Tuesday, January 17, 2012

लता मंगेशकर ह्यांचे पत्र

"बुद्धिविलास दाखवणारे काव्य हे रसिकाला चकित करते. स्तीमित करते, थक्क करते पण जे गाणे किंवा जे काव्य कलावंताच्या हृदयातून उत्स्फूर्तपणे प्रकट होते, ते ऐकणाऱ्याच्या काळजाचा ठाव घेते. त्यात भपका नसेल, डामडोल नसेल,ऐट नसेल, पण त्यातली उत्कटता, सरलता आणि प्रांजळपणा हा सरळ आपल्या हृदयातप्रवेश करतो."
'रंग माझा वेगळा' हा भटांचा कवितासंग्रह वाचून लता मंगेशकर ह्यांनी पाठवलेले पत्र येथे  सादर आहे.

रंग माझा वेगळा - लता मंगेशकर ह्यांचे पत्र


प्रिय सुरेश भट यांस सस्नेह नमस्कार.
'रंग माझा वेगळा' हा तुमचा कवितासंग्रह तुम्ही अगत्यपूर्वक मला वाचण्यासाठी दिला त्याबद्दल आभारी आहे. तुमच्या कविता वाचायला सुरवात केली आणि एका बैठकीतच सगळा संग्रह मी वाचून काढला. तुमच्या कविता वाचताना सहज जे विचार मनात आले ते तुम्हाला लिहून कळवावे असे वाटले; म्हणून हे पत्र लिहीत आहे.

तुमच्या कवितांमागे वेगवेगळ्या प्रेरणा आहेत। काही कविता देशात घडणाऱ्या राजकीय आणि सामाजिक संघर्षाच्या प्रसंगी लिहिल्या गेल्या आहेत. या कवितांमधून तुमच्या देशभक्तीचा, मायदेशाविषयीच्या, तुमच्या उत्कट भावनेचा आविष्कार झाला आहे. या कवितांतली 'उषःकाल होता होता काळरात्र झाली! अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली!' ही कविता मला अतिशय आवडली. देश स्वतंत्र झाला. पण स्वातंत्र्याबरोबर आपली जी सुखस्वप्ने साकार व्हायला हवी होती ती तशी झाली नाहीत. उलट स्वातंत्र्योत्तर काळामध्ये देशात अनेक दुष्ट प्रवृती मोकाट सुटल्या आणि सामान्य माणूस साध्या सुखाला, साध्या आनंदालाही वंचित झाला. यामुळे संवेदनक्षम कविमनात उसळलेला प्रक्षोभ या कवितेत अतिशय परिणामकारक रीतीने प्रकट झाला आहे. इथे तुमची चीड, तुमचे दुःख, तुमची वेदना अगदी अस्सलपणे जाणवते आणि ती काळजाला जाऊन भिडते. या सुंदर कवितेबद्दल तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच.

तुमच्या कवितासंग्रहातला दुसरा भाग आहे तो गीतांचा। मी कविता आवडीने वाचते. गीतांशी तर गाण्यामुळे हरघडी संबंध येतो. गीते वाचताना मला ती त्यातल्या काव्यकल्पनांमुळे जशी आकर्षून घेतात तसे त्यात दडलेले 'गाणे'ही मला सारखे जाणवत राहते.'वाजवी मुरली देवकिनंदन', 'आज गोकुळात रंग खेळतो हरी', सखि मी मज हरपुन बसले ग',मालवून टाक दीप चेतवून अंग अंग' ही तुमची गीते वाचताना मला त्यातले काव्य तर आवडलेच; पण त्याची 'गेयता' ही मला हृदयंगम वाटली. काव्य आणि गीत यांना जोडणारा धागा गेयता हाच आहे. गीताची शब्दरचना निर्दोष असली, नादमधुर मृदू व्यंजनांनी युक्त असली, तर असे गीत चाल बसवण्याच्या दृष्टीने संगीतदिग्दर्शकाला प्रेरणा देते आणि गायकालाही ते गीत गाताना मनाला थोडे समाधान वाटते. 'आज गोकुळात रंग खेळतो हरी', 'मेंदीच्या पानवर', मालवून टाक दीप चेतवून अंग अंग' ही तुमची गीते ध्वनीमुद्रिकेसाठी गाताना मला हे समाधान आणि आनंद फार मोठ्या प्रमाणात लाभला. चांगल्या गीताची माझ्या दृष्टीने एक कसोटी आहे. गीत इतके चांगले 'बांधलेले' असावे की ते 'बांधले' आहे हेही कुणाच्या ध्यानात येऊ नये. तुमची गीते रचनेच्या दृष्टीने इतकी देखणी व बांधेसूद आहेत की, ती ह्या कसोटीला निश्चित उतरतात. गीत कोणते आणि काव्य कोणते; गीतकाराला कवी मानावे की नाही, या वादात माझ्यासारखीने पडू नये. पण उत्तम गीत हे मुळात उत्तम काव्यही असावे लागते, ह्याबद्दल सहसा कुणाचा मतभेद होईल असे वाटत नाही. तसेच पाहिले तर ज्ञानदेवांसारख्या महाकवीची 'मोगरा फुलला', 'पैल तो गे काऊ कोकताहे','धनु वाजे घुणघुणा' किंवा 'रुप पाहता लोचनी' ही गीतेच आहेत ना? पण त्यातले काव्य अस्सल नाही असे कोण म्हणेल? 'मालवून टाक दीप' हे तुमचे गीत उत्तम काव्य म्हणूनही तितकेच परिणामकारक आहे. 'बोल रे हळू उठेल चांदण्यावरी तरंग' यासारखी त्या गीतातली रम्य आणि नाजूक कल्पना गीत गाऊन झाल्यावरही दीर्घकाळ माझ्या मनात तरळत राहिली.

तुमच्या या संग्रहातला सर्वात चांगला वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे तो अर्थात गझल शैलीतील कवितांचा। तुमचे व्यक्तिमत्त्व, तुमच्या व्यथा, तुमच्या वेदना, जीवन जगताना तुम्हाला आलेले कटु अनुभव, या साऱ्यांचा अर्क तुमच्या गझलवजा कवितांत उतरला आहे. उर्दू कवींच्या गझला तुम्ही मनःपूर्वक वाचल्या आहेत. इतकेच नव्हे तर गझलांची जी एक 'खासियत' असते ती तुम्ही स्वतःमध्ये उत्तम मुरवली आहे. एक प्रकारची बेहोषी, बेफिकिरी, जगाबद्दलची पूर्ण उपेक्षा, आपल्याच भावविश्वात रमून राहण्याची वृत्ती, तीव्र एकाकीपणा, आणि अंतःकरणात सलत राहिलेल्या दुःखाची जिवापाड जपणूक-

दुभंगून जाता जाता मी अभंग झालो!
चिरा चिरा जुळला माझा, आत दंग झालो!
किरण एक धरुनी हाती मी पुढे निघालो!
अन् असाच वणवणतांना मी मला मिळालो!


सर्व संग सुटले, माझा मीच संग झालो...
.... ..... .....
आता मजेने बोलतो भेटेल त्या दुःखासवे!
सांभाळूनी घेती मला माझी इमाने आसवे
.... .... ....
केव्हातरी दात्यापरी आयुष्य हाका मारते
मीही असा भिक्षेकरी ज्याला न काही मागवे!

तुमच्या कवितांमध्ल्या काही कल्पना विलक्षण नाजूक आणि सुंदर आहेत, अशा कल्पना माझ्या कायम ध्यानात राहून गेल्या आहेत!

मनांतल्या मनात मी तुझ्यासमीप राहतो!
तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो!
तसा न राहिला आता उदास एकटेपणा
तुझीच रूपपल्लवी जिथे तिथे करी खुणा
कसा हवेत मी तुझ्यासवे सळाळतो
.... .... ......
अशीच येथली दया हवेत चांचपायाची
अशीच जीवनास या पुन्हा क्षमा करयाची
.... ..... ......
असेच निर्मनुष्य मी जिथेतिथे असायचे
मनात सूर्य वेचुनी जनांत मावळायचे!
..... ..... .......
मग सुटेल मंद मंद वासंतिक पवन धुंद
माझे आयुष्य तुझ्या अंगणात टपटपेल!

गझल म्हटल्यावर त्यातल्या भावनांचे हे स्वरूप प्रथम मनात उभे राहते। गझलेची ही विशिष्ट वृत्ती तुम्ही पूर्णपणे आत्मसात केली आहे. उर्दू गझल भरपूर वाचण्यात एक धोका असा होता की, तुमच्या कविता या उर्दू किंवा फारसी गझलांचे नुसते अनुकरण होणेही शक्य होते. तथापि तुमच्या बाबतीत तसे ते झाले नाही. तुमच्या या प्रकारच्या कविता अगदी तुमच्या स्वतःच्या आहेत. गझल वाचनामुळे तुमची विशिष्ट कवीवृत्ती सिद्ध झाली असे म्हणण्यापेक्षा, मुळ तुमची मनोवृत्ती गझलेच्या भावविश्वाशी मिळतीजुळती असल्यामुळे गझल शैलीतील कवितेचे माध्यम भावाविष्कारासाठी तुम्ही निवडले, असे म्हटल्यास ते अधिक बरोबर होईल. उर्दू गझल मीही पुष्कळ वाचले आहेत. म्हणूनच तुमच्या या कवितांचा अस्सलपणा मला सारखा जाणवत राहिला. त्यांतली वेदना सच्चेपणाने जिवाला भिडत राहिली.

तुमच्या या कवितांत एकही कविता अशी नाही की, ज्यातली एखादी तरी ओळ, एखादी तरी भावना, एखादी तरी कल्पना सतत स्मरणात राहात नाही! अशा ओळी, भावना, कल्पना द्यायच्या म्हटल्या तर कितीतरी लिहावे लागेल, पण त्यातल्या त्यात काही ओळी लिहिल्याशिवाय मला राहावतच नाही:

माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी
माझियासाठी न माझ्या पेटण्याचा सोहळा!
... .... .... ....
स्वप्न माझे भंगले अन् गीत माझे संपले
हाय! बाजारांत माझा हुंदका आणू नका!

'जन्माच्या वेळीचे सावध पान पान','कार्याचा बंद कापूर', स्वप्नदेशी अनावर झालेली नीज' अशा कोमल आणि काव्यमय शब्दचित्रांचा ठसा मनावर एकदा उमटला की, तो कधी पुसून जात नाही।

तुमचा कवितासंग्रह वाचताना एक विचार राहून राहून मनात येत होता. काव्य असो की गाणे असो, त्यात बुद्धीच्या चपल आणि तल्लख विलासापेक्षा भावनेचा जिवंत जिव्हाळा हाच शेवटी आपल्या मनाला जाऊन भिडतो आणि नंतर दीर्घकाळ तिथे रेंगाळत राहतो. मी अनेक कवींची काव्ये वाचली आहेत, आणि अनेक गायकांचे गाणे ऐकले आहे.बौद्धिक चमत्कृतीची कसरत करून गायिलेले गाणे किंवा केवळ तल्लख बुद्धिविलास दाखवणारे काव्य हे रसिकाला चकित करते. स्तिमित करते, थक्क करते पण जे गाणे किंवा जे काव्य कलवंताच्या हृदयातून उत्फूर्तपणे प्रकट होते, ते ऐकणाऱ्याच्या काळजाचा ठाव घेते. त्यात भपका नसेल, डामडौल नसेल, ऐट नसेल, पण त्यातली उत्कटता, सरलता आणि प्रांजळपणा हा सरळ आपल्या हृदयात प्रवेश करतो. आपल्या संतकवींचे कितीतरी काव्य असे उत्कट आणि हृदयस्पर्शी आहे. आपल्या बालकवींच्या काव्यात हे साधेपणाचे सौंदर्य होते. उर्दू कवींमध्ये मीर हा याच प्रकारचा कवी होऊन गेला. गायनाच्या संदर्भात बोलायचे झाले तर आपल्याकडच्या शास्त्रीय गायकांमध्ये बडे गुलाम अलीखाँसाहेब यांच्या गाण्यात हा भावनेचा जिव्हाळा होता. चित्रपट संगीत गाणाऱ्या कलावंतामध्ये सहगल हा या जातीचा कलावंत होता. त्याच्यापाशी डोळे दिपवणारी बौद्धिक चमत्कृती नव्हती; पण तो जे गाई ते रसिकांच्या हृदयाचा तत्काळ वेध घेई. तुमच्या कवितेबद्दल मला हेच म्हणावेसे वाटते. या कविता वाचताना त्यातल्या दुःखाची, वेदनेची कळ ही वाचकालाही जाणवण्याइतकी निश्चित प्रभावी आहे. या कवितांत बुद्धीला दिपवणारे चमत्कार नसतील; पण भावनेचा जिवंत जिव्हाळा, मनाचा निर्मळ प्रांजळपणा त्यात खचित आहे. आणि त्याचे मोल फारच मोठे आहे.

असो. पत्र लांबले. पण तुम्ही ज्या स्नेहभावनेने तुमचा कवितासंग्रह मला वाचायला दिला, त्याच मनमोकळेपणाने मी हा संग्रह वाचताना जे जे काही मला जाणवले ते तुम्हाला लिहून कळवले आहे. आज प्रसिद्ध होणाऱ्या मराठी कवितासंग्रहांमध्ये तुमचा हा संग्रह आपल्या स्वतंत्र वैशिष्ट्यामुळे निश्चित ठळकपणाने उठून दिसेल. त्याचा 'रंग वेगळा' आहे हे तर खरेच; पण तो रंग अस्सलही आहे. कारण, तुमच्या हृदयातले रक्त त्यात मिसळलेले आहे!
- लता मंगेशकर

No comments:

Post a Comment