Showing posts with label Shivlilamrut. Show all posts
Showing posts with label Shivlilamrut. Show all posts

Friday, July 31, 2020

Shivlilamrut - Adhyay 5

अध्याय पाचवा

श्रीगणेशाय नमः ॥

सदाशिव अक्षरें चारी ॥ सदा उच्चारी ज्याची वैखरी ॥ जो नित्य शिवार्चन करी ॥ तो उद्धरी बहुतां जीवा ॥१॥
बहुत प्रायश्चित्तांचे निर्धार ॥ शास्त्रवक्ते करिती विचार ॥ परी जे शिवनामें शुद्ध साचार ॥ कासया इतर साधनें त्यां ॥२॥
नामाचा महिमा परमाद्भुत ॥ त्यावरी प्रदोषव्रत आचरत ॥ त्यासी सर्वसिध्दि प्राप्त होत ॥ सत्य सत्य त्रिवाचा ॥३॥ तुष्टि पुष्टि धृति आयुष्यवर्धन ॥ संतति संपत्ति दिव्यज्ञान ॥ पाहिजे तिंहीं प्रदोषव्रत पूर्ण ॥ यथासांग करावें ॥४॥
प्रदोषव्रत भावें आचरतां ॥ या जन्मीं प्रचीत पाहावी तत्वतां ॥ दारिद्र्य आणि महद् व्यथा॥ निःशेष पळती षण्मासांत ॥५॥
एकसंवत्सरें होय ज्ञान ॥ द्वादशवर्षी महद्भाग्य पूर्ण ॥ हें जो असत्य मानील व्यासवचन ॥ त्यासी बंधन कल्पांतवरी ॥६॥
त्याचा गुरु लटिकाच जाण ॥ त्याची दांभिक भक्ति लटिकेंच ज्ञान ॥ उमावल्लभचरणीं ज्याचे मन ॥ त्याहुनि पावन कोणी नाहीं ॥७॥
मृत्यु गंडांतरे दारूण ॥ प्रदोषव्रतें जाती निरसोन ॥ येविषयीं इतिहास जाण ॥ सूत सांगे शौनकांदिकां ॥८॥ विदर्भदेशींचा भूभुज ॥ सत्यरथ नामें तेजःपुंज ॥ सर्वधर्मरत पराक्रमी सहज ॥ बंदीजन वर्णिती सदा ॥९॥
बहु दिवस राज्य करीत ॥ परी शिवभजनीं नाहीं रत ॥ त्यावरी शाल्वदेशींचा नृपनाथ ॥ बळें आला चालूनियां ॥१०॥

आणीक त्याचे आप्त ॥ क्षोणीपाळ साह्य झाले बहुत ॥ सप्त दिवसपर्यंत ॥ युद्ध अद्भुत जाहलें ॥११॥
हा एकला ते बहुत ॥ समरभूमीसी सत्यरथ ॥ धारातीर्थी पावला मृत्य॥ शत्रु नगरांत प्रवेशले ॥१२॥
राजपत्नी गरोदर राजस ॥ पूर्ण झाले नव मास ॥ एकलीच पायीं पळतां वनास ॥ थोर अनर्थ ओढवला ॥१३॥
परम सुकुमार लावण्यहरिणी ॥ कंटक सरांटे रूतती चरणीं ॥ मुर्च्छना येऊनि पडे धरणीं ॥ उठोनि पाहे मागें पुढें ॥१४॥
शत्रु धरितील अकस्मात ॥ म्हणोनि पुढती उठोनि पळत ॥ किंवा ते विद्युल्लता फिरत ॥ अवनीवरी वाटतसे ॥१५॥ वस्त्रें अलंकारमंडित ॥ हिऱ्यांऐसे दंत झळकत ॥ जिचा मुखेंदु देखतां रतिकांत ॥ तन्मय होवोनि नृत्य करी ॥१६॥ पहा कर्माची गती गहन ॥ जिच्या अंगुष्ठी न पडे सूर्यकिरण ॥ ते गरोदर हिंडे विपिन ॥ मृगनेत्री गजगामिनी ॥१७॥ वनीं हिंडे महासती ॥ जेवीं नैषधरायाची दमयंती ॥ कीं भिल्लीरूपें हैमवती ॥ दुस्तरवनी तैसी हिंडे ॥१८॥ कर्मनदीच्या प्रवाही जाण ॥ पडली तीस काढील कोण ॥ असो एका वृक्षाखाली येऊन ॥ परम व्याकुळ पडियेली ॥१९॥
शतांचीं शतें दासी ॥ ओळंगती सदैव जियेपासीं ॥ इंदुमती नाम जियेसी ॥ ते भूमीवरी लोळत ॥२०॥

चहुंकडे पाहे दीनवदनीं ॥ जिव्हा मुख वाळलें न मिळे पाणी ॥ तों प्रसूत झाली तोचि क्षणीं ॥ दिव्य पुत्र जन्मला ॥२१॥
तृषेनें तळमळी अत्यंत ॥ कोण उदक देईल तेथ ॥ बाळ टाकूनि उठत बसत ॥ गेली एका सरोवरा ॥२२॥
उदकांत प्रवेशली तेच क्षणीं ॥ अंजुळी भरूनि घेतसें पाणी ॥ तंव ग्राहें नेली ओढोनि ॥ विदारूनी भक्षिली ॥२३॥
घोर कर्माचें विंदान ॥ वनीं एकला रडे राजनंदन ॥ तंव उमानामक विप्रपत्नी जाण ॥ विगतधवा पातली ॥२४॥
माता पिता बंधु पाहीं ॥ तियेलागीं कोणी नाहीं ॥ एक वर्षाचा पुत्र तीसही ॥ कडिये घेवोनि आली तेथें ॥२५॥
तों नाहीं केलें नालच्छेदन ॥ ऐसें बाळ उमा देखोन ॥ म्हणे अहा रे ऐसें पुत्ररत्न ॥ कोणीं टाकिलें दुस्तर वनीं ॥२६॥ म्हणे कोण जाती कोण वर्ण ॥ मी कैसें नेऊं उचलून ॥ जावें जरी टाकून ॥ वृक व्याघ्र भक्षितील कीं ॥२७॥
स्तनीं दाटूनी फुटला पान्हा ॥ नेत्रीं ढाळीत अश्रुजीवना ॥ बाळ पुढें घेऊनी ते ललना ॥ मुखकमळीं स्तन लावी ॥२८॥ संशयसमुद्रीं पडली वेल्हाळ ॥ म्हणे नेऊ कीं नको बाळ ॥ तंव तो कृपाळु पयःफेनधवल ॥ यतिरूप धरूनि पातला ॥२९॥
उमेलागीं म्हणे त्रिपुरारी ॥ बाळ नेई संशय न धरी ॥ महद्भाग्य तुझें सुंदरी ॥ क्षत्रियराजपुत्र तुज सांपडला ॥३०॥

कोणासी न सांगें हे मात ॥ समान पाळीं दोघे सुत ॥ भणंगासी परीस होय प्राप्त ॥ तैसें तुज जाहलें ॥३१॥
अकस्मात निधी जोडत ॥ कीं चिंतामणि पुढें येऊनि पडत ॥ कीं मृताच्या मुखांत ॥ पडे अमृत पूर्वदत्तें ॥३२॥
ऐसें बोलोनि त्रिपुरारी ॥ गुप्त झाला ते अवसरीं ॥ मग दोघे पुत्र घेवोनि ते नारी ॥ देशग्रामांतरीं हिंडत ॥३३॥
ब्रह्मपुत्राचें नाम शुचिव्रत ॥ राजपुत्राचें नाम ठेविले धर्मगुप्त ॥ घरोघरीं भिक्षा मागत ॥ कडिये खांदीं घेऊनियां ॥३४॥ लोक पुसतां उमा सांगत ॥ माझे पोटींचे दोघे सुत ॥ ऐसी हिंडत हिंडत ॥ एकचक्रनगरा पातली ॥३५॥
घरोघरीं भिक्षा मागत ॥ तों शिवालय देखिलें अकस्मात ॥ आंत द्विज दाटले बहुत ॥ शांडिल्य त्यांत मुख्य ऋषि ॥३६॥
शिवाराधना करिती विधियुक्त ॥ तों उमा आली शिवालयांत ॥ क्षण एक पूजा विलोकीत ॥ तों शांडिल्य ऋषी बोलिला ॥३७॥
अहा कर्म कैसें गहन ॥ हा राजपुत्र हिंडे दीन होऊन ॥ कैसें विचित्र प्राक्तन ॥ उमा वचन ऐकती झाली ॥३८॥
ऋषीचे चरण उमा धरीत ॥ म्हणे याचा सांगा पूर्ववृत्तांत ॥ त्रिकालज्ञानी महासमर्थ ॥ भूतभविष्यज्ञान तुम्हां ॥३९॥
याचीं माता पिता कोण ॥ आहेत कीं पावलीं मरण ॥ यावरी शांडिल्य सांगे वर्तमान ॥ याचा पिता जाण सत्यरथ ॥४०॥

तो पूर्वीं होता नृप जाण ॥ प्रदोषसमयीं करी शिवार्चन ॥ तों शत्रु आले चहूंकडोन ॥ नगर त्याचें वेढिलें ॥४१॥
शत्रूची गजबज ऐकून ॥ उठिला तैसीच पूजा सांडोन ॥ तंव प्रधान आला पुढें धांवोन ॥ शत्रु धरोनि आणिले ॥४२॥
त्यांचा शिरच्छेद करून ॥ पूजा पूर्ण न करितां उन्मत्तपणें ॥ तैसाच जाऊनि करी भोजन ॥ नाहीं स्मरण विषयांधा ॥४३॥
त्याकरितां या जन्मीं जाण ॥ सत्यरथ अल्पायुषी होऊन ॥ अल्पवयांत गेला मरोन ॥ म्हणोनि पूजन न सोडावें ॥४४॥ याच्या मातेनें सवत मारिली ॥ ती जळीं विवशी झाली ॥ पूर्ववैरें वोढोनि नेली ॥ क्रोधें भक्षिली विदारूनी ॥४५॥
हा राजपुत्र धर्मगुप्त ॥ यानें कांहीच केलें नाहीं शिवव्रत ॥ म्हणोनियां मातापितारहित ॥ अरण्यांत पडियेला ॥४६॥ याकरितां प्रदोषकाळीं ॥ अव्यग्र पूजावा इंदुमौळी ॥ पूजन सांडुनि कदाकाळीं ॥ सर्वथाही न उठावें ॥४७॥ भवानीसी बैसवूनि कैलासनाथ ॥ प्रदोषकाळी पुढें नृत्य करीत ॥ वाग्देवी वीणा वाजवीत ॥ वेणु पुरुहूत वाजवीतसे ॥४८॥
अंबुजसंभव ताल सांवरी ॥ भार्गवी गातसे मधुरस्वरीं ॥ मृदंग वाजवी मधुकैटभारी ॥ नृत्यगती पाहूनियां ॥४९॥ यक्षपति शिवप्राणमित्र ॥ हस्त जोडोनि उभा समोर ॥ यक्षगण गंधर्व किन्नर ॥ सुरासुर उभे असती ॥५०॥

ऐसा प्रदोषकाळींचा महिमा ॥ अगोचर निगमागमां ॥ मग काय बोले उमा ॥ मम पुत्र दरिद्री कां झाला ॥५१॥
तुझ्या पुत्रें प्रतिग्रह बहुत ॥ पूर्वीं घेतले दुष्ट अमित ॥ दान केलें नाहीं किंचित ॥ शिवार्चन न करी कदा ॥५२॥
परान्नें जिव्हा दग्ध यथार्थ ॥ दुष्ट प्रतिग्रहें दग्ध हस्त ॥ स्त्रीअभिलाषें नेत्र दग्ध होत ॥ मंत्रासी सामर्थ्य मग कैचें ॥५३॥ मग उमेनें पुत्र दोन्ही ॥ घातले ऋषीचे चरणीं ॥ तेणें पंचाक्षर मंत्र उपदेशुनी ॥ प्रदोषव्रत उपदेशिलें ॥५४॥
पक्षप्रदोष शनिप्रदोष ॥ महिमा वर्णिला अतिविशेष ॥ निराहार असावें त्रयोदशीस ॥ दिवसा सत्कर्म आचरावें ॥५५॥ तीन घटिका झालिया रजनी ॥ प्रदोषपूजा आरंभावी प्रीतीकरूनी ॥ गोमयें भूमी सारवूनी ॥ दिव्यमंडप उभारिजे ॥५६॥
चित्रविचित्र वितान ॥ कर्दळीस्तंभ इक्षुदंडेंकरून ॥ मंडप कीजे शोभायमान ॥ रंगमाळा नानापरी ॥५७॥
शुभ्र वस्त्र नेसावें आपण ॥ शुभ्र गंध सुवाससुमन ॥ मग शिवलिंग स्थापून ॥ पूजा करावी विधियुक्त ॥५८॥
प्राणायाम करूनि देखा ॥ अंतर्बाह्य न्यास मातृका ॥ दक्षिणभागीं पूजावें मुरांतका ॥ सव्यभागीं अग्नि तो ॥५९॥
वीरभद्र गजानन ॥ अष्टमहासिध्दि अष्टभैरव पूर्ण ॥ अष्टदिक्पालपूजन ॥ सप्तावरणीं शिवपूजा ॥६०॥

यथासांग शिवध्यान ॥ मग करावें पूजन ॥ राजोपचारें सर्व समर्पून ॥ करावें स्तवन शिवाचें ॥६१॥
जयजय गौरीनाथ निर्मळ ॥ जय जय कोटिचंद्र सुशीतळ ॥ सच्चिदानंदघन अढळ ॥ पूर्णब्रह्म सनातन ॥६२॥
ऐसें प्रदोषव्रत ऐकवून ॥ बाळ उपदेशिले दोघेजण ॥ मग ते एकमनेंकरून ॥ राहते झाले एकचक्रीं ॥६३॥
चार महिनेपर्यंत ॥ दोघेही आचरती प्रदोषव्रत ॥ गुरुवचनें यथार्थ ॥ शिवपूजन करिती पै ॥६४॥
शिवपूजा न द्यावी सर्वथा ॥ न द्यावे प्रसादतीर्था ॥ शत ब्रह्महत्यांचें पाप माथां ॥ होय सांगता शांडिल्य ॥६५॥
सर्व पापांहूनि पाप थोर ॥ शिवपूजेचा अपहार ॥ असो ते दोघे किशोर ॥ सदा सादर शिवभजनीं ॥६६॥
ब्रह्मपुत्र शुचिव्रत ॥ एकला नदीतीरीं क्रीडत ॥ दरडी ढांसळतां अकस्मात ॥ द्रव्यघट सांपडला ॥६७॥
घरासी आला घेऊन ॥ माता संतोषली देखोन ॥ म्हणे प्रदोषव्रताचा महिमा जाण ॥ ऐश्वर्य चढत चालिलें ॥६८॥ राजपुत्रास म्हणे ते समयीं ॥ अर्ध द्रव्यविभाग घेई ॥ येरू म्हणे सहसाही ॥ विभाग न घेई अग्रजा ॥६९॥
या अवनींतील धन ॥ आमुचेंच आहे संपूर्ण ॥ असो ते दोघे शिवध्यान शिवस्मरण ॥ न विसरती कदाही ॥७०॥

यावरी एकदां दोघेजण ॥ गेले वनविहारालागून ॥ तों गंधर्वकन्या येऊन ॥ क्रीडतां दृष्टीं देखिल्या ॥७१॥
दोघे पाहती दुरूनी ॥ परम सुंदर लावण्यखाणी ॥ शुचिव्रत म्हणे राजपुत्रालागुनी ॥ परदारा नयनीं न पाहाव्या ॥७२॥ दर्शनें हरती चित्त ॥ स्पर्शनें बळ वीर्य हरीत ॥ कौटिल्यदंभसंयुक्त ॥ महाअनर्थकारिणी ॥७३॥
ब्रह्मसुतास तेथें ठेऊन ॥ राजपुत्र चालिला सुलक्षण ॥ स्वरूप सुंदर मन्मथाहून ॥ आकर्णनयन कोमलांग ॥७४॥ जवळी येवोनि पाहात ॥ तंव मुख्य नायिका विराजित ॥ अंशुमती नामें विख्यात ॥ गंधर्वकन्या पद्मिनी ॥७५॥ कोद्रविण नामा गंधर्वपती ॥ त्याची कन्या अंशुमती ॥ पिता पुसे महेषाप्रती ॥ हे कन्या अर्पू कोणातें ॥७६॥
मग बोले हिमनगजामात ॥ धर्मगुप्त सत्यरथाचा सुत ॥ तो माझा परम भक्त ॥ त्यासी देई अंशुमती ॥७७॥
हे पूर्वीचें शिववचन ॥ असो यावरी अंशुमती पाहे दुरोन ॥ न्याहाळीत राजनंदन ॥ वाटे पंचबाण दुसरा ॥७८॥ क्षीरसिंधूंत रोहिणीरमण ॥ काय आला कलंक धुवोन ॥ तैसें राजपुत्राचें वदन ॥ अंशुमती न्याहाळी ॥७९॥ बत्तिसलक्षण संयुक्त ॥ अजानुबाहू चापशरमंडित ॥ विशाळ वक्षःस्थळ चालत ॥ करिनायक ज्यापरी ॥८०॥

ऐसा तो गुणाढ्य देखूनि त्वरित ॥ अंशुमती सखयांप्रति सांगत ॥ तुम्हीं दुज्या वनाप्रति जाऊनि समस्त ॥ सुमनें आणावी सुवासें ॥८१॥
अवश्य म्हणोनि त्या ललना ॥ जात्या झाल्या आणिका वना ॥ अंशुमती एकली जाणा ॥ राजपुत्रा खुणावीत ॥८२॥ भूरुहपल्लव पसरून ॥ एकांतीं घातलें आसन ॥ वरी वृक्षडाहाळिया भेदून ॥ भूमीवरी पसरल्या ॥८३॥
असो तेथें बैसला येऊन ॥ राजपुत्र सुहास्यवदन ॥ विशाळ भाळ आकर्णनयन ॥ आरक्त ओष्ठ सुकुमार ॥८४॥ मंजुळभाषिणी नेत्रकटाक्षबाणीं ॥ विंधिली ते लावण्यहरिणी ॥ मनोजमूर्च्छना सांवरूनी ॥ वर्तमान पुसे तयातें ॥८५॥ श्रुंगारसहोवरा तुजपासीं ॥ मी वास करीन राजहंसी ॥ देखतां तव वदन दिव्यशशी ॥ मम मानसचकोर नृत्य करी ॥८६॥
तव मुखाब्ज देखतां आनंद ॥ झेंपावती मम नेत्रमिलिंद ॥ कीं तव वचन गर्जतां अंबुद ॥ मम चित्तशिखी नृत्य करी ॥८७॥
कवि-गुरूंहुन तेज विशाळ ॥ आत्मकंठीची काढिली मुक्ताफळमाळ ॥ कंठीं सूदली तत्काळ ॥ चरणीं भाळ ठेवीत ॥८८॥
म्हणे मी कायावाचामनेंकरून ॥ तुझी ललना झालें पूर्ण ॥ यावरी धर्मगुप्त वचन ॥ काय बोलता जाहला ॥८९॥
मी जनकजननी विरहित ॥ राज्यभ्रष्ट दरिद्री अत्यंत ॥ तव पित्यासी कळतां मात ॥ घडे कैसें वरानने ॥९०॥

यावरी म्हणे अंशुमती ॥ तीन दिवसां येईन या स्थळाप्रती ॥ तुम्हीं यावें शीघ्रगती ॥ लग्नसिध्दि साधावया ॥९१॥
ऐसें बोलून ते चातुर्यराशी ॥ वेगें आली पितयापाशीं ॥ झालें वर्तमान सांगे त्यासी ॥ तो परम मानसी संतोषला ॥९२॥
राजपुत्र गेला परतोन ॥ बंधुप्रती सांगे सर्व वर्तमान ॥ शांडिल्यगुरूचें वचन स्मरून ॥ म्हणती प्रसाद पूर्ण त्याचा हा ॥९३॥
गुरुचरणीं ज्याचें मन ॥ त्यासी ऐश्वर्यासी काय न्यून ॥ काळमृत्युभयापासून ॥ सर्वदा रक्षी देशिक तो ॥९४॥
यावरी ते दोघे बंधु येऊन ॥ मातेसी सांगती वर्तमान ॥ येरी म्हणे धन्य धन्य शिवभजन ॥ फळ देते चालिलें ॥९५॥
यावरी तिसरे दिवशीं ॥ दोघेही गेले त्या वनासी ॥ गंधर्वराज सहपरिवारेंसी ॥ सर्व सामग्री घेऊनि आला ॥९६॥
दृष्टी देखतां जामात ॥ गंधर्व आनंदसमुद्रीं पोहत ॥ छत्र सेना सुखासन त्वरित ॥ धाडूनि उमा आणविली ॥९७॥
यावरी यथासांग लग्न ॥ चारी दिवस पूर्ण ॥ कोणी एक पदार्थ न्यून ॥ पडिला नाहीं तेधवां ॥९८॥
स्वर्गीच्या दिव्य वस्तु अमोलिक सतेज ॥ विहिणीस देत गंधर्वराज ॥ लक्ष रथ दहा सहस्त्र गज ॥ तेजःपुंज एक लक्ष वाजी ॥९९॥
एक लक्ष दास दासी ॥ अक्षय कोश रत्नराशी ॥ अक्षय भाते देत शक्तिसी ॥ दिव्य चाप बहुसाल ॥१००॥

अपार सेना संगें देत ॥ एक सेनापतिगंधर्व बळिवंत ॥ उमा दोघां पुत्रांसववेत ॥ मान देवोनि बोळविली ॥१०१॥ सुखासनारूढ अंशुमती ॥ पतीसवें चालिली शीघ्रगती ॥ कनकवेत्रपाणी पुढें धांवती ॥ वाहनासवें जियेच्या ॥१०२॥ चतुर्विध वाद्यांचे गजर ॥ चतुरंग चालिला दळभार ॥ येऊनि वेढिलें विदर्भनगर ॥ सत्यरथ पितयाचें ॥१०३॥ नगरदुर्गावरूनि अपार ॥ उल्हाटयंत्रांचा होत भडिगार ॥ परी गंधर्वाचें बळ फार ॥ घेतलें नगर क्षणार्धे ॥१०४॥
जेणें पूर्वी पिता मारिला जाण ॥ त्याचें नाम दुर्मर्षण ॥ तो जिताचि धरूनि जाण ॥ आपला करून सोडिला ॥१०५॥ देशोदेशींचे प्रजाजन ॥ धांवती करभार घेऊन ॥ उत्तम मुहूर्त पाहून ॥ सिंहासनारूढ जाहला ॥१०६॥
माता उमा बंधु शुचिव्रत ॥ त्यांसमवेत राज्य करीत ॥ दहा सहस्त्र वर्षेंपर्यंत ॥ यशवंत राज्य केलें ॥१०७॥
शांडिल्य गुरु आणून ॥ शतपद्म अर्पिलें धन ॥ रत्नाभिषेक करून ॥ अलंकार वस्त्रे दीधलीं ॥१०८॥
दुर्भिक्ष जळशोष अवर्षण ॥ आधि व्याधि वैवध्य मरण ॥ दुःख शोक कलह विघ्न ॥ राज्यांतूनि पळालीं ॥१०९॥
प्रजा भूदेव दायाद ॥ देती रायासी आशिर्वाद ॥ कोणासही नाहीं खेद ॥ सदा आनंद घरोघरीं ॥११०॥

ऐसा अंशुमती समवेत ॥ धर्मगुप्त राज्य करीत ॥ यौवराज्य शुचिव्रतातें देत ॥ पारिपत्य सर्व करी ॥१११॥
ऐसें दहा सहस्त्र वर्षें राज्य करून ॥ सुदत्तपुत्रासी राज्य देऊन ॥ चिंतितां मनीं उमाधवचरण ॥ दिव्य विमान धाडिलें ॥११२॥
दिव्य देह पावोनि नृपती ॥ माता-बंधूंसमवेत अंशुमती ॥ शिवविमानीं बैसती ॥ करीत स्तुति शिवाची ॥११३॥ कैलासपदासी जाऊन ॥ जगदात्मा शिव विलोकून ॥ जयजयकार करून ॥ लोटांगणें घालिती ॥११४॥
दीनबंधु जगन्नाथ ॥ पतित पावन कृपावंत ॥ हृदयीं धरूनी समस्त ॥ अक्षयपदीं स्थापिलीं ॥११५॥
हें धर्मगुप्ताचें आख्यान ॥ करिती जे श्रवण पठण ॥ लेखन रक्षण अनुमोदन ॥ तरी पंचवदन रक्षी तयां ॥११६॥ सकळ पापांचा होय क्षय ॥ जेथें जाय तेथें विजय ॥ धनधान्यवृध्दि होय ॥ ऋण जाय निरसुनी ॥११७॥
प्रदोषमहिमा अद्भुत ॥ जे आचरती ऐकूनि ग्रंथ ॥ तेथें कैचें दारिद्र मृत्य ॥ सत्यसत्य त्रिवाचा ॥११८॥
ज्याच्या घरीं शिवलीलामृत ग्रंथ ॥ त्याची शिव पाठी राखीत ॥ सदा हिंडे उमाकांत ॥ अंती शिवपद प्राप्त तया ॥११९॥
हा ग्रंथ आम्रवृक्ष सुरस ॥ पद्मरचनाफळें आलीं पाडास ॥ कुतर्कवादी जे वायस ॥ मुखरोग त्यांस नावडे ॥१२०॥

जयजय ब्रह्मानंदा विरूपक्षा ॥ श्रीधरवरद सर्वसाक्षा ॥ दुष्टकर्ममोचका कर्माध्यक्षा ॥ न येसी लक्षा निगमागमा ॥१२१॥ शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड ॥ स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड ॥ परिसोत सज्जन अखंड ॥ पंचमोध्याय गोड हा ॥१२२॥

इति पंचमोऽध्यायः ॥५॥
॥श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥

Wednesday, July 29, 2020

Shivlilamrut - Adhyay 4

अध्याय चवथा

श्रीगणेशाय नमः ॥

धराधरेंद्रनंदिनीमानससरोवर ॥ मराळ उदार कर्पूरगौर ॥ अगम्य गुण अपार ॥ तुझे वर्णिती सर्वदा ॥१॥
न कळे जयाचें मूळ मध्य अवसान ॥ आपणचि सर्वकर्ता कारण ॥ कोठें प्रगटेल ज्याचें आगमन ॥ ठायीं न पडे ब्रह्मादिकां ॥२॥
जाणोनि भक्तांचें मानस ॥ तेथेंचि प्रगटे जगन्निवास ॥ येचिविषयीं सूतें इतिहास ॥ शौनकादिकांप्रति सांगितला ॥३॥
किरातदेशींचा राजा विमर्शन ॥ परमप्रतापी शत्रुभंजन ॥ मृगया करीत हिंसक दारूण ॥ मद्यमांसीं रत सदा ॥४॥
चतुर्वर्णाच्या स्त्रिया भोगीत ॥ निर्दय अधर्मेंचि वर्तत ॥ परी शिवभजनीं असे रत ॥ विधीनें पूजित नित्य शिवासी ॥५॥
त्याचे स्त्रियेचें नाम कुमुद्वती ॥ परम चतुर गुणवती ॥ पतीप्रति पुसे एकांतीं ॥ कापट्यरीती टाकोनियां ॥६॥
म्हणे शिवव्रतें आचरतां बहुवस ॥ शिवरात्री सोमवार प्रदोष ॥ गीत नृत्य स्वयें करितां विशेष ॥ शिवलीलामृत वर्णितां ॥७॥
दोषही घडती तुम्हांपासून ॥ इकडे शिवभजनीं सावधान ॥ मग तो राजा विमर्शन ॥ वर्तमान सांगे पुरातन पैं ॥८॥
मी पूर्वीं पंपानाम नगरीं ॥ सारमेय होतों सुंदरी ॥ तों माघ वद्य चतुर्दशी शिवरात्रीं ॥ शिवमंदिरासमोर आलों ॥९॥ शिवपूजा पाहिली समस्त ॥ द्वारीं उभे होते राजदूत ॥ तिंहीं दंड मारितां त्वरित ॥ सव्य पळत प्रदक्षिणा करीं ॥१०॥

आणीक आलों परतोनी ॥ बलिपिंड प्राप्त होईल म्हणोनी ॥ मागुती दाटावितां त्यांनी ॥ प्रदक्षिणा केल्या शिवसदना ॥११॥
मागुती बैसलों येऊन ॥ तंव तिंहीं क्रोधें मारिला बाण ॥ म्यां शिवलिंग पुढें लक्षून ॥ तेथेंचि प्राण सोडिला ॥१२॥
त्या पुण्यकर्मेंकरून ॥ आतां राजदेह पावलों जाण ॥ परी श्वानाचे दुष्ट गुण ॥ नाना दोष आचरें ॥१३॥
कुमुद्वती म्हणे तुम्हांसी पूर्वज्ञान ॥ तरी मी कोण होतें सांगा मजलागून ॥ मग तो बोले विमर्शन ॥ कपोती होतीस पुर्वीं  तूं ॥१४॥
मांसपिंड नेतां मुखीं धरून ॥ पाठीं लागला पक्षी श्येन ॥ शिवालयास प्रदक्षिणा तीन ॥ करूनि शिखरीं बैसलीस ॥१५॥
तूं श्रमलीस अत्यंत ॥ तुज श्येनपक्षी मारीत ॥ शिवसदनासमोर शरीर पडत ॥ ती राणी सत्य झालीसं तूं ॥१६॥
मग कुमुद्वती म्हणे रायास ॥ तुम्ही त्रिकाळज्ञानी पुण्यपुरुष ॥ तुम्ही आम्ही जाऊं कोण्या जन्मास ॥ सांगा समस्त वृत्तांत हा ॥१७॥
यावरी तो राव म्हणे ॥ ऐकें मृगनेत्रे इभगमने ॥ सिंधुदेशीचा नृप इंदुवदने ॥ होईन पुढलिये जन्मीं मी ॥१८॥
तूं जयानामें राजकन्या होसी ॥ मजलागीं राजसे वरिसी ॥ तिसरे जन्मीं सौराष्ट्रराव नेमेंसी ॥ होईन सत्य गुणसरिते ॥१९॥
तूं कलिंगकन्या होऊन ॥ मज वरिसी सत्य जाण ॥ चौथे जन्मीं गांधारराव होईन ॥ तूं मागधकन्या होऊन वरिसी मज ॥२०॥

पांचवे जन्मी अवंतीराज ॥ दाशार्हकन्या तूं पावसी मज ॥ सहावे जन्मीं आनर्तपति सहज ॥ तूं ययातिकन्या गुणवती ॥२१॥
सातवे जन्मीं पांड्यराजा होईन ॥ तुं पद्मराजकन्या वसुमती पूर्ण ॥ तेथें मी बहुत ख्याती करून ॥ शत्रु दंडीन शिवप्रतापें ॥२२॥
महाधर्म वाढवीन ॥ जन्मोजन्मीं शिवभजन करीन ॥ मग त्या जन्मीं पुत्रास राज्य देऊन ॥ तपास जाईन महावना ॥२३॥
शरण रिघेन अगस्तीस ॥ शैवदीक्षा घेऊन निर्दोष ॥ शुभवदने तुजसमवेत कैलास ॥ पद पावेन निर्धारें ॥२४॥
सूत म्हणे शौनकादिकांप्रती ॥ तितुकेही जन्म घेवोनि तो भूपती ॥ ब्रह्मवेत्ता होऊनि अंती ॥ अक्षय शिवपद पावला ॥२५॥
ऐसा शिवभजनाचा महिमा ॥ वर्णू न शके द्रुहिण सुत्रामा ॥ वेदशास्त्रांसी सीमा ॥ न कळे ज्याची वर्णावया ॥२६॥
ऐकूनि शिवगुणकीर्तन ॥ सद्गद न होय जयाचें मन ॥ अश्रुधारा नयन ॥ जयाचे कदा न वाहती ॥२७॥
धिक् त्याचें जिणें धिक् कर्म ॥ धिक् विद्या धिक् धर्म ॥ तो वांचोनि काय अधम ॥ दुरात्मा व्यर्थ संसारीं ॥२८॥
ऐका शिवभजनाची थोरी ॥ उज्जयिनी नामें महानगरी ॥ राव चंद्रसेन राज्य करी ॥ न्यायनीतीकरूनियां ॥२९॥ ज्योतिर्लिंग महाकाळेश्वर ॥ त्याचे भजनीं रत नृपवर ॥ मित्र एक नाम मणिभद्र ॥ प्राणसखा रायाचा ॥३०॥

मित्र चतुर आणि पवित्र ॥ देशिक सर्वज्ञ दयासागर ॥ शिष्य भाविक आणि उदार ॥ पूर्वसुकृतें प्राप्त होय ॥३१॥
गृहिणी सुंदर आणि पतिव्रता ॥ पुत्र भक्त आणि सभाग्यता ॥ व्युत्पन्न आणि सुरस वक्ता ॥ होय विशेष सुकृतें  ॥३२॥
दिव्य हिरा आणि परिस ॥ मुक्ताफळ सुढाळ सुरस ॥ पिता ज्ञानी गुरु तोचि विशेष ॥ हें अपूर्व त्रिभुवनीं ॥३३॥
ऐसा तो राव चंद्रसेन ॥ मित्र मणिभद्र अति सुजाण ॥ तेणें एक मणि दिधला आणोन ॥ चंडकिरण दुसरा ॥३४॥
अष्टधातुंचा होतां स्पर्श ॥ होय चामीकर बावनकस ॥ सर्पव्याघ्रतस्करवास ॥ राष्ट्रांत नसे त्याकरितां ॥३५॥
त्या मण्याचें होतां दर्शन ॥ सर्व रोग जाती भस्म होऊन ॥ दुर्भिक्ष शोक अवर्षण ॥ दारिद्र्य नाहीं नगरांत ॥३६॥
तो कंठी बांधितां प्रकाशवंत ॥ राव दिसे जैसा पुरुहूत ॥ समरांगणी जय अद्भुत ॥ न ये अपयश कालत्रयीं ॥३७॥
जे करावया येती वैर ॥ ते आपणचि होती प्राणमित्र ॥ आयुरारोग्य ऐश्वर्य अपार ॥ चढत चालिलें नृपाचें ॥३८॥
भूप तो सर्वगुणीं वरिष्ठ ॥ शिवभजनीं गंगेचा लोट ॥ कीं विवेकभावरत्नांचा मुकुट ॥ समुद्र सुभट चातुर्याचा ॥३९॥
कीं वैराग्यसरोवरींचा मराळ ॥ कीं शांतिउद्यानींचा तपस्वी निर्मळ ॥ कीं ज्ञानामृताचा विशाळ ॥ कूपचि काय उचंबळला ॥४०॥

ऐश्वर्य वाढतां प्रबळ ॥ द्वेष करिती पृथ्वीचे भूपाळ ॥ मणि मागों पाठवितां सकळ ॥ स्पर्धा बळें वाढविती ॥४१॥
बहुतांसि असह्य झालें ॥ अवनीचे भूभुज एकवटले ॥ अपार दळ घेवोनि आले ॥ वेढिलें नगर रायाचें ॥॥४२॥
इंदिरावर कमलदलनयन ॥ त्याचें कंठी कौस्तुभ जाण ॥ कीं मृडानीवरमौळीं रोहिणीरमण ॥ प्रकाशघन मणी तैसा ॥४३॥
तो मणी आम्हांसि दे त्वरित ॥ म्हणोनि नृपांनीं पाठविले दूत ॥ मग राव विचारी मनांत ॥ कैसा अनर्थ ओढवला ॥४४॥
थोर वस्तूंचे संग्रहण ॥ तेंचि अनर्थासि कारण ॥ ज्याकारणें जें भूषण ॥ तेंचि विदूषणरूप होये ॥४५॥
अतिरूप अतिधन ॥ अतिविद्या अतिप्रीति पूर्ण ॥ अतिभोग अतिभूषण ॥ विघ्नासि कारण तेंचि होय ॥४६॥
बोले राव चंद्रसेन ॥ मणी जरी द्यावा यांलागून ॥ तरी जाईल क्षात्रपण ॥ युद्ध दारुण न करवे ॥४७॥
आतां स्वामी महाकाळेश्वर ॥ करुणासिंधु कर्पूरगौर ॥ जो दीनरक्षण जगदुद्धार ॥ वज्रपंजर भक्तांसी ॥४८॥
त्यासी शरण जाऊं ये अवसरीं ॥ जो भक्ताकाजकैवारी ॥ जो त्रिपुरांतक हिमनगकुमारी ॥ प्राणवल्लभ जगदात्मा ॥४९॥
पूजासामग्री सिद्ध करून ॥ शिवमंदिरीं बैसला जाऊन ॥ सकळ चिंता सोडून ॥ विधियुक्त पूजन आरंभिलें ॥५०॥

बाहेर सेना घेऊन प्रधान ॥ युद्ध करित शिव स्मरून ॥ महायंत्रांचे नगरावरून ॥ मार होती अनिवार ॥५१॥
सर्व चिंता सोडूनि चंद्रसेन ॥ चंद्रचूड आराधी प्रीतीकरून ॥ करी श्रौतमिश्रित त्र्यंबकपूजन ॥ मानसध्यान यथाविधी  ॥५२॥
बाहेर झुंजती पृथ्वीचे भूपाळ ॥ परी चिंतारहित भूपति प्रेमळ ॥ देवद्वारीं वाद्यांचा कल्लोळ ॥ चतुर्विध वाद्यें वाजताती ॥५३॥
राव करीत महापूजन ॥ पौरजन विलोकिती मिळोन ॥ त्यांत एक गोपगृहिणी पतिहीन ॥ कुमार कडिये घेऊन पातली ॥५४॥
सहा वर्षांचा बाळ ॥ राजा पूजा करितां पाहें सकळ ॥ निरखोनियां वाढवेळ ॥ गोपगृहिणी आली घरा ॥५५॥
कुमार कडेखालता उतरोन ॥ आपण करी गृहींचें कारण ॥ शेजारी उद्वस तृणसदन ॥ बाळ जाऊनि बैसला तेथें ॥५६॥
लिंगाकृति पाषाण पाहून ॥ मृतिकेची वेदिका करून ॥ दिव्य शिवप्रतिमा मांडून ॥ करी स्थापना प्रीतीनें ॥५७॥
कोणी दुजें नाहीं तेथ ॥ लघुपाषाण आणोनि त्वरित ॥ पद्मासनीं पूजा यथार्थ ॥ पाषाणचि वाहे प्रीतीनें ॥५८॥
राजपूजा मनांत आठवून ॥ पदार्थमात्राविषयीं वाहे पाषाण ॥ धूप दीप नैवेद्य पूर्ण ॥ तेणेंचिकरूनि करीतसे ॥५९॥
आर्द्र तृणपुष्प सुवासहीन ॥ तेंचि वाहे आवडीकरून ॥ नाहीं ठाउकें मंत्र ध्यान आसन ॥ प्रेमभावें पूजीतसे ॥६०॥

परिमळद्रव्यें कैंचीं जवळी ॥ शिवावरी मृत्तिकाच उधळी ॥ मृत्तिकाचि घेऊनि करकमळीं ॥ पुष्पांजळीं समर्पित ॥६१॥
एवं रायाऐसें केलें पूजन ॥ मग मानसपूजा कर जोडून ॥ ध्यान करी नेत्र झांकून ॥ शंकरी मन दृढ जडलें ॥६२॥ मातेंनें स्वयंपाक करून ॥ ये बा पुत्रा करीं भोजन ॥ बहु वेळां हांक फोडोन ॥ पाचारितां नेदी प्रत्युत्तर ॥६३॥
म्हणोनि बाहेर येवोनि पाहे ॥ तंव शून्यगृहीं बैसला आहे ॥ म्हणे अर्भका मांडिलें काये ॥ चाल भोजना झडकरी ॥६४॥
परी नेदी प्रत्युत्तर ॥ मातेनें क्रोधे करूनि सत्वर ॥ त्याचें लिंग आणि पूजा समग्र ॥ निरखुनियां झुगारिलीं ॥६५॥
चाल भोजना त्वरित ॥ म्हणोनि हस्तकीं धरूनि वोढीत ॥ बाळ नेत्र उघडोनि पाहत ॥ तंव शिवपूजा विदारिली ॥६६॥
अहा शिव शिव म्हणोन ॥ घेत वक्षः:स्थळ बडवून ॥ दुःखें पडला मूर्च्छा येऊन ॥ म्हणे प्राण देईन मी आतां ॥६७॥
गलिप्रदानें देऊन ॥ माता जाऊनि करी भोजन ॥ जीर्णवस्त्र पांघरून ॥ तृणसेजे पहुडली ॥६८॥
इकडे पूजा भंगली म्हणून ॥ बाळ रडे शिवनाम घेऊन ॥ तंव दयाळ उमारमण ॥ अद्भुत नवल पै केलें ॥६९॥
तृणगृह होतें जें जर्जर ॥ झालें रत्नखचित शिवमंदिर ॥ हिऱ्यांचे स्तंभ वरी शिखर ॥ नाना रत्नांचे कळस झळकती ॥७०॥

चारी द्वारें रत्नखचित ॥ मध्यें मणिमय दिव्यलिंग विराजित ॥ चंद्रप्रभेहूनि अमित ॥ प्रभा ज्योतिर्लिंगाची ॥७१॥
नेत्र उघडोनि बाळ पाहात ॥ तंव राजोपचारें पूजा दिसत ॥ सिद्ध करोनि ठेविली समस्त ॥ बाळ नाचत ब्रह्मानंदें ॥७२॥
यथासांग महापूजन ॥ बाळें केलें प्रीतीकरोन ॥ षोडशोपचारें पूजा समर्पुन ॥ पुष्पांजळी वाहतसे ॥७३॥ शिवनामावळी उच्चारीत ॥ बाळ कीर्तनरंगीं नाचत ॥ शिव म्हणे माग त्वरित ॥ प्रसन्न झालों बाळका रे ॥७४॥ बाळक म्हणे ते वेळीं ॥ मम मातेनें तुझी पूजा भंगिली ॥ तो अन्याय पोटांत घालीं ॥ चंद्रमौळी अवश्य म्हणे ॥७५॥ मातेसि दर्शना आणितों येथ ॥ म्हणोनि गेला आपुले गृहांत ॥ तंव तें देखिलें रत्नखचित ॥ माता निद्रिस्त दिव्यमंचकीं ॥७६॥ पहिलें स्वरूप पालटून ॥ झाली ते नारी पद्मीण ॥ सर्वालंकारेंकरून ॥ शोभायमान पहुडली ॥७७॥
तीस बाळकें जागें करून ॥ म्हणे चाल घेईं शिवदर्शन ॥ तंव ती पाहे चहूंकडे विलोकून ॥ अद्भुत करणी शिवाची ॥७८॥
हृदयीं धरूनि दृढ बाळ ॥ शिवालया आली तात्काळ ॥ म्हणे धन्य तूं शिव दयाळ ॥ धन्य बाळ भक्त हा ॥७९॥ गोपदारा गेली राजगृहा धांवून ॥ चंद्रसेना सांगे वर्तमान ॥ राव वेगें आला प्रीतीकरून ॥ धरी चरण बाळकाचे ॥८०॥

शंकराची अद्भुत करणी ॥ राव आश्चर्य करूनि पाहे नयनीं ॥ नागरिकजनांच्या श्रेणी ॥ धांवती बाळा पाहावया ॥८१॥
दिगंतरीं गाजली हांक अहुत ॥ बाळकासी पावला उमानाथ ॥ अवंतीनगरा येती धांवत ॥ जन अपार पाहावया ॥८२॥
चंद्रसेन रायाप्रती ॥ नृप अर्वनीचे सांगोनि पाठविती ॥ धन्य धन्य तुझी भक्ती ॥ गिरिजावर प्रसन्न तूतें ॥८३॥
आम्ही टाकूनि द्वेष दुर्वासना ॥ तुझ्या भेटीस येऊं चंद्रसेना ॥ तो बाळ पाहूं नयना ॥ कैलासराणा प्रसन्न ज्यासी ॥८४॥
ऐसें ऐकतां चंद्रसेन ॥ प्रधानासमेत बाहेर येऊन ॥ सकळ रायांस भेटून ॥ आला मिरवत घेऊनी ॥८५॥
अवंतीनगरींची रचना ॥ पाहतां आश्चर्य वाटे मना ॥ सप्तपुरींत श्रेष्ठ जाणा ॥ उज्जयिनी नाम तियेचें ॥८६॥
राजे सकळ कर जोडून ॥ शिवमंदिरापुढें घालिती लोटांगण ॥ त्या बालकासी वंदून ॥ आश्चर्य करिती सर्वही ॥८७॥
म्हणती जैं शिव प्रसन्न ॥ तैं तृणकुटी होय सुवर्णसदन ॥ शत्रु ते मित्र होऊन ॥ वोळंगती सर्वस्वें ॥८८॥
गृहींच्या दासी सिद्धी होऊन ॥ न मागतां पुरविती इच्छिलें पूर्ण ॥ आंगणींचे वृक्ष कल्पतरु होऊन ॥ कल्पिलें फळ देती ते ॥८९॥
मुका होईल पंडित ॥ पांगुळ पवनापुढें धांवत ॥ जन्मांध रत्नें पारखीत ॥ मूढ अत्यंत होय वक्ता ॥९०॥

रंक-भणंगा भाग्य परम ॥ तोचि होईल सार्वभौम ॥ न करितां सायास दुर्गम ॥ चिंतामणि येत हाता ॥९१॥
त्रिभुवनभरी कीर्ति होय ॥ राजे समग्र वंदिती पाय ॥ जेथें जेथें खणूं जाय ॥ तेथें तेथें निधाने सांपडती ॥९२॥
अभ्यास न करितां बहुवस ॥ सांपडे वेदांचा सारांश ॥ सकळ कळा येती हातास ॥ उमाविलास भेटे जेव्हां ॥९३॥
गोपति म्हणें गोरक्षबाळा ॥ तुजसी गोवाहन प्रसन्न झाला ॥ गोविप्र प्रतिपाळीं स्नेहाळा ॥ धन्य नृपराज चंद्रसेन ॥९४॥ यात्रा दाटली बहुत ॥ सर्व राजे आश्चर्य करीत ॥ तों तेथें प्रकटला हनुमंत ॥ वायुसुत अंजनीप्रिय जो ॥९५॥
जो राघवचरणारविंदभ्रमर ॥ भूगर्भरत्नमानससंतापहर ॥ वृत्रारिशत्रुजनकनगर ॥ दहन मदनदमन जो ॥९६॥
द्रोणाचळौत्पाटण ॥ ऊर्मिलाजीवनप्राण रक्षण ॥ ध्वजस्तंभीं बैसोन ॥ पाळी तृतीयनंदन पृथेचा ॥९७॥
ऐसा प्रगटतां मारुती ॥ समस्त क्षोणीपाळ चरणीं लागती ॥ राघवप्रियकर बाळाप्रती ॥ हृदयीं धरूनि उपदेशी ॥९८॥
शिवपंचाक्षरी मंत्र ॥ उपदेशीत साक्षात रुद्र ॥ न्यास मातृका ध्यानप्रकार ॥ प्रदोष सोमवार व्रत सांगे ॥९९॥
हनुमंतें मस्तकीं ठेविला हात ॥ झाला चतुदर्शविद्यावंत ॥ चतुःषष्टिकळा आकळीत ॥ जैसा आमलक हस्तकीं ॥१००॥

त्याचें नाम श्रीकर ॥ ठेविता झाला वायुकुमर ॥ सकळ राव करिती जयजयकार ॥ पुष्पें सुरवर वर्षती ॥१०१॥
यावरी अंजनी हृदयाब्जमिलिंद ॥ श्रीकरास म्हणे तुजहो आनंद ॥ तुझे आठवे पिढीस नंद ॥ जन्मेल गोपराज गोकुळीं ॥१०२॥
त्याचा पुत्र पीतवसन ॥ होइल श्रीकृष्ण कंसदमन ॥ शिशुपालांतक कौरवमर्दन ॥ पांडवपालक गोविंद ॥१०३॥
श्रीहरीच्या अनंत अवतारपंक्ती ॥ मागें झाल्या पुढेंही होती ॥ जेवीं जपमाळेचे मणी परतोनी येती ॥ अवतार स्थिती तैसीच ॥१०४॥
कीं संवत्सर मास तिथि वार ॥ तेच परतती वारंवार ॥ तैसा अवतार धरी श्रीधर ॥ श्रीकरासत्य जाण पां ॥१०५॥
ऐसें हरिकुळभूषण बोलून ॥ पावला तेथेंचि अंतर्धान ॥ सर्व भूभुज म्हणती धन्य धन्य ॥ सभाग्यपण श्रीकराचें ॥१०६॥ ज्याचा श्रीगुरु हनुमंत ॥ त्यासी काय न्यून पदार्थ ॥ श्रीकर चंद्रसेन नृपनाथ ॥ बोळवीत सर्व भूपांते ॥१०७॥
वस्त्रें भूषणें देऊनी ॥ बोळविले पावले स्वस्थानीं ॥ मग सोमवार प्रदोष प्रीतीकरूनी ॥ श्रीकर चंद्रसेन आचरती ॥१०८॥
शिवरात्रीउत्साह करिती ॥ याचकांचे आर्त पुरविती ॥ शिवलीलामृत श्रवण करिती ॥ अंती शिवपदाप्रती पावले ॥१०९॥
हा अध्याय करितां पठण ॥ संतति संपत्ति आयुष्यवर्धन ॥ शिवार्चनी रत ज्याचें मन ॥ विघ्नें भीति तयासी ॥११०॥

शिवलीलामृतग्रंथवासरमणी ॥ देखोनि विकासती सज्जनकमलिनी ॥ जीवशिव चक्रवाकें दोनी ॥ ऐक्या येती प्रीतीनें ॥१११॥
निंदक दुर्जन अभक्त ॥ ते अंधारीं लपती दिवाभीत ॥ शिवनिंदकांसी वैकुंठनाथ ॥ महानरकांत नेऊनि घाली ॥११२॥
विष्णुनिंदक जे अपवित्र ॥ त्यांसी कुंभीपाकीं घाली त्रिनेत्र ॥ एवं हरि-हरनिंदकांसी सूर्यपुत्र ॥ नानाप्रकारें जाच करी ॥११३॥
ब्रह्मानंदा यतिवर्या ॥ श्रीभक्तकैलासाचलनिवासिया ॥ श्रीधरवरदा मृडानीप्रिया ॥ तुझी लीला वदवीं तूं ॥११४॥
शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड ॥ स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड ॥ परिसोत सज्जन अखंड ॥ चतुर्थाध्याय गोड हा ॥११५॥
-
॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥

Tuesday, July 28, 2020

Shivlilamrut - Adhyay 3

अध्याय तिसरा
श्रीगणेशाय नमः
जय जय शिव मंगलधामा निजजनहृदयआरामा चराचरफलांकितद्रुमा नामाअनामातीत तूं ॥१॥ इंदिरावरभगिनीमनरंजना षडास्यजनका शफरीध्वजदहना ब्रह्मानंदा भाललोचना भवभंजना त्रिपुरांतका ॥२॥ हे शिव सद्योजात वाम अघोरा तत्पुरुषा ईशाना ईश्वरा अर्धनारीनटेश्वरा गिरिजारंगा गिरीशा ॥३॥
गंगाधरा भोगिभूषणा सर्वव्यापका अंधकमर्दना परमातीता निरंजना गुणत्रयविरहित तूं ॥४॥
हे पय:फेनधवल जगज्जीवन  द्वितीयाध्यायीं कृपा करून अगाध सुरस आख्यान शिवरात्रिमहिमा वर्णविला ॥५॥
यावरी कैसी कथेची रचना वदवीं पंचमुकुट पंचानना शौनकादिकां मुनिजनां सूत सांगे नैमिषारण्यीं ॥६॥ इक्ष्वाकुवंशीं महाराज मित्रसहनामें भूभुज वेदशास्त्रसंपन्न सतेज दुसरा बिडौजा पृथ्वीवरी ॥७॥ पृतनावसनेंकरून घातलें उर्वी पालाण प्रतापसूर्य उगवला पूर्ण शत्रुभगणें मावळलीं ॥८॥
तो एकदां मृगयाव्याजेंकरून निघाला धुरंधर चमू घेऊन घोरांदर प्रवेशला विपिन तों सावजें चहूंकडून ऊठलीं ॥९॥
व्याघ्र वृक रीस वनकेसरी मृगमृगी वनगौ वानर वानरी शशकजंबुकांच्या हारी संहारीत नृपवर ॥१०॥

चातक मयूर बदक कस्तूरीकुरंग जवादिबिडालक नकुल राजहंस चक्रवाक पक्षी श्वापदें धांवती ॥११॥
नृपें मारिले जीव बहुवस त्यांत एक मारिला राक्षस महाभयानक तामस गतप्राण होऊनि पडियेला ॥१२॥
त्याचा बंधु परम दारुण तो लक्षिता झाला दुरोन मनीं कापट्य कल्पून म्हणे सूड घेईन बंधूचा ॥१३॥
मित्रसह पातला स्वनगरास असुरें धरिला मानववेष कृष्णवसनवेष्टित विशेष दर्वी स्कंधीं घेऊनियां ॥१४॥
नृपासी भेटला येऊन म्हणे मी सूपशास्त्रीं परम निपुण अन्न शाका सुवास करीन देखोन सुरनर भूलती ॥१५॥
रायें ठेविला पाकसदनीं त्यावरी पितृतिथी लक्षुनी गुरु वसिष्ठ घरालागुनी नृपश्रेष्ठें आणिला ॥१६॥
भोजना आला अब्जजनंदन तो राक्षसें कापट्यस्मरून शाकांत नरमांस शिजवून ऋषीस आणून वाढिलें ॥१७॥
त्रिकालज्ञानी वसिष्ठमुनी सकळ ऋषींमाजी शिरोमणी कापट्य सकळ जाणुनी मित्रसह शापिला ॥१८॥
म्हणे तूं वनीं होई राक्षस जेथें आहार मिळे नि:शेष मी ब्राह्मण मज नरमांस वाढिलें कैसें पापिया ॥१९॥
राव म्हणे मी नेणें सर्वथा बोलावा सूपशास्त्रीं जाणता तंव तो पळाला क्षण  लागतां गुप्तरुपें वना आपुल्या ॥२०॥

राव कोपला दारुण मज शापिलें काय कारण मीही तुज शापीन म्हणोन  उदक करीं घेतलें ॥२१॥
तंव रायाची पट्टराणी मदयंती नामें पुण्यखाणी रूपें केवळ लावण्यहरिणी चातुर्य उपमे जेवीं शारदा ॥२२॥
मदयंती म्हणे राया दूरदृष्टीं पाहें विचारूनियां शिष्यें गुरूसी शापावया अधिकार नाहीं सर्वथा ॥२३॥
गुरूसी शाप देतां निर्धारीं आपण नरक भोगावे कल्पवरी राव म्हणे चतुर सुंदरी बोललीस साच तें ॥२४॥
म्हणे हें उदक खालीं टाकूं जरी तरी पीक पिके दग्ध होय धरित्री मग आपुल्या प्रपदांवरी जल टाकी मित्रसह ॥२५॥
तों जानुपर्यंत चरण दग्ध झालें कृष्णवर्ण कुष्ठ भरला मग तेथून कल्माषपाद नाम त्याचें ॥२६॥
वसिष्ठें जाणोनि वृत्तांत रायासी :शाप देत म्हणे द्वादशवर्षीं होशील मुक्त येसी स्वस्थाना आपुल्या ॥२७॥
गुरु पावला अंतर्धान मग कल्माषपाद राक्षस होऊन क्षुधाक्रांत निशिदिनी वनीं भक्षी जीव सर्व ॥२८॥
परम भयानक असुर विशाळ देह कपाळीं शेंदुर विक्राळ वदन बाहेर शुभ्र दंतदाढा वाढलिया ॥२९॥
जीव भक्षिले आसमास वनीं हिंडतां तो राक्षस एक ब्राह्मणकुमर डोळस द्वादश वर्षी देखिला ॥३०॥

सवें त्याची ललना चिमणी दोघें क्रीडती कौतुकें वनीं तंव तो ब्राह्मणपुत्र राक्षसें धरूनी भक्षावया सिद्ध झाला ॥३१॥
तंव त्याची वधू काकुळती येत अरे तूं मित्रसह राजा पुण्यवंत गोब्राह्मणप्रतिपाळक सत्य माझा कांत मारूं नको ॥३२॥
गडबडां लोळे सुंदरी करुणाभाकी पदर पसरी सवेचि जाऊनि चरण धरीं सोडी झडकरी पति माझा ॥३३॥
पतीस भक्षूं नको राजेंद्रा महत्पाप घेऊं नको एकसरा स्वर्गमार्ग तरी चतुरा कैसा पावसी अंतकाळीं ॥३४॥
ऐसी करुणा भाकितां कामिनी निर्दयें भक्षिला तेचि क्षणीं अस्थिपंजर टाकुनी तियेपुढें दिधला ॥३५॥
तंव ती दुःखे करूनी आक्रोशें कपाळ पिटी धरणीं मृत्तिका घेऊनि घाली वदनी कोण वनीं सांवरी तीतें ॥३६॥
मग तिनें शाप दीधला रायातें जो अलोट विधिहरिहरातें म्हणे मदयंती संगसुरतें  प्राण जाईल तेचि क्षणीं ॥३७॥
कोणे एके स्त्रीचा संगसोहळा तुज घडो रे चांडाळा ऐसा शाप वदोनि ते वेळां केल्या गोळा अस्थि पतीच्या ॥३८॥
तात्काळ प्रवेशली अग्नीं  इकडे द्वादशवर्षीं शापमुक्त होऊनी राव स्वनगरा येऊनी वर्तमान सांगे स्त्रियेसी ॥३९॥
येरी कपाळ पिटी आक्रोशें करून म्हणे झालें वंशखंडन पतीस म्हणे ब्रह्मचर्य धरून प्राण आपुला रक्षीं कां ॥४०॥

अनिवार अत्यंत मन करीं कोणे स्त्रियेसीं संभाषण खदिरांगाराची सेज आजपासून झाली तुजलागीं जाण पां ॥४१॥
परम तळमळी राजेंद्र जैसा सांपळां कोंडिला व्याघ्र कीं महाभुजंगाचे दंत समग्र पाडोनि गारुडी दीन करी ॥४२॥
कीं नासिकीं वेसण घालून महावृषभ करिती दीन कीं वनीं निरंकुश वारण धरूनि क्षीण करिती मग ॥४३॥
तैसा कल्पाषपाद भूप होऊनि राहिला दीनरूप पुढें प्रकाशावया कुळदीप ॥ आपण धर्मशास्त्र पाहातसे ॥४४॥
तेथींचें पाहोनि प्रमाण वसिष्ठें मदयंतीस भोग देऊन अमोघ वीर्य पडतां पूर्ण दिव्य पुत्र जाहला ॥४५॥
तेणें पुढें वंश चालिला असो तो राव मृगयेस निघाला यथारण्य तथा गृह वाटे नृपाला भोग त्यजिले सर्वही ॥४६॥
मनांत मनोजविकार उठत विवेकांकुशें कामइभ आवरीत म्हणे स्त्रीस वैधव्य मज मृत्य  तें कर्म सहसा करावें ॥४७॥
आपुली कर्मगती गहन प्राक्तन विचित्र दारुण देवावरी काय बोल ठेवून भोगिल्याविण सुटेचि ॥४८॥
ऐसा राव उदासयुक्त वनीं हिंडता मागें पाहात तों पिशाच भयानक अत्यंत रायापाठीं उभें सदा ॥४९॥
दांपत्ये पूर्वीं मारिलीं ती ब्रह्महत्या पाठीसीं लागली राजा तीर्थें हिंडतां सकळीं परी कदाकाळीं सोडी ॥५०॥

सोडी स्वप्नीं जागृतींत महाविक्राळ दांत करकरां खात रायें व्रतें केलीं बहुत दान देत बहुसाल ॥५१॥
ऐसा हिंडतां राव भागला मिथुलानगरासमीप आला वनश्री देखतां आनंदला परी ब्रह्महत्या पाठीसीं उभी ॥५२॥
वृक्ष लागले बहुत आम्रवृक्ष फळभारें डोलत पोफळी रातांजन विराजित केळी नारळी खर्जुरिया ॥५३॥
चंपक जाई जुई मालती मोगरे पुन्नागराज शेवंती मलयागर कृष्णागर जाती जपा करवीर कोविदार ॥५४॥
वड पिंपळ औदुंबर पारिजातक बकुल देवदार कपित्थ बिल्व अंजीर अर्जुन पिचुमंद कदंब ते ॥५५॥
ऐसिया वनामाजी नृपती क्षण एक पावला विश्रांती परी ते पाठीसीं पापमती ब्रह्महत्या उभी असे ॥५६॥
तों उगवला भाग्यवासरमणी कीं निधान जोडे रंकालागुनी कीं क्षुधितापुढें उचंबळोनी क्षीरब्धि जैसा पातला ॥५७॥ कीं मरतियांच्या मुखांत अकस्मात घातलें अमृत कीं चिंताग्रस्तासी प्राप्त चिंतामणी जाहला ॥५८॥
तैसा तापसियांमाजी मुकुटमणीं शिष्यमांदी सवे घेऊनी महाराज तपस्वी गौतममुनी तये स्थानीं पातला ॥५९॥
रायें घातलें लोटांगण दाटला अष्टभावेंकरून उभा ठाकला कर जोडून करी स्तवन प्रीतीनें ॥६०॥

सहज होतां संतदर्शन पापें संहारती संपूर्ण तूं विलोकिसी जरी कृपा करून तरी रंक सहस्त्रनयन होय ॥६१॥
यावरी तो महाराज गौतम कल्माषपादा पुसे कुशलक्षेम राज्य राष्ट्रज प्रजा अमात्य परम सुखेंकरून नांदती कीं ॥६२॥
ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र स्वधर्म आचरती कीं समग्र पशु सेवक पुत्र कलत्र समस्त सुखरूप आहेत कीं ॥६३॥
राव म्हणे आपुले कृपेंकरून समस्त आहेत क्षेमकल्याण परंतु आलासी वाटतें दुरून आनंदघन दिसतोसी ॥६४॥
तुझ्या दर्शनें मज वाटे सत्वर ब्रह्महत्या दूर होईल समग्र मग पूर्वकर्म आपुलें दुस्तर ऋषीप्रती निवेदिलें ॥६५॥
गौतम म्हणे परम पवित्र भूकैलास गोकर्णक्षेत्र तेथूनि मी आलों अपार महिमा तेथींचा वर्णवें ॥६६॥
ॐकाररूपें कैलासनाथ भवानीसहित तेथें नांदत सुर असुर किन्नर सेवित अर्धमात्रापीठ जें ॥६७॥
त्या गोकर्णींचे शिवदर्शन ब्रह्मादिकां दुर्लभ जाण तेथें इंदिरेसहित जनार्दन तप गहन आचरत ॥६८॥
कोटिसूर्याची प्रभा मृडानीसहित शिव उभा कैवल्यगर्भीचा पूर्ण गाभा तेथींची शोभा वर्णवे ॥६९॥
इंद्र सनकादिक ब्रह्मपुत्र तेथेंचि वसती अहोरात्र जेथींचे पाषाण तरुवर समग्र निर्जर अवतरले ॥७०॥

सत्यवती हृदयरत्न जेथें करी अनुष्ठान वसिष्ठ भृग जामदग्न्य गोकर्णक्षेत्रीं सदा वसती ॥७१॥
पाहावया मृडानीनायक मंडपघसणी होतसे देख नारद तुंबरु गायक जेथें गाती शिवलीला ॥७२॥ गोकर्णाभोवतें समग्र उभे अखंड देवांचे भार मुखें गर्जती शिवहरहर आनंद थोर होतसे ॥७३॥
ऋषि करिती वेदघोष अष्टनायिकांचें नृत्य विशेष किन्नरगंधर्व गायक सुरस तोषविती महेशातें ॥७४॥
तें अति उत्तम स्थान तेजोमय प्रकाश गहन नाना वृक्ष लागले सघन कैलासभुवन प्रत्यक्ष ॥७५॥
शुभ्र सिंहासन लखलखित चारी द्वारें मणिमयखचित ऐरावतारूढ अमरनाथ पूर्वद्वारीं तिष्ठतसे ॥७६॥ दक्षिणेसी रक्षी सूर्यनंदन पश्चिमेसी वारुणीरमण उत्तरेसी वैश्रवण प्राणमित्र शिवाचा ॥७७॥
कर्पूरगौर भवानीसहित घवघवीत तेजें विराजित भूकैलास साक्षात ॥ माहेर संतसाधकांचें ॥७८॥
त्या मूर्तीचें करावें ध्यान त्याभोंवतें महासिध्दीचें पूजन त्याभोंवतें कात्यायनी आवरण अष्टभैरव पूजिजे ॥७९॥
द्वादश मित्र एकादश रुद्र तेथेंचि वसती अहोरात्र अष्टवसु दिक्पाळ समग्र जोडोनि कर उभे तेथें ॥८०॥

अष्टसिध्दि नवनिधि कर जोडूनी अखंड आराधिति पिनाकपाणी रायासी म्हणे गौतममुनी मीही वसतों सदा तेथें ॥८१॥
वरकड क्षेत्रीं लक्ष वरुषें जाण तप आचरला निर्वाण  गोकर्णीं एक दिन होय प्रसन्न सदाशिव ॥८२॥
अमावास्या संक्रांति सोमवार प्रदोष पर्वकाळ शिववासर समुद्रस्नान करितां समग्र फळ होय सकळ तीर्थांचे ॥८३॥
रावण कुंभकर्ण बिभिषण  यांहीं पूर्वीं केलें तेथें अनुष्ठान तें निर्वाणलिंग दशाननें जाण कैलासाहूनि आणिलें ॥८४॥
गणेशें स्थापिलें तें लिंग ऋषि म्हणती सूतातें कथा सांग ऐकावया लीला सुरंग श्रवण वाट पाहती ॥८५॥
यावरी सूत वक्ता निपुण रावणमातेसी कैकसी अभिधान ती नित्य लिंगपूजनाविण जाण उदक प्राशन करीच ॥८६॥
पंचधान्यांचें पिष्ट करून लिंग करी कामना धरून व्हावें रावणाचें कल्याण जय संपूर्ण प्राप्त व्हावा ॥८७॥
शक्रें तिचें लिंग नेऊन समुद्रीं टाकिलें द्वेषेंकरून त्यालागी रात्रंदिन रावणमाता अन्न घे ॥८८॥
रावण म्हणें मातेलागून मी मुख्य आत्मलिंग आणितों जाऊन कैलासाप्रती द्विपंचवदन जाता झाला साक्षेपें ॥८९॥
तप आचरला दारुण जो चतु:षष्टिकलाप्रवीण जेणें वेदांचीं खंडें करून सारासार निवडिलें ॥९०॥

चतुर्दशविद्यापारंगत शिवासी आवडे अत्यंत दशमुखें गायन अद्भुत केलें त्यानें स्वामीपुढें ॥९१॥
आपुलें शिर छेदूनि स्वहस्तें शिरांच्या तंती करूनि स्वरयुक्त दशमुख गात प्रेमभरित उमानाथ संतोषे जेणें ॥९२॥
राग उपराग भार्यासहित मूर्च्छना शरीर कंपित सप्तस्वर ताल संगीत शास्त्रप्रमाण गातसे ॥९३॥
गद्यपद्यरचना नाना कळा गीत प्रबंध अखंड नाममाळा गातां प्रीतीनें शिवलीला शंभु तोषला अद्भुत ॥९४॥
म्हणे प्रसन्न झालों दशमुखा इच्छित माग तुज प्रिय जें कां दशकद्वयनयन म्हणे कामांतका आत्मलिंग मज देईं ॥९५॥
या त्रिभुवनांत जे सुंदर ऐसी ललना देईं सुकुमार ऐकून संतोषला कर्पूरगौर भोळा उदारचक्रवर्ती ॥९६॥
कोटि चंद्र-सूर्यांची प्रभा पूर्ण ऐसें लिंग काढिलें हृदयांतून कीं ब्रह्मानंदरस मुरोन दिव्य लिंग ओतिलें ॥९७॥
सहस्त्र बालसूर्य पवती सरी ऐसी प्रभा पडली दशदिशांतरीं दिधलें रावणाचे करीं जें अतर्क्य ब्रह्मादिकां ॥९८॥
जें मुनिजनांचें ध्येय ध्यान जें सनकादिकांचें देवतार्चन वेद शास्त्र पुराण दिव्यलिंग वर्णिती ॥९९॥
जें त्रिगुणातीत परब्रह्म जें अर अजित अनाम सच्चिदानंद निर्वाणधाम योगी आराम पावती जेथें ॥१००॥

अनंत ब्रह्मांडे विचित्रें जेणें रचिलीं इच्छामात्रें ज्याकारणें भांडती वेदशास्त्रें तें दिव्य लिंग पुरातन ॥१॥
तें लिंग रावणे हातीं घेऊन म्हणे हे त्रिलोचन त्रिदोषशमन लावण्यसागरींचें निधान त्रिभुवनसुंदर ललना दे ॥२॥
जी अपर्णेची अपर प्रतिमा ऐसी देई मज सर्वोत्तमा सच्चिदानंद पूर्णब्रह्मा नामाअनामातीत तूं ॥३॥
शिव म्हणे इची प्रतिमा विशेष निर्मू शके विधीश भोळा चक्रवतीं महेश म्हणे हेचि नेईं अपर्णा तूं ॥४॥
रावणें अवश्य म्हणोनी स्कंधीं घेतली स्कंदजननी दिव्यलिंग हातीं घेऊनी लंकानाथ चालिला ॥५॥
दक्षिणपंथें जातां सत्वर गजबजिले सकळ सुरवर गजानन स्कंद वीरभद्र नंदिकेश्वर तळमळती ॥६॥
म्हणती हे सदाशिव त्रिनयन हें कैसें तुझें उदारपण भवानी बैसलासी देऊन पंचवदन हांसतसे ॥७॥
म्हणे तियेचा कैवारी वैकुंठनाथ तो धांवेल आतां स्नेहभरित इकडे भवानी स्तवन करीत हे पद्मजतांत धांव वेगीं ॥८॥
वारिजनयना इंदिरावरा निगमागमवंद्या सुहास्यवक्रा हे नीलपयोधरगात्रा धांव वेगीं सोडवी मज ॥९॥
हे मधु-कैटभ-नरकमुरभंजना हे दशावतारधरा पीतवसना हे मदनांतकमानसरंजना हे जनार्दना जगद्गुरो ॥११०॥

हे कोटिमनोजतात श्रीधर असुरमर्दन परम उदार ऐसें स्तवन ऐकतां सर्वेश्वर विप्ररूपें आडवा आला ॥११॥ म्हणे धन्य धन्य द्विपंचवदना कोठें मिळविली ऐसी ललना दशमुख म्हणे हे अपर्णा सदाशिवें दिधली ॥१२॥ विप्र म्हणे खालीं उतरून न्याहाळूनि पाहें इचें वदन रावण पाहें तव ते कुलक्षण अत्यंत कुरूप देखिली ॥१३॥ भुवयांस आंठी अमंगळ पूर्ण वृद्ध गाल बैसले दंतहीन गदगदां विप्र हांसे देखून टाकोनि रावण चालिला ॥१४॥ मग रमाधवें तये स्थळीं स्थापिली माता भद्रकाळी इकडे असुर शिवाजवळी म्हणे स्त्री अमंगळ कैसी दिधली ॥१५॥
शिव म्हणे सत्य वचन ते तुज नाटोपे कौटाळीण अनंत ब्रह्मांडें दावून सवेंचि लपवील तत्वतां ॥१६॥
मग श्रीधरें आंगींची मळी काढून स्वहस्तें निर्मिली रूपसंपन्न मयासूराचे उदरीं जाण उत्पन्न झाली तेचि पैं  ॥१७॥
तिच्या स्वरूपाची प्रती नाहीं नाहीं त्रिजगतीं अंगीच्या सुवासें धांवती काद्रवेयचक्रें प्रीतीनें ॥१८॥
तिचें नाम मंदोदरी तिची प्रतीमा नाहीं उर्वीवरी विंशतिनेत्राचे चत्वरीं पट्टमहिषी पतिव्रता ॥१९॥
मयासुर करील कन्यादान वरी एक शक्ति देईल आंदण सप्तकोटी मंत्रांचें गहन सामर्थ्य असे जियेमाजी ॥१२०॥

ते निर्वाण सांगातीण शक्ति तुज प्राप्त होईल लंकापती महाशत्रूवरी निर्वाणीं ती प्रेरावी त्वां सत्य पै ॥२१॥ ऐसें ऐकतांचि रावण परतला लिंग घेऊन पूर्वस्थळासी आला जाण तों गजानन गाई राखी ॥२२॥
गजाननाचें स्तवन देव करिती कर जोडून म्हणती दिव्यलिंग सोडवून स्थापीं अक्षयी गणपती ॥२३॥
ऐसा देवीं प्रार्थिला एकदंत तंव रावणासी मूत्र लागलें बहुत पुढें पाऊल घालवत चरफडीत मूत्रभरें ॥२४॥ भूमीवरी लिंग ठेवावें ऐसें पूर्वी सांगीतलें उमाधवें हातीं घेऊनि लघुशंकेसी बैसावें हेही कर्म अनुचित ॥२५॥ तंव तो सिध्दिबुध्दींचा दाता विप्रवेषें गाई राखितां त्यासी लंकानाथ म्हणे तत्वतां लिंग हातीं धरीं हे ॥२६॥
विप्र म्हणे लंकापती माझ्या गाई रानोरानीं पळती तुझ्या मूत्रशंकेस वेळ किती लागेल हें कळे मज ॥२७॥ रावण म्हणे लागतां क्षण येतों मूत्रशंका करून विप्र म्हणे तीन वेळां बांहीन येसी तरी लिंग टाकीन भूमीवरी ॥२८॥
अवश्य म्हणे लंकापती लिंग देत विप्राच्या हातीं दूर जाऊनि एकांतक्षितीं लघुशंकेस बैसला ॥२९॥
अगाध गजमुखाचें चरित्र जो साक्षात अवतरला इंदिरावर शिवउपासना करावया पवित्र जाहला पुत्र शंभूचा ॥१३०॥

असो रावणासी मूत्राचे पूर लोटले सांवरती अनिवार एक घटिका लोटतां इभवक्र हांक फोडी गर्जोनी ॥३१॥ माझ्या गाई गेल्या दूरी हें आपुलें लिंग घेईं करीं रावण बोलेचि निर्धारीं हस्तसंकेतें थांब म्हणे ॥३२॥
दुसरी घटिका झाली पूर्ण हांक फोडी गजानन एवं घटिका झाल्या तीन कदापि रावण उठेचि ॥३३॥
जैसें पाखंडियाचें कुमत सरेचि वारितां पंडित तैसें रावणाचें मूत्र सरे सत्य पुनः एकदंत हांक फोडी ॥३४॥ राक्षसा आपुलें लिंग सांभाळीं म्हणोनि ठेविलें भूमंडळीं अक्षय स्थापिलें कदाकाळीं ब्रह्मादिकां उपटेना ॥३५॥ पृथ्वीसहित अभंग एकचि झालें दिव्य लिंग रावण धांवें सवेग अशौच अपवित्र क्रोधभरें ॥३६॥
लिंग उपटितां डळमळी कुंभिनी महाबळें दशमुख पाहे उपटोनी परी उपटे तयालागुनी अखंड अभंग जाहलें ॥३७॥
गुप्त जाहला गजानन गाई पृथ्वींत जाती लपोन रावणें एक गाईचा कर्ण धांवोनियां धरियेला ॥३८॥
तोही उपडे तयालागून मग तेथेंच केलें लिंगपूजन गोकर्णमहाबळेश्वर तेथून नाम जाण पडियेलें ॥३९॥ रावणमाता तेथें येऊन ते नित्य करी शिवपूजन आदिलिंग हें जाणोन करिती अर्चन सुरऋषी ॥१४०॥

रावण कुंभकर्ण बिभीषण तेथेंच करिती अनुष्ठान त्याच्या बळेंकरून देव जिंकिले रावणें ॥४१॥
मयासूर मंदोदरी आणि शक्ति देता झाला रावणाप्रती लक्ष पुत्र नातू गणती सवा लक्ष जयाचें ॥४२॥ इंद्रजिताऐसा पुत्र अष्टादशाक्षौहिणी सेनाभार जेथींच्या अनुष्ठानें अपार रावण पावला संपत्ती ॥४३॥
गौतम म्हणे राजोत्तमा ऐसा गोकर्णीचा थोर महिमा वर्णूं शके मघवा ब्रह्मा येणें आम्हां तेथूनि जाहलें ॥४४॥ मिथिलेश्वराच्या यागाकारणें आम्ही येत असतां त्वरेनें अद्भुत एक वर्तलें तुजकारणें॥ कथा तेचि सांगतो ॥४५॥ एक वृक्ष न्यग्रोध विशाळ त्याखालीं आम्ही बैसलों सकळ तों एक चांडाळीण अमंगळ अति अपवित्र देखिली ॥४६॥
सर्वरोगवेष्टित पूर्ण जन्मांध गलितकुष्ठ भरलें जाण किडे पडले सर्वांगी व्रण दुर्गंधी उठली चहूंकडे ॥४७॥ रक्तपिती भरोन हस्तपाद बोटें गेली झडोन परम कुश्चित कुलक्षण कैचें अन्न उदक तियेतें ॥४८॥
दंतहीन कर्णहीन गर्भीच तियेचे गेले लोचन कर्ण नासिका झडोन किडे पडले बुचबुचित ॥४९॥ अंगींचें चर्म गेलें झडोन वस्त्र पडलें गळोन धुळींत लोळे चांडाळीण पाप पूर्वीचें भोगीत ॥१५०॥

तिचा मरणकाळ जवळी आला जाण वरतें पाहिलें आम्हीं विलोकून तों शिवें धाडिलें दिव्य विमान तियेलागीं न्यावया ॥५१॥
दशभुज पंचवदन शिवदूत बैसले चौघे जण कोटिसूर्यतेज विराजमान प्रभा शशिसमान एकाची ॥५२॥
कोणी अग्नितेजें विराजत भालचंद्र शोभिवंत दिव्य विमान लखलखित वाद्यें वाजती चतुर्विध ॥५३॥ अष्टनायिका नृत्य करिती किन्नर गंधर्व शिवलीला गाती गौतम म्हणे ऐकें नृपती मग तयांप्रती पूसिलें ॥५४॥
हें दिव्य विमान घेऊन कोणाचें करूं जातां उद्धरण ते म्हणत तिये चांडाळणीलागून शिवें आणूं पाठविलें निजपद ॥५५॥
मग म्यां तयांसी पुसिलें इणें पूर्वीं काय तप केलें मग ते शिवदूत बोलिले पूर्वजन्मींचा वृत्तांत ॥५६॥ पूर्वीं  केकय नामा ब्राह्मण त्याची कन्या सुमित्रा जाण आपुल्या सौंदर्यगर्वेकरून कोणासही मानीना ॥५७॥
ही बाळपणीं विधवा झाली तारुण्यमदें स्वधर्म विसरली जारकर्म करूं लागली बापें शिकविल्या नायके ॥५८॥
तों हे जाहली गरोदर लोक निंदा करिती समग्र मग बापें केश धरूनि सत्वर बाहेर घातलें इयेसी ॥५९॥
मग ही हिंडतां देशांतर कोणी एक सभाग्य शुद्र त्यानें इतें स्त्री करून सत्वर समग्र द्रव्य ओपिलें ॥१६०॥

तेथें अपत्यें झालीं बहुत ही अत्यंत मद्य-मांसी रत पुष्ट जाहली बहुत घूर्णित लोचन उघडीना ॥६१॥
शुद्र घेवोनि दासीदास गेला क्षेत्रीं कृषिकर्मास हे क्षुधित आठवूनि मांसास शस्त्र घेवोनि चालिली ॥६२॥
मद्यें माजली नुघडी लोचन हा बस्तचि आहे म्हणोन गोवत्साचे कंठी जाण पापिणी सुरी घालीतसे ॥६३॥
तें अट्टाहासें ओरडत गाई हंबरोनि अनर्थ करीत इणे कंठ छेदोनि गृहांत वत्स नेलें त्वरेनें ॥६४॥
डोळे उघडूनि पाहे पापिणी मग गोवत्स ओळखिलें ते क्षणीं तेव्हा तिणें शिव शिव उच्चारूनी म्हणे करणी कळतां केली ॥६५॥
मग अर्ध वत्समांस भक्षून उरलें टाकी बाहेर नेऊन लोकांत उठविलें पूर्ण गोवत्स मारिलें व्याघ्रानें ॥६६॥ त्यावरी ही काळें मृत्यु पावत तों येऊनियां यमदूत इयेसी नेलें मारीत बहुत जाचिती निर्दयपणें ॥६७॥ कुंभीपाकीं घालिती असिपत्रवनीं हिंडविती तप्तभूमीवरी लोळविती स्तंभ कवटाळविती तप्त जे कां ॥६८॥ चित्रगुप्तासी पुसे सूर्यनंदन इचें कांही आहे कीं नाहीं पुण्य तो म्हणे शिवनाम उच्चारून गोवत्सवध इणें केला ॥६९॥
मग यमें दिधलें लोटून चांडाळयोनींत पावली जनन गर्भांध कुश्चल कुलक्षण विष्ठामूत्रें भरली सदा ॥१७०॥

श्वानाचें उच्छिष्ट भक्षी जाण तंव माय-बापें गेलीं मरोन मग ही हातीं काठी घेऊन गांवोगांवीं हिंडतसे ॥७१॥
तों शिवरात्र पर्वकाळ लक्षून गोकर्णक्षेत्रापति संपूर्ण यात्रा चालिली घोष गहन नानाविध वाद्यांचा होतसे ॥७२॥ शिवनामाचा घोष अपार शिवभक्त करिती वारंवार त्यांच्यासंगें ही दुराचार चांडाळीही चालिली ॥७३॥
गोकर्णक्षेत्रा गेली चांडाळी पडली भद्रकाळीच्या देवळाजवळी म्हणे मज अन्न द्यावें ये वेळीं बहुत पापिणी मी आहें ॥७४॥
हांका फोडीत हात पसरून तों प्रदक्षिणा करिती भक्तजन एकें बिल्वपत्र नेऊन तिचे हातीं घातलें ॥७५॥
तें त्रिदळ चांचपोन पाहत मुखीं घालावयाची नाहीं वस्त म्हणोनि रागें भिरकावीत तें पडत शिवलिंगावरी ॥७६॥
शिवरात्रीस उपोषण बिल्वदळे घडले शिवपूजन शिवभक्तांसवें जागरण घडलें संपूर्ण चांडाळीस ॥७७॥
शिवनामें गर्जती जन हेही करीत तैसेंचि स्मरण ती ही वडाखालीं येऊन पडली आहे चांडाळी ॥७८॥
ऐसा तिचा पूर्ववृत्तांत शिवगणीं सांगितला समस्त मग ती दिव्य देह पावोनि बैसत शिवविमानीं तेधवां ॥७९॥ आपुलें पूर्वकर्म आठवून करूं लागली शिवस्मरण मग शिवगणीं नेऊन शिवपदीं स्थापिली ॥१८०॥

गौतम म्हणे ऐक राया सादर तूं गोकर्णाप्रति जाईं सत्वर शिवरात्रीस पार्वतीपरमेश्वर त्रिदळेंकरूनि अचीं कां ॥८१॥
ऐसें बोलोनि गौतम मुनी गेला जनकाच्या यागालागुनी कल्माषपाद तेच क्षणीं गोकर्णक्षेत्रीं पातला ॥८२॥ शिवरात्रीस दिव्य लिंग मित्रसहरायें पूजिलें सांग अंतरी सप्रेम अनुराग उमारंग संतोषला ॥८३॥
ब्रह्महत्येचें पातक विशेष जाऊनि राव झाला निर्दोष तों कैलासाहूनि आदिपुरुष पाठवीत दिव्य विमान ॥८४॥ विमानीं बैसले शिवगण परम तेजस्वी दैदीप्यमान अनंत विजांचे रस पिळोन मूर्ती ओतिल्या वाटतें ॥८५॥ अनंत वाद्यें गर्जती एक वेळां तेणें रंगसुरंग दाटला दिव्यसुमनांच्या माळा वर्षती वरून वृंदारक ॥८६॥ मित्रसह दिव्य देह पावोन झाला दशभुज पंचानन इंद्रचंद्रादिपदें ओलांडून नेला मिरवत शिवपदा ॥८७॥ सरूपता मुक्ति पावोन शिवरूपीं मिळाला आनंदघन धन्य शिवरात्रिव्रत पावन धन्य गोकर्ण शिवमंदिर ॥८८॥ गौतम ऋषि परम धन्य तेणें इतिहास सांगितला पावन धन्य श्रोते तुम्हीं सज्जन श्रवणीं सादर बैसलां ॥८९॥ मानससरोवरवेष्टित मराळ जैसे विराजीत कीं निधानाभोंवते समस्त साधक जैसे बैसती ॥१९०॥

तरी पंडित तुम्ही चतुर तुमचे अवधान दिव्यालंकार देवोनि गौरवा श्रीधर ब्रह्मानंदेकरूनियां ॥९१॥ श्रीमद्भीमातटविलासा ब्रह्मानंदा आदिपुरुषा श्रीधरवरदा कैलासविलासा कथारस वदवीं पुढें ॥९२॥ श्रीशिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड परिसोत सज्ज्न अखंड तृतियाध्याय गोड हा ॥१९३॥
श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु