Thursday, June 28, 2012

हरिविजय - अध्याय १०


अध्याय १०


 श्रीगणेशाय नमः ॥  श्रीकुलदेवतायै नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥
जय जय सिंहाद्रिवासा ॥ त्रिगुणातीता परमहंसा ॥ अत्रिनंदना परमहंसा ॥ लीलावेषा दिगंबरा ॥१॥
जय जय सर्गस्थित्यंतकारणा ॥ दत्तात्रेया मुनिमानसरंजना ॥ अमलदलराजीवनयना ॥ जगद्‌भूषणा जगद्‌गुरो ॥२॥
कैवल्यज्ञानदायका अवधूता॥ अवयवरहिता मायातीता ॥ भक्तजनपालका अव्यक्ता ॥ अपरिमिता निरंजना ॥३॥
सकळ योगियांत शिरोमणी ॥ सच्चिदानंद मोक्षदानी ॥ तो दिगंबर कटीं कर ठेवुनी ॥ पंढरीये उभा असे ॥४॥
जें वेदांचें निजसार ॥ जें सकळ शास्त्रांचें जिव्हार ॥ तो हा भीमातीरीं दिगंबर ॥ अति उदार सर्वात्मा ॥५॥
स्तंभें न उचले गगन ॥ न करवे अवनीचें वजन ॥ समुद्राचें किती जीवन ॥ नव्हे प्रमाण सर्वथा ॥६॥
तैसे तुझे अपार गुण ॥ शिव विरिंचि नेणती महिमान ॥ तेथें मी एक एकजिव्हें करुन ॥ काय गुण वर्णूं तुझे ॥७॥
हरिविजयग्रंथसार ॥ अवधूतांचें निजमंदिर ॥ तेथें दूषणश्वान अपवित्र ॥ प्रवेशेल कोठोनियां ॥८॥
असो नवमाध्यायीं कथन ॥ गोपी नावेंत बैसोन ॥ नौका बुडतां जगज्जीवन ॥ रक्षी पूर्ण गोपींतें ॥९॥
जो पांचां सहांवेगळा जाणा ॥ न ये पंचास्याच्या ध्याना ॥ तो वैकुंठपीठींचा राणा ॥ पांचां वर्षांचा जाहला ॥१०॥
गोपी म्हणती यशोदे सती ॥ वत्सें चाराया धाडी श्रीपती ॥ सवें देऊनि धाकुटे सांगाती ॥ वनाप्रती धाडीं कां ॥११॥
गांवांत असतां मुरारी ॥ घरोघरीं करितो चोरी ॥ सवें देऊनि सिद्ध शिदोरी ॥ पाठवावा वनातें ॥१२॥
असो प्रातःकाळीं उठोनियां ॥ माता म्हणे ऊठ प्राणसखया ॥ जाई वत्सें चारावया ॥ काननाप्रतीं गोविंदा ॥१३॥
सवें घेऊनि धाकुटया गोवळां ॥ सकळ वत्सें करुनि गोळा ॥ राजबिदीवरुनि सांवळा ॥ वना चालिला जगदात्मा ॥१४॥
वाद्यें वाजताती गंभीर ॥ मोहर्‍या पांवे सुस्वर ॥ टाळमृंगांचे झणत्कार ॥ करिती गजर स्वानंदें ॥१५॥
तेथें मृगांकमरीच्याकारें ॥ ढाळिताती दोहींकडे चामरें ॥ हरीवरी पल्लवछत्रें ॥ चिपणे गोपाळ धरिताती ॥१६॥
चिमणा श्रीकृष्ण सांवळा ॥ चिमणा पीतांबर कांसे कसिला ॥ चिमणी बरी कटीं मेखळा ॥ विद्युत्प्राय झळकतसे ॥१७॥
चिमण्या वांकी नेपुरें रुणझुणती ॥ मजा पाहात वेदश्रुती ॥ न वर्णवे निर्गुणाची कीर्ती ॥ म्हणोनि सगुणीं जडल्या त्या ॥१८॥
चिमणीच हातीं मुरली ॥ तेथें चित्तवृत्ति समूळ मुराली ॥ मिथ्या माया सकळ हरली ॥ चिमणी सांवळी मूर्ति पाहतां ॥१९॥
चिमणीच घोंगडी शोभली ॥ दशियांप्रती मोत्यें ओंविलीं ॥ चिमणाच वेत करकमळीं ॥ कमलनयनें धरिलासे ॥२०॥
चिमणे गळां मोत्यांचे हार ॥ चिमण्या क्षुद्रघंटांचा गजर ॥ गळां वनमाळांचे भार ॥ शोभे किशोर नंदाचा ॥२१॥
मूर्ति सांवळी गोमटी ॥ अंगीं शोभे केशराची उटी ॥ टिळक रेखिला ललाटीं ॥ रत्‍नें मुकुटीं झळकती ॥२२॥
कर्णीं कुंडलें मकराकार ॥ नेत्र आकर्ण अतिसुकुमार ॥ मंदास्मितवदन सुंदर ॥ रमावर शोभतसे ॥२३॥
भोंवते सखे गाती निर्भर ॥ मृदंग वाजती सुस्वर ॥ मध्यें पांवा वाजवी श्रीधर ॥ महिमा अपार न वर्णवे ॥२४॥
गोपिका आणि यशोदा सती ॥ हरीस बोळवीत जाताती ॥ माता म्हणे श्रीपती ॥ झडकरीं येईं माघारा ॥२५॥
गोपांसमवेत जगन्निवास ॥ आला तमारिसुतेचे तीरास ॥ नाना खेळ लीलाविलास ॥ पुराणपुरुष दावीतसे ॥२६॥
यावरी काननीं जगदुद्धार ॥ दिवस आला दोन प्रहर ॥ शिदोर्‍या मेळवूनि समग्र ॥ काला थोर मांडिला ॥२७॥
कमलपत्राकार गोपाळ ॥ मध्यें मिलिंद तमालनीळ ॥ कीं निधानाभोंवते साधक सकळ ॥ साधावया बैसती ॥२८॥
कीं फणिवरीं वेष्टिला चंदन ॥ कीं विबुधीं वेष्टिला सहस्त्रनयन ॥ कीं वराभोंवते संपूर्ण ॥ वर्‍हाडी जैसे बैसले ॥२९॥
कीं अनर्घ्य रत्‍नाजवळी ॥ मिळाली परीक्षकमंडळी ॥ कीं कनकाद्रीभोंवते सकळी ॥ कुलाचल बैसले ॥३०॥
कीं मानससरोवर निर्मळ ॥ त्याभोंवते बैसती मराळ ॥ कीं वेष्टूनियां जाश्वनीळ ॥ तपस्वी बैसती प्रीतीनें ॥३१॥
कीं श्रीकृष्ण सूर्यनारायण ॥ गोप ते किरण प्रकाशघन ॥ कीं हरिचंद्रास वेढून ॥ उडुगण गोप बैसले ॥३२॥
आपुल्या शिदोर्‍या संपूर्ण ॥ हरीपुढें ठेविती आणून ॥ एकीं मांडेच आणिले जाण ॥ अंतर्बाह्य गोड जे ॥३३॥
एकीं आणिली गुळवरी ॥ एकाचा दहींभात भाकरी ॥ एकाची ते शिळीच शिदोरी ॥ सोडोनियां बैसले ॥३४॥
कोंडयाची भाकरी एक सोडीत ॥ एकाचा ताकभात झिरपत ॥ एकाची शिदोरी विटली समस्त ॥ चवी न लागे जेवितां ॥३५॥
सकळांसी म्हणे हरि तेव्हां ॥ आपुलें वाढिलें उगेच जेवा ॥ दुसर्‍याचा नका करुं हेवा ॥ मनोभावापासुनी ॥३६॥
आपुलें पूर्वकर्म नीट नाहीं ॥ दुसर्‍याचा हेवा करुनि काई ॥ जें पेरिलें तें लवलाहीं ॥ बाहेर उगवोनि ठसावे ॥३७॥
असो काला करितां मुरारी ॥ त्यांतून पेंधा उठे झडकरी ॥ आणिक वृक्षच्छायेसी निर्धारीं ॥ जाऊनियां बैसला ॥३८॥
वेगळेंच थोंब तयानें केलें ॥ गोप आपणाकडे फोडिले ॥ एक एक अवघेच गेले ॥ टाकून एकले हरीसी ॥३९॥
गोपाळ म्हणती हृषीकेशी ॥ काय सुख तुझे संगतीसी ॥ नसतें जीवित्व आम्हांस देसी ॥ फेरे चौर्‍यायशीं भोगावया ॥४०॥
तूं आधीं एकला निर्गुण ॥ तुज पुसत होतें तरी कोण ॥ मग आम्हीं तुज सगुण ॥ करुनि आणिलें आकारा ॥४१॥
आम्हीं तुज नांवरुपा आणिलें ॥ महत्त्व चहुंकडे वाखाणिलें ॥ तुज थोरपण आम्हीं दिधलें ॥ तुंवा वेगळें केलें आम्हां ॥४२॥
तूं परब्रह्म मायेपरता ॥ आणि जीवदशा आमुचे माथां ॥ तूं अक्षय अचल अनंता ॥ नाना पंथां पिटिसी आम्हां ॥४३॥
तूं जाहलासी निर्विकार ॥ आम्हांसी लाविले नाना विकार ॥ तूं ब्रह्मानंद परात्पर ॥ निरय घोर आम्हांसी कां ॥४४॥
तूं देवाधिदेव आत्माराम ॥ तूं चराचरबीजफलद्रुम ॥ आमुच्या पाठीं क्रोध काम ॥ दुर्जन परम लाविले ॥४५॥
तूं अज अजित अचल ॥ आम्हां केलें सदा चंचल ॥ तूं ज्ञानरुप अतिनिर्मळ ॥ अज्ञान सबळ आम्हांसी कां ॥४६॥
तूं महाराज नित्यमुक्त ॥ आम्हां केलें विषयासक्त ॥ तूं मायेहूनि अतीत ॥ अविद्यावेष्टितत्व आम्हांसी कां ॥४७॥
महामुनी सोंवळे मुरारी ॥ ते तुज चिंतिती अंतरीं ॥ आम्हांसी न शिकवी क्षणभरी ॥ ऐसी परी तुवां केली ॥४८॥
तूं मदनमनोहर पुतळा ॥ आम्ही वांकडे विरुप अवकळा ॥ तुझे बोल लागती सकळां ॥ आमुच्या बोला हांसती ॥४९॥
ऐसें बोलोनि गोवळे ॥ अवघे पेंध्याकडे गेले ॥ मग तेणें घननीळें ॥ काय केलें ऐका तें ॥५०॥
आपण येऊनि गोपांजवळी ॥ उभा ठाकला वनमाळी ॥ तंव ते मिळोनि सकळी ॥ बळें दवडिती हरीतें ॥५१॥
म्हणती तूं नलगेसी आम्हांतें ॥ म्हणोनि माघारें लोटिती हातें ॥ हरि काकुळती ये तयांतें ॥ मी तुम्हांतें न विसंबें ॥५२॥
तुम्ही बोलाल जें वचन ॥ त्यासारिखा मी वर्तेन ॥ सांगाल तेंचि मी करीन ॥ तुम्हांविण न गमे मज ॥५३॥
मत्स्यकूर्मादि अवतार ॥ तुम्हांलागीं घेतले साचार ॥ सूकरनरसिंहरुपें सुंदर ॥ तुम्हांलागीं धरिलीं म्यां ॥५४॥
पाळावया तुम्हांलागुनी ॥ म्यां निःक्षत्री केली अवनी ॥ पौलस्त्यकुळ निर्दाळुनी ॥ रक्षिलें म्यां तुम्हांतें ॥५५॥
ऐसा मी निजभक्त साहाय्यकारी ॥ मज कां दडवितां ये अवसरीं ॥ ऐसें बोलतां हरीचे नेत्रीं ॥ अश्रु वाहती भडभडां ॥५६॥
ऐसें तें क्षणीं देखोनी ॥ पेंधा धांवोनि लागे चरणीं ॥ आपुल्या नेत्रोदकेंकरुनी ॥ हरिपदीं केला अभिषेक ॥५७॥
गडी स्फुंदत बोलती तेव्हां ॥ वैकुंठपाळा गा माधवां ॥ आम्ही तुज दडवूनि केशवा ॥ ठकलों होतों सर्वस्वें ॥५८॥
असो हरीस मध्यें बैसवूनी ॥ काला मांडिला ते क्षणीं ॥ आपुल्या हातें चक्रपाणी ॥ कवळ देत निजभक्तां ॥५९॥
गडी म्हणती जगन्मोहना ॥ आधीं ग्रास घे तूं जनार्दना ॥ हरि म्हणे तुम्हांविना ॥ ग्रास न घें मी सर्वथा ॥६०॥
मग म्हणती गोपाळ ॥ तुजविण ग्रास न घेऊं सकळ ॥ रुसोनि चालिला घननीळ ॥ जो वेल्हाळ वैकुंठींचा ॥६१॥
गोपाळ धांवोनि लागती पायां ॥ बैसे बैसे रे भक्तसखया ॥ तुझेंच ऐकूं म्हणोनियां ॥ कान्हयालागीं बैसविलें ॥६२॥
आधीं भक्तीं घेतला ग्रास ॥ तैं शेष सेवी जगन्निवास ॥ जो परात्पर पुराणपुरुष ॥ लीला अगाध दावीतसे ॥६३॥
ऐसा नित्यकाळ यमुनातीरीं ॥ काला करीत पूतनारी ॥ आपुल्या हातें शिदोरी ॥ वांटी हरि सकळांतें ॥६४॥
गडी म्हणती ते समयीं ॥ आमुचा ग्रास तूं घेईं ॥ तुझा ग्रास लवलाहीं ॥ आम्हीं घेऊं गोविंदा ॥६५॥
मीपण आणि तूंपण ॥ या दोहींचा ग्रास करुन ॥ मग रुचि कैंची संपूर्ण ॥ अनुभवेंकरुन पहावें ॥६६॥
गोपाल करिती करपात्रें ॥ त्यांत कवळ ठेविले राजीवनेत्रें ॥ आलें लोणचीं चित्रविचित्रें ॥ अंगुलिकासंधीं धरिताती ॥६७॥
मजा पहात ते परमहंस ॥ भोंवतें बैसले सदा उदास ॥ जैसें मानस वेष्टितीं राजहंस ॥ मुक्त सेवूं बैसले ॥६८॥
मध्यें बैसला भुवनसुंदर ॥ भोंवते गोपाळ दिगंबर ॥ मानापमान समग्र ॥ दोन्ही नेणती सर्वथा ॥६९॥
जैसी श्वानाची विष्ठा ॥ तैसी त्यांत वाटे प्रतिष्ठा ॥ तरीच पावले वरिष्ठा ॥ श्रीवैकुंठा हरीतें ॥७०॥
असो हरिमुखीं कवळ ॥ सकळ घालिती गोपाळ ॥ उरलें तें शेष गोवळ ॥ स्वयें घेती प्रीतीनें ॥७१॥
तों सकल निर्जर ते वेळीं ॥ विमानीं पाहती अंतराळीं ॥ तो ब्रह्मानंद वनमाळी ॥ काला कैसा करीतसे ॥७२॥
ब्रह्मा म्हणे ब्रह्मपद जाळावें ॥ गोकुळीं निरंतर बसावें ॥ इंद्र म्हणे रमाधवें ॥ कां येथें गोविलें आम्हांसी ॥७३॥
बोलती शसी सूर्य दोघेजण ॥ आम्हां कृष्णें लाविलें भ्रमण ॥ आपण गोकुळीं अवतरोन ॥ भक्तजन मुक्त केले ॥७४॥
तेथींचा प्रसादकवळ ॥ जरी आम्हांसी प्राप्त केवळ ॥ तरी मुक्त होऊं तत्काळ ॥ मायाचक्रापासूनि ॥७५॥
मग देव म्हणती एक करावें ॥ मत्स्य होऊनि अवघीं जावें ॥ मित्रकन्याहृदयीं रहावें ॥ प्रेमें तळपावें सादर ॥७६॥
गडियांसमवेत श्रीधर ॥ हस्तप्रक्षालना येईल जगदुद्धार ॥ तें शेष सेवूनि उद्धार ॥ सर्वहीं करुं आपुला ॥७७॥
सुरवर ऐसें बोलोन ॥ कालिंदीजीवनीं जाहले मीन ॥ तें एक जाणे जगज्जीवन ॥ अंतरखूण तयांची ॥७८॥
तों गडी म्हणती जगज्जीवना ॥ चला जाऊं यमुनाजीवना ॥ मग तो वैकुंठपीठींचा राणा ॥ काय बोले तयांतें ॥७९॥
हरि म्हणे तृषा लागली जरी ॥ तरी तक्र प्यावें निर्धारीं ॥ अथवा दुग्धचि प्यावें वरी ॥ परी नव जावें यमुनेतें ॥८०॥
हरि म्हणे गडियांतें ॥ हात पुसावे घोंगडियांतें ॥ ऐसें म्हणतां कान्हया तें ॥ तेंचि सर्वांते मानले ॥८१॥
गडी म्हणती जगज्जीवना ॥ कां आवर्जिली बा यमुना ॥ कोण्या विचारें मधुसूदना ॥ कोप धरिला तिजवरी ॥८२॥
मग म्हणे हृषीकेशी ॥ बा रे तेथें आली आहे विवशी ॥ ते धरुनि नेईल सकळांसी ॥ मी जावया भितों तेथें ॥८३॥
तंव पेंधा बोले वचन॥ तरी मी यमुनेसी जाईन ॥ जीवन अगत्य सेवीन ॥ आपुल्या करें करोनियां ॥८४॥
हरि म्हणे रे पेंधिया ॥ नसताचि घेऊं नको थाया ॥ तंव तो म्हणे प्राणसखया ॥ मी सर्वथा न राहें ॥८५॥
हरि म्हणे पेंधियासी ॥ तुज ग्रासील रे विवशी ॥ तरी गेळ्यानें कडेसी ॥ पाणी काढूनि सेविंजे ॥८६॥
मग पेंधा ते अवसरीं ॥ वेगें आला यमुनातीरीं ॥ न्याहाळूनि पाहे यमुनानीरीं ॥ विवशी कोठें म्हणोनियां ॥८७॥
तों यमुनाजीवनाचा खळाळ ॥ कानीं पेंधा ऐके तुंबळ ॥ गेळ्या खालता ठेविला तत्काळ ॥ जाळें माजीं आंवळिलें ॥८८॥
पेंधा म्हणे यमुनेसी ॥ तूं बायको होऊनि आम्हांसीं ॥ हमामा आजि घालिसी ॥ कैसी तगसी पाहीन आतां ॥८९॥
जरी मी कृष्णदास असेन सत्य ॥ तरीच तुज करीन शांत ॥ म्हणोनि हमामा त्वरित ॥ मांडियेला यमुनेसीं ॥९०॥
मग खळाळासीं पेंधा ॥ हमामा घालितां न राहे कदा ॥ तें कदंबातळीं गोविंदा ॥ आनंदकंदा समजलें ॥९१॥
कृष्ण म्हणे गडियांसी ॥ पेंधा गेला यमुनेसी ॥ तेथें आधींच होती विवशी ॥ गति कैसी जाहली ॥९२॥
समाचारासी गडी धाडिले ॥ तेही पेंधियासीं साह्य जाहले ॥ म्हणती आम्हांसी इणें लाविलें ॥ कृष्णभक्तांसी खळखळ ॥९३॥
आणिक समाचारासी गडी धाडिले ॥ तेही तेथेंचि गुंतले ॥ आणिक मागून पाठविले ॥ तेही जाहले साह्य पैं ॥९४॥
आले अवघे नव लक्ष गडी ॥ बळकाविली यमुनाथडी ॥ हमामा घालिती कडोकडीं ॥ मेटाखुंटीं येऊनियां ॥९५॥
पेंधियासी पाठिराखे ॥ मिळाले नव लक्ष सखे ॥ घाई हमाम्याची देखें ॥ एकसरें मांडिली ॥९६॥
जैसी मांडे रणधुमाळी ॥ तैसी हमाम्याची घाई गाजली ॥ सर्वांच्या मुखांस खरसी आली ॥ परी न सांडिती आवांका ॥९७॥
प्राण जाहले कासाविस ॥ परी कदा न येती हारीस ॥ जे सकळ सुरांचे अंश ॥ गोपवेषें अवतरले ॥९८॥
हे रामावतारीं वानर होऊन ॥ केलें लंकेसी रणकंदन ॥ जिंहीं दशकंधर त्रासवून ॥ रामचंद्र तोषविला ॥९९॥
तेचि हे गोकुळ गोपाळ ॥ पुन्हां अवतरले सकळ ॥ जरी राहील यमुनेचें जळ ॥ तरी उगे राहतील हे ॥१००॥
कदंबातळीं नंदनंदन ॥ एकला उरला जगज्जीवन ॥ मुरली हातीं घेऊन ॥ वेगे आला यमुनातीरा ॥१॥
कौतुक पाहे श्रीहरी ॥ गडी नाहींत देहावरी ॥ मग म्हणे मुरारी ॥ कां रे व्यर्थ शीणतां ॥२॥
आतां कां करितां श्रमा ॥ खळाळासीं घालितां हमामा ॥ तेथें नाहीं स्त्रीपुरुषप्रतिमा ॥ कैसें तुम्हां न कळेचि ॥३॥
ऐसें बोले शेषशायी ॥ परी प्रत्युत्तर ते समयीं ॥ कदा न देती कोणी कांहीं ॥ थोर घाई हमाम्याची ॥४॥
कृष्ण म्हणे जरी न राहे यमुना ॥ तरी तेथें समर्पिती प्राणा ॥ ऐसें जाणोनि वैकुंठराणा ॥ काय करिता जाहला ॥५॥
जो निजजनप्राणरक्षक मुरारी ॥ जो त्रिभुवनमोहन पूतनारी ॥ तत्काळ मुरली वाजविली अधरीं ॥ नादें भरी गगनातें ॥६॥
मुरली वाजवितां मुरलीधर ॥ सकळांची वृत्ती मुरली समग्र ॥ मुराले सकळांचे अहंकार ॥ मुरहरें थोर वेधिलें ॥७॥
मनोहर ध्वनि उमटती ॥ जैशा वेदश्रुती गर्जती ॥ नकुल भोगी विचरती ॥ एके ठायीं तेधवां ॥८॥
व्याघ्र आणि गाई ॥ निर्वैर चरती एके ठायीं ॥ गजकेसरींस वैर नाहीं ॥ थोर नवलाई हरीची ॥९॥
प्राणी स्थिर राहिले चराचर ॥ शांत जाहलें यमुनेचें नीर ॥ मुरलींत म्हणे मुरहर ॥ गडे हो स्थिर रहा आतां ॥११०॥
यमुना भिऊनि पळाली ॥ सावध होऊनि पहा सकळी ॥ तें पेंधियानें ऐकिलें ते वेळीं ॥ शांत जाहली यमुना ते ॥११॥
मांडी थापटोनि पळाली सहजी ॥ पेंधा आपणातें नांवाजी ॥ मग म्हणे भला मी पेंधाजी ॥ बळिया आढय जन्मलों ॥१२॥
पेंधा म्हणे पहा चक्रपाणी ॥ यमुना पळविली येच क्षणीं ॥ मग बोले त्रिभुवनज्ञानी ॥ तुमची करणी अगाध ॥१३॥
तुम्ही बळकट गोपाळ ॥ तुम्हांसी देखतां विटे काळ ॥ ऐसें बोले वैकुंठपाळ ॥ गडी हांसती गदगदां ॥१४॥
गडियांसमवेत वनमाळी ॥ वेगें परतला सायंकाळीं ॥ देव मत्स्य जाहले यमुनाजळीं ॥ तेही गेले स्वस्थाना ॥१५॥
गोधनें घेऊनि सांजवेळे ॥ परतला परब्रह्म सांवळें ॥ सवें वेष्टित गोवळे ॥ नाना वाद्यें वाजवती ॥१६॥
कल्याण गौडी श्रीराग ॥ मुरलींत आळवी श्रीरंग ॥ वसंत पावक पद्म सुरंग ॥ नीलांबर राग वाजवीत ॥१७॥
कनकदंडश्वेतचामरें ॥ गोप ढाळिती वरी आदरें ॥ झळकताती पल्लवछत्रें ॥ एक तुंगारपत्रें वाजविती ॥१८॥
आरत्या घेऊनि गोपिका ॥ सामोर्‍या येती वैकुंठनायका ॥ निंबलोण उतरिती देखा ॥ हरीवरुनि प्रीतीनें ॥१९॥
निजमंदिरांत येतां जगजेठी ॥ टाकोनियां घोंगडी काठी ॥ धांवोनि यशोदेच्या कंठीं ॥ घातली मिठी श्रीहरीनें ॥१२०॥
बळिरामें रोहिणीच्या गळां ॥ मिठी घातली ते वेळां ॥ एक गौर एक सांवळा ॥ दाविती लीला भक्तांतें ॥२१॥
ते साक्षात शेष नारायण ॥ यशोदेनें पूजिले दोघेजण ॥ दोघांसी करवूनि मार्जन ॥ माया आपण टिळक रेखी ॥२२॥
रत्‍नजडित पदकमाळा ॥ घातल्या दोघांचियां गळां ॥ चिमणा पीतांबर पिंवळा ॥ कांसे कसिला मायेनें॥२३॥
षड्रस अन्न वाढूनी ॥ आणिती जाहली रोहिणी ॥ माया आपुल्या हातेंकरुनी ॥ ग्रास घाली दोघांतें ॥२४॥
नाना क्रतु करितां करितां ॥ जो न घे अवदानें सर्वथा ॥ तो यशोदेच्या हाता ॥ पाहुनि मुख पसरीत ॥२५॥
झाडोनियां मंचक ॥ वरी पाटोळा क्षीरोदक ॥ शेष नारायण देख ॥ दोघे तेथें पहुडती ॥२६॥
क्षीरसागरींचीं निधानें ॥ शेजे निजविलीं मायेनें ॥ अनंत जन्में तपाचरणें ॥ केली होतीं याचलागीं ॥२७॥
असो उठोनि प्रातःकाळीं ॥ माया जागें करी वनमाळी ॥ कोमलहस्तें तें वेळीं ॥ थापटीत यशोदा ॥२८॥
ऊठ वेगें गोविंदा ॥ जगन्माहेना आनंदकंदा ॥ पुराणपुरुषा ब्रह्मानंदा ॥ गडी पाहती वाट तुझी ॥२९॥
जागा जाहला त्रिभुवनपती ॥ माता धरीं हृदयीं प्रीतीं ॥ तों बळिभद्र महामती ॥ उठता झाली ते क्षणी ॥१३०॥
मुख प्रक्षाळूनि ते क्षणीं ॥ दोघां जेववी नंदराणी ॥ हरीनें पांवा करीं घेऊनी ॥ आळवीत गोपाळां ॥३१॥
प्राणसखे हो चला त्वरित ॥ वेगें जाऊं काननांत ॥ वत्सें गोळा करुं समस्त ॥ गोप धांवती तेधवां ॥३२॥
गौळिणींसहित यशोदा ॥ बोळवीत जाय सच्चिदानंदा ॥ ज्याचें स्वरुप शेषवेदां ॥ ठायीं न पडे सर्वथा ॥३३॥
वाद्यें वाजविती गोवळे ॥ मध्यें पूर्णब्रह्म मिरवलें ॥ पाहतां गोपींचे डोळे ॥ पातीं ढाळूं विसरले ॥३४॥
पुढें जाती वत्सांचे भार ॥ ते वत्सरुपें सकल ऋषीश्वर ॥ पाळूनियां सर्वेश्वर ॥ उद्धरीत तयांतें ॥३५॥
तंत वितंत घन सुस्वर ॥ वाद्यें वाजविती परम मधुर ॥ मध्यें नाचत श्रीधर ॥ जें त्रिभुवनसुंदर रुपडें ॥३६॥
देवांचे अवतार गोप ॥ वत्से तितुके ऋषीश्र्वररुप ॥ सवें घेऊनि यादवकुलदीप ॥ वनांतरीं हिंडतसे ॥३७॥
धन्य गोपाळांचें तप थोर ॥ वश केला जगदुद्धार ॥ जो योगिमानसहृदयविहार ॥ न कळे पार वर्णितां ॥३८॥
मध्यें श्रीकृष्ण पांवा वाजवी ॥ जो आदिपुरुष मायालाघवी ॥ नाना अवतारभाव दावी ॥ नृत्य करितां स्वानंदें ॥३९॥
टाळ मृदंग मोहरिया ॥ पांवे श्रृंगें घुमरिया ॥ रुद्रवीणे पिनाकिया ॥ वाजविती सुस्वरें ॥१४०॥
घमंडी टाळांची घाई ॥ करटाळिया फडकती पाहीं ॥ गाती नाना गती लवलाहीं ॥ नाकें वाजविती वीणा एक ॥४१॥
नाना श्वापदें बाहती वनीं ॥ त्यांसीच देती प्रतिध्वनी ॥ एक वृक्षावरी वानर होऊनी ॥ बळें शाखा हालविती ॥४२॥
एक देती बळें भुभुःकार ॥ तेणें नादावलें अंबर ॥ एक म्हणती लंकानगर ॥ आम्हींच पूर्वीं जाळिलें ॥४३॥
नाना परींचे टिळे रेखिले ॥ वृक्षडाहाळे शिरीं खोंविले ॥ एक वृक्षावरी गाती चांगले ॥ लीला अपार हरीची ॥४४॥
एक गायनाचा छंद पाहोन ॥ तैसीच तुकाविती मान ॥ एक टिरीचा मृदंग करुन ॥ वांकुल्या दावीत वाजवीत ॥४५॥
खालती लक्षूनियां एक ॥ वरुनि फळें हाणिती देख ॥ मयूरपिच्छें शिरीं कित्येक ॥ अति सतेज झळकती ॥४६॥
एक बैसोनि वृक्षावरी ॥ मयूराऐसाचि ध्वनि करी ॥ एक मंडूक होऊनि निर्धारीं ॥ अवनीवरी उडताती ॥४७॥
एक मांजराऐसा गुर्गुरी ॥ एक कच्छ होऊनि रांगती पृथ्वीवरी ॥ एक वृषभ होऊनि धरणीवरी ॥ धांवताती तुडवावया ॥४८॥
एक दृढ आसन घालिती ॥ चरणांगुष्ठ करीं धरिती ॥ दोघे उचलोनि त्यास नेती ॥ मग बैसती दुजे स्थानीं ॥४९॥
गुंजमाळा गळां आरक्त ॥ वनमाळा डोलती पादपर्यंत ॥ तुळसीमाळा सुवासित ॥ परिमळत वन तेणें ॥१५०॥
एक खेळती चेंडूफळी ॥ एक वावडी उडविती निराळीं ॥ एक लंपडाईत वेळीं ॥ नेत्र झांकून खेळती ॥५१॥
भोंवरा विटीदांडू चक्रें ॥ एक हमामा घालिती गजरें ॥ हुतुतु हुमली एकसरें ॥ गोप घालिती आवडीं ॥५२॥
एक बळें झोंबी घेऊनी ॥ एक एकासी पाडिती मेदिनीं ॥ एक सुरवाती टाकूनी ॥ म्हणती शोधूनि काढा रे ॥५३॥
हे रामवतारीं बहु श्रमले ॥ युद्ध करितां लंकेसी भागले ॥ म्हणोनि गोकुळीं ये वेळे ॥ ब्रह्मानंदें क्रीडती ॥५४॥
पूर्वीं हे निराहार होते ॥ म्हणोनि जेविती हरीसांगातें ॥ आपुल्या हातें रमानाथें ॥ ग्रास त्यांस घातले ॥५५॥
असो वनीं खेळे जगदात्मा ॥ वृक्ष भेदीत गेले व्योमा ॥ त्या छायेसी शिवब्रह्मा ॥ क्रीडा करुं इच्छिती ॥५६॥
अशोक वृक्ष उतोतिया ॥ रायआंवळे आंबे खिरणिया ॥ निंब वट पिंपळ वाढोनियां ॥ सुंदर डाहाळिया डोलती ॥५७॥
डाळिंबी सुपारी सायन मांदार ॥ चंदन मोहवृक्ष अंजीर ॥ चंपक जाई परिकर ॥ बकुल मोगरे शोभती ॥५८॥
शेवंती जपावृक्ष परिकर ॥ तुळसी करवीर कोविदार ॥ कनकवेली नागवेली सुंदर ॥ पोंवळवेली आरक्त ॥५९॥
कल्पवृक्ष आणि कंचन ॥ गरुडवृक्ष आणि अर्जुन ॥ वाळियाचीं बेटें सुवासें पूर्ण ॥ कर्पूरकर्दळी डोलती ॥१६०॥
द्राक्षामंडप विराजती ॥ शतपत्रें कल्हारें विकासती ॥ वृक्षांवरी चढती मालती ॥ बदरी डोलती फलभारें ॥६१॥
शाल तमाल पारिजातक ॥ शिरस आणि रायचंपक ॥ फणस निंबोणी मातुलिंग सुरेख ॥ कळंब महावृक्ष सुंदर ॥६२॥
नारिंगी बिल्व देवपाडळी ॥ देवदारवृक्ष नभमंडळीं ॥ अगरु कृष्णागरु सुवासमेळीं ॥ नभःस्थळीं परिमळती ॥६३॥
जायफळ वृक्ष सुंदर ॥ लवंगी नाना लता परिकर ॥ येत सुंगध मलयसमीर ॥ रुंजती भ्रमर कमलांवरी ॥६४॥
कपित्थ ताड सुंदर वाढले ॥ सूर्यवृक्ष टवटवले ॥ औंदुबर सदा फळले ॥ इक्षुदंड रसभरित ॥६५॥
मयूर चातकें बदकें ॥ कस्तूरीमृग जवादी बिडलकें ॥ राजहंस नकुळ चक्रवाकें ॥ अतिकौतुकें विचरती ॥६६॥
कोकिळा आळविती पंचमस्वर ॥ विपिन तें सुवासिक मनोहर ॥ ऐसिया वनांत श्रीधर ॥ वत्सभार चारीतसे ॥६७॥
दिवस आला दोन प्रहर ॥ वृक्षच्छायेसी समग्र ॥ वत्सें गोळा करुनि जगदुद्धार ॥ कदंबातळीं बैसला ॥६८॥
काला मांडिला घननीळें ॥ गोप भोंवतें वेष्टूनि बैसले ॥ सकळ सुरवर पातले ॥ विमानीं बैसोनि पाहावया ॥६९॥
वत्सें जीं होतीं गोळा केलीं ॥ तीं चरत चरत दूर गेलीं ॥ कमळासनें देखोनि ते वेळीं ॥ मनामाजी आवेशला ॥१७०॥
म्हणे श्रीकृष्ण पूर्ण अवतार ॥ किंवा अंशरुप आहे साचार ॥ हा पुरता पाहूं विचार ॥ मांडिलें चरित्र कमलोद्भवें ॥७१॥
येऊनियां वृंदावनीं ॥ परमेष्ठी अवलोकी नयनीं ॥ म्हणे वत्सें न्यावीं चोरुनी ॥ करील करणी कैसी पाहूं ॥७२॥
हा पयःसागरनिवास ॥ जरी असे पुराणपुरुष ॥ तरी प्रताप दावील विशेष ॥ अति अद्‌भुत मजलागीं ॥७३॥
जरी हा असेल माझा जनिता ॥ तरी प्रत्यया येईल मज आतां ॥ ऐसें कल्पूनि विधिता ॥ वत्सें नेलीं क्षणमात्रें ॥७४॥
आपली माया वरी घातली॥ सत्यलोकीं नेऊनि लपविलीं ॥ तों इकडे सच्चिदानंद वनमाळी ॥ काला वांटीत बैसला ॥७५॥
नाना प्रकारचीं लोणचीं ॥ ज्यांची देवही नेणती रुची ॥ चवी पहावया दध्योदनाची ॥ लाळ विरिंचि घोंटीतसे ॥७६॥
गोप मुखीं घालिती ग्रास ॥ वरतें दाविती देवांस ॥ तें शेष प्राप्त नव्हे कोणास ॥ बहु तपे तपतां हो ॥७७॥
धन्य धन्य गोकुळींचे गोप ॥ अनंत जन्में केलें तप ॥ तें एकदांचि फळलें अमूप ॥ चित्स्वरुप वश्य केलें ॥७८॥
कीं पूर्वीं बहुत मख केलें ॥ कीं अनंत तीर्थीं नाहले ॥ कीं वातांबुपर्ण सेवूनि तप केलें ॥ शीत उष्ण सोसूनियां ॥७९॥
कीं त्रिवेणीसंगमीं पाहीं ॥ शरीर घातलें कर्वतीं त्यांहीं ॥ त्या पुण्यें क्षीराब्धीचा जांवई ॥ वश केला गोपाळीं ॥१८०॥
असो ब्रह्मा तेथें येऊनि गुप्त ॥ हरिलीला विलोकीत ॥ म्हणे येणें पूतना तृणावर्त ॥ शकटासुर मारिला ॥८१॥
इतुकेनि हा पुरुषार्थी ॥ आम्ही न मानूं श्रीपती ॥ ऐसें परमेष्ठी मनीं चिंती ॥ तों गडी बोलती हरीतें ॥८२॥
वत्सें बहु दूर गेलीं ॥ घेऊनि येईं वनमाळी ॥ आतां वळावयाची पाळी ॥ तुझीच असे ये वेळीं ॥८३॥
ऐसें ऐकतां वचन ॥ उठिला इंदिरामनमोहन ॥ जो मायातीत निरंजन ॥ चैतन्यघन जगद्‌गुरु ॥८४॥
वेणु खोंविलासे पोटीं ॥ कक्षेसी धरी श्रृंग आणि काठी ॥ दध्योदन वाम करपुटीं ॥ ग्रास जगजेठी घालीतसे ॥८५॥
वत्सें पहात दूरी॥ गेला वैकुंठपुरविहारी ॥ इकडे गोपाळ कवळ घेऊनि करीं ॥ वाट पाहती कृष्णाची ॥८६॥
हातींचा ग्रास राहिला हातीं ॥ मुखींचा कदा न गिळिती ॥ तटस्थ हरीची वाट पाहती ॥ म्हणती श्रीपती कां न ये ॥८७॥
तो ब्रह्मदेवें केलें विंदान ॥ वासरें नेलीं चोरुन ॥ इकडे वनीं यादवकुलभूषण ॥ वत्सें शोधीत हिंडतसे ॥८८॥
वत्सें न दिसती ते वेळां ॥ म्हणोनि पूर्वस्थळासी हरि आला ॥ तों न दिसे गोपमेळा ॥ घेऊनि गेला विधाता ॥८९॥
कळलें विरंचीचें विंदाण ॥ मग मनीं हांसे नारायण ॥ म्हणे कमलोद्भवाचा अभिमान ॥ दूर करावा तत्त्वतां ॥१९०॥
मग काय करी रमाजीवन ॥ सर्व स्वरुपें जाहला आपण ॥ ज्या ज्या वत्साचा जैसा वर्ण ॥ मनमोहन तैसा होय ॥९१॥
चितारें भिंगारें खैरें ॥ मोरें सेवरें आणि कैरें ॥ तांबडें काळें पांढरें ॥ अवघीं वासरें आपण जाहला ॥९२॥
ढवळें सांवळें चितळें ॥ पोवळें पारवें डफळें ॥ तैसींच रुपें घननीळें ॥ असंख्यात धरियेलीं ॥९३॥
वडजे वांकडे गोपाळ ॥ एक धाकुटे एक विशाळ ॥ एक रोडके एक ढिसाळ ॥ होय सकळ आपण ॥९४॥
मोडके कुब्जे काणे बहिर ॥ गोरे सांवळे सुंदर ॥ तितुकीं स्वरुपें श्रीधर ॥ आपण नटला एकदांचि ॥९५॥
त्यांची घोंगडी पायतण पांवे ॥ तितुकीं स्वरुपें धरिलीं कमलाधवें ॥ कटिसूत्र वनमाला श्रृंग सर्वें ॥ मयूरपिच्छें जाहला ॥९६॥
वेत्र घुमरिया शिदोरी जाळें ॥ लघु दीर्घ सूक्ष्म विशाळें ॥ अनंतब्रह्मांडगोपाळें ॥ रुपें सकळ धरियेलीं ॥९७॥
सायंकाळीं हृषीकेशी ॥ परतोनि आला गोकुळासी ॥ ज्याची ज्याची सवे जैसी ॥ तैसाचि होय जगदात्मा ॥९८॥
कोणासी न दिसे विपरीत ॥ कृष्णमाया परमाद्‌भुत ॥ एक संवत्सर निश्चित ॥ याच प्रकारें लोटला ॥९९॥
ब्रह्मा मनीं वाहे अभिमान ॥ म्हणे आतां गोकुळ पाहूं जाऊन ॥ काय करीत असे कृष्ण ॥ गोपवत्सांविण तो ॥२००॥
ब्रह्मा गुप्तरुपें पाहे ॥ तों पूर्ववत बैसला आहे ॥ शिदोरी वांटीत लवलाहें ॥ गोपाळांसी निजकरें ॥१॥
पांचां वर्षांची मूर्ती ॥ आकर्ण नेत्र विराजती ॥ कंठीं मुक्तमाळा डोलती ॥ पदकें झळकती अतितेजें ॥२॥
चिमणाच कांसे पीतांबर पिंवळा ॥ दशांगुलीं मुद्रिका वेल्हाळा ॥ चिमणी झळके कटीं मेखळा ॥नेपुरें खळखळां वाजती ॥३॥
असो गोपाळ जेविती स्वानंदें ॥ गदगदां हांसती ब्रह्मानंदें ॥ त्यांच्या मुखीं ग्रास गोविंदें ॥ आपुल्या हस्तें घालिजे ॥४॥
तों गडी म्हणती नारायणा ॥ वत्सें दूर गेलीं कानना ॥ तुझीच पाळी मनमोहना ॥ लौकर घेऊनि येइंजे ॥५॥
ब्रह्मा गुप्तरुपें पाहे अवलोकुनी ॥ म्हणे अगाध श्रीहरीची करणी ॥ अभिमान होता माझें मनीं ॥ सृष्टिकर्ता मीच असें ॥६॥
महा अद्‌भुत वर्तलें ॥ दों ठायीं वत्सें आणि गोवळे ॥ सत्यलोकीं आपण नेले ॥ ते तों संचले तैसेची ॥७॥
हा होय माझा जनिता ॥ आदिमायेचा निजभर्ता ॥ जो अनंतब्रह्मांडकर्ता ॥ करुन अकर्ता तोचि हा ॥८॥
तों इकडे कैवल्यदानी ॥ वत्सें शोधीत हिंडे वनीं ॥ दध्योदन करीं घेऊनी ॥ ग्रास वदनीं घालीतसे ॥९॥
शिरीं मयूरपिच्छें साजिरीं ॥ घोंगडी शोभे खांद्यावरी ॥ वनीं हिंडे पूतनारी ॥ अति तांतडी चहूंकडे ॥११०॥
काखेसी शिंग वेत्र ॥ जो मायालाघवी राजीवनेत्र ॥ हांसतसे श्रीधर ॥ ग्रास घेत हिंडतसे ॥११॥
ऐसें देखोनि विधाता ॥ म्हणे हा क्षीराब्धिशायी माझा पिता ॥ ज्याचा महिमा वर्णितां ॥ वेदशास्त्रां अतर्क्य ॥१२॥
याच्या नाभिकमळीं जन्मलों ॥ दिव्य सहस्त्र वर्षें मी श्रमलों ॥ कमलनालामाजी उतरलों ॥ जाचावलों बहुत मी ॥१३॥
मग अत्यंत निर्बुजोनी ॥ कमलावरी बैसलों येऊनी ॥ मग या जगद्‌गुरुनें तेच क्षणीं ॥ दिव्यज्ञान उपदेशिलें ॥१४॥
म्यां हरिस्वरुप नेणोनियां ॥ गेलों वत्स गोप घेऊनियां ॥ आतां शरण रिघावें याच्या पायां ॥ प्रेमभावें अनन्य ॥१५॥
निरंजनीं सांपडला श्रीधर ॥ समोर येऊनि चतुर्वक्‍त्र ॥ साष्टांग घातला नमस्कार ॥ प्रेमें अंतर सद्गदित ॥१६॥
जैसा कनकदंड पृथ्वीवरी ॥ हरिचरणीं शिरें ठेविलीं चारी ॥ नेत्रोदकें अभिषेक करी ॥ अष्टभाव उमटले ॥१७॥मागुती करी प्रदक्षिणा ॥ वारंवार घाली लोटांगणा ॥ सवेंचि उठोनि विलोकी ध्याना ॥ तों दहींभातें वदन माखलेंसे ॥१८॥
मग जोडोनि दोन्ही कर ॥ स्तविता जाहला चतुर्वक्त्र ॥ म्हणे जय जय जगदुद्धार ॥ निर्विकार निर्गुण तूं ॥१९॥
नमो महामाया आदिकारणा ॥ अज अजिता विश्वभूषणा ॥ पुराणपुरुषा जगन्मोहना ॥ गुणागुणातीत तूं ॥२२०॥
जय जय नागेंद्रदेहशयना ॥ कमलपत्राक्षा विश्वपालना ॥ परात्परा शुद्धनिरंजना ॥ भवमोचना भवहृदया ॥२१॥
जय जय कृष्णा करुणार्णवा ॥ हे केशवा देवाधिदेवा ॥ हे नारायणा अपारवैभवा ॥ हे माधवा गोविंदा ॥२२॥
हे विष्णो मधुप्राणहरणा ॥ हे त्रिविक्रमा बलिबंधना ॥ हे श्रीधरा हृत्पद्मशयना ॥ पद्मनाभा परेशा ॥२३॥
हे दामोदरा संकर्षणा ॥ हे वासुदेवा विश्वरक्षणा ॥ हे प्रद्युम्नजनका मनमोहना ॥ हे अनिरुद्धा अधोक्षजा ॥२४॥
हे पुरुषोत्तमा नरहरे ॥ हे अच्युत जनार्दन मुरारे॥ हे उपेंद्र मधुंकैटभारे ॥ हे पूतनारे श्रीकृष्णा ॥२५॥
हे कृष्णा सजलजलदवर्णा ॥ हे कृष्णा अमलनवपंकजलोचना ॥ हे कृष्णा इंदिरामनरंजना ॥ हे भक्तरक्षका यादवेंद्रा ॥२६॥
हे कृष्णा ब्रह्मानंदमूर्ति ॥ हे कृष्णा अनंतकल्याण अनंतकीर्ति ॥ हें कृष्णा जगद्‌भूषण जगत्पति ॥ अतर्क्य गति वेदशास्त्रां ॥२७॥
हे कृष्णा परममंगलधामा ॥ हे कृष्णा मृडमानसविश्रामा ॥ हे कृष्णा जलजनाभा अनामा ॥ सकलकामातीत तूं ॥२८॥
अपराध आचरे बालक ॥ परी क्षमा करी निजजनक ॥ भुवनसुंदर लक्ष्मीनायक ॥ सुखदायक सकळांतें ॥२९॥
सर्व अपराध तूं क्षमा करीं ॥ पीतवसना असुरारी ॥ माझिये मस्तकीं श्रीहरी ॥ वरदहस्त ठेवीं तुझा पैं ॥२३०॥
पुढती घाली लोटांगण ॥ सप्रेम धरिले कृष्णचरण ॥ याउपरी नंदनंदन ॥ व्रजभूषण काय बोले ॥३१॥
ऊठ ऊठ चतुरानना ॥ सोडोनि देहबुद्धि अभिमाना ॥ आपुल्या स्वस्वरुपस्मरणा- माजी विलसें सर्वदा ॥३२॥
ऐसें बोलतां जगज्जीवन ॥ सत्वर उठला कमलासन ॥ कृष्णें दृढ हृदयीं आलिंगून ॥ करी समाधान तयाचें ॥३३॥
मनमोहन पूतनारी ॥ कृष्ण हस्त ठेवी त्याचें शिरीं ॥ विरिंचि तृप्त झाला अंतरीं ॥ सुखसमुद्रीं निमग्‍न ॥३४॥
वत्सें गोप हरि झाला होता ॥ सादर विलोकी जों विधाता ॥ तंव त्या कृष्णमूर्ति तत्त्वतां ॥ पाहतां जाहला तन्मय ॥३५॥
लक्षानुलक्ष कृष्णमूर्ती ॥ शंखचक्रादि आयुधें हातीं ॥ श्रीवत्सादि चिन्हें झळकती ॥ श्रीनिकेतनासमवेत ॥३६॥
श्रृंग वेत्र पांवे पायतण ॥ सर्व स्वरुपें नटला नारायण ॥ असंख्य मूर्ती घनश्यामवर्ण ॥ दुसरेपण दिसेना ॥३७॥
असंख्य नाभिकमलें विराजमान ॥ तेथें असंख्य विरिंचि शिव सहस्त्रनयन ॥ चंद्र सूर्य कुबेर वरुण ॥ सृष्टि संपूर्ण चालविती ॥३८॥
कमलाप्रति भिन्न भिन्न ब्रह्मांड ॥ चित्रविचित्र परम प्रचंड ॥ वैकुंठ कैलासादि उदंड ॥ पदें दिसती कमलाप्रति ॥३९॥
समाधिस्थ झाला विधाता ॥ अहंकृति गेली पाहतां पाहतां ॥ वाचा राहिली बोलतां ॥ वृत्ती समस्त निमाल्या ॥२४०॥
मुख्य मूर्तिं त्यांत कोण ॥ न दिसे कांहीं दुजेपण ॥ वृंदावनींचे द्रुम पाषाण ॥ श्वापदें कृष्णरुप दिसतीं पैं ॥४१॥
भू आप तेज वात नभ ॥ दिसती कृष्णरुप स्वयंभ ॥ सरिता सिंधु चराचर सुप्रभ ॥ श्रीवल्लभरुप दिसताती ॥४२॥
हरली सकल अहंकृति ॥ अनंत ब्रह्मांडें अनंत कीर्ति ॥ अनंत वेद अनंत शास्त्ररीति ॥ कीर्ति गाती अनंत ॥४३॥
अनंत पुराण अनंत कला ॥ अनंत अवतार अनंत लीला ॥ अनंत स्वरुपें आपण नटला ॥ दावी तो सोहळा विधातया ॥४४॥
बहुत आकृती नाना याती ॥ स्त्री पुरुष नपुंसक व्यक्ती ॥ अवघा ओतला वैकुंठपती ॥ नाहीं स्थिति दूसरी ॥४५॥
विराट हिरण्यगर्भ महत्तत्त्व जाण ॥ न दिसे स्थूल लिंग कारण ॥ न चले तर्काचें विंदाण ॥ अवघा जगज्जीवन ओतला ॥४६॥
जागृति स्वप्न सुषुप्ति तुर्या ॥ अवस्था गेल्या हरोनियां ॥ सृष्टिस्थितिप्रलयसर्वसाक्षिणीया ॥ न उरे माया समूळीं ॥४७॥
विश्व तेजस प्राज्ञ प्रत्यगात्मा ॥ ब्रह्मा विष्णुरुद्र परमात्मा ॥ अवघा एक जगदात्मा ॥ नामानामातीत जो ॥४८॥
अकार उकार मकार ॥ चवथा अर्धमात्रा ओंकार ॥ रजतमसत्त्वविकार ॥ सर्व यादवेंद्र ओतला ॥४९॥
वैखरी मध्यमा पश्यंती परा ॥ वाचा खुंटल्या नयनीं धारा ॥ पाहतां ब्रह्मानंदा उदारा ॥ ब्रह्मा जाहला समाधिस्थ ॥२५०॥
अवस्था जिरवूनि पोटीं ॥ नेत्र उघडोनि पाहे परमेष्ठी ॥ तों श्वापदें सर्व सृष्टीं ॥ निर्वैर तेथें खेळती ॥५१॥
गाई व्याघ्र निर्वैर देख ॥ खेळे नकुळ दंदशूक ॥ वारण मृगेंद्र होती एक ॥ हरिप्रतापेंकरुनि ॥५२॥
पुढती ब्रह्मा घाली लोटांगण ॥ म्हणे धन्य धन्य आजि जाहलों पूर्ण ॥ काय करुं ब्रह्मपद घेऊन ॥ सदा राहों वृंदावनीं ॥५३॥
पदाभिमानें आम्ही नाडलों ॥ निजस्वरुपा विसरलों ॥ कामक्रोधचोरीं नागवलों ॥ अंतरलों हरिपायां ॥५४॥
नाहीं आमुची आत्मशुद्धी ॥ दृढ धरिली देहबुध्दी ॥ वेष्टित सदा आधिव्याधी ॥ आत्मशुद्धि कैंची मग ॥५५॥
सांडूनि सकल अभिमान ॥ होऊनि वृंदावनीं तृणपाषाण ॥ तेथें लगती कृष्णचरण ॥ तेणें उद्धरोन जाऊं आम्ही ॥५६॥
विधिजाहला निरभिमान ॥ मग बोले जगत्पालन ॥ म्हणे निजपदीं राहें सावधान ॥ दुरभिमान टाकूनियां ॥५७॥
ब्रह्मा करी प्रदक्षिणा ॥ पुढती मिठी घाली चरणा ॥ आज्ञा मागोनि रमाजीवना ॥ निजस्थाना विधि गेला ॥५८॥
गोपवत्सें जी चोरुनि नेलीं ॥ तीं अवघीं सोडूनि दिधलीं ॥ कृष्णें आपुली रचना झांकिली ॥ आपणामाजी सत्वर ॥५९॥
वत्सें गोप ब्रह्मयानें नेलें ॥ मागुती फिरोन आणिले ॥ परी हें चरित्र कोणास न कळे ॥ हरीवांचोनि सर्वथा ॥२६०॥
विधीनें पूर्वीं गोपाळ नेले होते ॥ तैसेचि मागुती बैसविले तेथें ॥ कृष्ण घेऊनि वत्सांतें ॥ सत्वर आला त्यांजवळी ॥६१॥
एक संवत्सरपर्यंत ॥ नेले होते गोप समस्त ॥ परी हरिमाया अद्‌भुत ॥ न कळे चरित्र तयांसी ॥६२॥
गडी म्हणती श्रीहरी ॥ लौकर येईं तूं पूतनारी ॥ आम्ही ग्रास घेऊनि निजकरीं ॥ वाट तुझी पाहतों ॥६३॥
गदगदां हरि हांसला ॥ त्यांमाजी येऊनि बैसला ॥ तों वासरमणी अस्ता गेला ॥ सत्वर परतला गोकुळा ॥६४॥
वत्सें आणि गोवळे ॥ जाती परम उल्लाळें ॥ बळिरामासी कांहीं न कळे ॥ हरीनें केलें चरित्र जें ॥६५॥
कृष्णमुखाकडे पाहे बळिराम ॥ तों ईषद्धास्य मेघश्याम ॥ गुज कळोनि सप्रेम ॥ बळिभद्र तेव्हां जाहला ॥६६॥
गोवर्धनीं ज्या गाई चरती ॥ त्या ओरसा येऊनि वत्सें चाटिती ॥ गौळी गोकुळींचे धांवती ॥ हृदयीं धरिती बाळकांतें ॥६७॥
तें कौतुक पाहोन ॥ हांसती शेषनारायण ॥ शचीरमणा न कळे ही खूण ॥ इतर कोठून जाणती ॥६८॥
थोर दाविलें कौतुक ॥ विरिंचि पोटींचें बालक ॥ त्यासी कृपेनें वैकुंठपालक ॥ रमानायक बोलिला ॥६९॥
दिधलें अद्‌भुत दर्शन ॥ हरिला सकळ अभिमान ॥ गोकुळींचें सर्व जन ॥ ब्रह्मानंदें डुलती ॥२७०॥
आरत्या घेऊनि गोपिका ॥ सामोर्‍या येती त्रिभुवननायका ॥ निजमंदिरा आला भक्तसखा ॥ यशोदा माता आलिंगी ॥७१॥
केलें जेव्हां वत्सहरण ॥ तेव्हां पांच वर्षांचा श्रीकृष्ण ॥ पुढिले अध्यायीं कालियामर्दन ॥ सावधान परिसावें ॥७२॥
गोकुळीं अवतरला यादवेंद्र ॥ तोचि पंढरीं ठेऊनि कटीं कर ॥ भीमातीरीं दिगंबर ॥ ब्रह्मानंद उभा असे ॥७३॥
हरिविजयग्रंथ वरिष्ठ ॥ हेंचि षड्रसअन्नें भरिलें ताट ॥ ज्यांसी भक्तिक्षुधा उत्कट ॥ तेचि जेविती प्रीतीनें ॥७४॥
जे निंदक रोगिष्ठ सहजीं ॥ कुटिलता कुपित्त उदरामाजी ॥ परम दुरात्मे भक्तकाजीं ॥ देह कदा रुळेना ॥७५॥
ऐसे अभक्त क्षयरोगी जाण ॥ त्यांस न जिरे हें अन्न ॥ असो क्षुधार्थी जे भक्तजन ॥ त्यांहींच भोजन करावें ॥७६॥
जो आनंदसंप्रदायभूषण ॥ तो ब्रह्मानंद यतिराज पूर्ण ॥ श्रीधर तयासी अनन्य शरण ॥ जैसें लवण सागरीं ॥७७॥
इति श्रीहरिविजयग्रंथ ॥ संमत हरिवंशभागवत ॥ श्रोते चतुर परिसोत ॥ दशमाध्याय गोड हा ॥२७८॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

Friday, June 15, 2012

हरिविजय - अध्याय ९

अध्याय ९
 श्रीगणेशाय नमः ॥  श्रीकुलदेवतायै नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥
जय जय यादवकुलावतंसा ॥ लीलावेषधारका जगन्निवासा ॥ गोकुलपालका बालवेषा ॥ हृषीकेशा जगद्‌गुरो ॥१॥
लोक वर्णिती विविध शास्त्रें ॥ मनरंजनकारक विचित्रें ॥ परी भवच्छेदक पवित्रें ॥ कदाकाळीं न होती ॥२॥
हरिगुणलीला न वर्णितां ॥ व्यर्थ काय ते अलवण कविता ॥ जैसा वाळूचा घाणा गाळितां ॥ तेल न पडे कांहींच ॥३॥
नळी फुंकिली सोनारें ॥ इकडून तिकडे जाय वारें ॥ तैसी तीं व्यर्थ शास्त्रें ॥ हरिलीला न वर्णितां ॥४॥
न वर्णितां हरिचरित्र ॥ व्यर्थ वटवट कायसे ग्रंथ ॥ जैसीं अर्कफळें क्षुधार्थ ॥ रुचि उडे भक्षितां ॥५॥
धन्य धन्य तेचि जन ॥ जे श्रीहरिध्यानपरायण ॥ जे श्रीहरिलीला करिती श्रवण ॥ धन्य तेचि संसारीं ॥६॥
पाखंडी जे कुतर्कवादी ॥ त्यांस ही सांगों नये कधीं ॥ जसे नवज्वरिता दुग्ध बाधी ॥ मरण आणी तत्काळ ॥७॥
असो अष्टमाध्यायीं भगवंतें ॥ विश्वरुप दाविलें कृपावंतें ॥ असंख्य रुपें मातेतें ॥ रमानाथें दाविलीं ॥८॥
यावरी काय झालें वर्तमान॥ ते साजरें ऐका भक्तजन ॥ जेणें कलिकिल्मिषें दारुण ॥ भस्म होती ऐकतां ॥९॥
एके दिवशीं प्रातःकाळीं ॥ उठोनि यशोदा वेल्हाळी ॥ शेजेसी निजला वनमाळी ॥ मुख न्याहाळी तयाचें ॥१०॥
मुखावरुनि वस्त्र काढिलें ॥ मायेनें हरिमुख न्याहाळिलें ॥ पातीं ढाळूं विसरले डोळे ॥ रुप सांवळे देखोनि ॥११॥
सकुमार घनश्याममूर्ती ॥ कर्णीं कुंडलें झळकती ॥ ते पाहतां यशोदा सती ॥ चित्तवृत्ति तन्मय ॥१२॥
श्रीकृष्णाच्या मुखावरुनी ॥ निंबलोण करी जननी ॥ म्हणे धन्य मीच त्रिभुवनीं ॥ निजभाग्य परिपूर्ण ॥१३॥
याउपरी यशोदा सुंदरी ॥ मंथन आरंभीं निजमंदिरीं ॥ जिचें उदरीं जन्मला हरी ॥ स्वरुप तिचें कोण वर्णी ॥१४॥
मणिमय स्तंभ विराजित ॥ पुढें मंथनडेरा घुमत ॥ अवक्र रवी असे फिरत ॥ मांजिरीं तळपत कनकवर्णी ॥१५॥
छंदें घुसळी यशोदा सती ॥ कनककंकणें रुणझुणती ॥ पुढें रत्‍नजडित दोरे झळकती ॥ तेजें तळपती रत्‍नकिळा ॥१६॥
माथां मोतियांची जाळी ॥ त्यांत चंद्रसूर्यांची प्रभा आगळी ॥ दिव्य कुंकुम निढळीं ॥ विशाळनेत्रीं यशोदा ॥१७॥
कदन वेल्हाळ गौरवर्णी ॥ मुक्तघोष डोलती श्रवणीं ॥ नासिकीं मोतीं सुपाणी ॥ उणें आणी नक्षत्रां ॥१८॥
जे जननी होय कमलावरा ॥ तिच्या निढळीं झळके बिजवरा ॥ हिरे खाणीं जैसे अवधारा ॥ वदनी द्विज झळकती ॥१९॥
चपळा झळके अंबरीं ॥ तैसें दिव्य वस्त्र नेसली सुंदरी ॥ रत्‍नजडित कंचुकी करीं ॥ मंथितां सांवरी यशोदा ॥२०॥
कृष्णमाय ते ज्ञानगळा ॥ जिचें पोटीं हरि अवतरला ॥ तिनें मंथना आरंभ केला ॥ विचार मांडिला सारासार ॥२१॥
पिंडब्रह्मांड अवघें असार ॥ हरिस्वरुप खरें निर्विकार ॥ मिथ्या मायाओडंबर ॥ नव्हे स्थिर कदापि ॥२२॥
जैसी गारुडियाची विद्या ॥ क्षणिक अवघी अविद्या ॥ शरण रिघावें जगद्वंद्या ॥ तरी ब्रह्मविद्या ठसावे ॥२३॥
असो ऐसे माया मंथित ॥ सार वरी आले नवनीत ॥ सोहंभावे डेरा घुमत ॥ विपरीतार्थ सांडोनि ॥२४॥
ऐसे मंथित असताम जननी ॥ जागा जाहला कैवल्यदानी ॥ यशोदेजवळी येऊनी ॥ रविदंड धरियेला ॥२५॥
आधीं मज देईं स्तनपान ॥ म्हणोनि खाळंबविले मंथन ॥ यशोदा तेथेचि पुढें घेऊन ॥ पाजी स्तन यादवेंद्रा ॥२६॥
आला प्रेमाचा पान्हा ॥ पाजितां अवलोकी कृष्णवदना ॥ धन्य धन्य ते नंदांगना ॥ राजीवनयनाकडे पाहे ॥२७॥
मनीं विचारीं भगवंत ॥ म्हणे मातेचें मजवरी आहे चित्त ॥ किंवा प्रपंचीं असे गुंतत ॥ हेंचि सत्य पाहूं आतां ॥२८॥
त्रिभुवनचालक जगन्मोहन ॥ मायातीत शुद्धचैतन्य ॥ तेणें जातवेद चेतवून ॥ दुग्ध उतोन दवडिलें ॥२९॥
अग्निसंगें दुग्ध करपतां ॥ जननीस तो वास येतां ॥ लोटोनि दिल्हे कृष्णनाथा ॥ गेली माता त्वरेनें ॥३०॥
कृष्ण परब्रह्म रुपडें ॥ माया टाकोनि गेली दुग्धाकडे ॥ परमार्थ टाकूनि प्रपंचाकडे ॥ प्रीति जैसी जनांची ॥३१॥
टाकूनि सुवर्ण सुंदर ॥ जन जतन करिती खापर ॥ सुरतरु सांडोनि पामर ॥ कंटकवृक्ष आलिंगिती ॥३२॥
परमामृत टाकूनि पूर्ण ॥ बळेंचि जाऊनि पिती धुवण ॥ तैसाचि टाकूनि नारायण ॥ माया गेली घरांत ॥३३॥
तों दुग्ध गेलें उतोन ॥ यशोदा जाहली क्रोधायमान ॥ तों बाहेर क्षीराब्धिजारण ॥ कौतुक करी तें ऐका ॥३४॥
कीं प्रेमपान्हा न पाजुनी ॥ मज टाकूनि गेली जननी ॥ म्हणोनि कृष्णें पाषाण घेऊनी ॥ मंथनडेरा फोडिला ॥३५॥
दहीं वाहूनियां गेलें ॥ पुढें जगन्नाथें काय केलें ॥ चिमणे बाळक मेळविले ॥ आपणा भोंवते तेधवां ॥३६॥
काष्ठाचें उंच उखळ ॥ पालथें घाली तमाळनीळ ॥ यशोदेनें नवनीत निर्मळ ॥ संचित ठेविलें होतें पैं ॥३७॥
शिंकी घालोनि हात ॥ कवळ नवनीताचे काढीत ॥ भोंवते अर्भकांस देत ॥ आपण सेवीत लवलाहें ॥३८॥
गडियांसी म्हणे लवकर भक्षा ॥ माय येतां करील शिक्षा ॥ ऐसें बोलताम कमळपत्राक्षा ॥ काय अपूर्व वर्तलें ॥३९॥
मंथनडेरा फोडिला घननीळें ॥ नवनीतही सकल सारिलें ॥ दुग्ध घरांत उतोन गेलें ॥ कार्य नासले चहूंकडे ॥४०॥
यशोदा न सोडिता भगवंता ॥ तरी हा नाश कासया होता ॥ श्रीकृष्णासी अंतर पडतां ॥ मग अनर्था उणें काय ॥४१॥
भगवंतीं मिठी घालितां सप्रेम ॥ प्रपंचचि होय परब्रह्म ॥ तो भक्तांचा पुरवी काम ॥ आत्माराम सर्वेश ॥४२॥
असो दुग्ध उतलें म्हणोनी ॥ परम क्रोधायमान जननी ॥ म्हणे कृष्णें बाहेर काय करणी ॥ केली असेल कळेना ॥४३॥
म्हणोनि वेताटी हातीं घेऊनि ॥ बाहेर आली नंदराणी ॥ तों दहीं वाहोनि गेलें आंगणीं ॥ आणि नवनीतही सारिलें ॥४४॥
देखतांचि जननी ॥ उडी टाकोनि चक्रपाणी ॥ पळाला बाळें घेऊनी ॥ नंदपत्‍नी पाठीं लागे ॥४५॥
वेताटीं घेऊनि हातीं ॥ बिदीं धांवे यशोदा सती ॥ तंव तो चपळ श्रीपती ॥ कोणासही न सांपडे ॥४६॥
शोधितां न सांपडे वेदशास्त्रां ॥ ठायीं न पडे द्विसहस्त्रनेत्रा ॥ न पवे चतुर्वक्‍त्रा ॥ पंचमुखा दुर्लभ ॥४७॥
निराहारी फलाहारी ॥ नग्न मौनी जटाधारी ॥ बहु शोधिति गिरिकंदरीं ॥ परि श्रीहरि न सांपडे ॥४८॥
नाना तीर्थें हिंडतां ॥ बहु विद्या अभ्यास करितां ॥ पंचाग्निसाधन साधितां ॥ परी तो कदा न लाभेचि ॥४९॥
हरि नातुडे बळवंता ॥ न चढे धनवंताच्या हाता ॥ चतुःषष्टि कला दावितां ॥ ठायीं तत्त्वतां पडेना ॥५०॥
एक सद्भावाविण ॥ हातीं न लाभे जगज्जीवन ॥ प्रेमाविण मनमोहन ॥ कोणासही न सांपडे ॥५१॥
प्रेमाविण कायसें ज्ञान ॥ प्रेमाविण व्यर्थ ध्यान ॥ प्रेमाविण जें गायन ॥ व्यर्थ जैसें गोरियाचें ॥५२॥
प्रेमाविण व्यर्थ पूजा ॥ काअ नावडे अधोक्षजा ॥ प्रेमाविण अभ्यास सहजा ॥ व्यर्थ सर्व विद्येचा ॥५३॥
एक नसतां प्रेमकळा ॥ त्याविण अवघ्या त्या विकळा ॥ शरण न रिघतां तमाळनीळा ॥ सकळ साधनें व्यर्थचि ॥५४॥
स्त्री सर्वलक्षणीं सुंदर पूर्ण ॥ परी पतिसेवेसी नाहीं मन ॥ तिचें चातुर्य शहाणपण ॥ व्यर्थचि काय जाळावें ॥५५॥
गळसरीविण अलंकार ॥ भूतदयेविण आचार ॥ कीं रविशशीविण अंबर ॥ तमें जैसें व्यापिलें ॥५६॥
कीं गुरुकृपेविण ज्ञान ॥ कीं आवडीविण भजन ॥ कीं गृहस्वामिणीविण सदन ॥ व्यर्थ जैसें भणभणित ॥५७॥
कीं रायाविण परिवार ॥ कीं नासिकेविण जैसें वक्त्र ॥ तैसा प्रेमाविण स्मरारिमित्र ॥ कदाकाळीं न सांपडे ॥५८॥
असो धांवता यशोदा सती ॥ कदा नाटोपे श्रीपती ॥ म्हणे हरि आतां गृहाप्रती ॥ कैसा येसील तें पाहूं ॥५९॥
माता धांवतां श्रमली ॥ स्वदेबिंदु दिसती भाळीं ॥ तें देखोनि वनमाळीं ॥ कृपा दाटली हृदयांत ॥६०॥
इणें बहुत जन्म तप केलें ॥ जन्मोजन्मीं प्रेमें बांधिलें ॥ म्यां सगुणरुप धरिलें ॥ भक्ति देखोनि इयेची ॥६१॥
श्रीकृष्ण सुहास्यवदन ॥ मातेकडे पाहे कृपेंकरुन ॥ तों यसोदेनें धांवोन ॥ हस्त धरिला हरीचा ॥६२॥
हस्तीं धरुनि वेताटी ॥ केली परम क्रोधदृष्टी ॥ तें देखोनि जगजेठी ॥ कांपतसे थरथराम ॥६३॥
करुनियां दीन वदन ॥ जगज्जीवन करी रुदन ॥ नेत्रींच्या जीवनेंकरुन॥ जात वाहून काजळ ॥६४॥
वेत उगारितां जननी ॥ वरी पाणी करी चक्रपाणी ॥ श्रीमुख करुनि दीनवाणी ॥ स्फुंदस्फुंदोनी रडतसे ॥६५॥
वेत उगारीत जननी ॥ परी न हाणवे तियेनी ॥ तो ब्रह्मानंद कैवल्यदानी ॥ जो श्रुतीचेनि न वर्णवे ॥६६॥
मग करीं धरुनि चक्रपाणी ॥ निजमंदिरा गेली जननी ॥ म्हणे यासी उखळीं बांधोनी ॥ शिक्षा लावीन मी आतां ॥६७॥
तों बहुत गौळिणी आल्या तेथें ॥ म्हणती दृढ बांधा या चोरातें ॥ दावें आणोनि स्वहस्तें ॥ नंदराणी बांधीतसे ॥६८॥
झाली गौळिणींची दाटी ॥ मंदमंद रडे जगजेठी ॥ दावें वेष्टिलें कटीं ॥ उखळासमवेत मायेनें ॥६९॥

काकुळती येतो हरी ॥ म्हणे आजिच्यानें मी न करीं चोरी ॥ म्हणोन वैकुंठपीठविहारी ॥ दीनवदन बोलतसे ॥७०॥
जो अनंत पुराण पुरुषोत्तम ॥ जो अनादि निर्गुण अनाम ॥ जो मायातीत अगम्य ॥ त्यासी कोण बांधील ॥७१॥
तो दावें न पुरें बांधाया ॥ दुसरें जोडी त्यास माया ॥ तेंही न पुरे म्हणोनियां ॥ तिसरें आणोनि लाविलें ॥७२॥
दोन बोटें उणें येतें ॥ म्हणोनि लाविलें दावें चौथें ॥ नाकळेचि चौघांतें ॥ सहा त्यातें न पुरती ॥७३॥
बारा सोळा अठरा ॥ न पुरतीच जगदुध्दारा ॥ पंचविसांच्या विचारा ॥ न ये खरा गोविंद ॥७४॥
गोपिका दावें आणूनि देती ॥ हांवे पेटली यशोदा सती ॥ नवलक्ष दावीं न पुरती ॥ अगाध कीर्ति हरीची ॥७५॥
पावावया स्वरुपप्राप्ती ॥ असंख्य वेदश्रुती गर्जती ॥ तैशा गौळिणी हरीस बांधिती ॥ बहुत करिती गलबला ॥७६॥
मातेकडे पाहे गोविंद ॥ नेत्र चोळी रडे मंद ॥ भोंवता गौळिणींचा वृंद ॥ दाटोदाटी झोंबतो ॥७७॥
बांधिती नवलक्ष गोकंठपाश ॥ तरी नाकळेचि परमपुरुष ॥ हा पूर्णब्रह्म सर्वेश ॥ हें मायेस न स्मरे ॥७८॥
माता न करीच विचारा ॥ बांधीन म्हणे विश्वोद्धारा ॥ कृपा आली यादवेंद्रा ॥ बांधो द्यावें म्हणे आतां ॥७९॥
तों दावें पुरलें अकस्मात ॥ दृढ ग्रंथि माया देत ॥ गौळिणी भोंवत्या हांसत ॥ कैसें आतां निजचोरा ॥८०॥
बहुत लोकांस तुवां पीडिलें ॥ त्याचें उटें आज निघालें ॥ मातेनें तुज बांधिलें ॥ आतां कैसा जासील ॥८१॥
गौळिणींस म्हणे नंदांगना ॥ तुम्ही जा आपुल्या सदना ॥ आंगणीं टाकूनि मनमोहना ॥ माया गेली गृहांत ॥८२॥
कोणी न दिसे आंगणीं ॥ पुराणपुरुष कैवल्यदानी ॥ उखळ ओढीत मेदिनीं ॥ हळूहळू नेतसे ॥८३॥
चंडवृक्ष नंदांगणीं ॥ यमलार्जुननामें दोन्ही ॥ ते नारदें पूर्वीं शापोनी ॥ वृक्षजन्मा घातले ॥८४॥
हे पूर्वीं कुबेरपुत्र ॥ नांवें यांची नलकूवर ॥ परम उन्मत अविचार ॥ सारासार कळेना ॥८५॥
नग्न होऊनि स्त्रियांसमवेत ॥ जलक्रीडा दोघे करीत ॥ तों नारदमुनि अकस्मात ॥ त्याचि पंथें पातला ॥८६॥
दृष्टीं देखिला ब्रह्मसुत ॥ परी ते विषयांध उन्मत्त ॥ परम अविचारी शंकरहित ॥ नारदे ते देखिले ॥८७॥
आधीच तारुण्यमदे मातले ॥ त्याहीवरी मद्यपान केलें ॥ विशेष शब्दज्ञान शिकले ॥ बोलो न देती कोणाते ॥८८॥
त्याहीवरी भाग्यमंद ॥ स्त्रीसंगमे झाले विषयांध ॥ तेचि चांडाळ भाग्यमंद ॥ जे अपमानिती साधूंतें ॥८९॥
आम्ही जाणते सर्वज्ञ ॥ म्हणोनि संतांसी ठेविती दूषण ॥ ऐसियांसी संतीं दंडून ॥ शुद्धमार्गीं लावावे ॥९०॥
जो पिशाच जाहला निश्चितीं ॥ त्यासी पंचाक्षरी दृढ बांधिती ॥ तैसे दुष्ट दंडून संतीं ॥ भजनस्थितीं लावावे ॥९१॥
असो नारदें कोपोनी ॥ ते दुष्ट शापिले तेच क्षणीं ॥ म्हणे दोघे वृक्ष होवोनी ॥ जडमूढदशा पावाल ॥९२॥
ऐसे ऐकतांचि वचन ॥ दोघीं धरिले नारदाचे चरण ॥ म्हणती स्वामी शापमोचन ॥ देऊनि वरदान करावें ॥९३॥
मग नारद बोले ते वेळीं ॥ तुम्ही वृक्ष व्हाल गोकुळीं ॥ रांगत येईल वनमाळी । उद्धरील उभयांतें ॥९४॥
त्यांचा करावया उद्धार ॥ उखळ ओढीत यादवेंद्र ॥ दोन्ही वृक्षांतून सर्वेश्वर ॥ रमावर चालिला ॥९५॥
वृक्षसंधीं अडकलें उखळ ॥ एकांत देखोनि वैकुंठपाळ ॥ दोन्ही वृक्ष सबळ ॥ बळें उन्मळोनि पाडिले ॥९६॥
तो दोन्ही वृक्षांमधूनी ॥ दोन पुरुष निघाले तेच क्षणीं ॥ उभे ठाकले कर जोडोनी ॥ हरिस्तवनीं प्रवर्तले ॥९७॥
वैकुंठपालका परमपुरुषा ॥ क्षीरसागरहृदयविलासा ॥ सच्चिदानंदा सर्वेंशा ॥ जगदानंदा मूळकंदा ॥९८॥
जय जय गोपालवेषधारका ॥ अनंतब्रह्मांडप्रतिपालका ॥ जय जय हरि वेदरक्षका ॥ मत्स्यरुपा केशवा ॥९९॥
नारायणा आदिकूर्मा ॥ वराहरुपा पुरुषोत्तमा ॥ नरहरिरुपा परब्रह्मा ॥ वामनवेषा त्रिविक्रमा ॥१००॥
निःक्षत्रिय केली धरणी ॥ पंचवटीवासिया चापपाणी ॥ तोचि तूं गोकुळीं अवतरोनी ॥ लीला दाविसी भक्तांतें ॥१॥
ऐसें दोघे स्तवन करोनी ॥ ऊर्ध्वपंथें गेले तेच क्षणीं ॥ पावले आपुल्या स्वस्थानीं ॥ हरि चरणप्रसादें ॥२॥
असो बाहेरुन आला नंद ॥ तंव दोन्ही वृक्ष सुबद्ध ॥ उन्मळोनि पडिले गोविंद ॥ वृक्षसंधींत सांपडला ॥३॥
ते देखोनि नंद गजबजिला ॥ धांवा धांवा म्हणे सकळां ॥ वृक्षाखालीं कृष्ण सांपडला ॥ सोडूनि उचलिला नंदानें ॥४॥
वार्ता ऐकोनि श्रवणीं ॥ हृदय पिटी धबधबां जननी ॥ धांवती सकळ गोपाळ गौळणी ॥ नदांगणीं दाटी जाहलीं ॥५॥
नंदाजवळी होता हरी ॥ मायेनें घेतला कडेवरी ॥ सद्गदित यशोदा नारी ॥ अश्रु नेत्रीं वाहती ॥६॥
स्फुंदस्फुंदोनि यशोदा रडत ॥ हे जळोत गे माझे हात ॥ म्यां बांधिला कृष्णनाथ ॥ मोठा अनर्थ चूकला ॥७॥
नंद म्हणे नसतां चंड प्रभंजन ॥ कां वृक्ष पडिले उन्मळोन ॥ आश्चर्य करिती सकळ जन ॥ अनर्थ गहन चूकला ॥८॥
तेथें मुलें धाकुटीं होतीं ॥ तीं सांगती नंदाप्रती ॥ कृष्णेंच वृक्ष निश्चितीं ॥ बळेंचि मोडून पाडिले ॥९॥
त्यांतून दोन पुरुष निघाले ॥ श्रीकृष्णासी काय बोलिले ॥ तें आम्हांलागीं न कळे ॥ मग गेले ऊर्ध्वपंथें ॥११०॥
हांसती सकळ ते अवसरी ॥ मुलांची गोष्ट न वाटे खरी ॥ यशोदा म्हणे मुरारी ॥ थोर दैवें वांचला ॥११॥
नंदें केला सोहळा थोर ॥ मेळवूनियां धरामर ॥ आनंद जाहला अपार ॥ गोकुळामाजी घरोघरीं ॥१२॥
निंबलोण तेच क्षणीं ॥ कृष्णावरुनि उतरी जननी ॥ हृदयीं दृढ धरोनी ॥ चुंबन देत प्रीतीनें ॥१३॥
एके दिवशीं मेघश्याम ॥ देव्हाराम खेळे पुरुषोत्तम ॥ नंदाचे सकळ शालिग्राम ॥ वदनी घालोनि गिळियेले ॥१४॥
नंद आला स्नान करुन करुं बैसला देवतार्चन ॥ तों शालिग्राम न दिसती पूर्ण ॥ मग यशोदेसी बोलतसे ॥१५॥
देव्हारीं शालिग्राम नसती ॥ येरी म्हणे तेथें खेळत होता श्रीपती ॥ आपण पुसावें तयाप्रती ॥ शालिग्राम देईल तो ॥१६॥
नंद म्हणे राजीवनेत्रा ॥ शालिग्राम देईं चारुगात्रा ॥ कडेवरी घेतले इंदिरावरा ॥ चुंबन देऊनि पुसतसे ॥१७॥
मग तो नीलोत्पलदलवर्ण ॥ मायातीत शुद्धचैतन्य ॥ परम उदार सुहास्य वदन ॥ नंदाप्रती बोलत ॥१८॥
शालिग्राम मी नेणें तत्त्वतां ॥ मजवरी वृथा आळ घालितां ॥ मी सर्वातीत अकर्ता ॥ करणें न करणें मज नाहीं ॥१९॥
नंद म्हणे न देखतां देवतार्चन ॥ मी कदापिही न घें अन्न ॥ देखोनि नंदाचें निर्वाण ॥ पसरी वदन जगद्‌गुरु ॥१२०॥
तो असंख्य शालिग्राममूर्ति ॥ असंख्य सूर्य असंख्य शक्ति ॥ असंख्य गणेश उमापति ॥ अगाध कीर्ति हरीची ॥२१॥
अनंतब्रह्मांडरचना ते क्षणीं ॥ नंदे आनंदें देखतां नयनीं ॥ गेला देहभाव विसरोनी ॥ शब्द न फुटे बोलतां ॥२२॥
विसरला कार्यकारण ॥ विसरला स्नान देवतार्चन ॥ नाठवे भोजन शयन ॥ मन निमग्न हरिरुपीं ॥२३॥
सवेंच घातलें माया आवरण ॥ दिधलें नंदाचें देवतार्चन ॥ मनांत नंद भावी पूर्ण ॥ यासी मूल कोण म्हणेल ॥२४॥
देवतार्चनविधि सारुन नंद ॥ कडिये घेतला सच्चिदानंद ॥ जो भोजना बैसतां आनंद ॥ गगनामाजी न समाये ॥२५॥
करिती नाना यागयजन ॥ तेथें कदा न घे अवदान ॥ त्याच्या मुखीं नंद आपण ॥ ग्रास घाली स्वहस्तें ॥२६॥
असो एके दिवशीं प्रातःकाळीं ॥ माया मंथन आरंभी ते वेळीं ॥ जवळ येऊनि वनमाळी ॥ मातेलागी बोलत ॥२७॥
मातेसी म्हणे वैकुंठनायक ॥ मी घुसळीन क्षण एक ॥ मग नंद म्हणे पहा कौतुक ॥ बिरडें हातीं घेईं कां ॥२८॥
हातीं दिधला रविदोर ॥ घुसळण आरंभी श्रीधर ॥ मातेसी म्हणे श्रमलीस थोर ॥ विश्रांति घेईं क्षणभरी ॥२९॥
कौतुक पाहती तातमाता ॥ घुसळीतसे सरसिजोद्भवपिता ॥ तेणें आनंद झाला बहुतां ॥ कित्येकां चिंता प्रवर्तली ॥१३०॥
देव सुखावले देखोन ॥ आतां करुं सुधारसपान ॥ इंद्र म्हणे रत्‍नें संपूर्ण ॥ हातां येतील चतुर्दश ॥३१॥
वासुकी जाहला दीनवदन ॥ कूर्मे पाठी देत सरसावून ॥ शिव म्हणे हालहाल पूर्ण ॥ पुढती कोठें सांठवूं ॥३२॥
लक्ष्मी म्हणे दुजी निघेल कमळा ॥ मजहून सुंदर वेल्हाळा ॥ तीच प्रिय होईल गोपाळा ॥ मोठा मांडिला अनर्थ ॥३३॥
नंद म्हणे यशोदेसी ॥ पुरे मंथन भागला हृषीकेशी ॥ नंद उचलोनि हृदयासी ॥ भगवंतासी धरी तेव्हां ॥३४॥
ऐका नवल वर्तलें एकें दिनीं ॥ मिळती बारा सोळा गौळणी ॥ म्हणती पुरुषार्थ करुनी ॥ गोरस रक्षूं सर्वदा ॥३५॥
दृढ गृह एक पाहूनी ॥ गोरस ठेविती सांठवूनी ॥ दृढ कुलपें घालूनी ॥ राखिती गौळणी सर्वदा ॥३६॥
आपण ओसरिये राहती ॥ कुलपें कदा न काढिती ॥ तों राजबिदीं ये जगत्पती ॥ खेळे गडियांसमवेत ॥३७॥
वडजे वांकुडे गोवळ ॥ तयांसी म्हणे तमाळनीळ ॥ एके घरीं गौळिणी सकळ ॥ गोरस रक्षिती मज भेणें ॥३८॥
बहुत ठकविंती आम्हांतें ॥ चला अवघे जाऊं तेथें ॥ गडी म्हणती कोण्या पंथें ॥ जावें सांग गोविंदा ॥३९॥
हरि म्हणे एक ऐका ॥ अवघे तुम्ही नेत्र झांका ॥ ऐसे बोलतां वैकुंठनायका ॥ नेत्र झाकिले समस्तीं ॥१४०॥
आपुली योगमाया स्मरोनि हरि ॥ क्षण न लागतां ते अवसरीं ॥ सौंगडे नेले सदनांतरीं ॥ न कळे बाहेरी कोणाते ॥४१॥
दधि घृत नवनीत ॥ भक्षिले गडियांसमवेत ॥ खांबासी पुसिले हात ॥ भोजनें समस्त फोडिलीं ॥४२॥
इतुकें घरांत वर्तलें ॥ परी बाहेर गौळिणींस न कळे ॥ जैसें जीवासी नेणवे वहिलें ॥ स्वरुप आपुलें सर्वथा ॥४३॥
कृष्ण म्हणे गडे हो ऐका ॥ आतां फोडा अवघेचि हांका ॥ ऐसें बोलतां यदुनायका ॥ कोल्हाळ केला समस्तीं ॥४४॥
गौळिणी चमकल्या बाहेरी ॥ म्हणती कोण्या द्वारें गेला भीतरी ॥ सबळ कुलपें तैसींच द्वारीं ॥ बरा अंतरीं सांपडला ॥४५॥
एक बोलती गोपीका ॥ कुलपें कदा काढूं नका ॥ एक यशोदेप्रती देखा ॥ सांगो गेल्या तेधवां ॥४६॥
वेताटी घेऊनि करीं ॥ सक्रोध बोलती सुंदरी ॥ आतां पोरें येतां बाहेरी ॥ शिक्षा बरी लावूं तयां ॥४७॥
एक म्हणती पोरें सोडावीं ॥ एक बोलती स्तंभीं बांधावीं ॥ मुख्य चोर जो मायालाघवी ॥ त्यास सर्वथा सोडूं नये ॥४८॥
माया करुनियां पुढें ॥ आपण मागें मागें दडे ॥ जैसा वारिजकोशांत पहुडे ॥ भ्रमर जेवीं कळेना ॥४९॥
ऐसें गोपी सक्रोध बोलत ॥ पोरें आंत रडती समस्त ॥ एक चळचळां कांपत ॥ बोलती स्फुंदत हरीसी ॥१५०॥
एकदां काढीं येथूनी ॥ दुसर्‍यानें हे न करुं करणीं ॥ म्हणोनि लागती हरिचरणीं ॥ चक्रपाणी हांसत ॥५१॥
गडी म्हणती हसतोसी गोविंदा ॥ उखळीं तुज जैं बांधील यशोदा ॥ सकळ गौळिणी तुज परमानंदा ॥ शिक्षा आतां करितील ॥५२॥
आम्हां ताडितील गौळिणी ॥ घरीं मारिती पिताजननी ॥ भुवनसुंदरा गदापाणी ॥ काढीं येथूनि आम्हांसी ॥५३॥
हरि म्हणे एक ऐका ॥ पुढती आतां नेत्र झांका ॥ कदा डोळे उघडूं नका ॥ नेतों सकळिकां बाहेरी ॥५४॥
सकळीं नेत्र झांकिले ॥ गवाक्षद्वारें बाहेर काढिले ॥ पेंध्यानें किंचित डोळे उघडिले ॥ माया हरीची पहावया ॥५५॥
डोळे उघडितां त्वरित ॥ पेंधा अडकला साहण्यांत ॥ अंतरिक्षी पाय लोंबत ॥ म्हणे धांव आतां गोविंदा ॥५६॥
कुलपें काढूनि त्वरित ॥ गोपी आल्या मंदिरांत ॥ तों पेंधा देखिला लोंबत ॥ गोपी सडकीत पाय त्याचे ॥५७॥
म्हणे धांव धांव मधुसूदना ॥ बहुत मारिती गजगामिना ॥ मी अन्यायी मनमोहना ॥ जगज्जीवना सोडवीं ॥५८॥
हरि म्हणे पेंधियासी ते वेळे ॥ त्वां नेत्र बहुतेक उघडिले ॥ येरु म्हणे थोडेसें पाहिलें ॥ तरी झालें ऐसें हें ॥५९॥
हात देऊनि पंकजपाणी ॥ पेंधा नेला तेच क्षणीं ॥ तों यशोदेसी घेऊनि गौळिणी ॥ निजमंदिरीं प्रवेशल्या ॥१६०॥
तो बोलें यशोदेसी जननी ॥ कोठें दावा गे चक्रपाणी ॥ मग बोलती नितंबिनी ॥ करुनि करणी गेला हो ॥६१॥
माग दिसतसे घरांत ॥ गौळिणी यशोदेसी दावीत ॥ येरी म्हणे कृष्णनाथ ॥ कोंडिला कोठें तुम्हीं हो ॥६२॥
चहूंकडे पाहणी डोळसां ॥ आला गेला न कळे कैसा ॥ ज्याची लीला न कळे महेशा ॥ सहस्त्रक्षा विरंचीतें ॥६३॥
यशोदा म्हणे ते अवसरीं ॥ प्रातःकाळपासून निजमंदिरीं ॥ खेळत होता मुरारी ॥ तुमच्या घरीं कैंसा आला ॥६४॥
कुलपें द्वारीं तैसींच सबळ ॥ तरी कोण्या द्वारें आला तमाळनीळ ॥ नसतीच घेतां हरीवरी आळ ॥ जावें गोकुळ टाकोनि ॥६५॥
एक बोले गजगामिनी ॥ गवाक्षद्वारें येतो चक्रपाणी ॥ यशोदा हांसे ऐकोनी ॥ गोष्टीं घडे कैसी हे ॥६६॥
इतुकीं मुलें घेऊनि सरसीं ॥ आला गेला हृषीकेशी ॥ येरी म्हणे ब्रह्मादिकांसी ॥ चरित्र न कळे कृष्णाचें ॥६७॥
तटस्थ जाहलिया व्रजसुंदरी ॥ माया म्हणे मज दावा गे श्रीहरी ॥ असो तुमचें खादलें किती तरी ॥ सांगा तितुकें देईन ॥६८॥
मग सकळ भाजनें दावीत ॥ तों तोंडावरी भरलें नवनीत ॥ रांजणी माथणी समस्त ॥ घृतेंकरोनि भरियेल्या ॥६९॥
जें जें पात्र पाहती उघडून ॥ त्यांत भरिले गोरस पूर्ण ॥ आंगणी आड दुग्धेंकरुन ॥ उचंबळोन आला असे ॥१७०॥
कृष्णमुखीं गोरसबिंदु अर्पिता ॥ कोटिगुणें वाढे तत्त्वताम ॥ जैसें वटबीज सूक्ष्म पेरितां ॥ सहस्त्रगुणे वाढत ॥७१॥
कीं सत्पात्रीं देतां दान ॥ कोटिगुणें वाढे संपूर्ण ॥ तैसें बिंदुमात्र कृष्णें सेवून ॥ सिंधुसमान तो देत ॥७२॥
कृष्णमुखीं जें अर्पिलें ॥ अनंतमखफळ हातां आलें ॥ गौळिणी म्हणती प्रकटलें ॥ भाग्य आमुचें अगाध ॥७३॥
यशोदा म्हणे नष्टा समस्त ॥ गौळिणी तुम्ही परम असत्य ॥ नानापरींचें आळ बहुत ॥ बाळावरी घेतां गे ॥७४॥
घरा गेलिया यशोदा ॥ खेळतां देखिलें आनंदकंदा ॥ माया हृदयीं धरुनि गोविंदा ॥ मुख चुंबीत प्रीतीनें ॥७५॥
आणि एके दिवशीं वनमाळी ॥ एके गृहीं प्रवेशे माध्यान्हकाळीं ॥ दधि भक्षितां ते वेळीं ॥ घरा आली गौळिणी ते ॥७६॥
तिणें दृढ मनगटीं धरुनी ॥ ओढूनि आणिला जेथें जननी ॥ दहीं माखलेंसे वदनी ॥ भाजनपात्र हातीं तें ॥७७॥
यशोदे बहुत दिवस जपतां ॥ आजि सांपडला अवचिता ॥ माया म्हणे कृष्णनाथा ॥ काय केलें तुवां हें ॥७८॥
कृष्ण म्हणे ऐक माते ॥ मी यथार्थ सांगतों तूंतें ॥ ही जितुकीं वचनें बोलते ॥ तितुकीं व्यर्थ असत्य ॥७९॥
माया म्हणे वदनीं पाहीं ॥ माखलेंसें तुझ्या दहीं ॥ खाऊनि म्हणसी नाही ॥ राजसा तूं कैसा रे ॥१८०॥
हरि म्हणे ऐक सावचित्त ॥ मी राजबिदीसी होतों खेळत ॥ तों गोवळे आले बहुत ॥ इच्या गृहांत प्रवेशले ॥८१॥
पोरें म्हणती ते अवसरीं ॥ हरि येतोस काय करुं चोरी ॥ बळेंचि मज धरुनि करीं ॥ घेऊनि गेले जननीये ॥८२॥
त्यांहीं गोरस भक्षिला समस्त ॥ मी उगाचि दूर होतों पाहत ॥ चोरावें इचें नवनीत ॥ हेंही मज कळेना ॥८३॥
ही येतांचि मंदिरांत ॥ गोवळे पळाले समस्त ॥ इणें मज धरिलें त्वरित ॥ अन्याय कांहीं न करितां ॥८४॥
माझ्या मुखीं दहीं इणें चर्चिलें ॥ दटावूनि मडकें हातीं दिधलें ॥ तुजजवळी ओढूनि आणिलें ॥ बळेंचि मज जननीये ॥८५॥
जे दहीं हरोनि गेले गोवळे ॥ त्यांसी न धरवे इचेनि वहिले ॥ ज्यांहीं चोरिले त्यांसी सोडिलें ॥ विरहण आलें मजवरी ॥८६॥
मातेच्या पदरें मुख पुसिलें ॥ भाजनपात्र भिरकाविलें ॥ कंठीं मिठी ते वेळे ॥ दृढ गोपाळें घातली ॥८७॥
गदगदां हांसोनि गोपिका ॥ आपुल्या गृहा गेल्या देखा ॥ मनीं म्हणती हरिलीला ब्रह्मादिकां ॥ न कळे सहसा निर्धारें ॥८८॥
मातेसी म्हणे गोविंद ॥ मज जेवूं घालीं भातदुग्ध ॥ मातेचे कंठीं वेदवंद्य ॥ मिठी घालीत पुढती पैं ॥८९॥
माया म्हणे श्यामसुंदरा ॥ आतां निकेतनपति येती मंदिरा ॥ त्यां सांगातें जेवीं सुकुमारा ॥ तों गोदोहन करितें मी ॥१९०॥
ऐसी ऐकतांचि गोष्टी ॥ उठे हांसत जगजेठी ॥ त्याचा महिमा वर्षकोटी ॥ वर्णितांही सरेना ॥९१॥
एके दिवशीं कमलासनपिता ॥ प्रातःकाळ जाहला असतां ॥ मातेसी म्हणे तत्त्वतां ॥ दूध प्यावयासी दे मज ॥९२॥
माता म्हणे आजि मित्रवार ॥ दुग्ध अनसूट असे समग्र ॥ खंडेराव दैवत तीव्र ॥ पुसे रमावर कोठें आहे ॥९३॥
माता म्हणे देव्हारां ॥ पाहें जाय सुकुमारा ॥ डोळसा मदनताता सुंदरा ॥ सर्वेश्वरा गोविंदा ॥९४॥
देव्हारां येऊनि गोपाळ ॥ पाहे देवाधिदेवा निर्मळ ॥ तंव ते टांक देवांचे सकळ ॥ दोरियेनें गोंविले ॥९५॥
मातेसी म्हणे क्षीराब्धिजाकांत ॥ येवढें देवांचें सांगसी सत्त्व ॥ तरी ह्या दोरीनेंनिश्चित ॥ कां आकळूनि रक्षिले ॥९६॥
काय तुझा देव करील ॥ म्हणोनियां वैकुंठपाळ ॥ बळेंचि दुग्ध सकळ ॥ तमालनीळ पीतसे ॥९७॥
त्याउपरी ते रात्र क्रमिली ॥ प्रातःकाळीं उठोनि वनमाळी ॥ मातेसी म्हणे ते वेळीं ॥ कडेवरी घेईं मज ॥९८॥
माझी वांकडी झाली मान ॥ दोन्ही दुखताती नयन ॥ माता म्हणे मल्लारी पूर्ण ॥ हरि तुजवरी क्षोभला ॥९९॥
खंडेराव दैवत दुरळ ॥ प्रचीत दाविली तत्काळ ॥ मातेचे नेत्रीं वाहे जळ ॥ म्हणे आतां काय करुं मी ॥२००॥
कडेवरी घेतला कृष्णा ॥ मायेचे खांदां टाकिली मान ॥ जैसा भ्रमर बैसे संकोचून ॥ कमलकोषीं प्रीतीनें ॥१॥
देव्हारां येऊनि माया ॥ म्हणे मार्तंडा खंडेराया ॥ हरिवरी कृपा करीं लवलाह्या ॥ म्हणोनि लावी आंगारा ॥२॥
तों अकस्मात म्हाळसापती ॥ देदीप्यमान दिव्यमूर्ती ॥ तडिदंबरप्रभा फांकती ॥ कैलासपति साक्षात ॥३॥
खंडा झळके दक्षिणकरीं ॥ हरिद्राचूर्ण उधळे वरी ॥ तुरंगवहन त्रिपुरारी ॥ उमानाथ प्रकटला ॥४॥
दिव्य तेजें भरलें गगन ॥ जो मणिमल्लप्राणहरण ॥ तो साक्षात शिव हयवाहन ॥ यशोदेसी बोलत ॥५॥
तुझें पूर्वपुण्य अद्‌भुत ॥ उदरा आला त्रैलोक्यनाथ ॥ त्याच्या अंगीं दैवतें समस्त ॥ देव आम्ही यशोदे ॥६॥
ब्रह्मानंद हा साक्षात ॥ यासी भज घरीं भावार्थ ॥ यासी पूजितां देव समस्त ॥ तृप्त होतीं निर्धारें ॥७॥
ऐसें बोलोनि तये वेळां ॥ खंडेराव गुप्त जाहला ॥ मातेसी हृदयीं कळला ॥ हरिप्रताप अद्‌भुत ॥८॥
एके दिवशी अधोक्षज ॥ म्हणे आधीं जेवूं घालीं मज ॥ जो मायातीत विश्वबीज ॥ आदिपुरुष परात्पर ॥९॥
त्यासी माया म्हणे कान्हया ॥ आधीं देवपूजा करोनियां ॥ मग मी तुज रे बा तान्हया ॥ जेवूं घालीन निर्धारें ॥२१०॥ हरि म्हणे मातेप्रती ॥ देव तरी आहेत किती ॥ माता म्हणे भगवती ॥ परम दैवत दारुण ॥११॥
खंडेराव महाखडतर ॥ भैरव दैवत महातीव्र ॥ गणेश पावतो सत्वर ॥ नाम घेतां आरंभीं ॥१२॥
ऐसें बोलतां माता ते ॥ गदगदाम हांसोनि जगन्नाथें ॥ म्हणे भज देवाधिदेवातें ॥ ते म्हणे आम्हांतें कैसा दिसे ॥१३॥
तत्काळ चतुर्भुज घनश्याम ॥ शंख चक्र गदा पद्म ॥ पीतांबरधारी पुरुषोत्तम ॥ यशोदेनें देखिला ॥१४॥
यशोदा नमस्कारी तत्काळ ॥ सवेंचि घालोनि मायाजाळ ॥ जसा पूर्वीं होता बाळ ॥ दीनदयाळ तैसा झाला ॥१५॥
एके दिनीं जगत्पती ॥ बोलावी देव्हार्‍याच्या मूर्ती ॥ म्हणे सांगा तुम्हीं मातेप्रती ॥ कीं कृष्णास आधीं वाढिजें ॥१६॥
माया आली देव्हारियाजवळी ॥ तों धातुमूर्ती बोलती ते वेळीं ॥ म्हणती सच्चिदानंदवनमाळी ॥ भजें यासी सद्भावें ॥१७॥
कृष्णासी आधीं जेवूं घालीं ॥ तरी तुझी पूजा आम्हांसी पावली ॥ ऐसें ऐकतां माया ते वेळी ॥ तटस्थ जाहली सप्रेम ॥१८॥
असो एके दिनीं श्रीहरी ॥ खेळत असतां ओसरीवरी ॥ माया म्हणे मुरारी ॥ दुग्धपान करीं कां ॥१९॥
हरि म्हणे मी दुग्धपान न करीं ॥ माता म्हणे बळिराम गेलां बाहेरी ॥ तोंवरी तूं पूतनारी ॥ दूध झडकरीं पिईं कां ॥२२०॥
बळिराम बाहेरुन आलिया ॥ तुज वांटा मागेल तान्हया ॥ हरि म्हणे दुग्ध प्यालिया ॥ काय होतें मज सांग ॥२१॥
बा रे शिखा वाढते साचार ॥ वनमाळी ॥ म्हणे कां शिखा नाहीं वाढली ॥ तनू काळीं दिसतसे ॥२२॥
माता म्हणे जगन्नायका ॥ आजचि कैसी वाढेल शिखा ॥ हांसे येतसे वैकुंठनायका ॥ बोल मातेचे ऐकोनि ॥२३॥
एके दिवशीं राम आणि कृष्ण ॥ आंगणीं खेळती दोघेजण ॥ हरीसी म्हणे संकर्षण ॥ तुज हें कळलें नाहीं कीं ॥२४॥
कोंडा देऊनियां जाणा ॥ तुज पोसणें घेतलें कृष्णा ॥ याची प्रचीत जगजीवना ॥ पाहे तुज सांगतों ॥२५॥
मायबापें गोरीं तुझी गोपाळा ॥ त्यांचे पोटींचा तूं तरी काळा ॥ कोंडा देऊनि घेतलें तुला ॥ तैसेंच मजला कळलें पैं ॥२६॥
ऐसे बोलतां बळिभद्र ॥ स्फुंदस्फुंदोनि रडे यादवेंद्र ॥ माता येऊनि सत्वर ॥ हृदयीं धरी गोपाळा ॥२७॥
पल्लवें पुसी राजीवनयन ॥ म्हणे तुज बोलिलें कोण ॥ स्फुंदस्फुंदोनि सांगे जगज्जीवन ॥ मज पोसणा म्हणे दादा ॥२८॥
माता म्हणे माझ्या उदरीं ॥ तूं जन्मलासी मुरारी ॥ बळिराम चाळवितो निर्धारीं ॥ तुजलागीं गोपाळा ॥२९॥
मातेनें कडेवरी घेतला ॥ मुख चुंबीत वेळोवेळां ॥ निंबलोण उतरी वेल्हाळा ॥ कृष्णावरुनि झडकरी ॥२३०॥
एके दिवसीं उषःकाळीं ॥ उठोनियां वनमाळीं ॥ एके गोपीचें घरीं ते वेळीं ॥ कौतुक केलें अद्‌भुत ॥३१॥
ब्राह्मीं मुहूर्तीं उठोनि जाणा ॥ गोपी गेलिया माघस्नाना ॥ मागें सकळ गाई राना ॥ लावूनियां दीधल्या ॥३२॥
बैल आणूनियां सकळ ॥ तिच्या वाडियांत बांधी घननीळ ॥ गोपी गृहा आली तत्काळ ॥ धारा काढूं धांवतसे ॥३३॥
भरणा घेऊनि बैसे खालती ॥ तों वृषण हातास लागती ॥ सर्व गाईंच्या कांसा धरीत हातीं ॥ एकचि गति चहूंकडे ॥३४॥
विस्मित जाहली बाला ॥ तों तमांतक उगवला ॥ तो वृषभांनीं वाडा भरला ॥ एकही गाय दिसेना ॥३५॥
कळली कृष्णाची करणी ॥ गार्‍हाणीं सांगों येती गौळणी ॥ माया वेताटी घेऊनी ॥ शिक्षा करावया धांवत समयीं ॥३६॥
दृढ आलिंगिला निजहृदयीं ॥ चुंबन देऊनि लवलाहीं ॥ यशोदेसी बोलता ॥३७॥
नंद म्हणे कां हो धांवसी ॥ माया म्हणे सोडूं नका यासी ॥ याणें पीडिलें गौळिणींसी ॥ याचे खोडीसी अंत नाहीं ॥३८॥
नंदापाशी सांगे सांवळा ॥ ह्या धमकटी गौळिणी सकळा ॥ मातेपाशीं वेळोवेळां ॥ लटकींच देती गार्‍हाणीं ॥३९॥
घेती नसतीच मजवरी आळ ॥ मातेसी खरें वाटे सकळ ॥ हांसे यशोदा वेल्हाळ ॥ नंदमुख विलोकूनि ॥२४०॥
घरास आणिलें जगन्नाथ ॥ नंद म्हणे मजपरता ॥ भाग्याचा नाहीं तत्त्वतां ॥ त्रिभुवनीं शोधितां हो ॥४१॥
एकदां बळिरामासीं हरि खेळे ॥ गोपाळ दोहींकडे वांटले ॥ तों कृष्णाकडे ते वेळे ॥ डाव लागला खेळतां ॥४२॥
ऐसें देखोनि चक्रपाणी ॥ बळिरामाची दोघे मुलें धरुनी ॥ त्यांच्या शिखा परस्परें बांधोनी ॥ वृक्षावरी घालीत ॥४३॥
मुलें ठेवूनि वृक्षावरी ॥ आपण लपला श्रीपती ॥ बाळें सोडविलीं निश्चितीं ॥ बळिरामें येऊनियां ॥४४॥
यशोदेजवळी गार्‍हाणी ॥ सांगों येती गजगामिनी ॥ म्हणती मुलांच्या शिखा बांधोनी ॥ वृक्षडहाळीवरी ठेवी ॥४५॥
माता म्हणे पूतनारी ॥ किती सोसाव्या खोडी तरी ॥ ऐक शास्त्र तरी पुढें मुरारी ॥ यावरी हरि बोलतसे ॥४६॥
हरि म्हणे मातेसी ॥ शास्त्र जें मज पढविसी ॥ तें कोणाचें शास्त्र निश्च्येंसीं ॥ सांग मजसी जननीये ॥४७॥
माता म्हणे देवांचें शास्त्र ॥ मग बोले राजीवनेत्र ॥ तें शास्त्र पढतां साचार ॥ काय देतो देव पैं ॥४८॥
माता म्हणे देतो मुक्तीतें ॥ हरि म्हणे ते तुजचि होऊं दे माते ॥ मी न सोडीं चोरीतें ॥ नवनीताच्या कदापि ॥४९॥
यशोदा म्हणे कृष्णनाथा ॥ आण वाहें तूं तत्त्वतां ॥ जे मी चोरी न करीं सर्वथा ॥ शपथ आतां बोलें पैं ॥२५०॥
गोरसावांचोनि न करीं चोरी ॥ माते आण तुझी निर्धारीं ॥ ऐसें बोलतां कैटभारी ॥ माता हांसे गदगदां ॥५१॥
एके दिवशीं यशोदा ॥ जेवूं घाली परमानंदा ॥ दहींभात पुढें मुकुंदा ॥ कालवोनि दीधला ॥५२॥
लोणचें आणीं माते झडकरी ॥ येरी म्हणे आहे सोंवळ्याभीतरी ॥ लोळणी घालीत मुरारी ॥ म्हणे न जेवीं सर्वथा ॥५३॥
मग सोंवळें विटाळोनी ॥ आलें निंबें घाली जननी ॥ गौळी भुलले अहंममतेंकरुनी ॥ नेणती करणी हरीची ॥५४॥
गोकुळींची एक म्हातारी ॥ सुनेसी राखी दिवसरात्रीं ॥ म्हणे कृष्णाचा वारा निर्धारीं ॥ पडों नेदीं सर्वदा ॥५५॥
यास येऊं देशील जरी मंदिरा ॥ तरी मुकलीस आपुल्या संसारा ॥ नांवरुपा न उरे थारा ॥ झणीं यदुवीरा ऐक्य होसी ॥५६॥
तों वृद्धा दिवशीं मंदिरीं ॥ एकलीच होती सुंदरी ॥ वृद्धा गेली बाहेरी ॥ तों मागें हरि पातला ॥५७॥
त्या गोपीस हरि भोगीत ॥ तों वृद्धा पातली घराम्त ॥ दोघांजणां हातीं धरीत ॥ बिदीस नेत ओढूनि ॥५८॥
वृद्धा सांगे अवघ्यांजणां ॥ हीं दोघें धरिलीं पहा नयना ॥ लोक म्हणती सून पुत्र दोघांजणां ॥ कोठें नेतीस म्हातार्‍ये ॥५९॥
वृद्धा म्हणे हा घननीळ ॥ तुम्ही नेणां काय लोक सकळ ॥ नंदगृहास तत्काळ ॥ दोघां घेऊनि पातली ॥२६०॥
तों तेथें खेळे हृषीकेशी ॥ विस्मय वाटे वृद्धेसी ॥ नंद म्हणे पुत्रसुनेसी ॥ कां आणिलें चावडिये ॥६१॥
वृद्धा म्हणे या दोघांसी धरिलें ॥ नंद म्हणे तुझें काय गेलें ॥ अवघ्यांनीं वृद्धेसी गोफाटिलें ॥ निर्भर्त्सिलें सकळिकी ॥६२॥
यशोदा म्हणे बाळावरी आळ ॥ ऐसेचि घेती जन सकळ ॥ पूर्णब्रह्मानंद निर्मळ ॥ कृष्ण माझा निर्धारीं ॥६३॥
मग आपुल्या घरा गेली वृद्धा ॥ सोडूनि दिधलें परमानंदा ॥ ज्याचिया गुणाची मर्यादा ॥ शिव स्वयंभू नेणेचि ॥६४॥
एकदां कडे घेऊनि हृषीकेशी ॥ गोपी आल्या रविकन्यातीरासी ॥ जैसा विद्युल्लताभार आकाशीं ॥ तैसा दिसे समुदाय ॥६५॥
तों तेथें नाव खुंटली ॥ घरास गेले तारक सकळी ॥ गोपिकांनीं नाव सोडिली ॥ आंत बैसल्या सर्वही ॥६६॥
एक नौकादंड करीं घेती ॥ सव्य अपसव्य आवलिती ॥ तों धारेमाजी निश्चितीं ॥ नाव गेली तेधवां ॥६७॥
जुनी नाव अत्यंत पाहीं ॥ छिद्रें पडलीं ठायीं ठायीं ॥ माजी उदक आलें लवलाहीं ॥ धरवत अतिवेगेंसीं ॥६८॥
उदक देखतां युवती ॥ परम भयभीत होती ॥ म्हणती काय करावें श्रीपती ॥ नौका बुडेल कीं आतां ॥६९॥
हरि म्हणे कंचुक्या काढूनी ॥ बोळे घालोनि कोंडा पाणी ॥ ऐसें ऐकोनि गजगामिनी ॥ नावेचीं छिद्रें कोंडिती ॥२७०॥
बोळे निघोनियां गेले ॥ अधिकच पाणी आंत भरलें ॥ गोपी म्हणता ये वेळे ॥ काय सांग करावें ॥७१॥
हरि म्हणे वस्त्रें काढून बुजा ॥ तैसेंचि करिती आरजा ॥ म्हणती काय करावें अधोक्षजा ॥ संकट थोर मांडलें ॥७२॥
तों तेथें सूर्य मावळला ॥ असंभाव्य पर्जन्य वळला ॥ तमें नभोमंडप भरला ॥ मोठा सुटला प्रभंजन ॥७३॥
भयानक लाटा उचंबळती ॥ जळचरांचे पाळे धांवती ॥ भ्यासुर मुखें पसरिती ॥ प्रळयगति ओढवली ॥७४॥
गोपी म्हणती वैकुंठनाथा ॥ विश्वव्यापका रमाकांता ॥ पुराणपुरुषा अव्यक्ता ॥ धांवें आतां ये वेळीं ॥७५॥
आमुचे प्राण गेले तरी काय ॥ परी हरि बुडेल कीं आतां सये ॥ प्रळय करी कीं याची माय ॥ प्राण देईल ऐकतां ॥७६॥
पाहोनियां कृष्णमुखा ॥ सद्गद रडती गोपिका ॥ धांवें यावें इंदिरानायका ॥ कृष्ण आमुचा वांचवी ॥७७॥
जानूइतुकें नीर गोपिकांस जाहलें ॥ श्रीकृष्णास नाभीपर्यंत आलें ॥ हरीस कडियेवरी घेतलें ॥ कंठ दाटले गोपिकांचे ॥७८॥
हृदयपर्यंत जाहलें जीवन ॥ स्कंधीं घेतला जगज्जीवन ॥ आकंठ उदक जाहलें पूर्ण ॥ म्हणती मरण आलें कीं ॥७९॥
देहांत आला जवळी ॥ गोपिकांनीं मूर्ति सांवळी ॥ हृदयीं तैसीच रेखिली ॥ वृत्ति मुराली हरिरुपीं ॥२८०॥
गोपी म्हणती सांवळे कान्हाई ॥ जगन्मोहने कृष्णाबाई ॥ ऐसें जन्मोजन्मीं देईं ॥ दर्शन तुझें राजसे ॥८१॥
आम्ही अनंत घेऊं जन्मां ॥ परी तूं आम्हांसी खेळे मेघश्यामा ॥ भक्तकामकल्पद्रुमा ॥ ऐसाचि भेटें पुढती तूं ॥८२॥
आपणाम आलें निकट मरण ॥ परी गोपिका न सोडिती स्मरण ॥ निर्वाणींचे भक्तां जाण ॥ राजीवनयन तुष्टला ॥८३॥
पर्जन्य अकस्मात उघडला ॥ अभ्र वितळलें सूर्य प्रगटला ॥ जळचरांचा मेळा दूर गेला ॥ समीर राहिला स्थिर पैं ॥८४॥
अकस्मात नाव कडेसी ॥ लागली देखोनि गोपिकांसी ॥ आनंद जाहला न माय आकाशीं ॥ निजगृहासी पातल्या ॥८५॥
यशोदेसी सांगती कृष्णचरित्र ॥ आजि हरीनें केलें विचित्र ॥ ऐकतां पापारण्य सर्वत्र ॥ भस्म करी जाळूनि ॥८६॥
नाव तीरास लागली जेव्हां ॥ गोपींचीं वस्त्रें तैसींच तेव्हां ॥ तो जगद्‌गुरु त्याचिया भावा ॥ ब्रह्मादिकां न कळती ॥८७॥
जो अनंतब्रह्मांडनायक ॥ लीलावतारी जगव्द्यापक ॥ वस्त्रें निर्मावया काय अशक्य ॥ दीनबंधु सर्वात्मा ॥८८॥
हरिविजयग्रंथ हाचि समुद्र ॥ साहित्यमुक्तें अतिपवित्र ॥ त्यांचे शोधक सज्जन नर ॥ बुडया देती स्वानंदें ॥८९॥
बुडी दिधल्याविण होता ॥ मुक्तें न येती सर्वथा ॥ अविध होती जीं तत्त्वतां ॥ गुरुकृपें विंधिलीं तीं ॥२९०॥
तीं ओविलीं सद्‌गुणगुणीं ॥ समसमान चहूंकडूनी ॥ ते मुक्ताभाळ सतेजपणीं ॥ संतांचे कंठीं डोलत ॥९१॥
ब्रह्मानंदा परात्परा ॥ गोकुळपाळका दिगंबरा ॥ वेदवंद्या श्रीधरवरा ॥ निर्विकारा अभंगा ॥९२॥

इति श्रीहरिविजयग्रंथ ॥ संमत हरिवंशभागवत चतुर श्रोते परिसोत ॥ नवमाध्याय गोड हा ॥२९३॥
श्रीकृष्णार्पणमस्तु॥ ॥अध्याय॥९॥ओंव्या॥२९३॥

Sunday, June 10, 2012

हरिविजय - अध्याय ८


अध्याय ८ 


श्रीगणेशाय नमः ॥  श्रीकुलदेवतायै नमः ॥श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥
ज्याचें करितां स्मरण ॥ तुटे जन्मसंसारबंधन ॥ प्रकाशे पूर्ण आत्मज्ञान ॥ जाय निरसोन देहबुद्धि ॥१॥
ज्याची ऐकतां लीलाकथा ॥ निरसे समूळ मोहममता ॥ निर्दोष पद ये हाता ॥ करितां वर्णितां हो ॥२॥
जो विश्वबीज विश्वालय ॥ क्षीराब्धितनयेचा परम प्रिय ॥ जो निर्विकार अज अव्यय ॥ जो सच्चिदानंदघनतनु ॥३॥
श्रोता आणि वक्ता ॥ साहित्यकथा कविता ॥ श्रवणाअर्थबोधकर्ता ॥ जगन्नाथा तूंचि सर्व ॥४॥
भीमातीरवासा पंढरीनाथा ॥ पुढें बोलें हरिविजयग्रंथा ॥ तुझी अद्‌भुत लीला समर्था ॥ तूंचि बोले रसाळ ॥५॥
मी केवळ मतिमंद आळसी ॥ मजहातीं हा ग्रंथ करविसी ॥ जरी सकळ साहित्य पुरविसी ॥ तरीच रसीं ग्रंथ चढे ॥६॥
मागें सप्तमाध्यायाचे अंतीं ॥ गार्‍हाणें गौळिणी सांगती ॥ दशवतारांची लीला रीती ॥ दाविली गति अद्‌भुत ॥७॥
आपुली लीला वर्णिली भगवंतें ॥ परी ते मिथ्यां वाटे गोपिकांतें ॥ तीं दशावतारचरित्रें अद्‌भुतें ॥ गोपींनीं सांगितलीं यशोदे ॥८॥
म्हणती यशोदे सुंदरी ॥ बहु खोडी करितो मुरारी ॥ याचीं गार्‍हाणीं वर्णितां वक्त्रीं ॥ शेषही भागे जाण पां ॥९॥
गोपी म्हणती यशोदे सती ॥ तूं व्रत घेईं संकष्टचतुर्थी ॥ गणेश गुण देईल याप्रती ॥ निश्चयेंसीं जननीये ॥१०॥
गणेश देईल उत्तम गुण ॥ मानीं आमुचें वचन प्रमाण ॥ यशोदा म्हणे अवश्य करीन ॥ संकष्टचतुर्थीव्रत आतां ॥११॥
गजवदनासी म्हणे यशोदा ॥ गुण देईं माझिया मुकुंदा ॥ संकष्टचतुर्थी सर्वदा ॥ न सोडीं मी जाण पां ॥१२॥
वचन ऐकोनि कृष्णनाथें ॥ सत्य करावया गणेशातें ॥ खोडी नाहीं केली अनंतें ॥ एकमासपर्यंत ॥१३॥
यशोदा म्हणे आली प्रचीती ॥ धन्य धन्य देव गणपती ॥ तों सवेंचि आली चतुर्थी ॥ संकटहर्त्री सर्वांचें ॥१४॥
इंदिराबंधूचा उदय होय ॥ तंववरी यशोदा उपवासी राहे ॥ पूजासामग्री लवलाहें ॥ करी माय सिद्ध तेव्हां ॥१५॥
थोर थोर लाडू एकवीस ॥ शर्करामिश्रित केले सुरस ॥ सिद्धलाडू विशेष ॥ आणि बहुवस मोदक ते ॥१६॥
ऐसा नैवेद्याचा भरुन हारा ॥ माता नेऊन ठेवी देव्हारां ॥ तों उदय जाहला निशाकरा ॥ पडिला अंबंरीं प्रकाश ॥१७॥
मातेसी म्हणे हृषीकेशी ॥ लाडू मज कधीं देसी ॥ माता म्हणे गजवदनासी ॥ नैवेद्य दावून देईन ॥१८॥
आणिक धूप दीप सामग्री ॥ माता आणूं गेली बाहेरी ॥ देव्हारियाजवळी श्रीहरी ॥ एकलाचि उभा होता ॥१९॥
एकांत देखोनि ते वेळां ॥ श्रीकृष्ण हारा उचलिला ॥ नैवेद्य सर्वही स्वाहा केला ॥ क्षणमात्र न लगतां ॥२०॥
मौनेंच करुनि सर्व ग्रास ॥ उगाच बैसला जगदीश ॥ श्रीवैकुंठपुरविलास ॥ लीला भक्तांस दावीत ॥२१॥
धूप दीप घेऊनि त्वरित ॥ माता आली सदनांत ॥ तों रिताचि देखिला हारा तेथ ॥ देव्हारियावरी पडियेला ॥२२॥
विस्मय मायेसी वाटला ॥ म्हणे रे कृष्णा घननीळा ॥ नैवेद्य अवघा काय झाला ॥ हारा पडिला रिता कां ॥२३॥
श्रीकृष्ण म्हणे वो माते ॥ सत्य मानीं वचनातें ॥ एक सहस्त्र उंदीर येथें ॥ आले होते आतां हो ॥२४॥
त्यांत एक थोरला मूषक ॥ त्यावरी बैसला विनायक ॥ सोंडेनें लाडू सकळिक ॥ एकाएकीं आकर्षिले ॥२५॥
सर्वांगीं चर्चिला शेंदूर ॥ सोंड हालवी भयंकर ॥ उदर त्याचें भ्यासुर ॥ देखोनि थोर भ्यालों मी ॥२६॥
बोबडी वळली वदनीं ॥ न बोलवे माझेनि जननी ॥ क्षुधा लागली मजलागूनी ॥ लाडू देईं सत्वर ॥२७॥
जननी बोले क्रोधायमान ॥ उघडूनि दावीं तुझें वदन ॥ जगन्निवास करी रुदन ॥ दीन वदन करुनियां ॥२८॥
लाडू होते बहुत ॥ कैसे जातील माझिया मुखांत ॥ विचार करुनि निश्चित ॥ मग मज शिक्षा करीं वो ॥२९॥
गणेश गेला लाडू घेऊन ॥ मजवरी आलें विहरण ॥ माता म्हणे वदन उघडून ॥ दावीं मज मुकुंदा ॥३०॥
हरि म्हणे मारुं नको माते ॥ उघडूनि दावितों वदनातें ॥ मातेपुढें वैकुंठनाथें ॥ मुख पसरुनि दाविलें ॥३१॥
तों ब्रह्मांड देखिलें संपूर्ण ॥ वैकुंठ कैलास आदिकरुन ॥ असंख्य दिसती गजवदन ॥ जननी पाहोन तटस्थ ॥३२॥



कृष्ण्मुखांतून गजवदन ॥ मातेसी म्हणे ऐक वचन ॥ हा देवाधिदेव सनातन ॥ तुझें उदरीं अवतरला ॥३३॥
आम्ही समस्तही देव ॥ या श्रीकृष्णाचे अवयव ॥ पूर्णब्रह्मानंद केशव ॥ भजें यासी जननीये ॥३४॥
यशोदा जाहली समाधिस्थ ॥ अहंकृति विराली समस्त ॥ आप आपणा विसरत ॥ लीला अद्‌भुत देखोनि ॥३५॥
नेत्र उघडोनि सवेंचि पाहे ॥ तो कृष्ण पुढें उभा आहे ॥ म्हणे लाडू देईं जननीये ॥ क्षुधा बहुत लागली ॥३६॥
माता सद्गदित होवोन ॥ कृष्ण कडिये घेतला उचलोन ॥ हरि सांगाते घेऊन ॥ करी भोजन यशोदा ॥३७॥
एकदाम बळिभद्र चक्रपाणी ॥ खेळत असतां आंगणीं ॥ कृष्णें मृत्तिका घेऊनी ॥ आपुल्या वदनीं घातली ॥३८॥
बळिराम म्हणे हृषीकेशी ॥ आतां सांगतों मातेपाशीं ॥ म्हणोनि संकर्षण वेगेंसीं ॥ मंदिरांत प्रवेशला ॥३९॥
मग म्हणे जननीसी ॥ मृत्तिका भक्षितो हृषीकेशी ॥ मग ते शिपटी घेऊनि वेगेंसी ॥ हरीपासी पातली ॥४०॥
कृष्णास बोले दटावून ॥ म्हणे मुख दावीं उघडून ॥ तों भयभीत जगज्जीवन ॥ दीन वदन करी तेव्हां ॥४१॥
जननी मारील म्हणोन ॥ वर हस्त करी जगज्जीवन ॥ माते बळिराम येऊन ॥ लटकेंच सांगे तुजपासीं ॥४२॥
याचे मनींचा भाव पूर्ण ॥ कीं मज तुवां करावें ताडन पाहें जननी माझें वदन ॥ कैसी मृत्तिका भक्षिली ॥४३॥
मुख हरीनें पसरिलें ॥ तो ब्रह्मांड सकळ देखिलें ॥ हा पूर्णब्रह्म ऐसें ओळखिले यशोदेनें निजमनीं ॥४४॥
असो एके दिनीं कमलोद्भवपिता ॥ स्फटिकभूमींत खेळतां ॥ लीला दाविली ते आतां ॥ सादर ऐका भाविक हो ॥४५॥
स्फटिकभूमींत प्रतिबिंब ॥ घननीळें देखिलें स्वयंभ ॥ मातेसी म्हणे निजभक्तवल्लभ ॥ मज काढूनि देईं तें ॥४६॥
तों हांसोनि बोले माता ॥ तो न ये हरि काढितां ॥ ऐसे ऐकतांचि जगत्पिता ॥ लोळणी तेव्हां घालीत ॥४७॥
गडबडां लोळे धरणीं ॥ म्हणे प्रतिबिंब दे काढूनी ॥ नानाप्रकारें समजावी जननी ॥ परी रडतां न राहे ॥४८॥
दिधलीं बहुत खेळणीं ॥ परी तीं न घे चक्रपाणी ॥ घातला पाळणां नेऊनी ॥ परी कदापि न राहे ॥४९॥
माता म्हणे श्रीहरी ॥ नीज घेईं तूं क्षणभरी ॥ प्रतिउत्तर दे पूतनारी ॥ निजस्वरुपीं मीच असे ॥५०॥
माया म्हएन किती रडतोसी ॥ गोष्टी गोड सांगे मजसी ॥ हरि म्हणे बोलावयासी ॥ दुसरेपण दिसेना ॥५१॥
ऐसे रडतां करी बोल ॥ परी समजेना तमाळनीळ ॥ तैसाचि सोडून भक्तवत्सल ॥ माय गेली स्वकार्या ॥५२॥
तों कार्यप्रसंगें त्या अवसरीं ॥ राधा येत यशोदेच्या मंदिरीं ॥ तों पालखामाजी जगदुध्दारी ॥ रडतां देखिला तियेनें ॥५३॥
म्हणे कां रडसी रे चावटा ॥ गोष्टी सांगसी कीं अचाटा ॥ ऐसें बोलोनि देववरिष्ठा ॥ कडेवरी घेतलें ॥५४॥
तों राहिला उगाच रडतां ॥ माय म्हणे ऐक राधे आतां ॥ नेईं घरासी कृष्णनाथा ॥ येथें रडताम न राहे ॥५५॥
राधा म्हणे भुवनसुंदरा ॥ चाल आतां माझ्या मंदिरा ॥ कडिये घेवोनि विश्वोद्धारा ॥ राधा त्वरें चालिली ॥५६॥
डोल्हारियावरी नेऊनी ॥ बैसविला कैवल्यदानी ॥ तों भ्रतार नव्हता सदनीं ॥ असे गौळवाड्यां सदा तो ॥५७॥
तों राधेची सासू म्हातारी ॥ तीही नसे कदा घरीं ॥ सदा राहे घोषमंदिरीं ॥ दधिमंथनाकारणें ॥५८॥
असो घरीं एकांतीं राधा ॥ हालवी डोल्हारां वेदवंद्या ॥ तिचिया स्वरुपाची मर्यादा ॥ कोणासही न वर्णवे ॥५९॥
जैसा कां इंदु संपूर्ण ॥ तैसें राधेचें सुहास्यवदन ॥ नासिक सरळ शोभायमान ॥ आकर्णनयन सुरेख ते ॥६०॥
कर्णीं जडित ताटंकें ॥ अत्यंत तळपती सुरेखें ॥ नक्षत्रपुंजांसारिखे ॥ मुक्ताघोंस डोलती ॥६१॥
जैसे कां हिरे तळपती ॥ वदनीं तैशा द्विजपंक्ती ॥ सकळ अलंकारांची दीप्ती ॥ सदनामाजी न समाये ॥६२॥
असो ऐसी राधिका सुंदरा ॥ डोल्हारां हालवी जगदुद्धारा ॥ मग म्हणे यादवेंद्रा ॥ तूं धाकुटा बहुत अससी ॥६३॥
जरी असतासी निमासुर ॥ तरी होता बरवा विचार ॥ मग म्हणे ब्रजराजकिशोर ॥ थोर होईन आतां मी ॥६४॥
गदगदां हांसे राधा ॥ कैसा थोर होसी गोविंदा ॥ ऐसें बोलतां ते मुग्धा ॥ स्वरुप थोर धरियेलें ॥६५॥
जो अनंतब्रह्मांडकर्ता ॥ जो आदिमायेचा निजभर्ता ॥ त्यासी थोर व्हावया अशक्यता ॥ सहसाही नसेचि ॥६६॥
निमासुर मुख सुंदर ॥ जाहला वैकुंठीचा सुकुमार ॥ राधा म्हणे हा ईश्वर ॥ गोकुळामाजी अवतरला ॥६७॥
सुखशेजे नित्य राधा ॥ भोगीतसे परमानंदा ॥ त्यजोनिया द्वैतभेदा ॥ कृष्णरुपीं मीनली ॥६८॥



तों तेच समयीं भ्रतार अनया ॥ आला घृतकावडी घेऊनियां ॥ वाडयांत प्रवेशला लवलाह्यां ॥ तों कपाट दिधलेंसे ॥६९॥
अनया म्हणे राधेसी ॥ द्वार उघडी वेगेंसी ॥ कोणासीं बोलतेसी ॥ गुजगोष्टी घरांत ॥७०॥
ऐकोनि भ्रताराचिया शब्दा ॥ भयभीत जाहली राधा ॥ मग म्हणे श्रीगोविंदा ॥ लहान होईं सत्वर ॥७१॥
माझी लाज राखीं आतां ॥ पूर्ववत होईं मागुता ॥ तंव तो मायाचक्रचाळिता ॥ पांच वर्षांचा जाहला ॥७२॥
ऐसें देखोनि ते अवसरीं ॥ राधेचा हर्ष न माये अंबरीं ॥ दहींभात आणूनि झडकरी ॥ कृष्णापुढें ठेविला ॥७३॥
भ्रतारासी म्हणे सुंदर ॥ कृष्ण जेविताहे समोर ॥ तुम्ही क्षण एक धरा धीर ॥ द्वार आतां उघडितें ॥७४॥
सवेंचि द्वार उघडिलें ॥ तों देखिलें रुप सांवळें ॥ अनयानें कृष्णास पुढें घेतलें ॥ मुख चुंबिलें प्रीतीनें ॥७५॥
अनया म्हणे राधेसी पाहीं ॥ तुज न गमेचि निजगृहीं ॥ कृष्णासी नित्य आणीत जाई ॥ खेळावया निजमंदिरा ॥७६॥
याचें पाहतां श्रीमुख ॥ अनंतजन्मीचें हरे दुःख ॥ तुज काळ क्रमावया आणिक ॥ कृष्णाविण असेना ॥७७॥
राधा वंदी भ्रताराचे चरण ॥ तुमची आज्ञा मज प्रमाण ॥ मायेनें घरासी नेतां जगज्जीवन ॥ करी रुदन आक्रोशें ॥७८॥
ऐसें बहुत दिवस जाहलियावरी ॥ गुजगुज उठली गोकुळाभीतरीं ॥ कृष्ण राधेच्या घरीं ॥ थोर होतो म्हणोनियां ॥७९॥
एक म्हणती गोष्टी नोहे ॥ लहानाचा थोर कैसा होय ॥ एक म्हणती नवल काय ॥ कृष्ण नाटकी बहु असे ॥८०॥
कोणी म्हणती सगुण ॥ एक म्हणती निर्गुण ॥ एक म्हणती गुणागुण ॥ याचे ठायीं नाहींत ॥८१॥
वेदांती यास ब्रह्म म्हणती ॥ मीमांसक याचिलागीं कर्में करिती ॥ सर्वकर्ता हाचि म्हणती ॥ नैयायिक ययातें ॥८२॥
सांख्यशास्त्र गर्जत ॥ प्रकृतिपुरुष सांगत ॥ तोचि हा कृष्णनाथ ॥ गोकुळांत अवतरला ॥८३॥
भाष्यकार शब्द साधून ॥ याचिया नामाचा अर्थ करुन ॥ तेंचि शास्त्र व्याकरण ॥ हरिगुण वर्णीतसे ॥८४॥
योगसाधन पतंजली ॥ साधून पाहती वनमाळी ॥ ऋगवेदीं कर्में स्थापिलीं ॥ याचिलागी पावावया ॥८५॥
यजुर्वेदीं दिव्य ज्ञान ॥ औपासन सांगे अथर्वण ॥ सामवेदी करीत गायन ॥ याचिलागीं पावती ॥८६॥
शैव म्हणती सदाशिव ॥ वैष्णव हा म्हणती रमाधव ॥ सौर म्हणती स्वयमेव ॥ सूर्यनारायण जयातें ॥८७॥
गाणपत्य म्हणती गजवदन ॥ तोचि हा राधामनमोहन ॥ शाक्त भजती शक्तीलागून ॥ तोचि हा जाण प्रकृतिरुपें ॥८८॥
एक म्हणती यासी काळा ॥ कोणी म्हणती आहे सांवळा ॥ परी तो सकळवर्णांवेगळा ॥ जो राधेनें डोल्हारां बैसविला ॥८९॥
शचीनें तप केलें बहुत ॥ सप्त जन्मपर्यंत ॥ भोगावया भगवंत ॥ तेचि राधा सत्य गोकुळीं ॥९०॥
पद्मपुराणीं असे ही कथा ॥ श्रोतीं शब्द न ठेविजे या ग्रंथा ॥ मूळावेगळी सर्वथा कथा ॥ तत्त्वतां वाढेना ॥९१॥
जयदेव पद्मावतीरमण ॥ बोलिला राधाकृष्णआख्यान ॥ जो पंडितांमाजी चूडामणिरत्‍न ॥ व्यासअवतार कलियुगीं ॥९२॥
बिल्वमंगलादि कवींद्र ॥ कथिती राधाकृष्णचरित्र ॥ तेंच वर्णीत श्रीधर ॥ नसे विचार दुसरा ॥९३॥
असो गुजगुज उठली गोकुळीं ॥ राधागृहीं थोर होतो वनमाळी ॥ ते यशोदेनें कर्णकमळीं ॥ ऐकियेली जनवार्ता ॥९४॥
गौळिणी सांगती यशोदेसी ॥ कृष्ण न धाडी राधेच्या गृहासी ॥ माता म्हणे हृषीकेशी ॥ राधागृहासी न जावें ॥९५॥
तथापि तूं जासी रडोन ॥ तरी मी तुज शिक्षा करीन ॥ मग बोले जगज्जीवन ॥ न जाईं आतां सर्वथा ॥९६॥
राधेची सासू म्हातारी ॥ तीस एक सांगती सुंदरी ॥ तुझ्या सुनेस तूं आवरीं ॥ घरास हरि न आणिजे ॥९७॥
सासू म्हणे राधे परियेसी ॥ कृष्ण जरी घरासी आणिसी ॥ तरी मी शिक्षा निश्चयेसीं ॥ तुज करीन निर्धारें ॥९८॥
ऐसी लोकीं पाडिली तुटी ॥ नव्हे राधेसी कृष्णभेटी ॥ स्फुंदस्फुंदूनि रडे गोरटी ॥ म्हणे जगजेठी अंतरला ॥९९॥
नावडे अन्न उदकपान ॥ नावडे मार्जन आणि भूषण ॥ नावडे अंजन चंदन शयन ॥ मोहिलें मन हरीनें ॥१००॥
नावडे कदा दिव्यांबर ॥ काढूनि टाकिले अलंकार ॥ नावडती सुमनहार ॥ केवळ विखार भासती ॥१॥
चंद्रकिरण शीतळ थोर ॥ ते वाटती परम तीव्र ॥ हृदयीं आठवे श्रीधर ॥ चिंता थोर वाटतसे ॥२॥
एके दिवशी कुरंगनयना ॥ चालिली कृतांत भगिनीजीवना ॥ चाले हंसगती शुभानना ॥ नंदसदनावरुनि जातसे ॥३॥
तों ते वेळीं प्रातःकाळ ॥ धारा काढूं निधे घननीळ ॥ हातीं भरणा घेऊनि गोपाळ ॥ धारा काढी त्वरेनें ॥४॥
भरणा भरुनि घरांत ॥ यशोदा डेरियांत ओतीत ॥ मागुती येई त्वरित ॥ दुसरा भरणा न्यावया ॥५॥
ज्या गाईस स्पर्शे गोविंद ॥ तीस अमर्याद फुटे दुग्ध ॥ भरणा भरतांचि मुकुंद ॥ तो ब्रह्मानंद काय करी ॥६॥
आपुलिया मुखीं धारा ॥ कृष्ण ओढीत भरभरां ॥ तो माता म्हणे श्रीधरा ॥ ऐसें काय करितोसी ॥७॥
कृष्ण म्हणे भरला भरणा ॥ आडखेल गाईचा पान्हा ॥ म्हणोनिया माझिया निजवदना ॥ माजी धार काढितो ॥८॥
यशोदा गेली घरांत ॥ पुढें भरणा घेऊनि कृष्णनाथ ॥ द्वाराकडे जंव पाहत ॥ तंव तेथें राधा उभी असे ॥९॥
देखूनि राधेचें वदन ॥ तन्मय झाला मधुसूदन ॥ विसरुनि गोदोहन ॥ वृषभाखालीं बैसला ॥११०॥
राधेकडे करुनि वदन ॥ इकडे ओढी वृषभाचा वृषण ॥ भुलला राधेस देखोन ॥ नाहीं स्मरण कदापि ॥११॥
राधावदनशशांक ॥ देखोनि भुलला व्रजपालक ॥ दोन्ही नेत्रचकोर सुरेख ॥ स्नेहेंकरुनि पाहती ॥१२॥
यशोदा आली आंगणी ॥ तो वृषभ दुहिताहे चक्रपाणी ॥ माता म्हणे ते क्षणीं ॥ काय करितोसी गोपाळा ॥१३॥
राधेकडे लावूनि नेत्र ॥ मातेसी देत प्रत्युत्तर ॥ म्हणतो काढितों गायीची धार ॥ भरणा समग्र भरला हो ॥१४॥
माता म्हणे बरवें पाहे ॥ दुहितोसी वृषभ कीं गाय ॥ खालीं पाहे निजभक्तप्रिय ॥ तो वृषभ दृष्टीं देखिला ॥१५॥
मातेसी म्हणे कमलानायक ॥ देवाचा नवस चुकलीस बहुतेक ॥ चौंथानांचें थान एक ॥ इतुक्यामाजी जाहले ॥१६॥
माता म्हणे श्रीहरी ॥ तुझें मन नाहीं थारीं ॥ तंव द्वारीं देखिली कुरंगनेत्री ॥ राधा सुंदरी तेधवां ॥१७॥
माता म्हणे घट घेऊनि शिरीं ॥ कां गे येथें उभी द्वारीं ॥ येरी चालली झडकरी ॥ यमुनानीर आणावया ॥१८॥
गेली घेऊनि यमुनाजीवन ॥ तों खेळावया आला जगज्जीवन ॥ राधेच्या द्वारीं येऊन ॥ मुलें मेळवून उभा असे ॥१९॥
तों राधिका ओसरीवरी ॥ मंथनासी आरंभ करी ॥ तों नेत्रीं देखिला श्रीहरी ॥ जलदवर्ण साजिरा ॥१२०॥
तिकडे वेधले राधेचें नयन ॥ विसरली गोरसमंथन ॥ रित्या डेर्‍यांत रवी घालून ॥ घुसळी पूर्ण निजछंदें ॥२१॥
श्रीहरीनें मोहिलें मन ॥ नाठवे देहगेहअभिमान ॥ वृत्ति गेली मुरोन ॥ ब्रह्मानंदसागरीं ॥२२॥
समरस झालीं आत्मप्रकाशी ॥ नाठवेचि दिवसनिशी ॥ लवण मिळतां जळासीं ॥ परी तैसीच जाहली ॥२३॥
नलगे पातया पातें ॥ वृत्ती आकर्षिल्या रमानाथें ॥ हृदयीं दाटोनि आनंद भरतें ॥ आपणातें विसरली ॥२४॥
तों खडखडां वाजे डेरा ॥ सासू धांवूनि आली द्वारा ॥ सक्रोध बोले ते अवसरां ॥ राधेलागीं वृद्धा ते ॥२५॥
कां गे मंथतेसी रिक्तपात्र ॥ काय गेले तुझे नेत्र ॥ काय न ऐकती तुझे श्रोत्र ॥ रिता डेरा खडबडितां ॥२६॥
राधा म्हणे ऐका मामिसें ॥ डेरा धड कीं फुटका असे ॥ रिता घुसळोनि पाहतसें ॥ तगेल कीं न तगेल म्हणूनियां ॥२७॥
सासू म्हणे मन नाहीं स्थिर ॥ तों द्वारीं उभा श्यामसुंदर ॥ वृद्धा म्हणे तुझें चित्त व्यग्र ॥ खंजनाक्षी जाहलें ॥२८॥
वृद्धा म्हणे कृष्णासी ॥ कां रे तूं येथें उभा अससी ॥ येरु म्हणे आम्ही खेळतों बिदीसी ॥ तूं कां दवडिसी थेरडे ॥२९॥
वांकडे तोंड करुन ॥ वृद्धेसी वेडावी जगज्जीवन ॥ वृद्धां धांवे क्रोधेंकरुन पळे मनमोहन तेथूनि ॥१३०॥
घरीं नंदासवें जेविला ॥ तों दोन प्रहर दिवस जाहला ॥ पुढें घेऊनि सांवळा ॥ यशोदा निजे मंचकावरी ॥३१॥
म्हणे कृष्णा खोडी न करीं ॥ जाऊं नको कदा बाहेरी ॥ पुढे घेऊनि पूतनारी ॥ निद्रा करी सावकाश ॥३२॥
तों इकडे राधिका सुंदर ॥ उदका आली यमुनातीरा ॥ मनीं म्हणे यादवेंद्रा ॥ कधीं आतां भेटसी ॥३३॥
वस्त्र लावूनियां नेत्रां ॥ स्फुंदत उभी राधा सुंदरा ॥ म्हणे गुणसमुद्रा जगदुद्धारा ॥ प्राण देईन मी आतां ॥३४॥
जगन्नायका जगज्जीवना ॥ यमुनाजीवनीं देईन प्राण ॥ माझ्या वेधका मनमोहना ॥ तुझ्या चरणां अंतरलें ॥३५॥
ऐसें राधेचें अंतर ॥ जाणोनियां करुणाकर ॥ हळूच उठोनियां सर्वेश्वर ॥ यमुनातीरा पातला ॥३६॥
तों जाहली खरी दुपारी ॥ दुजें कोणी नसे यमुनातीरीं ॥ सवेग येऊनि मुरारी ॥ धरिली निरी राधेची ॥३७॥

राधा म्हणे चक्रपाणी ॥ संसारा माझ्या पाडिलें पाणी ॥ माझें नांवरुप बुडविलें जनीं ॥ विपरीत करणी तुझी कृष्णा ॥३८॥
तूं दिसतोसी किशोर ॥ तुझी करणी गगनाहूनि थोर ॥ विपरीत तुझें चरित्र ॥ ब्रह्मादिकां कळेना ॥३९॥
जागी जाहली नंदराणी ॥ तों पुढे न दिसे कैवल्यदानी ॥ म्हणे कोठें गेला उठोनी ॥ कळी घेऊनि येईल आतां ॥१४०॥
श्रीकृष्णाचा माग काढीत ॥ माता चालिली शोधीत ॥ जैसी वेदश्रुति निर्वाणपंथ ॥ सूक्ष्म काढीत शोधूनि ॥४१॥
यमुनातीरा आली यशोदा ॥ तों उभीं कृष्ण आणि राधा ॥ राधा म्हणे सच्चिदानंदा ॥ आली माया तुझी पैं ॥४२॥
आतां तुज आणि मज येथें ॥ ताडन करील स्वहस्तें ॥ तों यशोदा म्हणे हरीतें ॥ कैसें तूतें वाटतें पैं ॥४३॥
तों हरि स्फुंदस्फुदोनि रडत ॥ माते मी बिदीस होतों खेळत ॥ इनें माझा कंदुक सत्य ॥ उचलोनियां आणिला ॥४४॥
मी रडत लागलो पाठीसीं ॥ माते कुंदक आहे इजपाशीं ॥ तो देववीं म्हणे हृषीकेशी ॥ लोळणी तेथें घातली ॥४५॥
राधेसी म्हणे यशोदा ॥ कां ओरडविसी गोविंदा ॥ नसतेच अपवाद सदा ॥ बाळावरी घालिता गे ॥४६॥
राधा म्हणे ते वेळीं ॥ मामिसें अकल्पित घेतो किटाळी ॥ चेंडू नाहीं मजजवळीं ॥ नसतीच आळी घेतो हा ॥४७॥
कृष्ण म्हणे मातेसी ॥ झाडा घेईं तूं इजपाशीं चेंडू निघेल निश्चयेंसीं ॥ जननीये आतांचि ॥४८॥
राधिका गदगदां हांसे ॥ वस्त्र चहूंकडे झाडीतसे ॥ सच्चिदानंदें परमपुरुषें ॥ थोर केलें लाघव ॥४९॥
घेतला नसतां एकाएक ॥ अवचितां पडला कंदुक ॥ गदगदां हांसे वैकुंठनायक ॥ अकळ देख लीला त्याची ॥१५०॥
राधा अधोमुख पाहात ॥ म्हणे याची करणी अद्‌भुत ॥ अष्टभावें सद्गदित ॥ राधा जाहली तेधवां ॥५१॥
माया म्हणे तुम्ही गौळिणी ॥ महानष्टा व्यभिचारिणी ॥ माझा ब्रह्मचारी चक्रपाणी ॥ बोलिजे जनीं विपरीत ॥५२॥
पांच वर्षांचें तान्हें बाळ ॥ त्यावरी घेतां नसतीच आळ ॥ टाकूनि जावें गोकुळ ॥ या लोकांभेणें पैं ॥५३॥
सद्गदित माया जाहली ॥ अष्टभावें पूर्ण दाटली ॥ कडेवरी घेऊनि वनमाळी ॥ माया चालिली मंदिरा ॥५४॥
कडे घेतला ब्रह्मांडनायक ॥ करी झेलीतसे कंदुक ॥ वारंवार माया देख ॥ मुख चुंबीत हरीचें ॥५५॥
राधेनें घटीं भरुनि जीवना ॥ घरासी गेली पद्मनयना ॥ पूर्णब्रह्म वैकुंठराणा ॥ मनीं कळलें राधेंसी ॥५६॥
लोकांत फुटों नेदी शब्द ॥ नित्य भोगीत परमानंद ॥ सांडूनियां विषयभेद ॥ निजबोधा पावली ॥५७॥
राधा केवळ निजभक्ती ॥ तीस वश झाला जगत्पती ॥ अनंत जन्मींचें तप निश्चितीं ॥ एकदांचि फळा आलें ॥५८॥
हे इंद्राची इंद्रानी ॥ इनें विष्णु अभिलाषिला मनीं ॥ सप्त जन्म तप घोर करुनी ॥ चक्रपाणी पावली हे ॥५९॥
इकडे माया म्हणे मुरारी ॥ जाऊं नको तूं बाहेरी ॥ चोरीचाही आळ तुजवरी ॥ घेती सुंदरी गोकुळींच्या ॥१६०॥
गौळिणींस म्हणे यशोदा ॥ चोरी करितो म्हणतां गोविंदा ॥ तरी सणगावरी मुकुंदा ॥ धरुनि एकदां आणा गे ॥६१॥
कृष्णासी धरावया गौळिणी ॥ जपत असतां दिनरजनीं ॥ तों एकीलागीं चक्रपाणी ॥ गोरस भक्षितां सांपडला ॥६२॥
एकलाचि निघाला घरांत ॥ दधिभाजन वरुनि फोडीत ॥ मुखेंकरुनि दधि भक्षीत ॥ वैकुंठनाथ निज लीलें ॥६३॥
दधिचर्चित वदन ॥ दिसे परम शोभायमान ॥ तों अकस्मात गौळण येऊन ॥ करीं धरिलें हरीसी ॥६४॥
चाल रे तुझ्या मातेपासीं ॥ म्हणोनि ओढूनि आणिला बिदीसी ॥ सांगे समस्त गौळिणींसी ॥ या गे हृषीकेशी सांपडला ॥६५॥
जे जे गौळण येई घरांतून ॥ तिचे हातीं एक एक कृष्ण ॥ लक्षानुलक्ष स्वरुपें पूर्ण ॥ एकासारिखीं चहूंकडे ॥६६॥
पंचवर्षी सांवळ्या मूर्ती ॥ एकसारिखीं खापरें हातीं ॥ दधि मुखीं माखलें निश्चितीं ॥ ओढूनि नेती मायेपाशीं ॥६७॥
यशोदेपाशीं आल्या सांगावया ॥ तों तिचे कडेवरी असे कान्हया ॥ तटस्थ होवोनियां माया ॥ चहूंकडे विलोकी ॥६८॥
जिकडे पाहे तिकडे कृष्ण असंख्यात ॥ स्वरुपें परिपूर्ण ॥ बोलावयासी पवन ॥ ठाव कोठें असेना ॥६९॥
मागें पुढें यशोदा पहात ॥ तों अवघा व्यापिला जगन्नाथ ॥ तो ब्रह्मानंद सदोदित ॥ नाहीं अंत स्वरुपासी ॥१७०॥
माया पाहे घरांत बाहेरी ॥ पाळणां आणि ओसरीवरी ॥ अवघा कृष्णचि निर्धारीं ॥ मायादेवी पाहतसे ॥७१॥
देवापासीं एक बैसलासे ॥ डोल्हारीं एक खदखदां हांसे ॥ एक तो पाळण्यांत रडतसे ॥ स्तन देईं म्हणोनियां ॥७२॥
एक कृष्ण घरांत जेवीतसे ॥ एक आंगणीं रांगे हर्षे ॥ एक स्तनपान करीतसे ॥ मायेपुढें निजोनि ॥७३॥
एक आंगणीं गडबडां लोळत ॥ एक देहावरी धुळी घालीत ॥ एक पदरीं धरुनि ओढीत ॥ मातेलागीं ते वेळीं ॥७४॥
यशोदा समाधिस्थ स्वानंदें ॥ ब्रह्मांड भरिलेंसें गोविंदें ॥ विश्व कोंदलें ब्रह्मानंदें ॥ न दिसे दुजें सर्वदा ॥७५॥
माया जों खालीं घाली दृष्टी ॥ तंव कृष्णरुप दिसे सृष्टी ॥ अवघाचि विश्वंभर जगजेठी ॥ दुजेविण एकला ॥७६॥
सकळ गौळिणी तन्मय झाल्या ॥ ठाव नाहीं गार्‍हाणीं द्यावया ॥ गेलिया देहभाव विसरोनिया ॥ न दिसे मायाओडंबर ॥७७॥
अवघा भरला हरि एक ॥ वेदांचेहि मावळले तर्क ॥ शास्त्रें भांबावलीं देख ॥ सहस्त्रमुख लाजला ॥७८॥
कवणासी सांगावें गार्‍हाणें ॥ सर्वही व्यापिलें नारायणें ॥ राहिलें सर्वांचें बोलणें ॥ दृष्टीचें पाहणें विरालें ॥७९॥
एकीकडे एक गोपी पहाती ॥ तंव त्या अवघ्याचि कृष्णमूर्ती ॥ नाहीं स्त्रीपुरुषव्यक्ती ॥ त्रिजगतीं हरिरुप ॥१८०॥
न दिसती लोक गोकुळ ॥ अवघा एक घननीळ ॥ पूर्णब्रह्मानंद निर्मळ ॥ अचल अढळ अव्यय ॥८१॥
योगी करिती अष्टांगसाधन ॥ त्यांसीही नव्हे ऐसें दर्शन ॥ साधिती पंचाग्निसाधन ॥ त्यांसही खूण न कळेचि ॥८२॥
तीर्थें करितां परम श्रमले ॥ जे शास्त्रश्रवणीं बहु भागले ॥ त्यांस या सुखाचे सोहळे ॥ कदाकाळीं न लाभती ॥८३॥
धन्य भाग्य गौळियांचें त्रिशुद्धि ॥ लाविली केवळ पूर्णसमाधि ॥ निरसल्या सकळ आधि व्याधि ॥ ब्रह्मानंदीं निमग्न ॥८४॥
निरसला सकळ भेद ॥ ओतिला सकळ गोविंद ॥ गौळियांचें पुण्य अगाध ॥ न समाये ब्रह्मांडीं ॥८५॥
ऐसे जाणोनि कृपानिधी ॥ म्हणे अवघ्यांसी लागली समाधी ॥ आतां हे विरतील ब्रह्मानंदीं ॥ अव्ययरुप अभेद ॥८६॥
मग ऐशा प्रेमळ निश्चितीं ॥ मज पुन्हां कैंच्या मिळती ॥ मी वेधलों यांचे भक्तीं ॥ कायशा मुक्ती यांपुढें ॥८७॥
यांचा देहभाव गेला विरुन ॥ हरीनें योगमाया घालून ॥ आपली रचना संपूर्ण ॥ झांकिली हो तेधवां ॥८८॥
तो एकलाच मायेपाशीं ॥ उभा असे हृषीकेशी ॥ मौनेंचि गौळिणी गेल्या गृहासी ॥ बोलावयासी ठाव नाहीं ॥८९॥
सर्वही व्यापिलें यादवेंद्रे ॥ बोलायला नाहीं दुसरें ॥ सच्चिदानंद सर्वेश्वरें ॥ थोर दाविलें लाघव ॥१९०॥
हरिविजयग्रंथ थोर ॥ हेचि कृष्णवेणी वाहे साचार ॥ भक्तिकन्यागतीं सादर ॥ भाविक नर धांवती ॥९१॥
येथींच्या अर्थीं बुडी देऊन ॥ जे सदा करिती अघमर्षण ॥ ते मायेस मागें लोटून ॥ पावती पूर्ण ब्रह्मानंद ॥९२॥
ब्रह्मानंदें विनवी श्रीधर ॥ पुढें रसाळ कथा असे परिकर ॥ संतश्रोतीं व्हावें सादर ॥ कृपा करुनि मजवरी ॥९३॥

इति श्रीहरिविजयग्रंथ ॥ संमत हरिवंश भागवत ॥ चतुर श्रोते परिसोत ॥ अष्टमाध्याय गोड हा ॥१९४॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

Friday, June 8, 2012

हरिविजय - अध्याय ७


अध्याय ७




श्रीगणेशाय नमः ॥  श्रीकुलदेवतायै नमः ॥श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥
जय जय सच्चिदानंद सगुण ॥ अतीसीकुसुमभास तूं पूर्ण ॥ वाटे त्याच रंगेंकरुन ॥ नीलोत्पलें रोविलीं ॥१॥
नभासी चढला तोचि रंग ॥ त्याचे प्रभें रंगले मेघ ॥ इंद्रनीळ हरिरंग ॥ त्याच प्रकाशें जाहलें ॥२॥
तेथींचें सौंदर्य अद्‌भुत ॥ गरुडपाचूंस तेज चढत ॥ मर्गजासी वीक दिसत ॥ तनु सांवळी देखोनियां ॥३॥
लावण्यामृतसागराद्‌भुत ॥ कीं कोटिमकरध्वजाचा तात ॥ तो पुष्पधन्वा उदरीं जन्मत ॥ अंकीं खेळत जयाच्या ॥४॥
श्यामलांगी अतिनिर्मळ ॥ वरी डोले वैजयंतीमाळ ॥ पुष्करीं चक्रचाप सुढाळ ॥ सुरंग जैसें मिरवे पैं ॥५॥
कीं मेघीं स्थिरावली क्षणप्रभा ॥ तैसी वैजयंतीची शोभा ॥ सहस्त्रमुखाचिया जिभा ॥ शिणल्या गुण वर्णितां ॥६॥
इंद्रनीळाचा मेरु प्रभाघन ॥ वेष्टिला शातकुंभतगटेकरुन ॥ तैसा झळकत वसन ॥ हरिजघनीं सर्वदा ॥७॥
कीं सकळ चपळा गाळून ॥ रंगविले हे पीतवसन ॥ वाटे द्वादश भानु येऊन ॥ कटीं मेखळेवरी जडियेले ॥८॥
पांघरावयाचा क्षीरोदक ॥ कीं शुभ्र यशा चढलें बीक ॥ कीं शुभ्र श्वेत मृडानीनायक ॥ कर्पूरेंकरुनि उटिला ॥९॥
कीं शुद्धरजततगटा घडिलें ॥ कीं पारदें कैलास डवरिलें ॥ कीं जान्हवीतीरीं वोपिलें ॥ दिनकरनाथें स्वहस्तें ॥१०॥
अंगीं उटी दिसे सुढाळ ॥ कीं इंदुबिंब उकललें निर्मळ ॥ कीं मुक्ताफळांचा गाळून ढाळ ॥ इंद्रनीळ चर्चिला ॥११॥
त्रिभुवनसौंदर्य एकवटलें ॥ तें हरिमुखीं येवोनि ओतिलें ॥ आनंदाचें स्वरुप उजळलें ॥ रुपा आलें हरिमुखीं ॥१२॥
हरिअंगींचा अखिल सुवास ॥ भेदूनि गेला महदाकाश ॥ कीं ब्रह्मानंद भरोनि निःशेष ॥ सगुण सुरस ओतिलें ॥१३॥
आनंदसरोवरींचीं कमळदळें ॥ तैसे आकर्णनेत्र विकासले ॥ ते कृपादृष्‍टीनें निवाले ॥ प्रेमळ जन सर्वही ॥१४॥
अहो तें स्वानंदरुप सगुण ॥ कीं कमलेचें सौभाग्य पूर्ण ॥ कीं सद्भक्तांचें निजधन ॥ ठेवणें हें आकारलें ॥१५॥
तो वैकुंठीचा वेल्हाळ सुंदर ॥ कीं भक्तमंदिरांगणमंदार ॥ पद्मोद्भवाचा तात उदार ॥ गोकुळामाजी अवतरला ॥१६॥
मत्स्य कच्छ रुपें धरीं श्रीपती ॥ परी तेथें न बैसे लोकांची भक्ती ॥ म्हणोनि गोकुळीं आला व्यक्ती ॥ मानववेष धरुनियां ॥१७॥
जे कां विषयपर जन ॥ न ऐकती हरीचे गुण ॥ त्यांस श्रृंगाररस दावून ॥ वेधी मन आपणाकडे ॥१८॥
भक्तांसी विघ्नें येती प्रबळ ॥ तीं निजांगीं सोशी तमाळनीळ ॥ मर्दूनियां दुर्जन खळ ॥ भक्त प्रेमळ रक्षीतसे ॥१९॥
सबळ काष्ठें भ्रमर कोरी ॥ पिष्ट करी क्षणाभीतरी ॥ परी कमळास निर्धारीं ॥ धक्का न लावी सर्वथा ॥२०॥
कमळआकोचें कोंडे भ्रमर ॥ परी तें न फोडीच अणुमात्र ॥ तैसे दासांचे अन्याय समग्र ॥ सोसूनि रक्षी तयांतें ॥२१॥
तिळमात्र पाषाण ॥ जळीं न तरे देखती जन ॥ तेथेंचि सबळ काष्ठ तरे पूर्ण ॥ कदा जीवन न बुडवी ॥२२॥
जीवनीं हाचि अभिमान ॥ कीं आपण वाढविलें काष्ठ पूर्ण ॥ तें न बुडवीं मी कदा जाण ॥ कालत्रयीं सहसाही ॥२३॥
त्या काष्ठाच्या नौका होती ॥ आणिक जड जीवां तारिती ॥ तैसे भगवद्भक्त उद्धरिती ॥ बहुतांसही समागमें ॥२४॥
असो जलकाष्ठन्यायें निश्चित ॥ शरणागतां तारी भगवंत ॥ नाना चरित्रें अद्‌भुत ॥ दावी भक्तां तारावया ॥२५॥
असो षष्ठाध्यायीं कथा ॥ गौळणीनें ठकविलें कृष्णनाथा ॥ गोरस मथुरे विकूं जातां ॥ अति अनर्थ पावली ॥२६॥
गोरस न देऊनि वनमाळी ॥ गौळणचि परम ठकली ॥ सच्चिदानंदमूर्ति सांवळी ॥ महिमा न कळे तियेतें ॥२७॥
नवल एक गोकुळीं वर्तलें ॥ एका गौळियानें स्त्रियेसी सांगितलें ॥ म्हणे दधि दूध जें सांचलें ॥ अनसूट धरीं येथूनि ॥२८॥
भगवंताचा नवस पुरवीन ॥ करीन ब्राह्मणसंतर्पण ॥ तरी घृत ठेवीं सांचवून ॥ अवश्य म्हणे नितंबिनी ॥२९॥
घृत सांचलें बहुत ॥ स्त्रीनें अर्ध चोरिलें त्यांत ॥ शेजारिणीच्या घरीं त्वरित ॥ घट भरुनि ठेविला ॥३०॥
स्त्रियांचें कर्तृत्व न कळे भ्रतारां ॥ महाअनृता अविचारा ॥ सकळ असत्याचा थारा ॥ भय न धरिती पापाचें ॥३१॥
अनृत साहस माया मूर्खत्व ॥ अतिलोभ अशौच निर्दयत्व ॥ हे स्वभावगुण सत्य ॥ स्त्रियांच्या ठायीं असती हो ॥३२॥
गौळियानें महोत्सव केला ॥ नवस श्रीहरीचा फेडिला ॥ परी घृतघट जो ठेविला ॥ तो कळला श्रीरंगातें ॥३३॥
बाहेर गेली घरची सुंदरी ॥ कृष्ण प्रवेशला तिचें मंदिरीं ॥ घृतघट काढोनि झडकरी ॥ नेला दूरी ते वेळीं ॥३४॥
मेळविलीं गौळियांचीं बाळें ॥ घृत तें सकळांसी वांटिलें ॥ कृष्णें आपण भक्षिलें ॥ पूर्ण केलें नवसासी ॥३५॥
वसुधारा घृतावदान ॥ येथें तृप्ति न पावे नारायण ॥ तो गौळियांचें घृत चोरुन ॥ भक्षून तृप्त जाहला ॥३६॥
कमलासन मीनकेतनारी ॥ सदा ध्याती तो कैटभारी ॥ तो बळेंच गौळियांचें घरीं ॥ चोरुनि घृत भक्षीत ॥३७॥
असो घरा गेला वैकुंठराणा ॥ यशोदा म्हणे जगज्जीवना ॥ खोडी करुनि मनमोहना ॥ कोठूनि आलासी सांग पां ॥३८॥
कडे घेतला कृष्णनाथ ॥ माता हर्षें मुख चुंबीत ॥ तों अंगास माखलें घृत ॥ माता पुसत हरीसी ॥३९॥
घृत लागलेंसे अंगा ॥ कोठें गेला होतासी श्रीरंगा ॥ आतां गार्‍हाणीं अतिवेगा ॥ गौळिणी सांगों येतील ॥४०॥
येरीकडे गौळण ते पाहीं ॥ सेजीच्या गृहा येत लवलाही ॥ म्हणे माझा घृतघट देईं ॥ आणूनियां सत्वर ॥४१॥
घरांत गौळण पाहत ॥ तों आपलीं शिंकीं तैसींच समस्त ॥ तो घृतघट नाहीं तेथ ॥ नवल वाटलें तियेतें ॥४२॥
म्हणे बाई शिंकीं आणि घागरी ॥ न दिसती कोठें मंदिरीं ॥ आळ घालावी कृष्णावरी ॥ तरी मागही कोठें दिसेना ॥४३॥
ते म्हणे तुझा गोरस उरला ॥ माझाचि घृतघट कां गेला ॥ नष्टे तुवांचि अभिलाषिला ॥ कलह माजला अद्‌भुत ॥४४॥
ते गौळण वाहे आण ॥ म्यां घृतघट ठेविला असेल चोरुन ॥ तरी हे हस्त जाऊं दे झडोन ॥ कां तुवां आणोनि ठेविला ॥४५॥
मनीं गौळण विचारीत ॥ कलह माजवावा बहुत ॥ कळेल भ्रतारासी मात ॥ तोही अनर्थ दुसरा ॥४६॥
मग ते म्हणे मृगनयनी ॥ गलबला न करीं वो साजणी ॥ माझ्या भ्रताराच्या श्रवणीं ॥ गोष्टी जाईल सर्वथा ॥४७॥
बरें गेलें तरी जाऊं दे घृत ॥ कृष्णार्पण झालें निश्चित ॥ ऐसें बोलोनि त्वरित ॥ गौळण गेली गृहातें ॥४८॥
गोकुळीं एक दंपत्यें ॥ राखिती बहुत गोरसातें ॥ राजीवनेत्रें तेथें ॥ कौतुक केलें अद्‌भुत ॥४९॥
दोघें निजलीं मध्यरातीं ॥ तेथें प्रकटोनि रमापती ॥ एक मुंगूस निश्चितीं ॥ दोघांमध्यें सोडिलें ॥५०॥
गृहींचा सर्व गोरस ॥ स्वहस्तें काढी जगन्निवास ॥ तृप्त झाला सर्वेश ॥ शेषशायी परमात्मा ॥५१॥
मुंगूस दोघांमध्यें उकरी ॥ तंव तीं होतीं निजसुरीं ॥ एकाएकीं घाबरी ॥ हांक फोडीत उठली ॥५२॥
न सांवरत वसन ॥ बाहेर आली भिऊन ॥ म्हणती भूत उरावरी येऊन ॥ बैसलें होतें दोघांच्या ॥५३॥
धांवा धांवा म्हणती कोणी ॥ लोक मिळाले चहूंकडोनी ॥ दीपिका लाविल्या तत्क्षणीं ॥ पुसती दोघांसी तेधवां ॥५४॥
तंव तीं म्हणती भूत आलें ॥ आम्हां दोघांमध्यें बैसलें ॥ आम्हीं तत्काळ ओळखिलें ॥ सदनाबाहेरी मग आलों ॥५५॥
पंचाक्षरी घेऊनि विभूती ॥ द्वाराबाहेरचि फुंकिती ॥ परी सदनीं कोणी न प्रवेशती ॥ भय वाटे मनीं तयां ॥५६॥
तों घरांत हिंडे नकुळ ॥ लोक म्हणती भूत सबळ ॥ मग धीट गौळी जे तत्काळ ॥ निःशंक आंत प्रवेशती ॥५७॥
तंव तें मुंगूस देखिलें ॥ तत्काळ बाहेर आणिलें ॥ लोक गदगदां हांसिले ॥ नवल जाहलें तेधवां ॥५८॥
एक म्हणती मुंगूस सकाळीं ॥ कांखेस घेऊनि वनमाळी ॥ हिंडत होता आळोआळीं ॥ त्याणेंच आणूनि सोडिलें ॥५९॥
एक म्हणती मोठा नष्ट ॥ करणी करतो अचाट गोकुळींचीं मुलें चाट ॥ तेणें समस्त केलीं पैं ॥६०॥
जन गेले सदना सत्वर ॥ तो उदय पावला सहस्त्रकर ॥ मग ते गौळण चतुर ॥ नंदमंदिरीं गेली हो ॥६१॥
मग म्हणे सुंदरी यशोदे ॥ थोर पीडिलें मुकुंदें ॥ मुंगूस सोडिलें गृहामध्यें ॥ नवल गोविंदें केलें हो ॥६२॥
गदगदां हांसे नंदराणी ॥ हरिवदन पाहे नयनीं ॥ तों एक बोले गौळणी ॥ तुज चक्रपाणी लावीन शिक्षा ॥६३॥
हरि तूं माझ्या घरा येसी ॥ मी तुज बांधीन खांबासी ॥ मग बोले हृषीकेशी ॥ बांध कैसी पाहूं आतां ॥६४॥
गृहासी गेली गौळिणी ॥ रात्रीं दृढ कपाटें देऊनी ॥ भ्रतारासहित नितंबिनी ॥ निद्रार्णवीं निगग्न ॥६५॥
पतीपुढें निजली कामिनी ॥ तों पातला पंकजपाणी ॥ पतीची दाढी तिची वेणी ॥ धरुनि ते क्षणीं गांठी देत ॥६६॥
कृष्णें गांठी दिधली हटें ॥ जे ब्रह्मादिकां न सुटे ॥ जे न जळे हव्यवाटें ॥ तीक्ष्ण शस्त्रें न कापेचि ॥६७॥
ऐसें करुनि जगन्मोहन ॥ घरींचा गोरस सर्व भक्षून ॥ नेला तेथूनि न लागतां क्षण ॥ अतर्क्य विंदान हरीचें ॥६८॥
तों सरली अवघी रजनी ॥ धार काढूं उठे कामिनी ॥ तों ओढतसे तिची वेणी ॥ मृगनयनी हांसतसे ॥६९॥
पतीस म्हणे सुंदरा ॥ कांहीं तरी लाज धरा ॥ मी काढूं जातें धारा ॥ वेणी सत्वर सोडिंजे ॥७०॥
अजूनि काय भोगव्यसन ॥ उदय करुं पाहतो सहस्त्रकिरन ॥ अद्यापि न धायेचि मन ॥ वेणी सोडोनि द्यावी जी ॥७१॥
तंव तयाची दाढी ओढत ॥ जागा जाहला पति त्वरित ॥ स्त्रियेसी म्हणे तुझें चित्त ॥ अजूनि इच्छीत कामातें ॥७२॥
सोडीं वेगीं माझी दाढी ॥ जाय वेगीं धारा काढीं ॥ बहु माजलीसी धांगडी ॥ ओढीओढी करितेसी ॥७३॥
सोडीं दाढी गे तरुणी ॥ उदयाद्रीवरी आला तरणी ॥ पुढें अरुणोदय होवोनी ॥ प्रकाश आरक्त पडियेला ॥७४॥
कीं पूर्वदिशेनें मुख धुतलें ॥ निढळीं कुंकुम रेखिलें ॥ तेंचि आरक्तवर्ण नभ जाहलें ॥ अरुणोदय वाटतसे ॥७५॥
सूर्याआधीं उगवे अरुण ॥ ज्ञानाआधीं जैसें भजन ॥ कीं भजनाआधीं नमन ॥ श्रेष्ठ जैसेम सर्वांसी ॥७६॥
कीं तपाआधीं शुचित्व ॥ कीं बोधाआधीं सत्त्व ॥ कीं सत्त्वाआधीं अद्‌भुत ॥ पुण्य जैसें प्रकटलें ॥७७॥
साक्षात्काराआधीं निजध्यास ॥ कीं मननाआधीं श्रवण विशेष ॥ कीं श्रवणाआधीं सुरस ॥ आवडी पुढें विराजत ॥७८॥
कीं वैराग्याआधीं विरक्ति ॥ कीं आनंदाआधीं उपरति ॥ कीं महासुखासी शांति ॥ पुढें आधीं ठसावे ॥७९॥
तैसा जाहला अरुणोदय ॥ सोडीं मूर्खे दूरी राहें ॥ दोघें उठोनि लवलाहें ॥ बोलताती सक्रोध ॥८०॥
पति म्हणे चांडाळिण ॥ गांठ कां दिधली दाढीवेणी ॥ येरी आण वाहे ते क्षणीं ॥ माझी करणी नव्हे हे ॥८१॥
म्यां गांठ दिधली असेल ॥ तरी हे नेत्र जातील ॥ पति म्हणेल जिव्हा झडेल ॥ जरी म्यां गांठ असेल दिधली ॥८२॥
नानाप्रकारेम होती कष्टी ॥ परी न सुटेचि कदा गांठी ॥ सोडितां भागल्या चिमटी ॥ अति हिंपुटी दोघेंही ॥८३॥
तो मायालाघवी जगजेठी ॥ त्याची कोणा न सुटे गांठी ॥ जरी आलिया परमेष्ठी ॥ तरी न सुटे त्याचेनि ॥८४॥
भ्रतार म्हणे आणीं शस्त्र ॥ वेणी कापूं तुझी सत्वर ॥ येरी म्हणे दाढीच अणुमात्र ॥ कातरुनि काढावी ॥८५॥
सौभाग्यदायक हे वेणी ॥ कातरुं पाहतां ये क्षणीं ॥ पति म्हणे कोणी करणी ॥ केली ऐसी न कळे पां ॥८६॥
उदय पावला चंडकिरण ॥ कोण करील गोदोहन ॥ पति म्हणे शस्त्रेंकरुन ॥ दाढी माझी छेदी तूं ॥८७॥
तंव ते शस्त्रें न कापे सर्वथा ॥ न तुटे न सुटे पाहतां ॥ न जळे कदा अग्नि लावितां ॥ विचित्र गति जाहली ॥८८॥
पति म्हणे ते वेळे ॥ तुज जरी मरण आलें ॥ तरी म्यांही मरावें वो वहिलें ॥ पूर्वकर्म कैसें हें ॥८९॥
दीर्घस्वरें दोघें रडती ॥ मग बिदीस येऊनि उभीं ठाकती ॥ आल्यागेल्यास येती ॥ काकुळती तेधवां ॥९०॥
व्याही जांवई पिशुन ॥ भोंवते मिळाले बहुत जन ॥ जे ते पाहती गांठी सोडून ॥ परी ते जाण न सुटेचि ॥९१॥
कोणी कातरुनि पाहती ॥ परी ते न कापे कष्टी होती ॥ तो समाचार नंदाप्रति ॥ एक सांगती कौतुकें ॥९२॥
नंद चावडिये बैसला ॥ घेऊनि गौळियांचा मेळा ॥ इंद्र जैसा मिरवला ॥ देवसभेंत श्रेष्ठ पैं ॥९३॥
अंकीं बैसविला जगन्मोहन ॥ जो अमलदलराजीवनयन ॥ तो ब्रह्मानंद सगुण ॥ गोकुळीं खेळे निज लीला ॥९४॥
जो सर्वांतर्यामीं वसे ॥ जो सर्वांचीं मनें जाणतसे ॥ जें जें प्राणी राहटतसे ॥ हृषीकेशी जाणत ॥९५॥
जग नग हा कनक जान ॥ जग पट हा तंतु पूर्ण ॥ जग तरंग हा सागर खूण ॥ अभेदपण मोडेना ॥९६॥
असो नंदें ते वेळीं ॥ दोघें चावडिये आणिलीं ॥ पुढें स्त्री मागें गौळी ॥ देखोनि सकळ हांसती ॥९७॥
नंदें पुसिलें वर्तमान ॥ कोणीं गांठी दिधली येऊन ॥ तंव तीं दोघें करिती रुदन ॥ गहिंवरुन करुणस्वरें ॥९८॥
म्हणती न कळे ईश्वरकरणी ॥ गदगदां हांसे चक्रपाणी ॥ म्हणे काल माझी शेंडी धरुनी ॥ बांधीन म्हणत होतीस कीं ॥९९॥
तुज प्रचीत दाखविली भगवंतें ॥ व्यर्थ बांधीन म्हणसी आम्हांतें ॥ तंव तीं म्हणती हरीतें ॥ आमुची गति काय आतां ॥१००॥
दीनवदनें भाकिती करुणा ॥ कृपा आली जगज्जीवना ॥ जो परब्रह्म वैकुंठराणा ॥ वेद्पुराणां अगम्य जो ॥१॥
मग पाहतांचि कृपादृष्टीं ॥ तत्काळ सुटली मायागांठी ॥ आनंद न माये सकळ सृष्टीं ॥ जगजेठी लाघवी हा ॥२॥
असो तीं दोघें जाहलीं सद्गदित ॥ श्रीहरीचें वदन अवलोकीत ॥ अहंकृति समस्त ॥ बुडोनि गेली तेधवां ॥३॥
काम क्रोध जाहले लज्जित ॥ मद मत्सर उठोनि पळत ॥ दंभ मोह अनर्थ ॥ जाहले गलित तेधवां ॥४॥
नमस्कारुनि यादवेंद्रा ॥ दोघें गेलीं निजमंदिरा ॥ सुख न माये अंतरा ॥ दोघांचेही तेधवां ॥५॥
आणिक एके दिवशीं श्रीरंगें ॥ नवल केलें भक्तभवभंगें ॥ एके गोपीचें घरीं सवेगें ॥ प्रवेशला गोविंद ॥६॥
तंव ते बोले मृगनयनी ॥ कां आलासी येथें चक्रपाणी ॥ काय पाहसी पाळती घेऊनी ॥ जातोसी तें कळेना ॥७॥
चित्तचोरा सकळचाळका ॥ जगन्मोहना महानाटका ॥ संचितगोरसभक्षका ॥ जगद्रक्षका जगदीशा ॥८॥
गोपी म्हणे कृष्णा बैस ॥ तों करें नेत्र चोळी हृषीकेश ॥ हळूंच बोले जगन्निवास ॥ गौळणीस तेधवां ॥९॥
माझे दुखती वो नयन ॥ मग बोले गोपी वचन ॥ कांहीं औषधेंकरुन ॥ व्यथा दूर करावी ॥११०॥
मग बोले घननीळ ॥ जे पुत्राचि माता असेल ॥ तिचें दुग्ध तत्काळ ॥ डोळियांमाजी घालिजे ॥११॥
तंव ते कुरंगनयनी बोले वचन ॥ माझे स्तनींचे दुग्ध जा घेऊन ॥ मग बोले राजीवनयन ॥ हास्यवदन करुनि ॥१२॥
म्हणे ते दुग्ध कामा न ये जाण ॥ तूं मागसी तेंचि देईन ॥ परी मी आपुल्या करयुगेंकरुन ॥ पिळीन स्तन तुझे वो ॥१३॥
ऐसें ऐकतांचि वचन ॥ गोपी हांसली गदगदोन ॥ म्हणे ऊठ चावटा येथून ॥ नसतेंच वचन बोलसी ॥१४॥
पुढें पुढें वाढतां ॥ बहु शहाणा होशील अच्युता ॥ तुझे मातेपासीं तत्त्वतां ॥ चाल अनंता सत्वर ॥१५॥
म्हणोनि धरावया धांविन्नली ॥ उठोनि पळे वनमाळी ॥ गोपी दारवंटा उभी ठाकली ॥ तंव तो गेला सत्वर ॥१६॥
येऊनि मायेजवळी ॥ गार्‍हाणें सांगे वेल्हाळी ॥ यशोदा हांसे वनमाळी ॥ कडियेवरी बैसलासे ॥१७॥
कृष्णाकडे माता पाहे ॥ मुख चुंबीत लवलाहें ॥ म्हणे हरि करुं काय ॥ खोडी तुझ्या अनिवार ॥१८॥


असो कृष्ण एके दिवसीं ॥ बाहेर गेला खेळावयासी ॥ मुलें मिळालीं सरसीं ॥ क्रीडताती हरीसवें ॥१९॥
सखयांसी म्हणे हरी ॥ तुमची माता जातांचि बाहेरी ॥ सांगा मज लौकरी ॥ तेचि मंदिरीं रिघों वेगें ॥१२०॥
ज्या घरीं प्राप्त नोहे गोरस ॥ ताडन करी त्यांच्या मुलांस ॥ कां रे न सांगा आम्हांस ॥ पाळती तुमच्या गृहींची ॥२१॥
वासरांच्या पुच्छीं बांधी अर्भकें ॥ आळोआळी पिटी कौतुकें ॥ आक्रोशें रडती बाळकें ॥ माता धांवती सोडावया ॥२२॥
बाळें सोडोनि गौळिणी ॥ मायेसी सांगती गार्‍हाणीं ॥ म्हणती जावें गोकुळ टाकोनी ॥ तुझ्या पुत्राचेनि त्रासें ॥२३॥
घरीं राखीत बैसल्या जरी नारी ॥ तरी वांसरें सोडितो बाहेरी ॥ वत्सांपाठीं जातां झडकरी ॥ मागें हरि गोरस खातो ॥२४॥
ताक सांडी मडकीं फोडूनी ॥ खापरें पसरितो आंगणीं ॥ असार सांडी सार भक्षूनी ॥ विचित्र करणी हरीची ॥२५॥

सारुनि कर्मजाळ समस्त ॥ स्वरुपप्राप्तीसी पावती संत ॥ कीं शब्द टाकूनि अर्थ ॥ सार जैसेम घेइजे ॥२६॥
शुक्ति सांडोनि घेइजे मुक्त ॥ कीं प्रपंचत्यागें परमार्थ ॥ क्रोधत्यागें जैसें समस्त ॥ शांतिसुख हाता ये ॥२७॥
भूस टाकूनि घेइजे कण ॥ कीं धूळ टाकूनि घेइजे रत्‍न ॥ कीं विषयत्यागें संपूर्ण ॥ स्वानंदसुख सेविजे ॥२८॥
ऐसें कृष्णें केलें सत्य ॥ सार सेविलें नवनीत ॥ ताक असार समस्त ॥ लवंडोनि फोडी भाजनें ॥२९॥
कोणीएक गजगामिनी ॥ चालिली सूर्यकन्येच्या जीवनीं ॥ घट भरुनि निजसदनीं ॥ मृगनयना जातसे ॥१३०॥
तों ते वाटे आला गोंविंद ॥ सवें शोभला बाळांचा वृंद ॥ कृष्णाकडे पाहूनि छंद ॥ लेंकरें बहुत करिताती ॥३१॥
कृष्णें तेव्हां काय केलें ॥ गोपीचें वस्त्र वेगें असुडिलें ॥ तत्काळ धरेवरी पडिलें ॥ उघडें जाहलें सर्वांग ॥३२॥
कर गुंतले घागरीं ॥ वस्त्र घेऊनि पळाला हरी ॥ चोहटां ते नग्न नारी ॥ सकळ लोक पाहती ॥३३॥
काकुळती येत गोपिका ॥ कृष्णा माझें वस्त्र देईं कां ॥ हरीनें वृक्षावरी एका ॥ वस्त्र तिचें टाकिलें ॥३४॥
आपण पळाला सत्वरा ॥ नग्न गोपी जात मंदिरा ॥ तिचें पाठीं अर्भकें एकसरा ॥ हांसतचि धांवती ॥३५॥
गोपी प्रवेशली मंदिरीं ॥ दुजें वस्त्र नेसे सुंदरी ॥ गार्‍हाणें सांगावया झडकरी ॥ घरा आली यशोदेच्या ॥३६॥
म्हणे कोठें तुझा हृषीकेशी ॥ माझें वस्त्र फेडिलें वाटेसी ॥ माता म्हणे कृष्णासी ॥ काय खोडीसी करुं तुझ्या ॥३७॥
एक सांगे तरुणी ॥ मी भरीत होतें यमुनेचे पाणी ॥ मागें येऊनि चक्रपाणी ॥ नेत्र माझे झांकिले ॥३८॥
मी भयभीत होऊनी ॥ मागे पाहे परतोनी ॥ अदृश्य जाहला तेच क्षणीं ॥ नवल करणी हरीची ॥३९॥
एक म्हणे मी उदक आणितां ॥ मागूनि आला अवचिता ॥ थै थै म्हणोनि त्वरितां ॥ नितंब करें थापटी ॥१४०॥
जैसे पर्जन्यकाळीं गंगेचे पूर ॥ लोटावरी लोट येती अनिवार ॥ तेवीं गार्‍हाणियांचे चपेटे थोर ॥ एकावरि एक पडताती ॥४१॥
पाहूनियां श्रीरंगा ॥ गोपी चितीं सानुरागा ॥ मृषा कोप वाउगा ॥ बाह्यदृष्टीं दाविती ॥४२॥
अंतरीं सप्रेम वरी कोपती ॥ फणस आंत गोड ॥ वरी कांटे दिसती ॥ जेवीं नारिकेल वरी कठिण भासती ॥ परी अंतरी जीवन तयांच्या ॥४३॥
कीं ज्ञानी वर्तती संसारीं ॥ परी सर्वदा निःसंग अंतरीं ॥ तैशा गोपी क्रोधायमान वरी ॥ परी हृदयीं सप्रेम ॥४४॥
ऐशा त्या सकळ नारी ॥ दृष्टीं लक्षूनि पूतनारी ॥ गार्‍हाणें देती सुंदरी ॥ ऐकतां दूरी शोक होय ॥४५॥
हाता न ये ज्या घरचा गोरस ॥ तरी ताडन करी त्यांचिया मुलांस ॥ त्यांच्या गळां काठमोरे हृषीकेश ॥ घालोनियां हिंडवी ॥४६॥


निद्रिस्तास तुडवी चरणीं ॥ बाळकें उठवितो रडवूनी ॥ म्हणे अग्नि लावीन ये सदनी ॥ तृप्त नव्हें मी येथें ॥४७॥
जेथें न लाभो गोरस पूर्ण ॥ म्हणे हें घर मसणवटीसमान ॥ जेथें मी तृप्त नव्हें मधुसूदन ॥ तेंचि स्थान अपवित्र ॥४८॥
मी तृप्त न होत जगन्निवास ॥ तें घर नांदतचि ओस ॥ तेथें अवदशा ये बहुवस ॥ आसमास कष्ट होती ॥४९॥
ऐसिया खोडी बहुत ॥ जननीस गोपी सांगत ॥ कृष्ण्मुखाकडे पाहूनि हांसत ॥ यशोदादेवी तेधवां ॥१५०॥
तें वैकुंठींचें निधान ॥ मातेकडे पाहे राजीवनयन ॥ म्हणे या गौळिणी संपूर्ण ॥ असत्य जाण बोलती ॥५१॥
मजवरी घालिती व्यर्थ आळ ॥ मी सर्वातीत निर्मळ ॥ जैसें आकाश केवळ ॥ घटमठांशीं वेगळें ॥५२॥
मी ब्रह्मानंद निर्मळ ॥ मज म्हणती हा धाकुटा बाळ ॥ यांच्या खोडी सकळ ॥ तुज माते सांगेन मी ॥५३॥
ह्या मज नेती गृहांत ॥ कुचेष्टा शिकविती बहुत ॥ मज हृदयीं धरुनि समस्त ॥ कुस्करिती निजबळें ॥५४॥
माते माझे चावोनि अधर ॥ चुंबन देती वारंवार ॥ मज कष्टविती थोर ॥ सकळ धमकटी मिळोनि ॥५५॥
बहुतजणी मिळोन ॥ घरांत होताती आपुल्या नग्न ॥ मज मध्यें बैसवून ॥ नाचताती सभोंवत्या ॥५६॥
म्हणती कृष्णा असतासी थोर ॥ तरी होता बरवा विचार ॥ तुजजवळी हा समाचार ॥ सांगेन म्हणतां दाबिती ॥५७॥
ऐसें बोले पूतनाप्राणहरण ॥ गोपी लटक्याचि क्रोधें पूर्ण ॥ म्हणती यशोदे तुझा नंदन ॥ तुजचि गोड वाटतसे ॥५८॥
अवघ्या मिळोनि गौळिणी ॥ गोफाटली नंदराणी ॥ म्हणती काय कौतुक नयनीं ॥ निजपुत्राचें पाहसी ॥५९॥
अगे हा परम नष्ट अनाचारी ॥ नसतीच आळी घेतो आम्हांवरी ॥ पुढें बहुतांचि घरें निर्धारीं ॥ हा बुडवील यशोदे ॥१६०॥
हंसतां हंसतां कौतुकें ॥ ब्रह्मांड लपवी कांखे ॥ सप्त समुद्र क्षण एकें ॥ नखाग्रांत जिरवील ॥६१॥
याच्या एक एक गोष्टी सांगतां ॥ तरी धरणी न पुरे लिहितां ॥ काल आमुच्या मंदिरांत तत्त्वतां ॥ अकस्मात पातला ॥६२॥
आम्ही बोलिलों कौतुकरीतीं ॥ तुज नवरी कैसी पाहिजे श्रीपती ॥ येणें प्रतिउत्तर कोणे रीतीं ॥ दिधलें तें ऐक पां ॥६३॥
अनंतब्रह्मांडांच्या गती ॥ जिच्या इच्छामात्रें होती जाती ॥ जे परब्रह्मींची मूळस्फूर्ती ॥ तेचि निश्चितीं नोवरी माझी ॥६४॥
ब्रह्मा विष्णु महेश्वर ॥ इंद्र चंद्र वरुण दिनकर ॥ हीं बाहुलीं नाचवी समग्र ॥ एकसूत्रेंकरुनियां ॥६५॥
जगडंबर हा दावी नेटें ॥ सवेंचि झांकूनि म्हणे कोठें ॥ ते माझी नोवरी भेटे ॥ तरीच करणें विवाह ॥६६॥
ते पतिव्रताशिरोमणी ॥ नांवरुपा आणिलें मजलागुनी ॥ माझी योगनिद्रा मोडोनी ॥ जागविलें मज तिनें ॥६७॥
मज न कळतां जागें केलें ॥ अवघें मोडोनि मजमाजी मिळविलें ॥ माझ्या सत्तेनें खेळ खेळे ॥ परी मी नेणें तियेतें ॥६८॥
ऐशा लबाड गोष्टी फार ॥ रचितो गे तुझा कुमार ॥ तों एक कुरंगनेत्री सुकुमार ॥ गार्‍हाणें सांगे ऐका हो ॥६९॥
काल माझ्या मंदिरा येऊनी ॥ शिंकीं पाहे अवलोकूनी ॥ तंव तीं न दिसती नयनीं ॥ म्हणे लपवोनि ठेवियेलीं ॥१७०॥
मज भेणें लपवितां लोणी ॥ परी मी काढीन धुंडोनी ॥ म्यां समुद्रांत शोधूनी ॥ शंखासुर काढिला ॥७१॥
असुर वेद घेऊनि गेला जेव्हां ॥ विधि माझा धांवा करी तेव्हां ॥ धांवें धांवें कमलाधवा ॥ हे केशवा दीनबंधो ॥७२॥
ब्रह्मा माझें पोटींचें बाळ ॥ मज बहुत त्याची कळकळ ॥ मी मत्स्यरुप होऊनि तत्काळ ॥ वेदशोधना निघालों ॥७३॥
तों असंभाव्य समुद्रजळ ॥ सवालक्ष गांवें रुंद विशाळ ॥ तितुकाच खोल सबळ ॥ पृथ्वीभोंवता असंभाव्य ॥७४॥
मी जाहलों मत्स्यरुप विशाळ ॥ असंभाव्य समुद्रजळ ॥ पुच्छघायें जळ सकळ ॥ आकाशपंथें उडविलें ॥७५॥
जैसें विहिरियाचें पाणी ॥ एकाच हस्तचपेटेंकरुनी ॥ बाहेर पडे येऊनी ॥ तैसा सागर उडविला ॥७६॥
सवालक्ष गांवें समुद्र ॥ आकाशीं उडविला समग्र ॥ मग पायीं धरुनि शंखासुर ॥ ओढूनियां काढिला ॥७७॥
असुरासी बाहेर काढिलें ॥ मग समुद्रजळ खालीं पाडिलें ॥ शंखासुरासी वधिलें ॥ करीं धरिलें कलेवर ॥७८॥
ते काळीं ब्रह्मादिक इंद्र ॥ स्तुतिस्तोत्रें करिती अपार ॥ वेद देऊनि समग्र ॥ म्यां मान रक्षिला देवांचा ॥७९॥
याकारणें चतुरे कामिनी ॥ जेणें प्रळयजळीं वेद शोधूनी ॥ काढिलें त्यापुढें लोणी ॥ लपवाल कोठें अबला हो ॥१८०॥
ऐक यशोदे सुंदरी ॥ लटक्याचि कथा उत्पन्न करी ॥ मी घुसळितां मंदिरीं ॥ हरि येऊनि बोलिला ॥८१॥
म्हणे घुसळितां गोपी समस्ता ॥ परी न ये माझिया चित्ता ॥ म्यां कूर्मअवतारीं तत्त्वतां ॥ क्षीरसागर मथिला हो ॥८२॥
एकादश सहस्त्र योजनें सबळ ॥ रवी केली मंदाराचळ ॥ जो अवक्र उंच सरळ ॥ सुवर्णमय प्रभा त्याची ॥८३॥
वासुकीची त्यास बिरडी ॥ मग समुद्र मथिला कडोविकडीं ॥ सुर आणि असुर प्रौढीं ॥ दोहींकडे सम धरिती ॥८४॥
मग चालिला भेदीत पाताळतळ ॥ मी कूर्म जाहलों घननीळ ॥ चतुर्दश रत्‍नें निर्मळ ॥ नवनीत तेंचि काढिलें ॥८५॥
तुम्ही दूध पाजितां बाळकांस ॥ तैसाचि मी सुरांस पाजीं सुधारस ॥ मोहिनीस्वरुप विशेष ॥ मीच नटलों तेधवां ॥८६॥
म्यां मोहिनीस्वरुप धरिलें जाण ॥ म्हणोनि मोडूनि दाखवी नयन ॥ तें कूर्मचरित्र संपूर्ण ॥ आपुलें आंगीं दावितो ॥८७॥
आणिक नवल एक साजणी ॥ मी कुंभ भरितां तमारिकन्याजीवनीं ॥ तों हळूंच माझा कर धरुनी ॥ काय बोलिला गोपाळ ॥८८॥
तुम्ही गे घागरी उचलितां ॥ बहुत गोपी कष्टी होतां ॥ म्यां दाढेवरी तत्त्वतां ॥ पृथ्वी उचलोनि धरियेली ॥८९॥
तो मी वराहवेषधारी ॥ हिरण्याक्ष मारिला क्षणाभीतरी ॥ अद्यापि दाढेवरी धरित्री ॥ म्यां धरिलीसे निजबळें ॥१९०॥
म्यां दाढेवरी धरिली अवनी ॥ कुंभ न उचले तुमचेनी ॥ मी ब्रह्मांड नखाग्रीं धरुनी ॥ नाचवीन म्हणतसे ॥९१॥
ऐकें यशोदें शुभकल्याणी ॥ आम्ही फळें कांकडया चिरतां सदनीं ॥ म्हणे हिरण्यकश्यपा चिरुनी ॥ आंतडीं ऐशीं काढिलीं म्यां ॥९२॥
तो मी नृसिंहवेषधारक ॥ असुरकुळकाननपावक ॥ माझ्या क्रोधापुढें ब्रह्मादिक ॥ उभे न ठाकती सर्वथा ॥९३॥
क्रोधें विदारिला असुर ॥ रक्षिला प्रल्हाद किंकर ॥ तो नरसिंहअवतार समग्र ॥ लीला अपार दाविली ॥९४॥
ऐकें यशोदें सुताचें विंदाण ॥ नसतेंच करितो निर्माण ॥ एके दिवशीं मी पतीचे चरण ॥ धूत होतें निजगृहीं ॥९५॥
हळूंच बैसला येऊन ॥ म्हणे बळीनें धुतलें माझे चरण ॥ मज त्रिपादभूमी दान ॥ प्रल्हादपौत्रें दिधली पैं ॥९६॥
दोन पाद जाहलें त्रिभुवन ॥ मम बळीनें केलें आत्मनिवेदन ॥ बळी माझें रुप विलोकी पूर्ण ॥ तों असंभाव्य लक्षवेना ॥९७॥
सप्तपाताळांखालीं चरण ॥ प्रपद तें रसातळ पूर्ण ॥ गुल्फद्वय तें महातल जाण ॥ पोटरिया तें सुतळ ॥९८॥
अतळ आणि वितळ ॥ त्या जानु जंघा निर्मळ ॥ कटिप्रदेश तें भूमंडळ ॥ मृत्युलोक वसे वरी ॥९९॥
सप्त समुद्र पोटांत ॥ जठराग्नि वडवानळ धडधडीत ॥ नाभिस्थान नभ निश्चित ॥ ज्योतिर्लोक वक्षःस्थळ ॥२००॥
महर्लोक तो कंठ जाण ॥ मस्तक तें विधिभुवन ॥ दोहों हस्तरुपें शची रमण ॥ माझ्या अंगीं वसतसे ॥१॥
नेत्र ते सूर्यनारायण ॥ चंद्रमा ते माझें मन ॥ दिशा ते माझे श्रवण ॥ विष्णु अंतःकरण जाण पां ॥२॥
विरिंची बुद्धि साचार ॥ शंकर माझा अहंकार ॥ यम माझ्या दाढा समग्र ॥ वरुण जिव्हा जाणिजे ॥३॥
ऐसें माझें स्वरुप अद्‌भुत ॥ देखोनि बळी माझा भक्त ॥ तेणें शरीर निश्चित ॥ मज केलें अर्पण ॥४॥
मग मी स्थापिला रसातळीं ॥ अद्यापि उभा आहें जवळी ॥ त्याचें द्वार राखें मी वनमाळी ॥ तोच गोकुळीं अवतरलों ॥५॥
जान्हवी माझें चरणजळ ॥ मस्तकीं वाहे तो जाश्वनीळ ॥ ऐशा गोष्टी घननीळ ॥ सांगे आम्हांतें जननीये ॥६॥
जें पोर मोडी पितृआज्ञेतें ॥ त्यासी ताडन करी स्वहस्तें ॥ मी मारीं आपुले मातेतें ॥ पितृआज्ञेंकरुनियां ॥७॥
एकवीस वेळां निःक्षत्री ॥ म्यां परशुधरें केली धरित्री ॥ तोचि गोकुळाभीतरी ॥ अवतरलों मी म्हणतसे ॥८॥
रामावतारीं मी पितृभक्त ॥ वना जाई चरणीं चालत ॥ खर दुषण त्रिशिरा समस्त ॥ वधिले अद्‌भुत विरोधें ॥९॥
माझी सीता नेली रावणें ॥ सवेंच म्यां केलें धांवणें ॥ वाली वधूनि सुग्रीवाकारणें ॥ किष्किंधा ते समर्पिली ॥२१०॥
माझा प्राणसखा हनुमंत ॥ सीताशुद्धि करुनि येत ॥ मी दळभारें रघुनाथ ॥ समुद्रतीरा पातलों ॥११॥
पाषाणीं पालाणिला समुद्र ॥ सुवेळेसी गेलों मी राघवेंद्र ॥ देवांतक नरांतक महोदर ॥ अतिकाय प्रहस्त वधियेले ॥१२॥
कुंभकर्ण इंद्रजित सर्व ॥ शेवटीं मारिला दशग्रीव ॥ सोडविलें बंदीचे देव ॥ निजप्रतापेंकरुनियां ॥१३॥
तोचि मी आतां गोकुळीं येथें ॥ कंस वधीन निजहस्तें ॥ मी क्षीर सागरीं असतां तेथें ॥ शरण देव मज आले ॥१४॥
ब्रह्मा शंकर प्रजा ऋषी ॥ गार्‍हाणीं सांगती मजपासीं ॥ मग मी मारावया कंसासी ॥ नंदगृहीं अवतरलों ॥१५॥
मुष्टिक चाणूर अघासुर ॥ दैत्य अवघे मारीन दुर्धर ॥ मी बायका सोळा सहस्त्र ॥ पुढें करीन म्हणतो कीं ॥१६॥
होईन मी भक्तांचा सारथी ॥ उच्छिष्ट काढीन स्वहस्तीं ॥ दुष्ट भारुनि निश्चितीं ॥ भूमार सर्व हरीन ॥१७॥
ब्रह्मयाचा बाप म्हणतो बाई ॥ म्हणवी क्षीराब्धीचा जांवई ॥ परमात्मा शेषशायी ॥ म्हणवी पाहीं यशोदे ॥१८॥
ज्यांचें घरीं न लाभे चोरी ॥ त्याचिया अर्भकांसी करीं धरी ॥ म्हणे तुमचे शिरींचे निर्धारीं ॥ केश लुंचीन अवघे पैं ॥१९॥
पोरें केश लुंचिती ॥ चिमटी मुलांच्या भागती ॥ म्हणे मी बौद्ध निश्चितीं ॥ कलियुगीं गति दावीन हो ॥२२०॥
पोरें न सांगती पाळती ॥ त्यांसी जाची नानागती ॥ एके मुलावरी बैसे श्रीपती ॥ ताट हातीं घेऊनियां ॥२१॥ मुलांस म्हणे म्लेंच्छ तुम्ही ॥ मरोन पडा रे रणभूमीं ॥ कलंकी अवतार पुढें मी ॥ ऐसाचि होईन जाण पां ॥२२॥
करीं घेऊनियां कुंत ॥ म्लेंच्छ संहारीन सत्य ॥ मी वैकुंठीचा नाथ ॥ यादवकुळीं अवतरलों ॥२३॥
ऐसे माझे अवतार किती ॥ भोगींद्रासही नेणवती ॥ मेघधारा मोजवती ॥ परी अंत नाहीं अवतारां ॥२४॥
मी आद्य निष्कलंक अचळ ॥ अरुप निर्विकार निर्मळ ॥ मी ब्रह्मानंदस्वरुप अढळ ॥ नाहीं चळ मजलागीं ॥२५॥
मी अच्युत अनंत ॥ मी नामरुपातीत ॥ मी गुणागुणरहित ॥ करुनि सत्या अकर्ता मी ॥२६॥
मी सर्वांचें निजमूळ ॥ परी नोळखती लोक बरळ ॥ जीवदशा पावोनि सकळ ॥ अविद्येनें वेष्टिले ॥२७॥
अहंकारमद्य पिऊनी ॥ भ्रमती मायाघोरविपिनीं ॥ आपुली शुद्धि विसरोनी ॥ आडफांटा भरले हो ॥२८॥
काम क्रोध मद मत्सर ॥ हे अनामिक दुराचार ॥ यांचे संगतीं जीव समग्र ॥ भ्रष्टोनि मज विसरती ॥२९॥
मी सर्वांजवळी असें ॥ परी कोणासही पाहतां न दिसें ॥ मृगनाभीं कस्तूरी वसे ॥ परी न गवसे तयातें ॥२३०॥
एक दर्पणांचें निकेतन ॥ त्यांत सोडिलें जैसें श्वान ॥ प्रतिबिंबें असंख्यात देखोन ॥ भुंकोन प्राण देत जैसें ॥३१॥
कां स्फटिकाचे पर्वतीं ॥ प्रतिबिंब द्विरद देखती ॥ झाडां व्यर्थ हाणितीं दांती ॥ परी न येती मरणावरी ॥३२॥
कां चणियाच्या आशें वानर ॥ गोवूनि बैसे दोनी कर ॥ कां नळिकेच्या योगें पामर ॥ शुक बद्ध जाहले ॥३३॥
कीं आंधळें हातरुं माजलें ॥ कीं सिंहानें प्रतिबिंब देखिलें ॥ कृपामाजी व्यर्थ मेलें ॥ जीवा झालें तैसेंचि ॥३४॥
कां उडुगणप्रतिभांस देखोन ॥ हंस पावे व्यर्थ मरण ॥ तैसें अविद्यायोगें भुलोन ॥ जन्ममरण भोगिती ॥३५॥
स्फटिक सर्वदा निर्मळ असे ॥ परी काजळावरी काळा दिसे ॥ कां केशावरी भासे ॥ चिरफळिया जाहल्या ॥३६॥
असो आतां यशोदे माय ॥ गोष्टी याच्या सांगों काय ॥ ऐकतां चित्ता उपरम होय ॥ प्रेम सये नावरे मज ॥३७॥
एक म्हणे नाटकी मोठा ॥ पुत्र तुझा बहुत गोटा ॥ मिथ्या गोष्टी गे अचाटा ॥ घेऊनियां ऊठतो ॥३८॥
जितुक्या सांगितल्या गोष्टी ॥ तितुक्या मिथ्याचि चावटी ॥ नसती क्रियाकर्मरहाटी ॥ आपुलें आंगीं लावितो ॥३९॥
पूर्वीं जे अवतार झाले ॥ ते आपुलेचि आंगीं लावितो बळें ॥ जें जें हा जननीये बोले ॥ तितुकें मिथ्या मृगजल ॥२४०॥
रांजणींचें पाणी देखतां ॥ भय वाटे तुझ्या सुता ॥ तो प्रळयसमुद्रीं तत्त्वतां ॥ मत्स्य कैसा झाला गे ॥४१॥
थापटोनी निजवितां जगजेठी ॥ म्हणे हळूचि थापटीं माझी पाठी ॥ तो म्हणतो मंदराचळ उठाउठीं ॥ पृष्ठीवरी धरिला म्यां ॥४२॥
चेंडू न उचले लवकरी यातें ॥ म्हणे म्यां दाढेवरी धरिलें धरेतें ॥ पृथ्वी रक्षिली म्यां अनंतें ॥ वराहवेषें म्हणतसे ॥४३॥
आंगडियाचा कसा सोडितां ॥ म्हणे नखें दुखती माझीं आताम ॥ आणि म्हणतो असुर तत्त्वतां ॥ विदारिला निजहस्तें ॥४४॥
शिंकें यासी न पवे वहिलें ॥ तो म्हणतो ब्रह्मांड नखें भेदिलें ॥ जान्हवीजळ काढिलें ॥ त्रिविक्रम होऊनियां ॥४५॥
मारुं जातां शिपटी ॥ भेणें पळतो जगजेठी ॥ तो म्हणतो तीन सप्तकें सृष्टी ॥ निःक्षत्री म्यां केली हो ॥४६॥
इक्षु न मोडे यास जाण ॥ म्हणतो मोडिलें भवसायकासन ॥ जो पळतो बागुलाच्या भेणें ॥ सांगें रावण मारिला म्यां ॥४७॥
मागील गोष्टी मिथ्या सर्व ॥ आतां मारीन म्हणतो कंसराव ॥ दावितो अवताराचा भाव ॥ निजांगींच आपुल्या ॥४८॥
उडत उडत होय मासा ॥ म्हणे हा मत्स्यावतार ऐसा ॥ अर्भक पायीं धरुनि ऐसा ॥ शंखासुर हाचि पैं ॥४९॥
चक्रवत फिरे घननीळ ॥ म्हणे ऐसा भ्रमविला मंदराचळ ॥ खडे घेऊनि तत्काळ ॥ म्हणे रत्‍नें काढिलीं ॥२५०॥
दांतांवरी काडी धरुनी ॥ वस्त्रघडी त्यावरी ठेवूनी ॥ म्हणे म्यां असे धरिली अवनी ॥ दावी रांगोनी सूकर ऐसा ॥५१॥
बाहुल्याचें पोट फोडी ॥ म्हणे हिरण्यकश्यपाचीं काढितों आंतडीं ॥ पोरें पळती तांतडीं ॥ भिती देखोनि तयातें ॥५२॥
गुडघे टेंकूनि होय वामन ॥ म्हणे म्यां त्रिपद घेतलें भूमिदान ॥ एका पोरावरी उभा राहोन ॥ म्हणे बळी पाताळीं घालितों ॥५३॥
करीं घेऊनि कंदुक ॥ म्हणे हेंचि माझे फरश देख ॥ निःक्षत्री करीन धरणी सकळिक ॥ म्हणोनि हिंडे सैराचि ॥५४॥
चुईचें धनुष्य करुनी ॥ हरि ठाण मांडी ॥ मेदिनीं आकर्ण ओढूनी ॥ मारीत म्हणे राक्षसां ॥५५॥
घडिभर घेतो मुरली ॥ ऐकतां आमुची वृत्ति मुराली ॥ अहंकृति समूळ हरली ॥ गातो वनमाळी सुंदर ॥५६॥
ऐकें यशोदे जननी ॥ अवघी लटकीच याची करणी ॥ आम्हांवरी इटाळी घेऊनी ॥ नसतीच उठतो गे ॥५७॥
याची गोष्ट न मानींच खरी ॥ परम चक्रचाळक मुरारी ॥ याच्या भेणें निर्धारी ॥ जावें टाकूनि गोकुळ ॥५८॥
यशोदा म्हणे अनंता ॥ सोसूं किती खोडी आतां ॥ क्षणभरी पाय तत्त्वतां ॥ घरीं तुझा न राहे ॥५९॥
परघरीं मी न करीं चोरी ॥ म्हणवोनि आण वाहें मुरारी ॥ तुज मी बांधीन हृदयमंदिरीं ॥ ना सोडींच सवर्था ॥२६०॥
पहा हरिविजयग्रंथ ॥ हाचि त्र्यंबकराज उमाकांत ॥ भावसिंहस्थी यात्रा येत ॥ त्यासी जगन्नाथ नुपेक्षी ॥६१॥
कीं ब्रह्मगिरी हाचि ग्रंथ ॥ जो पारायणप्रदक्षिणा करीत ॥ त्याचे बंध समस्त ॥ जन्मोजन्मींचे तुटती ॥६२॥
ब्रह्मानंदकृपामेघ सुरवाडे ॥ हें हरिविजयक्षेत्र वाढे ॥ श्रीधर म्हणे निवाडे ॥ अर्थ सज्जनीं पाहिजे ॥६३॥

इति श्रीहरिविजयग्रंथ ॥ संमत हरिवंशभागवत ॥ चतुर श्रोते परिसोत ॥ सप्तमाध्याय गोड हा ॥२६४॥
॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥