मध्यंतरी एक छान लेख वाचनात आला। लोकप्रभेच्या सोजन्याने तो इथे सदर करीत आहे।
बाजीराव परदेशात जन्मले असते तर..
मकरंद दीक्षित ‘श्रीमंत बाजीराव पेशवे पहिले’ हा संदर्भ आला की बहुतेकांना फक्त मस्तानी आठवते. तीन-साडेतीनशे वर्षांपूर्वीच्या काळातला अजिंक्य, युद्धनीतीनिपुण, राजनैतिक कौशल्यात सरस, आजही ज्याच्या डावपेचांचा जागतिक पातळीवर अभ्यास केला जातो, असा योद्धा म्हणजे बाजीराव पेशवे.. त्यांचा गौरवशाली इतिहास आपल्या पाठय़पुस्तकात केवळ दीड पानात संपतो. त्यांची रावेरखेडची समाधी आजही दुर्लक्षितच आहे.. १८ ऑगस्टच्या बाजीराव पेशव्यांच्या जयंतीनिमित्त- |
काही
निवडक इतिहासप्रेमी सोडले तर १८ ऑगस्ट २०१२ रोजी श्रीमंत बाजीराव
पेशव्यांची ३१२ वी जयंती आहे हे इतरांच्या स्मरणात देखील नसेल. १८ ऑगस्ट
१७०० ते २८ एप्रिल १७४० या अवघ्या ४० वर्षांच्या आयुष्यात या पेशव्याने
दैदिप्यमान आणि गौरवशाली इतिहास घडवला. हा इतिहास आपण दुर्लक्षित केला नाही
तर चिरंतन टिकणारा आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या कारकीर्दीत पेशवेपदाला विशेष महत्व प्राप्त झाले. पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांनी शाहू महाराजांचे राज्य स्थिरस्थावर करण्यात मोठे योगदान दिले. याच कारणामुळे आणि भट घराण्याच्या छत्रपतीवरील निष्ठेविषयी पूर्ण खात्री असल्यामुळे प्रतिनिधी, सुमंत इ .दरबारातील मुत्सद्यांचा विरोध डावलून छत्रपती शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथांच्या मृत्युनंतर अवघ्या १९-२० वर्षांच्या बाजीरावांस पेशवे पदाची वस्त्रे दिली (इ.स. १७२०) . बाजीरावांनी हा विश्वास सार्थ ठरवून सह्यद्रीच्या चिंचोळ्या पट्टयात असलेल्या स्वराज्याचा विस्तार नर्मदा,चंबळ आणि यमुनेच्या पलीकडे करून सोडला. बाजीराव पेशव्यांनी मुघल, निजाम, सिद्दी यांचा पराभव करून स्वराज्य निष्कंटक तर केलेच शिवाय ते अधिक बलशाली केले . बाळाजी विश्वनाथ हे सेनापती धनाजी जाधवांच्या पदरी कारभारी होते. साहजिकच बाजीरावांचे लष्करी शिक्षण धनाजी जाधवांसारख्या कसलेल्या सेनापतीकडे झाले . बाळाजी विश्वनाथ स्वराज्याच्या सनदा आणण्यासाठी दिल्लीस गेले असता बाजीराव त्यांच्या समवेत होते तेव्हा दिल्लीच्या राजकारणाची ओळख बाजीरावांना तेथेच झाली. धनाजी जाधवांचे युद्ध कौशल्य, लष्करी गुण आणि बाळाजी विश्वनाथांचे मुत्सद्दीपण, प्रशासकीय कौशल्य यांचा सुरेख मिलाफ बाजीरावांच्या व्यक्तिमत्वात झालेला आढळतो. बाळाजी विश्वानाथांबरोबरच्या दिल्लीतील वास्तव्यात मुघल साम्राज्य कमकुवत झालेले असल्याचे बाजीरावांच्या लक्षात आलेले होते आणि एक जबर धक्का दिल्यास ते कोलमडून पडेल आणि त्याची जागा केवळ मराठे घेऊ शकतात असा दृढ विश्वास बाजीरावांमध्ये होता. बाजीरावांच्या पेशवेपदाच्या काळातील सर्व लष्करी आणि राजनतिक घडामोडींचे ते एक सूत्र होते . २० वर्षांच्या कारकीर्दीत ४७ च्या वर जास्त लढाया बाजीरावांनी निर्णायक पणे लढल्या आणि जिंकल्या . माळवा - १७२३, धार - १७२४, पालखेड - १७२८, बुंदेलखंड - १७३०, दिल्ली - १७३७, भोपाळ इ. १७३८ या त्यातील काही प्रमुख लढाया. या सर्व लढायांनी महाराष्ट्राच्या आणि भारताच्या राजकारणावर दुरगामी परिणाम घडवले. पालखेडची लढाई प्रसिद्ध असून ज्या पद्धतीने बाजीरावांनी बुऱ्हानपुरापासून गुजरातेपर्यंत निजामाला गुंगारा दिला आणि सरते शेवटी पालखेड या गावी निजामाच्या सन्याची रसद तोडून त्यास मुंगी शेवगावचा तह करण्यास भाग पडले तो एक युद्धनीतीशास्त्राचा अत्युच्च नमुना म्हणून गणला जातो. दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील ब्रिटनचा सरसेनापती फिल्ड मार्शल मोंटगोमेरीने देखील या लढाईचे वर्णन strategic masterpiece असे केलेले आहे. अमेरिकेच्या युद्ध शास्त्राच्या अभ्यासक्रमात पालखेडच्या लढाईचा अभ्यास केला जातो. बाजीरावांनी आपल्या संपूर्ण कारकीर्दीत सामरिकशास्त्राच्या योजनाबध्द नियोजन, जलद हालचाल आणि विस्मय या सूत्रांचा वापर करून शत्रूला पूर्णपणे निष्प्रभ केलेले आढळते. बहुतेक सर्व लढायात बाजीरावांचे सन्य आणि शत्रुसन्य यांचे गुणोत्तर व्यस्त प्रमाणात असून देखील (म्हणजे शत्रू सन्य संख्येने जास्त असून देखील) बाजीरावांनी विजय मिळवलेला आढळतो. बाजीरावांच्या युद्धकौशल्यापुढे त्यांचे इतर बरेच गुण झाकले जातात. मुघलांनी आपले साम्राज्य टिकवले ते राजपुतांच्या मत्रीवर! बाजीरावांनी हे ओळखून मुघल साम्राज्य खिळखिळे करण्याच्या दृष्टीने राजपुतांशी मत्री करण्याचे धोरण आखले आणि ते बहुतांशी यशस्वी झाले यावरून बाजीरावांच्या राजानैतिक कौशल्याचे दर्शन घडते. शिंदे, होळकर, विंचुरकर, रेठरेकर, पवार इ. इतिहासात नावारुपास आलेल्या सरदारांना अचूक हेरण्याची जातीभेदापार जाणारी गुणग्राहकता बाजीरावांपाशी होती. आपला धनी उपाशी राहू नये म्हणून सरणावर भाकरी भाजणाऱ्या गोविंदपंत खेर (बुंदेले) यांची समयसूचकता ओळखून त्यांना बुंदेलखंडात मामलतदार नेमण्याची वृत्ती बाजीरावांपाशी होती.
निजामाच्या बेगमांनी उधळलेले मोती
त्या बेगामांकडे न बघता स्वीकारणाऱ्या बाजीरावांमध्ये उमद्या आणि सज्जन
माणसाचे दर्शन घडते. बाजीरावांनी आपल्या आयुष्यात कर्मकांड, प्रथा यांना
वाजवीपेक्षा जास्त महत्व दिले नाही.
निजामाच्या बेगमांनी उधळलेले मोती त्या बेगामांकडे न
बघता स्वीकारणाऱ्या बाजीरावातील उमद्या आणि सज्जन माणसाचे दर्शन घडते.
बाजीरावांनी आपल्या आयुष्यात कर्मकांड, प्रथा यांना वाजवीपेक्षा जास्त
महत्व दिले नाही. बाजीरावांसारखे पुरोगामी व्यक्तिमत्व इतिहासात शोधून
सापडणार नाही. पुण्यातील सनातन्यांचा मस्तानीला विरोध नव्हता तर तो
बाजीरावांच्या मस्तानीला ‘पत्नीचा’ दर्जा देण्याला होता. बाजीरावांनी तो
विरोध सहन केला पण मस्तानीला ‘रक्षेचा’ दर्जा दिला नाही यावरून
बाजीरावाच्या निस्सीम प्रेमाचे दर्शन घडते. बाजीरावांना धर्मबहिष्कृत
करण्यासाठी पुण्यात सभा भरली तेव्हा काशीच्या संन्यास्यांनी खडसावून
विचारले ‘‘आपल्या तलवारीच्या जोरावर हिदुंची तीर्थक्षेत्रे यवन मुक्त
करणारा बाजीराव धर्म बहिष्कृत कसा होऊ शकतो?’’ शेवटी आपल्या कुटुंबीयांचा देखील आपल्याला विरोध आहे हे पाहून संघर्ष टाळण्यासाठी अवघ्या िहदुस्थानभर नाचवलेली तलवार त्यांनी म्यान केली आणि आपल्या प्रेमाची आहुती दिली यावरून या कणखर योद्ध्याच्या भावूक अंत:करणाचे दर्शन घडते. बाजीरावांच्या ४० वर्षांच्या आयुष्यातील केवळ शेवटचा १० (१७३१-१७४०) वर्षांचा काळ मस्तानीने व्यापलेला आहे आणि त्यामुळे बाजीरावांच्या लष्करी, राजनतिक कारकिर्दीवर कोणताही अनिष्ट परिणाम घडून आलेला दिसत नाही. बाजीरावांची दिल्लीची इतिहास प्रसिद्ध धडक आणि निजामाचा भोपाळच्या लढाईत केलेला पराभव (१७३८) याची साक्ष आहे. बाजीरावांच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र याचा अनिष्ट परिणाम झाला आणि त्याची परिणती बाजीरावांच्या अकाली मृत्यूत झाली. बाजीरावांचे आयुष्य जसे होते तसाच त्यांचा मृत्यूही होता. बाजीरावांना मृत्यू आला तो योद्ध्याला साजेल असा. उघडय़ा रणात, तंबूच्या कनातीत आणि त्यांच्या अजिंक्य सन्याच्या सान्निध्यात! ‘‘मुळावर घाव घाला म्हणजे पाने आपोआप गळून पडतील’’ ‘‘रात्र ही झोपण्यासाठी आहे असे जे समजतात ते मूर्ख आहेत, रात्र ही शत्रूवर हल्ला करून त्याचा पराभव करण्यासाठी असते’’ असे सांगणारा हा जगातील एकमेव अपराजित योद्धा आज मात्र दुर्लक्षित, उपेक्षित अवस्थेत आहे, याला मराठी माणसाचे औदासीन्य कारणीभूत आहे असे खेदाने म्हणावे लागेल. आपला अभिमान आपण पायदळी तुडवतो आहोत. बाजीराव म्हटलं की ‘‘तो ‘मस्तानी’वाला ना?’’ असे म्हणत इतिहासाचा घोर अपमान करणारे महाभाग आहेत. आज देखील काल्पी, झाशी, सागर, रावेरखेडी येथे फिरताना तेथील रहिवासी बाजीरावांचा उल्लेख ‘बाजीराव साहेब’ ‘पेशवा (पेसुआ) सरकार’ असा करतात. बाजीरावांचा जन्म दक्षिण भारतात किंवा युरोप, अमेरिकेत झाला असता तर त्यांच्यावर भव्य साहित्य, चित्रपट, मालिका निर्माण झाल्या असत्या आणि त्यात बाजीरावांच्या समग्र व्यक्तिमत्वाचा उचित परामर्श घेतला गेला असता आणि ‘बाजीराव’ हे नाव जागतिक पातळीवर विराजमान झाले असते. आपल्या बहुतांश साहित्यिकांनी आणि दृक-श्राव्य माध्यमातील लोकांनी बाजीरावांच्या दैदीप्यमान कारकीर्दीचा ओझरता उल्लेख करून केवळ मस्तानी प्रकरणावर भर देण्यात धन्यता मानलेली आहे. तो एकप्रकारे बाजीरावांवर झालेला अन्याय आहे. इतिहासाच्या क्रमिक पुस्तकातील बाजीरावांवरचा धडा दीड पानात संपतो. स्पर्धा परीक्षांमध्ये देखील शिवाजी महाराज, मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध आणि पेशवाई वर क्वचित प्रश्न विचारले जातात. आज शनिवार वाड्याचे भग्न अवशेष उरले आहेत. बाजीरावांची रावेरखेडीची समाधी एकाकी आणि दुर्लक्षित अवस्थेत आहे. कोणताही राजकीय नेता तेथे गेलेला ऐकीवात नाही. नर्मदेवरील धरणाची उंची वाढवल्यास ही समाधी पाण्याखाली जाण्याची भीती आहे. जुल महिन्यात बाजीरावांच्या मस्तानीपासूनचे आठवे वंशज उमर अली बहादूर आणि विनायकराव पेशवे यांची पुण्यात प्रभात रोड येथे ऐतिहासिक भेट झाली याची बातमी फक्त इंग्रजी दैनिकाने दिली ही तमाम मराठी माणसांनी, माध्यमांनी विचार करण्याची गोष्ट आहे. बाजीराव पेशव्यांनी तत्कालीन परिस्थितीचा विस्तृत आढावा घेऊन, सामरिक कौशल्य पणाला लावून मराठी माणसाला संपूर्ण हिंदुस्थानभर विशाल कार्यक्षेत्र निर्माण करून दिले आणि त्याला एक आत्मविश्वास, विजिगिषु वृत्ती दिली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे रुपांतर प्रबळ मराठी साम्राज्यात केले हे त्यांचे कार्य ऐतिहासिक महत्वाचे आहे. कर्तुत्वाच्या संदर्भात बाजीरावांचे नाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या खालोखाल घ्यावे लागेल. आज संपूर्ण िहदुस्तानात केवळ मराठी माणूसच असे म्हणू शकतो की आम्हाला गौरवशाली इतिहास आहे. आमच्या इतिहास पुरुषांनी जे पराक्रम, कर्तुत्व गाजवले त्यावरच या राष्ट्राची उभारणी झाली आहे. याच कारणास्तव आणि ‘इतिहास विसरला की भूगोल बदलतो ‘ हे सत्य ध्यानात ठेवून, आपल्या इतिहासाचे संवर्धन करण्याची काळाने सोपवलेली जबाबदारी आपल्याला पार पाडावीच लागेल. हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. या कर्तव्यात कसूर झाल्यास आपल्या युगपुरूषांचा आपल्याच हातून पराभव होईल आणि त्यासाठी इतिहास आपल्याला कधीही क्षमा करणार नाही! |
No comments:
Post a Comment