Wednesday, August 28, 2013

महाराष्ट्रीयन मुलांचे खेळ - 1

आखाडी :-

कोकणातल्या दशावतारी खेळासारखा एक प्रकर. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात याचा प्रचार आहे. शेतीचा हंगाम संपल्यावर आखाडीला सुरुवात होते आणि पुन्हा पावसाळा सुरु होईपर्यंत हे खेळ चालतात. यात सगळ्या जातीचे लोक भाग घेतात. ग्रामीण लोक आखाडीत निरनिराळ्या देवांची सोंगे आणून नाचतात . एखाद्या घराण्यात काही सोंगे वंशपरंपरागत चालू अस्तात. आखाडीतले सोंग मिळणे हा मान समजला जातो . या खेळाला बोहाडा असेही नाव आहे. बोहाडा नाशिक, धुळे भागात खेळला जातो .

ओका बोका :-

लहान मुलांचा एक खेळ. यात दहा-पाच मुले जमिनीवर बसून आपल्या दोन्ही हातांची दाही बोटे जमिनीवर उभी टेकवतात. मग त्या समुदायातला एक मुलगा प्रत्येकाच्या हाताला स्पर्श करीत पुढील गाणे म्हणतो

ओका बोका तीन तडोका ।
लडवा लाठी चंदन काठी ।।
बागमे बगडवा डोले ।
सावनमे करइली फुले ।।
ओ करइली के नांव का ?
इजइल बिजइल,
पानवा फुलवा ढोढिया पचक ।।

हे त्याचे गाणे ठेक्यात चालते. प्रत्येक ठेक्याला तो मुलांच्या एकेका हातावर बोट ठेवीत जातो आणि पाचक शब्द येताच त्या मुलाच्या हातावर मुठ मारून तो हात जमिनी सरपट करतो.


खांब-खांबोळ्या :-

मुलांचा एक खेळ. पुष्कळ खांब असलेल्या जागी हा खेळ खेलतात. या खेळत जितके खांब असतील त्यापेक्षा एक गाडी जास्त घेतात. मग मुले खांब पकडायला धावतात. ज्याला खांब मिळत नाही, त्याच्यावर राज्य येते. मग इतर मुले पळून खांबांची अदलाबदल करीत रह्तात. तसे ते करीत असताना राज्य घेतलेला मुलगा शिताफी करून एखाद्याचा खांब पकडतो. मग, ज्याचा खांब धरला असेल त्याच्यावर राज्य येते.राज्य आलेला मुलगा खांबाला उद्देशून 'खांब-खांबोळ्या, दे रे आंबोळ्या' असे म्हणत राहतो व खेळ सुरु राहतो.


Monday, August 26, 2013

महाराष्ट्रीयन मुलींचे खेळ - 1

कोंबडा :-

कोंबड्याचा खेळ म्हणून मुली एक खेळ खेळतात. यात मुली डाव्या पायाच्या गुडघ्यावर उजवा पाय चढवून उकिडव्या बसतात. दोन्ही तळात जुळवून गुडघ्यावर ठेवतात व कोंबड्यासारख्या उड्या मारता मारता गाणे म्हणतात.
सईबाईचा कोंबडा आला माझ्या दरी,
घालीन चारा, पाजीन पाणी,
हाकालीन वारा बिलमोगरा,
बिलाचे काटे सागर गोटे सासरच्या वाटे कुचकुच काटे,
माहेरच्या वाटे हरिख दाटे.


किकीचे पान :-

महाराष्ट्रातील लहान मुलींचा हा एक खेळ आहे. यात खेळणाऱ्या मुली एकमेकींपासून समान अंतरावर उभ्या रह्तात. नंतर सर्वजणी टाळी वाजवून दोन्ही हातांच्या टिचा कानाच्या बाजूंना लाव्तत. तसे करून त्या पाच किंवा सहा हात पुढे जातात व पुन्हा तितक्याच मागे येतात. हा खेळ खेळताना मुली जे गाणे म्हणतात ते असे-

किकीचे पान बाई की की
सागर मासा सू सू
आल्या ग बाई गुजरणी
कापुस घ्या ग पिंजरणी

केतकीचे पान बाई की की असाही एक दुसऱ्या प्रकारचा खेळ आहे. यात दोन मुली समोरासमोर एक हात डोक्यावर व दुसरा हात कमरेवर ठेवून उभ्या रह्तात. नंतर गिरकी घेवून आपल्या जागांची अदलाबदल करतात. एक बसते व दुसरी उभी रहते. त्या वेळी त्या 'केतकीचे पान बाई की की' हे गाणे म्हणतात.

आंधळी कोशिंबीर :-

लहान  मुला-मुलींचा हा एक खेळ आहे. फार पूर्वी हा खेळ केवळ मुलीच खेळत. आता मुले, मुली एकत्र किंवा वेगळे ही हा खेळ खेळतात.
यात कमीत कमी दहा खेळाडूंची आवश्यकता असते. खेळाडू प्रथम चकतात व एकावर राज्य देतत. राज्य आलेल्या मुलाचे डोळे बांधतात आणि इतर मुले त्याच्या अवतीभोवती पळतात. डोळे बांधून आंधळा झालेला मुलगा ज्याला शिवेल त्याच्यावर राज्य येते. मग त्याचे डोळे बांधून त्याला आंधळा केले जते. पहिल्या डोळे बांधलेल्या मुलाचे डोळे सोडले जातात व तो मुलगा बाकीच्या खेळाडूंप्रमाणे या नव्या आंधळ्या मुलाच्या भोवती पळू लागतो. पळताना कुणालाही मैदानाबाहेर जाता येत नाही, असा नियम असतो.

आपडी थापडी :-

महाराष्ट्रातील लहान मुलींचा हा एक खेळ आहे. मुले एकमेकिंच्या मांडीला मांडी लावून वाटोळी बसतात  आणि हातावर हात उलथे पालथे करीत व डावी उजवीकडे झुलत पुढील गाणे म्हणतात -

आपडी थापडी गुळाची पापडी
धम्मक लाडू तेल काढू
तेलंगीच एकच पान
दोन्ही हाती धरले कान / धर ग बिब्बे हाच कान .

शेवटची ओळ म्हणताच मुले एकदम बाजूच्या मुलीचा कान धरून खूप हसतात. दुसऱ्या कोणी आपला कान पकडू नये म्हणून मुले खूप खबरदारी घेतात .

Monday, August 19, 2013

श्री शिवस्तुति

कैलासराणा शिवचंद्रमौळी । फणींद्र माथां मुकुटीं झळाळी ।
कारुण्यसिंधू भवदुःखहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १॥

रवींदु दावानल पूर्ण भाळीं । स्वतेज नेत्रीं तिमिरौघ जाळी ।
ब्रह्मांडधीशा मदनांतकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २॥

जटा विभूती उटि चंदनाची । कपालमाला प्रित गौतमीची ।
पंचानना विश्वनिवांतकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ३॥

वैराग्ययोगी शिव शूलपाणी । सदा समाधी निजबोधवाणी ।
उमानिवासा त्रिपुरांतकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ४॥

उदार मेरू पति शैलजेचा । श्रीविश्वनाथ म्हणती सुरांचा ।
दयानिधी जो गजचर्मधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ५॥

ब्रह्मादि वंदी अमरादिनाथ । भुजंगमाला धरि सोमकांत ।
गंगा शिरीं दोष महाविदारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ६॥

कर्पूरगौरीं गिरिजा विराजे । हळाहळे कंठ निळाचि साजे ।
दारिद्र्यदुःखें स्मरणें निवारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ७॥

स्मशानक्रीडा करितां सुखावे । तो देवचूडामणि कोण आहे ।
उदासमूर्तीं जटाभस्मधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ८॥

भूतादिनाथ अरिअंतकाचा । तो स्वामि माझा ध्वज शांभवाचा ।
राजा महेश बहुबाहुधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ९॥

नंदी हराचा हर नंदिकेश । श्री विश्वनाथ म्हणती सुरेश ।
सदाशिव व्यापक तापहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १०॥

भयानक भीम विक्राळ नग्न । लीलाविनोदें करि काम भग्न ।
तो रुद्र विश्वंभर दक्ष मारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ११॥

इच्छा हराची जग हें विशाळ । पाळी रचीतो करि ब्रह्मगोळ ।
उमापती भैरव विघ्नहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १२॥

भागीरथीतीर सदा पवित्र । जेथें असे तारक ब्रह्ममंत्र ।
विश्वेश विश्वंभर त्रिनेत्रधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १३॥

प्रयाग वेणी सकळा हराच्या । पदारविंदीं वहाती हरीच्या ।
मंदाकिनी मंगल मोक्षकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १४॥

कीर्ती हराची स्तुति बोलवेना । कैवल्यदाता मनुजां कळेना ।
एकाग्रनाथ विष अंगिकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १५॥

सर्वांतरीं व्यापक जो नियंता । तो प्राणलिंगाजवळी महंता ।
अंकीं उमा ते गिरिरूपधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १६॥

सदा तपस्वी असे कामधेनू । सदा सतेज शशि कोटिभानू ।
गौरीपती जो सदा भस्मधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १७॥

कर्पूरगौर स्मरल्या विसांवा । चिंता हरी जो भजकां सदैवा ।
अंतीं स्वहीत सुचना विचारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १८॥

विराम काळीं विकळ शरीर । उदास चित्तीं न धरीच धीर ।
चिंतामणी चिंतनें चित्तहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १९॥

सुखावसाने सकळें सुखाचीं । दुःखावसाने टळती जगाचीं ।
देहावसानें धरणी थरारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २०॥

अनुहातशब्द गगनीं न माय । त्याचेनि नादें भव शून्य होय ।
कथा निजांगें करुणा कुमारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २१॥

शांति स्वलीला वदनीं विलासे । ब्रह्मांडगोळीं असुनी न दीसे ।
भिल्ली भवानी शिव ब्रह्मचारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २२॥

पीतांबरें मंडित नाभि ज्याची । शोभा जडीत वरि किंकिणीची ।
श्रीदेवदत्त दुरितांतकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २३॥

जिवाशिवांची जडली समाधी । विटला प्रपंच तुटली उपाधी ।
शुद्धस्वरें गर्जति वेद चारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २४॥

निधानकुंभ भरला अभंग । पहा निजांगें शिव ज्योतिर्लिंग ।
गंभीर धीर सुरचक्रधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २५॥

मंदार बिल्वें बकुलें सुवासी । माला पवित्र वहा शंकरासी ।
काशीपुरीं भैरव विश्व तारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २६॥

जाई जुई चंपक पुष्पजाती । शोभे गळां मालतिमाळ हातीं ।
प्रतापसूर्य शरचापधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २७॥

अलक्षमुद्रा श्रवणीं प्रकाशे । संपूर्ण शोभा वदनीं विकासे ।
नेई सुपंथें भवपैलतीरीं । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २८॥

नागेशनामा सकळां जिव्हाळा । मना जपें रे शिवमंत्रमाळा ।
पंचाक्षरी ध्यान गुहाविहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २९॥

एकांति ये रे गुरुराज स्वामी । चैतन्यरूपीं शिव सौख्यनामीं ।
शिणलों दयाळा बहुसाल भारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ३०॥

शास्त्राभ्यास नको श्रुती पढुं नको तीर्थांसि जाऊं नको ।
योगाभ्यास नको व्रतें मख नको तीव्रें तपें तीं नको ॥
काळाचें भय मानसीं धरुं नको दुष्टांस शंकूं नको ।
ज्याचीया स्मरणें पतीत तरती तो शंभु सोडूं नको ॥

॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु