Wednesday, October 15, 2014

'माझे विद्यापीठ' विषयी...

पद्मश्री कवी श्री. नारायण सुर्वे यांची आज जयंती. १५ ऑक्टोबर १९२६ हा त्यांचा जन्मदिवस. सुर्वे देवाधीन झाले तेव्हा महाराष्ट्र टाईम्स मध्ये छापून आलेला हा लेख.

'ना घर होते, ना गणगोत, चालेन तेवढी पायाखालची जमीन होती...' अशा ओळींनी प्रारंभ होणारी नारायण सुर्वे यांची 'माझे विद्यापीठ' ही कविता म्हणजे जणू कवीचे आत्मचरित्रच. विलक्षण गाजलेली ही कविता कशी रचली गेली... तिला कशी प्रसिद्धी मिळाली, हे खुद्द सुर्वे यांच्याच शब्दांत...….
---- ---- // o // ---- ----


काही काही कविता विलक्षण रसायन जमून यावे, तशा चपखलपणे स्वत: व्यक्तित्त्व घेऊनच व्यक्त होतात. आशय शब्दांचे बोट धरून चालतो, की शब्दच आशयाला खांद्यावर उचलून मिरवत नेतात, हे कळेनासे होते. इतका एकवटलेपणा, एकजिनसी अनुभवांचा विलक्षण पट तयार होतो. मालिका तयार होते. अशा रचनेतील एकही शब्द इथे तिथे सरकला, किंवा जरा धक्का त्याला लागला की, सारेच कोलमडून पडले असे वाटत राहते. नवा विलक्षण पोत आपणासमोर रचनेच्या रूपात उभा राहतो. 'माझे विद्यापीठ' ही कविता म्हणजे ७२ ओळींची दीर्घ रचना आहे. एकूण चार बंधांत ती बांधली गेली आहे व अठरा ओळींचा एकेक बंध व त्यातील ताणेबाणे दुसऱ्या बंधाशी जोडीत ती निखळपणे विणत जाते. कवी जर स्वनिमिर्तीशी प्रामाणिक असेल व कवितेला कवितेच्या, म्हणजेच तिला तिचे स्वातंत्र्य देऊन निखळ रूपात बोलू देणार असेल, तर ती अधिक मोकळी होते, अधिक सच्ची होते. काळाच्याही पलिकडे पाहण्याची, उड्डाण करण्याची क्षमता तिच्यात येते, असा माझा अनुभव आहे. कविता लिहिणे ही एक जोखीमच आहे, असे मी मानतो. ती एक गंभीर गोष्ट आहे. नवसृजन आहे. तिच्यावर कसलेही सावट न येईल याची काळजी घ्यावी लागते. याचा अर्थ या सर्व प्रक्रियेपासून कवी अलिप्त राहू शकतो का? त्याचे उत्तर होय आणि नाही असेच द्यावे लागेल. कारण निमिर्तीत देखील रचनात्मक आंतरद्वंद्व असते. तो रचनात्मक संघर्षच असतो. सडेपणा आणि कलात्मकता याचे भान ठेवावेच लागते. दीर्घ रचनेत हा तोल सांभाळावाच लागतो. तसे पाहिले तर 'माझे विद्यापीठ' कवितेने मला फार दमवले आहे. उणेपुरे एक वर्ष मी ही कविता लिहित होतो. कुणाला हा मूर्खपणाही वाटेल. तो माझ्या निमिर्तीबाबत वारंवार घडतो खरा! परंतु मला त्यात समाधान वाटते. एखादी कविता उत्तमपणे माझ्याकडून लिहिली गेली, की त्या पलिकडे कोणताही सवोर्च्च आनंद मी मानत नाही.

'माझे विद्यापीठ' या कवितेचा शेवटचा अठरा ओळींचा बंध माझ्याकडून आधी रचला गेला. 'निळ्या छताखाली नांगरून ठेवल्या होत्या साहेबांच्या बोटी' या अठरा ओळींच्या शेवटच्या ओळीतले शब्द 'कधी दोन घेत, कधी दोन देत' होते. खरे तर ही कविता इथेच संपत होती. मग तिची सुरुवात कुठे? मी चक्रावून गेलो. वर्षभर या कवितेभोवती मी घुमत राहिलो. पुन्हा पुन्हा वरील ओळींचे अर्थ व संदर्भ शोधत मी एकदाचा 'ना घर होते, ना गणगोत' या पहिल्या कडव्यातील पहिल्या ओळीच्या रचनेने सावरलो आणि कविता मनासारखी पूर्ण करून मोकळा झालो. त्यानंतर सहा महिने मी एकही ओळ लिहिली नाही इतका कातावून गेलो. असो.

ही कविता एकदाची लिहून झाली खरी; परंतु ती प्रकाशित कोण करणार, हा प्रश्न माझ्यासमोर होताच. आधीच काव्याविषयी उदासीनता. त्यात मी पडलो नवखा कवी व कोणत्याही मासिकाची ओळखपाळख नसलेला. बहुतेक नियतकालिके जाहिराती आधी छापतील व कविता नंतर. विचार केला तर त्यांचेही असे करणे चूक नाही व कविता प्रकाशित करणे आवश्यक आहे का, हा आग्रहही चूक नाही. कविता काही उत्पादक गोष्ट नाही आणि जाहिरातीवर तर नियतकालिके उभी राहतात, चालतात, हा अनुभव सार्वत्रिकच आहे. शिवाय ही कविता नीट प्रकाशित करायची म्हटले, तर मासिकाची दोन पाने तरी लागणारच. मोठा पेच होता.

दुसऱ्याच दिवशी मी प्रा. केशव मेश्राम यांना भेटलो. मी जेव्हा जेरबाई वाडिया, परळ येथील बोगदा चाळीत राहात असे, खरे तर या चाळीला अंधार चाळ म्हणणेच योग्य होईल, प्रा. मेश्राम तेव्हा म्हात्रे पेन्सच्या शेजारील बैठ्या चाळीत राहत. पस्तिसेक वर्षांपूवीर्ची ही घटना आहे. सेनापती बापट मार्गावरील झोपडपट्ट्या, त्यालगतचे भलेमोठे गटार व वस्त्यांवरचे मिणमिणते दिवे. प्रा. मेश्रामांना 'माझे विद्यापीठ' ही कविता रात्री याच मार्गावरील एका पालिकेच्या दिव्याखाली बसवून ऐकवली होती. त्या सोबतच 'सत्य' नावाची माझी दुसरीही एक कविता मी ऐकवली होती. त्यांना दोन्ही कविता आवडल्या. म्हणाले, 'मला या दोन्ही कविता आत्ताच द्या. माझ्या कॉलेजमध्ये (एम. डी. कॉलेज, परळ) 'सत्यकथे'चे संपादक प्रा. राम पटवर्धन अर्धवेळ प्राध्यापक म्हणून शिकवायला येतात. त्यांना मीच स्वत: त्या वाचून दाखवतो.'

'अहो, मेश्राम, मला 'सत्यकथे'त कोणीही ओळखत नाही.' मी म्हणालो.

'चालेल, तुमची ओळख मी करून देईन.' प्रा. मेश्राम म्हणाले.

आणि बरोबर चार-पाच दिवसांनंतर मला प्रा. मेश्राम यांच्याकरवी प्रा. राम पटवर्धनांचा 'सत्यकथा' कचेरीत भेटायला या असा निरोप आला. मी सत्यकथा कचेरीत पोहोचलो.

'या. या.' राम पटवर्धन म्हणाले, 'बसा, तुमच्या दोन्ही कविता आम्ही स्वीकारल्या आहेत. 'माझे विद्यापीठ' ही सत्यकथेच्या दिवाळी अंकासाठी व 'सत्य' ही कविता 'मौज'च्या दिवाळी अंकासाठी घेतली आहे. पण तुम्हाला एक विचारू का सुवेर्?'

'बोला.' मी म्हणालो.

'तुमचा पहिला काव्यसंग्रह निघाला आहेच. त्याला पुरस्कारही मिळालेला आहे. म्हणजे तुम्ही बरीच वषेर् लेखन करीत आहात; तुम्हाला 'सत्यकथे'कडे लेखन पाठवावे असे का वाटले नाही. मला जरा याविषयी कुतूहल आहे म्हणून विचारतो.' इतके बोलून ते थांबले.

'खरे सांगू, रामभाऊ!' मी म्हणालो, 'तुमच्या 'सत्यकथा' अथवा 'मौज'मध्ये जे लिखाण येते, त्या लेखकांविषयी मला आदर आहेच; परंतु त्यांच्यासारखे मला लिहिता येणार नाही. कारण त्यांचा बाज व लिहिणे निराळे, माझे निराळे.'

'द्या टाळी!' म्हणत रामभाऊ पटवर्धनांनी हात पुढे केला.

'परंतु एक करा. तुम्हाला असे का वाटते याच्याविषयी तुम्ही एक टिपण अथवा लेखच पाठवा. आम्ही तो छापू. तुमची टीकाटिप्पणी आम्हाला हवी आहे.'

मी त्यावर स्वत:चे मत मांडायचे कबूल केले; परंतु अद्याप काही लिहू शकलो नाही. त्यांनीही मला अनेकदा भेट होऊनही पुन्हा कधी हटकले नाही. तेही विसरले, मीदेखील विसरलो.

पुढे 'सत्यकथे'चे प्रकाशनच बंद झाले. माझे लिहिणे आणि त्यांचे छापणे थांबले ते आजतागायत तसेच राहिले.

या 'माझे विद्यापीठ' कवितेविषयी अशा कितीतरी हकीकती आहेत; परंतु एक गोष्ट मला नमूद करावीशी वाटते ती अशी :

याच 'मौज प्रकाशन गृहा'तच माझी प्रा. श्री. पु. भागवत यांची गाठ पडली. पुढे अधूनमधून केव्हा तरी फुटकळपणे भेटत राहिलो, बोलत राहिलो. एकदा मला त्यांनी थांबवले. 'तुम्हाला एक विचारू. या कवितेतील ती अंतर्गत लय आहे, तिचा संथसा खळबळ ध्वनी मला ऐकायला येतो, तो तुम्ही कसा साधलात. तेवढे सांगाल?' श्री. पु. म्हणाले.

मी काय सांगणार डोंबल!

मी म्हणालो, मला यातले काही माहीत नाही. मी लिहिले आणि तुम्ही छापले. एवढेच. पुढे १९६६ मध्ये 'माझे विद्यापीठ' या शीर्षकाने माझा नवा कवितासंग्रह प्रकाशित झाला. मी भागवतांना एक प्रत भेट म्हणून पाठवली. दोन-चार महिन्यांतच त्यांचे मला पत्र आले ते असे :

प्रिय सुर्वे
संग्रह अगत्यपूर्वक पाठवल्याबद्दल आभार; परंतु मला एक नवल वाटते ते तुम्ही आमच्या 'मौज प्रकाशन गृहा'च्या यादीतून कसे काय निसटलात याचे. ते असो. आता एक करा, जेव्हा या संग्रहाची नवी आवृत्ती प्रकाशित कराल तेव्हा या संग्रहाची मुदणप्रत मी तपासून देईन. तेवढे लक्षात ठेवा.

('डिंपल पब्लिकेशन'च्या 'कहाणी कवितेची' या नारायण सुर्वे यांच्या पुस्तकातून साभार.) 


---- ---- // o // ---- ----

साभार : महाराष्ट्र टाईम्स Aug 17, 2010

No comments:

Post a Comment