Wednesday, October 15, 2014

'माझे विद्यापीठ' विषयी...

पद्मश्री कवी श्री. नारायण सुर्वे यांची आज जयंती. १५ ऑक्टोबर १९२६ हा त्यांचा जन्मदिवस. सुर्वे देवाधीन झाले तेव्हा महाराष्ट्र टाईम्स मध्ये छापून आलेला हा लेख.

'ना घर होते, ना गणगोत, चालेन तेवढी पायाखालची जमीन होती...' अशा ओळींनी प्रारंभ होणारी नारायण सुर्वे यांची 'माझे विद्यापीठ' ही कविता म्हणजे जणू कवीचे आत्मचरित्रच. विलक्षण गाजलेली ही कविता कशी रचली गेली... तिला कशी प्रसिद्धी मिळाली, हे खुद्द सुर्वे यांच्याच शब्दांत...….
---- ---- // o // ---- ----


काही काही कविता विलक्षण रसायन जमून यावे, तशा चपखलपणे स्वत: व्यक्तित्त्व घेऊनच व्यक्त होतात. आशय शब्दांचे बोट धरून चालतो, की शब्दच आशयाला खांद्यावर उचलून मिरवत नेतात, हे कळेनासे होते. इतका एकवटलेपणा, एकजिनसी अनुभवांचा विलक्षण पट तयार होतो. मालिका तयार होते. अशा रचनेतील एकही शब्द इथे तिथे सरकला, किंवा जरा धक्का त्याला लागला की, सारेच कोलमडून पडले असे वाटत राहते. नवा विलक्षण पोत आपणासमोर रचनेच्या रूपात उभा राहतो. 'माझे विद्यापीठ' ही कविता म्हणजे ७२ ओळींची दीर्घ रचना आहे. एकूण चार बंधांत ती बांधली गेली आहे व अठरा ओळींचा एकेक बंध व त्यातील ताणेबाणे दुसऱ्या बंधाशी जोडीत ती निखळपणे विणत जाते. कवी जर स्वनिमिर्तीशी प्रामाणिक असेल व कवितेला कवितेच्या, म्हणजेच तिला तिचे स्वातंत्र्य देऊन निखळ रूपात बोलू देणार असेल, तर ती अधिक मोकळी होते, अधिक सच्ची होते. काळाच्याही पलिकडे पाहण्याची, उड्डाण करण्याची क्षमता तिच्यात येते, असा माझा अनुभव आहे. कविता लिहिणे ही एक जोखीमच आहे, असे मी मानतो. ती एक गंभीर गोष्ट आहे. नवसृजन आहे. तिच्यावर कसलेही सावट न येईल याची काळजी घ्यावी लागते. याचा अर्थ या सर्व प्रक्रियेपासून कवी अलिप्त राहू शकतो का? त्याचे उत्तर होय आणि नाही असेच द्यावे लागेल. कारण निमिर्तीत देखील रचनात्मक आंतरद्वंद्व असते. तो रचनात्मक संघर्षच असतो. सडेपणा आणि कलात्मकता याचे भान ठेवावेच लागते. दीर्घ रचनेत हा तोल सांभाळावाच लागतो. तसे पाहिले तर 'माझे विद्यापीठ' कवितेने मला फार दमवले आहे. उणेपुरे एक वर्ष मी ही कविता लिहित होतो. कुणाला हा मूर्खपणाही वाटेल. तो माझ्या निमिर्तीबाबत वारंवार घडतो खरा! परंतु मला त्यात समाधान वाटते. एखादी कविता उत्तमपणे माझ्याकडून लिहिली गेली, की त्या पलिकडे कोणताही सवोर्च्च आनंद मी मानत नाही.

'माझे विद्यापीठ' या कवितेचा शेवटचा अठरा ओळींचा बंध माझ्याकडून आधी रचला गेला. 'निळ्या छताखाली नांगरून ठेवल्या होत्या साहेबांच्या बोटी' या अठरा ओळींच्या शेवटच्या ओळीतले शब्द 'कधी दोन घेत, कधी दोन देत' होते. खरे तर ही कविता इथेच संपत होती. मग तिची सुरुवात कुठे? मी चक्रावून गेलो. वर्षभर या कवितेभोवती मी घुमत राहिलो. पुन्हा पुन्हा वरील ओळींचे अर्थ व संदर्भ शोधत मी एकदाचा 'ना घर होते, ना गणगोत' या पहिल्या कडव्यातील पहिल्या ओळीच्या रचनेने सावरलो आणि कविता मनासारखी पूर्ण करून मोकळा झालो. त्यानंतर सहा महिने मी एकही ओळ लिहिली नाही इतका कातावून गेलो. असो.

ही कविता एकदाची लिहून झाली खरी; परंतु ती प्रकाशित कोण करणार, हा प्रश्न माझ्यासमोर होताच. आधीच काव्याविषयी उदासीनता. त्यात मी पडलो नवखा कवी व कोणत्याही मासिकाची ओळखपाळख नसलेला. बहुतेक नियतकालिके जाहिराती आधी छापतील व कविता नंतर. विचार केला तर त्यांचेही असे करणे चूक नाही व कविता प्रकाशित करणे आवश्यक आहे का, हा आग्रहही चूक नाही. कविता काही उत्पादक गोष्ट नाही आणि जाहिरातीवर तर नियतकालिके उभी राहतात, चालतात, हा अनुभव सार्वत्रिकच आहे. शिवाय ही कविता नीट प्रकाशित करायची म्हटले, तर मासिकाची दोन पाने तरी लागणारच. मोठा पेच होता.

दुसऱ्याच दिवशी मी प्रा. केशव मेश्राम यांना भेटलो. मी जेव्हा जेरबाई वाडिया, परळ येथील बोगदा चाळीत राहात असे, खरे तर या चाळीला अंधार चाळ म्हणणेच योग्य होईल, प्रा. मेश्राम तेव्हा म्हात्रे पेन्सच्या शेजारील बैठ्या चाळीत राहत. पस्तिसेक वर्षांपूवीर्ची ही घटना आहे. सेनापती बापट मार्गावरील झोपडपट्ट्या, त्यालगतचे भलेमोठे गटार व वस्त्यांवरचे मिणमिणते दिवे. प्रा. मेश्रामांना 'माझे विद्यापीठ' ही कविता रात्री याच मार्गावरील एका पालिकेच्या दिव्याखाली बसवून ऐकवली होती. त्या सोबतच 'सत्य' नावाची माझी दुसरीही एक कविता मी ऐकवली होती. त्यांना दोन्ही कविता आवडल्या. म्हणाले, 'मला या दोन्ही कविता आत्ताच द्या. माझ्या कॉलेजमध्ये (एम. डी. कॉलेज, परळ) 'सत्यकथे'चे संपादक प्रा. राम पटवर्धन अर्धवेळ प्राध्यापक म्हणून शिकवायला येतात. त्यांना मीच स्वत: त्या वाचून दाखवतो.'

'अहो, मेश्राम, मला 'सत्यकथे'त कोणीही ओळखत नाही.' मी म्हणालो.

'चालेल, तुमची ओळख मी करून देईन.' प्रा. मेश्राम म्हणाले.

आणि बरोबर चार-पाच दिवसांनंतर मला प्रा. मेश्राम यांच्याकरवी प्रा. राम पटवर्धनांचा 'सत्यकथा' कचेरीत भेटायला या असा निरोप आला. मी सत्यकथा कचेरीत पोहोचलो.

'या. या.' राम पटवर्धन म्हणाले, 'बसा, तुमच्या दोन्ही कविता आम्ही स्वीकारल्या आहेत. 'माझे विद्यापीठ' ही सत्यकथेच्या दिवाळी अंकासाठी व 'सत्य' ही कविता 'मौज'च्या दिवाळी अंकासाठी घेतली आहे. पण तुम्हाला एक विचारू का सुवेर्?'

'बोला.' मी म्हणालो.

'तुमचा पहिला काव्यसंग्रह निघाला आहेच. त्याला पुरस्कारही मिळालेला आहे. म्हणजे तुम्ही बरीच वषेर् लेखन करीत आहात; तुम्हाला 'सत्यकथे'कडे लेखन पाठवावे असे का वाटले नाही. मला जरा याविषयी कुतूहल आहे म्हणून विचारतो.' इतके बोलून ते थांबले.

'खरे सांगू, रामभाऊ!' मी म्हणालो, 'तुमच्या 'सत्यकथा' अथवा 'मौज'मध्ये जे लिखाण येते, त्या लेखकांविषयी मला आदर आहेच; परंतु त्यांच्यासारखे मला लिहिता येणार नाही. कारण त्यांचा बाज व लिहिणे निराळे, माझे निराळे.'

'द्या टाळी!' म्हणत रामभाऊ पटवर्धनांनी हात पुढे केला.

'परंतु एक करा. तुम्हाला असे का वाटते याच्याविषयी तुम्ही एक टिपण अथवा लेखच पाठवा. आम्ही तो छापू. तुमची टीकाटिप्पणी आम्हाला हवी आहे.'

मी त्यावर स्वत:चे मत मांडायचे कबूल केले; परंतु अद्याप काही लिहू शकलो नाही. त्यांनीही मला अनेकदा भेट होऊनही पुन्हा कधी हटकले नाही. तेही विसरले, मीदेखील विसरलो.

पुढे 'सत्यकथे'चे प्रकाशनच बंद झाले. माझे लिहिणे आणि त्यांचे छापणे थांबले ते आजतागायत तसेच राहिले.

या 'माझे विद्यापीठ' कवितेविषयी अशा कितीतरी हकीकती आहेत; परंतु एक गोष्ट मला नमूद करावीशी वाटते ती अशी :

याच 'मौज प्रकाशन गृहा'तच माझी प्रा. श्री. पु. भागवत यांची गाठ पडली. पुढे अधूनमधून केव्हा तरी फुटकळपणे भेटत राहिलो, बोलत राहिलो. एकदा मला त्यांनी थांबवले. 'तुम्हाला एक विचारू. या कवितेतील ती अंतर्गत लय आहे, तिचा संथसा खळबळ ध्वनी मला ऐकायला येतो, तो तुम्ही कसा साधलात. तेवढे सांगाल?' श्री. पु. म्हणाले.

मी काय सांगणार डोंबल!

मी म्हणालो, मला यातले काही माहीत नाही. मी लिहिले आणि तुम्ही छापले. एवढेच. पुढे १९६६ मध्ये 'माझे विद्यापीठ' या शीर्षकाने माझा नवा कवितासंग्रह प्रकाशित झाला. मी भागवतांना एक प्रत भेट म्हणून पाठवली. दोन-चार महिन्यांतच त्यांचे मला पत्र आले ते असे :

प्रिय सुर्वे
संग्रह अगत्यपूर्वक पाठवल्याबद्दल आभार; परंतु मला एक नवल वाटते ते तुम्ही आमच्या 'मौज प्रकाशन गृहा'च्या यादीतून कसे काय निसटलात याचे. ते असो. आता एक करा, जेव्हा या संग्रहाची नवी आवृत्ती प्रकाशित कराल तेव्हा या संग्रहाची मुदणप्रत मी तपासून देईन. तेवढे लक्षात ठेवा.

('डिंपल पब्लिकेशन'च्या 'कहाणी कवितेची' या नारायण सुर्वे यांच्या पुस्तकातून साभार.) 


---- ---- // o // ---- ----

साभार : महाराष्ट्र टाईम्स Aug 17, 2010

Tuesday, October 7, 2014

भोंडल्याची ( हादग्याची ) गाणी - १३

आड बाई आडवणी, आडाचं पाणी काढवणी
आडात होती देवळी, देवळीत होता खराटा
आमचा हादगा मराठा।।

आड बाई आडवणी आडाचं पाणी काढवणी
आडात होती देवळी देवळीत होता साबण
आमचा हादगा बामण ।। 

अशाप्रकारे देवळी तून वेगवेगळ्या वस्तू काढून गाणे पूर्ण व्हायचे. ह्याच गाण्याचे दुसरे रूप आहे ते भोंडल्याची वेळ दर्शविणारे. 
आड बाई आडोणी, आडाचं पाणी काढोणी।
आडात पडली सुपारी, आमचा भोंडला दुपारी ।।

आड बाई आडोणी आडाचं पाणी काढोणी।
आडात पडली मासोळी आमचा भोंडला संध्याकाळी ।।

आड बाई आडोणी आडाचं पाणी काढोणी।
आडात पडली कात्री आमचा भोंडला रात्री ।।

आड बाई आडोणी आडाचं पाणी काढोणी।
आडात पडला शिंपला आमचा भोंडला संपला ।।

भोंडल्याची ही माहिती आणि गाणी तुम्हा सर्वांना आवडली असतील अशी आशा आहे.
भोंडल्याचे हे व्रत आजच्या काळात मागे पडले आहे, खेळ वा गंमत म्हणून प्रत्येकाने दर नवरात्रीत एकदा तरी हे व्रत करावे, अशाने आपला वारसा मागे पडणार नाही.


Monday, October 6, 2014

भोंडल्याची ( हादग्याची ) गाणी - १२

हस्त हा जीवनाचा राजा
पावतो जनांचिया काजा
तयासी नमस्कार माझा ।।

दहा मधले आठ गेले
( पावसाची नक्षत्रे दहा, त्या पैकी मृग, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, मघा, पुर्वा, उत्तरा मग हस्त यायचं )
हस्ताची ही पाळी आली
म्हणोनी त्याने गंमत केली ।।

ज्याच्या योगे झाला चिखल
त्याही चिखलात लावल्या केळी ।।

एकेक केळ मोठालं
भोंडल्या देवा वाहिलं ।।

============================================

भोपळ्याच फुल बाई फुलरंजना
माळ्याचा माळ बाई माळरंजना
माळ्याची सांडली भिकबाळी
हुड्कुन दे पण हुड्केना
हुडकली पण सापडेना

शि़क्यावरच लोणी वाहात जा
ताट वाटी झळकत जा
ताट वाटी झळकली
पंगतीत जावून बसली

सर्प म्हणे मी एकुला
दारी आंबा पिकुला
दारी आंब्याची फोड ग
खिरापतीला काय ग ?

Sunday, October 5, 2014

भोंडल्याची ( हादग्याची ) गाणी - ११

माझ्या सुंद्रीचं लगीन
वराडी कोण कोण येणार, माझ्या सुंद्रीचं लगीन

भाऊ म्हणे मी भाऊ, आणीन नवरा पाहून
माझ्या सुंद्रीचं लगीन

बहिण म्हणे मी बहीण, करवली मी होईन
माझ्या सुंद्रीचं लगीन

बाप म्हणे मी बाप, खर्चीन हुंडा लाख
माझ्या सुंद्रीचं लगीन

आई म्हणे मी आई, करीन लग्नात घाई
माझ्या सुंद्रीचं लगीन

चुलता म्हणे मी चुलता, येईन जेवणापुरता
माझ्या सुंद्रीचं लगीन

चुलती म्हणे मी चुलती, येईन वरातीपुरती
माझ्या सुंद्रीचं लगीन

मावसा म्हणे मी मावसा, बसेन दागिन्यासरसा
माझ्या सुंद्रीचं लगीन

मावशी म्हणे मी मावशी, फराळाचे माझ्यापाशी
माझ्या सुंद्रीचं लगीन

मामा म्हणे मी मामा, येईन सर्व कामा
माझ्या सुंद्रीचं लगीन

भट म्हणे मी भट, धरीन अंतरपाट
माझ्या सुंद्रीचं लगीन

भटीण म्हणे मी भटीण, सगळ्याच पोळ्या लाटीन
माझ्या सुंद्रीचं लगीन

(साभार : मायबोली वेबजाळ)

Saturday, October 4, 2014

भोंडल्याची ( हादग्याची ) गाणी - १०

सासरच्या जाच सांगणाऱ्या ह्या मुली सासरची बढाई सुद्धा तेवढीच रंगवून सांगायच्या.

भुलाबाई भुलाबाई सासरे कसे गं सासरे कसे?
कचेरीत बसले हे वकील जसे गं वकील जसे ॥१॥

भुलाबाई भुलाबाई सासू कशा गं सासू कशा?
कपाळभर कुंकू पाटलीन जशा गं पाटलीन जशा ॥२॥

भुलाबाई भुलाबाई पुतणे कसे गं पुतणे कसे?
हातामध्ये घडी मास्तर जसे गं मास्तर जसे ॥३॥

भुलाबाई भुलाबाई जाऊ कशी गं जाऊ कशी?
हातामध्ये लाटणं स्वयंपाकीण जशी गं स्वयंपाकीण जशी ॥४॥

भुलाबाई भुलाबाई दीर कसे गं दीर कसे?
डोळ्यावर गॉगल डॉक्टर जसे गं डॉक्टर जसे ॥५॥

भुलाबाई भुलाबाई नणंद कशी गं नणंद कशी?
हातामध्ये घडी मास्तरीन जशी गं मास्तरीन जशी ॥६॥

भुलाबाई भुलाबाई पती कसे गं पती कसे?
जटातून गंगा वाहे शंकरजी जसे गं शंकरजी जसे ॥७॥

भुलाबाई भुलाबाई आपण कशा गं आपण कशा?
शंकराच्या मांडीवर पार्वती जशा गं पार्वती जशा ॥८॥

भुलाबाई भुलाबाई मुल कसे गं मुल कसे?
वाकड्या सोंडाचे गणपती जसे गं गणपती जसे ॥९॥

(साभार : मायबोली वेबजाळ - संकलन : गंगाधर मुटे)

Friday, October 3, 2014

भोंडल्याची ( हादग्याची ) गाणी - ९

श्रीकांता कमलाकांता असं कसं झालं
असं कसं वेडं माझ्या कपाळी आलं

वेडयाच्या बायकोने केले होते लाडू
तिकडून आला वेडा त्याने निरखून पाहिले
चेंडू चेंडु म्हणून त्याने खेळायला घेतले ॥१॥

श्रीकांता कमलाकांता असं कसं झालं
असं कसं वेडं माझ्या कपाळी आलं

वेडयाच्या बायकोने केला होता चिवडा
तिकडून आला वेडा त्याने निरखून पाहिला
केरकचरा म्हणून त्याने फेकून दिला ॥२॥

श्रीकांता कमलाकांता असं कसं झालं
असं कसं वेडं माझ्या कपाळी आलं
 
वेडयाच्या बायकोने केल्या होत्या करंज्या
तिकडून आला वेडा त्याने निरखून पाहिल्या
होडया होडया म्हणून त्याने पाण्यात सोडल्या ॥३॥
 
श्रीकांता कमलाकांता असं कसं झालं
असं कसं वेडं माझ्या कपाळी आलं

वेडयाच्या बायकोने केल्या होत्या चकली
तिकडून आला वेडा त्याने निरखून पाहिली
चक्रं चक्रं म्हणून त्याने फेकून दिली ॥४॥

श्रीकांता कमलाकांता असं कसं झालं
असं कसं वेडं माझ्या कपाळी आलं

वेडयाच्या बायकोने केले होते श्रीखंड
तिकडून आला वेडा त्याने निरखून पाहिले
स्नो स्नो म्हणून त्याने अंगाला फासले ॥५॥

श्रीकांता कमलाकांता असं कसं झालं
असं कसं वेडं माझ्या कपाळी आलं
 
वेडयाच्या बायकोने केल्या होत्या शेवया
तिकडून आला वेडा त्याने निरखून पाहिल्या
अळ्या अळ्या म्हणून त्याने टाकून दिल्या ॥६॥
 
श्रीकांता कमलाकांता असं कसं झालं
असं कसं वेडं माझ्या कपाळी आलं
 
वेडयाची बायको एकदा पलंगावर झोपली
तिकडून आला वेडा त्याने निरखून पाहिली
मेली मेली म्हणून त्याने जाळून टाकली ॥७॥

Thursday, October 2, 2014

भोंडल्याची ( हादग्याची ) गाणी - ८

खालील गाण्यात यमक साधणारे शब्द शोधून हजर असलेल्या मुलींची / मुलांची नावे गुंफतात.


अडकित जाऊ खिडकीत जाउ खिडकीत होता बत्ता
भुलाबाईला लेक झाला नाव ठेवा दत्ता ॥१॥

अडकित जाऊ खिडकीत जाउ खिडकीत होता वाटी
भुलोजीला लेक झाली नाव ठेवा चाटी ॥२॥

अडकित जाऊ खिडकीत जाउ खिडकीत होती भाकर
भुलाबाईला लेक झाला नाव ठेवा प्रभाकर ॥३॥

अडकित जाऊ खिडकीत जाउ खिडकीत होता चेंडू
भुलोजीला लेक झाला नाव ठेवा बंडू  ॥४॥

अडकित जाऊ खिडकीत जाउ खिडकीत होता चष्मा
भुलाबाईला लेक झाली नाव ठेवा सुषमा / रेश्मा  ॥५॥


अडकित जाऊ खिडकीत जाउ खिडकीत होता रुपया बंधा
भुलोजीला लेक झाली नाव ठेवा चंदा  ॥६॥

अडकीत जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत ठेवला अडकित्ता
भुलाबाईला मुलगी झाली, नाव ठेवलं स्मिता ॥७॥

अडकित जाऊ खिडकीत जाउ खिडकीत होता पाटा
भुलोजीला लेक झाला साखर खडी वाटा,
बाणा बाई बाणा, स्वदेशी बाणा, गाणे संपले खीरापत आणा ॥५॥

================================================



काळी चंद्रकळा नेसु कशी?
गळ्यात हार घालू कशी?

ओटीवर मामांजी जाऊ कशी?
दमडिचं तेल आणु कशी?

दमडीचं तेल आणलं
सासुबाईंचं न्हाणं झालं

वन्सन्ची वेणी झाली
भावोजींची दाढी झाली

मामंजींची शेन्डी झाली
उरलेलं तेल झाकुन ठेवलं

लांडोरीचा पाय लागला
वेशीबाहेर ओघळ गेला

त्यात हत्ती वाहून गेला
सासुबाई सासुबाई अन्याय झाला

दुध्-भात जेवायला वाढा
माझं उष्ट तुम्हीच काढा.…


Wednesday, October 1, 2014

भोंडल्याची ( हादग्याची ) गाणी - ७

सासरी नांदत असलेल्या मुलीला सणासुदीच्या निमित्ताने माहेरी जायची परवानगी मिळत असे.
खालील गाण्यात वडील मुलीला माहेरी नेण्यासाठी येतात आणि आनंदलेली मुलगी लगेच तयारही होते  पण सासरच्या मंडळींची परवानगी हवी ना… आणि ती परवानगी लगेच मिळायची नाही, कधी कधी जायलाही मिळायचे नाही. सासरच्या मंडळींना ही घराची घडी विस्कळू नये म्हणून काळजी घायची असायची; त्यामुळे भीत - भीत परवानगी मागणारी सून आणि नाकारणारी सासरची मंडळी खालील गाण्यांमध्ये अधोरेखित होतात.

सासूबाई, सासूबाई मला आलं मूळ
जाऊ का मी आपुल्या माहेरा माहेरा ॥ ध्रु.॥
कार्ल्याचा वेल लाव गं सुने लाव गं सुने
मग जा आपुल्या माहेरा माहेरा
कार्ल्याचा वेल लावला हो सासुबाई लावला हो सासुबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा ॥१॥

कार्ल्याचा वेल वाढू दे ग सुने वाढू दे ग सुने
मग जा तू आपुल्या माहेरा माहेरा
कार्ल्याचा वेल वाढला हो सासुबाई वाढला हो सासुबाई
आता तरी जाऊ का मी माहेरा माहेरा ॥२॥

कार्ल्याला फूल येउ दे गं सुने येउ दे गं सुने
मग जा आपुल्या माहेरा माहेरा
कार्ल्याला फूल आलं हो सासुबाई आलं हो सासुबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा ॥३॥

कार्ल्याला फळ येऊ दे गं सुने येउ दे गं सुने
मग जा आपुल्या माहेरा माहेरा
कार्ल्याला फळ आलं हो सासुबाई आलं हो सासुबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा ॥४॥

कार्ल्याची भाजी कर गं सुने कर गं सुने
मग जा आपुल्या माहेरा माहेरा
कार्ल्याची भाजी केली हो सासुबाई केली हो सासुबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा ॥५॥

कार्ल्याची भाजी खा गं सुने खा गं सुने
मग जा आपुल्या माहेरा माहेरा
कार्ल्याची भाजी खाल्ली हो सासुबाई खाल्ली हो सासुबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा ॥६॥

आपलं उष्टं काढ ग सुने काढ ग सुने
मग जा तू आपल्या माहेरा माहेरा
माझं उष्टं काढलं हो सासुबाई काढलं हो सासुबाई
आता तरी जाऊ का मी माहेरा माहेरा

आणा फणी घाला वेणी जाऊ द्या राणी माहेरा माहेरा
आणली फणी घातली वेणी गेली राणी माहेरा माहेरा ॥७॥

=========================================

सोन्याचा करंडा बाई मोत्याचं झाकण
तिथं आमच्या सासुबाई कुंकु लावीत होत्या
सासुबाई सासुबाई मला आलं मूळ
मला काय पुसतीस बरीच दिसतीस
पुस जा आपल्या सासर्‍याला, सासर्‍याला ॥१॥
सोन्याची दऊत बाई मोत्याची लेखणी
तिथं आमचे मामंजी लिहीत होते
मामंजी मामंजी मला आल मुळ
मला काय पुसतीस बरीच दिसतीस
पुस जा आपल्या जावेला, जावेला ॥२॥
सोन्याचा डेरा बाई मोत्याची रवी
तिथं आमच्या जाऊबाई ताक करीत होत्या
जाऊबाई जाऊबाई मला आलं मूळ
मला काय पुसतीस बरिच दिसतीस
पुस जा आपल्या दीराला, दीराला ॥३॥
सोन्याची विटी आणि मोत्याचा चेंडू
तिथं आमचे भाऊजी खेळत होते
भावोजी भावोजी मला आलं मूळ
मला काय पुसतीस बरीच दिसतीस
पुस जा आपुल्या नणंदेला, नणंदेला ॥४॥
सोन्याची सुपली बाई मोत्यांनी गुंफीली
तिथं आमच्या वन्स पाखडत होत्या
वन्सबाई वन्सबाई मला आलं मूळ
मला काय पुसतीस बरीच दिसतीस
पुस ज्या आपुल्या पतीला, पतीला ॥५॥
सोन्याच पलंग बाई मोत्याचे खूर
तिथं आमचे पतिराज झोपले होते
पतिराज पतिराज मला आलं मूळ
आणा फणी घाला वेणी जाऊ दे राणी माहेरा

जाती तशी जाऊ दे, निळ्या घोडीवर बसु दे
निळी घोडी हसली, सखुबाई सुंदर दिसली ॥६॥