Friday, July 31, 2020

Shivlilamrut - Adhyay 5

अध्याय पाचवा

श्रीगणेशाय नमः ॥

सदाशिव अक्षरें चारी ॥ सदा उच्चारी ज्याची वैखरी ॥ जो नित्य शिवार्चन करी ॥ तो उद्धरी बहुतां जीवा ॥१॥
बहुत प्रायश्चित्तांचे निर्धार ॥ शास्त्रवक्ते करिती विचार ॥ परी जे शिवनामें शुद्ध साचार ॥ कासया इतर साधनें त्यां ॥२॥
नामाचा महिमा परमाद्भुत ॥ त्यावरी प्रदोषव्रत आचरत ॥ त्यासी सर्वसिध्दि प्राप्त होत ॥ सत्य सत्य त्रिवाचा ॥३॥ तुष्टि पुष्टि धृति आयुष्यवर्धन ॥ संतति संपत्ति दिव्यज्ञान ॥ पाहिजे तिंहीं प्रदोषव्रत पूर्ण ॥ यथासांग करावें ॥४॥
प्रदोषव्रत भावें आचरतां ॥ या जन्मीं प्रचीत पाहावी तत्वतां ॥ दारिद्र्य आणि महद् व्यथा॥ निःशेष पळती षण्मासांत ॥५॥
एकसंवत्सरें होय ज्ञान ॥ द्वादशवर्षी महद्भाग्य पूर्ण ॥ हें जो असत्य मानील व्यासवचन ॥ त्यासी बंधन कल्पांतवरी ॥६॥
त्याचा गुरु लटिकाच जाण ॥ त्याची दांभिक भक्ति लटिकेंच ज्ञान ॥ उमावल्लभचरणीं ज्याचे मन ॥ त्याहुनि पावन कोणी नाहीं ॥७॥
मृत्यु गंडांतरे दारूण ॥ प्रदोषव्रतें जाती निरसोन ॥ येविषयीं इतिहास जाण ॥ सूत सांगे शौनकांदिकां ॥८॥ विदर्भदेशींचा भूभुज ॥ सत्यरथ नामें तेजःपुंज ॥ सर्वधर्मरत पराक्रमी सहज ॥ बंदीजन वर्णिती सदा ॥९॥
बहु दिवस राज्य करीत ॥ परी शिवभजनीं नाहीं रत ॥ त्यावरी शाल्वदेशींचा नृपनाथ ॥ बळें आला चालूनियां ॥१०॥

आणीक त्याचे आप्त ॥ क्षोणीपाळ साह्य झाले बहुत ॥ सप्त दिवसपर्यंत ॥ युद्ध अद्भुत जाहलें ॥११॥
हा एकला ते बहुत ॥ समरभूमीसी सत्यरथ ॥ धारातीर्थी पावला मृत्य॥ शत्रु नगरांत प्रवेशले ॥१२॥
राजपत्नी गरोदर राजस ॥ पूर्ण झाले नव मास ॥ एकलीच पायीं पळतां वनास ॥ थोर अनर्थ ओढवला ॥१३॥
परम सुकुमार लावण्यहरिणी ॥ कंटक सरांटे रूतती चरणीं ॥ मुर्च्छना येऊनि पडे धरणीं ॥ उठोनि पाहे मागें पुढें ॥१४॥
शत्रु धरितील अकस्मात ॥ म्हणोनि पुढती उठोनि पळत ॥ किंवा ते विद्युल्लता फिरत ॥ अवनीवरी वाटतसे ॥१५॥ वस्त्रें अलंकारमंडित ॥ हिऱ्यांऐसे दंत झळकत ॥ जिचा मुखेंदु देखतां रतिकांत ॥ तन्मय होवोनि नृत्य करी ॥१६॥ पहा कर्माची गती गहन ॥ जिच्या अंगुष्ठी न पडे सूर्यकिरण ॥ ते गरोदर हिंडे विपिन ॥ मृगनेत्री गजगामिनी ॥१७॥ वनीं हिंडे महासती ॥ जेवीं नैषधरायाची दमयंती ॥ कीं भिल्लीरूपें हैमवती ॥ दुस्तरवनी तैसी हिंडे ॥१८॥ कर्मनदीच्या प्रवाही जाण ॥ पडली तीस काढील कोण ॥ असो एका वृक्षाखाली येऊन ॥ परम व्याकुळ पडियेली ॥१९॥
शतांचीं शतें दासी ॥ ओळंगती सदैव जियेपासीं ॥ इंदुमती नाम जियेसी ॥ ते भूमीवरी लोळत ॥२०॥

चहुंकडे पाहे दीनवदनीं ॥ जिव्हा मुख वाळलें न मिळे पाणी ॥ तों प्रसूत झाली तोचि क्षणीं ॥ दिव्य पुत्र जन्मला ॥२१॥
तृषेनें तळमळी अत्यंत ॥ कोण उदक देईल तेथ ॥ बाळ टाकूनि उठत बसत ॥ गेली एका सरोवरा ॥२२॥
उदकांत प्रवेशली तेच क्षणीं ॥ अंजुळी भरूनि घेतसें पाणी ॥ तंव ग्राहें नेली ओढोनि ॥ विदारूनी भक्षिली ॥२३॥
घोर कर्माचें विंदान ॥ वनीं एकला रडे राजनंदन ॥ तंव उमानामक विप्रपत्नी जाण ॥ विगतधवा पातली ॥२४॥
माता पिता बंधु पाहीं ॥ तियेलागीं कोणी नाहीं ॥ एक वर्षाचा पुत्र तीसही ॥ कडिये घेवोनि आली तेथें ॥२५॥
तों नाहीं केलें नालच्छेदन ॥ ऐसें बाळ उमा देखोन ॥ म्हणे अहा रे ऐसें पुत्ररत्न ॥ कोणीं टाकिलें दुस्तर वनीं ॥२६॥ म्हणे कोण जाती कोण वर्ण ॥ मी कैसें नेऊं उचलून ॥ जावें जरी टाकून ॥ वृक व्याघ्र भक्षितील कीं ॥२७॥
स्तनीं दाटूनी फुटला पान्हा ॥ नेत्रीं ढाळीत अश्रुजीवना ॥ बाळ पुढें घेऊनी ते ललना ॥ मुखकमळीं स्तन लावी ॥२८॥ संशयसमुद्रीं पडली वेल्हाळ ॥ म्हणे नेऊ कीं नको बाळ ॥ तंव तो कृपाळु पयःफेनधवल ॥ यतिरूप धरूनि पातला ॥२९॥
उमेलागीं म्हणे त्रिपुरारी ॥ बाळ नेई संशय न धरी ॥ महद्भाग्य तुझें सुंदरी ॥ क्षत्रियराजपुत्र तुज सांपडला ॥३०॥

कोणासी न सांगें हे मात ॥ समान पाळीं दोघे सुत ॥ भणंगासी परीस होय प्राप्त ॥ तैसें तुज जाहलें ॥३१॥
अकस्मात निधी जोडत ॥ कीं चिंतामणि पुढें येऊनि पडत ॥ कीं मृताच्या मुखांत ॥ पडे अमृत पूर्वदत्तें ॥३२॥
ऐसें बोलोनि त्रिपुरारी ॥ गुप्त झाला ते अवसरीं ॥ मग दोघे पुत्र घेवोनि ते नारी ॥ देशग्रामांतरीं हिंडत ॥३३॥
ब्रह्मपुत्राचें नाम शुचिव्रत ॥ राजपुत्राचें नाम ठेविले धर्मगुप्त ॥ घरोघरीं भिक्षा मागत ॥ कडिये खांदीं घेऊनियां ॥३४॥ लोक पुसतां उमा सांगत ॥ माझे पोटींचे दोघे सुत ॥ ऐसी हिंडत हिंडत ॥ एकचक्रनगरा पातली ॥३५॥
घरोघरीं भिक्षा मागत ॥ तों शिवालय देखिलें अकस्मात ॥ आंत द्विज दाटले बहुत ॥ शांडिल्य त्यांत मुख्य ऋषि ॥३६॥
शिवाराधना करिती विधियुक्त ॥ तों उमा आली शिवालयांत ॥ क्षण एक पूजा विलोकीत ॥ तों शांडिल्य ऋषी बोलिला ॥३७॥
अहा कर्म कैसें गहन ॥ हा राजपुत्र हिंडे दीन होऊन ॥ कैसें विचित्र प्राक्तन ॥ उमा वचन ऐकती झाली ॥३८॥
ऋषीचे चरण उमा धरीत ॥ म्हणे याचा सांगा पूर्ववृत्तांत ॥ त्रिकालज्ञानी महासमर्थ ॥ भूतभविष्यज्ञान तुम्हां ॥३९॥
याचीं माता पिता कोण ॥ आहेत कीं पावलीं मरण ॥ यावरी शांडिल्य सांगे वर्तमान ॥ याचा पिता जाण सत्यरथ ॥४०॥

तो पूर्वीं होता नृप जाण ॥ प्रदोषसमयीं करी शिवार्चन ॥ तों शत्रु आले चहूंकडोन ॥ नगर त्याचें वेढिलें ॥४१॥
शत्रूची गजबज ऐकून ॥ उठिला तैसीच पूजा सांडोन ॥ तंव प्रधान आला पुढें धांवोन ॥ शत्रु धरोनि आणिले ॥४२॥
त्यांचा शिरच्छेद करून ॥ पूजा पूर्ण न करितां उन्मत्तपणें ॥ तैसाच जाऊनि करी भोजन ॥ नाहीं स्मरण विषयांधा ॥४३॥
त्याकरितां या जन्मीं जाण ॥ सत्यरथ अल्पायुषी होऊन ॥ अल्पवयांत गेला मरोन ॥ म्हणोनि पूजन न सोडावें ॥४४॥ याच्या मातेनें सवत मारिली ॥ ती जळीं विवशी झाली ॥ पूर्ववैरें वोढोनि नेली ॥ क्रोधें भक्षिली विदारूनी ॥४५॥
हा राजपुत्र धर्मगुप्त ॥ यानें कांहीच केलें नाहीं शिवव्रत ॥ म्हणोनियां मातापितारहित ॥ अरण्यांत पडियेला ॥४६॥ याकरितां प्रदोषकाळीं ॥ अव्यग्र पूजावा इंदुमौळी ॥ पूजन सांडुनि कदाकाळीं ॥ सर्वथाही न उठावें ॥४७॥ भवानीसी बैसवूनि कैलासनाथ ॥ प्रदोषकाळी पुढें नृत्य करीत ॥ वाग्देवी वीणा वाजवीत ॥ वेणु पुरुहूत वाजवीतसे ॥४८॥
अंबुजसंभव ताल सांवरी ॥ भार्गवी गातसे मधुरस्वरीं ॥ मृदंग वाजवी मधुकैटभारी ॥ नृत्यगती पाहूनियां ॥४९॥ यक्षपति शिवप्राणमित्र ॥ हस्त जोडोनि उभा समोर ॥ यक्षगण गंधर्व किन्नर ॥ सुरासुर उभे असती ॥५०॥

ऐसा प्रदोषकाळींचा महिमा ॥ अगोचर निगमागमां ॥ मग काय बोले उमा ॥ मम पुत्र दरिद्री कां झाला ॥५१॥
तुझ्या पुत्रें प्रतिग्रह बहुत ॥ पूर्वीं घेतले दुष्ट अमित ॥ दान केलें नाहीं किंचित ॥ शिवार्चन न करी कदा ॥५२॥
परान्नें जिव्हा दग्ध यथार्थ ॥ दुष्ट प्रतिग्रहें दग्ध हस्त ॥ स्त्रीअभिलाषें नेत्र दग्ध होत ॥ मंत्रासी सामर्थ्य मग कैचें ॥५३॥ मग उमेनें पुत्र दोन्ही ॥ घातले ऋषीचे चरणीं ॥ तेणें पंचाक्षर मंत्र उपदेशुनी ॥ प्रदोषव्रत उपदेशिलें ॥५४॥
पक्षप्रदोष शनिप्रदोष ॥ महिमा वर्णिला अतिविशेष ॥ निराहार असावें त्रयोदशीस ॥ दिवसा सत्कर्म आचरावें ॥५५॥ तीन घटिका झालिया रजनी ॥ प्रदोषपूजा आरंभावी प्रीतीकरूनी ॥ गोमयें भूमी सारवूनी ॥ दिव्यमंडप उभारिजे ॥५६॥
चित्रविचित्र वितान ॥ कर्दळीस्तंभ इक्षुदंडेंकरून ॥ मंडप कीजे शोभायमान ॥ रंगमाळा नानापरी ॥५७॥
शुभ्र वस्त्र नेसावें आपण ॥ शुभ्र गंध सुवाससुमन ॥ मग शिवलिंग स्थापून ॥ पूजा करावी विधियुक्त ॥५८॥
प्राणायाम करूनि देखा ॥ अंतर्बाह्य न्यास मातृका ॥ दक्षिणभागीं पूजावें मुरांतका ॥ सव्यभागीं अग्नि तो ॥५९॥
वीरभद्र गजानन ॥ अष्टमहासिध्दि अष्टभैरव पूर्ण ॥ अष्टदिक्पालपूजन ॥ सप्तावरणीं शिवपूजा ॥६०॥

यथासांग शिवध्यान ॥ मग करावें पूजन ॥ राजोपचारें सर्व समर्पून ॥ करावें स्तवन शिवाचें ॥६१॥
जयजय गौरीनाथ निर्मळ ॥ जय जय कोटिचंद्र सुशीतळ ॥ सच्चिदानंदघन अढळ ॥ पूर्णब्रह्म सनातन ॥६२॥
ऐसें प्रदोषव्रत ऐकवून ॥ बाळ उपदेशिले दोघेजण ॥ मग ते एकमनेंकरून ॥ राहते झाले एकचक्रीं ॥६३॥
चार महिनेपर्यंत ॥ दोघेही आचरती प्रदोषव्रत ॥ गुरुवचनें यथार्थ ॥ शिवपूजन करिती पै ॥६४॥
शिवपूजा न द्यावी सर्वथा ॥ न द्यावे प्रसादतीर्था ॥ शत ब्रह्महत्यांचें पाप माथां ॥ होय सांगता शांडिल्य ॥६५॥
सर्व पापांहूनि पाप थोर ॥ शिवपूजेचा अपहार ॥ असो ते दोघे किशोर ॥ सदा सादर शिवभजनीं ॥६६॥
ब्रह्मपुत्र शुचिव्रत ॥ एकला नदीतीरीं क्रीडत ॥ दरडी ढांसळतां अकस्मात ॥ द्रव्यघट सांपडला ॥६७॥
घरासी आला घेऊन ॥ माता संतोषली देखोन ॥ म्हणे प्रदोषव्रताचा महिमा जाण ॥ ऐश्वर्य चढत चालिलें ॥६८॥ राजपुत्रास म्हणे ते समयीं ॥ अर्ध द्रव्यविभाग घेई ॥ येरू म्हणे सहसाही ॥ विभाग न घेई अग्रजा ॥६९॥
या अवनींतील धन ॥ आमुचेंच आहे संपूर्ण ॥ असो ते दोघे शिवध्यान शिवस्मरण ॥ न विसरती कदाही ॥७०॥

यावरी एकदां दोघेजण ॥ गेले वनविहारालागून ॥ तों गंधर्वकन्या येऊन ॥ क्रीडतां दृष्टीं देखिल्या ॥७१॥
दोघे पाहती दुरूनी ॥ परम सुंदर लावण्यखाणी ॥ शुचिव्रत म्हणे राजपुत्रालागुनी ॥ परदारा नयनीं न पाहाव्या ॥७२॥ दर्शनें हरती चित्त ॥ स्पर्शनें बळ वीर्य हरीत ॥ कौटिल्यदंभसंयुक्त ॥ महाअनर्थकारिणी ॥७३॥
ब्रह्मसुतास तेथें ठेऊन ॥ राजपुत्र चालिला सुलक्षण ॥ स्वरूप सुंदर मन्मथाहून ॥ आकर्णनयन कोमलांग ॥७४॥ जवळी येवोनि पाहात ॥ तंव मुख्य नायिका विराजित ॥ अंशुमती नामें विख्यात ॥ गंधर्वकन्या पद्मिनी ॥७५॥ कोद्रविण नामा गंधर्वपती ॥ त्याची कन्या अंशुमती ॥ पिता पुसे महेषाप्रती ॥ हे कन्या अर्पू कोणातें ॥७६॥
मग बोले हिमनगजामात ॥ धर्मगुप्त सत्यरथाचा सुत ॥ तो माझा परम भक्त ॥ त्यासी देई अंशुमती ॥७७॥
हे पूर्वीचें शिववचन ॥ असो यावरी अंशुमती पाहे दुरोन ॥ न्याहाळीत राजनंदन ॥ वाटे पंचबाण दुसरा ॥७८॥ क्षीरसिंधूंत रोहिणीरमण ॥ काय आला कलंक धुवोन ॥ तैसें राजपुत्राचें वदन ॥ अंशुमती न्याहाळी ॥७९॥ बत्तिसलक्षण संयुक्त ॥ अजानुबाहू चापशरमंडित ॥ विशाळ वक्षःस्थळ चालत ॥ करिनायक ज्यापरी ॥८०॥

ऐसा तो गुणाढ्य देखूनि त्वरित ॥ अंशुमती सखयांप्रति सांगत ॥ तुम्हीं दुज्या वनाप्रति जाऊनि समस्त ॥ सुमनें आणावी सुवासें ॥८१॥
अवश्य म्हणोनि त्या ललना ॥ जात्या झाल्या आणिका वना ॥ अंशुमती एकली जाणा ॥ राजपुत्रा खुणावीत ॥८२॥ भूरुहपल्लव पसरून ॥ एकांतीं घातलें आसन ॥ वरी वृक्षडाहाळिया भेदून ॥ भूमीवरी पसरल्या ॥८३॥
असो तेथें बैसला येऊन ॥ राजपुत्र सुहास्यवदन ॥ विशाळ भाळ आकर्णनयन ॥ आरक्त ओष्ठ सुकुमार ॥८४॥ मंजुळभाषिणी नेत्रकटाक्षबाणीं ॥ विंधिली ते लावण्यहरिणी ॥ मनोजमूर्च्छना सांवरूनी ॥ वर्तमान पुसे तयातें ॥८५॥ श्रुंगारसहोवरा तुजपासीं ॥ मी वास करीन राजहंसी ॥ देखतां तव वदन दिव्यशशी ॥ मम मानसचकोर नृत्य करी ॥८६॥
तव मुखाब्ज देखतां आनंद ॥ झेंपावती मम नेत्रमिलिंद ॥ कीं तव वचन गर्जतां अंबुद ॥ मम चित्तशिखी नृत्य करी ॥८७॥
कवि-गुरूंहुन तेज विशाळ ॥ आत्मकंठीची काढिली मुक्ताफळमाळ ॥ कंठीं सूदली तत्काळ ॥ चरणीं भाळ ठेवीत ॥८८॥
म्हणे मी कायावाचामनेंकरून ॥ तुझी ललना झालें पूर्ण ॥ यावरी धर्मगुप्त वचन ॥ काय बोलता जाहला ॥८९॥
मी जनकजननी विरहित ॥ राज्यभ्रष्ट दरिद्री अत्यंत ॥ तव पित्यासी कळतां मात ॥ घडे कैसें वरानने ॥९०॥

यावरी म्हणे अंशुमती ॥ तीन दिवसां येईन या स्थळाप्रती ॥ तुम्हीं यावें शीघ्रगती ॥ लग्नसिध्दि साधावया ॥९१॥
ऐसें बोलून ते चातुर्यराशी ॥ वेगें आली पितयापाशीं ॥ झालें वर्तमान सांगे त्यासी ॥ तो परम मानसी संतोषला ॥९२॥
राजपुत्र गेला परतोन ॥ बंधुप्रती सांगे सर्व वर्तमान ॥ शांडिल्यगुरूचें वचन स्मरून ॥ म्हणती प्रसाद पूर्ण त्याचा हा ॥९३॥
गुरुचरणीं ज्याचें मन ॥ त्यासी ऐश्वर्यासी काय न्यून ॥ काळमृत्युभयापासून ॥ सर्वदा रक्षी देशिक तो ॥९४॥
यावरी ते दोघे बंधु येऊन ॥ मातेसी सांगती वर्तमान ॥ येरी म्हणे धन्य धन्य शिवभजन ॥ फळ देते चालिलें ॥९५॥
यावरी तिसरे दिवशीं ॥ दोघेही गेले त्या वनासी ॥ गंधर्वराज सहपरिवारेंसी ॥ सर्व सामग्री घेऊनि आला ॥९६॥
दृष्टी देखतां जामात ॥ गंधर्व आनंदसमुद्रीं पोहत ॥ छत्र सेना सुखासन त्वरित ॥ धाडूनि उमा आणविली ॥९७॥
यावरी यथासांग लग्न ॥ चारी दिवस पूर्ण ॥ कोणी एक पदार्थ न्यून ॥ पडिला नाहीं तेधवां ॥९८॥
स्वर्गीच्या दिव्य वस्तु अमोलिक सतेज ॥ विहिणीस देत गंधर्वराज ॥ लक्ष रथ दहा सहस्त्र गज ॥ तेजःपुंज एक लक्ष वाजी ॥९९॥
एक लक्ष दास दासी ॥ अक्षय कोश रत्नराशी ॥ अक्षय भाते देत शक्तिसी ॥ दिव्य चाप बहुसाल ॥१००॥

अपार सेना संगें देत ॥ एक सेनापतिगंधर्व बळिवंत ॥ उमा दोघां पुत्रांसववेत ॥ मान देवोनि बोळविली ॥१०१॥ सुखासनारूढ अंशुमती ॥ पतीसवें चालिली शीघ्रगती ॥ कनकवेत्रपाणी पुढें धांवती ॥ वाहनासवें जियेच्या ॥१०२॥ चतुर्विध वाद्यांचे गजर ॥ चतुरंग चालिला दळभार ॥ येऊनि वेढिलें विदर्भनगर ॥ सत्यरथ पितयाचें ॥१०३॥ नगरदुर्गावरूनि अपार ॥ उल्हाटयंत्रांचा होत भडिगार ॥ परी गंधर्वाचें बळ फार ॥ घेतलें नगर क्षणार्धे ॥१०४॥
जेणें पूर्वी पिता मारिला जाण ॥ त्याचें नाम दुर्मर्षण ॥ तो जिताचि धरूनि जाण ॥ आपला करून सोडिला ॥१०५॥ देशोदेशींचे प्रजाजन ॥ धांवती करभार घेऊन ॥ उत्तम मुहूर्त पाहून ॥ सिंहासनारूढ जाहला ॥१०६॥
माता उमा बंधु शुचिव्रत ॥ त्यांसमवेत राज्य करीत ॥ दहा सहस्त्र वर्षेंपर्यंत ॥ यशवंत राज्य केलें ॥१०७॥
शांडिल्य गुरु आणून ॥ शतपद्म अर्पिलें धन ॥ रत्नाभिषेक करून ॥ अलंकार वस्त्रे दीधलीं ॥१०८॥
दुर्भिक्ष जळशोष अवर्षण ॥ आधि व्याधि वैवध्य मरण ॥ दुःख शोक कलह विघ्न ॥ राज्यांतूनि पळालीं ॥१०९॥
प्रजा भूदेव दायाद ॥ देती रायासी आशिर्वाद ॥ कोणासही नाहीं खेद ॥ सदा आनंद घरोघरीं ॥११०॥

ऐसा अंशुमती समवेत ॥ धर्मगुप्त राज्य करीत ॥ यौवराज्य शुचिव्रतातें देत ॥ पारिपत्य सर्व करी ॥१११॥
ऐसें दहा सहस्त्र वर्षें राज्य करून ॥ सुदत्तपुत्रासी राज्य देऊन ॥ चिंतितां मनीं उमाधवचरण ॥ दिव्य विमान धाडिलें ॥११२॥
दिव्य देह पावोनि नृपती ॥ माता-बंधूंसमवेत अंशुमती ॥ शिवविमानीं बैसती ॥ करीत स्तुति शिवाची ॥११३॥ कैलासपदासी जाऊन ॥ जगदात्मा शिव विलोकून ॥ जयजयकार करून ॥ लोटांगणें घालिती ॥११४॥
दीनबंधु जगन्नाथ ॥ पतित पावन कृपावंत ॥ हृदयीं धरूनी समस्त ॥ अक्षयपदीं स्थापिलीं ॥११५॥
हें धर्मगुप्ताचें आख्यान ॥ करिती जे श्रवण पठण ॥ लेखन रक्षण अनुमोदन ॥ तरी पंचवदन रक्षी तयां ॥११६॥ सकळ पापांचा होय क्षय ॥ जेथें जाय तेथें विजय ॥ धनधान्यवृध्दि होय ॥ ऋण जाय निरसुनी ॥११७॥
प्रदोषमहिमा अद्भुत ॥ जे आचरती ऐकूनि ग्रंथ ॥ तेथें कैचें दारिद्र मृत्य ॥ सत्यसत्य त्रिवाचा ॥११८॥
ज्याच्या घरीं शिवलीलामृत ग्रंथ ॥ त्याची शिव पाठी राखीत ॥ सदा हिंडे उमाकांत ॥ अंती शिवपद प्राप्त तया ॥११९॥
हा ग्रंथ आम्रवृक्ष सुरस ॥ पद्मरचनाफळें आलीं पाडास ॥ कुतर्कवादी जे वायस ॥ मुखरोग त्यांस नावडे ॥१२०॥

जयजय ब्रह्मानंदा विरूपक्षा ॥ श्रीधरवरद सर्वसाक्षा ॥ दुष्टकर्ममोचका कर्माध्यक्षा ॥ न येसी लक्षा निगमागमा ॥१२१॥ शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड ॥ स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड ॥ परिसोत सज्जन अखंड ॥ पंचमोध्याय गोड हा ॥१२२॥

इति पंचमोऽध्यायः ॥५॥
॥श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥

Wednesday, July 29, 2020

Shivlilamrut - Adhyay 4

अध्याय चवथा

श्रीगणेशाय नमः ॥

धराधरेंद्रनंदिनीमानससरोवर ॥ मराळ उदार कर्पूरगौर ॥ अगम्य गुण अपार ॥ तुझे वर्णिती सर्वदा ॥१॥
न कळे जयाचें मूळ मध्य अवसान ॥ आपणचि सर्वकर्ता कारण ॥ कोठें प्रगटेल ज्याचें आगमन ॥ ठायीं न पडे ब्रह्मादिकां ॥२॥
जाणोनि भक्तांचें मानस ॥ तेथेंचि प्रगटे जगन्निवास ॥ येचिविषयीं सूतें इतिहास ॥ शौनकादिकांप्रति सांगितला ॥३॥
किरातदेशींचा राजा विमर्शन ॥ परमप्रतापी शत्रुभंजन ॥ मृगया करीत हिंसक दारूण ॥ मद्यमांसीं रत सदा ॥४॥
चतुर्वर्णाच्या स्त्रिया भोगीत ॥ निर्दय अधर्मेंचि वर्तत ॥ परी शिवभजनीं असे रत ॥ विधीनें पूजित नित्य शिवासी ॥५॥
त्याचे स्त्रियेचें नाम कुमुद्वती ॥ परम चतुर गुणवती ॥ पतीप्रति पुसे एकांतीं ॥ कापट्यरीती टाकोनियां ॥६॥
म्हणे शिवव्रतें आचरतां बहुवस ॥ शिवरात्री सोमवार प्रदोष ॥ गीत नृत्य स्वयें करितां विशेष ॥ शिवलीलामृत वर्णितां ॥७॥
दोषही घडती तुम्हांपासून ॥ इकडे शिवभजनीं सावधान ॥ मग तो राजा विमर्शन ॥ वर्तमान सांगे पुरातन पैं ॥८॥
मी पूर्वीं पंपानाम नगरीं ॥ सारमेय होतों सुंदरी ॥ तों माघ वद्य चतुर्दशी शिवरात्रीं ॥ शिवमंदिरासमोर आलों ॥९॥ शिवपूजा पाहिली समस्त ॥ द्वारीं उभे होते राजदूत ॥ तिंहीं दंड मारितां त्वरित ॥ सव्य पळत प्रदक्षिणा करीं ॥१०॥

आणीक आलों परतोनी ॥ बलिपिंड प्राप्त होईल म्हणोनी ॥ मागुती दाटावितां त्यांनी ॥ प्रदक्षिणा केल्या शिवसदना ॥११॥
मागुती बैसलों येऊन ॥ तंव तिंहीं क्रोधें मारिला बाण ॥ म्यां शिवलिंग पुढें लक्षून ॥ तेथेंचि प्राण सोडिला ॥१२॥
त्या पुण्यकर्मेंकरून ॥ आतां राजदेह पावलों जाण ॥ परी श्वानाचे दुष्ट गुण ॥ नाना दोष आचरें ॥१३॥
कुमुद्वती म्हणे तुम्हांसी पूर्वज्ञान ॥ तरी मी कोण होतें सांगा मजलागून ॥ मग तो बोले विमर्शन ॥ कपोती होतीस पुर्वीं  तूं ॥१४॥
मांसपिंड नेतां मुखीं धरून ॥ पाठीं लागला पक्षी श्येन ॥ शिवालयास प्रदक्षिणा तीन ॥ करूनि शिखरीं बैसलीस ॥१५॥
तूं श्रमलीस अत्यंत ॥ तुज श्येनपक्षी मारीत ॥ शिवसदनासमोर शरीर पडत ॥ ती राणी सत्य झालीसं तूं ॥१६॥
मग कुमुद्वती म्हणे रायास ॥ तुम्ही त्रिकाळज्ञानी पुण्यपुरुष ॥ तुम्ही आम्ही जाऊं कोण्या जन्मास ॥ सांगा समस्त वृत्तांत हा ॥१७॥
यावरी तो राव म्हणे ॥ ऐकें मृगनेत्रे इभगमने ॥ सिंधुदेशीचा नृप इंदुवदने ॥ होईन पुढलिये जन्मीं मी ॥१८॥
तूं जयानामें राजकन्या होसी ॥ मजलागीं राजसे वरिसी ॥ तिसरे जन्मीं सौराष्ट्रराव नेमेंसी ॥ होईन सत्य गुणसरिते ॥१९॥
तूं कलिंगकन्या होऊन ॥ मज वरिसी सत्य जाण ॥ चौथे जन्मीं गांधारराव होईन ॥ तूं मागधकन्या होऊन वरिसी मज ॥२०॥

पांचवे जन्मी अवंतीराज ॥ दाशार्हकन्या तूं पावसी मज ॥ सहावे जन्मीं आनर्तपति सहज ॥ तूं ययातिकन्या गुणवती ॥२१॥
सातवे जन्मीं पांड्यराजा होईन ॥ तुं पद्मराजकन्या वसुमती पूर्ण ॥ तेथें मी बहुत ख्याती करून ॥ शत्रु दंडीन शिवप्रतापें ॥२२॥
महाधर्म वाढवीन ॥ जन्मोजन्मीं शिवभजन करीन ॥ मग त्या जन्मीं पुत्रास राज्य देऊन ॥ तपास जाईन महावना ॥२३॥
शरण रिघेन अगस्तीस ॥ शैवदीक्षा घेऊन निर्दोष ॥ शुभवदने तुजसमवेत कैलास ॥ पद पावेन निर्धारें ॥२४॥
सूत म्हणे शौनकादिकांप्रती ॥ तितुकेही जन्म घेवोनि तो भूपती ॥ ब्रह्मवेत्ता होऊनि अंती ॥ अक्षय शिवपद पावला ॥२५॥
ऐसा शिवभजनाचा महिमा ॥ वर्णू न शके द्रुहिण सुत्रामा ॥ वेदशास्त्रांसी सीमा ॥ न कळे ज्याची वर्णावया ॥२६॥
ऐकूनि शिवगुणकीर्तन ॥ सद्गद न होय जयाचें मन ॥ अश्रुधारा नयन ॥ जयाचे कदा न वाहती ॥२७॥
धिक् त्याचें जिणें धिक् कर्म ॥ धिक् विद्या धिक् धर्म ॥ तो वांचोनि काय अधम ॥ दुरात्मा व्यर्थ संसारीं ॥२८॥
ऐका शिवभजनाची थोरी ॥ उज्जयिनी नामें महानगरी ॥ राव चंद्रसेन राज्य करी ॥ न्यायनीतीकरूनियां ॥२९॥ ज्योतिर्लिंग महाकाळेश्वर ॥ त्याचे भजनीं रत नृपवर ॥ मित्र एक नाम मणिभद्र ॥ प्राणसखा रायाचा ॥३०॥

मित्र चतुर आणि पवित्र ॥ देशिक सर्वज्ञ दयासागर ॥ शिष्य भाविक आणि उदार ॥ पूर्वसुकृतें प्राप्त होय ॥३१॥
गृहिणी सुंदर आणि पतिव्रता ॥ पुत्र भक्त आणि सभाग्यता ॥ व्युत्पन्न आणि सुरस वक्ता ॥ होय विशेष सुकृतें  ॥३२॥
दिव्य हिरा आणि परिस ॥ मुक्ताफळ सुढाळ सुरस ॥ पिता ज्ञानी गुरु तोचि विशेष ॥ हें अपूर्व त्रिभुवनीं ॥३३॥
ऐसा तो राव चंद्रसेन ॥ मित्र मणिभद्र अति सुजाण ॥ तेणें एक मणि दिधला आणोन ॥ चंडकिरण दुसरा ॥३४॥
अष्टधातुंचा होतां स्पर्श ॥ होय चामीकर बावनकस ॥ सर्पव्याघ्रतस्करवास ॥ राष्ट्रांत नसे त्याकरितां ॥३५॥
त्या मण्याचें होतां दर्शन ॥ सर्व रोग जाती भस्म होऊन ॥ दुर्भिक्ष शोक अवर्षण ॥ दारिद्र्य नाहीं नगरांत ॥३६॥
तो कंठी बांधितां प्रकाशवंत ॥ राव दिसे जैसा पुरुहूत ॥ समरांगणी जय अद्भुत ॥ न ये अपयश कालत्रयीं ॥३७॥
जे करावया येती वैर ॥ ते आपणचि होती प्राणमित्र ॥ आयुरारोग्य ऐश्वर्य अपार ॥ चढत चालिलें नृपाचें ॥३८॥
भूप तो सर्वगुणीं वरिष्ठ ॥ शिवभजनीं गंगेचा लोट ॥ कीं विवेकभावरत्नांचा मुकुट ॥ समुद्र सुभट चातुर्याचा ॥३९॥
कीं वैराग्यसरोवरींचा मराळ ॥ कीं शांतिउद्यानींचा तपस्वी निर्मळ ॥ कीं ज्ञानामृताचा विशाळ ॥ कूपचि काय उचंबळला ॥४०॥

ऐश्वर्य वाढतां प्रबळ ॥ द्वेष करिती पृथ्वीचे भूपाळ ॥ मणि मागों पाठवितां सकळ ॥ स्पर्धा बळें वाढविती ॥४१॥
बहुतांसि असह्य झालें ॥ अवनीचे भूभुज एकवटले ॥ अपार दळ घेवोनि आले ॥ वेढिलें नगर रायाचें ॥॥४२॥
इंदिरावर कमलदलनयन ॥ त्याचें कंठी कौस्तुभ जाण ॥ कीं मृडानीवरमौळीं रोहिणीरमण ॥ प्रकाशघन मणी तैसा ॥४३॥
तो मणी आम्हांसि दे त्वरित ॥ म्हणोनि नृपांनीं पाठविले दूत ॥ मग राव विचारी मनांत ॥ कैसा अनर्थ ओढवला ॥४४॥
थोर वस्तूंचे संग्रहण ॥ तेंचि अनर्थासि कारण ॥ ज्याकारणें जें भूषण ॥ तेंचि विदूषणरूप होये ॥४५॥
अतिरूप अतिधन ॥ अतिविद्या अतिप्रीति पूर्ण ॥ अतिभोग अतिभूषण ॥ विघ्नासि कारण तेंचि होय ॥४६॥
बोले राव चंद्रसेन ॥ मणी जरी द्यावा यांलागून ॥ तरी जाईल क्षात्रपण ॥ युद्ध दारुण न करवे ॥४७॥
आतां स्वामी महाकाळेश्वर ॥ करुणासिंधु कर्पूरगौर ॥ जो दीनरक्षण जगदुद्धार ॥ वज्रपंजर भक्तांसी ॥४८॥
त्यासी शरण जाऊं ये अवसरीं ॥ जो भक्ताकाजकैवारी ॥ जो त्रिपुरांतक हिमनगकुमारी ॥ प्राणवल्लभ जगदात्मा ॥४९॥
पूजासामग्री सिद्ध करून ॥ शिवमंदिरीं बैसला जाऊन ॥ सकळ चिंता सोडून ॥ विधियुक्त पूजन आरंभिलें ॥५०॥

बाहेर सेना घेऊन प्रधान ॥ युद्ध करित शिव स्मरून ॥ महायंत्रांचे नगरावरून ॥ मार होती अनिवार ॥५१॥
सर्व चिंता सोडूनि चंद्रसेन ॥ चंद्रचूड आराधी प्रीतीकरून ॥ करी श्रौतमिश्रित त्र्यंबकपूजन ॥ मानसध्यान यथाविधी  ॥५२॥
बाहेर झुंजती पृथ्वीचे भूपाळ ॥ परी चिंतारहित भूपति प्रेमळ ॥ देवद्वारीं वाद्यांचा कल्लोळ ॥ चतुर्विध वाद्यें वाजताती ॥५३॥
राव करीत महापूजन ॥ पौरजन विलोकिती मिळोन ॥ त्यांत एक गोपगृहिणी पतिहीन ॥ कुमार कडिये घेऊन पातली ॥५४॥
सहा वर्षांचा बाळ ॥ राजा पूजा करितां पाहें सकळ ॥ निरखोनियां वाढवेळ ॥ गोपगृहिणी आली घरा ॥५५॥
कुमार कडेखालता उतरोन ॥ आपण करी गृहींचें कारण ॥ शेजारी उद्वस तृणसदन ॥ बाळ जाऊनि बैसला तेथें ॥५६॥
लिंगाकृति पाषाण पाहून ॥ मृतिकेची वेदिका करून ॥ दिव्य शिवप्रतिमा मांडून ॥ करी स्थापना प्रीतीनें ॥५७॥
कोणी दुजें नाहीं तेथ ॥ लघुपाषाण आणोनि त्वरित ॥ पद्मासनीं पूजा यथार्थ ॥ पाषाणचि वाहे प्रीतीनें ॥५८॥
राजपूजा मनांत आठवून ॥ पदार्थमात्राविषयीं वाहे पाषाण ॥ धूप दीप नैवेद्य पूर्ण ॥ तेणेंचिकरूनि करीतसे ॥५९॥
आर्द्र तृणपुष्प सुवासहीन ॥ तेंचि वाहे आवडीकरून ॥ नाहीं ठाउकें मंत्र ध्यान आसन ॥ प्रेमभावें पूजीतसे ॥६०॥

परिमळद्रव्यें कैंचीं जवळी ॥ शिवावरी मृत्तिकाच उधळी ॥ मृत्तिकाचि घेऊनि करकमळीं ॥ पुष्पांजळीं समर्पित ॥६१॥
एवं रायाऐसें केलें पूजन ॥ मग मानसपूजा कर जोडून ॥ ध्यान करी नेत्र झांकून ॥ शंकरी मन दृढ जडलें ॥६२॥ मातेंनें स्वयंपाक करून ॥ ये बा पुत्रा करीं भोजन ॥ बहु वेळां हांक फोडोन ॥ पाचारितां नेदी प्रत्युत्तर ॥६३॥
म्हणोनि बाहेर येवोनि पाहे ॥ तंव शून्यगृहीं बैसला आहे ॥ म्हणे अर्भका मांडिलें काये ॥ चाल भोजना झडकरी ॥६४॥
परी नेदी प्रत्युत्तर ॥ मातेनें क्रोधे करूनि सत्वर ॥ त्याचें लिंग आणि पूजा समग्र ॥ निरखुनियां झुगारिलीं ॥६५॥
चाल भोजना त्वरित ॥ म्हणोनि हस्तकीं धरूनि वोढीत ॥ बाळ नेत्र उघडोनि पाहत ॥ तंव शिवपूजा विदारिली ॥६६॥
अहा शिव शिव म्हणोन ॥ घेत वक्षः:स्थळ बडवून ॥ दुःखें पडला मूर्च्छा येऊन ॥ म्हणे प्राण देईन मी आतां ॥६७॥
गलिप्रदानें देऊन ॥ माता जाऊनि करी भोजन ॥ जीर्णवस्त्र पांघरून ॥ तृणसेजे पहुडली ॥६८॥
इकडे पूजा भंगली म्हणून ॥ बाळ रडे शिवनाम घेऊन ॥ तंव दयाळ उमारमण ॥ अद्भुत नवल पै केलें ॥६९॥
तृणगृह होतें जें जर्जर ॥ झालें रत्नखचित शिवमंदिर ॥ हिऱ्यांचे स्तंभ वरी शिखर ॥ नाना रत्नांचे कळस झळकती ॥७०॥

चारी द्वारें रत्नखचित ॥ मध्यें मणिमय दिव्यलिंग विराजित ॥ चंद्रप्रभेहूनि अमित ॥ प्रभा ज्योतिर्लिंगाची ॥७१॥
नेत्र उघडोनि बाळ पाहात ॥ तंव राजोपचारें पूजा दिसत ॥ सिद्ध करोनि ठेविली समस्त ॥ बाळ नाचत ब्रह्मानंदें ॥७२॥
यथासांग महापूजन ॥ बाळें केलें प्रीतीकरोन ॥ षोडशोपचारें पूजा समर्पुन ॥ पुष्पांजळी वाहतसे ॥७३॥ शिवनामावळी उच्चारीत ॥ बाळ कीर्तनरंगीं नाचत ॥ शिव म्हणे माग त्वरित ॥ प्रसन्न झालों बाळका रे ॥७४॥ बाळक म्हणे ते वेळीं ॥ मम मातेनें तुझी पूजा भंगिली ॥ तो अन्याय पोटांत घालीं ॥ चंद्रमौळी अवश्य म्हणे ॥७५॥ मातेसि दर्शना आणितों येथ ॥ म्हणोनि गेला आपुले गृहांत ॥ तंव तें देखिलें रत्नखचित ॥ माता निद्रिस्त दिव्यमंचकीं ॥७६॥ पहिलें स्वरूप पालटून ॥ झाली ते नारी पद्मीण ॥ सर्वालंकारेंकरून ॥ शोभायमान पहुडली ॥७७॥
तीस बाळकें जागें करून ॥ म्हणे चाल घेईं शिवदर्शन ॥ तंव ती पाहे चहूंकडे विलोकून ॥ अद्भुत करणी शिवाची ॥७८॥
हृदयीं धरूनि दृढ बाळ ॥ शिवालया आली तात्काळ ॥ म्हणे धन्य तूं शिव दयाळ ॥ धन्य बाळ भक्त हा ॥७९॥ गोपदारा गेली राजगृहा धांवून ॥ चंद्रसेना सांगे वर्तमान ॥ राव वेगें आला प्रीतीकरून ॥ धरी चरण बाळकाचे ॥८०॥

शंकराची अद्भुत करणी ॥ राव आश्चर्य करूनि पाहे नयनीं ॥ नागरिकजनांच्या श्रेणी ॥ धांवती बाळा पाहावया ॥८१॥
दिगंतरीं गाजली हांक अहुत ॥ बाळकासी पावला उमानाथ ॥ अवंतीनगरा येती धांवत ॥ जन अपार पाहावया ॥८२॥
चंद्रसेन रायाप्रती ॥ नृप अर्वनीचे सांगोनि पाठविती ॥ धन्य धन्य तुझी भक्ती ॥ गिरिजावर प्रसन्न तूतें ॥८३॥
आम्ही टाकूनि द्वेष दुर्वासना ॥ तुझ्या भेटीस येऊं चंद्रसेना ॥ तो बाळ पाहूं नयना ॥ कैलासराणा प्रसन्न ज्यासी ॥८४॥
ऐसें ऐकतां चंद्रसेन ॥ प्रधानासमेत बाहेर येऊन ॥ सकळ रायांस भेटून ॥ आला मिरवत घेऊनी ॥८५॥
अवंतीनगरींची रचना ॥ पाहतां आश्चर्य वाटे मना ॥ सप्तपुरींत श्रेष्ठ जाणा ॥ उज्जयिनी नाम तियेचें ॥८६॥
राजे सकळ कर जोडून ॥ शिवमंदिरापुढें घालिती लोटांगण ॥ त्या बालकासी वंदून ॥ आश्चर्य करिती सर्वही ॥८७॥
म्हणती जैं शिव प्रसन्न ॥ तैं तृणकुटी होय सुवर्णसदन ॥ शत्रु ते मित्र होऊन ॥ वोळंगती सर्वस्वें ॥८८॥
गृहींच्या दासी सिद्धी होऊन ॥ न मागतां पुरविती इच्छिलें पूर्ण ॥ आंगणींचे वृक्ष कल्पतरु होऊन ॥ कल्पिलें फळ देती ते ॥८९॥
मुका होईल पंडित ॥ पांगुळ पवनापुढें धांवत ॥ जन्मांध रत्नें पारखीत ॥ मूढ अत्यंत होय वक्ता ॥९०॥

रंक-भणंगा भाग्य परम ॥ तोचि होईल सार्वभौम ॥ न करितां सायास दुर्गम ॥ चिंतामणि येत हाता ॥९१॥
त्रिभुवनभरी कीर्ति होय ॥ राजे समग्र वंदिती पाय ॥ जेथें जेथें खणूं जाय ॥ तेथें तेथें निधाने सांपडती ॥९२॥
अभ्यास न करितां बहुवस ॥ सांपडे वेदांचा सारांश ॥ सकळ कळा येती हातास ॥ उमाविलास भेटे जेव्हां ॥९३॥
गोपति म्हणें गोरक्षबाळा ॥ तुजसी गोवाहन प्रसन्न झाला ॥ गोविप्र प्रतिपाळीं स्नेहाळा ॥ धन्य नृपराज चंद्रसेन ॥९४॥ यात्रा दाटली बहुत ॥ सर्व राजे आश्चर्य करीत ॥ तों तेथें प्रकटला हनुमंत ॥ वायुसुत अंजनीप्रिय जो ॥९५॥
जो राघवचरणारविंदभ्रमर ॥ भूगर्भरत्नमानससंतापहर ॥ वृत्रारिशत्रुजनकनगर ॥ दहन मदनदमन जो ॥९६॥
द्रोणाचळौत्पाटण ॥ ऊर्मिलाजीवनप्राण रक्षण ॥ ध्वजस्तंभीं बैसोन ॥ पाळी तृतीयनंदन पृथेचा ॥९७॥
ऐसा प्रगटतां मारुती ॥ समस्त क्षोणीपाळ चरणीं लागती ॥ राघवप्रियकर बाळाप्रती ॥ हृदयीं धरूनि उपदेशी ॥९८॥
शिवपंचाक्षरी मंत्र ॥ उपदेशीत साक्षात रुद्र ॥ न्यास मातृका ध्यानप्रकार ॥ प्रदोष सोमवार व्रत सांगे ॥९९॥
हनुमंतें मस्तकीं ठेविला हात ॥ झाला चतुदर्शविद्यावंत ॥ चतुःषष्टिकळा आकळीत ॥ जैसा आमलक हस्तकीं ॥१००॥

त्याचें नाम श्रीकर ॥ ठेविता झाला वायुकुमर ॥ सकळ राव करिती जयजयकार ॥ पुष्पें सुरवर वर्षती ॥१०१॥
यावरी अंजनी हृदयाब्जमिलिंद ॥ श्रीकरास म्हणे तुजहो आनंद ॥ तुझे आठवे पिढीस नंद ॥ जन्मेल गोपराज गोकुळीं ॥१०२॥
त्याचा पुत्र पीतवसन ॥ होइल श्रीकृष्ण कंसदमन ॥ शिशुपालांतक कौरवमर्दन ॥ पांडवपालक गोविंद ॥१०३॥
श्रीहरीच्या अनंत अवतारपंक्ती ॥ मागें झाल्या पुढेंही होती ॥ जेवीं जपमाळेचे मणी परतोनी येती ॥ अवतार स्थिती तैसीच ॥१०४॥
कीं संवत्सर मास तिथि वार ॥ तेच परतती वारंवार ॥ तैसा अवतार धरी श्रीधर ॥ श्रीकरासत्य जाण पां ॥१०५॥
ऐसें हरिकुळभूषण बोलून ॥ पावला तेथेंचि अंतर्धान ॥ सर्व भूभुज म्हणती धन्य धन्य ॥ सभाग्यपण श्रीकराचें ॥१०६॥ ज्याचा श्रीगुरु हनुमंत ॥ त्यासी काय न्यून पदार्थ ॥ श्रीकर चंद्रसेन नृपनाथ ॥ बोळवीत सर्व भूपांते ॥१०७॥
वस्त्रें भूषणें देऊनी ॥ बोळविले पावले स्वस्थानीं ॥ मग सोमवार प्रदोष प्रीतीकरूनी ॥ श्रीकर चंद्रसेन आचरती ॥१०८॥
शिवरात्रीउत्साह करिती ॥ याचकांचे आर्त पुरविती ॥ शिवलीलामृत श्रवण करिती ॥ अंती शिवपदाप्रती पावले ॥१०९॥
हा अध्याय करितां पठण ॥ संतति संपत्ति आयुष्यवर्धन ॥ शिवार्चनी रत ज्याचें मन ॥ विघ्नें भीति तयासी ॥११०॥

शिवलीलामृतग्रंथवासरमणी ॥ देखोनि विकासती सज्जनकमलिनी ॥ जीवशिव चक्रवाकें दोनी ॥ ऐक्या येती प्रीतीनें ॥१११॥
निंदक दुर्जन अभक्त ॥ ते अंधारीं लपती दिवाभीत ॥ शिवनिंदकांसी वैकुंठनाथ ॥ महानरकांत नेऊनि घाली ॥११२॥
विष्णुनिंदक जे अपवित्र ॥ त्यांसी कुंभीपाकीं घाली त्रिनेत्र ॥ एवं हरि-हरनिंदकांसी सूर्यपुत्र ॥ नानाप्रकारें जाच करी ॥११३॥
ब्रह्मानंदा यतिवर्या ॥ श्रीभक्तकैलासाचलनिवासिया ॥ श्रीधरवरदा मृडानीप्रिया ॥ तुझी लीला वदवीं तूं ॥११४॥
शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड ॥ स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड ॥ परिसोत सज्जन अखंड ॥ चतुर्थाध्याय गोड हा ॥११५॥
-
॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥

Shivlilamrut - Adhyay 2

अध्याय दुसरा
॥ श्रीगणेशाय नमः॥

जेथें सर्वदा शिवस्मरण ॥ तेथें भुक्ति मुक्ति सर्वकल्याण ॥ नाना संकटें विघ्नें दारुण ॥ न बाधती कालत्रयी ॥१॥
संकेतें अथवा हास्येंकरून ॥ भलत्या मिसें घडो शिवस्मरण ॥ न कळतां परिसासी लोह जाण ॥ संघटतां सुवर्ण करी कीं ॥२॥
न कळतां प्राशिलें अमृत ॥ परी अमर करी कीं यथार्थ ॥ औषधी नेणतां भक्षित ॥ परी रोग सत्य हरी कीं ॥३॥
शुष्कतृणपर्वत अद्भुत ॥ नेणतां बाळक अकस्मात ॥ अग्निस्फुलिंग टाकीत ॥ परी भस्म यथार्थ करी कीं ॥४॥
तैसे न कळतां घडे शिवस्मरण ॥ परी सकळ दोषां होय दहन ॥ अथवा विनोदेंकरून ॥ शिवस्मरण घडो कां ॥५॥
हे कां व्यर्थ हांका फोडिती ॥ शिव शिव नामें आरडती ॥ अरे कां हे उगे न राहती ॥ हरहर गर्जती वेळोवेळां ॥६॥ शिवनामाचा करिती कोल्हाळ ॥ माझें उठविलें कपाळ ॥ शिव शिव म्हणतां वेळोवेळ ॥ काय येतें यांच्या हाता ॥७॥ ऐसी हेळणा करी क्षणक्षणीं ॥ परी उमावल्लभनाम ये वदनीं ॥ पुत्रकन्यानामेंकरूनी ॥ शिवस्मरण घडो कां ॥८॥ महाप्रीतीनें करितां शिवस्मरण ॥ आदरें करितां शिवध्यान ॥ शिवस्वरूप मानूनी ब्राह्मण ॥ संतर्पण करी सदां ॥९॥ ऐसी शिवीं आवडी धरी ॥ त्याहीमाजी आली शिवरात्री ॥ उपवास जागरण करी ॥ होय बोहरी महत्पापा ॥१०॥

ते दिवशीं बिल्वदळें घेऊन ॥ यथासांग घडलें शिवार्चन ॥ तरी सहस्त्रजन्मींचे पाप संपूर्ण ॥ भस्म होऊन जाईल ॥११॥
नित्य बिल्वदळें शिवासी वाहत ॥ त्याएवढा नाहीं पुण्यवंत ॥ तो तरेल हें नवल नव्हे सत्य ॥ त्याच्या दर्शनें बहुत तरती ॥१२॥
प्रातःकाळी घेतां शिवदर्शन ॥ यामिनीचें पाप जाय जळोन ॥ पूर्वजन्मींचें दोष गहन ॥ माध्यान्हीं दर्शन घेतां नुरती ॥१३॥
सायंकाळीं शिव पाहतां सप्रेम ॥ सप्तजन्मींचें पाप होय भस्म ॥ शिवरात्रीचा महिमा परम ॥ शेषही वर्णू शकेना ॥१४॥
कपिलाषष्ठी अर्धोदय संक्रमण ॥ महोदय गजच्छाया ग्रहण ॥ इतुकेही पर्वकाळ ओंवाळून ॥ शिवरात्रीवरून टाकावें ॥१५॥
शिवरात्री आधींचि पुण्यदिवस ॥ त्याहीवरी पूजन जागरण विशेष ॥ त्रिकाळपूजा आणि रुद्रघोष ॥ त्याच्या पुण्यासी पार नाहीं ॥१६॥
वसिष्ठ विश्वामित्रादि मुनीश्वर ॥ सुरगण गंधर्व किन्नर ॥ सिद्ध चारण विद्याधर ॥ शिवरात्रिव्रत करिताती ॥१७॥
यदर्थी सुरस कथा बहुत ॥ शौनकादिकां सांगे सूत ॥ ती श्रोतीं ऐकावी सावचित्त ॥ अत्यादरेंकरूनियां ॥१८॥
तरी मासांमाजी माघमास ॥ ज्याचा व्यास महिमा वर्णीं विशेष ॥ त्याहीमाजी कृष्णचतुर्दशीस ॥ मुख्य शिवरात्रि जाणिजे ॥१९॥
विंध्याद्रिवासी एक व्याध ॥ मृगपक्षिघातक परमनिषिध्द ॥ महानिर्दय हिंसक निषाद ॥ केले अपराध बहु तेणें ॥२०॥

धनुष्यबाण घेऊनि करीं ॥ पारधीसी चालिला दुराचारी ॥ पाश वागुरा कक्षेसी धरी ॥ कवच लेत हरितवर्ण ॥२१॥
करीं गोधांगुलित्राण ॥ आणिकही हातीं शस्त्रसामुग्री घेऊन ॥ काननीं जातां शिवस्थान ॥ शोभायमान देखिलें ॥२२॥
तंव तो शिवरात्रीचा दिन ॥ यात्रा आली चहुंकडून ॥ शिवमंदिर श्रुंगारून ॥ शोभा आणिली कैलासींची ॥२३॥
शुद्धरजततगटवर्ण ॥ देवालय झळके शोभायमान ॥ गगनचुंबित ध्वज पूर्ण ॥ रत्नजडित कळस तळपताती ॥२४॥
मध्यें मणिमय शिवलिंग ॥ भक्त पूजा करिती सांग ॥ अभिषेकधारा अभंग ॥ विप्र धरिती रुद्रघोषें ॥२५॥
एक टाळ मृदंग घेऊन ॥ सप्रेम करिती शिवकीर्तन ॥ श्रोते करटाळी वाजवून ॥ हरहरशब्दें घोष करिती ॥२६॥
नाना परिमळद्रव्यसुवास ॥ तेणें दशदिशा दुमदुमिल्या विशेष ॥ लक्ष दीपांचे प्रकाश ॥ जलजघोष घंटारव ॥२७॥
शशिमुखा गर्जती भेरी ॥ त्यांचा नाद न माये अंबरी ॥ एवं चतुर्विध वाद्यें नानापरी ॥ भक्त वाजविती आनंदे ॥२८॥
तो तेथें व्याध पातला ॥ समोर विलोकी सर्व सोहळा ॥ एक मुहूर्त उभा ठाकला ॥ हांसत बोलिला विनोदे ॥२९॥
हे मूर्ख अवघे जन ॥ येथें द्रव्य काय व्यर्थ नासोन ॥ आंत दगड बाहेरी पाषाण ॥ देवपण येथें कैचें ॥३०॥

उत्तम अन्न सांडून ॥ व्यर्थ कां करिती उपोषण ॥ ऐसिया चेष्टा करीत तेथून ॥ काननाप्रती जातसे ॥३१॥
लोक नामें गर्जती वारंवार ॥ आपणहि विनोदें म्हणे शिव हर हर ॥ सहज सव्य घालूनि शिवमंदिर ॥ घोर कांतार प्रवेशला ॥३२॥
वाचेसी लागला तोचि वेध ॥ विनोदें बोले शिव शिव शब्द ॥ नामप्रतापें दोष अगाध ॥ झडत सर्व चालिले ॥३३॥
घोरांदर सेवितां वन ॥ नाढळतीच जीव लघुदारूण ॥ तों वरूणदिग्वधूचें सदन ॥ वासरमणि प्रवेशला ॥३४॥
निशा प्रवर्तली सबळ ॥ कीं ब्रह्मांडकरंडा भरलें काजळ ॥ कीं विशाळ कृष्णकंबळ ॥ मंडप काय उभारिला ॥३५॥
विगतधवा जेवीं कामिनी ॥ तेवीं न शोभे कदा यामिनी ॥ जरी मंडित दिसे उडुगणीं ॥ परी पतिहीन रजनी ते ॥३६॥
जैसा पंडित गेलिया सभेंतून ॥ मूर्ख जल्पती पाखंडज्ञान ॥ जेवीं अस्ता जातां सहस्त्रकिरण ॥ उडुगणें मागें झळकती ॥३७॥
असो ऐसी निशा दाटली सुबद्ध ॥ अवघा वेळ उपवासी निषाद ॥ तों एक सरोवर अगाध ॥ दृष्टीं देखिलें शोधितां ॥३८॥
अनेक संपत्ती सभाग्यसदनीं ॥ तेवीं सरोवरी शोभती कुमुदिनी ॥ तटीं बिल्ववृक्ष गगनीं ॥ शोभायमान पसरला ॥३९॥
योगभ्रष्ट कर्मभूमीसी पावती जनन ॥ तेवीं बिल्वडहाळिया गगनींहून ॥ भूमीस लागल्या येऊन ॥ माजी रविशशिकिरण न दिसे ॥४०॥

त्यांत तम दाटलें दारूण ॥ माजी बैसल्या व्याध जाऊन ॥ शरासनीं शर लावून ॥ कानाडी ओढोन सावज लक्षी ॥४१॥
दृष्टीं बिल्वदळें दाटलीं बहुत ॥ तीं दक्षिणहस्तें खुडोनि टाकीत ॥ तो तेथें पद्मजहस्तें स्थापित ॥ शिवलिंग दिव्य होतें ॥४२॥
त्यावरी बिल्वदळें पडत ॥ तेणें संतोषला अपर्णानाथ ॥ व्याधासी उपवास जागरण घडत ॥ सायास न करितां अनायासें ॥४३॥
वाचेसी शिवनामाचा चाळा ॥ हर हर म्हणे वेळोवेळां ॥ पापक्षय होत चालिला ॥ पूजन स्मरण सर्व घडलें ॥४४॥
एक याम झालिया रजनी ॥ तों जलपानालागीं एक हरिणी ॥ आली तेथें ते गर्भिणी ॥ परम सुकुमार तेजस्वी ॥४५॥ व्याध तिणें लक्षिला दुरून ॥ कृतांतवत परम दारुण ॥ आकर्ण ओढिला बाण ॥ देखोनि हरिणी बोलतसे ॥४६॥
म्हणे महापुरुषा अन्यायाविण ॥ कां मजवरी लाविला बाण ॥ मी तव हरिणी आहे गर्भिण ॥ वध तुवां न करावा ॥४७॥ उदरांत गर्भ सूक्ष्म अज्ञान ॥ वधितां दोष तुज दारुण ॥ एक रथभरी जीव वधितां सान ॥ तरी एक बस्त वधियेला ॥४८॥
शत बस्त वधितां एक ॥ वृषभहत्येचें पातक ॥ शत वृषभ तैं गोहत्या देख ॥ घडली शास्त्र वदतसे ॥४९॥
शत गोहत्येचें पातक पूर्ण ॥ एक वघितां होय ब्राह्मण ॥ शत ब्रह्महत्येचें पातक जाण ॥ एक स्त्री वधिलिया ॥५०॥

शत स्त्रियांहूनि अधिक ॥ एक गुरुहत्येचें पातक ॥ त्याहूनि शतगुणी देख ॥ एक गर्भिणी विधिलिया ॥५१॥
तरी अन्याय नसतां ये अवसरीं ॥ मज मारिसी कां वनांतरी ॥ व्याध म्हणे कुटुंब घरी ॥ उपवासी वाट पहात ॥५२॥ मीही आजि निराहार ॥ अन्न नाहींच अणुमात्र ॥ परी मृगी होऊनि सुंदर ॥ गोष्टी वद्सी शास्त्रींच्या ॥५३॥
मज आश्चर्य वाटतें पोटीं ॥ नराऐशा सांगसी गोष्टी ॥ तुज देखोनियां दृष्टीं ॥ दया हृदयीं उपजतसे ॥५४॥
पूर्वीं तुं होतीस कोण ॥ तुज एवढें ज्ञान कोठून ॥ तूं विशाळनेत्री रूप लावण्य ॥ सर्व वर्तमान मज सांगे ॥५५॥
मृगी म्हणे ते अवसरीं ॥ पूर्वी मंथन करितां क्षीरसागरीं ॥ चतुर्दश रत्ने काढिलीं सुरासुरीं ॥ महाप्रयत्नेंकरूनियां ॥५६॥
त्यांमाजी मी रंभा चतुर ॥ मज देखोनि भुलती सुरवर ॥ नाना तपें आचरोनि अपार ॥ तपस्वी पावती आम्हांतें ॥५७॥ म्यां नयनकटाक्षजाळें पसरून ॥ बांधिले निर्जरांचें मनमीन ॥ माझिया अंगसुवासा वेधून ॥ मुनिभ्रमर धांवती ॥५८॥ माझे गायन ऐकावया सुरंग ॥ सुधापानीं धांवती कुरंग ॥ मी भोगीं स्वर्गीचे दिव्य भोग ॥ स्वरूपें न मानी कोणासी ॥५९॥
मद अंगी चढला बहुत ॥ शिवभजन टाकिलें समस्त ॥ शिवरात्री सोमवार प्रदोषव्रत ॥ शिवार्चन सांडिलें म्यां ॥६०॥

सोडोनियां सुधापान ॥ करूं लागलें मद्यप्राशन ॥ हिरण्यनामा दैत्य दारूण ॥ सुर सोडोनि रतले त्यांसी ॥६१॥
ऐसा लोटला काळ अपार ॥ मृगयेसी गेला तो असुर ॥ त्या दुष्टासंगे अपर्णावर ॥ भजनपूजन विसरलें ॥६२॥
मनासी ऐसें वाटलें पूर्ण ॥ असुर गेला मृगयेलागून ॥ इतुक्यांत घ्यावें शिवदर्शन ॥ म्हणोनि गेलें कैलासा ॥६३॥
मज देखतां हिमनगजामात ॥ परम क्षोभोनि शाप देत ॥ तूं परम पापिणी यथार्थ ॥ मृगी होई मृत्युलोकीं ॥६४॥
तुझ्या सख्या दोघीजणी॥ त्या होतील तुजसवं हरिणी ॥ हिरण्य असुर माझिये भजनीं ॥ असावध सर्वदा ॥६५॥
तोही मृग होऊनि सत्य ॥ तुम्हांसींचि होईल रत ॥ ऐक व्याधा सावचित्त ॥ मग म्यां शिव प्रार्थिला ॥६६॥
हे पंचवदना विरूपाक्षा ॥ सच्चिदानंदा कर्माधक्षां॥ दक्षमखदळणा सर्वासाक्षा ॥ उ:शाप देईं आम्हांतें ॥६७॥
भोळा चक्रवर्ती दयाळ ॥ उःशाप वदला पयःफेनधवल ॥ द्वादश वर्षे भरतां तात्काळ ॥ पावाल माझिया पदातें ॥६८॥
मग आम्हीं मृगयोनी ॥ जन्मलों ये कर्मअवनीं ॥ तरी मी गर्भिणी आहें हरिणी ॥ प्रसूतकाळ समीप असे ॥६९॥
तरी मी आपुल्या स्वस्थळा जाऊन ॥ सत्वर येतें गर्भ ठेवून ॥ मग तूं सुखें घेई प्राण ॥ सत्य वचन हें माझें ॥७०॥

ऐसें मृगी बोलिली सावचित्त ॥ त्यावरी तो व्याध काय बोलत ॥ तूं गोड बोलसी यथार्थ ॥ परी विश्वास मज न वाटे ॥७१॥
नानापरी असत्य बोलोन ॥ करावें शरीराचें संरक्षण ॥ हें प्राणीमात्रासी आहे ज्ञान ॥ तरी तूं शपथ वदें आतां ॥७२॥
महत्पापें उच्चारून ॥ शपथ वदें यथार्थ पूर्ण ॥ यावरी ते हरिणी दीनवदन ॥ वाहत आण ऐका ते ॥७३॥
ब्राह्मणकुळीं उपजोन ॥ जो न करी वेदशास्त्राध्ययन ॥ सत्यशौचवर्जित संध्याहीन ॥ माझे शिरीं पातक तें ॥७४॥ एक वेदविक्रय करिती पूर्ण ॥ कृतघ्न परपीडक नावडे भजन ॥ एक दानासी करिती विघ्न ॥ गुरु निंदाश्रवण एक करिती ॥७५॥
रमावर-उमावरांची निंदा ॥ त्या पापाची मज होय आपदा ॥ दान दिधलें जें ब्रह्मवृंदा ॥ हिरोनी घेती माघारें ॥७६॥
एक यतिनिंदा करिती ॥ एक शास्त्रें पाहती द्वैत निर्मिती ॥ नाना भ्रष्टमार्ग आचरती ॥ स्वधर्म आपुला सांडोनियां ॥७७॥
देवायलामाजी जाऊनी ॥ हरिकथापुराणश्रवणीं ॥ जे बैसती विडा घेउनी ॥ ते कोडी होती पापिये ॥७८॥
जे देवळांत करिती स्त्रीसंभोग ॥ कीं स्त्रीभ्रतारांसी करिती वियोग ॥ ते नपुंसक होऊनि अभाग्य ॥ उपजती या जन्मीं ॥७९॥
वर्मकर्में निंदा करीत ॥ तो जगपुरीषभक्षक काग होत ॥ शिष्यांसी विद्या असोनि न सांगत ॥ तो पिंगळा होत निर्धारें ॥८०॥

अनुचित प्रतिग्रह ब्राह्मण घेती ॥ त्यानिमित्तें गंडमाळा होती ॥ परक्षेत्रींच्या गाई वळूनि आणिती ॥ ते अल्पायुषी होती या जन्मीं ॥८१॥
जो राजा करी प्रजापीडण ॥ तो या जन्मीं व्याघ्र कां सर्प होय दारूण ॥ वृथा करी साधुछळण ॥ निर्वंश पूर्ण होय त्याचा ॥८२॥
स्त्रिया व्रतनेम करीत ॥ भ्रतारासी अव्हेरीत ॥ धनधान्य असोनि वंचित ॥ त्या वाघुळा होती या जन्मीं ॥८३॥
पुरूष कुरूप म्हणोनियां त्यागिती ॥ त्या या जन्मीं बालविधवा होती ॥ तेथेंही जारकर्म करिती ॥ मग त्या होती वारांगना ॥८४॥
ज्या भ्रतारासी निर्भर्त्सिती ॥ त्या दासी किंवा कुलटा होती ॥ सेवक स्वामीचा द्रोह करिती ॥ ते जन्मा येती श्वानाच्या ॥८५॥
सेवकापासूनि सेवा घेऊन ॥ त्याचें न दे जो वेतन ॥ तो अत्यंत भिकारी होऊन ॥ दारोदारीं हिंडतसे ॥८६॥
स्त्रीपुरुष गुज बोलतां ॥ जो जाऊनि ऐके तत्वतां ॥ त्याची स्त्री दुरावे हिंडतां ॥ अन्न न मिळे तयातें ॥८७॥
जे जारणमारण करिती ॥ ते भूत प्रेत पिशाच होती ॥ यती उपवासें पीडिती ॥ त्यांतें दुष्काळ जन्मवरी ॥८८॥
स्त्री रजस्वला होऊनी ॥ गृहीं वावरें जे पापिणी ॥ पूर्वज रुधिरीं पडती पतनीं ॥ त्या गृही देव-पितृगण न येती ॥८९॥
जे देवाच्या दीपाचें तेल नेती ॥ ते या जन्मीं निपुत्रिक होती ॥ ज्या रांधितां अन्न चोरोनी भक्षिती ॥ त्या मार्जारी होती या जन्मीं ॥९०॥

ब्राह्मणांस कदान्न घालून ॥ आपण भक्षिती षड्रसपक्वान्न ॥ त्यांचे गर्भ पडती गळोन ॥ आपुलिया कर्मवशें ॥९१॥
जो मातापित्यांसी शिणवीत ॥ तो ये जन्मीं मर्कट होत ॥ सासु-श्वशुरा स्नुषा गांजित ॥ तरी बाळक न वांचे तियेचें ॥९२॥
मृगी म्हणे व्याधालागून ॥ जरी मी न यें परतोन ॥ तरी हीं महत्पापें संपूर्ण ॥ माझ्या माथां बैसोत ॥९३॥
हे मिथ्या गोष्ट होय साचार ॥ तरी घडो शिवपूजेचा अपहार ॥ ऐसी शपथ ऐकतां निर्धार ॥ व्याध शंकला मानसीं ॥९४॥
म्हणे पतिव्रते जाईं आतां ॥ सत्वर येई निशा सरतां ॥ हरिणी म्हणे शिवपदासी तत्वतां ॥ पुण्यवंता जाशील ॥९५॥
उदकपान करूनि वेगीं ॥ निजाश्रमा गेली ते कुरंगी ॥ इकडे व्याघ्र दक्षिणभार्गी ॥ टाकी बिल्वदळें खुडूनियां ॥९६॥ दोन प्रहर झाली यामिनी ॥ द्वितीय पूजा शिवें मानुनी ॥ अर्धपाप जळालें मुळींहुनी ॥ सप्तजन्मींचें तेधवां ॥९७॥
नामीं आवड जडली पूर्ण ॥ व्याध करी शिवस्मरण ॥ मृगीमुखें ऐकिलें निरूपण ॥ सहज जागरण घडलें तया ॥९८॥ तों दुसरी हरिणी अकस्मात ॥ पातली तेथें तृषाक्रांत ॥ व्याधें बाण ओढीतां त्वरित॥ करुणा भाकी हरिणी ते ॥९९॥ म्हणे व्याधा ऐक ये समयी ॥ मज कामानळें पीडीलें पाहीं ॥ पतीसी भोग देऊनि लवलाहीं॥ परतोनि येतें सत्वर ॥१००॥

व्याध आश्चर्य करी मनांत ॥ म्हणे शपथ बोलोनि जाईं त्वरित ॥ धन्य तुमचें जीवित्व ॥ सर्व शास्त्रार्थ ठाउका ॥१०१॥
वापी तडाग सरोवर ॥ जो पतित मोडी देवागार ॥ गुरुनिंदक मद्यपानी दुराचार ॥ तीं पापें समग्र मस्तकीं माझ्या ॥१०२॥
महाक्षत्रिय आपण म्हणवित ॥ समरांगणी मागें पळत ॥ वृत्ति हरी सीमा लोटित ॥ ग्रंथ निंदित महापुरूषांचे ॥१०३॥
वेदशास्त्रांची निंदा करी ॥ संत-भक्तांसी द्वेष धरी ॥ हरिहर चरित्रें अव्हेरी ॥ माझे शिरीं तीं पापें ॥१०४॥
धनधान्य असोनि पाहीं ॥ पतीलागीं शिणवी म्हणे नाहीं ॥ पति सांडोनि निजे परगृही ॥ तीं पापे माझिया माथां ॥१०५॥
पुत्र स्नुषा सन्मार्गें वर्तता ॥ त्यांसी व्यर्थची गांजिती नं पाहंतां ॥ ते कुरुप होती तत्वतां ॥ हिंडतां भिक्षा न मिळेचि ॥१०६॥
बंधुबंधु जे वैर करिती ॥ ते या जन्मीं मत्स्य होती ॥ गुरुचें उणें जे पाहती ॥ त्यांची संपत्ति दग्ध होय ॥१०७॥
जे मार्गस्थांचीं वस्त्रे हरिती ॥ ते अतिशूद्र प्रेतवस्त्रें पांघरती ॥ आम्ही तपस्वी म्हणोनियां अनाचार करिती ॥ ते घुले होती मोकाट ॥१०८॥
दासी स्वामीची सेवा न करी ॥ ती ये जन्मीं होय मगरी ॥ जो कन्याविक्रय करी ॥ हिंसक योनीं निपजे तो ॥१०९॥
स्त्री भ्रताराची सेवा करीत ॥ तीस जो व्यर्थचि गांजित ॥ त्याचा गृहभंग होत ॥ जन्मजन्मांतरी न सुटे ॥११०॥

ब्राह्मण करी रसविक्रय ॥ घेतां देतां मद्यपी होय ॥ जो ब्रह्मवृंदा अपमानिताहे ॥ तो होय ब्रह्मराक्षस ॥१११॥
एकें उपकार केला ॥ जो नष्ट नाठवी त्याला ॥ तो कृतघ्न जंत झाला ॥ पूर्वकर्में जाणिजे ॥११२॥
विप्र श्राध्दीं जेवुनी ॥ स्त्रीभोग करी ते दिनीं ॥ तो श्वानसूकरयोनीं ॥ उपजेल नि:संशये ॥११३॥
व्यवहारीं दहांत बैसोन ॥ खोटी साक्ष देई गर्जोन ॥ पूर्वज नरकीं पावती पतन ॥ असत्य साक्ष देतांचि ॥११४॥
दोघी स्त्रिया करून ॥ एकीचेंच राखी जो मन ॥ तो गोचिड होय जाण ॥ सारमेय शरीरीं ॥११५॥
पूर्वजन्मीं कोंडी उदक ॥ त्याचा मळमूत्रनिरोध देख ॥ करितां साधुनिंदा आवश्यक ॥ सत्वर दंत भग्न होती ॥११६॥
देवालयीं करी भोजन ॥ तरी ये जन्मी होय क्षीण ॥ पृथ्वीपतीची निंदा करितां जाण ॥ उदरीं मंदाग्नि होय पैं ॥११७॥
ग्रहणसमयीं करी भोजन ॥ त्यासी पित्तरोग होय दारुण ॥ परबाळें विकी परदेशीं नेऊन ॥ तरी सर्वांगीं कुष्ठ भरे ॥११८॥
जी स्त्री करी गर्भपातन ॥ तीउपजे वंध्या होऊन ॥ देवालय टाकी पाडोन ॥ तरी अंगभंग होय त्याचा ॥११९॥
अपराधाविण स्त्रीसी गांजिताहे ॥ त्याचें ये जन्मीं एक अंग जाये ॥ ब्राह्मणाचें अन्न हरिती पापिये ॥ त्यांचा वंश न वाढे कधीं ॥१२०॥

गुरु संत माता पिता ॥ त्यांसी होय जो निर्भर्त्सिता ॥ तरी वाचा जाय तत्वतां ॥ अडखळे बोलतां क्षणाक्षणां ॥१२१॥
जो ब्राह्मणांसी दंड मारी ॥ त्यासी व्याधितिडका लागती शरीरीं ॥ जो संतासीं वादविवाद करी ॥ दीर्घ दंत होती त्याचे ॥१२२॥
देवद्वारींचे तरुवर ॥ अश्वत्थादि वृक्ष साचार ॥ तोडितां पांगुळ होय निर्धार ॥ भिक्षा न मिळे हिंडतां ॥१२३॥
जो सूतक अन्न भक्षित ॥ त्याचे उदरीं नाना रोग होत ॥ आपणचि परिमळद्रव्य भोगी समस्त ॥ तरी दुर्गंधी सत्य सर्वांगी ॥१२४॥
ब्राह्मणाचें ऋण न देतां ॥ तरी बाळपणीं मृत्यु पावे पिता ॥ जलवृक्षछाया मोडितां ॥ तरी एकही स्थळ न मिळे त्यातें ॥१२५॥
ब्राह्मणासी आशा लावून ॥ चाळवी नेदी कदा दान ॥ तो ये जन्मीं अन्न अन्न ॥ करीत हिंडे घरोघरीं ॥१२६॥
जो पुत्रद्वेष करीत ॥ आणि दरिद्रियाचें लग्न मोडित ॥ तरी स्त्रीसी सल राहे पोटांत ॥ वंध्या निश्चित संसारीं ॥१२७॥
जेणें ब्राह्मण बांधिले निग्रहून ॥ त्यासी सांडसें तोडी सुर्यनंदन ॥ जो नायके कथाग्रंथ पावन ॥ बधिर होय जन्मोजन्मीं  ॥१२८॥
जो पीडी माता-पितयांस ॥ त्याचा सर्वदा होई कार्यनाश ॥ एकासी भजे निंदी सर्व देवांस ॥ तरी एकचि पुत्र होय त्यासी ॥१२९॥
जो चांडाळ गोवध करी ॥ त्यासी मिळे कर्कशा नारी ॥ वृषभ वधितां निर्धारीं ॥ शतमूर्ख पुत्र होय त्यासी ॥१३०॥

उदकतृणेंविण पशु मारीत ॥ तरी मुक्याचि प्रजा होती समस्त ॥ जो पतिव्रतेसी भोगूं इच्छित ॥ तरी कुरूप नारी कर्कशा मिळे ॥१३१॥
जो पारधी बहु जीव संहारी ॥ तो फेंफरा होय संसारी ॥ गुरूचा त्याग जो चांडाळ करी ॥ तो उपजतांचि मृत्यु पावे ॥१३२॥
नित्य अथवा रविवारीं मुते रवीसमोर ॥ त्याचे बाळपणीं दंत भग्न केश शुभ्र ॥ जे मृत बाळासाठीं रूदती निर्धार॥ त्यांस हांसता निपुत्रिक होय ॥१३३॥
हरिणी म्हणे व्याधालागून ॥ मी सत्वर येतें पतीसी भोग देऊन ॥ न यें तरी हीं पापें संपूर्ण ॥ माझ्या माथां बैसोत पैं ॥१३४॥
व्याध मनांत शंकोन ॥ म्हणे धन्य धन्य तुमचें ज्ञान ॥ सत्वर येईं गृहासी जाऊन ॥ सत्य संपूर्ण सांभाळीं ॥१३५॥
जलपान करूनि वेगीं ॥ आश्रम गेली ते कुरंगी ॥ तों मृगराज तेचि प्रसंगीं ॥ जलपानार्थ पातला ॥१३६॥
व्याधें ओढिला बाण ॥ तों मृग बोले दीनवदन ॥ म्हणे माझ्या स्त्रिया पतिव्रता सगुण ॥ त्यांसी पुसोन येतों मी ॥१३७॥
शपथ ऐकें त्वरित ॥ कीर्तन करिती प्रेमळ भक्त ॥ तो कथारंग मोडितां निर्वंश होत ॥ तें पाप सत्य मम माथां ॥१३८॥
ब्रह्मकर्म वेदोक्त ॥ शुद्र निजांग आचरत ॥ तो अधम नरकीं पडत ॥ परधर्म आचरतां ॥१३९॥
तीर्थयात्रेसी विघ्नें करी ॥ वाटपाडी वस्त्र द्रव्य हरी ॥ तरी सर्वांगी व्रण अघोरीं ॥ नरकीं पडे कल्पपर्यंत ॥१४०॥

शास्त्रकोशीं नाहीं प्रमाण ॥ कूटकविता करी क्षुद्र लक्षून ॥ हरिती ब्राह्मणांचा मान ॥ तरी संतान तयांचे न वाढे ॥१४१॥
हरिदिनीं शिवदिनीं उपोषण ॥ विधियुक्त न करी द्वादशी पूर्ण ॥ तरी हस्त-पाद क्षीण ॥ होती त्याचे निर्धारें ॥१४२॥
एक शिवहरीप्रतिमा फोडिती ॥ एक भगवद्भक्तां विघ्नें करिती ॥ एक शिवमहिमा उच्छेदिती ॥ नरकीं होती कीटक ते ॥१४३॥
मातृद्रोही त्यासी व्याधी भरे ॥ पितृद्रोही पिशाच विचरे ॥ गुरुद्रोही तत्काळ मरे ॥ भूतप्रेतगणीं विचरे तो ॥१४४॥
विप्र आहार बहुत जेविती ॥ त्यांसी जो हांसे दुर्मती ॥ त्याचे मुखीं अहोचक्ररोग निश्चितीं॥ न सोडिती जन्मवरी ॥१४५॥
एक गोविक्रय करिती ॥ एक कन्याविक्रय अर्जिती ॥ ते नर मार्जार मस्त होती ॥ बाळें भक्षिती आपुलीं ॥१४६॥
जो कन्या भगिनी अभिलाषी ॥ कामदृष्टीं न्याहाळी पतिव्रतेसी ॥ प्रमेहरोग होय त्यासी ॥ कीं खडा गुह्यांत दाटत ॥१४७॥
प्रासादभंग लिंगभंग करी ॥ देवांचीं उपकरणें अलंकार चोरी ॥ देवप्रतिष्ठा अव्हेरी ॥ पंडुरोग होय तेथें ॥१४८॥
एक मित्रद्रोह विश्वासघात करिती ॥ मातृ-पितृहत्या गुरूसी संकटीं पाडिती ॥ ब्रह्मवध गोवध न वारिती ॥ अंगी सामर्थ्य असोनियां ॥१४९॥
ब्राह्मण बैसवोनि बाहेरी ॥ उत्तमान्न जेवी गृहांतरी ॥ सोयऱ्यांची प्रार्थना करी ॥ संग्रहणी पोटशूळ होती तयां ॥१५०॥

एक कर्मभ्रष्ट पंचयज्ञ न करिती ॥ एक ब्राह्मणांची सदनें जाळिती ॥ एक दीनासी मार्गीं नागविती ॥ एक संतांचा करिती अपमान ॥१५१॥
एक करिती गुरुछळण ॥ एक म्हणती पाहों याचें लक्षण ॥ नाना दोष आरोपिती अज्ञान ॥ त्यांचे संतान न वाढे ॥१५२॥
जो सदा पितृद्वेष करी ॥ जो ब्रह्मवृंदासी अव्हेरी ॥ शिवकीर्तन ऐकतां त्रासे अंतरीं ॥ तरी पितृवीर्य नव्हे तो ॥१५३॥
शिवकीर्तनीं नव्हे सादर ॥ तरी कर्णमूळरोग निर्धार ॥ नसत्याच गोष्टी जल्पे अपार ॥ जो दर्दुर होय निर्धारें ॥१५४॥
शिवकीर्तन किंवा पुराणश्रवण ॥ तेथें शयन करितां सर्प होय दारुण ॥ एक अतिवादक छळक जाण ॥ ते पिशाचयोनी पावती ॥१५५॥
एका देवार्चनीं वीट येत ॥ ब्राह्मण पूजावया कंटाळत ॥ तीर्थप्रसाद अव्हेरीत ॥ त्यांच्या आंखुडती अंगशिरा ॥१५६॥
मृग म्हणे ऐसीं पापें अपार ॥ मम मस्तकीं होईल परम भार ॥ मग पारधी म्हणे सत्वर ॥ जाईं स्वस्थाना मृगवर्या ॥१५७॥
व्याध शिवनामें गर्जे ते क्षणीं ॥ कंठ सद्गदित अश्रु नयनीं ॥ मागुती बिल्वदळें खुडोनी ॥ शिवावरी टाकीतसे ॥१५८॥
चौंप्रहरांच्या पूजा चारी ॥ संपूर्ण झाल्या शिवजागरीं ॥ सप्तजन्मींचीं पापें निर्धारीं ॥ मुळींहून भस्म झालीं ॥१५९॥
तों पूर्वदिशा मुख प्रक्षाळित ॥ सुपर्णाग्रज उदय पावत ॥ आरक्तवर्ण शोभा दिसत ॥ तेंचि कुंकुम प्राचीचें ॥१६०॥

तों तिसरी मृगी आली अकस्मात ॥ व्याध देखिला कृतांतवत ॥ म्हणे मारूं नको मज यथार्थ ॥ बाळासी स्तन देऊनि येतें मी ॥१६१॥
व्याध अत्यंत हर्षभरित ॥ म्हणे ही काय बोलेल शास्त्रार्थ ॥ तो ऐकावया म्हणत ॥ शपथ करूनि जाय तूं ॥१६२॥
यावरी मृगी म्हणे व्याधा ऐक ॥ जो तृणदाहक ग्रामदाहक ॥ गोब्राह्मणांचें कोंडी उदक ॥ क्षयरोग त्यासी न सोडी ॥१६३॥
ब्राह्मणांची सदनें हरिती देख ॥ त्यांचे पूर्वज रौरवीं पडती नि:शंक ॥ मातृ-पुत्रां विघडती एक ॥ स्त्रीपुरुषां विघड पाडिती ॥१६४॥
देव-ब्राह्मण देखोन ॥ खालती न करिती कदा मान ॥ निंदिती बोलती कठोर वचन ॥ यम करचरण छेदी तयांचे ॥१६५॥
परवस्तु चोरावया देख ॥ अखंड लाविला असें रोंख ॥ साधुसन्मानें मानी दुःख ॥ त्यासी नेत्ररोगतिडका न सोडिती ॥१६६॥
पुस्तकचोर ते मुके होती ॥ रत्नचोरांचे नेत्र जाती ॥ अत्यंत गर्वी ते महिष होती ॥ पारधी निश्चित श्येनपक्षी ॥१६७॥
भक्तांची जो निंदा करीत ॥ त्याचे मुखीं दुर्गंधी घाणित ॥ जो मातापितयांसी ताडित ॥ लुला होत यालागीं ॥१६८॥
जो अत्यंत कृपण ॥ धन न वेंची अणुप्रमाण ॥ तो महाभुजंग होऊन ॥ धुसधुसीत बैसे तेथें ॥१६९॥
भिक्षेसी यतीश्वर आला ॥ तो जेणें रिता दवडिला ॥ शिव त्यावरी जाण कोपला ॥ संतती संपत्ती दग्ध होय ॥१७०॥

ब्राह्मण बैसला पात्रावरी ॥ उठवूनि घातला बाहेरी ॥ त्याहूनियां दुराचारी ॥ दुसरा कोणी नसेचि ॥१७१॥
ऐसा धर्माधर्म ऐकोन ॥ पारधी सद्गद बोले वचन ॥ स्वस्थळा जाईं जलपान करून ॥ बाळांसी स्तन देऊन येई ॥१७२॥
ऐसें ऐकोनि मृगी लवलाह्यां ॥ गेली जलप्राशन करूनियां ॥ बाळें स्तनी लावूनियां ॥ तृप्त केलीं तियेनें ॥१७३॥
वडील झाली प्रसूत ॥ दुसरी पतीची कामना पुरवीत ॥ मृगराज म्हणे आतां त्वरित ॥ जाऊं चला व्याधापासीं ॥१७४॥
मृगें पाडसांसहित सर्वही ॥ व्याधापासीं आलीं लवलाहीं ॥ मृग म्हणे ते समयीं ॥ आधीं मज वधीं पारधिया ॥१७५॥
मृगी म्हणे हा नव्हे विधी ॥ आम्हीं जाऊं पतीच्या आधी ॥ पाडसें म्हणती त्रिशुध्दी ॥ आम्हांसी वधीं पारधिया ॥१७६॥
त्यांचीं वचनें ऐकतां ते क्षणी ॥ व्याध सद्गद झाला मनीं ॥ अश्रुधारा लोटल्या नयनीं ॥ लागे चरणीं तयांच्या ॥१७७॥
म्हणे धन्य जिणें माझें झालें ॥ तुमचेनि मुखें निरूपण ऐकिलें ॥ बहुतां जन्मींचें पाप जळालें ॥ पावन केलें शरीर ॥१७८॥
माता पिता गुरु देव ॥ तुम्हीच आतां माझे सर्व ॥ कैंचा संसार मिथ्या वाव ॥ पुत्र-कलत्र सर्व लटकें ॥१७९॥
व्याध बोले प्रेमेंकरून ॥ आतां कधीं मी शिवपद पावेन ॥ तों अकस्मात आलें विमान ॥ शिवगण बैसले त्यावरी ॥१८०॥

पंचवदन दशभुज ॥ व्याघ्रांबर नेसले महाराज ॥ अद्भुत तयांचें तेज ॥ दिक्चक्रामाजी न समाये ॥१८१॥
दिव्य वाद्यें वाजविती किन्नर ॥ आलाप करिती विद्याधर ॥ दिव्य सुमनांचे संभार ॥ सुरगण स्वयें वर्षती ॥१८२॥
मृगें पावलीं दिव्य शरीर ॥ व्याध करी साष्टांग नमस्कार ॥ मुखें म्हणे जय जय शिव हर हर ॥ तों शरीरभाव पालटला ॥१८३॥
परिसीं झगडतां लोह होय सुवर्ण ॥ तैस व्याध झाला दशभुज पंचवदन ॥ शिवगणीं बहुत प्रार्थून ॥ दिव्य विमानीं बैसविला ॥१८४॥
मृगें पावलीं दिव्य शरीर ॥ तींही विमानी आरूढलीं समग्र ॥ व्याधाची स्तुति वारंवार ॥ करिती सुरगण सर्वही॥१८५॥
व्याध नेला शिवपदाप्रती ॥ तारामंडळीं मृगें राहती ॥ अद्यापि गगनीं झळकती ॥ जन पाहाती सर्व डोळां ॥१८६॥
सत्यवतीहृदयरत्नखाणी ॥ रसभरित बोलिला लिंगपुराणीं ॥ तें सज्जन ऐकोत दिनरजनीं ॥ ब्रह्मानंदेंकरूनियां ॥१८७॥
धन्य तें शिवरात्रिव्रत ॥ श्रवणें पातक दग्ध होत ॥ जे हें पठण करिती सावचित्त ॥ धन्य पुण्यवंत नर तेचि ॥१८८॥
सज्जन श्रोते निर्जर सत्य ॥ प्राशन करोत शिवलीलामृत ॥ निंदक असुर कुतर्कि बहुत ॥ त्यांस प्राप्त कैंचें हें ॥१८९॥
कैलासनाथ ब्रह्मानंद ॥ तयांचे पदकल्हार सुगंध ॥ तेथें श्रीधर अभंग षट्पद ॥ रुंजी घालीत शिवनामें ॥१९०॥ शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड ॥ स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड ॥ परिसोत सज्जन अखंड ॥ द्वितीयाध्याय गोड हा ॥१९१॥

॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥