक्षर मंत्र ॥ सांगे बहुलेप्रति सत्वर ॥ शिवलीलामृत सुरस फार ॥ श्रवणी करवी शिवद्वारी ॥७१॥
मग तिणे सर्व ग्रंथ ॥ गुरुमुखे ऐकिला प्रेमयुक्त ॥ श्रवणभक्ति अवध्यात ॥ श्रेष्ठ ऐसे जाणिजे ॥७२॥
सत्संगे होय निःसंग ॥ निःसंगे निर्मोह सहज मग ॥ निर्मोहत्वे निश्चित उद्वेग ॥ कैचा मग तयासी ॥७३॥
बहुला झाली परम पवित्र ॥ शिवनाम जपे अहोरात्र ॥ दोष न उरे तिळमात्र ॥ शुचिर्भूत सर्वदा ॥७४॥
तव्याचा जाय बुरसा ॥ मग तो सहजचि होय आरसा ॥ की लोह लागता परिसा ॥ चामीकर सहजचि ॥७५॥
की अग्नीत काष्ठ पडले ॥ मग सहजचि अग्निमय झाले ॥ गंगेसी वोहळ मिळाले ॥ गंगाजळ सहजचि ॥७६॥
जप करिता पाप जाय निःशेष ॥ ज्ञानाहूनि ध्यान विशेष ॥ श्रवणाहूनि मननास ॥ सतेजता सहजचि ॥७७॥
मननाहूनि निदिध्यास ॥ त्याहूनि साक्षात्कार समरस ॥ मग तो शिवरूप निर्दोष ॥ संशय नाही सर्वथा ॥७८॥
बहुला निर्दोष होऊन ॥ श्रवणे झाली सर्वपावन ॥ जिव्हेने करू लागली शिवकीर्तन ॥ मग कैचे बंधन तियेसी ॥७९॥
श्रवणे थोर पावन होत ॥ श्रवणे याचि जन्मी मुक्त ॥ नलगे तीर्थाटण श्रम बहुत ॥ श्रवणे सार्थक सर्वही ॥८०॥

ज्यासी न मिळे सत्समागम श्रवण ॥ त्याणे करू जावे तीर्थाटण ॥ नलगे अष्टांगयोगसाधन ॥ करावे श्रवण अत्यादरे ॥८१॥
योग याग व्रत साधन ॥ नलगे काहीच करावे जाण ॥ नवविद्या भक्ति पूर्ण ॥ श्रवणेचि हाता येतसे ॥८२॥
चारी वर्ण चारी आश्रम ॥ श्रवणेचि पावन परम ॥ असो बहुलेसी संतसमागम ॥ सर्वांहूनि थोर वाटे ॥८३॥
गुरूची सेवा अखंड करी ॥ त्यावरी राहिली गोकर्णक्षेत्री ॥ जटावल्कलाजिनधारी ॥ तीर्थी करी नित्यस्नान ॥८४॥
सर्वांगी भस्मलेपन ॥ करी पुण्यरुद्राक्षधारण ॥ सर्व प्राप्त सोडोनिया जाण ॥ गुरुसेवा केली तिणे ॥८५॥
नित्य गोकर्णलिंगाचे दर्शन ॥ गोकर्णक्षेत्र पुण्यपावन ॥ तेथींचा महिमा विशेष पूर्ण ॥ तृतीयाध्यायी वर्णिला ॥८६॥
स्वयातिकीर्तिपुष्टिवर्धन ॥ बहुलेने तिन्ही देह जाळून ॥ तेचि भस्म अंगी चर्चून ॥ झालीपावन शिवरूपी ॥८७॥
शंकरे विमान धाडिले ते काळी ॥ बहुला शिवपदाप्रती नेली ॥ एवढी पापीण उद्धरिली ॥ चतुर्दश लोक नवल करिती ॥८८॥
सदाशिवापुढे जाऊन ॥ बहुलेने केले बहुत स्तवन ॥ मग अंबेची स्तुति करिता पावन ॥ झाली प्रसन्न हिमनगकन्या ॥८९॥
म्हणे इच्छित वर माग त्वरित ॥ येरी म्हणे पति पडला अधोगतीत ॥ कोठे आहे न कळे निश्चित ॥ पावन करोनि आणी येथे ॥९०॥

मग ते त्रिजगज्जननी ॥ अंतरी पाहे विचारूनि ॥ तो विंध्याचळी पिशाच होऊनी ॥ रडत हिंडे पापिष्ट ॥९१॥
मग बहुलेसी म्हणे भवानी ॥ जाई सवे तुंबर घेऊनी ॥ पतीस आणी विंध्याद्रीहूनी ॥ श्रवण करवी शिवकथा ॥९२॥
मग गेली विंध्याचळा ॥ तव पिशाच नग्न देखिला ॥ धरोनि वृक्षासी बांधिला ॥ तुंबरे बळे करोनिया ॥९३॥
मग वल्कली काढून ॥ सप्तस्वर मेळवून ॥ आरंभिले शिवकीर्तन ॥ ऐकता पशुपक्षी उद्धरती ॥९४॥
शिवकीर्तनरसराज ॥ तुंबरे मात्रा देता सतेज ॥ सावध झाला विदुरद्विज ॥ म्हणे मज सोडा आता ॥९५॥
मग सोडिताचि धावोन ॥ तुंबराचे चरण ॥ म्हणे स्वामी धन्य धन्य ॥ केले पावन पापियाते ॥९६॥
स्त्रियेसी म्हणे धन्य तू साचार ॥ केला माझा आजि उद्धार ॥ मग तुंबरे शिवपंचाक्षर ॥ त्यासी मंत्र उपदेशिला ॥९७॥
त्याचा करिता जप ॥ तव विमान आले सतेजरूप ॥ विदुर झाला दिव्यरूप ॥ स्त्रीसहित विमानी बैसला ॥९८॥
आणिली शिवापाशी मिरवत ॥ दोघेही शिवचरणी लागत ॥ लवण जळी विरत ॥ तैसी मिळत शिवरूपी ॥९९॥
जळी विराली जळगार नभी नाद विरे सत्वर ॥ तैसी बहुला आणि विदुर ॥ शिवस्वरूप जाहली ॥१००॥

ज्योती मिळाली कर्पूरी ॥ गंगा सामावली सागरी ॥ ब्रह्मस्वरूपी निर्धारी ॥ विराली ऐक्य होऊनिया ॥१॥
शिवमंत्र शिवकथाश्रवण ॥ शिवदीक्षा रुद्राक्षधारण ॥ भस्मलेपने उद्धरोन ॥ गेली किती संख्या नाही ॥२॥
भस्मांतूनि निघाला भस्मासुर ॥ शिवद्रोही परम पामर ॥ त्याचा कैसा केला उद्धार ॥ ते चरित्र सांग कैसे ॥३॥
हे शिवपुराणी कथा सुरस ॥ श्रोती ऐकावी सावकाश ॥ कैलासी असता महेश ॥ प्रदोषकाळी एकदा ॥४॥
भस्म स्वकरी घेऊन ॥ आंगी चर्ची उमारमण ॥ तव एक खडा लागला तो शिवे जाण ॥ भूमीवरी ठेविला ॥५॥
नवल शिवाचे चरित्र ॥ तेथेचि उत्पन्न झाला असुर ॥ नाम ठेविले भस्मासूर ॥ उभा सदा कर जोडूनी ॥६॥
म्हणे वृषभध्वजा सदाशिवा ॥ मज काही सांगिजे सेवा ॥ शंभु म्हणे मज नित्य येधवा ॥ चिताभस्म आणोनि देइजे ॥७॥
नित्य नूतन आणी भस्म ॥ हीच सेवा करी उत्तम ॥ ऐसी आज्ञा होता परम ॥ भस्मासुर संतोषला ॥८॥
कर्मभूमीस नित्य येवोन ॥ वसुंधरा शोधी संपूर्ण ॥ जो शिवभक्तपरायण ॥ लिंगार्चन घडले ज्यासी ॥९॥
शिवरात्री सोमवार प्रदोष ॥ सदा ऐके शिवकीर्तन सुरस ॥ त्याचेचि भस्म भवानीश ॥ अंगीकारी आदरे ॥११०॥

जे का भक्त अभेद प्रेमळ ॥ त्यांच्या मुंडांची करी माळ ॥ स्मशानी वैराग्य वाढे प्रबळ ॥ म्हणोनि दयाळ राहे तेथे ॥११॥
लोक स्मशानाहूनि घरा येती ॥ वैराग्य जाय विषयी जडे प्रीती ॥ म्हणोनि उमावल्लभे वस्ती ॥ केली महास्मशानी ॥१२॥
पंचभूते तत्त्वांसहित ॥ पिंडब्रह्मांड जाळोनि समस्त ॥ सर्व निरसूनि जे उरत ॥ स्वात्मसुख भस्म तेचि ॥१३॥
तेचि ब्रह्मानंदसुख सोज्ज्वळ ॥ ते भस्म चर्ची दयाळ ॥ तो अमूर्तमूर्त कृपाळ ॥ षड्विकाररहित जो ॥१४॥
अस्ति जायते वर्धते विपरिणमते ॥ अपक्षीयते निधन षड्विकार समस्त ॥ शिव परब्रह्म शाश्वत ॥ विकाररहित निर्विकार जो ॥१५॥
जो षडगुणैश्वर्यसंपन्न ॥ यशःश्रीकीर्तिविज्ञान ॥ औदार्य वैराग्य संपूर्ण ॥ ऐसे कोठे असेना ॥१६॥
आणिक षट्चिन्ह मंडित ॥ ती ऐका सर्वज्ञ पंडित ॥ कर्तृत्व नियंतृत्व भोक्तृत्व ॥ विभुत्व साक्षित्व सर्वज्ञत्व पै ॥१७॥
या चिन्ही मंडित शुद्ध ॥ शंकर परिपूर्ण ब्रह्मानंद ॥ मायाचक्रचाळक शुद्ध ॥ त्रिविधभेदरहित जो ॥१८॥
भक्तरक्षणार्थ सगुण ॥ शंभु झाला चैतन्यघन ॥ तेणे भस्मासुर निर्मून ॥ धाडिला भस्म आणावया ॥१९॥
ऐसे नित्य आणिता चिताभस्म ॥ असुर मातला मदे परम ॥ गो ब्राह्मण देखे मनुष्य उत्तम ॥ म्हणे संहारूनिया टाकू हे ॥१२०॥

हे संहारूनिया सकळ ॥ असुरराज्य करावे सबळ ॥ जाऊनिया निर्जरमंडळ ॥ शक्र कमलोद्भव जिंकावे ॥२१॥
विष्णु आणि धूर्जटी ॥ हेही संहारावे शेवटी ॥ त्रिभुवन जिंकिल्यापाठी ॥ मीच इंद्र होईन ॥२२॥
ऐसी मनी बांधोनी गाठी ॥ कैलासा गेला तो कपटी ॥ म्हणे ऐकतोस धूर्जटी ॥ भस्म सृष्टी न मिळे कोठे ॥२३॥
चार लक्ष मनुष्य योनी पाहे ॥ नित्य सवा लक्ष घडामोड होये ॥ शोधिली सर्व अवनी हे ॥ परी भस्म शुद्ध न मिळेचि ॥२४॥
ऐसी कपटभक्ति दावी परम ॥ म्हणे माझा टळतो नित्यनेम ॥ तुज अर्पावे चिताभस्म ॥ तरी एक वर्म सुगम असे ॥२५॥
म्हणे हरा पंचवदना ॥ विरूपाक्षा त्रिपुरच्छेदना ॥ उमावल्लभा नागभूषणा ॥ वरप्रदान दे माते ॥२६॥
मज देई एक वर ॥ ज्याच्या माथा ठेवीन कर ॥ तो भस्म व्हावा निर्धार ॥ कार्य फार साधे येणे ॥२७॥
म्हणोनि लोटांगण घालित ॥ इतुके माझे चालवी व्रत ॥ निष्कपट शिव भोळानाथ ॥ वर द्यावया सिद्ध झाला ॥२८॥
मग बोले हिमनगराजकुमारी ॥ हा नष्ट परम दुराचारी ॥ यासी वर देता धरित्री ॥ भस्म करील निर्धारे ॥२९॥
महाशब्द करावयाची हौस ॥ तो पातला फाल्गुनमास ॥ आधीच वाटपाड्या चोरास ॥ निरोप दिधला भूभुजे ॥१३०॥

आधीच जारकर्मी रत ॥ त्यासी प्रभुत्व दिधले स्त्रीराज्यात ॥ की मद्यपियासी दावीत ॥ सिंदीवन साक्षेपे ॥३१॥
मर्कटासी मद्यपान ॥ त्यात झाले वृश्चिकदंशन ॥ त्याहीवरी भूत संचरले दारुण ॥ मग अन्योन्य वते जेवी ॥३२॥
यालागी हा तामसी असुर ॥ यास न द्यावा कदापि वर ॥ षडास्य गजास्य वीरभद्र ॥ नंदिकेश्वर हेचि सांगे ॥३३॥
परम भोळा शंकर ॥ आमचे लेकरू भस्मासुर ॥ यासी द्यावा अगत्य वर ॥ तो अन्यत्र रहाटी न करीच ॥३४॥
म्हणे बाळका तुज दिधला वर ॥ ऐसे ऐकतचि असुर ॥ उडे नाचे आनंदे थोर ॥ त्रिभुवनामाजी न समाये ॥३५॥
मृत्युलोकासी आला सत्वर ॥ मग करीत चालिला संहार ॥ संत भक्त गो विप्र ॥ शोधून भस्म करीतसे ॥३६॥
मस्तकी हस्त ठेविता तत्काळ ॥ भस्म होय न लगे वेळ ॥ ऋषिचक्र शोधूनि सकळ ॥ भस्म करी एकदांचि ॥३७॥
छपन्न देश शोधीत ॥ चमूसहित भूभुज समस्त ॥ भस्म करी क्षणात थोर अनर्थ ओढवला ॥३८॥
कुटुंबासहित ब्राह्मण ॥ गिरिविवरी बैसती लपोन ॥ पृथ्वी उध्वंस संपूर्ण ॥ बाहेर कोण न फिरेचि ॥३९॥
जैसा श्येनपक्षी अकस्मात ॥ पक्षी धरोन संहारीत ॥ तैसा अंतरिक्ष येवोनि त्वरित ॥ मस्तकी हस्तस्पर्श करी ॥१४०॥

महायोद्धा रणपंडित समरी जिंकी कृतांत ॥ परी भस्मासुरापुढे बलहत ॥ काहीच न चले युक्ती त्या ॥४१॥
जैसा पाखांडी खळ तत्वता ॥ तो नावरे बहुता पंडिता ॥ तैसी त्या असुरापुढे पाहता ॥ न चले युक्ति कवणाची ॥४२॥
असुर करितो नित्य संहार ॥ शिवासी न कळे समाचार ॥ भस्म नेऊनि दे सत्वर ॥ महानम्र होय तेथ ॥४३॥
सवेचि ये मृत्युलोका ॥ मनी धरिला ऐसा आवाका ॥ त्रिदशांसहित शचीनायका ॥ भस्म करावे यावरी ॥४४॥
मग कमलोद्भव कमलाकर ॥ शेवटी भस्म करावा गंगाधर ॥ उमा त्रिभुवनांत सुंदर ॥ हिरोनि घ्यावी वृद्धाची ॥४५॥
पृथ्वी पडली उद्वस ॥ मिळाल्या प्रजा ऋषि आसमास ॥ सर्वांचे भय पावले मानस ॥ पुरुहुतास शरण आले ॥४६॥
मग मघवा सकळांसहित ॥ पद्मजाप्रति गार्हाणे सांगत ॥ तो म्हणे क्षीराब्धिजामात ॥ त्यास सांगू चला आता ॥४७॥
अक्षज नाम इंद्रियज्ञान ॥ ते ज्याने केले आधी दमन ॥ म्हणोनि अधोक्षज नाम त्यालागून ॥ अतींद्रियद्रष्टा तो ॥४८॥
ऐसा जो अधोक्षज ॥ जवळी केला वैकुंठराज ॥ गार्हाणे सांगती प्रजा द्विज ॥ भस्मासुराचे समस्त ॥४९॥
मग समस्तासहित नारायण ॥ शिवाजवळी सांगे वर्तमान ॥ भस्मासुरे जाळून ॥ भस्म केले सर्वही ॥५०॥

उरलो आम्ही समस्त ॥ इतुक्यांचाही करील अंत ॥ सदाशिवा तुझाही प्रांत बरा न दिसे आम्हांते ॥५१॥
हैमवती करी जतन ॥ ऐकोनि हासला भाललोचन ॥ म्हणे भस्मासुरासी मरण ॥ जवळ आले यावरी ॥५२॥
तुम्ही जावे स्वस्थाना सत्वर ॥ ऐसे बोले जो कर्पूरगौर ॥ तो अकस्मात आला असुर ॥ भस्म घेऊन तेधवा ॥५३॥
आपुले गार्हाणे आणिले येथ ॥ मिळाले ते देखिले समस्त ॥ असुर मान तुकावीत ॥ सरड्याऐसी तयांवरी ॥५४॥
म्हणे जे आले येथ ॥ उद्या भस्म करीन समस्त ॥ मग क्रोधे बोले उमानाथ ॥ भस्मासुरासी तेधवा ॥५५॥
अरे तू अधम असुर ॥ केला पृथ्वीचा संहार ॥ तुज आम्ही दिधला वर ॥ परिणाम त्याचा बरा केला ॥५६॥
असुर क्रोधे बोले ते समयी ॥ तुझी सुंदर दारा मज देई ॥ नातरी तव मस्तकी लवलाहि ॥ हस्त आताचि ठेवितो ॥५७॥
भवानी उठोनि गेली सदनात ॥ असुर ग्रीवा तुकावीत ॥ शिवाच्या माथा ठेवोनि हस्त ॥ तुज नेईन क्षणार्धे ॥५८॥
शिवमस्तकी ठेवावया कर ॥ वेगे धाविन्नला भस्मासुर ॥ प्रजा आणि ऋषीश्वर ॥ पळू लागले दशदिशा ॥५९॥
जो भक्तजनभवभंग ॥ मायालाघवी उमारंग ॥ पळता झाला सवेग ॥ घोरांदर वन घेतले ॥१६०॥

पाठी लागला भस्मासुर ॥ म्हणे जोगाड्या उभा धरी धीर ॥ आजि तुझा करीन संहार ॥ रक्षा लावीन अंगासी ॥६१॥
वेदशास्त्रा न कळे पार ॥ मायाचक्रचाळक अगोचर ॥ त्यासी पामर भस्मासुर ॥ धरीन म्हणे निजबळे ॥६२॥
जो ब्रह्मादिक देवांचे ध्यान ॥ सनकादिकांचे देवतार्चन ॥ त्यासी भस्मासुर आपण ॥ धरीन म्हणे पुरुषार्थे ॥६३॥
त्यासी वाटे धरीन मी आता ॥ दिसे जवळी परी नाटोपे सर्वथा ॥ ऐसा कोटिवर्षे धावता ॥ न लगे हाता सर्वेश्वर ॥६४॥
उणेपुरे शब्द बोलत ॥ शब्दा नातुडे गिरिजाकांत ॥ तर्क कुतर्क करिता बहुत ॥ हाक फोडिता नातुडे ॥६५॥
वेदशास्त्रांचा तर्क चाचरे ॥ घोकिता शास्त्रज्ञ झाले म्हातारे ॥ सकळ विद्या घेता एकसरे ॥ मदनांतक नाटोपे ॥६६॥
जे प्रेमळ शुद्ध भाविक ॥ त्यांचा विकला कैलासनायक ॥ उमेसहित त्यांचे घरी देख ॥ वास करी सर्वदा ॥६७॥
तप बल विद्या धन ॥ या बळे धरू म्हणता ते मूर्ख पूर्ण ॥ कल्पकोटि जन्ममरण ॥ फिरता गणित न होय ॥६८॥
असो अहंकारे भस्मासुर ॥ धावता नाटोपे शंकर ॥ इकडे भवानी इंदिरावर बंधु आपुला स्तवी तेव्हा ॥६९॥
म्हणे कमलोद्भवजनका कमलनयना ॥ कमलनाभा मुरमर्दना ॥ कमलधारका कमलशयना ॥ कमलाभरणा कमलाप्रिया ॥१७०॥

जगद्वंद्या जगद्व्यापका ॥ जनजराजन्ममोचका ॥ जनार्दना जगरक्षका ॥ जगदुद्धारा जलाब्धिशयना ॥७१॥
ऐसे ऐकता माधव मोहिनीरूप धरोनि अभिनव ॥ शिवमनरंजना केशव ॥ आडवा आला असुराते ॥७२॥
शिव न्यग्रोध होऊनि देख ॥ दुरून पाहता झाला कौतुक ॥ मोहिनी देखता असुर निःशंक ॥ भुलोनि गेला तेधवा ॥७३॥
विमानी पहाती समस्त देव ॥ म्हणती हे कैचे रूप अभिनव ॥ अष्टनायिकांचे वैभव ॥ चरणांगुष्ठी न तुळेचि ॥७४॥
नृत्य करीत मोहिनी ॥ असुर तन्मय झाला देखोनी ॥ म्हणे ललने तुजवरूनी ॥ कमला अपर्णा ओवाळिजे ॥७५॥
तुझे देखता वदन ॥ वाटे ओवाळूनि सांडावा प्राण ॥ तुवा नयनकटाक्षबाणेकरून ॥ मनमृग माझा विंधिला ॥७६॥
तुझे पदकमळ जेथे उमटले ॥ तेथे सुवास घ्यावया वसंत लोळे ॥ तुवा पसरोनि श्रृंगारजाळे ॥ आकळिले चित्तमीना ॥७७॥
मज माळ घाली सत्वर ॥ तुझे दास्य करीन निरंतर ॥ मायावेषधारी मुरहर ॥ हास्यवदने बोलतसे ॥७८॥
म्हणे मी तुज वरीन त्वरित पैल तो न्यग्रोधतरु दिसत ॥ माझे त्यात आहे आराध्य दैवत ॥ नवस तेथे केला म्या ॥७९॥
लग्नाआधी पतिसहित ॥ तेथे करावे गायन नृत्य ॥ परी मी जेथे ठेवीन हस्त ॥ तुवा तेथेचि ठेवावा ॥१८०॥

मी जे दावीन हावभाव ॥ तूही तैसेच दावी सर्व ॥ तेथे अणुमात्र उणे पडता देव ॥ क्षोभेल मग तुजवरी ॥८१॥
महाखडतर माझे दैवत ॥ सकळ ब्रह्मांड जाळील क्षणात ॥ असुर तियेसी अवश्य म्हणत ॥ सांगसी तैसा वर्तेन मी ॥८२॥
ऐसा भुलवूनि तयासी ॥ आणिला तो वटच्छायेसी ॥ मग नमूनि दैवतासी ॥ आरंभी नृत्य मोहिनी ॥८३॥
मोहिनी नृत्य करीत ॥ अष्टनायिका तटस्थ पाहत ॥ किन्नर गंधर्व तेथ ॥ गायन ऐकता भुलले ॥८४॥
देव सर्व षट्पद होऊनी ॥ सुवासा तिच्या वेधूनी ॥ गुप्तरूपे गुंजारव करिती वनी ॥ परि ते कामिनी कोणानेणवे ॥८५॥
तिचे सुस्वर ऐकता गायन ॥ विधिकुरंग गेला भुलोन ॥ कुंभिनी सोडूनि करावया श्रवण ॥ कद्रूतनय येऊ पाहे ॥८६॥
मोहिनी जेथे ठेवी हस्त ॥ असुरही तैसेच करीत ॥ आपुले मस्तकी ठेवीत ॥ आत्मकर मोहिनी ॥८७॥
मग असुरेही शिरी हात ॥ ठेविता भस्म झाला तेथ ॥ मोहिनीरूप त्यागूनि भगवंत ॥ चतुर्भुज जाहला ॥८८॥
वटरूप सोडोनि देख ॥ प्रगट झाला तेथे मदनांतक ॥ हरिहर भेटले झाले एक ॥ देव वर्षती सुमनमाळा ॥८९॥
मोहिनीरूप जेव्हा धरिले ॥ पाहोनि शिवाचे वीर्य द्रवले ॥ भूमीवरी पडता अष्टभाग झाले ॥ अष्टभैरव अवतार ते ॥१९०॥

असितांग रुरु चंड क्रोध ॥ उन्मत्त कपाल भीषण प्रसिद्ध ॥ संहारभैरव आठवा सुसिद्ध ॥ अंशावतार शिवाचे ॥९१॥
भस्मासुर वधिला हे मात ॥ प्रगटता त्रैलोक्य आनंदभरित ॥ हस्त धरोनि रमाउमानाथ ॥ येते झाले कैलासा ॥९२॥
अंबिका तात्काळ प्रगटोन ॥ करी हरिहराते वंदन ॥ दोनी मूर्ति बैसवून ॥ करी पूजन हैमवती ॥९३॥
हरिहर नारायण नागभूषण ॥ शिव सीतावल्लभ नाम सगुण ॥ पंचवदन पन्नगशयन ॥ कर्पूरगौर कमलोद्भवपिता ॥९४॥
पिनाकपाणि पीतांबरधर ॥ नीलकंठ नीरदवर्णशरीर ॥ वृंदारकपति वृंदावनासी मधुहर ॥ गोवाहन हर गोविंद ॥९५॥
चंद्रशेखर शंखचक्रधर ॥ विश्वनाथ विश्वंभर ॥ कपालनेत्र कमनीयगात्र ॥ लीला विचित्र दोघांची ॥९६॥
मुरहर मायामल्लहर ॥ व्यालभूषण मोहहर्ता श्रीधर ॥ अंधक मर्दन अघबकहर ॥ असुरमर्दन दोघेही ॥९७॥
सिद्धेश्वर सिंधुजावर ॥ निःसार निरहंकार ॥ नगतनयावर नंदकिशोर ॥ ईशान ईश्वर इंदिरापती ॥९८॥
क्षारवर्णतनु क्षीराब्धिशयन ॥ एक ब्रह्मादिवंद्य एक ब्रह्मानंदपूर्ण ॥ त्या दोघांसी पूजोन ॥ आनंदमय जगदंबा ॥९९॥
आता श्रोते सावधान ॥ पुढे सुरसकथा अमृताहून ॥ वीरभद्रजन्म शिवपार्वतीलग्न ॥ आणि षडाननजन्म असे ॥२००॥

शिवलीलामृत ग्रंथ सिंहस्थ ॥ गौतमी स्वर्धुनी भेटो येत ॥ या अध्यायी कैलासवैकुंठनाथ ॥ एके ठायी मिळाले ॥१॥
तरी ह्या सिंहस्थी भाविक जन ॥ ग्रंथगौतमी करिती स्नान ॥ अर्थजीवनी बुडी देवोन ॥ अघमर्षणी निमग्न जे ॥२॥
श्रीधरस्वामी ब्रह्मानंद ॥ सुखावला तेथेचि प्रसिद्ध ॥ जेथे नाही भेदाभेद ॥ अक्षय अभंग सर्वदा ॥३॥
शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड ॥ स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड ॥ परिसोत श्रोतेअखंड ॥ द्वादशाध्याय गोड हा ॥२०४॥

इति द्वादशोऽध्यायः ॥१२॥
॥श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु॥

Saturday, June 25, 2011

Shivlilamrut - Adhyay 11

अध्याय अकरावा
श्रीगणेशाय नमः ॥

धन्य धन्य तेचि जन ॥ जे शिवभजनी परायण ॥ सदा शिवलीलामृत श्रवण ॥ अर्चन सदा शिवाचे ॥१॥
सूत म्हणे शौनकादिकांप्रति ॥ जे रुद्राक्षधारण भस्म चर्चिती ॥ त्यांच्या पुण्यास नाही मिती ॥ त्रिजगती तेचि धन्य ॥२॥
जो सहस्त्र रुद्राक्ष करी धारण ॥ त्यासी वंदिती शक्रादि सुरगण ॥ तो शंकरचि त्याचे दर्शन ॥ घेता तरती जीव बहू ॥३॥
अथवा षोडश षोडश दंडी जाण ॥ बांधावे रुद्राक्ष सुलक्षण ॥ शिखेमाजी एक बांधावा पूर्ण ॥ शिवस्वरूप म्हणवुनी ॥४॥
त्यावरोनि करिता स्नान ॥ तरी त्रिवेणीस्नान केल्यासमान ॥ असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण ॥ रुद्राक्ष बांधिजे आदरे ॥५॥
कंठी बांधावे बत्तीस ॥ मस्तकाभोवते चोवीस ॥ सहा सहा कर्णी पुण्य विशेष ॥ बांधिता निर्दोष सर्वदा ॥६॥
अष्टोत्तरशत माळ ॥ सर्वदा असावी गळा ॥ एकमुखी रुद्राक्ष आगळा ॥ पूजिता भाग्य विशेष ॥७॥
पंचमुख षण्मुख अष्टमुख ॥ चतुर्दशमुख लक्ष्मीकारक ॥ सकळ मंत्र सुफळ देख ॥ रुद्राक्षजप नित्य करिता ॥८॥
नित्य रुद्राक्षपूजन ॥ तरी केले जाणिजे शिवार्चन ॥ रुद्राक्षमहिमा परम पावन ॥ इतिहास ऐका येविषयी ॥९॥
काश्मीर देशींचा नृप पावन ॥ नामाभिधान भद्रसेन ॥ विवेकसंपन्न प्रधान ॥ परम चतुर पंडित ॥१०॥

प्रजा दायाद भुसुर ॥ धन्य म्हणती तोचि राजेश्वर ॥ लाच न घे न्याय करी साचार ॥ अमात्य थोर तोचि पै ॥११॥
सुंदर पतिव्रता मृदुभाषिणी ॥ पूर्वदत्ते ऐसी लाधिजे कामिनी ॥ सुत सभाग्य विद्वान गुणी ॥ विशेष सुकृते पाविजे ॥१२॥
गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर ॥ शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार ॥ वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार ॥ विशेष सुकृते लाहिजे ॥१३॥
श्रोता सप्रेम चतुर सावधान ॥ यजमान साक्षेपी उदार पूर्ण ॥ काया आरोग्य सुंदर कुलीन ॥ पूर्वसुकृते प्राप्त होय ॥१४॥
असो तो भद्रसेन आणि प्रधान ॥ बहुत करिता अनुष्ठान ॥ दोघांसी झाले नंदन ॥ शिवभक्त उपजतांचि ॥१५॥
राजपुत्र नाम सुधर्म ॥ प्रधानात्मज तारक नाम ॥ दोघे शिवभक्त निःसीम ॥ सावधान शिवध्यानी ॥१६॥
बाळे होऊनि सदा प्रेमळ ॥ अनुराग चित्ती वैराग्यशीळ ॥ लौकिकसंगे ध्रुव अमंगळ ॥ त्यांची संगती नावडे त्या ॥१७॥
पंचवर्षी दोघे कुमर ॥ लेवविती वस्त्रे अलंकार ॥ गजमुक्तमाळा मनोहर ॥ नाना प्रकारे लेवविती ॥१८॥
तव ते बाळ दोघेजण ॥ सर्वालंकारउपाधी टाकून ॥ करिती रुद्राक्ष धारण ॥ भस्म चर्चिती सर्वांगी ॥१९॥
आवडे सर्वदा एकांत ॥ श्रवण करिती शिवलीलामृत ॥ बोलती शिवनामावळी सत्य ॥ पाहाणे शिवपूजा सर्वदा ॥२०॥

आश्चर्य करिती राव प्रधान ॥ यांसी का नावडे वस्त्रभूषण ॥ करिती रुद्राक्षभस्मधारण ॥ सदा स्मरण शिवाचे ॥२१॥
विभूति पुसोनि रुद्राक्ष काढिती ॥ मागुती वस्त्रे भूषणे लेवविती ॥ ते सवेचि ब्राह्मणांसी अर्पिती ॥ घेती मागुती शिवदीक्षा ॥२२॥
शिक्षा करिता बहुत ॥ परी ते न सांडिती आपुले व्रत ॥ राव प्रधान चिंताग्रस्त ॥ म्हणती करावे काय आता ॥२३॥
तो उगवला सुकृतमित्र ॥ घरासी आला पराशर ॥ सवे वेष्टित ऋषींचे भार ॥ अपर सूर्य तेजस्वी ॥२४॥
जो कृष्णद्वैपायनाचा जनिता ॥ त्रिकाळज्ञानी प्रतिसृष्टिकर्ता ॥ जो वसिष्ठाचा नातू तत्त्वता ॥ राक्षससत्र जेणे केले ॥२५॥
जेवी मनुष्ये वागती अपार ॥ तैसेचि पूर्वी होते रजनीचर ॥ ते पितृकैवारे समग्र ॥ जाळिले सत्र करूनिया ॥२६॥
जनमेजये सर्पसत्र केले ॥ ते आस्तिके मध्येचि राहविले ॥ पराशरासी पुलस्तीने प्रार्थिले ॥ मग वांचिले रावणादिक ॥२७॥
विरंचीस दटावूनि क्षणमात्रे ॥ प्रतिसृष्टि केली विश्वामित्रे ॥ तेवी पितृकैवारे पराशरे ॥ वादी जर्जर पै केले ॥२८॥
ते सांगावी समूळ कथा ॥ तरी विस्तार होईल ग्रंथा ॥ यालागी ध्वनितार्थ बोलिलो आता ॥ कळले पाहिजे निर्धारे ॥२९॥
ऐसा महाराज पराशर ॥ ज्याचा नातू होय शुक योगींद्र ॥ तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार ॥ घरा आला जाणोनी ॥३०॥

राव प्रधान सामोरे धावती ॥ साष्टांग नमूनि घरासी आणिती ॥ षोडशोपचारी पूजिती ॥ भाव चित्ती विशेष ॥३१॥
समस्ता वस्त्रे भूषणे देऊन ॥ राव विनवी कर जोडून ॥ म्हणे दोघे कुमर रात्रंदिन ॥ ध्यान करिती शिवाचे ॥३२॥
नावडती वस्त्रे अलंकार ॥ रुद्राक्षभस्मावरी सदा भर ॥ वैराग्यशील अणुमात्र ॥ भाषण न करिती कोणासी ॥३३॥
इंद्रियभोगावरी नाही भर ॥ नावडे राजविलास अणुमात्र ॥ गजवाजियानी समग्र ॥ आरूढावे आवडेना ॥३४॥
पुढे हे कैसे राज्य करिती ॥ हे आम्हांसी गूढ पडले चित्ती ॥ मग ते दोघे कुमर आणोनि गुरूप्रती ॥ दाखविले भद्रसेने ॥३५॥
गुरूने पाहिले दृष्टीसी ॥ जैसे मित्र आणि शशी ॥ तैसे तेजस्वी उपमा तयांसी ॥ नाही कोठे शोधिता ॥३६॥
यावरी बोले शक्तिसुत ॥ म्हणे हे का झाले शिवभक्त ॥ यांची पूर्वकथा समस्त ॥ ऐक तुज सांगतो ॥३७॥
पूर्वी काश्मीर देशात उत्तम ॥ महापट्टण नंद्रिग्राम ॥ तेथील वारांगना मनोरम ॥ महानंदा नाम तियेचे ॥३८॥
त्या ग्रामीचा तोचि भूप ॥ पृथ्वीमाजी निःसीम स्वरूप ॥ ललिताकृति पाहोनि कंदर्प ॥ तन्मय होवोनि नृत्य करी ॥३९॥
जैसा उगवला पूर्णचंद्र ॥ तैसे तिजवरी विराजे छत्र ॥ रत्नखचित याने अपार ॥ भाग्या पार नाही तिच्या ॥४०॥

रत्नमय दंडयुक्त ॥ चामरे जीवरी सदा ढळत ॥ मणिमय पादुका रत्नखचित ॥ चरणी जिच्या सर्वदा ॥४१॥
विचित्र वसने दिव्य सुवास ॥ हिरण्मयरत्नपर्यंतक राजस ॥ चंद्ररश्मिसम प्रकाश ॥ शय्या जिची अभिनव ॥४२॥
दिव्याभरणी संयुक्त ॥ अंगी सुगंध विराजित ॥ गोमहिषीखिल्लारे बहुत ॥ वाजी गज घरी बहुवस ॥४३॥
दास दासी अपार ॥ घरी माता सभाग्य सहोदर ॥ जिचे गायन ऐकता किन्नर ॥ तटस्थ होती कोकिळा ॥४४॥
जिच्या नृत्याचे कौशल्य देखोन ॥ सकळ नृप डोलविती मान ॥ तिचा भोगकाम इच्छून ॥ भूप सभाग्य येती घरा ॥४५॥
वेश्या असोन पतिव्रता ॥ नेमिला जो पुरुष तत्त्वता ॥ त्याचा दिवस न सरता ॥ इंद्रासही वश्य नव्हे ॥४६॥
परम शिवभक्त विख्यात ॥ दानशीळ उदार बहुत ॥ सोमवार प्रदोषव्रत ॥ शिवरात्र करी नेमेसी ॥४७॥
अन्नछत्र सदा चालवीत ॥ नित्य लक्षत्रिदळे शिव पूजित ॥ ब्राह्मणहस्ते अद्भुत ॥ अभिषेक करवी शिवासी ॥४८॥
याचक मनी जे जे इच्छीत ॥ ते ते महानंदा पुरवीत ॥ कोटि लिंगे करवीत ॥ श्रावणमासी अत्यादरे ॥४९॥
ऐक भद्रसेना सावधान ॥ कुक्कुट मर्कट पाळिले प्रीतीकरोन ॥ त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधोन ॥ नाचू शिकविले कौतुके ॥५०॥

आपुले जे का नृत्यागार ॥ तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर ॥ कुक्कुट मर्कट त्यासमोर ॥ तेथेंचि बांधी प्रीतीने ॥५१॥
करी शिवलीलामृतपुराणश्रवण ॥ तेही ऐकती दोघेजण ॥ सवेंचि महानंदा करी गायन ॥ नृत्य करी शिवापुढे ॥५२॥
महानंदा त्यांसी सोडून ॥ नृत्य करवी कौतुकेकरून ॥ त्यांच्या गळा कपाळी जाण ॥ विभूति चर्ची स्वहस्ते ॥५३॥
एवं तिच्या संगतीकरून ॥ त्यांसही घडतसे शिवभजन ॥ असो तिचे सत्त्व पाहावयालागोन ॥ सदाशिव पातला ॥५४॥
सौदागराचा वेष धरिला ॥ महानंदेच्या सदना आला ॥ त्याचे स्वरूप देखोनि ते अबला ॥ तन्मय झाली तेधवा ॥५५॥
पूजा करोनि स्वहस्तकी ॥ त्यासी बैसविले रत्नमंचकी ॥ तो पृथ्वीमोलाचे हस्तकी ॥ कंकण त्याच्या देखिले ॥५६॥
देखता गेली तन्मय होऊन ॥ म्हणे स्वर्गीची वस्तु वाटे पूर्ण ॥ विश्वकर्म्याने निर्मिली जाण ॥ मानवी कर्तृत्व हे नव्हे ॥५७॥
सौदागरे ते काढून ॥ तिच्या हस्तकी घातले कंकण ॥ येरी होवोनि आनंदघन ॥ नेम करी तयासी ॥५८॥
पृथ्वीचे मोल हे कंकण ॥ मीहि बत्तीस लक्षणी पद्मिण ॥ तीन दिवस संपूर्ण ॥ दासी तुमची झाले मी ॥५९॥
तयासी ते मानले ॥ सवेंचि त्याने दिव्यलिंग काढिले ॥ सूर्यप्रभेहूनि आगळे ॥ तेज वर्णिले नवजाय ॥६०॥

लिंग देखोनि ते वेळी ॥ महानंदा तन्मय झाली ॥ म्हणे जय जय चंद्रमौळी ॥ म्हणोनी वंदी लिंगाते ॥६१॥
म्हणे या लिंगाच्या प्रभेवरूनी ॥ कोटि कंकणे टाकावी ओवाळूनी ॥ सौदागर म्हणे महानंदेलागूनी ॥ लिंग ठेवी जतन हे ॥६२॥
म्हणे या लिंगापाशी माझा प्राण ॥ भंगले की गेले दग्ध होऊन ॥ तरी मी अग्निप्रवेश करीन ॥ महाकठीण व्रत माझे ॥६३॥
येरीने अवश्य म्हणोन ॥ ठेविले नृत्यागारी नेऊन ॥ मग दोघे करिती शयन ॥ रत्नखचित मंचकी ॥६४॥
तिचे कैसे आहे सत्त्व ॥ धैर्य पाहे सदाशिव ॥ भक्त तारावया अभिनव ॥ कौतुकचरित्र दाखवी ॥६५॥
त्याच्या आज्ञेकरून ॥ नृत्यशाळेस लागला अग्न ॥ जन धावो लागले चहूकडोन ॥ एकचि हांक जाहली ॥६६॥
तीस सावध करी मदनारी ॥ म्हणे अग्नि लागला ऊठ लवकरी ॥ येरी उठली घाबरी ॥ तंव वातात्मज चेतला ॥६७॥
तैशामाजी उडी घालून ॥ कंठपाश त्यांचे काढून ॥ कुक्कुट मर्कट दिधले सोडून ॥ गेले पळोन वनाप्रती ॥६८॥
नृत्यशाळा भस्म झाली समग्र ॥ मग शांत झाला सप्तकर ॥ यावरी पुसे सौदागर ॥ महानंदेप्रति तेधवा ॥६९॥
माझे दिव्यलिंग आहे की जतन ॥ महानंदा घाबरी ऐकोन ॥ वक्षःस्थळ घेत बडवून ॥ म्हणे दिव्यलिंग दग्ध जाहले ॥७०॥

सौदागर बोले वचन ॥ नेमाचा आजि दुसरा दिन ॥ मी आपुला देतो प्राण ॥ लिंगाकारणे तुजवरी ॥७१॥
मग त्रिचरण चेतविला ॥ आकाशपंथे जाती ज्वाला ॥ सौदागर सिद्ध झाला ॥ समीप आला कुंडाच्या ॥७२॥
अतिलाघवी उमारंग ॥ जो भक्तजनभवभंग ॥ उडी घातली सवेग ॥ ॐनमःशिवाय म्हणवुनी ॥७३॥
ऐसे देखता महानंदा ॥ बोलाविले सर्व ब्रह्मवृंदा ॥ लुटविली सर्व संपदा ॥ कोशसमवेत सर्वही ॥७४॥
अश्वशाळा गजशाळा संपूर्ण ॥ सर्व संपत्तिसहित करी गृहदान ॥ महानंदेने स्नान करून ॥ भस्म अंगी चर्चिले ॥७५॥
रुद्राक्ष सर्वांगी लेऊन ॥ ह्रदयी चिंतिले शिवध्यान ॥ हर हर शिव म्हणवून ॥ उडी निःशंक घातली ॥७६॥
सूर्यबिंब निघे उदयाचळी ॥ तैसा प्रगटला कपाळमौळी ॥ दशभुज पंचवदन चंद्रमौळी ॥ संकटी पाळी भक्तांते ॥७७॥
माथा जटांचा भार ॥ तृतीयनेत्री वैश्वानर ॥ शिरी झुळझुळ वाहे नीर ॥ अभयंकर महाजोगी ॥७८॥
चंद्रकळा तयाचे शिरी ॥ नीळकंठ खट्वांगधारी ॥ भस्म चर्चिले शरीरी ॥ गजचर्म पांघुरला ॥७९॥
नेसलासे व्याघ्रांबर ॥ गळा मनुष्यमुंडाचे हार ॥ सर्वांगी वेष्टित फणिवर ॥ दशभुजा मिरविती ॥८०॥

वरचेवरी कंदुक झेलीत ॥ तेवी दहा भुजा पसरोनी अकस्मात ॥ महानंदेस झेलूनि धरीत ॥ ह्रदयकमळी परमात्मा ॥८१॥
म्हणे जाहलो मी सुप्रसन्न ॥ महानंदे माग वरदान ॥ ती म्हणे हे नगर उद्धरून ॥ विमानी बैसवी दयाळा ॥८२॥
माताबंधूसमवेत ॥ महानंदा विमानी बैसत ॥ दिव्यरूप पावोनि त्वरित ॥ नगरासमवेत चालली ॥८३॥
पावली सकळ शिवपदी ॥ जेथे नाही आधिव्याधी ॥ क्षुधातृषाविरहित त्रिशुद्धी ॥ भेदबुद्धि कैची तेथे ॥८४॥
नाही काम क्रोध द्वंद्व दुःख ॥ मद मत्सर नाही निःशंक ॥ जेथींचे गोड उदक ॥ अमृताहूनि कोटिगुणे ॥८५॥
जेथे सुरतरूंची वने अपारे ॥ सुरभींची बहुत खिल्लारे ॥ चिंतामणींची धवलागारे ॥ भक्ताकारणे निर्मिली ॥८६॥
जेथे वोसणता बोलती शिवदास ॥ ते ते प्राप्त होय तयास ॥ शिवपद सर्वदा अविनाश ॥ महानंदा तेथे पावली ॥८७॥
हे कथा परम सुरस ॥ पराशर सांगे भद्रसेनास ॥ म्हणे हे कुमर दोघे निःशेष ॥ कुक्कुट मर्कट पूर्वींचे ॥८८॥
कंठी रुद्राक्षधारण ॥ भाळी विभूति चर्चून ॥ त्याचि पूर्वपुण्येकरून ॥ सुधर्म तारक उपजले ॥८९॥
हे पुढे राज्य करतील निर्दोष ॥ बत्तीस लक्षणी डोळस ॥ शिवभजनी लाविती बहुतांस ॥ उद्धरितील तुम्हांते ॥९०॥

अमात्यसहित भद्रसेन ॥ गुरूसी घाली लोटांगण ॥ म्हणे इतुकेन मी धन्य ॥ सुपुत्र उदरी जन्मले ॥९१॥
भद्रसेन बोलत पुढती ॥ हे राज्य किती वर्षै करिती ॥ आयुष्यप्रमाण किती ॥ सांगा यथार्थ गुरुवर्या ॥९२॥
बहुत करिता नवस ॥ एवढाचि पुत्र आम्हांस ॥ परम प्रियकर राजस ॥ प्राणांहूनि आवडे बहु ॥९३॥
तुमच्या आगमनेकरून ॥ स्वामी मज समाधान ॥ तरी या पुत्राचे आयुष्यप्रमाण ॥ सांगा स्वामी मज तत्त्वता ॥९४॥
ऋषि म्हणे मी सत्य बोलेन देख ॥ परी तुम्हांसी ऐकता वाटेल दुःख ॥ हे सभा सकळिक ॥ दुःखार्णवी पडेल पै ॥९५॥
प्रत्ययसदृश बोलावे वचन ॥ ना तरी आंगास येते मूर्खपण ॥ तुम्हा वाटेल विषाहून ॥ विशेष ऐसी ते गोष्टी ॥९६॥
भद्रसेन म्हणे सत्य वचन ॥ बोलावया न करावा अनमान ॥ तरी तुझ्या पुत्रासी बारा वर्षे पूर्ण ॥ झाली असता जाणपा ॥९७॥
आजपासोनि सातवे दिवशी ॥ मृत्यु पावेल या समयासी ॥ राव ऐकता धरणीसी ॥ मूर्च्छा येऊनि पडियेला ॥९८॥
अमात्यासहित त्या स्थानी ॥ दुःखाग्नीत गेले आहाळोनी ॥ अंतःपुरी सकळ कामिनी ॥ आकांत करिती आक्रोशे ॥९९॥
करूनिया हाहाकार ॥ वक्षःस्थळ पिटी नृपवर ॥ मग रायासी पराशर ॥ सावध करोनि गोष्ट सांगे ॥१००॥

नृपश्रेष्ठा न सोडी धीर ॥ ऐक एक सांगतो विचार ॥ जै पंचभूते नव्हती समग्र ॥ शशिमित्र नव्हते तै ॥१॥
नव्हता मायामय विकार ॥ केवळ ब्रह्ममय साचार ॥ तेथे झाले स्फुरणजागर ॥ अहं ब्रह्म म्हणोनिया ॥२॥
ते ध्वनि माया सत्य ॥ तेथोनि जाहले महत्तत्त्व ॥ मग त्रिविध अहंकार होत ॥ शिवइच्छेकरूनिया ॥३॥
सत्त्वांशे निर्मिला पीतवसन ॥ रजांशे सृष्टिकर्ता द्रुहिण ॥ तमांशे रुद्र परिपूर्ण ॥ सर्गस्थित्यंत करविता ॥४॥
विधीसी म्हणे सृष्टि रची पूर्ण ॥ येरू म्हणे मज नाही ज्ञान ॥ मग शिवे तयालागून ॥ चारी वेद उपदेशिले ॥५॥
चहू वेदांचे सार पूर्ण ॥ तो हा रुद्राध्याय परम पावन ॥ त्याहूनि विशेष गुह्य ज्ञान ॥ भुवनत्रयी असेना ॥६॥
बहुत करी हा जतन ॥ त्याहूनि आणिक थोर नाही साधन ॥ हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून ॥ श्रीशंकर स्वये बोले ॥७॥
जे रुद्राध्याय ऐकती पढती ॥ त्यांच्या दर्शने जीव उद्धरती ॥ मग कमलोद्भव एकांती ॥ सप्तपुत्रा सांगे रुद्र हा ॥८॥
मग सांप्रदाये ऋषीपासोन ॥ भूतळी आला अध्याय जाण ॥ थोर जप तप ज्ञान ॥ त्याहूनि अन्य नसेचि ॥९॥
जो हा अध्याय जपे संपूर्ण ॥ त्याचेनि दर्शने तीर्थे पावन ॥ स्वर्गीचे देव दर्शन ॥ त्याचे घेऊ इच्छिती ॥११०॥

जप तप शिवार्चन ॥ याहूनि थोर नाही जाण ॥ रुद्रमहिमा अगाध पूर्ण ॥ किती म्हणोनि वर्णावा ॥११॥
रुद्रमहिमा वाढला फार ॥ ओस पडिले भानुपुत्रनगर ॥ पाश सोडोनि यमकिंकर ॥ रिते हिंडो लागले ॥१२॥
मग यमे विधिलागी पुसोन ॥ अभक्तिकृत्या निर्मिली दारुण ॥ तिणे कुतर्कवादी भेदी लक्षून ॥ त्यांच्या ह्रदयी संचरली ॥१३॥
त्यांसी मत्सर वाढविला विशेष ॥ वाटे करावा शिवद्वेष ॥ तेणे ते जावोनि यमपुरीस महानरकी पडले सदा ॥१४॥
यम सांगे दुतांप्रती ॥ शिवद्वेषी जे पापमती ॥ ते अल्पायुषी होती ॥ नाना रीती जाचणी करा ॥१५॥
शिव थोर विष्णु लहान ॥ हरि विशेष हर गौण ॥ ऐसे म्हणती जे त्यांलागून ॥ आणोनि नरकी घालावे ॥१६॥
रुद्राध्याय नावडे ज्यांसी ॥ कुंभीपाकी घालावे त्यांसी ॥ रुद्रानुष्ठाने आयुष्यासी ॥ वृद्धि होय निर्धारे ॥१७॥
याकरिता भद्रसेन अवधारी ॥ अयुत रुद्रावर्तने करी ॥ शिवावरी अभिषेकधार धरी ॥ मृत्यु दूरी होय साच ॥१८॥
अथवा शतघट स्थापून ॥ दिव्यवृक्षांचे पल्लव आणून ॥ रुद्रे उदक अभिमंत्रून ॥ अभिषिंचन पुत्रा करी ॥१९॥
नित्य दहा सहस्त्र आवर्तने पूर्ण ॥ क्षोणीपाळा करी सप्तदिन ॥ राये धरिले दृढ चरण ॥ सद्गद होवोनि बोलत ॥१२०॥

सकळऋषिरत्नमंडितपदक ॥ स्वामी तू त्यात मुख्य नायक ॥ काळ मृत्यु भय शोक ॥ गुरु रक्षी त्यांपासूनि ॥२१॥
तरी त्वा आचार्यत्व करावे पूर्ण ॥ तुजसवे जे आहेत ब्राह्मण ॥ आणीक सांगती ते बोलावून ॥ आताचि आणितो आरंभी ॥२२॥
मग सहस्त्र विप्र बोलावून ॥ ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्ति पूर्ण ॥ न्यासध्यानयुक्त पढून ॥ गुरूपासून जे आले ॥२३॥
परदारा आणि परधन ॥ ज्यांस वमनाहूनि नीच पूर्ण ॥ विरक्त सुशील गेलिया प्राण ॥ दुष्ट प्रतिग्रह न घेती ॥२४॥
जे शापानुग्रहसमर्थ ॥ सामर्थ्यो चालो न देती मित्ररथ ॥ किंवा साक्षात उमानाथ ॥ पुढे आणोनि उभा करिती ॥२५॥
ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण ॥ बैसला व्यासपिता घेऊन ॥ सहस्त्र घट मांडून ॥ अभिमंत्रोनि स्थापिले ॥२६॥
स्वर्धुनीचे सलिल भरले पूर्ण ॥ त्यांत आम्रपल्लव घालून ॥ रुद्रघोषे गर्जिन्नले ब्राह्मण ॥ अनुष्ठान दिव्य मांडिले ॥२७॥
शास्त्रसंख्या झाले दिवस ॥ सातवे दिवशी मध्याह्नी आला चंडांश ॥ मृत्युसमय येता धरणीस ॥ बाळ मूर्च्छित पडियेला ॥२८॥
एक मुहूर्त निचेष्टित ॥ चलनवलन राहिले समस्त ॥ परम घाबरला नृपनाथ ॥ गुरु देत नाभीकारा ॥२९॥
रुद्रोदक शिंपून ॥ सावध केला राजनंदन ॥ त्यासी पुसती वर्तमान ॥ वर्तले तेचि सांगत ॥१३०॥

एक काळपुरुष भयानक थोर ॥ ऊर्ध्व जटा कपाळी शेंदूर ॥ विक्राळ दाढा भयंकर ॥ नेत्र खादिरांगासारखे ॥३१॥
तो मज घेऊनि जात असता ॥ चौघे पुरुष धावोनि आले तत्त्वता ॥ पंचवदन दशभुज त्यांची साम्यता ॥ कमळभवांडी दुजी नसे ॥३२॥
ते तेजे जैसे गभस्ती ॥ दिगंततम संहारिती ॥ भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती ॥ दश हस्ती आयुधे ॥३३॥
ते महाराज येऊन ॥ मज सोडविले तोडोनि बंधन ॥ त्या काळपुरुषासी धरून ॥ करीत ताडण गेले ते ॥३४॥
ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर ॥ भद्रसेन करी जयजयकार ॥ ब्राह्मणांसी घाली नमस्कार ॥ आनंदाश्रु नेत्री आले ॥३५॥
अंगी रोमांच दाटले ॥ मग विप्रचरणी गडबडा लोळे ॥ शिवनाम गर्जत तये वेळे ॥ देव सुमने वर्षती ॥३६॥
अनेक वाद्यांचे गजर ॥ डंक गर्जे अवघ्यात थोर ॥ मुखद्वयांची महासुस्वर ॥ मृदंगवाद्ये गर्जती ॥३७॥
अनेक वाद्यांचे गजर ॥ शिवलीला गाती अपार ॥ श्रृंगेभृंगे काहाळ थोर ॥ सनया अपार वाजती ॥३८॥
चंद्रानना धडकती भेरी ॥ नाद न माये नभोदरी ॥ असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीतसे ॥३९॥
षड्रस अन्ने शोभिवंत ॥ अलंकार दिव्य वस्त्रे देत ॥ अमोलिक वस्तु अद्भुत ॥ आणोनि अर्पी ब्राह्मणांसी ॥१४०॥

दक्षिणेलागी भांडारे ॥ मुक्त केली राजेंद्रे ॥ म्हणे आवडे तितुके भरा एकसरे ॥ मागे पुढे पाहू नका ॥४१॥
सर्व याचक केले तृप्त ॥ पुरे पुरे हेचि ऐकिली मात ॥ धनभार झाला बहुत ॥ म्हणोनि सांडिती ठायी ठायी ॥४२॥
ब्राह्मण देती मंत्राक्षता ॥ विजय कल्याण हो तुझिया सुता ॥ ऐसा अति आनंद होत असता ॥ तो अद्भुत वर्तले ॥४३॥
वसंत येत सुगंधवनी ॥ की काशीक्षेत्रावरी स्वर्धुनी ॥ की श्वेतोत्पले मृडानी ॥ रमण लिंग अर्चिजे ॥४४॥
की निर्दैवासी सापडे चिंतामणी ॥ की क्षुधितापुढे क्षीराब्धि ये धावूनी ॥ तैसा कमलोद्भवनंदन ते क्षणी ॥ नारदमुनी पातला ॥४५॥
वाल्मीक सत्यवतीनंदन ॥ औत्तानपादीकयाधुह्रदयरत्न ॥ हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जाण ॥ वंद्य जे का सर्वांते ॥४६॥
जो चतुःषष्टिकळाप्रवीण निर्मळ ॥ चतुर्दशविद्या करतलामळ ॥ ज्याचे स्वरूप पाहता केवळ ॥ नारायण दुसरा की ॥४७॥
हे कमळभवांड मोडोनी ॥ पुनःसृष्टि करणार मागुतेनी ॥ अन्याय विलोकिता नयनी ॥ दंडे ताडील शक्रादिका ॥४८॥
तो नारद देखोनि तेचि क्षणी ॥ कुंडांतूनि मूर्तिमंत निघे अग्नी ॥ दक्षिणग्नि गार्हपत्य आहवनी ॥ उभे ठाकले देखता ॥४९॥
पराशरादि सकळ ब्राह्मण ॥ प्रधानासहित भद्रसेन ॥ धावोनि धरिती चरण ॥ ब्रह्मानंदे उचंबळले ॥१५०॥

दिव्य गंध दिव्य सुमनी ॥ षोडशोपचारे पूजिला नारदमुनी ॥ राव उभा ठाके कर जोडोनी ॥ म्हणे स्वामी अतींद्रियद्रष्टा तू ॥५१॥
त्रिभुवनी गमन सर्व तुझे ॥ काही देखिले सांग अपूर्व ॥ नारद म्हणे मार्गी येता शिव ॥ दूत चौघे देखिले ॥५२॥
दशभुज पंचवदन ॥ तिही मृत्यु नेला बांधोन ॥ तुझ्या पुत्राचे चुकले मरण ॥ रुद्रानुष्ठाने धन्य केले ॥५३॥
तव पुत्ररक्षणार्थ ते वेळा ॥ शिवे वीरभद्रमुख्य पाठविला ॥ मज देखता मृत्यूसी पुसू लागला ॥ शिवसुत ऐका ते ॥५४॥
तू कोणाच्या आज्ञेकरून ॥ आणीत होतासी भद्रसेननंदन ॥ त्यासी दहा सहस्त्र वर्षे पूर्ण ॥ आयुष्य असे निश्चये ॥५५॥
तो सार्वभौम होईल तत्त्वता ॥ रुद्रमहिम तुज ठाऊक असता ॥ शिवमर्यादा उल्लंघूनि तत्त्वता ॥ कैसा आणीत होतासी ॥५६॥
मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन ॥ पत्रिका पाहिली वाचून ॥ तव द्वादशवर्षी मृत्युचिन्ह ॥ गंडांतर थोर होते ॥५७॥
ते महत्पुण्ये निरसूनि सहज ॥ दहा सहस्त्र वर्षे करावे राज्य ॥ मग तो सूर्यनंदन महाराज ॥ स्वापराधे कष्टी बहू ॥५८॥
मग उभा ठाकूनि कृतांत ॥ कर जोडोनि स्तवन करीत ॥ हे अपर्णाधव हिमनगजामात ॥ अपराध न कळता घडला हा ॥५९॥
ऐसे नारदे सांगता ते क्षणी ॥ राये पायावरी घातली लोळणी ॥ आणीक सहस्त्र रुद्र करूनी ॥ महोत्साह करीतसे ॥१६०॥

शतरुद्र करिता निःशेष ॥ शतायुषी होय तो पुरुष ॥ हा अध्याय पढता निर्दोष ॥ तो शिवरूप याचि देही ॥६१॥
तो येथेचि झाला मुक्त ॥ त्याच्या तीर्थे तरती बहुत ॥ असो यावरी ब्रह्मसुत ॥ अंतर्धान पावला ॥६२॥
आनंदमय शक्तिनंदन ॥ राये शतपद्म धन देऊन ॥ तोषविला गुरु संपूर्ण ॥ ऋषींसहित जाता झाला ॥६३॥
हे भद्रसेन आख्यान जे पढती ॥ त्यांसी होय आयुष्य संतती ॥ त्यांसी काळ न बाधे अंती ॥ वंदोनि नेती शिवपदा ॥६४॥
दशशत कपिलादान ॥ ऐकता पढता घडे पुण्य ॥ केले असेल अभक्ष्यभक्षण ॥ सुरापान ब्रह्महत्या ॥६५॥
एवं महापापपर्वत तत्त्वता ॥ भस्म होती श्रवण करिता ॥ हा अध्याय त्रिकाळ वाचिता ॥ गंडांतरे दूर होती ॥६६॥
यावरी कलियुगी निःशेष ॥ शिवकीर्तनाचा महिमा विशेष ॥ आयुष्यहीन लोकांस ॥ अनुष्ठान हेचि निर्धारे ॥६७॥
मग तो राव भद्रसेन ॥ सुधर्म पुत्रासी राज्य देऊन ॥ युवराज्य तारकालागून ॥ देता झाला ते काळी ॥६८॥
मग प्रधानासमवेत राव जाणा ॥ जाता झाला तपोवना ॥ शिवअनुष्ठान रुद्राध्याना ॥ करिता महारुद्र तोषला ॥६९॥
विमानी बैसवूनि त्वरित ॥ राव प्रधान नेले मिरवित ॥ विधिलोकी वैकुंठी वास बहुत ॥ स्वेच्छेकरूनि राहिले ॥१७०॥

शेवटी शिवपदासी पावून ॥ राहिले शिवरूप होऊन ॥ हा अकरावा अध्याय जाण ॥ स्वरूप एकादश रुद्रांचे ॥७१॥
हा अध्याय करिता श्रवण ॥ एकादश रुद्र समाधान ॥ की हा कल्पद्रुम संपूर्ण ॥ इच्छिले फळ देणार ॥७२॥
मृत्युंजयजप रुद्रानुष्ठान ॥ त्यांसी न बाधी ग्रहपीडा विघ्न ॥ पिशाचबाधा रोग दारुण ॥ न बाधीच सर्वथाही ॥७३॥
येथे जो मानील अविश्वास ॥ तो होईल अल्पायुषी तामस ॥ हे निंदी तो चांडाळ निःशेष ॥ त्याचा विटाळ न व्हावा ॥७४॥
त्यासी प्रसवोनि वांझ झाली माता ॥ त्याची संगती न धरावी तत्त्वता ॥ त्यासी संभाषण करिता ॥ महापातक जाणिजे ॥७५॥
ते आपुल्या गृहासी न आणावे ॥ आपण त्यांच्या सदनासी न जावे ॥ ते त्यजावे जीवेभावे ॥ जेवी सुशीळ हिंसकगृह ॥७६॥
तो प्रत्यक्ष भक्षितो विष ॥ जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस ॥ त्यांसी मृत्यु आला या गोष्टीस ॥ संदेह काही असेना ॥७७॥
असो सर्वभावे निश्चित ॥ अखंड पहावे शिवलीलामृत ॥ हे न घडे जरी त्वरित ॥ हा अध्याय तरी वाचावा ॥७८॥
या अध्यायाचे करिता अनुष्ठान ॥ तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य ॥ त्याचे घरी अनुदिन ॥ ब्रह्मानंद प्रगटेल ॥७९॥
अपर्णाह्रदयाब्जमिलिंद ॥ श्रीधरस्वामी तो ब्रह्मानंद ॥ जो जगदानंदमूळकंद ॥ अभंग न विटे कालत्रयी ॥१८०॥

शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड ॥ स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड ॥ परिसोत सज्जन अखंड ॥ एकादशाध्याय गोड हा ॥१८१॥

इति एकादशोऽध्यायः समाप्तः ॥११॥
॥श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु॥

Wednesday, June 22, 2011

Shivlilamrut - Adhyay 10

अध्याय दहावा
श्रीगणेशाय नमः ॥

कामगजविदारकपंचानना ॥ क्रोधजलदविध्वंसप्रभंजना ॥ मदतमहारकाचंडकिरणा ॥ चंद्रशेखरा वृषभध्वजा ॥१॥
मत्सरदुर्धराविपिनदहना ॥ दंभनगच्छेदका सहस्त्रनयना ॥ अहंकार अंधकारसुरमर्दना ॥ धर्मवर्धना भालनेत्रा ॥२॥
आनंदकैलासनगविहारा ॥ निगमागमवंद्या सुहास्यवक्रा ॥ दक्षमखदलना आनंदसमुद्रा ॥ ब्रह्मानंदा दयानिधे ॥३॥
नवमाध्यायाचे अंती ॥ उद्धरिला शबर सिंहकेतनृपती ॥ यावरी सूत शौनकादिकांप्रती ॥ नैमिषारण्यी सांगत ॥४॥
आनर्तदेशी वास्तव्य करीत ॥ एक द्विज नामे देवरथ ॥ वेदाध्ययनी शास्त्ररत ॥ पंडित आणि वंशज होय ॥५॥
त्याची कन्या चातुर्यखाणी ॥ शारदा नामे कमलनयनी ॥ जिचे स्वरूप देखोनी ॥ जन होती तटस्थ ॥६॥
तव ते झाली द्वादशवर्षी ॥ पित्याने लग्न करूनि संभ्रमेसी ॥ पद्मनाभद्विजासी ॥ देता झाला विधियुक्त ॥७॥
तोही परम अधीत ब्राह्मण ॥ सभाग्य आणि वेदसंपन्न ॥ जयाची विद्या पाहोन ॥ राजे होती तटस्थ ॥८॥
लग्नसोहळा जाहलियावरी ॥ काही दिवस होता श्वशुरघरी ॥ सायंकाळी नदीतीरी ॥ संध्यावंदनासी तो गेला ॥९॥
परतोन येता अंधार ॥ पायास झोंबला दुर्धर विखार ॥ तेथेच पडिले कलेवर ॥ नगरात हाक जाहली ॥१०॥

मातापित्यासमवेत ॥ शारदा धावोनि आली तेथ ॥ गतप्राण देखोनि प्राणनाथ ॥ शरीर घालीत धरणीवरी ॥११॥
म्हणे विद्याधनाचे सतेज ॥ आजि बुडाले माझे जहाज ॥ वोस पडली सेज ॥ बोले गुज कोणासी ॥१२॥
माझे बुडाले भांडार ॥ सर्परूपे वरी पडला तस्कर ॥ दग्ध झाली आभरणे समग्र ॥ म्हणोनि टाकी तोडोनिया ॥१३॥
देखोनि शारदेची करूणा ॥ अश्रु आले जनांचिया नयना ॥ म्हणती अहा पशुपते भाललोचना ॥ हे आता करील काय ॥१४॥
मग त्या विप्राचे करूनि दहन ॥ माता पिता बंधु आप्तजन ॥ शारदेशी संगे घेऊन ॥ सदनाप्रति गेले ते ॥१५॥
कित्येक दिवस झालियावरी ॥ घरची कार्यास गेली बाहेरी ॥ शारदा एकली मंदिरी ॥ तव एक अपूर्व वर्तले ॥१६॥
नैध्रुव नामे ऋषीश्वर ॥ वृद्ध तपस्वी गेले नेत्र ॥ शिष्य हाती धरोनि पवित्र ॥ सदना आला शारदेच्या ॥१७॥
शारदा आसन देऊनि सत्वर ॥ पूजन करोनि करी नमस्कार ॥ नैध्रुव म्हणे सौभाग्य वाढो अपार ॥ हो तुज पुत्र वेदवक्ता ॥१८॥
विप्रास न दिसे केवळ अंध ॥ अमोघ वदला आशीर्वाद ॥ हासोनि शारदा करी खेद ॥ शोक करी दुःखभरे ॥१९॥
म्हणे हे अघटित घडे केवी पूर्ण ॥ सांगितले पूर्ववर्तमान ॥ नैध्रुव म्हणे माझे वचन ॥ असत्य नोहे कल्पांती ॥२०॥

माझे जिव्हेबाहेर आले ॥ ते माघारे न सरे कदाकाळे ॥ माझे तपानुष्ठान वेगळे ॥ अघटित तेचि घडवीन ॥२१॥
घरची बाहेरूनि आली त्वरित ॥ माता पिता बंधु समस्त ॥ समूळ कळला वृत्तांत ॥ म्हणती विपरीत केवी घडे ॥२२॥
ऋषीचा आशीर्वाद अमोघ पवित्र ॥ क्षणे रंकाचा करी सहस्त्रनेत्र ॥ शापे न लागता क्षणमात्र ॥ कुळासहित संहारीत ॥२३॥
शापबळेचि विशेष ॥ सर्प केला राजा नहुष ॥ यादवकुळ निःशेष ॥ भस्म झाले ब्रह्मशापे ॥२४॥
ब्राह्मणी क्षोभोनि निर्धारी ॥ शुक्राची संपत्ति घातली सागरी ॥ ब्रह्मशापे मुरारी ॥ अंबऋषीचे जन्म घेत ॥२५॥
विधिहरिहर चित्ती ॥ ब्रह्मशापाचे भय वाहती ॥ विप्रशापे राव परिक्षिती ॥ भस्म झाला क्षणार्धे ॥२६॥
जमदग्नीचा क्रोध परम ॥ चौघे पुत्र केले भस्म ॥ स्त्रिया असता पांडुराजसत्तम ॥ भोग नाही सर्वदा ॥२७॥
विप्रशापाची नवलगती ॥ साठ सहस्त्र सागर जळती ॥ कुबेरपुत्र वृक्ष होती ॥ नारदशापेकरोनिया ॥२८॥
कृष्णासहित यादवकुळ ॥ ब्रह्मशापे भस्म झाले सकळ ॥ दंडकाऐसा नृपाळ ॥ क्षणमात्रे दग्ध केला ॥२९॥
ब्रह्मशाप परम दृढ ॥ नृगराज केला सरड ॥ धराधरशत्रु बळप्रचंड ॥ सहस्त्रभगे त्या अंगी ॥३०॥

क्षयरोगी केला अत्रिनंदन ॥ मेदिनीवसनाचे केले आचमन ॥ शाप देवोनि सूर्यनंदन ॥ दासीपुत्र केला पै ॥३१॥
पाषाणाचे करिती देव ॥ रंकाचेही करिती राव ॥ मंत्राक्षता टाकिता नवपल्लव ॥ कोरड्या काष्ठा फुटेल की ॥३२॥
ब्राह्मण थोर त्रिजगती ॥ हे ब्रह्मांड मोडोनि पुन्हा घडती ॥ यावरी नैध्रुव तियेप्रती ॥ बोलता झाला ते ऐका ॥३३॥
म्हणे ऐके शारदे यथार्थ ॥ तू धरी उमामहेशव्रत ॥ षडक्षरमंत्र विधियुक्त ॥ नित्य जप करावा ॥३४॥
म्हणे या व्रताचे फळ होय पूर्ण ॥ तववरी मी येथेचि राहीन ॥ मग त्याच्या अंगणात मठ करून ॥ राहाता झाला नैध्रुव तो ॥३५॥
म्हणे व्रताचा आरंभ प्रेमेसी ॥ करावा जाण चैत्रमासी ॥ अथवा मार्गशीर्षेसी ॥ शुक्लपक्षी करावा ॥३६॥
पाहोनि सुमुहूर्त सोमवार ॥ अष्टमी चतुर्दशी परिकर ॥ पूजावा उमामहेश्वर ॥ एक संवत्सर नेमेसी ॥३७॥
गुरुवचन शारदा ऐकोन ॥ तैसेचि करी न पडे न्यून ॥ नैध्रुवगुरुपासुन ॥ षडाक्षर मंत्र घेतला ॥३८॥
दिव्य शिवमंदिर करून ॥ वरी दिधले शुभ्र वितान ॥ चारी स्तंभ शोभायमान ॥ नानाफळे शोभताती ॥३९॥
अष्टगंधे सुवाससुमने ॥ भूमी शोधूनि रंगमाळा आस्तरणे ॥ षोडशवर्ण यंत्र करणे ॥ अष्टदळे तयामाजी ॥४०॥

तयामाजी चतुर्दळ ॥ त्यावरी घालोनि तांदूळ ॥ वरी घट स्थापूनि अढळ ॥ शोभा बहुत आणिजे ॥४१॥
उमामहेशप्रतिमा दोन्ही ॥ स्थापिजे सुवर्णाच्या करोनी ॥ मग एकनिष्ठा धरूनि ॥ षोडशोपचारी पूजिजे ॥४२॥
यथासांग ब्राह्मणसंतर्पण ॥ सुवासिनी पूजिजे प्रीतीकरून ॥ षड्रस चतुर्विध अन्न ॥ द्यावे भोजन तृप्तीवरी ॥४३॥
पुराणश्रवण कीर्तन ॥ येणेचि करावे जागरण ॥ गुरुवचनी विश्वास पूर्ण ॥ धरूनि वर्तणे सर्वदा ॥४४॥
कुंदेदुर्वण केवळ ॥ कर्पूरगौर पयःफेनधवल ॥ ज्योतिर्मय शुभ्र तेजाळ ॥ रजतवर्ण निर्मळ जो ॥४५॥
सूर्यकोटिसम तेज विरजित ॥ शुभ्र आभरणी भूषित ॥ जगदानंदकंद गुणातीत ॥ स्वर्धुनी विराजित मस्तकी ॥४६॥
शुभ्रजटामुकुटमंडित ॥ सर्प मणियुक्त विराजित ॥ किशोरचंद्र भाळी मिरवत ॥ भस्मचर्चित शुभ्र दिसे ॥४७॥
उन्मीलित भाललोचन ॥ केयूरांगद शुभ्र वीरकंकण ॥ मुंडमाळा शोभायमान ॥ दिसती लोचन सूर्येदुवत ॥४८॥
दिव्यगरुडपाचूहूनि वरिष्ठ ॥ विराजमान दिसे नीलकंठ ॥ दशभुज आयुधे सघट ॥ झळकती प्रळयचपळेऐसी ॥४९॥
खट्वांग त्रिशूळ कपाल डमरू ॥ अंकुश पाश घंटा नागधरू ॥ पिनाक पाशुपत कमलतेजाकारू ॥ शुभ्रवर्ण आयुधे ॥५०॥

शुभ्र तेजस्वी शार्दूलचर्मवसन ॥ शुभ्र स्फटिकवर्ण गजाजिन ॥ मणिमय शुभ्र सिंहासन ॥ नाना रत्ने विराजित ॥५१॥
कैलासगिरी शुभ्रवर्ण ॥ वरी मंडप शुभ्र सहस्त्रयोजन ॥ स्तंभविरहित सहस्त्रकिरण ॥ गगनी जेवी प्रकाशे पै ॥५२॥
ऐरावताहूनि विशाळ शुभ्र ॥ पुढे शोभे नंदिकेश्वर ॥ मणिमय कुंडले सुंदर ॥ शेष तक्षक झळकती ॥५३॥
ब्रह्मानंदसुख मुरोन ॥ ओतिले शिवस्वरूप सगुण आता भवानीचे ध्यान ॥ शारदा ध्यानी आणीत ॥५४॥
बाला तन्वंगी सुंदर ॥ विराजमान चंद्रशेखर ॥ चतुर्भुज पाशांकुशधर ॥ गदापद्मयुक्त जे ॥५५॥
सुरतरुसुमनमाळायुक्त ॥ मल्लिकाबकुळमळी विराजित ॥ इभमुक्तावतंस डोलत ॥ शोभा अद्भुत कोण वर्णी ॥५६॥
हरिमध्या भुजंगवेणी ॥ जलजवदना आकर्णनयनी ॥ द्वादशादित्यशोभा जघनी ॥ कांचीवरी झळकतसे ॥५७॥
मागे स्त्रिया वर्णिल्या बहुत ॥ निःसीमरूपलक्षणयुक्त ॥ ओवाळूनि टाकाव्या समस्त ॥ जिच्या पादांगुष्ठावरूनी ॥५८॥
कोटिमन्मथशोभा साजिरी ॥ त्रिभुवनजननी त्रिपुरसुंदरी ॥ ब्रह्मांड फोडोनिया वरी ॥ आंगींचा सुवास धावत ॥५९॥
पदमुद्रा जेथे उमटती ॥ तेथे आरक्तकमळे उगवती ॥ द्विजपंक्तीचा रंग पडता क्षिती ॥ खडे होती दिव्यमणि ॥६०॥

या ब्रह्मांडमंडपात देख ॥ ऐसे स्वरूप नाही आणिक ॥ शशि मित्र द्विमुख ॥ जिच्या तेजे शोभती ॥६१॥
विधिशक्रादि बाळे अज्ञान ॥ स्नेहे निजगर्भी करी पाळण ॥ समस्त त्रिभुवनलावण्य ॥ ओतिले स्वरूप देवीचे ॥६२॥
विशाल ताटके प्रभा घन ॥ ओतिली शशिमित्रतेज गाळून ॥ गंडस्थळी प्रभा पूर्ण ॥ पडली झळके अत्यंत ॥६३॥
बिंबाधर अतिरिक्त ॥ नासिकींचे वरी डोलता मुक्त ॥ प्रवाळचि केवळ भासत ॥ तेज अमित न वर्णवे ॥६४॥
नेत्रांजनप्रभा पडली मुक्तशिरी ॥ तो गुंजेऐसे दिसे क्षणभरी ॥ जगन्माता हास्य करी ॥ तो रंग दिसे शुभ्र मागुती ॥६५॥
ओळीने बैसल्या हंसपंक्ती ॥ तैसे द्विज हासता झळकती ॥ मुक्तशुभ्रवर्ण मागुती ॥ हैमवतीचे झळकती ॥६६॥
दंतपंक्ती शुभ्र अत्यंत ॥ अधरप्रभेने आरक्त भासत ॥ डाळिंबबीज पक्व शोभत ॥ क्षणैक तैसे दीसती ॥६७॥
कंठीचे मुक्ताहार संपूर्ण ॥ दिसती इंद्रनीळासमान ॥ श्यामलांगप्रभा दैदीप्यमान ॥ मुक्तामाजी बिंबली ॥६८॥
कमंडलु तेजस्वी सुंदर ॥ तेवी विश्वजननिचे पयोधर ॥ कुमार आणि इभवक्र ॥ ज्यातील अमृत प्राशिती ॥६९॥
प्रळयचपळा गाळोनि समग्र ॥ रंगविले वाटे देवीचे अंबर ॥ मुक्तालग कंचुकी प्रभाकर ॥ बाहुभूषणे झळकती ॥७०॥

इंद्रनीलकीलवर्णी ॥ लीलावेषधारिणी ॥ भक्तानुग्रहकारिणी ॥ प्रलयरूपिणी आदिमाता ॥७१॥
आदिपुरुषाची ज्ञानकळा ॥ घडी मोडी ब्रह्मांडमाळा ॥ जिचे स्वरूप पाहता डोळा ॥ जाश्वनीळा धणी न पुरे ॥७२॥
कृत्तिकापुंज झळके गगनी ॥ तैसे जलजघोस डोलती कर्णी ॥ अरुणसंध्यारागा उणे आणी ॥ कुंकुमरेखा आरक्तपणे ॥७३॥
विश्वप्रलयी शिव सगुणपण ॥ टाकोनि होता तत्काळ निर्गुण ॥ परी तिचे सौभाग्य गहन ॥ ताटंककुंकुममहिमा हा ॥७४॥
दोन वेळा वरिले कर्पूरगौरा ॥ भवानीने लाविला कपाळी बिजवरा ॥ तांबूलरेखांकितवदनचंद्रा ॥ अपार कवी वर्णिती ॥७५॥
प्रयागी त्रिवेणी जैसी ॥ अंबेची वेणी शोभे तैसी ॥ कृष्णवर्ण कुरळ निश्चयेसी ॥ आदित्यनंदिनी होय ते ॥७६॥
शुभ्र हार गुंफिला दिव्यसुमनी ॥ तेचि ब्रह्मांडावरूनि स्वर्धुनी ॥ माजी आरक्तपुष्पे दिसती नयनी ॥ पद्मजनंदिनी गुप्त ते ॥७७॥
मूदराखडी मच्छकच्छादि अलंकार ॥ हे प्रयागी तळपती जलचर ॥ केशाग्री गुच्छ विशाळ थोर ॥ सागराकार शोभती ॥७८॥
काय ब्रह्मांडे गुंफिली सकळ ॥ तेचि डोलत मोहनमाळ ॥ जीवशिव दोन्ही तेजाळ ॥ आवरोनि धरिले दोन पक्षी ॥७९॥
अक्षय सौभाग्य नव्हे खंडन ॥ म्हणून वज्रचूडेमंडित कर जाण ॥ दशांगुळी मुद्रिका बंधु जनार्दन ॥ दशावतार नटलासे ॥८०॥

पायी नुपुरे पैंजण ॥ गर्जता शिव समाधि विसरून ॥ पाहे मुखचंद्र सावधान ॥ नेत्रचकोरे करोनिया ॥८१॥
भक्त जे का एकनिष्ठ ॥ पायी दोल्हारे जोडवी अनुवट ॥ ऐसे स्वरूप वरिष्ठ ॥ शारदा ध्यात ब्रह्मानंदे ॥८२॥
ऐसे एक संवत्सरपर्यंत ॥ आचरली उमामहेश्वरव्रत ॥ नैध्रुव उद्यापन करवित ॥ यथाविधिप्रमाणे ॥८३॥
अकरा शते दंपत्ये ॥ वस्त्र अलंकारदक्षिणायुक्त ॥ पूजोनि शारदा हर्षभरित ॥ तव रवि अस्त पावला ॥८४॥
जप ध्यान कीर्तन करीत ॥ शारदा गुरुजवळी बैसत ॥ अर्धयामिनी झालिया अकस्मात ॥ भवानी तेथे प्रगटली ॥८५॥
असंभाव्य तेज देखोनी ॥ नैध्रुवासी नेत्र आले तेचि क्षणी ॥ नैध्रुव शारदा लागती चरणी ॥ प्रेमभावेकरूनिया ॥८६॥
देवीचे करिती स्तवन ॥ उभे ठाकती कर जोडून ॥ परी त्या दोघांवाचून ॥ आणिक कोणी न देखती ॥८७॥
जय जय भवानी जगदंबे ॥ मूळप्रकृतिप्रणवस्वयंभे ॥ ब्रह्मानंदपददायिनी सर्वारंभे ॥ चिद्विलासिनी तू माये ॥८८॥
धराधरेंद्रनंदिनी ॥ सौभाग्यसरिते हेरंबजननी ॥ भक्तह्रदयारविंदचिन्मयखाणी ॥ वेदपुराणी वंद्य तू ॥८९॥
तुझिये कृपे निश्चिती ॥ गर्भांधासी नेत्र येती ॥ मागे सांडूनि पवनगती ॥ पांगुळ धावती कृपे तुझ्या ॥९०॥

मुके होतील वाचाळ ॥ मूर्ख पंडित होय तात्काळ ॥ रत्ने होती सिकताहरळ ॥ गारा होती चिंतामणी ॥९१॥
भवभयहारके भवानी ॥ भक्तपाळके मनोल्हासिनी ॥ वेदमाते द्विजजनरंजनी ॥ वेधले ध्यानी ब्रह्मादिक ॥९२॥
त्रिपुरसुंदरी त्रिभुवनजननी ॥ दोषत्रयहारके त्रितापशमनी ॥ त्रिकाळ जे सादर तव ध्यानी ॥ त्रिदेहविरहित ते ॥९३॥
शिवमानससरोवरमराळिके ॥ जय जय विज्ञानचंपककळिके ॥ सकळ ऐश्वर्यकल्याणदायके ॥ सर्वव्यापके मृडानी ॥९४॥
ऐसे ऐकता सुप्रसन्न ॥ देवी म्हणे माग वरदान ॥ नैध्रुवे वृत्तांत मुळींहून ॥ शारदेचा सांगितला ॥९५॥
मम मुखांतूनि वचन आले ॥ ते अंबे पाहिजे सत्य केले ॥ तुवा जरी मनी धरिले ॥ तरि काय एक न करिसी ॥९६॥
यावरी शिवजाया बोले वचना ॥ हे शारदा पूर्वी शुभानना ॥ द्रविडदेशी विप्रकन्या ॥ नाम भामिनी इयेचे ॥९७॥
इच्या भ्रतारासी स्त्रिया दोघीजणी ॥ ही धाकुटी प्रिया मृदुभाषिणी ॥ इणे वर वश करोनी ॥ वडील कामिनी विघडविली ॥९८॥
शेजारी एक जार होता ॥ तो ईस बहुत दिवस जपत असता ॥ एकांत पाहोन इच्या हाता ॥ धरिता झाला दुर्बुद्धि ॥९९॥
इणे नेत्र करोनि आरक्त ॥ झिटकारिला तो जार पतित ॥ मग तो होवोनि खेदयुक्त ॥ गृहासी गेला दुरात्मा ॥१००॥

इचे त्यासी लागले ध्यान ॥ सुरतआलिंगन आठवून ॥ इच्या ध्यासेकरून ॥ तो जार मृत्यु पावला ॥१॥
ईस विधवा हो म्हणून ॥ इच्या सवतीने शापिले दारुण ॥ मग तीही पावली मरण ॥ इच्या दुःखेकरूनिया ॥२॥
मग हेही काळे मृत्यु पावली ॥ तेचि शारदा हे जन्मली ॥ पूर्वीच्या जारे ईस वरिली ॥ ये जन्मी जाण निर्धारे ॥३॥
तोचि पद्मनाभ ब्राह्मण ॥ गेला इसी दावा साधून ॥ इचा पूर्वजन्मींचा भ्रतार जाण ॥ द्रविडदेशी आहे आता ॥४॥
तीनशेसाठ योजन ॥ येथोनि दूर आहे ब्राह्मण ॥ स्त्रीहीन इचे स्वरूप आठवून ॥ तळमळीत सर्वदा ॥५॥
तो ईस स्वप्नामध्ये नित्य येवोन ॥ भोग देईल प्रीतीकरून ॥ जागृतीहूनि विशेष जाण ॥ सुख होईल इयेते ॥६॥
ऐसे लोटता बहुत दिवस ॥ पुत्र एक होईल शारदेस ॥ शारदानंदन नाम तयास ॥ लोकी विख्यात जाण पा ॥७॥
ईस नित्य भोगी होईल जो हरिख ॥ तैसाच विप्र पावेल सुख ॥ स्वप्नानंदे विशेष देख ॥ तृप्ति होईल निर्धारे ॥८॥
ऐसे तयासी सांगोन ॥ अंबा पावली अंतर्धान ॥ त्यावरी शारदा नित्य स्वप्न ॥ देखती झाली तैसेचि ॥९॥
तव ती झाली गरोदर ॥ जन निंदा करितीसमग्र ॥ दीर भावे सासू श्वशुर ॥ आप्त सोयरे सर्व आले ॥११०॥

देवीचे करणे अघटित ॥ खदखदा जन हासत ॥ म्हणती हे केवी घडे विपरीत ॥ अंबा ईस भेटली कधी ॥११॥
एक म्हणती कर्ण नासिक छेदून ॥ बाहेर घाला खरारोहण करून ॥ तो आकाशवाणी बोले गर्जोन ॥ सत्य गर्भ शारदेचा ॥१२॥
जन परम अमंगळ ॥ म्हणती हे कापट्यवाणी सकळ ॥ त्यात एक वृद्ध होता पुण्यशीळ ॥ वदता झाला ते ऐका ॥१३॥
ईश्वरी मायेचे अगम्य चरित्र ॥ अघटित घडवी निर्धार ॥ स्तंभेविण धरिले अंबर ॥ कुंभिनी तरे जळावरी ॥१४॥
ग्रहगण भगणे विधु मित्र ॥ यास आहे कोणाचा आधार ॥ सर्वदेही व्यापक परमेश्वर ॥ परी शोधिता ठायी न पडे ॥१५॥
परस्परे पंचभूतांसी वैर ॥ ती एकरूपे चालती कौतुक थोर ॥ जननीगर्भी जीव समग्र ॥ रक्षितो कैसा पहा हो ॥१६॥
काय एक न करी जगन्नाथ ॥ राजा पूर्वी यूपकेत ॥ त्याचे जळी पडले रेत ॥ ते जळ प्राशित वेश्या एक ॥१७॥
तितुकेनि झाली ते गर्भिणी ॥ पुत्र प्रसवली उत्तमगुणी ॥ विभांडकाचे रेत जळी पडोनी ॥ ते जळ हरिणी प्राशीत ॥१८॥
तोचि झाला ऋषिश्रृंगी ॥ तेणे ख्याती केली दशरथयागी ॥ सौराष्ट्रराजा स्पर्शता करे मृगी ॥ दिव्य पुत्र प्रसवली ॥१९॥
सत्यवती मत्स्यगर्भसंभूत ॥ तो मत्स्य राजपुत्र होत ॥ महिषासुर दैत्य ॥ महिषीगर्भी जन्मला ॥१२०॥

कित्येक ऋषि करुणावंत ॥ वचनमात्रे गर्भ राहत ॥ रेवतीरमण जन्मत ॥ रोहिणीपोटी कैसा पा ॥२१॥
सांबाचे पोटी मुसळ झाले ॥ ते कोणी कैसे घातले ॥ कुंतीपोटी पांडव जन्मले ॥ पाच देवांसमागमे ॥२२॥
ऐसे बोलती वृद्धजन ॥ तरी निंदा करिती दुर्जन ॥ मागुती देववाणी झाली पूर्ण ॥ ऐका वचन मूर्ख हो ॥२३॥
शारदेस कोणी असत्य म्हणती ॥ तरी जिव्हा चिरोनी किडे पडती ॥ ऐसे ऐकता सात्त्विक सुमती ॥ सत्य सत्य म्हणती त्रिवाचा ॥२४॥
कित्येक दुर्जन पुन्हा बोलत ॥ हे सर्वही कापट्य असत्य ॥ तो जिव्हा चिरोनि अकस्मात ॥ किडे गळो लागले ॥२५॥
हे देखोनि सर्व जन ॥ शारदेसी घालिती लोटांगण ॥ म्हणती माते तू सत्य पूर्ण ॥ जानकीरेणुकेसारखी ॥२६॥
मग तीस पुत्र झाला सतेज ॥ लोक म्हणती शारदात्मज ॥ वाढत जैसा द्विजराज ॥ शुद्धद्वितीयेपासुनी ॥२७॥
उपनयन झालिया पूर्ण ॥ आठवे वर्षी वेदाध्ययन ॥ चारी वेद षट्शास्त्रे जाण ॥ मुखोद्गत पुराणे ॥२८॥
नवग्रहात जैसा वासरमणी ॥ तेवी पंडितात अग्रगणी ॥ जेणे अनुष्ठाने पिनाकपाणी ॥ प्रसन्न केला सर्वस्वे ॥२९॥
यावरी शारदा पुत्रसमवेत ॥ लक्षूनि शिवरात्रिव्रत अद्भुत ॥ गोकर्णक्षेत्राप्रति जात ॥ यात्रा बहुत मिळाली ॥१३०॥

तो द्रविडदेशींचा ब्राह्मण ॥ तोही आला यात्रेलागून ॥ परस्परे पाहून ॥ कष्टी होती अंतरी ॥३१॥
परस्परा कळली खूण ॥ पूर्वी देवी बोलिली वचन ॥ उमामहेश्वर व्रताचे पुण्य ॥ अर्ध देई पतीसी ॥३२॥
पुत्र देई त्याचा त्यास ॥ तू त्यापासी राहे चार मास ॥ समागम न करी निःशेष ॥ शिवपदासी पावसी ॥३३॥
मग शिवरात्रियात्रा करून ॥ भ्रतारासी केले नमन ॥ म्हणे हा घ्या आपुला नंदन ॥ म्हणोनि करी दीधला ॥३४॥
उमामहेश्वरव्रत ॥ त्याचे अर्धपुण्य देत ॥ मग शारदा सवे जात ॥ द्रविडदेशाप्रति तेव्हा ॥३५॥
शारदा व्रतस्थ पूर्ण ॥ दुरून पतीचे घे दर्शन ॥ विख्यात झाला शारदानंदन ॥ महापंडित पृथ्वीवरी ॥३६॥
तप आचरला अपार ॥ मातृपितृभजनी सादर ॥ माता भवानी पिता शंकर ॥ हेचि भावना तयाची ॥३७॥
जो न करी जनकजननीचे भजन ॥ धिक् त्याचे तप ज्ञान ॥ धिक् विद्या धिक् थोरपण ॥ धिक् भाग्य तयाचे ॥३८॥
घरी साठवी स्त्रियेचे गोत ॥ आणि मायबापा शिणवीत ॥ अन्न नेदी बाहेर घालीत ॥ शब्दबाणे ह्रदय भेदी ॥३९॥
तो जरी पढला षट्शास्त्र ॥ परी अनामिकाहूनि अपवित्र ॥ त्याचे न पहावे वक्र ॥ विटाळ कदा न व्हावा ॥१४०॥

यद्यपि झाला स्पर्श जाण ॥ तरी करावे सचैल स्नान ॥ महादोषी तो कृतघ्न ॥ यम दारुण गांजीत ॥४१॥
यावरी शारदेचा भ्रतार ॥ महातपस्वी योगीश्वर ॥ शरीर ठेवोनि परत्र ॥ पावला तो शिवपदा ॥४२॥
शारदाही चिंतूनि मदनदहन ॥ करी विधियुक्त सहगमन ॥ पतीसमवेत कैलासभुवन ॥ पावोन सुखे राहिली ॥४३॥
शिवलीलामृत सुरस पूर्ण ॥ किंवा हे दिव्य रसायन ॥ भवरोगी सेविता जाण ॥ आरोग्य होऊन शिव होती ॥४४॥
जे मृत्यूने कवळिले सहज ॥ त्यांसी नावडे हा रसराज ॥ ज्यांची सुकृते तेजःपुंज ॥ तेचि अधिकारी येथींचे ॥४५॥
ब्रह्मानंदे श्रीधर ॥ श्रोतया विनवी जोडोनि कर ॥ शिवलीलाम्रुत निर्जर ॥ तुम्ही सेवा आदरे ॥४६॥
पुढील अध्यायी सुरस कथा ॥ पावन होय श्रोता वक्ता ॥ मृडानीसहित शिव तत्त्वता ॥ पाठीराखा सर्वार्थी ॥४७॥
शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड ॥ स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड ॥ परिसोत सज्जन अखंड ॥ दशमाध्याय गोड हा ॥१४८॥

इति दशमोऽध्यायः समाप्तः ॥१०॥
॥श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु॥

Monday, June 20, 2011

Shivlilamrut - Adhyay 9

अध्याय नववा
श्रीगणेशाय नमः ॥

जेथे शिवनामघोष निरंतर ॥ तेथे कैचे जन्ममरणसंसार ॥ तिही कळिकाळ जिंकिला समग्र ॥ शिवशिवछंदेकरूनिया ॥१॥
पाप जळावया निश्चिती ॥ शिवनामी आहे ज्याची आसक्ती ॥ त्यासी नाही पुनरावृत्ती ॥ तो केवळ शिवरूप ॥२॥
जैसे प्राणियाचे चित्त ॥ विषयी गुंतले अत्यंत ॥ तैसे शिवनामी होता रत ॥ तरी बंधन कैचे तया ॥३॥
धन इच्छा धरूनि चित्ती ॥ धनाढ्याची करिती स्तुती ॥ तैसे शिवनामी प्रवर्तती ॥ तरी जन्ममरण कैचे तया ॥४॥
राजभांडारीचे धन ॥ साधावया करिती यत्न ॥ तैसे शिवचरणी जडले मन ॥ तरी संकट विघ्न कैचे तया ॥५॥
धन्य ते शिवध्यानी रत ॥ येचिविषयी कथा अद्भुत ॥ नैमिषारण्यी सांगत ॥ सूत शौनकादिकांप्रती ॥६॥
वामदेव नामे महाज्ञानी ॥ शिवध्यानी रत विचरे काननी ॥ एकाकी निर्माय शांत दांत जनी ॥ त्रिविधभेदरहित जो ॥७॥
दिशा जयाचे अंबर ॥ भस्मचर्चित दिगंबर ॥ निराहार निरंतर ॥ एकलाचि हिंडतसे ॥८॥
काय करावे कोठे जावे ॥ काय घेवोनि काय त्यजावे ॥ विश्व शिवमय आघवे ॥ खेद मोह भेद नाही ॥९॥
अक्रोध वैराग्य इंद्रियदमन ॥ क्षमा दया कृपा समान ॥ निर्लोभ दाता भय शोक मान ॥ काळत्रयी न धरीच ॥१०॥

गृहापत्यदारावर्जित ॥ कोणी एक परिग्रह नाही सत्य ॥ कायावाचामनोदंडयुक्त ॥ मौनी न बोले इतरांसी ॥११॥
ज्ञानचरा शिवस्मरण ॥ त्याविण नेणेचि भाषण ॥ या नाव बोलिजे मौन ॥ भेदाभेदरहित जो ॥१२॥
सर्वांच्या अनुग्रहास्तव ॥ ते स्वरूप धरोनि विचरे शिव ॥ जडजीव तारावया सर्व ॥ विचरे सृष्टी स्वइच्छे ॥१३॥
कार्याकार्य सारूनि कारण ॥ आत्मस्वरूपी पावला समाधान ॥ देहत्रयरहित विधिनिषेधहीन ॥ प्रवृत्तिनिवृत्तिवेगळा ॥१४॥
निरंकुश जो निःसंग ॥ जैसा ब्रह्मारण्यी विचरे मातंग ॥ तयाची रीती अभंग ॥ वेदशास्त्रे वर्णिती ॥१५॥
तो स्वरूपी सदा समाधिस्थ ॥ गगन तेही अंगासी रुतत ॥ म्हणूनि तेही परते सारीत ॥ हेतुदृष्टांतवर्जित जो ॥१६॥
तेणे तेजाचे दाहकत्व जाळिले ॥ उर्वीचे कठिणत्व मोडिले ॥ चंचलत्व हिरोनि घेतले ॥ प्रभंजनाचे तेणे पै ॥१७॥
आर्द्रत्व निरसोन ॥ धुवोनि शुद्ध केले जीवन ॥ एवं पिंडब्रह्मांड जाळून ॥ भस्म अंगी चर्चिले ॥१८॥
ऐसा तो अमूर्तामूर्त ॥ केवळ शुक्र की जडभरत ॥ क्रौंचारण्यी विचरत ॥ सर्वही देखत शिवरूप ॥१९॥
तो एक ब्रह्मराक्षस धावत ॥ महाभयानक शरीर अद्भुत ॥ कपाळी शेंदूर जिव्हा लळलळीत ॥ भयानक मुखाबाहेरी ॥२०॥

खदिरांगार तैसे नेत्र ॥ बहुत जीव भक्षिले अपरिमित ॥ क्षुधित तृषित पापी कुपात्र ॥ अकस्मात पातला ॥२१॥
महाहिंसक सर्वभक्षक ॥ तेणे वामदेव देखिला पुण्यश्लोक ॥ धावोनिया एकाएक ॥ कंठी घालीत मिठी त्याच्या ॥२२॥
लोह परिसासी झगटता पूर्ण ॥ तत्काळ होय दिव्य सुवर्ण ॥ तेवी त्याच्या अंगस्पर्शेकरून ॥ मति पालटली तयाची ॥२३॥
वामदेवांगीचे भस्म ॥ त्याच्या अंगी लागले उत्तम ॥ सत्त्ववृत्ति झाली परम ॥ असुरभाव पालटला ॥२४॥
आपुल्या अंगी झगटोन ॥ उद्धरिला पिशिताशन ॥ हे त्यासी नाहीच भान ॥ समाधिस्थ सर्वदा ॥२५॥
नेणे सुखदुःख शीतोष्ण ॥ लोक निंदिती की वंदिती पूर्ण ॥ शरीरी भोग की रोग दारुण ॥ हेही नेणे कदा तो ॥२६॥
मी हिंडतो देशी की विदेशी ॥ हेही स्मरण नाही त्यासी ॥ तो ब्रह्मानंद सौख्यराशी ॥ विधिनिषेधी स्पर्शेना ॥२७॥
ऐसा तो योगींद्र निःसीम ॥ त्याच्या अंगस्पर्शे पापे झाली भस्म ॥ दिव्यरूप होवोनि सप्रेम ॥ चरणी लागला तयाच्या ॥२८॥
सहस्त्र जन्मीचे झाले ज्ञान ॥ त्यासी आठव झाला संपूर्ण ॥ मानससरोवरी उदकपान ॥ करिता काक हंस होय ॥२९॥
की हाटकनदीतीरी देख ॥ पडता पाषाण काष्ठादिक ॥ दिव्य कार्तस्वर होय सुरेख ॥ तेवी राक्षस पै झाला ॥३०॥

की करिता सुधारसपान ॥ तेथे सहजचि आले देवपण ॥ की शशिकिरणस्पर्शेकरून ॥ द्रवे जैसा चंद्रकांत ॥३१॥
की रवि उगवता निःशेष ॥ निशा सरे प्रगटे प्रकाश ॥ तैसा उद्धरला राक्षस ॥ स्तवन करी तयाचे ॥३२॥
म्हणे गुरुवर्या ऐक पूर्ण ॥ मी तव दर्शने झालो पावन ॥ तुजसी करिता संभाषण ॥ वाटते पावेन शिवपदा ॥३३॥
मज सहस्त्रजन्मीचे झाले ज्ञान ॥ परी पंचवीस जन्मांपासून ॥ पापे घडली जी दारुण ॥ ती अनुक्रमे सांगतो ॥३४॥
पूर्वी मी राजा दुर्जय ॥ यौवनमदे अति निर्दय ॥ परम दुराचारी होय ॥ ब्राह्मण प्रजा पीडीत ॥३५॥
प्रजेसी नित करी मार ॥ आवडे तैसा करे स्वेच्छाचार ॥ वेद पुराण शास्त्र ॥ कैसे आहे मी नेणे ॥३६॥
स्वप्नीही नेणे कदा धर्म ॥ ब्रह्महत्यादि पापे केली परम ॥ नारी अपूर्व आणूनि उत्तम ॥ नित्य नूतन भोगी मी ॥३७॥
ऐशा स्त्रिया असंख्य भोगून ॥ बंदी घालूनि केले रक्षण ॥ सर्व देश धुंडोन॥ स्त्रिया नूतन आणवी ॥३८॥
एकदा भोग देऊन ॥ दुसर्याने तिचे न पाहावे वदन ॥ त्या बंदी रडती आक्रंदून ॥ शाप देती मजलागी ॥३९॥
विप्र पळाले राज्यांतून ॥ पट्टणे ग्रामे खेटके जाण ॥ इतुकीही धुंडोन ॥ स्त्रिया धरून आणिल्या ॥४०॥

भोगिल्या तीन शते द्विजनारी ॥ चार शते क्षत्रियकुमारी ॥ वैश्यस्त्रिया सुंदरी ॥ दहा शते भोगिल्या ॥४१॥
शूद्रांच्या सहस्त्र ललना ॥ चांडालनारी चार शते जाणा ॥ त्यावरी अपवित्र मांगकन्या ॥ सहस्त्र एक भोगिल्या ॥४२॥
चर्मककन्या पांच शत ॥ रजकांच्या चार शते गणित ॥ वारांगना असंख्यात ॥ मिती नाही तयाते ॥४३॥
पांच शते महारिणी ॥ तितुक्याच वृषली नितंबिनी ॥ यांवेगळ्या कोण गणी ॥ इतर वर्ण अष्टादश ॥४४॥
इतुक्या कामिनी भोगून ॥ तृप्त नव्हे कदा मन ॥ नित्य करी मद्यपान ॥ अभक्ष्य तितुके भक्षिले ॥४५॥
ऐसे भोगिता पापभोग ॥ मज लागला क्षयरोग ॥ मृत्यु पावलो सवेग ॥ कृतांतदूत धरोनि नेती ॥४६॥
यमपुरीचे दुःख अपार ॥ भोगिले म्यां अति दुस्तर ॥ तप्तताम्रभूमी तीवर ॥ मजलागी चालविले ॥४७॥
लोहस्तंभ तप्त करून ॥ त्यासी नेऊनि देवविती आलिंगन ॥ माझे घोर कर्म जाणून ॥ असिपत्रवनी हिंडविती ॥४८॥
कढईत तेल झाले तप्त ॥ त्यांत नेऊनि बुडवीत ॥ तोंडी घालिती नरक मूत ॥ पाप बहुत जाणोनी ॥४९॥
महाक्षार कटुरस आणोनी ॥ मुखी घालिती पासले पाडोनी ॥ तीक्ष्ण चंचूचे गृध्र येवोनी ॥ नेत्र फोडिती एकसरे ॥५०॥

कुंभीपात्री घालोनि शिजविती कर्णी तप्त लोहदंड दडपिती ॥ अहा तेथींची जाचणी किती ॥ सांगो आतां गुरुवर्या ॥५१॥
तेथे रक्तकुंड रेतकुंड दारुण ॥ त्यांत पचविती कित्येक दिन ॥ मांस तोडिती सांडसेकरून ॥ वरी शिंपिती क्षारोदक ॥५२॥
जिव्हा नासिक आणि कर्ण ॥ तीक्ष्ण शस्त्रे टाकिती छेदून ॥ हस्त पाद खंडून ॥ पोट फाडिती क्रूर शस्त्रे ॥५३॥
अंगाचा काढिती भाता ॥ तप्त शस्त्रे रोविती माथा ॥ शिश्न छेदून गुदद्वारी अवचिता ॥ तप्त अर्गळा घालिती ॥५४॥
सर्वांगासी टिपर्या लावून ॥ सवेंचि करिती पाशबंधन ॥ पृष्ठीकडे वाकवून ॥ चरणी ग्रीवा बांधिती ॥५५॥
बोटी बोटी सुया रोवून ॥ पाषाणे वृषण करिती चूर्ण ॥ हस्तपायी आणून ॥ पाषाणबेडी घालिती ॥५६॥
सहस्त्र वर्षै न लगे अंत ॥ ऐशिया नरकी बुडवीत ॥ एक येवोनि पाडिती दांत ॥ पाश घालिती ग्रीवेसी ॥५७॥
आपली विष्ठामूत्र ॥ बळेच भक्षविती यमदूत ॥ सवेचि अंगाचे तुकडे पाडीत ॥ दोष अमित जाणोनी ॥५८॥
श्यामशबलश्वान लावून ॥ चरचरा टाकिती फाडून ॥ एक शिरास्थि काढिती ओढून॥ एक मांस उकरिती ॥५९॥
लोहार्गळा उष्ण तीव्र ॥ पृष्ठी ह्रदयी करिती मार ॥ उखळी घालोनि सत्वर ॥ लोहतप्तमुसळे चेचिती ॥६०॥

तीक्श्ण औषधींचे रस आणिती ॥ नासिकद्वारे आत ओतिती ॥ सवेचि वृश्चिककूपी टाकिती ॥ बहुत विपत्ती भोगिल्या ॥६१॥
ज्यांचे विष परम दुर्धर ॥ ऐसे अंगासी डसविती विखार ॥ अग्निशिका लावोनि सत्वर ॥ हे शरीर भाजिले ॥६२॥
अंतरिक्ष असिधारे बैसवून ॥ पायी बांधिती जड पाषाण ॥ सवेंचि पर्वतावरी नेऊन ॥ ढकलूनि देती निर्दयपणे ॥६३॥
आतडी काढून निश्चिती ॥ ज्याची त्याजकडोन भक्षविती ॥ ऊर्ध्व नेवोनि टांगती ॥ आपटिती क्रोधभरे ॥६४॥
लोहकंटकी उभे करून ॥ करिती इंगळांचे आंथरूण ॥ मस्तकी घालूनिया पाषाण ॥ फोडोनि टाकिती मस्तक ॥६५॥
लौहचणक करूनि तप्त ॥ खा खा म्हणोनि दूत मारीत ॥ ओष्ठ धरोनि फाडीत ॥ तप्त सळ्या नाकी खोविती ॥६६॥
उफराटे टांगून ॥ ग्रीवेसी बांधोनि थोर पाषाण ॥ रीसव्याघ्रादिक आणोन ॥ विदारिती त्यांहाती ॥६७॥
गजपदाखाली चूर्ण ॥ करविती तप्तनीरप्राशन ॥ अष्टांगे कर्वतून ॥ वेगळाली टाकिती ॥६८॥
भयानक भूते भेडसाविती ॥ लिंग छेदूनि खा म्हणती ॥ सांधे ठायी ठायी मोडिती ॥ तीक्ष्ण शस्त्रेकरूनिया ॥६९॥
भूमीत रोवोनिया शरीर ॥ करिती बहुत शरमार ॥ सवेंचि शूळ परम तीव्र ॥ त्यावरी पालथे घालिती ॥७०॥

वरी मारिती मुसळघाये ॥ मग पाषाण बांधोनि लवलाहे ॥ नरकवापीत टाकिती पाहे ॥ अंत न लागे उतरता ॥७१॥
काचा शिसे यांचा रस करून ॥ बळेचि करविती प्राशन ॥ तेथे जात नाही कदा प्राण ॥ यातना दारुण भोगिता ॥७२॥
ऐशा तीन सहस्त्र वर्षैपर्यंत ॥ नरकयातना भोगिल्या बहुत ॥ त्यावरी मज ढकलोनि देत ॥ व्याघ्रजन्म पावलो ॥७३॥
दुसरे जन्मी झालो अजगर ॥ तिसरे जन्मी वृक भयंकर ॥ चौथे जन्मी सूकर ॥ सरडा झालो पाचवा ॥७४॥
सहावे जन्मी सारमेय सबळ ॥ सातवे जन्मी श्रृगाल ॥ आठव्याने गवय विशाळ ॥ गुरुवर्या मी झालो ॥७५॥
नववे जन्मी मर्कट प्रसिद्ध ॥ दहावे जन्मी झालो गर्दभ निषिद्ध ॥ त्यावरी नकुळ मग वायस विविध ॥ तेरावे जन्मी बक झालो ॥७६॥
चौदावे जन्मी वनकुक्कुट ॥ त्यावरी गीध झालो पापिष्ट ॥ मग मार्जारयोनी दुष्ट ॥ मंडूक त्यावरी जाण पा ॥७७॥
अठरावे जन्मी झालो कूर्म ॥ त्यावरी मत्स्य झालो दुर्गम ॥ सवेचि पावलो मूषकजन्म ॥ उलूक त्यावरी झालो मी ॥७८॥
बाविसावे जन्मी वनद्विरद ॥ त्यावरी उष्ट्रजन्म प्रसिद्ध ॥ मग दुरात्मा निषाद ॥ आतां राक्षस जन्मलो ॥७९॥
सहस्त्रजन्मीचे ज्ञान ॥ झाले स्वामी मज पूर्ण ॥ तव दर्शनाच्या प्रतापेकरून ॥ पावन झालो स्वामिया ॥८०॥

गंगास्नाने जळे पाप ॥ अत्रिनंदन हरि ताप ॥ सुरतरु दैन्य अमूप ॥ हरीत दर्शनेकरूनिया ॥८१॥
पाप ताप आणि दैन्य ॥ संतसमागमे जाय जळून ॥ यावरी वामदेव योगींद्र वचन ॥ बोलता झाला तेधवा ॥८२॥
एक विप्र होता महा अमंगळ ॥ शूद्र स्त्रियेसी रतला बहुत काळ ॥ तिच्या भ्रतारे साधूनि वेळ ॥ जीवे मारिले द्विजाते ॥८३॥
ग्रामाबाहेर टाकिले प्रेत ॥ कोणी संस्कार न करीत ॥ तो यमदूती नेला मारीत ॥ जाच बहुत भोगीतसे ॥८४॥
इकडे शिवसदन उत्तम ॥ त्यापुढे पडिले असे भस्म ॥ महाशिवरात्रिदिवशी सप्रेम ॥ भक्त पूजना बैसले ॥८५॥
त्या भस्मात श्वान सवेग ॥ येऊनि बैसले पाहे शिवलिंग ॥ भस्मचर्चित त्याचे अंग ॥ जात मग त्वरेने ॥८६॥
पडिले होते विप्रप्रेत ॥ त्यावरी गेले अकस्मात ॥ कुणपास भस्म लागत ॥ पापरहित झाला तो ॥८७॥
तो यमदूती नरकातूनि काढिला ॥ शिवदूती विमानी वाहिला ॥ कैलासास जावोनि राहिला ॥ संहारिला पापसमूग ॥८८॥
ऐसे हे पवित्र शिवभूषण ॥ त्याचे न वर्णवे महिमान ॥ राक्षस पुसे कर जोडून ॥ भस्ममहिमा सांगा कैसा ॥८९॥
भस्म कोणते उत्तम ॥ शिवभक्ती लावावे कैसा नेम ॥ यावरी वामदेव उत्तम ॥ चरित्र सांगे शिवाचे ॥९०॥

मंदरगिरी परमपवित्र ॥ उंच योजने अकरा सहस्त्र ॥ त्यावरी एकदा त्रिनेत्र ॥ देवासहित पातला ॥९१॥
यक्षगण गंधर्व किन्नर ॥ चारण पिशाच गुह्यक समग्र ॥ देव उपदेव पवित्र ॥ महेशा वेष्टूनि बैसले ॥९२॥
मरुद्गण पितृगण समस्त ॥ एकादश रुद्र द्वादशादित्य ॥ अष्ट वसु अष्ट भैरव सत्य ॥ अष्ट दिक्पाळ पातले ॥९३॥
अठ्ययंशी सहस्त्र ऋषीश्वर ॥ साठ सहस्त्र वालखिल्य ब्रह्मपुत्र ॥ पाताळनाग पृथ्वीचे नृपवर ॥ शंकरा वेष्टित बैसले ॥९४॥
विष्णु विधि पुरंदर ॥ शिवध्यान पाहती समग्र ॥ भूतांचे मेळे अपार ॥ मंदराचळी मिळाले ॥९५॥
सिंधुरवदन वीरभद्रकुमार ॥ साठ कोटी गण समग्र ॥ पुढे विराजे नंदिकेश्वर ॥ दुसरा मांदार शुभ्र दिसे ॥९६॥
तेथे आले सनत्कुमार ॥ साष्टांग करूनि नमस्कार ॥ स्तवन करूनि अपार ॥ विभूतिधारणविधी पुसती ॥९७॥
यावरी बोले जाश्वनीळ ॥ विभूति जाण तेचि निर्मळ ॥ शुद्ध करूनि गोमयगोळ ॥ मृत्तिकाकणविरहित ॥९८॥
ते वाळवूनि उत्तम ॥ मग करावे त्यांचे भस्म ॥ शुद्ध विभूति मग परम ॥ शिवगायत्रीने मंत्रिजे ॥९९॥
आधी अंगुष्ठे लाविजे ऊर्ध्व ॥ मग मस्तकाभोवते वेष्टिजे शुद्ध ॥ तर्जनी न लाविजे निषिद्ध ॥ कनिष्ठिका वेगळी करी ॥१००॥

दो बोटांनी लाविजे भाळी ॥ अंगुष्ठे मध्यरेखा तेजागळी ॥ तैसे त्रिपुंड्रधारण चंद्रमौळी ॥ सनत्कुमारा सांगत ॥१॥
तर्जनी न लाविता सर्वांगी विभूती ॥ त्रिबोटी लाविजे निश्चिती ॥ येणे महत्पापे भस्म होती ॥ शिवभूषणप्रसादे ॥२॥
अगम्यागमन सुरापान ॥ ब्रह्महत्या गोहत्या अभक्ष्यभक्षणा ॥ महत्पापांचे पर्वत जाण ॥ भस्मचर्चने भस्म होती ॥३॥
ऐसा भस्माचा महिमा वामदेव ॥ ब्रह्मराक्षसा सांगे सर्व ॥ विमान आले अपूर्व ॥ दिव्यरूप असुर झाला ॥४॥
कैलासाप्रति जाऊन ॥ राहिला शिवरूप होऊन ॥ वामदेव पृथ्वीपर्यटन ॥ स्वेच्छे करीत चालिला ॥५॥
सत्संगाचा महिमा थोर ॥ वामदेवासंगे तरला असुर ॥ भस्मलेपने भाळनेत्र ॥ सदा सुप्रसन्न भक्तांसी ॥६॥
मंत्र तीर्थ द्विज देव ॥ गुरु यज्ञ ज्योतिषी औषधी सर्व ॥ येथे जैसा धरिती भाव ॥ सिद्धि तैसी तयांसी ॥७॥
पांचाळ देशी नृपनाथ ॥ नाम जयाचे सिंहेकत ॥ जैसा शक्रनंदन की तृतीय सुत ॥ पृथादेवीचा पुरुषार्थी ॥८॥
मृगयेस गेला तो भूपाळ ॥ मागे चालत धुरंधर दळ ॥ शबरांचेही मेळ ॥ बहुसाल निघती तयासवे ॥९॥
वनोवनी हिंडता भूपाळक ॥ शबर एक परम भाविक ॥ भग्न शिवालय एक ॥ गेला त्यात निषाद तो ॥११०॥

उन्मळोनि पडले दिव्य लिंग ॥ पंचसूत्री रमणीय़ अभंग ॥ सिंहकेतरायाते सवेग ॥ दाविता झाला तेधवा ॥११॥
राजा म्हणे लिंग चांगले ॥ परीपाहिजे भावे पूजिले ॥ उगेचि देवार्चन मांडिले ॥ दंभेकरूनि लौकिकी ॥१२॥
लौकिकी मिरवावया थोरपण ॥ प्रतिमा ठेविल्या सोज्वळ करून ॥ जेवी कांसारे मांडिले दुकान ॥ प्रतिमाविक्रय करावया ॥१३॥
ब्राह्मणवेष घेवोनि शुद्ध ॥ यात्रेत हिंडती जैसे मैंद ॥ की मार्गघ्न वाटेत साधुसिद्ध ॥ वेष धरूनि बैसले ॥१४॥
काळनेमी साधुवेष धरून ॥ वाटेत बैसला करावया विघ्न ॥ एवं भावेविण देवतार्चन ॥ व्यर्थ काय दांभिक ॥१५॥
शबरासी म्हणे नृपसत्तम ॥ तुज हे लिंग सांपडले उत्तम ॥ निषाद म्हणे पूजनक्रम ॥ कैसा आहे सांग पा ॥१६॥
विनोदे बोले नृपवर ॥ पूजेचे आहेत बहुत प्रकार ॥ परी चिताभस्म पवित्र ॥ नित्य नूतन आणावे ॥१७॥
चिताभस्माविण ॥ नैवेद्य करू नये समर्पण ॥ हेचि मुख्य वर्म जाण ॥ शैवलक्षण निष्ठेचे ॥१८॥
नृपवचन मानूनि यथार्थ ॥ शबर लिंग घरा आणीत ॥ शबरीस सांगे वृत्तांत ॥ हर्षभरित ते झाली ॥१९॥
सुमुहूर्तै शिवलिंग स्थापून ॥ दोघे पूजिती एकनिष्ठेकरून ॥ चिताभस्म नित्य नूतन ॥ आणिती मेळवून साक्षेपे ॥१२०॥

एकार्ती होताचि सुंदरी ॥ नैवेद्य आणीत झडकरी ॥ उभयता जोडल्या करी ॥ शिवस्तवनी सादर ॥२१॥
ऐसे नित्य करिता पूजन ॥ लोटले कित्येक दिन ॥ त्यांची निष्ठा पहावया पूर्ण ॥ केले नवल पंचवदने ॥२२॥
ऐसे एकदा घडोनि आले ॥ चिताभस्म कोठे न मिळे ॥ शबरे बहुत शोधिले ॥ अपार क्रमिले भूमंडळ ॥२३॥
परतोनि सदनासी येत ॥ शबरीस सांगे वृत्तांत ॥ तेही झाली चिंताक्रांत ॥ म्हणे पूजन केवी होय ॥२४॥
केले शिवपूजन उत्तम ॥ परी न मिळता चिताभस्म ॥ तो शबर भक्तराज परम ॥ नैवेद्य शिवासी अर्पीना ॥२५॥
शिवदीक्षा परम कठीण ॥ निष्ठा पाहे उमारमण ॥ शबरी म्हणे प्रियालागून ॥ मी आपुले भस्म करिते आता ॥२६॥
पाकसदनी बैसोन ॥ लावोनि घेते आता अग्न ॥ ते चिताभस्म चर्चून ॥ सांबपूजन करावे ॥२७॥
मग शुचिर्भूत होवोनी शबरी ॥ शिवध्यान स्मरण करी ॥ अग्नि लावोनी झडकरी ॥ भस्म करी कलेवर ॥२८॥
शबर घेवोनि ते भस्म ॥ चर्ची सदाशिवासी सप्रेम ॥ परी नैवेद्य आणावया उत्तम ॥ दुसरे कोणी नसेचि ॥२९॥
भोळा चक्रवर्ती उदार ॥ तारावया धैर्य पाहे शंकर ॥ आसन घालोनि शबर ॥ परम सादर शिवार्चनी ॥१३०॥

शबरी उत्तम पाक करून ॥ नित्य येत नैवेद्य घेवोन ॥ शबर एकार्ती करून ॥ पूर्वाभ्यासे बोलावीत ॥३१॥
एकार्ती होतांचि सदाशिवा ॥ त्रुटी न वाजता नैवेद्य दावावा ॥ विलंब होता महादेवा ॥ क्षोभ अत्यंत पै होय ॥३२॥
सर्व अन्याय क्षमा करी शंकर ॥ परी नैवेद्यासी होता उशीर ॥ क्षोभोनि जातो श्रीशंकर ॥ उशीर अणुमात्र सोसेना ॥३३॥
शबर आनंदमय शिवार्चनी ॥ स्त्रियेने शरीर जाळिले हे नाठवे मनी ॥ म्हणे ललने नैवेद्य आणी ॥ तव पाठीसी उभी घेवोनिया ॥३४॥
रंभा उर्वशी मेनका सुंदरी ॥ त्यांहूनि दिव्यरूप झाली शबरी ॥ चतुर्विध नैवेद्य करी ॥ देत पतीच्या तेधवा ॥३५॥
नैवेद्य अर्पूनि शबर ॥ पूजा झाली षोडशोपचार ॥ दोघे जोडोनिया कर ॥ स्तवन करी शिवाचे ॥३६॥
जय जय अनंतब्रह्मांडनायका ॥ जय जय शिव मायाचक्रचालका ॥ दुर्जनदमना मदनांदका ॥ भवहारका भवानीपते ॥३७॥
पूजन झाले संपूर्ण ॥ शबर पाहे स्त्री विलोकून ॥ अलंकारमंडित सद्गुण ॥ आपणही शिवरूप जाहला ॥३८॥
एक नीलकंठ वेगळा करून ॥ शिवभक्त शिवसमान ॥ तव आले दिव्य विमान ॥ वाद्ये अपार वाजती ॥३९॥
येत दिव्यसुमनांचे परिमळ ॥ आश्चर्य करी सिंहकेतनृपाळ ॥ विमानी बैसवूनि तत्काळ ॥ शिवपद पावली दोघेही ॥१४०॥

राव म्हणे विनोदेकरून ॥ म्यां सांगितले चिताभस्मपूजन ॥ परी धन्य शबराचे निर्वाण ॥ उद्धारोनि गेला कैलासा ॥४१॥
धन्य ते शबरी कामिनी ॥ देह समर्पिला शिवार्चनी ॥ एवं एकनिष्ठ देखिल्यावांचोनी ॥ पिनाकपाणी प्रसन्न नव्हे ॥४२॥
सिंहकेतासी लागला तोचि छंद ॥ सर्वदा शिवभजनाचा वेध ॥ शिवलीलामृत प्रसिद्ध ॥ श्रवण करी सर्वदा ॥४३॥
शिवरात्री प्रदोष सोमवार ॥ व्रते आचरे प्रीती नृपवर ॥ शिवप्रीत्यर्थ उदार ॥ धने वाटी सत्पात्री ॥४४॥
ऐसे करिता शिवभजन ॥ सिंहकेत शिवरूप होवोन ॥ शिवपदी राहिला जावोन ॥ धन्य भजन निष्ठेचे ॥४५॥
शिवलीलामृतमंडपी सुरवाडली ॥ चढत जात श्रीधरवाग्वल्ली ॥ अहळबहळ पसरली ॥ ब्रह्मानंदेकरूनिया ॥४६॥
ते छाया सघन अत्यंत ॥ तेथे बैसोत शिवभक्त ॥ प्रेमद्राक्षफळे पक्व बहुत ॥ सदा सेवोत आदरे ॥४७॥
श्रीधरवरदा ब्रह्मानंदा ॥ मृडानीह्रदयाब्जमिलिंदा ॥ कैवल्यपददायक अभेदा ॥ लीला अगाध बोलवी पुढे ॥४८॥
शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड ॥ स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड ॥ परिसोत सज्जन अखंड ॥ नवमाध्याय गोड हा ॥१४९॥

इति नवमोऽध्यायः ॥९॥
॥श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु॥

Saturday, June 18, 2011

Shivlilamrut - Adhyay 8

अध्याय आठवा
श्रीगणेशाय नमः ॥

जय जय शिव ब्रह्मानंदमूर्ती ॥ वेदवंद्य तू भोळाचक्रवर्ती ॥ शिवयोगीरूपे भद्रायूप्रती ॥ अगाध नीती प्रगटविली ॥१॥
तुझिया बळे विश्वव्यापका ॥ सूत सांगे शौनकादिका ॥ भद्रायूसी शिवकवच देखा ॥ श्रीगुरूने शिकविले ॥२॥
मृत्युंजयमंत्र उत्तम व सर्वांगी चर्चिले भस्म ॥ रुद्राक्षधारण सप्रेम ॥ करी भद्रायु बाळ तो ॥३॥
एक शंख उत्तम देत ॥ ज्याच्या नादे शत्रु होती मूर्च्छित ॥ खङ्ग दिधले अद्भुत ॥ त्रिभुवनात ऐसे नाही की ॥४॥
ते शस्त्र शत्रूते दाविता नग्न ॥ जाती एकदाच भस्म होऊन ॥ द्वादश सहस्त्रइभबळ गहन ॥ तत्काळ दिधले कृपेने ॥५॥
देणे शिवाचे अद्भुत ॥ म्हणे होई ऐश्वर्यवंत ॥ आयुरारोग्य विख्यात ॥ सर्व रायात श्रेष्ठ तू ॥६॥
चिरकाल विजयी होऊनी ॥ संतोषरूपे पाळी मेदिनी ॥ निष्कामदानेकरूनी ॥ माजेल त्रिभुवनी कीर्तिघोष ॥७॥
भाग्यलक्ष्मी असो तव सदनी ॥ भूतकारुण्यलक्ष्मी ह्रदयभवनी ॥ दानलक्ष्मी येवोनी ॥ करकमळी राहो सदा ॥८॥
सर्वांगी असो लक्ष्मीसौम्य ॥ दौर्दंडी वीरलक्ष्मी उत्तम ॥ दिगंतरी किर्ति परम ॥ सर्वदाही वसो तुझी ॥९॥
शत्रुलक्ष्मी खङ्गाग्री वसो ॥ साम्राज्यलक्ष्मी सदा असो ॥ विद्यालक्ष्मी विलसो ॥ सर्वदाही तुजपाशी ॥१०॥

ऐसे शिवयोगी बोलोन ॥ तेथेचि पावला अंतर्धान ॥ भद्रायु सुमती गुरुचरण ॥ सर्वदाही न विसंबती ॥११॥
इकडे भद्रायूचा पिता निरुती ॥ दाशार्णदेशींचा नृपती ॥ वज्रबहु महामती ॥ शत्रू त्यावरी पातले ॥१२॥
मगधदेशाधिपति हेमरथ ॥ तेणे देश नागविला समस्त ॥ धनधान्य हरूनि नेत ॥ सर्व करीत गोहरण ॥१३॥
स्त्रिया पुरुष धरोनि समस्त ॥ बळे नेऊनि बंदी घालित ॥ मुख्य राजग्राम वेष्टित ॥ बाहेर निघत वज्रबाहू ॥१४॥
युद्ध झाले दशदिनपर्यंत ॥ हा एकला शत्रू बहुत ॥ त्यासी धरोनिया जित ॥ रथी बांधिती आकर्षोनी ॥१५॥
वज्रबाहूचे अमात्य धरोन ॥ तेही चालविले बांधोन ॥ सर्व ग्राम प्रजा लुटून ॥ राजस्त्रिया धरियेल्या ॥१६॥
ऐसे हरोनि समस्त ॥ घेवोनि चालिला हेमरथ ॥ वज्रबाहू सचिवासहित ॥ मागे पुढे पाहतसे ॥१७॥
पुत्र ना बंधु आम्हास ॥ कोण कैवारी या समयास ॥ आम्ही पहावी कवणाची आस ॥ सोडवील कोण दुःखार्णवी ॥१८॥
तो समाचार कळला भद्रायूसी ॥ की शत्रु नेती पितयासी ॥ गुरुस्मरण करूनि मानसी ॥ अंगी कवच लेईले ॥१९॥
मृत्युंजयमंत्र परम ॥ सर्वांगी चर्चिले भस्म ॥ शंख खङ्ग घेऊनी उत्तम ॥ मातेलागी नमस्कारी ॥२०॥

म्हणे माते शत्रू बहुत ॥ ग्राम हरूनि पितयास नेत ॥ तरी मी गुरुदास तुझा सुत ॥ संहारीन समस्ताते ॥२१॥
माते तुझ्या सुकृतेकरून ॥ कृतांत समरी करीन चूर्ण ॥ पृथ्वीचे राजे जितचि धरून ॥ आणीन तुझिया दर्शना ॥२२॥
निर्दोष यशाचा ध्वज ॥ उभवीन आज तेजःपुंज ॥ शरत्काळींचा द्विजराज ॥ सोज्वळ जैसा शोभत ॥२३॥
पद्माकरपुत्र सुनय वीर ॥ सवे घेतला सत्वर ॥ सर्पाचा माग काढी विनतापुत्र ॥ तैसे दोघे धावती ॥२४॥
इभ आहे कोणते कांतारी ॥ शोधीत धावती दोघे केसरी ॥ का जनकजेचे कैवारी ॥ लहु कुश पुत्र जैसे ॥२५॥
पायी क्रमिती भूमी सत्वर ॥ शोभती धाकुटे वय किशोर ॥ जवळी देखोनि शत्रूंचे भार ॥ सिंहनादे गर्जिन्नले ॥२६॥
म्हणति उभे रहा रे तस्कर समस्त ॥ वज्रबाहुऐसी दिव्य वस्त ॥ चोरोनि नेता त्वरित ॥ शिक्षा लावू तुम्हाते ॥२७॥
तस्करांसी हेचि शिक्षा जाण ॥ छेदावे कर्ण नासिक कर चरण ॥ एवढा अन्याय करून ॥ कैसे वाचून जाल तुम्ही ॥२८॥
अवघे माघारी जव पाहती ॥ तव दोघे किशोर धावती ॥ म्हणती एक रमापती एक उमापती ॥ येती निजभक्तकैवारे ॥२९॥
एक मृगांक एक मित्र ॥ वसिष्ठ एक विश्वामित्र ॥ एक वासुकी एक भोगींद्र ॥ तेवी दोघे भासती ॥३०॥

असंख्यात सोडिती बाण ॥ जैशा धारा वर्षे धन ॥ वीर खिळिले संपूर्ण ॥ मयूराऐसे दीसति ॥३१॥
परतले शत्रूंचे भार ॥ वर्षती शस्त्रास्त्रे समग्र ॥ वाद्ये वाजती भयंकर ॥ तेणे दिशा व्यापिल्या ॥३२॥
तो जलज वाजविला अद्भुत ॥ धाके उर्वी डळमळित ॥ पाताळी फणिनाथ ॥ सावरीत कुंभिनीते ॥३३॥
दिशा कोंदल्या समस्त ॥ दिग्गज थरथरा कापत ॥ शत्रु पडिले मूर्च्छित ॥ रिते रथ धावती ॥३४॥
त्यातील दिव्य रथ घेवोनि दोनी ॥ दोघे आरूढले तेचि क्षणी ॥ चापी बाण लावूनी ॥ सोडिती प्रलयविद्युद्वत ॥३५॥
वज्रबाहूचे वीर बहुत ॥ भारासमवेत गजरथ ॥ भद्रायुभोवते मिळत ॥ कैवारी आपला म्हणवूनी ॥३६॥
वाद्ये वाजवूनिया दळ ॥ भद्रायूभोवते मिळाले सकळ ॥ म्हणती हा कैवारी या वेळ ॥ आला न कळे कोठोनी ॥३७॥
पाठिराखा देखोनि समर्थ ॥ वीरांस बळ चढले अद्भुत ॥ हेमरथाची सेना बहुत ॥ संहारिली ते काळी ॥३८॥
वज्रबाहूसहित प्रधान ॥ रथी बांधिले पाहती दुरून ॥ म्हणती त्रिपुरारि मुरारि दोघे जण ॥ किशोरवेषे पातले ॥३९॥
एका गुरुने शिकविले पूर्ण ॥ दिसे दोघांची विद्या समान ॥ त्यात मुख्य राजनंदन ॥ देखोनि स्नेह वाटतो ॥४०॥

कोण आहेत न कळे सत्य ॥ मज वाटती परम आप्त ॥ ह्रदयी धरूनि यथार्थ ॥ द्यावे चुंबन आवाडीने ॥४१॥
मांडिले घोरांदर रण ॥ रक्तपूर चालिले जाण ॥ वज्रबाहु दुरून ॥ प्रधानासहित पाहतसे ॥४२॥
अनिवार भद्रायूचा मार ॥ शत्रु केले तेव्हा जर्जर ॥ समरभूमी माजली थोर ॥ बाणे अंबर कोंदले ॥४३॥
ऐसे देखोनि हेमरथ ॥ लोटला तेव्हा कृतांतवत ॥ दोघांसी युद्ध अद्भुत ॥ चार घटिका जाहले ॥४४॥
शत्रू थरथरा कापत ॥ म्हणती भीम की हनुमंत ॥ किंवा आला रेवतीनाथ ॥ मुसळ नांगर घेऊनी ॥४५॥
शत्रूचा देखोनी उत्कर्ष बहुत ॥ भद्रायूने शिवयोगिदत्त ॥ खङ्ग काढिले तेज अद्भुत ॥ सहस्त्रमार्तंडासमान ॥४६॥
काळाग्नीची जिव्हा कराळ ॥ की प्रळयविजांचा मेळ ॥ की काळसर्पाची गरळ ॥ तेवी खङ्ग झळकतसे ॥४७॥
ते शस्त्र झळकता तेजाळ ॥ मागधदळ भस्म झाले सकळ ॥ मागे होता हेमरथ तत्काळ ॥ समाचार श्रुत जाहला ॥४८॥
की काळशस्त्र घेता हाती ॥ देखतांचि दळ संहारिती ॥ मग पळू लागला पवनगती ॥ उरल्या दळासमवेत ॥४९॥
प्रधानांसह वज्रबाहूसी टाकून ॥ पळती शत्रु घेतले रान ॥ ते भद्रायूने देखोन ॥ धरिला धावून हेमरथ ॥५०॥

धरिल तो दृढ केशी ॥ ओढूनि पाडिला भूमीसी ॥ लत्ताप्रहार देता ह्रदयदेशी ॥ अशुद्ध ओकीत भडभडा ॥५१॥
रथी बांधिला आकर्षून ॥ मंत्रिप्रधानांसहित जाण ॥ खुरमुखशर घेऊन ॥ पाच पाट काढिले ॥५२॥
अर्धखाड अर्धमिशी भादरून ॥ माघारे चालवी संपूर्ण ॥ राजस्त्रिया अपार कोश धन ॥ घेत हिरोन तेधवा ॥५३॥
देश नागविला होता सकळ ॥ वस्तुमात्र आणविल्या तत्काळ ॥ गोभार परतविला सकळ ॥ जेथींचा तेथे स्थापिला ॥५४॥
अमात्यासमवेत पिता ॥ सोडवूनि पायी ठेविला माथा ॥ वज्रबाहु होय बोलता ॥ त्याजकडे पाहूनी ॥५५॥
नयनी लोटल्या अश्रुधारा ॥ तू कोण आहेस सांग कुमारा ॥ मज अपयशसमुद्रातूनि त्वरा ॥ काढिले उडी घालूनी ॥५६॥
जळत शत्रुद्रावाग्नीत ॥ वर्षलासी जलद अद्भुत ॥ मज वाटे तू कैलासनाथ ॥ बाळवेषे आलासी ॥५७॥
की वाटे वैकुंठनायके ॥ रूपे धरिली बाळकांची कौतुके ॥ की सहस्त्राक्षे येण एके ॥ केले धावणे वाटतसे ॥५८॥
सकळ राजस्त्रिया धावोन ॥ उतरिती मुखावरूनि निंबलोण ॥ म्हणती बाळा तुजवरून ॥ जाऊ ओवाळून सर्वही ॥५९॥
भद्रायु म्हणे नगरात ॥ चला शत्रु घेवोनि समस्त ॥ बंदी घालूनि रक्षा बहुत ॥ परम यत्ने करोनिया ॥६०॥

नगरात पिता नेऊनी ॥ बैसविला दिव्य सिंहासनी ॥ जयवाद्यांचा ध्वनी ॥ अपार वाजो लागला ॥६१॥
नगर श्रृंगारिले एकसरा ॥ रथी भरूनि वाटती शर्करा ॥ नगरजन धावती त्वरा ॥ वज्रबाहूसी भेटावया ॥६२॥
वज्रबाहु म्हणे सद्गद होऊन ॥ जेणे मज सोडविले धावून ॥ त्या कैवारियाचे चरण धरा जाऊन ये वेळा ॥६३॥
भद्रायु म्हणे पितयालागून ॥ शत्रूस करा बहुत जतन ॥ तीन दिवसां मी येईन ॥ परतोनि जाणा तुम्हापासी ॥६४॥
मी आहे कोणाचा कोण ॥ कळेल सकळ वर्तमान ॥ ऐसे बोलोनि दोघेजण ॥ रथारूढ पै झाले ॥६५॥
मनोवेगेकरून ॥ येऊन वंदिले मातेचे चरण ॥ मग तिणे करूनि निंबलोण ॥ सुखावे पूर्ण पद्माकर ॥६६॥
असो यावरी शिवयोगी दयाघन ॥ चित्रांगदसीमंतिनीसी भेटोन ॥ जन्मादारभ्य वर्तमान ॥ त्यासी सांगे भद्रायूचे ॥६७॥
पिता सोडवूनि पुरुषार्थ ॥ केला तो ऐकिली की समस्त ॥ तरी तो तुम्ही करावा जामात ॥ कीर्तिमालिनी देऊनिया ॥६८॥
ऐकता ऐसा मधुर शब्द ॥ सीमंतिनी आणि चित्रांगद ॥ दृढ धरिती चरणारविंद ॥ पूजिती मग षोडशोपचारे ॥६९॥
म्हणती तुझे वचन प्रमाण ॥ वर आणावा आताचि आहे लग्न ॥ मग दळभार वाहने पाठवून ॥ दिधली वैश्यनगराप्रती ॥७०॥

सुनयपुत्रासहित समग्र ॥ नाना संपत्ति घेऊन अपार ॥ लग्नासी चालिला पद्माकर ॥ वाद्ये अपार वाजिती ॥७१॥
भद्रायु बैसला सुखासनी ॥ तैसीच माता शिबिकायानी ॥ चित्रांगद सामोरा येवोनी ॥ घेवोनि गेला मिरवीत ॥७२॥
वर पाहूनि जन तटस्थ ॥ म्हणती कायसा यापुढे रतिनाथ ॥ पृथ्वीचे राजे समस्त ॥ आणविले लग्नासी ॥७३॥
त्यात वज्रबाहु सहपरिवारे ॥ लग्नालागी पातला त्वरे ॥ वराकडे पाहे सादरे ॥ तव तो कैवारी ओळखिला ॥७४॥
पाय त्याचे धरावया धाविन्नला ॥ भद्रायुने वरच्यावरी धरिला ॥ आलिंगन देता वेळोवेळा ॥ कंठ दाटले उभयतांचे ॥७५॥
नयनी चालिल्या विमलांबुधारा ॥ अभिषेक करिती येरयेरा ॥ मग वज्रबाहु पुसे वरा ॥ देश तुझा कवण सांग ॥७६॥
फेडी संशय तत्त्वता ॥ सांग कवण माता पिता ॥ गोत्र ग्राम गुरु आता ॥ सर्व सांग मजप्रती ॥७७॥
चित्रांगदे एकांती नेउन ॥ सांगितले साद्यंत वर्तमान ॥ हा शिवयोगियाचा महिमा पूर्ण ॥ उपासना शिवाची ॥७८॥
अनंत पुण्य कोट्यनुकोटी ॥ तै शिवयोगियाची होय भेटी ॥ तो साक्षात धूर्जटी त्याचे चरित्र जाण हे ॥७९॥
मग ते सुमती पट्टराणी ॥ भेटविली एकांती नेऊनी ॥ वज्रबाहु खालते पाहूनी ॥ रुदन करी तेधवा ॥८०॥

म्हणे ऐसीनिधाने वरिष्ठे ॥ म्या घोर वनी टाकिली नष्टे ॥ मजएवढे अन्यायी कोठे ॥ पृथ्वी शोधिता नसेल ॥८१॥
सुमती मागील दुःख अद्भुत ॥ आठवूनि रडे सद्गदित ॥ म्हणे शिवयोगी गुरुनाथ ॥ तेणे कृतार्थ केले आम्हा ॥८२॥
मग सीमंतिनी चित्रांगद ॥ उभयतांचा करूनि ऐक्यवाद ॥ वज्रबाहु बोले सद्गद ॥ धन्य सुमती राणी तू ॥८३॥
बिंदूचा सिंधु करून ॥ मज त्वा दाविला आणोन ॥ सर्षप कनकाद्रीहून ॥ श्रेष्ठ केला गुणसरिते ॥८४॥
त्वा माझा केला उद्धार मज अभाग्यासी कैचा पुत्र ॥ हे राज्य तुझेचि समग्र ॥ सुतासहित त्वा दीधले ॥८५॥
ऐसे बोलोनि त्वरित ॥ वज्रबाहु बाहेर येत ॥ भद्रायु धावोनि सद्गदित ॥ साष्टांगे नमित पितयाते ॥८६॥
वज्रबाहु देत आलिंगन ॥ जेवी भेटती शिव आणि षडानन ॥ की वाचस्पति आणि कचनिधान ॥ संजीवनी साधिता आलिंगी ॥८७॥
मस्तक अवघ्राणूनि झडकरी ॥ सप्रेम बैसवला अंकावरी ॥ कीर्तिमालिनी स्नुषा सुंदरी ॥ दक्षिणांकी बैसविली ॥८८॥
तव राजे समस्त आश्चर्य करिती ॥ धन्य वज्रबाहु नृपती ॥ मग पद्माकर सुनय याप्रती ॥ भद्रायु भेटवी पितयाते ॥८९॥
गगनी न समाये ब्रह्मानंद ॥ ऐसा झाला सकळा मोद ॥ मग चारी दिवस सानंद ॥ यथासांग लग्न झाले ॥९०॥

आंदण दिधले अपार ॥ दोन लक्ष वाजी अयुत कुंजर ॥ दास दासी भांडार ॥ भरूनि द्रव्य दिधले ॥९१॥
सवे घेऊनि कीर्तिमालिनी ॥ पद्माकरासहित जनकजननी ॥ निजनगर तेचि क्षणी ॥ जाते झाले तेधवा ॥९२॥
गगनगर्भी न समाये हरिख ॥ ऐसे मातापितयांसी झाले सुख ॥ पट्टराणी सुमती देख ॥ केले आधीन सर्व तिच्या ॥९३॥
मग सकळ शत्रु सोडोन ॥ प्रतिवर्षी करभार नेमून ॥ करूनि आपणाआधीन ॥ जीवदान दीधले तया ॥९४॥
भद्रायु ऐसा पुत्र प्राप्त ॥ होय असल्या पुण्य बहुत ॥ तरी जन्मोजन्मी हिमनगजामात ॥ पूजिला असेल प्रेमभरे ॥९५॥
स्त्री पतिव्रता चतुर सुंदर ॥ पुत्र पंडित सभाग्य पवित्र ॥ गुरु सर्वज्ञ उदार थोर ॥ पूर्वदत्ते प्राप्त होय ॥९६॥
मग त्या भद्रायूवरी छत्र ॥ वज्रबाहु उभवूनि सत्वर ॥ स्त्री सुमतीसहित तप अपार ॥ हिमकेदारी करिता झाला ॥९७॥
करिता शिवआराधन ॥ त्रिकाळज्योतिर्लिंगाचे पूजन ॥ मागे भद्रायु बहुत दिन ॥ राज्य करीत पृथ्वीचे ॥९८॥
शिवकवच भस्मधारण ॥ रुद्राक्षमहिमा अपार पूर्ण ॥ धन्य गुरु शिवयोगी सुजाण ॥ शिष्य भद्रायु धन्य तो ॥९९॥
असो भद्रायु नृपनाथ ॥ कीर्तिमालिनीसमवेत ॥ चालिला वनविहारार्थ ॥ अवलोकीत वनश्रियेते ॥१००॥

छाया सघन शीतळ ॥ पाट वाहती जळ निर्मळ ॥ तेथे बैसता सूर्यमंडळ ॥ वरी कदापि दिसेना ॥१॥
नारळी केळी पोफळी रातांजन ॥ मलयागर सुवास चंदन ॥ अशोकवृक्ष खर्जूरी सघन ॥ आंबे जांभळी खिरणिया ॥२॥
वट पिंपळ कडवे निंब ॥ डाळिंब सेवरी मंदार कदंब ॥ अंजीर औदुंबर पारिभद्र नभ ॥ भेदीत गेले गगनमार्गे ॥३॥
चंपक मोगरे जाई जुई ॥ मालती शेवंती बकुळ ठायी ठायी ॥ शतपत्र जपा अगस्तिवृक्ष पाही ॥ वेष्टोनि वरी चालिले ॥४॥
कनकवेली नागवेली परिकर ॥ पोवळवेली नाना लता सुवासकर ॥ द्राक्षद्वीप द्राक्षतरु सुंदर ॥ जायफळी डोलती फळभारे ॥५॥
बदके चातक मयूर ॥ कस्तूरीमृग जवादी मार्जार ॥ चक्रवाक नकुळ मराळ परिकर ॥ सरोवरतीरी क्रीडती ॥६॥
असो तया वनात ॥ कीर्तिमालिनीसमवेत ॥ क्रीडत असता अकस्मात ॥ एक अपूर्व वर्तले ॥७॥
दूरवरी भद्रायु विलोकीत ॥ तो स्त्री पुरुष येती धावत ॥ ऊर्ध्व करोनिया हस्त ॥ दीर्घस्वरे बोभाती ॥८॥
पाठी लागला महाव्याघ्र ॥ आक्रोशे बोभात विप्र ॥ म्हणे नृपा स्त्री पतिव्रता थोर ॥ मागे सुकुमार राहिली ॥९॥
गजबजोनि धाविन्नला नृप ॥ शर लावूनि ओढिले चाप ॥ तव तो व्याघ्र काळरूप ॥ स्त्रियेसी नेत धरूनिया ॥११०॥

राये शर सोडिले बहुत ॥ परी तो न गणी तैसाचि जात ॥ विजूऐसे शर अद्भुत ॥ अंगी भेदले तयाच्या ॥११॥
गिरिकंदरे ओलांडून ॥ व्याघ्र गेला स्त्रीस घेऊन ॥ विप्र रायापुढे येऊन ॥ शोक करी आक्रोशे ॥१२॥
अहा ललने तुजविण ॥ गृह वाटते महा अरण्य ॥ रायास म्हणे ब्राह्मण ॥ धिक् क्षत्रियपण धिक् जिणे ॥१३॥
तुज देखता सत्य ॥ माझ्या स्त्रीने केला आकांत ॥ अहा कांत पडले व्याघ्रमुखांत ॥ सोडवी मज यापासूनी ॥१४॥
तुजही हाका फोडिल्या बहुत ॥ धाव धाव हे जगतीनाथ ॥ धिक् तुझी शस्त्रे समस्त ॥ खङ्ग व्यर्थ गुरूने दीधले ॥१५॥
द्वादशसहस्त्र नागांचे बळ ॥ धिक् मंत्र अस्त्रजाळ ॥ क्षतापासोनि सोडवी तत्काळ ॥ शरणागता रक्षी तोचि पार्थिव ॥१६॥
धिक् आश्रम धिक् ग्राम ॥ जेथे नाही सत्समागम ॥ धिक् श्रोता धिक् वक्ता ॥ सप्रेम नाही किर्तन शिवाचे ॥१७॥
धिक् संपत्ति धिक् संतती ॥ द्विज न रक्षी न भेजे उमापती ॥ ते धिक् नारी पापमती ॥ पतिव्रता जे नव्हे ॥१८॥
मातापितयांसी शिणवीत ॥ धिक् पुत्र वाचला व्यर्थ ॥ धिक् शिष्य जो गुरुभक्त ॥ नव्हेचि मतवादी पै ॥१९॥
गुरूची झाकोनि पदवी ॥ आपुला महिमा विशेश मिरवी ॥ धिक् पार्थिव जो न सोडवी ॥ संकटी प्राण गेलिया ॥१२०॥

भद्रायु बोले उद्विग्न ॥ मी तुज इच्छिले देईन करी पुढती उत्तम लग्न ॥ अथवा राज्य दान घे माझे ॥२१॥
विप्र म्हणे कासया लग्न ॥ स्त्रीहीनास कासया धन ॥ जन्मांधासी दर्पण ॥ व्यर्थ काय दाऊनी ॥२२॥
मूढासी कासया उत्तम ग्रंथ ॥ तरुणासी संन्यास देणे हे अनुचित ॥ जरेने कवळिला अत्यंत ॥ त्याचे लग्न व्यर्थ जैसे ॥२३॥
तृषाक्रांतासी पाजिले धृत ॥ क्षुधातुरासी माळा गंधाक्षत ॥ चिंतातुरापुढे व्यर्थ ॥ गायन नृत्य कासया ॥२४॥
यालागी नलगे तुझे राज्य धन ॥ दे माझी स्त्री आणोन ॥ राव म्हणे जा कीर्तिमालिनी घेवोन ॥ दिधली म्या तुजप्रती ॥२५॥
रायाचे सत्त्व पाहे ब्राह्मण ॥ म्हणे दे कीर्तिमालिनी मज दान ॥ माझे तप मेरुपर्वताहून ॥ उंच असे न सरे कधी ॥२६॥
मी पापासी भीत नाही जाण ॥ अंगिकारिले तुझे स्त्रीरत्न ॥ सागरी ढेकुळ पडले येऊन ॥ तरी सागर काय डहुळेल ॥२७॥
धुळीने न मळे आकाश तैसा मी सदा निर्दोष ॥ राव म्हणे हे अपयश ॥ थोर आले मजवरी ॥२८॥
माझे बळ गेले तेज क्षणा ॥ व्याघ्रे नेली विप्रललना ॥ आता स्त्री देवोनि ब्राह्मणा ॥ अग्निकाष्ठे भक्षीन मी ॥२९॥
विप्रापुढे संकल्प करूनी ॥ दान दिधली कीर्तिमालिनी ॥ विप्र गुप्त झाला तेचि क्षणी ॥ राये अग्नि चेतविला ॥१३०॥

ज्वाळा चालिल्या आकाशपंथे ॥ मग स्नान केले नृपनाथे ॥ भस्म चर्चिले सर्वांगाते ॥ रुद्राक्षधारण पै केले ॥३१॥
आठवूनि गुरुचरण ॥ शिवमंत्र शिवध्यान ॥ प्रदक्षिणा करूनि तीन ॥ अग्निकुंडाभोवत्या ॥३२॥
जय जय शंकर उमारंगा ॥ मदनांतका भक्तभवभंगा ॥ विश्वव्यापका आराध्यलिंगा ॥ नेई वेगे तुजपाशी ॥३३॥
उडी टाको जाता ते वेळी ॥ असंभाव्य चेतला ज्वाळामाळी ॥ तव त्यामधून कपालमौली ॥ अपर्णेसहित प्रकटला ॥३४॥
दशभुज पंचवदन ॥ कर्पूरगौर पंचदशनयन ॥ पंचविंशतितत्त्वाहून ॥ पंचभूतावेगळा जो ॥३५॥
भद्रायूस ह्रदयी धरूनि सत्वर ॥ म्हणे सखया इच्छित माग वर ॥ तुझी भक्ति निर्वाण थोर ॥ देखोनि प्रकट झालो मी ॥३६॥
भद्रायु बोले सद्गदित ॥ म्हणे विप्रस्त्री आणून दे त्वरित ॥ ते ऐकोनि हासिन्नला गजमुखतात ॥ विप्र तो मीच झालो होतो ॥३७॥
व्याघ्रही मीच होऊन ॥ गेलो भवानीस घेऊन ॥ तुझी भक्ति पहावया निर्वाण ॥ दोघेही आम्ही प्रगटलो ॥३८॥
तुझी हे घे कीर्तिमालिनी ॥ म्हणोनि उभी केली तेचि क्षणी ॥ देव सुमने वर्षती गगनी ॥ राव चरणी लागतसे ॥३९॥
शिव म्हणे रे गुणवंता ॥ अपेक्षित वर मागे आता ॥ येरू म्हणे वज्रबाहु पिता ॥ सुमती माता महासती ॥१४०॥

पद्माकर गुणवंत ॥ कैलासी न्यावा स्त्रीसमवेत ॥ इतुक्यांसी ठाव यथार्थ ॥ तुजसमीप देईजे ॥४१॥
तुझिया पार्श्वभागी सकळ ॥ असोत स्वमी अक्षयी अढळ ॥ यावरी बोले पयःफेनधवल ॥ कीर्तिमालिनी तू माग आता ॥४२॥
ती म्हणे माता सीमंतिनी ॥ पिता चित्रांगद पुण्यखाणी ॥ तुजसमीप राहोत अनुदिनी ॥ शूळपाणी तथास्तु म्हणे ॥४३॥
तुम्ही उभयतानी मागितले ॥ ते म्या सर्व दिधले ॥ माझे चित्त गुंतले ॥ तुम्हापासी सर्वदा ॥४४॥
मग कीर्तिमालिनीसमवेत ॥ दहा सहस्त्र वर्षेपर्यंत ॥ भद्रायु राजा राज्य करीत ॥ हरिश्चंद्रासारिखे ॥४५॥
मग त्यावरी सकळी ॥ दिव्यदेह अवघी झाली ॥ दिव्य विमानी कपालमौली ॥ नेता झाला संनिध ॥४६॥
चित्रांगद सीमंतिनी ॥ वज्रबाहु सुमती राणी ॥ अवघी विमानारूढ होवोनी ॥ पावली शिवपद शाश्वत ॥४७॥
स्त्रीपुत्रांसमवेत पद्माकर ॥ भद्रायु कीर्तिमालिनी सुकुमार ॥ त्यासी विमान धाडूनि श्रीशंकर ॥ आपुल्या स्वरूपी मेळविले ॥४८॥
हे भद्रायुआख्यान ॥ परम यशदायक आयुष्यवर्धन ॥ ऐकता लिहिता जाण ॥ विजय कल्याण सर्वदा ॥४९॥
हे आख्यान जे म्हणत ॥ ते सर्वदा वादी अयवंत ॥ विजय धैर्य अत्यंत ॥ कीर्तिवंत सर्वांठायी ॥१५०॥

भद्रायुआख्यान पुण्य आगळे ॥ पद रचना ही बिल्वदळे ॥ उमावल्लभा वाहती भावबळे ॥ ते तरती संसारी ॥५१॥
भद्रायुआख्यान कैलासगिरी ॥ जो का पारायण प्रदक्षिणा करी ॥ त्याचा बंद तोडोनि मदनारी ॥ निष्पाप करी सर्वदा ॥५२॥
ब्रह्मानंदा सुखदायका ॥ श्रीधरवरदा कैलासनायका ॥ भक्तकामकल्पद्रुम गजांतका ॥ न येसी तर्का निगमागमा ॥५३॥
शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड ॥ स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड ॥ परिसोत श्रोते अखंड ॥ अष्टमोध्याय गोड हा ॥१५४॥

॥श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु॥

Thursday, June 16, 2011

Shivlilamrut - Adhyay 7

अध्याय सातवा
श्रीगणेशाय नमः ॥

जय जय किशोरचंद्रशेखरा ॥ उर्वीघरेंद्रनंदिनीवरा ॥ भुजंगभूषणा सप्तकरनेत्रा ॥ लीला विचित्रा तुझिया ॥१॥
भानुकोटितेज अपरिमिता ॥ विश्वव्यापका विश्वनाथा ॥ रमाधवप्रिया भूताधिपते अनंता ॥ अमूर्तमूर्ता विश्वपते ॥२॥
परमानंदा पंचवक्रा ॥ परात्परा पंचदशनेत्रा ॥ परमपावना पयःफेनगात्रा ॥ परममंगला परब्रह्मा ॥३॥
मंदस्मितवदन दयाळा ॥ षष्ठाध्यायी अतिनिर्मळा ॥ सीमंतिनीआख्यानलीळा ॥ स्नेहाळा तू वदलासी ॥४॥
श्रीधरमुख निमित्त करून ॥ तूचि वदलासी आपुले गुण ॥ व्यासरूपे सूतास स्थापून ॥ रसिक पुराण सांगविसी ॥५॥
ऐसे ऐकता दयाळ ॥ वदता झाला श्रीगोपाळ ॥ विदर्भनगरी एक सुशीळ ॥ वेदमित्र नामे द्विज होता ॥६॥
तो वेदशास्त्र संपन्न ॥ त्याचा मित्र सारस्वत नामे ब्राह्मण ॥ वेदमित्रास पुत्र सगुण ॥ सुमेधा नामे जाहला ॥७॥
सारस्वतसुत सोमवंत ॥ उभयतांचे मित्रत्व अत्यंत ॥ दशग्रंथी ज्ञान बहुत ॥ मुखोद्गत पुराणे ॥८॥
संहिता पद क्रम अरण ब्राह्मण ॥ छंद निघंट शिक्षा जाण ॥ ज्योतिष कल्प व्याकरण ॥ निरुक्त पूर्ण दशग्रंथी ॥९॥
ऐसा विद्याभ्यास करिता ॥ षोडश वर्षै झाली तत्त्वता ॥ दोघांचे पिते म्हणती आता ॥ भेटा नृपनाथ वैदर्भासी ॥१०॥

विद्या दावूनि अद्भुत ॥ मेळवावे द्रव्य बहुत ॥ मग वधू पाहूनि यथार्थ ॥ लग्ने करू तुमची ॥११॥
यावरी ते ऋषिपुत्र ॥ विदर्भरायासी भेटले सत्वर ॥ विद्याधनाचे भांडार ॥ उघडोनि दाविती नृपश्रेष्ठा ॥१२॥
विद्या पाहता तोषला राव ॥ परी विनोद मांडिला अभिनव ॥ म्हणे मी एक सांगेन भाव ॥ धरा तुम्ही दोघेही ॥१३॥
नैषधपुरीचा नृपनाथ ॥ त्याची पत्नी सीमंतिनी विख्यात ॥ मृत्युंजयमृडानीप्रीत्यर्थ ॥ दंपत्यपूजा करी बहू ॥१४॥
तरी तुम्ही एक पुरुष एक नितंबिनी ॥ होवोनि जावे ये क्षणी ॥ दिव्य अलंकार बहुत धनी ॥ पूजील तुम्हाकारणे ॥१५॥
तेथोनि यावे परतोन ॥ मग मीही देईन यथेष्ट धन ॥ मातापितागुरुनृपवचन ॥ कदा अमान्य करू नये ॥१६॥
तव बोलती दोघे किशोर ॥ हे अनुचित कर्म निंद्य फार ॥ पुरुषास स्त्री देखता साचार ॥ सचैल स्नान करावे ॥१७॥
पुरुषासी नारीवेष देखता ॥ पाहणार जाती अधःपाता ॥ वेष घेणारही तत्त्वता ॥ जन्मोजन्मी स्त्री होय ॥१८॥
हेही परत्री कर्म अनुचित ॥ तैसेचि शास्त्र बोलत ॥ त्याहीवरी आम्ही विद्यावंत ॥ धम अमित मेळवू ॥१९॥
आमुची विद्यालक्ष्मी सतेज ॥ तोषवू अवनीचे भूभुज ॥ आमुचे नमूनि चरणांबुज ॥ धन देती प्रार्थूनिया ॥२०॥

पंडितांची विद्या माय सद्गुणी ॥ विद्या अकाळी फळदायिनी ॥ विद्या कामधेनु सांडुनी ॥ निंद्य कर्म न करू कदा ॥२१॥
मातापित्यांहूनि विद्या आगळी ॥ संकटी प्रवासी प्रतिपाळी ॥ पृथ्वीचे प्रभु सकळी ॥ देखोन्या जोडिती कर ॥२२॥
विद्याहीन तो पाषाण देख ॥ जिताची मृत तो शतमूर्ख ॥ त्याचे न पाहावे मुख ॥ जननी व्यर्थ श्रमविली ॥२३॥
राव म्हणे दोघांलागुन ॥ माझे मान्य करावे एवढे वचन ॥ परम संकट पडले म्हणून ॥ अवश्य म्हणती तेधवा ॥२४॥
राये वस्त्र अलंकार आणून ॥ एकासी स्त्रीवेष देऊन ॥ सोमवारी यामिनीमाजी जाण ॥ पूजासमयी पातले ॥२५॥
जे सकळ प्रमदांची ईश्वरी ॥ जिची प्रतिमा नाही कुंभिनीवरी ॥ जीस देखोनि नृत्य करी ॥ पंचशर प्रितीने ॥२६॥
रंभा उर्वशी चातुर्यखाणी ॥ परी लज्जा पावती जीस देखोनी ॥ रेणुका जानकी श्रीकृष्णभगिनी ॥ उपमा शोभे जियेसी ॥२७॥
तिणे हे दंपत्य देखोनी ॥ कृतिम पाहूनि हासे मनी ॥ परी भावार्थ धरूनि चातुर्यखाणी ॥ हरभवानी म्हणोनि पूजित ॥२८॥
अलंकार वस्त्रे यथेष्ट धन ॥ षड्रस अन्ने देत भोजन ॥ शिवगौरी म्हणोन ॥ नमस्कार करूनि बोळवी ॥२९॥
जाता ग्रामपंथ लक्षूनी ॥ पुढे भ्रतार मागे कामिनी ॥ नाना विकार चेष्टा भाषणी ॥ बहुत बोले तयासी ॥३०॥

म्हणे आहे हे एकांतवन ॥ वृक्ष लागले निबिड सघन ॥ मी कामानळेकरून ॥ गेले आहाळून प्राणपति ॥३१॥
तू वर्षोनि सुरतमेघ ॥ शीतळ करी ममांग ॥ मी नितंबिनी झाले अभंग ॥ जवळी पाहे येऊनिया ॥३२॥
तो म्हणे का चेष्टा करिसी विशेष ॥ फेडी वस्त्र होय पुरुष ॥ विनोद करिसी आसमास ॥ हासती लोक मार्गीचे ॥३३॥
तव ते कामे होवोनि मूर्च्छित ॥ मेदिनीवरी अंग टाकीत ॥ म्हणे प्राणनाथा धाव त्वरित ॥ करी शांत कामज्वराते ॥३४॥
तव तो परतोनि आला सवेग ॥ म्हणे हे नसते काय मांडिले सोंग ॥ तुम्ही आम्ही गुरुबंधू निःसंग ॥ ब्रह्मचारी विद्यार्थी ॥३५॥
येरी म्हणे बोलसी काये ॥ माझे अवयव चाचपोनि पाहे ॥ गेले पुरुषत्व लवलाहे ॥ भोगी येथे मज आता ॥३६॥
हाती धरूनि तयासी ॥ आडमार्गे नेले एकांतासी ॥ वृक्ष गेले गगनासी ॥ पल्लव भूमीसी पसरले ॥३७॥
साल तमाल देवदार ॥ आम्र कदंबादि तरुवर ॥ त्या वनी नेऊनि सत्वर ॥ म्हणे शंका सांडी सर्वही ॥३८॥
मी स्त्री तू भ्रतार निर्धार ॥ नाही येथे दुसरा विचार ॥ येरु म्हणे हे न घडे साचार ॥ तुम्ही आम्ही गुरुबंधू ॥३९॥
शास्त्र पढलासी सकळ ॥ त्याचे काय हेचि फळ ॥ परत्रसाधन सुकृत ॥ निर्मळ विचार करूनि पाहे पा ॥४०॥

आधीच स्त्री वरी तारुण्य ॥ परम निर्लज्ज एकांतवन ॥ मिठी घाली गळा धावून ॥ देत चुंबन बळेचि ॥४१॥
घेऊनिया त्याचा हात ॥ म्हणे पाहे हे पयोधर कमंडलुवत ॥ तव तो झिडकारूनि मागे सारीत ॥ नसता अनर्थ करू नको ॥४२॥
धन्य धन्य ते पुरुष जनी ॥ परयोषिता एकांतवनी ॥ सभाग्य सधन तरुणी ॥ प्रार्थिता मन चळेना ॥४३॥
वृत्तीस नव्हे विकार ॥ तरी तो नर केवळ शंकर ॥ त्यापासी तीर्थै समग्र ॥ येवोनि राहती सेवेसी ॥४४॥
जनरहित घोर वनी ॥ द्रव्यघट देखिला नयनी ॥ देखता जाय वोसंडोनी ॥ तरी तो शंकर निर्धारे ॥४५॥
सत्यवचनी सत्कर्मी रत ॥ निगमागमविद्या मुखोद्गत ॥ इतुके आसोनि गर्वरहित ॥ तरी तो शंकर निर्धारे ॥४६॥
आपणा देखता वर्म काढूनी ॥ निंदक विंधिती वाग्बाणी ॥ परी खेदरहित आनंद मनी ॥ तरी तो शंकर निर्धारे ॥४७॥
दुसरियाचे कूटदोष गुण ॥ देखे ऐके जरी अनुदिन ॥ परी ते मुखास नाणी गेलिया प्राण ॥ तरी तो शंकर निर्धारे ॥४८॥
न दिसे स्त्रीपुरुषभान ॥ गुरुरूप पाहे चराचर संपूर्ण ॥ न सांगे आपुले सुकृत तप दान ॥ तरी तो शंकर निर्धारे ॥४९॥
पैल मूर्ख हा पंडित ॥ निवडू नेणे समान पाहत ॥ कीर्ति वाढवावी नावडे मनात ॥ तरी तो शंकर निर्धारे ॥५०॥

अभ्यासिले न मिरवी लोकात ॥ शिष्य करावे हा नाहीच हेत ॥ कोणाचा संग नावडे आवडे एकांत ॥ तरी तो शंकर निर्धारे ॥५१॥
विरोनि गेल्या चित्तवृत्ती ॥ समाधी अखंड गेली भ्रांती ॥ अर्थ बुडालिया नाही खंती ॥ तरी तो शंकर निर्धारे ॥५२॥
श्रीधर म्हणे ऐसे पुरुष ॥ ते ब्रह्मानंद परमहंस ॥ त्यांच्या पायींच्या पादुका निःशेष ॥ होऊनि राहावे सर्वदा ॥५३॥
वेदमित्रपुत्र साधु परम ॥ धैर्यशस्त्रे निवटोनि काम ॥ म्हणे ग्रामास चला जाऊ उत्तम ॥ विचार करू या गोष्टीचा ॥५४॥
ऐसे बोलोनि सारस्वतपुत्र ॥ स्त्रीरूपे सदना आणिला सत्वर ॥ श्रुत केला समाचार ॥ गतकतार्थ वर्तला जो ॥५५॥
सारस्वते मांडिला अनर्थ ॥ रायाजवळी आला वृक्षःस्थळ बडवीत ॥ म्हणे दुर्जना तुवा केला घात ॥ हत्या करीन तुजवरी ॥५६॥
वेदशास्त्रसंपन्न ॥ येवढाचि पुत्र मजलागुन ॥ अरे तुवा निर्वंश केला पूर्ण ॥ काळे वदन झाले तुझे ॥५७॥
विदर्भ अधोगतमुख पाहात ॥ म्हणे कृत्रिम केवी झाले सत्य ॥ शिवमाया परम अद्भुत ॥ अघटित कर्तृत्व तियेचे ॥५८॥
राये मिळवूनि सर्व ब्राह्मण ॥ म्हणे सतेज करा अनुष्ठान ॥ द्यावे यासि पुरुषत्व आणून ॥ तरीच धन्य होईन मी ॥५९॥
विप्र म्हणती हे ईश्वरी कळा ॥ आमुचेनि न पालटे भूपाळा ॥ तेव्हा विदर्भराव तये वेळा ॥ आराधिता झाला देवीते ॥६०॥

हवन मांडिले दुर्धर ॥ राव सप्तदिन निराहार ॥ देवी प्रसन्न झाली म्हणे माग वर ॥ मग बोले विदर्भ तो ॥६१॥
म्हणे हा सोमवंत स्त्रीवेष ॥ यासी पुनः करी पुरुष ॥ देवी म्हणे ही गोष्ट निःशेष ॥ न घडे सहसा कालत्रयी ॥६२॥
निःसीम पतिव्रता सीमंतिनी ॥ परम भक्त सद्गुणखाणी ॥ तिचे कर्तृत्व माझेनी ॥ न मोडवे सहसाही ॥६३॥
या सारस्वतासी दिव्य नंदन ॥ होईल सत्य वेदपरायण ॥ ईस सुमेधा वर जाण ॥ लग्न करूनि देईजे ॥६४॥
देवीच्या आज्ञेवरून ॥ त्यासीच दिधले लग्न करून ॥ अंबिकेचे वचने जाण ॥ पुत्र जाहला ॥ सारस्वता ॥६५॥
धन्य सीमंतिनीची शिवभक्ती ॥ उपमा नाही त्रिजगती ॥ जिचे कर्तृत्व हैमवंती ॥ मोडू न शके सर्वथा ॥६६॥
सूत म्हणे ऐका सावधान ॥ अवंतीनगरी एक ब्राह्मण ॥ अत्यंत विषयी नाम मदन ॥ श्रृंगारसुगंधमाल्यप्रिय ॥६७॥
पिंगलानामे वेश्या विख्यात ॥ तिसी झाला सदा रत ॥ सांडूनि ब्रह्मकर्म समस्त ॥ मातापिता त्यागिली ॥६८॥
धर्मपत्नी टाकूनि दुराचारी ॥ तिच्याच घरी वास करी ॥ मद्यमांसरत अहोरात्री ॥ कामकर्दमी लोळत ॥६९॥
करावया जगदुद्धार ॥ आपणचि अवतरला शंकर ॥ ऋषभनामे योगीश्वर ॥ होवोनि विचरत महीवरी ॥७०॥

आपुले जे जे निर्वाणभक्त ॥ त्यांची दुःखे संकटे निवारीत ॥ पिंगलेच्या सदना अकस्मात ॥ पूर्वपुण्यास्तव पातला ॥७१॥
तो शिवयोगींद्र दृष्टी देखोन ॥ दोघेहि धावती धरिती चरण ॥ षोडशोपचारेकरून ॥ सप्रेम होऊन पूजिती ॥७२॥
शुष्क सुपक्व स्निग्ध विदग्ध ॥ चतुर्विध अन्ने उत्तम स्वाद ॥ भोजन देऊनि बहुविध ॥ अलंकार वस्त्रे दीधली ॥७३॥
करूनिया दिव्य शेज ॥ निजविला तो शिवयोगीराज ॥ तळहाते मर्दिती दोघे चरणांबुज ॥ सुपर्णाग्रजउदय होय तो ॥७४॥
एक निशी क्रमोनि जाण ॥ शिवयोगी पावला अंतर्धान ॥ दोघे म्हणती उमारमण ॥ देऊनि दर्शन गेला आम्हा ॥७५॥
मग पिंगला आणि मदन ॥ कालांतरी पावली मरण ॥ परी गाठीस होते पूर्वपुण्य ॥ शिवयोगीपूजनाचे ॥७६॥
दाशार्हदेशीचा नृपती ॥ वज्रबाहूनामे विशेषकीर्ती ॥ त्याची पट्टराणी नामे सुमती ॥ जेवी दमयंती नळाची ॥७७॥
तो मदननामे ब्राह्मण ॥ तिच्या गर्भी राहिला जाऊन ॥ सीमंतिनीच्या पोटी कन्यारत्न ॥ पिंगला वेश्या जन्मली ॥७८॥
कीर्तिमालिनी तिचे नाव ॥ पुढे कथा ऐका अभिनव ॥ इकडे सुमतीचे पोटी भूदेव ॥ असता विचित्र वर्तले ॥७९॥
तिच्या सवती होत्या अपार ॥ ही पट्टराणी ईस होईल पुत्र ॥ त्याही तीस विष दुर्धर ॥ गर्भिणी असता घातले ॥८०॥

तीस तत्काळ व्हावा मृत्य ॥ परी रोग लागला झाली प्रसूत ॥ विष अंगावरी फुटले बहुत ॥ बाळकासहित जननीच्या ॥८१॥
क्षते पडली झाले व्रण ॥ रक्त पू गळे रात्रंदिन ॥ राये बहुत वैद्य आणून ॥ औषधे देता बरे नोहे ॥८२॥
रात्रंदिवस रडे बाळ ॥ सुमती राणी शोके विव्हळ ॥ मृत्युही नोहे व्यथा सबळ ॥ बरी नव्हेचि सर्वथा ॥८३॥
लेकरू सदा करी रुदन ॥ रायासी निद्रा न लागे रात्रंदिन ॥ कंटाळला मग रथावरी घालून ॥ घोर काननी सोडिली ॥८४॥
जेथे मनुष्याचे नाही दर्शन ॥ वसती व्याघ्र सर्प दारुण ॥ सुमती बाळक कडे घेऊन ॥ सव्यअपसव्य हिंडतसे ॥८५॥
कंटक पाषाण रुतती चरणी ॥ मूर्च्छा येऊनि पडे धरणी ॥ आक्रंदे रडे परी न मिळे पाणी ॥ व्रणेकरूनि अंग तिडके ॥८६॥
म्हणे जगदात्म्या कैलासपती ॥ जगद्वंद्या ब्रह्मानंदमूर्ती ॥ भक्तवज्रपंजरा तुझी कीर्ती ॥ सदा गाती निगमागम ॥८७॥
जय जय त्रिदोषशमना त्रिनेत्रा ॥ जगदंकुरकंदा पंचवक्त्रा ॥ अज अजिता पयःफेनगात्रा ॥ जन्मयात्रा चुकवी का ॥८८॥
अनादिसिद्धा अपरिमिता ॥ मायाचक्रचालका सद्गुणभरिता ॥ विश्वव्यापका गुणातीता ॥ धाव आता जगद्गुरो ॥८९॥
ऐसा धावा करिता सुमती ॥ तव वनी सिंह व्याघ्र गर्जती ॥ परम भयभीत होऊनि चित्ती ॥ बाळासहित क्षिती पडे ॥९०॥

श्रावणारितनये नेऊन ॥ वनी सांडिले उर्वीगर्भरत्न ॥ की वीरसेनस्नुषा घोर कानन ॥ पतिवियोगे सेवी जैसे ॥९१॥
सुमतीची करुणा ऐकून ॥ पशु पक्षी करिती रुदन ॥ धरणी पडता मूर्च्छा येऊन ॥ वृक्ष पक्षी छाया करिताती ॥९२॥
चंचू भरूनिया जळ ॥ बाळावरी शिंपिती वेळोवेळ ॥ एकी मधुर रस आणोनि स्नेहाळ ॥ मुखी घालोनि तोषविती ॥९३॥
वनगाई स्वपुच्छेकरूनि ॥ वारा घालिती रक्षिती रजनी ॥ असो यावरी जे राजपत्नी ॥ हिंडता अपूर्व वर्तले ॥९४॥
तो वृषभभार वणिक घेवोनी ॥ पंथे जाता देखे नयनी ॥ त्याचिया संगेकरूनी ॥ वैश्यनगरा पातली ॥९५॥
तेथील अधिपति वैश्य साचार ॥ त्याचे नाव पद्माकर ॥ परम सभाग्य उदार ॥ रक्षक नाना वस्तूंचा ॥९६॥
तेणे सुमतीस वर्तमान ॥ पुसिले तू कोठील कोण ॥ तिणे जे वर्तले मुळीहून ॥ श्रुत केले तयाते ॥९७॥
ते ऐकूनि पद्माकर ॥ त्याचे अश्रुधारा स्रवती नेत्र ॥ श्वासोच्छ्वास टाकूनि घोर ॥ म्हणे गती थोर कर्माची ॥९८॥
वज्रबाहूची पट्टराणी ॥ पतिव्रता अवनीची स्वामिणी ॥ अनाथापरी हिंडे वनी ॥ दीनवदन आली येथे ॥९९॥
मग पद्माकर म्हणे सुमती ॥ तू माझी धर्मकन्या निश्चिती ॥ शेजारी घर देऊनि अहोराती ॥ परामर्श करी तियेचा ॥१००॥

बहुत वैद्य आणून ॥ देता झाला रसायन ॥ केले बहुत प्रयत्न ॥ परी व्याधी न राहेचि ॥१॥
सुमती म्हणे ताता ॥ श्रीशंकर वैद्य न होता ॥ कवणासही हे व्यथा ॥ बरी न होय कल्पांती ॥२॥
असो पुढे व्यथा होता कठीण ॥ गेला राजपुत्राचा प्राण ॥ सुमती शोक करी दीनवदन ॥ म्हणे रत्न गेले माझे ॥३॥
पद्माकर शांतवी बहुता रीती ॥ नगरजन मिळाले सभोवती ॥ तो निशांती उगवला गभस्ती ॥ तेवी शिवयोगी आला तेथे ॥४॥
जैसे दुर्बळाचे सदन शोधीत ॥ चिंतामणि ये अकस्मात ॥ की क्षुधेने प्राण जात ॥ तो क्षीराब्धि पुढे धाविन्नला ॥५॥
पद्माकरे धरिले चरण ॥ पूजिला दिव्यासनी बैसवून ॥ त्यावरी सुमतीप्रति दिव्य निरूपण ॥ शिवयोगी सांगता झाला ॥६॥
म्हणे वत्से सुमती ऐक ॥ का हो रडसी करिसी शोक ॥ तुझे पूर्वजन्मीचे पति पुत्र जनक ॥ कोठे आहेत सांग पा ॥७॥
आलीस चौर्यायशी लक्ष योनी फिरत ॥ तेथींचे स्वजन सोयरे आप्त ॥ आले कोठून गेले कोठे त्वरित ॥ सांग मजपाशी वृत्तांत हा ॥८॥
तू नाना योनी फिरसी ॥ पुढेही किती फेरे घेसी ॥ कोणाचे पुत्र तू का रडसी ॥ पाहे मानसी विचारूनी ॥९॥
शरीर धरावे ज्या ज्या वर्णी ॥ त्या त्या कुळाभिमाने नाचती प्राणी ॥ परी आपण उत्पन्न कोठूनी ॥ ते विचारूनी न पाहती ॥११०॥

त्वा पुत्र आणिला कोठून ॥ कोण्या स्थळा गेला मृत्यु पावोन ॥ तू आणि हे अवघे जन ॥ जातील कोठे कवण्या देहा ॥११॥
आत्मा शिव शाश्वत ॥ शरीर क्षणभंगुर नाशवंत ॥ तरी तू शोक करिसी व्यर्थ ॥ विचारूनि मनी पाहे पा ॥१२॥
आत्मा अविनाशी शाश्वत ॥ तो नव्हे कोणाचा बंधु सुत ॥ शरीरकारणे शोक करिसी व्यर्थ ॥ तरी पडले प्रेत तुजपुढे ॥१३॥
जळी उठती तरंग अपार ॥ सवेचु फुटती क्षणभंगुर ॥ मृगजळचि मिथ्या समग्र ॥ तरी बुडबुडेसत्य कैसेनी ॥१४॥
चित्रींच्या वृक्षछाये बैसला कोण ॥ चित्राग्नीने कोणाचे जाळिले सदन ॥ तेथे गंगा लिहिली सहितमीन ॥ कोण वाहोनि गेला तेथे ॥१५॥
वंध्यासुते द्रव्य आणून ॥ भीष्मकन्या मारुतीस देऊन ॥ गंधर्व नगरीचे वर्हाडी आणून ॥ लग्न कोणे लाविले ॥१६॥
वार्याचा मंडप शिवून ॥ सिकतादोरे बांधिला आवळून ॥ शुक्तिकारजताचे पात्र करून ॥ खपुष्पे कोणी भरियेले ॥१७॥
कासवीचे घालून घृत ॥ मृगजळीचे मीन पाजळती पोत ॥ ते चरणी नूपुरे बांधोनि नाचत ॥ जन्मांध पाहत बैसले ॥१८॥
अहिकर्णींची कुंडले हिरोनी ॥ चित्रींचे चोर आले घेवोनी ॥ हा प्रपंच लटिका मुळीहूनी ॥ तो साच कैसा जाणावा ॥१९॥
मुळीच लटके अशाश्वत ॥ त्याचा शोक करणे व्यर्थ ॥ केशतरूचे उद्यान समस्त ॥ शरीर हे उद्भवले ॥१२०॥

सकळ रोगाचे भांडार ॥ कृमिकीटकांचे माहेर ॥ की पापाचा समुद्र ॥ की अंबर भ्रांतीचे ॥२१॥
मूत्र श्लेष्म मांस रक्त ॥ अस्थींची मोळी चर्मवेष्टित ॥ मातेचा विटाळ पितृरेत ॥ अपवित्र असत्य मुळीच हे ॥२२॥
ऐसे हे शरीर अपवित्र ॥ ते पशुमूत्रे झाले पवित्र ॥ क्षुरे मूर्धज छेदिले समग्र ॥ इतुकेनि पावन केवी होय ॥२३॥
शरण न जाती देशिकाप्रति ॥ तरी कैसेनि प्राणी तरती ॥ कल्पकोटी फेरे घेती ॥ मुक्त होती कधी हे ॥२४॥
सुमती तू सांगे सत्वर ॥ तुझे जन्मोजन्मीचे कोठे आहेत भ्रतार ॥ अवघा हा मायापूर ॥ सावध सत्वर होई का ॥२५॥
जयाचे हे सकळ लेणे ॥ मागता देता लाजिरवाणे ॥ तनुघर बांधिले त्रिगुणे ॥ पाच वासे आणोनिया ॥२६॥
याचा भरवसा नाही जाण ॥ केधवा लागेल न कळे अग्न ॥ की हे झाले वस्त्र जीर्ण ॥ ऋणानुबंध तव तगे ॥२७॥
मिथ्या जैसे मृगजळ ॥ की स्वप्नीचे राज्य ढिसाळ ॥ अहा प्राणी पापी सकळ ॥ धन धान्य पुत्र इच्छिती ॥२८॥
गंगेमाजी काष्ठे मिळती ॥ एकवट होती मागुती बिघडती ॥ तैसी स्त्रीपुरुषे बोलिजेती ॥ खेळ मुळीच असत्य हा ॥२९॥
वृक्षापरी पक्षी येती ॥ कितीएक बैसती कितीएक जाती ॥ आणिक्या तरूवरी बैसती ॥ अपत्ये तैसी जाण पा ॥१३०॥

पथिक वृक्षातळी बैसत ॥ उष्ण सरलिया उठूनि जात ॥ सोयरे बंधू आप्त ॥ तैसेचि जाण निर्धारे ॥३१॥
मायामय प्रपंचवृक्षी ॥ जीव शिव बैसले दोन पक्षी ॥ शिव समाधान सर्वसाक्षी ॥ जीव भक्षी विषयफळे ॥३२॥
ती भक्षिताचि भुलोनि गेला ॥ आपण आपणासी विसरला ॥ ऐसा अपरिमित जीव भ्रमला ॥ जन्ममरण भोगीतसे ॥३३॥
त्यामाजी एखादा पुण्यवंत ॥ सद्गुरूसी शरण रिघत ॥ मग तो शिव होवोनि भजत ॥ शिवालागी अत्यादरे ॥३४॥
ऐसे ऐकता दिव्य निरूपण ॥ पद्माकर सुमती उठोन ॥ अष्टभावे दाटोन ॥ वंदिती चरण तयाचे ॥३५॥
म्हणती एवढे तुझे ज्ञान ॥ काय न करिसी इच्छेकरुन ॥ तू साक्षात उमारमण ॥ भक्तरक्षणा धावलासी ॥३६॥
मग मृत्युंजयमंत्र राजयोगी ॥ सुमतीस सांगे शिवयोगी ॥ मंत्रून भस्म लाविता अंगी ॥ व्यथारहित जाहली ते ॥३७॥
रंभा उर्वशीहून वहिले ॥ दिव्य शरीर तिचे झाले ॥ मृत्युंजयमंत्रे भस्म चर्चिले ॥ बाळ उठिले तत्काळ ॥३८॥
व्रणव्यथा जावोनि सकळ ॥ बत्तीसलक्षणी झाला बाळ ॥ मग शिवध्यान उपासना निर्मळ ॥ सुमतीबाळ उपदेशिले ॥३९॥
परिस झगडता पूर्ण ॥ लोह तत्काळ होय सुवर्ण ॥ तैसी दोघे दिव्यरूप जाण ॥ होती झाली ते काळी ॥१४०॥

आश्चर्य करी पद्माकर ॥ म्हणे धन्य धन्य गुरुमंत्र ॥ काळ मृत्युभय अपार ॥ त्यापासूनि रक्षी गुरुनाथ ॥४१॥
गुरुचरणी रत होती सदा ॥ त्यासी कैची भवभयआपदा ॥ धनधान्यांसी नाही मर्यादा ॥ भेद खेदा वारिले ॥४२॥
बाळ चरणावरी घालोनी ॥ सुमती लागे सप्रेम चरणी ॥ म्हणे सद्गुरु तुजवरूनी ॥ शरीर सांडणे हे माझे ॥४३॥
या शरीराच्या पादुका करून ॥ तुझिया दिव्यचरणी लेववीन ॥ तरी मी नव्हे उत्तीर्ण ॥ उपकार तुझे गुरुमूर्ती ॥४४॥
मग शिवयोगी बोलत ॥ आयुरारोग्य ऐश्वर्य अद्भुत ॥ तुझिया पुत्रासी होईल प्राप्त ॥ राज्य पृथ्वीचे करील हा ॥४५॥
त्रिभुवनभरी होईल कीर्ति ॥ निजराज्य पावेल पुढती ॥ भद्रायु नाम निश्चिती ॥ याचे ठेविले मी जाण ॥४६॥
थोर होय भद्रायु बाळ ॥ तववरी क्रमी येथेचि काळ ॥ मृत्युंजयमंत्रजप त्रिकाळ ॥ निष्ठा धरूनि करीत जा ॥४७॥
हा राजपुत्र निश्चित ॥ लोकांशी प्रगटो नेदी मात ॥ हा होईल विद्यावंत ॥ चतुःषष्टिकळाप्रवीण ॥४८॥
ऐसे शिवयोगी बोलोन ॥ पावला तेथेचि अंतर्धान ॥ गुरुपदांबुज आठवून ॥ सुमती सद्गद क्षणक्षणा ॥४९॥
पद्माकरासी सुख अत्यंत ॥ सुनय पुत्राहूनि बहुत ॥ भद्रायु त्यासी आवडत ॥ सदा पुरवीत लाड त्याचा ॥१५०॥

पद्माकरे आपुली संपत्ति वेचून ॥ दोघांचे केले मेखलाबंधन ॥ दोघांसी भूषणे समान ॥ केले संपन्न वेदशास्त्री ॥५१॥
द्वादश वर्षांचा झाला बाळ ॥ धीर गंभीर परम सुशीळ ॥ मातेच्या सेवेसी सदाकाळ ॥ जवळी तिष्ठत सादर ॥५२॥
पदरी पूर्वसुकृताचे पर्वत ॥ शिवयोगी प्रगटला अकस्मात ॥ सुमती भद्रायु धावत ॥ पाय झाडीत मुक्तकेशी ॥५३॥
नयनोदके चरणक्षालन ॥ केशवसने पुसिले पूर्ण ॥ जे सुगंधभरित जाण ॥ स्नेह तेचि लाविले ॥५४॥
वारंवार करिती प्रदक्षिणा ॥ दाटती अष्टभावेकरून ॥ षोडशोपचारी पूजन ॥ सोहळा करिती अपार ॥५५॥
स्तवन करीतसे तेव्हा सुमती ॥ प्रसादेकरून मी पुत्रवंती ॥ यावरी भद्रायूसी नीति ॥ शिवयोगी शिकवीतसे ॥५६॥
श्रुतिस्मृति पुराणोक्त पाही ॥ धर्मनीती वर्तत जाई ॥ मातापितागुरुपायी ॥ निष्ठा असो दे सर्वदा ॥५७॥
गोभूदेवप्रजापाळण ॥ सर्वाभूती पहावा उमारमण ॥ वर्णाश्रमस्वधर्माचरण ॥ सहसाहि न सांडावे ॥५८॥
विचार केल्यावाचूनिया ॥ सहसा न करावी आनक्रिया ॥ मागे पुढे पाहोनिया ॥ शब्द बोलावा कुशलत्वे ॥५९॥
काळ कोण मित्र किती ॥ कोण द्वेषी शत्रू किती ॥ आय काय खर्च किती ॥ पाहावे चित्ती विचारूनिया ॥१६०॥

माझे बळ किती काय शक्ती ॥ आपुले सेवक कैसे वर्तती ॥ यश की अपयश देती ॥ पहावे चित्ती विचारूनी ॥६१॥
अतिथी देव मित्र ॥ स्वामी वेद अग्निहोत्र ॥ पशु कृषि धन विद्या सर्वत्र ॥ घ्यावा समाचार क्षणाक्षणा ॥६२॥
लेकरू भार्या अरि दास ॥ सदन गृहवार्ता रोगविशेष ॥ येथे उपेक्षा करिता निःशेष ॥ हानि क्षणात होत पै ॥६३॥
ज्या पंथे गेले विद्वज्जन ॥ आपण जावे तोचि पंथ लक्षून ॥ मातापितायतिनिंदा जाण ॥ प्राणांतीही न करावी ॥६४॥
वैश्वदेवसमयी अतिथी ॥ आलिया त्यासी न पुसावी याती ॥ अन्नवस्त्र सर्वाभूती ॥ द्यावे प्रीत्यर्थ शिवाचिया ॥६५॥
परोपकार करावा पूर्ण ॥ परपीडा न करावी जाण ॥ करावे गोब्राह्मणरक्षण ॥ सत्य सुजाण म्हणती तया ॥६६॥
निंदा वाद टाकोन ॥ सर्वदा कीजे शिवस्मरण ॥ तेचि म्हणावे मौन ॥ शिवसेवन तप थोर ॥६७॥
परदारा आणि परधन ॥ हे न पहावे जेवी वमन ॥ करावे शास्त्रश्रवण ॥ शिवपूजन यथाविधि ॥६८॥
स्नान होम जपाध्ययन ॥ पंचयज्ञ गोविप्रसेवन ॥ श्रवण मनन निजध्यास पूर्ण ॥ अनालस्ये करावी ॥६९॥
सुरत निद्रा भोजन ॥ येथे असावे प्रमाण ॥ दान सत्कर्म अभ्यास श्रवण ॥ आळस येथे न करावा ॥१७०॥

काम पूर्ण धर्मपत्नीसी ॥ निषिद्ध जाण परियोषितेसी ॥ क्रोधे दंडावे शत्रूसी ॥ साधुविप्रांसी नमिजे सदा ॥७१॥
द्वेषियांसी धरावा मद ॥ संतभक्तांसी नम्रता अभेद ॥ संसाररिपूसी मत्सर प्रसिद्ध ॥ असावे निर्मत्सर सर्वाभूती ॥७२॥
दुर्जनासी दंभ दाविजे ॥ भल्याचे पदरज वंदिजे ॥ अहंकारे पृथ्वी जिंकिजे ॥ निरहंकार द्विजांसी ॥७३॥
वाचा सावध शिवस्मरणी ॥ पाणीसार्थक दानेकरूनी ॥ पाद पावन देवालययात्रागमनी ॥ नित्य शिवध्यानी बैसावे ॥७४॥
पुराणश्रवणी श्रोत्र सादर ॥ त्वचा संत आलिंगनी पवित्र ॥ सार्थक शिवध्यानी नेत्र ॥ जिव्हेने स्तोत्र वर्णावे ॥७५॥
शिवनिर्माल्यवास घेईजे घ्राणी ॥ ये रीती इंद्रिये लावावी भजनी ॥ दीन अनाथ अज्ञान देखोनी ॥ तयावरी कृपा कीजे ॥७६॥
ईश्वरी प्रेम संतांसी मैत्री ॥ देवाचे द्वेषी त्यांची उपेक्षा करी ॥ युक्तनिद्रा युक्ताहारी ॥ मृगया करी परम नीतीने ॥७७॥
अतिविद्या अतिमैत्री ॥ अतिपुण्य अतिस्मृती ॥ उत्साह धैर्य दान धृती ॥ वर्धमान असावी ॥७८॥
आपुले वित्त आयुष्य गृहच्छिद्र ॥ मैथुन औषध सुकृत मंत्र ॥ दान मान अपमान ही सर्वत्र ॥ गुप्त असावी जाणिजे ॥७९॥
नष्ट पाखंडी शठ धूर्त ॥ पिशुन तस्कर जार पतित ॥ चंचळ कपटी नास्तिक अनृत ॥ ग्राम्य सभेसी नसावे ॥१८०॥

निंदक शिवभक्तउच्छेदक ॥ मद्यपानी गुरुतल्पक ॥ मार्गपीडक कृतघ्न धर्मलोपक ॥ त्यांचे दर्शन न व्हावे ॥८१॥
दारा धन आणि पुत्र ॥ यांसी आसक्त नसावे अणुमात्र ॥ अलिप्तपणे संसार ॥ करोनि आसक्त असावे ॥८२॥
बंधु सोयरे श्वशुर स्वजन ॥ यांसी स्नेह असावा साधारण ॥ भलता विषय देखोन ॥ आसक्ति तेथे न करावी ॥८३॥
करावे रुद्राक्षधारण ॥ मस्तकी कंठी दंडी करभूषण ॥ गेलिया प्राण शिवपूजन ॥ सर्वथाही न सांडावे ॥८४॥
शिवकवच सर्वांगी ॥ लेऊ शिकवी शिवयोगी ॥ भस्म चर्चिता रणरंगी ॥ शस्त्रास्त्रबाधा न होय ॥८५॥
काळमृत्युभयापासून ॥ रक्षी मृत्युंजयऔपासन ॥ आततायी मार्गघ्न ब्रह्मघ्न ॥ यांसी जीवे मारावे ॥८६॥
सोमवारव्रत शिवरात्र प्रदोष ॥ विधियुक्त आचरावे विशेष ॥ शिवहरिकीर्तन निर्दोष ॥ सर्व सांडूनि ऐकावे ॥८७॥
महापर्व कुयोग श्राद्धदिनी ॥ व्यतीपत वैघृति संक्रमणी ॥ न प्रवर्तावे मैथुनी ॥ ग्रहणी भोजन न करावे ॥८८॥
सत्पात्री देता दान ॥ होय ऐश्वर्य वर्धमान ॥ अपात्री दाने दारिद्र्य पूर्ण ॥ शास्त्रप्रमाण जाणिजे ॥८९॥
वेद शास्त्र पुराण कीर्तन ॥ गुरुब्राह्मणमुखे करावे श्रवण ॥ दान दिधल्याचे पाळण ॥ करिता पुण्य त्रिगुण होय ॥१९०॥

अपूज्याचे पूजन ॥ पूज्य त्याचा अपमान ॥ तेथे भय दुर्भिक्ष मरण ॥ होते जाण विचारे ॥९१॥
महाडोही उडी घालणे ॥ महापुरुषासी विग्रह करणे ॥ बळवंतासी स्पर्धा बांधणे ॥ ही द्वारे अनर्थाची ॥९२॥
दाने शोभे सदा हस्त ॥ कंकणमुद्रिका भार समस्त ॥ श्रवणी कुंडले काय व्यर्थ ॥ श्रवणसार्थक श्रवणेचि ॥९३॥
ज्याची वाचा रसवंती भार्या रूपवती सती ॥ औदार्य गुण संपत्ती ॥ सफल जीवित्व तयाचे ॥९४॥
देईन अथवा नाही सत्य ॥ हे वाचेसि असावे व्रत ॥ विद्यापात्रे येती अमित ॥ सद्य; दान त्या दीजे ॥९५॥
विपत्तिकाळी धैर्य धरी ॥ वादी जयवंत वैखरी ॥ युद्धमाजी पराक्रम करी ॥ याचकांसी पृष्ठी न दाविजे ॥९६॥
ब्राह्मणमित्रपुत्रांसमवेत ॥ तेचि भोजन उत्तम यथार्थ ॥ गजतुरंगासहित पंथ ॥ चालणे तेचि श्रेष्ठ होय ॥९७॥
ज्या लिंगाचे नाही पूजन ॥ तेथे सांक्षेपे पूजा करावी जाऊन ॥ अनाथप्रेतसंस्कार जाण ॥ करणे त्या पुण्यासी पार नाही ॥९८॥
ब्रह्मद्वेषाएवढे विशेष ॥ मारक नाही कदा विष ॥ सत्यमागम रात्रंदिवस ॥ तुच्छ सुधारस त्यापुढे ॥९९॥
प्रतापे न व्हावे संतप्त ॥ परसौख्ये हर्षभरित ॥ सद्वार्ता ऐकता सुख अत्यंत ॥ तोचि भक्त शिवाचा ॥२००॥

पाषाण नाम रत्ने व्यर्थ ॥ चार रत्ने आहेत पृथ्वीत ॥ अन्न उदक सुभाषित ॥ औदार्य रत्न चौथे पै ॥१॥
वर्म कोणाचे न बोलावे ॥ सद्भक्तांचे आशीर्वाद घ्यावे ॥ भाग्याभाग्य येत स्वभावे ॥ स्वधर्म ध्रुव न ढळावा ॥२॥
पूर्वविरोधी विशेष ॥ त्याचा न धरावा विश्वास ॥ गर्भिणी पाळी गर्भास ॥ तेवी प्रजा पाळी का ॥३॥
गुरु आणि सदाशिव ॥ यासी न करावा भेदभाव ॥ भाग्यविद्या गर्व सर्व ॥ सोडोनि द्यावा जाण पा ॥४॥
नराची शोभा स्वरूप पूर्ण ॥ स्वरूपाचे सद्गुण आभरण ॥ गुणाचे अलंकार ज्ञान ॥ ज्ञानाचे भूषण क्षमा शांती ॥५॥
कुलशील विद्याधन ॥ राज्य तप रूप यौवन ॥ या अष्टमदेकरून ॥ मन भुलो न द्यावे ॥६॥
ऐसा नानापरी शिवयोगी ॥ बोधिता झाला भद्रायूलागी ॥ हे नीति ऐकता जगी ॥ साकडे न पडे सर्वथा ॥७॥
सातवा अध्याय गिरीकैलास ॥ यावरी वास्तव्य करी उमाविलास ॥ पारायणप्रदक्षिणा करिती विशेष ॥ निर्दोष यश जोडे तया ॥८॥
की हा अध्याय हिमाचळ ॥ भक्तिभवानी कन्या वेल्हाळ ॥ तीसी वरोनि पयःफेनधवल ॥ श्वशुरगृही राहिला ॥९॥
पुढील अध्यायी कथा सुरस ॥ शिवयोगी दया करील भद्रायूस ॥ ब्रह्मानंदे निशिदिवस ॥ श्रवण करोत विद्वज्जन ॥२१०॥

भवगजविदारक मृगेंद्र ॥ श्रीधरवरद आनंदसमुद्र ॥ तो शिव ब्रह्मानंद यतींद्र ॥ जो सद्गुरु जगदात्मा ॥११॥
शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड ॥ स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड ॥ परिसोत सज्जन अखंड ॥ सप्तमाऽध्याय गोड हा ॥२१२॥

इति सप्तमोऽध्यायः ॥७॥
॥श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥