अध्याय ४
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकुलदेवतायै नमः ॥श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥
जय जय श्रीकृष्ण उदारा ॥ निजजनमानसचकोरचंद्रा ॥ ब्रह्मानंदा ज्ञानसमुद्रा ॥ मायातीता अनंता ॥२॥
जय भवहृदयानंदकंदा ॥ प्रेमळभक्तचातकजलदा ॥ पूर्णानंदा पूर्णसुखदा ॥ भेदभेदातीत तूं ॥३॥
जय जय मायाविपिनदहना ॥ मधुकैटभारे मुरमर्दना ॥ धर्मपाळका सद्गुणवर्धना ॥ सच्चिदानंदा परेशा ॥४॥
जय जय कमळनाभा कमळपत्राक्षा ॥ मनमोहना निर्विकल्पवृक्षा ॥ मायाचक्रचाळका सर्वसाक्षा ॥ दानवशिक्षाकारणा ॥५॥
षड्गुणैश्वर्यसंपन्ना ॥ यशःश्रीकीर्तिऔदार्यविज्ञाना ॥ जय अरिषडवर्गमदभंजना ॥ निरंजना निरुपाधिका ॥६॥
हरे अनंतशायी अनंता ॥ पुढें बोलें हरिविजयग्रंथा ॥ तुझी लीला जगन्नाथा ॥ तूंच बोलें सर्वही ॥७॥
तिसरे अध्यायीं निरुपण ॥ गोकुळीं गेला मनमोहन ॥ वसुदेवास आडवें विघ्न ॥ मायाजाळ पैं आलें ॥८॥
धरितां स्वरुपानुसंधान ॥ आडवें येत मायाविघ्न ॥ तैसा हरि उदरा येऊन ॥ वसुदेव बांधिला मायेनें ॥९॥
साधकां जों स्वरुपप्राप्ति होत ॥ तंव सिद्धि पुढें आडवी येत ॥ सिद्धिसंगें परमार्थ ॥ सर्व जातो हातींचा ॥१०॥
सिद्धिपाठीं जो लागला ॥ तो दिवसाच चोरीं नागविला ॥ आत्मप्राप्ति तयाला ॥ कल्पांतींही नव्हेचि ॥११॥
देवाच्या बापाच्या पायीं वहिली ॥ मायेनें बेडी ठोकिली ॥ मायिक जीव सकळी ॥ मुक्त कैसे होती पां ॥१२॥
ऐसी दुर्धर हरीची माया ॥ तीस कंस गेला आपटावया ॥ तंव ते गेली निसटोनियां ॥ न ये ते आया सुरासुरांच्या ॥१३॥
ब्रह्मादिकां पडली माया अटक ॥ तेथें कंस काय मशक ॥ लागला कंसासी परम धाक ॥निशिदिवस विसरेना ॥१४॥
जवळी प्रधान कारभारीं ॥ कंस धांवे तयांवरी ॥ अरे तुम्ही माझे सर्व अरी ॥ मज मारुं पाहतां ॥१५॥
भोंवते सेवकांचे भार ॥ तों हांक फोडी कंसासुर ॥ म्हणे अवघेचि दावेदार ॥ मजभोंवते मिळाले ॥१६॥
असो आतां गोकुळीं चक्रपाणी ॥ पहुडला यशोदेचे शयनीं ॥ जागी जाहली नंदराणी ॥ निजनयनीं अवलोकी ॥१७॥
यशोदा केवळ ज्ञानकळा ॥ हरिप्राप्ति जाहली तिजला ॥ सायास न करितां आला ॥ घरा आपण गोविंद ॥१८॥
यशोदेचें भाग्य विशेष ॥ कवडी देऊनि घेतला परिस ॥ कोंडा देऊनि कल्पवृक्ष ॥ हाता आला निजभाग्यें ॥१९॥
धुवण देऊनि घेतलें अमृत ॥ कीं अजापालटें ऐरावत ॥ जंबुक देऊनि यथार्थ ॥ सिंह घरा आणिला ॥२०॥
एकें चिंतामणि गोफणिला ॥ तो येऊनि अंगणांत पडिला ॥ तैसा यशोदेसी लाभ जाहला ॥ घरा आला श्रीहरी ॥२१॥
यशोदा बैसली उठोन ॥ तों सेजे देखिलें निधान ॥ अमलदलराजीवनयन ॥ मोहिलें मन यशोदेचें ॥२२॥
हांसे वरी मुख करोनी ॥ आपुले चरणींचा अंगुष्ठ धरोनी ॥ घाली आपुलें वदनीं ॥ तेज सदनीं न समाये ॥२३॥
यशोदेसी पुत्र जाहला म्हणोनी ॥ धांवती रोहिणी आणि गौळिणी॥ आनंद न समाये त्रिभुवनीं ॥ धन्य राणी नंदाची ॥२४॥
द्वारीं उभे मंडप केले ॥ समस्त ब्राह्मण जवळी आले ॥ कुळींचा उपाध्याय ते वेळे ॥ गर्गमुनि धांविन्नला ॥२५॥
गोकुळीं अवतरला श्रीहरी ॥ वाद्यें वाजती अतिगजरीं ॥ दाटी झाली नंदद्वारीं ॥ देव अंबरीं पाहती ॥२६॥
नंदें करुनि मंगलस्नान ॥ पाहों चालिला पुत्रवदन ॥ गर्ग आदिकरुन ब्राह्मण ॥ त्रिकाळज्ञानी पातले ॥२७॥
करुनियां पुण्याहवाचन ॥ मग पाहे कृष्णवदन ॥ मधुबिंदु मुखीं घालोन ॥ मधुसूदन तोषविला ॥२८॥
श्रीवासुदेवाचें वदन ॥ पाहतां नंद आनंदघन ॥ म्हणे अनंत जन्मींचें पुण्य ॥ एकदांचि फळा आलें ॥२९॥
दोन लक्ष गोधनें ॥ नानापरींचीं दिव्य रत्नें ॥ विचित्र अलंकार भूषणें ॥ वाटितां जाहला नंद तो ॥३०॥
अक्षय वाणें घेऊनी ॥ धांवती नगरींच्या गौळिणी ॥ अहेर अलंकारें ते क्षणीं ॥ गौळी पूजिती नंदातें ॥३१॥
मंडित सर्व अलंकारें ॥ गौळिणी नेसल्या कनकांबरें ॥ पायीं पैंजण वाजती गजरें ॥ यशोदेच्या गृहीं जातां ॥३२॥
हळदीकुंकुमांची ताटे भरोनी ॥ धांवताती नितंबिनी ॥ म्हणती धन्य त्रिभुवनीं ॥ यशोदा देखिली समर्थ ॥३३॥
एक म्हणती हें बाळ ॥ सखे दिसतें बहु विशाळ ॥ एक म्हणती त्रिभुवनास ॥ घालील पालाण हा पुरुषार्थें ॥३४॥
एक म्हणती होईल महावीर ॥ एक म्हणती दिसतो उदार ॥ एक म्हणती सहस्त्रकर ॥ उणा तेजासी याचिया ॥३५॥
एक म्हणती नखावरोनी ॥ काम सांडावा कुर्वंडी करोनी ॥ एक म्हणती ओंवाळूनी ॥ जाऊं तुजवरोनि बाळका ॥३६॥
एक म्हणती बोलूं नका गोष्टी ॥ बाळास लागेल गे दृष्टी ॥ यशोदेनें जगजेठी ॥ पुढें ओसंगा घेतला ॥३७॥
ज्या ज्या मंदीरीं उपजला श्रीपती ॥ केशरकस्तूरीनें लिंपिल्या भिंती ॥ आरक्त चांदवे विराजती ॥मुक्तझालरी भोंवत्या ॥३८॥
रत्नजडित पलंग ॥ त्यापुढें ठेविला रत्नखचित ॥ चौरंग त्यावरी यशोदा श्रीरंग ॥ घेऊनियां बैसली ॥३९॥
ओसंगा घेतला चक्रपाणी ॥ श्वेत चामरें करीं घेऊनी ॥ ढाळिताती दोघीजणी ॥ यशोदेवरी स्वानंदें ॥४०॥
तांबूल त्रयोदशगुणी ॥ विडे देती दोघीजणी ॥ एक पिकपात्र धरोनि ॥ उभी असे जवळिकें ॥४१॥
कनकांबराची बुंथी ॥ घेऊनि बैसली यशोदा सती ॥ ओसंगा घेतला श्रीपती ॥ आनंद चित्तीं न समाये ॥४२॥
भोंवते वेष्टिले विद्वज्जन ॥ गर्गमुनि पुढें होऊन ॥ पाहे बाळकाचें लक्षण ॥ नयनीं वदन विलोकी ॥४३॥
जातक वर्णीत गर्गमुनी ॥ नंद यशोदा ऐकती श्रवणीं ॥ जें श्रवण करितां पापधुणी ॥ होय एकदां सर्वांची ॥४४॥
हात पाहोनि गर्ग ॥ म्हणे इंदिरावर श्रीरंग ॥ धन्य यशोदे तुझें भाग्य ॥ न वर्णवे शेषातें ॥४५॥
जें क्षीरसागरींचें निधान ॥ जें क्षीराब्धितनयेचें जीवन ॥ क्षितिधरावरी करी शयन ॥ तो हा निधान पुत्र तुझा ॥४६॥
कमलनयन कमलवदन ॥ कमलनाभ कमलभूषण ॥ कमलप्रिय कमलशयन ॥ तो हा पूर्ण पुत्र तुझा ॥४७॥
हा उपजला तुझ्या उदरीं ॥ परी कीर्ति करील त्रैलोक्यभरी ॥ यास असती बहुत वैरी ॥ परी नाटोपे कोणा हा ॥४८॥
महाविषें स्तन भरोनी ॥ कोणी येईल कामिनी ॥ स्तन पाजितां चक्रपाणी ॥ तीस शोषोनि टाकील ॥४९॥
चंडवायु उडवूनि यातें ॥ घेऊनि जाईल आकाशपंथें ॥ मर्दूनियां त्या दैत्यातें ॥ विजयी होईल पुत्र हा ॥५०॥
आंगावरी येईल गाडा ॥ त्याचाही करील चुराडा ॥ दोनी वृक्ष कडकडा ॥ मोडूनि पडतील यावरी ॥५१॥
हा होईल चित्तचोर ॥ गोरस उरों नेदी अणुमात्र ॥ ऐकतां हांसती सकळ विप्र ॥ यशोदा नंदा सुखावती ॥५२॥
मायाचक्रचाळक चक्रपाणी ॥ मोहील अवघ्या गौळिणी ॥ यास थोर यमुनाजीवनीं ॥ महासर्पमय असे ॥५३॥
तेथें विजयी होईल आपेंआप ॥ आणिक एक बापासी गिळील सर्प ॥ परी तेथेंही याचा प्रताप ॥ विशेष वाढेल जननीये ॥५४॥
द्वादश योजनें महाअग्न ॥ ग्रासील हा न लागताम क्षण ॥ महापर्वत उचलोन ॥ नखाग्रींच धरील हा ॥५५॥
गोरक्षण करील हा माते ॥ कंसास मृत्यु याचेनि हातें ॥ संहारील सर्व दैत्यांतें ॥ बंदींचीं समस्तें सोडवील ॥५६॥
गुरुपुत्र गेला मरोन ॥ तो पुन्हां देईल आणून ॥ समुद्रांत एक पट्टण ॥ नवेंचि रचील अद्भुत ॥५७॥
महादैत्य संहारुनी ॥ वरील मुख्य पट्टराणी ॥ आणिक सोळा सहस्त्र जणी ॥ एकलाचि पर्णील ॥५८॥
षोडशसहस्त्र एक शत ॥ आणिक आठजणी विख्यात ॥ संतति वाढेल अपरिमित ॥ नाहीं अंत निजभाग्या ॥५९॥
घेईल भक्तांचा कैवार ॥ उतरील धरणीचा सर्व भार ॥ याची लीला गातां सर्वत्र ॥ प्राणी तरती त्रिभुवनींचे ॥६०॥
धर्माघरीं उच्छिष्टें प्रीतीं ॥ काढील हा श्रीपती ॥ होईल भक्तांचा सारथी ॥ लाज चित्तीं धरीना ॥६१॥
दिवसेंदिवस लीलाचरित्र ॥ दावील गति चित्रविचित्र ॥ निजधामा जातां स्वगोत्र ॥ समागमें नेईल हा ॥६२॥
ऐसें जातक ऐकतां श्रवणीं ॥ तटस्थ जाहलीं नंदराणी ॥ तों स्तनपान करितां चक्रपाणी ॥ परतोन पाहे द्विजाकडें ॥६३॥
माझी लीला सांगितली सर्वत्र ॥ म्हणोनि हास्य करी राजीवनेत्र ॥ जो ब्रह्मानंद सर्वेश्वर ॥ लीलाकौतुक दावी तो ॥६४॥
बारा दिवसपर्यंत ॥ सोहळा होतसे अद्भुत ॥ नंदें द्रव्य अपरिमित ॥ वांटिलें विप्रा तेधवां ॥६५॥
तेरावे दिवशीं पाळणां ॥ पहुडविला वैकुंठराणा ॥ श्रीकृष्ण हें नाम जाणा ॥ गर्गें स्थापिलें जाणोनि ॥६६॥
करितां नाना साधना ॥ न ये ब्रह्मादिकांच्या ध्याना ॥ त्यासी घालूनि पाळणां ॥ जो जो म्हणोनि हालविती ॥६७॥
वेदशास्त्रां न ये आया ॥ भोगींद्र झाला हरीची शय्या ॥ तो पाळणां निजोनियां ॥ लीला दावी भक्तांतें ॥६८॥
जो पयोब्धिहृदयनिवासी ॥ पद्मा सेवी पदपद्मांसी ॥ उरगरिपु वहन ज्यासी ॥ पाळणाम त्यासी पहुडविलें ॥६९॥
जलजनाभ जलजलोचन ॥ जलधिशायी जलदवर्ण ॥ जय विजय कर जोडून ॥ द्वारीं उभे जयाच्या ॥७०॥
सनकादिक सनत्कुमार ॥ हृदयीं चिंतिती निरंतर ॥ जें मन्मथशत्रुध्येय साचार ॥ नारददिकां गुह्य जें कां ॥७१॥
जें मूळ आदिमायेचें ॥ जें पक्व फळ निगमवल्लीचें ॥ जें देवतार्चन कमलोद्भवाचें ॥ पाळण्यांत खेलतसे ॥७२॥
जो विद्वज्जनमानसमराळ ॥ जो वैकुंठींचा वेल्हाळ ॥ निजभक्तवरद तमालनील ॥ तो पहुडला पाळणाम ॥७३॥
जो अनंतगुणसंपन्न ॥ अनंतनेत्र अनंतवदन ॥ अनंतबाहु अनंतचरण ॥ त्यास जो जो म्हणोनि हालवी ॥७४॥
जो अलक्ष्य अपरंपार ॥ जो आदिमायेचा निजवर ॥ जो त्रिभुवनाचा आधार ॥ जो वंद्य निगमागमां ॥७५॥
जो विराट्वृक्षाचें मूळबीज ॥ जो योगियांची विश्रांतिशेज ॥ जो आदिप्रणवाचें निजगुज ॥ तो पाळणां पहुडविला ॥७६॥
जो वेदविद्याचलदिनकर ॥ जो ब्रह्मांडनगरीचा स्तंभ थोर ॥ जो दानवसमरप्रतापधीर ॥ पाळणां तो पहुडविला ॥७७॥
अज्ञानगजच्छेदकपंचानन ॥ जो मायाघोरविपिनदहन ॥ जो सर्वआनंद आद्यकारण ॥ ब्रह्म पूर्ण श्रीकृष्ण ॥७८॥
पाळण्याभोंवत्या सुवासिनी ॥ शांति क्षमा दया उन्मनी ॥ उपरति सद्विद्या कामिनी ॥ जो ओ शब्दें हालविती ॥७९॥
निर्वाणदीक्षा तितिक्षा स्वरुपास्थिती ॥ मुमुक्षा निष्कामना प्रतीती ॥ सुलीनता समाधि सद्गती ॥ लीला गाती आनंदें ॥८०॥
परा पश्यंती मध्या वैखरी ॥ गजरें गाती चारी नारी ॥ चारी मुक्ति निर्धारीं ॥ चहूं कोनीं तटस्थ ॥८१॥
घरांत मुख्य या सुंदरी ॥ इतर बैसल्या बाहेरी ॥ जागृती सुषुप्ति नारी ॥ त्यांस हरी दिसेना ॥८२॥
असंभावना विपरीत भावना ॥ विक्षिप्ता त्यागिता येतां जाणा ॥ तुर्या दावी शहाणपणा ॥ जाणती असें बहुत मी ॥८३॥
बारा सोळा चौदा नारी ॥ गलबला करिती बाहेरी ॥ चौसष्टी दाविती कलाकुसरी ॥ परी अंतरीं प्रवेश नव्हे ॥८४॥
असो आतां सकल नितंबिनी ॥ ओंटी यशोदेची भरोनी ॥ अलंकार वस्त्रें अर्पूनी ॥ सदना आपुल्या त्या गेल्या ॥८५॥
वस्त्रें भूषणें देऊन ॥ नंदें बोळविले ब्राह्मन ॥ गर्ग गौरविला संपूर्ण ॥ वस्त्राभरणीं तेधवां ॥८६॥
गोकुळीं अवतरतां गोपाळ ॥ सकळ वृक्ष सदाफळ ॥ धेनु दुभती त्रिकाळ ॥ दुग्ध तुंबळ वर्षती ॥८७॥
आधिव्याधिरहित लोक ॥ नाही चिंता दरिद्रदुःख ॥ शुष्क धरणीस अपार पिक ॥ पिको लागलें तेधवां ॥८८॥
अवतरतांचि रमारमण ॥ जग जरारहित जाहलें तरुण ॥ विकल्प पाप समूळून ॥ देशधडी जाहलें ॥८९॥
दरिद्री ते जाहले भाग्यवंत ॥ मूर्ख ते होती बोलके पंडित ॥ कुरुप ते जाहले रुपवंत ॥ देदीप्यमान तेजस्वी ॥९०॥
अवतरतां श्रीकृष्णपरब्रह्म ॥ निःशेष गेलें रजतम ॥ गौळियां सुकाळ परम ॥ स्वानंदाचा जाहला ॥९१॥
गृहीं प्रकाशतां प्रभाकर ॥ मग कैंचा उरेल अंधकार ॥ गृहस्वामी येतांच तस्कर ॥ पळोनि जाती चहूंकडे ॥९२॥
कीं बोलतां ज्ञानवेदांत ॥ सकळ मतें होती कुंठित ॥ कीं सद्विवेक होतां प्राप्त ॥ संसारदुःख वितळे पैं ॥९३॥
कीं प्रवेशतां वैराग्य शांती ॥ दुष्ट कामक्रोध पळती ॥ तैसा अवतरतां कमलापती ॥ दोषदुष्काळ पळाले ॥९४॥
असो इकडे मथुरेप्रती ॥ दुश्चिन्हें कंसास जाणवती ॥ राजद्वारीं शुनी रडती ॥ विजा पडती सभेवरी ॥९५॥
महास्फोट होऊनि धरा ॥ क्षणक्षणां कांपे थरथरां ॥ मेघ पडला नसतां धारा ॥ शोणिताच्या वर्षताती ॥९६॥
कंस सभेसी चालिला ॥ उगाच मुकुट खालीं पडिला ॥ गेली सभेची सर्व कळा ॥ प्रेतवत वीर दिसती ॥९७॥
आपुलें शिरीं तेल शेंदूर ॥ स्वप्नीं देखे कंसासुर ॥ दिवाभीतांचे घुंघाट स्वर ॥ दिवसाच कंस आयके ॥९८॥
उगेंच छत्र मोडून पडलें ॥ कंसा वाटे मरण आलें ॥ कंसास्त्रियांनीं स्वप्नीं देखिलें ॥ महादुश्चिन्ह दारुण ॥९९॥
विधवा स्त्रिया स्वप्नकाळीं ॥ ओंटी भरिती घेऊनि धुळी ॥ मंगळसूत्र गळसरी तोडिली ॥ काळपुरुषें अकस्मात ॥१००॥
नाना विघ्नें देखोनी ॥ कंस भयभीत मनीं ॥ सदा जाळी चिंताग्नी ॥ कदा शयनीं नीज न ये ॥१॥
प्रधानाशीं कंस विचार करी ॥ आमुचा वैरी उर्वीवरी ॥ अवतरला परी निर्धारीं ॥ ठायीं न पडे शोधितां ॥२॥
कोणे ग्रामीं कोणे घरीं ॥ वाढतो न कळे माझा वैरी ॥ जो ठायीं पाडील निर्धारीं ॥ त्यासी इच्छिलें देईन मी ॥३॥
शत्रू जों लहान आहे ॥ तों वेगें करावा क्षय ॥ दंदशूक लघु म्हणों नये ॥ देखतांचि वधावा ॥४॥
तृणामाजी किंचित् अग्न ॥ तो जाळील नलगतां क्षण ॥ घर जों न पडे मोडून ॥ तों बाहेर आधीं व्हावें ॥५॥
शस्त्राचा धाय जों न पडे ॥ तों आधींच वोढण करावें पुढें ॥ तैसा शत्रु जो न वाढे ॥ तों आधींच घात योजावा ॥६॥
प्रधान म्हणे ते वेळीं ॥ जनवदंता ऐसी ऐकिली ॥ वैरी वाढतो गोकुळीं ॥ गौळियाघरीं म्हणोनियां ॥७॥
लक्षानुलक्ष गौळिणी ॥ गोकुळीं असती बाळंतिणी ॥ परी वैरी असे कोण्या सदनीं ॥ तोचि ठायीं पाडिजे ॥८॥
कापटयवेषें दैत्य बरवा ॥ धूर्त तार्किकी पाठवावा ॥ अरि ठायीं पाडोन वधावा ॥ नाना उपायेंकरोनी ॥९॥
तों महाबळ नामें दैत्य ॥ कंसासी पैज बोलत ॥ मी विप्र होऊनि त्वरित ॥ पाळती घेतों गोकुळीं ॥११०॥
कंस बहुत संतोषला ॥ महाबळ दैत्य गौरविला ॥ तो तत्काळ धरियेला ॥ विप्रवेष कापट्यें ॥११॥
धोत्रें कळोत्रें नेसला ॥ यज्ञोपवीत रुळे गळां ॥ कापट्यवेष अवलंबिला ॥ हातीं पंचांग घेतलें ॥१२॥
धोत्रें वोळी सरसावी ॥ टिळे वाटे लोकांस दावी ॥ मी ब्राह्मणच हें लटिकेंचि मिरवी ॥ परी अंतरीं कापट्य ॥१३॥
लटिका दाखवी आचार ॥ परी अंतरीं दुराचार ॥ वृंदावनफळ वरीच सुंदर ॥ अंतरीं काळकूट भरियेलें ॥१४॥
कीं बक पक्षियाचें शुष्क ध्यान ॥ कीं धनलुब्धकाचें तत्त्वज्ञान ॥ कीं दंभिकाचें भजन ॥ वरी वरी दावी असत्य ॥१५॥
स्त्रीलंपटाचें विरक्तपण ॥ कीं वेश्येचें मुखमंडण ॥ कीं कोल्हाटियाचें शूरत्व पूर्ण ॥ वरी वरी व्यर्थ पैं ॥१६॥
विश्वासघातक्याचे बोल ॥ वरी वरी दिसती रसाळ ॥ कीं मैंदाची शांति निर्मळ ॥ वरी धरीच व्यर्थ पैं ॥१७॥
तैसा तो दैत्य महाबळ ॥ वरी वरी जाहला सुशीळ ॥ प्रवेशता जाहला गोकुळ ॥ धूर्त कुटिल दुरात्मा ॥१८॥
पुसताहे लोकां सकळां ॥ कोणाचे घरीं होतो पुत्रसोहळा ॥ तों ते सांगती कृष्ण अवतरला ॥ नंदाचिये मंदिरीं ॥१९॥
हरिवंशभागवतीं पाहीं ॥ महाबळ विप्राची कथा नाहीं ॥ शोध करितां सर्वांठायीं ॥ नारदपुराणीं देखिली ॥१२०॥
तेथें ही कथा लिहिली जाण ॥ श्रोतीं न धरावा अनमान ॥ मुळावेगळी कथा पूर्ण ॥ सहसाही वाढेना ॥२१॥
नाना पुराणींचे इतिहास ॥ बोलिला स्वामी वेदव्यास ॥ यालागीं कदापि दोष ॥ न ठेवावा ग्रंथातें ॥२२॥
असो तो धूर्त महाबळ विप्र ॥ प्रवेशला नंदाचें मंदिर ॥ गौळी करिती नमस्कार ॥ भावें करोनि विप्रातें ॥२३॥
बैसावया दिधलें आसन ॥ केलें ब्राह्मणाचें पूजन ॥ यशोदा कृष्णासी घेऊन ॥ स्तनपान करवीत ॥२४॥
यशोदा म्हणे ब्राह्मणासी ॥ शुभग्रह पहा कृष्णासी ॥ जन्मकाळची दशा कैसी ॥ तें आम्हांसी सांगिजे ॥२५॥
पूर्वीं गर्गें केलें जातक ॥ परमकल्यान शुभसूचक ॥ तुम्हीं सांगावें सम्यक ॥ दशा पाहोन कृष्णाची ॥२६॥
तंव तो कापट्येंकरुन ॥ पंचांग पाहे उकलोन ॥ क्षणएक ग्रीवा तुकावून ॥ सांगता जाहला तेधवां ॥२७॥
म्हणे गर्गादि ऋषीश्वर ॥ सकळ चुकले गुणाकार ॥ सर्वांचे मुळीं साचार ॥ कृष्ण उपजला जाण पां ॥२८॥
यास उपजतां लागलें मूळ ॥ हा करील सर्वांचें निर्मूळ ॥ याच्या पायीं गोकुळ ॥ निर्दाळेल सर्वही ॥२९॥
हा उपजला हो मूळीं ॥ करील स्वगोत्राची होळी ॥ तरी तुम्ही सकळ मिळोनि गौळी ॥ लेंकरुं बाहेर टाका हें ॥१३०॥
गर्तेमाजी नेऊनी ॥ जितचि पुरावें ये क्षणीं ॥ तरीच कल्याण तुम्हांलागुनी ॥ निश्चयेंसीं जाणिजे ॥३१॥
बाळ नव्हें हा काळ ॥ गिळील तुमचें कुळ सकळ ॥ ऐसें ऐकतांच वैकुंठपाळ ॥ काय चरित्र मांडिलें ॥३२॥
जो सकळचराचरव्यापक ॥ जो मायाचक्रचाळक ॥ जग हाचि पट सुरेख ॥ परी तंतु देख श्रीकृष्ण ॥३३॥
नाना परीचे विचित्र मणी ॥ परी ओंविले एकच गुणीं ॥ कीं अनेक तरंग सिंधुजीवनी ॥ परी उदक एकचि निर्धारें ॥३४॥
कीं नाना घटीं एक दिनकर ॥ कीं बहु मंदिरें एक अंबर ॥ कीं एक सुवर्ण नाना अलंकार ॥ तैसा व्यापक श्रीहरी ॥३५॥
कीं नाना मातृकांचा उच्चार ॥ परी त्यांत एकचि ॐकार ॥ नाना घटांचे आकार ॥ परी मृत्तिका एकचि ॥३६॥
तैसा श्रीकृष्ण सर्वचित्तचाळक ॥ जो मनोबुद्धींचा प्रवर्तक ॥ तेणें मांडिलें हो कौतुक ॥ परम नाटकी श्रीहरी ॥३७॥
बाहेर टाकावा बाळ ॥ ऐसें बोलतां महाबळ ॥ तों दह्यांचें मडकें सबळ ॥ कपाळावरी आदळलें ॥३८॥
बोलतो उत्तरें अमंगळें ॥ म्हणोनि लाटणें आवेशलें ॥ मुखामाजी उभेंचि शिरलें ॥ कपटियाच्या तेधवां ॥३९॥
ऐसें कौतुक गौळी पाहती ॥ तंव घरांतून देव्हारे पाट धांवती ॥ उरावरी धडधडां आदळती ॥ नाहीं शक्ति पळावया ॥१४०॥
पाटे वरवंटे मोडिती पाय ॥ कपटिया तेथूनि पळों पाहे ॥ बाजही आडवी उभी राहे ॥ वाट नेदी दुर्जना ॥४१॥
पाट चौक्या पाहारा अर्गळा ॥ घण कुदळी कुर्हाडी सबळा ॥ गोंवर्यांसी जीव आला ॥ पक्ष्यांसारिख्या धांवती ॥४२॥
होती मुसळांचे मार ॥ धोत्र फिटोनि गेलें समग्र ॥ पंचांग फाटोनि जाहलें चूर ॥ जानवें गेलें तुटोनि ॥४३॥
ढुंगणाचें धोत्र गळालें ॥ नागवाचि कपटी पळे ॥ पदार्थ तितुके धांवती बळें ॥ मार देती दारुण ॥४४॥
गौळी हांसती सकळ ॥ आमच्या कृष्णासी ठेविला बोल ॥ परी त्याचें फळ तात्काळ ॥ प्राप्त जाहलें तयासी ॥४५॥
गदगदां हांसती गौळिणी ॥ अपवित्र बोलिला पापखाणी ॥ जळो जळो त्याची वाणी ॥ बरा झोडिला भगवंतें ॥४६॥
इकडे कपटी नागवाचि पळत ॥ पावला त्वरे मथुरेआंत ॥ चळचळाम कांपत रडत ॥ कंसाजवळी पातला ॥४७॥
कंसासी म्हणे तुझा अरी ॥ वाढतो गोकुळाभीतरी ॥ तो अनिवार सकळ धरित्री ॥ निर्वैर करील वाटतें ॥४८॥
थोर मार जो मज बैसला ॥ पदार्थमात्रासी जीव आला ॥ हे नव्हे मानवी कळा ॥ तो अवतरला श्रीविष्णु ॥४९॥
कंसासी म्हणे महाबळ ॥ गोकुळीं वाढतो तुझा काळ ॥ तो दिसतो जरी बाळ ॥ परी नाकळे कृतांता ॥१५०॥
कंसा मज वाटते पूर्ण ॥ कीं जवळी आलें तुझें मरण ॥ ऐकतां दचकलें मन ॥ कंसरायाचें तेधवां ॥५१॥
केसरीचा प्रताप ऐकोन ॥ थरथरां कांपे वारण ॥ कीं गरुडाचें ऐकोन स्तवन ॥ उरग चित्तीं दचकती ॥५२॥
ऐकोन सभाग्याची स्तुती ॥ दुर्जन दचके परम चित्तीं ॥ कीं वेदांतींच्या ऐकोन श्रुती ॥ मतवादी भयभीत ॥५३॥
तैसाच कंस दचकोन ॥ म्हणे दिसतें वर्तमान कठीण ॥ आतां वैरियासी शोधून ॥ कोण मारील सत्वर ॥५४॥
कीं व्याधि जों उद्भव न धरी ॥ तों निर्मूळ करावा लौकरी ॥ अग्नि आणि वैरी ॥ धाकुटा म्हणों नये कीं ॥५५॥
लघु म्हणूं नये दंदशूक ॥ पुढें दुष्ट विघ्नकारक ॥ तों पूतना येऊनि संमुख ॥ पैज बोले कंसासी ॥५६॥
क्षणामाजी तुझा वैरी ॥ शोधूनि मारीन निर्धारीं ॥ मी जाणें कपटकळाकुसरी ॥ आज्ञा देईं मज आतां ॥५७॥
कंस परम संतोषला ॥ गौरवोनि निरोप दिधला ॥ कपटस्वरुप ते वेळां ॥ नटली रंभेसारखी ॥५८॥
पायीं रुणझुणती पैंजण ॥ नेत्रीं सोगयाचें अंजन ॥ सर्व अळंकारीं नटली पूर्ण ॥ परम पापीण पूतना ॥५९॥
कंस म्हणे पूतने अवधारीं ॥ गांवोगांवींचीं बाळकें मारीं ॥ त्यांत सांपडेल माझा वैरी ॥ तो तूं झडकरी वधीं कां ॥१६०॥
आधीं पूतना परम चांडाळी ॥ त्यावरी कंसाची आज्ञा झाली ॥ येरीनें तेचि हृदयीं धरिली ॥ अतिप्रीतीनें तेधवां ॥६१॥
आधींच शंख करावयाची हौस॥ त्यावरी पातला फाल्गुनमास ॥ कीं राजाज्ञा झाली तस्करास ॥ यथासुखें हिंडावया ॥६२॥
आधींच जार दुराचारी ॥ तो स्त्रीराज्यांत कारभारी ॥ आधींच पैशुन्यदुष्ट अघोरी ॥ त्यावरी नृपति पाठिराखा ॥६३॥
कीं मदिरा पाजिली मर्कटाला ॥ त्यांत भूतसंचारहीं जाहला ॥ त्यामाजी वृश्चिकें दंश केला ॥ तैसें जाहलें पूतनेसी ॥६४॥
की मद्यपियानें देखिलें शिंदीवन ॥ कीं वमन देखोनि धांवे श्वान ॥ कीं काग क्षत देखोन ॥ अतिसाक्षेपें उकरी पैं ॥६५॥
तैसी राक्षसी ते अवसरीं ॥ गांवोगांवीचीं बाळकें मारी ॥ प्रवेशताम लोकमंदिरीं ॥ न वारिती कोणीच ॥६६॥
तीस देखोन म्हणती ॥ लक्ष्मीच आली की गृहाप्रति ॥ बाळें मारी गुप्तगती ॥ तें कोणास कळेना ॥६७॥
ऐसी ते बाळकांची महामारी ॥ प्रवेशली गोकुळामाझारी ॥ स्तन मुखीं लावितांच झडकरि ॥ बाळें प्राण टाकिती ॥६८॥
महाविषें भरोनि स्तन ॥ प्रवेशली यशोदेचें सदन ॥ यशोदा म्हणे बाळकृष्ण ॥ पहावया आली गोपी हे ॥६९॥
पाळण्याजवळी आली पूतना ॥ दृष्टीं अवलोकी राजीवनयना ॥ ते बाळलीला देखोन मना ॥ परम सुख वाटतें ॥१७०॥
नीलवर्ण केश कुरळ ॥ आकर्न नेत्र विशाळ भाळ ॥ दिव्य पिंपळपान सुढाळ ॥ झगझगीत सतेज ॥७१॥
कर्णीं कुंडलें तळपती ॥ लघुदंत चौकीचे झळकती ॥ सुहास्यवदन श्रीपती ॥ कंठीं शोभती वाघनखें ॥७२॥
पदक एकावळी मुक्ताहार ॥ तेणें शोभला बाल दिगंबर ॥ वांकी बिंदली परिकर ॥ तडित्प्राय झळकती ॥७३॥
चिमणीं बोटें चिमणे हात ॥ चिमण्या मुद्रिका लखलखित ॥ चिमणीच कटी मेखळा झळकत ॥ क्षुद्रघंटा किणकिणती ॥७४॥
पायीं पैंजण वाळे वाजती ॥ चरणांगुष्ठ धरिला हातीं ॥ वदनीं घालून रमापती ॥ चोखी प्रीतीकरुनिया ॥७५॥
तो वैकुंठपती वरिष्ठ ॥ कां मुखीं घातला चरणांगुष्ठ ॥ तरी चरणीं गोडी आहे उत्कृष्ट ॥ ऐसें भक्त बोलती ॥७६॥
जे ते भक्त चरणीं रंगती ॥ गोड म्हणोनि वाखाणिती ॥ ते गोडी पहावया श्रीपती ॥ जपत होता बहुत दिवस ॥७७॥
तें गोकुळीं फावलें स्पष्ट ॥ म्हणवोनि चोखी चरणांगुष्ठ ॥ कीं स्वचरणींचा महिमा वरिष्ठ ॥ आबाळ लोक नेणती ॥७८॥
जैसें पितयानें अमृतफळ आणिलें ॥ ते बाळकाहातीं दिधलें ॥ परी त्याची गोडी त्यासी न कळे ॥ वदनीं न घाली सर्वथा ॥७९॥
तेंच फळ पिता चोखितां ॥ बाळ झोंबोनि लागे हाता ॥ तैसा हा जगत्पितयाचा पिता ॥ गोडी आधीं सेवीत ॥१८०॥
गोडीनें चरण चोखी श्रीपती ॥ यालागीं भक्तांच्या मिठ्या पडती ॥ असो पालखाजवळी निश्चितीं ॥ पूतना ते उभी असे ॥८१॥
पूतना उचली वनमाळी ॥ स्तन घातला मुखकमळीं ॥ परम आवडीनें ते वेळीं ॥ स्तनपान करीतसे ॥८२॥
हातीं धरोनियां स्तन ॥ मुखीं घाली जगज्जीवन ॥ पूतनेच्या खांद्यावरी जाण ॥ एक हात ठेविला ॥८३॥
विष शोषिलें संपूर्ण ॥ दुग्धही गेलें सरोन ॥ सर्वांगीच्या शिरा ओढून ॥ तुंबडी एकचि लागली ॥८४॥
पूतनेसी नवल वाटले ॥ म्हणे विष शोषून बाळ वांचलें ॥ सर्वांग तिचें कांपों लागलें ॥ सोडी म्हणे श्रीकृष्णा ॥८५॥
गोपाळा गोविंदा श्रीपती ॥ सोडीं सोडीं कां मजप्रती ॥ मी परतोनि न यें मागुतीं ॥ या गोकुळामाजी ॥८६॥
सांवळे गोपाळे माझे आई ॥ सोडीं सोडीं कृष्णे कान्हाई ॥ म्हणोनि मुखाकडे ते समयीं ॥ पूतना विलोकी सद्गद ॥८७॥
सोडीं वेधका वनमाळी ॥ तुझी माता कैसी वांचली ॥ धन्य ती यशोदा वेल्हाळी ॥ स्तनपान करावी तूंतें ॥८८॥
माझा शोषिसी कां जीवप्राण ॥ सोडीं न यें मी आतां परतोन ॥ खालीं पडें मूर्च्छा येऊन ॥ तरी जगज्जीवन सोडीना ॥८९॥
सकळ गात्रें शोषिलीं ॥ पूतना अवलोकी वनमाळी ॥ तंव ते मूर्ति सांवळी ॥ हृदयावरी विराजे ॥१९०॥
अवलोकित कृष्णाचें वदन ॥ हृदयीं बिंबलें तेंच ध्यान ॥ मुखीं करी हरिस्मरण ॥ कृष्णा गोविंदा माधवा ॥९१॥
जय जय मुकुंदा मुरारी ॥ पुराणपुरुषा श्रीहरी ॥ माझा भवपाश निर्धारीं ॥ छेदीं आतां विश्वेशा ॥९२॥
जो सजलजलदवर्ण ॥ वदन उदार आकर्णनयन ॥ अवलोकितां सोडिला प्राण ॥ पूतनेनें तेधवां ॥९३॥
स्थूल लिंग कारण महाकारण ॥ हरीनें शोषिलें न लागतां क्षण ॥ दश इंद्रियें पंच प्राण ॥ शोषी अंतःकरणचतुष्टयासी ॥९४॥
अवस्था भोग भोगून स्थानें ॥ संपूर्ण शोषिलीं जगज्जीवनें ॥ पूतनेचें भाग्य वानावें कवणें ॥ केली धन्य भगवंते ॥९५॥
महाभयानक विक्राळ वदन ॥ दंत दाढा भ्यासुर पूर्ण ॥ जिव्हा लांब सिंदूरवर्ण ॥ लळलळे मुखाबाहेरी ॥९७॥
भाळीं चर्चिला शेंदूर ॥ बाबरझोटी भयंकर ॥ कीं हे ताटिकाचा निर्धार ॥ कृष्णावतारीं जन्मली हो ॥९८॥
नरशिरांच्या रुळती माळा ॥ यशोदेनें देखिली ते वेळां ॥ हांक फोडोनि बोलावी सकळां ॥ धांवा धांवा म्हणतसे ॥९९॥
गौळी पातले समस्त ॥ थरथरां यशोदा कांपत ॥ महाभयानक प्रेत ॥ राक्षसीचें पसरलें ॥२००॥
गौळी पाहती सकळ ॥ तों तिच्या वक्षःस्थळीं घननीळ ॥ सच्चिदानंदघन निर्मळ ॥ स्तन मुखीं धरिलासे ॥१॥
गौळियानें कृष्ण उचलिला ॥ यशोदेपाशीं दिधला ॥ अश्रू वाहती मातेच्या डोळां ॥ हृदयीं धरोनि स्फुंदत ॥२॥
मोठा चुकला गे अनर्थ ॥ कैंची राक्षसी आली घरांत ॥ मागुती कृष्णवदन पाहात ॥ अश्रू पडती हरीवरी ॥३॥
भ्याला असेल गे श्रीपती ॥ म्हणोनि आपुले पायींची माती ॥ कृष्णाचे ललाटीं लाविती ॥ नवलभक्ति तयांची ॥४॥
एक करिती निंबलोण ॥ एकीं कृष्णाचें पाहोनि वदन ॥ म्हणति जाऊं ओंवाळून ॥ तुजवरोन डोळसा ॥५॥
भालदोरी करुनि गोरटी ॥ घालिती हरीच्या निजकंठीं ॥ दृढ बांधिती रिठे गांठीं ॥ होईल दृष्टि म्हणवोनि ॥६॥
श्रीकृष्णकथा प्रयाग थोर ॥ भावमाघमासी सुंदर ॥ येथें माघस्नान भक्तनर ॥ त्रिकाळ करिती अनुतापें ॥७॥
की हा हरिविजयग्रंथराशी ॥ हे आनंदवन वाराणसी ॥ येथें जे होती क्षेत्रवासी ॥ ते कृष्णासी परम प्रिय ॥८॥
जो भीमातीरविहार ॥ श्रीब्रह्मानंद जगदुध्दार ॥ जो श्रीधरवरद उदार ॥ त्याचें चरित्र परिसा आतां ॥९॥
इति श्रीहरिविजयग्रंथ ॥ संमत हरिवंश भागवत ॥ चतुर श्रोते परिसोत ॥ चतुर्थाध्याय गोड हा ॥२१०॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
No comments:
Post a Comment