Showing posts with label Marathi Kavita. Show all posts
Showing posts with label Marathi Kavita. Show all posts

Wednesday, October 15, 2014

'माझे विद्यापीठ' विषयी...

पद्मश्री कवी श्री. नारायण सुर्वे यांची आज जयंती. १५ ऑक्टोबर १९२६ हा त्यांचा जन्मदिवस. सुर्वे देवाधीन झाले तेव्हा महाराष्ट्र टाईम्स मध्ये छापून आलेला हा लेख.

'ना घर होते, ना गणगोत, चालेन तेवढी पायाखालची जमीन होती...' अशा ओळींनी प्रारंभ होणारी नारायण सुर्वे यांची 'माझे विद्यापीठ' ही कविता म्हणजे जणू कवीचे आत्मचरित्रच. विलक्षण गाजलेली ही कविता कशी रचली गेली... तिला कशी प्रसिद्धी मिळाली, हे खुद्द सुर्वे यांच्याच शब्दांत...….
---- ---- // o // ---- ----


काही काही कविता विलक्षण रसायन जमून यावे, तशा चपखलपणे स्वत: व्यक्तित्त्व घेऊनच व्यक्त होतात. आशय शब्दांचे बोट धरून चालतो, की शब्दच आशयाला खांद्यावर उचलून मिरवत नेतात, हे कळेनासे होते. इतका एकवटलेपणा, एकजिनसी अनुभवांचा विलक्षण पट तयार होतो. मालिका तयार होते. अशा रचनेतील एकही शब्द इथे तिथे सरकला, किंवा जरा धक्का त्याला लागला की, सारेच कोलमडून पडले असे वाटत राहते. नवा विलक्षण पोत आपणासमोर रचनेच्या रूपात उभा राहतो. 'माझे विद्यापीठ' ही कविता म्हणजे ७२ ओळींची दीर्घ रचना आहे. एकूण चार बंधांत ती बांधली गेली आहे व अठरा ओळींचा एकेक बंध व त्यातील ताणेबाणे दुसऱ्या बंधाशी जोडीत ती निखळपणे विणत जाते. कवी जर स्वनिमिर्तीशी प्रामाणिक असेल व कवितेला कवितेच्या, म्हणजेच तिला तिचे स्वातंत्र्य देऊन निखळ रूपात बोलू देणार असेल, तर ती अधिक मोकळी होते, अधिक सच्ची होते. काळाच्याही पलिकडे पाहण्याची, उड्डाण करण्याची क्षमता तिच्यात येते, असा माझा अनुभव आहे. कविता लिहिणे ही एक जोखीमच आहे, असे मी मानतो. ती एक गंभीर गोष्ट आहे. नवसृजन आहे. तिच्यावर कसलेही सावट न येईल याची काळजी घ्यावी लागते. याचा अर्थ या सर्व प्रक्रियेपासून कवी अलिप्त राहू शकतो का? त्याचे उत्तर होय आणि नाही असेच द्यावे लागेल. कारण निमिर्तीत देखील रचनात्मक आंतरद्वंद्व असते. तो रचनात्मक संघर्षच असतो. सडेपणा आणि कलात्मकता याचे भान ठेवावेच लागते. दीर्घ रचनेत हा तोल सांभाळावाच लागतो. तसे पाहिले तर 'माझे विद्यापीठ' कवितेने मला फार दमवले आहे. उणेपुरे एक वर्ष मी ही कविता लिहित होतो. कुणाला हा मूर्खपणाही वाटेल. तो माझ्या निमिर्तीबाबत वारंवार घडतो खरा! परंतु मला त्यात समाधान वाटते. एखादी कविता उत्तमपणे माझ्याकडून लिहिली गेली, की त्या पलिकडे कोणताही सवोर्च्च आनंद मी मानत नाही.

'माझे विद्यापीठ' या कवितेचा शेवटचा अठरा ओळींचा बंध माझ्याकडून आधी रचला गेला. 'निळ्या छताखाली नांगरून ठेवल्या होत्या साहेबांच्या बोटी' या अठरा ओळींच्या शेवटच्या ओळीतले शब्द 'कधी दोन घेत, कधी दोन देत' होते. खरे तर ही कविता इथेच संपत होती. मग तिची सुरुवात कुठे? मी चक्रावून गेलो. वर्षभर या कवितेभोवती मी घुमत राहिलो. पुन्हा पुन्हा वरील ओळींचे अर्थ व संदर्भ शोधत मी एकदाचा 'ना घर होते, ना गणगोत' या पहिल्या कडव्यातील पहिल्या ओळीच्या रचनेने सावरलो आणि कविता मनासारखी पूर्ण करून मोकळा झालो. त्यानंतर सहा महिने मी एकही ओळ लिहिली नाही इतका कातावून गेलो. असो.

ही कविता एकदाची लिहून झाली खरी; परंतु ती प्रकाशित कोण करणार, हा प्रश्न माझ्यासमोर होताच. आधीच काव्याविषयी उदासीनता. त्यात मी पडलो नवखा कवी व कोणत्याही मासिकाची ओळखपाळख नसलेला. बहुतेक नियतकालिके जाहिराती आधी छापतील व कविता नंतर. विचार केला तर त्यांचेही असे करणे चूक नाही व कविता प्रकाशित करणे आवश्यक आहे का, हा आग्रहही चूक नाही. कविता काही उत्पादक गोष्ट नाही आणि जाहिरातीवर तर नियतकालिके उभी राहतात, चालतात, हा अनुभव सार्वत्रिकच आहे. शिवाय ही कविता नीट प्रकाशित करायची म्हटले, तर मासिकाची दोन पाने तरी लागणारच. मोठा पेच होता.

दुसऱ्याच दिवशी मी प्रा. केशव मेश्राम यांना भेटलो. मी जेव्हा जेरबाई वाडिया, परळ येथील बोगदा चाळीत राहात असे, खरे तर या चाळीला अंधार चाळ म्हणणेच योग्य होईल, प्रा. मेश्राम तेव्हा म्हात्रे पेन्सच्या शेजारील बैठ्या चाळीत राहत. पस्तिसेक वर्षांपूवीर्ची ही घटना आहे. सेनापती बापट मार्गावरील झोपडपट्ट्या, त्यालगतचे भलेमोठे गटार व वस्त्यांवरचे मिणमिणते दिवे. प्रा. मेश्रामांना 'माझे विद्यापीठ' ही कविता रात्री याच मार्गावरील एका पालिकेच्या दिव्याखाली बसवून ऐकवली होती. त्या सोबतच 'सत्य' नावाची माझी दुसरीही एक कविता मी ऐकवली होती. त्यांना दोन्ही कविता आवडल्या. म्हणाले, 'मला या दोन्ही कविता आत्ताच द्या. माझ्या कॉलेजमध्ये (एम. डी. कॉलेज, परळ) 'सत्यकथे'चे संपादक प्रा. राम पटवर्धन अर्धवेळ प्राध्यापक म्हणून शिकवायला येतात. त्यांना मीच स्वत: त्या वाचून दाखवतो.'

'अहो, मेश्राम, मला 'सत्यकथे'त कोणीही ओळखत नाही.' मी म्हणालो.

'चालेल, तुमची ओळख मी करून देईन.' प्रा. मेश्राम म्हणाले.

आणि बरोबर चार-पाच दिवसांनंतर मला प्रा. मेश्राम यांच्याकरवी प्रा. राम पटवर्धनांचा 'सत्यकथा' कचेरीत भेटायला या असा निरोप आला. मी सत्यकथा कचेरीत पोहोचलो.

'या. या.' राम पटवर्धन म्हणाले, 'बसा, तुमच्या दोन्ही कविता आम्ही स्वीकारल्या आहेत. 'माझे विद्यापीठ' ही सत्यकथेच्या दिवाळी अंकासाठी व 'सत्य' ही कविता 'मौज'च्या दिवाळी अंकासाठी घेतली आहे. पण तुम्हाला एक विचारू का सुवेर्?'

'बोला.' मी म्हणालो.

'तुमचा पहिला काव्यसंग्रह निघाला आहेच. त्याला पुरस्कारही मिळालेला आहे. म्हणजे तुम्ही बरीच वषेर् लेखन करीत आहात; तुम्हाला 'सत्यकथे'कडे लेखन पाठवावे असे का वाटले नाही. मला जरा याविषयी कुतूहल आहे म्हणून विचारतो.' इतके बोलून ते थांबले.

'खरे सांगू, रामभाऊ!' मी म्हणालो, 'तुमच्या 'सत्यकथा' अथवा 'मौज'मध्ये जे लिखाण येते, त्या लेखकांविषयी मला आदर आहेच; परंतु त्यांच्यासारखे मला लिहिता येणार नाही. कारण त्यांचा बाज व लिहिणे निराळे, माझे निराळे.'

'द्या टाळी!' म्हणत रामभाऊ पटवर्धनांनी हात पुढे केला.

'परंतु एक करा. तुम्हाला असे का वाटते याच्याविषयी तुम्ही एक टिपण अथवा लेखच पाठवा. आम्ही तो छापू. तुमची टीकाटिप्पणी आम्हाला हवी आहे.'

मी त्यावर स्वत:चे मत मांडायचे कबूल केले; परंतु अद्याप काही लिहू शकलो नाही. त्यांनीही मला अनेकदा भेट होऊनही पुन्हा कधी हटकले नाही. तेही विसरले, मीदेखील विसरलो.

पुढे 'सत्यकथे'चे प्रकाशनच बंद झाले. माझे लिहिणे आणि त्यांचे छापणे थांबले ते आजतागायत तसेच राहिले.

या 'माझे विद्यापीठ' कवितेविषयी अशा कितीतरी हकीकती आहेत; परंतु एक गोष्ट मला नमूद करावीशी वाटते ती अशी :

याच 'मौज प्रकाशन गृहा'तच माझी प्रा. श्री. पु. भागवत यांची गाठ पडली. पुढे अधूनमधून केव्हा तरी फुटकळपणे भेटत राहिलो, बोलत राहिलो. एकदा मला त्यांनी थांबवले. 'तुम्हाला एक विचारू. या कवितेतील ती अंतर्गत लय आहे, तिचा संथसा खळबळ ध्वनी मला ऐकायला येतो, तो तुम्ही कसा साधलात. तेवढे सांगाल?' श्री. पु. म्हणाले.

मी काय सांगणार डोंबल!

मी म्हणालो, मला यातले काही माहीत नाही. मी लिहिले आणि तुम्ही छापले. एवढेच. पुढे १९६६ मध्ये 'माझे विद्यापीठ' या शीर्षकाने माझा नवा कवितासंग्रह प्रकाशित झाला. मी भागवतांना एक प्रत भेट म्हणून पाठवली. दोन-चार महिन्यांतच त्यांचे मला पत्र आले ते असे :

प्रिय सुर्वे
संग्रह अगत्यपूर्वक पाठवल्याबद्दल आभार; परंतु मला एक नवल वाटते ते तुम्ही आमच्या 'मौज प्रकाशन गृहा'च्या यादीतून कसे काय निसटलात याचे. ते असो. आता एक करा, जेव्हा या संग्रहाची नवी आवृत्ती प्रकाशित कराल तेव्हा या संग्रहाची मुदणप्रत मी तपासून देईन. तेवढे लक्षात ठेवा.

('डिंपल पब्लिकेशन'च्या 'कहाणी कवितेची' या नारायण सुर्वे यांच्या पुस्तकातून साभार.) 


---- ---- // o // ---- ----

साभार : महाराष्ट्र टाईम्स Aug 17, 2010

Thursday, May 1, 2014

Marathi Language

मराठी आणि मराठी अभिमान गीत


मराठी - महाराष्ट्राची राज्यभाषा जगातल्या नऊ कोटि लोकांची मातृभाषा. संस्कृतातुन प्राकृत अणि प्राकृतातुन मरहट्ट्यांची मरहाट्टी म्हणजेच आजची मराठी जन्माला आली.
इंग्रजीला वाघिणीचे दूध संबोधल्यावर तर अत्र्यांनी मराठीला आईचे दूध म्हटले ते साहजिकच श्रेष्ठ ठरविले आणि ते आहेच. अत्रे म्हणाले होते, "ज्याला मराठीत बोलायची, आपल्या मातृभाषेत बोलायची लाज वाटते, त्याला आपल्या आईच्या दुधाची देखिल लाज वाटत असली पाहिजे."

बाराव्या शतकात संत ज्ञानेश्वर म्हणाले होते..

माज्या मराठीची बोलू कौतुके।

परी अमृतातेही पैजा जिंके।

ऐसी अक्षरे रसिके मेळविन॥



फादर स्टीफन्स या परदेशी धर्मोपदेशकाने थोडक्या काळात मराठी भाषेत नैपुण्य मिळविले सहजसुंदर, ओवीबद्ध अशी काव्यरचना केली। तो केवळ मराठी अभ्यासकच नव्हता तर मराठीवर त्याचे प्रेमही होते हे त्याच्या खालील ओव्यांतिल मराठी भाषेच्या प्रशंसेवारून कळून येईल॥
जैसी हरळांमाजी रत्नकिळा
कि रत्नांमाजी हिरा निळा
तैसी भासांमाजी चोखळा
भासा मराठी
जैसी पुस्पांमाजी पुस्पमोगरी
की परिमळांमाजी कस्तुरी
तैसी भासांमाजी साजिरी मराठीया
पखियांमधे मयोरू
वृखियांमध्ये कल्पतरु
भासांमध्ये मानु थौरु
मराठीयेसी


मराठीवरिल सुरेश भटांची ही एक प्रसिद्ध कविता :-

लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी


आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या उराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी
आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी

येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी


येथल्या वनावनांत गूंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी
येथल्या नभांमधुन वर्षते मराठी
येथल्या पिकांमधुन डोलते मराठी
येथल्या नद्यांमधुन वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरीच हाल सोसते मराठी
हे असे कित्तिक खेल पाहते मराठी
शेवटी मदांध तख़्त फोडते मराठी।.. 


सुरेश भटांची ही रचना - मराठी अभिमान गीत - आजचे आघाडीचे संगीतकार कौशल इनामदार यांनी संगीतबद्ध केली आहे  अनेक नामवंत मराठी गायक गायिकांच्या आवाजात …. 


 

Friday, April 18, 2014

जीवनाविषयीच्या ओल्या उमाळ्याची कविता - इंदिरा संत

इंदिरा संत यांच्या समग्र कवितेचा वेध घेणारा संग्रह पॉप्युलर प्रकाशनातर्फे प्रकाशित होत आहे. कवयित्री अरुणा ढेरे यांनी तो संपादित केला आहे. या संग्रहास ढेरे यांनी लिहिलेल्या विचक्षण प्रस्तावनेतील संपादित अंश..…. 

इंदिरा संत हे नाव मराठी कवितेच्या क्षेत्रात प्रथम आले ते सत्तर-बहात्तर वर्षांपूर्वी. १९४० साली 'सहवास' हा त्यांचा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला. मात्र, हा त्यांचा स्वतंत्र संग्रह नव्हता. कवी ना. मा. संत आणि कवयित्री इंदिरा संत या पती-पत्नींचा मिळून तो सिद्ध झाला होता. १९३५ साली ते दोघे विवाहबद्ध झाले आणि मधल्या पाच वर्षांच्या परस्परसहवासाच्या सगळ्या आनंदखुणा वागवीत 'सहवास' आला.

मात्र, इंदिराबाईंची निजखूण उमटली ती 'सहवास'मध्ये नव्हे. ती उमटली 'शेला' या त्यांच्या पहिल्या स्वतंत्र काव्यसंग्रहात. १९५१ साली 'शेला' प्रसिद्ध झाला आणि इंदिरा या नावाची वीजरेघ जाणत्या रसिकांच्या मनात लखलखून उमटली. तिची तीक्ष्ण चमक मर्मज्ञ समीक्षकांनाही दृष्टिआड करता आली नाही.
'शेला'नंतर त्यांचे आणखी आठ संग्रह आले. 'मेंदी' हा दुसरा संग्रह 'शेला'पाठोपाठ चारच वर्षांनी १९५५ मध्ये प्रसिद्ध झाला आणि 'मृगजळ' तर अवघ्या दोनच वर्षांच्या अंतराने १९५७ मध्ये प्रसिद्ध झाला. पुढच्या संग्रहांची प्रकाशनाची गती थोडी संथ झाली. रंगबावरी (१९६४), बाहुल्या (१९७२), गर्भरेशीम (१९८२), चित्कळा (१९८९), वंशकुसुम (१९९४) आणि निराकार (२०००) असे संग्रह सहा-सात वर्षांच्या अंतराने पुढे प्रसिद्ध होत राहिले.

वयाच्या सोळाव्या-सतराव्या वर्षी म्हणजे १९३०-३१ साली इंदिराबाईंच्या कवितालेखनाची सुरुवात झाली. तेव्हापासून 'शेला' हा त्यांचा पहिला स्वतंत्र काव्यसंग्रह प्रसिद्ध होईर्पयचा काळ हा मराठी कवितेतले जुने नामवंत अस्तंगत होण्याचा आणि नवे कवी उदयाला येण्याचा मोठा गजबजता काळ होता. ज्येष्ठ कवी एकापाठोपाठ एक दृष्टिआड होत होते आणि याच दोन दशकांत आधुनिक मराठी कवितेचे सामथ्र्य आणि सौंदर्य प्रकट करणारी विविधगुणी कविता घेऊन अनेक नवे प्रतिभावंत कवीही पुढे आले. 'प्रतिभा', 'जीवनसंगीत' आणि 'दूधसागर' हे बा. भ. बोरकरांचे तीन संग्रह या काळात प्रसिद्ध झाले. पु. शि. रेगे ('फुलोरा' आणि 'दोला'), संजीवनी ('संजीवनी') आणि बा. सी. मर्ढेकर ('शिशिरागम') या कवींचे पहिलेवहिले संग्रह याच काळात प्रसिद्ध झाले. नव्या कवितेची सृजनशील गजबज हे या काळाचे वैशिष्टय़च म्हटले पाहिजे.

इंदिराबाईंच्या कवितेतले नवेपण 'शेला'मध्ये जे प्रथम प्रकटले त्याचे स्वरूप समजून घेण्याआधी या गजबजत्या सर्जक काळाच्या पाश्र्वभूमीवर 'सहवास'चा विचार करणे अगत्याचे आहे. कारण इंदिराबाईंच्या विशिष्ट गुणभारित कवितेच्या प्रातिभ क्षमतांची अर्धस्फुट, पण निश्चित चाहूल 'सहवास'मध्ये लागते आहे. 'सहवास' हा रविकिरण मंडळाच्या छायेतला संग्रह आहे असे सर्वसाधारणपणे मानले जाते. यशवंत आणि माधव जूलियन हे इंदिराबाईंचे आवडते कवी होते. आणि 'सहवास'ला प्रस्तावना आहे तीही यशवंतांचीच आहे.

संत पती-पत्नी त्यांच्या पहिल्यावहिल्या संयुक्त संग्रहाच्या अभिप्रायासाठी रविकिरण मंडळाकडे वळलेले दिसतात. रविकिरण मंडळाच्या छायेतला संग्रह याच भावनेने यशवंतांनी त्याचे स्वागत केले आहे. फर्गसन महाविद्यालयातले विद्यार्थीजीवन, महाविद्यालयामागच्या टेकडीवरचे विहार, तिथल्या कवि-कातळावर रंगलेल्या गप्पा, फुलत जाणारे प्रेम आणि घरच्या विरोधातून झालेला विवाह ही संत दाम्पत्याची पाश्र्वभूमी रविकिरण मंडळाच्या इतिहासातल्या नोंदी पुढे नेणारी होती. विशेषत: श्री. बा. रानडे आणि मनोरमाबाई या दोघांची आठवण यशवंतांना 'सहवास'चे स्वागत करताना येणे स्वाभाविक होते. ते दोघेही कविवृत्तीचे होते आणि प्रेमविवाहानंतर दोघांनीही 'श्री-मनोरमा' या नावाने एकत्रित कवितासंग्रह प्रसिद्ध केला होता. यशवंतांनी साहजिकच या दोघांची आठवण केली आहे आणि इंदिराबाईंची कविता मनोरमाबाईंइतकीच गोड असल्याचा अभिप्राय दिला आहे. इंदिराबाईंच्या किंवा मनोरमाबाई, पद्मा, संजीवनी, शान्ताबाई यांच्या प्रारंभकाळातल्या कवितांमधल्या गोडव्याचा पोत सर्वसाधारणपणे सारखा वाटतो. या कवयित्रींच्या कवितेतला गोडवा त्यांनी व्यक्त केलेल्या आधुनिक जीवनदृष्टीचा आणि काव्यदृष्टीचा आहे. रविकिरण मंडळामध्ये त्यांची कडी काहीशी अडकते ती आधुनिकतेच्या जाणिवेमुळे.

विसाव्या शतकाचा प्रारंभकाळ हा शिकू लागलेल्या स्त्रियांच्या जीवनात चहूबाजूंनी मोकळेपणाचे वारे शिरण्याचा काळ होता. या वाऱ्याने काही लिहित्या स्त्रियांच्या जाणिवांचे पदर उलगडले. स्वतच्या प्रतिमेकडे, कुटुंबाकडे, नातेसंबंधांकडे पारंपरिकापेक्षा स्वतंत्र दृष्टीने पाहण्याचे भान त्यांना आले. त्यामुळे नव्या वळणाची आणि नवा आशय असणारी कविता त्यांच्याकडून लिहिली गेली. हा निराळेपणा आधुनिकतेचा परिणाम म्हणून आलेला होता आणि त्याचे नाते त्या कवयित्रींच्या जीवनानुभवाशी होते. रविकिरण मंडळाशी त्यांचे पुसटसे नाते होते ते अभिव्यक्तीच्या पद्धतीमुळे. 
'सहवास'मध्ये ना. मा. संतांच्या पंचवीस कविता आहेत आणि इंदिराबाईंच्या सदतीस! या कविता बहुतांश प्रीतीच्या कविता आहेत. इंदिराबाईंनी पूर्ववयात जे अनुभवले, पाहिले-साहिले, ते मनातळाशी तसेच आहे. वडिलांच्या वियोगाचे दुख आहे. तापट काकांनी दिलेल्या मनस्तापाचा क्षोभ आहे. वेळोवेळी कुस्करल्या गेलेल्या मनोभावांचे, अपेक्षाभंगांचे, नकारांचे, अन्याय-अपमानांचे सल आहेत. पण प्रियकराच्या सहवासाने त्यावर फुंकर घातली गेली आहे. वय तरुण आहे आणि प्रेम करण्याची शिक्षा म्हणून काकांनी हातावर तप्तमुद्रा उमटवली तरी मनाजोगती साथसोबत मिळाली आहे आणि मनाचा भार तिथे हलका करता येतो आहे.

कोठे खोल तळात पूर्वस्मृतिचे ज्वालामुखी जागृत
त्यांची साहुनि आच नित्य मन हे आतूनिया पोळले

अशी कबुली देतानाच आतले ते कढत रसायन वर आणणे प्रियकरालाही साहवणार नाही म्हणून तो ज्वालामुखी तसाच निद्रिस्त ठेवण्याची त्यांची धडपड आहे. 'कधी कुठे न भेटणार, कधि न काही बोलणार' या व्रताचा उच्चार पुढच्या संग्रहात झाला असला तरी व्रताची सुरुवात मात्र 'सहवास'मध्येच झाली आहे.
मनोरमाबाई, संजीवनीबाई वा पद्माताईंच्या कवितेत दिसतात तसे 'सहवास'मधल्या कवितेत प्रीतिभावनेचे अगदी नाजूक खेळ दिसतात; पण त्या खेळात गुंतलेले अतिसूक्ष्म, अतिखोल आणि अतितरल असे मनोभाव मात्र एकटय़ा इंदिराबाईंच्याच कवितेत अगदी प्रारंभीच्या त्या कवितेतसुद्धा प्रकट होतात.
मातीखालून हरळीची मुळे पुढे सरसरत जावीत तशा या कविता 'शेला'पाशी पोचतात असे वाटते. म्हणूनच की काय, 'शेला'मध्ये काही मोजक्या कविता 'सहवास'मधून निवडून घेतलेल्याच आहेत. 'सहवास'मध्ये आलेल्या कवितांचा लेखनकाळ म्हणजे इंदिराबाईंच्या ऐन तरुणपणाची दहा वष्रे. त्यांच्या वयाच्या पंधराव्या-सोळाव्या वर्षांपासून पंचविसाव्या वर्षांपर्यंतच्या कविता या संग्रहात आहेत. तरी आश्चर्य असे वाटते की, त्यांच्या पूर्ववाचनाची सावली या संग्रहातल्या आशयावर तर कुठे नाहीच, पण अभिव्यक्तीवरही फारशी दाट नाही. 

त्यांचे वडील गेले ते त्यांच्या वयाच्या सातव्या वर्षी. पण वडील असतानाच धार्मिक पुस्तके त्यांच्या ओळखीची झाली होती. रोज रात्री आईबरोबर बसून वडिलांनी वाचलेली आख्याने ऐकण्याची सवय झाली होती. ऐकून ऐकून काही आर्या, काही श्लोक पाठही झाले होते. रोज संध्याकाळी वडील वेगवेगळी स्तोत्रे म्हणायला लावत. सकाळी आई भूपाळ्या म्हणवून घेई. कवितेशी त्यांची ओळख अशी पारंपरिक रचनांमधून झाली. आर्या वृत्त आवडीचे झाले आणि प्राथमिक स्वरूपात कवितेचा- म्हणजे कविता रचण्याचा नादही लागला. शाळेत भेंडय़ा लावताना वृत्त-छंदांमधून कविता रचण्याइतकी कवितेशी सलगी वाढली आणि 'फुलांची परडी' या नावाने स्वरचित कवितेची वहीदेखील झाली.
वडील गेले आणि सुखकारक होते ते सारेच चित्र बदलले. उग्र आणि तापट अशा काकांच्या धाकात वाढत असताना त्यांच्या विरोधामुळे कवितेची वही लपवूनच ठेवावी लागली. पण तिच्यात गुंतलेला जीव काही तिच्यावेगळा झाला नाही. पुढे कविता थोडी जाणती झाली ती फर्गसन महाविद्यालयात शिकत असताना. इथेच तिचा रसिकांशी आणि कवी-समीक्षकांशी संबंध आला. 'ज्योत्स्ना', 'संजीवनी'सारख्या संकलन-नियतकालिकांतून कविता प्रसिद्ध झाल्या. ना. मा. संत भेटले आणि कवितांनी परस्परप्रेमाचे रंग आणखी गडद केले.
इंदिराबाईंनी लिहून ठेवलेली या काळातली एक आठवण त्यांच्या स्वतंत्र कविताकुळीची ओळख देणारी आहे. कोल्हापूरला असताना माधव जूलियनांशी त्यांचा परिचय झाला. माधवरावांनी आपण होऊनच तो करून घेतला आणि त्यांची कवितांची वही मोठय़ा आग्रहाने वाचायला नेली. त्या काळात बाईंचेच शब्द वापरायचे तर त्या 'मोठय़ा भावावर्तात' सापडल्या होत्या. प्रेम केले होते आणि प्रेमाला घरचा अर्थात् काकांचा तीव्र विरोध होता. फर्गसन महाविद्यालय सोडून कोल्हापुरात राजाराम कॉलेजमध्ये येणे भाग पडले होते. अशा काळात संतांची प्रेमभेट असलेली काळ्या रेशमाचे कव्हर असलेली ती सुंदर वही माधवरावांनी वाचायला नेली आणि दुसऱ्याच दिवशी ती परत केली तेव्हा तिच्यात तांबडय़ा पेन्सिलीने सर्वत्र चुका दाखवणाऱ्या खुणा होत्या आणि शेवटी शुद्धलेखन सुधारण्याची सूचना होती. 'आधी जे म्हणायचे ते गद्यात लिहून काढा आणि मग ते कवितेत आणा. ज्ञानेश्वरी वाचा. लावण्या वाचा. शब्दाला स्वतचे व्यक्तिमत्त्व असते हे ध्यानात ठेवा,' असा तोंडी उपदेशही त्यांनी केला. इंदिराबाईंनी लिहिले आहे, 'त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी सर्व वाचले; शब्दांच्या दृष्टीने वाचले. पण त्याचा काही फारसा परिणाम झालेला मला दिसून येत नाही. कोणता का शब्द असेना, त्यात जे तेज कवी निर्माण करतो, त्याने त्या शब्दाला व्यक्तिमत्त्व येते असे माझे त्यावेळी मत झाले.'
इंदिराबाई अशा तऱ्हेने माधव जूलियनांच्या प्रत्यक्ष संपर्कात आल्या, किंवा यशवंतांच्या कविता आवडीने वाचत गेल्या, किंवा 'वाग्जयंती'सारखे संग्रह पुनपुन्हा चाळत राहिल्या तरी पूर्वकवींच्या किंवा रविकिरण मंडळाच्या प्रभावळीत त्या जाऊन बसल्या नाहीत. याचे कारण अगदी प्रथमपासूनची त्यांच्या कविवृत्तीची पृथगात्मता आणि त्या पृथगात्मतेची त्यांना असणारी स्पष्ट जाणीव. या पृथगात्मतेची वैशिष्टय़पूर्ण घडण बऱ्याच अंशी त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून म्हणजे त्यांच्या िपडधर्मातून झाली आहे आणि काही अंशी त्यांच्या बालपणीच्या परिसरातून झाली आहे.
तवंदी हे कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमेवरचे गाव. इंदिराबाईंचे बालपण तिथे गेले. साठ-सत्तर वर्षांपूर्वी खेडय़ातल्या माणसांचे ऐकणे, वाचणे आणि सगळ्याच कला त्यांच्या दैनंदिन व्यवहारात मिसळून गेलेल्या असायच्या. त्या कलांची जीवनाशी असलेली निकटता आणि त्यांचा उत्स्फूर्त आणि सहज असा आविष्कार यांचा ठसा इंदिराबाईंवर फार गाढपणे उमटला. निसर्गातल्या रंग-गंधांनी जीव माखला गेला. आकारांनी दृष्टीवर गारुड केले आणि आविष्काराची अनलंकृत, स्वाभाविक, तरीही प्रतिभासंपन्न अशी पद्धतही त्यांना मनापासून भावली. जीवनाच्या मुक्ततेचा, चतन्याचा, लयपूर्णतेचा आणि सहज-साधेपणाचा गाढ परिणाम मनावर झाला. पुढे तोच कवितेच्या गाभ्याशी राहिला. त्यांच्या पृथगात्मतेची ती एक वेधवंती खूण झाली.

'सहवास' ते 'शेला' हा दहा-अकरा वर्षांचा काळ इंदिराबाईंच्या आयुष्यातला फार सुखाचा आणि फार दुखाचाही काळ ठरला. फार मोठय़ा उलथापालथीचा काळ ठरला. घरचा तीव्र विरोध पत्करून संतांशी त्यांनी प्रेमविवाह केला होता. तीन मुले झाली होती आणि उभ्या जगात परस्परांना आपणच फक्त काय ते आहोत, अशा गाढ विश्वासावर दिवस सरत होते. ते जर तसेच जात राहिले असते तर इंदिराबाई कवयित्री म्हणून फारशा क्रियाशील राहिल्या असत्या असे वाटत नाही. 'माझे स्वप्न माझ्या हाती आले होते. आनंदाने मन भरलेले होते. कवितारचनेकडे माझे लक्ष नव्हते,' असे त्यांनी स्वतकडे वळून बघताना पुढे म्हटले आहे. त्या दहा वर्षांत अवघ्या बारा कविता आणि त्याही बऱ्याचशा अंशी मुलांभोवती केंद्रित अशा त्यांनी लिहिल्या. कविता ही त्या काळात गौण होती. जगण्याच्या केंद्रस्थानी ती आलेली नव्हती.
१९४६ साली संतांच्या आकस्मिक मृत्यूने मात्र संसार एकदम हेलपाटला. पुराचा जबरदस्त तडाखा बसून घरदार होत्याचे नव्हते व्हावे तशी अवस्था झाली. माहेर असून नसल्यासारखेच होते. सासरचेही कोणी नव्हते. तीन मुलांची ती आई अवघी तीसच वर्षांची होती. त्या अवघड आणि शोककारी प्रसंगात सहनशक्तीच्या शोधात इंदिराबाई कवितेकडे वळल्या आणि दोन्ही परस्परांमध्ये वितळून गेल्या. हे वितळणे एकप्रकारे काचेसारखे होते. भावनांचे अतिशय नितळ बिंब धरणारे आणि तरी अगदी कठीण, कणखर असणारे. 

'शेला' सर्वस्वी इंदिराबाईंचा असा पहिला संग्रह. स्वतंत्र असा बासष्ट कवितांचा संग्रह. मनोरमाबाईंच्या कवितेतल्या गोडव्याशी आणि रविकिरण मंडळाच्या शैलीशी काहीशा क्षीण स्वरूपातच, पण दृश्यमान असलेला पूर्वीचा बंध या संग्रहाने पुरा नाहीसा झाला आणि इंदिराबाईंच्या विविध भावावस्थांचे नकाशे-अगदी त्यांच्याच शैलीने कवितेत उमटून आले. ते एकाच मनप्रदेशाचे नकाशे होते आणि तो सारा प्रदेश दुखार्त वाऱ्याने झोडपून गेल्यासारखा झाला होता.
हे दुख तसे अगदी व्यक्तिगत होते. त्याला सामाजिक किंवा सांस्कृतिक दुखांचे परिमाण नव्हते. किंबहुना, एकूणच इंदिराबाईंच्या कवितेला- काही अपवाद वगळता (आणि तशा अपवादात्मक कवितांमध्ये कवितापण उणावलेलेच आहे, हे लक्षात घेता) सामाजिक, सांस्कृतिक सुखदुखाचे भान नाहीच म्हटले तरी चालेल. पतिनिधनाचे दुख फक्त त्यांचे असेच होते, पण ते खरे तर प्रीतीचे दुख होते. ज्याच्यावर जीव उपसून प्रेम केले तो सहचर त्यांनी कायमचा गमावला होता आणि पाण्याबाहेर काढलेल्या मासोळीसारखी त्यांची कविता जीव घाबरा होईपर्यंत तडफड करीत होती. वाचणाऱ्याला सहन होऊ नये इतकी ती तडफड निकराची होती.
'शेला'मधल्या याच अनुभवाचा विस्तार अधिक उचंबळून 'मेंदी'त आणि त्याहीपेक्षा जास्त उसळीने 'मृगजळ'मध्ये झाला आहे. इंदिराबाईंच्या एकूण कवितेत सर्वात उंच चढलेली कविता याच दोन संग्रहांमधली आहे. निसर्ग, प्रेम, विरह, दुख आणि एकाकीपण हे इंदिराबाईंच्या कवितेचे पंचप्राण आहेत असे म्हटले गेले आहे. पण 'शेला', 'मेंदी' आणि 'मृगजळ' या तीनही संग्रहांतल्या (आणि खरे तर पुढच्या सहा संग्रहांतल्याही) एकूण कवितांचे स्वरूप उलगडताना ही पंचप्राणांची कल्पना दूरच सारावी लागते. कारण यांपकी कोणताही एक भावघटक स्वतंत्रपणे इंदिराबाईंच्या कवितेत येत नाहीच. त्यांचे प्रेम म्हणजेच दुख आहे. दुखाच्या गाभ्यातच विरह आहे. विरहाची मिठी एकाकीपणाला आहे. आणि या सगळ्यात निसर्ग विरघळून एकजीव झालेला आहे.

Friday, October 26, 2012

Parva Bhetla Bappa!!

नमस्कार मित्रांनो,
गणपती, नवरात्र , दसरा या सर्व गडबडीत फारसे post करायला जमलेच नाही. तशी  मी हल्ली पुरती गुरफटून गेले आहे. असो.
एक छान कविता वाचनात आली. वाचून बघा तुम्हालाही नक्की आवडेल.
 

परवा भेटला बाप्पा, जरा वैतागलेला वाटला....
"दोन क्षण दम खातो", म्हणून माझ्या घरी टेकला !
"उंदीर कुठे पार्क करू? लॉट नाही सापडला" ...

मी म्हटले "सोडून दे, आराम करू दे त्याला !!

....तू पण ना देवा, कुठल्या जगात राहतोस?
मर्सिडीजच्या जमान्यात सुद्धा उंदरावरून फिरतोस???....
मर्सिडीज नाही, निदान nano तरी घेऊन टाक
तमाम देव मंडळींमध्ये थोडा भाव खाऊन टाक !!!"


"इतक्या मागण्या पुरवताना जीव माझा जातो
भक्तांना खुश करेपर्यंत खूप खूप दमतो....
....काय करू आता माझ्याने manage होत नाही
पूर्वीसारखी थोडक्यात माणसे खुशही होत नाहीत....
immigration च्या requests ने system झालीये hang,
तरीदेखील संपत नाही भक्तांची रांग !!
चार-आठ आणे देऊन काय काय मागतात
माझ्याकडच्या files नुसत्या वाढतच राहतात!!"

"माझं ऐक बाप्पा, तू कर थोडं थोडं delegation
management च्या theory मध्ये मिळेल तुला solution !
M.B.A. चे फंडे कधी शिकला नाहीस का रे?
Delegation of Authority कधी ऐकलंच नाहीस का रे??
असं कर बाप्पा, एक Call Center टाक
तुझ्या साऱ्या दूतांना एक-एक region देऊन टाक !
बसल्याजागी कामं होतील, तुझी धावपळ नको
परत जाऊन कुणाला, दमलो म्हणायला नको!!"

माझ्या साऱ्या युक्त्यांनी बाप्पा खुश झाला
"एक वर देतो बक्षीस, माग हवं ते म्हणाला !!
CEO ची position, Townhouse ची ownership
immigration देखील होईल झटपट, मग duel citizenship"

मी हसलो उगाच, "म्हटलं खरंच देशील का सांग?"

"अरे मागून तर बघ, थोडी देणार आहे टांग?"

"पारिजातकाच्या सड्यामध्ये हरवलेलं अंगण हवं...
सोडून जाता येणार नाही, असं एक तरी बंधन हवं...
हवा आहे परत माणसातला हरवलेला भाव...
प्रत्येकाच्या मनात थोडा मायेचा शिडकाव...!!
देशील आणून मला माझी हरवलेली नाती ?
नेशील मला परत जिथे आहे माझी माती ??
इंग्रजाळलेल्या पोरांना थोडं संस्कृतीचं लेणं...
आई-बापाचं कधीही न फिटणारं देणं ??
कर्कश्श वाटला तरी हवा ढोल-ताशांचा गर्जर...
भांडणारा असला तरी चालेल, पण हवा आहे शेजार !
यंत्रवत होत चाललेल्या माणसाला थोडं आयुष्याचं भान...
देशील का रे देवा, यातलं एक तरी दान?"

"तथास्तु" म्हणाला नाही, बाप्पा नुसता सोंडेमागून हसला..
" सारं हाताबाहेर गेलंय पोरा, सुखी रहा" म्हणाला..... !!!!
 
साभार - इंटरनेटचे महाजाळ 

Sunday, October 14, 2012

Shanta Shelke!!

शांता  शेळके - मराठीतील एक अग्रगण्य कवयित्री.
परवा १२ ऑक्टोबरला  रेडिओ ऐकत होते तर विविधभारती वर शांत शेळके यांची गाणी लागली होती निमित्त होते शांताबाईंच्या जयंतीचे. सहज म्हणून बघितले तर ह्या नामवंत कवयित्रीची साधी जन्म तारीख सुद्धा बहुतेक साईटवर वेगवेगळी आहे. विकिपीडिया :- १९ ऑक्टोबर मनसे :- २१ ऑक्टोबर
हा आपला दुर्दैवविलास म्हणावा कि..
असो. त्या निमित्ताने ही शांता बाईंची ही कविता.

लाडकी बाहुली
लाडकी बाहुली होती माझी एक
मिळणार तशी ना शोधूनी दुसर्‍या लाख
किती गोरी गोरी गाल गुलाबच फुलले
हासती केस ते सुंदर काळे कुरळे
झाकती उघडती निळे हासरे डोळे
अन ओठ जसे की आत्ताच खुदकन हसले
अंगात शोभला झगा रेशमी लाल
केसांवर फुलले लाल फितीचे फुल
कितीतरी बाहुल्या होत्या माझ्याजवळी
पण तीच सोनुली फार मला आवडली
मी गेले तीजसह माळावर खेळाया
मी लपून म्हणते साई सुट्ट्या हो या या
किती शोध शोधली परी कुठे न ती दिसली
परतले घरी मी होउन हिरमुसलेली
स्वप्नात तीने मम रोज एकदा यावे
हलवून मला हळु माळावरती न्यावे
वाटते सारखे जावे त्याच ठिकणी
शोधुनी पहावी पुन्हा पुन्हा ती चिमणी
जाणार कशी पण संतत पाउस धार
खल मुळी न तिजला वारा झोंबे फर
पाऊस उघडता गेले माळावरती
गवतावर ओल्या मजला सापडली ती
कुणी गेली होती गाय तुडवूनी तिजला
पाहूनी दशा ती रडूच आले मजला
मैत्रिणी म्हणाल्या काय अहा हे ध्यान
केसांच्या झिपर्‍या रंगही गेला उडून
परी आवडली ती तशीच मजला राणी
लाडकी बाहुली होती माझी म्हणुनी
- शांता शेळके

Wednesday, May 4, 2011

म्हणुन मी हल्ली बोलतच नाही…..

म्हणुन मी हल्ली बोलतच नाही…..

मित्रांची नावे ई-मेल आय.डी. असतात,
भेटायच्या जागा चाट-रूम असतात,
कट्ट्यावर कोणी आता भेटतच नाही,
दिलखुलास शिवी कानी पडतच नाही,

म्हणुन मी हल्ली बोलतच नाही.....

दिसले कि हाय, जाताना बाय
पण समोर असताना प्रश्नचिन्ह, कि बोलायच काय,
अशी खोटी जवळीक मी कधी साधतच नाही,
मुखवट्याआड चेहरा कधी लपवत नाही,

म्हणुन मी हल्ली बोलतच नाही......

आज इथे उद्या तिथे……… कोणासाठी कोणी थांबणार नाही
कोणीतरी साथ द्यावी हा माझा अट्टहास पण नाही,
पण इथुन तिथे जाताना कोणी निरोप तरी देइल कि नाही,
जाताना आपण, कोणी एक अश्रु तरी ढाळेल कि नाही,

म्हणुन मी हल्ली बोलतच नाही......

शब्दच हल्ली अर्थ विसरतात,
संवेदनाच हल्ली बधीर होतात,
भावनाच हल्ली बोथट होतात,
अगदी थोडी माणसचं हि कविता शेवटपर्यत वाचतात,

म्हणुन…… म्हणुन मी हल्ली बोलतच नाही......

Sunday, March 20, 2011

Pune Poem

पुणे तिथ काय उणे …..
आहो आपण म्हणतो पुणे तिथ काय उणे…..बरोबर आहे ........

इथ जागेंचे भाव झालेत १००० X कित्तिक पट गुणे
अणि आपण म्हणतोय पुणे तिथे काय उणे

चौपाटी नसताना महाग झाले "Z Bridge" चे चणे
अणि आपण म्हणतोय पुणे तिथे काय उणे

भर-रस्त्यात इथ खून मारामारी दंगा जाहीरपणे
अणि आपण म्हणतोय पुणे तिथे काय उणे

इथ आईटी न वाढलय प्रमाण पार्टी, मग त्यात आले पिणे
अणि आपण म्हणतोय पुणे तिथे काय उणे

जागेचा प्रश्न,पाण्याचा प्रश्न,त्वरित कामपूर्ति साठी मग मलई खाणे
अणि आपल एकच पुणे तिथे काय उणे

मोकळी जागा विकायची म्हणाल की हजर पवार किंवा राणे
अणि आपल एकच पुणे तिथे काय उणे
एकमेकांच्या गरजा अफाट , त्याने झाले महाग खिशातले आणे
आणि आपण म्हणतोय पुणे तिथे काय उणे

इथ परप्रांतीय येउन मराठी माणसा-साठी मोठा खड्डा खणे
आणि आपण म्हणतोय पुणे तिथे काय उणे

अहो इथे कुणाल (पार्क) जवळचे व्यापारी विकतील मोहरी सांगुन धणे
आणि आपल काय तर पुणे तिथे काय उणे

मटका गांजा रेव-पार्टी यांना पोलिसच करतात मदत उघडपणे
आणि आपल काय तर पुणे तिथे काय उणे

इथ संस्कृति,शिक्षण आणि हुशारीचा चुराडा होतोय अगदी शांतपणे
अणि आपण अजुनही म्हणतोय पुणे तिथ काय उणे

पण काही असो इथल्या मातीत रंगते पंडित भीमसेन जोशी चे गाणे
अणि म्हणूनच की काय पुणे तिथे काय उणे

अत्यंत साध्या पण भेदक शब्दात आहे संदीप,सलील चे लिहिणे/गाणे
आणि म्हणूनच की काय पुणे तिथे काय उणे

काय सांगू मित्रांनो काहीही झाले तरी कवी प्रणव चे तर पक्के आहे इथेच रहाणे
शेवटी एक महत्वाचे........ पुणे तिथे खरच काय उणे !!!!!!!!!

कवी - प्रणव कुलकर्णी
(भिलवडी) जिल्हा-सांगली, महाराष्ट्र (सध्या मुक्काम पुणे)

इंटरनेटच्या माहिती महाजाळातून साभार....