Friday, July 31, 2020

Shivlilamrut - Adhyay 5

अध्याय पाचवा

श्रीगणेशाय नमः ॥

सदाशिव अक्षरें चारी ॥ सदा उच्चारी ज्याची वैखरी ॥ जो नित्य शिवार्चन करी ॥ तो उद्धरी बहुतां जीवा ॥१॥
बहुत प्रायश्चित्तांचे निर्धार ॥ शास्त्रवक्ते करिती विचार ॥ परी जे शिवनामें शुद्ध साचार ॥ कासया इतर साधनें त्यां ॥२॥
नामाचा महिमा परमाद्भुत ॥ त्यावरी प्रदोषव्रत आचरत ॥ त्यासी सर्वसिध्दि प्राप्त होत ॥ सत्य सत्य त्रिवाचा ॥३॥ तुष्टि पुष्टि धृति आयुष्यवर्धन ॥ संतति संपत्ति दिव्यज्ञान ॥ पाहिजे तिंहीं प्रदोषव्रत पूर्ण ॥ यथासांग करावें ॥४॥
प्रदोषव्रत भावें आचरतां ॥ या जन्मीं प्रचीत पाहावी तत्वतां ॥ दारिद्र्य आणि महद् व्यथा॥ निःशेष पळती षण्मासांत ॥५॥
एकसंवत्सरें होय ज्ञान ॥ द्वादशवर्षी महद्भाग्य पूर्ण ॥ हें जो असत्य मानील व्यासवचन ॥ त्यासी बंधन कल्पांतवरी ॥६॥
त्याचा गुरु लटिकाच जाण ॥ त्याची दांभिक भक्ति लटिकेंच ज्ञान ॥ उमावल्लभचरणीं ज्याचे मन ॥ त्याहुनि पावन कोणी नाहीं ॥७॥
मृत्यु गंडांतरे दारूण ॥ प्रदोषव्रतें जाती निरसोन ॥ येविषयीं इतिहास जाण ॥ सूत सांगे शौनकांदिकां ॥८॥ विदर्भदेशींचा भूभुज ॥ सत्यरथ नामें तेजःपुंज ॥ सर्वधर्मरत पराक्रमी सहज ॥ बंदीजन वर्णिती सदा ॥९॥
बहु दिवस राज्य करीत ॥ परी शिवभजनीं नाहीं रत ॥ त्यावरी शाल्वदेशींचा नृपनाथ ॥ बळें आला चालूनियां ॥१०॥

आणीक त्याचे आप्त ॥ क्षोणीपाळ साह्य झाले बहुत ॥ सप्त दिवसपर्यंत ॥ युद्ध अद्भुत जाहलें ॥११॥
हा एकला ते बहुत ॥ समरभूमीसी सत्यरथ ॥ धारातीर्थी पावला मृत्य॥ शत्रु नगरांत प्रवेशले ॥१२॥
राजपत्नी गरोदर राजस ॥ पूर्ण झाले नव मास ॥ एकलीच पायीं पळतां वनास ॥ थोर अनर्थ ओढवला ॥१३॥
परम सुकुमार लावण्यहरिणी ॥ कंटक सरांटे रूतती चरणीं ॥ मुर्च्छना येऊनि पडे धरणीं ॥ उठोनि पाहे मागें पुढें ॥१४॥
शत्रु धरितील अकस्मात ॥ म्हणोनि पुढती उठोनि पळत ॥ किंवा ते विद्युल्लता फिरत ॥ अवनीवरी वाटतसे ॥१५॥ वस्त्रें अलंकारमंडित ॥ हिऱ्यांऐसे दंत झळकत ॥ जिचा मुखेंदु देखतां रतिकांत ॥ तन्मय होवोनि नृत्य करी ॥१६॥ पहा कर्माची गती गहन ॥ जिच्या अंगुष्ठी न पडे सूर्यकिरण ॥ ते गरोदर हिंडे विपिन ॥ मृगनेत्री गजगामिनी ॥१७॥ वनीं हिंडे महासती ॥ जेवीं नैषधरायाची दमयंती ॥ कीं भिल्लीरूपें हैमवती ॥ दुस्तरवनी तैसी हिंडे ॥१८॥ कर्मनदीच्या प्रवाही जाण ॥ पडली तीस काढील कोण ॥ असो एका वृक्षाखाली येऊन ॥ परम व्याकुळ पडियेली ॥१९॥
शतांचीं शतें दासी ॥ ओळंगती सदैव जियेपासीं ॥ इंदुमती नाम जियेसी ॥ ते भूमीवरी लोळत ॥२०॥

चहुंकडे पाहे दीनवदनीं ॥ जिव्हा मुख वाळलें न मिळे पाणी ॥ तों प्रसूत झाली तोचि क्षणीं ॥ दिव्य पुत्र जन्मला ॥२१॥
तृषेनें तळमळी अत्यंत ॥ कोण उदक देईल तेथ ॥ बाळ टाकूनि उठत बसत ॥ गेली एका सरोवरा ॥२२॥
उदकांत प्रवेशली तेच क्षणीं ॥ अंजुळी भरूनि घेतसें पाणी ॥ तंव ग्राहें नेली ओढोनि ॥ विदारूनी भक्षिली ॥२३॥
घोर कर्माचें विंदान ॥ वनीं एकला रडे राजनंदन ॥ तंव उमानामक विप्रपत्नी जाण ॥ विगतधवा पातली ॥२४॥
माता पिता बंधु पाहीं ॥ तियेलागीं कोणी नाहीं ॥ एक वर्षाचा पुत्र तीसही ॥ कडिये घेवोनि आली तेथें ॥२५॥
तों नाहीं केलें नालच्छेदन ॥ ऐसें बाळ उमा देखोन ॥ म्हणे अहा रे ऐसें पुत्ररत्न ॥ कोणीं टाकिलें दुस्तर वनीं ॥२६॥ म्हणे कोण जाती कोण वर्ण ॥ मी कैसें नेऊं उचलून ॥ जावें जरी टाकून ॥ वृक व्याघ्र भक्षितील कीं ॥२७॥
स्तनीं दाटूनी फुटला पान्हा ॥ नेत्रीं ढाळीत अश्रुजीवना ॥ बाळ पुढें घेऊनी ते ललना ॥ मुखकमळीं स्तन लावी ॥२८॥ संशयसमुद्रीं पडली वेल्हाळ ॥ म्हणे नेऊ कीं नको बाळ ॥ तंव तो कृपाळु पयःफेनधवल ॥ यतिरूप धरूनि पातला ॥२९॥
उमेलागीं म्हणे त्रिपुरारी ॥ बाळ नेई संशय न धरी ॥ महद्भाग्य तुझें सुंदरी ॥ क्षत्रियराजपुत्र तुज सांपडला ॥३०॥

कोणासी न सांगें हे मात ॥ समान पाळीं दोघे सुत ॥ भणंगासी परीस होय प्राप्त ॥ तैसें तुज जाहलें ॥३१॥
अकस्मात निधी जोडत ॥ कीं चिंतामणि पुढें येऊनि पडत ॥ कीं मृताच्या मुखांत ॥ पडे अमृत पूर्वदत्तें ॥३२॥
ऐसें बोलोनि त्रिपुरारी ॥ गुप्त झाला ते अवसरीं ॥ मग दोघे पुत्र घेवोनि ते नारी ॥ देशग्रामांतरीं हिंडत ॥३३॥
ब्रह्मपुत्राचें नाम शुचिव्रत ॥ राजपुत्राचें नाम ठेविले धर्मगुप्त ॥ घरोघरीं भिक्षा मागत ॥ कडिये खांदीं घेऊनियां ॥३४॥ लोक पुसतां उमा सांगत ॥ माझे पोटींचे दोघे सुत ॥ ऐसी हिंडत हिंडत ॥ एकचक्रनगरा पातली ॥३५॥
घरोघरीं भिक्षा मागत ॥ तों शिवालय देखिलें अकस्मात ॥ आंत द्विज दाटले बहुत ॥ शांडिल्य त्यांत मुख्य ऋषि ॥३६॥
शिवाराधना करिती विधियुक्त ॥ तों उमा आली शिवालयांत ॥ क्षण एक पूजा विलोकीत ॥ तों शांडिल्य ऋषी बोलिला ॥३७॥
अहा कर्म कैसें गहन ॥ हा राजपुत्र हिंडे दीन होऊन ॥ कैसें विचित्र प्राक्तन ॥ उमा वचन ऐकती झाली ॥३८॥
ऋषीचे चरण उमा धरीत ॥ म्हणे याचा सांगा पूर्ववृत्तांत ॥ त्रिकालज्ञानी महासमर्थ ॥ भूतभविष्यज्ञान तुम्हां ॥३९॥
याचीं माता पिता कोण ॥ आहेत कीं पावलीं मरण ॥ यावरी शांडिल्य सांगे वर्तमान ॥ याचा पिता जाण सत्यरथ ॥४०॥

तो पूर्वीं होता नृप जाण ॥ प्रदोषसमयीं करी शिवार्चन ॥ तों शत्रु आले चहूंकडोन ॥ नगर त्याचें वेढिलें ॥४१॥
शत्रूची गजबज ऐकून ॥ उठिला तैसीच पूजा सांडोन ॥ तंव प्रधान आला पुढें धांवोन ॥ शत्रु धरोनि आणिले ॥४२॥
त्यांचा शिरच्छेद करून ॥ पूजा पूर्ण न करितां उन्मत्तपणें ॥ तैसाच जाऊनि करी भोजन ॥ नाहीं स्मरण विषयांधा ॥४३॥
त्याकरितां या जन्मीं जाण ॥ सत्यरथ अल्पायुषी होऊन ॥ अल्पवयांत गेला मरोन ॥ म्हणोनि पूजन न सोडावें ॥४४॥ याच्या मातेनें सवत मारिली ॥ ती जळीं विवशी झाली ॥ पूर्ववैरें वोढोनि नेली ॥ क्रोधें भक्षिली विदारूनी ॥४५॥
हा राजपुत्र धर्मगुप्त ॥ यानें कांहीच केलें नाहीं शिवव्रत ॥ म्हणोनियां मातापितारहित ॥ अरण्यांत पडियेला ॥४६॥ याकरितां प्रदोषकाळीं ॥ अव्यग्र पूजावा इंदुमौळी ॥ पूजन सांडुनि कदाकाळीं ॥ सर्वथाही न उठावें ॥४७॥ भवानीसी बैसवूनि कैलासनाथ ॥ प्रदोषकाळी पुढें नृत्य करीत ॥ वाग्देवी वीणा वाजवीत ॥ वेणु पुरुहूत वाजवीतसे ॥४८॥
अंबुजसंभव ताल सांवरी ॥ भार्गवी गातसे मधुरस्वरीं ॥ मृदंग वाजवी मधुकैटभारी ॥ नृत्यगती पाहूनियां ॥४९॥ यक्षपति शिवप्राणमित्र ॥ हस्त जोडोनि उभा समोर ॥ यक्षगण गंधर्व किन्नर ॥ सुरासुर उभे असती ॥५०॥

ऐसा प्रदोषकाळींचा महिमा ॥ अगोचर निगमागमां ॥ मग काय बोले उमा ॥ मम पुत्र दरिद्री कां झाला ॥५१॥
तुझ्या पुत्रें प्रतिग्रह बहुत ॥ पूर्वीं घेतले दुष्ट अमित ॥ दान केलें नाहीं किंचित ॥ शिवार्चन न करी कदा ॥५२॥
परान्नें जिव्हा दग्ध यथार्थ ॥ दुष्ट प्रतिग्रहें दग्ध हस्त ॥ स्त्रीअभिलाषें नेत्र दग्ध होत ॥ मंत्रासी सामर्थ्य मग कैचें ॥५३॥ मग उमेनें पुत्र दोन्ही ॥ घातले ऋषीचे चरणीं ॥ तेणें पंचाक्षर मंत्र उपदेशुनी ॥ प्रदोषव्रत उपदेशिलें ॥५४॥
पक्षप्रदोष शनिप्रदोष ॥ महिमा वर्णिला अतिविशेष ॥ निराहार असावें त्रयोदशीस ॥ दिवसा सत्कर्म आचरावें ॥५५॥ तीन घटिका झालिया रजनी ॥ प्रदोषपूजा आरंभावी प्रीतीकरूनी ॥ गोमयें भूमी सारवूनी ॥ दिव्यमंडप उभारिजे ॥५६॥
चित्रविचित्र वितान ॥ कर्दळीस्तंभ इक्षुदंडेंकरून ॥ मंडप कीजे शोभायमान ॥ रंगमाळा नानापरी ॥५७॥
शुभ्र वस्त्र नेसावें आपण ॥ शुभ्र गंध सुवाससुमन ॥ मग शिवलिंग स्थापून ॥ पूजा करावी विधियुक्त ॥५८॥
प्राणायाम करूनि देखा ॥ अंतर्बाह्य न्यास मातृका ॥ दक्षिणभागीं पूजावें मुरांतका ॥ सव्यभागीं अग्नि तो ॥५९॥
वीरभद्र गजानन ॥ अष्टमहासिध्दि अष्टभैरव पूर्ण ॥ अष्टदिक्पालपूजन ॥ सप्तावरणीं शिवपूजा ॥६०॥

यथासांग शिवध्यान ॥ मग करावें पूजन ॥ राजोपचारें सर्व समर्पून ॥ करावें स्तवन शिवाचें ॥६१॥
जयजय गौरीनाथ निर्मळ ॥ जय जय कोटिचंद्र सुशीतळ ॥ सच्चिदानंदघन अढळ ॥ पूर्णब्रह्म सनातन ॥६२॥
ऐसें प्रदोषव्रत ऐकवून ॥ बाळ उपदेशिले दोघेजण ॥ मग ते एकमनेंकरून ॥ राहते झाले एकचक्रीं ॥६३॥
चार महिनेपर्यंत ॥ दोघेही आचरती प्रदोषव्रत ॥ गुरुवचनें यथार्थ ॥ शिवपूजन करिती पै ॥६४॥
शिवपूजा न द्यावी सर्वथा ॥ न द्यावे प्रसादतीर्था ॥ शत ब्रह्महत्यांचें पाप माथां ॥ होय सांगता शांडिल्य ॥६५॥
सर्व पापांहूनि पाप थोर ॥ शिवपूजेचा अपहार ॥ असो ते दोघे किशोर ॥ सदा सादर शिवभजनीं ॥६६॥
ब्रह्मपुत्र शुचिव्रत ॥ एकला नदीतीरीं क्रीडत ॥ दरडी ढांसळतां अकस्मात ॥ द्रव्यघट सांपडला ॥६७॥
घरासी आला घेऊन ॥ माता संतोषली देखोन ॥ म्हणे प्रदोषव्रताचा महिमा जाण ॥ ऐश्वर्य चढत चालिलें ॥६८॥ राजपुत्रास म्हणे ते समयीं ॥ अर्ध द्रव्यविभाग घेई ॥ येरू म्हणे सहसाही ॥ विभाग न घेई अग्रजा ॥६९॥
या अवनींतील धन ॥ आमुचेंच आहे संपूर्ण ॥ असो ते दोघे शिवध्यान शिवस्मरण ॥ न विसरती कदाही ॥७०॥

यावरी एकदां दोघेजण ॥ गेले वनविहारालागून ॥ तों गंधर्वकन्या येऊन ॥ क्रीडतां दृष्टीं देखिल्या ॥७१॥
दोघे पाहती दुरूनी ॥ परम सुंदर लावण्यखाणी ॥ शुचिव्रत म्हणे राजपुत्रालागुनी ॥ परदारा नयनीं न पाहाव्या ॥७२॥ दर्शनें हरती चित्त ॥ स्पर्शनें बळ वीर्य हरीत ॥ कौटिल्यदंभसंयुक्त ॥ महाअनर्थकारिणी ॥७३॥
ब्रह्मसुतास तेथें ठेऊन ॥ राजपुत्र चालिला सुलक्षण ॥ स्वरूप सुंदर मन्मथाहून ॥ आकर्णनयन कोमलांग ॥७४॥ जवळी येवोनि पाहात ॥ तंव मुख्य नायिका विराजित ॥ अंशुमती नामें विख्यात ॥ गंधर्वकन्या पद्मिनी ॥७५॥ कोद्रविण नामा गंधर्वपती ॥ त्याची कन्या अंशुमती ॥ पिता पुसे महेषाप्रती ॥ हे कन्या अर्पू कोणातें ॥७६॥
मग बोले हिमनगजामात ॥ धर्मगुप्त सत्यरथाचा सुत ॥ तो माझा परम भक्त ॥ त्यासी देई अंशुमती ॥७७॥
हे पूर्वीचें शिववचन ॥ असो यावरी अंशुमती पाहे दुरोन ॥ न्याहाळीत राजनंदन ॥ वाटे पंचबाण दुसरा ॥७८॥ क्षीरसिंधूंत रोहिणीरमण ॥ काय आला कलंक धुवोन ॥ तैसें राजपुत्राचें वदन ॥ अंशुमती न्याहाळी ॥७९॥ बत्तिसलक्षण संयुक्त ॥ अजानुबाहू चापशरमंडित ॥ विशाळ वक्षःस्थळ चालत ॥ करिनायक ज्यापरी ॥८०॥

ऐसा तो गुणाढ्य देखूनि त्वरित ॥ अंशुमती सखयांप्रति सांगत ॥ तुम्हीं दुज्या वनाप्रति जाऊनि समस्त ॥ सुमनें आणावी सुवासें ॥८१॥
अवश्य म्हणोनि त्या ललना ॥ जात्या झाल्या आणिका वना ॥ अंशुमती एकली जाणा ॥ राजपुत्रा खुणावीत ॥८२॥ भूरुहपल्लव पसरून ॥ एकांतीं घातलें आसन ॥ वरी वृक्षडाहाळिया भेदून ॥ भूमीवरी पसरल्या ॥८३॥
असो तेथें बैसला येऊन ॥ राजपुत्र सुहास्यवदन ॥ विशाळ भाळ आकर्णनयन ॥ आरक्त ओष्ठ सुकुमार ॥८४॥ मंजुळभाषिणी नेत्रकटाक्षबाणीं ॥ विंधिली ते लावण्यहरिणी ॥ मनोजमूर्च्छना सांवरूनी ॥ वर्तमान पुसे तयातें ॥८५॥ श्रुंगारसहोवरा तुजपासीं ॥ मी वास करीन राजहंसी ॥ देखतां तव वदन दिव्यशशी ॥ मम मानसचकोर नृत्य करी ॥८६॥
तव मुखाब्ज देखतां आनंद ॥ झेंपावती मम नेत्रमिलिंद ॥ कीं तव वचन गर्जतां अंबुद ॥ मम चित्तशिखी नृत्य करी ॥८७॥
कवि-गुरूंहुन तेज विशाळ ॥ आत्मकंठीची काढिली मुक्ताफळमाळ ॥ कंठीं सूदली तत्काळ ॥ चरणीं भाळ ठेवीत ॥८८॥
म्हणे मी कायावाचामनेंकरून ॥ तुझी ललना झालें पूर्ण ॥ यावरी धर्मगुप्त वचन ॥ काय बोलता जाहला ॥८९॥
मी जनकजननी विरहित ॥ राज्यभ्रष्ट दरिद्री अत्यंत ॥ तव पित्यासी कळतां मात ॥ घडे कैसें वरानने ॥९०॥

यावरी म्हणे अंशुमती ॥ तीन दिवसां येईन या स्थळाप्रती ॥ तुम्हीं यावें शीघ्रगती ॥ लग्नसिध्दि साधावया ॥९१॥
ऐसें बोलून ते चातुर्यराशी ॥ वेगें आली पितयापाशीं ॥ झालें वर्तमान सांगे त्यासी ॥ तो परम मानसी संतोषला ॥९२॥
राजपुत्र गेला परतोन ॥ बंधुप्रती सांगे सर्व वर्तमान ॥ शांडिल्यगुरूचें वचन स्मरून ॥ म्हणती प्रसाद पूर्ण त्याचा हा ॥९३॥
गुरुचरणीं ज्याचें मन ॥ त्यासी ऐश्वर्यासी काय न्यून ॥ काळमृत्युभयापासून ॥ सर्वदा रक्षी देशिक तो ॥९४॥
यावरी ते दोघे बंधु येऊन ॥ मातेसी सांगती वर्तमान ॥ येरी म्हणे धन्य धन्य शिवभजन ॥ फळ देते चालिलें ॥९५॥
यावरी तिसरे दिवशीं ॥ दोघेही गेले त्या वनासी ॥ गंधर्वराज सहपरिवारेंसी ॥ सर्व सामग्री घेऊनि आला ॥९६॥
दृष्टी देखतां जामात ॥ गंधर्व आनंदसमुद्रीं पोहत ॥ छत्र सेना सुखासन त्वरित ॥ धाडूनि उमा आणविली ॥९७॥
यावरी यथासांग लग्न ॥ चारी दिवस पूर्ण ॥ कोणी एक पदार्थ न्यून ॥ पडिला नाहीं तेधवां ॥९८॥
स्वर्गीच्या दिव्य वस्तु अमोलिक सतेज ॥ विहिणीस देत गंधर्वराज ॥ लक्ष रथ दहा सहस्त्र गज ॥ तेजःपुंज एक लक्ष वाजी ॥९९॥
एक लक्ष दास दासी ॥ अक्षय कोश रत्नराशी ॥ अक्षय भाते देत शक्तिसी ॥ दिव्य चाप बहुसाल ॥१००॥

अपार सेना संगें देत ॥ एक सेनापतिगंधर्व बळिवंत ॥ उमा दोघां पुत्रांसववेत ॥ मान देवोनि बोळविली ॥१०१॥ सुखासनारूढ अंशुमती ॥ पतीसवें चालिली शीघ्रगती ॥ कनकवेत्रपाणी पुढें धांवती ॥ वाहनासवें जियेच्या ॥१०२॥ चतुर्विध वाद्यांचे गजर ॥ चतुरंग चालिला दळभार ॥ येऊनि वेढिलें विदर्भनगर ॥ सत्यरथ पितयाचें ॥१०३॥ नगरदुर्गावरूनि अपार ॥ उल्हाटयंत्रांचा होत भडिगार ॥ परी गंधर्वाचें बळ फार ॥ घेतलें नगर क्षणार्धे ॥१०४॥
जेणें पूर्वी पिता मारिला जाण ॥ त्याचें नाम दुर्मर्षण ॥ तो जिताचि धरूनि जाण ॥ आपला करून सोडिला ॥१०५॥ देशोदेशींचे प्रजाजन ॥ धांवती करभार घेऊन ॥ उत्तम मुहूर्त पाहून ॥ सिंहासनारूढ जाहला ॥१०६॥
माता उमा बंधु शुचिव्रत ॥ त्यांसमवेत राज्य करीत ॥ दहा सहस्त्र वर्षेंपर्यंत ॥ यशवंत राज्य केलें ॥१०७॥
शांडिल्य गुरु आणून ॥ शतपद्म अर्पिलें धन ॥ रत्नाभिषेक करून ॥ अलंकार वस्त्रे दीधलीं ॥१०८॥
दुर्भिक्ष जळशोष अवर्षण ॥ आधि व्याधि वैवध्य मरण ॥ दुःख शोक कलह विघ्न ॥ राज्यांतूनि पळालीं ॥१०९॥
प्रजा भूदेव दायाद ॥ देती रायासी आशिर्वाद ॥ कोणासही नाहीं खेद ॥ सदा आनंद घरोघरीं ॥११०॥

ऐसा अंशुमती समवेत ॥ धर्मगुप्त राज्य करीत ॥ यौवराज्य शुचिव्रतातें देत ॥ पारिपत्य सर्व करी ॥१११॥
ऐसें दहा सहस्त्र वर्षें राज्य करून ॥ सुदत्तपुत्रासी राज्य देऊन ॥ चिंतितां मनीं उमाधवचरण ॥ दिव्य विमान धाडिलें ॥११२॥
दिव्य देह पावोनि नृपती ॥ माता-बंधूंसमवेत अंशुमती ॥ शिवविमानीं बैसती ॥ करीत स्तुति शिवाची ॥११३॥ कैलासपदासी जाऊन ॥ जगदात्मा शिव विलोकून ॥ जयजयकार करून ॥ लोटांगणें घालिती ॥११४॥
दीनबंधु जगन्नाथ ॥ पतित पावन कृपावंत ॥ हृदयीं धरूनी समस्त ॥ अक्षयपदीं स्थापिलीं ॥११५॥
हें धर्मगुप्ताचें आख्यान ॥ करिती जे श्रवण पठण ॥ लेखन रक्षण अनुमोदन ॥ तरी पंचवदन रक्षी तयां ॥११६॥ सकळ पापांचा होय क्षय ॥ जेथें जाय तेथें विजय ॥ धनधान्यवृध्दि होय ॥ ऋण जाय निरसुनी ॥११७॥
प्रदोषमहिमा अद्भुत ॥ जे आचरती ऐकूनि ग्रंथ ॥ तेथें कैचें दारिद्र मृत्य ॥ सत्यसत्य त्रिवाचा ॥११८॥
ज्याच्या घरीं शिवलीलामृत ग्रंथ ॥ त्याची शिव पाठी राखीत ॥ सदा हिंडे उमाकांत ॥ अंती शिवपद प्राप्त तया ॥११९॥
हा ग्रंथ आम्रवृक्ष सुरस ॥ पद्मरचनाफळें आलीं पाडास ॥ कुतर्कवादी जे वायस ॥ मुखरोग त्यांस नावडे ॥१२०॥

जयजय ब्रह्मानंदा विरूपक्षा ॥ श्रीधरवरद सर्वसाक्षा ॥ दुष्टकर्ममोचका कर्माध्यक्षा ॥ न येसी लक्षा निगमागमा ॥१२१॥ शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड ॥ स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड ॥ परिसोत सज्जन अखंड ॥ पंचमोध्याय गोड हा ॥१२२॥

इति पंचमोऽध्यायः ॥५॥
॥श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥

Wednesday, July 29, 2020

Shivlilamrut - Adhyay 4

अध्याय चवथा

श्रीगणेशाय नमः ॥

धराधरेंद्रनंदिनीमानससरोवर ॥ मराळ उदार कर्पूरगौर ॥ अगम्य गुण अपार ॥ तुझे वर्णिती सर्वदा ॥१॥
न कळे जयाचें मूळ मध्य अवसान ॥ आपणचि सर्वकर्ता कारण ॥ कोठें प्रगटेल ज्याचें आगमन ॥ ठायीं न पडे ब्रह्मादिकां ॥२॥
जाणोनि भक्तांचें मानस ॥ तेथेंचि प्रगटे जगन्निवास ॥ येचिविषयीं सूतें इतिहास ॥ शौनकादिकांप्रति सांगितला ॥३॥
किरातदेशींचा राजा विमर्शन ॥ परमप्रतापी शत्रुभंजन ॥ मृगया करीत हिंसक दारूण ॥ मद्यमांसीं रत सदा ॥४॥
चतुर्वर्णाच्या स्त्रिया भोगीत ॥ निर्दय अधर्मेंचि वर्तत ॥ परी शिवभजनीं असे रत ॥ विधीनें पूजित नित्य शिवासी ॥५॥
त्याचे स्त्रियेचें नाम कुमुद्वती ॥ परम चतुर गुणवती ॥ पतीप्रति पुसे एकांतीं ॥ कापट्यरीती टाकोनियां ॥६॥
म्हणे शिवव्रतें आचरतां बहुवस ॥ शिवरात्री सोमवार प्रदोष ॥ गीत नृत्य स्वयें करितां विशेष ॥ शिवलीलामृत वर्णितां ॥७॥
दोषही घडती तुम्हांपासून ॥ इकडे शिवभजनीं सावधान ॥ मग तो राजा विमर्शन ॥ वर्तमान सांगे पुरातन पैं ॥८॥
मी पूर्वीं पंपानाम नगरीं ॥ सारमेय होतों सुंदरी ॥ तों माघ वद्य चतुर्दशी शिवरात्रीं ॥ शिवमंदिरासमोर आलों ॥९॥ शिवपूजा पाहिली समस्त ॥ द्वारीं उभे होते राजदूत ॥ तिंहीं दंड मारितां त्वरित ॥ सव्य पळत प्रदक्षिणा करीं ॥१०॥

आणीक आलों परतोनी ॥ बलिपिंड प्राप्त होईल म्हणोनी ॥ मागुती दाटावितां त्यांनी ॥ प्रदक्षिणा केल्या शिवसदना ॥११॥
मागुती बैसलों येऊन ॥ तंव तिंहीं क्रोधें मारिला बाण ॥ म्यां शिवलिंग पुढें लक्षून ॥ तेथेंचि प्राण सोडिला ॥१२॥
त्या पुण्यकर्मेंकरून ॥ आतां राजदेह पावलों जाण ॥ परी श्वानाचे दुष्ट गुण ॥ नाना दोष आचरें ॥१३॥
कुमुद्वती म्हणे तुम्हांसी पूर्वज्ञान ॥ तरी मी कोण होतें सांगा मजलागून ॥ मग तो बोले विमर्शन ॥ कपोती होतीस पुर्वीं  तूं ॥१४॥
मांसपिंड नेतां मुखीं धरून ॥ पाठीं लागला पक्षी श्येन ॥ शिवालयास प्रदक्षिणा तीन ॥ करूनि शिखरीं बैसलीस ॥१५॥
तूं श्रमलीस अत्यंत ॥ तुज श्येनपक्षी मारीत ॥ शिवसदनासमोर शरीर पडत ॥ ती राणी सत्य झालीसं तूं ॥१६॥
मग कुमुद्वती म्हणे रायास ॥ तुम्ही त्रिकाळज्ञानी पुण्यपुरुष ॥ तुम्ही आम्ही जाऊं कोण्या जन्मास ॥ सांगा समस्त वृत्तांत हा ॥१७॥
यावरी तो राव म्हणे ॥ ऐकें मृगनेत्रे इभगमने ॥ सिंधुदेशीचा नृप इंदुवदने ॥ होईन पुढलिये जन्मीं मी ॥१८॥
तूं जयानामें राजकन्या होसी ॥ मजलागीं राजसे वरिसी ॥ तिसरे जन्मीं सौराष्ट्रराव नेमेंसी ॥ होईन सत्य गुणसरिते ॥१९॥
तूं कलिंगकन्या होऊन ॥ मज वरिसी सत्य जाण ॥ चौथे जन्मीं गांधारराव होईन ॥ तूं मागधकन्या होऊन वरिसी मज ॥२०॥

पांचवे जन्मी अवंतीराज ॥ दाशार्हकन्या तूं पावसी मज ॥ सहावे जन्मीं आनर्तपति सहज ॥ तूं ययातिकन्या गुणवती ॥२१॥
सातवे जन्मीं पांड्यराजा होईन ॥ तुं पद्मराजकन्या वसुमती पूर्ण ॥ तेथें मी बहुत ख्याती करून ॥ शत्रु दंडीन शिवप्रतापें ॥२२॥
महाधर्म वाढवीन ॥ जन्मोजन्मीं शिवभजन करीन ॥ मग त्या जन्मीं पुत्रास राज्य देऊन ॥ तपास जाईन महावना ॥२३॥
शरण रिघेन अगस्तीस ॥ शैवदीक्षा घेऊन निर्दोष ॥ शुभवदने तुजसमवेत कैलास ॥ पद पावेन निर्धारें ॥२४॥
सूत म्हणे शौनकादिकांप्रती ॥ तितुकेही जन्म घेवोनि तो भूपती ॥ ब्रह्मवेत्ता होऊनि अंती ॥ अक्षय शिवपद पावला ॥२५॥
ऐसा शिवभजनाचा महिमा ॥ वर्णू न शके द्रुहिण सुत्रामा ॥ वेदशास्त्रांसी सीमा ॥ न कळे ज्याची वर्णावया ॥२६॥
ऐकूनि शिवगुणकीर्तन ॥ सद्गद न होय जयाचें मन ॥ अश्रुधारा नयन ॥ जयाचे कदा न वाहती ॥२७॥
धिक् त्याचें जिणें धिक् कर्म ॥ धिक् विद्या धिक् धर्म ॥ तो वांचोनि काय अधम ॥ दुरात्मा व्यर्थ संसारीं ॥२८॥
ऐका शिवभजनाची थोरी ॥ उज्जयिनी नामें महानगरी ॥ राव चंद्रसेन राज्य करी ॥ न्यायनीतीकरूनियां ॥२९॥ ज्योतिर्लिंग महाकाळेश्वर ॥ त्याचे भजनीं रत नृपवर ॥ मित्र एक नाम मणिभद्र ॥ प्राणसखा रायाचा ॥३०॥

मित्र चतुर आणि पवित्र ॥ देशिक सर्वज्ञ दयासागर ॥ शिष्य भाविक आणि उदार ॥ पूर्वसुकृतें प्राप्त होय ॥३१॥
गृहिणी सुंदर आणि पतिव्रता ॥ पुत्र भक्त आणि सभाग्यता ॥ व्युत्पन्न आणि सुरस वक्ता ॥ होय विशेष सुकृतें  ॥३२॥
दिव्य हिरा आणि परिस ॥ मुक्ताफळ सुढाळ सुरस ॥ पिता ज्ञानी गुरु तोचि विशेष ॥ हें अपूर्व त्रिभुवनीं ॥३३॥
ऐसा तो राव चंद्रसेन ॥ मित्र मणिभद्र अति सुजाण ॥ तेणें एक मणि दिधला आणोन ॥ चंडकिरण दुसरा ॥३४॥
अष्टधातुंचा होतां स्पर्श ॥ होय चामीकर बावनकस ॥ सर्पव्याघ्रतस्करवास ॥ राष्ट्रांत नसे त्याकरितां ॥३५॥
त्या मण्याचें होतां दर्शन ॥ सर्व रोग जाती भस्म होऊन ॥ दुर्भिक्ष शोक अवर्षण ॥ दारिद्र्य नाहीं नगरांत ॥३६॥
तो कंठी बांधितां प्रकाशवंत ॥ राव दिसे जैसा पुरुहूत ॥ समरांगणी जय अद्भुत ॥ न ये अपयश कालत्रयीं ॥३७॥
जे करावया येती वैर ॥ ते आपणचि होती प्राणमित्र ॥ आयुरारोग्य ऐश्वर्य अपार ॥ चढत चालिलें नृपाचें ॥३८॥
भूप तो सर्वगुणीं वरिष्ठ ॥ शिवभजनीं गंगेचा लोट ॥ कीं विवेकभावरत्नांचा मुकुट ॥ समुद्र सुभट चातुर्याचा ॥३९॥
कीं वैराग्यसरोवरींचा मराळ ॥ कीं शांतिउद्यानींचा तपस्वी निर्मळ ॥ कीं ज्ञानामृताचा विशाळ ॥ कूपचि काय उचंबळला ॥४०॥

ऐश्वर्य वाढतां प्रबळ ॥ द्वेष करिती पृथ्वीचे भूपाळ ॥ मणि मागों पाठवितां सकळ ॥ स्पर्धा बळें वाढविती ॥४१॥
बहुतांसि असह्य झालें ॥ अवनीचे भूभुज एकवटले ॥ अपार दळ घेवोनि आले ॥ वेढिलें नगर रायाचें ॥॥४२॥
इंदिरावर कमलदलनयन ॥ त्याचें कंठी कौस्तुभ जाण ॥ कीं मृडानीवरमौळीं रोहिणीरमण ॥ प्रकाशघन मणी तैसा ॥४३॥
तो मणी आम्हांसि दे त्वरित ॥ म्हणोनि नृपांनीं पाठविले दूत ॥ मग राव विचारी मनांत ॥ कैसा अनर्थ ओढवला ॥४४॥
थोर वस्तूंचे संग्रहण ॥ तेंचि अनर्थासि कारण ॥ ज्याकारणें जें भूषण ॥ तेंचि विदूषणरूप होये ॥४५॥
अतिरूप अतिधन ॥ अतिविद्या अतिप्रीति पूर्ण ॥ अतिभोग अतिभूषण ॥ विघ्नासि कारण तेंचि होय ॥४६॥
बोले राव चंद्रसेन ॥ मणी जरी द्यावा यांलागून ॥ तरी जाईल क्षात्रपण ॥ युद्ध दारुण न करवे ॥४७॥
आतां स्वामी महाकाळेश्वर ॥ करुणासिंधु कर्पूरगौर ॥ जो दीनरक्षण जगदुद्धार ॥ वज्रपंजर भक्तांसी ॥४८॥
त्यासी शरण जाऊं ये अवसरीं ॥ जो भक्ताकाजकैवारी ॥ जो त्रिपुरांतक हिमनगकुमारी ॥ प्राणवल्लभ जगदात्मा ॥४९॥
पूजासामग्री सिद्ध करून ॥ शिवमंदिरीं बैसला जाऊन ॥ सकळ चिंता सोडून ॥ विधियुक्त पूजन आरंभिलें ॥५०॥

बाहेर सेना घेऊन प्रधान ॥ युद्ध करित शिव स्मरून ॥ महायंत्रांचे नगरावरून ॥ मार होती अनिवार ॥५१॥
सर्व चिंता सोडूनि चंद्रसेन ॥ चंद्रचूड आराधी प्रीतीकरून ॥ करी श्रौतमिश्रित त्र्यंबकपूजन ॥ मानसध्यान यथाविधी  ॥५२॥
बाहेर झुंजती पृथ्वीचे भूपाळ ॥ परी चिंतारहित भूपति प्रेमळ ॥ देवद्वारीं वाद्यांचा कल्लोळ ॥ चतुर्विध वाद्यें वाजताती ॥५३॥
राव करीत महापूजन ॥ पौरजन विलोकिती मिळोन ॥ त्यांत एक गोपगृहिणी पतिहीन ॥ कुमार कडिये घेऊन पातली ॥५४॥
सहा वर्षांचा बाळ ॥ राजा पूजा करितां पाहें सकळ ॥ निरखोनियां वाढवेळ ॥ गोपगृहिणी आली घरा ॥५५॥
कुमार कडेखालता उतरोन ॥ आपण करी गृहींचें कारण ॥ शेजारी उद्वस तृणसदन ॥ बाळ जाऊनि बैसला तेथें ॥५६॥
लिंगाकृति पाषाण पाहून ॥ मृतिकेची वेदिका करून ॥ दिव्य शिवप्रतिमा मांडून ॥ करी स्थापना प्रीतीनें ॥५७॥
कोणी दुजें नाहीं तेथ ॥ लघुपाषाण आणोनि त्वरित ॥ पद्मासनीं पूजा यथार्थ ॥ पाषाणचि वाहे प्रीतीनें ॥५८॥
राजपूजा मनांत आठवून ॥ पदार्थमात्राविषयीं वाहे पाषाण ॥ धूप दीप नैवेद्य पूर्ण ॥ तेणेंचिकरूनि करीतसे ॥५९॥
आर्द्र तृणपुष्प सुवासहीन ॥ तेंचि वाहे आवडीकरून ॥ नाहीं ठाउकें मंत्र ध्यान आसन ॥ प्रेमभावें पूजीतसे ॥६०॥

परिमळद्रव्यें कैंचीं जवळी ॥ शिवावरी मृत्तिकाच उधळी ॥ मृत्तिकाचि घेऊनि करकमळीं ॥ पुष्पांजळीं समर्पित ॥६१॥
एवं रायाऐसें केलें पूजन ॥ मग मानसपूजा कर जोडून ॥ ध्यान करी नेत्र झांकून ॥ शंकरी मन दृढ जडलें ॥६२॥ मातेंनें स्वयंपाक करून ॥ ये बा पुत्रा करीं भोजन ॥ बहु वेळां हांक फोडोन ॥ पाचारितां नेदी प्रत्युत्तर ॥६३॥
म्हणोनि बाहेर येवोनि पाहे ॥ तंव शून्यगृहीं बैसला आहे ॥ म्हणे अर्भका मांडिलें काये ॥ चाल भोजना झडकरी ॥६४॥
परी नेदी प्रत्युत्तर ॥ मातेनें क्रोधे करूनि सत्वर ॥ त्याचें लिंग आणि पूजा समग्र ॥ निरखुनियां झुगारिलीं ॥६५॥
चाल भोजना त्वरित ॥ म्हणोनि हस्तकीं धरूनि वोढीत ॥ बाळ नेत्र उघडोनि पाहत ॥ तंव शिवपूजा विदारिली ॥६६॥
अहा शिव शिव म्हणोन ॥ घेत वक्षः:स्थळ बडवून ॥ दुःखें पडला मूर्च्छा येऊन ॥ म्हणे प्राण देईन मी आतां ॥६७॥
गलिप्रदानें देऊन ॥ माता जाऊनि करी भोजन ॥ जीर्णवस्त्र पांघरून ॥ तृणसेजे पहुडली ॥६८॥
इकडे पूजा भंगली म्हणून ॥ बाळ रडे शिवनाम घेऊन ॥ तंव दयाळ उमारमण ॥ अद्भुत नवल पै केलें ॥६९॥
तृणगृह होतें जें जर्जर ॥ झालें रत्नखचित शिवमंदिर ॥ हिऱ्यांचे स्तंभ वरी शिखर ॥ नाना रत्नांचे कळस झळकती ॥७०॥

चारी द्वारें रत्नखचित ॥ मध्यें मणिमय दिव्यलिंग विराजित ॥ चंद्रप्रभेहूनि अमित ॥ प्रभा ज्योतिर्लिंगाची ॥७१॥
नेत्र उघडोनि बाळ पाहात ॥ तंव राजोपचारें पूजा दिसत ॥ सिद्ध करोनि ठेविली समस्त ॥ बाळ नाचत ब्रह्मानंदें ॥७२॥
यथासांग महापूजन ॥ बाळें केलें प्रीतीकरोन ॥ षोडशोपचारें पूजा समर्पुन ॥ पुष्पांजळी वाहतसे ॥७३॥ शिवनामावळी उच्चारीत ॥ बाळ कीर्तनरंगीं नाचत ॥ शिव म्हणे माग त्वरित ॥ प्रसन्न झालों बाळका रे ॥७४॥ बाळक म्हणे ते वेळीं ॥ मम मातेनें तुझी पूजा भंगिली ॥ तो अन्याय पोटांत घालीं ॥ चंद्रमौळी अवश्य म्हणे ॥७५॥ मातेसि दर्शना आणितों येथ ॥ म्हणोनि गेला आपुले गृहांत ॥ तंव तें देखिलें रत्नखचित ॥ माता निद्रिस्त दिव्यमंचकीं ॥७६॥ पहिलें स्वरूप पालटून ॥ झाली ते नारी पद्मीण ॥ सर्वालंकारेंकरून ॥ शोभायमान पहुडली ॥७७॥
तीस बाळकें जागें करून ॥ म्हणे चाल घेईं शिवदर्शन ॥ तंव ती पाहे चहूंकडे विलोकून ॥ अद्भुत करणी शिवाची ॥७८॥
हृदयीं धरूनि दृढ बाळ ॥ शिवालया आली तात्काळ ॥ म्हणे धन्य तूं शिव दयाळ ॥ धन्य बाळ भक्त हा ॥७९॥ गोपदारा गेली राजगृहा धांवून ॥ चंद्रसेना सांगे वर्तमान ॥ राव वेगें आला प्रीतीकरून ॥ धरी चरण बाळकाचे ॥८०॥

शंकराची अद्भुत करणी ॥ राव आश्चर्य करूनि पाहे नयनीं ॥ नागरिकजनांच्या श्रेणी ॥ धांवती बाळा पाहावया ॥८१॥
दिगंतरीं गाजली हांक अहुत ॥ बाळकासी पावला उमानाथ ॥ अवंतीनगरा येती धांवत ॥ जन अपार पाहावया ॥८२॥
चंद्रसेन रायाप्रती ॥ नृप अर्वनीचे सांगोनि पाठविती ॥ धन्य धन्य तुझी भक्ती ॥ गिरिजावर प्रसन्न तूतें ॥८३॥
आम्ही टाकूनि द्वेष दुर्वासना ॥ तुझ्या भेटीस येऊं चंद्रसेना ॥ तो बाळ पाहूं नयना ॥ कैलासराणा प्रसन्न ज्यासी ॥८४॥
ऐसें ऐकतां चंद्रसेन ॥ प्रधानासमेत बाहेर येऊन ॥ सकळ रायांस भेटून ॥ आला मिरवत घेऊनी ॥८५॥
अवंतीनगरींची रचना ॥ पाहतां आश्चर्य वाटे मना ॥ सप्तपुरींत श्रेष्ठ जाणा ॥ उज्जयिनी नाम तियेचें ॥८६॥
राजे सकळ कर जोडून ॥ शिवमंदिरापुढें घालिती लोटांगण ॥ त्या बालकासी वंदून ॥ आश्चर्य करिती सर्वही ॥८७॥
म्हणती जैं शिव प्रसन्न ॥ तैं तृणकुटी होय सुवर्णसदन ॥ शत्रु ते मित्र होऊन ॥ वोळंगती सर्वस्वें ॥८८॥
गृहींच्या दासी सिद्धी होऊन ॥ न मागतां पुरविती इच्छिलें पूर्ण ॥ आंगणींचे वृक्ष कल्पतरु होऊन ॥ कल्पिलें फळ देती ते ॥८९॥
मुका होईल पंडित ॥ पांगुळ पवनापुढें धांवत ॥ जन्मांध रत्नें पारखीत ॥ मूढ अत्यंत होय वक्ता ॥९०॥

रंक-भणंगा भाग्य परम ॥ तोचि होईल सार्वभौम ॥ न करितां सायास दुर्गम ॥ चिंतामणि येत हाता ॥९१॥
त्रिभुवनभरी कीर्ति होय ॥ राजे समग्र वंदिती पाय ॥ जेथें जेथें खणूं जाय ॥ तेथें तेथें निधाने सांपडती ॥९२॥
अभ्यास न करितां बहुवस ॥ सांपडे वेदांचा सारांश ॥ सकळ कळा येती हातास ॥ उमाविलास भेटे जेव्हां ॥९३॥
गोपति म्हणें गोरक्षबाळा ॥ तुजसी गोवाहन प्रसन्न झाला ॥ गोविप्र प्रतिपाळीं स्नेहाळा ॥ धन्य नृपराज चंद्रसेन ॥९४॥ यात्रा दाटली बहुत ॥ सर्व राजे आश्चर्य करीत ॥ तों तेथें प्रकटला हनुमंत ॥ वायुसुत अंजनीप्रिय जो ॥९५॥
जो राघवचरणारविंदभ्रमर ॥ भूगर्भरत्नमानससंतापहर ॥ वृत्रारिशत्रुजनकनगर ॥ दहन मदनदमन जो ॥९६॥
द्रोणाचळौत्पाटण ॥ ऊर्मिलाजीवनप्राण रक्षण ॥ ध्वजस्तंभीं बैसोन ॥ पाळी तृतीयनंदन पृथेचा ॥९७॥
ऐसा प्रगटतां मारुती ॥ समस्त क्षोणीपाळ चरणीं लागती ॥ राघवप्रियकर बाळाप्रती ॥ हृदयीं धरूनि उपदेशी ॥९८॥
शिवपंचाक्षरी मंत्र ॥ उपदेशीत साक्षात रुद्र ॥ न्यास मातृका ध्यानप्रकार ॥ प्रदोष सोमवार व्रत सांगे ॥९९॥
हनुमंतें मस्तकीं ठेविला हात ॥ झाला चतुदर्शविद्यावंत ॥ चतुःषष्टिकळा आकळीत ॥ जैसा आमलक हस्तकीं ॥१००॥

त्याचें नाम श्रीकर ॥ ठेविता झाला वायुकुमर ॥ सकळ राव करिती जयजयकार ॥ पुष्पें सुरवर वर्षती ॥१०१॥
यावरी अंजनी हृदयाब्जमिलिंद ॥ श्रीकरास म्हणे तुजहो आनंद ॥ तुझे आठवे पिढीस नंद ॥ जन्मेल गोपराज गोकुळीं ॥१०२॥
त्याचा पुत्र पीतवसन ॥ होइल श्रीकृष्ण कंसदमन ॥ शिशुपालांतक कौरवमर्दन ॥ पांडवपालक गोविंद ॥१०३॥
श्रीहरीच्या अनंत अवतारपंक्ती ॥ मागें झाल्या पुढेंही होती ॥ जेवीं जपमाळेचे मणी परतोनी येती ॥ अवतार स्थिती तैसीच ॥१०४॥
कीं संवत्सर मास तिथि वार ॥ तेच परतती वारंवार ॥ तैसा अवतार धरी श्रीधर ॥ श्रीकरासत्य जाण पां ॥१०५॥
ऐसें हरिकुळभूषण बोलून ॥ पावला तेथेंचि अंतर्धान ॥ सर्व भूभुज म्हणती धन्य धन्य ॥ सभाग्यपण श्रीकराचें ॥१०६॥ ज्याचा श्रीगुरु हनुमंत ॥ त्यासी काय न्यून पदार्थ ॥ श्रीकर चंद्रसेन नृपनाथ ॥ बोळवीत सर्व भूपांते ॥१०७॥
वस्त्रें भूषणें देऊनी ॥ बोळविले पावले स्वस्थानीं ॥ मग सोमवार प्रदोष प्रीतीकरूनी ॥ श्रीकर चंद्रसेन आचरती ॥१०८॥
शिवरात्रीउत्साह करिती ॥ याचकांचे आर्त पुरविती ॥ शिवलीलामृत श्रवण करिती ॥ अंती शिवपदाप्रती पावले ॥१०९॥
हा अध्याय करितां पठण ॥ संतति संपत्ति आयुष्यवर्धन ॥ शिवार्चनी रत ज्याचें मन ॥ विघ्नें भीति तयासी ॥११०॥

शिवलीलामृतग्रंथवासरमणी ॥ देखोनि विकासती सज्जनकमलिनी ॥ जीवशिव चक्रवाकें दोनी ॥ ऐक्या येती प्रीतीनें ॥१११॥
निंदक दुर्जन अभक्त ॥ ते अंधारीं लपती दिवाभीत ॥ शिवनिंदकांसी वैकुंठनाथ ॥ महानरकांत नेऊनि घाली ॥११२॥
विष्णुनिंदक जे अपवित्र ॥ त्यांसी कुंभीपाकीं घाली त्रिनेत्र ॥ एवं हरि-हरनिंदकांसी सूर्यपुत्र ॥ नानाप्रकारें जाच करी ॥११३॥
ब्रह्मानंदा यतिवर्या ॥ श्रीभक्तकैलासाचलनिवासिया ॥ श्रीधरवरदा मृडानीप्रिया ॥ तुझी लीला वदवीं तूं ॥११४॥
शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड ॥ स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड ॥ परिसोत सज्जन अखंड ॥ चतुर्थाध्याय गोड हा ॥११५॥
-
॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥

Shivlilamrut - Adhyay 2

अध्याय दुसरा
श्रीगणेशाय नमः॥

जेथें सर्वदा शिवस्मरण तेथें भुक्ति मुक्ति सर्वकल्याण नाना संकटें विघ्नें दारुण बाधती कालत्रयी ॥१॥
संकेतें अथवा हास्येंकरून भलत्या मिसें घडो शिवस्मरण कळतां परिसासी लोह जाण संघटतां सुवर्ण करी कीं ॥२॥
कळतां प्राशिलें अमृत परी अमर करी कीं यथार्थ औषधी नेणतां भक्षित परी रोग सत्य हरी कीं ॥३॥
शुष्कतृणपर्वत अद्भुत नेणतां बाळक अकस्मात अग्निस्फुलिंग टाकीत परी भस्म यथार्थ करी कीं ॥४॥
तैसे कळतां घडे शिवस्मरण परी सकळ दोषां होय दहन अथवा विनोदेंकरून शिवस्मरण घडो कां ॥५॥
हे कां व्यर्थ हांका फोडिती शिव शिव नामें आरडती अरे कां हे उगे राहती हरहर गर्जती वेळोवेळां ॥६॥ शिवनामाचा करिती कोल्हाळ माझें उठविलें कपाळ शिव शिव म्हणतां वेळोवेळ काय येतें यांच्या हाता ॥७॥ ऐसी हेळणा करी क्षणक्षणीं परी उमावल्लभनाम ये वदनीं पुत्रकन्यानामेंकरूनी शिवस्मरण घडो कां ॥८॥ महाप्रीतीनें करितां शिवस्मरण आदरें करितां शिवध्यान शिवस्वरूप मानूनी ब्राह्मण संतर्पण करी सदां ॥९॥ ऐसी शिवीं आवडी धरी त्याहीमाजी आली शिवरात्री उपवास जागरण करी होय बोहरी महत्पापा ॥१०॥

ते दिवशीं बिल्वदळें घेऊन यथासांग घडलें शिवार्चन तरी सहस्त्रजन्मींचे पाप संपूर्ण भस्म होऊन जाईल ॥११॥
नित्य बिल्वदळें शिवासी वाहत त्याएवढा नाहीं पुण्यवंत तो तरेल हें नवल नव्हे सत्य त्याच्या दर्शनें बहुत तरती ॥१२॥
प्रातःकाळी घेतां शिवदर्शन यामिनीचें पाप जाय जळोन पूर्वजन्मींचें दोष गहन माध्यान्हीं दर्शन घेतां नुरती ॥१३॥
सायंकाळीं शिव पाहतां सप्रेम सप्तजन्मींचें पाप होय भस्म शिवरात्रीचा महिमा परम शेषही वर्णू शकेना ॥१४॥
कपिलाषष्ठी अर्धोदय संक्रमण महोदय गजच्छाया ग्रहण इतुकेही पर्वकाळ ओंवाळून शिवरात्रीवरून टाकावें ॥१५॥
शिवरात्री आधींचि पुण्यदिवस त्याहीवरी पूजन जागरण विशेष त्रिकाळपूजा आणि रुद्रघोष त्याच्या पुण्यासी पार नाहीं ॥१६॥
वसिष्ठ विश्वामित्रादि मुनीश्वर सुरगण गंधर्व किन्नर सिद्ध चारण विद्याधर शिवरात्रिव्रत करिताती ॥१७॥
यदर्थी सुरस कथा बहुत शौनकादिकां सांगे सूत ती श्रोतीं ऐकावी सावचित्त अत्यादरेंकरूनियां ॥१८॥
तरी मासांमाजी माघमास ज्याचा व्यास महिमा वर्णीं विशेष त्याहीमाजी कृष्णचतुर्दशीस मुख्य शिवरात्रि जाणिजे ॥१९॥
विंध्याद्रिवासी एक व्याध मृगपक्षिघातक परमनिषिध्द महानिर्दय हिंसक निषाद केले अपराध बहु तेणें ॥२०॥

धनुष्यबाण घेऊनि करीं पारधीसी चालिला दुराचारी पाश वागुरा कक्षेसी धरी कवच लेत हरितवर्ण ॥२१॥
करीं गोधांगुलित्राण आणिकही हातीं शस्त्रसामुग्री घेऊन काननीं जातां शिवस्थान शोभायमान देखिलें ॥२२॥
तंव तो शिवरात्रीचा दिन यात्रा आली चहुंकडून शिवमंदिर श्रुंगारून शोभा आणिली कैलासींची ॥२३॥
शुद्धरजततगटवर्ण देवालय झळके शोभायमान गगनचुंबित ध्वज पूर्ण रत्नजडित कळस तळपताती ॥२४॥
मध्यें मणिमय शिवलिंग भक्त पूजा करिती सांग अभिषेकधारा अभंग विप्र धरिती रुद्रघोषें ॥२५॥
एक टाळ मृदंग घेऊन सप्रेम करिती शिवकीर्तन श्रोते करटाळी वाजवून हरहरशब्दें घोष करिती ॥२६॥
नाना परिमळद्रव्यसुवास तेणें दशदिशा दुमदुमिल्या विशेष लक्ष दीपांचे प्रकाश जलजघोष घंटारव ॥२७॥
शशिमुखा गर्जती भेरी त्यांचा नाद माये अंबरी एवं चतुर्विध वाद्यें नानापरी भक्त वाजविती आनंदे ॥२८॥
तो तेथें व्याध पातला समोर विलोकी सर्व सोहळा एक मुहूर्त उभा ठाकला हांसत बोलिला विनोदे ॥२९॥
हे मूर्ख अवघे जन येथें द्रव्य काय व्यर्थ नासोन आंत दगड बाहेरी पाषाण देवपण येथें कैचें ॥३०॥

उत्तम अन्न सांडून व्यर्थ कां करिती उपोषण ऐसिया चेष्टा करीत तेथून काननाप्रती जातसे ॥३१॥
लोक नामें गर्जती वारंवार आपणहि विनोदें म्हणे शिव हर हर सहज सव्य घालूनि शिवमंदिर घोर कांतार प्रवेशला ॥३२॥
वाचेसी लागला तोचि वेध विनोदें बोले शिव शिव शब्द नामप्रतापें दोष अगाध झडत सर्व चालिले ॥३३॥
घोरांदर सेवितां वन नाढळतीच जीव लघुदारूण तों वरूणदिग्वधूचें सदन वासरमणि प्रवेशला ॥३४॥
निशा प्रवर्तली सबळ कीं ब्रह्मांडकरंडा भरलें काजळ कीं विशाळ कृष्णकंबळ मंडप काय उभारिला ॥३५॥
विगतधवा जेवीं कामिनी तेवीं शोभे कदा यामिनी जरी मंडित दिसे उडुगणीं परी पतिहीन रजनी ते ॥३६॥
जैसा पंडित गेलिया सभेंतून मूर्ख जल्पती पाखंडज्ञान जेवीं अस्ता जातां सहस्त्रकिरण उडुगणें मागें झळकती ॥३७॥
असो ऐसी निशा दाटली सुबद्ध अवघा वेळ उपवासी निषाद तों एक सरोवर अगाध दृष्टीं देखिलें शोधितां ॥३८॥
अनेक संपत्ती सभाग्यसदनीं तेवीं सरोवरी शोभती कुमुदिनी तटीं बिल्ववृक्ष गगनीं शोभायमान पसरला ॥३९॥
योगभ्रष्ट कर्मभूमीसी पावती जनन तेवीं बिल्वडहाळिया गगनींहून भूमीस लागल्या येऊन माजी रविशशिकिरण दिसे ॥४०॥

त्यांत तम दाटलें दारूण माजी बैसल्या व्याध जाऊन शरासनीं शर लावून कानाडी ओढोन सावज लक्षी ॥४१॥
दृष्टीं बिल्वदळें दाटलीं बहुत तीं दक्षिणहस्तें खुडोनि टाकीत तो तेथें पद्मजहस्तें स्थापित शिवलिंग दिव्य होतें ॥४२॥
त्यावरी बिल्वदळें पडत तेणें संतोषला अपर्णानाथ व्याधासी उपवास जागरण घडत सायास करितां अनायासें ॥४३॥
वाचेसी शिवनामाचा चाळा हर हर म्हणे वेळोवेळां पापक्षय होत चालिला पूजन स्मरण सर्व घडलें ॥४४॥
एक याम झालिया रजनी तों जलपानालागीं एक हरिणी आली तेथें ते गर्भिणी परम सुकुमार तेजस्वी ॥४५॥ व्याध तिणें लक्षिला दुरून कृतांतवत परम दारुण आकर्ण ओढिला बाण देखोनि हरिणी बोलतसे ॥४६॥
म्हणे महापुरुषा अन्यायाविण कां मजवरी लाविला बाण मी तव हरिणी आहे गर्भिण वध तुवां करावा ॥४७॥ उदरांत गर्भ सूक्ष्म अज्ञान वधितां दोष तुज दारुण एक रथभरी जीव वधितां सान तरी एक बस्त वधियेला ॥४८॥
शत बस्त वधितां एक वृषभहत्येचें पातक शत वृषभ तैं गोहत्या देख घडली शास्त्र वदतसे ॥४९॥
शत गोहत्येचें पातक पूर्ण एक वघितां होय ब्राह्मण शत ब्रह्महत्येचें पातक जाण एक स्त्री वधिलिया ॥५०॥

शत स्त्रियांहूनि अधिक एक गुरुहत्येचें पातक त्याहूनि शतगुणी देख एक गर्भिणी विधिलिया ॥५१॥
तरी अन्याय नसतां ये अवसरीं मज मारिसी कां वनांतरी व्याध म्हणे कुटुंब घरी उपवासी वाट पहात ॥५२॥ मीही आजि निराहार अन्न नाहींच अणुमात्र परी मृगी होऊनि सुंदर गोष्टी वद्सी शास्त्रींच्या ॥५३॥
मज आश्चर्य वाटतें पोटीं नराऐशा सांगसी गोष्टी तुज देखोनियां दृष्टीं दया हृदयीं उपजतसे ॥५४॥
पूर्वीं तुं होतीस कोण तुज एवढें ज्ञान कोठून तूं विशाळनेत्री रूप लावण्य सर्व वर्तमान मज सांगे ॥५५॥
मृगी म्हणे ते अवसरीं पूर्वी मंथन करितां क्षीरसागरीं चतुर्दश रत्ने काढिलीं सुरासुरीं महाप्रयत्नेंकरूनियां ॥५६॥
त्यांमाजी मी रंभा चतुर मज देखोनि भुलती सुरवर नाना तपें आचरोनि अपार तपस्वी पावती आम्हांतें ॥५७॥ म्यां नयनकटाक्षजाळें पसरून बांधिले निर्जरांचें मनमीन माझिया अंगसुवासा वेधून मुनिभ्रमर धांवती ॥५८॥ माझे गायन ऐकावया सुरंग सुधापानीं धांवती कुरंग मी भोगीं स्वर्गीचे दिव्य भोग स्वरूपें मानी कोणासी ॥५९॥
मद अंगी चढला बहुत शिवभजन टाकिलें समस्त शिवरात्री सोमवार प्रदोषव्रत शिवार्चन सांडिलें म्यां ॥६०॥

सोडोनियां सुधापान करूं लागलें मद्यप्राशन हिरण्यनामा दैत्य दारूण सुर सोडोनि रतले त्यांसी ॥६१॥
ऐसा लोटला काळ अपार मृगयेसी गेला तो असुर त्या दुष्टासंगे अपर्णावर भजनपूजन विसरलें ॥६२॥
मनासी ऐसें वाटलें पूर्ण असुर गेला मृगयेलागून इतुक्यांत घ्यावें शिवदर्शन म्हणोनि गेलें कैलासा ॥६३॥
मज देखतां हिमनगजामात परम क्षोभोनि शाप देत तूं परम पापिणी यथार्थ मृगी होई मृत्युलोकीं ॥६४॥
तुझ्या सख्या दोघीजणी॥ त्या होतील तुजसवं हरिणी हिरण्य असुर माझिये भजनीं असावध सर्वदा ॥६५॥
तोही मृग होऊनि सत्य तुम्हांसींचि होईल रत ऐक व्याधा सावचित्त मग म्यां शिव प्रार्थिला ॥६६॥
हे पंचवदना विरूपाक्षा सच्चिदानंदा कर्माधक्षां॥ दक्षमखदळणा सर्वासाक्षा :शाप देईं आम्हांतें ॥६७॥
भोळा चक्रवर्ती दयाळ उःशाप वदला पयःफेनधवल द्वादश वर्षे भरतां तात्काळ पावाल माझिया पदातें ॥६८॥
मग आम्हीं मृगयोनी जन्मलों ये कर्मअवनीं  तरी मी गर्भिणी आहें हरिणी प्रसूतकाळ समीप असे ॥६९॥
तरी मी आपुल्या स्वस्थळा जाऊन सत्वर येतें गर्भ ठेवून मग तूं सुखें घेई प्राण सत्य वचन हें माझें ॥७०॥

ऐसें मृगी बोलिली सावचित्त त्यावरी तो व्याध काय बोलत तूं गोड बोलसी यथार्थ परी विश्वास मज वाटे ॥७१॥
नानापरी असत्य बोलोन करावें शरीराचें संरक्षण हें प्राणीमात्रासी आहे ज्ञान तरी तूं शपथ वदें आतां ॥७२॥
महत्पापें उच्चारून शपथ वदें यथार्थ पूर्ण यावरी ते हरिणी दीनवदन वाहत आण ऐका ते ॥७३॥
ब्राह्मणकुळीं उपजोन जो करी वेदशास्त्राध्ययन सत्यशौचवर्जित संध्याहीन माझे शिरीं पातक तें ॥७४॥ एक वेदविक्रय करिती पूर्ण कृतघ्न परपीडक नावडे भजन एक दानासी करिती विघ्न गुरु निंदाश्रवण एक करिती ॥७५॥
रमावर-उमावरांची निंदा त्या पापाची मज होय आपदा दान दिधलें जें ब्रह्मवृंदा हिरोनी घेती माघारें ॥७६॥
एक यतिनिंदा करिती एक शास्त्रें पाहती द्वैत निर्मिती नाना भ्रष्टमार्ग आचरती स्वधर्म आपुला सांडोनियां ॥७७॥
देवायलामाजी जाऊनी हरिकथापुराणश्रवणीं जे बैसती विडा घेउनी ते कोडी होती पापिये ॥७८॥
जे देवळांत करिती स्त्रीसंभोग कीं स्त्रीभ्रतारांसी करिती वियोग ते नपुंसक होऊनि अभाग्य उपजती या जन्मीं ॥७९॥
वर्मकर्में निंदा करीत तो जगपुरीषभक्षक काग होत शिष्यांसी विद्या असोनि सांगत तो पिंगळा होत निर्धारें ॥८०॥

अनुचित प्रतिग्रह ब्राह्मण घेती त्यानिमित्तें गंडमाळा होती परक्षेत्रींच्या गाई वळूनि आणिती ते अल्पायुषी होती या जन्मीं ॥८१॥
जो राजा करी प्रजापीडण तो या जन्मीं व्याघ्र कां सर्प होय दारूण वृथा करी साधुछळण निर्वंश पूर्ण होय त्याचा ॥८२॥
स्त्रिया व्रतनेम करीत भ्रतारासी अव्हेरीत धनधान्य असोनि वंचित त्या वाघुळा होती या जन्मीं ॥८३॥
पुरूष कुरूप म्हणोनियां त्यागिती त्या या जन्मीं बालविधवा होती तेथेंही जारकर्म करिती मग त्या होती वारांगना ॥८४॥
ज्या भ्रतारासी निर्भर्त्सिती त्या दासी किंवा कुलटा होती सेवक स्वामीचा द्रोह करिती ते जन्मा येती श्वानाच्या ॥८५॥
सेवकापासूनि सेवा घेऊन त्याचें दे जो वेतन तो अत्यंत भिकारी होऊन दारोदारीं हिंडतसे ॥८६॥
स्त्रीपुरुष गुज बोलतां जो जाऊनि ऐके तत्वतां त्याची स्त्री दुरावे हिंडतां अन्न मिळे तयातें ॥८७॥
जे जारणमारण करिती ते भूत प्रेत पिशाच होती यती उपवासें पीडिती त्यांतें दुष्काळ जन्मवरी ॥८८॥
स्त्री रजस्वला होऊनी गृहीं वावरें जे पापिणी पूर्वज रुधिरीं पडती पतनीं त्या गृही देव-पितृगण येती ॥८९॥
जे देवाच्या दीपाचें तेल नेती ते या जन्मीं निपुत्रिक होती ज्या रांधितां अन्न चोरोनी भक्षिती त्या मार्जारी होती या जन्मीं ॥९०॥

ब्राह्मणांस कदान्न घालून आपण भक्षिती षड्रसपक्वान्न  त्यांचे गर्भ पडती गळोन आपुलिया कर्मवशें ॥९१॥
जो मातापित्यांसी शिणवीत तो ये जन्मीं मर्कट होत सासु-श्वशुरा स्नुषा गांजित तरी बाळक वांचे तियेचें ॥९२॥
मृगी म्हणे व्याधालागून जरी मी  यें परतोन तरी हीं महत्पापें संपूर्ण माझ्या माथां बैसोत ॥९३॥
हे मिथ्या गोष्ट होय साचार तरी घडो शिवपूजेचा अपहार ऐसी शपथ ऐकतां निर्धार व्याध शंकला मानसीं ॥९४॥
म्हणे पतिव्रते जाईं आतां सत्वर येई निशा सरतां हरिणी म्हणे शिवपदासी तत्वतां पुण्यवंता जाशील ॥९५॥
उदकपान करूनि वेगीं निजाश्रमा गेली ते कुरंगी इकडे व्याघ्र दक्षिणभार्गी टाकी बिल्वदळें खुडूनियां ॥९६॥ दोन प्रहर झाली यामिनी द्वितीय पूजा शिवें मानुनी अर्धपाप जळालें मुळींहुनी सप्तजन्मींचें तेधवां ॥९७॥
नामीं आवड जडली पूर्ण व्याध करी शिवस्मरण मृगीमुखें ऐकिलें निरूपण सहज जागरण घडलें तया ॥९८॥ तों दुसरी हरिणी अकस्मात पातली तेथें तृषाक्रांत व्याधें बाण ओढीतां त्वरित करुणा भाकी हरिणी ते ॥९९॥ म्हणे व्याधा ऐक ये समयी मज कामानळें पीडीलें पाहीं पतीसी भोग देऊनि लवलाहीं परतोनि येतें सत्वर ॥१००॥

व्याध आश्चर्य करी मनांत म्हणे शपथ बोलोनि जाईं त्वरित धन्य तुमचें जीवित्व सर्व शास्त्रार्थ ठाउका ॥१०१॥
वापी तडाग सरोवर जो पतित मोडी देवागार गुरुनिंदक मद्यपानी दुराचार तीं पापें समग्र मस्तकीं माझ्या ॥१०२॥
महाक्षत्रिय आपण म्हणवित समरांगणी मागें पळत वृत्ति हरी सीमा लोटित ग्रंथ निंदित महापुरूषांचे ॥१०३॥
वेदशास्त्रांची निंदा करी संत-भक्तांसी द्वेष धरी हरिहर चरित्रें अव्हेरी माझे शिरीं तीं पापें ॥१०४॥
धनधान्य असोनि पाहीं पतीलागीं शिणवी म्हणे नाहीं पति सांडोनि निजे परगृही तीं पापे माझिया माथां ॥१०५॥
पुत्र स्नुषा सन्मार्गें वर्तता त्यांसी व्यर्थची गांजिती नं पाहंतां ते कुरुप होती तत्वतां हिंडतां भिक्षा मिळेचि ॥१०६॥
बंधुबंधु जे वैर करिती ते या जन्मीं मत्स्य होती गुरुचें उणें जे पाहती त्यांची संपत्ति दग्ध होय ॥१०७॥
जे मार्गस्थांचीं वस्त्रे हरिती ते अतिशूद्र प्रेतवस्त्रें पांघरती आम्ही तपस्वी म्हणोनियां अनाचार करिती ते घुले होती मोकाट ॥१०८॥
दासी स्वामीची सेवा करी ती ये जन्मीं होय मगरी जो कन्याविक्रय करी हिंसक योनीं निपजे तो ॥१०९॥
स्त्री भ्रताराची सेवा करीत तीस जो व्यर्थचि गांजित त्याचा गृहभंग होत जन्मजन्मांतरी सुटे ॥११०॥

ब्राह्मण करी रसविक्रय घेतां देतां मद्यपी होय जो ब्रह्मवृंदा अपमानिताहे तो होय ब्रह्मराक्षस ॥१११॥
एकें उपकार केला जो नष्ट नाठवी त्याला तो कृतघ्न जंत झाला पूर्वकर्में जाणिजे ॥११२॥
विप्र श्राध्दीं जेवुनी स्त्रीभोग करी ते दिनीं तो श्वानसूकरयोनीं उपजेल नि:संशये ॥११३॥
व्यवहारीं दहांत बैसोन खोटी साक्ष देई गर्जोन पूर्वज नरकीं पावती पतन असत्य साक्ष देतांचि ॥११४॥
दोघी स्त्रिया करून एकीचेंच राखी जो मन तो गोचिड होय जाण सारमेय शरीरीं ॥११५॥
पूर्वजन्मीं कोंडी उदक त्याचा मळमूत्रनिरोध देख करितां साधुनिंदा आवश्यक सत्वर दंत भग्न होती ॥११६॥
देवालयीं करी भोजन तरी ये जन्मी होय क्षीण पृथ्वीपतीची निंदा करितां जाण उदरीं मंदाग्नि होय पैं ॥११७॥
ग्रहणसमयीं करी भोजन त्यासी पित्तरोग होय दारुण परबाळें विकी परदेशीं नेऊन तरी सर्वांगीं कुष्ठ भरे ॥११८॥
जी स्त्री करी गर्भपातन तीउपजे वंध्या होऊन देवालय टाकी पाडोन तरी अंगभंग होय त्याचा ॥११९॥
अपराधाविण स्त्रीसी गांजिताहे त्याचें ये जन्मीं एक अंग जाये ब्राह्मणाचें अन्न हरिती पापिये त्यांचा वंश वाढे कधीं ॥१२०॥

गुरु संत माता पिता त्यांसी होय जो निर्भर्त्सिता तरी वाचा जाय तत्वतां अडखळे बोलतां क्षणाक्षणां ॥१२१॥
जो ब्राह्मणांसी दंड मारी त्यासी व्याधितिडका लागती शरीरीं जो संतासीं वादविवाद करी दीर्घ दंत होती त्याचे ॥१२२॥
देवद्वारींचे तरुवर अश्वत्थादि वृक्ष साचार तोडितां पांगुळ होय निर्धार भिक्षा मिळे हिंडतां ॥१२३॥
जो सूतक अन्न भक्षित त्याचे उदरीं नाना रोग होत आपणचि परिमळद्रव्य भोगी समस्त तरी दुर्गंधी सत्य सर्वांगी ॥१२४॥
ब्राह्मणाचें ऋण देतां तरी बाळपणीं मृत्यु पावे पिता जलवृक्षछाया मोडितां तरी एकही स्थळ मिळे त्यातें ॥१२५॥
ब्राह्मणासी आशा लावून चाळवी नेदी कदा दान तो ये जन्मीं अन्न अन्न करीत हिंडे घरोघरीं ॥१२६॥
जो पुत्रद्वेष करीत आणि दरिद्रियाचें लग्न मोडित तरी स्त्रीसी सल राहे पोटांत वंध्या निश्चित संसारीं ॥१२७॥
जेणें ब्राह्मण बांधिले निग्रहून त्यासी सांडसें तोडी सुर्यनंदन जो नायके कथाग्रंथ पावन बधिर होय जन्मोजन्मीं  ॥१२८॥
जो पीडी माता-पितयांस त्याचा सर्वदा होई कार्यनाश एकासी भजे निंदी सर्व देवांस तरी एकचि पुत्र होय त्यासी ॥१२९॥
जो चांडाळ गोवध करी त्यासी मिळे कर्कशा नारी वृषभ वधितां निर्धारीं शतमूर्ख पुत्र होय त्यासी ॥१३०॥

उदकतृणेंविण पशु मारीत तरी मुक्याचि प्रजा होती समस्त जो पतिव्रतेसी भोगूं इच्छित तरी कुरूप नारी कर्कशा मिळे ॥१३१॥
जो पारधी बहु जीव संहारी तो फेंफरा होय संसारी गुरूचा त्याग जो चांडाळ करी तो उपजतांचि मृत्यु पावे ॥१३२॥
नित्य अथवा रविवारीं मुते रवीसमोर त्याचे बाळपणीं दंत भग्न केश शुभ्र जे मृत बाळासाठीं रूदती निर्धार॥ त्यांस हांसता निपुत्रिक होय ॥१३३॥
हरिणी म्हणे व्याधालागून मी सत्वर येतें पतीसी भोग देऊन यें तरी हीं पापें संपूर्ण माझ्या माथां बैसोत पैं ॥१३४॥
व्याध मनांत शंकोन म्हणे धन्य धन्य तुमचें ज्ञान सत्वर येईं गृहासी जाऊन सत्य संपूर्ण सांभाळीं ॥१३५॥
जलपान करूनि वेगीं आश्रम गेली ते कुरंगी तों मृगराज तेचि प्रसंगीं जलपानार्थ पातला ॥१३६॥
व्याधें ओढिला बाण तों मृग बोले दीनवदन म्हणे माझ्या स्त्रिया पतिव्रता सगुण त्यांसी पुसोन येतों मी ॥१३७॥
शपथ ऐकें त्वरित कीर्तन करिती प्रेमळ भक्त तो कथारंग मोडितां निर्वंश होत तें पाप सत्य मम माथां ॥१३८॥
ब्रह्मकर्म वेदोक्त शुद्र निजांग आचरत तो अधम नरकीं पडत परधर्म आचरतां ॥१३९॥
तीर्थयात्रेसी विघ्नें करी वाटपाडी वस्त्र द्रव्य हरी तरी सर्वांगी व्रण अघोरीं नरकीं पडे कल्पपर्यंत ॥१४०॥

शास्त्रकोशीं नाहीं प्रमाण कूटकविता करी क्षुद्र लक्षून हरिती ब्राह्मणांचा मान तरी संतान तयांचे वाढे ॥१४१॥
हरिदिनीं शिवदिनीं उपोषण विधियुक्त करी द्वादशी पूर्ण तरी हस्त-पाद क्षीण होती त्याचे निर्धारें ॥१४२॥
एक शिवहरीप्रतिमा फोडिती एक भगवद्भक्तां विघ्नें करिती एक शिवमहिमा उच्छेदिती नरकीं होती कीटक ते ॥१४३॥
मातृद्रोही त्यासी व्याधी भरे पितृद्रोही पिशाच विचरे गुरुद्रोही तत्काळ मरे भूतप्रेतगणीं विचरे तो ॥१४४॥
विप्र आहार बहुत जेविती त्यांसी जो हांसे दुर्मती त्याचे मुखीं अहोचक्ररोग निश्चितीं सोडिती जन्मवरी ॥१४५॥
एक गोविक्रय करिती एक कन्याविक्रय अर्जिती ते नर मार्जार मस्त होती बाळें भक्षिती आपुलीं ॥१४६॥
जो कन्या भगिनी अभिलाषी कामदृष्टीं न्याहाळी पतिव्रतेसी प्रमेहरोग होय त्यासी कीं खडा गुह्यांत दाटत ॥१४७॥
प्रासादभंग लिंगभंग करी देवांचीं उपकरणें अलंकार चोरी देवप्रतिष्ठा अव्हेरी पंडुरोग होय तेथें ॥१४८॥
एक मित्रद्रोह विश्वासघात करिती मातृ-पितृहत्या गुरूसी संकटीं पाडिती ब्रह्मवध गोवध वारिती अंगी सामर्थ्य असोनियां ॥१४९॥
ब्राह्मण बैसवोनि बाहेरी उत्तमान्न जेवी गृहांतरी सोयऱ्यांची प्रार्थना करी संग्रहणी पोटशूळ होती तयां ॥१५०॥

एक कर्मभ्रष्ट पंचयज्ञ करिती एक ब्राह्मणांची सदनें जाळिती एक दीनासी मार्गीं नागविती एक संतांचा करिती अपमान ॥१५१॥
एक करिती गुरुछळण एक म्हणती पाहों याचें लक्षण नाना दोष आरोपिती अज्ञान त्यांचे संतान वाढे ॥१५२॥
जो सदा पितृद्वेष करी जो ब्रह्मवृंदासी अव्हेरी शिवकीर्तन ऐकतां त्रासे अंतरीं  तरी पितृवीर्य नव्हे तो ॥१५३॥
शिवकीर्तनीं नव्हे सादर तरी कर्णमूळरोग निर्धार नसत्याच गोष्टी जल्पे अपार जो दर्दुर होय निर्धारें ॥१५४॥
शिवकीर्तन किंवा पुराणश्रवण तेथें शयन करितां सर्प होय दारुण एक अतिवादक छळक जाण ते पिशाचयोनी पावती ॥१५५॥
एका देवार्चनीं वीट येत ब्राह्मण पूजावया कंटाळत तीर्थप्रसाद अव्हेरीत त्यांच्या आंखुडती अंगशिरा ॥१५६॥
मृग म्हणे ऐसीं पापें अपार मम मस्तकीं होईल परम भार मग पारधी म्हणे सत्वर जाईं स्वस्थाना मृगवर्या ॥१५७॥
व्याध शिवनामें गर्जे ते क्षणीं कंठ सद्गदित अश्रु नयनीं मागुती बिल्वदळें खुडोनी शिवावरी टाकीतसे ॥१५८॥
चौंप्रहरांच्या पूजा चारी संपूर्ण झाल्या शिवजागरीं सप्तजन्मींचीं पापें निर्धारीं मुळींहून भस्म झालीं ॥१५९॥
तों पूर्वदिशा मुख प्रक्षाळित सुपर्णाग्रज उदय पावत आरक्तवर्ण शोभा दिसत तेंचि कुंकुम प्राचीचें ॥१६०॥

तों तिसरी मृगी आली अकस्मात व्याध देखिला कृतांतवत म्हणे मारूं नको मज यथार्थ बाळासी स्तन देऊनि येतें मी ॥१६१॥
व्याध अत्यंत हर्षभरित म्हणे ही काय बोलेल शास्त्रार्थ तो ऐकावया म्हणत शपथ करूनि जाय तूं ॥१६२॥
यावरी मृगी म्हणे व्याधा ऐक जो तृणदाहक ग्रामदाहक गोब्राह्मणांचें कोंडी उदक क्षयरोग त्यासी सोडी ॥१६३॥
ब्राह्मणांची सदनें हरिती देख त्यांचे पूर्वज रौरवीं पडती नि:शंक मातृ-पुत्रां विघडती एक स्त्रीपुरुषां विघड पाडिती ॥१६४॥
देव-ब्राह्मण देखोन खालती करिती कदा मान निंदिती बोलती कठोर वचन यम करचरण छेदी तयांचे ॥१६५॥
परवस्तु चोरावया देख अखंड लाविला असें रोंख साधुसन्मानें मानी दुःख त्यासी नेत्ररोगतिडका सोडिती ॥१६६॥
पुस्तकचोर ते मुके होती रत्नचोरांचे नेत्र जाती अत्यंत गर्वी ते महिष होती पारधी निश्चित श्येनपक्षी ॥१६७॥
भक्तांची जो निंदा करीत त्याचे मुखीं दुर्गंधी घाणित जो मातापितयांसी ताडित लुला होत यालागीं ॥१६८॥
जो अत्यंत कृपण धन वेंची अणुप्रमाण तो महाभुजंग होऊन धुसधुसीत बैसे तेथें ॥१६९॥
भिक्षेसी यतीश्वर आला तो जेणें रिता दवडिला शिव त्यावरी जाण कोपला संतती संपत्ती दग्ध होय ॥१७०॥

ब्राह्मण बैसला पात्रावरी उठवूनि घातला बाहेरी त्याहूनियां दुराचारी दुसरा कोणी नसेचि ॥१७१॥
ऐसा धर्माधर्म ऐकोन पारधी सद्गद बोले वचन स्वस्थळा जाईं जलपान करून  बाळांसी स्तन देऊन येई ॥१७२॥
ऐसें ऐकोनि मृगी लवलाह्यां  गेली जलप्राशन करूनियां बाळें स्तनी लावूनियां तृप्त केलीं तियेनें ॥१७३॥
वडील झाली प्रसूत दुसरी पतीची कामना पुरवीत मृगराज म्हणे आतां त्वरित जाऊं चला व्याधापासीं ॥१७४॥
मृगें पाडसांसहित सर्वही व्याधापासीं आलीं लवलाहीं मृग म्हणे ते समयीं  आधीं मज वधीं पारधिया ॥१७५॥
मृगी म्हणे हा नव्हे विधी आम्हीं जाऊं पतीच्या आधी पाडसें म्हणती त्रिशुध्दी आम्हांसी वधीं पारधिया ॥१७६॥
त्यांचीं वचनें ऐकतां ते क्षणी व्याध सद्गद झाला मनीं अश्रुधारा लोटल्या नयनीं लागे चरणीं तयांच्या ॥१७७॥
म्हणे धन्य जिणें माझें झालें तुमचेनि मुखें निरूपण ऐकिलें बहुतां जन्मींचें पाप जळालें पावन केलें शरीर ॥१७८॥
माता पिता गुरु देव तुम्हीच आतां माझे सर्व  कैंचा संसार मिथ्या वाव पुत्र-कलत्र सर्व लटकें ॥१७९॥
व्याध बोले प्रेमेंकरून आतां कधीं मी शिवपद पावेन तों अकस्मात आलें विमान शिवगण बैसले त्यावरी ॥१८०॥

पंचवदन दशभुज व्याघ्रांबर नेसले महाराज ॥ अद्भुत तयांचें तेज दिक्चक्रामाजी समाये ॥१८१॥
दिव्य वाद्यें वाजविती किन्नर आलाप करिती विद्याधर दिव्य सुमनांचे संभार सुरगण स्वयें वर्षती ॥१८२॥
मृगें पावलीं दिव्य शरीर व्याध करी साष्टांग नमस्कार मुखें म्हणे जय जय शिव हर हर तों शरीरभाव पालटला ॥१८३॥
परिसीं झगडतां लोह होय सुवर्ण तैस व्याध झाला दशभुज पंचवदन शिवगणीं बहुत प्रार्थून दिव्य विमानीं बैसविला ॥१८४॥
मृगें पावलीं दिव्य शरीर तींही विमानी आरूढलीं समग्र व्याधाची स्तुति वारंवार करिती सुरगण सर्वही॥१८५॥
व्याध नेला शिवपदाप्रती तारामंडळीं मृगें राहती अद्यापि गगनीं झळकती जन पाहाती सर्व डोळां ॥१८६॥
सत्यवतीहृदयरत्नखाणी रसभरित बोलिला लिंगपुराणीं तें सज्जन ऐकोत दिनरजनीं ब्रह्मानंदेंकरूनियां ॥१८७॥
धन्य तें शिवरात्रिव्रत श्रवणें पातक दग्ध होत जे हें पठण करिती सावचित्त धन्य पुण्यवंत नर तेचि ॥१८८॥
सज्जन श्रोते निर्जर सत्य प्राशन करोत शिवलीलामृत निंदक असुर कुतर्कि बहुत त्यांस प्राप्त कैंचें हें ॥१८९॥
कैलासनाथ ब्रह्मानंद तयांचे पदकल्हार सुगंध तेथें श्रीधर अभंग षट्पद रुंजी घालीत शिवनामें ॥१९०॥ शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड ॥ परिसोत सज्जन अखंड द्वितीयाध्याय गोड हा ॥१९१॥

श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु