अध्याय २०
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकुलदेवतायै नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥
जय जय कमललोचना कांचनांबरा ॥ कमनीयरूपा कमलाधरा ॥ कर्ममोचका किल्मिषहरा ॥ अरिसंहारा कमठरूपा ॥१॥परमानंदा परमपुरुषा ॥ परात्परा पयोब्धिवासा ॥ पद्मजनका परमहंसा ॥ पंढरीशा परमात्मया ॥२॥
गोपविहारा गोवर्धनोद्धारणा ॥ गोपीवल्लभा गोपपाळणा ॥ गोकुळपालका गोरक्षणा ॥ गोरसचोरा गोविंदा ॥३॥
राधारंगा रासविहारा ॥ राघवा रजनीचरसंहारा ॥ रावणांतका राजेंद्रा ॥ राजीवाक्षा ऋणमोचका ॥४॥
मकरकुंडल अमणिमयहारा ॥ मदनारिप्रिया मुरसंहारा ॥ मंगलधामा मंदरोद्धारा ॥ मणिकंधरा मनवेधका ॥५॥
ब्रह्मानंदा यदुकुळभूषणा ॥ पुढे बोले ग्रंथरचना ॥ मथुरेसी जाऊनि वैकुंठराणा ॥ काय करिता जाहला ॥६॥
एकोणिसावे अध्यायी कथन ॥ कंस मारूनि केले बंदिमोचन ॥ त्यावरी जाहले मौजिबंधन ॥ मग नंद गेला गोकुळा ॥७॥
यावरी सुदानमाना ब्राह्मण ॥ संकर्षण आणि कृष्ण ॥ गुरुगृहाप्रति तिघेजण ॥ विद्याभ्यासा चालिले ॥८॥
अवंतीनगरीमाजी जाण ॥ महाऋषि नाम सांदीपन ॥ जो शांत दांत ज्ञानी निपुण ॥चारी वेद मुखोद्गत ॥९॥
जो सर्वज्ञ परिपूर्ण ॥ ज्यासी नाही ज्ञानभिमान ॥ जो वेदाज्ञा मानी प्रमाण ॥ त्यासी शरण आधी जावे ॥१०॥
परदारा आणि परधन ॥ येथे पराङ्मुखचित्त पूर्ण ॥ जो कदा नुच्चारी परदोषगुण ॥ त्यासी शरण आधी जावे ॥११॥
जो सर्वज्ञ दयाळु उदास ॥ जो सदाचारवृत्ति जैसा चंडांश ॥ सर्वांभूती दया विशेष ॥ त्यासी शरण आधी जावे ॥१२॥
जो तरोनि तारिता होये ॥ शिष्या जो ब्रह्मरूप पाहे ॥ मानापमानी चित्त सम राहे ॥ त्यासी शरण आधी जावे ॥१३॥
आपण ज्यासी विद्यादान केले ॥ ते शिष्य दुजिया शरण गेले ॥ चित्त्त क्रोधे न खवळे ॥ त्यासी शरण आधी जावे ॥१४॥
जन झुगारिती निंदेचे पाषाण ॥ पुढे केले क्षमा-ओडवण ॥ मनात नुपजे द्वेष पूर्ण ॥ त्यासी शरण आधी जावे ॥१५॥
पुत्राहूनि विशेष गाढे ॥ शिष्यावरी प्रेम चढे ॥ जो शिष्या न घाली सांकडे ॥ त्यासी शरण आधी जावे ॥१६॥
वर्ते आपुल्या वर्णाश्रममेळी ॥ न चाले कदा वांकुडे पाउली ॥ सदा आत्मरूपी वृत्ति रंगली ॥ त्यासी शरण आधी जावे ॥१७॥
पिंडब्रह्मांड नाशिवंत ॥ आत्मरूप एक शाश्वत ॥ जे जाणोनि सदा विरक्त ॥ त्यासी शरण आधी जावे ॥१८॥
शरीरप्रारब्धे भाग्य आले ॥ अथवा एकदांचि सर्व बुडाले ॥ परी हर्शामर्षपंके मन न मळे ॥ त्यासी शरण आधी जावे ॥१९॥
पिपीलिका आणी कमलासन ॥ इंद्र आणि दरिद्री दीन ॥ राजा रंक अवधे समान ॥ त्यासी शरण आधी जावे ॥२०॥
वैकुंठापासोनि नागलोकपर्यंत ॥ भूताकृति ज्या ज्या दिसत ॥ त्या त्या हरिरूप भासत ॥ त्यासी शरण आधी जावे ॥२१॥
जैसा नाना घागरी आणि एक रांजण ॥ त्यांत भासे एक चंडकिरण ॥ तैसे ज्यासि न दिसत स्त्रीपुरुषभान ॥ त्यासी शरण आधी जावे ॥२२॥
जो बोले जनी हिंडे ॥ परि ज्याची समाधि न मोडे ॥ वादप्रतिवाद नावडे ॥ त्यासी शरण आधी जावे ॥२३॥
पृथ्वीचे राजे भाग्यवंत ॥ नित्य ज्याच्या दर्शना येत ॥ परी मी थोर हा नुपजे हेत ॥ त्यासी शरण आधी जावे ॥२४॥
भाग्यवंताचे करावे स्तवन ॥ दीनदुर्बळांचे हेळण ॥ हे ज्यापाशी नाही लक्षण ॥ त्यासी शरण आधी जावे ॥२५॥
प्रपंच जाहला किंवा नाही ॥ हे स्मरण नसे काही ॥ जो बुडाला ब्रह्मानंदडोही ॥ त्यासी शरण आधी जावे ॥२६॥
इतुक्या लक्षणी अलंकृत ॥ त्यावरी गुरुभजनी नित्य हेत ॥ प्रेमभरे सदा डुल्लत ॥ त्यासी शरण आधी जावे ॥२७॥
ज्यासी हरिकीर्तनी आवडी ॥ संतदर्शना घाली उडी ॥ तीर्थक्षेत्रमहिमा न खंडी ॥ त्यासी शरण आधी जावे ॥२८॥
इतुक्या चिन्ही मंडित पूर्ण ॥ महाराज ऋषि सांदीपन ॥ त्याच्या आश्रमापुढे शेषनारायण ॥ लोटांगण घालिती ॥२९॥
सांदीपन करिता अनुष्ठान ॥ तो कळले आले रामकृष्ण ॥ तात्काळ बाहेर आला धांवोन ॥ सद्गद मन जाहले ॥३०॥
जन्मादारभ्य अनुष्ठानाचे फळ ॥ घरा आला वैकुंठपाळ ॥ ऋषीच्या नेत्री वाहे प्रेमजळ ॥ धांवोनि घननीळ पाय धरी ॥३१॥
सांदीपने कृष्णासी उचलून ॥ ह्रदयी धरिला मनमोहन ॥ म्हणे बा रे तुझे दुर्लभ दर्शन ॥ ब्रह्मादि देवा समस्ता ॥३२॥
ऋषीने बळिभद्रासी दिधले क्षेम ॥ सुदामा आलिंगिला सप्रेम ॥ आसनी बैसवोनि विप्रोत्तम ॥ वार्ता क्षेम पुसतसे ॥३३॥
हरीने सांगितले वर्तमान ॥ म्हणे स्वामीसी आम्ही आलो शरण ॥ तनमनधनेसी अनन्य ॥ म्हणोनि चरण धरियेले ॥३४॥
सांदीपन म्हणे कृष्णनाथा ॥ तू जगद्गुरु जगत्पिता ॥ तुझे नाम वदनी गाता ॥ सकळ दुरित संहरे ॥३५॥
तुवा हंसरूपेकरून ॥ उपदेशिला चतुरानन ॥ सनकादिकांसही ज्ञान ॥ उपदेशूनि उद्धरिले ॥३६॥
तू मायानियंता ह्रषीकेशी ॥ पूर्णब्रह्मानंद ज्ञानराशी ॥ तो तू मज शरण आलासी ॥ हेचि आश्चर्य वाटते ॥३७॥
तू सकळ देवांचा निर्मिता ॥ अज अजित कर्ता हर्ता ॥ त्या तुज देवकी माता वसुदेव पिता ॥ हेचि आश्चर्य वाटते ॥३८॥
तू निर्गुण निःसंग निर्विकारी ॥ सदा तृप्त बाह्यांतरी ॥ तो तू गोकुळी करिसी चोरी ॥ हेचि आश्चर्य वाटते ॥३९॥
तू ऊर्ध्वरेता ब्रह्मचारी ॥ महातापसी वंदिती शिरी ॥ तो तू रासमंडळी भोगिशी नारी ॥ हेचि आश्चर्य वाटते ॥४०॥
तू काळासी शासनकर्ता ॥ मायेने बागुल आला रे म्हणत ॥ भयभीत होसी अनंता ॥ हेचि आश्चर्य वाटते ॥४१॥
तुज जे अनन्यशरण ॥ त्यांचे संकट वारिसी तू भगवान ॥ तो तू यज्ञपत्न्यासी मागसी अन्न ॥ हेचि आश्चर्य वाटते ॥४२॥
तुवा त्रिविक्रमरूप धरिले ॥ पूर्वी बलिदर्पहरण केले ॥ त्या तुज मायेने पाळण्यांत निजविले ॥ हेचि आश्चर्य वाटते ॥४३॥
योगयाग जे साधित ॥ त्यांसी दर्शन देसी तू अनंत ॥ तो तू गोवळ्यांसवे खासी भात ॥ हेचि आश्चर्य वाटते ॥४४॥
मज द्यावयासी थोरपण ॥ आश्रमा आले शेष नारायण ॥ लोकसंग्रहाकारण ॥ गुरुभजन वाढवावया ॥४५॥
ऐका श्रोते हो सावधान ॥ गुरुभक्तांचे कैसे लक्षण ॥ परमात्मा आदिनारायण ॥ तोही शरण गुरूसी रिघे ॥४६॥
जे तनमनधनेसी शरण ॥ गुरुवचन ज्यांसी प्रमाण ॥ न पाहती गुरूचे दोषगुण ॥ हेचि लक्षणे शिष्याचे ॥४७॥
गुरु सांगती तेचि आचरती ॥ गुरुसमान आपण न म्हणती ॥ दिवसेंदिवस चढे भक्ती ॥ हेचि लक्षण शिष्याचे ॥४८॥गुरु हा केवळ ईश्वर ॥ मजलागी धरिला अवतार ॥ ऐसा मनी दृढ निर्धार ॥ हेचि लक्षण शिष्यांचे ॥४९॥
मी एक जाणता सर्वज्ञ ॥ गुरुसन्निध न मिरवी योग्यपण ॥ घडोघडी आठवी गुरुचरण ॥ हेचि लक्षण शिष्याचे ॥५०॥
सकळ देवांहुनि आगळे ॥ गुरुस्वरूप जेणे निर्धारिले ॥ मन गुरुपदींच लंपट जाहले ॥ हेचि लक्षण शिष्याचे ॥५१॥
सारासारविचार ॥ गुरुमुखे ऐकिती निरंतर ॥ आवडे अद्वैंतशास्त्र की हरिचरित्र । हेचि लक्षण शिष्याचे ॥५२॥
गुरुवचनाकारणे सत्य ॥ प्राण वेचावया उदित ॥ तेथे धनाची कायसा मात ॥ हेचि लक्षण शिष्याचे ॥५३॥
जे जे दिसे चराचर ॥ ते ते गुरुरूप पाहे निर्धार ॥ गुरुवचनी नुपसे तिरस्कार ॥ हेचि लक्षण शिष्याचे ॥५४॥
गुरु सांगे जे हितगोष्टी ॥ ते सदा धरी ह्रदयसंपुटी ॥ प्रवृत्तिशास्त्रावरी नाही दृष्टी ॥ हेचि लक्षण शिष्याचे ॥५५॥
गुरुनामस्मरणाचा ध्वज ॥ अखंड उभारिला तेजःपुंज ॥ गुरुसेवा करिता नुपजे लाज ॥ हेचि लक्षण शिष्याचे ॥५६॥
अनुष्ठान गुरुमूर्तीचे ध्यान ॥ पूजेचे मूळ ते गुरुचरण ॥ गुरुनाममंत्र ते जपकारण ॥ हेचि लक्षण शिष्याचे ॥५७॥
गुरुतीर्थ करी प्राशन ॥ सदा गुरुगौरवगायन ॥ हरि गुरुरूप देखे समान ॥ हेचि लक्षण शिष्याचे ॥५८॥
माझे शरीर असो बहुकाळ ॥ मज गुरुसेवा घडो निर्मळ ॥ गुरुभेटीलागी उतावेळ ॥ हेचि लक्षण शिष्याचे ॥५९॥
गुरुनिंदा ऐकता जाण ॥ बोटे घालूनी बुजी कान ॥ पुन्हा न पाही त्याचे वदन ॥ हेचि लक्षण शिष्याचे ॥६०॥
जारणमारणअनुष्ठान ॥ वादविवाद पैशुन्य ॥ कुटिलता निंदा नावडे मनातून ॥ हेचि लक्षण शिष्याचे ॥६१॥
अद्भुत प्रज्ञा जवळी असे ॥ चातुर्यकला ह्रदयी वसे ॥ अंगी सद्भाव विशेष दिसे ॥ हेचि लक्षण शिष्याचे ॥६२॥
सर्वस्वेसी अतिउदार ॥ गुरुकार्यासी सदा सादर ॥ लौकिकावरी नाही भार ॥ हेचि लक्षण शिष्याचे ॥६३॥
जे देशी वसे गुरुनाथ ॥ तिकडून जरी आला मारुत ॥ त्यासी क्षेम द्यावया धावत ॥ हेचि लक्षण शिष्याचे ॥६४॥
सदा जपे सद्गुरुनाम ॥ तेणे वितळे क्रोध काम ॥ गेले लोभ मत्सर मोह भ्रम ॥ हेचि लक्षण शिष्याचे ॥६५॥
नाना मते कुमार्ग अनाचारी ॥ तेथे न बैसे क्षणभरी ॥ वेदाज्ञा वंदी जो शिरी ॥ हेचि लक्षण शिष्याचे ॥६६॥
गुरुशिष्यांचे लक्षण ॥ सांगितले बहु निवडून ॥ ही भूषणे लेइली संपूर्ण ॥ त्याचे दर्शन दुर्लभ ॥६७॥
ही चिन्हे अंगी नसती ॥ नसतेचि गुरुत्व भोगिती ॥ सदा अंतरी पापमती ॥ त्यांची संगति न धरावी ॥६८॥
अंगी नसे किंचित ज्ञान ॥ परसंगे दाविती डोलोन ॥ सरड तुकावी जैसी मान ॥ त्यांची संगति न धरावी ॥६९॥
संतमूर्ति सदा निंदी ॥ नसतेंचि शास्त्र प्रतिपादी ॥ कुमार्ग दावूनि भोळे भोंदी ॥ त्याची संगति न धरावी ॥७०॥
हरिहरचरित्रे पावन सर्वथा ॥ म्हणे हे व्यर्थ काय गाता ॥ मीच सर्वात म्हणे जाणता ॥ त्याची संगति न धरावी ॥७१॥
नावडे हरिकीर्तन कधी ॥ तीर्थक्षेत्रमहिमा उच्छेदी ॥ मज पूजा म्हणे सर्वांआधी ॥ त्याची संगति न धरावी ॥७२॥
माझे शिष्य व्हा म्हणवोनि ॥ भलत्यासी आणी ओढोनी ॥ नसतेचि मंत्र सांगे कर्णी ॥ त्याची संगति न धरावी ॥७३॥
मद्यपी जैसा बडबडत ॥ वाचाळ बळे भाविक गोवीत ॥ आपुले अंगी नाही प्रचीत ॥ त्याची संगति न धरावी ॥७४॥
शिष्यासी सांगे दटावून ॥ माझे करावे बरवे पूजन ॥ नाहीतरी तुम्हा शापीन ॥ त्याची संगति न धरावी ॥७५॥
म्हणे आम्ही ज्ञानी मुक्त ॥ जाहलो सकळ कर्मातीत ॥ वेदाविरुद्ध तेचि स्थापीत ॥ त्यांची संगति न धरावी ॥७६॥
नाही इंद्रियांसी कदा शांती ॥ जवळ काम क्रोध दुमदुमती ॥ तरलो म्हणोनी लोका सांगती ॥ त्यांची संगति न धरावी ॥७७॥
प्रत्यया न येता श्रीरंग ॥ लटकेचि दावी वरते सोंग ॥ त्याचा न तुटे भवरोग ॥ त्याची संगति न धरावी ॥७८॥
सर्पाच्या माथा मणि दिसत ॥ परी घेऊ जाता बहुत अनर्थ ॥ तैसा जो जाहला जरी विद्यावंत ॥ त्याची संगति न धरावी ॥७९॥
इतर संताची निंदा करी ॥ देखता दुःख उपजे अंतरी ॥ चढला अहंकृतीच्या गडावरी ॥ त्याची संगति न धरावी ॥८०॥
ज्ञानहीन गुरु त्यजिजे ॥ ऐसे गुरुगीतेचे वचन गाजे ॥ दयाहीन देश देखिजे ॥ तोही त्यजिजे सर्वथा ॥८१॥
स्नेहाविण बंधुवर्ग ॥ दुर्मुखी स्त्रियेचा करिजे त्यग ॥ तैसे जे दुष्ट दाविती कुमार्ग ॥ त्यांचाही त्याग करावा ॥८२॥
शिष्य आचरती अधर्म ॥ करिती व्यभिचारिक कर्म ॥ ज्यांसी नावरती क्रोध काम ॥ तेही शिष्य त्यजावे ॥८३॥
गुरु सांगे हितोपदेश ॥ तो ज्यांसी वाटे जैसे विष ॥ गुरुहून म्हणती आम्ही विशेष ॥ तेही शिष्य त्यजावे ॥८४॥
गुरुदेखता दाविती मर्यादा ॥ सांगे सदा जल्पती निंदा ॥ स्वामीसी प्रवर्तती जे वादा ॥ तेही शिष्य त्यजावे ॥८५॥
असो जैसा पुत्र भ्रष्टला ॥ तो सर्वी जैसा बहिष्कारिला ॥ तैसा तो शिष्य आपुला ॥ न म्हणावा कदाही ॥८६॥
म्हणोनि सद्गुरु एक सांदीपन ॥ शिष्य ते शेषनारायण ॥ जरी परीस लोह मिळती पूर्ण ॥ तरीच सुवर्ण होय तेथे ॥८७॥
असो ज्याचे श्वासी जन्मले वेद ॥ त्यासी गुरूने काय करावा बोध ॥ परी लोकसंग्रहार्थ गोविंद ॥ दावी विशद गुरुसेवा ॥८८॥
चौसष्ट दिवसपर्यंत ॥ गुरुगृही राहिला रमाकांत ॥ चौसष्ट कला समस्त ॥ अभ्यासिल्या श्रीरंगे ॥८९॥
चौदा विद्या चौसष्ट कळा ॥ सकळ अभ्यासीत मेघसांवळा ॥ जैसा करतळींचा आवळा ॥ तैशा विद्या आकळीत ॥९०॥
परी सर्वात आत्मज्ञान ॥ त्याविण सकळ कळा शून्य ॥ ते आत्मकळा सांदीपन ॥ श्रीकृष्णासी उपदेशी ॥९१॥
जो साधनचतुष्ट्यसंयुक्त ॥ अनुतापी जो शिष्य विरक्त ॥ तेथे ज्ञान सद्गुरुनाथ ॥ सर्व ठेवी आपुले ॥९२॥
भंगल्या घटांत जीवन ॥ कायसे व्यर्थचि घालून ॥ जैसी सुंदर राजकन्या नेऊन ॥ षंढ़ाप्रति दिधली ॥९३॥
म्हणोनि पूर्ण पात्र जगज्जीवन ॥ तो त्रिभुवनाचे सांठवण ॥ त्यासी उपदेशी सांदीपन ॥ निजज्ञान ऐका ते ॥९४॥
तिघे समोर बैसवून ॥ सांदीपन वर्षे कृपाघन ॥ म्हणे सर्वद्रष्टा तू श्रीकृष्ण ॥ दुजेपण नाही तुज ॥९५॥
तू अज अव्यय निर्मळ ॥ तुझिया स्वरूपा नाही चळ ॥ जगडंबर पसारा सकळ ॥ अविद्यामय लटकाचि ॥९६॥
गुरूसी म्हणे श्रीकृष्ण ॥ स्वरूपी स्फुरण व्हावया काय कारण ॥ वस्तु निर्विकार निर्गुण ॥ तेथे त्रिगुण का जाहले ॥९७॥
ऐकोनि श्रीकृष्णाचे बोल ॥ ऋषीस येती सुखाचे डोल ॥ ऐका ते निरूपण रसाळ ॥ जे अधिकारी ज्ञानाचे ॥९८॥
ऋषि म्हणे हरि ऐक सावधान ॥ तुझे तुजचि सांगतो ज्ञान ॥ जैसे पयोब्धीचे क्षीर घेऊन ॥ त्यासीच नैवेद्य दाविजे ॥९९॥
तुवा पुसिले स्फुरण कैसे ॥ तरी स्वसुखी असता परमपुरुषे ॥ अहं ब्रह्मास्मि ध्वनि विशेशे ॥ उठती झाली स्वरूपी ॥१००॥
जैसी सागरी उठे लहरी ॥ तैसी ध्वनि उठली चिदंबरी ॥ का पहुडला सुखसेजेवरी ॥ तो जागा होय स्वइच्छे ॥१॥
मुळी उठली जे ध्वनी ॥ परमपुरुषापासूनी ॥ प्रकृति म्हणती तिजलागूनी ॥ आदिजननी ज्ञानकळा ॥२॥
जैसा दीप आणि ज्योती ॥ की शातकुंभ आणि कांती ॥ की रत्न आणि कळा निश्चिती ॥ अभेदस्थिति न मोडे ॥३॥
की तरंग आणि नीर ॥ की तंतु आणि वस्त्र ॥ की घातु आणि पात्र ॥ लोह आनि सह्स्त्र अभेद की ॥४॥
गूळ आणि गोडी अभेद ॥ की वाद्य आणि नाद ॥ की ओंकार आनि ध्वनि विशद ॥ एकरूपे वर्तती ॥५॥
तैसी प्रकृति पुरुष निर्धारी ॥ अभेदरूप निर्विकारी ॥ तिचे पोटी इच्छाशक्ति सुंदरी ॥ जाहली गुणक्षोभिणी ते ॥६॥
इच्छादेवी कर्णकुमारी ॥ पुरुषसत्ते जाहली गरोदरी ॥ सृष्टिकरावी अंतरी ॥ अहंकृति धरिली तिणे ॥७॥
तीन्ही देव त्रिविध अहंकार ॥ तिजपासोनि जाहले साचार ॥ त्रिशक्तिस्वरूपे चतुर ॥ तेचि जाहली ती ठायी ॥८॥
सत्त्वगुणे ज्ञानशक्ति जाहली ॥ रजोगुणे क्रियाशक्ति विरूढली ॥ तमोगुणे द्रव्यशक्ति बोलिली ॥ तीन्ही नटली स्वरूपे ते ॥९॥
द्रव्यशक्तिआधारे तमोगुण ॥ पंच विषय निर्मिले जाण ॥ शब्द स्पर्श रूप रसगंध गुण ॥ पंचतन्मात्रा याच पै ॥११०॥
क्रियाशक्तीच्या सहवासेकरून ॥ रजोगुण व्याला पंचके तीन ॥ ज्ञानेंद्रियपंचक पहिले पूर्ण ॥ कर्मेंद्रियपंचक दूसरे ॥११॥
प्राणपंचक तीसरे ॥ आता सत्त्वे ज्ञानशक्तिआधारे ॥ अंतःकरणपंचक एकसरे ॥ ज्ञानमय ओतिले ॥१२॥
ऐसी पंच पंचके विशेषे ॥ ती मिळाली परस्परानुप्रवेशे ॥ मग कर्दम करून परमपुरुषे दोन विभाग पै केले ॥१३॥
उत्तम भाग तो हिरण्यगर्भ केवळ ॥ असार भाग विराट् ढिसाळ ॥ पंचभूतात्मक निखिल ॥ पंडब्रह्मांड रचियेले ॥१४॥
जैसी पार्याची कोटी फुटली ॥ तेथे कोट्यवधि रवाळ जाहली ॥ की अग्नि स्फुलिंगकल्लोळी ॥ बहुत जैसा पसरला ॥१५॥
की आकाशी मेघ एक धार सोडी ॥ त्याचे बिंदु होती लक्ष कोडी ॥ अहंध्वनी सरिसे परवडी ॥ जीव उठिले अपार ॥१६॥
जीव शिव हे दोन्ही पक्षी ॥ बैसले या प्रपंचवृक्षी ॥ शिव पूर्णज्ञानी सर्वसाक्षी ॥ जीव लक्षी विषयाते ॥१७॥
तेणे जीवासी जाहला भ्रम ॥ विसरला आपुले निजधाम ॥ चौर्यायशी लक्ष योनिग्राम ॥ हिंडता कष्टी होतसे ॥१८॥
त्या जीवाची करावया सोडवण ॥ श्रीकृष्ण तू झालासी सगुण ॥ तुझ्या कृपावलोकनेकरून ॥ जीव सकळ उद्धरती ॥१९॥
तू सर्वांतीत सर्वश्रेष्ठ ॥ तुजहूनि कोणी नाही वरिष्ठ ॥ तुझ्या मायेचा खेळ उत्कृष्ट ॥ हा जगडंबरपसारा ॥१२०॥
स्थूळ लिंग कारण महाकारण ॥ विराट् हिरण्यगर्भ चालक पूर्ण ॥ महत्तत्त्व मायेहूनि भिन्न ॥ स्वरूप निर्वाण हरि तुझे ॥२१॥
जागृति स्वप्न सुषुप्ति तुर्या ॥ सृष्टिस्थितिप्रलयसर्वसाक्षिणी माया ॥ याहूनि स्वरूप तुझे यादवराया ॥ वेगळेचि जाण पां ॥२२॥
विश्व तैजस प्राज्ञ प्रत्यगात्मा ॥ ब्रह्मा विष्णु रुद्र परमात्मा ॥ याहूनि वेगळा तू आत्मारामा ॥ यादवकुळटिळका ॥२३॥
नेत्रकंठह्रदयमूर्ध्नि ॥ सूर्य ज्योतिर्लोकआदिकरूनी ॥ महर्लोक ब्रह्मस्थानी ॥ यांसी चक्रपाणी वेगळा तू ॥२४॥
अकार उकार मकार ॥ तीन्ही मिळोनी पूर्ण ओंकार ॥ त्याहून स्वरूप तुझे निर्विकार ॥ पूतनापाणशोषका ॥२५॥
रज सत्त्व तमोगुण ॥ चौथा शुद्ध सत्व निरसोन ॥ तू सच्चिदानंद निर्वाण ॥ कंसांतका श्रीरंगा ॥२६॥
वैखरी मध्यमा पश्यंती परा ॥ चहू वाचातीत क्षराक्षरपरा ॥ तो तू परात्परसोयरा ॥ कालियामर्दना श्रीकृष्णा ॥२७॥
जारज अंडज उद्भिज्ज ॥ चौथी खाणी नांव स्वेदज ॥ त्याहूनि वेगळा तू तेजःपुंज ॥ गोपीमानसराजहंसा ॥२८॥
ऋग्वेद यजुर्वेद सामवेद ॥ चौथा अथर्वण प्रसिद्ध ॥ त्यांहुनि वेगळा तू ब्रह्मानंद ॥ वृंदावनविलासिया ॥२९॥
स्थूळ प्रविविक्त स्वरूपभाव ॥ स्वरूपानंदादि भोग सर्व ॥ त्याहूनि वेगळा तू स्वयमेव ॥ गोवर्धनगिरिधरा ॥१३०॥
सलोकता समीपता ॥ सरूपता सगुणसायुज्यता ॥ त्यांहूनि वेगळा तू तत्त्वतां ॥ अघबकनाशका गोपाळा ॥३१॥
विजातिस्वजातिस्वगतभेद ॥ त्यांहूनि वेगळा तू जगदंकुरकंद ॥ अज अजित तू शुद्धबुद्ध ॥ राधिकामानसमोहन ॥३२॥
जहल्लक्षण अजहल्लक्षण ॥ तिसरे जहदजहल्लक्षण ॥ त्यांहूनि स्वरूप तू निर्वाण ॥ क्षीरसागरविहारिया ॥३३॥
द्वैत अद्वैत महाद्वैत ॥ भू नीर अनळ अनिळ नभातीत ॥ तोचि पूर्णब्रह्म शाश्वत ॥ कमलोद्वभजनक तू ॥३४॥
तू पंचविषयांवेगळा ॥ गंधविषय उर्वीपासून जाहला ॥ याहूनि तू निराळा ॥ इंदिरावर श्रीहरि ॥३५॥
रसविषय आपापासूनी ॥ रूपविषय तेजस्थानी ॥ त्याहूनि वेगळा तू मोक्षदानी ॥ वैकुंठपुरनिवासिया ॥३६॥
स्पर्शविषय समीरी ॥ शब्दविषय जाहला पुष्करी ॥ याहूनि वेगळा तू निर्विकारी ॥ गोपीवसनहारका ॥३७॥
अन्नमय प्राणमय मनोमय ॥ विज्ञानमय आनंदमय ॥ पंचकोशाहूनि तू अव्यय ॥ जगद्वंद्या सर्वेषा ॥३८॥
अन्नापासून स्थूळदेह ॥ तो कोश जाण अन्नमय ॥ याहूनि वेगळा तू निश्चिय ॥ अजास्यजनकप्रियकरा ॥३९॥
प्राण आणि अपान ॥ व्यान समान उदान ॥ हा प्राणमय कोश नव्हेसी तू पूर्ण ॥ मधुमुरनरकनाशना ॥१४०॥
वाचा पाणि पाद शिश्न गुद ॥ मनसहित मनोमयकोश प्रसिद्ध ॥ याहूनि वेगळा तू पूर्णानंद ॥ गोपीकुचकुंकुमांगमर्दना ॥४१॥
श्रोत्र त्वचा चक्षु जिव्हा घ्राण ॥ बुद्धिसहित विज्ञानमयकोश जाण ॥ यांहूनि वेगळा तू नारायण ॥ श्रीकुचदुर्गविहारा ॥४२॥
सर्वांचे जे का कारण ॥ अविद्याचातुर्यविअज्ञान ॥ हा आनंदमय कोश तू यासी भिन्न ॥ गोरसचोरा गोपति ॥४३॥
त्याग अत्याग त्यागात्याग ॥ त्यांहून परता तू सारभाग ॥ निर्विकार तू अज अव्यंग ॥ मुरलीधरा मनमोहना ॥४४॥
साकार साभास आभास ॥ चौथे जाणिजे निराभास ॥ याहूनि पर तू परात्पर हंस ॥ तृणावर्तप्राणहरणा ॥४५॥
अविद्यामय चारी प्रलय ॥ पांचवा केवळ ज्ञानमय ॥ यांहुनि वेगळा तू अद्वय ॥ गोपीनयनाजदिनेशा ॥४६॥
पिंडीच नित्य प्रळय ते निद्रा ॥ मरणासम ते अवधारा ॥ निद्रेविरहित तू यादवेंद्रा ॥ समरधीरा केशवा ॥४७॥
महाप्रळय ते मरण ॥ स्थूळदेह जाय नासोन ॥ तू षड्विकाररहित पूर्ण ॥ जन्ममरणमोचका ॥४८॥
अस्ति जायते वर्धते ॥ विपरिणमते अपक्षीयते ॥ हे दामोदरा यादवपते ॥ याहूनि परते स्वरूप तुजे ॥४९॥
विनश्यति विकार सहावा ॥ षड्विकाररहित तू कमलाधवा ॥ जगद्व्यापका तू आदि सर्वा ॥ मायाचक्रचाळका ॥१५०॥
असो ब्रह्मांडीचा नित्य प्रळय पाहे ॥ चारी युगे सहस्त्र वेळा जाय ॥ तो एक दिन ब्रह्मयाचा होय ॥ दानवशिक्षाकारणा ॥५१॥
याचप्रमाणे रात्रि निद्रा ॥ परमेष्ठी करी अवधारा ॥ तो सृष्टि बुडे एकसरा ॥ ऐक उदारा श्रीपति ॥५२॥
बत्तीस लक्ष गावे चढे पाणी ॥ इतुके ब्रह्मांड जाय बुडोनि ॥ सप्त चिरंजीव शशितरणी ॥ जाती लोपोनि सर्वेशा ॥५३॥
मागुती ब्रह्मा जागा होत ॥ यथापूर्वमकल्पयत ॥ पुन्हा तैसेच रची निश्चित ॥ तुझा सुत परमात्मया ॥५४॥
हा ब्रह्मांडींचा नित्यप्रळय जाण ॥ ऐक महाप्रळयाची खूण ॥ येथे ब्रह्मादिका संहरण ॥ होय ऐक श्रीकरधरा ॥५५॥
आधी अनावृष्टि शतसंवत्सर ॥ तेणे होईल जीवसंहार ॥ द्वादशार्क निरंतर ॥ तपती तेव्हा शकटांतका ॥५६॥
सप्त सागर शोषूनि वडवानळ ॥ जाळील सर्व उर्वीमंडळ ॥ सप्त पाताळे जळतील ॥ शेषमुखाग्नीने सर्वेशा ॥५७॥
मग वारणशुंडेऐसी धार ॥ मेघ वर्षतील शतसंवत्सर ॥ पृथ्वीची राखाडी समग्र ॥ विरेल प्रलयी यादवेंद्रा ॥५८॥
त्या जळासी तेज गिळील ॥ तेजासी प्रभंजन प्राशील ॥ त्या समीरासी निराळ ॥ क्षणे ग्रासील पद्यनाभा ॥५९॥
नभासी ग्रासील तमोगुण ॥ तम होय रजी लीन ॥ रज जाय सत्त्वी मिळोन ॥ कमलपत्राक्षा मुरारे ॥१६०॥
सत्व सामावे महत्तत्त्वांत ॥ तेही हरपे मूळमायेत ॥ मूळमाया पुरुषांत मिळत ॥ वेदवंद्या माधवा ॥६१॥
पुरुष तोचि ओंकार ॥ माया तेचि ध्वनि निर्धार ॥ हे स्वरूपी लीन होती साचार ॥ तेंचि निर्विकारस्वरूप तू ॥६२॥
वैकुंठ कैलास क्षीरसागर ॥ विरोनि जाहले निर्विकार ॥ ते स्वरूप हरि तू साचार ॥ आता पुरे काय पूससी ॥६३॥
ऐसे सांगता सांदीपन ॥ समाधिस्थ जाहला जगज्जीवन ॥ ब्रह्मानंदसागरी लीन ॥ ऋषीही जाहला तेधवा ॥६४॥
राहिले गुरुशिष्यगण ॥ राहिले वेदांतनिरूपण ॥ स्वरूपार्णवी निमग्न ॥ अवघे जाहले एकदांचि ॥६५॥
निरसोनि सकळ आधि ॥ लागली केवळ अक्षय समाधि ॥ हरपली मन चित्त बुद्धि ॥ सर्व उपाध विराली ॥६६॥
स्वानंदलहरी जिरवून ॥ सावध जाहला सांदीपन ॥ म्हणे हे कृष्ण वसुदेवनंदन ॥ समाधि ग्रासोनि सावध होई ॥६७॥
राजीववत् नेत्र चांगले ॥ हरीने तेव्हा उघडिले ॥ अष्टभाव अंगी दाटले ॥ वेदांसी न कळे सौख्य जे का ॥६८॥
मग उठोनि पूतनाप्राणहरण ॥ ऋषीसी साष्टांग केले नमन ॥ ह्रदयी दृढ धरी सांदीपन ॥ मनमोहनासी तेधवा ॥६९॥
सकळ विद्यांमाजी मुकुटमणी ॥ ते हे अध्यात्मविद्या रत्नखाणी ॥ हे ब्रह्मविद्या नेणती ते प्राणी ॥ नाना योनी भोगिती ॥१७०॥
आत्मविद्या नेणती गूढ ॥ नरक भोगिती अनेक मूढ ॥ नाना शास्त्रांचे काबाड ॥ काय व्यर्थ करूनिया ॥७१॥
जरी केली नाना तीर्थे ॥ भस्म लाविले शरीराते ॥ काय करूनि तपाते ॥ आत्मप्राप्ति नाही जो ॥७२॥
केले जरी कोटि यज्ञ ॥ मेरूइतके सुवर्णदान ॥ तरी आत्मप्राप्तीवांचून ॥ प्राणी न तरती सर्वथा ॥७३॥
तेणे केले देहदंडन ॥ पुराणपठण अथवा गायन ॥ काय जटाभार राखोन ॥ आत्मप्राप्तीवांचूनि ॥७४॥
असो संपूर्ण ब्रह्मविद्या ॥ सांदीपन देत जगद्वंद्या ॥ ज्याचे नाम घेता सकळ अविद्या ॥ तुटोनि जाती क्षणमात्रे ॥७५॥
यावरी स्त्रियेसी सांदीपन ॥ सांगे एकांती जाऊन ॥ घरा आले शेषनारायण ॥ यांसी सेवाकारण सांगू नको ॥७६॥
आमुचे पूर्वपुण्य समर्थ ॥ घरा आला रमानाथ ॥ हा त्रिभुवननायक समर्थ ॥ यासी कार्य सांगू नको ॥७७॥
एके दिवशी सांदीपन ॥ करावया गेला अनुष्ठान ॥ मागे आश्रमी शेषनारायण ॥ सुदामासहित बैसले ॥७८॥
तो घरात गुरुपत्नी बोलत ॥ सप्तदिन पर्जन्य वर्षत ॥ काष्ठे नाहीत घरात ॥ कैसे आता करावे ॥७९॥
कानी ऐकतांचि ऐसे वचन ॥ तात्काळ उठिले तिघेजण ॥ शास्त्रपुस्तके ठेविली बांधोन ॥ अरण्याप्रति चालिले ॥१८०॥
शुष्क काष्ठे मोडूनी ॥ मोळ्या बांधोनि तिघांजणी ॥ आश्रमा परतले तेचि क्षणी ॥ तो पर्जन्य पडिला असंभाव्य ॥८१॥
चहूंकडून दाटलेपूर ॥ वोहळ गंगा भरल्या समग्र ॥ तिघे मस्तकी घेऊनि काष्ठभार ॥ तैसेचि येती त्वरेने ॥८२॥
सांदीपन आला आश्रमासि ॥ तो न दिसती रामह्रषीकेशी ॥ मग पुसे स्वस्त्रियेसी ॥ कोठे गेले रामकृष्ण ॥८३॥
की तुवा काही सांगितले कारण ॥ तो ते ऋषिपत्नी बोले वचन ॥ गृहांत काष्ठे नाहीत म्हणोन ॥ मी बोलिले स्वभावेंचि ॥८४॥
ऋषि म्हणे याचि कार्याते ॥ उठोनि गेले अरण्यपंथे ॥ अहा मूर्खे वैकुंठपतीते ॥ काय कार्य सांगितले ॥८५॥
परम नष्टा तुम्ही स्त्रिया ॥ महा अशौचा निर्दया ॥ वना धाडिले यादवराया ॥ अनर्थ थोर केला हो ॥८६॥
महानिर्दय स्त्रियांची जाती ॥ कपटनाटकी असत्य बोलती ॥ कार्याकार्य नोळखती ॥ अहंमती भुलोनिया ॥८७॥
अहा मूर्खे काय केले ॥ शेषनारायणा वना धाडिले ॥ बोलता ऋषीच्या डोळा अश्रू आले ॥ कंठ दाटला सद्गदित ॥८८॥
अरण्यपंथे ऋषि जात ॥ अष्टभावे सद्गदित ॥ नाम घेऊनि हाका फोडीत ॥ करुणा भरित ह्रदय जाहले ॥८९॥
हे रामा हे कृष्णा ॥ हे मुरहरे हे जनार्दना ॥ हे कंसांतका मधुसूदना ॥ कालियामर्दना कैटभारि ॥१९०॥
हे भक्तजनमानसराजहंसा ॥ हे कृष्णा अविद्याविपिनहुताशा ॥ हे वैकुंठपते रमाविलासा ॥ कोणे वनी पाहू तूते ॥९१॥
अहा कमलपत्राक्षा श्रीरंगा ॥ मनमोहना कोमलांगा ॥ पुराणपुरुषा मम ह्रत्पद्मभृंगा ॥ कोणे वनी पाहू तूते ॥९२॥
तो वर्षत घोर घन ॥ दुरूनि येता देखिला जगज्जीवन ॥ सवे सुदामदेव संकर्षण ॥ काष्ठे घेऊनि येती तिघे ॥९३॥
जैसी धेनु धावे वत्स देखोन ॥ तैसा धावला सांदीपन ॥ हरीच्या कंठी मिठी घालोन ॥ स्फुंदस्फुंदोनि रडतसे ॥९४॥
कृष्णा तुज पूजिती योगीश्वर ॥ आम्ही माथा दिधले काष्ठभार ॥ तैसेचि आश्रमा आले सत्वर ॥ उतरती भार काष्ठांचे ॥९५॥
तो ऋषिपत्नी बाहेर धावत ॥ हरीच्या कंठी मिठी घालीत ॥ स्फुंदस्फुंदोनि रडत ॥ म्हणे अन्याय केला म्यां ॥९६॥
अहा वत्सा माझिया श्रीकृष्णा ॥ कोमलगाता शतपत्रनयना ॥ म्यां न सांगता पीतवसना ॥ का तू गेलासी वनाते ॥९७॥
श्रीकृष्ण म्हणे ऐक माते ॥ आम्ही सेवा करावी भावार्थे ॥ आम्हांसी थोर गुरुदास्यापरते ॥ आणिक काही नावडे ॥९८॥
ज्यासी गुरुसेवा नावडे यथार्थ ॥ काय जाळावा त्याचा परमार्थ ॥ गुरुसेवेविण विद्या समस्त ॥ अविद्या होती जाण पां ॥९९॥
जो कंटाळे गुरुसेवेसी ॥ किडे पडले त्याच्या ज्ञानासी ॥ जो स्वामीसी आपुल्या द्वेषी ॥ तो महानरकासी जाईल ॥२००॥
तो साही शास्त्रे आला पढोन ॥ तेणे केले दान तप कीर्तन ॥ त्यासी देव जरी आले शरण ॥ न करिता गुरुभजन तरेना ॥१॥
काय कोरडा करूनि जप ॥ व्यर्थ ध्यान खटाटोप ॥ काय जाळावा त्याचा प्रताप ॥ गुरुस्वरूप नाठवी जो ॥२॥
सद्गुरूंचे स्मरण न करी ॥ नाठवी गुरुमुर्ति अंतरी ॥ तो बुडाला अघोरी ॥ चंद्रार्कवरी दुरात्मा ॥३॥
सद्गुरूंचे नाम सांगता ॥ लाज येत ज्याच्या चित्ता ॥ त्या चांडालाचे मुख देखता सचैल स्नान करावे ॥४॥
गुरुचरणी मन न ठेविता ॥ व्यर्थ काय चाटावी कविता ॥ तो ज्ञान सांगे ते तत्त्वता ॥ मद्यपियाचे भाषण ॥५॥
असो कृष्णे गुरूचे गृही ॥ अपार संपत्ति भरिली ते समयी ॥ जे शक्रांचे येथे वस्तु नाही ॥ ते ते आणूनि पुरवीतसे ॥६॥
वस्त्रे आभरणे धनाच्या राशी ॥ श्रीकृष्ण देत गुरुपत्नीसी ॥ चौसष्ट दिवस गुरुगृहवासी ॥ शेष श्रीहरि जाहले ॥७॥
मग जोडोनि दोनी कर ॥ उभे राहिले गुरुसमोर ॥ सद्गद होवोनि अंतर ॥ सांदीपनीसी बोलती ॥८॥
काही मागा जी गुरुदक्षिणा ॥ ऐसे बोले वैकुंठराणा ॥ सांदीपनी बोले जगद्भूषणा ॥ काही वासना नसेचि ॥९॥
तू आम्हांसी गुरुदक्षिणा देऊनी ॥ जाऊ पाहसी चक्रपाणी ॥ तुज सोडून मन ठेवील जो धनी ॥ तोचि अभागी जाणिजे ॥२१०॥
सोडूनिया तुझे ध्यान ॥ क्षुद्र देवतांचे करी भजन ॥ तुझे नामी विन्मुख पूर्ण ॥ तोचि अभागी जाणिजे ॥११॥
शुभदायक तुझे जन्मकर्म ॥ जो सर्वथा न आयकेचि अधम ॥ तुज टाकूनि इच्छी धनकाम ॥ तोचि अभागी जाणिजे ॥१२॥
जगद्वंद्या तुझे विलोकिता मुख ॥ हारपे अपार जन्मींचे दुःख ॥ तुज टाकूनि इच्छी स्वर्गसुख ॥ तोचि अभागी जाणिजे ॥१३॥
तू परम पुरुष निर्गुण ॥ भक्तालागी जाहलासी सगुण ॥ तुज टाकूनि करी आणिकांचे ध्यान ॥ तोचि अभागी जाणिजे ॥१४॥
असो गुरुपत्नी खेद करी ॥ कृष्णा तू आमचा पूर्ण कैवारी ॥ माझा पुत्र बुडाला सागरी ॥ तो आणून देई दक्षिणा ॥१५॥
तेवढाच पुत्र होता जाण ॥ पुढे नाहींच मग संतान ॥ हरि पुत्राविण शून्य सदन ॥ देई आणून तेवढा ॥१६॥
अंधार पडला आमुचे कुळी ॥ हरि तेवढा दीप उजळी ॥ सांदीपन म्हणे वनमाळी ॥ करी आज्ञा येवढीच ॥१७॥
हाती धरूनि सांदीपना ॥ समुद्रतीरी आला वैकुंठराणा ॥ तो सागर येऊनि लागला चरणा ॥ काय ती आज्ञा मज सांगा ॥१८॥
हरि म्हणे गुरुसुत देई वहिला ॥ तिर्मिगिल मत्स्य बोलविला ॥ तो म्हणे पांचजन्यदैत्ये भक्षिला ॥ त्यासी पुसे श्रीहरि ॥१९॥
मग समुद्रांत रिघोन ॥ हरीने शोधिला पांचजन्य ॥ तयासी युद्ध करून ॥ शिर त्याचे छेदिले ॥२२०॥
पोट तयाचे विदारीत ॥ तो आंत नाही गुरुसुत ॥ मग म्हणे हा मारिला व्यर्थ ॥ वर मागत पांचजन्य ॥२१॥
हरि इतुकाच देई वर ॥ तू करी धर माझे कलेवर ॥ मजविण जे तुजवरी घालिती नीर ॥ त्यांचे पूजन व्यर्थ व्हावे ॥२२॥हरि म्हणे वर दिधला ॥ मग तो पांचजन्य हाती घेतला ॥ पुढे मृत्युपुरीस हरि गेला ॥ गुरुपुत्राचियाकारणे ॥२३॥
सूर्यसुते हरीची पूजा करून ॥ उभा ठाकला कर जोडून ॥ हरि म्हणे गुरुसुत आणून ॥ देई सत्वर आतांचि ॥२४॥
मग त्याचे आतिवाहिक देह होते ॥ लिंगदेह म्हणती त्यांते ॥ यमें शोधूनि निजहस्ते ॥ हरीपासी आणिले ॥२५॥
हरीने इच्छामात्रेकरूनी ॥ दिव्य देह निर्मिला तेचि क्षणी ॥ गुरुपुत्र हाती धरूनी ॥ गुरुआश्रमा पातला ॥२६॥
संतोशला सांदीपन ॥ कृष्णासी दिधले आलिंगन ॥ गुरुकांता करी लिंबलोण ॥ कृष्णावरूनि तेधवा ॥२७॥
म्हणे हरि तुजवरूनी ॥ मी जाईन ओवाळूनी ॥ अद्भुत केली तुवा करणी ॥ ब्रह्मादिका अगम्य ॥२८॥
असो आज्ञा घेऊनि गुरुपासी ॥ श्रीकृष्ण आले मथुरेसी ॥ आता उद्धव जाईल गोकुळासी ॥ गोपिकांसी बोधावया ॥२९॥
हा अध्याय जो विसावा ॥ तो केवळ संतांचा प्राणविसांवा ॥ अर्थ घेता जो विसावा ॥ मंत्र ह्रदयी ठसावे ॥२३०॥
हरिविजयग्रंथ वैरागर ॥ त्यांत विसावा हा हिरा थोर ॥ प्रकाशमय निर्विकार ॥ जोहरी याचे निजभक्त ॥३१॥
ऐसा हा विसावा हिरा ॥ ह्रदयपदकी जडावा बरा ॥ जन्ममरण येरझारा ॥ तेणे तुमच्या चुकतील ॥३२॥
का घेता जन्ममरणाच्या धांवा ॥ या विसाव्यांत घ्या विसावा ॥ पूर्ण करवील मनोभावा ॥ आपण श्रीहरि येऊनि ॥३३॥
जे करिती सद्गुरुसेवा ॥ त्यांच्या हाता चढे हा विसावा ॥ या विसाव्याचा अर्थ घ्यावा ॥ सर्व कार्ये टाकूनिया ॥३४॥
नाना विसावा हाचि शेष ॥ यावरी पहुडला रमाविलास ॥ जिंहीं सांडिले आशापाश ॥ तेचि विसाव्या झोंबती ॥३५॥
की विसावा हे पंढरीनगर ॥ येथे विसांवला रुक्मिणीवर ॥ भाव पुंडलिकासमोर ॥ उभा तिष्ठत सर्वदा ॥३६॥
जैसी भारतामाजी गीता थोर ॥ तैसा हरिविजयी विसावा सार ॥ की नक्षत्रामाजी रोहिणीवर ॥ तैसा साचार विसावा ॥३७॥
की रसांमाजी थोर अमृत ॥ तैसा विसावा सुरस बहुत ॥ की त्रिदशांमाजी शचीनाथ ॥ विसावा सत्य तैसाचि हा ॥३८॥
की भोगियांमाजी दशशतवक्त्र ॥ की नवग्रहांमाजी दशशतकर ॥ तैसा विसावा सुंदर ॥ हरिविजयामाजी पै ॥३९॥
जे प्रवृत्तिशास्त्रे ऐकता ॥ भागले बहुत ग्रंत वाचिता ॥ ते विसाव्यांत तत्त्वतां ॥ विसांवती हे साच ॥२४०॥
ब्रह्मानंदा यादवेंद्रा ॥ जगद्व्यापका श्रीकरधरा ॥ हाचि वर देई सत्वरा ॥ विसावा अंतरामाजी भरो ॥४१॥
इति श्रीहरीविजयग्रंथ ॥ संमत हरिवंशभागवत ॥ श्रोते चतुर पंडित परिसोत ॥ विंशतितमाध्याय गोड हा ॥२४२॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ अध्याय ॥२०॥२४२॥
No comments:
Post a Comment