Tuesday, October 25, 2011

RamVijay Adhyay - 14


श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥


श्रीरामकथा ऐकतां सादर ॥ सुख उपजे अपार ॥ शशांक देखोनि सागर ॥ पूर्ण जैसा उचंबळे ॥१॥
सद्रुरु वर्षतां कृपाघन ॥ शिष्यसरितेसी ये स्वानंदजीवन ॥ कीं उगवतां सूर्यनारायण ॥ अरविंदें विकासती ॥२॥
कीं दुर्बळासी सांपडे धन ॥ कीं वणव्यांत जळतां वर्षे घन ॥ वसंतकाळ देखोन ॥ द्रुप जैसे फूलती पैं ॥३॥
ऐसी कथा ऐकतां उपजे सुख ॥ जे कथेसी भुलला कैलासनायक ॥ पार्वतीसह प्रेमं देख ॥ रामकथा हृदयीं धरिली ॥४॥
जे मोक्षतरूचें बीज देखा ॥ जे भवनदीमाजीं तारक नौका ॥ जे अज्ञानतिमिरदिपिका ॥ वाल्मीकें हे पाजळली ॥५॥
कीं अविद्याकाननवैश्र्वानर ॥ कीं एश्र्वर्यपीठांची देवी सुंदर ॥ कीं मनोरथमोक्षांची जननी ॥ कं पापतापभंजनी ॥ मंदाकिनी प्रत्यक्ष हे ॥७॥
ऐसी कथा अत्यंत पावन ॥ श्रवण करोत पंडितजन ॥ तेरावे अध्यायीं कथन ॥ आला रघुनंदन पंचवटीये ॥८॥
जो द्विपंचमुखदर्पहरण ॥ जो कमळिणीमित्रकुलभूषण ॥ मेदिनीगर्भरत्नजीवन ॥ पंचवटीये राहिला ॥९॥
जो भूधरावतार लक्ष्मण ॥ जो नरवीरांमाजी पंचानन ॥ सुरस फळें नित्य नूतन ॥ काननींहून आणित ॥१०॥
ऐसें असतां कोणे एके काळीं ॥ लक्ष्मण विलोकितां वनस्थळीं ॥ तो देखिली वंशजाळी ॥ सरळ गगनचुंबित ॥११॥
ते वंशजाळीभीतरीं ॥ दशकंठाचा भाचा शंबरी ॥ विषकंठाचें आराधन करी ॥ काळखड्रप्राप्तीतें ॥१२॥
साठीसहस्रवर्षेपर्यंत ॥ तप दारुण करितां तेथ ॥ वंशजाळीत असे गुप्त ॥ बाहेर न दिसे कोणातें ॥१३॥
माध्यान्हीं आला आदित्य ॥ तो काळखड्र अकस्मात ॥ गगनपंथें उतरत ॥ सुमित्रासुतें देखिलें ॥१४॥
तंव ते मनीं भावी शस्त्रदेवता ॥ मी नवजाय शंबरीच्या हाता ॥ शरण जाईन सुमित्रासुता ॥ हरीन जीवीता शंबरीच्या ॥१५॥
सभाग्यापुढें चिंतामणी ॥ पडे अकस्मात येऊनी ॥ तैसें काळशस्त्र ते क्षणीं ॥ सौमित्राजवळी पातलें ॥१६॥
सौमित्रें हाती घेतलें शस्त्र ॥ म्हणे कृपाळु तो त्रिनेत्र ॥ ऐसें बोलोनि अजराजपौत्र ॥ परमानंदें तोषला ॥१७॥
मग तो उर्मिलाप्राणाधार ॥ वस्त्रें पुसिलें काळशास्त्र ॥ म्हणे याचा प्रताप दिसे अपार ॥ पाहूं धार कैसी ते ॥१८॥
जेणें पुष्पप्राय धरिली धरणी ॥ तेणें निजबळें शस्त्र उचलोनी ॥ शंबरीसहित जाळी ते क्षणीं ॥ दुखंड केली तत्काळ ॥१९॥
शोणिताचा चालिला पूर ॥ साशंकित पाहे उर्मिलावर ॥ म्हणे कवण होता येथें विप्र ॥ नेणोनि साचार वधिला म्यां ॥२०॥
चिंतातुर राघवानुज ॥ तपस्वी वधिला नेणोनि सहज ॥ आतां कोपेल रघुराज ॥ मुखांबुज कोमाइलें ॥२१॥
असो याउपरी परतला ॥ जानकी मार्ग लक्षी वेळोवेळां ॥ म्हणे माध्यान्हकाळ टळला ॥ सौमित्रें लाविला उशीर कां ॥२२॥
ऐसें विलोकीं क्षणक्षणां ॥ तों येतां देखिलें लक्ष्मणा ॥ शस्त्र देखोनि मृगनयना ॥ अहल्योद्धरणाप्रति बोले ॥२३॥
म्हणे स्वामी आजि लक्ष्मण ॥ येत मंद मंद म्लानवदन ॥ तंव तो सर्वसाक्षी पूर्ण चैतन्यघन ॥ अंतरखूण जाणतसे ॥२४॥
तंव तो पावला महावीर ॥ रघुपतीपुढें ठेविलें शस्त्र ॥ जोडोनियां दोन्ही कर ॥ समाचार सांगितला ॥२५॥
म्हणे अयोध्याधीशा समर्था ॥ अकस्मात खड्ग आलें हाता ॥ वंशजाळी हाणोनि पाहतां ॥ तपस्वी घात पावला ॥२६॥
मग सुहास्यवदन जनकजामात ॥ म्हणे द्विज नव्हे तो राक्षस यथार्थ ॥ शूर्पणखेचा तो सुत ॥ भाचा जाण रावणाचा ॥२७॥
तो बहुत दिवस तप करित होता ॥ काळखड्र यावें हाता ॥ मग इंद्रादिदेवां समस्तां ॥ अजिंक्य व्हावें समरांत ॥२८॥
दुजयाचा चिंतिती घात ॥ त्यांसीं निर्दाळी उमाकांत ॥ ज्याची क्रिया त्यास बाधित ॥ अति अनर्थसूचक जे ॥२९॥
जैसे खणूं जातां वारुळ ॥ महासर्पें डंखिलें तत्काळ ॥ कीं हातीं धरितां तप्त लोहगोळ ॥ भस्म होय तेधवां ॥३०॥
जैसा शुष्ककाष्ठछिद्रीं चरण ॥ बळेंचि घालिजे नेऊन ॥ वरी खीळ बैसविली ठोकून ॥ मग करितां रुदन न निघेची ॥३१॥
जे जे आपण क्रिया करावी ॥ ते ते सवेंचि लागे भोगावी ॥ परी सौमित्रा आतां सीता रक्षावी ॥ न विसंबावी क्षण एक ॥३२॥
आतां येथून महाद्वंद्व ॥ मांडेल असावें सावध ॥ राक्षसी मावा नानाविध ॥ ब्रह्मादिकां न कळती ॥३३॥
हें एक बरवें जाहलें ॥ जें काळखड्र हातासी आलें ॥ ऐसें ऐकतां ते वेळे ॥ मन तोषलें सौमित्राचें ॥३४॥
तंव ते रावणाची भगिनी ॥ शूर्पणखा शंबरीची जननी ॥ रात्री दुष्ट स्वप्न देखोनि ॥ सावध जाहली तात्काळ ॥३५॥
मग विचार करून मानसीं ॥ सवें घेतल्या चौघी राक्षसी ॥ सवेग चालिसी वनासी ॥ निजपुत्रासी पहावया ॥३६॥
लंकेबाहेर जों आली ॥ तों दिनकरें प्रभा केली ॥ मार्ग चालतां वेळोवेळीं ॥ वंशजाळी विलोकित ॥३७॥
तंव ते न दिसेचि पाहतां ॥ देखे गृध्र मंडळ घालितां ॥ धापा दाटली धांवतां ॥ स्थळबीभत्सता देखोनी ॥३८॥
जवळी येऊनियां पाहे ॥ तों पुत्रासहित जाळी घायें ॥ द्विखंड होवोनि पडिली आहे ॥ रुधिर वाहे भडांभडां ॥३९॥
मग धाय मोकलोनि कैशी ॥ गडबडां लोळे भूमीसी ॥ जळावेगळी मासोळी जैशी ॥ चडफडी तैशी अतिशोकें ॥४०॥
मग उठवोनी सखियांनीं ॥ बैसविली सावध करूनी ॥ म्हणती पुढील कार्य मनासी आणीं ॥ कोणें वनीं सुत वधियेला ॥४१॥
मग ते राक्षसी उठोन । भोंवते पाहे विलोकून ॥ तों मानवी पदमुद्रा देखोन ॥ विस्मय करी मानसीं ॥४२॥
शंबरीसहित जाळभ् ॥ एके घायें खंड केली ॥ तरी काय राक्षसांची सीमा जाहली ॥ आयुष्याची येथोनियां ॥४३॥
असो दहन करून शंबरीसी ॥ वन शोधिती तेव्हां राक्षसी ॥ तों दुरोनि देखिलें सौमित्रासी ॥ जैसा तेजस्वी चंडाशु ॥४४॥
शूर्पणखा म्हणे हाचि काळ ॥ येणेंचि ग्रासिला माझा बाळ ॥ मग कापट्यवेष तात्काळ ॥ धरित्या जाहल्या राक्षसी ॥४५॥
रंभेहूनि सुंदर देखा ॥ स्वरूपें नटली शूर्पणखा ॥ सवें चौघीजणी सख्या ॥ भुले देखतां अनंग ॥४६॥
चौघीजणी दोहींकडे ॥ मध्यें शूर्पणखा दिव्य रूपडें ॥ जिच्या स्वरूपाचा प्रकाश पडे ॥ काननामाजीं हिंडतां ॥४७॥
चौघींच्या स्कंधावरी हात ॥ पादुका पायीं रत्नखचित ॥ हावभाव कटाक्ष दावित ॥ गायन करी मधुरस्वरें ॥४८॥
आल्हादकारक चंद्रवदन ॥ वदनीं बोलतां झळकती दशन ॥ चाले गजगती मोडोनि नयन ॥ उर्मिलाजीवन देखोनियां ॥४९॥
हळूच सख्यांसी बोलत ॥ येणेंचि वधिला गे माझा सुत ॥ तरी यासी सगळेंचि मुखांत ॥ घालोनि गिळीन निर्धारें ॥५०॥
तो सौमित्र करीत रामस्मरण ॥ काननामाजी करी भ्रमण ॥ जैसे कमळावरी भ्रमर जाण ॥ ठायीं ठायीं रुणझुणती ॥५१॥
तों शूर्पणखा ते वेळीं ॥ सवेग पातली सौमित्राजवळी ॥ कामचेष्टा करी वेळोवेळीं ॥ वचन माधुर्य बोलोनियां ॥५२॥

म्हणे वो अवधारा सुंदरा ॥ बहुत हिंडल्यें वसुंधरा ॥ परी मजयोग्य न मिळे नोवरा ॥ कुशळ चतुर प्रतापी ॥५३॥
तरी आजि माझें धन्य भाग्य ॥ पावल्यें स्वामीचें अर्धांग ॥ आजि तप फळले सांग ॥ आली सवेग पुढेंचि ॥५४॥
घेऊनियां नवरत्नमाळा ॥ घालावया आली गळां ॥ तंव तो महाराज सत्त्वगळा ॥ जो अवतरला भोगींद्र ॥५५॥
गुणसिंधु जानकीजीवन ॥ त्याची कृपा जयावरी पूर्ण ॥ विषयसंगें त्याचें मन ॥ काळत्रयीं मळेना ॥५६॥
जेणें प्राशिला सुधारस ॥ त्यासीं काय बाधेल महाविष ॥ जो सूर्यासन्निध करील वास ॥ तम केवीं त्यासी बाधेल ॥५७॥
कामधेनू ज्याचे मंदिरीं ॥ तो कधींच नव्हे दरिद्री ॥ जो पहुडला आनंदसमुद्रीं ॥ कर्मबंधीं न पडे तो ॥५८॥
कल्पवृक्ष आंगणीं देख ॥ तो कासया मागेल भीक ॥ ज्यासी भेटला वैकुंठनायक ॥ तो न पूजी भूतें प्रेतें ॥५९॥
उर्वशीसमान ज्याची ललना ॥ तो कदाही प्रेत कवळीना ॥ नंदनवनींचा भ्रमर जाणा ॥ अर्कीवरी न बैसे ॥६०॥
जो भ्रमरमंचकावरी ॥ पहुडणार अहोरात्रीं ॥ तो निजेल खदिरांगारीं ॥ हें काळत्रयीं घडेना ॥६१॥
ज्याचे अंगीं मृगमदाची उटी ॥ तो काकविष्ठा न पाहे दृष्टीं ॥ जो बैसला क्षीराब्धीच्या तटीं ॥ तो कां कांजी इच्छील ॥६२॥
असो ऐसा लक्ष्मण ॥ तो आहाररहित निर्वाण ॥ तो शूर्पणखेसी प्रतिवचन ॥ बोलता जाहला तेधवां ॥६३॥
मग म्हणे वो सुंदरी राहें ॥ आम्हां सीताराम वडील आहे ॥ पैल वसती पंचवटिये ॥ उमामहेश्र्वर ज्यापरी ॥६४॥
मायबाप गुरु बंधु ॥ रघुवीर माझा कृपासिंधु ॥ त्याचे आज्ञेविण हा संबंधु ॥ कालत्रयीं घडेना ॥६५॥
शेष सांडील भूभार ॥ पूर्वेस मावळेल दिनकर ॥ तरी राम आज्ञेविण साचार ॥ तुज न वरीं निर्धारें ॥६६॥
तों शूर्पणखा बोले वचन ॥ तरी मी आणित्यें रामाची खूण ॥ अवश्य म्हणे लक्ष्मण ॥ येरी तेथून चालिली ॥६७॥
सांगातें सखिया चौघीजणी ॥ विचार सांगे त्यालागुनी ॥ राम लक्ष्मण सीता तिन्हीं ॥ रात्रीं गिळोनि जाऊं लंके ॥६८॥
आमुची कार्यसिद्धी येथून ॥ सख्याहो जाहली परिपूर्ण ॥ मग ये वनींचे ब्राह्मण ॥ भक्षूं शाधोनि साक्षेपें ॥६९॥
ऐसें विचारोनि मानसीं ॥ वेगें आली पंचवटीसी ॥ देखोनियां सीतारामासी ॥ साष्टांग नमन पैं केलें ॥७०॥
आजि माझे भाग्य पूर्ण ॥ देखिले भावें स्वामिचरण ॥ बाई मी तुम्हांसी शरण ॥ जाऊ जाहल्यें तुमची मी ॥७१॥
मजवरी स्नेह करावा बहुत ॥ भावोजींस प्रार्थोनि त्वरित ॥ मजजवळी द्यावें लिखित ॥ प्राणनाथ वरावया ॥७२॥
चरण त्यांचे कोमळ चांगले ॥ वनीं हिंडताती एकले ॥ तळहातीन करकमळें ॥ सुमनसेजे घोलोनि ॥७३॥
भावोजींचे आज्ञेविण पाहें ॥ मज ते वरीत नाहींत करूं काये ॥ अहा त्यांचा वियोग न साहे ॥ विरहें जाय प्राण हा ॥७४॥
डोळां आसुवें आणिलीं लवलाहीं ॥ पतीस माझा विश्र्वास नाहीं ॥ पुढें जन्म कंठणें एके ठायीं ॥ भावोजींस बाई सांगा जी ॥७५॥
मी केवळ पतिव्रता साचार ॥ कर्णकुमारी परमपवित्र ॥ मज एकही पुरुषाचा पदर ॥ बाई लागला नाहींच ॥७६॥
त्यावीण मज पुरुष इतर ॥ बंधूसमान साचार ॥ मागुती उदकें भरोनि नेत्र ॥ म्हणे सत्वर पत्र द्या आतां ॥७७॥
सीतेसी सुख वाटलें फार ॥ म्हणे बरवा जाहला विचार ॥ मज जाऊ मिळाली सुंदर ॥ ईस सौमित्र वर साजे ॥७८॥
मग म्हणे जी रघुराया ॥ ईस खुण द्यावी लवलाह्या ॥ स्वामी सौमित्रा योग्य जाया ॥ मिळाली जी निर्धारें ॥७९॥
मग तो सर्वात्मा रघुनायक ॥ चराचरचित्तपरीक्षक ॥ जो मायाचकचाळक ॥ कर्ता हर्ता पाळिता जो ॥८०॥
तिच्या उफराट्या बाहुल्या नेत्रांत ॥ न्याहाळून पाहे जनकजामात ॥ म्हणे हे निशाचरी यथार्थ ॥ छळावया आली असे ॥८१॥
नेत्रवक्रांचे तिचे विकार ॥ त्यावरोनि समजलें अंतर ॥ सुमनावरून सत्वर ॥ वृक्ष चतुर जाणती ॥८२॥
बोलावरोनि कळे चित्त ॥ आचरणावरून पूर्वार्जित ॥ क्रियेवरोनी वर्णाश्रम सत्य ॥ परीक्षक जाणती ॥८३॥
राहणीवरून कळे परमार्थ ॥ शब्दावरूनी कळे पांडित्य ॥ प्रेमावरोनी भक्त ॥ परीक्षक जाणती ॥८४॥
दानावरूनी कळे उदार ॥ रणीं समजे प्रजा शूर ॥ लक्षणांवरूनी नृपवर ॥ जाणती चतुर परीक्षक ॥८५॥
वास येतां कळे काष्ठ ॥ स्वरावरोनी समज कंठ ॥ कोंभावरून स्पष्ट ॥ भूमीचें मार्दव जाणिजे ॥८६॥
अंगणावरून समजे सदन ॥ भूतदयेवरून ब्रह्मज्ञान ॥ प्रमेवरून रत्न ॥ परीक्षक जाणती ॥८७॥
असो सर्वात्मा रघुवीर ॥ शूर्पणखेचें ओळखिलें अंतर ॥ आंत शठत्व मृदु शब्द बाहेर ॥ जाणे चतुर श्रीराम ॥८८॥
मुख शोभे जैसें कमळ ॥ शब्द चंदनाहून शीतळ ॥ परी अंतरीं धूर्त कुटिळ ॥ तमाळनीळें आळखिलें ॥८९॥
श्रीराम म्हणे ते अवसरीं ॥ लग्नपत्रिका लिहों दे पाठीवरी ॥ ऐकतां भयभीत निशाचरी ॥ विश्र्वास अंतरीं उपजेना ॥९०॥
सीतेसी म्हणे बाई ऐकतां ॥ भावोजींसमोर बोलतां ॥ मज लाज वाटे तत्वतां ॥ तुम्हीच प्रार्था तयांसी ॥९१॥
भावोजी चतुर आणि तरुण ॥ मी लज्जावेष्ठित कामिन ॥ त्यांपुढें बैसतां जाण ॥ जाईल प्राण वाटतसे ॥९२॥
मग बोले रघुनंदन ॥ पृष्ठीवरी लिहिल्याविण ॥ आणिक आम्हांपाशीं खूण ॥ दुजी नाहीं सर्वथा ॥९३॥
मग शूर्पणखा बोले वचन ॥ तरी पृष्ठीवरी लिहावी खूण ॥ अवश्य म्हणे रघुनंदन ॥ केलें लेखन पृष्ठीवरी ॥९४॥
श्रीराम म्हणे जाय सत्वर ॥ उशीर न लावीच सौमित्र ॥ ऐसें बोलतां शतपत्रनेत्र ॥ पवनवेगें चालिली ॥९५॥
मग लक्ष्मणाजवळी येऊन ॥ सांगे परम हर्षेकरून ॥ भावोजींनीं मज देखोनि मान ॥ मुखवचनें सांगितलें ॥९६॥
अवश्य वरावें तुम्हांसी ॥ ऐसें सांगितलें मजपाशीं ॥ गांधर्वलग्न निश्र्चयेसी ॥ तात्काळचि लावावें ॥९७॥
मग बोले लक्ष्मण ॥ न देखतां श्रीरामाची खूण ॥ तुज न वरीं मीच पूर्ण ॥ सत्य वचन हें माझें ॥९८॥
येरी म्हणे ते समयीं ॥ माझा विश्र्वास तुम्हांसी नाहीं ॥ पुढें जन्म कंठणें एके ठायीं ॥ दुजें कांहीं नसेचि ॥९९॥
मी येथें लटिकें बोलोन ॥ भावजींस काय दावूं वदन ॥ मी तयांलागीं भेटोन ॥ आल्यें आतां तत्वतां ॥१००॥

भावोजी जलदवर्ण सुंदर ॥ बाई चंपकळिका सुकुमार ॥ जवळ लिहावया नव्हतें पत्र ॥ सांगितलें तुम्हां वरावें ॥१॥
तुम्हासी श्रम जाहले थोर ॥ चरण तळहातीन सुकुमार ॥ कीं सौख्यशयनीं दोघें साचार ॥ निद्रा करूं क्षणभरी ॥२॥
परी न मानीच लक्ष्मण ॥ शूर्पणखा बोले हांसोन ॥ म्यां तों आणिली आहे खूण ॥ तुमचें मन पाहिलें म्यां ॥३॥
येरी खूण दाखवी पाठीची ॥ तों आज्ञा ऐशी श्रीरामाची ॥ शूर्पणखा भगिनी दशमुखाची ॥ इच्या नासिककर्णांची शांति करीं ॥४॥
कर्ण आणि नासिक सकळ ॥ सपाट करीं न लावीं वेळ ॥ नवरी श़ृंगारूनि अमंगळ ॥ लंकेकडे पाठवावी ॥५॥
स्त्रीवध न करावा जाण ॥ यालागीं राखें इचा प्राण ॥ ऐसें लक्ष्मणें वाचून ॥ म्हणे जाऊं चला एकांतीं ॥६॥
दूरी केल्या चौघीजणी ॥ धरिली शूर्पणखेची वेणी ॥ सौमित्रें पाडिली धरणीं ॥ पापखाणी ते निशाचरी ॥७॥
मग म्हणे प्राणनाथा ॥ मी सिद्ध आहे या कार्यार्था ॥ झोंबोनी कासया पाडितां ॥ नवल मज वाटतसे ॥८॥
लक्ष्मणें न लागतां क्षणमात्र ॥ छेदिलें नासिक आणि श्रोत्र ॥ तों ते आक्रंदली अपवित्र ॥ विशाळ शरीर धरियेलें ॥९॥
अत्यंत विशाळ भयंकर ॥ कपाळीं चर्चिला शेंदूर ॥ नासिकापासोनि पूर ॥ अशुद्धाचा भडकतसे ॥११०॥
चौघीजणी समवेत ॥ पळती वाटेसी शंख करीत ॥ म्हणे धांवा धांवा रे समस्त ॥ राक्षस हो शीघ्रकाळें ॥११॥
पळतां पाहे मागें पुढें ॥ तो सौमित्रचि दृष्टीं पडे ॥ भोंवता दिसे चहूंकडे ॥ कोणीकडे जाऊं म्हणे ॥१२॥
अडखळोनि भूमीवर पडती ॥ मुखीं नासिकीं भरे माती ॥ पद्मपुराजवळी येती ॥ शंख करिती पांचजणी ॥१३॥
आक्रोश ऐकतां थोर ॥ त्रिशिका आणि दूषण खर ॥ सिद्ध करोनि चतुरंग दळभार ॥ आले सत्वर बाहेरी ॥१४॥
असुर पायींच नेटके ॥ पुढें चमकताती कौतुकें ॥ हातीं असिलता करीं खेटकें ॥ कटीं झळके यमदंष्ट्रा ॥१५॥
तों चालिले चतुरंग भारें ॥ जैसीं चित्रें लिहिलीं चित्रकारें ॥ तयांहून अतिसाजिरे ॥ सर्वालंकारें डवरिले ॥१६॥
वीर भयंकर रणरगडे ॥ जैसे काळाचे सवंगडे ॥ एक धांवती एकापुढें ॥ सिंहनादें गर्जती ॥१७॥
निघाले गजभार उन्मत्त ॥ कीं ते ऐरावतीचे सुत ॥ श्र्वेतवर्ण आणि चौदंत ॥ किंकाटत धांवती ॥१८॥
जिहीं युद्ध करोनि समरंगणीं ॥ सुरांचे मुकुट पाडिले धरणीं ॥ ते गजस्कंधावरी बैसोनी ॥ शस्त्रें तुळिती आनंदें ॥१९॥
त्यांमागें रथांचें भार ॥ वरी शस्त्र सामग्री अपार ॥ चौदा सहस्र महावीर ॥ एकवटले ते काळीं ॥१२०॥
त्रिशिरा आणि खर दूषण ॥ दळभारीं मुख्य तिघेजण ॥ तों शूर्पणखा पुढें येऊन ॥ शंख करीत उभी ठाके ॥२१॥
जैसा शेंदुरें माखिला पर्वत ॥ तैशी रक्तें चर्चिली आरक्त ॥ म्हणे राक्षस आटिले समस्त ॥ आला रघुनाथा पंचवटिये ॥२२॥
नवमेघरंग रघुवीर ॥ सौमित्र गौरवर्ण सुकुमार ॥ सीतेचें स्वरूप पाहतां पंचशर ॥ ओंवाळूनि टाकिजे ॥२३॥
तरी बहुत अरुवार लक्ष्मण ॥ त्याचे नरडीचा घोट घेईन ॥ तुम्ही सांगातें या अवघेजण ॥ रक्तपान करवा मज ॥२४॥
जेणें माझे नासिक छेदिलें ॥ त्यासी मी गिळिन सगळें ॥ त्रिशिरा खर दूषण हांसले ॥ बीभत्सरूप देखोनि ॥२५॥
म्हणती मानव तो रघुनंदन ॥ आम्ही त्यावरी जावें हें नीचपण ॥ मग राक्षस चौदाजण ॥ निवडोनियां काढिले ॥२६॥
ते शूर्पणखेसंगें देऊन ॥ म्हणती मारून रामलक्ष्मण ॥ ईस करावा रक्तपान ॥ समाधान होय तों ॥२७॥
मग शूर्पणखा आणि राक्षस ॥ वेगें जाती पंचवटीस ॥ म्हणती धरून रामसौमित्रांस ॥ जितचि न्यावे खरापाशीं ॥२८॥
एक म्हणती येथेंचि मारून ॥ आम्ही करूं मांसभक्षण ॥ आधीं करावावें रक्तपान ॥ शूर्पणखेसी साक्षेपें ॥२९॥
जैशी मृगेंद्राची निंदा देख ॥ मागें करिती जंबुक ॥ अळिका म्हो खगनायक ॥ धरून आणूं क्षणार्धें ॥१३०॥
तृणपुतळे मिळोनि बहुत ॥ वडवानळासी धरूं म्हणत ॥ कीं हृदयीं भाविती खद्योत ॥ आसडून आदित्य पाडूं खालीं ॥३१॥
शलभ म्हणती मिळोनी ॥ कल्पांतविजू घालूं वदनीं ॥ तैसे राक्षस आले धांवोनी ॥ पंचवटीस तेधवां ॥३२॥
रघुपतीस जाणवी लक्ष्मण ॥ राक्षस आले चौदाजण ॥ ऐसें ऐकतां रविकुलभूषण ॥ वाहात गुण धनुष्यातें ॥३३॥
पर्वतदरीमधून ॥ अकस्मात निघे पंचानन ॥ तैसा कौशिकमखरक्षण ॥ गुंफेबाहेर पातला ॥३४॥
राम नरवीरपंचानन ॥ चतुर्दशगज लक्षिले दूरून ॥ कीं शार्दूळें लक्षिलें हरिण ॥ रघुनंदन पाहे तैसा ॥३५॥
तों हांक देती निशाचर ॥ भोंवते तळपती भयंकर ॥ दारुण शस्त्रें अनिवार ॥ सोडिते झाले तेधवां ॥३६॥
जैसें मुर्खाचें वाग्जाळ बहुत ॥ एकेचि शब्दें वारी पंडित ॥ तैशीं अरिशस्त्रें वारोनि समस्त ॥ केलें अद्भुत श्रीरामें ॥३७॥
ओढी ओढोनि आकर्ण ॥ सोडिला सूर्यमुख बाण ॥ चौदाजणांची शिरें छेदून ॥ उर्वीवरी पाडिलीं ॥३८॥
मृगेंद्रें विदारिजे वारण ॥ तैसे पाडिले चौदाजण ॥ कीं अरुणानुजें दारुण ॥ भुजंग जैसे तोडिले ॥३९॥
राम राक्षसांतक प्रळयाग्न ॥ यासी चतुर्दश असुरांचे अवदान ॥ शूर्पणखेनें समर्पिलें आणून ॥ माघारी परतोनि पळतसे ॥१४०॥
सौमित्रें काढिला एक शर ॥ शूर्पणखेचें छेदावया शिर ॥ तंव ती म्हणे हा दावेदार ॥अद्यापिही सोडिना ॥४१॥
श्रीराम म्हणे सुमित्रासुता ॥ इसी न वधावें तुवां आतां ॥ हें सांगोनि राक्षसां समस्तां ॥ आणील येथें वधावया ॥४२॥
असो निर्नासिका शंख करित ॥ खरदूषणां येवोनि सांगत ॥ राक्षस मारिले समस्त ॥ तुम्हीं त्वरित चलावें ॥४३॥
ऐसें शूर्पणखा सांगोनि सरे ॥ तों रणतुरें वाजती गजरें ॥ भार निघाला बहु त्वरें ॥ पवनवेगें करोनियां ॥४४॥
खर तो केवळ खरमुख ॥ दूषणाचें पांढरें नाक ॥ शुभ्रकुष्ठनिःशंक ॥ दूषण नाम त्याकरितां ॥४५॥
त्रिशिराचीं शिरें तीन ॥ तीं व्हावया काय कारण ॥ त्याचे मातेनें वाणें विस्तारून ॥ तिन्हीं एकास दीधलीं ॥४६॥
त्याजकरितां तीन शिरें ॥ त्रिशिरास जाहलीं निर्धारें ॥ असो भार धांवती गजरें ॥ पंचवटीये समीप ॥४७॥
दूषणाचे पुत्र तिघेजण ॥ कपाली प्रमाथी स्थूललोचन ॥ वाटेसी जाहले अपशकुन ॥ विघ्नसूचक तेधवां ॥४८॥
सुटला अद्भुत प्रभंजन ॥ सर्वांचे धुळीनें भरले नयन ॥ रथध्वज पडला उन्मळून ॥ अपशकुन तोचि पैं ॥४९॥
रामें भार देखिला दूरी ॥ गगन गर्जे रणतुरीं ॥ नाद भरला दिशांतरीं ॥ कांपे धरित्री थरथरां ॥१५०॥
सौमित्रासी म्हणे रघुनंदन ॥ तूं आतां सीतेसी करीं जतन ॥ आज युद्ध करोनि निर्वाण ॥ वधीन दारुण राक्षसां ॥५१॥
तरी या पर्वतमस्तकीं जाण ॥ उभा राहें सीतेसहित एक क्षण ॥ आज्ञा वंदोनि लक्ष्मण ॥ चढे घेवोन जानकीतें ॥५२॥
पर्वतशिखरीं जनकनंदिनी ॥ जैसी मूळपीठीं आदिभवानी ॥ जवळी परशुराम कर जोडुनी ॥ सौमित्र ते क्षणीं तेवीं दिसे ॥५३॥
असो येरीकडे रघुनंदन ॥ धनुष्यासी चढवोनि गुण ॥ कानाडी ओढितां आकर्ण ॥ झणत्कारिती किंकिणी ॥५४॥
तों येरीकडे राक्षस ॥ सिंहनाद करिती कर्कश ॥ भोंवता वेढिला अयोध्याधीश ॥ पुराणपुरुष जगदात्मा ॥५५॥
राक्षसभारांत कडकडाट ॥ वाद्यांचा होत दणदणाट ॥ तेणें मंगळजननीचें पोट ॥ उलो पाहे ते काळीं ॥५६॥
अपार उठावले भार ॥ रणकर्कश भयंकर ॥ जैसा वृषभांनीं कोंडिला मृगेंद्र ॥ कीं द्विजेंद्र उरगांनीं ॥५७॥
कीं देखोनि दीपिकेचा रंग ॥ झेंपावती बहुत पतंग ॥ कीं वासुकी महाभुजंग ॥ मूषकीं जैसा वेष्टिला ॥५८॥
श्रीराम रणरगधीर ॥ कैसा लक्षित शत्रुभार ॥ कलशोद्भवें लक्षिला सागर ॥ सूर्यें अंधकार जैसा कीं ॥५९॥
कीं व्याघ्रें लक्षिले अजांचे कळप ॥ कीं कुठारपाणि विलोकी पादप ॥ कीं सुपर्णें लक्षिले सर्प ॥ अयोध्याधिप तेवीं पाहे ॥१६०॥
तों असुरीं ओढोनि ओढी ॥ सोडिल्या बाणांच्या कोडी ॥ कीं बैसलीसे सातवाकडी ॥ सायकांची ते वेळीं ॥६१॥
सिंहनाद करिती वेळोवेळां ॥ लोटला वाहिनीचा मेळा ॥ जैसा सागर खळबळिला ॥ प्रलयीं लोटला भूमीवरी ॥६२॥
जैशा जलदकल्लोळीं ॥ चपळा झळकती नभमंडळीं ॥ तैशा तळपती ते वेळीं ॥ असिलता सतेज ॥६३॥
शस्त्रास्त्रांचे संभार ॥ रघुपतीवरी येती अपार ॥ राक्षस म्हणती कैंचा रघुवीर ॥ खंडविखंड जाहला पैं ॥६४॥
एक म्हणती रक्तपान ॥ शूर्पणखा करील कोठून ॥ तिच्या तोंडी मृत्तिका पूर्ण ॥ पडली ऐसें वाटतसे ॥६५॥
इतुका होत शस्त्रमार ॥ परी रणरंगधीर रघुवीर ॥ ठाण न चळेचि निर्धार ॥ ऐका चतुराहो दृष्टांत ॥६६॥
हाणतां कुठार प्रहार ॥ बैसका न सांडी तरुवर ॥ कीं पर्जन्य वर्षतां अपार ॥ अचळ न चळे सर्वथा ॥६७॥
कीं निंदक निंदिती अपार ॥ न चळे साधूचें अंतर ॥ कीं प्रल्हादासी लावितां विखार ॥ परी साचार डळमळिना ॥६८॥
जयासी लाधलें अंतरसुख ॥ मग तो न मानी प्रपंचदुःख ॥ अयोध्याप्रभु तैसा देख ॥ ठाण सुरेख चळेना ॥६९॥
असो यावरी जानकीरंग ॥ ठाण मांडीत अभंग ॥ बाण सोडीत सवेग ॥ जैसे उरग पक्षांचे ॥१७०॥
आवेशें धांवती बाण ॥ जैसे सफळ तरुवर देखोन ॥ विहंगमांचे पाळे उडोन ॥ अकस्मात जेवीं येती ॥७१॥
जैसे कृषीवल एकसरें ॥ कणसें छेदिती अपारें ॥ तैसीं राक्षसांचीं शिरें ॥ अपार तेथें पाडिलीं ॥७२॥
वरी कोणी करितां हस्त ॥ ते भुजा तोडी शस्त्रासहित ॥ लक्षानुलक्ष शर सुटत ॥ चापापासून ते वेळीं ॥७३॥
श्रीरामचा तूणीर ॥ अक्षय भरलासे साचार ॥ कुंडामाजी वैश्र्वानर ॥ प्रदीप्त जैसा झांकिला ॥७४॥
कीं वासुकीचे मुखीं हळाहळ ॥ कीं सरितापतीमाजी वडवानळ ॥ कीं मेघीं विद्युल्लता तेजाळ ॥ तूणीरांत शर त्यापरी ॥७८॥
कपटी राक्षस चवदा जण ॥ रामावरी आले सरसावून ॥ अग्नीस विझवावया रंभानंदन ॥ आवेशें करून लोटला ॥७६॥
कीं वारणविदारणापुढें ॥ मार्जर दावूं आलें पवाडे ॥ कीं बृहस्पतीपुढें मूढें ॥ वाद करूं धांविन्नलीं ॥७७॥
कीं रासभांनी ब्रीदें बांधोन ॥ गंधर्वसभेसी मांडिलें गायन ॥ तैसे राक्षस चौदाजण ॥ रामावरी लोटले ॥७८॥
क्षण न लागतां रणरंगधीरें ॥ छेदिलीं चवदा जणांचीं शिरें ॥ जैशीं कां तीक्ष्ण शस्त्रें ॥ अरविंदें वीर छेदिती ॥७९॥
ऐसें देखतां वीर दूषण ॥ पुढें धांविन्नला वर्षत बाण ॥ जैसा कां वर्षत घन ॥ युद्धीं निपुण राक्षस ॥१८०॥
दूषणाचें बाणजाळ थोर ॥ रामें निवारिलें साचार ॥ जैसा उगवतां दिनकर ॥ उडुगणें जेवीं लोपती ॥८१॥
कीं अनुताप होतां अपार ॥ होय पापाचा संहार ॥ कीं वेदांतज्ञानें संसार--॥ दुःख जैसें वितुळे पैं ॥८२॥
तैसे दूषणाचे शर तोडून ॥ अश्र्वासहित तोडिला स्यंदन ॥ मग राक्षस गदा घेऊन ॥ चरणचाली धांविन्नला ॥८३॥
मग तो रावणदर्पहरण ॥ वेगें सोडी अर्धचंद्रबाण ॥ गदा हातींचीं छेदून ॥ एकीकडे पाडिली ॥८४॥
मग परिघ वीरभद्रदत्त ॥ घेऊन दूषण धांवत ॥ देव जाहले चिंताक्रांत ॥ म्हणती अनर्थ मांडला ॥८५॥
या परिघाचें निवारण ॥ केवीं करील रघुनंदन ॥ श्रीरामें काढिला दिव्य बाण ॥ वायूचें खंडण करणार जो ॥८६॥
परिघा सहित हात तेथें ॥ छेदून पाडिला रघुनाथें ॥ सवेंच एक बाण सीताकांतें ॥ चंडांशमुख काढिला ॥८७॥
दूषणाचा कंठ लक्षून ॥ विषकंठवैद्यें सोडिला बाण ॥ शिर उडविलें न लागतां क्षण ॥ पडिला दूषण ते काळीं ॥८८॥
मग दूषणाचे तिघे सुत ॥ तिहीं रण माजविलें बहुत ॥ पितयाचा सूड घेऊं यथार्थ ॥ ऐसा पुरुषार्थ धरियेला ॥८९॥
तिघेही करिती संधान ॥ राम नरवीरपंचानन ॥ बाणीं खिळिले तिघेजण ॥ परी ते आंगवण न सांडिती ॥१९०॥
बिळीं प्रवेशतां विखार ॥ अर्धे दिसती बाहेर ॥ तैसे राक्षसां अंगीं शर ॥ श्रीरामाचे खडतरले ॥९१॥
कीं पिच्छें पसरिती नीळकंठ ॥ कीं फणस फळावरी कांटे दाट ॥ तैसें बाण रुतले सघट ॥ प्रताप उद्भट रामाचा ॥९२॥
असो तिघांची शिरें रघुनाथें ॥ उडवोनि धाडिलीं निराळपंथें ॥ मग त्रिशिरा आवेशें बहुतें ॥ रामावरी लोटला ॥९३॥
रथारूढ निशाचर ॥ सोडी बहुत बाणांचा पूर ॥ तो रघुवीर तोडी जैसा समीर ॥ जलदजाळ विभांडी ॥९४॥
रघुपतीचे बाण तीक्ष्ण ॥ त्रिशिराचा छेदिला स्यंदन ॥ मग कुमारदत्त शक्ति घेऊन ॥ पिशिताशन धांविन्नला ॥९५॥
निजबाळें शक्ति झोंकली ॥ परी ते रामासी वश्य जाहली ॥ चरणांजवळ जावोनि पडली ॥ दासी तुमची म्हणोनियां ॥९६॥
रंभापर्णवत ज्या बाणाचें मुख ॥ लक्षोनि सोडी तो अयोध्यानायक ॥ त्या बाणतेजें सकळिक ॥ ब्रह्मकटाह उजळिलें ॥९७॥
त्रिशिराचीं तिन्हीं शिरें ॥ तात्काळ छेदिलीं रघुवीरें ॥ ऐसें देखोनियां खरें ॥ धांविजे त्वरें रथारूढ ॥९८॥
असंख्य बाण ते अवसरीं ॥ खरें सोडिले रामावरी ॥ श्रीराम एकला रणचक्रीं ॥ रजनीचरीं वेढिला ॥९९॥
चहूंकडोनि बाण ॥ रामावरी येती दारुण ॥ परी तितुक्यांचें संधान ॥ रघुनंदन छेदितसे ॥२००॥

जैसें योगेश्र्वरें मायाजाळ ॥ कीं सहस्र किरणें तममंडळ ॥ कीं अरुणानुजें सर्पकुळ ॥ विदारून सांडिजे जैसें ॥१॥
कीं शुष्कवना हुताशन ॥ भस्म करी न लागतां क्षण ॥ कीं जलदजाळ प्रभंजन ॥ विदारून सांडी जैसा ॥२॥
खरा बाण सोडित रणरंगीं ॥ अगस्तिदत्त कवच रामाचे आंगीं ॥ त्याचें बिरडें छोदोनि वेगीं ॥ खालीं पाडिलें राक्षसें ॥३॥
ऐसें विपरीत देखिलें ॥ विमानीं देव गजबजिले ॥ समस्तही चिंतूं लागले ॥ रघुवीरासी कल्याण ॥४॥
मग खरें मांडिलें निर्वाण ॥ शक्तिवरद चारी बाण ॥ सहस्राक्षही निवारण ॥ करूं न शके जयांचें ॥५॥
प्रळयींच्या चार सौदामिनी ॥ तैसे बाण सुटले ते क्षणीं ॥ परी नवल जाहलें नयनीं ॥ भूचर खेचर पाहती ॥६॥
चारी बाण तये वेळे ॥ रघुपतीच्या भातां रिघाले ॥ ब्रह्मयाचे मुखीं प्रवेशले ॥ चारी वेद जैसे कां ॥७॥
कीं चारी नद्या समुद्रांत ॥ येऊन मिळती अकस्मात ॥ कीं आनंदवनींच्या कमळांत ॥ भ्रमर चारी बैसले ॥८॥
असो देव करिती जयजयकार ॥ पुढें असिलता घेऊन खर ॥ सुरकैवारियावरी असुर ॥ चपळेऐसा धांविन्नला ॥९॥
मग चंडिशकोदंडभंजन ॥ प्रचंड दोर्दंडेंकरून ॥ सोडिला वसिष्ठदत्त बाण ॥ अनिवार अखंड जो ॥२१०॥
तेणें खराचें शिर छेदोन ॥ तत्काळ परतला दिव्य बाण ॥ श्रीराम तुणीरामाजी येऊन ॥ आपले आपण प्रवेशला ॥११॥
विजयी जाहला रघुनंदन ॥ पुष्पें वर्षती देवगण ॥ विषयकंठहृदयमखपालन ॥ निजभावेंसी पूजिला ॥१२॥
चौदासहस्र राक्षस अद्भुत ॥ त्यांत उरला नाहीं एक जिवंत ॥ रणीं एकला रघुनाथ ॥ सीता सौमित्र पाहती ॥१३॥
महाप्रलयीं सर्व निरसून ॥ एक परब्रह्म उरे निर्वाण ॥ तैसा दशकंठदर्पहरण ॥ एकला रणीं विराजे ॥१४॥
कीं सर्व निरसोनि कर्मजाळ ॥ निवृत्तितटीं संत निश्र्चळ ॥ तैसा राम तमालनीळ ॥ एकला रणीं विराजे ॥१५॥
कीं गिळोनि सर्व नक्षत्रांसीं ॥ एकला मित्र निरभ्राकाशीं ॥ त्यापरी सीतामनचकोरशशी ॥ एकला रणीं विराजे ॥१६॥
बहुत काष्ठें जाळोनि अग्न ॥ एकला उरे दैदीप्यमान ॥ त्याचपरी कौसल्यानंदन ॥ एकला रणीं विराजे ॥१७॥
शब्दध्वनि निरसुनी ॥ एकलाचि अर्थ बैसे मनीं ॥ कीं जडत्व सांडोनि धरणी ॥ क्षमारूप उरे जेवीं ॥१८॥
कीं शीतळत्व सांडोनि जळ ॥ जीवनत्व उरे निर्मळ ॥ दाहकत्व सांडोनि तेज समूळ ॥ प्रकाशरूपें उरे जैसें ॥१९॥
कीं समीरें सांडोनि चंचळपण ॥ एक पवनत्व उरे पूर्ण ॥ कीं शून्यत्व सांडोनि गगन ॥ व्यापकत्व उरे जैसें ॥२२०॥
कीं शब्दजाल निरसोनि समस्त ॥ वेदस्वरूपीं होय समाधिस्थ ॥ तैसा असुर संहारोनि रघुनाथ ॥ उभा निःशब्द उगाचि ॥२१॥
काम क्रोध आणि मत्सर ॥ हेचि त्रिशिरा दूषण खर ॥ रणीं संहारोनि समग्र ॥ निजभक्त सुखी राखिले ॥२२॥
दुर्वासना हेचि शूर्पणखा ॥ विरक्तिशस्त्रें घेवोनि देखा ॥ बोध लक्ष्मण रामसखा ॥ निर्नासिका केली तेणें ॥२३॥
आशा मनशा कल्पना ॥ भ्रांती भुली इच्छा तृष्णा ॥ त्या देखोनि बोधलक्ष्मणा ॥ पळत्या जाहल्या राक्षसी ॥२४॥
झाडलिया जैसा केर ॥ शुद्ध दिसे जेवीं मंदिर ॥ तैसें दंडकारण्य गोदातीर ॥ असुररहित जाहलें ॥२५॥
स्थूळ लिंग आणि कारण ॥ निरसोनि उरे शुद्ध ज्ञान ॥ तैसें जनस्थानीं ब्राह्मण ॥ सुखें नांदों लागले ॥२६॥
ब्राह्मण मारतील म्हणोनी शूर्पणखा घेऊन राक्षसिणी ॥ भेणें पळाली तेथूनि ॥ लंकेस जाऊन शंख करी ॥२७॥
सेवक सांगती दशमुखा ॥ निर्नासिकी जाहली शूर्पणखा ॥ शंख करी तेणें लंका ॥ दुमदुमली समग्र ॥२८॥
मग तीस पाचारोन रावण ॥ एक तीं पुसे वर्तमान ॥ ती म्हणे राम लक्ष्मण ॥ जनस्थानीं आलेरे ॥२९॥
लक्ष्मणें गौरविलें मजलागुनी तुझी भगिनी म्हणोनी ॥ त्रिशिरा खर दूषण समरंगणी ॥ सहपरिवारें वधियेले ॥२३०॥
शंबरीस वधोन सवेग ॥ सौमित्रें नेले काळखड्ग ॥ चालो लागले सन्मार्ग ॥ याग जप तप आणि व्रतें ॥३१॥
गोदातीर जनस्थान ॥ तेथें सुखें नांदती ब्राह्मण ॥ अखंड करिती वेदाध्ययन ॥ निःशंक पूर्ण सर्वदा ॥३२॥
आतां तुझी लंका घेऊन ॥ हेही ब्राह्मणासी देईल दान ॥ जळो तुझी आंगवण ॥ कासयाय वदन दाविसी ॥३३॥
तुझ्या उरावरी धनुष्य पडिलें ॥ तें क्षणमात्रें रामें भंगिलें ॥ तेव्हांच तुझें काळें वदन जाहलें ॥ सकळ रायां देखतां ॥३४॥
सीतेसारखी नोवरी ॥ नाहीं ब्रह्मांडमंडपामाझारी ॥ ते हातींची दवडोनि निर्धारीं ॥ पळोन येथें आलासी ॥३५॥
तरीच तुझा पुरुषार्थ जनीं ॥ जरी सीता आणिसी हिरोनी ॥ तिचें सौंदर्य रूप पाहोनी ॥ वनचरेंही भुलती ॥३६॥
ऐसी शूर्पणखा अनुवादली ॥ मग तें रावणे संबोखिली ॥ तेव्हां मनामाजी ते वेळीं ॥ युक्ति सुचविता पैं जाहला ॥३७॥
म्हणे मृगवेष धरूनि निर्मळ ॥ पाठवूं मारीच मातुळ ॥ मृग वधाया तत्काळ ॥ काकुत्स्थ जाईल वनातें ॥३८॥
मग आणूं जानकी दिव्यरत्न ॥ ऐसें विचारी द्विपंचवदन ॥ असो इकडे जानकी लक्ष्मण ॥ पर्वताखालीं उतरलीं ॥३९॥
सद्रद होवोनि जनकनंदिनी ॥ मिठी घाली राघवचरणीं ॥ म्हणे धन्य लीला दाखविली नयनीं ॥ अतर्क्य करणी वेदशास्त्रां ॥२४०॥
जाहले उदंड अवतार ॥ परी कोणाचे परतले नाहीं शर ॥ तों ऋषि धांवले समग्र ॥ श्रीरामचंद्र वेष्टिला ॥४१॥
म्हणती कौसल्यागर्भरत्ना ॥ जलदगात्रा शतपत्रनयना ॥ ताटिकांतका मखपाळणा ॥ भवमोचना भवहृदया ॥४२॥
जयजयकार करिती ऋषीश्र्वर ॥ पूर्ण ब्रह्मानंद रघुवीर ॥ अभंगविजयी श्रीधर ॥ शरयु तीरविहारी जो ॥४३॥
स्वस्ति श्रीरामविजयग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकनाटकाधार ॥ सदा परिसोत पंडित चतुर ॥ चतुर्दशाध्याय गोड हा ॥ २४४॥ 

 






॥श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु॥ 

Monday, October 24, 2011

RamVijay Adhyay - 13


श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

संस्कृतापासोनि केवळ ॥ झाली प्राकृत भाषा रसाळ ॥ कीं स्वातीजळापासोनि मुक्ताफळ ॥ अतितेजाळ निपजे पैं ॥१॥
चंद्राचे अंगीं निपजे चांदणें ॥ कीं दिनकरापासाव जेवीं किरणें ॥ कीं जंबुनदापासाव सोनें ॥ बावनकसी निपजे पैं ॥२॥
कीं दुग्धापासोनि नवनीत ॥ कीं अभ्यासापासोनि मति अद्भुत ॥ कीं इक्षुदंडापासोनि निपजत ॥ रसभरित शर्करा ॥३॥
कीं पुष्पापासोनि परिमळ ॥ कीं रंभेपासोनि कर्पूर शीतळ ॥ मृगापासोनि परिमळ ॥ मृगमद जेवीं निपजें पैं ॥४॥
कथालक्षण सरितानाथ ॥ साहित्यतरंग अपरिमित ॥ प्रेमळ लहरिया अद्भुत ॥ ऐक्या येत परस्परें ॥५॥
अमृताहून गोड अन्न ॥ परि रुचि नये शाकेविण ॥ दृष्टांताविण ग्रंथ संपूर्ण ॥ रसीं न चढे सर्वथा ॥६॥
रत्नखाणी मेरुपाठारीं ॥ तैसें दृष्टांत कथांमाझारीं ॥ कमलावांचोनि सरोंवरीं ॥ शोभा नये सर्वथा ॥७॥
अलंकारें शोभे नितंबिनी ॥ कीं गगन मंडित उडुगणीं ॥ कीं मानससरोवरा हंसांवांचोनी ॥ शोभा नयेचि सर्वथा ॥८॥
कीं मननाविण श्रवण ॥ कीं सद्भावाविण कीर्तन ॥ कीं क्षेत्र जैसे बीजाविण ॥ दृष्टांतांविण ग्रंथ तैसा ॥९॥
कीं सभा जैसी पंडितांविण ॥ कीं सुस्वराविण गायन ॥ कीं शुचीविण तपाचरण ॥ दृष्टांतांविण ग्रंथ तैसा ॥१०॥
कीं विरक्तीविण ज्ञान ॥ की प्रेमाविण व्यर्थ भजन ॥ कीं दानाविण भाग्य पूर्ण ॥ दृष्टांताविण ग्रंथं तैसा ॥११॥
अरण्यकांड अरण्यांत ॥ दृष्टांतवृक्ष विराजत ॥ तेथें आनंदफळें पंडित ॥ सदा सेवोत स्वानंदें ॥१२॥
आतां अरण्यकांड वसंतवन ॥ तेथें वाग्देवी चिच्छक्ति पूर्ण ॥ क्रीडा करी उल्हासेंकरून ॥ संतसज्जन परिसा तें ॥१३॥
असो चित्रकूटाहूनि अयोध्यानाथ ॥ सीतासौमित्रांसमवेत ॥ निजभक्तांसी उद्धरित ॥ जगन्नाथ जातसे ॥१४॥
दक्षिणपंथें जनकजामात ॥ सकळ ऋषींच आश्रम पहात ॥ त्रयोदश वर्षेंपर्यंत ॥ रघुनाथ क्रमित ऐसेंचि ॥१५॥
कोठें वर्ष कोठें अयन ॥ कोठें मास कोठें पक्ष पूर्ण ॥ कोठें एक रात्र पक्ष त्रिदिन ॥ कोठें पंच रात्री क्रमियेल्या ॥१६॥
मग अत्रीचिया आश्रमाप्रांति ॥ येता झाला जनकजापती ॥ तों देखिली दत्तात्रेयमूर्ति ॥ अविनाशस्थिति जयाचि ॥१७॥
सह्याद्रीवरी श्रीराम ॥ अजअजित मेघश्याम ॥ श्रीदत्तात्रेय पूर्ण ब्रह्म ॥ देत क्षेम तयातें ॥१८॥
क्षीरसागरींच्या लहरिया ॥ परस्परें समरसोनियां ॥ कीं जान्हवी आणि मित्रतनया ॥ एके ठायीं मिळताती ॥१९॥
कीं नानावर्ण गाई ॥ परी दुग्धास दुजा वर्ण नाहीं ॥ तैसा जनकाचा जांवई ॥ आणि अत्रितनय मिसळले ॥२०॥
अवतारही उदंड होती ॥ सर्वेचि मागुती विलया जाती ॥ तैसी नव्हे श्रीदत्तात्रेयमूर्ति ॥ नाश कल्प ती असेना ॥२१॥
पूर्णब्रह्म मुसावलें ॥ तें हें दत्तात्रेयरूप ओतिलें ॥ ज्याचे विलोकनमात्रें तरले ॥ जीव अपार त्रिभुवनीं ॥२२॥
सकळ सिद्ध ऋषी निर्जर ॥ विधि वाचस्पती शचीवर ॥ दत्तात्रयदर्शना साचार ॥ त्रिकाळ येती निजभावें ॥२३॥
अद्यापि सह्याद्रीपर्वतीं ॥ देवांचे भार उतरती ॥ सर्व ब्रह्मांडींचीं दैवतें धांवती ॥ अवधूतमूर्ति पहावया ॥२४॥
घेतां दत्तात्रयदर्शन ॥ देवांसी सामर्थ्य चढे पूर्ण ॥ मग ते इतरांसी होती प्रसन्न ॥ वरदान द्यावयातें ॥२५॥
ज्यासी प्रयागीं प्रातःस्नान ॥ पांचाळेश्र्वरीं अनुष्ठान ॥ करवीरपुरांत येऊन ॥ भिक्षाटण माध्यान्हीं ॥२६॥
अस्ता जातां वासरमणि ॥ सह्याद्रीस जाती परतोनी ॥ तो देवांचे भार कर जोडोनी ॥ वाट पहाती अगोदर ॥२७॥
दुष्टी देखतां दिगंबर ॥ एकचि होय जयजयकार ॥ असंख्य वाद्यांचे गजर ॥ अद्यापि भक्त ऐकती ॥२८॥
दत्तात्रेयभक्त देखतां दृष्टीं ॥ सकळ दैवतें जीं जीं सृष्टी ॥ त्याचे पाय घालिती मिठी ॥ पुढें ठाकती कर जोडूनि ॥२९॥
करितां दत्तात्रेयस्मरण ॥ भूतप्रेतें पळतीं उठोन ॥ मग उपासकांसी विघ्न ॥ कवण करूं शकेल ॥३०॥
असो ऐसा स्वामी अवधूत ॥ जो अत्रीचा महापुण्यपर्वत ॥ तयास वंदोनि रघुनाथ ॥ अत्रिदर्शन घेतसे ॥३१॥
तंव ते अनसूया सती ॥ सीता राम तियेसी वंदिती ॥ सीतेसी आलिंगूनि प्रीतीं ॥ वर देती जाहली ॥३२॥
आपुले निढळीचें कुंकुम काढिलें ॥ तें सीतेचे कपाळीं लाविलें ॥ अमलवस्त्र नेसविलें ॥ जे न मळे न विटे कल्पांतीं ॥३३॥
गळां घातला सुमनहार ॥ जो कधीं न सुके साचार ॥ जैसा नित्य नूतन दिनकर ॥ तेज अणुमात्र ढळेना ॥३४॥
सीतेचें सुवास शरीर ॥ अनसूया करी निरंतर ॥ ज्या सुवासें अंबर ॥ परिपूर्ण होय पैं ॥३५॥
भेटतां राक्षस दुर्धर ॥ सीतेसी भय न वाटे अणुमात्र ॥ ऐसा दिधला निर्भय वर ॥ अनसूयेनें तेधवां ॥३६॥
सवेंचि रेणुकेचें दर्शन ॥ घेत रविकुळभूषण ॥ जिच्या वरें भार्गवें पूर्ण ॥ निःक्षत्री केली धरित्री ॥३७॥
ते मूळपीठनिवासिनी शक्ति ॥ तीस वंदी अयोध्यापति ॥ ते श्रीरामाची मूळप्रकृती ॥ आदिमाया निर्धारें ॥३८॥
ते प्रथमअवताराची जननी ॥ तीच कौसल्या झाली दुसरेनि ॥ श्रीराम स्तवी म्हणोनी ॥ ऐका श्रवणीं सादर ॥३९॥
जयजय आदिकुमारिके ॥ जयजय मूळपीठनायिके ॥ सकळ कल्याणसौभाग्यदायिके ॥ जगदंबिके मूळप्रकृति ॥४०॥
जयजय भार्गवप्रियभवानी ॥ भवनाशके भक्तवरदायिनी ॥ सुभद्रकारके हिमनगनंदिनी ॥ त्रिपुरसुंदरी महामाये ॥४१॥
जयजय आनंदकासारमराळिके ॥ जयजय चातुर्यचंपककळिके ॥ जयजय शुंभनिशुंभदैत्यांतके ॥ सर्वव्यापके मृडानी ॥४२॥
जयजय शिवमानसकनकलतिके ॥ पद्मनयने दुरितवनपावके ॥ जयजय त्रिविधतापमोचके ॥ निजजनपालके अन्नपूर्णें ॥४३॥
तव मुखकमलशोभा देखोनी ॥ इंदुबिंब गेलें विरोनी ॥ ब्रह्मादिकें बाळें तिन्हीं ॥ स्वानंदसदनीं निजविसी ॥४४॥
जीव शिव दोनी बाळकें ॥ अंबे तुवां निर्मिलीं कौतुकें ॥ जीव तुझें स्वरूप नोळखे ॥ म्हणोनि पडिला आवर्तीं ॥४५॥
शिव तुझे स्मरणीं सावचित्त ॥ म्हणोनि तो नित्यमुक्त ॥ ब्रह्मानंद पद हातां येत ॥ तुझे कृपेनें जननीय ॥४६॥
मेळवूनि पंचभूतांचा मेळ ॥ तुवां रचिला ब्रह्मांडगोळ ॥ इच्छा परततां तत्काळ ॥ क्षणांत निर्मूळ करिसी तूं ॥४७॥
ऐसें स्तवोनि चापपाणि ॥ सह्याद्रीवरी दिनत्रय क्रमोनि ॥ अत्रिऋृषीची आज्ञा घेऊनि ॥ दक्षिणपंथे चालिले ॥४८॥
अत्रि म्हणे गा रघुपति ॥ या वनीं राक्षस बहु वसती ॥ जतन करी सीता सती ॥ क्षणही परती न कीजे ॥४९॥
अवश्य म्हणोनि जलजनेत्र ॥ पुढें चालिला स्मरारिमित्र ॥ पाठीसी भोगींद्रअवतार ॥ वीर सौमित्र जातसे ॥५०॥


त्यामागें मंगळभगिनी ॥ मंगळकारक विश्र्वजननी ॥ स्थिर स्थिर हंसगमनी ॥ मंगळजननीवरी चाले ॥५१॥
दुरावतां भूमिकन्या ॥ सौमित्र म्हणे राजीवनयना ॥ जानकी मागें राहिली मनमोहना ॥ उभा राहें क्षणभरी ॥५२॥
वचन ऐकतां जगन्नायक ॥ उभा राहिला क्षण एक ॥ परम उदार सुहास्यमुख ॥ परतोनि पाहे सीतेकडे ॥५३॥
तंव ते सुकुमार जनकबाळी ॥ हळूहळू आली जवळी ॥ जेंवी सारासार विचार नेहाळी ॥ आत्मसुखाची पाविजे ॥५४॥
असो ते पतिव्रतामंडन ॥ विलोकी श्रीरामाचें वदन ॥ जयावरून कोटी मदन ॥ ओंवाळून टाकावे ॥५५॥
परम सलज्ज होऊन ॥ केलें किंचित हास्यवदन ॥ जेणें निवती राघवकर्ण ॥ ऐसें वचन बोलली ॥५६॥
म्हणे जगद्वंद्या रविकुळभूषणा ॥ विषकंठहृदयाचिन्मयलोचना ॥ चरणीं चालतां रघुनंदना ॥ बहुत श्रम पावलेती ॥५७॥
परम सुकुमार लक्ष्मण ॥ चरणीं पावला शीण ॥ वृक्षच्छायेसि जाऊन ॥ गुणसागरा बैसावें ॥५८॥
रातोत्पल सुकुमार ॥ त्याहूनि पदें तुमची अरुवार ॥ अरुणसंध्यारागमित्र ॥ चरणतळवे सुरवाडले ॥५९॥
जें जान्हवीचें जन्मस्थान ॥ तें मी निजकेशीं झाडीन ॥ शीतोदकें धुवोन ॥ मग चुरीन क्षणभरी ॥६०॥
आजिचें पेणें किती दूर ॥ आहे तें नकळे साचार ॥ ऐकतां पद्माक्षीचें उत्तर ॥ द्रवला रघुवीर अंतरीं ॥६१॥
म्हणे सुकुमार चंपककळी ॥ चरणीं चालतां बहु श्रमली ॥ ऐसें बोलतां नेत्रकमळीं ॥ अश्रु आले राघवाचे ॥६२॥
मग आपुलें हस्तें करून ॥ कुरवाळिलें सीतेचें वदन ॥ मस्तकीं हस्त ठेवून ॥ श्रम संपूर्ण हरियेला ॥६३॥
परम सुखावली जनकनंदिनी ॥ श्रीरामाचीं पदें झाडूनि ॥ मग आपुल्या मुक्तकेशेंकरूनि ॥ प्रक्षाळूनि चरण चुरीतसे ॥६४॥
मग उठोनि चालिला रघुवीर ॥ पाठीसी उभा भूधरावतार ॥ त्याचेमागें जनकजा सुंदर ॥ हंसगती चमकतसे ॥६५॥
वनचरें वैरभाव सांडोनि ॥ होतीं ते पळतीं भयेंकरूनि ॥ विराध राक्षस ते क्षणीं ॥ आला धांवूनि अकस्मात ॥६६॥
महाभयानक विशाळ शरीर ॥ खदिरांगार तैसे नेत्र ॥ कपाळीं चर्चिला शेंदूर ॥ बाबरझोटी मोकळिया ॥६७॥
जैसा अग्नीचा ओघ थोर ॥ तैसी जिव्हा लवलवित बाहेर ॥ काजळाचा पर्वत थोर ॥ तैसें शरीर दिसतसे ॥६८॥
गळा नरमुंडांच्या माळा ॥ हातीं शूल ऊर्ध्व धरिला ॥ सिंहगजवनचरांचा मेळा ॥ टोंचिल्या माळा शूलावरी ॥६९॥
शतांचे शत ब्राह्मण ॥ रगडी दाढेखालीं घालून ॥ वाटेंसी लत्ताप्रहारेंकरूनी ॥ वृक्ष पाडी समूळीं ॥७०॥
पुढें जातसे रघुनाथ ॥ मागोनि विराध आला धांवत ॥ जानकी धरूनि अकस्मात ॥ जात झाला ते वेळीं ॥७१॥
जैसा गृहीं तस्कर रिघोनी ॥ धनकुंभ जाय घेऊनि ॥ कीं अकस्मात व्याघ्र येऊनि ॥ नेत उचलानि हरिणीतें ॥७२॥
कीं होमशाळेंत रिघे श्र्वान ॥ जाय चरुपात्र घेऊन ॥ तैसा विराध दुर्जन ॥ जात वेगेंकरूनियां ॥७३॥
करुणास्वरें करूनि देखा ॥ जानकी म्हणे मित्रकुळटिळका ॥ धांव धांव अयोध्यानायका ॥ जगव्यापका दीनबंधु ॥७४॥
परतोनि पाहे राजीवाक्ष ॥ तों सघन लागले वनीं वृक्ष ॥ नयनीं न दिसे प्रत्यक्ष ॥ कोणीकडे गेला तो ॥७५॥
क्षण न लागतां लक्ष्मण ॥ धनुष्यासी योजिला अर्धचंद्र बाण ॥ तत्काळ वृक्ष छेदून ॥ केलें वन निर्मूळ ॥७६॥
धनुष्य चढवोनि जनकजामातें ॥ पाचारिलें तेव्हां विरोधातें ॥ जैसा मृगेंद्र महागजातें ॥ तैसी लक्ष्मणें हांक फोडली ॥७७॥
अरे राक्षसा धरीं धीर ॥ माझा बाण घटोद्भव थोर ॥ तुझे आयुष्यसागराचें नीर ॥ प्राशील आतां निर्धारें ॥७८॥
महाव्याघ्राचा विभाग देख ॥ कैसा नेऊन वांचेल जंबुक ॥ आदित्याच्या कळा मशक ॥ तोडील कैसा निजांगें ॥७९॥
काळाचें हातींचा दंड अभंग ॥ केविं नेऊं शके झोटिंग ॥ वासुकीचा विषदंत सवेग ॥ दुर्दुर केवीं पाडीं पां ॥८०॥
विराध म्हणे तूं मानव धीट ॥ गोष्टी सांगतोसी अचाट ॥ तरी तुझें करीन पिष्ट ॥ मुष्टिघातें आतांचि ॥८१॥
ऐसें राक्षस बोलून ॥ जानकीस खालीं ठेवून ॥ धाविन्नला पसरूनि वदन ॥ रामसौमित्रांवरी तेधवां ॥८२॥
करीं धांवत्या वायूंचें खंडण ॥ ऐसें रामें सोडिले दोन बाण ॥ त्यांहीं दोनी भुजा उडवून ॥ गेले घेवोन निराळपंथें ॥८३॥
सवेंचि सूर्यमुखशरें ॥ शीर छेदिलें कौसल्याकुमरें ॥ विमानीं देव जयजयकारें ॥ पुष्पसंभार वर्षती ॥८४॥
विराध पावला दिव्य शरीर ॥ रामासी विनवी जोडूनि कर ॥ म्हणे मी गंधर्व तुंबर ॥ नाम माझें रघुवीरा ॥८५॥
गायन करावया वहिलें ॥ यक्षपतीनें बोलाविलें ॥ तंव म्यां मद्यपान केलें ॥ भ्रांत झालें शरीर माझें ॥८६॥
कंठीं न उमटतां स्वर ॥ मग कुबेरें सोडिलें शापशस्त्र ॥ म्हणे तूं होय निशाचर ॥ महाघोर वनांतरीं ॥८७॥
मग म्यां करुणा भाकितां थोर ॥ उच्छाप बोलिला कुबेर ॥ तुज वनीं वधील रघुवीर ॥ तैं उद्धार होय तुझा ॥८८॥
राघवा वर्षें दहा सहस्र ॥ मी विचरें येथें रजनीवर ॥ माझ्या भेणें दशशिर ॥ चळचळां थोर कांपतसे ॥८९॥
असो माझा उद्धार झाला येथ ॥ म्हणोनि वंदिलें रघुनाथातें ॥ विमानीं बैसोनि त्वरितें ॥ स्वस्थानासी पावला ॥९०॥
विराध रामें मारितां वनीं ॥ चहूंकडे पसरली कीर्तिध्वनी ॥ जैसे तैल पडतां जीवनीं ॥ जाय पसरोनि क्षणार्धें ॥९१॥
कीं सुपुत्रीं दान देतां निर्मळ ॥ कीर्तीनें भरे भूमंडळ ॥ कीं दुर्जनासी गुह्य केवळ ॥ सांगतां पसरे चहूंकडे ॥९२॥
कीं कुलवंतासी उपकार ॥ करितां कीर्ति वाढे सविस्तर ॥ कीं संतसमागमें अपार ॥ दिव्य ज्ञान प्रगटे पैं ॥९३॥
असो जानकी सप्रेम येऊन ॥ वंदी श्रीरामाचे चरण ॥ म्हणे तुमचा पराक्रम आणि संधान ॥ आजि म्यां दृष्टीं पाहिलें ॥९४॥
विराध उद्धरूनि जातां ॥ तेणें प्रार्थिलें रघुनाथा ॥ स्वामी तव दर्शनीं आस्था ॥ शरभंगऋृषीनें धरिली असे ॥९५॥
हंसविमान घेऊनि इंद्र ॥ त्यासी मूळ आला साचार ॥ परी तुज पाहिल्याविण मुनीश्र्वर ॥ नवजायचि ब्रह्मपदा ॥९६॥
केव्हां उगवेल रोहिणीवर ॥ म्हणोनि इच्छिती चकोर ॥ तैसा दृष्टीं पहावया रामचंद्र ॥ शरभंग ऋृषि इच्छितसे ॥९७॥
ऐसें विराधें सांगून ॥ मग तो गेला उद्धरून ॥ त्याचे आश्रमासी रघुनंदन ॥ जाता झाला ते काळीं ॥९८॥
मग पुढें जात रघुनंदन ॥ मागें येत जानकी चिद्रत्न ॥ तिचे पाठिसीं लक्ष्मण ॥ चहूंकडे पहातसे ॥९९॥
आणीक येतील रजनीचर ॥ म्हणोनि चापासी लाविला शर ॥ बळिया सुमित्राकुमर ॥ पाठिराखा येतसे ॥१००॥


तों वृक्षच्छायेसी क्षणक्षणां ॥ ठायीं ठायीं बैसे पद्मनयना ॥ श्र्वास टाकोनि म्हणे लक्ष्मणा ॥ कांहो राहाना आजि कोठें ॥१॥
तों वृक्षातळीं सर्वसाक्षी ॥ जो चराचरचित्तपरीक्षी ॥ पद्माक्षीचा मार्ग लक्षी ॥ उभा राहूनि क्षणैक ॥२॥
पुढें शरभंगाच्या आश्रमा रघुवीर ॥ येता झाला दयासागर ॥ चहूंकडोन धांवले ऋषीश्र्वर ॥ जैसे पूर गंगेचे ॥३॥
सांडोनि समाधि तपाचरण ॥ लगबगां धांवती ब्राह्मण ॥ शरभंग निघे वेगेंकरून ॥ रामदर्शना ते काळीं ॥४॥
शरभंग महाऋषी ॥ परी गलितकुष्ठ भरला त्यासी ॥ दिव्य शरीर धरूनि भेटीसी ॥ येता झाला श्रीरामाचे ॥५॥
पहिलें शरीर झांकून ॥ घरीं ठेवी तो ब्राह्मण ॥ क्षणभरी दिव्य रूप धरून ॥ रामदर्शना पातला ॥६॥
असो देखोन ऋषीश्र्वरांचे भार ॥ साष्टांग नमित रामसौमित्र ॥ शरभंगासहित विप्र ॥ राघवेंद्रें आलिंगिले ॥७॥
शरभंगाच्या आश्रमांत ॥ राहते झाले रघुनाथ ॥ सीतासौमित्रसमवेत ॥ राम पूजिला शरभंगें ॥८॥
लक्ष्मण ऋषीतें पुसत ॥ कंथेखालीं काय कांपत ॥ शरभंग उघडोनि दावित ॥ सौमित्रातें तेधवां ॥९॥
म्हणे हें कर्मशरीर भोगिल्याविण ॥ न तुटे कदा देहबंधन ॥ राजा रंक हो साधु सज्ञान ॥ कर्म गहन सोडीना ॥११०॥
चिळस उपजली लक्ष्मणा ॥ म्हणे वर मागा जी रघुनंदना ॥ ऋषि म्हणे उष्णोदकस्नाना ॥ मज ते न मिळे सर्वथा ॥११॥
शीतोदकें स्नान नित्य ॥ तेणें शरीर हें उलत ॥ ऐसें ऐकोनि अवनिजाकांत ॥ काय बोले ऋृषीतें ॥१२॥
असो तुम्हांसी उदक होऊन ॥ प्रातःकाळीं करूं गमन ॥ तों रात्रि संपतां चंडकिरण ॥ उदयाचळीं उगवला ॥१३॥
ऋषिआज्ञा घेऊनि त्वरित ॥ पुढें चालिला रघुनाथ ॥ ऋषिवचनाचा विसर पडत ॥ श्रीराम येत गौतमीतीरा ॥१४॥
गौतमींत करिता स्नान ॥ तों आठवलें ऋषीचें वचन ॥ मग धनुष्यासि लावून अग्निबाण ॥ सोडिला क्षण न लागतां ॥१५॥
चपळऐसा बाण आला ॥ ऋषिआश्रमापुढें कूप केला ॥ बाण प्रवेशला पाताळा ॥ कूप उचंबळला उष्णोदकें ॥१६॥
तेथें एकेचि स्नानें साचार ॥ ऋषीचें झाले दिव्य शरीर ॥ मग विमानीं बैसवूनि विप्र ॥ शक्रें नेला अमरलोका ॥१७॥
मग सुतीक्षणाच्या आश्रमाप्रति ॥ जाता झाला जनकजापती ॥ मार्गीं तापसी बहुत मिळती ॥ श्रीरामाच्या समागमें ॥१८॥
नाना प्रकारचे तापसी ॥ कित्येक ते वृक्षाग्रवासी ॥ एक वृद्ध अत्यंत वाचेसी ॥ शब्द न फुटे बोलतां ॥१९॥
एक दंतहीन बहुसाल ॥ फळें ठेंचावया कांखेसी उखळ ॥ नग्न मौनी जटाधारी सकळ ॥ दुग्धाहारी फळहारी ॥१२०॥
असो सुतीक्ष्णआश्रमासी ॥ आला शरयूतीरनिवासी ॥ मग परमानंद होत ऋषींसी ॥ रघुपतीसी भेटती ॥२१॥
तेथें क्रमोनि तीन दिन ॥ त्रिनयनहृदयजीवन ॥ त्रिभुवनपति रघुनंदन ॥ पुढें तेथोनि चालिला ॥२२॥
तों गौतमीतीर पावन ॥ पाहतां पांचाळेश्र्वर रम्य स्थान ॥ तेथें भूमींतून गायन ॥ रामचंद्रें ऐकिलें ॥२३॥
रघुत्तमातें सांगती तापसी ॥ येथें मंदकर्ण महाऋषी ॥ परम तपिया तेजोराशि ॥ जैसा आकाशीं भास्कर ॥२४॥
क्षय करावया तपातें ॥ पांच अप्सरा अमरनाथें ॥ पाठवितां ऋषी त्यांतें ॥ देखोनियां भाळला ॥२५॥
भूगर्भविवर कोरून ॥ त्यांचें सर्वदा ऐके गायन ॥ त्याकरितां उर्वींमधून ॥ ध्वनी उमटती राघवा ॥२६॥
असो ऋषि पाह ज्ञानीं ॥ श्रीराम आला कळलें मनीं ॥ मग विवरद्वार उघडोनि ॥ बाहेर आला भेटावया ॥२७॥
रामें वंदिले ऋषीचे चरण ॥ आदरें भेटले दोघेजण ॥ मग आश्रमातें नेऊन ॥ मित्रकुळभूषणा पूजिलें ॥२८॥
तेथें क्रमोनि एक रात्र ॥ पुढें चालिला मदनारिमित्र ॥ नवमेघरंग रघुवीर ॥ सुतीक्ष्णआश्रमा पावला ॥२९॥
मग अगस्तीचें दर्शन ॥ घ्यावया उदित रघुनंदन ॥ तों महाऋषि सुतीक्ष्ण ॥ पुरुषार्थ सांगे अगस्तीचा ॥१३०॥
आतापी वातापी इल्वल ॥ तिघे दैत्य परम सबळ ॥ शिववरें महाखळ ॥ कापट्य सकळ जाणती ॥३१॥
अन्नरूप होय एक ॥ दुजा निजांगें होय उदक ॥ एक अन्नदाता देख ॥ होऊनि बैसले वनांतरीं ॥३२॥
आतापी अन्नदाता पूर्ण ॥ प्रार्थूनि आणी ब्राह्मण ॥ पूजा करूनि उदकपान आदरेंसी समर्पिती ॥३३॥
मग आतापी बाहे नाम घेऊन ॥ वातापी इल्वल दोघेजण ॥ मग ते विप्राचें पोट फोडून ॥ येती धांवून बाहेरी ॥३४॥
ऐसे असंख्यात द्विजगण ॥ भक्षिलें तिहीं मारून ॥ मग कलशोद्भवासी शरण ॥ सकळ ब्राह्मण गेलें पैं ॥३५॥
मग तो महाराज घटोद्भव ॥ जयासी शरण स्वर्गींचे देव ॥ ऋषिकैवारी करुणार्णव ॥ दैत्यस्थाना पातला ॥३६॥
तंव तो धरी अगस्तीचे चरण ॥ म्हणे आश्रम करा जी पावन ॥ अन्न अथवा फळ सेवून ॥ शीतळ जीवन प्राशिजे ॥३७॥
मुखीं सदा वेदाध्ययन ॥ पाठीसी सदा धनुष्यबाण ॥ तंव आतापी ब्राह्मण ॥ कापट्यवेषें पातला ॥३८॥
शुभ्र धोत्रे यज्ञोपवीत ॥ टिळे कुशमुद्रा मिरवत ॥ धोत्रें ओलीं सरसावित ॥ क्षमा बहुत धरिलीसे ॥३९॥
लटिकाचि दावी आचार ॥ परी अंतरीं दुराचार ॥ वृंदावनफळ सुंदर ॥ अंतरीं काळकूट भरलेंसे ॥१४०॥
कीं वरीच जेवीं जारिण ॥ दावी भ्रतारसेवा करून ॥ कीं शठमित्राचें लक्षण ॥ आरंभीं वचन गोड पैं ॥४१॥
कीं बचनाग मुखीं घालितां ॥ प्रथम गोड वाटे तत्वतां ॥ कीं साव चोर गांवीं असतां ॥ बहुत स्नेह वाढवी ॥४२॥
कीं विषकुंभ भरला समस्त ॥ वरी अमृत घातलें किंचित ॥ कीं दांभिक शिष्य दावित ॥ गुरुसेवा वरी वरी ॥४३॥
कुसुंब्याचा आरक्त रंग ॥ आरंभीं दावी सुरंग ॥ किंवा नटें धरिलें सोंग ॥ विरक्ताचें व्यर्थ पैं ॥४४॥
तैसा आतापी मावकर ॥ ऋषीस दावी बहुत आदर ॥ वरी शब्द रसाळ फार ॥ अंतरीं कातर दुरात्मा ॥४५॥
असो आतापी कापट्यवेषी ॥ आश्रमा नेत अगस्तीसी ॥ वातापी फळें वेगेंसीं ॥ होऊनियां बैसला ॥४६॥
अगस्तीनें भक्षिलीं फळें ॥ उदक नाहीं जों प्राशिलें ॥ तों कापट्य अवघे समजलें ॥ काय केलें कलशोद्भवें ॥४७॥
उदरावरी फिरवूनि हस्त ॥ दैत्य भस्म केला पोटांत ॥ दोघे नाम घेऊनि बाहत ॥ बाहेर त्वरित ये आतां ॥४८॥
तंव तो नेदी प्रत्युत्तर ॥ तंव दोघे रूप धरिती थोर ॥ महाविक्राळ भयंकर ॥ धांवले सत्वर ऋषीवरी ॥४९॥
धनुष्या चढवोनि गुण ॥ अगस्तीनें सोडिला बाण ॥ वातापीचें शिर छेदून ॥ नेलें उडवोनि आकाशीं ॥१५०॥

दोघे निमाले देखोन ॥ इल्वल पळाला तेथून ॥ तंव तो घटोद्भव क्रोधायमान ॥ पाठीं लागला तयाचे ॥५१॥
पळतां सरली अवघी जगती ॥ परी पाठ न सोडी अगस्ती ॥ तंव तो उदक होऊनि कापट्यगती ॥ समुद्रजळीं मिसळला ॥५२॥
क्रोधायमान ऋषीश्र्वर ॥ तत्काळ पसरूनि दोन्ही कर ॥ आचमन करूनि सागर ॥ उदरामाजी सांठविला ॥५३॥
म्हणे उदारा रघुपति ॥ ऐसा पुरुषार्थी अगस्ति ॥ त्याची भेटी घेऊनि निश्र्चिंतीं ॥ सीतापति पुढें जाय तूं ॥५४॥
मग सुतीक्ष्णाची आज्ञा ॥ घेऊनियां रामराणा ॥ चालिला कर्दळीवना ॥ अगस्तीच्या आश्रमाप्रति ॥५५॥
तों मार्गीं अगस्तीचा बंधु ॥ महामतीनाम तपसिंधु ॥ त्याचे आश्रमीं आनंदकंदु ॥ सीतावल्लभ राहिला ॥५६॥
तेथें क्रमोनि एक दिन ॥ पुढें जात रविकुळभूषण ॥ तों देखिलें अगस्तीचें वन ॥ शोभायमान सदाफळ ॥५७॥
छाया शीतळ सघन ॥ माजी न दिसे सूर्यकिरण ॥ नारळी पोफळी रातांजन ॥ गेले भेदोनि गगनातें ॥५८॥
अशोक वृक्ष उतोतिया ॥ रायआंवळे खिरणिया ॥ निंब वट पिंपळ वाढोनियां ॥ सुंदर डाहाळिया शोभती ॥५९॥
डाळिंबें सांवरी पारिजातक मांदार ॥ चंदन मोहवृक्ष अंजीर ॥ चंपक जाई जुई परिकर ॥ बकुळ मोगरे शोभती ॥१६०॥
तुळसी मंदार कोविदार ॥ शेवंती चंपावृक्ष परिकर ॥ कनकवेली नागवेली सुंदर ॥ पोवळवेली आरक्त ॥६१॥
कल्पवृक्ष आणि चंदन ॥ गरुडवृक्ष आणि अर्जुन ॥ वाळियांची बेटें सुवासिक पूर्ण ॥ कर्पूरकर्दळी डोलती ॥६२॥
शाल तमाल पारिजातक ॥ शिरीष रायचंपक अशोक ॥ फणस निंबोळी मातुलिंग सुरेख ॥ अगर कृष्णागर सुवास ॥६३॥
मयूर बदकें चातकें ॥ कस्तूरीमृग जवादी बिडालकें ॥ राजहंस नकुल चक्रवाकें ॥ कोकिळा कौतुकें बाहती ॥६४॥
धन्य धन्य ऋषि अगस्ति ॥ श्र्वापदें निर्वैर विचरती ॥ पक्षी शास्त्रचर्चा करिती ॥ पंडित बोलती जे रीतीनें ॥६५॥
ठायीं ठायीं वनांत ॥ शिष्य वेदाध्ययन करित ॥ न्याय मीमांसा सांख्य पढत ॥ तर्क घेत नानापरी ॥६६॥
पातंजल आणि व्याकरण ॥ एक वेदांतशास्त्रप्रवीण ॥ एक समाधि सुखीं तल्लीन ॥ एक मौन्येंच डुल्लती ॥६७॥
नानाग्रंथींचें श्रवण ॥ ठायीं ठायीं होत पुराण ॥ अष्टांगयोगादि नाना साधन ॥ मनोजय करिताती ॥६८॥
असो शिष्य गेले धांवून ॥ अगस्तीसी सांगती हर्षे करून ॥ श्रीराम सीता लक्ष्मण ॥ जवळी आले गुरुवर्या ॥६९॥
ऐसें ऐकतां ते अवसरीं ॥ ऋषीचा आनंद न माये अंबरीं ॥ सकळिकांसी म्हणे उठा झडकरी ॥ जाऊं राघवा सामोरे ॥१७०॥
समाधि जप तप अनुष्ठान ॥ करूनि पावावे जयाचे चरण ॥ तो राजीवनेत्र रघुनंदन ॥ आश्रमा आपण पातला ॥७१॥
जो जगद्वंद्य आदिसोयरा ॥ जो अगम्य विधिशक्रकर्पूरगौरा ॥ मूळ न धाडितां आमचे मंदिरा ॥ पूर्वभाग्यें पातला ॥७२॥
जैशा नद्या भरूनियां ॥ जाती नदेश्र्वरासी भेटावया ॥ तैसा अगस्ति लवलाह्यां ॥ श्रीरामाजवळी पातला ॥७३॥
देखोनियां ऋषीचें भार ॥ राम सौमित्र घालिती नमस्कार ॥ घटोद्भवें पुढें धांवोनि सत्वर ॥ रघुवीर आलिंगिला ॥७४॥
रमापति आणि उमापति ॥ प्रीतीनें जैसे भेटती ॥ कीं इंद्र आणि बृहस्पति ॥ आलिंगिती परस्परें ॥७५॥
परम सद्रद ऋषीचें मन ॥ म्हणे धन्य धन्य आजिचा दिन ॥ कौसल्यागर्भरघुनंदन ॥ नेत्रीं देखिला धणीवरी ॥७६॥
असो इतरही मुनीश्र्वरां ॥ भेटला अनादिसोयरा ॥ ब्राह्मणीं वेष्टिलें जनकजावरा ॥ याचकीं वेष्टिला दाता जेवीं ॥७७॥
कीं चंदनवेष्टित फणिवर ॥ कीं भूपती भोंवता दळभार ॥ कीं ते बहुत मिळोनि चकोर ॥ ऋक्षपतीसी विलोकिती ॥७८॥
कीं विलोकितां सौदामिनीपति ॥ नीलकंठ आनंदें नाचती ॥ कीं महावैद्य देखोनि धांवती ॥ व्यथाभिभूत जैसे कां ॥७९॥
कीं उगवतां सहस्रकर ॥ चक्रवाकें तोषती अपार ॥ तैसा देखतां जगदुद्धार ॥ मुनीश्र्वर संतोषले ॥१८०॥
देखोनियां ऋषीमंडळी ॥ परम लज्जित जनकबाळी ॥ मग जाऊनि निराळी ॥ उभी ठाकली क्षण एक ॥८१॥
तंव ऋषिपत्न्या असंख्यात ॥ पहावया धांवल्या रघुनाथ ॥ तों ऋषिमाजी सीताकांत ॥ कोण तो नये प्रत्यया ॥८२॥
जगीं असोनि जगदीश्र्वर ॥ नेणती जैसे भ्रांत नर ॥ तैसा ऋषींत असोनि रामचंद्र ॥ ऋृषिपत्न्यांसी दिसेना ॥८३॥
साधक शरण सद्रुरूशीं ॥ तैशा त्या येती सीतेपाशीं ॥ म्हणती रघुवीर प्रत्ययासी ॥ आणूनि देईं आम्हांतें ॥८४॥
जैसी आदिमाया भगवती ॥ तीस वेष्टित अनंतशक्ति ॥ तैशा ऋषिपत्न्या सीतासती ॥ वेष्टोनियां पुसती तियेतें ॥८५॥
पुराणपुरुष रघुनंदन ॥ ऋषिवृंदांत आहे पूर्ण ॥ परी अमुकचि राम म्हणोन ॥ दावीं आम्हांसी माउलिये ॥८६॥
अवघे जटाजूट तापसी ॥ एकाहूनि एक तेजोराशी ॥ परी तव नेत्रचकोर शशी ॥ दावीं आम्हांसी माउलिये ॥८७॥
जवळी असोनि राघवेंद्र ॥ नव्हे आम्हांसी कां गोचर ॥ परी मंगळभगिनी तुझा वर ॥ मंगळकारक दावीं आम्हां ॥८८॥
चौऱ्यांयशीं लक्ष गर्भवास ॥ हिंडतां शिणलों बहुवस ॥ परी तो मखपाळक सर्वेश ॥ आदिपुरुष दावीं कां ॥८९॥
मृगनाभीं असोनि मृगमद ॥ परी तो नेणेचि मतिमंद ॥ कीं जवळ रत्न असोनि गर्भांध ॥ नेणें जैसा अभाग्य ॥१९०॥
जो वेदवल्लीचें दिव्य फळ जाण ॥ जो सरसिजोद्भवाचें अनादि धन ॥ जो नारदादिकांचें गुह्य पूर्ण ॥ ध्येय ध्यान विषकंठाचें ॥९१॥
ऐशा नानापरी पूसती ॥ परी न बोले सीतासती ॥ मग ऋषिस्त्रिया ध्यानें वर्णिती ॥ नाना ऋृषींचीं ते वेळीं ॥९२॥
ज्या ज्या ऋषींचें वर्णिती ध्यान ॥ तों तों जानकी हालवी मान ॥ जैसा दृश्य पदार्थ संपूर्ण ॥ वेदश्रुती निरसिती ॥९३॥
जे जे दिसतें तें तें नाशिवंत ॥ तें चिन्मय नव्हे अशाश्र्वत ॥ ऋषिस्त्रिया स्वरूप वर्णित ॥ मान हालवित सीता तेथें ॥९४॥
वेदशास्त्रां पडलें मौन ॥ तो केवीं बोलिजे शब्देंकरून ॥ यालागीं न बोले वचन ॥ हालवी मान जानकी ॥९५॥
हस्तसंकेतें करून ॥ जरी दावावा रघुनंदन ॥ तरी तो एकदेशी नव्हे पूर्ण ॥ जो निर्गुण निर्विकारी ॥९६॥
योग याग साधनें अपार ॥ करितां शिणती साधक नर ॥ तेवीं ऋषिस्त्रिया शिणल्या थोर ॥ रूपें वर्णितां स्वचित्तीं ॥९७॥
जैसी वेदांचिये शेवटीं ॥ स्वरूपी पडे ऐक्य मिठी ॥ तैसा श्रीराम देखिला दृष्टीं ॥ ऋषिस्त्रियांनीं अकस्मात ॥९८॥
म्हणती सजलजलदवर्ण ॥ आकर्णनेत्र सुहास्यवदन ॥ वाटे ब्रह्मानंदचि मुरोन ॥ मूर्ति ओतिली चिन्मय ॥९९॥
जटाजूटमुकुट पूर्ण ॥ आजानुबाहु वल्कलवसन ॥ हातीं विराजती चापबाण ॥ पति होय कीं हा तुझा ॥२००॥


ऐसें ऐकतां वचन ॥ सीतेनें केलें हास्यवदन ॥ हालवितां राहिली मान ॥ उन्मीलित नयन जाहले ॥१॥
ऋषिपत्न्यांतें कळली खूण ॥ प्रत्यया आला रघुनंदन ॥ विलोकितां राघवध्यान ॥ धाल्या पूर्ण ब्रह्मानंदें ॥२॥
मग सीतेचिया चरणीं मिठी ॥ घालिती सकळ त्या गोरटी ॥ म्हणती माते धन्य सृष्टी ॥ राम जगजेठी दाविला ॥३॥
जैसा मौन धरूनि वेद ॥ संतांसीं दावी ब्रह्मपद ॥ तैसा सीतेनें परमानंद ॥ ऋषिपत्न्यांसी दाविला ॥४॥
आतां असो हा पसार ॥ अगस्तीनें श्रीरामचंद्र ॥ आश्रमा नेऊनि साचार ॥ परमानंदें पूजिला ॥५॥
अक्षय चाप अक्षय भाते ॥ अक्षय कवच रघुत्तमातें ॥ शस्त्रें अस्त्रें मंत्रसामर्थ्यें ॥ दशरथीतें दीधलीं ॥६॥
जैसा नवग्रहांत चंडकिरण ॥ तैसा दिधला एक बाण ॥ म्हणे याच शिरें रावण ॥ शेवटीं धाडीं निजधामा ॥७॥
एक मासपर्यंत ॥ तेथें काळ क्रमी रघुनाथ ॥ मग घटोद्भवासी पुसत ॥ आम्हीं आतां रहावें कोठें ॥८॥
अगस्ति म्हणे गोदातटीं ॥ वस्तीसी स्थान पंचवटी ॥ तेथें तूं राहे जगजेठी ॥ सीता गोरटी जतन करीं ॥९॥
आज्ञा घेऊनि ते वेळां ॥ पंचवटी श्रीराम चालिला ॥ वाटेसी जटायु देखिला ॥ राघवेंद्रें अकस्मात ॥२१०॥
पथीं बैसला जैसा पर्वत ॥ श्रीराम सौमित्रासी पुसत ॥ हा राक्षस होय यथार्थ ॥ आणीं त्वरित धनुष्य बाण ॥११॥
दोन्ही तूणीर घननीळें ॥ पाठीसी दोहींकडे आकर्षिले ॥ तंव तो जटायु ते वेळे ॥ काय बोले दुरूनियां ॥१२॥
म्हणे ये वनांतरीं तूं कोण ॥ मजवरी टाकिसी बाण ॥ सांग तुझें नामभिधान ॥ मग रघुनंदन बोलत ॥१३॥
रविकुळमंडण दशरथ ॥ त्याचा पुत्र मी रघुनाथ ॥ ऐसी ऐकतांचि मात ॥ जटायु जवळी पातला ॥१४॥
म्हणे कश्यपसुत अरुण ॥ तो माझा जनिता पूर्ण ॥ पितृव्य माझा सुपर्ण ॥ जटायु जाण नाम माझें ॥१५॥
माझा ज्येष्ठबंधु सांपाती ॥ तो दक्षिणसागरीं करी वस्ती ॥ तुझा पिता दशरथ नृपती ॥ मज बंधुत्वें मानीतसे ॥१६॥
शक्रासी युद्ध करितां ॥ मी साह्य झालों दशरथा ॥ मज बंधुत्व मानी तत्वतां ॥ अजराजपुत्र ते काळीं ॥१७॥
ऐसी ऐकतांचि मात ॥ सद्रदित झाला रघुनाथ ॥ जटायूचे कंठी मिठी घालित ॥ म्हणे तूं निश्र्चित पितृव्य माझा ॥१८॥
मग जटायूचे अनुमतें ॥ श्रीराम राहे पंचवटीतें ॥ पर्णशाळा सुमित्रासुतें ॥ विशाळ रचिल्या ते वेळे ॥१९॥
फळें मुळें आणून ॥ नित्य देत सुमित्रानंदन ॥ आपण निराहार निर्वाण ॥ चतुर्दशवर्षेंपर्यंत ॥२२०॥
जानकी भावी ऐसें मनीं ॥ लक्ष्मण फळें भक्षितो वनीं ॥ मग आणितो आम्हांलागुनी ॥ फळें घ्या म्हणोनि म्हणतसे ॥२१॥
सीतेचे आज्ञेविण ॥ सौमित्र न करी फळें भक्षण ॥ नित्य उपवासी निर्वाण ॥ तो लक्ष्मण महाराज ॥२२॥
पुढील जाणोनि भविष्यार्थ ॥ फळें नेदी रघुनाथ ॥ याच प्रकारें दिवस बहुत ॥ उपवास झाले तयासी ॥२३॥
पर्णकुटीचा द्वारपाळ ॥ सर्वकाळ सुमित्राबाळ ॥ तो विष्णुशयन फणिपाळ ॥ सेवा प्रबळ करीतसे ॥२४॥
रात्रीमाजी लक्ष्मण ॥ हातीं घेऊनि धनुष्यबाण ॥ राक्षस येतील म्हणोन ॥ सावधान सर्वदा ॥२५॥
निद्रा आणि आहार ॥ कधीं न स्पर्शे सौमित्र ॥ भक्तराज परम पवित्र ॥ जैसा निर्मळ मित्र सदा ॥२६॥
पंचवटीस राहिला रघुनाथ ॥ चहूंकडे प्रकटली मात ॥ तों वनभिल्लस्त्रिया मिळोनि बहुत ॥ म्हणती राघव पाहूं चला ॥२७॥
अयोध्याधीश रघुपति ॥ बहुत ऐकतों त्याची किर्ति ॥ एकवचन एकपत्नीव्रती ॥ चला निश्र्चितीं पाहूं तो ॥२८॥
निरंजनी राहिला रघुनाथ ॥ तो डोळेभरी पाहों यथार्थ ॥ अरिदर्पहरण सीताकांत ॥ पाहूं चला एकदां ॥२९॥
जो निर्विकार परब्रह्म ॥ तो सगुण सुवेष श्रीराम ॥ ज्याचे श्रुति नेणती वर्म ॥ तो पूर्णकाम पाहूं चला ॥२३०॥
म्हणती परब्रह्म सांवळे ॥ भेटीसी न्यावी अमृतफळें ॥ पूर्वपुण्य असेल आगळें ॥ गुण गाती श्रीरामाचे ॥३१॥
अपार मिळोनि भिल्लिणी ॥ उत्तम फळें वेंचिती वनीं ॥ नाचत नाचत कामिनी ॥ गुण गाती श्रीरामाचे ॥३२॥
ज्याचें नाम घेतां निर्मळ ॥ शीतळ जाहला जाश्र्वनीळ ॥ चरणरजें तात्काळ ॥ गौतमललना तारिली ॥३३॥
एक जानकी वेगळीकरून ॥ सकळ स्त्रिया कौसल्येसमान ॥ जो दशकंठदर्पहरण ॥ मखरक्षण मखभोक्ता ॥३४॥
अहो पूर्वकर्म निर्मळ ॥ पाहावया परब्रह्म उतावेळ ॥ हेंच उत्तम साचें फळ ॥ पंचवटीसी आलिया ॥३५॥
पंचभूतात्मक पंचवटी ॥ नरदेहास आल्या गोरटी ॥ श्रीराम देखतां दृष्टीं ॥ घालिती सृष्टी लोटांगण ॥३६॥
पूर्वफळें आणिलीं होतीं ॥ समस्त अर्पिलीं रघुपतीप्रती ॥ देखोनि तयांची भक्ति ॥ फळें भक्षीत सीताराम ॥३७॥
नित्यकाळ भिल्लिणी ॥ रामास फळें देती आणोनी ॥ येथें कितीएक जनीं ॥ विपरीत वाणी बोलिजे ॥३८॥
म्हणती उच्छिष्ट फळें भक्षिलीं ॥ हे सर्वथा असत्य बोली ॥ तीं उत्तम फळें पाहोनि रक्षिलीं ॥ श्रीरामभेटीकारणें ॥३९॥
मूळ न पाहतां यथार्थ ॥ भलतेंचि करी जो स्थापिति ॥ त्यासी बंधन यथार्थ ॥ चंद्रार्कवरी चुकेना ॥२४०॥
असो श्रीरामविजय ग्रंथ ॥ हाचि अमृतवृक्ष यथार्थ ॥ येथींचीं फळें रघुनाथभक्त ॥ सदा भक्षिती प्रीतीनें ॥४१॥
ब्रह्मानंदा जगदोद्धारा ॥ पंचवटीवासिया श्रीधरवरा ॥ आदिपुरुषा निर्विकारा ॥ अचळ अभंगा अक्षया ॥४२॥
इति श्रीरामविजयग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकनाटकाधार ॥ सदा परिसोत भक्त चतुर ॥ त्रयोदशाध्याय गोड हा ॥२४३॥

॥श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु॥  


 


 


 





Sunday, October 23, 2011

RamVijay Adhyay - 12



श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
 
संतमंडळी बैसली थोर ॥ बृहस्पतीऐसे चतुर ॥ आतां साहित्यसुमनाचे हार ॥ गुंफोन गळां घालूं त्यांचे ॥१॥
अनर्ध्य शब्दरत्नें प्रकाशवंत ॥ त्यांचे ग्राहक चतुर पंडित ॥ विशेषें रघुनाथभक्त विरक्त ॥ ते प्रेमभरें डुल्लती ॥२॥
मतिमंद बैसतां श्रोता श्रवणीं ॥ तरी ग्रंथरस जाय वितळोनी ॥ जैसें भस्मामाजी नेऊनी ॥ व्यर्थ अवदान घालिजे ॥३॥
रत्नपरिक्षा करिती चतुर ॥ तेथें गर्भांध विटे साचार ॥ गायन ऐकती सज्ञान नर ॥ परी बधिर तेथें विटती पैं ॥४॥
कमळसुवास सेविती भ्रमर ॥ परी तो स्वाद न जाणे दर्दुर ॥ हंस घेती मुक्तांचा चार ॥ परी तो बकासी प्राप्त नाहीं ॥५॥
दुग्ध दोहोनि नेती इतर ॥ गोचिड तेथें अहोरात्र ॥ वसे परी प्राप्त त्यास रुधिर ॥ नेणे क्षीर मतिमंद तो ॥६॥
कीं वसंतकाळीं कोकिळा ॥ पंचमस्वरें आळविती ॥ रसाळा ॥ काकजाती तैशा सकळा ॥ परी तयां तो स्वर नव्हेचि ॥७॥
बलाहक गर्जना करिती गगनीं ॥ मयुर नाचती पिच्छें पसरूनी ॥ परी ते कळा वृषभांनीं ॥ नेणिजे जैशी सर्वथा ॥८॥
चकोर चंद्रामृत सेविती ॥ परी ते कळा कुक्कुट नेणती ॥ म्हणोनि श्रोता मंदमती ॥ सहसाही न भेटावा ॥९॥
श्रोता भेटलिया चतुर ॥ ग्रंथरस वाढे अपार ॥ जेवीं वीर संघटतां थोर ॥ रणचक्रीं रंग भरे ॥१०॥
असो एकादशाध्यायाचे अंतीं ॥ चित्रकुटी राहिला रघुपति ॥ सुदर्शन गंधर्व निश्र्चितीं ॥ काकरूपी उद्धरिला ॥११॥
उपरी सिंहावलोकनें करूनि तत्वतां ॥ श्रोतीं परिसावी मागील कथा ॥ दळभारेंसी भरत तत्वतां ॥ चित्रकूटासमीप आला ॥१२॥
तंव तो भूधरअवतार ॥ चित्रकूटाखालीं सौमित्र ॥ फळें वेंचितां तो दळभार ॥ गजरें येतां देखिला ॥१३॥
ओळखिला आपला घ्वजसंकेत ॥ आले कळलें शत्रुघ्न भरत ॥ म्हणे कैकयीनें पाठविले यथार्थ ॥ वनीं रघुनाथ वधावया ॥१४॥
हे युद्धासी आले येथ ॥ जरी रघुनाथास करूं श्रुत ॥ तरी हेही गोष्ट अनुचित ॥ युद्ध अद्भुत करीन मी ॥१५॥
माझा श्रीराम एकला वनीं ॥ हे आले दळभार सिद्ध करूनी ॥ तरी जैसा वणवा लागे वनीं ॥ तैसें जाळीन सैन्य हें ॥१६॥
रवीच्या किरणांवरी देखा ॥ कैशा चढतील पिपीलिका । कल्पांतविजूस मशक मुखा-॥ माजी केंवि सांठवील ॥१७॥
चढून प्रळयाग्नीचे शिरीं ॥ पत्रग कैसा नृत्य करी ॥ ऊर्णनाभीचे तंतुवाभीतरीं ॥ वारण कैसा बांधवेल ॥१८॥
तृणपाशेंकरून ॥ कैसा बांधवे पंचानन ॥ द्विजेंद्रासी अळिका धरून । कैसी नेईल आकाशा ॥१९॥
दीपाचें तेज देखोन ॥ कैसा आहाळेल चंडकिरण ॥ तैसा मी वीर लक्ष्मण ॥ मज जिंकूं न शकती हे ॥२०॥
भार देखोनि समीप ॥ क्षण न लागतां चढविलें चाप ॥ बाण सोडिले अमूप ॥ संख्येरहित ते काळीं ॥२१॥
वाटे गडगडितां महाव्याघ्र ॥ थोकती जेवीं अजांचे भार ॥ तैसे सोळा पद्में दळभार ॥ भयभीत जाहला ॥२२॥
त्या बाणांचे करावया निवारण ॥ वीर सरसावला शत्रुघ्न ॥ दोघांचें समसमा संधान ॥ बाणें बाण तोडित ॥२३॥
एक चंद्र एक मित्र ॥ कीं रमावर आणि उमावर ॥ किंवा ते मेरुमंदार ॥ युद्धालागीं मिसळले ॥२४॥
एक समुद्र एक निराळ ॥ एक दावाग्नि एक वडवानळ ॥ एक गदा एक चक्र निर्मळ ॥ विष्णुआयुधें भिडती कीं ॥२५॥
एक वासुकी एक भोगींद्र ॥ एक वसिष्ठ एक विश्र्वामित्र ॥ तैसे शत्रुघ्न आणि सौमित्र ॥ बाण सोडिती परस्परें ॥२६॥
एकावरी एक सोडिती बाण ॥ ते वरचेवरीं उडविती संपूर्ण ॥ बाणमंडप जाहला सघन ॥ चंडकिरण न दिसेचि ॥२७॥
रामनामबीजांकित ॥ बाण सुटती सतेज मंडित ॥ रघुनाथ नाम गर्जत ॥ सुसाटे निघत येतांचि ॥२८॥
वाटे ओढवला प्रळयकाळ ॥ वनचरां सर्वां सुटला पळ ॥ ऋषीश्र्वर पळती सकळ ॥ कडे वेंधती पर्वताचे ॥२९॥
सांडोनि गुंफा तपाचरण ॥ पळती आपुला जीव घेऊन ॥ एक धांवतां धापा दाटून ॥ मूर्च्छा येऊनि पडियेले ॥३०॥
एक म्हणती राक्षसदळ ॥ आलें रामावरी तुंबळ ॥ येणें मखरक्षणीं राक्षस सबळ ॥ वीस कोटी निवाटिले ॥३१॥
तें वैर स्मरोनि अंतरीं ॥ सत्य हे आले राघवावरी ॥ आतां सोमित्राची कैंची उरी ॥ अनर्थ निर्धारीं ओढवला ॥३२॥
असो ऋषीश्र्वर समस्त ॥ आले जेथें रघुनाथ ॥ गोष्टी सांगतां बोबडी वळत ॥ संकेत दाविती एक करें ॥३३॥
एक रुदन करूनि फोडित हांका ॥ वेगें पळवीं जनककन्यका ॥ आतां गूढ विवरीं लपवीं कां ॥ रघुनायका ऊठ वेगीं ॥३४॥
न भरे जों अर्ध निमेष ॥ चढविलें श्रीरामें धनुष्य ॥ जैसा उगवतां चंडांश ॥ गुंफेबाहेर तैसा आला ॥३५॥
ऋषींस म्हणे अयोध्यानाथ ॥ तुम्ही मनीं न व्हावें दुश्र्चित्त ॥ काळही विघ्न करूं आलिया येथ ॥ खंडविखंड करीन बाणीं ॥३६॥
पडत्या आकाशा दईन धीर ॥ रसातळा उर्वी जातां करीन स्थिर ॥ तुम्ही समस्त बैसा धरूनि धीर ॥ तपश्र्चर्या करीत पैं ॥३७॥
अथवा करावें अध्ययन ॥ न्याय मीमांसा सांख्यज्ञान ॥ पातंजल अथवा व्याकरण ॥ यांची चर्चा करा जी ॥३८॥
असो पाठींसीं घालून ब्राह्मण ॥ पुढें चालिला रघुनंदन ॥ तो ध्वजचिन्हें ओळखिलीं पूर्ण ॥ शत्रुघ्न बाण टाकीतसे ॥३९॥
आपले भेटीकारणें उत्कंठित ॥ सद्रद जाहला भरत ॥ लक्ष्मणापाशीं सीतानाथ ॥ क्षण न लागतां पातला ॥४०॥
मग म्हणे सौमित्रासी ॥ बा रे भरत आला भेटीसी ॥ तूं किमर्थ यासी युद्ध करिसी ॥ पाहा मानसीं विचारूनि ॥४१॥
ऐसें बोलतां राजीवनेत्र ॥ परी वीरश्रियेनें वेष्टिला सौमित्र ॥ सोडितां न राहे शर ॥ मग रघुवीर काय करी ॥४२॥
हातींचें धनुष्य हिरूनी ॥ श्रीरामें घेतलें तये क्षणीं ॥ सौमित्र लागला श्रीरामचरणीं ॥ हास्यवदन करूनियां ॥४३॥
श्रीरामें वरितां फणिपाळ ॥ अवघें वितळलें बाणजाळ ॥ जैसें निजज्ञान ठसतां केवळ ॥ मायापडळ जेवीं विरे ॥४४॥
भरतासहित अयोध्येचे जन ॥ सर्वीं विलोकिला रघुनंदन ॥ जैसा निशा संपतां चंडकिरण ॥ उदयचळीं विराजे ॥४५॥
तों भरतासी न धरवे धीर ॥ सप्रेम धांव घेतली सत्वर ॥ वाटेसीं साष्टांग नमस्कार ॥ वारंवार घालीतसे ॥४६॥
कीं बहुत दिवस माता गेली ॥ ते बाळकें समीप देखिली ॥ कीं गाय वनींहूनि परतली ॥ वत्सें आटोपिली धांवूनियां ॥४७॥
कीं क्षीराब्धि देखोनि त्वरित ॥ धांव घेत क्षुधाक्रांत ॥ कीं मृगजळ देखानि त्वरित ॥ मृग धांवती उष्णकाळीं ॥४८॥
कीं सफळ देखोनि दिव्य द्रुम ॥ झेंपावे जैसा विहंगम ॥ भरतें धरूनि तैसा राम ॥ चरणसरोजीं स्पर्शिला ॥४९॥
जैसें लोभियाचें जीवित्व धन ॥ तैसें भरतें दृढ चरण ॥ नयनोदकें करून ॥ केलें क्षालन रामपायां ॥५०॥

मग उचलोनियां दोहीं करीं ॥ बंधूसीं आदरें हृदयीं धरी ॥ जैसा जयंतपुत्र सहस्रनेत्रीं ॥ प्रीतीकरोनी आलिंगिला ॥५१॥
की क्षीरसागरीं लहरिया उठती ॥ त्या एकांत एक मिसळती ॥ कीं वेदशास्त्री श्रुती ॥ ऐक्या येती परस्परें ॥५२॥
तैसा अलिंगिला भरत ॥ तों शत्रुघ्न लोटांगण घालित ॥ परम प्रीतीं रघुनाथ ॥ आलिंगन देती तयातें ॥५३॥
सकळ अयोध्येचे ब्राह्मण ॥ रामासी भेटती प्रीतीकरून ॥ सर्व दळभार प्रजानन ॥ करिती नमन रामासी ॥५४॥
लक्ष्मण भरत शत्रुघ्न ॥ परस्परें देती क्षेमालिंगन ॥ मग सुमंत प्रधानें येऊन ॥ श्रीरामचरण वंदिले ॥५५॥
मग सुमंत म्हणे रघुराया ॥ पैल वसिष्ठ आणि दोघी माया ॥ तंव त्या दशरथकुळवर्या ॥ धीर न धरवे ते काळीं ॥५६॥
सामोरा चालिला रघुनंदन ॥ भोंवते अपार अयोध्याजन ॥ जैसा कां वेदोनारायण ॥ अनेक श्रुतीं वेष्टिला ॥५७॥
येऊनियां वसिष्ठाजवळी ॥ रामें गुरुचरण वंदिले भाळीं ॥ जैसा मदनदहनाचे चरणकमळीं ॥ स्कंद ठेवी मस्तक ॥५८॥
तों कौसल्या सुमित्रा माता ॥ त्यांचीं वाहनें जवळी देखतां ॥ धांवोनी येतां रामसुमित्रासुतां ॥ उतरती खालत्या दोघीजणी ॥५९॥
कौसल्येचे चरणीं मस्तक ॥ ठेवूनि बोले रघुनायक ॥ म्हणे सुखीं कीं मम जनक ॥ श्रीदशरथ दयाब्धि ॥६०॥
तों जाहला एकचि कल्लोळ ॥ रुदन करिती लोक समग्र ॥ सुमित्राकौसल्येसी बहुसाल ॥ नाहीं पार तयातें ॥६१॥
वसिष्ठ म्हणे रघुनाथा ॥ तुझा वियोग न साहे दशरथा ॥ रामराम म्हणतां मोक्षपंथा ॥ गेला तात्काळ जाण पां ॥६२॥
वचन ऐसें ऐकतां कानीं ॥ करुणासागर मोक्षदानी ॥ विमलांबुधारा नयनीं ॥ तेच क्षणीं चालिल्या ॥६३॥
स्फुंदस्फुंदोनि विलाप थोर ॥ पित्यालागीं करी रघुवीर ॥ म्हणे पूर्ण सत्याचा सागर ॥ श्रीदशरथ वीर जो ॥६४॥
ज्याचे युद्धाची ठेव ॥ पाहती मानव इंद्रादि देव ॥ वृषपर्वा शुक्रादि सर्व ॥ दैत्य युद्धीं जिंकिले ॥६५॥
श्रोते म्हणती नवल येथ ॥ जो पुराणपुरुष रघुनाथ ॥ तो शोकार्णवीं पडिला ही मात ॥ असंगत दिसतसे ॥६६॥
जो जगद्वंद्य आत्माराम ॥ जो विश्र्वबीजफलांकित द्रुम ॥ तो शोकाकुलित परब्रह्म ॥ पितयालागीं कां जाहला ॥६७॥
विषकंठ आला कीं क्षीरसागरा ॥ उष्णता व्यापिली रोहिणीवरा ॥ पक्षिवर्या त्या खगेंद्रा ॥ सर्पबाधा केवीं जहाली ॥६८॥
चिंतामणी दरिद्रें व्यापिला ॥ कल्पवृक्ष केवीं निष्फळ जाहला ॥ प्रळयाग्नीचे डोळां ॥ अंधत्व केवीं पातलें ॥६९॥
तंव वक्ता दे प्रत्त्युत्तर ॥ श्रोतीं ऐकिजे सादर ॥ पूर्ण ब्रह्मानंद रघुवीर ॥ मानवलोकीं अवतरला ॥७०॥
जगद्रुरु देवाधिदेव ॥ दावी मायेचें लाघव ॥ अवतारकारणाची ठेव ॥ लौकिकभाव दाविला ॥७१॥
नट जो जो धरी वेष ॥ त्याची संपादणी करी विशेष ॥ यालागीं जगदात्मा आदिपुरुष ॥ दाखवी आवेश मायेचा ॥७२॥
ऐसी उघडतां शब्दरत्न मांदुस ॥ गुणग्राहक श्रोते पावले संतोष ॥ संदेहरहित निःशेष ॥ जेंवी तम नासे सूर्योदयीं ॥७३॥
कीं वैराग्यें निरसे काम ॥ ज्ञानें वितळे जेवीं भ्रम ॥ जैसा निधानांतूनि परम ॥ दारुण सर्प निघाला ॥७४॥
करितां संशयाचें निरसन ॥ मागें राहिलें अनुसंधान ॥ तरी हे गोष्टीस दूषण ॥ सर्वथाही न ठेवावें ॥७५॥
ग्रासामाजी लागला हरळ ॥ तो काढावया लागेल वेळ ॥ कीं अनध्यायामाजीं रसाळ ॥ वेदाध्ययन राहिलें ॥७६॥
चोरवाटा चुकवावया पूर्ण ॥ अधिक लागला एक दिन ॥ तरी ते गोष्टीतें दूषण ॥ कदा सज्ञान न ठेविती ॥७७॥
रात्रीमाजीं सत्कर्में राहतीं ॥ परी सूर्योदयीं सवेंचि चालतीं ॥ छायेंस पांथिक बैसती ॥ सवेंचि जाती निजमार्गे ॥७८॥
समुद्राचें भरते ओहटें ॥ सवेंच मागुती विशेष दाटे ॥ कीं चपळ तुरंग चपेटे ॥ विसावा घेऊनि मागुती ॥७९॥
तेंवि परिसा पुढील कथार्थं ॥ आठवोनि पिता दशरथ ॥ शोकाकुलित जनकजामात ॥ क्षणएक जाहला ॥८०॥
मग वसिष्ठ म्हणे श्रीरामा ॥ प्रयागाप्रति जाऊनि गुणग्रामा ॥ उत्तरक्रिया करूनि निजधामा ॥ दशरथासी बोळविजे ॥८१॥
कित्येक प्राकृत कवि बोलत ॥ कीं जे पतनीं पडिला दशरथ ॥ परी हे गोष्ट असंमत ॥ बोलतां अनर्थ वाचेसी ॥८२॥
जयाचें नाम घेतां आवडीं ॥ जीव उद्धरले लक्षकोडी ॥ तो आपुला पिता पतनीं पाडी ॥ काळत्रयीं न घडे हें ॥८३॥
असो गयेप्रति येऊन ॥ उत्तरक्रिया सर्व सारून ॥ पिता निजपदी स्थापून ॥ आले परतोन चित्रकूटा ॥८४॥
सकळ ऋषी आणि अयोध्याजन ॥ बैसले श्रीरामासी वेष्टून ॥ मग भरतें घालोनि लोटांगण ॥ कर जोडूनि उभा ठाकला ॥८५॥
म्हणे जयजयाजी पुरुषोत्तमा ॥ मायाचक्रचालका पूर्णब्रह्मा ॥ विरिंचिजनका सुखविश्रामा ॥ मंगलधामा रघुराया ॥८६॥
हे राम करुणासमुद्रा ॥ हे रविकुलभूषणा राघवेंद्रा ॥ सर्वानंदसदना रामचंद्रा ॥ प्रतापरुद्रा जगद्रुरो ॥८७॥
हे राम रावणदर्पहरणा ॥ हे राम भवहृदयमोचना ॥ हे राम अहल्योद्धारणा ॥ मखरक्षणा सीताधवा ॥८८॥
हे राम कौसल्यागर्भरत्ना ॥ हे राम माया अपारश्रममोचना ॥ सनकसनंदमानसरंजना ॥ निरंजना निजरूपा ॥८९॥
दानवकाननवैश्र्वानरा ॥ ममहृदयारविंदभ्रमरा ॥ अज्ञानतिमिरच्छेदक दिवाकरा ॥ समरधीरा सर्वेशा ॥९०॥
हे राम भक्तचातकजलधरा ॥ प्रेमचकोरवेधकचंद्रा ॥ संसारगजच्छेदकमृगेंद्रा ॥ अनंगमोहना अनंगा ॥९१॥
उपवासी मरतां चकोर ॥ त्याचे धांवण्या धांवे चंद्र ॥ कीं अवर्षण पडतां जलधर ॥ चातकालागीं धांवे कां ॥९२॥
कीं चिंताक्रांतासी चिंतामणि ॥ सांपडे पूर्वभाग्येंकरूनि ॥ कीं दरिद्रियाचे अंगणीं ॥ कल्पवृक्ष उगवला ॥९३॥
कीं पतिव्रतेसी प्राणनाथ भेटला ॥ कीं क्षुधितापुढें क्षीराब्धि आला ॥ कीं साधकासी निधि जोडला ॥ आनंद जाहला तैसा आम्हां ॥९४॥
हंसें देखिलें मानससरोवर ॥ कीं प्रेमळा भेटला उमावर ॥ कीं संकल्पीं द्रव्य अपार ॥ दुर्बळ ब्राह्मणासी दीधलें ॥९५॥
तैसा आनंद जाहला जनांसी ॥ आतां सत्वर चलावें अयोध्येसी ॥ सांभाळावें बंधुवा आम्हांसीं ॥ श्रीदशरथाचेनि न्यायें ॥९६॥
आपुलें राज्य सांभाळावें ॥ गोब्राह्मणां प्रतिपाळावें ॥ आमुचे मनोरथ पूर्ण करावे ॥ आतां परतावें सत्वर ॥९७॥
जननी आमुची परम चतुर ॥ मज देत होती राज्यभार ॥ जैसे छेदोनियां शिर ॥ गुडघ्यास पूजा बांधिली ॥९८॥
पूज्यमूर्ति वोसंडून ॥ जैसे गुरवाचे धरी चरण ॥ राजकुमर सांडोन ॥ कन्या दिधली अजारक्षका ॥९९॥
पाडोनि देवळाचें शिखर ॥ घातलें भोंवतें आवार ॥ नागवूनि यात्रा समग्र ॥ अन्नसत्र घातलें ॥१००॥



फणस टाकोनि रसाळ ॥ प्रीतीनें घेतलें कनकफळ ॥ मुक्त सांडोनि तेजाळ ॥ गुंज जैसी घातली ॥१॥
गार घेऊनि टाकिला हिरा ॥ अंधकार घेऊनि त्यजिलें दिनकरा ॥ पाच भिरकावूनि सत्वरा ॥ कांच बळें रक्षिली ॥२॥
परिस त्यागून घेतला खडा ॥ पंडित दवडूनि आणिला वेडा ॥ चिंतामणि टाकोनि रोकडा ॥ पलांडु घेतला बळेंचि ॥३॥
अमृत टाकूनि घेतली कांजी ॥ कल्पवृक्ष तोडोनि लाविली भाजी ॥ कामधेनु दवडोनि सहजीं ॥ अजा पूजी आदरें ॥४॥
निजसुख टाकोनि घेतलें दुःख ॥ कस्तूरी टाकूनि घेतली राख ॥ सोने टाकूनि सुरेख ॥ शेण जैसें घेतलें ॥५॥
सांडोनियां रायकेळें ॥ आदरें भक्षी अर्कींफळें ॥ ज्ञान सांडोनि घेतलें ॥ अज्ञान जाण बळेंचि ॥६॥
तैसें कैकयीनें केलें साचार ॥ वना दवडोनि जगदोद्धार ॥ मज द्यावया राज्यभार ॥ सिद्ध जाहली साक्षेपें ॥७॥
सर्व अपराध करूनि क्षमा ॥ अयोध्येसी चलावें श्रीरामा ॥ याउपरी जगदात्मा ॥ काय बोलिला तं ऐका ॥८॥
सूर्य मार्ग चुके करितां भ्रमण ॥ नेत्रीं अंधत्व पावे अग्न ॥ मशकाची धडक लागून ॥ जरी मेरु पडेल ॥९॥
पाषाण प्रहार लागून ॥ वायु पडेल मोडोनि चरण ॥ कीं पिपीलिका शोषी सिंधुजीवन ॥ विजूस धांवूनि मशक धरी ॥११०॥
धडधडीत अग्निज्वाळ ॥ कर्पूरतुषारें होय शीतळ ॥ हेंही घडेल एक वेळ ॥ परी वचनास चळ नोहे माझे ॥११॥
एक बाण एक वचन ॥ एकपत्नीव्रत पूर्ण ॥ चौदा वर्षें भरल्याविण ॥ कदापि आगमन घडेना ॥१२॥
ऐसें निश्र्चयाचें वचन ॥ बोलता जाहला रघुनंदन ॥ अग्नीनें आहाळे जैसें सुमन ॥ तैसें भरता जाहलें ॥१३॥
मग भरतें चेतविला जातवेद ॥ प्राण द्यावया जाहला सिद्ध ॥ म्हणे हा देह करीन दग्ध ॥ रामवियोग मज न सोसवे ॥१४॥
महाराज वाल्मीक मुनि ॥ भरतास एकांतीं नेऊनी ॥ मूळकाव्यार्थ अवघा कानीं ॥ भविष्यार्थ सांगितला ॥१५॥
तो ऐकतां कैकयीसुत ॥ उगाच राहिला निवांत ॥ मग येऊनि जनकजामात ॥ हृदयीं धरी भरतातें ॥१६॥
आपुल्या हस्तेंकरून ॥ पुसिले भरताचे नयन ॥ करें कुरवाळिलें वदन ॥ समाधान करीतसे ॥१७॥
देव बंदींचे सोडवून ॥ चौदा वर्षांत येतों परतोन ॥ मग वरदहस्त उचलोन ॥ भाष दीधली भरतातें ॥१८॥
चौदा वर्षें चौदा दिन ॥ पंधरावे दिवशीं पूर्ण ॥ माध्यान्हा येतां चंडकिरण ॥ भेटेन येऊन तुजलागीं ॥१९॥
भरत म्हणे हा नेम टाळतां ॥ मग देह त्यागीन तत्वतां ॥ श्रीरामचरणीं ठेविला माथा ॥ प्रेमावस्था अधिक पैं ॥१२०॥
भरत मागुता उठोन ॥ विलोकी श्रीरामाचें वदन ॥ अमलदलराजीवनयन ॥ तैसाचि हृदयीं रेखिला ॥२१॥
भरत सद्रद बोले वचन ॥ मी अयोध्येसी न जाय परतोन ॥ सकळ मंगळभोग स्नान ॥ त्यजूनि राहीन नंदिग्रामीं ॥२२॥
अवश्य म्हणे रघुनायक ॥ मणिमय पादुका सुरेख ॥ भरतासी दिधल्या शोकहारक ॥ येरें मस्तकीं वंदिल्या ॥२३॥
शिवमस्तकीं विराजे चंद्र ॥ तैशा शिरीं पादुका सुंदर ॥ शोक हारपला समग्र ॥ शरीर शीतळ जाहलें ॥२४॥
जैसें कंठीं धरितां नामस्मरण ॥ शीतळ जाहला पार्वती-रमण ॥ तैसाचि प्रेमळ भरत जाण ॥ अंतरीं पूर्ण निवाला ॥२५॥
शत्रुघ्नासी म्हणे रघुनाथ ॥ तूं आणि प्रधान सुमंत ॥ राज्यभार चालवा समस्त ॥ यथान्यायेंकरूनियां ॥२६॥
सदा स्तवावे संतसज्जन ॥ श्रीगुरुभजनीं सावधान ॥ दूर त्यागावे दुर्जन ॥ त्यांचें अवलोकन न करावें ॥२७॥
परदारा आणि परधन ॥ येथें कदा न ठेविजे मन ॥ वेदमर्यादा नुल्लंघावी पूर्ण ॥ प्राणांतही जाहलिया ॥२८॥
जरी क्लेशकाळ पातला बहुत ॥ परी धैर्य न सोडावें यथार्थ ॥ गुरुभजन पुण्यपंथ ॥ न सोडावे सर्वथा ॥२९॥
साधु संत गोब्राह्मण ॥ त्यांचें सदा करावें पाळण ॥ सकळ दुष्टांस दवडोन ॥ स्वधर्म पूर्ण रक्षावा ॥१३०॥
कथा कीर्तन पुराणश्रवण ॥ काळ क्रमावा येणेंकरून ॥ आपुला वर्णाश्रमधर्म पूर्ण ॥ सर्वथाही न त्यजावा ॥३१॥
संतांचा न करावा मानभंग ॥ हरिभजनीं झिजवावें अंग ॥ सांडोनि सर्व कुमार्ग ॥ सन्मार्गेंचि वर्तावें ॥३२॥
ऋषींचे आशीर्वाद घ्यावे ॥ वर्म कोणाचें न बोलावें ॥ विश्र्व अवघें जाणावें ॥ आत्मरूपीं निर्धारें ॥३३॥
सत्संग धरावा आधीं ॥ नायकावी दुर्जनांची बुद्धि ॥ कामक्रोधादिक वादी ॥ दमवावे निजपराक्रमें ॥३४॥
मी जाहलों सज्ञान ॥ हा न धरावा अभिमान ॥ विनोदेंही पराचें छळण ॥ न करावें सहसाही ॥३५॥
शमदमादिक साधनें ॥ स्वीकारावी साधकानें ॥ जन जाती आडवाटेनें ॥ त्यांसी सुमार्ग दाविजे ॥३६॥
शोकमोहांचे चपेटे पूर्ण ॥ आंगीं आदळत येऊन ॥ विवेकवोडण पुढें करून ॥ ज्ञानशस्त्र योजावें ॥३७॥
काम क्रोध मद मत्सर ॥ हे गृहासी येऊं न द्यावे तस्कर ॥ आयुष्य क्षणिक जाणोनि साचार ॥ सारासार विचारावें ॥३८॥
क्षणिक जाणोनि संसार ॥ सोडावा विषयांवरील आदर ॥ सद्रुवचनीं सादर ॥ सदा चित्त ठेविजे ॥३९॥
दैवें आलें भाग्य थोर ॥ त्याचा गर्व न धरावा अणुमात्र ॥ एकदांचि जरी गेलें समग्र ॥ कदा धीर न सांडावा ॥१४०॥
कमलपत्राक्ष कृपानिधान ॥ वर्षत स्वातीजल पूर्ण ॥ ते सुमंत आणि शत्रुघ्न ॥ कर्ण शुक्तिकेंत सांठविती ॥४१॥
शब्दामृत वर्षे रामचंद्र ॥ निवाले भरत कर्णचकोर ॥ कीं रामवचन क्षीरसागर ॥ उपमन्यु भरत साचार तेथें ॥४२॥
सूर्य उगवतां निरसे तमजाळ ॥ तैसें श्रीरामवचनें जाहलें हृदय निर्मळ ॥ मग भरत परतोनि तात्काळ ॥ नंदिग्रामीं राहिला ॥४३॥
करूनि मातेचे समाधान ॥ सकळ ब्राह्मण प्रजाजन ॥ सुमंत आणि शत्रुघ्न ॥ पाठवी परतोनि अयोध्ये ॥४४॥
श्रीरामपादुका सिंहासनीं ॥ शत्रुघ्नें वरी छत्र धरूनि ॥ मग राज्य चालवी अनुदिनीं ॥ नामस्मरणें सावध ॥४५॥
क्षणक्षणां येत नंदीग्रामासी ॥ मागुता जाय अयोध्येसी ॥ सकळ पृथ्वीच्या राजांसी ॥ धाक भरत शत्रुघ्नांचा ॥४६॥
प्रतिसंवत्सरीं करभार ॥ भूपाळ देती समग्र ॥ असो नंदिग्रामीं भरतवीर ॥ निर्विकार बैसला ॥४७॥
नंदिग्रामाजवळ अरण्यांत ॥ पर्णकुटी करून राहे भरत ॥ श्रीरामपादुका विराजित ॥ रात्रंदिवस मस्तकीं ॥४८॥
जे आवडते श्रीरामभक्त ॥ तेही भरताऐसे विरक्त ॥ कनक कामिनी गृह सुत ॥ त्याग करूनि बैसले ॥४९॥
वटदुग्धीं जटा वळूनि ॥ सकळ मंगळभोग त्यजोनि ॥ वल्कलें वेष्टित तृणासनीं ॥ बैसले ध्यानीं श्रीरामाचे ॥१५०॥


नक्षत्रांत जैसा चंद्र ॥ तैसा मध्यें भरत साचार ॥ रात्रंदिवस रामचरित्र ॥ भरत सांगे समस्तांतें ॥५१॥
किंवा मानससरोवरीं ॥ बैसती राजहंसाच्या हारी ॥ भरतास भोंवतें तेचिपरी ॥ वेष्टूनियां बैसले ॥५२॥
श्रीधर म्हणे श्रोतयां समस्तां ॥ चित्त द्यावें पुढील श्र्लोकार्था ॥ रघुनाथ चित्रकुटीं असतां ॥ काय कथा वर्तली ॥५३॥
कवीची शब्दरत्नमांदुस ॥ उघडितां पंडित पावती संतोष ॥ इतर कुबुद्धि मतिमंदास ॥ रत्नपरीक्षा नकळे हो ॥५४॥
असो चित्रकूटीं असतां रघुनंदन ॥ मिळोनि बहिर्मूख ब्राह्मण ॥ म्हणती रामा तूं जाईं येथून आम्हांसी विघ्नें तुझेनि ॥५५॥
तुझी स्त्री परम सुंदर ॥ न्यावया जपती बहुत असुर ॥ वाल्मीकभविष्य साचार ॥ ऐसेंचि असे जाण पां ॥५६॥
वनींहूनि वार्ता उठली साचार ॥ त्रिशिरा दूषण आणि खर ॥ दळभारेंसीं येथे येणार ॥ तुजकरितां रघुवीरा ॥५७॥
म्हणोनि सांगतों तुजसी ॥ येथोनि जाईं निश्र्चयेसीं ॥ नाहींतरी आम्हीं स्वाश्रमासी ॥ त्यजोनि जाऊं निर्धारें ॥५८॥
श्रीराम म्हणे ब्राह्मणांलागुनी ॥ तुम्हीं निश्र्चिंत असावें अंतःकरणीं ॥ काळही फोडीन समरंगणीं ॥ राक्षसांतें गणी कोण ॥५९॥
परम अविश्र्वासी ब्राह्मण ॥ म्हणती विघ्नें येती दारुण ॥ हा आपले स्त्रीस रक्षील जाण ॥ कीं आम्हांसी रक्षील ॥१६०॥
हा त्यांसीं न पुरे समरंगणीं ॥ चारी बाण जाती सरूनि ॥ याच्या बोलाचा विश्र्वास धरूनि कदां येथें न राहावें ॥६१॥
मग सकळीं करूनि एकविचार ॥ रात्रीचे उठोनियां समग्र ॥ कुटुंबें घेऊनि सत्वर ॥ गेले विप्र पळोनियां ॥६२॥
उपरी प्रातःकाळीं उठोन ॥ श्रीराम पाहे ऋषिजन ॥ तंव ते रात्रींच गेले पळोन ॥ राजीवनयन काय करी ॥६३॥
एक वाल्मीक उरला पूर्ण ॥ तो महाराज तपोधन ॥ भूत भविष्य वर्तमान ॥ त्रिकालज्ञान जयासी ॥६४॥
वायुसंगें उडे तृण ॥ परी अचळ न सोडी स्थान ॥ किंवा रणमंडळ सोडून ॥ रणशूर कदा पळेना ॥६५॥
तैसा वाल्मीक उरला जाण ॥ तेणें आधींच कथिलें रामायण ॥ इतर बहिर्मूख ब्राह्मण ॥ श्रीराम निधान नोळखती ॥६६॥
प्रत्यया न येतां रघुवीर ॥ आचार तितका अनाचार ॥ कर्म तोच भ्रम थोर ॥ पिशाच नर तेचि पैं ॥६७॥
तणें केलें वेदपठण ॥ करतलामलक शास्त्रें प्रमाण ॥ परी तें मद्यपीयाचें भाषण ॥ राघवा शरण न जातां ॥६८॥
जैसी मुग्धा बत्तीसलक्षणीं ॥ परम सौंदर्य लावण्यखाणी ॥ परी मन नाहीं पतिभजनीं ॥ तरी तें सर्वही वृथा गेलें ॥६९॥
खरपृष्ठीस चंदन देख ॥ परी तो नेणें सुवाससुख । षड्रसीं फिरवी जे दर्वी पाक ॥ रसस्वाद नेणें ती ॥१७०॥
कृपा न करितां सीतावर ॥ कासया व्यर्थ तत्त्वविचार ॥ त्याचें ज्ञान नव्हे साचार ॥ जैसे कीर अनुवादती ॥७१॥
तेणें केले तीर्थाटण ॥ होय चौसष्ट कळाप्रवीण ॥ तेणें केलें जरी कीर्तन ॥ तें जाण गायन गौरियाचें ॥७२॥
असो रघुपतीस सांडोनि विप्र ॥ पळोन गेले समग्र ॥ जदद्वंद्य रघुवीर ॥ त्याचें स्वरूप नेणोनियां ॥७३॥
असो आतां बहु भाषण ॥ श्रीराम चित्रकुट त्यागोन ॥ वाल्मीकऋषीस नमून ॥ दंडकारण्या चालिला ॥७४॥
श्रीरामविजय ग्रंथ प्रचंड ॥ येथें संपलें अयोध्याकांड ॥ आतां अरण्यकांड इक्षुदंड ॥ अति अपूर्व सुरस पुढें ॥७५॥
रामविजय ग्रंथ क्षीरसागर ॥ दृष्टांतरत्नें निघती अपार ॥ संत श्रोते निर्जर ॥ अंगीकरोत सर्वदा ॥७६॥
ब्रह्मानंदा रविकुलभूषणा ॥ श्रीधरवरदा सीताजीवना ॥ पुढें अरण्यकांडरचना ॥ बोलवीं आतां येथोनि ॥७७॥
स्वस्ति श्रीरामविजय ग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकनाटकाधार ॥ सदा परिसोत भक्त चतुर ॥ द्वादशोध्याय गोड हा ॥१७८॥

॥श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु॥ 

Saturday, October 22, 2011

RamVijay Adhyay - 11


श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

अध्यायापरीस अध्याय परिकर ॥ जैसा पळोपळें चढे दिनकर ॥ कीं शुक्लपक्षींहून चंद्र-॥ कळा विशेष वाढती ॥१॥
कीं अभ्यास करितां वाढे ज्ञान ॥ कीं योगसाधनें समाधान ॥ कीं वटबीज विस्तारे पूर्ण ॥ दिवसेंदिवस अधिक पैं ॥२॥
कीं बाळपणापासूनि पंडित ॥ अधिकाधिक व्युत्पत्ति वाढत ॥ कीं कृष्णावेणी संकीर्ण दिसत ॥ पुढें विशाळ होती जैशा ॥३॥
कीं अग्रापासूनि मुळाकडे ॥ इक्षुदंडाची गोडी वाढे ॥ कीं गुरुभजन करितां आतुडे ॥ ज्ञानकळा विशेष ॥४॥
जों जों नेम शुचिष्मंत ॥ तों तों तपश्र्चर्या वाढत ॥ कीं साधुसमागम करितां त्वरित ॥ क्षमा दया वाढती ॥५॥
कीं करितां निष्काम दान ॥ कीर्तीनें भरे त्रिभुवन ॥ कीं वीरश्रीची धरितां आंगवण ॥ प्रताप विशेष वाढे पैं ॥६॥
किंवा धरितां स्नेहादर ॥ मैत्री वाढे अपार ॥ किंवा करितां परोपकार ॥ यश विशेष वाढत ॥७॥
तैसी रामकथा गोड बहुत ॥ विशेष पुढें रस चढत ॥ जेवीं वर्षाकाळीं पूर येत ॥ गंगेस जैसा उल्हासें ॥८॥
गंगेचा पूर मागुता ओहटे ॥ हा दिवसेंदिवस अधिक वाटे ॥ चतुर प्रेमळ जरी श्रोता भेटे ॥ तरी वक्त्यासी आनंद ॥९॥
श्रोता भेटलिया मतिमंद ॥ तरी मावळे व्युत्पत्तीचा आनंद ॥ जैसें सूर्य मावळतां अरविंद ॥ संकोचोनि जाय पैं ॥१०॥
असो दशमाध्यायीं कथन ॥ जान्हवीतीरीं रघुनंदन ॥ न्यग्रोध वृक्षातळीं जाण ॥ तृणशेजे पहुडला ॥११॥
त्यजोनियां मायाजाळ ॥ निरंजनीं योगी जैसा निश्र्चळ ॥ तैसा राम तमालनीळ ॥ जान्हवीतीरीं शोभला ॥१२॥
तों तेथें गुहक भक्त थोर ॥ तयासी म्हणे राघवेंद्र ॥ परतीरासि सत्वर ॥ आम्हां आतां नेईं तूं ॥१३॥
भवाब्धि तरावया दुस्तर ॥ नामनौका जयाची पवित्र ॥ तो रघुवीर राजीवनेत्र ॥ प्रार्थना करी गुहकाची ॥१४॥
भणगापुढें क्षीरसागर ॥ म्हणे मज भूक लागली थोर ॥ कीं वाचस्पति मूढास विचार ॥ पुसतसे साक्षेपें ॥१५॥
कीं थिल्लरासी जन्हुकुमरी ॥ म्हणे माझी तृषा हरी ॥ किंवा दरिद्रियाचे द्वारीं ॥ कल्पवृक्ष याचक ॥१६॥
तैसा राम गुहाकातें ॥ म्हणे परपारा नेईं मातें ॥ तंव तो जाणोनियां राघवातें ॥ पुसे कौतुकें करूनियां ॥१७॥
म्हणे तुमचें नांव करूं श्रवण ॥ कोठें जातां काय कारण ॥ मग मेदिनीगर्भरत्नभूषणें ॥ काय बोलतां जाहला ॥१८॥
रविकुळमंडळ दशरथ ॥ तो पिता आमुचा यथार्थ ॥ या देहास नाम रघुनाथ ॥ जन समस्त बोलती ॥१९॥
ऐसें बोलतां रघुनंदन ॥ गुहकमाता करी रुदन ॥ म्हणे याचा नौकेसी लागतां चरण ॥ नारी संपूर्ण होईल ॥२०॥
याचे चरणरज झगडतां ॥ शिळज्ञ उद्धरली मिथिलेसी जातां ॥ आम्हीं पूर्वींच ऐकिली कथा ॥ भक्तसंतांचेनि मुखें ॥२१॥
कठिण पाषाण लागतां चरणीं ॥ इंदिरेतुल्य जाहली कामिनी ॥ नौका काष्ठाची तत्क्षणीं ॥ चरण लागतां होईल ॥२२॥
वृद्धा म्हणे पुत्रा अवधारीं ॥ यासी न घालावें नावेवरी ॥ नौकेची जाहलिया नारी ॥ कैसी जीविका तुझी होय ॥२३॥
एक वनिता पोसितां ॥ तुज संकट होय तत्वतां ॥ नावेवरी रघुनाथा ॥ पुत्रा सर्वथा बैसवूं नको ॥२४॥
मग गुहक म्हणे सर्वोत्तमा ॥ अगाध तुझे चरणांचा महिमा ॥ तरी ते चरण श्रीरामा ॥ मी प्रक्षाळीन स्वहस्तें ॥२५॥
पाषाणाची जाहली नारी ॥ हे तों चरणरजांची थोर ॥ तरी ते पद प्रक्षाळीन निर्धारीं ॥ मग नावेवरी बैसवीन ॥२६॥
मग गुहकें आश्रमास नेऊन ॥ बैसविला जगन्मोहन ॥ जो मायातीत शुद्ध चैतन्य ॥ पद्माक्षीरमण जगद्रुरु ॥२७॥
विधि हर सहस्रनयन ॥ ज्याचे वांछिती रजःकण ॥ सनकादिकां दुर्लभ पूर्ण ॥ करितां साधन नातळे जो ॥२८॥
जेथूनि जन्मली जन्हुकुमरी ॥ ते चरण प्रक्षाळून स्वकरीं ॥ फळें मूळ आणूनि झडकरी ॥ जनकजामात पूजिला ॥२९॥
ते वेळीं गुहकाचा हर्ष पाहें ॥ ब्रह्मांडामाजीं न समाये ॥ दृढ समाये ॥ दृढ धरूनि श्रीरामाचे पाय ॥ प्रेमेंकरून स्फुंदत ॥३०॥
म्हणे स्वामी रविकुलतिलका ॥ दयाब्धे मायाचक्रचाळका ॥ अयोध्यापते ताटिकांतका ॥ झडकरीं येईं मागुती ॥३१॥
स्वामी तूं परतोन आलियावीण ॥ मी कदापि न भक्षी अन्न ॥ नाना भोग मंगलस्नान ॥ न करीं येथूनि श्रीरामा ॥३२॥
जाणोनियां प्रेमळ भक्त ॥ श्रीराम त्यासी हृदयीं धरित ॥ मग नौका आणूनि त्वरित ॥ जनकजामात बैसविला ॥३३॥
सौमित्र आणि सीता सती ॥ तिघें नौकेवरी आरूढती ॥ मग सुमंताप्रति रघुपति ॥ आज्ञा देता जाहला ॥३४॥
सुमंता तूं जाय वेगें ॥ सकळ वृत्तांत रायासि सांगें ॥ माझा नमस्कार साष्टांगें ॥ वसिष्ठदशरथांसी सांगें कां ॥३५॥
चतुर्दश वर्षें होतां पूर्ण ॥ मी सत्वर येतों परतोन ॥ सकळ लोकांचें समाधान ॥ करी सुमंता जाऊनियां ॥३६॥
तुवां जाऊनियां त्वरित ॥ ग्रामासि आलिया बंधु भरत ॥ क्रोधेंकरून दशरथ ॥ वधील एकादा तयासी ॥३७॥
याकारणें तुवां सुमंता ॥ वेगें परतोनि जावें आतां ॥ सुमंत उतरून रथाखालता ॥ चरणीं माथा ठेवितसे ॥३८॥
नयनोदकेंकरून ॥ प्रक्षाळिले श्रीरामचरण ॥ सुमंत म्हणे माझेन ॥ अयोध्येस न जाववे ॥३९॥
मी समागमें येईन ॥ अथवा येथें प्राण देईन ॥ परी मी न जाय परतोन ॥ दुःख द्यावया समस्तां ॥४०॥
देखती जेव्हां रथ रिता ॥ दशरथ आणि कौसल्या माता ॥ त्यांची करावया हत्या ॥ माझेन तेथें न जाववे ॥४१॥
वनीं सांडून तुज रघुनायका ॥ प्रवेशतां अयोध्येंत देखा ॥ मज म्हणती काळमुखा ॥ कां तूं येथें आलासी ॥४२॥
मग रघुनाथें धरिलें हृदयीं ॥ म्हणे बारे चिंता न करी कांहीं ॥ तूं अयोध्येसी शीघ्र जाईं ॥ आज्ञा माझी पाळी कां ॥४३॥
माथां ठेविला वरदहस्त ॥ तेणें शोक समस्त जाहला शांत ॥ जैसा मेघ वर्षतां अद्भुत ॥ वणवा त्वरित विझोनि जाय ॥४४॥
मग आज्ञा घेऊनि सुमंत ॥ पैलतीरीं उभा अवलोकित ॥ नावेंत बैसला रघुनाथ ॥ गुहक पैलतीरा नेत पैं ॥४५॥
जैसा निवृत्तितटाकीं योगी पावत ॥ तैसा पैलतीरा उभा रघुनाथ ॥ सुमंतासी हातें पालवित ॥ जाय त्वरित माघारा ॥४६॥
यावरी पुढें पुष्करिणी ॥ तेथें क्रमिली एक रजनी ॥ मग प्रयागाप्रति चापपाणी ॥ येता जाहला ते वेळे ॥४७॥
दृष्टी देखोनि रघुनंदन ॥ प्रयागही जाहला पावन ॥ पुढें भरद्वाजआश्रमा रघुनंदन ॥ येता जाहला साक्षेपें ॥४८॥
आला ऐकोनि रघुराज ॥ सामोरा धांवला भरद्वाज ॥ रामें नमस्कारिला द्विज ॥ क्षेमालिंगन दीधलें ॥४९॥
भरद्वाज बोले सप्रेम ॥ आजि माझा सुफळ जन्म ॥ त्रिभुवनपति श्रीराम ॥ गृहा आला म्हणोनियां ॥५०॥


माझिया पुण्याचे गिरीवर ॥ भेदोनि गेलें चिंदंबर ॥ तरीच सीतावल्लभ रघुवीर ॥ मूळेंविण पातला ॥५१॥
सकळमंगलदायक रघुवीर ॥ जो मंगल भगिनीचा निजवर ॥ मंगलमातेचा उद्धार ॥ करावया जात प्रदक्षिणे ॥५२॥
तो पंचद्वयरथनंदन ॥ करावया सुरांचें बंधमोचन ॥ कमळिणीमित्रकुलभूषण ॥ येणें पंथें चालिला ॥५३॥
तो ऋषि धांवती अपार ॥ त्यांहीं कैसा वेष्टिला रघुवीर ॥ जैसा देवीं वेष्टिला सहस्रनेत्र ॥ कीं किरणांत मित्र विराजे ॥५४॥
कीं चंदनें वेष्टित मलयानिळ ॥ कीं विरक्तीं वेष्टिला जाश्र्वनीळ ॥ की वराभोंवते सकळ ॥ वऱ्हाडी जैसी मिरवती ॥५५॥
कीं साधक जैसे निधानाजवळी ॥ कीं रत्नाभोंवतीं परीक्षकमंडळी ॥ कीं कनकाद्रिभोंवतीं ॥ पाळी ॥ कुलाचलांची विराजे ॥५६॥
कीं नक्षत्रें वेष्टिला शशी ॥ कीं मानस वेष्टिलें राजहंसीं ॥ तैसा ऋषींनीं अयोध्यानिवासी ॥ भरद्वाज आश्रमीं वेष्टिला ॥५७॥
भरद्बाजें पूजिला रघुनंदन ॥ तेथें क्रमिला एक दिन ॥ ऋषि बोलती सुवचन ॥ अजनंदनपुत्राप्रति ॥५८॥
चतुर्दश वर्षेंपर्यंत ॥ श्रीरामा रहा येथें स्वस्थ ॥ दंडकारण्याप्रति व्यर्थ ॥ कासयासी जावें हो ॥५९॥
राघव म्हणे येथें राहतां ॥ अयोध्येच्या प्रजा येतील समस्ता ॥ ब्राह्मण आणि माता पिता ॥ येतील भेटीस निश्र्चयें ॥६०॥
आम्ही गुप्तरूपें येथूनी ॥ प्रवेशूं महाकाननीं ॥ पुढील भविष्यार्थ मनीं ॥ मुनि तुम्हीं जाणतसां ॥६१॥
असो ऋषि आश्रमीं क्रमोनि एक दिवस ॥ ऋषींस पुसे अयोध्याधीश ॥ पुढें चालिला जगन्निवास ॥ मार्ग आम्हांस दाविजे जी ॥६२॥
भरद्वाज म्हणे चित्रकूटपर्वतीं ॥ विद्वज्जन बहुत राहती ॥ तुम्ही तेथें करावी वस्ती ॥ कांही दिवस राघवा ॥६३॥
भरद्वाजें बोळविला रघुनाथ ॥ आज्ञा घेऊनि त्वरित ॥ प्रयागासी परतला ॥६४॥
सिद्धवट देखोनि नमन ॥ करी पद्माक्षी रमण ॥ त्या सिद्धवटीं सावित्री पूर्ण ॥ सीता देखोन नमस्कारी ॥६५॥
विजयी होऊनि रघुनंदन ॥ वनींहून आलिया परतोन ॥ दोन लक्ष गोदानें येथें देईन ॥ ब्राह्मणसंतर्पण यथाविधि ॥६६॥
पुढें चित्रकूटपर्वतावरी ॥ चढला शरयुतीरविहारी ॥ तेथें वाल्मीक ऋषि तप करी ॥ बहुत ऋषींसमवेत ॥६७॥
जेणें नारदकृपेचेनि बळें ॥ अवतारभविष्य कथियेलें ॥ जैसें कमळा अगोदर भरिलें ॥ सरोवरीं जळ जेवीं ॥६८॥
अवताराआधीं जन्मपत्र ॥ केलें शतकोटी विस्तार ॥ तेणें दृष्टीं देखतां रघुवीर ॥ आश्रमाबाहेर धांवला ॥६९॥
वाल्मीकाचे निजचरणीं ॥ माथा ठेवी मोक्षदानी ॥ वाल्मीकें वरचेवर उचलोनी ॥ अलिंगन दीधलें ॥७०॥
इतरां समस्त द्विजवरां ॥ भेटला परात्पर सोयरा ॥ सौमित्रें चित्रकूटीं ते अवसरा ॥ पर्णकुटिका बांधिली ॥७१॥
ऋषिमंडळींत रघुवीर ॥ चित्रकूटीं राहिला जगदुद्धार ॥ गुहक पाठवून बाहेर ॥ समाचार नेला हो ॥७२॥
चित्रकूटीं राहिला रघुनायक ॥ सुमंतासी सांगे गुहक ॥ राघववियोगें दोघांसी दुःख ॥ अत्यंत जाहलें तेधवां ॥७३॥
गुहकें घरासी नेला ॥ म्हणे मी आतां राम कैं देखेन डोळां ॥ असो रथासहित सुमंत परतला ॥ वेगीं अयोध्येसी येतसे ॥७४॥
अयोध्या दिसे प्रेतवत ॥ रिता घेऊन प्रवेशला रथ ॥ सुमंत मुखावरी पल्लव घेत ॥ झांकोनि मुख चालिला ॥७५॥
सुमंत म्हणे आपुले मनीं ॥ श्रीराम टाकोनि आलों वनीं ॥ ऐशिया मज अभाग्यासी जननी ॥ काय व्यर्थ प्रसवली ॥७६॥
कैकयीसदनासमोर ॥ सुमंतें सोडोनि रहंवर ॥ मंदिरांत प्रवेशे सत्वर ॥ अति मुखचंद्र उतरला ॥७७॥
रिता आणिला माघारा रथ ॥ अयोध्येंत समस्तांसी जाहलें श्रुत ॥ घरोघरीं एकचि आकांत ॥ सीताकांतवियोगें ॥७८॥
इकडे कंठीं प्राण धरून ॥ कैकयीसदनीं अजनंदन ॥ सुमंतें तयासी देखोन ॥ नमन करूं लाजतसे ॥७९॥
राजा म्हणे टाकिलें राजीवनयना ॥ मज वाटतें माझिया प्राणा ॥ मूळ आलासी सत्वर ॥८०॥
जगद्वंद्य माझी वस्तु जाण ॥ टाकिली कोण वनीं नेऊन ॥ श्रीराम माझें निधान ॥ कोणें चोरें चोरिलें ॥८१॥
राजहंस माझा रघुनंदन ॥ पंकगर्तेत ठेविला रोवून ॥ माझें सुढाळ मुक्त पूर्ण ॥ भिरकावून दिधलें कोठें ॥८२॥
अन्नपूर्णावरहृदयींचें रत्न ॥ म्यां तुझे हातीं दिधलें पूर्ण ॥ घोर वनीं तें टाकून ॥ कैसा आलासी माघारा ॥८३॥
मज अंधाची काठी बळें ॥ हिरूनि कोणी नेली न कळे ॥ अरण्यामाजी माझीं बाळें ॥ उपवासी निराहारें ॥८४॥
सुंदर सुकुमार सुमनकळी ॥ माझी माउली जनकबाळी ॥ सुमंता रथाखालीं कैसी उतरली ॥ कैसी चालिली पंथीं सांग ॥८५॥
तिहीं भोजनें कोठें केलीं वनीं ॥ शयन केलें कोणे मेदिनीं ॥ सुमंता सांग मजलागुनी ॥ देह टाकूनि जाईन मी ॥८६॥
मग तो सुमंत म्लानवदन ॥ सांगे सकळ वर्तमान ॥ तीन दिवस निराहार पूर्ण ॥ तिघेंजणें पैं होतीं ॥८७॥
तृणासनीं राजीवनेत्र ॥ पहुडला घनश्यामगात्र ॥ पांघरावया अंबर ॥ आपाद मस्तक देखिला म्यां ॥८८॥
श़ृंगवेरपर्यंत ॥ म्यां बोळविला रघुनाथ ॥ ज्याचेनि नामें जग तरत ॥ तो गुहकें नेला परपारा ॥८९॥
मायानदीं उल्लंघून ॥ संत स्वरूपीं होती लीन ॥ तैसा पैलतीरा रघुनंदन ॥ दैदीप्यमान पाहिला म्यां ॥९०॥
याउपरी करुणाकरें ॥ अयोध्येसी जातां त्वरें ॥ तेथोनियां जगदुद्धारें ॥ निजकरें मज पालविलें ॥९१॥
राघवें साष्टांग नमन ॥ घातलें मग तेथून ॥ पुढें चरणचालीं रघुनंदन ॥ करीत गमन वनवासा ॥९२॥
जैसा अस्ता गेला दिनकर ॥ तैसा वनीं प्रवेशला रघुवीर ॥ याज्ञिककुंडामाजी वैश्र्वानर ॥ आच्छादित जैसा कां ॥९३॥
ऐसीं सुमंताचीं वचनें भूपाळ ॥ कर्णीं ऐकतांचि तात्काळ ॥ धबधबा तेव्हां वक्षःस्थळ ॥ पिटोन घेत ते समयीं ॥९४॥
सुमंता वनीं रघुनंदन ॥ कैसा परतलासी सोडून ॥ अरे तुझें हृदय निर्दय पूर्ण ॥ कैसा प्राण गेला नाहीं ॥९५॥
सुमंता तुझा थोर धीर ॥ वज्रापरी तुझें शरीर ॥ वनीं सांडोनि रघुवीर ॥ कैसा एथवरी आलासी ॥९६॥
गळामाजी गुंतला मीन ॥ तैसा तळमळी अजनंदन ॥ श्रीराम वियोगाचा अग्न ॥ जाळीत पूर्ण सर्वांगीं ॥९७॥
म्हणे धांव धांव बारे रघुनंदना ॥ सरोजनेत्रा सुहास्यवदना ॥ कोमलांगा माझिया प्राणा ॥ गेलासी वना टाकूनि ॥९८॥
हांक फोडिली दशरथें ॥ धांव माउलीये रघुनाथे ॥ मज सांडोनि तान्हयातें ॥ गेलासी वना दूरदेशा ॥९९॥
रामा चालिला माझा प्राण ॥ अंतकाळीं दावीं तुझें वदन ॥ ऐसें बोलतां वटारिले नयन ॥ सोडिला प्राण रामस्मरणें ॥१००॥


राम राम करितां दशरथ ॥ जाहला रामरूप यथार्थ ॥ खुंटला शोक समस्त हेत ॥ मात सर्व राहिली ॥१॥
पाहा शरीराचें कर्म गहन ॥ चोघे पुत्र दशरथास असोन ॥ एकही जवळी नसतां सोडिला प्राण ॥ मग सुमंत प्रधान धांवला ॥२॥
तेणे उशाशी मांडी दिधली ॥ सुमित्रा कौसल्या जवळी आली ॥ तेव्हां एकचि हांक जाहली ॥ महाशब्दें करूनियां ॥३॥
सप्तशत राण्या सकळ ॥ दुःखें पिटिती वक्षःस्थळ ॥ हडबडलें अयोध्यापुर सकळ ॥ शोक तुंबळ लोकांतें ॥४॥
आक्रोशें कौसल्या सुमित्रा रडत ॥ रामवियोगें दुःख बहुत ॥ त्यांत मृत्यु पावला दशरथ ॥ नाहीं अंत शोकातें ॥५॥
जैसें पायास डंखिजे महाव्याळें ॥ तों मस्तकीं वृक्षिकें ताडिलें ॥ कीं वणव्यांत प्राणी सांपडले ॥ त्यावरी तोडिलें तस्करांनीं ॥६॥
आधींच बहुत धाकेंकरून ॥ त्यावरी पडती पाषाण ॥ आधींच नवज्वरें गेला व्यापून ॥ त्यांत विषपान पैं झालें ॥७॥
आधींच गृहास लागला अग्न ॥ त्यावरी साह्य जाहला प्रभंजन ॥ कीं पूरीं जातां बुडोन ॥ तों गळां पाषाण बांधिला ॥८॥
व्याघ्रभयें पळतां उठाउठी ॥ तों रिसें कंठीं घातली मिठी ॥ तैसी कौसल्येस जाहली गोष्टी ॥ लल्लाट पिटी अवनीये ॥९॥
तों तेथें पातला ब्रह्मसुत ॥ म्हणे शोक कां करितां व्यर्थ ॥ आतां वेगीं आणोन भरत ॥ राज्यीं तया स्थापावा ॥११०॥
एक राजा उभा राहिल्याविण ॥ करूं नये राजाचें दहन ॥ आणि समीप नसतां नंदन ॥ कदा अग्न देऊं नये ॥११॥
मग तैलद्रोणींत साचार ॥ घातलें दशरथाचें शरीर ॥ वसिष्ठ म्हणे सुमंता सत्वर ॥ रथ घेऊनि धांवें कां ॥१२॥
सूर्योदय होतां येथें ॥ वेगीं घेऊनि यावें भरतातें ॥ त्याचे कर्णीं वोखटें तेथें ॥ सर्वथाही सांगूं नको ॥१३॥
वनास गेला रघुनंदन ॥ अथवा दशरथें सोडिला प्राण ॥ हें गुह्य त्यासी न सांगोन ॥ वेगें घेवोन येईंजे ॥१४॥
भरत केवळ श्रीरामभक्त ॥ ही गोष्ट ऐकतां विपरीत ॥ तात्काळ देह टाकील तेथ ॥ यालागीं श्रुत न करावें ॥१५॥
भक्त विरक्त चतुर वरिष्ठ ॥ जो ज्ञानगेंगेचा निर्मळ लोट ॥ जो विवेकररत्नांचा मुकुट ॥ एकनिष्ठ सुभट जो ॥१६॥
जो वैराग्यवैरागर पूर्ण ॥ जो आनंदभूमीचें निधान ॥ जो विरक्तवल्लीचें सुमन ॥ जो समुद्र सत्याचा ॥१७॥
जो शांतिवृक्षांचें पक्वफळ ॥ जो दयेचा आगर केवळ ॥ कीं उपरतीचा निर्मळ ॥ पूर्ण कुंभ उचंबळला ॥१८॥
ऐसा सर्वगुणीं अलंकृत ॥ वेगीं घेऊन ये भरत ॥ तैसाचि निघाला सुमंत ॥ आचार्यचरण वंदूनि ॥१९॥
वायुवेगें चालिला सुमंत ॥ स्वप्न देखे मातुळीं भरत ॥ कृष्णवर्णवस्त्रवेष्टित ॥ नारी एक देखिली ॥१२०॥
तिणें घेऊनियां करीं ॥ तैल जिरवी आपुलें शिरी ॥ भरत जागा होऊनि झडकरीं ॥ रुदन करी आक्रोशें ॥२१॥
म्हणे स्वप्न नव्हे हा दिसतो अनर्थ ॥ आम्हीं चौघे बंधु आणि दशरथ ॥ पांचांमाजी जीवघात ॥ होईल एकाचा निर्धारें ॥२२॥
आणि प्राणसखा अत्यंत ॥ तो अंतरेल दूर बहुत ॥ धरणीवरी मस्तक भरत ॥ आपटी शोकें तेधवां ॥२३॥
आक्रंदोनि हाक देती ॥ केवीं दृष्टीं रघुनाथ ॥ राजाधिराज दशरथ ॥ अंतरला ऐसें वाटतें ॥२४॥
तों मातुळ संग्रामजित ॥ भरतासी स्नेहें हृदयीं धरित ॥ शत्रुघ्नासी समजावित ॥ शोक व्यर्थ कां करितां ॥२५॥
रजनी सरतां तात्काळ ॥ सिद्ध करून चतुरंग दळ अयोध्येप्रति उतावेळ ॥ नेऊन पाठवितों तुम्हांतें ॥२६॥
ऐसें बोलतां सरली रजनी ॥ भरत शत्रुघ्न उठोनी ॥ नगराबाहेर येउनी ॥ मार्ग लक्षीत अयोध्येचा ॥२७॥
ऊर्ध्व वदनेंकरूनि चकोर ॥ विलोकित जैसा चंद्र ॥ कीं चक्रवाक चिंती दिवाकर ॥ किंवा मयूर मेघातें ॥२८॥
ऐसा अयोध्येचा मार्ग लक्षित ॥ तों एकाएकीं देखिला रथ ॥ वरी प्रधान सुमंत ॥ आरूढोनि येतसे ॥२९॥
मंद मंद येत रहंवर ॥ अश्र्वांचे नेत्रीं वाहे नीर ॥ ध्वजाचें विद्युत्प्राय चीर ॥ अति मलिन दिसतसे ॥१३०॥
वरी सुमंत म्लानवदन ॥ नेत्रीं वाहत अश्रुजीवन ॥ राघव लीला आठवून ॥ क्षणांक्षणां स्फुंदतसे ॥३१॥
मागुतीं वस्त्रें नेत्र पुसित ॥ तों शत्रुघ्न आणि भरत ॥ जवळी आले धांवोनि त्वरित ॥ चिन्हें विपरीत देखोनियां ॥३२॥
सुमंतें देखतांचि भरत ॥ वेगें रथाखालीं उतरत ॥ क्षेमालिंगन दोघां देत ॥ सांगे त्वरित बोलाविलें ॥३३॥
भरत सुमंताचें वदन ॥ क्षणक्षणां पाहे विलोकून ॥ म्हणे सख्या तुझे आरक्त नयन ॥ शोक झाले दिसती पैं ॥३४॥
काय अयोध्येचें वर्तमान ॥ सुखी आहे कीं रघुनंदन ॥ श्रीदशरथ क्षेमकल्याण ॥ सुखरूप आहे कीं ॥३५॥
सुमंत म्हणे सुखी रघुनंदन ॥ तुम्हांसी बोलाविलें त्वरेंकरून ॥ मग रथीं बैसत भरतशत्रुघ्न ॥ त्वरेनें शीघ्र चालिले ॥३६॥
पुढें धुरे बैसला सुमंत ॥ घडीघडी नेत्रांसी वस्त्र लावित ॥ तेणें भरत होय सद्रदित ॥ तों पुढें देखत अयोध्या ॥३७॥
प्राणरहित जैसें शरीर ॥ तैसें दिसे अयोध्यानगर ॥ कीं जीवनेंवीण सरोवर ॥ किंवा कांतार दग्ध जैसें ॥३८॥
कीं नारी जैसी भ्रताराविण ॥ कीं जननीविण तान्हें दीन ॥ कीं नासिकावांचोनि वदन ॥ अयोध्याभुवन तेवीं दिसे ॥३९॥
राजमंदिराचे ढळले कळस ॥ मंगलवाद्यांचा नाहीं घोष ॥ घरोघरीं नारी पुरुष ॥ शोक आक्रोशें करिताती ॥१४०॥
होतें दशरथाचें प्रेत ॥ सुमंतें तेथेंचि नेला रथ ॥ छत्र भंगलें देखतां भरत ॥ रथाखालीं पडियेला ॥४१॥
दशरथाचें प्रेत देखोनी ॥ भरत तेव्हां लोळें धरणीं ॥ अश्रुधारा वाहती नयनीं ॥ शोक गगनीं न समाये ॥४२॥
शोक समुद्रीं निमग्न ॥ जाहला कैकयीनंदन ॥ भोवतें सद्रद प्रजानन ॥ दुःखेकरून बोलती ॥४३॥
मग सुमंत प्रधानें सांवरूनि ॥ भरत बैसविला उठवोनि ॥ भरत विचार करी मनीं ॥ राम नयनीं पाहीन आतां ॥४४॥
संसारमाया सांडोन ॥ दशरथ पावला स्वर्गभुवन ॥ मीं आतां राघवचरण ॥ दृढ धरीन निजभावें ॥४५॥
विलोकितां श्रीरामवदन ॥ मी शोकावेगळा होईन ॥ प्रधानासी म्हणे मज नेऊन ॥ श्रीरामचरणांवरी घालावें ॥४६॥
वडील बंधु रघुनाथ ॥ दशरथासम यथार्थ ॥ रामसदनाकडे भरत ॥ मुरडोनियां चालिला ॥४७॥
परी वनास गेला रघुनंदन ॥ हें कोणासी न बोलवे वचन ॥ एक म्हणती देईल प्राण ॥ सीतारमण न देखतां ॥४८॥
तों ओरडत कौसल्यामाय ॥ भरत धांवोनि धरी दृढ पाय ॥ माये श्रीराम कोठें आहे ॥ तो लावलाहें दावी कां ॥४९॥
तों कौसल्येसी आली मूर्च्छना ॥ बोलतां न बोलवे वचना ॥ बा रे राम गेला तपोवना ॥ मग रायें प्राण त्यजियेला ॥१५०॥


भरतें ऐसें ऐकिलें ॥ लल्लाट भूमीवरी आपटिलें ॥ तें दुःख नवजाय वर्णिलें ॥ कल्पांत मांडला ते वेळीं ॥५१॥
अहा रघुवीरा राजीवनेत्रा ॥ नवमेघरंगा स्मरारिमित्रा ॥ जगद्वंद्या कोमलगात्रा ॥ कां ऊपेक्षिलें आम्हांतें ॥५२॥
ऐसे बोलोनियां भरत ॥ मेदिनीवरी अंग घालित ॥ माझी माउली रघुनाथ ॥ गेली निश्र्चित टाकोनि ॥५३॥
मेदिनीगर्भरत्नभूषण ॥ वनासी निघतां रघुनंदन ॥ दशरथें जेवीं सोडिला प्राण ॥ तैसें मरण मज कां न ये ॥५४॥
अद्यापि न ये मजला मृत्य ॥ कां मृत्यूच निमाला यथार्थ ॥ रामवियोगाचें दुःख अत्यंत ॥ मृत्यूसही न सोसवे ॥५५॥
धन्य धन्य राजा दशरथ ॥ कोमल हृदय प्रेमळ यथार्थ ॥ देह ठेवूनि विदेहजामात ॥ जवळ केला त्वरेनें ॥५६॥
तंव तो कमलोद्भवसुत ॥ आचार्य पातला त्वरित ॥ भरत जाऊनि चरण धरित ॥ मज रघुनाथ दाखवीं ॥५७॥
पहावया भरताचें मन ॥ वसिष्ठ काय बोले वचन ॥ तुज राज्य दिधल्याविण ॥ रायास अग्न देऊं नये ॥५८॥
आणि तुझिया मातेच्या मनांत ॥ तुज राज्य व्हावें प्राप्त ॥ वनास गेला जनकजामात ॥ तेंचि निमित्त जाण पां ॥५९॥
ऐसें ऐकतां ते अवसरीं ॥ परम दुःख पावला अंतरीं ॥ भरत आक्रंदत दीर्घस्वरीं ॥ राज्य करी म्हणतांचि ॥१६०॥
सुकुमार चंपककळिकेवरी ॥ चपळा पडतां न उरे उरी ॥ कीं कर्पूर जननीचे शिरीं ॥ शुंडाप्रहारीं ताडी गज ॥६१॥
कीं शस्त्रघायें तोडिली बाळें ॥ कीं वज्रघायीं चूर्ण कपाळें कीं अग्नींत पडलीं मुक्ताफळें ॥ तैसें वाटलें भरतातें ॥६२॥
श्रीराम गेला वनांतरी ॥ जरी मी येथें राज्य करीं ॥ तरी जितुकें ब्राह्मण पृथ्वीवरी ॥ म्यां वधिले स्वहस्तें ॥६३॥
जगद्वंद्यास वनीं सांडोन ॥ जरी मी अंगिकारीं राज्यासन ॥ विगतधवा जे जारीण ॥ तिचें गर्भस्थळ मी पावें ॥६४॥
रजस्वलेच्या शोणितासमान ॥ राज्यभिषेकाचें उदक पूर्ण ॥ मी आपुल्या उदरीं शस्त्र घालीन ॥ राज्यासन घ्या म्हणतां ॥६५॥
ज्यासी मृडानीवर ध्याय मनीं ॥ ज्याची अयोध्या हे राजधानी ॥ ते मी भोगितांचि ते क्षणीं ॥ महाचांडाळ मी जाहलों ॥६६॥
रघुवीर सांडोन काननीं ॥ जरी मी भोगीन राजधानी ॥ तरी जिव्हा जावो झडोनी ॥ कीटक पडोनि तत्काळ ॥६७॥
वनीं सांडोनि जगन्मोहन ॥ जरी मी घेईन राज्यासन ॥ तरी गुरुवध मद्यपान ॥ मात्रागमन घडे मज ॥६८॥
कलंक लागेल वासरमणी ॥ पाप प्रवेशेल गंगाजीवनीं ॥ मृगजळीं घटोद्भवमुनी ॥ जरी बुडोन जाईल ॥६९॥
चित्रकिरणाचियावरी ॥ चढती मुंगियांच्या हारी ॥ कीं वडवानळाचे शिरीं ॥ नृत्य करी पतंग ॥१७०॥
कीं ऊर्णनाभींच्या तंतुसूत्रीं ॥ जरी उचलेल धरित्री ॥ कीं तृणपाशें महाकेसरी ॥ जरी गुंतोन पडेल ॥७१॥
कीं मही उचलेल मशका ॥ जरी सुपर्णासी बाधेल आळिका ॥ दृष्टी देखतां दीपका ॥ मृगांक खालीं पडेल ॥७२॥
जरी हें घडेल ब्रह्मनंदना ॥ तरी मज होईल राज्यवासना ॥ ऐकोनि भरताच्या वचना ॥ वसिष्ठ जाहला सद्रद ॥७३॥
अहो तें भरताचें वचन ॥ वैराग्यवल्लीचें सुमन ॥ कीं विवेकनभींचें उडुगण ॥ प्रेमतेजें झळकत ॥७४॥
कीं तें भक्तिपंथींचें सरोवर ॥ कीं निश्र्चयभावें दिव्य नगर ॥ कीं तें विश्रांतीचें मंदिर ॥ वचनरूप प्रत्यक्ष ॥७५॥
असो तो कैकयीनंदन ॥ म्हणे स्वामी शिवतों तुझे चरण ॥ श्रीरघुवीराची मज आण ॥ राज्याभिषेक करूं नेदी ॥७६॥
कैकयीचें काळें वदन ॥ माता नव्हे ते लांव पूर्ण ॥ तीस आवडे रांडपण ॥ पतीचा प्राण घेतला ॥७७॥
मग वसिष्ठें जें जें चिंतिलें ॥ तें तें भरतासी निवेदिलें ॥ मंथरादासीचे बोलें ॥ कार्य नासलें सर्वही ॥७८॥
कलहकल्लोळसरिता ॥ ते ही मंथरा दासी तत्वतां ॥ कुबुद्धि शिकवूनि तुझी माता ॥ इणेंचि पाहें पां बोधिली ॥७९॥
ऐसी ऐकतांचि मात ॥ वेगें धांवे वीर भरत ॥ मंथरेची वेणी अकस्मात ॥ धरूनि शस्त्र काढिलें ॥१८०॥
मग धांवोनि ब्रह्मसुत ॥ भरताचा धरिला हात ॥ म्हणे स्त्री वधितां पाप अद्भुत ॥ कदा विपरीत करूं नको ॥८१॥
मग लत्ताप्रहारेंकरूनि ॥ भरतें ताडिलें तियेलागुनी ॥ त्रिवक्रकुब्जा तेथूनि ॥ नाम तियेसी जाहलें ॥८२॥
असो ब्रह्मपुत्रें तयेक्षणीं ॥ रामपादुका सिंहासनीं ॥ मणिमय रचित दिव्यरत्नीं ॥ सिंहासनीं स्थापिल्या ॥८३॥
त्यांवरी छत्र धरून ॥ मग राजदेह उचलून ॥ अग्निमुखीं समर्पून ॥ उत्तरकर्म भरत करी ॥८४॥
सप्तशत रायाच्या युवती ॥ अग्निप्रवेश तात्काळ करिती ॥ जैसी सूर्यकिरणें सामावती ॥ सूर्यासरसीं अस्तमानीं ॥८५॥
सुमित्रा आणि कौसल्या ॥ प्राण द्यावया सिद्ध जाहल्या ॥ मग वसिष्ठें वर्जिल्या ॥ शास्त्रप्रमाण रीतीनें ॥८६॥
पुत्रवंत्या स्त्रिया विशेष ॥ त्यांहीं न करावा अग्निप्रवेश ॥ तों कौसल्या म्हणे आम्हांस ॥ कशास व्यर्थ ठेवितां ॥८७॥
वनास गेला रघुनाथ ॥ परत्र पावला दशरथ ॥ आतां काय वांचूनि व्थर्थ ॥ काया अग्नींत निक्षेपूं ॥८८॥
मग वसिष्ठ सांगे वाहूनि आण ॥ तुम्हांस श्रीराम भेटवीन ॥ मग वनासी करील गमन ॥ पुढती आगमन करील पैं ॥८९॥
निवटोनि असुर समस्त ॥ अयोध्येसी येईल रघुनाथ ॥ हा वाल्मीकाचा मूळ काव्यार्थ ॥ माना यथार्थ सर्वही ॥१९०॥
गुरुवचन मानूनि प्रमाण ॥ चित्रकुटीं भेटेल रघुनंदन ॥ अग्निप्रवेश म्हणून ॥ वर्ज केला ते काळीं ॥९१॥
असो रात्र जाहली दोन प्रहर ॥ कैकयीनें येऊन सत्वर ॥ भरतासि एकांत विचार ॥ सांगे कैसा ऐका तें ॥९२॥
म्हणे पुत्रा ऐक वहिलें ॥ संकटीं म्यां राज्य साधिलें ॥ रामासी वनवासा पाठविलें ॥ नाना यत्नेंकरूनियां ॥९३॥
वना गेलें रामलक्ष्मण ॥ हें तूं परम मानीं कल्याण ॥ सत्वर घेईं छत्रीसिंहासन ॥ कांहीं अनमान करूं नको ॥९४॥
पितृवचन करावया प्रमाण ॥ वनास गेला रघुनंदन ॥ त्या शोकास्तव राव पावला मरण ॥ हेही जाण बरें जाहलें ॥९५॥
सापत्नबंधु राम निर्धारें ॥ त्यासीं वंचन करितां बरें ॥ देव दैत्य दायाद वैरें ॥ अद्यापिही वर्तती ॥९६॥
गरुड सर्व सापत्न ॥ वैरें वर्तती दोघेजण ॥ जरी तूं होसी माझा नंदन ॥ तरी वचन पाळीं हें ॥९७॥
भरतें ऐकतांचि तिची वाणी ॥ म्हणे उठें येथोनि चांडाळिणी ॥ तुझा वध केला असतां या क्षणीं ॥ परी माता म्हणोनि रक्षिली ॥९८॥
परम निर्दय तूं पापीण ॥ अमंगळ तूं लांव पूर्ण ॥ घेतला दशरथाचा प्राण ॥ जानकीजीवन धाडिला वना ॥९९॥
तूं सर्पीण होसी यथार्थ ॥ डंखोनि मारिला दशरथ ॥ माझा सखा रघुनाथ ॥ दूर वनासी धाडिला ॥२००॥


पिता बंधु दोघेजण ॥ गेले ज्या पंथेकरून ॥ त्या मार्गें मीही जाईन ॥ ऊठ येथूनि पापरूपे ॥१॥
असो कैकयी गेली उठोन ॥ तों उदय पावला चंडकिरण ॥ भरतें वल्कलें वेष्टून ॥ भस्म लाविलें सर्वांगीं ॥२॥
सर्व अलंकार त्यागून ॥ वटदुग्धीं जटा वळून ॥ वनाप्रती कैकयीनंदन ॥ चरणचालीं चालिला ॥३॥
षोडशपद्में दळभार ॥ नगरलोक निघाले सत्वर ॥ ओस पडले अयोध्यापुर ॥ जीवमात्र चालिले ॥४॥
कौसल्या सुमित्रा दोघीजणी ॥ शिबिकेंत बैसल्या ते क्षणीं ॥ वरी वस्त्रावरण घालूनी ॥ वाहनासहित झांकल्या ॥५॥
वसिष्ठादि सकळ ब्राह्मण ॥ सवें निघालें चारी वर्ण ॥ अयोध्येंत कैकयीवांचून ॥ नाहीं कोणी राहिलें ॥६॥
जन म्हणती ओस नगर ॥ कैकयीचें वपन करूं सत्वर ॥ तिजवरी धरावें छत्र ॥ परम अपवित्र पापिणी ॥७॥
तिचें पोटीं भरत जन्मला ॥ जैसा कागविष्ठेंत अश्र्वत्थ प्रगटला ॥ कीं कागिणी पोटीं कोकिळा ॥ निपजे अवचिता जैसी कां ॥८॥
असो भरत म्हणे सुमंतातें ॥ रघुवीर गेला कोण्या पंथें ॥ तोच मार्ग दावीं आम्हांतें ॥ तुझें अनुमतें चालूं आम्ही ॥९॥
मग भरतसमवेत दळभार ॥ गुहकाश्रमा पावले सत्वर ॥ वाजत वाद्यांचे गजर ॥ नादें अंबर कोंदलें ॥१०॥
गुहक विलोकी दुरून ॥ म्हणे मातेनें धाडिले दोघेजण ॥ दळभार सिद्ध करून ॥ रामलक्ष्मण वधावया ॥११॥
मग सहस्रांचे सहस्र किरात ॥ गुहकें मेळविले समस्त ॥ धनुष्य ओढोनियां त्वरित ॥ जान्हवीतीर बळकाविलें ॥१२॥
भरतासि सांगती सेवक ॥ संग्रामासी सिद्ध जाहला गुहक ॥ जन्हुकुमारीचें उदक ॥ स्पर्शों न देती कोणातें ॥१३॥
मग शत्रुघ्न आणि दळपती ॥ भरतासंगें विचार करिती ॥ म्हणती आज्ञा द्यावी निश्र्चितीं ॥ शिक्षा लावूं तयातें ॥१४॥
भरत म्हणे गुहक रामभक्त ॥ म्यां ऐकिला होता वृत्तांत ॥ तरी समाचार न घेतां यथार्थ ॥ युद्ध त्यासी न करावें ॥१५॥
मग भरत पुढें होऊन ॥ गुहकाप्रति बोले वचन ॥ त्वां युद्ध आरंभिलें निर्वाण ॥ काय कारण सांग तें ॥१६॥
गुहक म्हणे घेऊनि दळभार ॥ वधावया जातोसि रघुवीर ॥ तरी मी श्रीरामउपासक निर्धार ॥ वेंचीन प्राण स्वामीकाजीं ॥१७॥
माझा स्वामी रघुनंदन ॥ निराहार वनीं निर्वाण ॥ तुम्ही मारावया दोघेजण ॥ दळभारेंसी चालिलां ॥१८॥
परम निंदक दुर्जन खळ ॥ जे रघुनाथद्वेषी चांडाळ ॥ त्यांचीं शिरें छेदोनि तत्काळ ॥ पाठवीन यमलोका ॥१९॥
मातेच्या बोलेंकरूनि ॥ श्रीराम वधूं पाहसी वनीं ॥ तरी तुम्हांस जान्हवीचें पाणी ॥ स्पर्शों नेदीं अणुमात्र ॥२२०॥
ऐकतां गुहकाचें वचन ॥ भरतासी आलें दीर्घ रुदन ॥ गुहकास म्हणे सोडूनि बाण ॥ माझें शिर छेदोनी टाकीं ॥२१॥
मज पापियाचा देह त्वरित ॥ गुहका छेदीं यथार्थ ॥ कैकयीनें केला अनर्थ ॥ सीताकांत धाडिला वना ॥२२॥
जन्मलों कैकयीचे उदरीं ॥ जन म्हणती हा रामचंद्राचा वैरी ॥ तरी गुहका आतां वेग करीं ॥ छेदीं झडकरीं देह माझा ॥२३॥
श्रीरामावियोगाचें दुःख ॥ मज सोसवेचि अणुमात्र देख ॥ निर्वाण बाण सोडोनि एक ॥ मज रघुनायकपद दावीं ॥२४॥
भरताचें अंतर ओळखून ॥ गुहक धांवोनि धरी चरण ॥ दोघांसी पडिलें आलिंगन ॥ गेले विसरून देहभाव ॥२५॥
कंठ दाटला दोघांचा ॥ उभारणी जाहली रोमांचा ॥ दोघांचे नेत्रीं अश्रुधारांचा ॥ पूर पडत ते काळीं ॥२६॥
दोघेही श्रीरामचे भक्त ॥ दोघेही योगी विरक्त ॥ दोघेही श्रीरामास आवडत ॥ वल्कलेंवेष्टित दोघेही ॥२७॥
दोघांही केलें भस्मोध्दूलन ॥ दोघांही केलें जटावळण ॥ दोघेंही न घेती अन्न ॥ रामदर्शनावांचोनि ॥२८॥
गुहक म्हणे भरता वसिष्ठा ॥ श्रीराम गेला चित्रकूटा ॥ आतां चला जी उठा उठा ॥ वेगीं भेटा राघवातें ॥२९॥
ऐकतां गुहकाचें वचन ॥ भरत धरूं धावे चरण ॥ गुहक घाली लोटांगण ॥ प्रेमेंकरून सद्रद ॥२३०॥
भरतें स्नानसंध्या सारून ॥ गुहकासी म्हणे प्रीतीकरून ॥ श्रीराम राहिला एक दिन ॥ तें मज स्थळ दाविजे ॥३१॥
गुहक म्हणे न्यग्रोधवृक्ष ॥ त्याखालीं राहिला कमलपत्राक्ष ॥ जयासी हृदयीं ध्याय विरूपाक्ष ॥ सहस्राक्ष शरण ज्यातें ॥३२॥
या तृणशेजे वरी जाण पद्मनयनें केलें शयन ॥ याच पंथें येऊन ॥ केलें स्नान जान्हवीचें ॥३३॥
सीतेच्या तगटवस्त्रांचे रज ॥ ते न झगटती तृणशेज ॥ देखतां भरत भक्तराज ॥ साष्टांग नमन करीतसे ॥३४॥
रघुनाथपदमुद्रा तेथ ॥ उमटल्या देखोनि भरत ॥ ते धुळी कपाळा लावित ॥ सद्रदित होवोनि ॥३५॥
असो नौका आणोनि सहस्र ॥ उतरला सकळ दळभार ॥ प्रयागासी येऊन सत्वर ॥ भरद्वाजदर्शन घेतलें ॥३६॥
लक्षोनि चित्रकुटाचा पंथ ॥ चालती गुहक आणि भरत ॥ तों फळें वेंचावया सुमित्रासुत ॥ पर्वतातळीं उतरला ॥३७॥
तों पर्णकुटीमाजी रघुनंदन ॥ करावया बैसला हवन ॥ तेथें उपसामग्री आणोन ॥ जनकात्मजा देतसे ॥३८॥
चकोरमुखीं एकसरां ॥ अत्रिसुत सोडी अमृतधारा ॥ तैशा आहुती घाली वैश्र्वानरा ॥ तृप्त होय रामहस्तें ॥३९॥
तेव्हां आश्रमाबाहेर जनकबाळी ॥ जो सुकुमार चंपककळी ॥ तों सुदर्शनगंधर्वें जातां निराळीं ॥ ते वेल्हाळी देखिली ॥२४०॥
जानकी देखोनि सुंदर ॥ चित्तीं जाहला कामातुर ॥ भय लज्जा समग्र सोडोनियां दीधली ॥४१॥
मंगळरूप ते मंगळभगिनी ॥ गंधर्व धांवला ते क्षणीं ॥ अमंगळ कागरूप धरूनी ॥ सीतेलागीं झडपीतसे ॥४२॥
जैसा पतंग दीप देखोन ॥ उडी घाली विसरून मरण ॥ कीं खदिरांगारासी वृश्र्चिक येऊन ॥ पुच्छेंकरून ताडी जेंवि ॥४३॥
कीं अंतगृहींचें दिव्यान्न ॥ स्पर्शों धांवे जैसे श्र्वान ॥ यज्ञशाळेमाजी मळिण ॥ अंत्यज जैसा पातला ॥४४॥
असो जानकींचें स्तनयुग ॥ धरूं पाहे पतित काग ॥ जगन्माता धांवली सवेग ॥ आंग घाली घरणीतें ॥४५॥
मग म्हणे धांव धांव रघुराया ॥ कागें विटंबिली माझी काया ॥ आक्रंदे परम जनकतनया ॥ रघुवर्या जाणवलें ॥४६॥
आहुती टाकी रघुनाथ ॥ जवळी नाही सुमित्रासुत ॥ मग दर्भ मंत्रोनि त्वरित ॥ रामचंद्रें प्रेरिला ॥४७॥
कल्पांतविजूसमान ॥ कागें दर्भ देखिला दुरून ॥ पळों लागला घेतलें रान ॥ पाठीसी बाण लागला असे ॥४८॥
गंधर्व भ्रमे सकळ सृष्टी ॥ परी कोणी न घाली तया पाठीं ॥ हिंडता जाहला हिंपुटी ॥ होय कष्टी दुरात्मा ॥४९॥
इंद्रादिक देवगण ॥ समस्तांसी गेला शरण ॥ ते म्हणती न दाखवीं वदन ॥ दुष्टा होईं माघारा ॥२५०॥
मग भेटला नारद मुनि ॥ काग लागला तयाचे चरणीं ॥ म्हणे पहा हो या त्रिभुवनीं ॥ ठाव नेदी कोणी मज ॥५१॥
माझी पाठ न सोडी बाण ॥ मग नारद बोले वचन ॥ मूढा रामासी जाय शरण ॥ तोचि मरण चुकवील ॥५२॥
मग म्हणे जगद्वंद्या रामचंद्रा ॥ मी तुज शरण कृपासागरा ॥ दीनरक्षका अतिउदारा ॥ मज पामरा न मारावें ॥५३॥
मजवरी टाकिला बाण ॥ हें लोकांत न दिसे थोरपण ॥ कमळावरी वज्र घेऊन ॥ घातल्या काय पुरुषार्थ ॥५४॥
सूक्ष्म आळिका धरी सुपर्ण ॥ वडवानळ जाळी तृण ॥ भोगींद्र उचली सुमन ॥ हें काय अपूर्व बोलावें ॥५५॥
पर्जन्यें उठलें तृण ॥ अगस्ति प्याला किंचित जीवन ॥ मेघें निजप्रतापेंकरून ॥ घटीं जीवन भरियेलें ॥५६॥
सूर्यें दीपतेज झांकिलें ॥ गोवत्स विदारिला शार्दूलें ॥ रघुपति त्वां मज तैसें मारिलें ॥ तरी थोरपण प्रकटेना ॥५७॥
मातेचिया स्तनावरी ॥ बाळक हस्त ठेवूनि क्रीडा करी ॥ तरी काय माता जीवें मारी ॥ बाळकातें सांगपां ॥५८॥
महाराज रविकुळभूषणा ॥ ताटिकांतका अहल्योद्धारणा ॥ द्विपंचमुखदर्पहरणा ॥ शरणागता न मारावें ॥५९॥
मग बोले रघुपति ॥ माझा बाण असत्य कल्पांतीं ॥ नव्हेच जाण निश्र्चितीं ॥ महामलिना अपवित्रा ॥२६०॥
मग बाणासी अज्ञापी रघुनंदन ॥ याचा रक्षोनियां प्राण ॥ वेगें छेदावा सव्य नयन ॥ शिक्षा यास जाण पैं ॥६१॥
न लागतां पातया पातें ॥ दर्भें छेदिलें नयनातें ॥ काग म्हणे रघुत्तमातें ॥ देई वरातें मज कांहीं ॥६२॥
मग दोहींकडे एक बुबुळ ॥ खेळे ऐसें केलें चंचळ ॥ काकदृष्टी अवघ्यांत चपळ ॥ जन सकळ देखती ॥६३॥
सीतेसी द्यावया चुंबन ॥ तूं धावलासी दुरात्मा पूर्ण ॥ तरी तूं करिसी विष्ठाभक्षण ॥ कनिष्ठ जाण पक्ष्यांत तूं ॥६४॥
तुज वर एक देतो जाण ॥ प्रेतपिंड तूं भक्षल्याविण ॥ सर्वथा नोहे उद्धारण ॥ हें वरदान तुज दिधलें ॥६५॥
मग सुदर्शन गंधर्व तेव्हां ॥ साष्टांग नमोनि श्रीराघवा ॥ आपले स्वस्थळाप्रति तेधवां ॥ जाता जाहला आनंदें ॥६६॥
भरत प्राणसखा आतां ॥ येऊनि भेटेल रघुनाथा ॥ श्रोतीं परिसावी तेचि कथा ॥ भव्यव्यथा नासे जेणें ॥६७॥
रामविजय ग्रंथ प्रचंड ॥ रसभरित अयोध्याकांड ॥ तें श्रवण करितां वितंड ॥ विघ्नें उदंड वितळती ॥६८॥
अयोध्याधीशा रामचंद्रा ॥ ब्रह्मानंदा ज्ञानसमुद्रा ॥ श्रीधरवरदा प्रतापरुद्रा ॥ मज नाममुद्रा अखंड देईं ॥६९॥
स्वस्ती श्रीरामविजय ग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकनाटकाधार ॥ सदा परिसोत भक्त चतुर ॥
एकदशोऽध्याय गोड हा ॥२७०॥ 

॥श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु॥