Showing posts with label Marathi Lokkala. Show all posts
Showing posts with label Marathi Lokkala. Show all posts

Tuesday, October 7, 2014

भोंडल्याची ( हादग्याची ) गाणी - १३

आड बाई आडवणी, आडाचं पाणी काढवणी
आडात होती देवळी, देवळीत होता खराटा
आमचा हादगा मराठा।।

आड बाई आडवणी आडाचं पाणी काढवणी
आडात होती देवळी देवळीत होता साबण
आमचा हादगा बामण ।। 

अशाप्रकारे देवळी तून वेगवेगळ्या वस्तू काढून गाणे पूर्ण व्हायचे. ह्याच गाण्याचे दुसरे रूप आहे ते भोंडल्याची वेळ दर्शविणारे. 
आड बाई आडोणी, आडाचं पाणी काढोणी।
आडात पडली सुपारी, आमचा भोंडला दुपारी ।।

आड बाई आडोणी आडाचं पाणी काढोणी।
आडात पडली मासोळी आमचा भोंडला संध्याकाळी ।।

आड बाई आडोणी आडाचं पाणी काढोणी।
आडात पडली कात्री आमचा भोंडला रात्री ।।

आड बाई आडोणी आडाचं पाणी काढोणी।
आडात पडला शिंपला आमचा भोंडला संपला ।।

भोंडल्याची ही माहिती आणि गाणी तुम्हा सर्वांना आवडली असतील अशी आशा आहे.
भोंडल्याचे हे व्रत आजच्या काळात मागे पडले आहे, खेळ वा गंमत म्हणून प्रत्येकाने दर नवरात्रीत एकदा तरी हे व्रत करावे, अशाने आपला वारसा मागे पडणार नाही.


Monday, October 6, 2014

भोंडल्याची ( हादग्याची ) गाणी - १२

हस्त हा जीवनाचा राजा
पावतो जनांचिया काजा
तयासी नमस्कार माझा ।।

दहा मधले आठ गेले
( पावसाची नक्षत्रे दहा, त्या पैकी मृग, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, मघा, पुर्वा, उत्तरा मग हस्त यायचं )
हस्ताची ही पाळी आली
म्हणोनी त्याने गंमत केली ।।

ज्याच्या योगे झाला चिखल
त्याही चिखलात लावल्या केळी ।।

एकेक केळ मोठालं
भोंडल्या देवा वाहिलं ।।

============================================

भोपळ्याच फुल बाई फुलरंजना
माळ्याचा माळ बाई माळरंजना
माळ्याची सांडली भिकबाळी
हुड्कुन दे पण हुड्केना
हुडकली पण सापडेना

शि़क्यावरच लोणी वाहात जा
ताट वाटी झळकत जा
ताट वाटी झळकली
पंगतीत जावून बसली

सर्प म्हणे मी एकुला
दारी आंबा पिकुला
दारी आंब्याची फोड ग
खिरापतीला काय ग ?

Sunday, October 5, 2014

भोंडल्याची ( हादग्याची ) गाणी - ११

माझ्या सुंद्रीचं लगीन
वराडी कोण कोण येणार, माझ्या सुंद्रीचं लगीन

भाऊ म्हणे मी भाऊ, आणीन नवरा पाहून
माझ्या सुंद्रीचं लगीन

बहिण म्हणे मी बहीण, करवली मी होईन
माझ्या सुंद्रीचं लगीन

बाप म्हणे मी बाप, खर्चीन हुंडा लाख
माझ्या सुंद्रीचं लगीन

आई म्हणे मी आई, करीन लग्नात घाई
माझ्या सुंद्रीचं लगीन

चुलता म्हणे मी चुलता, येईन जेवणापुरता
माझ्या सुंद्रीचं लगीन

चुलती म्हणे मी चुलती, येईन वरातीपुरती
माझ्या सुंद्रीचं लगीन

मावसा म्हणे मी मावसा, बसेन दागिन्यासरसा
माझ्या सुंद्रीचं लगीन

मावशी म्हणे मी मावशी, फराळाचे माझ्यापाशी
माझ्या सुंद्रीचं लगीन

मामा म्हणे मी मामा, येईन सर्व कामा
माझ्या सुंद्रीचं लगीन

भट म्हणे मी भट, धरीन अंतरपाट
माझ्या सुंद्रीचं लगीन

भटीण म्हणे मी भटीण, सगळ्याच पोळ्या लाटीन
माझ्या सुंद्रीचं लगीन

(साभार : मायबोली वेबजाळ)

Saturday, October 4, 2014

भोंडल्याची ( हादग्याची ) गाणी - १०

सासरच्या जाच सांगणाऱ्या ह्या मुली सासरची बढाई सुद्धा तेवढीच रंगवून सांगायच्या.

भुलाबाई भुलाबाई सासरे कसे गं सासरे कसे?
कचेरीत बसले हे वकील जसे गं वकील जसे ॥१॥

भुलाबाई भुलाबाई सासू कशा गं सासू कशा?
कपाळभर कुंकू पाटलीन जशा गं पाटलीन जशा ॥२॥

भुलाबाई भुलाबाई पुतणे कसे गं पुतणे कसे?
हातामध्ये घडी मास्तर जसे गं मास्तर जसे ॥३॥

भुलाबाई भुलाबाई जाऊ कशी गं जाऊ कशी?
हातामध्ये लाटणं स्वयंपाकीण जशी गं स्वयंपाकीण जशी ॥४॥

भुलाबाई भुलाबाई दीर कसे गं दीर कसे?
डोळ्यावर गॉगल डॉक्टर जसे गं डॉक्टर जसे ॥५॥

भुलाबाई भुलाबाई नणंद कशी गं नणंद कशी?
हातामध्ये घडी मास्तरीन जशी गं मास्तरीन जशी ॥६॥

भुलाबाई भुलाबाई पती कसे गं पती कसे?
जटातून गंगा वाहे शंकरजी जसे गं शंकरजी जसे ॥७॥

भुलाबाई भुलाबाई आपण कशा गं आपण कशा?
शंकराच्या मांडीवर पार्वती जशा गं पार्वती जशा ॥८॥

भुलाबाई भुलाबाई मुल कसे गं मुल कसे?
वाकड्या सोंडाचे गणपती जसे गं गणपती जसे ॥९॥

(साभार : मायबोली वेबजाळ - संकलन : गंगाधर मुटे)

Friday, October 3, 2014

भोंडल्याची ( हादग्याची ) गाणी - ९

श्रीकांता कमलाकांता असं कसं झालं
असं कसं वेडं माझ्या कपाळी आलं

वेडयाच्या बायकोने केले होते लाडू
तिकडून आला वेडा त्याने निरखून पाहिले
चेंडू चेंडु म्हणून त्याने खेळायला घेतले ॥१॥

श्रीकांता कमलाकांता असं कसं झालं
असं कसं वेडं माझ्या कपाळी आलं

वेडयाच्या बायकोने केला होता चिवडा
तिकडून आला वेडा त्याने निरखून पाहिला
केरकचरा म्हणून त्याने फेकून दिला ॥२॥

श्रीकांता कमलाकांता असं कसं झालं
असं कसं वेडं माझ्या कपाळी आलं
 
वेडयाच्या बायकोने केल्या होत्या करंज्या
तिकडून आला वेडा त्याने निरखून पाहिल्या
होडया होडया म्हणून त्याने पाण्यात सोडल्या ॥३॥
 
श्रीकांता कमलाकांता असं कसं झालं
असं कसं वेडं माझ्या कपाळी आलं

वेडयाच्या बायकोने केल्या होत्या चकली
तिकडून आला वेडा त्याने निरखून पाहिली
चक्रं चक्रं म्हणून त्याने फेकून दिली ॥४॥

श्रीकांता कमलाकांता असं कसं झालं
असं कसं वेडं माझ्या कपाळी आलं

वेडयाच्या बायकोने केले होते श्रीखंड
तिकडून आला वेडा त्याने निरखून पाहिले
स्नो स्नो म्हणून त्याने अंगाला फासले ॥५॥

श्रीकांता कमलाकांता असं कसं झालं
असं कसं वेडं माझ्या कपाळी आलं
 
वेडयाच्या बायकोने केल्या होत्या शेवया
तिकडून आला वेडा त्याने निरखून पाहिल्या
अळ्या अळ्या म्हणून त्याने टाकून दिल्या ॥६॥
 
श्रीकांता कमलाकांता असं कसं झालं
असं कसं वेडं माझ्या कपाळी आलं
 
वेडयाची बायको एकदा पलंगावर झोपली
तिकडून आला वेडा त्याने निरखून पाहिली
मेली मेली म्हणून त्याने जाळून टाकली ॥७॥

Thursday, October 2, 2014

भोंडल्याची ( हादग्याची ) गाणी - ८

खालील गाण्यात यमक साधणारे शब्द शोधून हजर असलेल्या मुलींची / मुलांची नावे गुंफतात.


अडकित जाऊ खिडकीत जाउ खिडकीत होता बत्ता
भुलाबाईला लेक झाला नाव ठेवा दत्ता ॥१॥

अडकित जाऊ खिडकीत जाउ खिडकीत होता वाटी
भुलोजीला लेक झाली नाव ठेवा चाटी ॥२॥

अडकित जाऊ खिडकीत जाउ खिडकीत होती भाकर
भुलाबाईला लेक झाला नाव ठेवा प्रभाकर ॥३॥

अडकित जाऊ खिडकीत जाउ खिडकीत होता चेंडू
भुलोजीला लेक झाला नाव ठेवा बंडू  ॥४॥

अडकित जाऊ खिडकीत जाउ खिडकीत होता चष्मा
भुलाबाईला लेक झाली नाव ठेवा सुषमा / रेश्मा  ॥५॥


अडकित जाऊ खिडकीत जाउ खिडकीत होता रुपया बंधा
भुलोजीला लेक झाली नाव ठेवा चंदा  ॥६॥

अडकीत जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत ठेवला अडकित्ता
भुलाबाईला मुलगी झाली, नाव ठेवलं स्मिता ॥७॥

अडकित जाऊ खिडकीत जाउ खिडकीत होता पाटा
भुलोजीला लेक झाला साखर खडी वाटा,
बाणा बाई बाणा, स्वदेशी बाणा, गाणे संपले खीरापत आणा ॥५॥

================================================



काळी चंद्रकळा नेसु कशी?
गळ्यात हार घालू कशी?

ओटीवर मामांजी जाऊ कशी?
दमडिचं तेल आणु कशी?

दमडीचं तेल आणलं
सासुबाईंचं न्हाणं झालं

वन्सन्ची वेणी झाली
भावोजींची दाढी झाली

मामंजींची शेन्डी झाली
उरलेलं तेल झाकुन ठेवलं

लांडोरीचा पाय लागला
वेशीबाहेर ओघळ गेला

त्यात हत्ती वाहून गेला
सासुबाई सासुबाई अन्याय झाला

दुध्-भात जेवायला वाढा
माझं उष्ट तुम्हीच काढा.…


Wednesday, October 1, 2014

भोंडल्याची ( हादग्याची ) गाणी - ७

सासरी नांदत असलेल्या मुलीला सणासुदीच्या निमित्ताने माहेरी जायची परवानगी मिळत असे.
खालील गाण्यात वडील मुलीला माहेरी नेण्यासाठी येतात आणि आनंदलेली मुलगी लगेच तयारही होते  पण सासरच्या मंडळींची परवानगी हवी ना… आणि ती परवानगी लगेच मिळायची नाही, कधी कधी जायलाही मिळायचे नाही. सासरच्या मंडळींना ही घराची घडी विस्कळू नये म्हणून काळजी घायची असायची; त्यामुळे भीत - भीत परवानगी मागणारी सून आणि नाकारणारी सासरची मंडळी खालील गाण्यांमध्ये अधोरेखित होतात.

सासूबाई, सासूबाई मला आलं मूळ
जाऊ का मी आपुल्या माहेरा माहेरा ॥ ध्रु.॥
कार्ल्याचा वेल लाव गं सुने लाव गं सुने
मग जा आपुल्या माहेरा माहेरा
कार्ल्याचा वेल लावला हो सासुबाई लावला हो सासुबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा ॥१॥

कार्ल्याचा वेल वाढू दे ग सुने वाढू दे ग सुने
मग जा तू आपुल्या माहेरा माहेरा
कार्ल्याचा वेल वाढला हो सासुबाई वाढला हो सासुबाई
आता तरी जाऊ का मी माहेरा माहेरा ॥२॥

कार्ल्याला फूल येउ दे गं सुने येउ दे गं सुने
मग जा आपुल्या माहेरा माहेरा
कार्ल्याला फूल आलं हो सासुबाई आलं हो सासुबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा ॥३॥

कार्ल्याला फळ येऊ दे गं सुने येउ दे गं सुने
मग जा आपुल्या माहेरा माहेरा
कार्ल्याला फळ आलं हो सासुबाई आलं हो सासुबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा ॥४॥

कार्ल्याची भाजी कर गं सुने कर गं सुने
मग जा आपुल्या माहेरा माहेरा
कार्ल्याची भाजी केली हो सासुबाई केली हो सासुबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा ॥५॥

कार्ल्याची भाजी खा गं सुने खा गं सुने
मग जा आपुल्या माहेरा माहेरा
कार्ल्याची भाजी खाल्ली हो सासुबाई खाल्ली हो सासुबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा ॥६॥

आपलं उष्टं काढ ग सुने काढ ग सुने
मग जा तू आपल्या माहेरा माहेरा
माझं उष्टं काढलं हो सासुबाई काढलं हो सासुबाई
आता तरी जाऊ का मी माहेरा माहेरा

आणा फणी घाला वेणी जाऊ द्या राणी माहेरा माहेरा
आणली फणी घातली वेणी गेली राणी माहेरा माहेरा ॥७॥

=========================================

सोन्याचा करंडा बाई मोत्याचं झाकण
तिथं आमच्या सासुबाई कुंकु लावीत होत्या
सासुबाई सासुबाई मला आलं मूळ
मला काय पुसतीस बरीच दिसतीस
पुस जा आपल्या सासर्‍याला, सासर्‍याला ॥१॥
सोन्याची दऊत बाई मोत्याची लेखणी
तिथं आमचे मामंजी लिहीत होते
मामंजी मामंजी मला आल मुळ
मला काय पुसतीस बरीच दिसतीस
पुस जा आपल्या जावेला, जावेला ॥२॥
सोन्याचा डेरा बाई मोत्याची रवी
तिथं आमच्या जाऊबाई ताक करीत होत्या
जाऊबाई जाऊबाई मला आलं मूळ
मला काय पुसतीस बरिच दिसतीस
पुस जा आपल्या दीराला, दीराला ॥३॥
सोन्याची विटी आणि मोत्याचा चेंडू
तिथं आमचे भाऊजी खेळत होते
भावोजी भावोजी मला आलं मूळ
मला काय पुसतीस बरीच दिसतीस
पुस जा आपुल्या नणंदेला, नणंदेला ॥४॥
सोन्याची सुपली बाई मोत्यांनी गुंफीली
तिथं आमच्या वन्स पाखडत होत्या
वन्सबाई वन्सबाई मला आलं मूळ
मला काय पुसतीस बरीच दिसतीस
पुस ज्या आपुल्या पतीला, पतीला ॥५॥
सोन्याच पलंग बाई मोत्याचे खूर
तिथं आमचे पतिराज झोपले होते
पतिराज पतिराज मला आलं मूळ
आणा फणी घाला वेणी जाऊ दे राणी माहेरा

जाती तशी जाऊ दे, निळ्या घोडीवर बसु दे
निळी घोडी हसली, सखुबाई सुंदर दिसली ॥६॥

Tuesday, September 30, 2014

भोंडल्याची ( हादग्याची ) गाणी - ६

महिला वर्गाची देवावरची श्रद्धा, बाळहट्टापुढे होणारी अगतिकता, घाईत धांदलीत गडबडलेली गोष्ट हुशारीने सावरून घेण्याची हातोटी - हे सगळे ह्या खालील गाण्यांमध्ये दिसून येते.


आज कोण वार बाई । आज कोण वार?
आज आहे सोमवार । शंकराला नमस्कार ।
आज कोण वार बाई । आज कोण वार?
आज आहे मंगळवार । देवीला नमस्कार ।
आज कोण वार बाई । आज कोण वार?
आज आहे बुधवार । बृहस्पतीला नमस्कार ।
आज कोण वार बाई । आज कोण वार?
आज आहे गुरुवार । दत्ताला नमस्कार।
आज कोण वार बाई । आज कोण वार?
आज आहे शुक्रवार । अंबाबाईला नमस्कार ।
आज कोण वार बाई । आज कोण वार?
आज आहे शनिवार । शनिला नमस्कार ।
आज कोण वार बाई । आज कोण वार ?
आज आहे रविवार । सुर्याला नमस्कार ।

==============================================


कृष्ण घालीतो लोळण, आली यशोदा धावून
काय रे मागतोस बाळा, तुला देते मी आणून

आई मला चंद्र दे आणून त्याचा चेंडू दे करुन
असलं रे कसलं मागणं तुझं जगाच्या वेगळं

आई मला विंचू दे आणून त्याची अंगठी दे करुन
असलं रे कसलं मागणं तुझं जगाच्या वेगळं

आई मला साप दे आणून त्याचा चाबूक दे करुन
असलं रे कसलं मागणं तुझं जगाच्या वेगळं

कृष्ण घालीतो लोळण, आली यशोदा धावून


==============================================


हरीच्या नैवेद्याला केली, जिलबी बिघडली
त्यातलं उरलं थोडं पीठं त्याचं केलं थालीपीठं
नेऊनी वाढीलं पानातं

जिलबी बिघडली
त्यातला उरला थोडा पाक त्याचा केला साखरभातं
नेऊनी वाढीला पानातं

जिलबी बिघडली
त्यातलं उरलं थोडं तूप त्याच्या केल्या पुर्‍या छानं
नेऊनी वाढील्या पानातं
हरीच्या नैवेद्याला केली, जिलबी बिघडली. 

Monday, September 29, 2014

भोंडल्याची ( हादग्याची ) गाणी - ५

ह्या सासुरवाशिणी मुली मार ही खायच्या. सासरी मिळणाऱ्या ह्या प्रसादाचे उल्लेख असणारी ही काही गाणी :-


नणंदा भावजया दोघीजणी । घरात नव्हतं तिसरं कोणी ।
'शिंक्यावरचं लोणी । खाल्लं कोणी ?
'मी नाही खाल्लं । वहिनीनं खाल्लं ।
आतां माझा दादा येईल ग । दादाच्या मांडिवर बसेन ॥'
'दादा तुझी बायको चोरटी ।'
'असु दे माझी बायको चोरटी ।'
'घे काठी लाग पाठीं ।'
'घेत नाही काठी । लागत नाही पाठी ।
घरादाराची लक्ष्मी मोठीं ॥'

 ===========================================


'कोथिंबीरी बाई ग, आता कधी येशील ग?'
'आता येईन चैत्रमासी', चैत्रा चैत्रा लौकर ये,
हस्त घालीन हस्ताला, देव बसवीन देव्हारा,
देव्हार्‍याच्या चौकटी, उठता  बसता लाथा बुक्की

============================================



कमळे कमळे दिवा लाव
दिवा गेला वार्‍यानं
कमळीला नेलं चोरानं
चोराच्या हातातुन सुटली
बाजेखाली लपली
सासुबाईंनी देखली
मामांजीनी ठोकली...

Sunday, September 28, 2014

भोंडल्याची ( हादग्याची ) गाणी - ४

सासरकडचे कोणी पाहूणे आले माहेरवासीणीला न्यायला की सासरी जावेसे वाटायचे नाही म्हणून त्यांच्यावर  झिपरे कुत्रे सोडा असे गाणे होते...

अरडी गं बाई परडी, परडी एवढं काय गं
परडी एवढं फूल गं, दारी मूल कोण गं?
दारी मूल सासरा
सासर्‍याने काय आणलं ग बाई ?
सासर्‍यानं आणल्या पाटल्या
पाटल्या मी घेत नाही, सांगा मी येत नाही,
चारी दरवाजे लावा ग बाई, झिप्रं कुत्र सोडा ग बाई ॥१॥

अरडी गं बाई परडी, परडी एवढं काय गं
परडी एवढं फूल गं, दारी मूल कोण गं?
दारी मूल सासू
सासूने काय आणलंय गं?
सासुने आणले गोट
गोट मी घेत नाही, सांगा मी येत नाही,
चारी दरवाजे लावा ग बाई, झिप्रं कुत्र सोडा ग बाई ॥२॥

अरडी गं बाई परडी, परडी एवढं काय गं
परडी एवढं फूल गं, दारी मूल कोण गं?
दारी मूल दीर
दीरानं काय आणलं ग बाई ?
दीरानं आणल्या बांगड्या
बांगड्या मी घेत नाही, सांगा मी येत नाही,
चारी दरवाजे लावा ग बाई, झिप्रं कुत्र सोडा ग बाई ॥३॥

अरडी गं बाई परडी, परडी एवढं काय गं
परडी एवढं फूल गं, दारी मूल कोण गं?
दारी मूल जाऊबाई
जावेनं काय आणलं ग बाई ?
जावेनं आणली नथ
नथ मी घेत नाहीं, सांगा मी येत नाही,
चारी दरवाजे लावा ग बाई, झिप्रं कुत्र सोडा ग बाई ॥४॥


अरडी गं बाई परडी, परडी एवढं काय गं
परडी एवढं फूल गं, दारी मूल कोण गं?
दारी मूल नणंद
नणदेने काय आणलंय गं?
नणदेने आणल्या तोरड्या
तोरड्या मी घेत नाही, सांगा मी येत नाही
चारी दरवाजे लावा गं बाई, झिप्रं कुत्र सोडा ग बाई ॥५॥

असेच सासरकडचे विविध नातेवाईक (सासरा, दीर, जाऊ वगैरे) आणि प्रत्येकाने आणलेले वेगवेगळे दागिने घेऊन अशीच कडवी म्हणायची. सगळ्यात शेवटचे कडवे असे -

अरडी गं बाई परडी, परडी एवढं काय गं
परडी एवढं फूल गं, दारी मूल कोण गं?
दारी मूल नवरा
नवर्‍याने काय आणलंय गं?
नवर्‍याने आणलं मंगळसूत्र
मंगळसूत्र मी घेते, सांगा मी येते
चारी दरवाजे उघडा गं बाई, उघडा गं बाई
झिपर्‍या कुत्र्याला बांधा गं बाई, बांधा गं बाई ॥६॥

=====================================================

नणंद भावजया खेळत होत्या, भावजयीवर आला डाव, भावजय बसली रुसुन,
सासुरवासी सुन रुसुन बसली कैसी, यादवराया, राणी घरासी येईल कैसी ॥१॥
सासरा गेला समजावयाला ।
'ऊठ ऊठ मुली चल ग घरला, माझी दौत लेखणी देतो तुला'
'तुमची दौत लेखणी नको मला । मी नाही यायची तुमच्या घराला'॥२॥

सासु गेलीं समजावयाला ।
'ऊठ ऊठ मुली चल घराला, माझा डेरा रवी देते तुला'
'तुमचा डेरा रवी नको मजला । मी नाही यायची तुमच्या घराला' ॥३॥
दीर गेला समजावयाला ।
'ऊठा ऊठा वहिनी चला घराला, माझा विटी दांडू देतो तुम्हाला'
'तुमचा विटी दांडु नको मला । मी नाही यायची तुमच्या घराला' ॥४॥
जाऊ गेली समजावयाला ।
'ऊठा ऊठा बाई चला घराला, माझा फणी करंडा देते तुम्हाला'
'तुमची फणी करंडा नको मला । मी नाही यायचे तुमच्या घराला' ॥५॥
नणंद गेली समजावयाला ।
'ऊठा ऊठा वहिनी चला घराला, माझा खेळ देते तुम्हाला'
'तुमचा खेळ नको मला । मी नाही यायचे तुमच्या घराला' ॥६॥
पतिदेव गेले समजावयाला ।
'ऊठ ऊठ राणी चल घराला, माझा लाल चाबुक देतो तुला'
'तुमचा लाल चाबूक हवा मला । मी येते तुमच्या घराला' ॥७॥
सासुरवासी सुन घरासी आली ऎसी। यादवराया, राणी घरासी आली ऎसी ॥


Saturday, September 27, 2014

भोंडल्याची ( हादग्याची ) गाणी - ३

भोंडल्याच्या ह्या गाण्यांमधे माहेरचे कोडकौतुक सांगणाऱ्या मुली सासरचा जाच ही सांगायच्या

अक्कण माती चिक्कण माती
अश्शी माती सुरेख बाई
खड्डा तो खणावा ।
अस्सा खड्डा सुरेख बाई
जातं ते रोवावं ।
अस्सं जातं सुरेख बाई
सपीठी दळावी ।
अश्शी सपिठी सुरेख बाई
करंज्या कराव्या ।
अश्श्या करंज्या सुरेख बाई
तबकी ठेवाव्या ।
अस्सं तबक सुरेख बाई
शेल्याने झाकावं ।
अस्सा शेला सुरेख बाई
माहेरी धाडावा ।
अस्सं माहेर सुरेख बाई
खेळाया मिळतं…
अस्सं सासर द्वाड बाई
कोंडोनी मारितं… ।।

================================================

आपल्या माहेरचा बडेजाव सांगणारे हे गाणे :- 

आणा माझ्या सासरचा वैद्य
अंगात अंगरखा फाटकातुटका डोक्याला पागोटं फाटकंतुटकं
हातात काठी जळकं लाकूड
कपाळाला टीळा शेणाचा
तोंडात विडा पादरा कीडा
कसा बाई दिसतो भिका-यावाणी बाई भिका-यावाणी ।।

आणा माझ्या माहेरचा वैद्य
अंगात अंगरखा भरजरी डोक्याला पागोटं भरजरी
हातात काठी चंदनाची
कपाळाला टीळा चंदनाचा
तोंडात विडा केशराचा
कसा बाई दिसतो राजावाणी बाई राजावाणी ।।

=================================================

माहेरचा बडेजाव सांगणाऱ्या स्त्रीला मुद्दाम हिणवणारे हे गाणे :-

'तुझ्या ग माहेरच्यांनी काय काय दिलं ?'
'माझ्या ग माहेरच्यांनी दिल्या मला साखळ्या ।'
'असल्या कसल्या साखळ्या बाई फुलाच्या पाकळ्या ॥'

'तुझ्या ग माहेरच्यांनी काय काय दिलं ?'
'माझ्या ग माहेरच्यांनी दिल्या मला पाटल्या ।'
'असल्या कसल्या पाटल्या बाई हाताल्या दाटल्या ॥'

'तुझ्या ग माहेरच्यांनी काय काय दिलं ?'
'माझ्या ग माहेरच्यांनी दिले मला गोट ।'
'असले कसले गोट बाई हत्तीचे रोट॥'


'तुझ्या ग माहेरच्यांनी काय काय दिलं ?'
'माझ्या ग माहेरच्यांनी दिली मला बिंदी ।'
'असली कसली बिंदी बाई कपाळाला चिंधी ॥'

'तुझ्या ग माहेरच्यांनी काय काय दिलं ?'
'माझा ग माहेरच्यांनी दिला मला हत्ती ।'
'असला कसला हत्ती बाई उधळतो माती ॥'

'तुझ्या ग माहेरच्यांनी काय काय दिलं ?
'माझ्या ग माहेरच्यांनी दिला मला गडी ।'
'असला कसला गडी बाई, मिजास बडी ॥'

'तुझ्या ग माहेरच्यांनी काय काय दिलं ?'
'माझ्या ग माहेरच्यांनी दिली मला बाई ।'
असली कसली बाई तिला रीतच न्हाई ॥'

Friday, September 26, 2014

भोंडल्याची ( हादग्याची ) गाणी - २

भोंडल्याची गाणी आणि उत्सव म्हणजे सासुरवाशिणी स्त्रियांचा किंबहुना लहान वयात लग्न होवून सासरी गेलेल्या मुलींचा मन रमवण्याचा, रोजची दुःखे विसरण्याचा, कल्पना विलासात रमण्याचा सण.
मुलींच्या खेळाची आणि कल्पना विलासाचे प्रतिबिंब दाखवणारी ही काही गाणी :-

एक लिंबु झेलू बाई, दोन लिंबं झेलूं ।
दोन लिंब झेलूं बाई, तीन लिंबं झेलूं ।
तीन लिंबं झेलूं बाई, चार लिंबं झेलू ।
चार लिंब झेलू बाई, पाच लिंबं झेलूं ।
पाचा लिंबांचा पानवडा , माळ घाली हनुमंताला ।
हनुमंताची निळी घोडी. येतां जातां कमळं तोडी ।
कमळाच्या पाठीमागं होती राणी ॥
अगं अगं राणी इथं कुठं पाणी ?
पाणी नव्हे यमुना जमुना,
यमुना जमुनेची बारिक वाळू, तिथं खेळे चिलारि बाळू ।
चिलारि बाळाला भूक लागली ।
सोन्याच्या शिंपेनं दूध पाजीलं, पाटावरच्या घडीवर निजवलं ।
नीज रे चिलारि बाळा, मी तर जाते सोनारवाड्‍या ।
सोनारदादा सोनारभाई, गौरीचे मोती झाले कां नाहीं ?
गौरीच्या घरीं तांब्याच्या चुली, मांडव घातला मखमख पुरी ।
लगीन लागलं सूर्योंदयीं, भोजन झालं आवळीखालीं ।
उष्ट्या पत्रावळी चिंचेखालीं, शेणगोळा आंब्याखालीं ।
पानसुपारी तुळशीवरी, वरात निघाली हत्तीवरी ।


====================================



आला चेंडू, गेला चेंडू, लाल चेंडू झुगारिला ।
आपण चाले हत्ती घोडे, राम चाले पायीं ।
एवढा डोंगर शोधिला, राम कोठें नाहीं ।
राम ग वेचीतो कळ्या, सीता ग गुंफीती जाळ्या ।
आली ग लगीन वेळा, आकाशीं घातिला मंडप ।
मंडप मंडप बसते पोती, पोती पोती तिरुबाई राळा ।
जरतारी घातलं बोहलं, नवरा नवरी बसली पाटीं ।
पोशीन पायी तिरुबाई राळा, तिरुबाई राळा मुंजा बाळा ।
मुंजाबाळाची मुंजक दोरी, तीच दोरी सावध करी ।
सावध सावध सर्वकाळ, सर्वकाळाचा उत्तम दोर ।
दोर बांधा झाडासी, झाड झबका फुल टपका ।
तें बाई फूल तोडावं, बहिणी माथां खोवावं ।
बहिणी तुझे केस ग, मोतीयाचे घोस ग ।
बहिणी तुझी वेणी ग , केतकीची फणी ग ।
बहिणी तुझा भांग ग, पौर्णिमेचा चांद ग ।
बहिणी तुझा खोपा ग, उंदिर घेतो झोपा ग ।

========================================

शिवाजी आमुचा राजा, 
त्याचा तो तोरणा किल्ला ।
किल्ल्यामधे सात विहिरी,
विहिरीमधे सात कमळे ।
एक एक कमळ तोडिलं,
भवानी मातेला अर्पण केलं ।
भवानी माता प्रसन्न झाली,
शिवाजी राजाला तलवार दिली ।
तलवाऽऽरंऽऽ घेऊनी आला,
हिंदूंचाऽऽ राजा तो झाला ।
हिंदुनी त्याचे स्मरण करावे,
हादग्यापुढे गाणे गावें ।। 
हादगा देव मी पूजिते,
सख्यांना बोलाविते ।
हादगा देव मी पूजिते ।।
लवंगा, सुपार्‍या, वेलदोडे,
करून ठेवले विडे,
आणिक दुधाचे दुध पेढे,
वाहून हादग्या पुढे ।।
हादगा देव मी पूजिते
सख्यांना बोलाविते
हादगा देव मी पूजिते ।।

Thursday, September 25, 2014

भोंडल्याची ( हादग्याची ) गाणी - १

भोंडल्याची सुरुवात सहसा खालील गाण्याने होते…. गणेशाला वंदना करून मुली भोंडल्याचा खेळ सुरु करतात.

ऐलमा पैलमा गणेश देवा ।
माझा खेळ मांडुदे करीन तुझी सेवा ।
माझा खेळ मांडिला वेशीच्या दारी,
पारवे घुमती बुरजावरी ।
गुंजवाणि डोळ्याच्या सारविल्या टिका,
आमच्या गावच्या भुलोजी नायका ।
एवि निघा तेवि निघा, कांडा तीळ बाई तांदुळ घ्या ।
आमच्या आया, तुमच्या आया, खातील काय दुधोंडे ।
दुधोंड्याची लागली टाळी, आयुष्य दे रे  बा वनमाळी ।
माळी गेला शेती भाता, पाऊस पडला येता जाता ।
पड पड पावसा थेंबो थेंबी, थेंबो थेंबीच्या आळव्या लोंबी ।
आळव्या तुझी सात कणसं, भोंडल्या तुझी सोळा वर्षं ।
अतुला तुझी सात कणसं, भोंडल्या तुझी सोळा वर्षं ।
अतुला मातुला चरणी घातूला, चरणीचे सोंडे हातपाय खणखणीत गोंडे ।
एक एक गोंडा विसा विसाचा, साडे नांगर नेसायचा ।
नेसा ग नेसा बाहुल्यांनो, वरीस वर्ष पावल्यांनो ॥१॥


काही ठिकाणी गणेश वंदना खालील गाण्याने होते. तसे हे गाणे फार ऐकिवात नाही, पण गाण्याचे शब्द पाहता हे गाणे लोकसंगीताचाच एक नमुना वाटते.
आधी नमुया श्री गणराया
मंगलमुर्ती विघ्न हराया
मंगलमुर्ती उंदरावरी
सत्ता त्याची इंद्रावरी
इंद्र हा स्वर्गीचा राजा ( चाल बदल)
झुलती हत्तीच्या फौजा
वरुण चाकर इंद्राचा
पाऊस पाडील हस्ताचा
पड पड पावसा थेंबोथेंबी
थेंबोथेंबीच्या हळव्या लोंबी
हळव्या लोंबी आणुया, तांदुळ त्याचे कांडुया
मोदक्-लाडु बनवुया
गणरायाला अर्पुया....

Wednesday, September 24, 2014

भोंडला

भोंडला - महाराष्ट्रातील मुलींचे हे एक लौकिक व्रत. याला हादगा / हदगा असेही म्हणतात.

आश्विन महिन्यात हस्त नक्षत्राला सुरवात झाली, कि त्या दिवसापासून पुढे सोळा दिवस किंवा नवरात्राच्या पहिल्या दिवसापासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत मुली भोंडला खेळतात. त्यासाठी घराच्या भिंतीवर सोंडेत माळ धरलेल्या व समोरासमोर तोंड केलेल्या दोन हत्तींचे रंगीत चित्र टांगतात. त्याच्यावर लाकडाची मंडपी टांगून तिला निरनिराळ्या फळांच्या व फुलांच्या माळा घालतात. शिवाय घरोघरी मुली जमिनीवर किंवा पाटावर रांगोळीने किंवा धान्याने हत्ती काढतात. या हत्तीला रांगोळीच्या ठिपक्यांची झूल काढून किंवा त्याच्या अंगावर रंगीबेरंगी फुलांच्या माळा घालून सजवतात. नंतर आसपासच्या मुली एकत्र जमून पाटाभोवती फेर धरतात व भोंडल्याची गाणी गातात. पहिल्या दिवशी एक, दुसर्या दिवशी दोन याप्रमाणे रोज एकेका गाण्याची भर पडून शेवटच्या दिवशी सोळा गाणी म्हणतात. गाणी दिवसेंदिवस जसजशी वाढू लागतात, तसतसा ती म्हणायला अधिक वेळ लागतो. त्यामुळे पुढे पुढे मुली एकमेकींच्या घरी आळीपाळीने जमून गाणी गातात. गाणी संपल्यावर जिच्या घरी भोंडला असतो, ती मुलगी सर्वांना खिरापत वाटते. पण ती वाटण्यापूर्वी इतर मुलींना तो खिरापत ओळखायला सांगतात. त्यावेळी मुलींची होणारी प्रश्नोत्तरे मोठी मनोरंजक असतात. खिरापतीचा पदार्थ रोज वेगळा असतो. काही वेळा वाढत्या गाण्यांप्रमाणे खिरापतीही वाढत्या असतात. अशा रीतीने सोळाव्या दिवशी सोळा खिरापती करतात.

या भोंडल्या प्रमाणे भुलाबाईचा सोहळा असतो. खानदेशात व विदर्भात भुलाबाईचा विशेष प्रचार आहे.
भिल्लीणीचा वेष घेवून भिल्लरूपी शंकराला भुलवायला आलेल्या पार्वतीला भुलाबाई हे नाव पडले आहे. पार्वती भुलाबाई झाली म्हणून शंकराला भुलोबा म्हणू लागले.
भाद्रपद पौर्णिमेला घरोघरी भुलोबा व भुलाबाई या दोघांच्या मातीच्या मूर्ती करून त्या सजवलेल्या मखरात किंवा कोनाड्यात बसवतात आणि कोजागिरी पौर्णिमेला रात्रभर जागवून वद्य प्रतिपदेला त्याचे पाण्यात विसर्जन करतात. दररोज संध्याकाळी मुली भुलाबाईपुढे फेर धरून गाणी म्हणतात व कसली तरी खिरापत करून तिला तिचा नैवेद्य दाखवतात. यांच्या पूजेला शिव - शक्तीची पूजा म्हटले जाते. भुलाबाईचा हा सोहळा भोंडल्याप्रमाणे सोळा दिवस चालतो व आश्विन मासातच होतो. या वेळी वाढत्या दिवसाप्रमाणे गाण्यांचा व खिरापतींचा वाढता क्रम असतो.

मराठी लोकसाहित्यात भोंडला किंवा हदगा याची गाणी अस्सल जुन्या मराठी लोकगीतांचा नमुना म्हणून ओळखली जातात. त्यांच्या चाली अगदी प्राथमिक स्वरूपाच्या असून गाण्यांची मूळची संख्या सोळा आहे. प्रांत परत्वे त्यांत सातांची भर पडली आहे. पण काही ठिकाणी ती सोळाही नाहीत.

आज पासून भोंडला हे सदर आपण रोज पाहू त्यःच्या विविध गाण्यांसह.

Tuesday, April 15, 2014

मुंबईचा पोवाडा


ई. सन १७९० च्या आसपास मल्हारी नावाचा दक्षिणेतील एक मराठा शाहीर मुंबईत आला. मुंबईचे वैभव पाहून याच्या कवीमनावर फार परिणाम झाला, आणि याने दख्खनी बोलीत चार कडव्यांची एक सुंदर लावणी तयार केली.

या लावणीचं कवन खुद्द गवर्नर साहेबांसमोर करण्यात आलं. मुंबईचं इतकं सुंदर आणि विस्तृत वर्णन ऐकून त्यांनी मल्हारी शाहीरास ३०० रु बक्षीस म्हणून दिले. पण देताना शाहीरास परत आपल्या गावी जाण्यास सांगितले. हेतू असा होता की हे विस्तृत वर्णन इंग्रजांच्या शत्रूंच्या, म्हणजेच फ्रेंच आणि मराठे यांच्या, कानी पडू नये.

आपल्यासाठी यां लावणीतील आरमाराच्या वर्णनाचा उतारा इथे देत आहे.

बावडीकुं बंब बांधकर पाणी भेजवता जहाजोमें ||
हजारो आरमार खडी देखत तमासा बंदरमें ||
कांटेसे तोफा चढाकर उतार लेते किल्लेमें ||
पहाडसारिखे जहाज बनाते कारखाना गोदीमें ||
सो हत्तीसें काम ना हुवे सो एक आदमीने करना ||
उसमेंसें जहाज निकल कर बडे पानीमे ले जाना ||२||

मुंबई शहर गुलजार मुंबादेवी है ठिकाणा ||
इंग्रजकी साहेबी चलता उप्पर किल्ला नमुना ||
अजब तऱ्होंका टापु मुंबई जरा है दखनमें ||
शिव शंकर पैगंबर देव रहेते है ते बसतीमें ||

- मुंबईचा पोवाडा. शाहीर मल्हारी. लेखन साल अंदाजे ई. सन १७९०

Wednesday, August 28, 2013

महाराष्ट्रीयन मुलांचे खेळ - 1

आखाडी :-

कोकणातल्या दशावतारी खेळासारखा एक प्रकर. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात याचा प्रचार आहे. शेतीचा हंगाम संपल्यावर आखाडीला सुरुवात होते आणि पुन्हा पावसाळा सुरु होईपर्यंत हे खेळ चालतात. यात सगळ्या जातीचे लोक भाग घेतात. ग्रामीण लोक आखाडीत निरनिराळ्या देवांची सोंगे आणून नाचतात . एखाद्या घराण्यात काही सोंगे वंशपरंपरागत चालू अस्तात. आखाडीतले सोंग मिळणे हा मान समजला जातो . या खेळाला बोहाडा असेही नाव आहे. बोहाडा नाशिक, धुळे भागात खेळला जातो .

ओका बोका :-

लहान मुलांचा एक खेळ. यात दहा-पाच मुले जमिनीवर बसून आपल्या दोन्ही हातांची दाही बोटे जमिनीवर उभी टेकवतात. मग त्या समुदायातला एक मुलगा प्रत्येकाच्या हाताला स्पर्श करीत पुढील गाणे म्हणतो

ओका बोका तीन तडोका ।
लडवा लाठी चंदन काठी ।।
बागमे बगडवा डोले ।
सावनमे करइली फुले ।।
ओ करइली के नांव का ?
इजइल बिजइल,
पानवा फुलवा ढोढिया पचक ।।

हे त्याचे गाणे ठेक्यात चालते. प्रत्येक ठेक्याला तो मुलांच्या एकेका हातावर बोट ठेवीत जातो आणि पाचक शब्द येताच त्या मुलाच्या हातावर मुठ मारून तो हात जमिनी सरपट करतो.


खांब-खांबोळ्या :-

मुलांचा एक खेळ. पुष्कळ खांब असलेल्या जागी हा खेळ खेलतात. या खेळत जितके खांब असतील त्यापेक्षा एक गाडी जास्त घेतात. मग मुले खांब पकडायला धावतात. ज्याला खांब मिळत नाही, त्याच्यावर राज्य येते. मग इतर मुले पळून खांबांची अदलाबदल करीत रह्तात. तसे ते करीत असताना राज्य घेतलेला मुलगा शिताफी करून एखाद्याचा खांब पकडतो. मग, ज्याचा खांब धरला असेल त्याच्यावर राज्य येते.राज्य आलेला मुलगा खांबाला उद्देशून 'खांब-खांबोळ्या, दे रे आंबोळ्या' असे म्हणत राहतो व खेळ सुरु राहतो.


Monday, August 26, 2013

महाराष्ट्रीयन मुलींचे खेळ - 1

कोंबडा :-

कोंबड्याचा खेळ म्हणून मुली एक खेळ खेळतात. यात मुली डाव्या पायाच्या गुडघ्यावर उजवा पाय चढवून उकिडव्या बसतात. दोन्ही तळात जुळवून गुडघ्यावर ठेवतात व कोंबड्यासारख्या उड्या मारता मारता गाणे म्हणतात.
सईबाईचा कोंबडा आला माझ्या दरी,
घालीन चारा, पाजीन पाणी,
हाकालीन वारा बिलमोगरा,
बिलाचे काटे सागर गोटे सासरच्या वाटे कुचकुच काटे,
माहेरच्या वाटे हरिख दाटे.


किकीचे पान :-

महाराष्ट्रातील लहान मुलींचा हा एक खेळ आहे. यात खेळणाऱ्या मुली एकमेकींपासून समान अंतरावर उभ्या रह्तात. नंतर सर्वजणी टाळी वाजवून दोन्ही हातांच्या टिचा कानाच्या बाजूंना लाव्तत. तसे करून त्या पाच किंवा सहा हात पुढे जातात व पुन्हा तितक्याच मागे येतात. हा खेळ खेळताना मुली जे गाणे म्हणतात ते असे-

किकीचे पान बाई की की
सागर मासा सू सू
आल्या ग बाई गुजरणी
कापुस घ्या ग पिंजरणी

केतकीचे पान बाई की की असाही एक दुसऱ्या प्रकारचा खेळ आहे. यात दोन मुली समोरासमोर एक हात डोक्यावर व दुसरा हात कमरेवर ठेवून उभ्या रह्तात. नंतर गिरकी घेवून आपल्या जागांची अदलाबदल करतात. एक बसते व दुसरी उभी रहते. त्या वेळी त्या 'केतकीचे पान बाई की की' हे गाणे म्हणतात.

आंधळी कोशिंबीर :-

लहान  मुला-मुलींचा हा एक खेळ आहे. फार पूर्वी हा खेळ केवळ मुलीच खेळत. आता मुले, मुली एकत्र किंवा वेगळे ही हा खेळ खेळतात.
यात कमीत कमी दहा खेळाडूंची आवश्यकता असते. खेळाडू प्रथम चकतात व एकावर राज्य देतत. राज्य आलेल्या मुलाचे डोळे बांधतात आणि इतर मुले त्याच्या अवतीभोवती पळतात. डोळे बांधून आंधळा झालेला मुलगा ज्याला शिवेल त्याच्यावर राज्य येते. मग त्याचे डोळे बांधून त्याला आंधळा केले जते. पहिल्या डोळे बांधलेल्या मुलाचे डोळे सोडले जातात व तो मुलगा बाकीच्या खेळाडूंप्रमाणे या नव्या आंधळ्या मुलाच्या भोवती पळू लागतो. पळताना कुणालाही मैदानाबाहेर जाता येत नाही, असा नियम असतो.

आपडी थापडी :-

महाराष्ट्रातील लहान मुलींचा हा एक खेळ आहे. मुले एकमेकिंच्या मांडीला मांडी लावून वाटोळी बसतात  आणि हातावर हात उलथे पालथे करीत व डावी उजवीकडे झुलत पुढील गाणे म्हणतात -

आपडी थापडी गुळाची पापडी
धम्मक लाडू तेल काढू
तेलंगीच एकच पान
दोन्ही हाती धरले कान / धर ग बिब्बे हाच कान .

शेवटची ओळ म्हणताच मुले एकदम बाजूच्या मुलीचा कान धरून खूप हसतात. दुसऱ्या कोणी आपला कान पकडू नये म्हणून मुले खूप खबरदारी घेतात .

Sunday, May 6, 2012

Powada on Baji Prabhu Deshpande

चौक १
जयोऽस्तु ते श्रीमहन्‌मंगले शिवास्पदे शुभदे ।
स्वतंत्रते भगवति त्वामहम् यशोयुतां वंदे ॥१॥
स्वतंत्रते भगवती या तुम्ही प्रथम सभेमाजीं ।
आम्ही गातसों श्रीबाजीचा पोवाडा आजी ॥२॥
चितूरगडिंच्या बुरुजानो त्या जोहारासह या ।
प्रतापसिंहा प्रथितविक्रमा या हो या समया ॥३॥
तानाजीच्या पराक्रमासह सिंहगडा येई ।
निगा रखो महाराज रायगड की दौलत आयी ॥४॥
जरिपटका तोलीत धनाजी संताजी या या ।
दिल्लीच्या तक्ताचीं छकलें उधळित भाऊ या ॥५॥
स्वतंत्रतेच्या रणांत मरुनी चिरंजीव झाले ।
या ते तुम्ही राष्ट्रवीरवर या हो या सारे ॥६॥
चाल
घनदाट सभा थाटली । गर्जना उठली ।
घोर त्या कालीं । जय छत्रपतींचा बोला ।
जय स्वतंत्रतेचा बोला । जय भवानी की जय बोला ।
तुम्ही मावळे बोल हर हर महादेव बोला ।
चला घालुं स्वांत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥१॥
चौक २
हर हर गर्जुनि वीर मावळे सर्व सज्ज असती ।
परंतु कोठें चुकले बाजी यांत कां न दिसती ॥१॥
हाय हाय तो म्लेंछासंगें घडित बसे साची ।
स्वदेशभूच्या पायासाठीं बेडी दास्याची ॥२॥
ऐकुनियां शिवहृदय हळहळे म्हणे दूत हो जा ।
बोधुनि वळवा वीर बाजि तो तुम्ही राष्ट्रकाजा ॥३॥
चाल
शिवदूत तेधवां जाती । बाजिला वदती ।
सोड रे कुमती । कां म्लेंच्छ कसाई भजसी ।
कां दास्य-नरकिं तूं पचसी । कां जिणें तुच्छ हें नेसी ।
स्वदेश नाहीं, स्वराज्य नाहीं, धिक या देहाला ।
चला घालुं स्वातत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥२॥
चौक ३
बाजीराया म्लेंछ सबळ हा दोष न काळाचा ।
ना देवाचा ना धर्माचा किंवा नशिबाचा ॥१॥
देशद्रोही चांडाळांचा भरला बाजार ।
गुलमगिरी जे देती त्यांसी निष्ठा विकणार ॥२॥
तुम्हीच ना स्वातंत्र्य चिरियलें या पोटासाठीं ।
तुम्हीच ना रे भूमातेच्या नख दिधलें कंठीं ॥३॥
चाल
हो सावध बाजीराया । दास्यिं कां काया ।
झिजविशी वाया । तुज भगवान्‌ श्री शिवराजा ।
स्वातंत्र्य प्राप्तिच्या काजा । बोलावी तिकडे जा जा ।
देशभक्तिची सुधा पिउनि घे प्रायश्चित्ताला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥३॥
चौक ४
शिवदूताचे बोल ऐकतां बाजी मनिं वदला ।
काळसर्प मीं कसा उराशी मित्र म्हणुनि धरिला ॥१॥
घरांत शिरला चोर तया मी मानुनिया राजा ।
बंड बोलिलों शिवरायाच्या परमपूत काजा ॥२॥
माता माझी कष्टविली मीं राजनिष्ठ त्यासी ।
या पाप्यानें युद्ध मांडिलें देशरक्षकांशीं ॥३॥
चाल
जा सांगा शिवभूपाला । अशा अधमाला ।
राजनिष्ठाला । त्वां आधीं शतधा चिरणें ।
तुज करवीं घडतां मरणें । पावेन शुद्धि मग मानें ।
तुझ्या करींच्या तरवारीच्या घेइन जन्माला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥४॥
चौक ५
देशभूमिच्या कसायासि कां इमान मी देऊ ।
भाकरि देतो म्हणुनि तयाच्या चाकरीस राहूं ॥१॥
कवणाची भाकरी बंधु हो चाकरि कवणाची ।
भाकर दे भूमाता चाकरि तिच्या घातकांची ॥२॥
राज्य हिसकलें देश जिंकला त्या पर अधमाशीं ।
राजनिष्ठ मी राहुनि कवण्या साधित नरकासी ॥३॥
चाल
ही गुलामगिरिची गीता । राजनिष्ठता ।
ह्यापुढें आतां । मद्देशचि माझा राजा ।
तो प्राण देव तो माझा । मी शरण शिवा सांग जा ।
राख उडाली प्रदीप्त बाजी वैश्वानल ठेला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥५॥
चौक ६
लोट धुळीचा सुटला अवचित दीन शब्द उठला ।
लगट करुनि शिद्दिनें पन्हाळा गड वेढुनि धरिला ॥१॥
लक्ष्मीचे मृदु कमल शारदा सुंदरिचा वीणा ।
स्वतंत्रतेचा कलिजा अडके गडांत शिवराणा ॥२॥
अफझल्याच्या वधा स्मरोनी फाजल सुत त्याचा ।
करितो पण कीं शिवभूपाला जिवंत धरण्याचा ॥३॥
चाल
बापासि तुझ्या जो खडे । चारि रोकडे ।
जाशि त्याकडे । जीवंत धरुं तरि साचा ।
जीवंत पवन धरण्याचा । अभ्यास आधिं कर याचा ।
खुशाल हरिणा मग तूं धावें धरण्या वणव्याला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥६॥
चौक ७
बाजि लागला शिवभूपाच्या थोडा कानाला ।
हातीं भाला एक मावळा गडाखालिं आला ॥१॥
शिद्दि पाहतां चुकुनि हात तरवारीला गेला ।
दाबुनि त्याला मुजरा केला धीट नीट वदला ॥२॥
शिवाजि राजा जिवंत येतो तुमच्या गोटाला ।
उद्यां सकाळीं करुं गड खालीं कळवी तुम्हांला ॥३॥
चाल
ऐकुनी शिद्दि बहु फुगला । रिपूजन भुलला ।
परस्पर वदला । अजि खान, खानखानाजी ।
हुए शिकस्त मराठे हैं जी । फिर लढना क्यौं कर आजी ।
चलो शराब उडायें ताजी । आप लेवजी, नहीं आप लेवजी ।
आप गाजि आप तो रणगाजी । झिंगविला अरि सर्प फुंकुनी पुंगी गुंगविला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥७॥
चौक ८
गुगवोनि अरि सर्प शिवा गारोडि गडावरि तो ।
प्रहर रात्र उलटतां मराठी जादू मग करितो ॥१॥
कृष्णपक्षिच्या काळ्या काळ्या रात्रीं त्या दडल्या ।
गर्द झाडिला भिउनि चांदण्या बाहेरि न पडल्या ॥२॥
अशा तमीं किलकिलें दार का तटावरी झालें ।
बाजि निघाले श्री शिव आले आले शत भाले ॥३॥
भाला खांद्यावरी मराठा घोडयावरि स्वारी ।
भरतां घोडा थै थै नाचे तोंचि शीळ झाली ॥४॥
चाल
वीर हो टाच घोडयाला । बाण हा सुटला ।
हटविणें त्याला । रिपु तुडवित व्हा व्हा पार ।
चौक्यासि तुम्हा दावील । काजवा चोर कंदील ।
गेला गडतळ गेला सत्तर मैल भूप आला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥८॥
चौक ९
तुरी शिद्धिच्या हातीं देउनि सुटता शिवनृपती ।
अब्रह्मण्यम् कितिक भाबडीं भोळिं भटें वदतीं ॥१॥
अब्रह्मण्यम् यांत कायरे दोष कोणता तो ।
आला ठक ठकवाया उलटा भला ठकविला तो ॥२॥
साप विखारी देश जननिला ये घ्याया चावा ।
अवचित गांठुनि फसवुनि भुलवुनि असाच ठेचावा ॥३॥
चाल
ये यथा प्रपद्यंते माम् । भजाम्यहं तान् ।
तथैव; धीमान् । भारतीं कृष्ण वदला हें ।
अधमासि अधम या न्यायें । रक्षिलें राष्ट्र शिवरायें ।
राष्ट्ररक्षका सावध हो रिपु हुडकित तुज आला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥९॥
चौक १०
हात जोडितों पाया पडतों बाजि तुझ्या राया ।
गड अवघड रांगणा तिथें तुम्ही जाणें या समया ॥१॥
राष्ट्रदेविचा हस्त कुशल तूं तरि लाखों भाले ।
अम्हासारिखे मिळतील; चिरतिल चरचर रिपु सारे ॥२॥
जाऊं काय मी बाजि मृत्युमुखिं ढकलुनि तुम्हाला ॥
कधीं शिवा जातिचा मराठा मृत्यूला भ्याला ॥३॥
चढा गड तुम्ही यशोदायिनी तोफ पांच करा ।
तोंवरि लढवूं गनीम अडवूं खिंड करुं निकरा ॥४॥
चाल
वसुदेव तूंचि शिवराया । कंस कपटा या ।
करुनियां वाया । स्वातंत्र्य कृष्ण चिन्मूर्ती ।
जा घेउनि अपुल्या हातीं । गड गोकुळांत नांदो ती ।
गडीं चालला शिव तो खिंडित दीन शब्द उठला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥१०॥
चौक ११
आले आले गनीम खिंडिंत चवताळुनि आले ।
झाले झाले सज्ज मराठे सरसावुनि भाले ॥१॥
संख्या दुप्पट रिपुची, परि ते निकरानें लढती ।
हर हर गर्जुनि समर रंगणीं तुटोनियां पडती ॥२॥
खङगाचे खणखणाट त्या मधिं शर सणसण येती ।
मारण मराणावीण नेणती वीर रणीं रंगती ॥३॥
चाल
तो हर हर एकचि झाला । वदति रे चला ।
म्लेंछ हा हटला । चला चढवा नेटाचा हल्ला ।
वीरश्रीचा करा रे हल्ला । निकराचा चालु द्या हल्ला ।
मारित हाणित हटवित म्लेंछा खिंडिपार केला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपुवरी घाला ॥११॥
चौक १२
म्लेंछ हटवितां बाजी वळुनी गडाकडे पाहे ।
श्री शिव चाले मागे बघुनियां वीर गर्जताहे ॥१॥
गडांत जाईल राष्ट्रदेविचा जिवलग शिवराणा ।
तोंवरि लढवूं खिंड शूर हो हा अपुला बाणा ॥२॥
त्या वाण्याच्या आधिं रणांगणि जरी घडे मरणें ।
पुनर्जन्म घेउनी तत्क्षणीं पुनः पुन्हा लढणें ॥३॥
चाल
रघुराया रावणहरणा । कंसमर्दना ।
भो जनार्दना । लाडक्या देश जननीचे ।
स्वातंत्र्य रक्षणीं साचे । हे प्राण दान जरि अमुचे ।
पवित्र हे जरि त्वत्प्रिय हे जरि दे तरि सुयशाला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥१२॥
चौक १३
आले आले गनीम चालुनि पुनरपि तों आले ।
झाले जाले सज्ज पुनरपी उठावले भाले ॥१॥
दीन दीन रण शब्दा हर हर महादेव भिडला ।
भिडला ओष्ठीं दंत मस्तकीं खङग वक्षिं भाला ॥२॥
हल्ला चढवित परस्परावरि पुनः पुन्हा लढती ।
नटती योद्धे समरभाजनीं वीररसा लुटिती ॥३॥
चाल
कचरला मराठी भाला । बाजि तों आला ।
तोलुनी धरिला । रणिं रंग पुन्हा ये साचा ।
गर्जती मराठे रिपुचा । घ्या सूड म्लेंच्छ मत्तांचा ।
उगवावा सूड देशाचा । आणि सूड स्वातंत्र्याचा ।
भोसका कटयारी बरच्या । करा माळा रिपुच्या आंतडयाच्या ।
लावा उटया त्यांच्या रक्ताच्या । त्याचा मस्तक चेंडू साचा ।
समररंगणीं चेंडूफळीचा डाव भरा आला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥१३॥
चौक १४
डाव उलटला म्लेंच्छावरी तो पुन्हा परत हटला ।
जय झाला परि वीर मराठा बहुतांशी पडला ॥१॥
तिकडे गडिंच्या तोफा अजुनी पांच कां न सुटती ।
वीर मराठे सचिंत आशाबद्ध सर्व बघती ॥२॥
तशांत घेउनि ताजी टोळी फाजलखां येतो ।
धन्य बाजिची; पुन्हा उसळुनी अशनी सम पडतो ॥३॥
खिंड तोफ तिज मधुनी सुटला गोळा श्री बाजी ।
रणीं तळपतो वीरश्रीचा रणनवरा बाजी ॥४॥
चाल
तों गोळी सूं सूं आली । अहो त्या काळीं ।
मर्मिं ती घुसली । श्री बाजी विव्हळ पडला ।
मागुती कांहिंसा उठला । बेहोष वीर परि वदला ।
तोफे आधीं न मरे बाजी सांगा मृत्यूला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥१४॥
चौक १५
थांबा बाजी जखम तरि पुरी बांधूं द्या थांबा ।
हर हर रणिंचा ऐकुनि वीरा उसळुं नका थांबा ॥१॥
जखम कुठें रे असे फक्त मी तृषाक्रांत थोडा ।
रिपुरक्ताते पितों घटघटा सोडा मज सोडा ॥२॥
खरी जखम भू-आईस माझ्या, फोडी हंबरडा ।
ओढुनि अरिची अंतडी बांधुया पट्टि तिला सोडा ॥३॥
भले मराठे लढा तसेची आलो मी सोडा ।
प्रखर आपुली भूक शमविण्या रिपु नरडी फोडा ॥४॥
चाल
होईल तोफ शिवबाची । क्षणीं दो क्षणिंची ।
तोवरी साची । खिंड लढवाची ।
फेडाया ऋण या भूचें । अजि उष्ण बिंदु रक्ताचे ।
द्या मुद्दल मोजुनि साचें । व्याज तिला स्वातंत्र्य देउनी फेडा कर्जाला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥१५॥
चौक १६
काय वाजलें ? बाजीराया बार न गडिं झाला ।
शिला कोसळे, पान सळसळे, पक्षी ओरडला ॥१॥
लढा तरी मग वीर चला हो रणांत घुसलों मी ।
रक्तें मढवूं लढवूं खिंडिची तसू तसू भूमी ॥२॥
शपथ तुम्हाला वृक्ष, पक्षि, जल, शिला तेज, वारे ।
मरतां आम्ही तोफेपूर्वी लढा तुम्ही सारे ॥३॥
देहबंध तो तुटला बाजीराय धरे पडला ।
वीरवराचा विव्हल आत्मा नयनाशीं भिडला ॥४॥
चाल
तों बार धडाधड झाले । प्राण परतले ।
हास्य मुख केलें । हा पहिला बार शिवाचा ।
हा दुसरा स्वतंत्र्याचा । हा तिसरा चवथा साचा ।
बार पांचवा धडाडला जय गर्जुनि प्राण दिला ।
चला घालुं स्वातंत्र्य संगरीं रिपूवरीं घाला ॥१६॥
चौक १७
दिव्य द्युतिचा चकचकाट आकाशीं कोंदटला ।
रथ श्रीमती स्वतंत्रतेचा भूवरती आला ॥१॥
ऊठ चितोडा ऊठ देविला उत्थापन द्याया ।
प्रतापसिंहा प्रथित विक्रमा उठि मंगल समया ॥२॥
भूमातेच्या तान्ह्या उठि कां वीतचिंत व्हाना ? ।
असे कुशल रांगण्यांत तुमचा जिवलग शिवराणा ॥३॥
स्वांतत्र्याचा पोवाडा हा ऐकाया आलां ।
उठा सर्व स्वातत्र्यवीरवर जयमंगल बोला ॥४॥
चाल
श्री स्वतंत्रता भगवती । बाजिला नेती ।
आपुल्या रथीं । गंधर्व तनन तैं करिती ।
दुंदुभी नभीं दुमदुमती । श्री बाजी स्वर्गा जाती ।
करी चराचर विश्व बाजिच्या जयजयकाराला ।
चला घालुं स्वांत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥१७॥
चौक १८
चला मराठे रणीं पहुडले जे आणिक सुर ते ।
पावन खिंडिंत बसून तीसह जाति नभः पंथें ॥१॥
श्री बाजीचें रक्त पेरिलें खिंडिंत त्या काळा ।
म्हणुन रायगडिं स्वातंत्र्याचा थोर वृक्ष झाला ॥२॥
अहो बंधु हो पूर्वज ऐसे स्वतंत्र रणगाजी ।
स्वतंत्र त्या पूर्वजां शोभतां वंशज कां आजी ॥३॥
विनवि विनायक समजुनि घ्यावें यांतिल अर्थाला ।
चरण घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥४॥
स्वदेश नाहीं स्वराज्य नाहीं धिक् या देहाला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥५॥

Wednesday, February 15, 2012

Original Powada on Tanaji Malusare


Herewith is the Original Powada on Shur Narveer Tanaji Malusare by Shahir Tulashidas.

चौक १
राजगड राजाचा । प्रतापगड जिजाबाईचा ॥
सिंहगड पन्हाळा ॥ पहा त्या मोंगलाचा ॥
सरजा शिवाजी शिवभजन । काबिज केलें तळकोंकण ॥
गड माहुली घेतली । कल्याण भिंवडी काबिज केली ॥
खबर त्या विजापुराला गेली । ठाणें राजाचें बसलें ॥
शिवाजी महाराज राजगड किल्ल्यावर बसले ॥
जिजाबाई माता । आहे प्रतापगडावरी ॥
सोमवाराच्या दिवशीं । हातीं हस्तनाची फणी ॥
उगवते बाजुला नजर गेली । नजर सिंहगडावर गेली ॥१॥


चौक २
बारा मावळ पुण्याखालीं । बारा मावळ जुनराखालीं ॥
पुण्याच्या तोंडाला जेजुरीच्या बारीला । किल्ला सिंहगड पाहिला ॥
नवें कोंबडीचें अंडे । ऐसा किल्ला सिंहगड झळकला ॥
ऐसा पंतोजी तो काका । त्यानें हुजर्‍या बोलाविला ॥
"जावें राजगड किल्ल्याला । अंचवावें प्रतापगडाला" ॥२॥

चौक ३
शिवाजी महाराज पांच पोषाख नटला । पाई तुमानी सुरवारी चढविल्या ॥
अंगी किनखाप घातले । शिरीं जिरीटोप घातला ॥
हातीं वाघनखें घालून । कृष्ण घोडीला जिन केला ॥
ढाल पाठिवरी टाकिता झाला । सोनसाळीं पट्टा हातांत घेतला ॥
कृष्णघोडीला चाबुक केला । आला मढयाच्या घाटाला ॥
घाट मढयाचा उतरला । आला बिरवाडी गांवाला ॥
गांव बिरवाडी सोडिला । आला पोलातपुराला ॥
पोलातपुर पाराचा वेंघला ॥ आले प्रतापगड किल्ल्याला ।
सलाम जिजाबाईला केला ॥३॥


चौक ४
"धाडला तुम्हीं हुजराचा जासूद । काम सांगावें आम्हाला " ।
"शिवाजी महाराज । डाव फांशाचा खेळावा" ॥
"डाव खेळावा उमाजी यानें । तूं माता मी तुझा पुत्र ॥
डाव खेळावा मातेसंगें । हें आमचें महत्त्व नव्हे" ॥
"मायलेकरांचा डाव । ह्यामधिं काही गुंता नाहीं"॥
येवढया जाबावरुन । ज्यानें तिवड मांडिली ॥
हातीं फांसा ह्यानें घ्यावा । "डाव पहिला येऊं दे तुला ॥
मी बायकोची जात । पहिला डाव येऊं दे तुझा" ॥४॥

चौक ५
हातीं फांसा जो घेतला । बारा बारा तो बोलला ॥
फांसा जमिनीवर फेकला । त्याचा तिरपगडा पडला ॥
तिरपगड पडला । त्याची बेती हो पडली ॥
बेती हो बोलला । त्याचे बारा जे पडले ॥
तिन डाव गेले ज्याचे । त्या शिवाजी महाराजाचे ॥
"जिजामाई ग माते । आता डाव येऊं दे तुझा" ॥
येवढया जाबावरुन । बाईनें हाती फांसा घेतला ॥
"प्रतापगडची भवानी देवी । तूं पाव माझ्या नवसाला" ॥
बारा रे बोलली बाई । बाईचे बारा रे पडले ॥
बाई बेतीन बोलली । बाईचे बेतीन पडले ॥
तिरपगडें बोलली । बाईचे तिरपगडें पडलें ॥
जिजाबाईचे डाव पुरे रे झाले ॥५॥


चौक ६
"ऐक जिजाबाई । सत्तावीस किल्ल्यांचा मी राजा ॥
माग माग जिजाबाई । जें मागाल तें देतों तुज ॥
नाशकाची बारी सांवताची वाडी । ह्यांतून किल्ला मागून घ्यावा ॥
तुंक तिकोना लघुगड किल्ला विसापुर । हयांतून कन्‌चा मागून घ्यावा " ॥
’ह्यांतून नको मला बाळा । पुण्याचे तोंडाला ॥
आहे जेजुरीच्या बारीला । पुरंदर किल्ल्याला ॥
बारे पुरंदर किल्ला (ल्लयाला) । आहे सिंहगड किल्ला ॥
घेऊन द्यावा मला । आयुष्य मागेन तुझ्या राज्याला" ॥
नांव घेतां सिंहगडाचें । राजा थरथरां कांपला ॥
"हा किल्ला उदेभान मोगलाचा । बाई उदेभान मोगलाचा ॥
जे उमराव गेले सिंहगडाला । त्यांच्या पाठी ग पाहिल्या ॥
नाहीं पुढे पाहिले । किल्ला आहे वाघाचा जबडा ॥
सत्ताविस किल्ल्यांची बारी । ह्यांतून मागावा बाईनें" ॥
"नाहीं सिंहगड किल्ला दिल्या । मी शाप देईन ॥
राज्य जाळून टाकीन उभे" । "नको बाई चल माझ्या राजगड किल्ल्याला" ॥६॥

चौक ७
बारा भोयांची पालखी । आंत बाईला बसविली ॥
राजगड किल्ल्याला । शिवाजी महाराज जाऊन तक्तावर बसले ॥
ज्यानें वात लावूनी । जात शोधाया लागले ॥
’सिंहगड किल्ला घेणें । मला कोणी उमराव दिसेना’ ॥
प्रहर रात्रीपासुनि । बारांचा अंमल झाला ॥
प्रतापगडाखालीं । उमराठया गांवाला ॥
ज्यानें उमराव शोधिला । माझा तान्या मालुसरा ॥
तानाजी सुभेदार । पन्नास माणसांचा सरदार ॥
शिवाजीराजाचे राज्यास । ऐसा उमराव होणें नाहीं ॥
किल्ला घेईल सुभेदार । तानाजी सुभेदार ॥
खरखर लखोटा लिहीला । ज्यानें हुजर्‍या बोलविला ॥
"जावें उमराठया गांवाला । तानाजी सुभेदाराला ॥
तीन दिसांचा वायदा जो केला ॥ बारा हजार फौज ती घेऊन भेटावें तिसर्‍या दिवसाला ॥७॥
 
चौक ८
पंतोजी तो काका । ज्यानें लखोटा घेतला ॥
ज्यानें राजगड तो सोडिला । आला येल्याचे पेठेला ॥
पेठ येल्याची सोडिली । आला डोणीचे पाण्याला ॥
घाट मढयाचा उतरला । आला बिरवाडी गांवाला ॥
हुजरा तेथून निघाला । आला कोलातपुराला ॥
तेथून निघाला । गेला उमराठया गांवाला ॥
सवा प्रहर दिवस आला । तानाजी सुभेदार सदरेला बैसला ॥८॥

चौक ९
जासूद महाराजांचा पाहिला । तानाजी सुभेदार सुखी झाला ॥
पोटीं रायाबा तो बेटा । सयंवर बाळाचें मांडिलें ॥
काढल्या पंचमीच्या हळदी । काढलें षष्ठीचें लगिन ॥
लगिन बाळाचें मांडिलें । आली सिंहगडची कामगिरी ॥
लगिन रायाबाचें राहिलें । ज्यानें उमराव बोलाविले ॥
ज्याचा शलोर तो मामा । ज्याचा सूर्याबा तो बंधु ॥
येसा कणकर रुमाजी दादा । ज्यानें सरदार बोलाविला ॥
"माझ्या शेलार तूं मामा । आली सिंहगडची कामगिरी" ॥
दादा परपर बाबाजी । ज्यानें हुजर्‍या बोलाविला ॥
मिषा तोड मकाजी । ज्यानें हुजर्‍या बोलाविला ॥९॥
 
चौक १०
मामा बोलाया तो लागला । ऐंशीं वर्षांचा म्हातारा ॥
"लगिन राहिलें रायबाचें तो मजला सांगावी । माझ्या तानाजी सुभेदारा ।
जे गेले सिंहगडाला ॥ त्याचे पाठिरे पाहिले ।
नाहीं पुढारे पाहिले । ज्यानें आंबारे खाईला ।
बाठा बुरजा लाविला ॥ त्याचे झाड होउनि आंबे बांधले ।
किल्ला हातीं नाहीं आला ॥ सिंहगड किल्ल्याची वार्ता ।
काढूं नको तानाजी सुभेदारा ॥ जे गेले सिंहगडाला ।
ते मरुनशानी गेले ॥ तुमचा सपाटा होईल" ।
"असें बोलूं नको रे मामा ॥ आम्ही सूरमर्द क्षत्री ।
नाहीं भिणार मरणाला" ॥१०॥

चौक ११
मग रायाबा तो बेटा । बाबाच्या जवळ आला ॥
"ऐक ऐक माझ्या बाळा । जातों आम्ही सिंहगडाला" ॥
"माझें लगिन करील कोण ?" ॥ रायाबा पुसे बाबाला ॥
"साता नवसांचा माझा रायाबा । त्याचें लगीन मागीन ॥
भिऊं नको माझे बाळा । जातों राजगड किल्ल्याला ।
जाउन सांगतो महाराजाला ॥ सात दिवसांचा वायदा ।
घेऊन येतों तुझ्या लग्नाला ॥ आहे मी महाराजांचा चाकर " ।
लखोटा हातांत घेतला ॥ ज्यानें एका लखोटयाचे ।
बारा लखोटे केले ॥ धाडले कागद खोर्‍याला ॥
मोठया मोठया सरदारांला ॥ पंधरा गांवचे पारुंचे ।
ज्यानें आपणांजवळ बोलाविले ॥ दसपटिचे मोकाशी ।
त्यानें आपणाजवळ बोलाविले ॥ उमराठयाचे शिरके ।
त्यानें आपणांजवळ बिलाविले ॥ नांदविचे सावंत ।
त्यानें आपणांजवळ बोलाविले ॥ वडघरचे नाईक ।
त्यानें आपणांजवळ बोलाविले ॥ सिलमाचे ठाकूर ।
त्यानें आपणांजवळ बोलाविले ॥ बारा हजार फौजेला ।
ज्याचा लखोटा पोंचला ॥११॥
 

चौक १२
’अरे फलाणाचे फलाणा । घाव घाला निशाणा’ ॥
बारा हजार लोक, बिनहत्यारी । होते. सैन्य बोलाया लागलें ॥
बिनहत्यारी लोक । कसे जाऊं महाराजांचे भेटिला ।
ज्यानें सैन्य पाहिलें । बारा हजार लोक बिनहत्यारी आले ॥
आंकडया कोयत्या त्या कमरेला । टापसीच्या खोळा डोईवर घेतल्या ॥
हातीं सोडा घेऊन । सलाम त्यांनीं केला सुभेदाराला ॥
माझे तानाजीची हिम्मत । म्हणून मिळाली जमात ॥
त्यानें पेटारा उघडिला । बारा हजार रुपया बाहेर काढिला ॥
बारा हजार मनुष्यें । त्यांचे हातांमधिं दिला ॥
’दाढि होई रे करावी । चिरी मिरी रे घ्यावी ॥
चला महाराजांचे भेटिला । राजगड किल्ल्याला" ॥१२॥
 

चौक १३
बारा हजार फौज बोलूं लागली । मनीं विचार त्यानें केला ॥
"जातों राजगड किल्ल्याला । धनगर अडविल बायकोला ॥
अब्रु घेईल आमुची । बारा हजार रुपया त्यांनें मागें लावून दिला ॥
सुभेदार बोले त्या सेनेला । "बारा हजार रुपया काय केला ॥

घेतलें धनगराचें घोंगडें । त्याला मागें लावून दिला" ॥

बारा भोयांची पालखी सवारिली । तोरण पालखीला बांधिलें ।
पाय दिला पालखीमध्यें । हात पालखीला दिला ॥
रायाबा तो बेटा । बाबाच्या आडवा येणार झाला ॥
"माझें लगीन करिल कोण । तुम्ही जातां सिंहगडाला" ॥
"भिऊं नको बेटा । तुझे मी येतों लग्नाला ।
आधीं लगीन सिंहगडचें । मग करीन रायाबाचें" ॥१३॥
 
चौक १४
हुकूम ज्यानें भोयांला केला । आले नगरीचे वेशीला ॥
तोरण पालखीचें तुटून उजव्या बाजूवर पडलें ॥
माझ्या शेलार तूं मामा । आम्ही जातों सिंहगडाला ॥
अपशकुन झाला । माझ्या तानाजी सुभेदाराला ॥
तानाजी सुभेदारानें । ह्याचा गुमान नाहीं केला ॥
गेला गांवाच्या शिवेवर । ज्याला आडवा तास गेला ॥
मग तो शेलार मामा बोलला । तानाजी सुभेदाराला ॥
"तानाजी सुभेदारा । मोहोरें बरें नाहीं होणार" ॥
"राजा शिवाजीचें देणें । अढळपदीं सोनें !" ॥१४॥

चौक १५
"अपशकून मानूं नये । ज्यानें हर हर वाहिला" ॥
गांव उमराठें सोडिलें । पांचकर्णांचा बाजा केला ।
आले त्या पोलातपुराला । पांचकर्णांचा बाजा केला ।
गेले बिरवाडी गांवाला । पांचकर्णांचा बाजा केला ।
घाट मढयाचा वेधला । गेले डोणीचे पाण्याला ॥
गलीम तेथुनि निघाला । गेला येल्याच्या पेठेला ॥
गलीम तेथुनि निघाला । गेला रायगडच्या पोटाला ॥
बारांच्या अंमलांत । गेले किल्ल्याच्या पोटाला ॥
बारा हजार फौज चाले । धुरळा गगनास गेला ॥१५॥

चौक १६
हिरव्या बुरुजावरुन । जिजाबाईनें पाहिला ॥
"माझ्या शिवाजीमहाराजा । गलीम वैरियाचा आला ॥
तोफांला आग घाला । गलीम मारावा किल्ल्याखाला" ॥
शिवाजी महाराजानें । गलीम नजरेनें पाहिला ॥
तो शिवाजी महाराजाचा । भगवा झेंडा ओळखिला ॥
"माझे जिजाबाई माते । आमचा तानाजी सुभेदार आला" ॥
नांव घेतलें सुभेदाराचें । बाई गदगदां हांसलि ॥
सेना तानाजीची पाहिली । मनांत संतोषित झाली ॥१६॥

चौक १७
बारा हजार फौज घेऊन । सुभेदार दरवाजाला आला ॥
पहिल्या सदरे जमाडिला । सूर्या गगनीं लखाकला ॥
दुसर्‍या सदरेमधीं । कमरकमर कापुस टाकला ॥
तिसर्‍या सदरेमधीं । ज्यानें चांदवे बांधिले ॥
चवथ्या सदरेमधीं । हंडया झुंबर बांधिले ॥
पाचव्या सदरेमधीं । महाराज शिवाजी बैसले ॥
सुभेदार सलामाला गेला । महाराजावर घुसा केला ॥
"मागचे दिवस मागल्यापरी । मोहरिल दिवस मोहरल्यापरी ॥
माझ्या बेटयाचें लगीन, तुम्हीं जासूद धाडिला । तुमचा काय वाद केला ?" ॥
"ऐक तानाजी सुभेदारा । आमची कामगिरी नव्हे तुम्हांला ॥
जिजामातेनें बोलाविलें" । दोघांचा जबाब जिजाबाईनें ऐकिला ॥
जिजाबाई बोलाया लागली । "मी जातीनें बाईल ॥
आतां सुभेदार येईल । माझी अबरु घेईल" ॥१७॥

चौक १८
सर्व शृंगार नटली । धांवा अंबाबाईचा मांडिला ॥
"भले भले अंबाबाई । तानाजी सुभेदार आला ॥
इच्छेप्रमाणें होऊं दे ।" सिंहगड किल्ल्याची पंचारती केली ॥
गेली सुभेदाराला ओंवाळायला । "तुझे जाऊं अलाबला ॥
तानाजी सुभेदारा । चढत्या दवलतीचें राज्य येऊं दे तुला" ॥
सुभेदाराला ओंवाळितां । त्याचा राग निघून गेला ॥
ज्याला वर्तली चिंता । ही आहे महाराजांची माता ॥
इच्या आरतीला । मी घालूं काय आता ॥
ज्यानें मंदिल काढिला । बाईचे पायांवर ठेविला ॥
जिजाबाई बोलली । तानाजी सुभेदाराला ॥
"माझा सुभेदार शाहाणा ।" हात मस्तकी ठेविला ॥
"माग माग जिजाबाई । जें मागशील (तें) देतों तुला" ॥
"काय मागूं सुभेदाराला ? । ह्या म्हातारपणीं सिंहगड किल्ला ॥
घेऊन द्यावा मला । आयुष्य मागेन तुझ्या राजाला ॥
माझा शिवाजी थोरला माझा तानाजी धाकटा । लेकाचें वाण दिलें त्याला" ॥१८॥

चौक १९
सुभेदार तेथुन निघाला । आपल्या सेनेमधिं आला ॥
शेलार त्याचा मामा । त्याला पुसाया लागला ॥
"गेला बाईच्या भेटीला । तुम्हीं काय मजकूर केला" ॥
"काय सांगू शेलारमामा । जाणें आहे सिंहगडाला" ॥
जावें जावें बाईच्या भेटीला । बारा हजार फौज आली तुझ्या ग कामाला ॥
नाहीं गाढव वळायाला । जेवण कर बारा हजारांला मग आम्ही जाऊ सिंहगडाला" ॥
"माझ्या सुभेदार बाळा । तुजवर घातलें गडाचें ओझें" ॥
"भला भला सुभेदारा । यावें जेवायाला ॥
आहे गडाची रे वस्ती । येथें अन्न रे मिळेल ॥
नाहीं मिळायाचें पाणी । जावें गुंजवर्‍या नदीला ॥
आंघोळ करायाला । मग यावें जेवायाला" ॥१९॥

चौक २०
बारा हजार फौजेनिशीं । सुभेदार गडाखालीं उतरला ॥
गडाखालीं उतरुन ज्यानें विचार काढिला । मग त्या शेलार मामानें ॥
विचार काढिला । "भला भला रे सुभेदारा ॥
तीन कोस जावयाला वेळ फार झाला । धोपर संध्या रे करा ॥
चला जाऊं रे जेवणाला" । बारा हजार फौजेतून ॥
एकटा सुभेदार गेला । गुंजवर्‍या नदीला ।
आंघोळ करायाला ॥ ज्याने आंघोळ संध्या केली ।
आला आपल्या फौजेमधीं ॥ बारा हजार घेऊन ।
आला दरवाजाचे तोंडीं ॥ ज्यानें सैंपाक पाहिला ।
बारा हजार पाट मांडला ॥ बारा हजार दुरुन ।
बारा हजार पंचपात्री ॥ बारा हजार लाविला ठाव ।
सैंपाक वाढून त्वरीत झाली (ला) ॥२०॥

चौक २१
ज्यानें सैंपाक पाहून । हुर्द ज्याचें भरुन आलें ॥
"आग लागो जेवणाला । माझा बाळ अंतरला" ॥
ज्याचा शेलार तो मामा । बोलाया लागला ॥
"भला भला सुभेदार । ऐंशीं वर्षांची उमर ॥
ह्या रे जिजाबाईची । एकटी वाढील रे कुणाला" ॥
मामा बोले सुभेदाराला । "अठरा शाखा अठरा भाज्या ॥
एक ठिकाणीं करा । जेवण वाढिलें फौजेला" ॥
अर्धे उठून उभे राहिले । बारा हजार फौजेनें एकच गर्दी केली ॥
कोणी करतो पोळी पोळी । कोणी करतो खीर खीर ॥
कोणी करतो भाजी भाजी । कोणी करतो डाळ डाळ ।
ज्यानें एकच गर्दी केली । जिजाबाई माता बहुत श्रमी झाली ॥
धांवा अवघा मांडिला । "प्रतापगडची भवानी धांव संकटाला" ॥
पांचजणी देवी । धांवुनिया आल्या ॥
सैंपाक वाढाया लागल्या । ऐकेनात कुणाला ॥
ज्याचा मापटयाचा आहार । त्याचा अधोलीचा झाला ॥
ज्याच्या मोहरें पांच पोळ्या ॥ याच्या पंधरा पोळ्या झाल्या ॥
खाववतील त्यानें खाव्या । उरतील त्यांनीं गडाखालीं टाकाव्या ॥२१॥

चौक २२
बारा हजार फौज । जेऊन तृप्त झाली ॥
तानाजी सुभेदार गेला । शिवाजीच्या मुजर्‍याला ॥
"आम्ही जातों सिंहगडाला । आमचा रायाबा संभाळा ॥
जर आलों सिंहगडाहून । लगीन करीन रायाबाचें ॥
जर गेलों तिकडे मेलो । लगीन करा रायाबाचें ॥
मज बापाची सरदारी । द्यावी रायाबा बेटयाला ।
दिवटी बुदलीची जहागीर । द्यावी रायाबा बेटयाला ।
डोजगांव द्यावा पानसुपारिला । मालसर्‍याला दंड द्यावा इनाम खायाला" ॥
सुभेदार तेथून निघाला । आला बाईचे भेटिला ॥
डोईचा मंदिल काढला । बाईच्या चरणावर ठेविला ॥
"आम्ही जातों सिंहगडाला । माझ्या बेटयाला सांभाळा" ॥
बाईनें पेटारा उघडिला । पांच पोषाख काढिले ॥
त्या ग सुभेदाराला दिले । ’यांतून जरि जगून (जिंकून?) तू आला ॥
नव पोषाख करिन तुला’ । ज्यानें पोषाख तो केला फौजेमधीं गेला ॥२२॥

चौक २३
शेलार मामानें पाहिला । "माझ्या ऐक सुभेदारा ।
बारा हजार फौज आली रे तुझ्या कामाला ॥ हा पोषाक तो घ्यावा नेऊनशानी द्यावा ।
देशील तर द्यावा बारा हजाराला" । येवढया जाबावरुन ।
बाई मनीं चरकली ॥ काय सांगू सुभेदाराला ।
देईन बारा हजाराला ॥ चढविन सिंहगडची पायरी ।
बाईनें कोठार उघडिले ॥ ’मोहरे येर’ बारा हजार तलवार ।
बारा हजार काढिल्या ढाला ॥ बारा हजार गूर्दा ।
बारा हजार सिंगडा ॥ बारा हजार चौकडा ।
बारा हजारांना तोडा ॥ बारा हजार पोषाक ।
बारा हजारांना केसरी झगा ॥ घेरदार, बारा हजार ।
कोणी उमराव समजेना ॥ एकापेक्षां एक अधिक ।
दादा फौज निघाली ॥२३॥

चौक २४
’माझे जिजाबाई माते । माझ्या बाळाला सांभाळा" ॥
तानाजी सुभेदार । बारा भोयाचे पालखीमधिं बसला ॥
सर्व सेनेला मग तो मुजरा केला ॥ बसा बसा दादांनो ॥
आम्हीं जातों सिहगडाला । आमचा रामराम तो घ्यावा ॥
ज्यानें राजगड तो सोडीला । पांच कर्णांचा बाजा केला ॥
गलीम तेथून निघाला । साखरेच्या मुक्कामी गेला ॥
पांच कर्णांचा बाजा केला ॥ गलीम तेथून निघाला ।
गेला खामगांवाला । पाच कर्णांचा बाजा केला ॥
गलीम तेथून निघाला । गेला डेर्‍याच्या मुक्कामी ॥
पांच कर्णांचा बाजा केला । गलीम तेथून निघाला ॥
गेला सिंहगडच्या पोटाला । तेथुनि कर्णा बंद केला ॥२४॥

चौक २५
गलीम आनंदी, बारीला । दबा दिला भला ॥
माझ्या शेलार मामानें काळी घोंगडी हांतरिली । विडे पैजेचे मांडले ॥
"ज्यानें विडा उचलावा । त्यानें जावे सिंहगडाच्या माहितीला ॥
माहिती काढून येईल त्याला । छत्री घोडा इनाम त्याला, बारा गांव इनाम देईन त्याला" ॥
ज्या वीरांच्या वरती माना । त्यांनीं खालती घातल्या ॥
हात कोणी लाविना विडयाला । तानाजी सुभेदार भला ॥
त्यानें हात विडयाला घातला ॥ विडा मंदिलीं खोंविला ॥२५॥

चौक २६
"सूर्याबा रे बंधु आरता येरे माझ्या दादा । आम्ही जातों सिंहगडाला ॥
जगुनशानि आलों । लगीन करुं रायाबाचें ॥
गेलों तिकडे मेलों । लगीन करा रायाबाचें" ॥
तानाजी सुभेदार त्यानें पोषाक काढिला । पाटलाचा थाट केला ॥
जंगल लागलें दारुण । वेळु करकरां वाजती ॥
लागलें चिंवारीचें रान । लागलें आळविचें रान ॥
आरीबोरीचें दारुण । वाट नाहीं रे जावयाला ॥
काळोखी रात्र । वाट नाहीं रे जावयाला ॥
वन धुंडाया लागला । वाट मिळेना जावयाला ॥
सुमार पाहाया लागला । बारे धोंडीवर चढला ॥
गेला कोळ्याचे ग्याटाला (म्याटाला) । बारा जण कोळी होते पहिल्या ग्याटाला (म्याटाला) ॥
त्यानें सुभेदार पाहिला । "मारा मारा ह्या चोराला" ॥
सुभेदार बोलाया लागला । "भ्यालों ह्या चोराला ॥
हे ठार मारतील मला" । "चोर असलों ठार मारा ॥
राव असलों तर काय मरतां । बायकोच्या याराला ? ॥
जरा बत्ती तुम्ही लावा । यावें मला पाहावयाला" ॥२६॥

चौक २७
पहिल्यानें सरदार पाहिला । "धन्य याची नारायणा ॥
कोण तुमचें नांव गांव । येवढे सांगावें आम्हांला " ॥
"मी साखरेचा पाटील । गेलों होतों पुण्याला ॥
मंडईच्या वाडयांत । गेलों होतों पट्टी लावायाला ।
जात होतों घराला । तेथें वाघानें आडविला ॥
तुमच्या आलों आश्रमाला ॥ भले भले रे दादांनों ॥
घाईनें निघालों । पान खायला विसरलों " ।
पान द्यावें खायाला ॥ ऐक ऐक दादा ।
ह्या बारा वर्षामधीं पान खाल्लें नाहीं " ॥ बटवा खाकेचा सोडिला ।
यानें विडे जे काढिले ॥ बारा त्या कोळयाला ।
यानें बारा विडे दिले आफुमाजुमाचे विडे कोळ्यांला दिले ।
कोळी झिंगूनशानी गेले ॥२७॥

चौक २८
बारा बाराजण कोळी । पहिल्या दरबाराचे गेटकरी (मेटकरी) ॥
"बारा असामींचा कोण सरदार सांगावा" । आहे मी खंडोजी नाईक बारांचा सरदार" ॥
"ऐक खंडोजी नाईक । तुमची तैनात सांगावी" ॥
"तीन रुपयांची तैनात । मला सरदाराला मिळती" ॥
ह्यानें कठी जी काढिली । दिली खंडोजी नाईकाला ॥
ज्यानें तोडा जो काढिला । दिला विठोजी कोळ्याला ॥
चौकडा काढिला । दिला मालोजी कोळ्याला ॥
बारा कोळ्यांला बारा । ऐशा वस्ता त्यानें दिल्या ॥
कोळी फितूर ते केले । "ऐक ऐक पाटीलबोवा ॥
मोठया वस्तू आम्हांला जिरतील कशा । काम सांगा आम्हांला" ॥
"काम तुम्हांला सांगेन । भाक द्यावी रे मजला" ॥
इमान ज्यानें दिलें । कोळ्यांनीं इमान दिलें ॥
"मी आहें कोणाचा कोण । नांव सांगतों रे तुम्हांला ॥
राजा शिवाजीचा उंबराव । आहे मी तानाजी सुभेदार ।
पन्नास माणसांचा सरदार ॥ आहें मी, एकला ।
आलों सिंहगडच्या माहितीला । लांबी रुंदी सांगा मला" ॥२८॥

चौक २९
नांव घेतां शिवाजीचें । कोळी खालती बसले ॥
"ऐक ऐक तानाजी सुभेदारा । शिवाजीचें कुत्रे नाहीं येत सिंहगडाला" ॥
ज्यानें वस्ता घेतल्या । त्यानें सुभेदाराच्या पुढें ठेविल्या ॥
"घे रे सुभेदारा । आल्या वाटेनें जावें राजगडकिल्ल्याला " ॥
"ऐक खंडोजी नाईका । इमान तूं रे मला दिलें ॥
द्यावी सेजेची बाइल । पण इमान देऊं नये" ॥
येवढया जाबावरुन । कोळी सांगायला लागला ॥
"ऐका सिंहगडची माहिती । तिनकोसांचा आहे बा घेरा ॥
दिडकोचासी आहे बा रुंदी । आहे अठराशें पठाण सिंहगडाला ॥
आहे उदेभान मोंगल । दीड गाई दीड शेळी सवामण तांदूळ वेळेला ॥
अठराजणी बिब्या । आहेत त्याच्या पलंगाला ॥
घेतो तेल्याची पहार । मणगटावर घालतो ॥
सरी करुन घालतो । बिबिच्या गळ्यांत ॥
चांदवडी रुपया । दोहों बोटांनी तोडितो" ॥२९॥

चौक ३०
"आहे बाच्छायाचा हत्ती । त्याचें नांव चंद्रावळी ॥
एक बाच्छायाचा हत्ती । करिल सब दुनियेची माती ॥
उदेभानाचा प्रधान । आहे सिद्दी हिलाल ॥
एक शेळी अर्धी गाई । आदमण तांदुळ त्याचे एका वेळेला ॥
नउजणी बिब्या । सिद्दी हिलालाच्या पलंगाला ॥
बाराजण होते लेक । उदेभानाच्या पेक्षां भारी ॥
उगवत्या बाजुला । कड़ा आहे डोणागिरी ॥
तेथें आहे सोलाची जागा । डोणागिरीच्या कडयाला ॥३०॥

चौक ३१
"बसावें सरदारांनो । जातों आपल्या गोटाला" ॥
बाराजण कोळी चरण धरुन । तुम्ही काय सांगतां आम्हांला ॥
त्या मर्दाला पाहुन । कोळी रडाया लागले ॥
"शिवाजीच्या राज्यांत कोणीं । तुजसारखा सरदार नाहीं पाहिला" ।
"भिऊं नको रे दादांनो । हा किल्ला हातीं आला तर ह्या किल्याची सरदारी देईन तुम्हांला ॥
हजाराची तैनात देईन बारा असामीला" ॥ तानाजी सुभेदारानें दिला हातचा लखोटा ।
त्या खंडोजी कोळ्याला ॥३१॥
 
चौक ३२
सुभेदार तेथुनि निघाला । आला आपल्या फौजेला ॥
ज्याचा शेलार तो मामा । त्याच्या पुढें धावत आला ।
"तुम्ही गेला सिंहगडाला । नवस केला बहिरोबाला ॥
माझा सुभेदार येऊं दे । बारा बकरे देईन तुला ॥
तुम्ही चला हो किल्ल्याला । जातों नवस फेडायाला" ।
ऐक ऐक शेलारमामा बारा द्यावयाचे ते चोवीस देऊं । पण किल्ला येऊं दे हाताला" ॥
"बहिरोबा आहे ओंगळ । त्याचा नवस पाहिजे फेडला" ॥
"ऐक ऐक शेलार मामा माझ्या महाराजाचें देणें । अढळ पदीं सोनें ॥
नाही आम्ही बहिरोबा जाणित । साडेतिनशें देव पाणी रांजणांत भरतात ॥
ऐसा शिवाजीमहाराजा । आहे तळकोंकणचा राजा" ॥३२॥


चौक ३३
चला माझे दादांनो । हुकूम सैन्याला केला ॥
बारा हजार फौज गेली । कल्याण दरवाज्याला ॥
ज्यानें पेटारा उघडिला । काढिली यशवंत घोरपड ॥
सात शेर शेंदुर । तिच्या मस्तकीं थापिला ॥
भांग मोत्यांचा भरला । चरणीं मस्तक ठेविलें ॥
सांखळी कमरेला बांधिली ॥ यशवंत घोरपड ज्यानें किल्ल्याला लाविली ॥
अर्ध्या किल्ल्याला गेली । घोरपड माघारीं परतली ॥
आउक्ष तानाजीचें समजली । घोरपड फिरली ती सुभेदारानें पाहिली ॥
"सत्ताविस किल्ले मी घेतले । घोरपड कधीं मागें नाही फिरली" ॥
राग आला त्या मर्दाला । "मी आहे मराठयाचा पोर नाही भिणार मरणाला ॥
एक हात टाकीन । अठरा खांडोळीं पाडीन, शिळ्या भाकरीसंगें खाईन" ॥
त्या मरणाचे धास्तीनें । सात वेढे जी फिरली नखें रोऊन बसली ॥३३॥

चौक ३४
"जावें जावें शेलारमामा सोल बघायाला" । ज्यानें टिचकीनें मारिली ॥
सोलाला जोरानें लागली ॥ काळी घोंगडी जी सोडली ॥
ज्यानें बटवा जो सोडिला । बारा विडे काढिले ॥
"कोण शूर मर्द आहे क्षत्री । त्यानें विडा उचलावा, हात सोलाला घालावा" ॥
ज्या वीरांच्या वरती माना । त्यांनीं खालीं घातल्या माना ॥
सुभेदार बोलतो । "भरा बायकांच्या बांगडया" ॥
एवढया जाबावरुन । राग आला त्या सैन्याला ॥
मोहिता म्हणतो धार माझी । घाग म्हणतो धार माझी ॥
चवाण म्हणतो धार माझी । जाधव म्हणतो धार माझी ॥
गायकवाड म्हणतो धार माझी । शिरके म्हणतो धार माझी ॥
महाडिक म्हणतो धार माझी । बारा हजार फोजेनें एकच गर्दी केली ॥३४॥

चौक ३५
अरे फलाणाचा फलाणा । घाव घाला निशाणा ॥
घस्त आली मोगलांची । त्यानं कानोसा घेतला ॥
हांक मारली गेटाला (मेटाला) । खंडोजी नायकाला ॥
"किस्का गलबला मेरे भाई । एवढा सांगावा आम्हांला" ॥
खालून कोळ्याने जबाब दिला । जंगलमें धनगराचा वाडा ॥
त्यामध्यें बडा वाघ शिर्‍या । गाईकी बचडी खाते ॥
रांड पोर किचाड करते । वरती सुखी राज्य करा" ॥३५॥

चौक ३६
सुभेदार बोलतो सेनेला । "पहिली सोल शिवाजीमहाराजांची ॥
दुसरी सोल अंबाबाईची । तिसरी सोल तानाजी सुभेदाराची" ॥
पट्टे घेतले तोंडामधीं । सोल धरली हातामधीं ॥
आपल्या बेताचे माणुस पन्नास मोजीले । सुभेदार गडावर चढले ॥
पन्नास कमी बारा हजार फौज । खालीं होती, त्याने एकच गर्दी केली ॥
सूर्याबा तो बंधु । त्यानें एकच गर्दी केली । दादा वरती गेला (म्हणून) ।
बारा हजार फौजेनें हात सोलाला घातला ॥ तीन पुरुष वरती गेले ।
सोल मधीच तुटली ॥ पन्नास कमी बारा हजार ।
फौज धरणीवर पडली ॥३६॥

चौक ३७
सुभेदार तो वरती जाऊन । त्याला दोन घटका झाल्या ॥
माझ्या "शेलार तूं मामा । कां वेळ लागला फौजेला तूं जावे बघायाला" ॥
सोल पाहुन मामा । धोतरात....ला ॥
"काय सांगूं सुभेदारा । सोल ते तुटली आली मरणाची वेळा" सुभेदार बोलाया लागला ।
"नाहीं सोल रे तुटली माझें आयुष्य तुटलें ॥ ऐक ऐक शेलार मामा ।
माझ्या रायाबा बेटयाला रामराम सांगा " ॥३७॥

चौक ३८
शेलार मामा बोलतो । "ऐक ऐक मी तुला एक तोड सांगतो ॥
आहे अठराशें फौज । किल्ल्याला अठराशे पठाण ॥
आहे उदेभान मोंगल । आहे सिद्धी तो हिलाल, आहे चंद्रावळी हत्ती ।
उडी टाका किल्ल्याखालीं । म्हणजे पहायाला नको" ॥
"भला भला शेलार मामा । उडी टाकीली तरी प्राण जायाचा ॥
पन्नास माणसाचा सरदार । सत्तावीस किंल्ल्यांचा मी सरदार, नाहीं भिणार मरणाला" ॥
शूर मर्दाची कीर्ति । धावा केला अंबाबाईचा ॥
प्रतापगडची भवानी । पाव माझ्या नवसाला ॥
सातारची मंगळाई । मग पुण्याची पर्वती ॥
तुळापुरची (तुळजापूरची) भवानी । माता पाराची वरदानी ॥३८॥

चौक ३९
पांच देवी पुढे धांवत आल्या । गळ्यांत कवडयांच्या माळा ॥
हात मारिला पाठीवर । "भिऊं नका सुभेदारा ॥
यश तुझ्या तलवारीला" । बळ देवीचें सापडलें ॥
जोर हातींचा चढविला । मागची पुढची आशा सोडली ॥
खुन डोळ्यावर चढला । "ऐक माझ्या शेलारमामा ॥
जेथें सुभेदाराचा पटा । तेथें पन्नासांचा पटा ॥
जेथें सुभेदाराचा मान । तेथें पन्नासांची मान चलचल माझ्या मामा" ॥३९॥

चौक ४०
गेले पहिले दरवाजाला । ज्यानें दिंडीनें पाहिला ॥
होती आरबाची जात । होती मोगलाची जात ॥
होती मुसलमानाची जात । अफु माजुम खाल्ली ॥
मदनमस्त झाली । ज्यानें डाव जे मांडिले ॥
कोण बारा बारा बोलती । कोण ग्यारा रे बोलती ॥
ह्याने एकच गर्दी केली । खणाखण वाजिती ॥
व्हाळ आसुदाचे वाहती । रक्त अंगाला लागलें खुन डोळ्याला चढला ॥
कोण करितो खुदा खुदा । बुधा धरणीला पडला ॥
कोण करितो अल्ला अल्ला । खाली काला जो पडला ॥४०॥

चौक ४१
पहिला दरवाजा मारिला । गेला दुसर्‍या दरवाजाला ॥
काळोखी रात्र, पार--
दुसर्‍या दरवाजाला होता । तिनशें पठाण, ज्यानें दिन दिन वाहिला ॥
मुसलमानी लोक दादा । बिनफिकिर होते, नाहीं गलीमाची माहित ॥
तानाजी सुभेदार, जैसा ठाणांत । वाघ लोटला, सेनांत ॥
पांच पट्टयांचा मारा केला । सवाघटकेमधिं तिनशें पठाण कापिला ॥
गेला तिसर्‍या दरवाजाला । होता चारशें पठाण ॥
दिन दिन ज्यानें वाहिला । चारशें पठाण कापिला ॥
एकदंर हिशेब नऊशें मनुष्यांचा झाला ॥४१॥

चौक ४२
"ऐक शेलार मामा । गलीमाचा हिशेब घ्यावा ॥
एक ह्यानें कमी । नऊशें पठाण झाला" ॥
त्यांत बोंब्या निघून गेला । उदेभान मोंगलापाशीं गेला ॥
अठरा तो पेले अफूचे । उदेभान एकटा प्याला ॥
भंगीच्या जुडया । आणि अफुच्या वडया खाल्ल्या ॥
उदेभान मोंगल मगरमस्त झाला । आठरा पलंग ज्यानें बिब्यांचे सवारिले ॥
ज्यानें लुंगिज सोडिली । ज्यानें खुंटीवर ठेविली ॥
चोन कराया चालला । तो म्होरें बोंब्या अवचित गेला ॥
"मेरे उदेभान मोंगला । आग लागो तुझ्या चोन्याला ।
सिंहगड किल्ला डुब होया । भाई नऊशें पठाण कापिला ॥
काळोखी रात्र, नाहीं गलीमाची माहित । नऊशें पठाण काटया" ॥
"x x हमारे पर बैठया । आम्ही नाहीं चोन्याला सोडताया ॥
जा बालेकिल्ल्याला । जाऊन सांगा हत्तीच्या महाताला ॥
आठरा घागरी कुसुंबा पाजा हत्तीला । अठरा अफूचे ते पेले ॥
अठरा माजुमाच्या वडया, पांच पते त्या (द्या) सोंडेला । चंद्रावळीचा हत्ती जाऊं दे कल्याणदरवाज्याला ॥४२॥
 
चौक ४३
सुभेदारानें काय केलें । सुभेदार बोलतो मामाला ॥
"नऊशें पठाण कापिला । माझा जीव श्रमी झाला बटवा सोडा पान खायाला" ॥
शेलार तो मामा शिणल्यावर "दादा पोट रे फुगलें" । "भला भला माझ्या मामा ॥
बाराच्या ठोक्याला । किल्ला सई करुन देतों तुला ॥
पान खाऊं दे मला" । पान जो खातांना मोहरें हत्ती धांवत आला ॥
"किस्का उमराव । मेरा भाई सांगावा मजला" ॥
"उंबराव शिवाजीमहाराजांचा । मी आहें तानाजी सुभेदार" ॥
"नऊशें पठाण कोणी काटया, सांगावें मजला" । "नऊशें पठाण आम्ही काटया" ॥
महाता बोले सुभेदार । "कुणब्याच्या पोरा काय तुझा एवढा तोरा ॥
जंगलामधीं तूं रें जावें । लकडी तोडावी त्याची मोळी ।
बांधावी जाऊन बनियाला ओपावी ॥ ज्यानी धानोर्‍या आणाव्या ।
रांडा पोरा रे घालाव्या ॥ एवढया बडया बडया सरदारी एवढया बडया तलवारी ।
कोठें होत्या तुझ्या बाला ?" ॥ सुभेदार बोले महताला ।
"ऐक भुसार्‍याच्या पोरा जाऊन ताग तूं पेरावा ॥ गोणी ताटुक वळावा ।
यावें कुणब्याच्या वाडयाला ॥ भात रुपयाचे द्यावें ।
तुझ्या रंडीनें भरडावें ॥ कणी कोंडा आपण खावा ।
तांदूळ बनियाला ओपावा ॥ एवढया बडया बडया अंबार्‍या एवढया बडया तलवारा ।
कोठें होत्या रे मुसंडया तुला ?" ॥४३॥

चौक ४४
सलाम सलाम मेरे भाई । पहिला हात येऊं दे रे तुझा" ॥
पैलवान हत्तीवर बसला । शिवी दिली हत्तीला ॥
"तेरी रंडीका नर । ह्याला पाहुन घ्यावा" ॥
हत्ती सात पावलें मागे गेला । पांच पटयाचा मारा केला ॥
"संभाळ संभाळ मेरे भाई । आतां संभाळ सुभेदारा ॥
हा हात्ती बाच्छाईचा" । "मी रे आहे महाराजांचा" ॥
पहिला हत्तीनें डोईवर मारा केला । सुभेदार भला,
हत्तीच्या पोटाखालून निघून गेला ॥ हत्तीनें मारा केला ।
बंदुकीचा गजभर चिरा जो तुटला ॥ वरुन पहिलवान बोलला ।
"सहाही पाताळ गाडिला !" राग आला सुभेदाराला ।
सात हात जमीन उडाला लाथ मारिली महाताला ॥
अल्ला म्हणून बोलला । शब्द हत्तीनें ओळखिला ॥
हत्तीने उलटा पाठीवर मारा केला । ह्या वैर्‍याला मारायाला ॥
सुभेदार सराईत भला । कावा नदरेचा राखिला ॥
सळ पटयाचा सोडिला । नऊ तुकडे सोंडेचे नऊ सांखळीचे ॥
अठरा खांडोळीं पाडिलीं । सुभेदार खालीं उतरला ॥
पन्नास माणूस लागलें हत्तीला भोकाया । शेलार मामा धांवत आला ह्याचा "भोचु दे रे बोx" ॥४४॥

चौक ४५
तिथुन बोंब्या निघून गेला ॥ "मेरे उदेभानभाई आग लागो तुझे चोन्याला ॥
"सिंहगड किल्ला डुब होया" । "हम चोन नहीं सोडताई ॥
जा पिराच्या दरग्याला । सांगा सिद्दी हिलालाला ॥
पांच हत्यारें घेऊन जावें । कल्याण दरवाजाला" ॥
सिद्दी हिलाल भला । ज्याच्या नऊ जनी बिब्या पलंगा निजायाला ॥
चोन कराया लागला । लाखोटा मोगलाचा दिला ॥
सिद्दी हिलालानें । त्यानें वाचून पाहिला ॥
सिंहगड किल्ल्याला गलीम बहुत आला । तुम्हीं जावें लढायाला ॥
सिद्दी तो हिलाल पांच पोषाग नटला । दोहीं हातांत दोन पट्टे नऊजण बिब्या हारोहारीनें उभ्या केल्या ॥
ज्यानें पहिला हात टाकिला । अठरा खांडोळीं पाडिलीं ॥
आसुदाचा टिळा ल्याला । उमराव तेथून निघाला सुभेदारापाशीं आला ॥४५॥

चौक ४६
"सलाम सलाम मेरे भाई । किस्का तूं उमराव ऐसा सांगावा मजला" ॥
"उमराव आहे शिवाजीचा । मी तानाजी सुभेदार" ॥
"ऐक कुळंब्याच्या पोरा । पागोटयाच वेढे घाल गळ्यामधीं शरण यावें सरदाराला" ॥
सुभेदार त्याला बोलता झाला । "घ्यावे तोंडात तृण, घ्यावी डोईवर वहाण, शरण यावें सुभेदाराला ॥
पहिला हात येऊ दे तुझा सिद्दी तूं हिलाला" ।
पहिला हात जो टाकिला सात हात जमीन उडाला रे हातांमधीं हात त्यानें अठरा टाकीला ।
सुभेदार गुंजभर नाहीं ढळला ॥ "अरे सिद्दी तू हिलाल ।
दुसरा हात येऊं दे तुझा" ॥ सुभेदार बोलला ॥
"संभाळ संभाळ मेरे भाई । आतां हाच येतो सुभेदाराचा ॥
नऊ हात जमीन उडाला । मारा सुभेदारानं केला ॥
बत्तीस वेढे पागोटयाचे । बत्तीस वेढे मंदिलाचे ॥
बेंबीपावेतों चिरित नेला । खुदा रे खुदा बोलला बुध्या धरणीवर पाडिला ॥४६॥

चौक ४७
बोंब्या तेथुनि निघाला । उदेभानापाशीं गेला ॥
"मेरे उदेभान भाई आग लागो तुझ्या चोन्याला । सिंहगड किल्ला डुब होया ।
नऊशें पठाण कापिला । बाच्छाईचा हत्ती कापिला ॥
सीद्दी हिलाल कापिला । हमकु किल्ला डुब होया" ॥
"हम चोन नहीं सोडताई । जावें जळमंदिराला ॥
आहेत बारा जण छोकरे । जावा कल्याणदरवाजाला लढायाला" ।
तुम्हीं जावें लढाईला" ॥ बारा जण भाऊ, केला मरणाचा पोषाग, पांच हत्यारें घेतलीं ।
तेथुन निघाले आले सुभेदाराजवळी ॥ "सलाम सलाम मेरे भाई ।
किस्का तू उमराव सांगावें आम्हांला" ॥ "उमराव शिवाजी महाराजाचा ।
आहे मी तानाजी मालूसरा" ॥ "सुभेदार भाई ।
पहिला हात येऊं दे तुझा" । "तुम्ही आम्हां मोगलांचे बाळक ।
पहिला हात येऊं दे तुमचा " ॥ बारा जण लडक्यांनीं ।
चोवीस हात जे टाकिले ॥ सुभेदार भला ।
त्यानें धांवा अंबेचा मांडला ॥ अंबाबाई तू पाव गे माझ्या नवसाला ।
नऊ हात जमीन उडाला ॥ बारा जण लडक्यांचीं ।
चोवीस खांडोळीं पाडिलीं ॥४७॥

चौक ४८
तेथून बोंब्या निघून गेला । उदेभानाचा जवळ आला ॥
"मेरे उदेभान भाई आग लागो ह्या चोन्याला । सिंहगड किल्ला डुब होया ॥
नऊशें पठाण काटया । बाच्छाईचा हत्ती काटया ॥
सिद्धी हिलाल काटया । तुम्हारे बारा लडके काटया !"
लडक्याचा तो जाब ह्याच्या कानावरतीं गेला ।
उदेभान मोंगल ज्या बिबी xxx बसला होता तेथून उठेनासा झाला ॥
लेंकांचा तो दुःखाचा शब्द । ज्याच्या ऊरामधीं बसला ॥
खरखर लखोटा लिहिला त्या बोंब्यापाशीं दिला ॥
"जाऊन सांगा उमरावाला । उदेभान तो मोंगल पळून पुण्याला गेला ॥
झेंडा लावा सिंहगडाला । यश तुमच्या तलवारीला" ॥४८॥

चौक ४९
उदेभान तेथुन निघाला । आला पिराच्या दरग्याला ॥
फोडल्या कापसाच्या उदी । ओतले तेलाचे बुधले ॥
ज्यानें आग जी लाविली । ज्यानें उजेड तो केला ॥
गलीम किती मोजून पाहिला । पन्नास माणूस पाहून ह्याच्या आलें हिशोबाला ॥
उदेभान माणूस पाहून । त्याच्या भुज्या ज्या थरारल्या ॥
पन्नास माणूस माझी आंबाडाची भाजी मोगल मागें परतला ।
गेला आखाडखान्यामधीं ॥ पायीं तुमानी सुरवारा घातल्या ।
अठरा खंडीचे किनखाप त्यानें आंगांत घातलें ॥ बारा आतबडीचा जोडा ।
त्यानें पायांमधीं घातला ॥ ज्यानें वाघनखें चढविलीं ॥
जिरेटोप डोईस घातला ॥ अठरा जागीं बिब्या ।
हारोहारीनें उभ्या केल्या ॥ सळ पट्टयाचा सोडिला ।
अठरा बिभ्यांची खांडें केलीं ॥ आसुदाचा टिळा ल्याला ।
गाभणीगाई जी काटली ॥ गेला पिराच्या दरग्याला ।
सवामण ऊद जाळिला ॥ एका हातीं गुरदा एका हातीं घेतला पट्टा ।
दोपट्टयाचा मारा केला । आला कल्याणदरवाजाला ।
ज्यानें सलाम वाहिला ॥ दादा नऊशें पठाण ।
ज्यानें दिमतीला घेतला ॥४९॥

चौक ५०
"सलाम मेरे भाई । उंबराव किस्का सांगावा मजला" ॥
"उंबराव शिवाजी महाराजांचा । आहें मी तानाजी सुभेदार" ॥
उंबराव मोगलानें पाहिला । "ऐसा भला आहेस रे दादा ॥
तुज्यासारख्या भाई पाठीला असावा । खाणें घालावें वजिराला वजीर पाळावा बाजूला ॥
सोड महाराजांची चाकरी । कर माझी मोगलाची चाकरी ॥
हवाला देतों सिंहगडाचा । हजार रुपयांची तैनात देतों बसून खायाला" ॥
सुभेदार बोले मोगलाला । "सोड सिंहगडाची गादी ॥
चल माझ्या राजगड किल्ल्याला । चलावे महाराजाचे भेटीला ॥
राजगड किल्ल्याचा हवाला । उदेभाना देतों तुला " ।
एवढया जाबावरुन । घुस्सा आला मोगलाला ॥
"पहिला हात येऊं दे तुझा" । "उदेभान हात येऊं दे तुझा" ॥
तानाजी सुभेदार धांवा अंबेचा मांडिला । धांव धांव अंबाबाई ॥
अंबा त्या बाईनें घोस गाईचा पाहिला । देवी मागें जी सरली ॥
मोगलासमोर उभारिला । गर्भगाळ कोसळला ॥
नऊ हात जमीन उडाला । मोगलाला माराया गेला ॥
हातामधीं हात ज्यानें अठरा टाकिले । गुंजभर नाहीं जो सरला ॥
"ऐका उदेभान मोगला । पहिला हात माझा झाला ॥
दुसरा हात येऊं दे तुझा" । सुभेदार बोलतो "मामा ऐक निर्वाणाची वेळा ॥
लग्न करा रायाबाचें । दोहों हातांचा मुजरा सांगा शिवाजी महाराजाला" ॥
उदेभान मोगल बारा हात जमीन उडाला । वचक सुरबाईचा दाविला मारा कैफाचा केला ।
पन्नास वेढे पागोटयाचे पन्नास वेढे मंदिलाचे बेंबीपावेतों चिरित नेला ।
सुभेदार धरणीला लोटिला ॥५०॥

चौक ५१
पन्नास माणूस, ज्यानें रोजन्या----मांडिल्या, आमच्या सुभेदार धन्या ॥
आम्हाला सांभाळील कोण । आणलेंस वाघाच्या रानाला ॥
मग तो शेलार मामानें । मुर्दा मांडीवर घेतला ॥
उदेभान बोलाया लागला । दादा आपल्या सेनेला ॥
"हात मी नऊशें पठाण । पन्नास माणसें घेऊन जावें॥
कल्याण दरवाजाला ॥ आऊत द्यावी हयांची बुरजाला" ॥
लोक खळखळा रडती कैसें झालें नारायणा । दिन दिन पटयानें वाहिला मारायाला लागला ॥
सुभेदार मेलेला मुरदा इरयानें झाला । ऐशी वर्षांचा तो मामा त्याच्या आंगात संचारला ॥
यश आलें मोगलाला । मोगल मागें जात होता ॥
मग तो सुभेदाराचा पट्टा । शेलार मामानें घेतला ॥
"फीर ग मर्दाचे लंडे फीर ग मर्दाचे लंडे" । मोगल मागे पहात होता ॥
दोहों हातांनीं कचका दिला बेंबीपावता चिरीत नेला ॥ खुदा खुदा बोलला ।
बुधा धरणीला पाडिला ॥ ज्यानें भाव तो आंतला सोडिला मग तो नऊशे पठाण राहीले ॥
नऊशे पठाण । मार माराया लागले ॥
त्यामध्ये एकटा शेलार मामा लढनेवाला । पन्नास माणसांतून पंचवीस माणूस पडला ॥५१॥
 
चौक ५२
नऊशे पठाण बोलाया लागला । चला कल्याण दरवाजाला ॥
आहुत देऊं पंचवीस माणसांची । संकट पडलें अंबाबाईला ॥
प्रतापगडची भवानी । उभी राहीली सांकडयाला ॥
पिवळें पातळ नेसली । गळीं कवडयांची माळा ॥
संकट पडलें देवीला । यश जातें शिवाजीमहाराजाचें ॥
देवीनें आपल्या हातून दरवाजा उघडिला । पन्नास कमी बारा हजार फौज किल्ल्याला घेतली ॥
ज्याचा सूर्याबा तो बंधु । मामाला पुसाया लागला ॥
"शेलार रे मामा । माझा दादा रे कुठे आहे बंधू रे कुठे आहे" ॥
शेलार मामा रे बोलला । जरी मेलासे बोललों तर सारी फौज बसेल ॥
सुभेदार आहे बाले सद्रेमधीं । मी आहे कल्याणदरवाजाला ॥
नऊशे पठाण मारावा । मग जाऊं दादाच्या भेटीला" ॥
मग त्या बारा हजार फौजेने । ज्यानें हर हर वाहिला ॥
एका एकाच्या मागें तिघे तिघे लागले । नऊशे पठाण कापिला ॥
पांढरें निशाण उपटलें । भगवा झेंडा शिवाजीचा ॥
पांच तोफा जों मारिल्या । यशाच्या तोफा जों मारिल्या ॥
त्या तोफांचा आवाज । गेला राजगड किल्ल्याला ॥
शिवाजी महाराज बोलला । माझ्या सुभेदारानें सिंहगड सही केला ॥
शिवाजी महाराजानें । यशाच्या दहा तोफा सोडिल्या ॥५२॥

चौक ५३
ज्याचा सूर्याबा तो बंधू । शेलार मामाला बोलला ॥
चला जाऊ दादाच्या भेटीला । शेलार मामानें सूर्याबा बंधूचे ।
पटे घेतले आपल्या हातामधीं ॥ गेले मुर्द्याचे जवळ ।
वरुन शेला उघडिला ॥ मुर्दा दादाचा पाहिला ।
मुर्दा सुभेदाराचा पाहिला ॥ "माझ्या सुभेदार दादा लग्न रायाबाचं राहिलं ।
ह्याचें लग्न करील कोण" ॥ बारा गेटांचे (मेटांचे) कोळी निघाले ।
आले सुभेदाराजवळ ॥ "आमचा सुभेदार धनी ।
आम्हांला तैनात देईल कोण आम्हांला हवाल देईल कोण" ॥
सुभेदार बोलायाला लागला । "भिऊं नका रे दादांनो ह्या दादाचें वचन पुरें करीन ॥
जातों राजगड किल्ल्याला । सांगतों शिवाजी महाराजाला सिंहगडाचा हवाला देतों तुम्हाला" ॥
अबिर गुलाल । ज्याचे मुर्द्यांत भरला ॥ दोरा रेशमाचा घातला ।
मुर्दा पालखींत ठेविला ॥ पंचवीस कमी बारा हजार लोक सगळे घेतले ।
वाजत गाजत मुर्दा गेला राजगड किल्ल्याला ॥५३॥

चौक ५४
आले किल्ल्याचे पोटाला । पांचकर्णांचा बाजा केला ॥
आवाज महाराजानें घेतला । सुभेदार किल्ला घेऊन आला ॥
सुभेदाराची पालखी । नेली राजाचे सदरेला ॥
शिवाजी महाराजानें । मुर्दा पाहिला सुभेदाराचा ॥
शिवाजीचे राज्यांत । ऐसा उंबराव होणें नाहीं सुभेदारासारखा ।
जिजाबाई धांवत आली । पालखी पाहिली ॥
गर्व आला सुभेदाराला । नाहीं आला भेटायाला ॥
बाई पालखीपाशीं आली । बाईनें शेला उघडिला ॥
मुर्दा सुभेदाराचा पाहिला ॥ आंग धरणीला टाकिलें ॥
"सुभेदारासारखा । ऐसा क्षत्री होणार नाही ॥
बाजू गेली महाराजांची । बाजू गेली शिवाजीची" ॥
मग त्या शिवाजीनें चाकराचे साठीं । डोईला रुमाल बांधला ॥
बारा भोयांचे पालखींत । सुभेदाराचा मुर्दा जो घातला ।
वाजत गाज्त आणला उमराठया गांवाला । ह्याचे लेकाचे भेटीला ॥
पांच कर्णांचा आवाज । रायाबा बेटयानें केला (ऐकला?) ॥
रायाबा बोलतो । बाबा आले माझे लग्नाला ॥
पालखीपाशीं धांवत आला । मुर्दा बाबाचा पाहिला ॥
"साता दिवसांची मुदत ॥ केली माझे लगनाला ॥
बाबा माझें लगीन करील कोण । यजमान होईल बाबा कोण ? मंडपांत मिरवेल कोण ? ॥
आग लागो ह्या लग्नाला । कां माझा बाबा निघून गेला" ॥
शिवाजी राजानें । मुलगा पोटासंगं धरिला ॥
"भिऊं नको माझे बेटा । शिवाजी महाराज तो गेला, तान्हाजी सुभेदार ।
आहे तुला " ॥ बारा दिवसांचे सुतक धरिलें ।
शिवाजी महाराजांनीं सुभेदाराचें ॥५४॥
 
चौक ५५
मग त्या तेराव्या दिवसांत । संयबर बाळाचे मांडिलें ॥
ज्यानें मंडप घातला । मंडपाला तोरण बांधिलें ॥
पहिली नवरी रद्द केली । कडाशीचे दरकराची केली रायबा बेटयाला ॥
संयवर केलें रायाबाचें । रायाबा पुढें तो बसविला ॥
बापाची सरदारी । दिली रायाबा बेटयाला ॥
दिवटया बुदलीची जहागिर । दिली रायाबा बेटयाला ॥
डोणजं तें गांव । दिलें पानसुपारीला ॥
मालुसर्‍याचा दंड । दिला इनाम खायाला ॥
रायाबा तो बेटा । ज्यानें संगतिला घेतला ।
आले राजगड किल्ल्याला ॥ ज्यानें पंतोजी तो काका ।
ज्यानें हुजर्‍या बोलविला ॥ "पंतोजी तो काका ।
जावें पुण्याचे शहराला ॥ मंडईच्या बाजारीं ।
आहे तुळशीदास शाहीर ॥ घेऊन यावें त्याला ।
राजगड किल्ल्याला" ॥ तुळशीदास शाहिर ।
त्यानें सदरेला आणिला ॥ डफ तुणतुणें घेऊन ।
मग त्या तान्हाजी सुभेदाराला ॥ शिवाजी महाराजांचा ।
पोवाडा कटिबंध केला ॥ हजार रुपयांचा तोडा ।
हातामधीं घातला त्या रे तुळशीदास शाहीराच्या ॥ शूरमर्दाचा पोवाडा ।
शूरमर्दानें ऐकावा ॥ शिवाजीचे राज्यांत ।
ऐसा उमराव होणें नाहीं ॥ पोवाडा गात्याला उद्राण ऐकत्याला घडो पुण्य ।
सत्य युगींचा पोवाडा कलयुगीं वर्तला ॥ सत्तावीस किल्ल्यांचा सरदार निघूनशानी गेला ।
ऐसा पुनः होणें नाहीं ॥५५॥