अध्याय १८
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकुलदेवतायै नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥
करितां श्रीहरिस्मरण ॥ दारुण विघ्नें पळती उठोन ॥ कोटिमुहूर्ताहून विशेष पूर्ण ॥ कृष्णचिंतन जाणावें ॥१॥
उदंड मुहूर्त साधिले ॥ परी कृष्णस्मरण नाहीं केलें ॥ तरी तितुकेही कुमुहूर्त जाहले ॥ विघ्नें सबळ धांवती ॥२॥षष्ठी नवमी व्यतीपात ॥ वैधृति कल्याणी कुयोग समस्त ॥ इतुकियांसही मंगळ करीत ॥ नाम हरीचें निर्धारें ॥३॥
सर्वदा लाभ आणि जय ॥ धरिती स्मरणकर्त्याचे पाय ॥ तो कधीं न पावे पराजय ॥ जो हृदयीं ध्याय हरीतें ॥४॥
जो नाम न विसंबे अहोरात्रीं ॥ नित्य उत्साह ज्याचें मंदिरीं ॥ वैकुंठपति तो श्रीहरी ॥ त्यासी क्षणभरी न विसंबे ॥५॥
तेंचि सुलग्न सुदिन ॥ ताराशशिदेवबळ पूर्ण ॥ जे इंदिरापतीचे चरण ॥ प्रेमेंकरुनि आठवती ॥६॥
राज्यभोग विपुल सर्वदा ॥ पुत्र विद्या बळ धन संपदा ॥ इतुकें इच्छी कामिक सदा ॥ तरी तिंहीं गोविंदा स्मरावें ॥७॥
सहस्त्र यागांचें निजफळ ॥ जरी इच्छिती तूं नित्यकाळ ॥ तरी चिंतीं घननीळ ॥ तमालनीळ साजिरा ॥८॥
केलें असेल अभक्ष्यभक्षण ॥ दुष्टप्रतिग्रह सुरापान ॥ तरी हरीनें केलें पूतनाशोंषण ॥ त्या श्रवणेंकरुन दोष जाय ॥९॥
ज्यांसी न कळतां घडला जरा ॥ तिंहीं रासमंडळीं खेळला यादवेंद्र ॥ तें श्रवण करितां चरित्र ॥ पाप जाय झडोनि ॥१०॥
ब्रह्महत्यादि दोष घडले पूर्ण ॥ तिंहीं करावें रासकथाश्रवण ॥ श्रवणीं ऐकतां कालियामर्दन ॥ सर्प जाण न बाधिती ॥११॥
ऐकतां गोवर्धनोद्धारणकथा ॥ निरसे सकळ संकटव्यथा ॥ अवघा हरिविजय ऐकतां ॥ सर्व कामना पुरती हो ॥१२॥
हा हरिविजय ऐकतां पवित्र ॥ त्याच्या वंशीं होय विजयी पुत्र ॥ एक आवर्तनें संकटमात्र ॥ निरसोन जाय सर्वथा ॥१३॥
ऐसा वर पंढरीनाथें ॥ दिधला हरिविजयग्रंथातें ॥ असत्य कदा नाहीं येथें ॥ प्रचीत भावार्थे पहावी ॥१४॥
सत्राव्या अध्यायीं जाण ॥ पूर्ण जाहलें रासक्रीडाकथन ॥ आतां अक्रूरागमन ॥ सावधान परिसावें ॥१५॥
ऐकोनि हरिप्रताप उदंड ॥ कंस चिंताक्रांत अखंड ॥ म्हणे कृष्णें मारिले दैत्य प्रचंड ॥ देव समस्त भिती जयां ॥१६॥
पंचाननाचा प्रताप ऐकोन ॥ भयभीत जेवीं वारण ॥ कीं यशवंत विनतानंदन ॥ दंदशूक ऐकोन तटस्थ ॥१७॥
तैसा भयें व्याप्त कंस ॥ गोड कांहीं न वाटे जीवास ॥ नाठवे रात्र किंवा दिवस ॥ परमपुरुष दृष्टीपुढें ॥१८॥
देखिला नसतां चक्रपाणी ॥ दुरोनि प्रताप ऐकतां श्रवणीं ॥ तैसीच मूर्ति ध्यानीं मनीं ॥ ठसावोनि बैसली ॥१९॥
मेळवूनि प्रधान चतुर ॥ विचारीं बैसला कंस नृपवर ॥ म्हणे आम्हांसी आटोपे नंदकिशोर ॥ ऐसा प्रकार योजावा ॥२०॥
प्रधान म्हणती धनुर्याग ॥ आरंभावा आतां सवेग ॥ बळिराम आणि श्रीरंग ॥ आदरेंकरुनि आणावें ॥२१॥
नंदादि गौळियांसमवेत ॥ मान देऊनि आणावें येथ ॥ नम्र वचनें बोलोनि बहुत ॥ शेवटीं घात करावा ॥२२॥
दिवाभीताचे गृहीं अग्न ॥ कागें लाविला नम्रता धरुन ॥ तैसे गौळियांसमवेत रामकृष्ण ॥ येथें कोंडूनि वधावे ॥२३॥
विषवल्ली जों वाढों लागे ॥ तों खुडूनि टाकावीं वेगें ॥ तरीच आपणां सुख भोगे ॥ चिरकाळ असिजे नृपवरा ॥२४॥
अनर्थ थोर बहुत दूर आहे ॥ म्हणोनि सुखें निद्रा करुं नये ॥ सत्वर करावा उपाये ॥ तरीच कुशल आपुलें ॥२५॥
नयनीं हरळ खुपतां ॥ सत्वर काढावा तत्त्वतां ॥ कंटक पदीं भेदितां ॥ आधीं काढिजे कोरुनि ॥२६॥
तैसे नाना उपाय करुन ॥ रामकृष्णां येथें आणून ॥ विश्वासोनि घ्यावा प्राण ॥ तरी कार्य साधेल ॥२७॥
दावूनियां अंगपतन ॥ पाषाण फोडी लोहघन ॥ कीं कंटक चरणीं लागोन ॥ जैसें जिव्हार भेदिती ॥२८॥
मस्तक करोनि खालतें ॥ पारधी वधी जैसा म्रुगातें ॥ कीं सराटे जेवीं महागजातें ॥ किंकाळूनि उभें करिति ॥२९॥
कीं बचनाग मुखीं घालितां ॥ जिव्हेसी गोड लागे खाताम ॥ मग सवेंचि मृत्युव्यथा ॥ प्राप्त करी तत्काळ ॥३०॥
वरी आमिष लावूनि क्षणमात्र ॥ गळ भेदी जैसें जिव्हार ॥ कां चणे टाकोनि वानर ॥ विश्वासोनि धरिती पैं ॥३१॥
कां वरिवरी बोले गोड मैंद ॥ परि आपुल्या कार्यासी सावध ॥ तैसे राम आणि गोविंद ॥ विश्वसोनि वधावे ॥३२॥
ऐकोनि प्रधानाच्या युक्ती ॥ कंसासी हर्ष न समाये चित्तीं ॥ म्हणे तुमचे बुद्धीपुढें बृहस्पती ॥ उणा मज वाटतसे ॥३३॥
तरी आतां पाठवावा कोण ॥ नम्र बोलका विचक्षण ॥ नाना युक्तींकरुन ॥ रामकृष्णाम आणी जो ॥३४॥
प्रधान म्हणती पाठवावा अक्रूर ॥ स्थिरबुद्धि परमचतुर ॥ त्याच्या बोलें ते क्षणमात्र ॥ न लागतां येथें येती पैं ॥३५॥
मग बोलावूनि अक्रूर ॥ कंसें दिधलीं वस्त्रें अलंकार ॥ म्हणे तुम्ही जाऊनि सत्वर ॥ रामकृष्णां आणां येथें ॥३६॥
धनुर्याग मांडिला येथें ॥ सांगावें नंदादि गौळियांतें ॥ महोत्साह पाहूनि मागुतें ॥ गोकुळासी जाइंजे ॥३७॥
आमुचा दिव्य रथ जाई घेऊनी ॥ वरी बैसवीं रामचक्रपाणी ॥ उदयीक सत्वर दोघांसी घेऊनी ॥ यावें उत्साह पहावया ॥३८॥
आज्ञा वंदूनि अक्रूरें ॥ रथ घेऊनि निघाला त्वरें ॥ म्हणे माझ्या सुकृततरुवरें ॥ वाढी आजि घेतली ॥३९॥
मनांत चिंता वाटे थोर ॥ म्हणे कंस चांडाळ दुराचार ॥ राम आणि यदुवीर ॥ दोघे सुकुमार कैसे आणूं ॥४०॥
मागुती श्रीकृष्णचरित्र ॥ अद्भुत आठवी मनांत ॥ संहारिलें दारुण दैत्य ॥ केशी अघबकादिक पैं ॥४१॥
श्रीकृष्णप्रतापापुढें देख ॥ कंस काय बापुडें मशक ॥ जगद्वंद्यासी आवश्यक ॥ नेईल आतां निर्धारें ॥४२॥
आणि चिंती एक अंतरीं ॥ मद्विश्वास हरि धरी कीं धरी ॥ हा कंससेवक म्हणोनि मजवरी ॥ कोपेल काय जगदात्मा ॥४३॥
तो तरी सर्वात्मा सर्वसाक्षी ॥ जो अनंत ब्रह्मांडचित्ता परीक्षी ॥ भक्ताभक्तांचीं लक्षणें लक्षी ॥ संकटीं रक्षी निजदासा ॥४४॥
म्हणे आजि धन्य माझे नयन ॥ देखतील वैकुंठींचें निधान ॥ पूर्णब्रह्म सनातन ॥ मी पाहीन डोळेभरी ॥४५॥
जो दशशतमुखांगशयन ॥ मी त्याचे पदीं भाल ठेवीन ॥ जो नीलग्रीवाचें हृदयध्यान ॥ चतुरानन बाळ ज्याचें ॥४६॥
जो क्षीराब्धिवासी पूर्ण ॥ ज्याचें वेदशास्त्रां न कळे वर्म ॥ त्या हरीसी आजि क्षेम ॥ देईन प्रेमें आवडीं ॥४७॥
जो निर्गुण निर्विकार ॥ जो देशकालरहित अपार ॥ तो गोकुळीं यादवेंद्र ॥ डोळेभरी पाहीन मी ॥४८॥
नाना शास्त्रपद्धती ॥ आग्रहें जो जो अर्थ भाविती ॥ तो हा एक जगत्पती ॥ गोकुळामाजी अवतरला ॥४९॥
वेदांती परब्रह्म जें स्थापिती ॥ तोचि हा क्षीराब्धिजापती ॥ मीमांसक कर्में करिती ॥ याचलागीं पावावया ॥५०॥
नैयायिक म्हणती ईश कर्ता ॥ तोचि हा चतुरास्याचा पिता ॥ जो आदिमायेचा निजभर्ता ॥ कर्ता हर्ता पाळिता जो ॥५१॥
कपिलमुनि सांख्यशास्त्रीं ॥ प्रकृतिपुरुष विभाग करी ॥ तोचि हा गोकुळीं पूतनारी ॥ डोळे भरुनि पाहीन मी ॥५२॥
व्याकरणकार शब्द साधिती ॥ योगसाधन पातंजल करिती ॥ शैव ज्यासी शिव म्हणती ॥ तोचि यदुपति अवतरला ॥५३॥
वैष्णव म्हणती चक्रपाणी ॥ शक्ति गणेश वासरमणी ॥ इच्छामात्रें हीं रुपें धरुनी ॥ नंदभुवनीं अवतरला ॥५४॥
दुरुनि अक्रूर गोकुळ देखत ॥ साष्टांग घातलें दंडवत ॥ म्हणे धन्य हे व्रजवासी समस्त ॥ मुख पाहती हरीचें ॥५५॥
तों गोखुरामाजी चांगली ॥ हरीचीं पाउलें उमटलीं ॥ अक्रूरें घेऊनि ते धूळी ॥ लाविली भाळीं आपुल्या ॥५६॥
जोडोनियां दोन्ही हस्त ॥ चरणचाली अक्रूर चालत ॥ कंठ जाहला सद्गदित ॥ अश्रुपात वाहती ॥५७॥
पदमुद्रा उमटल्या जेथें ॥ मागुती प्रणिपात करी तेथें ॥ तों वृक्ष देखिले निजभक्तें ॥ काय त्यांतें बोलत ॥५८॥
म्हणे धन्य धन्य तुम्ही वृक्ष ॥ तुमच्या छायेसी बैसे कमलपत्राक्ष ॥ जो भूतांतरात्मा कर्माध्यक्ष ॥ सहस्त्राक्ष शरण जया ॥५९॥
तों सायंकाळीं परतले गोभार ॥ गोपाळांसहित यादवेंद्र ॥ सवें ज्येष्ठ बंधु भोगींद्र ॥ वाद्यगजर बहु होती ॥६०॥
गोरजधूळी दाटली बहुत ॥ तेणें झांकिला अक्रूराचा रथ ॥ नंदमंदिराजवळी अकस्मात ॥ अक्रूर तेव्हां पातला ॥६१॥
अक्रूर नंदें देखोनि ॥ धांवोनि दिधलें क्षेमालिंगन ॥ तों पातले दोघेजण ॥ शेष नारायण ते काळीं ॥६२॥
देखिला त्रिभुवननायक डोळां ॥ नीलजीमूतवर्ण घनसांवळा ॥ रुळती आपाद वनमाळा ॥ गोरजें डवरला मुखचंद्र ॥६३॥
उदार श्रीमुख आकर्ण नयन ॥ कुंडलांसी शोभविती कर्ण ॥ हरितनूच्या आश्रयें पूर्ण ॥ अलंकार घवघविती ॥६४॥
अक्रुर यादवां वडील बहुत ॥ देखोनियां श्रीकृष्णनाथ ॥ चरण वंदावया धांवत ॥ तों अक्रुरें दंडवत घातलें ॥६५॥
नेत्रीं चालिल्या विमलांबुधारा ॥ ऐसें देखोनि परात्परसोयरा ॥ अक्रुराचे कर धरोनि त्वरा ॥ उठवोनि क्षेम दीधलें ॥६६॥
अक्रुराच्या गळां मिठी ॥ दृढ घाली जगजेठी ॥ रतिवरशत्रु आणि परमेष्ठी ॥ त्यांसीही भेटी नव्हेचि ॥६७॥ निजभक्त जाणती ते गोडी ॥ तेथ समाधि कायसि बापुडी ॥ तीर्थव्रतांचिया कोडी ॥ वरुनियां ओवाळिजे ॥६८॥
क्षणक्षणां तो अक्रुर ॥ कृष्णमुख न्याहाळी सुंदर॥ धरी हरीचे चरण वारंवार ॥ तृप्ति नव्हेचि सर्वथा ॥६९॥
बळिरामासी नसून ॥ अक्रुरें दिधलें आलिंगन ॥ साक्षात् शेषनारायण ॥ अवतारपुरुष भेटले ॥७०॥
अक्रुराचे दोन्ही हस्त ॥ बळिराम आणि अच्युत ॥ धरुनि प्रवेशले मंदिरांत ॥ नंदासहित तेधवां ॥७१॥
यशोदेसी नमस्कारुनि अक्रुर ॥ आसनीं बैसला सादर ॥ सांगे मथुरेचा समाचार ॥ सविस्तर आद्यंत जो ॥७२॥
नंदासी म्हणे अक्रुर ॥ कंसें तुम्हांसी बोलाविलें सत्वर ॥ बळिराम आणि यादवेंद्र ॥ याग पहावया चलावें ॥७३॥
धनुर्याग पाहूनि मागुती ॥ सवेंचि यावें गोकुळाप्रती ॥ उदयीक उगवतां गभस्ती ॥ अतिसत्वर निघावें ॥७४॥
तों नंदयशोदा बोलत ॥ मथुरेसी नेतां कृष्णनाथ ॥ तेच क्षणीं आमुचा प्राणांत ॥ होईल जाण अक्रुरा ॥७५॥
श्रीकृष्णाचा करावया घात ॥ कंस अहोरात्र जपत ॥ अक्रुरा तूं आमुचा परम आप्त ॥ पाहें बंरवें विचारुनि ॥७६॥
अक्रुर हांसोनि बोलत ॥ तुमचे दृष्टीं हें बाळ दिसत ॥ परी कृतांतासही शिक्षा निश्चित ॥ कृष्णनाथ लावील पैं ॥७७॥
श्रीहरि बोले ते समयीं ॥ अंतरीं भय धरुं नका कांहीं ॥ चला मथुरेसी लवलाहीं ॥ गौळी घेऊनि समागमें ॥७८॥
न लागतां एक क्षण ॥ कंस तत्काळ मारीन ॥ मुष्टिकचाणूरांचें मरण ॥ बहुत जवळी पातलें ॥७९॥
कृष्णें पूर्वीं पराक्रम केले ॥ ते नंदयशोदेसी आठवले ॥ थोर दैत्य संहारिले ॥ अघ बक केशी प्रलंबादिक ॥८०॥
गोवर्धनपर्वत उचलिला ॥ कालिया मर्दूनि अग्नि प्राशिला ॥ आखंडल शरण आला ॥ तोही देखिला सकळिकीं ॥८१॥
हा सर्वदा असे निर्भय ॥ त्यासी कळिकाळाचें नाहीं भय ॥ बुद्धीचा प्रवर्तक यादवराय ॥ गोष्टी ते मानली समस्तां ॥८२॥
अक्रुर म्हणे प्रातःकाळीं ॥ निघावे नंदादि सर्व गौळी ॥ गोकुळांत मात प्रकटली ॥ कीं वनमाळी आतो उद्यां ॥८३॥
तों उगवला वासरमणी ॥ स्नान संध्यादि भोजन सारुनी ॥ राम आणि चक्रपाणी ॥ सिद्ध जाहले तेधवां ॥८४॥
दिव्य रथ अक्रुरें सज्जिला ॥ गौळियांचा मेळां निघाला ॥ गोरसकावडी ते वेळां ॥ भरोनि घेतल्या कंसभेटी ॥८५॥
यशोदा आणि रोहिणीतें ॥ नमस्कारिलें रामें रमानाथें ॥ हात जोडूनि म्हणती माते ॥ जाऊनि येतों पूढती ॥८६॥
यशोदा म्हणे जगजेठी ॥ आतां कैंची तुझी भेटी ॥ स्नेहाचेअ उमाळे उठती पोटी ॥ स्तनीं पान्हा फूटला ॥८७॥
तूं जातोसी मनमोहना ॥ मी आतां न ठेवीं आपुल्या प्राणा ॥ माझ्या विसांवियां राजीवनयना ॥ मनरंजना श्रीहरे ॥८८॥
माझे सांवळे कान्हाई ॥ जगन्मोहने कृष्णाबाई ॥ तुझे गुण आठवूं किती काई ॥ मिती नाहीं तयांतें ॥८९॥
विश्वरुप दाविलें वदनीं ॥ गोवर्धन उचलिला चक्रपाणी ॥ द्वादश गांवें महाअग्नी ॥ तुवां गिळूनि रक्षिलें ॥९०॥
नंदजी बुडाले यमुनाजळीं ॥ तूं घेऊनि आलासी वनमाळी ॥ सर्पें गिळिलें शक्तिस्थळीं ॥ तेथें रक्षिलें पाडसा ॥९१॥
ब्रह्मांडनायका मी तुझी जननी ॥ म्हणतां लाज वाटते मनीं ॥ माता पिता बंधू भगिनी ॥ तूंचि माझी श्रीरंगा ॥९२॥
ऐसे बोलोनि यशोदा ॥ हृदयीं धरिलें परमानंदा ॥ म्हणे मनमोहना गोविंदा ॥ परतोनि येईं लौकरी ॥९३॥
मातेचिया चरणांवरी ॥ मस्तक ठेवीत मुरारी ॥ माया म्हणे पूतनारी ॥ उपेक्षा केली माझी तुवां ॥९४॥
तों गोपिका आल्या धांवत ॥ दोन्हीं करीं हृदय पिटीत ॥ एक पडती मूर्च्छागत ॥ थोर प्राणांत ओढवला ॥९५॥
धरणीवरी एक लोळती ॥ एक दीर्घस्वरें हांका देती ॥ एक अवनीं कपाळ आपटिती ॥ प्राणांतगती ओढवलीं ॥९६॥
एक म्हणती गेला सांवळा ॥ आतां अग्नि लावा गे गोकुळा ॥ अगे गोकुळींचा प्राण चालिला ॥ प्रेतकळा पातली ॥९७॥
अहा अक्रुरा चांडाळा परियेसीं ॥ अकस्मात कोठूनि आलासी ॥ अहा गोकुळींचा प्राण नेतोसी ॥ निर्दय होसी तूं साच ॥९८॥
सकळ गोकुळींच्या हत्या ॥ अक्रुरा पडती तुझ्या माथां ॥ नेऊं नको कृष्णनाथा ॥ इतुकें आतां आम्हांसी देइंजे ॥९९॥
तुझें नाम ठेविलें अक्रुर ॥ तूं हिंसक निर्दय थोर ॥ बहुत जाहलासी कां क्रूर ॥ परम निष्ठुर तूं होसी ॥१००॥
तों रामकृष्ण रथावरी ॥ बैसोनि चालिले झडकरी ॥ रथापुढें येवोनि व्रजनारी ॥ आडव्या पडती धरणीये ॥१॥
एक अक्रुरापुढें पदर पसरुन ॥ म्हणती आम्ही अनाथें भिकारी दीन ॥ करीं आजी कृष्णदान ॥ कीर्ति त्रिभुवनीं भरुं दे ॥२॥
अक्रुरादेखतां घेऊनि माती ॥ गोपीं आपुल्या मुखीं घालिती ॥ म्हणती मनमोहना यदुपती ॥ न भेटसी आतां तूं ॥३॥
ऐसें देखोनि त्या अवसरा ॥ अष्टभाव नावरती अक्रूरा ॥ नयनीं चालिल्या अश्रुधारा ॥ प्रेम देखोनि गोपिकांचे ॥४॥
म्हणें धन्य धन्य यांचें प्रेम ॥ यांही वश केला पुरुषोत्तम ॥ जें निर्विकार परब्रह्म ॥ नामरुपातीत जें ॥५॥
गोपींच्या शोकास नाहीं पार ॥ जैसा वनासी निघतां रघुनाथ ॥ पाठीं लागलें अयोध्यानगर ॥ तैसेंचि येथें जाहलें ॥६॥
जीवनाविण मत्स्य जैसे ॥ गोकुळीचे लोक तळमळती तैसे ॥ यशोदेसी मूर्च्छा येतसे ॥ धांवतसे रथापाठी ॥७॥
माझिया विसांविया जगज्जीवना ॥ मुख पाहूं दे जगन्मोहना ॥ आला मज प्रेमाचा पान्हा ॥ पाजूं कोणा सांग पां ॥८॥
माझे सांवळे कान्हाई ॥ उभी गे राजसे कूष्णाबाई ॥ तुजवेगळ्या दिशा दाही ॥ ओस मज वाटती ॥९॥
कृष्णा मज परी झाली कैशी ॥ तान्हें बाळ टाकूनि परदेशीं ॥ माता जाय सहगमनासी ॥ गति तैसी मज झाली ॥११०॥
कीं कांटेवनांत आंधळे जातां ॥ सांगाती टाकूनि जाती अवचितां ॥ तैसें मज केलें कृष्णनाथा ॥ पुन्हां मागुता न भेटसी ॥११॥
ऐका पद्मपुराणींचे संमत ॥ राधा येथें आली धांवत ॥ रथापुढें येऊनि त्वरित ॥ ध्यान हरीचें विलोकिलें ॥१२॥
हरिस्वरुपीं लावूनि नेत्र ॥ हृदयीं सांठविला यादवेंद्र ॥ मग कृष्णचरणीं ठेविलें शिर ॥ झालें थोर नवल पैं ॥१३॥
जैसें उदकीं मिळे लवण ॥ तैसी राधा गेली अदृश्य होऊन ॥ हरिरुपीं झाली लीन ॥ दुसरेपण हरपलें ॥१४॥
थोर जाहला चमत्कार ॥ राधा हरिरुप जाहली साचार ॥ गोपी तटस्थ समग्र ॥ वानिती भाग्य राधेचें ॥१५॥
नाना साधनें योगी साधिती ॥ त्यांसीही ऐसी नव्हे गती ॥ धन्य धन्य राधा पुण्यमूर्ती ॥ हरिस्वरुप जाहली ॥१६॥
असो हरि म्हणे अक्रुरा ॥ आतां रथ चालवीं सत्वर ॥ तरीच या गोपिका सुंदरा ॥ मार्ग दूरी राहती ॥१७॥
रथ घडघडिला समीरगती ॥ क्रमूनि मागें टाकिली जगती ॥ तेव्हां मूर्च्छा येऊनि गोपिका पडती ॥ हांका देती कृष्णामागें ॥१८॥
कपाळ पिटूनि फोडिती हांका ॥ आहा कमलावरा वैकुंठनायका ॥ आपुले हातें गोपिका ॥ वधूनि जाई आतांचि ॥१९॥
आतां केव्हां देखों पुढती ॥ एक हातें केश ताडिती ॥ रथ क्रमीत जात क्षिती ॥ दृष्टीं पाहती सुंदरा ॥१२०॥
म्हणती प्राणसखया वनमाळी ॥ तुझा वियोगनल परम जाळी ॥ एक म्हणती रथाजवळी ॥ धांवूनि जाऊं चला गे ॥२१॥
अक्रुरासी घालूनि कृष्णाची आण ॥ रथ आणावा वेगें परतोन ॥ नेदी तरी बळेंचि हिरोन ॥ आणूं मनमोहन आतांचि ॥२२॥
आम्ही आहों इतुक्या सुंदरी ॥ अक्रूर एकला काय करी ॥ तों रथ गेला बहुत दूरी ॥ विकळ नारी पडियेल्या ॥२३॥
म्हणती वेधका परमपुरुषा ॥ तुजविण ओस दाही दिशा ॥ क्षीरसागरहृदयविलासा ॥ जातोसी कैसा टाकूनि ॥२४॥
अवघ्या गोपी आकांत करीत ॥ गोकुळा परतल्या स्फुंदत ॥ एक म्हणती अग्नि त्वरित ॥ लावा आतां गोकुळा ॥२६॥
ऐशा शोक करीत सुंदरी ॥ प्रवेशल्या यशोदेच्या मंदिरीं ॥ तों यशोदा म्हणे ते अवसरीं ॥ माझा श्रीहरी दावा गे ॥२७॥
यशोदा मंदिरांत हिंडे रडत ॥ म्हणे आतां मज कैंचा गे कृष्णनाथ ॥ तो वैकुंठनाथ समर्थ ॥ टाकूनि यथार्थ मज गेला ॥२८॥
सकळ गोपी यशोदेचे कंठीं ॥ घालिती तेव्हां दृढ मिठी ॥ शोक केला तो न माये सृष्टीं ॥ न वर्णवेचि कोणातें ॥२९॥
शुकें वर्णितां हे कथा ॥ सद्गद कंठ जाहला तत्त्वतां ॥ शुकासी जाहली जे अवस्था ॥ ते वर्णितां मज न ये ॥१३०॥
आणि सद्गद जाहला परीक्षिती ॥ ढळढळां नयनीं अश्रु वाहती ॥ म्हणे श्रीकृष्ण वेधकमूर्ती ॥ त्याचीच कीर्ति सांगा पुढें ॥३१॥
असो यशोदा सांगे गोष्टी ॥ सख्यांनो घर लागतें गे पाठीं ॥ आतां माझा जगजेठी ॥ पुन्हां दृष्टीं पडेना ॥३२॥
कृष्णाचीं जीं बाळलेणीं ॥ टाकिलीं गोपींपुढें आणूनी ॥ हरीचीं खेळावयाचीं खेळणीं ॥ हृदयीं धरुनि माय रडे ॥३३॥
वाघनखें पदकमळा ॥ पाहूनि शोक करिती वेल्हाळा ॥ आपाद गळ्याच्या वनमाळा ॥ सदनीं ठेविल्या ठायीं ठायीं ॥३४॥
हरीची घोंगडी चांगली ॥ दशियांप्रति मोत्यें ओंविलीं ॥ चिमणीच हरीची मुरली ॥ ऐकतां हरिली चित्तवृत्ति ॥३५॥
हरीचा चिमणा पीतांबर ॥ शिदोरीचें जाळें सुंदर ॥ शिरींचीं पिच्छें परिकर ॥ करींचा वेत्र रत्नजडित ॥३६॥
वनमाळांचे ठेविले जे भार ॥ त्या सुवासें दाटलें मंदिर ॥ माया म्हणे पूर्वकर्म घोर ॥ आड आलें बळेंचि ॥३७॥
पूतना शोषून अघ बक मारिला ॥ कालिया मर्दून अग्नि प्राशिला ॥ गोवर्धन नखाग्रीं धरिला ॥ शक्रही आला शरण ज्यासी ॥३८॥
गर्ग नारदादि मुनिजन ॥ मज क्षणक्षणां येऊन ॥ हें क्षीरसागरींचें निधान ॥ तुझें पोटीं अवतरलें ॥३९॥
ऐसें सांगती क्षणक्षणां ॥ परी सत्य न वाटे माझिया मना ॥ दशावतारींच्या दिव्य रचना ॥ क्रीडतां दाविल्या हरीनें ॥१४०॥
पूर्णब्रह्म सांवळें ॥ म्यां पायांवरी घेऊनि न्हाणिलें ॥ आपुल्या पदरें अंग पुशिलें ॥ वैकुंठपतीचें नेणतां ॥४१॥
पूर्ण अवतार श्रीकृष्णनाथ ॥ उखळीं बांधिला न कळत ॥ जळोनि जावोत गे माझे हात ॥ जाहल्यें भ्रांत मायेनें ॥४२॥
ब्रह्मादिकांची आराध्य मूर्ती ॥ त्यासी मी पाठवीं वनाप्रती ॥ गुरें राखविलीं निश्चितीं ॥ अपराधां मिती नाहींच ॥४३॥
ज्यासी वर्णितां भागलीं दर्शनें ॥ त्यासी ये रे जा रे म्हणें ॥ ठकलें ठकविलें जगज्जीवनें ॥ महिमा नेणें अद्भुत ॥४४॥
हरीविण गृह दिसतें गे थोर ॥ जीवनेंविण जैसें कासार ॥ कीं प्राणेंविण शरीर ॥ दीपाविण मंदिर जेवीं ॥४५॥
ऐसा खेद करीत गौळणी ॥ प्रवेशल्या आपुल्या सदनीं ॥ संसारकृत्य करितां चक्रपाणी ॥ गीत गाती सर्वदा ॥४६॥
दळितां कांडितां मंथन करितां ॥ गाई दुहितां पालख हालवितां ॥ रांधितां जेवितां उदक पितां ॥ गीत गाती हरीचें ॥४७॥
करितां सडासंमार्जन ॥ रंगमाळा घालिता आणिताम जीवन ॥ हिंडतां करितां गमनागमन ॥ गीत गाती हरीचें ॥४८॥
जागृतीं सुषुप्तीं आणि स्वप्नीं ॥ ध्यानीं मनीं आसनीं शयनीं ॥ सर्वदा वेधल्या हरिचरणीं ॥ वृत्ति निमोनि गेलिया ॥४९॥
एकी गौळणी यमुनाजीवना ॥ घेऊनि येत आपुल्या सदना ॥ तों अंतरीं आठवला यादवराणा ॥ वेदपुराणां वंद्य जो ॥१५०॥
हरि रुपीं वृत्ति वेधली ॥ गृहा जावें हें विसरली ॥ कृष्णरुपीं वृत्ति मुराली ॥ तेथेंचि जाहली समाधिस्थ ॥५१॥
घरा आली ते नितंबिनी ॥ परी मन गेलें कृष्णरुप होऊनी ॥ जिकडे विलोकीत कामिनी ॥ तिकडे चक्रपाणी दिसतसे ॥५२॥
पंचप्राणांचेहि आधारें ॥ यथान्याय शरीर वावरे ॥ गोपी वेधली यादवेंद्रें ॥ कांहीं दुसरें दिसेना ॥५३॥
चराचर वरदळभाव ॥ विसरोनियां गेलें सर्व ॥ पूर्णब्रह्मानंद माधव ॥ अद्वय एक संचरला ॥५४॥
उसणें मागावया गौळणी ॥ प्रवेशलीसे जिचे सदनीं ॥ तों अंतरीं आठवला मोक्षदानी ॥ पुराणपुरुष श्रीकृष्ण ॥५५॥
मन वेधलें हरिपायीं ॥ म्हणे सखे उसना कृष्ण देईं ॥ आतांचि आणूनि लवलाहीं ॥ देईन तुझा निर्धारीं ॥५६॥
तंव ते बोले अबला ॥ सखे मथुरेस कृष्ण गेला ॥ दोघीजणींचिया डोळां ॥ पूर लोटती अश्रूंचे ॥५७॥
लेंकुरें वासरें घर ॥ अवघेंचि दिसे कृष्णाकार ॥ तों एक म्हणे सुंदर ॥ सये पुढें यदुवीर न ये कीं ॥५८॥
प्राक्तनाची विचित्र गती ॥ त्याहीवरी स्त्रीदेहाची बुंथी ॥ कोठें जातां न ये निश्चितीं ॥ पराधीन जिणें हें ॥५९॥
पुन्हां न भेटे कमलानायक ॥ सये क्षणिक नरदेह देख ॥ अंतरीं आठवतें हरीचे सुख ॥ निष्कलंक चंद्र जैसा ॥१६०॥
सये हरीविण विलासभोग ॥ तोचि केवळ भवरोग ॥ हरिकृपेविण योगायोग ॥ सर्व योग दिसतसे ॥६१॥
ऐसी गोपिकांची भक्ती ॥ गणितां न गणवे शेषाप्रती ॥ असो इकडे त्रिभुवनपती ॥ मथुरापंथें जातसे ॥६२॥
मागें गौळियांचे भार ॥ रथ वेगें चालवी अक्रुर ॥ तों तमारिकन्येचें तीर ॥ पुढें देखिलें तेधवां ॥६३॥
कृतांत भगिनीचें जीवन ॥ उल्लंघूनि गेला जगज्जीवन ॥ पैलतीरीं सर्व गौळीजन ॥ करावया स्नान उतरले ॥६४॥
रथ सोडूनि अक्रुर ॥ स्नानासी चालिला सत्वर ॥ रथीं शेष आणि यादवेंद्र ॥ दोघे तैसेचि बैसले ॥६५॥
परतोनि पाहे अक्रुर ॥ तों दोन्ही मूर्ती दिसती सुंदर ॥ एक घनश्याम एक गौर ॥ शशिमित्र ज्यापरी ॥६६॥
कीं विष्णु आणि शंकर ॥ कीं राम आणि वज्रधर ॥ कीं बृहस्पति आणि सौमित्र ॥ तैसे दोघे दीसती ॥६७॥
अक्रुर मनीं करी विचार ॥ म्हणे दोघेहि अत्यंत सुकुमार ॥ धाकुटें वय दिसती किशोर ॥ मी तों सत्वर यांसी नेतों ॥६८॥
परम द्वेषी कंस सत्य ॥ जपे दोघां करावया घात ॥ तेथें जरी जाहलें विपरीत ॥ तरी कैसें करावें ॥६९॥
मज संकट मोठें पडिलें ॥ शेवटीं काय होईल तें नकळे ॥ ऐसा चिंताक्रांत ते वेळे ॥ अक्रुर जळीं प्रवेशाला ॥१७०॥
सचिंत जाहला भक्तराणा ॥ बुडी देऊनि करी अघमर्षणा ॥ तों जीवनीं देखिलें जगज्जीवना ॥ विश्वमोहना गोविंदा ॥७१॥
चतुर्भुज चक्रपाणी ॥ पहुडलासे शेषशयनीं ॥ जो मायाचक्रचालक मोक्षदानी ॥ विश्वंभर परमात्मा ॥७२॥
नाभिकमळीं परमेष्ठी ॥ घडीत ब्रह्मांडांच्या कोटी ॥ नाना अवतरांच्या घिरटी ॥ स्वयें घेत परमात्मा ॥७३॥
मत्स्यकूर्मादि अवतार ॥ तेथींचीं चरित्रें दिसती फार ॥ श्रीकृष्णरुपें कंसासुर ॥ आकळूनियां मारिला ॥७४॥
मुष्टिकचाणूरादि दैत्य ॥ मल्ल मारिले परमाद्भुत ॥ शिशुपाल आणि वक्रदंत ॥ जरासंध पाडिला ॥७५॥
भौमासुर बाणासुर ॥ निवटिले कौरवांचे भार ॥ मागुती होऊनि तदाकार ॥ स्वरुपीं स्वरुप संचरलें ॥७६॥
अक्रुर पाहे आत्मदृष्टीं ॥ तों कृष्णरुप दिसे सर्व सृष्टी ॥ हरिनखीं दिसती ब्रह्मांडकोटी ॥ अंत न कळे पाहतां ॥७७॥
अद्भुत प्रताप देखोन ॥ अक्रुर करितां जाहला स्तवन ॥ म्हणे हे कृष्ण मधुसूदन ॥ हे जगज्जीवन सुखार्णवा ॥७८॥
हे कृष्णा सर्वव्यापका ॥ हे कृष्णा त्रिभुवननायका ॥ हे कृष्णा निजसुखदायका ॥ निरुपाधिका निरंजना ॥७९॥
हे कृष्णा अनंतचरणा ॥ हे कमलदलाक्षा अनंतवदना ॥ हे विरुपाक्षहृदया अनंतनयना ॥ भक्तपालना श्रीहरि ॥१८०॥
अनंत शिरें अनंत उदरें ॥ अनंत नामें अनंत चरित्रें ॥ अनंत हस्त अनंत मुखांतरें ॥ कर्ता भोक्ता तूंचि पैं ॥८१॥
तुझे स्मरणीं जे सादर ॥ तेचि पावले पैलपार ॥ त्यांहीं जिंकला संसार ॥ जे तत्पर भजनीं तुझ्या ॥८२॥
जे हरि तुझें नाम गाती ॥ त्यांचे पाय धरावे पुढती ॥ तेच पावले उत्तमगती ॥ अभेदस्थिती जयांची ॥८३॥
हरि तुझें दिव्य नाम ॥ हेंचि साधन परम सुगम ॥ तेचि शुचिष्मंत शुद्ध परम ॥ सूर्य जैसा तेजस्वी ॥८४॥
राम कृष्ण यादवपती ॥ हीं नामें जें सदा घेती ॥ जैसा अग्नि शुचिष्मंत अहोराती ॥ तेसेचि निश्चिती भक्त तुझे ॥८५॥
तुझी अनन्य भक्ति करितां ॥ जरी कर्मलोप जाहला अवचिता ॥ त्यालागीं प्राप्त होय अनंता ॥ सनकादिकांचें ठेवणें ॥८६॥
जें भक्तांचें सत्कर्म राहत ॥ तें न्यून पूर्ण करीत ॥ ऐसा कृपाळू भगवंत ॥ उणें पडों न देसी ॥८७॥
जो तुज अनन्य शरण ॥ त्याचे कोटी अपराध क्षमा करुन ॥ पुढती हिरोनियां मन ॥ आपुले पदीं ठेविसी ॥८८॥
जे सर्वकर्मबहिर्भूत ॥ परी तुझे नामीं आवडी बहुत ॥ ते तुज अत्यंत आवडत ॥ जैसें अपत्य एकुलतें ॥८९॥
कर्म करितां विधिनिषेध बहुत ॥ कर्म करितां व्याकुळ होत ॥ परी तुझ्या एक्या नामें समस्त ॥ होय कृतार्थ श्रीहरी ॥१९०॥
तिष्ठतां उठतां बैसतां ॥ निद्रा करितां जातां येतां ॥ तुझें नाम जगन्नाथा ॥ जपतां हरती सर्व दोष ॥९१॥
विप्र क्षत्रिय वैश्य शूद्र ॥ स्त्रिया अंत्यज समग्र ॥ तुझें अनम जपतां निरंतर ॥ पावन होती सर्वही ॥९२॥
ऐसा हरि तुझा महिमा ॥ त्या तुज शरण मी पुरुषोत्तमा ॥ पुराणपुरुषा निरुपमा ॥ नामाअनामातीत तूं ॥९३॥
अक्रुराचा संशय फेडिला ॥ कृष्ण पूर्णब्रह्म समजला ॥ मायापडळ ते वेळां ॥ विरोनि गेलें समस्त ॥९४॥
पूर्णब्रह्मानंदा जगजेठी ॥ इच्छामात्रें घडी मोडी सृष्टी ॥ तो कंसा वधील हे गोष्टी ॥ अपूर्व कांही नव्हेचि ॥९५॥
अक्रुर घाली नमस्कार ॥ सद्गद जाहलें अंतर ॥ तैसाचि निघाला बाहेर ॥ तों रथीं तोचि बैसला ॥९६॥
प्रत्यक्ष शेष आणि रमेश ॥ घवघवीत दिसती अवतारपुरुष ॥ भक्तांलागीं लीलाविलास ॥ दावावया अवतरले ॥९७॥
संध्यादि कर्म सारुनि सत्वर ॥ रथाजवळी आला अक्रुर ॥ तों गदगदां हांसे श्रीधर ॥ म्हणे कां हो उशीर लागला ॥९८॥
काय अपूर्व देखिलें जळीं ॥ तें सांगावें आम्हांजवळी ॥ ऐसें बोलतां वनमाळी ॥ अक्रुर जाहला सद्गदित ॥९९॥
धांवोनि धरिले कृष्णचरण ॥ आसुवें क्षाळिले हरिपद पूर्ण ॥ कृष्णें आलिंगिला उचलोन ॥ निजकरें नयन पूसिले ॥२००॥
अक्रुर म्हणे पुराण पुरुषा ॥ सच्चिदानंदा हरि सर्वेशा ॥ तुझा महिमा वेदशेषा ॥ न वर्णवेचि कदाही ॥१॥
तेथूनि रथ निघाला वेगेंशीं ॥ सत्वर आले मथुराप्रदेशीं ॥ उपवनीं राहिले ते दिवशीं ॥ नंदगौळियांसमवेत ॥२॥
अक्रुर म्हणे यादवेंद्रा ॥ रहावया चला माझिया मंदिरा ॥ मी दासानुदास तुझा खरा ॥ मज उद्धरीं श्रीरंगा ॥३॥
म्यां अनंतजन्मीं तप केलें ॥ तें एकदांचि फळासी आलें ॥ जन्माचें सार्थक जाहलें ॥ परब्रह्म सांवळें पाहिलें म्यां ॥४॥
तरी स्वामी इंदिरावर ॥ चलावें माझिया मंदिरा ॥ ऐसें ऐकतां परात्परसोयरा ॥ काय बोले तेधवां ॥५॥
कंसासी मारिल्याविण जाणा ॥ मी न यें तुझिया सदना ॥ राज्यीं स्थापीन उग्रसेना ॥ बंदिशाळा फोडोनियां ॥६॥
आजिचे रात्रीं ये स्थानीं ॥ आम्ही राहतों उपवनीं ॥ तरी तुम्हीं पुढें जाऊनी ॥ कंसालागीं सांगिजे ॥७॥
आज्ञा वंदोनि अक्रुर ॥ प्रवेशला तेव्हां मथुरापुर ॥ जैसा प्रकाशे सहस्त्रकर ॥ तैसी वार्ता गेली मथुरेंत ॥८॥
श्रीकृष्ण आला उपवना ॥ ऐकतां आनंद भक्तजनां ॥ परम भय वाटलें दुर्जनां ॥ चिंता बहुत प्रवर्तली ॥९॥
मागें बोलावें अति न्यून ॥ समोर देखतां पळती उठोन ॥ हें ग्रामसिंहाचें लक्षण ॥ तैसे दुर्जन मथुरेचे ॥२१०॥
हरिविजयग्रंथ कल्पद्रुम ॥ जो निजभक्तांचे पुरवी काम ॥ इच्छिलें फळ देत उत्तम ॥ मनोरथ सर्वदा ॥११॥
ऐसा हरिविजयग्रंथ कल्पवृक्ष ॥ येथें राहिला कमलपत्राक्ष ॥ जो ब्रह्मानंद सर्वसाक्ष ॥ भीमातटनिवासी जो ॥१२॥
ब्रह्मानंद कल्पद्रुम थोर ॥ तेथें याचक अनन्य श्रीधर ॥ मागे हेंचि निरंतर ॥ सप्रेम भजन देईं तुझें ॥१३॥
इति श्रीहरिविजयग्रंथ ॥ संमत हरिवंशभागवत ॥ प्रेमळ भक्त सदा परिसोत ॥ अष्टादशाध्याय गोड हा ॥२१४॥ अध्याय॥१८॥ओंव्या॥२१४॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
No comments:
Post a Comment