नित्यनूतन गीताई
हा अग्रलेख लोकसत्तेत छापून आला होता. गीताई आणि प्रामुख्याने तिच्या रचियेत्यावर प्रकाश टाकणारा हा लेख तुम्हा सर्वांना आवडेल अशी आशा आहे.
साभार : लोकसत्ता, शनिवार, १४ जुलै २०१२
विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात मराठीत दोन महान ग्रंथ निर्माण झाले. १९१४मध्ये लोकमान्य टिळकांचे ‘गीतारहस्य’ प्रसिद्ध झाले. स्वातंत्र्यलढय़ाला अनुकूल असा गीतेचा आविष्कार लोकांसमोर आला. तरुण वयापासून असलेले गीतेचे अखंड अनुसंधान आणि सामाजिक कार्यातून आलेले अफाट अनुभव यातून लोकमान्यांचे हे चिंतन उभे राहिले.
सह्य़ाद्रीच्या कडय़ासारखे लोकमान्यांचे व्यक्तिमत्त्व आहे असे ब्रिटिश खासदार हेन्री नेव्हिन्सन याने म्हटले होते. गीतारहस्य हेही सह्य़कडय़ाप्रमाणेच आहे. तत्त्वज्ञानाचा भव्य, बळकट तरीही सुंदर असा आविष्कार आपण पाहात आहोत अशी भावना गीतारहस्य वाचताना होते. अर्थात यासाठी तत्त्वज्ञानाची किमान आवड असावी लागते. आयुष्यातील समस्यांना तोंड देण्यासाठी गीतारहस्यात तात्त्विक आधार सापडतो.
तथापि, तात्त्विक आधाराने माणसाचे समाधान होत नाही. त्याला आत्मीय आधार हवा असतो. समाजाची ती चिरंतर गरज असते. तत्त्वज्ञान शुष्क असण्याची गरज नाही हे ज्ञानदेवांनी दाखवून दिले. नाद-रूपाबरोबर स्वाद व स्पर्श यांच्याही संवेदना देणाऱ्या सर्वेद्रियस्पर्शी शब्दकळेच्या साह्याने गीतेच्या तत्त्वज्ञानाची ‘सुखेसीं सुखाडिजे, सुखाचिमाजी’ अशी अलौकिक अनुभूती ज्ञानदेवांनी करून दिली. त्याचाच विसाव्या शतकातील उन्मेष म्हणजे विनोबांची ‘गीताई’. गीतेच्या तत्त्वज्ञानाच्या गूढ अंतरंगात ती वात्सल्याने घेऊन जाते. आपल्या लहानग्याशी आईचा संवाद जितका सहज, तीच सहजता गीताईची. गीतारहस्यानंतर २० वर्षांनी गीताई वाचकांच्या हाती आली आणि बुद्धीला वात्सल्याचे रूपडे चढले. त्या घटनेला आज ८० वर्षे पूर्ण होत आहेत.
असे घडले कारण आईचे नि:स्वार्थ प्रेम ही गीताईची मुख्य प्रेरणा होती. विनोबांवर आईचा खोल प्रभाव होता. त्यांची आई फार शिकलेली नसली तरी बुद्धिमान व सहृदय होती. भारतीय तत्त्वचिंतनाचा खोल अर्थ जाणत होती. विनोबांशी झालेल्या तिच्या लहान लहान संवादातून याची प्रचीती येते. गीतेचे अनुवाद तिने वाचले होते, पण सरळसोपे मराठी तिला हवे होते. ‘विन्या तूच का नाही माझ्यासाठी सोपा अनुवाद करीत, तू हे करू शकतोस’ या आईच्या उद्गाराचा विनोबांवर खोल परिणाम झाला. पुढे हीच अपेक्षा स्वातंत्र्यलढय़ातील अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. कारण टिळकांपाठोपाठ महात्मा गांधींनीही सामाजिक कार्यासाठी गीतेचा आधार घेतला होता. त्याचा प्रभावी आविष्कार आजूबाजूला दिसत असल्याने असंख्य कार्यकर्ते गीतेकडे आकृष्ट होत होते. विनोबा गांधींना भेटले १९१६ साली. या तरुणाचे आध्यात्मिक चिंतन खूप खोल आहे हे माणसे जोखण्यात वाकबगार असलेल्या गांधींना पहिल्याच भेटीत जाणवले. त्यानंतर दोघांमध्ये अनेक वर्षे संवाद होत राहिला. गीतेतील सिद्धान्तांच्या गहनगूढ अरण्यात दोघेही शिरत. मात्र ती केवळ बौद्धिक सफर नसे. जाणलेले आचरणात आणण्याचे विविध प्रयोग लगेच होत. शास्त्र व कला यांचा मनोहारी संगम असलेले गीता हे आचरणशास्त्र आहे असे स्पष्ट दर्शन या दोघांना झाले होते. गांधींनी सत्याग्रहींसाठी तयार केलेले एकादशव्रत ही या दर्शनाची निर्मिती होती.
कार्यकर्त्यांचा आग्रह, आईची प्रेरणा आणि बापूंचे सान्निध्य यांच्या संगमातून गीताईची निर्मिती झाली. कर्म आणि अकर्म यांचा परस्परसंबंध हे गीतेतील एक गूढ कोडे आहे. गीतेचा सखोल अभ्यास असला तरी हे कोडे सुटेपर्यंत गीतेवर काही बोलण्यास विनोबांची तयारी नव्हती. पूर्ण कर्मयोग हा संन्यास तर पूर्ण संन्यास हा पूर्ण कर्मयोग या कर्माच्या दुहेरी स्वरूपाबाबत नि:संदिग्धता आल्यावर पाचव्या अध्यायापासून गीतेच्या भाषांतरास सुरुवात झाली. गीतेचे नित्यनूतन तत्त्वज्ञान मधुर मराठीत पुन्हा सामान्य लोकांच्या अंगणात आले. तत्त्वज्ञानात रस नसेल तरी मराठीच्या माधुर्याचा अनुभव घेण्यासाठी गीताई चाळावी. साधेसोपे शब्द किती खोलवर घेऊन जातात ते पाहावे. गीतेचे तत्त्वज्ञान अजिबात क्लिष्ट नाही, उलट अगदी आजच्या परिस्थितीतही ते कसे मार्ग दाखविते याचे स्पष्ट दर्शन आपल्याला गीताईमध्ये मिळते. ‘अपार धरिती चिंता जी मेल्या हि सरे चि ना, गढले काम-भोगांत जणूं सर्वस्व मानुनी! ’ किंवा ‘आशेचे लेइले फांस काम-क्रोधात तत्पर, भोगासाठी अधर्माने इच्छिती धन-संचय! ’ हे आजच्या जीवनाचे किती सहज वर्णन? या परिस्थितीचे कारणही गीतेने मार्मिकपणे सांगितले आहे. ते सोप्या मराठीत विनोबा असे सांगतात.. ‘हे आज लाभलें आता तो जोडीन मनोरथ, हें आहे तें हि होईल माझे चि सगळें धन! ’ संपत्ती, सत्तेच्या चाकांवर धावणाऱ्या मनोरथाने आसुरी वृत्ती पोसली जाऊन ऐहिक जीवन नरकप्राय होऊन जाते असे विनोबांनी म्हटले आहे.
गीताई हे भाषांतर असले तरी त्यामध्ये विनोबांच्या व गांधींच्या विचारांचे सार आले आहे. गीताईची भारतीय संस्कृतीवर अपार श्रद्धा आहे, पण ती बुद्धीच्या ठाशीव पायावर उभी आहे. म्हणूनच आजच्या काळाला अनुकूल असे स्थितप्रज्ञ दर्शन विनोबांनी गीताईतून पुढे आणले. हा काळ बुद्धीचा आहे. बुद्धीची अचाट कार्ये आजूबाजूला चालू आहेत. पण भारतीय तत्त्वज्ञानानुसार बुद्धी हे जडतत्त्व असल्यामुळे ती सात्त्विक, राजस व तामस अशी असू शकते. सध्या सर्वत्र तामस व राजसी बुद्धीचे प्रदर्शन होते. अगदी आध्यात्मिक क्षेत्रातही पैसा, पारितोषिके व संख्येचे होणारे प्रदर्शन हे राजस बुद्धीचे प्रताप आहेत. समाजातील बुद्धी सात्त्विक व्हावी ही संतांची धडपड होती. गीताई, त्यापाठोपाठ आलेली गीता प्रवचने आणि त्यानंतर आलेले स्थितप्रज्ञ दर्शन या तिन्हीमध्ये विनोबांनी बुद्धीच्या सात्त्विकतेवर भर दिलेला आहे. बुद्धीला सात्त्विकता व्रतामधून येते. ही व्रते पूर्वी व्यक्तिगत असत. जशी चातुर्मासात घेतली जाणारी व्रते. पण गांधींनी व्रतांना सामाजिक केले. कारण गांधींना फक्त भारताचे स्वातंत्र्य अपेक्षित नव्हते तर त्यांना चारित्र्यवान राष्ट्र निर्माण करायचे होते. त्यासाठी आदर्श पुरुषविशेषाची गरज होती. गांधींना ती स्थितप्रज्ञाच्या वर्णनात सापडली. ‘स्थितप्रज्ञ’ हा गीतेचा खास शब्द आहे. तो अन्य कोणत्याच ग्रंथात सापडत नाही. ती गीतेची आदर्शमूर्ती आहे. दुसऱ्या अध्यायात त्याचे वर्णन येते. गांधींनी रोजच्या प्रार्थनेत त्याचा समावेश केला. ‘घेई ओढून संपूर्ण विषयातून इंद्रिये..’ ही स्थितप्रज्ञाच्या व्रतसाधनेची सुरुवात असून ‘स्वामित्वे विषयी वर्ते, त्यास लाभे प्रसन्नता’ हे मुक्कामाचे ठिकाण आहे.
ही प्रसन्नता साधण्यासाठी बुद्धीला कर्मयोगाची जोड अनिवार्य होती. विनोबांनी ती दिली. म्हणूनच पहिला सत्याग्रही म्हणून गांधींनी विनोबांची निवड केली. विनोबांचे चिंतन व्यक्तिगत असले तरी व्रतसाधना सामाजिक राहिली. मनुष्याचे रोजचे सर्व व्यवहार हे सामाजिकच असतात असा त्यांचा विश्वास होता. म्हणून गीताई परंपरानिष्ठ, धर्माध झाली नाही. ते मानवतेचे तत्त्वज्ञान झाले कारण गीतेची मूळ निर्मिती ही मानवासाठी होती. ही स्पष्टता आल्यामुळेच गीताई लिहूनही विनोबा कर्मकांडी झाले नाहीत. उलट सुरगावचे भंगीकाम, कांचनमुक्ती, ग्रामसेवा मंडळ असे अनेक क्रांतिकारी प्रयोग करू लागले. फैजपूरच्या काँग्रेस अधिवेशनाचे त्यांनी नियोजन केले. स्वातंत्र्यानंतर भूदान यज्ञाचा महान प्रयोग एकटय़ाच्या जिवावर केला. आत्मज्ञानही पूर्ण नसल्याने विज्ञानाप्रमाणे त्यातही कायम प्रयोग झाले पाहिजेत असे विनोबा म्हणत. विज्ञानयुगात व्यापक व कठीण समस्या वारंवार निर्माण होतील आणि त्यावर त्वरित निर्णय घेण्याची गरज असेल. यासाठी सात्त्विक निर्णयशक्ती विकसित व्हायला हवी. तेथे विज्ञानाला अध्यात्माची मदत होईल, असे त्यांचे प्रतिपादन होते. व्यवहारात गीता कशी उपयोगी पडते याचे रोकडे दर्शन टिळक, गांधी व विनोबा यांच्या जीवनात होते. अगदी व्यवहारी विचार केला तरी कत्तल व कायदा न वापरता भूदान यात्रेत गरिबांसाठी विनोबांनी रोज तीनशे एकर जमीन सरकारकडे जमा केली. याची किंमत टीकाकारांनी काढावी. ‘गीताई’च्या २६१ आवृत्त्या निघाल्या असून एकूण ४० लाख प्रतींची विक्री झाली आहे. विनोबांची अन्य पुस्तकेही जाहिरातीविना लाखोंनी खपतात. केवळ गीताईच्या स्वामित्वधनावर विनोबा कोटय़धीश झाले असते. पण हा आचार्य ‘कांचनमुक्त’ होता. कारण तो गीता आचरणात आणत होता.

No comments:
Post a Comment