Wednesday, May 16, 2018

अधिकमास

अधिकमासाविषयी संपुर्ण माहिती...

दिनांक १६/०५/२०१८ रोज बुधवार पासुन अधिक
ज्येष्ठ मास आरंभ...

आजच्या तरुणाईला अधिक महिन्यासंबंधीची, त्यामागच्या तर्कशुद्ध मांडणीची माहिती करून देणे आणि त्यानिमित्ताने आपल्या पूर्वजांनी खगोलीय घटना आणि दैनंदिन जीवन यांची सांगड किती कल्पकतेने घातली होती हे लक्षात आणून देण्याचा हा प्रयत्न.

आपल्याला माहित असेल की, एका वर्षात दोन अयने होतात, सहा ऋतू होतात, आणि बारा चांद्रमास होतात.

प्रत्येक चांद्रमासात रवीची संक्रांत असते. त्यावरून चांद्रमासांची नावे पडली आहेत.

मेषगे रवि संक्रांति: शशीमासे भवति तत्‌ चैत्रम्‌ !
एवं वैशाखाद्या: वृषादि संक्रांत योगेन !!

असे सूत्र आहे.

ज्या चांद्रमासात मेष संक्रांत होते तो चैत्र महिना, वृषभ संक्रांत होते तो वैशाख या प्रमाणे बारा महिने होतात.

चांद्रमास २९*१/४ दिवसांचा असतो आणि चांद्रवर्ष ३५४ दिवसांचे असते. ज्या चांद्रमासात रविची संक्रांत होत नाही, तो अधिक महिना . त्यास पुढील महिन्याचे नाव असते.

अधिक महिना साधारण ३२ महिन्यांनी येतो.

सूर्याभोवती पृथ्वीच्या एका भ्रमणास ३६५*१/४ दिवस लागतात. अश्विनी नक्षत्राच्या विशिष्ठ तार्‍यापासून निघून त्याच ता‍यापर्यंत सूर्य येण्यास ३६५*१/४ दिवसांचा काळ लागतो. ते सौरवर्ष होय.

सौरवर्ष व चांद्रवर्ष यांत दरवर्षी ११*१/४ दिवसांचे अंतर पडते. ते अधिक महिन्याने पुन: पूर्ववत होते.

अशा रितीने सौरवर्ष व चांद्रवर्ष यांचा आपल्या पंचांगात मेळ घातलेला आहे. तो धार्मिक कृत्त्यास पोषक आहे. योग, पर्व, शुभाशुभ दिवस, अधिक मास त्याच्यामुळेच होतात.

अधिक मास ( मल मास)-

चांद्रो मासो ही असंक्रांतो मलमास: प्रकीर्तित: !

ज्या चांद्र मासात रविची संक्रांत होत नाही तो अधिक महिना होय. साधारणपणे, फाल्गुन ते अश्विन हे महीनेच अधिक मास येतात.

कार्तिक, मार्गशीर्ष आणि पौष हे महिनेच गणिताने क्षय मास म्हणून येऊ शकतात.

क्षय मासात रवीच्या दोन संक्रांती होतात. त्यामुळे दोन्ही महिन्यांची नावे त्यास असतात.

कार्तिक, मार्गशीर्ष व पौष महिन्यात रविची गती (पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची)जास्त म्हणजे ६१ कला असल्याने गणिताने क्षय मास येतो. तो १९ वर्षांनी तर कधी ११९ वर्षांनी अथवा १४१ वर्षांनी येतो.

माघ मास हा कधीही अधिक किंवा क्षय मास होत नाही.

पृथ्वीवर होणारे ऋतुबदल हे सूर्यामुळे होत असल्यामुळे सौर कालगणना महत्वाची ठरते. पण त्याचवेळी हेही खरे आहे की सूर्याच्या स्थानबदलामुळे होणारे बदल सहज लक्षात येत नाहीत. त्यामुळे दैनंदिन जीवनचर्या ठरवताना सूर्यामधले बदल नोंदवून कालगणना करता येत नाही. चंद्राचा आकार आणि जागेतला बदल सहज नोंदवता येतो. त्यामुळे दैनंदिन व्यवहाराकरता चंद्र उपयोगी ठरतो. हे लक्षात घेऊन जगभरातील अनेक संस्कृतींमधून दैनिक व्यवहाराकरता चांद्र तर वार्षिक व्यवहाराकरता सौर कॅलेंडर वापरले जाते. अशा प्रकारच्या कॅलेंडरला चांद्रसौर कॅलेंडर म्हणतात.

या दोन्ही कॅलेंडर मध्ये कालगणनेत तफावत येऊ नये याकरता काही सुधारणा कराव्या लागतात. पृथ्वीची सूर्याभोवतीची एक फेरी म्हणजेच ३६५ दिवस ५ तास ४८ मी ४३ सेकंदांनी पूर्ण होते. व्यवहाराच्या सोयीकरता आपण ३६५ दिवसांनी नवे वर्ष सुरू करतो. दर चार वर्षांनी येणारे वर्ष एक वाढीव दिवस घेऊन ३६६ दिवसांचे ‘लीप वर्ष’म्हणून स्वीकारतो. पृथ्वीभोवतीची चंद्राची एक फेरी म्हणजे ‘चांद्रमास’. एक वर्षाच्या कालावधीत १२ चांद्रमास पूर्ण होतात. यालाच चांद्रवर्ष म्हणतात. चांद्रमास हा प्रतिपदा ते अमावास्या असा २९.५ दिवसांचा असतो. त्यामुळे चांद्रवर्ष हे (२९.५ x १२ = ३५४) दिवसांचे होते. याचा अर्थ चांद्रवर्ष हे सौरवर्षापेक्षा ११ दिवसांनी लहान असते. हा फरक दरवर्षी वाढत राहू नये याकरता चांद्रवर्षामध्ये ठराविक कालावधीनंतर एक महिना वाढीव म्हणजेच ‘अधिक’ घेतला जातो आणि दोन्ही कॅलेंडर एकमेकांना जोडून घेतली जातात.

* चांद्रमासाचे गणिती नाते

इ.स.पूर्व ४३३ मध्ये मेटोनने सौरवर्ष आणि चांद्रमास यांचे गणिती नाते शोधूले. त्यानुसार १९ सौरवर्ष आणि २३५ चांद्रमास यांचे दिवस साधारण सारखे येतात. याचा वापर करून त्याने १९ वर्षांचे एक चक्र सुचवले, ज्यात १२ वर्षे १२ चांद्रमासांची तर उरलेली ७ वर्षे १३ चांद्रमासांची होती. १३ चांद मासांची ७ वर्षे निश्चित करण्यात आली होती. म्हणजेच या ७ वर्षांत अधिक महिना घेतला जात होता. ही पद्धत इ.स. पूर्व ४६ पर्यंत सुरू होती.

ज्यू कॅलेंडरमध्ये आजही साधारण अशीच रचना आहे. बुद्धिस्ट कॅलेंडर थायलंड, म्यानमार, कंबोडिया, लाओस, श्रीलंका या देशांत वापरले जाते. यामध्ये रचना थोडी वेगळी आहे. यातला पहिला चांद्रमास २९ त्यापुढचा ३०, आणि पुढे २९, ३० हा क्रम सुरू रहातो. अधिक मास घेताना एक अधिक दिवसही घेतला जातो. कोणत्या वर्षी अधिक मास घ्यायचा हे निश्चित असते.

हिंदू अधिक मास

हा अधिक मास घेण्याची पद्धत पुर्णपणे खगोलशास्त्रीय आहे. या खगोलीय घटनेवर माणसांचे नियंत्रण नसते. त्यामुळे या पद्धतीने अधिक मास घेताना चूक होण्याची शक्यता खूपच कमी होते. त्यामध्ये माणूस ढवळाढवळ करू शकत नाही.

पृथ्वीवरून पहाताना सूर्य दररोज सरासरी एक अंश पुढे सरकल्यासारखा वाटतो. म्हणजेच दर ३० दिवसांनी तो ३० अंशांची एक रास पुढे सरकतो. सूर्याच्या या रास बदलण्याला ‘सूर्यसंक्रांत’अथवा ‘सूर्य संक्रमण’असे म्हणतात. हा कालावधी किमान २९ दिवस १० तास ४८ मिनिटे ते कमाल ३१ दिवस १० तास ४८ मिनिटे एवढा असू शकतो. चांद्रमास हा शुद्ध प्रतिपदेला सुरू होऊन अमावास्येला संपतो. चांद्रमास किमान २९ दिवस ५ तास ४४ मिनिटे ते कमाल २९ दिवस १९ तास ३६ मिनिटे असतो. या कालावधीत एक तरी सूर्यसंक्रांत होते. यावरून हे लक्षात येते की चांद्रमास हा सूर्यमासापेक्षा नेहमी लहान असतो. याचा परिणाम म्हणून कधीतरी अशी स्थिती येते की एखाद्या चांद्रमासात एकही सूर्यसंक्रांत होत नाही. या चांद्रमासाला ‘असंक्रातीमास’ म्हणजेच ‘अधिक मास’म्हटले जाते.

या महिन्याचा स्वामी मुरलीधर श्रीकृष्ण, भगवान विष्णु, पुरुषोत्तम (या मासास पुरुषोत्तम मास असेही म्हणतात )

म्हणूनच या महिन्यात विशेषकरून श्रीकृष्णाची भक्ती, पूजा अर्चा करतात, तीर्थस्नान, उपवास, व्रत, नियम आदीमुळे सुखशांती, संसारसुख मिळते.

अधिकमासात करावयाची व्रते व त्यासंबंधी नियम

१. या महिन्यात पहाटे लवकर उठून थंड पाण्याने स्नान करावे. अंगाला सुगंधी उटी लावावी. नदीवर अथवा तीर्थाच्या ठिकाणी स्नानादी धार्मिक कृत्ये करावीत. मन निर्मळ ठेवावे. या महिन्यात आवळीच्या झाडाखालील स्नानाला विशेष महत्व आहे.

स्नानानंतर म्हणावयाचा मंत्र

गोवर्धनधरं वंदे गोपालं गोपरूपिणम् ।

गोकुलोत्सवमीशानं गोविंदं गोपिकाप्रियम् ॥

भक्तिर्भवति गोविंदे पुत्रपौत्रविवर्धिनी ।

अकीर्तिक्षयमाप्नोति सत्कीर्तिर्वधते चिरम् ॥

२. या मासात शक्यतो एक वेळेसच अन्नग्रहण करावे. जेवताना मौन पाळावे.

३. अधिक महिन्यात रोज देवाजवळ दिवा लावावा आणि महिन्याच्या शेवटी तो ब्राह्मणाला दान द्यावा.

४. या महिन्यात आपल्याला आवडणार्‍या वस्तूचा त्याग करावा.

( उदा. एखादे फळ अथवा एखाद्य रंगाचे वस्त्र वगैरे. )

५. या महिन्यातील दानाचे महत्व अनन्यसाधारण आहे.

हिंदू धर्मात मुलगी - जावयाला लक्ष्मीनारायणाचा जोडा मानतात. म्हणून जावयाला तुपात तळलेले तेहतीसच्या पटीत अनारसे देतात. एका चांदीच्या अथवा तांब्याच्या ताम्हणात अनारसे ठेवून त्यावर तांब्याचा दिवा ठेवून तो लावून जावयाला देतात. (अनारशा ऐवजी बत्तासे, म्हैसूरपाक, वगैरे जाळीदार पदार्थ द्यावयाचे असतात.) या महिन्यात नारळ, सुपार्‍या, फळे यासारख्या वस्तू सुद्धा तेहतीसच्या पटीत घेऊन दान करतात.

या महिन्यात पुरणाचे दिंड करून इष्ट मित्रांना, नातेवाईकांना भोजन देतात (या दिंडांना धोंडे सुद्धा म्हणतात यावरुन या महिन्यास 'धोंडे महिना' सुद्धा म्हणतात.)

रोज गाईला पूरण पोळीचा घास द्यावा.

महिनाभर सतत नामस्मरण करावे - यात कुलदैवताचे नामस्मरण सर्वश्रेष्ठ.

श्री नारायण - श्रीकृष्णाचे स्मरण करावे.

*अपूपदानाचा संकल्प -

ममत्रयस्त्रिंशद्देवतात्मकविष्णुरूपी सहस्त्रांशु श्रीपुरुषोत्तम प्रीतिद्वारा निखिलपापप्रशमपूर्वं पुत्रपौत्रयुत धनधान्यक्षेमसमृद्धि लोकद्वय सुख हेतु पृथ्वीदान फलप्राप्त्यापूपच्छिद्रसमसंख्यवर्षसहस्त्रवधी स्वर्लोकनिवासादिकल्पोक्तफलसिद्ध्यर्थं मलमासप्रयुक्तं अपूपदानं करिष्ये ।

याप्रमाणे संकल्प करून दानवस्तूचे पूजन करावे. नंतर ब्राह्मणाचे पूजन करून पुढील श्लोकांनी त्यांची प्रार्थना करावी,

विष्णुरुपी सहस्त्रांशु: सर्वपापप्रणाशन: ।

अपूपान्न प्रदानेन मम पापं व्यपोहतु ॥

नारायण जगद्वीज भास्कर प्रतिरूपक ।

व्रतेनानेन पुत्रांश्च संपदं चापि वर्धय ॥

यस्य हस्ते गदाचक्रे गरुडो यस्य वाहनं ।

शंख: करतले यस्य स मे विष्णु: प्रसीदतु ॥

कलाकाष्ठादिरूपेण निमेषघटिकादिना ।

यो वंचयति भूतानि तस्मै कालात्मने नम: ॥

कुरुक्षेत्रमयं देश: काल: पर्वद्विजो हरि: ।

पृथ्वीसममिमं दानं गृहाण पुरुषोत्तम ॥

मलानांच विशुद्ध्द्यर्ह्तं तव दास्यामि भास्कर ।

इदं सोपस्करं त्रयस्त्रिंशदपूपदानं सदक्षिणाकं सतांबूलं

* पोथीवाचन/सत्संग - अधिक महिन्याची पोथी शुद्ध सात्विक मनाने रोज एक अध्याय याप्रमाणे महिनाभर वाचून शेवटी उद्यापनाच्या वेळी ब्राह्मणाला दान द्यावी. पोथी वाचन न जमल्यास निदान श्रवण तरी करावी. त्यामुळे भगवान पुरुषोत्तम श्रीनारायण प्रसन्न होतो आणि भक्तांचे कल्याण करतो.

* अधिक मासात केलेल्या पूजेचे तीर्थयात्रेचे फळ अनेक पटींनी मिळते. स्त्रीयांना अखंड सौभाग्याचा व पूत्रपौत्रांचा लाभ होतो,

* अधिकमासात उपोषणाला विशेष महत्व आहे.

अधिकमासात श्रीपुरुषोत्तमप्रीत्यर्थ महिनाभर उपोषण, अयाचित भोजन, नक्तभोजन अथवा एकभुक्त रहावे. अशक्त व्यक्तीने या चार प्रकारांपैकी एक प्रकार निदान तीन दिवस अथवा एक दिवस तरी आचरणात आणावा. संपूर्ण मासात दान करणे शक्य नसेल, त्याने शुक्ल आणि कृष्ण द्वादशी, पौर्णिमा, कृष्ण अष्टमी, नवमी, चतुर्दशी, अमावास्या या तिथी आणि व्यतिपात, वैधृति या योगांवर विशेष दानधर्म करावा, असे शास्त्रात सांगितले आहे.

अ. या मासात प्रतिदिन श्री पुरुषोत्तम कृष्णाची पूजा आणि नामजप करावा. अखंड अनुसंधानात रहाण्याचा प्रयत्न करावा.

आ. प्रतिदिन एकच वेळ भोजन करावे. जेवतांना बोलू नये. त्यामुळे आत्मबळ वाढते. मौन भोजन केल्याने पापक्षालन होते.

इ. तीर्थस्नान करावे. किमान एक दिवस गंगास्नान केल्यास सर्व पापांची निवृत्ती होते.

ई. दीपदान करावे. देवापुढे अखंड दीप लावल्यास लक्ष्मीप्राप्ती होते.

उ. तीर्थयात्रा करावी. देवदर्शन करावे.

ऊ. तांबूलदान (विडा-दक्षिणा) करावे. महिनाभर तांबूलदान दिल्यास सौभाग्यप्राप्ती होते.

ए. गोपूजन करावे.

अधिकमासात कोणती कामे करावीत ?

अधिक मासात नित्य आणि नैमित्तिक कर्मे करावीत. जी केल्यावाचून गती नाही, अशी कर्मे करावीत. ज्वरशांती, पर्जन्येष्टी इत्यादी नेहमीची काम्यकर्मे करावीत. या मासात देवाची पुनःप्रतिष्ठा करता येते. ग्रहणश्राद्ध, जातकर्म, नामकर्म, अन्नप्राशन हे संस्कार करावेत. मन्वादि आणि युगादि संबंधित श्राद्धादि कृत्ये करावीत. तीर्थश्राद्ध, दर्शश्राद्ध आणि नित्यश्राद्ध करावे.

अधिक मासात कोणती कामे करू नयेत ?

काम्यकर्माचा आरंभ आणि समाप्ती करू नये. महादाने, अपूर्व देवदर्शन, गृहारंभ, वास्तूशांती, संन्यासग्रहण, नूतनव्रतग्रहणदीक्षा, विवाह, उपनयन, चौल, देवप्रतिष्ठा करू नये.

पौराणिक कथा माहिती....

या मासात मंगल कार्ये, काम्य व्रते इत्यादींचा त्याग करतात. त्यामुळे या मासास इहलोकात अनेक निर्भत्सनांना सामोरे जावे लागले. त्यामुळे व्यथित होऊन तो मास वैकुंठात वि़ष्णूकडे आपले गाऱ्हाणे घेऊन गेला. विष्णूने त्यास गोकुळात कृष्णाकडे पाठविले. तो कृष्णास शरण गेला. कृष्णाने त्या मासाचे नाव बदलून 'पुरुषोत्तम मास' असे ठेविले. या मासात जे श्रद्धाभक्तियुक्त राहून उपासना, कर्मे, व्रते व दाने करतील त्यांना पुण्य मिळेल असेही त्यास वचन दिले.

दिनांक १३/०६/२०१८ रोज बुधवार पर्यंत अधिक
ज्येष्ठ मास समाप्त होतो.

2 comments: