अध्याय २१
जय जय पुराणपुरुषा दिगंबरा ॥ अवयवरहिता निर्विकारा ॥ मायातीता अगोचरा ॥ वेदसारा श्रीवल्लभा ॥१॥ तूचि जगदानंदमूळकंद ॥ उपाधिरहित अभेद ॥ सच्चिदानंदनामे शब्द ॥ हाही राहे आलीकडे ॥२॥ जैसा पुष्करी सतेज मित्र ॥ तेथे नीलिमा न साहे अणुमात्र ॥ तैसे ज्ञान राहिले साचार ॥ तुझा निर्धार करू जाता ॥३॥
जैसा वसुधामरांच्या देव्हारा ॥ प्रवेश नव्हे अतिशुद्रा ॥ तैसा तर्क होय माघारा ॥ मार्ग पुढे न सुचेचि ॥४॥
मृगेंद्र देखितांचि जाण ॥ जैसा देह ठेवी वारण ॥ तैसा अहंकृति जाय विरोन ॥ ब्रह्मानंदसागरी ॥५॥
चंडांशापुढे खद्योत जाण ॥ तेवी बुद्धीचे शहाणपण ॥ अंबुनिधीमाजी जैसे लवण ॥ तैसे मन होऊनि जाय ॥६॥
अस्ति भाति प्रियरूप नाम ॥ त्रिपुटीविरहित निष्काम ॥ त्रिविधभेदातीत पूर्णब्रह्म ॥ हेही म्हणणे न साहे ॥७॥
अकळ न कळती याच्या मावा ॥ हालविता न ये जिव्हा ॥ ध्येय ध्याता ध्यान तेव्हा ॥ सर्वथाही उरेना ॥८॥
ऐसा निर्विकार चित्समुद्र ॥ यदुकुलभूषण यादवेंद्र ॥ गुरुगृही राहोनि समग्र ॥ विद्याभ्यास केला हो ॥९॥
विसावे अध्यायी सुरस ॥ कथा हे जाहली विशेष ॥ यावरी मथुरेत जगन्निवास ॥ काय करिता जाहला ॥१०॥
मथुरेत असता ऋषीकेशी ॥ गोकुळी नंद यशोदा ब्रजवासी ॥ कृष्णप्राप्तीलागी दिवसनिशी ॥ उतावेळ मानसी ते ॥११॥
गोकुळीच्या नितंबिनी ॥ श्रीकृष्णलीला आठवूनी सद्गदित होताती मनी ॥ अश्रु नयनी वाहताती ॥१२॥
वाटती दशदिशा उदास ॥ वसते गोकुळ वाटे ओस ॥ लीलावतारी पुराणपुरुष ॥ लागला निजध्यास तयाचा ॥१३॥
नावडति सर्व विलासभोग भोग तितुके वाटती रोग ॥ अंतरी भरलासे श्रीरंग ॥ भक्तभवभंग दयाळू ॥१४॥
चंदन अंगी चर्चिता देखा ॥ वाटती जैशा शिखीच्या शिखा ॥ सुमनहार ते देखा ॥ उरगासमान भासती ॥१५॥
गगनी उगवता रोहिणीवर ॥ म्हणती यामिनीत का उगवला मित्र ॥ अंतरी ठसावता पंकजनेत्र ॥ विव्हळ होय मानस ॥१६॥
गोपी करू बैसती भोजन ॥ ग्रासोग्रासी आठवे कृष्ण ॥ करू जाता उदकपान ॥ जगन्मोहन आठवे ॥१७॥
एवं गोकुळींचे जन ॥ हरिचरणी ठेवूनि मन ॥ करिती सत्कर्माचरण ॥ निराभिमान सर्वदा ॥१८॥
कृष्णप्राप्तीविण करिती कर्म ॥ तरी तोचि तयांसी पडला भ्रम ॥ आम्ही कर्मकर्ते हा परम ॥ अभिमान वाहती ॥१९॥
मृत्तिका उदक नासूनी ॥ आम्ही जाणते ऐसे मिरविती जनी ॥ परि दुरावला चक्रपाणी ॥ जवळी असोनि अप्राप्त ॥२०॥
काष्ठामाजी जैसा अग्न ॥ असोनि नव्हे प्रकाशमान ॥ तैसा श्रीरंग ह्रदयी परिपूर्ण ॥ असोनि जन भुलले ॥२१॥
कृष्णप्राप्तीविण दान केले ॥ जैसे बीज उकरडा ओतिले ॥ ते व्यर्थ कुजोनि गेले ॥ मुक्त टाकिले अग्नीत जैसे ॥२२॥
हरिप्राप्तीविण पठन ॥ वृथा श्रम काय करून ॥ सिकतेचा घाणा गाळून ॥ व्यर्थ जैसी करकर ॥२३॥
हरिप्राप्तीविण गायनकळा दावीत ॥ जैसा गोवारी आरडे अरण्यांत ॥ हरिप्राप्तीवीण प्रवृत्तिक ग्रंथ ॥ काय कविता अलवण ते ॥२४॥
कृष्णप्राप्तीविण यज्ञ ॥ व्यर्थ काय डोळे धुम्रे भरून ॥ हरिप्राप्तीविण अनुष्ठान ॥ जैसे सोंग नटाचे ॥२५॥
भगवत्प्राप्ती कदा नाही ॥ एकांती गुहा सेविली पाही ॥ जैसा मूषक निघाला वई ॥ व्यर्थ काय एकांत ॥२६॥
हरिप्राप्तीविण जटा ॥ व्यर्थ भार वाहे करंटा ॥ एवं सर्व व्यर्थ त्याच्या चेष्टा ॥ ह्रदयी वैकुंठा न धरिता ॥२७॥
असा ह्रदयी धरूनि ह्रषीकेश ॥ गोपी मथुरेसी विकू जाता गोरस ॥ चित्ती आठवूनि रमाविलास ॥ परमपुरुष जगद्वंद्य ॥२८॥
मथुरेच्या चोहटा बैसती ॥ अंतरी आठवूनि यदुपती ॥ दधि दुग्ध घ्या म्हणो विसरती ॥ मुखासि येती हरिनामे ॥२९॥
दुग्ध घ्या म्हणावे जो या बोला ॥ तो पूर्वी शक्रे दुग्धाभिषेक केला ॥ तैसाचि ह्रदयी आठवता सांवळा ॥ गोविंद सकळां घ्या हो म्हणती ॥३०॥
दधि घ्या म्हणावे जो आता ॥ दामोदर आठवे चित्ता ॥ जो दह्यांनिमित्त तत्त्वतां ॥ मायेने उखळी बांधिला ॥३१॥
दांवे बांधिले उदरि जया ॥ म्हणोनि दामोदर नाम तया ॥ ते ध्यान गोपी आठवूनिया ॥ दामोदर घ्या हो म्हणती ॥३२॥
तो मथुरेच्या गोरंटी ॥ ज्यांची केवळ प्रपंचदृष्टी ॥ म्हणती कोठे गे जगजेठी ॥ कायशा गोष्टी बोलता ॥३३॥
जेणे मीनरूप धरोनी ॥ अवघा समुद्र उडविला गगनी ॥ तो वेदोद्धारक चक्रपाणी ॥ मडक्यांत कैसा साठविला ॥३४॥
मंदरोद्धारक जगजेठी ॥ जेणें पृष्ठीवरी धरिली सृष्टी ॥ ज्यासी ध्याय भार्गव परमेष्ठी ॥ तो मडक्यात कैसा साठविला ॥३५॥
जेणे हिरण्याक्ष मर्दूनी ॥ दाढेवरी धरिली अवनी ॥ जो क्षीराब्धिवासी मोक्षदानी ॥ तो मडक्यात कैसा साठविला ॥३६॥
जो प्रल्हादरक्षक नरहरी ॥ ज्याचा क्रोध न माये अंबरी ॥ हिरण्यकश्यपमर्दन मुरारी ॥ तो मडक्यांत कैसा साठविला ॥३७॥
जेणे दो पायांमाजी सकळ ॥ आटिल स्वर्ग मृत्यु पाताळ ॥ जो बळीदर्पहरण घननीळ ॥ तो मडक्यात कैसा साठविला ॥३८॥
त्रिसप्तके मुळींहूनी ॥ निर्वैर केली जेणे अवनी ॥ परमप्रतापवासरमणी ॥ तो मडक्यांत कैसा साठविला ॥३९॥
जो कमलिनीमित्र कुलभूषण ॥ जो दुष्टपिशिताशनमर्दन ॥ जो रावणांतक रघुनंदन ॥ तो मडक्यांत कैसा साठविला ॥४०॥
तोचि गोकुळी अवतरला ॥ गोवर्धन नखाग्री धरिला ॥ अघासुर ज्याणें उभा चिरिला ॥ तो मडक्यांत कैसा साठविला ॥४१॥
तो गोकुळींच्या गोपी समाधिस्थ ॥ त्यांसी कृष्णमय जग दिसत ॥ कृष्णमय ब्रह्मांड भासत ॥ नाही हेत दूसरा ॥४२॥
ऐशा गोपी व्रजवासिनी ॥ बोलती तेव्हा गजगामिनी ॥ म्हणती सर्व मडक्यांत चक्रपाणी ॥ परिपूर्ण भरला असे ॥४३॥
सर्वा घटी बिंबोनि तरणी ॥ अलिप्त जैसा वेगळा गगनी ॥ तैसा सर्वव्यापक मोक्षदानी ॥ बरवे मनी विचारा ॥४४॥
तुमच्या शरीरघटी पहा पुरते ॥ करणे वर्तती कोणाच्या सत्ते ॥ मिरविता स्त्रीपुरुषनामाते ॥ आणा पुरते मनासी ॥४५॥
एक सुवर्ण नाना अलंकार ॥ एक सागर तरंग अपार ॥ बहुत मंदिरे एक अंबर ॥ तैसा यदुवीर सर्वघटी ॥४६॥
जे जे भक्त बोलती ॥ ते ते यथार्थ करी श्रीपती ॥ सकळ गोपींच्या घटांप्रती ॥ दिसती मूर्ति हरीच्या ॥४७॥
घटाप्रति एकेक सुंदर ॥ श्रीमूर्ति दिसे सुकुमार ॥ गोपी तटस्थ पाहती सादर ॥ विवेकदृष्टी करूनिया ॥४८॥
म्हणती नवल केले यादवेंद्रे ॥ सर्व घटी व्यापिले हे तो खरे ॥ व्रजवासिनी बोलिल्या उत्तरे ॥ असत्य नव्हती सर्वथा ॥४९॥
भक्तवचना पडता व्यंग ॥ तेथे आंगे वोडवे श्रीरंग ॥ जो क्षीराब्धिह्रदयरत्नरंग ॥ जो अभंग सर्वदा ॥५०॥
वाल्मीके जे जे भाष्य केले ॥ ते ते राघवे वर्तोनि दाविले ॥ भक्त जे जे वचन बोलिले ॥ खाली न पडे सर्वथा ॥५१॥
पाकशासनशत्रूने नागपाशी ॥ बांधिले श्रीरामसौमित्रांसी ॥ भक्तभाष्या सत्य करावयासी ॥ बांधोनि घेतले रघुवीरे ॥५२॥
जो क्षणे ब्रह्मांड रची ढासळी ॥ तो श्रीराम पडला शरजाळी ॥ जो भक्तांचिया वचनासी पाळी ॥ सर्गस्थित्यंतकाळी अक्षय ॥५३॥
गोपी बोलिल्या जे वचन ॥ ते साच करीत जगज्जीवन ॥ असो गोपी गोरस विकून ॥ गेल्या तेव्हा गोकुळा ॥५४॥
श्रीकृष्णलीला मुखी गात ॥ गोपी करिती प्रपंचकृत्य ॥ आणिक नावडे दुजा हेत ॥ जाहले चित्त कृष्णरूप ॥५५॥
एक घुसळीता सुंदर ॥ हाती धरिला रविदोर ॥ वृत्ति जाहली कृष्णाकार ॥ दिवसनिशी नाठवे ॥५६॥
हरिरूपी तन्मय अबला ॥ वृत्ति विरोनी गेल्या सकळा ॥ जैसा लवणाचा पुतळा ॥ समुद्रामाजी समरसे ॥५७॥
घुसळिता चळती हस्त ॥ परी त्या आपण समाधिस्थ ॥ पंचप्राणाधारे शरीर वर्तत ॥ सत्कर्माचरण करिती ॥५८॥
जो सुखासनी जाय बैसोन ॥ त्याचे कदा न चळे आसन ॥ परी करी सकळ पर्यटन ॥ भक्त सुजाण तैसेचि ॥५९॥
एवं गोपिका दळिता कांडिता ॥ येता जाता दुग्ध तापविता ॥ घुसळिता उदक आणिता ॥ कृष्णनाथ न विसरती ॥६०॥
नंद आणि यशोदा ॥ ह्रदयी आठविती श्रीमुकुंदा ॥ त्याच्या लीला आठवूनि सर्वदा ॥ झुरती भेटीकारणे ॥६१॥
यशोदा करिता मंथन ॥ बाळलीला आठवी संपूर्ण ॥ म्हणे हे कृष्ण मधुसूदन ॥ गेलासी टाकूनि आम्हांते ॥६२॥
हे पूतनाप्राणशोषणा ॥ हे तृणावर्तासुरच्छेदना ॥ हे मुरारे शकटभंजना ॥ गेलासी टाकूनि आम्हाते ॥६३॥
हे गोपीमानसराजाहंसा ॥ हे कालियामर्दना पुराणपुरुषा ॥ हे गोवर्धनोद्धारणा ह्रषीकेशा ॥ गेला टाकूनि आम्हांते ॥६४॥
हे कृष्णा कमळपत्राक्षा ॥ हे मधुकैटभारे सर्वसाक्षा ॥ हे केशिप्राणांतका गोपवेषा ॥ गेलासी टाकूनि आम्हांते ॥६५॥
माझे सांवळे डोळसे सुकुमारे ॥ कृष्णाबाई श्यामसुंदरे ॥ उदारबदन मुरलीधरे ॥ गेलीस टाकूनि आम्हांते ॥६६॥
ऐसे आठवूनि हरिगुण ॥ यशोदादेवी करी मंथन ॥ नयनी वाहे अश्रुजीवन ॥ प्रेमेकरूनि सद्गदित ॥६७॥
ऐसा वृत्तांत गोकुळींचा ॥ जाणोनिया सखा प्रेमळांचा ॥ जो का नृप वैकुंठपुरीचा ॥ काय करिता जाहला ॥६८॥
जो सकळदेवाधिदेव ॥ भक्तवल्लभ करुणार्णव ॥ तेणे जवळी बोलाविला उद्धव ॥ गुजगोष्टी सांगावया ॥६९॥
तद्धव परम चतुर ज्ञाता ॥ सात्त्विक प्रेमळ उदार तत्त्वतां ॥ त्याहीवरी हरीचा आवडता ॥ प्राणाहूनि पलीकडे ॥७०॥
हरि म्हणे उद्धवा एक ऐकावे ॥ आपण गोकुळाप्रति जावे ॥ गोपिकांप्रति बांधावे ॥ निर्वाणज्ञान अगम्य जे ॥७१॥
माझा नंद पिता यशोदा जननी ॥ दोघे कंठी प्राण ठेवूनी ॥ वाट पाहती दिनरजनी ॥ चकोरचंद्रन्यायेसी ॥७२॥
परम गोपिका प्रियकरा ॥ सद्भाविका सगुणा उदारा ॥ वाट पाहात असतील सुकुमारा ॥ चातकजलदन्यायेसी ॥७३॥
माझे गोकुळीचे गडी ॥ ज्यांची निरसिली साकडी ॥ माझी त्यावरी बहुत आवडी ॥ धेनुवत्सन्यायेसी ॥७४॥
त्यांसी मी सांडोनि आलो सकळिकां ॥ मागे दुःखी जाहल्या गोपिका ॥ जैसे कृपणाचे धन जाय देखा ॥ त्यांच्या दुःखा पार नाही ॥७५॥
जा म्हणता माघार्या न सरती ॥ अक्रूरासी येती काकुळती ॥ त्यापुढे पदर पसरिती ॥ एक पडती मूर्च्छागत ॥७६॥
म्हणती का नेतोसी आमुचा प्राण ॥ घालिती रथापुढे लोटांगण ॥ एक म्हणती अक्रूर नामाभिधान ॥ कोणे तुज ठेविले ॥७७॥
तुझे नाम परम क्रूर ॥ निर्दया नेऊ नको यदुवीर ॥ गोकुळींच्या हत्या समग्र ॥ तुजवरी पडतील पै ॥७८॥
ऐसे गोपिकांचे वर्णिता प्रेम ॥ सद्गद जाहला मेघश्याम ॥ जो भक्तकामकल्पद्रुम ॥ आत्माराम श्रीकृष्ण ॥७९॥
सांगता गोपिकाची प्रीती ॥ नेत्री अश्रुधारा स्त्रवती ॥ उद्धवाच्या कंठी श्रीपति ॥ मिठी घालोनि स्फुंदत ॥८०॥
उद्धवा तू आता वेगे जाये ॥ त्यांची दृढभक्ति कैसी ते पाहे ॥ जे धरिती सदा माझी सोये ॥ मी स्वप्नीही न विसंबे ययासी ॥८१॥
जे मज न विसरती सर्वथा ॥ मी अखंड भोवें त्यांभोवता ॥ मत्स्यकूर्मादि अवतार तत्त्वता ॥ घेतले भक्ताकारणे ॥८२॥
उद्धवा त्यांची भक्ति पडली सगुणी ॥ वियोगे प्राण त्यागिती कामिनी ॥ त्यांसी संपूर्ण ज्ञान उपदेशूनी ॥ ब्रह्मवादिनी कराव्या ॥८३॥
अध्यात्मविद्या दुर्लभ पूर्ण ॥ उद्धवा तारी त्यांसी सांगोन ॥ संतावेगळे निर्वाणज्ञान ॥ कोण उपदेशील दूसरे ॥८४॥
ऐसे बोलोनि रमानाथ ॥ उद्धवाच्या मस्तकी ठेविला हात ॥ जेणे पूर्वी देवगुरुपाशी बहुत ॥ विद्याभ्यास पै केला ॥८५॥
आधींच बोलका विचक्षण ॥ वरी वाचस्पतीपासी अध्ययन ॥ विशेश कृष्णकृपा परिपूर्ण ॥ परम सज्ञान उद्धव ॥८६॥
हरिचरणी माथा ठेवूनी ॥ उद्धव निघाला तेचि क्षणी ॥ दिव्य रथी आरूढोनी ॥ गोकुळपंथे चालिला ॥८७॥
पहिल्याच प्रेमळा गोकुळींच्या गोरटी ॥ विशेष उद्धव चालिला त्यांच्या भेटी ॥ आधीच वाराणसी नगरी गोमटी ॥ त्यावरी जान्हवी आली तेथे ॥८८॥
सुदैवासी सांपडे परिस ॥ पुण्यवंता जोडे निर्दोष यश ॥ दिव्य अंजन पायाळास ॥ अकस्मात लाघे जेवी ॥८९॥
आधीच वन शोभिवंत ॥ त्याहीवरी आला वसंत ॥ पहिलेचि चतुर पंडित ॥ प्रेमळ भक्त त्याहीवरी ॥९०॥
आधींच कौस्तुभ तेजागळा ॥ वरी विष्णूच्या वक्षःस्थळी मिरवला ॥ आधींच उदार दाता भला ॥ त्याहीवरी सापडला धनकूप ॥९१॥
तैसा ओढवेल आता रस ॥ उद्धव आवडता श्रीकृष्णास ॥ विशेष बोधू चालिला गोपीकांस ॥ तो सुरस रस अवधारा ॥९२॥
असो वातवेगे रथ चालिला ॥ उद्धव गोकुळासमीप आला ॥ तो गाई परतल्या गोकुळा ॥ गोरजें झांकिला रथ तेथे ॥९३॥
गोरजस्नान पुण्यागळे ॥ रथासमवेत उद्धवे केले ॥ गोभार चहूंकडे दाटले ॥ उद्धवे थोपिले रथातें ॥९४॥
जे जे कृष्णे लाविली रीती ॥ तैसेचि नित्य गोपाळ वर्तती ॥ वेदाज्ञेप्रमाणे चालती ॥ विद्वज्जन जैसे का ॥९५॥
पुढे गाईंचे भार चालती ॥ मागे गोप हरिलीला गाती ॥ एक कृष्णवेष घेऊनि हाती ॥ मुरली धरुनि उभा असे ॥९६॥
घुमर्या पांवे टाळ मृदंग ॥ मधुर गायन राग उपराग ॥ हरिपदी धरूनि अनुराग ॥ लीला गाती हरीची ॥९७॥
कृष्णवेष जेणे धरिला ॥ केवळ कृष्णचि ऐसा भासला ॥ भोंवता गोपाळांचा मेळा ॥ चामरे वरी ढाळीत ॥९८॥
मुख दिसे त्याचे सांवळे ॥ गोचरणरज त्यावरी बैसले ॥ पांडुरवर्ण मुख शोभले ॥ ते वर्णिले नच जाय ॥९९॥
श्रीधर म्हणे मज येथे दृष्टांत ॥ स्फूरला तो ऐका प्रेमळ भक्त ॥ भीमातटविहारी पंढरीनाथ ॥ बुका उधळत त्यावरी ॥१००॥
उदार मुख चांगले ॥ त्याहीवरी शुभ्रवर्ण मिरवले ॥ जैसे इंद्रनीळासी घातले ॥ काश्मीराचे सतेज कवच ॥१॥
असो उद्धवे देखोनि तो महोत्साह ॥ अंगी दाटले अष्टभाव ॥ म्हणे धन्य धन्य या जनांचे दैव ॥ अद्भुत पुण्य आचरले ॥२॥
धन्य वृंदावनींचे तृणपाषाण ॥ लागले तेथे कृष्णचरण ॥ जन्मसार्थक परिपूर्ण ॥ केले याचि लोकांनी ॥३॥
गोकुळांत प्रवेशला रथ ॥ राजबिदीने सत्वर जात ॥ घरोघरी कृष्णलीला गात ॥ श्रवणी ऐकत उद्धव ॥४॥
गाई वाड्यांत प्रवेशती वेगेसी ॥ जे जे गाईसवे जैसी ॥ गोपीका रीती दाविती तैसी ॥ उद्धव जाता लक्षीतसे ॥५॥
श्रीकृष्णलीला कानी ऐकता ॥ गाईंसी पान्हा फुटे तत्त्वता ॥ कृष्णध्यानगीत गाता ॥ ऐकता गाई हुंबरती ॥६॥
यालागी हाती भरणा घेऊनी ॥ हरिलीला गाय एक कामिनी ॥ म्हणे वैकुंठपति चक्रपाणी ॥ नंदसदनी अवतरसी तू ॥७॥
हे रमापते निजकुळभूषणा ॥ हे राधावल्लभा गोवर्धनोद्धारणा ॥ हे मुरलीधरा पूतनाप्राणहरणा ॥ दुर्जनभंजना केशवा ॥८॥
ऐशा घरोघरी गोपी गाती गीत ॥ मग गाईसी पान्हा फुटत ॥ ते ते उद्धव विलोकीत ॥ प्रेमभरित जाहला ॥९॥
ऐकिल्याविण मुरलीस्वर ॥ एक गाई काढू नेई धार ॥ असो उद्धव नंदद्वार ॥ एकाएकी पावला ॥११०॥
नंदे उद्धव देखिला ॥ परमहर्षे पुढे धांविन्नला ॥ क्षेमालिंगन ते वेळा ॥ प्रेमभरे दिधले ॥११॥
रथ सोडिला बाहेर ॥ नंदे उद्धवाचा धरिला कर ॥ प्रवोशोनि निजमंदिर ॥ उत्तमासनी बैसविला ॥१२॥
उद्धवाची पूजा करून ॥ मग नंद पुसे वर्तमान ॥ म्हणे सखी की मनमोहन ॥ बोलता नयनी जल भरे ॥१३॥
उद्धवा कृष्ण आता न ये येथे ॥ उपेक्षूनि गेला आम्हांते ॥ सर्वमुखींहूनि माते ॥ कृष्णनाथे सोडविले ॥१४॥
पूतना तृणावर्त अघासुर ॥ कालिया मर्दूनि प्राशिला वैश्वानर ॥ गोवर्धन उचलूनि थोर ॥ पराक्रम दावियेला ॥१५॥
सद्गद होवोनि नंद सांगत ॥ तो यशोदाही आली तेथ ॥ मथुरेचा हरिप्रताप समस्त ॥ उद्धव सांगे तयांसी ॥१६॥
गेलिया दिवसापासूनि आघवे ॥ जे जे पुरुषार्थ केले माधवे ॥ ते ते सक्ळ वर्णिले उद्धवे ॥ ऐकता दोघे तटस्थ ॥१७॥
माया म्हणे काय करू विचार ॥ हरीविण शून्य दिसे मंदिर ॥ उद्धवा या स्थळी श्यामसुंदर ॥ जन्मला साचार जाण पा ॥१८॥
या पालखी हरि निजविला ॥ येचि न्हाणिये म्यां न्हाणिला ॥ याचि मंचकावरी पहुडला ॥ मजपुढे उद्धवा तो ॥१९॥
याचि डोल्हारा घडीघडी बैसे ॥ पहा शिरींची मयूरपिच्छे ॥ वनमाळांचे भार ज्या सुवासे ॥ मंदिर अवघे दुमदुमित ॥१२०॥
कृष्णाची घोंगडी पावा काठी ॥ हेचि गुंजाचे हार झळकत होते कंठी ॥ कृष्णाची बाळलेणी गोमटी ॥ माया दावीत उद्धवाते ॥२१॥
पदम वाघनखे बिंदली ॥ काढूनि उद्धवासी दाविली ॥ मग करुणास्वरे हांक फोडिली ॥ म्हणे वनमाळी की येसी ॥२२॥
गोविंदा कृष्णा यादवा ॥ जगन्मोहना हरि माधवा ॥ तुजविण आम्ही करुणार्णवा ॥ काय येथे करावे ॥२३॥
माझिया श्रीरंगा डोळसा ॥ सुकुमारा सांवळ्या पाडसा ॥ गेलासी टाकूनि राजसा ॥ पुराणपुरुषा श्रीहरे ॥२४॥
तुज म्यां बांधिले उखळी ॥ म्हणोनि रुसलासी वनमाळी ॥ तुजहाती गुरे राखविली ॥ नेणोनिया सर्वेशा ॥२५॥
तुज पायांवरी न्हाणिले ॥ मृत्तिका भक्षिता ताडिले ॥ माझे हात हे जळाले ॥ कैसी भ्रांत झाल्ये मी ॥२६॥
तुझे स्वरूप नेणो ह्रषीकेशी ॥ म्हणोनिया रुसलासी ॥ तू क्षीरसागरविलासी ॥ दाटविती गोपी तूंते ॥२७॥
तुझ्या पोटी जन्मला परमेष्ठी ॥ ह्रदयी ध्याय धूर्जटी ॥ तू सर्वावरिष्ठ जगजेठी ॥ झिडकारिती गोपी तूंते ॥२८॥
उद्धवा नलगे घरदार आता ॥ मी कोठे जाऊ सांग तत्त्वता ॥ उद्धव या गोष्टी ऐकता ॥ ह्रदयी जाहला सद्गद ॥२९॥
उद्धव म्हणे धन्य तुमचा भाग ॥ तुमच्या मंदिरी क्रीडला रमाधव ॥ नाना विलास कौतुकलाघव ॥ दाविले सर्व तुम्हांते ॥१३०॥
जे गजास्यजनकाचे ह्रदयरत्न ॥ जे पद्मोद्बवाचे देवतार्चन ॥ जे नारदादिकांचे गायन पूर्ण ॥ सनकादिकांची ध्येय मूर्ति ॥३१॥
जे मूळप्रकृतीचे निजमूळ ॥ जे निगमवृक्षाचे सुपक्व फळ ॥ तो ब्रह्मानंद वैकुंठपाळ ॥ तुमचे घरी क्रीडला ॥३२॥
ऐसे बोलता सरली यामिनी ॥ घरोघरी जाग्या जाहल्या कामिनी ॥ उद्धव प्रातःस्नानासी ते क्षणी ॥ जाता जाहला यमुनेसी ॥३३॥
तो घरोघरी हरिस्मरण होत ॥ दीप लाविले लखलखीत ॥ सडासंमार्जन करूनि प्रशस्त ॥ वास्तुपुझा करिताती ॥३४॥
मुखी गात हरीच्या लीला ॥ गोपी घालिती रंगमाला ॥ अंग प्रक्षालूनि अबला ॥ कनकांबरे नेसती ॥३५॥
दिव्य अलंकाराची प्रभा फाकली ॥ आरक्त कुंकुम शोभे निढळी ॥ अंजन विराजे नेत्रकमळी ॥ मुक्तजाळी शिरी शोभे ॥३६॥
जडितताटके कर्णी दिसती ॥ घुसळिका सतेज तळपती ॥ कर्णी मुक्तघोस ढाळ देती ॥ कृत्तिकापुंज जेवी गगनी ॥३७॥
विद्युत्प्राय झळकती चुडे ॥ मंदिरी घुसळिता प्रभा पडे ॥ कंठी एकावळी डोलती कोडे ॥ बाहुभूषणे शोभती ॥३८॥
माजी रत्नजडित कांची ॥ प्रभा फाके मुद्रिकांची ॥ पायीं नुपुरेपैंजणाची ॥ ध्वनि उमटे चालता ॥३९॥
देखता त्यांचा वदन चंद्र ॥ देवांगना लाजती समग्र ॥ हंसगमना त्या परम चतुर ॥ घरोघरि घुसळिती ॥१४०॥
घरोघरी डेरे घुमघुमती ॥ नाना कृष्णलीला गोपी गाती ॥ ते श्रवण करीत यमुनेप्रती ॥ उद्धव भक्त जातसे ॥४१॥
तमारिकन्येचे तीर ॥ उद्धव विलोकी समग्र ॥ म्हणे हे धन्य पाषाण तरुवर ॥ कृष्णदृष्टी उद्धरले ॥४२॥
तो वासरमणिचक्र प्रकटले ॥ मंथन गोपिकांचे संपले ॥ यमुनाजीवनालागी ते वेळे ॥ घट घेवोनि चालिल्या ॥४३॥
नंदद्वारावरूनि गोपी जात ॥ तो तेथे देखिला दिव्य रथ ॥ म्हणती कोणाचा स्यंदंत येथ ॥ कोण आला न कळेचि ॥४४॥
म्हणती निर्दय तो अक्रूर ॥ जेणे नेला जगदुद्धार ॥ आता कोण आला तो समाचार ॥ नेणवेचि साजणी ॥४५॥
ऐशा गोपी तेव्हा बोलती ॥ कृतांत भगिनीप्रति जाती ॥ तो येता देखिली दिव्य मूर्ती ॥ उद्धवाची तेधवा ॥४६॥
मित्रकन्यातीरी स्नान केले ॥ शुद्ध द्वादश टिळे रेखिले ॥ नेसला वसन पिवळे ॥ उत्तरीय वस्त्र रुळे दिव्य ॥४७॥
कृष्णाचसारिखे कृष्णभक्त ॥ अलंकार तैसेचि शोभत ॥ गोपिका निरखूनि पाहत ॥ तो तेथे उद्धव ओळखिला ॥४८॥
जैसा विद्युलतेचा ॥ तैसा अलंकारमंडित समग्र ॥ गजगामिनी मिळाल्या अपार ॥ उद्धवाभोवत्या ते वेळा ॥४९॥
अत्रिपुत्रवेष्टित तारागणे ॥ की मित्रवेष्टित जेवी किरणे ॥ उद्धव वेष्टिला प्रकारे तेणे ॥ सर्व कामिनी मिळोनिया ॥१५०॥
मस्तकी उदके पूर्ण घागरी ॥ कोणी रित्याचि घेतल्या शिरी ॥ देहभाव विसरोनि नारी ॥ कृष्णउपासक वेष्टिला ॥५१॥
उद्धवाचे चरण धरोनि भावे ॥ म्हणती पाठविलासी श्रीमाधवे ॥ गोकुळ टाकोनि मथुरेसी रहावे ॥ बरवे केशवे हे केले ॥५२॥
मातापितयांचा वृत्तांत ॥ घ्यावया तुज पाठविले येथ ॥ येर्हवी आणिक त्याचा आप्त ॥ येथे कोणी दिसेना ॥५३॥
तो तेथे एक भ्रमर ॥ अकस्मात सुंदर ॥ रुंजी घालीत क्षणमात्र ॥ गोपिकांनी देखिला ॥५४॥
अन्योक्तीने गोपी बोलत ॥ कृष्णापासूनि आलासि त्वरित ॥ तूही कृष्णवर्ण दिसतोसी सत्य ॥ पाहसी चित्त गोपिकांचे ॥५५॥
कळलासी तू कृष्णाचा हेर ॥ पाळती घेतोसी समग्र ॥ तू शठाचा मित्र शठ साचार ॥ कासया येथे रुणझुणसी ॥५६॥
एका कमळावरी चित्त ॥ न बैसे तुझे सावचित ॥ दशदिशा हिंडसी व्यर्थ ॥ चंचळ मन सदा तुझे ॥५७॥
तू ज्यापासूनि आलासी पाही ॥ त्याचे मन न बैसे एके ठायी ॥ भ्रमरा तू मथुरेसी जाई ॥ सांग हरीसी जाऊनिया ॥५८॥
म्हणावे मथुरेच्या नारी ॥ आता भोगी तू पूतनारी ॥ आम्हांहूनि कुब्जा सुंदरी ॥ तुवां निवडिली डोळसा ॥५९॥
परम अपवित्र कुब्जा ॥ तिशी रतलासी विश्वबीजा ॥ तुझ्यायोग्य जोडा अधोक्षजा ॥ दासि सर्वथा नव्हेचि ॥१६०॥
सोने आणि शेण साच ॥ जोडा नव्हे कांच आणि पाच ॥ तैसी कुब्जा आणि परब्रह्म साच ॥ जोडा नव्हे सर्वथा ॥६१॥
की हिरा आणि गार ॥ की वायस आणि खगेंद्र ॥ तैसी कुब्जा आणि कमलनेत्र ॥ जोडा नव्हे सर्वथा ॥६२॥
समुद्र आणि सौंदणी ॥ की खद्योत आणि वासरमणी ॥ तैसी कुब्जा आणि चक्रपाणी ॥ जोडा नव्हे सर्वथा ॥६३॥
की ओहळ आणि भागिरथी ॥ की अजा आणि ऐरावती ॥ तैसी कुब्जा आणि जगत्पती ॥ जोडा नव्हे सर्वथा ॥६४॥
की पेंड आणि कर्पूर ॥ की हंस आणि घुबड अपवित्र ॥ तैसी कुब्जा आणि श्रीधर ॥ जोडा नव्हे सर्वथा ॥६५॥
की कोळसा आणि कस्तूरी ॥ की दरिद्री आणि विष्णूची अंतुरी ॥ तैसी कुब्जा आणि कंसारी ॥ जोडा नव्हे सर्वथा ॥६६॥
संत आणि निंदक ॥ पंडित आणि अजारक्षक ॥ तैसी कुब्जा आणि जगन्नायक ॥ जोडा नव्हे सर्वथा ॥६७॥
की वेदांत आणि कोकशास्त्र ॥ की रंक आणि सहस्त्रनेत्र ॥ तैसी कुब्जा आणि घनश्यामगात्र ॥ जोडा नव्हे सर्वथा ॥६८॥
की अमृत आणि धुवण ॥ की परीस आणि पाषाण ॥ इतर खेडी आनंदवन ॥ जोडा नव्हे सर्वथा ॥६९॥
की भूत आणि कर्पूरगौर ॥ की षंढ आणि प्रतापशूर ॥ तैसी कुब्जा आणि कमलावर ॥ जोडा नव्हे सर्वथा ॥१७०॥
परमचतुर जगज्जीवन ॥ भाळला कुब्जानारी देखोन ॥ डोळे पिचके मुडे कान ॥ मध्ये नासिक बैसले ॥७१॥
कोळशाहुनि कुब्जा गोरी ॥ उवा सदा बुजबुजती शिरी ॥ गुडघे घासीत जाय चांचरी ॥ तीस मुरारी भाळलासी ॥७२॥
रडत रडत सदा बोले ॥ टांचा उलल्या खिरडत चाले ॥ लंबस्तन अंग वाळले ॥ वस्त्र फाटले चहूंकडे ॥७३॥
जैसा मृदंगमध्य देख ॥ तैसा माज तिचा बारीक ॥ मर्कटाऐसे तिचे मुख ॥ तीस रमानायक भाळला ॥७४॥
हा तरी नंदाचा गुराखा ॥ ते कंसाची दासी देखा ॥ शोधूनि जोडा नेटका ॥ बरा पाहिला विधीने ॥७५॥
एक बोले बरवंटा ॥ कुब्जा वृद्ध हरि धाकुटा ॥ जो हरि वंद्य नीळकंठा ॥ तिजशी तो चेष्टा करीतसे ॥७६॥
एक म्हणे कुब्जेने लाविला चंदन ॥ त्यात काही घातले मोहन ॥ तरीच भुलला जगज्जीवन ॥ कौटिल्य पूर्ण केले तिने ॥७७॥
गदगदा हासती गोरटी ॥ ब्रह्मा उद्भवला ज्याचे पोटी ॥ तो कुब्जेती एकांतगोष्टी ॥ करिताहे हे नवल पै ॥७८॥
की तिने केला प्रेमाचा फांसा ॥ त्यांत गोविले ह्रषीकेशा ॥ तिचा भाव देखोनि परमपुरुषा ॥ प्रीति बहुत वाढली ॥७९॥
एक म्हणती तिने तप केले बहुत ॥ तरीच वश जाहला भगवंत ॥ आम्ही हीनभाग्य यथार्थ ॥ काय व्यर्थ गोष्टी ह्या ॥१८०॥
ऐसे बोलता गोपाळा ॥ टपटपा आसुवे आली डोळा ॥ म्हणती रे भ्रमरा चंचळा ॥ जाय गोवळ्या सांगावया ॥८१॥
म्हणावे गोपिका समस्त ॥ हरि तुझ्या वियोगे पावल्या मृत्य ॥ प्रेते तरी येऊनि त्वरित ॥ विलोकी तू दयाळा ॥८२॥सांग गोपिका जाळिल्या सकळिक ॥ जाहली समस्तांची राख ॥ त्या स्थळावरी येऊनि नावेक ॥ मुरली वाजवी एकदा ॥८३॥
एक म्हणती सांगावे वनमाळी ॥ गोपींची रक्षा उदकी टाकिली ॥ तू येऊनि त्या जळी ॥ स्नान करी भगवंता ॥८४॥
आम्हांसी जाळिले ज्या स्थळावरी ॥ तेथे क्षणभरी उभा राहे तरी ॥ पांवा वाजवूनि मुरारी ॥ पाववी पदा आपुल्या ॥८५॥
ऐसी गोपिकांची भक्ति देखोनि ॥ उद्धव सद्गद जाहला मनी ॥ अश्रु पातले नयनी ॥ म्हणे धन्य कामिनी गोकुळीच्या ॥८६॥
धन्य यांची भक्ति साचार ॥ वश केला कमलावर ॥ तो भ्रमर गेला तेथूनि दूर स्वइच्छेने तेधवा ॥८७॥
मग उद्धवासी गोपबाळा ॥ सद्गद बोलती ते वेळा ॥ श्रीरंग आम्हांसी कंटाळला ॥ टाकूनि गेला मथुरेसी ॥८८॥
गोपिका आम्ही वज्राच्या कठिण ॥ अजूनि आमुचे वाचले प्राण ॥ आम्हांसी न ये कदा मरण ॥ कृष्णवियोग होताचि ॥८९॥
आम्हां काळ मारीच देख ॥ भोगवीत वियोगाचे दुःख ॥ अंतरला वैकुंठनायक ॥ किती कष्ट भोगावे ॥१९०॥
उद्धवा तू जाय मथुरापुरा ॥ आठव येई यादवेंद्रा ॥ म्हणावे विसरू नको गोपदारा ॥ परम उदारा श्रीपति ॥९१॥
उद्धवा अक्रूर तो परम क्रूर ॥ तू तरी भेटवी यादवेंद्र ॥ निर्दोष यश जोडेल साचार ॥ तुजलागी प्राणसखया ॥९२॥
उद्धवा गोकुळ आहे जो जीवंत ॥ तोवरी भेटवी रमानाथ ॥ नरदेह गेलिया भगवंत ॥ कैचा मग आम्हांते ॥९३॥
घेऊनि तुजदेखता पाषाण ॥ मस्तक फोडूनि देऊ प्राण ॥ मग तू श्रीहरीसी सांग जाऊन ॥ पावल्या मरण गोपिका ॥९४॥
तू जगद्वंद्याचा आवडता बहुत ॥ यालागी तुज सांगितला वृत्तांत ॥ तुझ्या वचने कृष्ण वर्तत ॥ हे आम्हांसी पूर्ण कळलेसे ॥९५॥
उदकाविण जैसा मीन ॥ तळमळी जाऊ पाहे प्राण ॥ तैसे यदुकुळटिळकाविण ॥ आम्हांसी जाहले जाण पा ॥९६॥
जैसे कृपणाचे धन गेले ॥ जन्मांध अरण्यात पडले ॥ अक्रूरे आमुचे राज्य बुडविले ॥ हरीसी नेले मथुरेसी ॥९७॥
श्रीकृष्ण हाचि रोहिणीवर ॥ तममय कुहू तोचि अक्रूर ॥ आम्हां चकोरांसी निराहार ॥ पाडिले साचार उद्धवा ॥९८॥
आम्ही चातके परम दीन ॥ श्रीरंग वोळला कृपाघन ॥ अक्रूर दुष्ट प्रभंजन ॥ मेघश्याम दुरी नेला ॥९९॥
कृष्णवियोगाचा महापूर ॥ त्यांत लोटुनि गेला अक्रूर ॥ उद्धवा तू चतुर पोहणार ॥ काढी बाहेर आम्हांते ॥२००॥
हरिवियोगवणवा सबळ ॥ त्यां जळतो आम्ही सकळ उद्धवा तू जलद दयाळ ॥ वर्षे आम्हांवरी पै ॥१॥
आमुचे निधान ह्रषीकेशी ॥ मध्यें अक्रूर आला विवशी ॥ उद्धवा तू पंचाक्षरी होसी ॥ निधान घरासी आणी ते ॥२॥
हरिवियोगरोग दारुण ॥ तेणे सकळही जाहलो क्षीण ॥ कृष्णकृपारसराज देऊन ॥ अक्षय करी आम्हाते ॥३॥
उद्धवा तू जोशी सुजाण ॥ कृष्णप्राप्तीचे देई लग्न ॥ पांचही पंचके निरसोन ॥ साधी कारण हे आधी ॥४॥
तनमनधनेसी अनन्य ॥ उद्धवा तुज आलो शरण ॥ कृष्णप्राप्तीसी कारण ॥ सद्गुरु तू आम्हांते ॥५॥
ऐसे बोलोनि कामिनी ॥ लागल्या दृढ तयाच्या चरणी ॥ ते देखोनिया उद्धवाच्या नयनी ॥ प्रेमांबुधारा लोटल्या ॥६॥
उद्धव म्हणे यालागून ॥ कैसे सांगू ब्रह्मज्ञान ॥ यांनी दृढ धरिली मूर्ति सगुण ॥ ते कैसी उडवूनि टाकू मी ॥७॥
सगुण उच्छेदिता देखा ॥ आतांचि प्राण देतील गोपिका ॥ मग म्हणे विरिंचीच्या जनका ॥ बुद्धिदाता तू होई ॥८॥
उद्धवे नेत्र झांकून ॥ मनी आठविले कृष्णचरण ॥ आता गोपिकांसी दिव्य ज्ञान उपदेशी तू श्रीरंगा ॥९॥
उद्धव अष्टभाव सांवरोन ॥ म्हणे ऐका वो तुम्ही सावधान ॥ कृष्ण दाखवा सत्वर म्हणोन ॥ कोण म्हणती तुम्हांमाजी ॥२१०॥
कोण इंद्रियांचा चाळक ॥ कोण आहे बुद्धीचा प्रेरक ॥ अंतःकरण आठवा सकळिक ॥ कोण धरवी विचारा ॥११॥
तुमच्या नेत्रा कोण दाखवी ॥ पदी गमनागमन कोण करवी ॥ श्रवणी गोष्टी ऐकवी ॥ तोचि बरवा शोधावा ॥१२॥
पंचवीस तत्त्वांचा जाणता तो कोण विचारा पुरता ॥ जो स्थावरजंगम निर्मिता ॥ व्यापूनि वेगळा कोण तो ॥१३॥
तुमचा देह स्त्रियांची आकृती ॥ परी आंत कोण नांदे निश्चिती ॥ स्त्री पुरुष नपुसक व्यक्ती ॥ कोणती स्थिती विचारा ॥१४॥
बहुत घागरी रांजण ॥ स्त्री पुरुष नामाभिधान ॥ परी आत बिंबला चंद्र पूर्ण ॥ स्त्री पुरुष नव्हे ती ॥१५॥
जैसे एकाचि सकळ गुणी ॥ ओविले नाना जातीचे मणी ॥ परी सूत्र एक अभेदपणी ॥ चक्रपाणी तैसा असे ॥१६॥
ऐसे ज्ञान ऐकता ते क्षणी ॥ गदगदा हासल्या नितंबिनी ॥ म्हणती हे सांगावयालागूनी ॥ पाठविले काय हरीने ॥१७॥
काय करावे कोरडे ज्ञान ॥ नसतेंचि दाविती आम्हांलागून ॥ प्रत्यक्ष हातीचे देऊन ॥ पळत्यापाठी लागावे ॥१८॥
प्रत्यक्ष श्यामसुंदर टाकून ॥ कोठे पाहु निर्गुण ॥ अचिंत्य अव्यक्त म्हणोन ॥ सांगावया आलासी ॥१९॥
हातींचा परिस टाकोनिया ॥ साधू जावे धातुक्रिया ॥ सगुणमूर्ति सांडूनिया ॥ निर्गुण वाया कां कथिसी ॥२२०॥
उद्धव म्हणे ऐका साचार ॥ एक कांचन नाना अलंकार ॥ तैसा व्यापक एक यदुवीर ॥ चराचर भरलासे ॥२१॥
तोचि संचला तुमचे ह्रदयी ॥ सर्व व्यापूनि जो सदा विदेही ॥ त्याहूनि रिता ठावचि नाही ॥ नसते प्रवाही पडो नका ॥२२॥
दिसती मायेचे विकार ॥ तितुके स्वयेंचि निराकार ॥ क्षणिक दिसे जळगार ॥ तत्काळ नीर होय पै ॥२३॥
गोपी म्हणती ते अवसरी ॥ हाती घेवोनि सुरस मोहरी ॥ नाचे रासमंडळामाझारी ॥ तोचि हरी दावी का ॥२४॥
खोडी करितो वनमाळी ॥ यालागी माया बांधी उखळी ॥ मंद मंद रडे नेत्र चोळी ॥ ते मुर्ति सांवळी दावी का ॥२५॥
आमुच्या घरासी येत घडीघडी ॥ करी नानापरींच्या खोडी ॥ आमुची जडली नावडी ॥ याच रूपी जाण पां ॥२६॥
उद्धव म्हणे ऐका एक ॥ सर्वां घटमठी निराळ व्यापक ॥ नाना उदके परी एक अर्क ॥ जगन्नायक तैसा असे ॥२७॥
सर्व मातृकांत एक ओंकार ॥ तैसा सर्वव्यापी सर्वेश्वर ॥ परी तुम्हांसी नकळे साचार ॥ भ्रम थोर पडियेला ॥२८॥
गळां मोती असोनि निवाडे ॥ लोकांचिया गळा पडे ॥ तैसे तुम्हांसी पडिलें साकडे ॥ जवळी हरि असोनिया ॥२९॥
गोपी म्हणती ऐका गोष्टी ॥ पीतवसनावरी कांस गोमती ॥ वनमाळा रुळती कंठी ॥ आपादपर्यंत साजिर्या ॥२३०॥
उदार श्रीमुख सांवळे ॥ आकर्ण विकासली नेत्रोत्पले ॥ जो वना जाय घेवोनि गोवळे ॥ बिदीवरूनि मिरवत॥३१॥
जाय छंदे पांवा वाजवीत ॥ हुंबरी घाली गडियासवेत ॥ यमुनेच्या वाळवंटी लोळत ॥ तोचि दावी आम्हांते ॥३२॥
हांसे घडीघडी पाहे आम्हांकडे ॥ सुंदर डोळे मोडी वांकडे ॥ तेचि परब्रह्म रोकडे ॥ दावीं आम्हांसी उद्धवा ॥३३॥
उद्धव म्हणे तुम्हांजवळी असता ॥ दाखवू कोणीकडे मागुता ॥ मृगनाभी कस्तूरी असता ॥ परी तत्त्वता न कळे तया ॥३४॥
केले दर्पणाचे निकेतन ॥ बहुत बिंबे दिसती जाण ॥ आत्मस्वरूप एक असोन ॥ चराचर तैसे भासले ॥३५॥
एक भिंती चित्रे नाना ॥ तैसी दिसे चराचररचना ॥ अविनाश एक वैकुंठराणा ॥ सर्गस्थित्यंतकाळीही ॥३६॥
गोपी बोलती ते वेळा ॥ अघासुर जेणे उभा चिरिला ॥ कालियामस्तकावरी नाचला ॥ तो घननीळ दावी का ॥३७॥
अंगुलीवरी गोवर्धन ॥ उभा उचलोनि सप्त दिन ॥ द्वादश गावे अग्नि गिळून ॥ कमळपत्राक्ष अक्षयी ॥३८॥
ठाण मांडूनि वाजवी मुरली ॥ आमुची चित्तवृत्ति तेथे मुराली ॥ संसारवासना सकळ हरली ॥ परी नाही पुरली असोसी ॥३९॥
उद्धव म्हणे ऐका विचार ॥ शरीरविरहित यादवेंद्र ॥ त्यासी नाहीत चरणकर ॥ मुरली कोठे वाजविली ॥२४०॥
सप्त धातूंविरहित ॥ चहूं देहांसी अतीत ॥ जो पिंडब्रह्मांडातीत ॥ मुरली कोठे वाजवी ॥४१॥
क्षणिक दावावया लीला ॥ सगुण वेष हरीने धरिला ॥ परि तो सकळ रंगांवेगळा ॥ काळ सांवळा नसे तेथे ॥४२॥
मायेने रचिले जगडंबर ॥ परी त्यासी ठाऊक नाही समाचार ॥ पुढे होईल निराकार ॥ हाही हेतु नसेचि ॥४३॥
त्याच्या सत्तेने जग चाले समस्त ॥ परी तो मन न घाली तेथ ॥ ऐसा तो अवयवरहित ॥ त्यासी सगुणत्व लावू नका ॥४४॥
गोपी म्हणती उद्धवाप्रती ॥ नागवे उघडे बैसले एकांती ॥ तुझे ज्ञान त्यांजप्रती ॥ सांगे जाय उद्धवा ॥४५॥
गुदद्वारी टांच लावून ॥ कोंडूनि बैसले प्रभंजन ॥ त्यासी सांगे तुझे ज्ञान ॥ आम्हां सगुण हरि दावी ॥४६॥
ऐके उद्धवा एक वचन ॥ तू ज्याच्या कृपेने बोधितोसी ज्ञान ॥ तो पूतनाप्राणशोषण ॥ दावी आम्हा एकदा ॥४७॥
जो श्रीकुचदुर्गविहार ॥ जो भक्तमंदिरांगणमंदार ॥ मुख सुहास्य अति उदार ॥ यादवेंद्र दावी तो ॥४८॥
कौस्तुभ झळके वक्षःस्थळी ॥ दिव्य टिळक विलसे भाळी ॥ कोटि अनंगाहूनि आगळी ॥ तोचि सांवळी मूर्ति दावी ॥४९॥
जो वृंदावनभुवनविलासी ॥ विश्वरूप मुख दावी मातेसी ॥ ज्याची लीला वर्णिता सौख्य सर्वांसी ॥ तोचि आम्हांसी दावी का ॥२५०॥
उद्धवा कृष्णप्राप्ति होय ॥ ऐसा सांग आम्हांसी उपाय ॥ कोण्या साधने यदुवर्य ॥ हातासी ये सांग पा ॥५१॥
उद्धव म्हणे हेचि साधन ॥ दृढ धरावे संतांचे चरण ॥ त्यांच्या वचनी विश्वास धरून ॥ करावे श्रवण भावार्थे ॥५२॥
करिता सारासारविचार ॥ तेणे शुद्ध होय अंतर ॥ आत्मरूप चराचर ॥ सहजचि मग दिसतसे ॥५३॥
गोपी म्हणती उद्धवासी ॥ तुवां जे ज्ञान बोधिले आम्हांसी ॥ ते सर्व आले प्रत्ययासी ॥ दृष्टांतेसी समजलो ॥५४॥
परी सगुणरूप वेल्हाळ ॥ आकर्ण राजीवनयन विशाळ ॥ अतिवेधक तमालनीळ ॥ कैसा विसरू उद्धवा ॥५५॥
येरू म्हणे जाणोनि निर्वाणज्ञान ॥ मग सगुण निर्गुण दोन्ही समान ॥ अलंकाररूपे मिरवे सुवर्ण ॥ दुजेपण तेथे काय ॥५६॥
तंतुरूपे अंबर साचार ॥ तरंगरूपे एक सागर ॥ तैसा सगुणअवतार सर्वेश्वर ॥ नाही विचार दूसरा ॥५७॥
बचकेत पाणी न सांपडे ॥ परी गाररूपे हाता चढे ॥ तैसे सगुण हरीचे रूपडे ॥ भक्तांलागी जाहले ॥५८॥
सुवास दाटला मंदीरी ॥ परी अबलासी न कळे निर्धारी ॥ तो दृष्टी देखिली कस्तूरी ॥ मग अंतरी समजले ॥५९॥
कस्तुरी दिसतसे सगुण ॥ सुवास तो केवळ निर्गुण ॥ थिजले विघुरले घृत पूर्ण ॥ सगुण निर्गुण तैसेंचि ॥२६०॥
सोन्याचे कडे घालविले ॥ तरी काय सोने मोलासी तुटले ॥ तैसे सगुण अवतरले ॥ परी ते संचले परब्रह्म ॥६१॥
गुरुमुखे जाणावे निर्गुण ॥ सगुणी भजावे आवडीकरून ॥ ऐसे गोपी ऐकोन ॥ धरिले चरण उद्धवाचे ॥६२॥
प्रार्थूनिया उद्धव सखा ॥ चारी मास राहविती गोपीका ॥ ज्या सदा अंतरी सद्भाविका ॥ यदुनायका न विसरती ॥६३॥
उद्धवाच्या मुखे ब्रह्मज्ञान ॥ गोपी करिती नित्य श्रवण ॥ तेणे चित्ताचे मळ तुटोन ॥ दिव्य ज्ञान ठसावले ॥६४॥
गोपींचा चित्ततवा जाहला ॥ त्रिविधतापमळ बैसला ॥ त्याचाचि उद्धवे आरसा केला ॥ त्यांत स्वरूप बिंबले ॥६५॥
उद्धव परम पंचाक्षरी ॥ पंचभूते झांकूनि निर्धारी ॥ गोपी आणिल्या स्वरूपावरी ॥ साक्षात्कारेकरूनिया ॥६६॥
उद्धव वैद्य परम सतेज ॥ अर्धमात्रा दिली रसराज ॥ संशयरोग निरसोनि तेजःपुंज ॥ सर्व गोपिका त्या केल्या ॥६७॥
घरोघरी गोपी नेती ॥ उद्धवाची पूजा करिती ॥ नित्य कीर्तन ऐकती ॥ त्याच्या मुखेकरूनिया ॥६८॥
उद्धव उठोनि लवलाहे ॥ नित्य गाईंसवे वना जाये ॥ अवलोकूनि हरीचे ठाये ॥ आश्चर्य करी अंतरी ॥६९॥
जे जे स्थळी कृष्णे क्रीडा केली ॥ तेथे उद्धव नमस्कार घाली ॥ नित्य सोहळा गोकुळी ॥ चारी मास जाहला ॥२७०॥
नंदयशोदेचा निरोप घेतला ॥ पुसोनिया गौळिया सकळा ॥ उद्धव मथुरेसी चालिला ॥ भेटावया हरीते ॥७१॥
वस्त्रे अलंकार हरीलागी देखा ॥ देती आणूनि गोपिका ॥ म्हणती उद्धवा सांगे यदुनायका ॥ आम्हांसी कदा न विसरावे ॥७२॥
नंद यशोदा गोपिबाळा ॥ उद्धव समस्ती बोळविला ॥ म्हणती उत्तम काळ क्रमिला ॥ उद्धवाचे संग्तीने ॥७३॥
रथी बैसोनि सत्वर ॥ उद्धव पावला मथुरापुर ॥ दृष्टी देइला यदुवीर ॥ साष्टांग नमस्कार घातला ॥७४॥
अहेर सकळांचे अर्पून ॥ सांगितले सर्व वर्तमान ॥ मग उद्धव आपुले सदन ॥ प्रवेशता जाहला ॥७५॥
हरिविजयग्रंथ सुरस ॥ एकविसावा अध्याय सुधारस ॥ सज्जननिर्जर रात्रंदिवस ॥ सावकाशे सेवोत का ॥७६॥
अहो हा अध्याय एकविसावा ॥ केवळ संतांचा प्राणविसावा ॥ सदा सर्वदा हाचि पाहावा ॥ सकळ कार्य टाकूनिया ॥७७॥
ब्रह्मानंदे हा बरवा ॥ केला अध्याय एकविसावा ॥ सांडूनिया सकळ धावा ॥ येथे विसावा भक्त हो ॥७८॥
ब्रह्मानंदा परात्परा ॥ पुराणपुरुषा दिगंबरा ॥ भक्तपालका श्रीधरवरा ॥ अढळ अचळ अभंगा ॥७९॥
इति श्रीहरिविजयग्रंथ ॥ संमत हरिवंशभागवत ॥ निजभक्त सदा परिसोत ॥ एकविंशतितमोऽध्याय गोड हा ॥२८०॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥अध्याय ॥२१॥ ओंव्या ॥२८०॥
No comments:
Post a Comment