Showing posts with label HariVijay. Show all posts
Showing posts with label HariVijay. Show all posts

Tuesday, February 19, 2013

हरिविजय - अध्याय ३६

अध्याय ३६ 
 श्रीगणेशाय नमः ॥  श्रीकुलदेवतायै नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥
ओं नमो सद्‌गुरु अवधूता ॥ परब्रह्मा अपरिमिता ॥ पुराणपुरुषा अव्यक्ता ॥ मायातीता अगम्या ॥१॥
आदिपुरुषा विश्वंभरा ॥ अवयवरहिता दिगंबरा ॥ सदानंदरुपा निर्विकारा ॥ आत्मयारामा कृपानिधे ॥२॥
अमलरुपा परमगंभीरा ॥ ब्रह्मानंदा परात्परा ॥ सहजानंदा अगोचरा ॥ कल्याणवासा जगद्‌गुरो ॥३॥
पूर्णानंदा अपरिमिता ॥ दत्तात्रेया षड्‌विकाररहिता ॥ ब्रह्मानंदा ज्ञानभरिता ॥ भीमातीरविलासिया ॥४॥
रुक्मिणीहृदयाज्बमधुकरा ॥ दाक्षायणीवरप्रिया मनोहरा ॥ पांडवकैवारिया दीनोद्धारा ॥ शिशुपाळांतका श्रीपते ॥५॥
पंचत्रिंशति अध्यायीं कथा परिकर ॥ छेदूनि शिशुपाळाचें शिर ॥ विजयी जाहला श्रीकरधर ॥ धर्मरक्षक परमात्मा ॥६॥
आतां छत्तिसावा बहु सुरस ॥ हरिविजयाचा पूर्ण कळस ॥ जो भोजनाच्या शेवटीं गोड ग्रास ॥ तैसा विशेष छत्तिसावा ॥७॥
छत्तिसावे अध्यायीं ग्रंथ आघवा ॥ परी मुकुटमणि छत्तिसावा ॥ तो भक्तजनीं परिसावा ॥ प्रेमादरेंकरुनियां ॥८॥
द्वारकेसी नांदतां रुक्मिणीरमण ॥ तों पुढें आलें सूर्यग्रहण ॥ कुरुक्षेत्रासी जावें म्हणोन ॥ निश्चय केला श्रीवल्लभें ॥९॥
तों यापूर्वींच बळिभद्र ॥ गोकुळासी पाठवी यादवेंद्र ॥ जो महाबळिया भोगींद्र ॥ धराघर अवतरला ॥१०॥
गोकुळासी जाऊनि रोहिणीसुत ॥ यशोदा नंद गौळी समस्त ॥ तयांसी भेटला रेवतीप्राणनाथ ॥ सौख्य अदभुत समस्तां ॥११॥
चार मासपर्यंत ॥ बळिभद्र राहिला स्वस्थ ॥ श्रीकृष्णप्रताप अद्‌भुत ॥ जाहला तो समस्त सांगितला ॥१२॥
मथुरेहूनि गेला कृष्णनाथ ॥ कोण कोण मारिले दैत्य॥ कैशा अष्टविनायका झाल्या प्राप्त ॥ आणि सोळा सहस्त्र कामिनी ॥१३॥
तें चरित्र मुळींहून ॥ सांगे बळिभद्र आपण ॥ कैसा जाहला राजसूययज्ञ ॥ कैसा शिशुपाळ मारिला ॥१४॥
तीं चरित्रें ऐकतां श्रवणीं ॥ तटस्थ होती गौळी गौळणी ॥ म्हणती ऐसा पुराणपुरुष चक्रपाणी ॥ कैं आम्हांलागूनि भेटेल ॥१५॥
बळिभद्र नित्य वनासी जाय ॥ विलोकी हरीचे क्रीडाठाय ॥ कुंजवनीं क्रीडा केली पाहें ॥ गडियांसमवेत हलधरें ॥१६॥
तों माध्यान्हासी आला चंडकिरण ॥ जलक्रीडा करुं इच्छी संकर्षण ॥ यमुना दूर होती तेथून ॥ तीस रेवतीरमण बोलावी ॥१७॥
म्हणे आलीकडे येईं सूर्यनंदिनी ॥ तों ते वाहे निजछंदेंकरुनी ॥ बळिराम क्षोभला ते क्षणीं ॥ नांगर घालूनि ओढिली ॥१८॥
ओघ मुरडोनि सगळा ॥ आपणाकडे रामें आणिला ॥ गगनीं देव पाहती डोळां ॥ नवल गोपाळां वाटतसे ॥१९॥
जलक्रीडा करुनि बळिभद्र ॥ गोकुळासी आला सत्वर ॥ चार मास झालिया हलधर ॥ जाता जाहला द्वारकेसी ॥२०॥
संपूर्ण गोकुळींचें वर्तमान ॥ कृष्णासी सांगे रेवतीरमण ॥ तों पुढें ग्रहणयात्रेसी जगज्जीवन ॥ निघता जाहला कुरुक्षेत्रासी ॥२१॥
निघाले छप्पन्न कोटी यादव ॥ उग्रसेन बळिभद्र वसुदेव ॥ प्रद्युम्न अनिरुद्ध अक्रूर उद्धव ॥ सांब भानुमंत निघाले ॥२२॥
रुक्मिणीसहित अष्टनायिका ॥ निघाल्या सोळा सहस्त्र गोपिका ॥ चतुरंगदळ देखा ॥ सिद्ध जाहलें ते काळीं ॥२३॥
लागले वाद्यांचे गजर ॥ असंभाव्य चालिला दळभार ॥ कृष्णनायिका समग्र ॥ सुखासनीं आरुढल्या ॥२४॥
रेवती देवकी रोहिणी ॥ सत्यभामा कालिंदी रुक्मिणी ॥ ज्यांचिया वहनापुढें कनकवेत्रपाणी ॥ लक्षावधि धांवती ॥२५॥
ओळीनें चालिले पर्वत ॥ तैसे गजभार येती डोलत ॥ त्यांवर यादव बैसले रणपंडित ॥ कृतांतही भीत तयांतें ॥२६॥
पुढें चालती पायदळभार ॥ मागें तुरंग चालती सत्वर ॥ त्यांचे पाठीमागें कुंजर ॥ किंकाट करीत जाताती ॥२७॥
श्रीकृष्णाचे भद्रजाती ॥ शुंडादंड ऊर्ध्व करिती ॥ वाटे आकाश कवळों पाहती ॥ हिरे दांती जडियेले ॥२८॥
त्यांचे पाठीमागें रथांचे भार ॥ निजरथीं विराजे यादवेंद्र ॥ जो कोटि अनंगांहूनि सुंदर ॥ लावण्यसागर श्रीहरि ॥२९॥
देशोदेशींचे नृपती ॥ निजभारेंसीं सवें चालती ॥ दाटी जाहली हरीभोंवतीं ॥ वारी नसे दर्शना ॥३०॥
राजयांचे मुकुट रत्‍नजडित ॥ त्यांसहित कृष्णपदीं नमित ॥ एक एका मुकुट आदळत ॥ रत्‍नें विखुरत सभोंवतीं ॥३१॥
जैसा सौदामिनीचा एकमेळ ॥ तैसे मुकुट दिसती तेजाळ ॥ पहावयालागीं घननीळ ॥ मंडपघसणी होतसे ॥३२॥
निजभारेंसीं कौरव पांडव ॥ तेही येते जाहले सर्व ॥ भीष्म द्रोण भक्तराव ॥ विदुरंही पातला ॥३३॥
तों इंद्रादि देव ते क्षणीं ॥ पाहों इच्छिती चक्रपाणी ॥ तों हरीभोंवतीं नृपांची दाटणी ॥ वारी दर्शना नव्हेचि ॥३४॥
पहावया हरिवदनचंद्र ॥ सर्वांचे नेत्र जाहले चकोर ॥ योगी तापसी मुनीश्वर ॥ तेहीष मुरहर पाहों येती ॥३५॥
आला इतुक्यांसमवेत मुरारी ॥ येऊनि उतरला कुरुक्षेत्रीं ॥ शिबिरें उभीं केलीं ते अवसरीं ॥ सोळा सहस्त्र पृथक्‌ पृथक्‌ ॥३६॥
पुढें लक्षूनि जान्हवीतीर ॥ निजभारें उतरले नृपवर ॥ तों पूर्वींच श्रीकृष्णें दूत सत्वर ॥ गोकुळवासी धाडिला होता ॥३७॥
यशोदा नंद गोपिका गौळी ॥ यात्रेसी पातले तये वेळीं ॥ बाळपणींचे सखे सकळी ॥ येत जाहलें हरिदर्शना ॥३८॥
असंख्य गौळी आनंदेंकरुन ॥ निघाले गोरसकावडी भरुन ॥ पुढें गोपाळ पांवे घेऊन ॥ आनंदेंकरुन नाचती ॥३९॥
मृदंग टाळ घुमरी घाई ॥ मोहर्‍या घुमर्‍या बाजे सनई ॥ हरीची बाळलीला गाती नवलाई ॥ येती लवलाहीं गोपाळ ॥४०॥
चित्रविचित्र घोंगडी ॥ पांघुरले कृष्णाचे गडी ॥ एक नाचती कडोविकडी ॥ हांसती घडिघडी स्वानंदें ॥४१॥
श्रीकृष्णासी जाणविती दूत ॥ कीं गोकुळवासी आले समस्त ॥ श्रीनिवास झाला आनंदभरित ॥ वेगें सांगत रुक्मिणीसी ॥४२॥
माझीं मातापितरें दोन्ही ॥ बाळमित्र आले गोकुळींहूनी ॥ मज ते आवडती बहुत रुक्मिणी ॥ बळिरामाहूनी अधिक पैं ॥४३॥
रुक्मिणीसहित कृष्णप्रिया समग्र ॥ सिद्ध जाहल्या पहावया सर्व ॥ गौळियांसी यादवेंद्र ॥ कैसा भेटतो म्हणवूनि ॥४४॥
तों लक्षानुलक्ष गाडे ॥ गौळियांचे धांवती वेगाढे ॥ वरी गोपिका बैसल्या निवाडें ॥ हरिलीला गात येती ॥४५॥
तों हरीचे सवंगडे समग्र ॥ त्यांपुढें आले गोपिकांचे भार ॥ त्यांसंमुख जाहला यादवेंद्र ॥ हरिनायिका समग्र पाहती ॥४६॥
घवघवीत देदीप्यमान ॥ गोपांनीं देखिला जगज्जीवन ॥ समस्तीं घातलें लोटांगण ॥ प्रेमेंकरुन स्फुंदती ॥४७॥
तितुक्यांसही कैवल्यदानी ॥ भेटे तेव्हां प्रेमेंकरुनी ॥ गोपाळ म्हणती चक्रपाणी ॥ तुझी करणी कळली आम्हां ॥४८॥
तुझी बाळपणींहूनि प्रकृती ॥ आम्हांसी ठाउकीच जगत्पती ॥ आमुचीं मनें चोरुनि निश्चितीं ॥ घेऊनि श्रीपती गेलासी पैं ॥४९॥
तूं परम नाटकी चित्तचोर ॥ तुझा विश्वास नाहीं अणुमात्र ॥ तुज भाग्य आलें थोर ॥ बाळमित्र विसरलासी ॥५०॥
आमुच्या संगतीनें जगज्जीवना ॥ गाई राखिल्या तुवां मनमोहना ॥ तूं यशोदेचा तान्हा ॥ आम्ही कान्हा म्हणवूनि बाहूं ॥५१॥
गाई राखितां हृषीकेशी ॥ तूं आम्हांसांगातें जेविसी ॥ आमुच्या शिदोर्‍या ठकवूनि खासी ॥ न लाजसी तोचि कीं तूं ॥५२॥
हुतुतू हमामा हुमली ॥ आम्हांसीं घालिसी वनमाळी ॥ तुज बुक्यांवरि सकळीं ॥ डाई लागलिया मारुं गडया ॥५३॥
कृष्णा तूं मोठा चोर होसी ॥ तुज मायेनें बांधिलें उखळीसी ॥ तेव्हां उद्धरिलें यमलार्जुनां दोघांसी ॥ आठवतें कीं हृषीकेशा ॥५४॥
कृष्णा तुज भाग्य आलें थोर ॥ येर्‍हवीं तूं नंदाचा किशोर ॥ तुझ्या गोकुळींच्या खोडी समग्र ॥ न वर्णवती शेषातें ॥५५॥
वासुरें चारितां गोविंदा ॥ वळत्या न देसी तूं कदा ॥ मग तुज मारुं आम्ही मुकुंदा ॥ तें तुज आठवतें कीं ॥५६॥
आमुच्या शिदोर्‍या एकत्र करुनी ॥ काला वांटिसी तूं चक्रपाणी ॥ तैं तूं आंबिल ताक घटघटोनी ॥ पीत होतासी गोपाळा ॥५७॥
आतां बहुत जाहलासी सुकुमार ॥ तें विसरालासी तूं समग्र ॥ अरे तूं परम होसी निष्ठुर ॥ माया अणुमात्र नाहीं तूतें ॥५८॥
तैं तुझे अंगासी माखे शेण ॥ आतां चर्चिला उत्तम चंदन ॥ तेव्हां धांवसी घोंगडी पांघरुन ॥ पीतवसन आतां झळके ॥५९॥
तैं मयूरपिच्छें शिरीं शोभत ॥ आतां रत्‍नकिरीट विराजत ॥ तैं गुंजांचे हार डोलत ॥ आतां कौस्तुभपदकें झळकती ॥६०॥
तें तूं विसरलासी गोपाळा ॥ आतां भाग्य आलें घननीळा ॥ ऐकतां कृष्णनायिका वेळोवेळां ॥ हांसती रुक्मिणीसहित पैं ॥६१॥
एक गोपाळ म्हणे हृषीकेशी ॥ जैं तुं काळियाच्या डोहीं बुडलासी ॥ आम्हीं गोंगाट त्या समयासी ॥ हरि केला तुजकारणें ॥६२॥
आमुचा गोंगाट ऐकतां भेणें ॥ मग तुज सोडिलें काळियानें ॥ आम्हीं तुज वांचविलें प्राणें ॥ ऐकतां कृष्णें हास्य केलें ॥६३॥
शिळाधारीं इंद्र वर्षला ॥ आम्हींच मग गोवर्धन उचलिला ॥ तुवां एकटीच अंगोळी गोपाळा ॥ लावूनि ठकविसी आम्हांतें ॥६४॥
ऐशा संवगडियांच्या गोष्टी ॥ ऐकतां तोषला जगजेठी ॥ तों आल्या गोकुळींच्या गोरटी ॥ देखिल्या दृष्टीं कृष्णनाथें ॥६५॥
परम सुंदर लावण्यखाणी ॥ किंवा उतरल्या सौदामिनी ॥ किंवा आल्या स्वर्गाहूनी ॥ देवांगना साक्षात ॥६६॥
तटस्थ पाहती कृष्णनायिका ॥ म्हणती धन्य गोकुळींच्या गोपिका ॥ परम सुकुमार लावण्यलतिका ॥ वैकुंठनायका भाळल्या ॥६७॥
असो गोकुळींच्या युवती ॥ कृष्णचरण दृढ धारिणी ॥ सप्रेम कृष्णासी भेटती ॥ प्रेम चित्तीं न समाये ॥६८॥
म्हणती वेधका वनमाळी ॥ आम्हांसी टाकूनि गोकुळीं ॥ तुम्हीं द्वारका वसविली ॥ नाहीं दिधली भेटी कदा ॥६९॥
असो गोपिकांचें करुनि समाधान ॥ गौळियांसी भेटला श्रीकृष्ण ॥ तों नंदयशोदा देखतां दुरोन ॥ धांवोनि चरण हरि धरी ॥७०॥
तो पुराणपुरुष जगत्पाळक ॥ यशोदेचें पदी ठेवी मस्तक ॥ येरीनें हरीचे धरोन हस्तक ॥ क्षेमालिंगन पैं दीधलें ॥७१॥
यशोदेचे पयोधर ॥ तेथें पान्हा फुटला सत्वर ॥ ज्यांतील अमृत क्षीराब्धिजावर ॥ बाळपणीं प्याला असे ॥७२॥
यशोदा म्हणे राजीवनेत्रा ॥ निराळवर्णा कोमलगात्रा ॥ मज सांडूनि सुकुमारा ॥ बहुत दिवस गेलासी ॥७३॥
कृष्णा तुजविण एक क्षण ॥ झाला आम्हांसी पहा युगासमान ॥ हरि तुझी बाळलीला आठवून ॥ आम्हीं प्राण रक्षिले ॥७४॥
उखळीं बांधिलें तुज हृषीकेशी॥ म्हणोनि मजवरी रुमलासी ॥ मज टाकूनि परदेशीं ॥ तूं द्वारकेसी वसतोस पैं ॥७५॥
श्रीकृष्ण म्हणे जननीलागून ॥ तुम्हांपासीं लागलें माझें मन ॥ तों नंद आला जवळी धांवोन ॥ कृष्णें चरण वंदिले ॥७६॥
कमलोद्भवाचा जनिता ॥ तेणें आलिंगिला नंद पिता ॥ म्हणे सखया श्रीकृष्णनाथा ॥ दूर टाकिलें आम्हांतें ॥७७॥
असो हातीं धरुनि नंदयशोदेसी ॥ आणिलीं वसुदेवदेवकीपाशीं ॥ क्षेमालिंगनें एकमेकासी ॥ प्रेमादरें देती तेव्हां ॥७८॥
तों अष्टनायिका आल्या धांवोनी ॥ आणि सोळा सहस्त्र नितंबिनी ॥ दृढ लागती यशोदेचे चरणीं ॥ मस्तक ठेविती आदरें ॥७९॥
सोळा सहस्त्रांमाजी पट्टराणी ॥ लावण्यखाणी मन्मथजननी ॥ तिनें यशोदेचे चरणीं ॥ मस्तक ठेविला आदरें ॥८०॥
यशोदेनें रुक्मिणी हृदयीं धरिली ॥ आनंद न माये दिग्मंडळीं ॥ जैसी कौसल्येनें सीता आलिंगिली ॥ तैसीच रीति झाली येथें ॥८१॥
असो धावरी ग्रहणीं करुनि स्नान ॥ कृष्णें यात्रा केली सांग दान ॥ आनकदुंदुभि उग्रसेन ॥ भिन्न भिन्न दानें देती ॥८२॥
अमर्याद भांडार फोडून ॥ सुखी केले याचकांचें सदा तृप्त मन ॥ हरिवदन पाहतां ॥८३॥
गोकुळींचे जन आले ॥ तितुके श्रीकृष्णें गौरविले ॥ दिव्य वस्त्राभरणीं ते वेळे ॥ पूजिले गोवळें गोपाळे ॥८४॥
रुक्मिणी म्हणे यादवेंद्रा ॥ बंधूंची बरवी पूजा करा ॥ माझा हेत आजि पुरला खरा ॥ संवगडे तुमचे पाहूनि ॥८५॥
दिव्य वस्त्रें अलंकार जे चांगले ॥ गोकुळींच्या गोपीकांसी ते वेळे ॥ स्वहस्तें दीधले घननीळें ॥ देखतां हांसों आलें रुक्मिणीसी ॥८६॥
श्रीकृष्णासी म्हणे ते वेळां ॥ बरव्या गौरवा जी गोपीबाळा ॥ आपुली पूर्व ओळखी सांभाळा ॥ केला सोहळा जो बाळपणीं ॥८७॥
ऐकतां रुक्मिणीच्या वचना ॥ हांसा आलें जगन्मोहना ॥ सत्यभामादि सोळा सहस्त्र ललना ॥ हांसती तेव्हां आनंदें ॥८८॥
नंदयशोदेचें पूजन ॥ आपण करीत श्रीकृष्ण ॥ बहुत अलंकार धन ॥ नंदयशोदेसी समर्पिलें ॥८९॥
कृष्णनायिका समग्र ॥ यशोदेसी देती वस्त्रें अलंकार ॥ श्रीकृष्णाचे पुत्रपौत्र ॥ यशोदेसी भेटले ॥९०॥
देवकी म्हणे यशोदेलागून ॥ त्वां देखिलें हरीचें बाळपण ॥ कृष्णासी करविलें स्तनपान ॥ तूंचि धन्य त्रिभुवनीं ॥९१॥
कंसें आपटिलीं सहा बाळें ॥ कृष्णाऐसीं सुंदर सांवळें ॥ सांगतां देवकीसी रुदन आलें ॥ दुःख आठवलें बंदिशाळेचें ॥९२॥
देवकि म्हणे यदुवीरा ॥ तुवां गुरुपुत्र आणिला माघारा ॥ तुजहुनि ज्येष्ठ सुकुमारा ॥ कंसें पूर्वीं मारिलीं ॥९३॥
तीं माझीं मज आणूनी ॥ सत्वर भेटवीं चक्रपाणी ॥ मग बोले कैवल्यदानी ॥ देवकीप्रति तेधवां ॥९४॥
माते आतांचि पाहें नवल ॥ तुज भेटवितों साही बाळें ॥ यमासी आज्ञा करी घननीळ ॥ तेणें तत्काळ आणिलीं ॥९५॥
साही बाळें आणूनी ॥ देवकीपुढें देत मोक्षदानी ॥ आश्चर्य करिती दोघीजणी ॥ देवकी आणि यशोदा ॥९६॥
साही बाळें ते वेळीं ॥ देवकीनें हृदयीं धरिलीं ॥ जन आश्चर्य करिती सकळी ॥ अद्‌भुत करणी केली हो ॥९७॥
पंक्तीं घेऊनि गोकुळींचे जन ॥ श्रीकृष्णें सारिलें भोजन ॥ पांच रात्रीं तेथें क्रमून ॥ सुख दिधलें समस्तां ॥९८॥
याउपरी श्रीकृष्णाची आज्ञा घेऊन ॥ नंद यशोदा गौळीजन ॥ गोकुळासी गेले परतोन ॥ श्रीकृष्णासी आठवीत ॥९९॥
सकळ दळभारेंसीं मधुसूदन ॥ द्वारकेसी आला परतोन ॥ ग्रहणयात्रा जाहली संपूर्ण ॥ ब्रह्मानंदेकरुनियां ॥१००॥
यावरी एके दिनीं कृष्णसुत ॥ वनक्रीडेसी गेले समस्त ॥ कंदुक खेळत खेळत ॥ अरण्यांत धांवती ॥१॥
कंदुक खेळतां उसळला ॥ महाकूपामाजी पडिला ॥ सकळ यादव ते वेळां ॥ कूपाआंत विलोकिती ॥२॥
आंत किंचित नसे नीर ॥ माजी सरड पडिला पर्वताकार ॥ महाविशाळ भयंकर ॥ उघडूनि नेत्र विलोकित ॥३॥
यादव म्हणती जन्मवरी पाहीं ॥ एवढा सरड देखिला नाहीं ॥ एक धांवूनि लवलाहीं ॥ कृष्णासी सांगती नवल हें ॥४॥
बळसहित कमलावर ॥ तेथें पहावया आले सत्वर ॥ कूपामाजी कौस्तुभधर ॥ पाहे सादर विलोकूनि ॥५॥
कृष्णदृष्टी पडतां साचार ॥ तत्काळ जाहला त्याचा ऊद्धार ॥ पावोनियां दिव्य शरीर ॥ कूपाबाहेर पातला ॥६॥
जो ब्रह्मादिकां वंद्य पूर्ण ॥ क्षीराब्धिवासी नारायण ॥ त्याचे धरिले दृढ चरण ॥ प्रेमेंकरुन तयानें ॥७॥
उभा ठाकला जोडूनि कर ॥ मग तयासी पुसे श्रीधर ॥ तूं कोण येथें सांग वीर ॥ काय प्रत्यत्तर बोले तो ॥८॥
म्हणे माझें नांव नृग नृपवर ॥ पुण्यपंथें वर्ततां साचार ॥ मध्यें एक अपाय घडला थोर ॥ जाहला कहर मजवरी ॥९॥
एक्या महापर्वकाळीं ॥ ब्राह्मन बोलावूनि सकळी ॥ तयांसी सहस्त्र गोदानें अर्पिलीं ॥ सवत्स विधिप्रकारें ॥११०॥
पूजामान पावोनि ब्राह्मण ॥ गेले आश्रमासी गाई घेऊन ॥ त्यांत एक्या ऋषीची गाय पळोन ॥ आली कळपांत आमुच्या ॥११॥
तों दुसरे दिवशीं करुनि स्नान ॥ आणिक एक ब्राह्मनालागून ॥ तेचि गाय दिधली नेणोन ॥ मग तो ब्राह्मण आला पहावया ॥१२॥
तेणें येऊनि ती गाय धरिली ॥ म्हणे हे माझी पळोनि आली ॥ ब्राह्मण म्हणे मज आतां दिधली ॥ मी न सोडीं सर्वथा ॥१३॥
एकासीं एक भांडती ब्राह्मण ॥ म्यां धरिले दोघांचे चरण ॥ पहिल्या ब्राह्मणासी सहस्त्रगोदान ॥ द्यावया सिद्ध जाहलों ॥१४॥
तो म्हणे मी न घेईं सर्वथा ॥ माझीच मज देईं आतां ॥ तों दुसर्‍या ब्राह्मणासी प्रार्थितां ॥ तोही सर्वथा नायके ॥१५॥
दोघेही विप्र भांडतां ॥ न राहतीच राहवितां ॥ दोघे क्षोभोनि कृष्णनाथा ॥ मज शापशस्त्रें ताडिलें ॥१६॥
म्हणती महासरड होऊन ॥ कृपामाजी पडें बहुत दिन ॥ म्यां धरिले त्यांचे चरण ॥ मागुती वचन बोलिले ॥१७॥
पुढें अवतरेल श्रीकृष्ण ॥ जो पूर्णब्रह्म सनातन ॥ त्याची दृष्टी पडतां उद्धरोन ॥ जासील तेव्हां स्वर्गातें ॥१८॥
यादवांसी म्हणे कृष्णनाथ ॥ पाहा अन्याय तरी किंचित ॥ केवढा जाहला अनर्थ ॥ पुण्यपुरुषा रायातें ॥१९॥
यालागीं ब्राह्मणांसी भिऊन ॥ वर्ता तुम्ही सावधान ॥ हें असो तत्काळ विमान ॥ रायाकारणें पातलें ॥१२०॥
नमस्कारुनि हरीचे चरण ॥ नृगराजा गेला उद्धरोन ॥ हरिपदप्रसादेकरुन ॥ इंद्रभुवनीं राहिला ॥२१॥
द्वारकेंत प्रवेशला कृष्णनाथ ॥ तों भेटीसी आला वीर पार्थ ॥ चतुर रणपंडित सुभद्राकांत ॥ आवडे बहुत श्रीकृष्ण ॥२२॥
श्रीकृष्णें आवडी करुन ॥ हृदयीं आलिंगिला अर्जुन ॥ परम प्रीति दोघांलागून ॥ पंक्तीसी भोजन शेजारीं ॥२३॥
एका आसनीं दोघांसी बैसणें ॥ एके तल्पकीं निद्रा करणें ॥ गुह्य गोष्टी बोलणें ॥ दोघांजणीं एकांतीं ॥२४॥
तों द्वारकेमाजी एक ब्राह्मण ॥ त्याचीं आठ बाळें गेलीं सटवोन ॥ मागुती स्त्री प्रसूत होऊन ॥ नववा पुत्र जाहला ॥२५॥
ब्राह्मण श्रीरंगाजवळी आला ॥ बाळांचा वृत्तांत सांगितला ॥ हरि जे पांचवे दिवसीं पुत्र जातात याला ॥ उपाय मजला सांगा कांहीं ॥२६॥
आतां स्त्री जाहली प्रसूत ॥ एवढा तरि राखें सुत ॥ तों गर्वें बोले वीर पार्थ ॥ मी रक्षीन बाळ तुझें ॥२७॥
ब्राह्मणाच्या घरासी आला अर्जुन ॥ म्हणे मी बाळकाचा रक्षीन प्राण ॥ यम काय उभे चिरीन ॥ निजसामर्थ्येंकरुनियां ॥२८॥
मी असतां सामर्थ्यवंत ॥ काय करितील यमदूत ॥ कैसा सटवेल विप्राचा सुत ॥ तो आजि सत्य पाहेन मी ॥२९॥
जरी या बाळाचा जाईल प्राण ॥ तरी मीही अग्निकाष्ठें भक्षीन ॥ ऐसा करुनियां पण ॥ रक्षी अर्जुन सभोंवतें ॥१३०॥
विप्राच्या गृहावरुनि थोर ॥ दृढ रचिलें बाणांचें मंदिर ॥ दिव्य मंत्र जपोनि सत्वर ॥ दिग्बंधन पार्थ करी ॥३१॥
धनुष्यासी लावूनि बाण ॥ द्वारीं रक्षीत अर्जुन ॥ तों प्रवर्तला पांचवा दिन ॥ गेला प्राण बाळकाचा ॥३२॥
जननी पिटी वक्षःस्थळ ॥ अहा रे अर्जुना सटवलें बाळ ॥ पार्थ क्षोभला प्रबळ ॥ गेला तत्काळ यमपुरीं ॥३३॥
यमासी पुसे वृत्तांत ॥ तो म्हणे नवही बाळें येथ ॥ म्यां आणिलीं नाहीं सत्य ॥ जाण यथार्थ कपिध्वजा ॥३४॥
बाळकाकारणें ते वळे ॥ स्वर्ग मृत्यु पाताळ शोधिले ॥ चौदा लोकांत झाडे घेतले ॥ परी बाळें न सांपडती ॥३५॥
आला द्वारकेसी परतोन ॥ मग चेतविला महाअग्न ॥ प्राण द्यावयासी अर्जुन ॥ सिद्ध जाहला ते काळीं ॥३६॥
वृत्तांत ऐकोनि सर्वेश्वर ॥ पार्थाजवळी आला सत्वर ॥ कपिध्वजें वृत्तांत समग्र ॥ श्रीरंगासी सांगितला ॥३७॥
मग दिव्य रथ सजवूनि परिकर॥ श्रीकृष्णें आणविला सत्वर ॥ त्यावर कमलावर सुभद्रावर ॥ बैसोनियां चालिले ॥३८॥
पवनवेगें रथ जात ॥ पृथ्वीमंडळ उल्लंघी त्वरित ॥ सप्तसमुद्र अद्‌भुत ॥ क्रमूनि मागें टाकिले ॥३९॥
सप्तावरणें भेदून ॥ जेथें वसे आदिनारायण ॥ तेथें नेऊनि अर्जुन ॥ उभा केला श्रीकृष्णें ॥१४०॥
कोटि सूर्याची प्रभा जाय लपोन ॥ ऐसा शेषशायी नारायण ॥ त्याचि पदअंगुष्ठावरुन ॥ ब्रह्मांडचि ओंवाळिजे ॥४१॥
तें स्वरुपतेज अपार ॥ नेत्रीं पाहूं न शके मित्र ॥ त्याचें स्वपदीं वसुदेवपुत्र ॥ मिळोनि गेला एकत्वें ॥४२॥
परम घाबरा जाहला अर्जुन ॥ पाहे तंव जवळी नाहीं श्रीकृष्ण ॥ अद्‌भुत तेज न लक्षवे पूर्ण ॥ झांकी नयन भयें तेव्हां ॥४३॥
नयन झांकूनि पंडुसुत ॥ श्रीकृष्णा नामें हांक देत ॥ म्हणे कैवारिया धांव त्वरित ॥ कां मज येथें सांडिलें ॥४४॥
मंगळधामा राजीवनेत्रा ॥ पुराणपुरुषा स्मरारिमित्रा ॥ मन्मथजनका देवकीपुत्रा ॥ धांव सत्वर मजलागीं ॥४५॥
जलजोद्भवजनका मधुसूदना ॥ पांडवरक्षका भक्तजनरंजना ॥ समरधीरा दानवभंजना ॥ काढीं मज येथूनि ॥४६॥
कासावीस जाहला पार्थ ॥ मग प्रकटला कृष्णनाथ ॥ दिव्य चक्षु तयासी देत ॥ म्हणे पाहें अद्‌भुत तेज माझें ॥४७॥
मग पार्थें उघडिलीं नेत्रकमलें ॥ दिव्य स्वरुप न्याहाळिलें ॥ तंव तेथें नवही बाळें ॥ ब्राह्मणाचीं खेळती ॥४८॥
मग स्तवूनि आदिनारायण ॥ नवही बाळें घेतलीं मागोन ॥ रथीं बैसोनि कृष्ण अर्जुन ॥ आले परतोन द्वारकेसी ॥४९॥
अर्जुनाजवळी नवही बाळें ॥ श्रीकृष्णें दिधलीं तये वेळे ॥ मग ब्राह्मणासी बोलाविलें ॥ स्त्रीसहित तेधवां ॥१५०॥
उभयतांसी पूजूनि पार्थ ॥ समर्पिले नवही सुत ॥ ब्राह्मण आनंदें बहुत ॥ यश वर्णीत पार्थाचें ॥५१॥
ब्राह्मण गेला गृहासी ॥ मग अर्जुन म्हणे हृषीकेशी ॥ तुझी लीला ब्रह्मादिकांसी ॥ पाकशासनासी अगम्य ॥५२॥
श्रीकृष्ण म्हणे पार्था ॥ सर्व स्वरुपें मीच धरिता ॥ येथें दुजयाची नाहीं वार्ता ॥ कर्ता हर्ता मीच पैं ॥५३॥
असो आज्ञा घेऊनि अर्जुन ॥ इंद्रप्रस्थासी गेला परतोन ॥ सकळ अभिमान गळून ॥ कृष्णस्मरणीं वर्ततसे ॥५४॥
श्रीधर श्रोतयां विनवीत ॥ संपत आला हरिविजयग्रंथ ॥ परी एक अनुसंधानीं संमत ॥ पद्मपुराणींचें सुचलें ॥५५॥
पद्मपुराणीं पांडुर्म्गमाहात्म्य ॥ तेथें ही कथा आहे उत्तम ॥ श्रोतीं परिसिजे सप्रेम ॥ अत्यादरेंकरुनियां ॥५६॥
शची शक्राची अंगना ॥ ती एकदां गेली विष्णुभुवना ॥ तों देखिला वैकुंठराणा ॥ लक्ष्मीसहित ते वेळां ॥५७॥
करुनियां हरीसी नमन ॥ उभी ठाकली कर जोडून ॥ परी शचीचें इच्छी मन ॥ अर्धांगीं बैसेन हरीच्या ॥५८॥
हा परमात्मा आदिनारायण ॥ जरी मी याच्या अर्धांगीं बैसेन ॥ तरी भाग्य परिपूर्ण ॥ मग जगज्जीवन बोलत ॥५९॥
हरि म्हणें ते अवसरीं ॥ शची तुवां जें इच्छिलें अंतरीं ॥ साठी सहस्त्र वर्षें तप करीं ॥ हिमगिरिपाठारीं मजलागीं ॥१६०॥
पुढें मी धरीन कृष्णावतार ॥ गोकुळीं करीन लीलाचरित्र ॥ तूं राधा होऊनि सत्वर ॥ प्रकटें मग व्रजातें ॥६१॥
तेथें मी तुज वरीन ॥ मग मी कंसवधासी जाईन ॥ ते वेळे तूं गुप्त होऊन ॥ द्वारके येईं वेगेंसी ॥६२॥
ऐसा वर पावोनि ते अवसरीं ॥ इंद्राणी निर्धारें तप करी ॥ प्रकटली गोकुळा भीतरी ॥ भोगिला मुरारी कुंजवनीं ॥६३॥
मग मथुरेसी जातां हृषीकेशी ॥ वियोग न साहवे राधेसी ॥ गुप्त होऊनि हिमाचळासी ॥ मागुती तपासी ते गेली ॥६४॥
मग ते दिव्य तप करुनी ॥ तेचि आली द्वारकेलागूनीं ॥ श्रीकृष्णें राधेसी देखोनी ॥ आलिंगूनि अंकीं बैसविली ॥६५॥
अद्यापि द्वारकेसी जाण ॥ श्रोतीं पहावें जाऊन ॥ होतें राधाकृष्णपूजन ॥ सर्व जन देखती ते ॥६६॥

असो अर्धांगी राधा घेऊनी ॥ बैसला असतां चक्रपाणी ॥ तेथें आली रुक्मिणी ॥ हरिचरण पहावया ॥६७॥
जरी सोळा सहस्त्र गोपिका असती ॥ सत्यभामादि सकळ युवती ॥ परी त्याही येतां रुक्मिणी सती ॥ न बैसती हरिअंकीं ॥६८॥
रुक्मिणी येतांचि सकळा ॥ उभ्या राहती गोपबाळा ॥ सर्वांदेखतां चित्काळा ॥ हरिअर्धांगीं बैसत ॥६९॥
सर्वांदेखतां बैसे रुक्मिणी ॥ परी तिजदेखत न बैसे कोणी ॥ हे ज्ञानकळा पट्टराणी ॥ इची सरी कोणी न पावत ॥१७०॥
असो रुक्मिणी आली जों एकदां ॥ तों हरीचे अर्धांगीं बैसली राधा ॥ न धरी रुक्मिणीची मर्यादा ॥ चढली क्रोधा भीमकी ॥७१॥
पुढील भविष्य जाणूनी ॥ तात्काळ रुक्मिणी गेली रुसोनी ॥ दक्षिणदिंडीरवनीं येऊनी ॥ तप करीत बैसली ॥७२॥
दिंडीरवन तेचि पंढरी ॥ भीमातीरीं भीमकी तप करी ॥ मज येथें पहावया येईल मुरारी ॥ द्वारकेहूनि आपणचि ॥७३॥
मग दिंडीरवनांत ॥ भीमककन्या तप करीत ॥ तों द्वारकेसी कृष्णनाथ ॥ काय करिता जाहला ॥७४॥
रुक्मिणी जातां द्वारकेहूनी ॥ कळाहीन सकळ कामिनी ॥ ते सर्व सौभाग्यखाणी ॥ गेली रुसोनी भीमतटा ॥७५॥
मग रुक्मिणीकारणें कृष्णनाथ ॥ सर्व उर्वीमंडळ शोधीत ॥ तों गोकुळासी आला त्वरित ॥ बाळवेष धरी तेव्हां ॥७६॥
सवें गाईगोपाळ घेऊनी ॥ दक्षिण दिशे आला चक्रपाणी ॥ शोधीत वनीं उपवनीं ॥ ते रुक्मिणी चित्कळा ॥७७॥
गोरक्षणाचा वेत्र करीं ॥ तोचि दंड धरी पूतनारी ॥ शंख तो कमंडलु निर्धारीं ॥ संन्यासी हरि जाहला असे ॥७८॥
श्रीवत्सांकित मनोहर ॥ मुकुट कुंडलें मकराकार ॥ नीलजीभूतवर्ण श्रीधर ॥ बाळ दिगंबर जाहला ॥७९॥
शोधीत शोधीत हृषीकेशी ॥ आला लोहदंडक्षेत्रासी ॥ दिंडीरवन म्हणती त्यासी ॥ तेथें द्वारकावासी प्रवेशला ॥१८०॥
मागें टाकूनि गाईगोपाळ ॥ त्या वनांत प्रवेशे घननीळ ॥ तो तेथें बैसली वेल्हाळ ॥ तप करीत एकांतीं ॥८१॥
अंकांतरीं धरुनि वेत ॥ दोन्ही कटीं ठेवूनि हस्त ॥ रुक्मिणीचें वदन विलोकीत ॥ उभा राहिला तेथेंचि ॥८२॥
म्हणे पद्मनेत्रे कामिनी ॥ कां बैसलीस येऊनी॥ मज न गमे तुजवांचूनी ॥ म्हणोनि धांवूनि येथें आलों ॥८३॥
म्हणे प्रिये तुजवांचून ॥ मज युगासमान वाटे क्षण ॥ मग रुक्मिणी बोले वचन ॥ तूं कोण आहेसी सांग पां ॥८४॥
चोरटियासारखा अकस्मात ॥ उभा ठाकलासी या वनांत ॥ परांगनेसीं बोलावया मात ॥ काय कारण तुज असे ॥८५॥
परनारीसी प्रिया म्हणसी ॥ मज ऐसें वाटतें मानसीं ॥ बहुतक परद्वारी आहेसी ॥ बाळपणापासूनि ॥८६॥
ऐकोनि भीमकीचें वचन ॥ हास्य करीत मधुसूदन ॥ मग हृदयीं दृढ आलिंगून ॥ केलें समाधान तियेचें ॥८७॥
तों पुढें पुंडलीक भक्त ॥ मातापितयांची सेवा करीत ॥ तेणें तोषला जगन्नाथ ॥ जाऊनि तेथें उभा ठाके ॥८८॥
हरि म्हणे धन्य धन्य पुंडलीका ॥ वर मागें भक्तटिळका ॥ येरें वीट टाकिली वैकुंठनायका ॥ बैसावयाकारणें ॥८९॥
त्या विटेवरी पद जोडूनी ॥ दोन्ही कर कटीं ठेवूनी ॥ उभा राहिला मोक्षदानी ॥ पुंडलिकासी न्याहाळीत ॥१९०॥
मातापितयांची सेवा करुनी ॥ हरीसमीप आला पुंडलीक मुनी ॥ प्रेमें लागला दृढ चरणीं ॥ मग मोक्षदानी बोलत ॥९१॥
पुंडलिका वर मागें येचि क्षणीं ॥ येरु म्हणे जैसा आहेसी चक्रपाणी ॥ तैसा चिरकाळ ये स्थानीं ॥ उभा राहें भगवंता ॥९२॥
जे तुझ्या दर्शनासी येती ॥ ज्ञानहीन मूढमती ॥ त्यांसी दर्शनें व्हावी मुक्ती ॥ हेचि विनंति माझी असे ॥९३॥
आणि या क्षेत्राचें नाम पंढरीनगर ॥ दक्षिणद्वारका नाम साचार ॥ रुक्मिणीसहित तूं सर्वेश्वर ॥ राहे स्थिर येथेंचि ॥९४॥
विठ्ठलनाम अभिधान ॥ चालवावें आतां येथून ॥ मज कोठें न जावें सोडून ॥ कृपाळुवा सर्वेशा ॥९५॥

म्हणून दक्षिणद्वारका पंढरीं ॥ जे विख्यात भूमंडळावरी ॥ सकळ द्वारकेची संपदा मुरारी ॥ आणीत तेव्हां पंढरीये ॥९६॥
हा भीमातीरविहारी दिगंबर ॥ आदिपुरुष परात्पर ॥ आनंदसांप्रदाय थोर ॥ तेथूनिया वाढला ॥९७॥
मूळ गुरु आदिनारायण ॥ प्रथम शिष्य चतुरानन ॥ आपुलें जें गुह्य ज्ञान ॥ ठेविलें पूर्ण त्यापासी ॥९८॥
तेंचि ब्रह्मवंद्य निजज्ञान ॥ अत्रीसी दिधलें प्रीतीकरुन ॥ त्याचें पोटीं परब्रह्म पूर्ण ॥ दत्तात्रेय अवतरला ॥९९॥
अवतार उदंड होऊनि गेले ॥ परी दत्तात्रेयरुप आहे संचलें ॥ अत्रीनें ज्ञान ठेविलें ॥ दत्तात्रेयीं सर्व ते वेळां ॥२००॥
त्या दत्तात्रेयापासून॥ सदानंदीं बिंबलें ज्ञान ॥ तेंचि रामानंदी ठसावोन ॥ परिपूर्ण पसरलें ॥१॥
तेथूनि अमळानंद यतीश्वर ॥ जो गंभीरपणें जैसा सागर ॥ तेथूनि ज्ञानसमग्र ॥ ब्रह्मानंद अवतरले ॥२॥
तेथूनि सहजानंदमुनी ॥ ज्याची समाधि आहे कल्याणीं ॥ तेथूनि पूर्णानंद पूर्णपणीं अवतरला यतिराज ॥३॥
तेथूनि दत्तानंद तत्त्वतां ॥ जो श्रीधराचे पितयाचा पिता ॥ तो दत्तात्रेयचि मागुता ॥ अवतरला सहजस्थितीं ॥४॥
तेथुनि ब्रह्मानंद सद्‌गुरु ॥ जो ज्ञानाचा महामेरु ॥ श्रीधरवरद निर्विकारु ॥ भीमातीरविलासी जो ॥५॥
शालिवाहन शके सोळाशेंचोवीस ॥ चित्रभानु नाम संवत्सरास ॥ शुद्ध द्वितीया मार्गशीर्षमास ॥ ते दिवसीं ग्रंथ संपला ॥६॥
श्रीपांडुरंगवरेंकरुन ॥ पंढरीसी ग्रंथ जाहला निर्माण ॥ एकदां श्रवण करितां परिपूर्ण ॥ पापें दारुण भस्म होती ॥७॥
तीन आवर्तनें वाचिता पवित्र ॥ कुळीं होय दिव्य पुत्र ॥ तो भक्तराज महाचतुर ॥ होईल ऐसें जाणिजे ॥८॥
एक आवर्तन करितां ॥ हरे घोर संकटचिंता ॥ शत्रुपराजय तत्त्वतां ॥ श्रवण करितां हरिविजय ॥९॥
काम क्रोध मद मत्सर ॥ हेचि शत्रु अनिवार ॥ यांचा पराजय होईल साचार ॥ श्रवण करितां भावार्थें ॥२१०॥
हरिविजय करितां श्रवण ॥ हरेल सकळ ऋण अथवा रोग दारुण ॥ आपण प्रकटोनि श्रीकृष्ण ॥ संकटें त्यांचीं निरसील ॥११॥
छत्तीस अध्याय ग्रंथ तत्त्वतां ॥ प्रीतीं पावो पंढरीनाथा ॥ या ग्रंथासी मूळकर्ता ॥ पंढरीनाथ जाणिजे ॥१२॥
जें जें विठ्ठलें कर्णीं सांगितलें ॥ तें तें येथें पत्रीं लिहिलें ॥ न्यून अथवा आगळें ॥ त्याचें तोचि जाणे पैं ॥१३॥
दशम आणि हरिवंश ॥ पद्मपुराणींच्या कथा विशेष ॥ त्याचि हरिविजयीं सुरस ॥ श्रोतीं सावकाश परिसाव्या ॥१४॥
छत्तीस अध्याय हरिविजय ॥ पांडुरंगासी परम प्रिय ॥ हा ग्रंथ संग्रहितां तें घर निर्भय ॥ सदा विजय होइजे ॥१५॥
हरिविजयग्रंथ भांडार ॥ छत्तीस कोठडयांचें परिकर ॥ माजी रत्‍नें भरलीं नानाप्रकार ॥ जोहरी संत परीक्षक ॥१६॥
छत्तीस तत्त्वें हीं साचार ॥ कीं छत्तीस खणांचें दामोदर ॥ कीं छत्तीस गंगा मिळोनि समग्र ॥ हरिविजयसमुद्र भरलासे ॥१७॥
कीं छत्तीस कोहळीं धन ॥ दिधलें ब्रह्मानंद दावून ॥ कीं छत्तीस खणांचें वृंदावन ॥ निजभक्त संपूर्ण तुळसी वरी ॥१८॥
कीं हरिविजयग्रंथ राजेंद्र ॥ हे छत्तीस जाणा त्याचे महावीर ॥ करिती सकळ पापांचा संहार ॥ प्रतापधीर महायुद्धीं ॥१९॥
हरिविजय हेंचि आकाश ॥ तेथें हे छत्तीस चंडांश ॥ ब्रह्मांड भेदूनि प्रकाश ॥ पलीकडे जाय पैं ॥२२०॥
कीं छत्तीस वृक्षांचें वन ॥ कीं छत्तीस क्षेत्रें पिकलीं पूर्ण ॥ कीं हें पदक देदीप्यमान ॥ छत्तीस रत्‍नांचें जडियेलें ॥२१॥
कीं हा प्रयागराज थोर ॥ भावमास अतिपवित्र ॥ स्नान करी पुण्यवंत नर ॥ अर्थीं बुडी देऊनियां ॥२२॥
कीं हा भवरोगावरी दिव्य रस ॥ बुद्धिमंदासी होय मतिप्रकाश ॥ शुक सांगे परीक्षितीस ॥ वारंवार गौरवूनि ॥२३॥
प्रथमाध्यायीं मंगलाचरण ॥ गणेशसरस्वतीसंतवर्णन ॥ गुरुमहिमा सांगोन ॥ प्रथमाध्याय संपविला ॥२४॥
दैत्य पृथ्वीवरी माजले ॥ म्हणोनि देव क्षीरसागरासी गेले ॥ स्तवन करुनि सुरवर परतले ॥ ऐसें हें कथिलें द्वितीयाध्यायीं ॥२५॥
देवकीवसुदेवांचें लग्न ॥ अवतरले शेषनारायण ॥ गोकुळासी गेले जगज्जीवन ॥ हें निरुपण तिसर्‍यांत ॥२६॥
गर्गें वर्णिलें जातक ॥ पाळणां निजविला वैकुंठनायक ॥ पूतना शोषिली निःशंक ॥ चौथ्यांत हें कथिलें असे ॥२७॥

पांचव्यांत तृणावर्त येऊन ॥ श्रीकृष्णासी नेलें उचलोन ॥ नाना क्रीडारस दावून ॥ मोहिलें मन सर्वांचें ॥२८॥
सहाव्यांत वनमाळी ॥ चोरीकर्मे केलीं गोकुळीं ॥ गोपींनीं गार्‍हाणीं सांगीतलीं ॥ कौतुकें करुनि यशोदेसी ॥२९॥
सातव्यांत हें कथन ॥ दहावतारलीला पूर्ण ॥ गोपींसी दावी श्रीकृष्ण ॥ सांगती पूर्ण यशोदेसी ॥२३०॥
आठव्यामाजी कथन ॥ पद्मपुराणींचें संमत पूर्ण ॥ राधेनें कृष्ण घरासी नेऊन ॥ खेळविला बहुसाल ॥३१॥
नवव्यांत हेचि कथेची प्रौढी ॥ कृष्णें केल्या बहुत खोडी ॥ माया उखळीं बांधी तांतडी ॥ यमलार्जुन उद्धरिले ॥३२॥
दहाव्यांत गोपाळकाला करुन ॥ वनक्रीडा करी नारायण ॥ कमलोद्भवें केलें वत्सहरण ॥ करी स्तवन प्रीतीनें ॥३३॥
अकराव्यांत कालियामर्दन ॥ बाराव्यांत गोवर्धनोद्धारण ॥ तेराव्यांत कंसदूत मर्दून ॥ गोरक्षण केलें पैं ॥३४॥
चौदाव्यांत अघासुरमर्दन ॥ नंद यमुनेंत गेला बुडोन ॥ तो माघारा आणिला नारायणें ॥ वरुणापाशीं जाऊनियां ॥३५॥
पंधराव्यांत हेंचि कथन ॥ कृष्णें घेतलें देवकीचें वाण ॥ वनांत मागे राधेसी हरि दान ॥ तेंचि वर्णन बहुत असे ॥३६॥
सोळाव्यांत यज्ञपत्‍न्यांनीं येऊन ॥ हरीसी समर्पिलें अन्न ॥ रासक्रीडासंपूर्ण ॥ सत्राव्यांत कथियेली ॥३७॥
अठराव्यांत निरुपण ॥ अक्रूर कृष्णासी गेला घेऊन ॥ एकोनविंशति अध्यायीं कंस वधून ॥ राज्य दिधलें उग्रसेना ॥३८॥
विसावा अध्याय अतिसुरस ॥ श्रीकृष्ण शरण सांदीपनास ॥ अद्‌भुत कथिला ज्ञानरस ॥ गुरुशिष्यलक्षणें ॥३९॥
एकविसाव्यांत उद्धवें येऊन ॥ गोपींसीं कथिलें ब्रह्मज्ञान ॥ बाविसाव्यांत जरासंध पराभवून ॥ काळयवन भस्म केला ॥२४०॥
तेविसावा चोविसावा सार ॥ येथें कथिलें रुक्मिणीस्वयंवर ॥ पंचविसाव्यांत सर्वेश्वर ॥ जांबुवंती पर्णूनि आणीत ॥४१॥
सविसाव्यांत कृष्णनायिका ॥ आणिल्या षोडशसहस्त्र गोपिका ॥ सत्ताविसाव्यांत रुक्मिणी विनोद देखा ॥ आणि प्रद्युम्न उपजला ॥४२॥
अठ्ठाविसाव्यां उखाहरण ॥ भुजा छेदूनि त्रासिला बाण ॥ एकुण तिसाव्यात दरिद्रहरण ॥ सुदामयाचें पैं केलें ॥४३॥
तिसाव्यांत सत्यभामेचा विनोद ॥ नारदासी दान दिधला गोविंद ॥ एकतिसाव्यांत गरुडाचा गर्वमद ॥ हनुमंताहातीं हरियेला ॥४४॥
बत्तिसाव्यांत सुभद्राहरण ॥ नारदासी घरोघरीं कृष्णदर्शन ॥ तेहतिसाव्यांत राजसूययज्ञ ॥ जरासंधा मारविलें ॥४५॥
चौतिसाव्यांत कथा निश्चितीं ॥ वाढीत असतां दौपती सती ॥ बिरडें सुटतां श्रीपती ॥ चतुर्भुज करी तेव्हां ॥४६॥
पस्तिसावा अध्याय मयसभावर्णन ॥ शिशुपाळ वक्रदंत वधून ॥ विजयी जाहला मधुसूदन ॥ हेंचि कथा असंभाव्य ॥४७॥
छत्तिसाव्यांत ग्रहणयात्रा करुन ॥ भेटले गोकुळींचे जन ॥ याउपरी पंढरीसी आला श्रीकृष्ण ॥ हेंचि निरुपण शेवटीं ॥४८॥
ऐसा छत्तीस अध्याय हा ग्रंथ ॥ हरिविजय यथार्थ ॥ सदा अवलोकोत भक्तसंत ॥ विवेकदृष्टीकरुनियां ॥४९॥
पंढरीहून चार योजनें दूर ॥ पश्चिमेसी नाझरें नाम नगर ॥ तेथील देशलेखक साचार ॥ ब्रह्मानंद पूर्वाश्रमीं ॥२५०॥
पुढें पंढरीसी जाऊन ॥ मग केलें संन्यासग्रहण ॥ त्यावरी भीमातीरींच संपूर्ण ॥ समाधिस्त निजसुखें ॥५१॥
तो ब्रह्मानंदमहाराज पिता ॥ सावित्री नामें माझी माता ॥ श्रीधरें वंदूनीं उभयतां ॥ हरिविजय संपविला ॥५२॥
सकळ श्रोतीयांसी आदरें ॥ साष्टांग नमूनि श्रीधरें ॥ ब्रह्मानंदेंकरुनि निर्धारें ॥ हरिविजय विलोकिजे ॥५३॥
इति श्रीहरिविजय ग्रंथ ॥ संमत हरिवंशभागवत ॥ सदा परिसोत प्रेमळ पंडित ॥ षट्‌त्रिंशत्तमाध्याय शेवटींचा ॥२५४॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥अध्याय॥३६॥ओंव्या॥२५४॥
॥ इति श्रीहरिविजय समाप्तः ॥

Monday, February 18, 2013

हरिविजय - अध्याय ३५

अध्याय ३५ 
 श्रीगणेशाय नमः ॥  श्रीकुलदेवतायै नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ 
माझे ह्रदय दिव्य कमळ ॥ जे तेजोमय परम निर्मळ ॥ अष्टकर्णिका अतिकोमळ ॥ मध्ये घननीळ विराजे ॥१॥
ह्रत्पद्म मध्ये गंभीररेखा ॥ श्रीरंग नांदे भक्तसखा ॥ अष्टकर्णिकांवरी अष्टनायिका ॥ त्याही स्थापू निजध्यानी ॥२॥
रुक्मिणी जांबुवंती सत्यभामा ॥ कालिंदी मित्रविंदा मनोरमा ॥ याज्ञजिती लक्ष्मणा पूर्णकामा ॥ मद्रावती आठवी ॥३॥
मध्यभागी श्रीकरधर ॥ कर्णिकांवरी नायिका सुकुमार ॥ ऐसा ह्रदयकमळी यादवेंद्र ॥ सर्वदाही पूजावा ॥४॥
चौतिसावे अध्यायी कथा जाणा ॥ धर्मै अग्रपूजा दिधली कृष्णा ॥ तेणे क्षोभ आला दुर्जना ॥ शिशुपाळादिकांसी ॥५॥
चैद्य आणि कौरव ॥ एके सभेसी बैसले सर्व ॥ क्षुद्रदृष्टी लक्षिती माधव ॥ परम द्वेषी दुरात्मे ॥६॥
शिवलिंग देखता दृष्टी ॥ शिवद्वेषी होती जेवी कष्टी ॥ की विष्णुप्रतिमा पाहता पोटी ॥ दुःख कपाळी जंगमा ॥७॥
की देखता साधूंचे पूजन ॥ परम क्षोभती जैसे कुजन ॥ की पतिव्रतेची राहटी पाहोन ॥ जारिणी जेवी निंदिती ॥८॥
की दृष्टी देखता राजहंस ॥ कावळियांसी उपजे त्रास ॥ की पंचानना देखूनि सावकाश ॥ जंबुकासी आनंद वाटेना ॥९॥
की सभेत देखोनि पंडित ॥ मूर्ख मतिमंद संतापत ॥ की दृष्टी देखता समीरसुत ॥ वाटे अनर्थ रजनीचरा ॥१०॥
की ऐकता हरिनामघोष ॥ भूतप्रेतांसी उपजे त्रास ॥ तैसे पूजिता श्रीरंगास ॥ दुर्जन परम संतापले ॥११॥
अंतरीच कष्टी कौरव संपूर्ण ॥ परी चैद्यांमाजी दमघोषनंदन ॥ परम दुखावला दुर्जन ॥ काळसर्प ज्यापरी ॥१२॥
भीष्मासी म्हणे कुंतीनंदन ॥ आता कोणाचे करू पूजन ॥ गंगात्मज बोले वचन ॥ तो शिशुपाळ जल्पे भलतेचि ॥१३॥
म्हणे रे धर्मा ऐक वचन ॥ तुम्ही नीच मूर्ख अवघेजण ॥ गोरक्षक आधी पूजन ॥ अपेश माथा घेतले ॥१४॥
योग्यायोग्य विचार ॥ मूढा तुज न कळे साचार ॥ अग्रपूजेसी अधिकारी जार ॥ करिता पामर पांडव तुम्ही ॥१५॥
दोघे जनक त्या गोरक्षाते ॥ पंच तात तुम्हां पांडवांते ॥ यालागी दोघांची चित्ते ॥ एक जाहली परस्परे ॥१६॥
परम मूर्ख युधिष्ठिर ॥ बुद्धिभ्रष्ट जाहला गंगाकुमर ॥ पूजेसी अधिकारी तस्कर ॥ केला साचार यज्ञमंडपी ॥१७॥
ऋत्विज सांडूनि सत्यवतीकुमर ॥ कपिल याज्ञवल्क्य वसिष्ठ ब्रह्मपुत्र ॥ द्रोण कृपाचार्य गुरुवर ॥ टाकूनि जार पूजिला ॥१८॥
धृतराष्ट्र सांडूनि वृद्ध ॥ सोयरा सांडूनि द्रुपद ॥ कोण्या विचारे बुद्धिमंद ॥ हा गोविंद पूजिला ॥१९॥
अश्वत्थामा गुरुनंदन ॥ पूजावा होता सूर्यसुत कर्ण ॥ पृथ्वीपति सुयोधन ॥ सांडूनि कृष्ण पूजिला ॥२०॥
भीमक वाल्हीक वृद्ध थोर ॥ शल्य एकलव्य भगदत्त वीर ॥ जयद्रथ शकुनि महावीर ॥ सांडूनि तस्कर पूजिला ॥२१॥
पूज्य अपमानूनि थोर थोर ॥ अपूज्यासी पूजिले साचार ॥ येणे तुमचे यश कीर्ति पुण्य समग्र ॥ बुडोनि भ्रष्ट जाहले ॥२२॥
येणे कोणते केले अनुष्ठान ॥ की केले जप तप व्रत साधन ॥ किंवा येणे केले वेदपठन ॥ म्हणोनि आधी पूजिला ॥२३॥
यासी म्हणावे रायासमान ॥ तरी नाही छत्रसिंहासन ॥ आचार्य नव्हे हा ब्राह्मण ॥ भ्रष्टपूजन व्यर्थ केले ॥२४॥
आम्ही बैसलो नृपवर ॥ आधी पूजिला गोपाळकुमर ॥ आमुचे घ्राण छेदिले समग्र ॥ परम अपवित्र पांडव तुम्ही ॥२५॥
पूजणे होते जरी गोवळा ॥ तुवा कुष्ठपुत्रा अमंगळा ॥ आम्हांसी का आणिले खळा ॥ यज्ञ गेला वृथा तुझा ॥२६॥
म्या तुज दिधला करभार ॥ की दुर्बळा हा कुष्ठपुत्र ॥ धर्मकृत्यासी साह्य करावे साचार ॥ विवेकी नर बोलती ॥२७॥
अपमानिले भूपाळा ॥ येथे थोर केला गोवळा ॥ इतुकेनि आम्हा नीचत्व सकळा ॥ सर्वथाही नव्हेचि ॥२८॥
यज्ञपुरोडाश अरण्यांत पडिला ॥ तो एका जंबुकासी लाधला ॥ तितुकेने काय तो श्रेष्ठ झाला ॥ मृगेंद्राहूनि थोर पै ॥२९॥
जैसी राजकन्या परम सुंदर ॥ षंढाप्रति दिधली साचार ॥ हिंसकासी गोदान निर्धार ॥ दिधले तुवा पंडुपुत्रा ॥३०॥
जन्मांधासी दर्पण दाविला ॥ सूकर सिंहासनी बैसविला ॥ येणे जरासंध कपटे मारिला ॥ कोणता केला पुरुषार्थ ॥३१॥
ऐसे बोलोनि पापमती ॥ खड्‌ग गवसवूनि आपुले हाती ॥ म्हणे उठा रे आमुचे सांगाती ॥ जे असाल तितुकेही ॥३२॥
ऐसे बोलता शिशुपाळ ॥ तात्काळ उठिले अवघे खळ ॥ कृष्णद्वेषी परम चांडाळ ॥ अति कोल्हाळ करिती ते ॥३३॥
धर्मे धांवोनि तत्काळ ॥ ह्रदयी कवळिला शिशुपाळ ॥ म्हणे तू आमुचा बंधु केवळ ॥ यज्ञ हा सकळ तुझा असे ॥३४॥
ऋषि तपस्वी वृद्ध राजेंद्र ॥ कृष्ण पूजिता त्यांसी आनंद थोर॥ तूही कृष्णभजनी सादर ॥ अनन्य होई शिशुपाळा ॥३५॥
परम जाणता गंगानंदन ॥ वृद्ध वडील सर्वमान्य ॥ त्याचे आज्ञेने म्या केले पूजन ॥ तू का दूषण ठेविसी ॥३६॥
तुजहूनि जाणते पंडित ॥ कृष्णपूजने ते आनंदत ॥ तुझे ह्रदयी हा अनर्थ ॥ काय म्हणोनि प्रवेशला ॥३७॥
तंव भीष्म यथार्थ बोले वचन ॥ परम नष्ट हा दमघोषनंदन ॥ त्याचे कासया करिसी शांतवन ॥ त्यासी मरण जवळी असे ॥३८॥
का याचे करिसी समाधान ॥ कदा न मानी तुझे वचन ॥ जैसी वस्त्रे भूषणे प्रेतासी पूर्ण ॥ काय लेववून सार्थक ॥३९॥
मतिमंदापुढे ठेविले शास्त्र ॥ षंढाहाती दिधले शस्त्र ॥ मसणी मंडप विचित्र ॥ व्यर्थ जैसे उभारिले ॥४०॥
वायसासी अमृतफळे ॥ की उष्ट्रासी समर्पिले केळे ॥ की रासभाच्या अंगासी लिंपिले ॥ भृगमदाचे उटणे हो ॥४१॥
द्राक्षफळे अर्पिली सूकरा ॥ आदर्श दाविला जन्मांध नरा ॥ की कृमियांसी समर्पिली शर्करा ॥ तैसा या पामरा काय बोध ॥४२॥
भग्नपात्री जीवन ॥ का श्रमावे व्यर्थचि घालून ॥ दुग्धामाजी हरळ रांधून ॥ काय व्यर्थचि जाण पा ॥४३॥
उकिरडां ओतिले सुधारसा ॥ सुमनशेजेवरी निजविली म्हैसा ॥ दुग्धे न्हाणिले वायसा ॥ शुभ्र नव्हे कदापि ॥४४॥
तैसा हा सुबुद्धि न धरी पामर ॥ जैसा तस्कर विटे देखोनि निशाकर ॥ हिंसकासी धर्मशास्त्र साचार ॥ कदा नावडे जाण पा ॥४५॥
आम्ही ज्याचे केले पूजन ॥ त्यासी ह्रदयी ध्यान ईशान ॥ जलजोद्भव सहस्त्रनयन ॥ अनन्यशरण जयासी ॥४६॥
जो जगद्‌गुरु इंदिरावर ॥ जो प्रतापमित्र समरधीर ॥ ऐसा कोण असे पामर ॥ जो पूजा इच्छी त्याआधी ॥४७॥
जो भवगजविदारक पंचानन ॥ सनकदिक ज्यासी शरण ॥ त्यासी आधि पूजिता पूर्ण ॥ का हा दुर्जन दुखावला ॥४८॥
जो अनंतब्रह्मांडनायक ॥ भोगींद्र जाहला ज्याचा तल्पक ॥ तो पुराणपुरुष निष्कलंक ॥ जगद्वंद्य अनादि जो ॥४९॥
हा एवढी आगळीक बोलत ॥ कोठे याने केला पुरुषार्थ ॥ महागज देखता भुंकत ॥ श्वान जेवी अनिवार ॥५०॥
ऐसे बोलता शंतनुकुमर ॥ तो सहदेवासी आवेश दाटला थोर ॥ जैसा का गजांत मृगेंद्र ॥ उभा राहोनि बोले ते वेळी ॥५१॥
आम्ही सभास्थानी निश्चित ॥ यथार्थ पूजिला वैकुंठनाथ ॥ असह्य मानी त्याचे पूर्वज समस्त ॥ चरणातळी माझिया ॥५२॥
जो कृष्णासी निंदी दुर्जन ॥ त्याची जिव्हा घ्राण छेदीन ॥ रासभावरी बैसवून ॥ पिटीन जाण दिगंतरी ॥५३॥
ऐसे सहदेव बोलता आगळे ॥ जयजयकारे देव गर्जले ॥ पुष्पांजुळी वोपिते झाले ॥ माद्रीपुत्रावरी तेधवा ॥५४॥
आकाशी देववाणी गर्जत ॥ धन्य धन्य सहदेव भक्त ॥ नारद म्हणे ऐका समस्त ॥ मोठा अनर्थ होईल आता ॥५५॥
जेणे निंदिला द्वारकानाथ ॥ त्याजवळी आला रे अनर्थ ॥ तो प्रेतप्राय निश्चित ॥ जननी व्यर्थ प्रसवली ॥५६॥
ऐसे ऐकोनि ते वेळा ॥ शिशुपाळ अत्यंत क्षोभला ॥ घेऊनि दुर्जनांचा मेळा ॥ उभा ठाकला संग्रामा ॥५७॥
म्हणे या वेळे पांडव भीम ॥ कृष्णासमवेत करीन भस्म ॥ अवघे खळ निघोनि परम ॥ कोल्हाळ करिती तेधवा ॥५८॥
जैसा दृष्टी देखता राजहंस ॥ एकदांचि कोल्हाळ करिती वायस ॥ युधिष्ठिर म्हणे भीष्मास ॥ कैसे आता करणे जी ॥५९॥
मग बोले गंगाकुमर ॥ तू स्वस्थ राही न सांडी धीर ॥ कैसा तरेन मी सागर ॥ कुंभोद्भवे विचार करावा का ॥६०॥
निद्रिस्थ श्रीकृष्णपंचानन ॥ तववरीच हे जंबुक करिती गर्जन ॥ हा धडधडित कृशान ॥ दुर्जनकानन जाळील पै ॥६१॥
श्रीकृष्णवडवानळावरी एक वेळे ॥ चैद्य उठले तृणाचे पुतळे ॥ शिशुपाळ कर्पूर बळे ॥ पुढे धावतो विझवावया ॥६२॥
याचा परिवार जो सकळी ॥ ही मेणाची जैसी बाहुली ॥ श्रीरंग हा ज्वाळामाळी ॥ भस्म करील क्षणार्धे ॥६३॥
ऐसे ऐकता शिशुपाळ ॥ क्रोधे खवळला जैसा व्याळ ॥ कुशब्द तेचि टाकी गरळ ॥ भीष्मासी समोर लक्षूनिया ॥६४॥
म्हणे रे भीष्मा दुष्टा वृद्धा ॥ परम हीना बुद्धिमंदा ॥ कपटिया आमुची करतोसी निंदा ॥ तुझी जिव्हा का झडेना ॥६५॥
कोणता कृष्णे केला पुरुषार्थ ॥ म्हणोनि जल्पसी सभेआत ॥ पूतना वृद्ध स्त्री मारिली सत्य ॥ म्हणोनि वाढीव बोलसी ॥६६॥
केशी अश्व मारिला देख ॥ काळिया अघासुर दंदशूक ॥ बकासुर पक्षी एक ॥ मारूनि पुरुषार्थी जाहला ॥६७॥
गोवर्धन तरी एक वल्मीक ॥ कपटी म्हणोनि गिळिला पावक ॥ कपटेचि कंस काळयवनादिक ॥ मारिले येणे गोवळे ॥६८॥
तस्करामाजी अतिश्रेष्ठ ॥ जारांमाजी परम वरिष्ठ ॥ कपटी नाटकी परम नष्ट ॥ स्वधर्मभ्रष्ट गोवळा ॥६९॥
अरे भीष्मा तु परम दुर्जन ॥ काशीपतीच्या कन्या नेल्या हिरून ॥ त्यात एके स्त्रीने दिधला प्राण ॥ तुजवरी नपुंसका ॥७०॥
लोकांसी निरोपिसी धर्म ॥ मूढा तूचि करिसी अधर्म ॥ ऐसी निंदा ऐकता भीम ॥ गदा सावरोनि सरसावला ॥७१॥
जैसा केवळ खदिरांगार ॥ तैसे आरक्त दिसती नेत्र ॥ म्हणे हे दुर्जन अपवित्र ॥ चूर्ण करीन गदाघाये ॥७२॥
भीष्मे धरूनि भीमाचा हात ॥ म्हणे क्षण एक राहे तू स्वस्थ ॥ याचे आयुष्य उरले किंचित ॥ जवळी अनर्थ पातला ॥७३॥
शिशुपाळ भीष्मासी म्हणे अवधारी ॥ सोडी भीम येऊ दे मजवरी ॥ जातवेद पतंगासी भस्म करी ॥ तैसे करीन निर्धारे ॥७४॥
कृष्ण भीम अर्जुन ॥ तिघे येऊ दे एकदांचि शस्त्र घेऊन ॥ विलंब करिता षंढ पूर्ण ॥ नाम तुझे निर्धारी ॥७५॥
ऐसी दुष्टोत्तरे बोलत ॥ ती क्षमा करूनि गंगासुत ॥ भीमासी म्हणे ऐक वृत्तांत ॥ पूर्वीचा तुज सांगतो ॥७६॥
दमघोषाची पत्‍नी सात्वती ॥ ते वसुदेवाची भगिनी होय निश्चिती ॥ तिचे उदरी हा पापमती ॥ शिशुपाळ जन्मला ॥७७॥
उपजतांचि बाळ पाहे नयनी ॥ भुजांवरी भुजा दोन्ही ॥ कपाळी नेत्र अवगुणी ॥ हा पापखाणी उपजला ॥७८॥
लोक म्हणती अवचिन्ह ॥ माता म्हणे टाका बाहेरी नेऊन ॥ तो आकाशी बोले देववाणी वचन ॥ न टाकी बाळ सर्वथा ॥७९॥
हा होईल महाभूपती ॥ शिशुपाळ नाम ठेवी याप्रती ॥ माता विस्मित जाहली चित्ती ॥ काय पुढती बोलत ॥८०॥
कोणाचे हाते याचा मृत्य ॥ हे देवदूता वदे निश्चित ॥ तो आणिक प्रतिध्वनि होत ॥ माय ऐकत सादरे ॥८१॥
ज्या पुरुषाचे दृष्टीकरून ॥ दोन भुजा आणि तिजा नयन ॥ खाली पडेल गळोन ॥ यासी मरण त्या हाती ॥८२॥
ऐसी बोलोनि आकाश वाणी ॥ गुप्त राहिली तेचि क्षणी ॥ मग बाळ घेती जाहली जननी ॥ विरूप रूपे चतुर्बाहू ॥८३॥
देशोदेशींचे भूपती ॥ बाळ पाहावयालागी येती ॥ प्रचीत विलोकावया सात्वती ॥ शिशुपाळ देत त्यांपुढे ॥८४॥
बळिभद्र आणि घननीळ ॥ तेही पाहावया आले बाळ ॥ बंधुपुत्र देखता तुंबळ ॥ आनंद झाला सात्वतीते ॥८५॥
शिशुपाळ आणि वक्रदंत ॥ दोघे कृष्णापुढे आले रांगत ॥ कृष्ण दृष्टी पडता अकस्मात ॥ भुजा गळोनि पडियेल्या ॥८६॥
कपाळींचा तिजा नयन ॥ तत्काळचि गेला जिरोन ॥ मातेसी चिंता दारुण ॥ प्राप्त जाहली तेधवा ॥८७॥
मग हरीपुढे पदर पसरून ॥ पितृभगिनी मागे पुत्रदान ॥ म्हणे यासी तू न मारी म्हणोन ॥ भाष देई मजलागी ॥८८॥
श्रीकृष्ण बोले साच वचन ॥ शत अपराध क्षमा करीन ॥ अधिक जाहलिया बोळवीन ॥ मोक्षसदना निर्धारे ॥८९॥
ऐसे बोलता गोविंद ॥ मातेसी जाहला आनंद ॥ म्हणे कासया करील शत अपराध ॥ मग राममुकुंद बोळविले ॥९०॥
यालागी ऐक भीमा निश्चित ॥ त्या शत अपराधांचे होय गणित ॥ यालागी श्रीकृष्ण निवांत ॥ वाट पहात समयाची ॥९१॥
हे शिशुपाळ वक्रदंत ॥ पूर्वीचे दैत्य उन्मत्त ॥ रावण कुंभकर्ण निश्चित ॥ रामावतारी वधिले जे ॥९२॥
येणे पूर्वी येऊनि मिथिलेसी ॥ धावला वरावया सीतेसी ॥ भार्गवचाप नुचले मानसी ॥ परम खेद पावला ॥९३॥
तोचि शिशुपाल पापखाणी ॥ वरावया धावला रुक्मिणी ॥ तेणे पराजय पावला रणी ॥ जरासंधासमवेत ॥९४॥
तो द्वेष धरूनि मनांत ॥ दुर्जन कृष्णनिंदा करीत ॥ तरी शत अपराध आले भरत ॥ जवळी अनर्थ यासी आला ॥९५॥
ऐकता भीष्माचे वचन ॥ क्रोधे धडकला दमघोषनंदन ॥ जैसा स्नेहे शिंपिता कृशान ॥ अधिक अधिक प्रज्वळे ॥९६॥
म्हणे रे बंदीजना नपुंसका ॥ किती रे वाखाणिसी त्या गोरक्षका ॥ जे जे येथे स्तवनासी योग्य देखा ॥ न वाखाणिसी तयांसी ॥९७॥
चोर जार कपटी केवळ ॥ बहुत माजला हा गोपाळ ॥ गोकुळ चौढाळिले सकळ ॥ कपटी अमंगळ नष्ट हा ॥९८॥
जालंधराची पत्‍नी वृंदा सती ॥ येणे ते भगिनी मानिली होती ॥ तिशींच रतला निश्चिती ॥ न भी चित्ती पापाते ॥९९॥
परदारागमनी आणि कपटी ॥ यासमान दुजा नाही सृष्टी ॥ ऐसियाची काय वाखाणिसी गोष्टी ॥ वारंवार मूढा तू ॥१००॥
मग म्हणे उठा अवघेजण ॥ आधी घेऊ या भीष्माचा प्राण ॥ तिलप्राय कुटके करून ॥ येथेंचि याचे टाकावे ॥१॥
याज्ञिक मिळोनि भोवते ॥ यज्ञपशु वधिती मुष्टिघाते ॥ तैसे वधावे या वृद्धाते ॥ येणे आम्हांते निंदिले ॥२॥
तैल तप्त कढईत तावूनि उत्तम ॥ हा जितचि आत घालावा भीष्म ॥ की शस्त्रे तावूनि परम ॥ खंडे याची करावी ॥३॥
मग बोले गंगासुत ॥ बोलिले जो न करी सत्य ॥ त्याचे पूर्वज समस्त ॥ महानरकी पचतील ॥४॥
तुझिया माथ्याचा मुकुट ॥ तो म्यां पदघाते केला पिष्ट ॥ जरी बोलिले वचन स्पष्ट ॥ खरे करूनि दावीसना ॥५॥
भीष्मसिंहापुढे जंबुक समस्त ॥ करिता युद्धाची तुम्ही मात ॥ वज्रधारा धगधगित ॥ तृणेकरूनि खंडे केवी ॥६॥
अजा जयाची जननी ॥ तो सिंहाशी भिडो पाहे रणी ॥ पिपीलिका म्हणे थडक हाणोनी ॥ दिग्गज खाली पाडीन ॥७॥
बळे उडोनि आळिका ॥ विदारूनि मारीन म्हणे विनायका ॥ मशक म्हणे हाणोनि धडका ॥ मेरुमांदार डोलवीन ॥८॥
घुंगरुडाइसे वदन ॥ म्हणे पर्वत सगळा ग्रासीन ॥ पतंग अग्नीसी म्हणे गिळीन ॥ सूड घेईन खांडववनाचा ॥९॥
स्वतंतुसूत्रेकरूनी ॥ ऊर्णनाभि झाकीन म्हणे धरणी ॥ वृश्चिक अभिमान वाहे मनी ॥ ताडूनि फोडीन वज्राते ॥११०॥
की रासभे ब्रीद बांधोन ॥ नारदापुढे मांडिले गायन ॥ की मूषक टवकारून ॥ वासुकी धरू पातला ॥११॥
की सज्ञान पंडितापुढे ॥ बोलावया आली मूढे ॥ की जंबुक आपुले पवाडे ॥ व्याघ्रापुढे दावीत ॥१२॥
मजपुढे काय आदित्य ॥ म्हणवूनि निंदा करी खद्योत ॥ मरणकाळी होय सन्निपात ॥ तैसे तुज जाहले रे ॥१३॥
काळमृत्यूची छाया पडली ॥ मृत्यूवेळ जवळी आली ॥ ऐकोनि शिशुपाळ ते वेळी ॥ अधिकचि आवेशला ॥१४॥
शस्त्र काढूनि वेगेसी ॥ म्हणे कृष्णा ऊठ रे झुंज मजसी ॥ नपुंसका काय बैसलासी ॥ लाज कैसी नुपजे तूते ॥१५॥
तुझे रुसणे समजणे दोन्ही ॥ मी शिशुपाळ तृणप्राय मानी ॥ गोरक्षा तुज अझूनी ॥ लज्जा का रे न वाटे ॥१६॥
उपजोनिया तुवा गोवळा ॥ वृष्णिकुळासी डाग लाविला ॥ तुवा चोरूनि नेली रुक्मिणी वेल्हाळा ॥ ते नवरी माझी निर्धारे ॥१७॥
रुक्मिणी आधी अर्पिली माते ॥ म्या मनींच भोगिले तीते ॥ मग ते प्राप्त जाहली तूते ॥ माझे उच्छिष्ट गुराखिया ॥१८॥
जैसे भोगिले वस्त्र बहुत ॥ ते भाटासी देती भाग्यवंत ॥ तैसी रुक्मिणी म्या भोगिली निश्चित ॥ तुज जे प्राप्त जाहली ॥१९॥
पुष्पहार भोगूनि टाकिला ॥ तो भणगे जैसा उचलूनि नेला ॥ की रावणे चोरूनि नेली जनकबाळा ॥ तैसी रुक्मिणी तुवा नेली ॥१२०॥
शाल्व पवित्र तुजपरीस ॥ कदा नातळे अंबेस ॥ नवरी जे नेमिली आणिकास ॥ ते सर्वथा न पर्णावी ॥२१॥
ज्याचे नावे जे पात्र वाढिले ॥ आणिका नेता ते उच्छिष्ट जाहले ॥ हे धर्माधर्म शास्त्री बोलिले ॥ तुज न कळती कर्मभ्रष्टा ॥२२॥
श्रीकृष्ण म्हणे रे दुर्जना ॥ महानिंदका दुष्टा मलिना ॥ तू अग्रपूजा इच्छितोसी हीना ॥ तरी आतांचि घेई निर्धारे ॥२३॥
ऐसे बोलोनि क्षीराब्धिजारमण ॥ केले सुदर्शनाचे स्मरण ॥ तव अकस्मात येऊन ॥ कृष्णहस्तकी संचरले ॥२४॥
जैसा कल्पांतीचा आदित्य ॥ तैसे सुदर्शन धगधगीत ॥ शिशुपालावरी सोडिले अकस्मात ॥ वैकुंठनाथे तेधवा ॥२५॥

तत्काळ शिशुपाळाचे छेदिले शिर ॥ निराळपंथे उडाले सत्वर ॥ मुखे गर्जना करी थोर ॥ म्या यदुवीर जिंकिला ॥२६॥
शिर मागुते उतरले ॥ ते श्रीकृष्णचरणाजवळी पडिले ॥ अंतर्ज्योति निघाली ते वेळी ॥ कृष्णरूपी प्रवेशली ॥२७॥
बाळसूर्यासारखे तेज अद्‌भुत ॥ ज्योति श्रीकृष्णह्रदयी प्रवेशत ॥ जैसे लवण जळी विरत ॥ की गगनांत नाद जैसा ॥२८॥
सांडुनि जीवदशा संपूर्ण ॥ शिशुपाळ जाहला कृष्ण ॥ त्वपद तत्पदी जाय हारपोन ॥ तैसा लीन जाहला ॥२९॥
की पूर्ण जळी जळबिंदु पडिला ॥ तो माघारा नाही परतला ॥ तैसा शिशुपाळ गोवळा जाहला ॥ नाही उरले वेगळेपण ॥१३०॥
हे वैकुंठीचे द्वारपाळ ॥ जय विजय निर्मळ ॥ सनकादिकी शापिता तत्काळ ॥ दैत्ययोनीत अवतरले ॥३१॥
हेचि हिरण्याक्ष हिरण्यकश्यप जाण ॥ हेचि जाहले रावण कुंभकर्ण ॥ तेचि हे शिशुपाळ वक्रदंत पूर्ण ॥ कृष्णावतारी जन्मले ॥३२॥
परम भक्त शिशुपाळ ॥ बळेंचि हरिरूप जाहला तत्काळ ॥ हातींची वस्त आसडूनि नेत बाळ ॥ तैसेचि केले यथार्थ ॥३३॥
तिसरे जन्मी निश्चिती ॥ कृष्णे दिधली अक्षय मुक्ती ॥ ह्रदयी ठेविली अंतर्ज्योती ॥ महाभक्त म्हणोनि ॥३४॥
असो जाहला जयजयकार ॥ पुष्पवृष्टि वर्षती संभार ॥ दुष्ट पळाले समग्र ॥ वक्रदंतासहित पै ॥३५॥
कौरव अंतरी चिंताक्रांत ॥ म्हणती आमुचे उणे पडिले बहुत ॥ एक आनंदे टाळिया वाजवीत ॥ बरे जाहले म्हणोनिया ॥३६॥
ऐसा शिशुपाळ पावला निजधाम ॥ पार्थाप्रति निरोपी धर्म ॥ म्हणे याचे प्रेत करा भस्म ॥ जातवेदामाझारी ॥३७॥
मग शिशुपाळाचे राज्य होते ॥ ते दिधले त्याच्या पुत्राते ॥ धर्मराजे समस्त रायाते ॥ वस्त्रे अलंकार समर्पिले ॥३८॥
ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र ॥ अवघियांसी गौरवी युधिष्ठिर ॥ पूजामान पावोनि समग्र ॥ गेले नगरा आपुलाले ॥३९॥
अवभृथस्नान केले ॥ तेथे सकळ लोक सुस्नात जाहले ॥ सहपरिवारेंसी ते वेळे ॥ श्रीकृष्ण निघाले द्वारकेसी ॥१४०॥
धर्मासी म्हणे कमलोद्भवपिता ॥ आम्हांसी निरोप देई आता ॥ धर्मे चरणी ठेविला माथा ॥ कंठ जाहला सद्गदित ॥४१॥
धर्मराज प्रेमे स्फुंदत ॥ जा ऐसे न म्हणेचि सत्य ॥ पुढती लौकरी यावे म्हणत ॥ धन्य भक्त धर्मराज ॥४२॥
भीम अर्जुन नकुळ सहदेव ॥ तयांसी पुसत वासुदेव ॥ कुंती द्रौपदी सुभद्रेप्रति माधव ॥ स्नेहआज्ञा मागतसे ॥४३॥
तव ते म्हणती श्रीपती ॥ जेथे पद तुझे उमटती ॥ तेथे आमुचे मस्तक असो निश्चिती ॥ ऐसेचि करी रमावरा ॥४४॥
ह्रदयांतूनि आमुच्या श्रीपती ॥ परता जाऊ नको निश्चिती ॥ ज्या जया भूताकृति भासती ॥ तुझे स्वरूप भासो ते ॥४५॥
श्रीकृष्णासी बोळवूनी ॥ पांडव आले परतोनि सदनी ॥ जागृतिसुषुप्तिस्वप्नी ॥ श्रीकृष्णचिंतनी सादर ॥४६॥
राजसूययज्ञ जाहला समाप्त ॥ द्वारकेसी पावला वैकुंठनाथ ॥ तो पौंड्रक आणि वक्रदंत ॥ वेढा घालिती नगराते ॥४७॥
शिवे दिधले वरविमान ॥ त्यांत वक्रदंत सेनेसहित बैसून ॥ द्वारकेवरी येऊन ॥ युद्ध करिती शस्त्रास्त्री ॥४८॥
तो इतुकियांत पावला जगज्जीवन ॥ तत्काळ सोडिले सुदर्शन ॥ वक्रदंताचे शिर छेदून ॥ आकाश पंथे उडविले ॥४९॥
पौंड्रक सेनेसमवेत ॥ हरीने संहारिला तेथ ॥ ऐसा प्रताप करूनि अद्‌भुत ॥ कृष्णे शस्त्रे ठेविली ॥१५०॥
मुख्य वधिले शिशुपाळ वक्रदंत ॥ इतुकानि आमुचे मनोगत ॥ अवतारकृत्य जाहले यथार्थ ॥ या दोघांसी मारिता ॥५१॥
आम्हांसी शस्त्र धरणे नाही आता ॥ उरले ते दैत्य तत्त्वता ॥ ते सारथ्य करूनि पार्था ॥ त्याहाती पुढे वधावे ॥५२॥
जनमेजयासी सांगे वैशंपायन ॥ धन्य धन्य अवतार श्रीकृष्ण ॥ गोकुळी अपार दैत्य मारून ॥ कंस वधिला मथुरेसी ॥५३॥
जरासंध सतरा वेळा त्रासिला ॥ द्वारका वसविली अवलीला ॥ नरकासुर मारूनि सहस्त्र सोळा ॥ गोपी आणिल्या घरासी ॥५४॥
आता श्रोती व्हावे सावचित्त ॥ पुढे छत्तिसावा अध्याय गोड बहुत ॥ छत्तिसाव्यापासून हरिविजयग्रंथ ॥ संपूर्ण यथार्थ जाहला ॥५५॥
जैसा मुकुटावरी मणी ॥ तैसा छत्तिसाव ऐका श्रवणी ॥ हरिविजय हिरियांची खाणी ॥ सज्जन जोहरी येथींचे ॥५६॥
श्रीधरवरदा जगन्निवासा ॥ ब्रह्मानंदा पंढरीशा ॥ भक्तमानसराजहंसा ॥ पुराणपुरुषा जगद्वंद्य ॥५७॥
इति श्रीहरिविजय ग्रंथ ॥संमत हरिवंशभागवत ॥ चतुर परिसोत प्रेमळ पंडित ॥ पंचत्रिशत्तमाध्याय गोड हा ॥१५८॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ अध्याय ॥३५॥ ओव्या ॥१५८॥

Friday, February 15, 2013

हरिविजय - अध्याय ३४

अध्याय ३४

 श्रीगणेशाय नमः ॥  श्रीकुलदेवतायै नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥
बाप धर्माचा पाठिराखा ॥ कमलोवद्भाचा जनक देखा ॥ प्रेमळांचा निजसखा ॥ सारथि पार्थाचा निर्धारे ॥१॥
द्रौपदीचा पूर्ण कैवारी ॥ नंदाचे घरींचा खिल्लारी ॥ दुर्जनांचा संहार करी सहाकारी साधूंचा ॥२॥
जो क्षीराब्धितनयेचा प्रियकर ॥ आनकदुंदुभीचा कुमर ॥ जो यादवकुळभास्कर ॥ मन्मथशत्रु ध्याय जया ॥३॥
जो काळासही शासनकर्ता ॥ जो हरिहरब्रह्मादिकांसी निर्मिता ॥ जो महामायेचा निजभर्ता ॥ कर्ता हर्ता पाळिता जो ॥४॥
जो क्षीरसिंधूचा जामात ॥ जेणे धर्माचे घरी केले अद्‌भुत ॥ तेणे स्वसंकल्पे उठविले प्रेत ॥ गतकथार्थ इतुका जाहला ॥५॥
गजरे होत राजसूययज्ञ ॥ नित्य उत्तम अन्नसंतर्पण ॥ जेविती ऋत्विज ब्राह्मण ॥ नामस्मरणे गर्जती ॥६॥
जेथे पुरविता भगवान ॥ ते मी काय वर्णू दिव्य अन्न ॥ त्या अन्नाच्या सुवासेकरून ॥ सुरगण लाळ घोटिती ॥७॥
त्या अन्नसुवासा वेधोन ॥ वसंत करी भोवती प्रदक्षिण ॥ नित्य जेविती ऋषिगण ॥ परी वीट न ये सर्वथा ॥८॥
जैसा सोमकांताचा अचळ ॥ तैसा भात शुभ्र निर्मळ ॥ जैसा सुवर्णभाग पीत निखिळ ॥ तैसे वरान्न पडियेले ॥९॥
अमृतास आणिती उणे ॥ ऐसी पंचभक्ष्ये परमान्ने ॥ विप्र जेविति नामस्मरणे ॥ वारंवार गर्जती ॥१०॥
दधिमधुदुग्धघृतसरोवर ॥ शाका सुवासे भरिती अंबर ॥ जेथे पुरविता इंदिरावर ॥ तेथींची गोडी काय वर्णू ॥११॥
तेथे वाढीत याज्ञसेनी ॥ जे कृष्णाची प्रिय भगिनी ॥ जैसी झळके सौदामिनी ॥ तैसी वाढी चपळत्वे ॥१२॥
अन्ने वाढिता निवाडे ॥ उभय हस्तीचे झळकती चुडे ॥ जेविती तयांवरी उजेड पडे ॥ दिव्य रूपडे द्रौपदीचे ॥१३॥
जे सुंदर घनश्यामवर्णा ॥ म्हणोनि द्रौपदीते म्हणती कृष्णा ॥ जे सुभद्रेहुनि आवडे जगज्जीवना ॥ ते पूर्ण अन्नपूर्णा अवतरली ॥१४॥
विशाळभाळी पद्मनेत्री ॥ सुहास्यवदना चारुगात्री ॥ जे द्रुपदराजनिजपुत्री ॥ ख्याती तिची त्रिभुवनी ॥१५॥
कोसकोसपर्यंत ॥ जिचे अंगींचा सुवास धांवत ॥ बोलता हिर्‍याऐसे द्विज झळकत ॥ किंवा विखरत रत्‍नखाणी ॥१६॥
ऐसी ते केवळ अन्नपुर्णा ॥ सदा अन्न वाढीत ब्राह्मणां ॥ जिच्या करपात्रींचिया अन्ना ॥ तुटी नाही कल्पांती ॥१७॥
द्रौपदी कैसी चपळत्वे वाढीत ॥ ते धर्म श्रीकृष्ण विलोकित ॥ कृष्णरंगे रंगली सत्य ॥ श्रम कल्पांती न बाधी ॥१८॥
लक्षानुलक्ष जेविती ब्राह्मण ॥ कृष्णा एकली वाढी आपण ॥ घडी घडी श्रीकृष्णवदन ॥ विलोकी परतोन सप्रेमे ॥१९॥
न्याहाळूनि पाहे हरिरूप सुरेख ॥ तो स्वेदे डवडविलासे मुखमृगांक ॥ मृगमदतिलक सुवासिक ॥ घर्मैकरूनि भिजलासे ॥२०॥
सुरंग विराजे पीतांबर ॥ गळा डोल देती मुक्तहार ॥ कौस्तुभतेजे अंबर ॥ परिपूर्ण कोंदले ॥२१॥
जो गोपीमानसराजहंस ॥ जो स्वानंदक्षीरसागरविलास ॥ जो जगद्वंद्य पुराणपुरुष ॥ तो याज्ञसेनी विलोकी ॥२२॥
जे वैकुंठपीठीचे निधान ॥ जे जलजोद्भवाचे देवतार्चन ॥ जे सनकादिकांचे ह्रदयरत्‍न ॥ प्रिय ठेवणे स्मरारीचे ॥२३॥
जो भक्तपालक दीनबंधु ॥ त्याचा विलोकूनि वदनइंदु ॥ पुढे वाढीत ब्रह्मानंदु ॥ ह्रदयी आनंदु न समाये ॥२४॥
ब्राह्मण जेवूनि उठति ॥ सवेंचि नृपांचा बैसल्या पंक्ती ॥ दुर्योधनादि कौरव दुर्मती ॥ तेही बैसले भोजना ॥२५॥
पांडव आणि जगत्पती ॥ तितुकेचि मागे राहती ॥ वरकड बैसले एकपंक्ती ॥ जेवावयाकारणे ॥२६॥
वाढावयालागी पुढती ॥ सरसावली द्रौपदी सती ॥ जैसा मेघ वर्षोनि मागुती ॥ वर्षाव करी अद्‌भुत ॥२७॥
किंवा अमृतक्षीरसागरी ॥ येती लहरींवर लहरी ॥ तैसी द्रौपदी राजकुमरी ॥ उठाव करी दुसरेने ॥२८॥
जैसे शब्दी नाद निघत ॥ त्यांचा न कळे जैसा अंत ॥ तैसी द्रौपदी सती वाढीत ॥ परी अन्न न सरे पात्रींचे ॥२९॥
जैशा जलदांचिया धारा ॥ वर्षती न कळे अपारा ॥ तैसी ते कृष्णा सुंदरा ॥ वाढी पात्रे असंख्य ॥३०॥
परी क्षणक्षणां परतोन ॥ विलोकी जगज्जीवनाचे वदन ॥ तो आंगींची उटी घर्मैकरून ॥ ठायी ठायी पुसलीसे ॥३१॥
भक्तांचे जे कष्ट सर्व ॥ आपण आंगे सोशी माधव ॥ उणे पडो नेदी केशव ॥ जो दयार्णव जगदात्मा ॥३२॥
सुखरूप वाढी द्रौपदी ॥ श्रम आंगी कदा न बाधी ॥ आंगे सोशी कृपानिधी ॥ कष्ट सर्वही भक्तांचे ॥३३॥
असो द्रौपदी पाहे मागुती ॥ तो अनुपम्य दिसे कृष्णमूर्ती ॥ जिची त्रिभुवनी अगाध कीर्ती ॥ वर्णिता नेति म्हणे वेद ॥३४॥
ब्रह्मीचे तेज गोळा होऊन ॥ हे कृष्णरूप ओतिले सगुण ॥ तो सच्चिदानंदतनु पूर्ण ॥ भक्तजनप्रतिपाळक ॥३५॥
ऐसे वाढिता द्रौपदीस ॥ काय बोले जगन्निवास ॥ बाई आजि बहु भागलीस ॥ प्राणसखये द्रौपदी ॥३६॥
तिचे पृष्ठीवरूनि हात ॥ उतरी कमलोद्भवाचा तात ॥ तो द्रौपदीस आनंद ॥ बहुत मनामाजी न साठवे ॥३७॥
परतोनि पाहे हरीचे वदन ॥ किरीटकुंडले मंडित पूर्ण ॥ सरळ नासिक आकर्ण नयन ॥ अत्यंत वदन सुरेख ॥३८॥
मुकुटाभोवता दाटला धर्म ॥ देखता जाहली सप्रेम ॥ म्हणे मजलागी परब्रह्म ॥ बहुत श्रम पावतसे ॥३९॥

मी काय होऊ उतराई ॥ माझे सांवळे कृष्णाबाई ॥ ऐसे बोलता ते समयी ॥ सद्गद जाहली याज्ञसेनी ॥४०॥
प्रेमे आंग फुगत ॥ दोन्ही उरी तटतटित ॥ बिरडे तुटले अकस्मात ॥ कौरवपंक्तीत वाढिता ॥४१॥
पल्लव जाहला विगलित ॥ वक्षःस्थळ उघडे पडत ॥ आकर्षोनिया कृष्णा होत ॥ घाबरी पाहत चहूंकडे ॥४२॥
शकुनि सुयोधन कर्ण ॥ एकाकडे एक दाविती खूण ॥ नाना विनोद दुर्जन ॥ करिते जाहले तेधवा ॥४३॥
लगबग करिती अवघे ॥ एकासारिखे एक न मागे ॥ म्हणती येथे उभी का गे ॥ अन्न आणि सत्वर ॥४४॥
एक म्हणती उठा रे सकळ ॥ आजि असे अन्नाचा दुकाळ ॥ परम लज्जित वेल्हाळ ॥ मुखकमळ कोमाइले ॥४५॥
नेत्री वाहती अश्रुधारा ॥ भोवती वाट पाहे सुंदरा ॥ म्हणे श्रीरंगा यादवेंद्रा ॥ तुज हे का न कळेचि ॥४६॥
हाक फोडिती अवघेजण ॥ अन्य पदार्थ मागती भिन्न भिन्न ॥ जैसे सहस्त्र व्याघ्र करिता गर्जन ॥ हरिणीचा प्राण जाऊ पाहे ॥४७॥
की आरडता तान्हे बालक ॥ त्यासी ताडिती सहस्त्र वृश्चिक ॥ की क्षत देखोनि बहुत काक ॥ उकरावया धांवती ॥४८॥
की चोहटा पडिले अन्न ॥ तेथे एकदांचि धांवती श्वान ॥ तैसे कौरव चैद्य दुर्जन ॥ नसतेंचि जाण मागती ॥४९॥
एक म्हणे भात आणी ॥ एक म्हणे आजि हरिदिनी ॥ एक म्हणती ऐका हो वहिनी ॥ तुम्हांसी दोन्ही कष्ट पडती ॥५०॥
एक वृक्षावरी धडका हाणिता ॥ डाहळिया डळमळती समस्ता ॥ एक कर्दळीसी पांच गज भिडता ॥ मग तिची अवस्था नुरेचि ॥५१॥
तैसे रजनीमाजी तत्त्वता ॥ पांचाशी सुरतयुद्ध करिता ॥ गात्रे ढिली पडता ॥ शक्ति नाही वाढावया ॥५२॥
ऐसे संकट देखोन ॥ परतोनि विलोकी हरीचे वदन ॥ म्हणे कृष्णा लपावयासी सदन ॥ तुजवांचून नाही कोठे ॥५३॥
तेचि दुरात्मे पापमती ॥ जे भक्तांचे उणे पाहती ॥ द्रौपदीचा सहाकारी जगत्पती ॥ म्हणे नाभी नाभी याज्ञसेनी ॥५४॥
तो यादवेंद्र मनमोहन ॥ द्रौपदीच्या अंतरी प्रवेशोन ॥ भुजावरी भुजा निर्माण ॥ करिता जाहला तये वेळी ॥५५॥
बिरडे घालूनि सत्वर ॥ सवेंचि सरसाविला पदर ॥ टवटविला मुखचंद्र ॥ द्रौपदीचा तेधवा ॥५६॥
बाप भक्त वत्सल कृपानिधी ॥ चतुर्भुज केली द्रौपदी ॥ दुर्जन जे का मंदबुद्धी ॥ अधोवदने पाहती हो ॥५७॥
द्रौपदी आणि कृष्ण ॥ पात्री पात्री भिन्न भिन्न ॥ जे जयांसी पाहिजे अन्न ॥ ते ते तयांसी ओपीत ॥५८॥
उगवता जैसा दिनकर ॥ लाजोनि पळे अंधकार ॥ की विष्णुसहस्त्रनामे दोषसंहार ॥ होय जैसा एकाएकी ॥५९॥
की मस्तकी उर्वी धरिता ॥ सर्षपप्राय भोगिनाथा ॥ की वातात्मजे द्रोणाद्रि आणिता ॥ श्रम सहसा न वाटे ॥६०॥
तैसे द्रौपदीस वाटे जाण ॥ म्हणे किती मागतील दुर्जन ॥ हे त्रिभुवन संपूर्ण ॥ जेवू घालीन एकदांचि ॥६१॥

की शुंभनिशुंभ मारूनी ॥ यशस्वी जाहली भवानी ॥ तैसी विजयी याज्ञसेनी कौरवगर्व निवटूनिया ॥६२॥
की जान्हवीचा होता स्पर्श ॥ एकदांचि विरती सर्व दोष ॥ हरिनाम ऐकता भूतप्रेतांस ॥ उपजे त्रास पळ घेती ॥६३॥
जो जो कोणी मागेल पदार्थ ॥ त्यापुढे टाकी अन्नाचा पर्वत ॥ भीमासी क्रोध दाटला अद्‌भुत ॥ काय बोलत दुर्जनांप्रती ॥६४॥
म्हणे अन्न सांडिता निश्चिती ॥ शिखा उपटोनि देईन हाती ॥ सकळ दुरात्मे खाली पाहती ॥ प्रत्युत्तर न देती कोणीही ॥६५॥
अंतरमलिन ते दुराभिमान ॥ त्यांत बुडाले अवघे दुर्जन ॥ भीमाचा क्रोध देखोन ॥ कोणासी वचन न काढवे ॥६६॥
की चोरट्यांसी मारमारूनी ॥ शुष्क काष्ठें झोडिती रानी ॥ तैसे कौरवे दिसती तेचि क्षणी ॥ तेजहीन दुरात्मे ॥६७॥
की दिव्य देता खोटा होय ॥ की समरी पावे पराजय ॥ तैसे दुरात्मे यादवराये ॥ अपमानिले तेधवा ॥६८॥
भक्त बोलती वेळी ॥ धन्य हे कृष्णा वेल्हाळी ॥ कृष्णे आपणाऐसीच केली ॥ चतुर्भुज प्रत्यक्ष ॥६९॥
हे मंगळदायक भवानी ॥ ईस वर मागा प्रार्थूनी ॥ हे कोपलिया निर्वाणी ॥ कुळक्षय करील तुमचा ॥७०॥
इचे ठायी कल्पिता विपरीत ॥ तरी भस्म व्हाल समस्त ॥ परी ते नायकती उन्मत्त ॥ महापापिष्ठ विषयांध ॥७१॥
असो द्रौपदी गेली घरांत ॥ तिजमागे गेला वैकुंठनाथ ॥ पायी मिठी तेव्हा घालीत ॥ प्रेमे स्फुंदत द्रौपदी ॥७२॥
कुंती पांडव ते वेळे ॥ सदनामाजी प्रवेशले ॥ म्हणती श्रीरंगे माउले ॥ थोर वारिले संकट आजी ॥७३॥
धर्म म्हणे जगन्नाथा ॥ कोणते उपकार आठवू आता ॥ माता पिता भयत्राता ॥ तुजपरता दिसेना ॥७४॥
भीम आणि अर्जुन ॥ स्फुंदस्फुंदोनि करिती रुदन ॥ त्यांसी ह्रदयी धरुनि मधुसूदन ॥ करी समाधान तयांचे ॥७५॥
द्रौपदीसी गहिंवर न सांवरे ॥ नेत्री वाहती जीवनझरे ॥ म्हणे श्रीकृष्णा भुवनसुंदरे ॥ उपकार न विसरे जन्मवरी ॥७६॥
श्रीकृष्णाचे निजकंठी ॥ कुंती येउनि घाली मिठी ॥ म्हणे कृपाळुवा जगजेठी ॥ द्रौपदीसी समजावी ॥७७॥
मग द्रौपदीसी म्हणे चक्रपाणी ॥ वाढिता कष्टलीस गे मायबहिणी ॥ तू सद्‌गुणरत्नांची खाणी ॥ प्राणाहूनी आवडसी ॥७८॥
द्रौपदी बोले वचन ॥ मी कोटिकोटी जन्म घेईन ॥ परी तूंचि बंधु होई पूर्ण ॥ पाठिराखा कैवारी ॥७९॥
ऐसा एक संवत्सर ॥ राजसूययज्ञ होत थोर ॥ नित्य जेविती किती विप्र ॥ लेखा नाही तयांते ॥८०॥
सकळांसी भोजने झालियावरी ॥ पांडवांसहित पूतनारी ॥ कुंती द्रौपदी सुंदरी ॥ पंक्तीसी बैसती आठजण ॥८१॥
कृष्णपंक्तीसी भोजन ॥ ब्रह्मादिकां न घडे पूर्ण ॥ धन्य धन्य पंडुनंदन ॥ जगज्जीवन वश ज्याते ॥८२॥
नित्य ब्राह्मणा होती पंक्ती ॥ स्वये उच्छिष्ट काढी श्रीपती ॥ ज्यासी वेदशास्त्रे वाखाणिती ॥ अगाध कीर्ती अनुपम्य ॥८३॥
ठेवोनिया थोरपणाची प्रौढी ॥ द्वारकाधीश पात्रे काढी ॥ लाहेलाहे तांतडी ॥ पुढती पंक्ती बैसावया ॥८४॥
विद्युल्लताप्राय पीतवसन ॥ सोगा त्याचा वरता खोंवून ॥ कौस्तुभवनमाळा मागे टाकून ॥ उच्छिष्ट काढी तांतडीने ॥८५॥
उच्छिष्टे काढिता जगन्मोहन ॥ ठायी ठायी लेपिले अन्न ॥ अन्नब्रह्मरूप मी पूर्ण ॥ ऐक्यरूप दावीतसे ॥८६॥
एके पंक्तीसी लक्ष ब्राह्मण ॥ ऐशा अमित पंक्ती पूर्ण ॥ कोटिसंख्या होता जाण ॥ स्वर्गघंटा वाजे एकदा ॥८७॥
त्यावरूनि केले गणित ॥ मग धर्मराजा संतोषित ॥ म्हणे श्रीकृष्णा हो तुजप्रीत्यर्थ ॥ विश्वंभरा विश्वेशा ॥८८॥
तो महोत्साह पाहावया जाण ॥ तेथे आला वेदव्यासनंदन ॥ जो योगियांमाजी मुकुटरत्‍न ॥ चंडकिरण दूसरा ॥८९॥
कामक्रोध जेणे जिंकिले ॥ रंभेने नानापरी छळिले ॥ परी अणुमात्र नाही चळले ॥ मन जिंकिले जयाने ॥९०॥
जो चिदंबरींचा निशाकर ॥ की अपरोक्षज्ञानाचा समुद्र ॥ की शांतीचे पूर्ण आगर ॥ सुखे सुखरूप कोंदला ॥९१॥
असो मंडपद्वारी क्षण एक ॥ उभा राहिला श्रीशुक ॥ तो मंडपघसणी होतसे देख ॥ मार्ग न दिसे जावया ॥९२॥
शुक विचारी मनात ॥ धर्म केवळ कृष्णभक्त ॥ येथींचा प्रसाद होईल मज प्राप्त ॥ तरीच सार्थक जन्माचे ॥९३॥
कृष्णजी जेथे उच्छिष्टे काढीत ॥ पडिले पत्रावळीचे पर्वत ॥ शुकयोगींद्र बैसोनि तेथ ॥ उच्छिष्ट शिते वेचीतसे ॥९४॥
मुखी घालिता एक ग्रास ॥ स्वर्गी घणघणी घंटाघोष ॥ कदा न राहे आसमास ॥ गजर विशेष जाहला ॥९५॥
श्रीकृष्णासी धर्मराज बोलत ॥ हे काय जी वर्तले अद्‌भुत ॥ घंटा घणघणी कोण अर्थ ॥ ते सांगा स्वामी यादवेंद्रा ॥९६॥
कोटि ब्राह्मण पंक्तीसी जेविता ॥ एक नाद होय तत्त्वता ॥ आता न राहे वाजता ॥ जगन्नाथा नवल हे ॥९७॥
हरि म्हणे येथे तत्त्वता ॥ जेविला असेल ब्रह्मवेत्ता ॥ ब्रह्मवेत्त्यासी वंदिती माथा ॥ ब्रह्मादिक सहस्त्राक्ष ॥९८॥
ब्राह्मण जे का यातिमात्र ॥ ते एकशतभरी साचार ॥ त्यांतुल्य एक वेदज्ञ विप्र ॥ ग्रंथत्रयी ज्ञान ज्याचे ॥९९॥
वेदज्ञाहूनि शतगुणे बहुत ॥ जो वेदार्थ करणार पंडित ॥ त्याहूनि अनुष्ठानी क्रियावंत ॥ शतगुणे आगळा ॥१००॥
अनुष्ठानी शतगुणे आगळा ॥ एक इंद्रियजित बोलिला ॥ त्या गुणे विष्णुभक्त सत्वाथिला ॥ जो भेदरहित निर्मत्सर ॥१॥
त्याहूनि शतगुणे विशेष शुद्ध ॥ एक जाण पां ब्रह्मविद ॥ ज्याचे दृष्टीस भेदाभेद ॥ जाणपण दिसेना ॥२॥
ऐसा ज्ञानी तुझे घरी ॥ तृप्त झाला आजि निर्धारी ॥ ऐक चौघेजण जाण या पृथ्वीवरी ॥ ब्रह्मज्ञानी अद्‌भुत ॥३॥
कपिल याज्ञवल्क्य शुक ॥ श्रीदत्तात्रेय चौथा देख ॥ जो परिपूर्ण ज्ञानार्क ॥ अत्रितनय अवतरला ॥४॥
धर्म हरिचरण दृढ धरीत ॥ जो येथे जाहला तृप्त ॥ तो मज दाखवावा निश्चित ॥ म्हणवूनि आळ घेतली ॥५॥
मग धर्माचा धरूनि हस्त ॥ वेगे दोघे बाहेर येत ॥ तो रूप पालटूनि व्याससुत ॥ वेगे वेचीत उच्छिष्ट शिते ॥६॥
श्रीहरि म्हणे धर्मा देख ॥ व्यासपुत्र हा महाराज शुक ॥ ऐकता धावूनि निःशंक ॥ चरण धरिले तयाचे ॥७॥
शुक मागे पाहे परतोन ॥ तो उभा देखिला जगन्मोहन ॥ दोघांसी पडिले आलिंगन ॥ प्रेमेकरून सद्गद ॥८॥
सवेंचि धर्मासी भेटला ॥ धर्मे शुकाचा हस्त धरिला ॥ मंडपासी आणूनि पूजिला ॥ बैसविला व्यासापाशी ॥९॥
शुक देखतांचि दृष्टी ॥ आनंदल्या ऋषींच्या कोटी ॥ मग धर्माहाती जगजेठी ॥ पूजन करी शुकाचे ॥११०॥
असो एक संवत्सर लोटला ॥ राजसूययज्ञ संपूर्ण जाहला ॥ तेथींचा वर्णावया सोहळा ॥ शेषही शक्त नव्हेचि ॥११॥
भीष्म निरोपी धर्माते ॥ अहेर अर्पिजे समस्तांते ॥ सकळ बैसवूनि मयसभेते ॥ तेथींची कौतुके दावावी ॥१२॥
मयासुर पांडवांचा मित्र ॥ जो दैत्यांमाजी विधीचा अवतार ॥ तेणे ती सभा रचिली सुंदर ॥ जे अनुपम्य त्रिभुवनी ॥१३॥
तेथे सभा वर्णिली अद्‍भुत ॥ म्हणोनि सभापर्व म्हणती पंडित ॥ जनमेजयासी वैशंपायन सांगत ॥ श्रीभारतग्रंथामाजी ॥१४॥
सभा रचिली ते वेळी ॥ आठही आय साधिले तळी ॥ अष्ट दिक्पाळ महाबळी ॥ पायाचे मूळी स्थापिले ॥१५॥
विद्रुमशिळा आरक्तवर्ण ॥ तेणे पाया आणिला भरून ॥ स्फटिकशिळा शुभ्रवर्ण ॥ त्याची पोवळी लखलखित ॥१६॥
सप्तरंगी पाषाण ॥ चक्रे झळकती आंतून ॥ अंतर्बाह्य देदीप्यमान ॥ पाहता जन विस्मित ॥१७॥
शेषफणांची आकृती ॥ हिरेजडित झळकती ॥ जेवी उगवले गभस्ती ॥ बैसले पंक्ती एकदा ॥१८॥
इंद्रनीळाचे वारण ॥ हिर्‍यांचे द्विज सतेज पूर्ण ॥ ते खालते जडून ॥ त्यावरी मंडप रचियेला ॥१९॥
तळी पद्मरागांचे तोळंबे सबळ ॥ वरी हिर्‍यांचे खांब विशाळ ॥ निळ्यांची उथाळी सुढाळ ॥ तेजाचे कल्लोळ दिसती ॥१२०॥
सुवर्णाचे तुळवट अखंड ॥ माणिकांचे दांडे प्रचंड ॥ गरुडपाचूंच्या किलच्या दृढ ॥ अभेदपणे जडियेल्या ॥२१॥
पेरोज्यांचे उंबरे तळवटी ॥ पुष्कराजांच्या चौकटी ॥ गजास्य जडिले मध्यपाटी ॥ आरक्तवर्ण माणिकांचे ॥२२॥
घोटीव जे मर्गजपाषाण ॥ तेणे साधिले मंडपांगण ॥ वरी कनकवर्ण वृक्ष रेखून ॥ तटस्थ नयन पाहता ॥२३॥
हिर्‍यांच्या मदलसा विशाळ ॥ त्यांवरी मोतियांचे मराळ ॥ वदनी विद्रुमलतेचे किरळ ॥ अतिचपळ दीसती ॥२४॥
नीळरत्‍नांचे शिखी साजिरे ॥ गरुडपाचूंचे कीर बरे ॥ रत्‍नमणियांची सुंदरे ॥ जांबुळे मुखी आकर्षिली ॥२५॥
धन्य मयासुराची करणी ॥ शुक पाचूंचे बोलती क्षणक्षणी ॥ मयूर नाचती आनंदोनी ॥ पुतळ्या खणोखणी नाचती ॥२६॥
प्रत्यक्ष रत्‍नपुतळे बोलती ॥ सभेसी आलिया बैसा म्हणती ॥ एक पुतळे आनंदे गाती ॥ पुरे म्हणता होती तटस्थ ॥२७॥
नवल कर्त्याची करणी ॥ पुढे सेवक वेत्रपाणी ॥ धावा म्हणती सभाजनी ॥ चपळ चरणी धावती ॥२८॥
मेष कुंजर जटिल एकलहरी ॥ आज्ञा होता घेती झुंझारी ॥ टाळ मृदंग वाजता कुसरी ॥ रागोद्धार करिती पै ॥२९॥
घटिकेने घटिका भरता दिवस ॥ एक पुतळे पिटिती ताप्त ॥ देवांगनांची रूपे विशेष ॥ नृत्य करिती संगीत ॥१३०॥
हिर्‍यांच्या स्तंभांतरी ॥ नृसिंहमूर्ती गर्जती हुंकारी ॥ कौस्तुभमणी झळकती एकसरी ॥ स्तंभांप्रति जडियेले ॥३१॥
कोठे जडियेले स्यमंतकमणी ॥ की एकदांचि उगवले तरणी ॥ दिवस किंवा यामिनी ॥ ते स्थानी नसे कोणा ॥३२॥
एकावरी एक शत खण ॥ मंगळतुरे अनुदिन ॥ लेपे वाजविती नवलविंदान ॥ कर्तयाने दाविले ॥३३॥
चपळा तळपती एकसरी ॥ तैशा पताका झळकती अंबरी ॥ कलशजडित नानापरी ॥ हिराविती गगनाते ॥३४॥
गरुडपाचूंची जोती ॥ चित्रशाळा विशाळ दिसती ॥ गोलांगुले सारी उडती ॥ जीव नसता चपळत्वे ॥३५॥
चतुर्दश भुवने नृपांसहित ॥ भिंतीवरी पुतळे रत्‍नजडित ॥ त्यांची जैसी आकृति सत्य ॥ प्रत्यक्ष तैसे काढिले ॥३६॥
नीळरत्‍नांचे वैकुंठ ॥ हिर्‍यांचे कैलासपीठ ॥ पुष्कराजांचे स्पष्ट ॥ केले वरिष्ठ ब्रह्मसदन ॥३७॥
इंद्र अग्नि यम निऋती ॥ वरुण समीर कुबेर मृडानीपती ॥ त्यांच्या तनूची विशेष दीप्ती ॥ प्रत्यक्ष मूर्ति दिक्पाळांच्या ॥३८॥
मित्र रोहिणीवर भूमिसुत ॥ सोमसुत गुरु शुक्र शनीसहित ॥ राहु केतु नवग्रह मूर्तिमंत ॥ पाहता तटस्थ जन होती ॥३९॥
मत्स्य कूर्म वराह नृसिंहमूर्ति ॥ वामन भार्गव राघवाकृती ॥ कृष्ण बौद्ध कल्की अवतारस्थिती ॥ चरित्रासमवेत प्रत्यक्ष पै ॥१४०॥
अतळ सुतळ वितळ ॥ शेष वासुकी फणिपाळ ॥ सप्त पाताळे निर्मळ ॥ लोकासहित रेखिली ॥४१॥
सप्त द्विपे नव खंड ॥ छप्पन्न देश कानने प्रचंडे ॥ सरिता सागर तीर्थे उदंडे ॥ पापसंहारक रेखिली ॥४२॥
शिवचरित्रे विष्णुचरित्रे ॥ शक्तिआख्याने अतिविचित्रे ॥ सोमकांतपाषाणी सरोवरे ॥ सोपाने सुंदर बांधिली ॥४३॥
उष्णोदकाच्या पुष्करिणी ॥ मंगळस्नान करिता जनी ॥ तनूवरी राजकळा ये ते क्षणी ॥ नवल करणी त्याची ॥४४॥
स्फटिकभूमी देखोन ॥ भुलती पाहावया नयन ॥ भरले तेथे जीवन ॥ वस्त्रे सांवरोन चालती ॥४५॥
जेथे भरले असे जळ ॥ ते भूमी ऐसी दिसे केवळ ॥ वस्त्रे सांवरिती अकुशळ ॥ तो सभा सकळ हांसे वरी ॥४६॥
अंतर्बाह्य निर्मळ दिसती ॥ सतेज काश्मीरांच्या भिंती ॥ मार्ग म्हणवूनि बरळ धांवती ॥ तो ते आदळती भिंतीसी ॥४७॥
केली हिर्‍यांची कवाडे कडोविकडी ॥ झांकिली की न कळती उघडी ॥ प्रवेशता संशय पाडी ॥ मग हस्तेकरूनि चांचपती ॥४८॥
सरोवरी सुवर्णकमळी सुवास ॥ हे कळा दाविली विशेष ॥ वरी नीळ्यांचे भ्रमर सावकाश ॥ रुंजी घालिती आनंदे ॥४९॥
हिर्‍यांचे मीन तळपती ॥ पाचूंची कांसवे आंग लपविती ॥ काश्मीरांचे बक धांवती ॥ मत्स्य धरावयाकारणे ॥१५०॥
त्रिभुवनसौंदर्य एकवटले ॥ ते मयसभेवरी ओतिले ॥ ते सभास्थल जेणे विलोकिले ॥ तेणे देखिल ब्रह्मांड ॥५१॥
सभेसी जाता मार्गी भले ॥ चंदनाचे सडे घातले ॥ पुष्पभार विखुरले ॥ मृगमदे लेपिले भित्तिभाग ॥५२॥
सभासौंदर्य हाचि समुद्र ॥ पाहातयांचे चक्षू पोहणार ॥ ते न पावती पैलपार ॥ आलीकडे बुचकळती ॥५३॥
की सभा सागराचे पैलतीर ॥ मनविहंगम चपळ थोर ॥ पाहावया नाही धीर ॥ तेजावर्ती पडे पै ॥५४॥
ज्या ज्या पदार्थाकडे पाहे प्राणी ॥ तिकडेचि चित्त जाय जडोनी ॥ दिवस किंवा आहे रजनी ॥ पाहातयांसी समजेना ॥५५॥
स्वर्ग मृत्यु पाताळ शोधिता ॥ ऐसी सभा नाही तत्त्वता ॥ धन्य तो मयासुर निर्मिता ॥ विरिंचिअंश सत्य पै ॥५६॥
आरक्तपटांचे चांदवे दिसती ॥ मुक्तघोस भोवते शोभती ॥ दिव्य आस्तरणे पसरिली क्षिती ॥ गाद्या झळकती विचित्र ॥५७॥
पिकदाने ऊर्ध्वमुखे ॥ तांबूलपत्रे अति सुरेखे ॥ परिमळ द्रव्ये मृगमदांके ॥ पेट्या झळकती तयांच्या ॥५८॥
असो राजसूययज्ञासी जे जे आले ॥ तितुके मयसभेवरी चढविले ॥ राजे ऋषी सर्व बैसले ॥ ठायी ठायी सन्माने ॥५९॥
धर्मे अहेर सिद्ध केले ॥ वस्त्रांबराचे पर्वत पडिले ॥ मुख्य सिंहासन मध्ये घातले ॥ अग्रपूजा करावया ॥१६०॥
भीष्म म्हणे धर्मराया ॥ आचार्यऋत्विजऋषिवर्या ॥ यथायोग्य पाहोनिया ॥ पूजा समग्र समर्पी ॥६१॥
पुरुषांलागी सप्तभूषणे ॥ तीही वस्त्रे कनकवर्णे ॥ द्वादशांगी अलंकारलेणे ॥ स्त्रियांसी देणे तैसेचि ॥६२॥
अंतर्वसन बाह्यवसन ॥ कंचुकीवरूनि प्रावरण ॥ पंचवसने संपूर्ण ॥ स्त्रियांलागी देई का ॥६३॥
तो धर्म म्हणे कुरुनायका ॥ माझिया जनकाचिया जनका ॥ अग्रपूजेचा अधिकार देखा ॥ कोण मज निरोपी ॥६४॥
भीष्म म्हणे पंडुसुता ॥ या कृष्णाहूनि कोण परता ॥ हे ब्रह्मांड शोधिता ॥ श्रेष्ठ नाही आणिक ॥६५॥
हा जलजोद्भवाचा पिता ॥ अपर्णापति वंदी माथा ॥ शक्रासी शक्रपद हाता ॥ येणे कृपेने दिधले ॥६६॥
जो जगदंकुरकंद ॥ जो त्रिभुवनमंदिरस्तंभ अभेद ॥ जो विश्वंभर ब्रह्मानंद ॥ त्याहूनि थोर कोण असे ॥६७॥
ह्रदयवैकुंठपीठाआंत ॥ विरिंचीचे आराध्यदैवत ॥ अंतःकरणसांबळीमाजी वाहत ॥ सनकादिक अत्यादरे ॥६८॥
हाचि मूळमायेचा भर्ता ॥ हाचि अनंत ब्रह्मांडकर्ता ॥ कैवल्यभांडारीचे ठेवणे तत्त्वतां ॥ सगुण झाले भक्तांलागी ॥६९॥
वेद पुराणे शास्त्र ॥ अर्थ करिती विचित्र ॥ तोचि जाणा राजीवनेत्र ॥ कोमलगात्र श्रीरंग ॥१७०॥
त्वंपद तत्पद असिपद ॥ त्याहूनि वेगळा सुबुद्ध ॥ ऐसा वेदांत गाजे अगाध ॥ तो हा गोविंद ओळखे ॥७१॥
मीमांसक स्थापिती कर्म ॥ आचरावे ज्यालागी धर्म ॥ तो हा जाण पुरुषोत्तम ॥ उच्छिष्ट काढी तुमचे येथे ॥७२॥
नैयायिक म्हणती कर्ता ईश्वर ॥ जीवासी न कळे स्वरूपपार ॥ तोचि जाण श्रीकरधर ॥ सारथी जाण पार्थाचा ॥७३॥
प्रकृतिपुरुषांचा ऐक्यार्थ ॥ सांख्यशास्त्र असे गर्जत ॥ तोचि हा क्षीराब्धिजामात ॥ द्रौपदीचा कैवारी ॥७४॥
व्याकरणशास्त्री सप्त विभक्ती ॥ नानासूत्रे नामे ध्याती ॥ तोचि हा कंसांतक यदुपती ॥ खिल्लारी म्हणती नंदाचा ॥७५॥
अष्टांगयोगादि साधन ॥ पातंजल शास्त्रांचेही कथन ॥ योग साधूनि पाववे चरण ॥ याचेचि जाण पंडुसुता ॥७६॥
शैव यासी म्हणती सदाशिव ॥ वैष्णव भाविती रमाधव ॥ सौर म्हणती सविता स्वयमेव ॥ तो हा माधव जाण पा ॥७७॥
गाणपत्य म्हणती गणेश ॥ तो जाण द्वारकाधीश ॥ शाक्त म्हणती शक्तिविशेष ॥ हरि मायाविलासी हा ॥७८॥
संतांचे ह्रदयजीवन ॥ जो समरधीर दुष्टभंजन ॥ तुमचे दृष्टीसी सोयरा पूर्ण ॥ जगद्‌भूषण दिसतो हा ॥७९॥
दुर्जन दुरात्मे पामर ॥ ते यासी म्हणती कपटी दुराचार ॥ हा जगद्‌गुरु यादवेंद्र ॥ जो मुरहर मधुसूदन ॥१८०॥
त्या श्रीकृष्णासी टाकून ॥ कोणाचे येथे करिसी पूजन ॥ ऐसे बोलता गंगानंदन ॥ सहदेवे पूजा सिद्ध केली ॥८१॥
अग्रोदकाचा भरूनि कलश ॥ षोडशोपचार जे जे विशेष ॥ पूजावया परमपुरुष ॥ धर्मराज सिद्ध जाहला ॥८२॥
सुगंधचंदनपात्र घेऊन ॥ उठावला भीमसेन ॥ सुवासपुष्पमाळा घेऊन ॥ पार्थ उभा आवडीने ॥८३॥
हिर्‍यांची चवकि अढळ ॥ लाहेलाहे घाली नकुळ ॥ वरी क्षीरोदकवस्त्र निर्मळ ॥ घडी घातली तयावरी ॥८४॥
धर्म म्हणे श्रीरंगा यदुकुळटिळका ॥ या चौरंगी बैसा मन्मथजनका ॥ भक्तवत्सला वैकुंठपालका ॥ कर्ममोचका मुरारे ॥८५॥
पुढील कार्य जाणोनि साचार ॥ आग्रह न धरीच श्रीधर ॥ पूजासनी बैसला यादवेंद्र ॥ जयजयकार जाहला ॥८६॥
प्रतिविंध्यादि द्रौपदीचे कुमर ॥ वेगे धरिती छत्रचामर ॥ वाळ्याचे विंझणे सुखकर ॥ दोहींकडे वरिती ॥८७॥
सुभद्रेचा पुत्र अभिमन्य ॥ उभा ठाकला पादुका घेऊन ॥ भीष्म विदुर अवघे भक्तजन ॥ उभे ठाकले आवडीने ॥८८॥
वैष्णव कीर्तने करिती ॥ हरिरंगे आनंदे नाचती ॥ विष्णुचरित्रे अद्‌भुत गाती ॥ टाळ्या वाजविती आनंदे ॥८९॥
विमानी बैसोनि सुरवर ॥ वर्षती सुमनांचे संभार ॥ सनकादिकांचे नेत्र ॥ प्रेमजळे पूर्ण भरले ॥१९०॥
नाना वाद्यांचे गजर होत ॥ बंदीजन यदुवंश वर्णीत ॥ षोडशोपचारे इंदिराकांत ॥ धर्म पूजीत तये वेळी ॥९१॥
हरिचरण धरूनि हाती ॥ प्रेमे क्षाळी धर्मनृपती ॥ जे जान्हवीची उत्पत्ती ॥ सप्तपाताळी होती सिंधुकन्या ॥९२॥
सद्‌गुरूसी शरण जाऊन ॥ ज्ञाने ओळखिजे निर्गुण पूर्ण ॥ परी त्यापरीस गोड सगुण ॥ भक्तांलागी अवतरले ॥९३॥
जो पुराणपुरुष परात्पर ॥ जो आनकदुंदुभीचा कुमर ॥ हरिभजनी वारंवार ॥ ह्रदयी ध्यास जयासी ॥९४॥
केवळ ब्रह्मानंद मुरोन ॥ मूर्ति ओतिली सगुण ॥ श्रुतींसीही न वर्णवे पूर्ण ॥ बुडे मन सहितकरणे ॥९५॥
तो अलंकारमंडित पूर्ण ॥ किरीटकुंडले सुहास्यवदन ॥ कृपाकटाक्षेकरून ॥ निजभक्तां न्याहाळी जो ॥९६॥
कपाळी मृगमदाचा टिळक ॥ आंगी केशरी उटी सुरेख ॥ वैजयंतीचे तेज अधिक ॥ ह्रदयी पदक झळकतसे ॥९७॥
मनोहर पीतवसन ॥ मुक्तलग पदर विराजमान ॥ उत्तरीय वस्त्र झळके पूर्ण ॥ जेवी चपळा निराळी ॥९८॥
चरणी ब्रीदे तोडर रुळती ॥ असुरांवरी गजर करिती ॥ ऐसा तो यादवेंद्र जगत्पती ॥ धर्मराय पूजी तया ॥९९॥
वेदशास्त्रग्रंथ विलोकून ॥ ज्यांचे शिणले सदा नयन ॥ ते कृष्णमूर्ति सदा पाहोन ॥ ब्रह्मानंदे डुल्लती ॥२००॥
जे वैराग्य जाहले तप्त ॥ जे तीर्थे हिंडती विरक्त ॥ तिही देखता द्वारकानाथ ॥ श्रमरहित जाहले ॥१॥
जप तप अनुष्ठान ॥ कर्मकुशल करिती यज्ञदान ॥ जे एकांती गुहा बैसले सेवून ॥ तेही हरिरूप पाहूनि निवाले ॥२॥
हेलावला सौंदर्यसमुद्र ॥ की आनंदाचा लोटला पूर ॥ श्रीकृष्ण देखुनि पूर्णचंद्र ॥ भक्तचकोर वेधले ॥३॥
तो वैकुंठीचा नृपवर ॥ ब्राह्मणदेव अतिउदार ॥ जो ब्रह्मादि देवांचे माहेर ॥ जो भ्रतार इंदिरेचा ॥४॥
कोट्यनुकोती मीनकेतन ॥ नखांवरूनि सांडावे ओवाळून ॥ त्याचे आपुले हाती पूजन ॥ पंडुनंदन करीतसे ॥५॥
वस्त्रे भूषणे अलंकार ॥ अर्पी सोळाही उपचार ॥ करणेंसहित मन सुकुमार ॥ सुमने चरणी समर्पिली ॥६॥
डोळे भरूनि हरि पाहिला ॥ तैसाचि मग ह्रदयी रेखिला ॥ जैसा निवांतस्थानी दीप ठेविला ॥ तो कदापि न हाले ॥७॥
ऐसा पुजिला यादवेंद्र ॥ परी दुर्जन क्षोभले समग्र ॥ आता शिशुपाळाचे शिर ॥ उडवील साचार श्रीकृष्ण ॥८॥
शत शिव्या देईल सभेत ॥ शेवटी तयासी मोक्ष प्राप्त ॥ ते सुरस कथा परिसोत पंडित ॥ अत्यादरेकरूनिया ॥९॥
श्रीधरवरद ब्रह्मानंद ॥ जो अभंग अक्षय अगाध ॥ तो हरिविजयामाजी जगदंकुरकंद ॥ विराजे सदा स्वानंदे ॥२१०॥
इति श्रीहरिविजयग्रंथ संमत हरिवंशभागवत ॥ सदा परिसोत प्रेमळ भक्त ॥ चतुस्त्रिंशतिमोऽध्याय गोड हा ॥२११॥ अध्याय ॥३४॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
 

Thursday, February 14, 2013

हरिविजय - अध्याय ३३

अध्याय ३३ 
 श्रीगणेशाय नमः ॥  श्रीकुलदेवतायै नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥
हृदयडोल्हारा सुंदर ॥ मन बुद्धि चित्त अहंकार ॥ चारी चरण अक्षय परिकर ॥ दृढ जडले सर्वदा ॥१॥
धर्मार्थकाममोक्ष गंभीर ॥ हेचि चहूंकडे लाविले दार ॥ त्यांवरी भाव बैसकार ॥ अतिमवाळ पसरला ॥२॥
त्यावरी प्रेमाची गादी सुघड ॥ पाठीशीं धैर्याचें केलें लोड ॥ वरी आनंदचांदवा अखंड ॥ प्रकाशमय लाविला ॥३॥
ऐसिया डोल्हारियावरी समर्थ ॥ अखंड बैसवूं श्रीगुरुनाथ ॥ जो अवयवरहित अमूर्तमूर्त ॥ श्रीदेवदत्त दयाळू ॥४॥
ब्रह्मानंद मुरोनि समूळ ॥ तें ओतलें गुरुरुप निखळ ॥ जें षड्‌विकाररहित निर्मळ ॥ अचळ अमळ अढळ जें ॥५॥
ऐसा परात्पर सर्वादि निर्गुण ॥ तो द्वारकेमाजी होऊनि सगुण ॥ पांडवपालक नारायण ॥ भक्तकैवारी गोविंद ॥६॥
तेणें लीला दाविली बहुत ॥ बत्तिसावे अध्यायीं गतकथार्थ ॥ सुभद्राहरण करुनि पार्थ ॥ इंद्रप्रस्थासी पैं गेला ॥७॥
कृष्णकृपेचें बळ अभिनव ॥ शक्रप्रस्थी सुखी असती पांडव ॥ पुढें वृत्तांत जो जाहला अपूर्व ॥ तो श्रोते सर्व परिसोत ॥८॥
कमलोद्भवनंदन नारदऋषी ॥ एकदां आला यमसभेसी ॥ सूर्यसुतेम सन्मानूनि तयासी ॥ पूजा केली आदरें ॥९॥
तों यमसभेसी पंडुराज ॥ नारदें देखिला तेजःपुंज ॥ तो पुण्यदेह पावोनि सहज ॥ सुखरुप बैसला ॥१०॥
पंडु म्हणे नारदासी ॥ जरी स्वामी म्रुत्युलोका जासी ॥ तरी शक्रप्रस्थीं मम पुत्रांसी ॥ इतुकीच आज्ञा करावी ॥११॥
जरी कराल राजसूययज्ञ ॥ तरी मी इंद्रसभेसी बैसेन ॥ यम मज बहुत करितो मान ॥ परी माझें मन विटतसे ॥१२॥
येथें जिवांसी जाचणी होत ॥ कुंभीपाकादि यातना बहुत ॥ तेणें खेद पावे सदा चित्त ॥ न घडे परमार्थसाधन ॥१३॥
जरी राजसूययज्ञ पुत्र करी ॥ तरी पुरंदर आपणाशेजारीं ॥ ठाव देऊनि निर्धारीं ॥ नानापरी सुख देत ॥१४॥
मग बोले विरिंचिनंदन ॥ अवश्य धर्मासी मी सांगेन ॥ तत्काळ उठिला तेथून ॥ वीणा वाहून ऊर्ध्वपंथें ॥१५॥
मस्तकीं रुळती जटाभार ॥ गौरवर्णें जैसा शीतकर ॥ यज्ञोपवीत रुळे सुंदर ॥ उत्तरीयवस्त्र झळकतसे ॥१६॥
क्षीरसमुद्रीं धुतलें ॥ तैसें प्रावरणवस्त्र दिव्य शोभलें ॥ द्वादश टिळे सतेज मिरवले ॥ सिद्धपादुका सतेज युगुळीं ॥१७॥
दिव्य गंधीं दिव्य सुमनीं ॥ जो सदा पूजिजे देवगणीं ॥ ऐसा महाराज नारदमुणी ॥ इंद्रप्रस्थासी पैं आला ॥१८॥
धर्में देखिला नारदमुनी ॥ साष्टांग नमिला प्रेमेंकरुनि ॥ दिव्य सिंहासनीं बैसवूनी ॥ षोडशोपचारें पूजिला ॥१९॥
जोडूनियां दोन्हीं कर ॥ धर्म उभा राहिला समोर ॥ म्हणे आजि भाग्य थोर ॥ दृष्टीं देखिले नारदमुनि ॥२०॥
नारद म्हणे ते वेळां ॥ मज पंडुराज स्वर्गीं भेटला ॥ तेणें निरोप तुम्हांसी सांगितला ॥ राजसूययज्ञ करा वेगें ॥२१॥
त्या पुण्येंकरुनि सहज ॥ शक्राशेजारीं बैसे पंडुराज ॥ तुम्हीं पुत्र त्याचे तेजःपुंज ॥ करावें काज एवढें ॥२२॥
ऐसें धर्मरायासी सांगून ॥ ऊर्ध्वपंथें गेला ब्रह्मनंदन ॥ धर्मराजें बंधु बोलावून ॥ विचारासी बैसले ॥२३॥
म्हणे सुफळ न होतां पितृवचन ॥ व्यर्थ काय वांचोन ॥ त्याचें वृथा गेलें धर्मदान ॥ तपाचरण कायसें त्याचें ॥२४॥
वृथा गेला पितृवचनार्थ ॥ तो पुत्र नव्हे प्रत्यक्ष जंत ॥ तो वांचूनि भूभार व्यर्थ ॥ अनुपकारी अभागी ॥२५॥
पितृवचनीं उपजे त्रास ॥ सद्‌गुरुशीं करी द्वेष ॥ कुशब्द बोले मातेस ॥ तो अल्पायुषी जाणिजे ॥२६॥
भक्त देखतां करी उपहास ॥ साधूसी लावी नसते दोष ॥ सद्‌गुरुनि म्हणे तोच विशेष ॥ तो नर अल्पायुषी जाणिजे ॥२७॥
सत्पुरुषांची करी निंदा ॥ अपमानी जो ब्रह्मवृंदा ॥ विद्याबळें प्रवर्ते वादा ॥ तो नर अल्पायुषी जाणिजे ॥२८॥
निंदी सदा तीर्थक्षेत्रें ॥ असन्मानी हरिहरचरित्रें ॥ सर्वदा निंदी वेदपुराणशास्त्रें ॥ तो नर अल्पायुषी जाणिजे ॥२९॥
कायावाचामनें ॥ परपीडा हिंसा करणें ॥ भूतद्रोह करी जारण मारणें ॥ तो अल्पायुषी जाणिजे ॥३०॥
निंदी महापुरुषांचे ग्रंथ ॥ नसतेच काढी कुतर्क अर्थ ॥ विद्यामदें उन्मत्त ॥ त्यासी अधःपात सुटेना ॥३१॥
मी विष्णुभक्त आहें मोठा ॥ म्हणवूनि निंदी नीलकंठा ॥ तपस्वी देखोनि करी चेष्टा ॥ त्यासी अधःपात सुटेना ॥३२॥
श्रीहरीचें गुणकीर्तन ॥ जो अव्हेरी न करी श्रवण ॥ टाकी विष्णुभक्तां उच्छेदून ॥ त्यासी अधःपात सुटेना ॥३३॥
मी शिवभक्त अतिनिर्मळ ॥ जो विष्णुनिंदा करी चांडाळ ॥ नसते कुमार्ग स्थापी खळ ॥ त्यासी अधःपात सुटेना ॥३४॥
होतां साधूंचा अपमान ॥ संतोष वाटे मनांतून ॥ करी वृद्धांचें मानखंडण ॥ त्यासी अधःपात सुटेना ॥३५॥
सभेमाजी दुरुक्ती बोले ॥ जेणें भल्याचें हृदय उले ॥ जठर विष्ठेनें सदा माखलें ॥ त्यासी अधःपात सुटेना ॥३६॥

निर्नासिक आरसा न पाहे ॥ तोंवरी रुपाचा अभिमान वाहे ॥ म्हणे माझ्या तुलना न ये ॥ रतिवराही पाहतां ॥३७॥
मी एक जाणता सर्वज्ञ ॥ ऐसा सदा धडके अभिमान ॥ सकळ मूर्खांहूनि नीच पूर्ण ॥ कर्में करी त्यांतुल्य ॥३८॥
असोत हे आतां बोल ॥ जो पितृवचन न करी सुफळ ॥ तो अभागी केवळ ॥ महाखळ जाणावा ॥३९॥
नारदें सांगितलें येऊन ॥ कीं करावा राजसूयज्ञ ॥ तों बोलिले भीमार्जुन ॥ उत्तम वचन तें ऐका ॥४०॥
पृथ्वीचे राजे जिंकोन ॥ द्रव्य आणावें बळेंकरुन ॥ तरी सिद्धी पावेल सकळ यज्ञ ॥ बहुत कठिण कार्य दिसे ॥४१॥
तरी द्वारकानाथ श्रीकृष्ण ॥ जो अनाकदुंदुभिहृदयरत्‍न ॥ तो जगत्‌गुरु आलियाविण ॥ कार्यसिद्धि नव्हेचि ॥४२॥
मग श्रीकृष्णासी दिव्य पत्र ॥ पाठवी धर्मराज पंडुपुत्र ॥ दूत पाठविले सत्वर ॥ द्वारकाधीश बोलवावया ॥४३॥
तों जरासंधाचे बंदिशाळेप्रती ॥ पडिले बावीस सहस्त्र नृपती ॥ तिंहीं पत्र लिहिलें श्रीहरीप्रती ॥ आम्हांसी जगत्पति सोडवीं ॥४४॥
दोन्हीकडूनि आलीं पत्रें ॥ तीं स्वयें वाचिलीं वारिजनेत्रें ॥ मग काय केलें स्मरारिमित्रें ॥ तें विचित्र परिसा पां ॥४५॥

मनीं विचारी कमलोद्भवपिता ॥ आधीं जावें शक्रप्रस्था ॥ भेटूनि यावें पंडुसुतां ॥ कार्य तत्त्वतां साधावें ॥४६॥
तों इकडे धर्में काय केलें ॥ चहूं दिशांप्रति ते वेळे ॥ चौघे बंधु पाठविले ॥ राजयांप्रति जिंकावया ॥४७॥
सैन्य अपार मिळवून ॥ उत्तर दिशेशी गेला अर्जुन ॥ तेणें सकळ राजे जिंकोन ॥ द्रव्य अपार आणिलें ॥४८॥
पूर्वेसी पाठविला भीम ॥ तेणें थोर केला पराक्रम ॥ राजे जिंकोनि बळोत्तम ॥ द्रव्य आणिलें तेधवां ॥४९॥
दक्षिणेसी पाठविला सहदेव ॥ तेणें पुरुषार्थ करुनि अपूर्व ॥ भूपति जिंकोनियां सर्व ॥ आणिलें द्रव्य तेधवां ॥५०॥
पश्चिमेसी पाठविला नकुळ तेणें ॥ नृपति जिंकोनियां सकळ ॥ द्वारकेसी आला प्रबळ ॥ सैन्यासहित तेधवां ॥५१॥
नगराबाहेर राहोन ॥ हरीसी पत्र पाठविलें लिहोन ॥ माथाम धर्माची मुद्रिका करुन ॥ दूताहातीं धाडिलें ॥५२॥
श्रीरंगें पत्र उकलिलें देखा ॥ तों धर्माचा असे मस्तकीं शिक्का ॥ श्रीकृष्णें वंदिलें मस्तका ॥ हृदयीं धरिलें सप्रेम ॥५३॥
म्हणे मी अजित निर्गुण ॥ परी मज भक्तीं जिंकिलें पूर्ण ॥ मी सदा तयांआधीन ॥ त्यांचें वचन मानीत मी ॥५४॥
जे दाविती धनविद्यातपबळ ॥ त्यांसी नातुडे तमालनीळ ॥ मी भक्तांआधीन सदाकाळ ॥ जे प्रेमळ अंतरींचे ॥५५॥
अनंत जन्म तप केलें ॥ पांडवीं पूर्वींच मज जिंकिलें ॥ हरीनें द्रव्य अपार ते वेळे ॥ आणूनि दिधलें माद्रीसुता ॥५६॥
द्वारकेबाहेर येऊनि गोपाळ ॥ नकुळा भेटला तात्काळ ॥ नकुळें दृढ धरिलें पदकमळ ॥ जगद्वंद्याचें तेधवां ॥५७॥
नयनींचें अश्रुजीवन ॥ तेणें प्रक्षाळिले कृष्णचरण ॥ कंठ दाटला प्रेमेंकरुन ॥ जगज्जीवन हृदयीं धरी ॥५८॥
नकुळ म्हणे श्रीकरधरा ॥ ब्रह्मांडनायका भुवनसुंदरा ॥ कंसातका मधुसंहारा ॥ समरधीरा गोविंदा ॥५९॥
तुझा मी दासानुदास विश्वंभरा ॥ म्यां पत्राचे शिरीं केली मुद्रा ॥ विरिंचीजनका प्रतापरुद्रा ॥ अन्याय क्षमा करीं हा ॥६०॥
श्रीरंग म्हणे सखया ऐक ॥ तुम्हीं निजप्रेम देऊनि अलौकिक ॥ मज विकत घेतलें देख ॥ सत्य सत्य त्रिवाचा ॥६१॥
नकुळ द्वारकेमाजी नेला ॥ दिव्य वस्त्राभरणीं गौरविला ॥ द्रव्य अपार देत ते वेळां ॥ जें भोगींद्रासी न गणवेचि ॥६२॥
नकुळासी म्हणे राजीवनेत्र ॥ मजही धर्में धाडिलें पत्र ॥ मीही आतां येतों सत्वर ॥ पुढें जाय तूं वेगेंसीं ॥६३॥
आज्ञा घेऊनि माद्रीसुत ॥ इंद्रप्रस्थासी आला त्वरित ॥ धर्मासी वंदूनि समस्त ॥ वृत्तांत सांगे द्वारकेचा ॥६४॥
सद्गदित जाहला धर्म ॥ म्हणे आमचा ऋणी पुरुषोत्तम ॥ तंव तो विश्वमनोभिराम ॥ येता जाहला शक्रप्रस्थासी ॥६५॥
पुढें जाऊनि धर्मराजें ॥ वंदिलीं हरीचीं चरणांबुजें ॥ वर्तमान जाहलें तें सहजें ॥ सर्व कथिलें हरीप्रति ॥६६॥
एक जरासंध वेगळा करुन ॥ सर्व राजे जिंकिले पूर्ण ॥ मग बोले कंसप्राणहरण ॥ तरी यज्ञ कैसा होईल ॥६७॥
जरासंध परम सबळ ॥ मथुरेसी धरिला सतरा वेळ ॥ परी त्याच्या मरणाचा काळ ॥ समीप असे यावरी ॥६८॥
मग भीम आणि अर्जुन ॥ संगें घेऊनि जगज्जीवन ॥ सवेंचि त्रिवर्ग निघोन ॥ येते जाहलें मागधपुरा ॥६९॥
दुर्ग ढांसळूनि बळें ॥ आडमार्गें ग्रामांत गेलें ॥ तों भेरी निशाण देखिलें ॥ भीमें फोडिलें हाणोनि ॥७०॥
ब्राह्मणवेष तिघीं धरिले ॥ जरासंधाचे मंदिरासी गेले ॥ तों बळिहरण टाकावया वेळे ॥ बाहेर आला जरासंध ॥७१॥
तों देखिले तिघे ब्राह्मण ॥ जरासंध करी तयांसी नमन ॥ तंव ते न बोलती धरिलें मौन ॥ आशीर्वचन न देती ॥७२॥
जरासंधाचे यज्ञशाळेंत जाऊन ॥ मौनें बैसले तिघे जण ॥ राजा म्हणे कैसे ब्राह्मण ॥ कांहीं वचन न बोलती ॥७३॥
जरासंध म्हणे द्विज हो सांगा ॥ काय इच्छा असेल तें मागा ॥ हरि म्हणे युद्धभिक्षा देईं वेगा ॥ तिघांमधूनि एकाशीं ॥७४॥

जरासंध पाहे हस्त विलोकून ॥ तों देखे गोधांगुळीचिन्ह ॥ म्हणे हे नव्हेति ब्राह्मण ॥ महाक्षत्रिय आहेती ॥७५॥
जरासंध बोले वचन ॥ म्यां भिक्षा दिधली तुम्हांलागून ॥ परी तुम्ही तिघेजण ॥ आहां कोण सांगा तें ॥७६॥
मग स्वरुपें प्रगटविलीं तिघां जणीं ॥ तों भीम अर्जुन चक्रपाणी ॥ जरासंध हांसोनी ॥ काय बोले तेधवां ॥७७॥
हा गोवळा कपटी कंसारी ॥ ह्याशीं मी तों युद्ध न करीं ॥ अर्जुनही पाहतां समरीं ॥ दृष्टीं माझे भरेना ॥७८॥
कांहीं भीम तगेल मजशीं ॥ मी युद्ध करीन तयाशी ॥ मग नगरबाह्यप्रदेशीं ॥ चौघेजण चालिले ॥७९॥
युद्धभूमिका नीट करुन ॥ जरासंध आणि भीमसेन ॥ उभे ठाकले गदा पडताळून ॥ गगनीं सुरगण पाहती ॥८०॥
गदा खणखणां वाजती ॥बळें उद्भट हांका देती ॥ निराळीं प्रतिशब्द उठती ॥ दुमदुमिती देवयानें ॥८१॥
चक्रकार उडया घेती ॥ वर्मी गदाघाय हाणितीं ॥ सिंहावरी सिंह लोटती ॥ तैसे झगटती एकमेकां ॥८२॥
करुनि चक्रकार मंडळ ॥ तितुक्यांत युद्ध करिती कल्लोळ ॥ नऊ सहस्त्र नागांचें बळ ॥ दोघांसही समानचि ॥८३॥
जैसे मेरु आणि मांदार ॥ तैसे सबळ दोघे शूर ॥ कीं पूर्वीं शक्रसुत आणि सूर्यकुमर ॥ अलोट जैसे भीडती ॥८४॥
एकीकडे चमक दावूनी ॥ सवेंचि गदा हाणिती फिरोनी ॥ सर्वांग चूर होऊनी ॥ छिन्न भिन्न जाहलें ॥८५॥
वीरश्रीमदें माजले जेव्हां ॥ शरीरव्यथा नाठवे तेव्हां ॥ पार्थ आणि रुक्मिणीधवा ॥ अति आश्चर्य वाटत ॥८६॥
नव दिवस नव रात्री ॥ दोघेही ढळती वीर क्षत्री ॥ दोघे धांवतां दणाणे धरित्री ॥ उठे अंबरीं प्रतिशब्द ॥८७॥
अंतरीं विचारी क्षीराब्धिजावर ॥ जरासंध हा अनिवार ॥ भीमासी संकेतें सर्वेश्वर ॥ दाविता झाला तेधवां ॥८८॥
तृणकाडी हातीं धरुनी ॥ भीमासी दाविली चिरोनी ॥ धर्मानुजें तोचि संकेत जाणूनी ॥ तैसेंचि केलें तेधवां ॥८९॥
जरासंध बळें धरिला ॥ पायांतळीं घालूनि चिरिला ॥ दूरी भिरकावूनि दीधला ॥ परी सांधा जडला पुनरपि ॥९०॥
मागुती हांक देऊनि जरासंध ॥ भीमाशीं भिडे सुबद्ध ॥ सवेंचि संकेत दावी गोविंद ॥ धड विषम टाकीं कां ॥९१॥
मागुती भीमें उभा चिरिला ॥ एक भाग दक्षिणेकडे टाकिला ॥ दुजा उत्तरेकडे भिरकाविला ॥ प्राणासी मुकला जरासंध ॥९२॥
जाहला एकचि जयजयकार ॥ सुर वर्षती सुमनसंभार ॥ विजयी जाहला पंडुकुमर ॥ पार्थयदुवीर भेटती ॥९३॥
बंदिशाळा फोडिली तये वेळे ॥ बावीस सहस्त्र राजे सोदविले ॥ तितुकेही स्वस्थळा पाठविले ॥ वस्त्रें भूषणें देऊनियां ॥९४॥
राजभांडारीं द्रव्य असंख्यात ॥ तें इंद्रप्रस्था नेलें समस्त ॥ सहदेव जरासंधाचा सुत ॥ त्यासी राज्य दीधलें ॥९५॥
ऐसा पुरुषार्थ करुनी ॥ शक्रप्रस्था आले परतोनी ॥ द्वारकेसी गेला शारंगपाणी ॥ रथीं बैसोनि तेधवां ॥९६॥
ऐसे दिवस कांहीं लोटले ॥ धर्मराजा बंधूंप्रति बोले ॥ हें करभारद्रव्य आणिलें ॥ याचें सार्थक करावें ॥९७॥
पडिले द्रव्याचे पर्वत ॥ सहस्त्र गज भरुनि वेंचिलें नित्य ॥ तरी सहस्त्र वर्षेंपर्यंत ॥ द्रव्य न सरे सर्वथा ॥९८॥
सर्व सामग्री सिद्ध जाहली ॥ याग आरंभावा या वेळीं ॥ आप्त सोयिरे सुहृद सकळी ॥ पाचारावे यज्ञातें ॥९९॥
पाचारावे ब्राह्मण समस्त ॥ जे शापानुग्रहसमर्थ ॥ वेदोनारायण साक्षात ॥ नांदे हृदयीं जयांच्या ॥१००॥
सप्तपुर्‍या तीर्थें अगाधें ॥ जेथें वसती ब्रह्मवृंदें ॥ जे वेदांतज्ञानी ब्रह्मानंदें ॥ निजसुखें डुल्लती ॥१॥
शाण्णव कुळींचे भूपाळ ॥ आप्त सोयरे द्रुपदादि सकळ ॥ विराटादि महानृपाळ ॥ यज्ञालागीं पाचारा ॥२॥
द्वारकेसी आधीं पाठवावे दूत ॥ जगद्वंद्य आमुचें कुळदैवत ॥ तो स्वामी श्रीकृष्णनाथ ॥ रुक्मिणीसहित पाचारा ॥३॥
द्रोणाचार्य कृपाचार्य ॥ धृतराष्ट्र भीष्मादि महाआर्य ॥ जे केवळ ज्ञानसूर्य ॥ ते पाचारा आधीं येथें ॥४॥
दुर्योधनादि बंधु सर्व ॥ पाचारावे ते कौरव ॥ महाज्ञानी कृपार्णव ॥ आधीं येथें बोलवावा ॥५॥
ऐसी आज्ञा देतां धर्मभूपती ॥ लक्षानुलक्ष दूत धांवती ॥ धर्माची आज्ञा सर्वां सांगती ॥ नृप निघती वेगेंसीं ॥६॥
तों दैव उदेलें अद्‌भुत ॥ दूत न पाठवितांची अकस्मात ॥ निजभारेंसी वैकुंठनाथ ॥ नगराजवळी पातला ॥७॥
दूत धांवत आले धर्माजवळी ॥ सांगती जवळी आले वनमाळी ॥ कुंजरभेरी गर्जती निराळीं ॥ प्रतिशब्द गगनीं न समाये ॥८॥
ऐकतां धर्मराजा गहिंवरला ॥ दूत म्यां अजूनि नाहीं धाडिला ॥ अंतर ओळखोनि धांविन्नला ॥ स्वामी माझा मजलागीं ॥९॥
एक प्रेमें धरितां हरिपायीं ॥ मुळेंविण येतो लवलाहीं ॥ माझ्या भाग्यासी अंत नाहीं ॥ आला जांवई भीमकाचा ॥११०॥
बंधूंसहित धर्मराव ॥ नगराबाहेरी घेतसे धांव ॥ तों सेनेसहित इंदिराधव ॥ पंदुपुत्रीं देखिला ॥११॥
सवें सोळा सहस्त्र कामिनी ॥ मुख्य रुक्मिणी विश्वजननी ॥ छपन्न कोटी यादव श्रेणी ॥ तितुक्यांच्या कामिनी आलिया ॥१२॥
एक लक्ष साठ सहस्त्र कुमर ॥ कन्या स्नुषा आलिया समग्र ॥ चौदा सहस्त्र भेरी प्रचंद थोर ॥ गजपृष्ठावरी धडकती ॥१३॥
गज तुरंग पदाति रथ ॥ अनुपम अलंकारें मंडित ॥ ध्वज अपार लखलखित ॥ जेवीं पुकष्‍रीं सौदामिनी ॥१४॥
मित्राऐसीं शतपत्रें ॥ चंद्रमंडळातुल्य तळपती छत्रें ॥ नीळरक्तवर्ण विचित्रें ॥ संख्यारहित दिसती ॥१५॥
कुंचे चामरें झळकती ॥ गज महानादें किंकाटती ॥ हिर जडिले दांतोदांतीं ॥ कर्णीं डुल्लती मुक्तघोंस ॥१६॥
रत्‍नजडित पाखरा सुरेख ॥ घंटा गर्जती अधोमुख ॥ मग पाहतां ते कृष्णउपासक ॥ हरिनामें किंकाटती ॥१७॥
अतिरथी उद्धट वीर ॥ पाठीसीं चालती कृष्णकुमर ॥ महारणपंडित धनुर्धर ॥ प्रचंड वीर हरीचे ॥१८॥
गजस्कंधी बैसोनि बंदीजन ॥ हरिप्रताप वाखाणिती गर्जोन ॥ पुढें कनकवेत्रधारी धांवोन ॥ वाव करिती चालावया ॥१९॥
कृष्णाभोंवते राजे घनदाट ॥ आदळती मुकुटांसी मुकुट ॥ ऐसा द्वारकानाथ वरिष्ठ ॥ धर्मराजें देखिला ॥१२०॥
पांचही जणांसी ते काळीं ॥ क्षेम देत वनमाळी ॥ धर्में हरीचे अंघ्रिकमळीं ॥ मस्तक ठेविला आदरें ॥२१॥
हरि म्हणे तूं दीक्षित सहजीं ॥ तुझीच पूजा करावी आजी ॥ धर्में श्रीरंग नगरामाजीं ॥ मंदिरासी आणिला ॥२२॥
चौदा सहस्त्र मत्त वारण ॥ आणिल द्रव्य अलंकार भरोन ॥ नानारत्‍नवस्त्रीं पंडुनंदन ॥ द्वारकाधीश पूजिला ॥२३॥
तों सकळ देशींचे नृपवर ॥ घेऊनि पातले करभार ॥ अठ्ठयायशीं सहस्त्र ऋषीश्वर ॥ शिष्यांसहित पातले ॥२४॥
जरासंधाचे बंदी पडले ॥ बावीससहस्त्र राजे सोडविले ॥ तितुकेही यज्ञ पाहावया आले ॥ करभार घेऊनियां ॥२५॥
धनाच्या राशी अपार ॥ स्वर्गाहूनि पाठवी कुबेर ॥ त्रिदशांसहित सुरेश्वर ॥ विमानारुढ पाहतसे ॥२६॥
नव ग्रह सुप्रसन्न ॥ जयलाभ उभे कर जोडून ॥ श्रीरामभक्त बिभीषण ॥ आनंद पाहों पातला ॥२७॥
सप्त द्वीपें छप्पन्न देश ॥ नव खंडींचे नराधीश ॥ भीष्मद्रोणादि कौरवेश ॥ पुत्रांसहित धृतराष्ट्र ॥२८॥
जे जे आले नरेश्वर ॥ त्यांसी धर्में जावोनि समोर ॥ बहुत करोनियां आदर ॥ इंद्रप्रस्थासी आणिलें ॥२९॥
कोटि शिल्पकारीं अगोदर ॥ चंदनसदनें निर्मिलीं विचित्र ॥ सकळ ऋषिराजयांसी पवित्र ॥ तींच राहावया दिधलीं ॥१३०॥
धर्म म्हणे सहदेवातें ॥ धौम्य पुरोहिताचेनि अनुमतें ॥ जे जे सामग्री लागे यज्ञातें ॥ ते ते सिद्ध करीं सत्वर ॥३१॥
मग भीष्म आणि जगन्मोहन ॥ एकासनीं बैसवून ॥ कृष्णपदीं मस्तक ठेवून ॥ धर्मराज विनवीतसे ॥३२॥
जें जें मनीं इच्छिलें ॥ तें तें हरीनें पुरविलें ॥ सकळ राजे भृत्य जाहले ॥ द्रव्य संचलें असंभाव्य ॥३३॥
तरी येथें कार्य वांटिल्याविण ॥ सिद्धी न पावे कदा यज्ञ ॥ तरी कोणा योग्य कोण कारण ॥ तूं नारायण जाणसी ॥३४॥
आम्ही नेणतीं लेंकुरें श्रीरंगा ॥ आम्हांसही एक कार्य सांगा ॥ कंसांतका भक्तभवभंगा ॥ आज्ञा करावी सत्वर ॥३५॥
मग बोले श्रीकरधर ॥ मी चतुर नव्हें नृपवर ॥ नंदाचा गोरक्षक साचार ॥ मज हा विचार समजेना ॥३६॥
यावरी अर्जुनाचा सारथि होय ॥ हें तों जाणे भुवनत्रय ॥ धर्में धरिले दृढ पाय ॥ तरी मी काय करुं आतां ॥३७॥
हरि म्हणे मी एक कार्य करीन ॥ द्विजांचीं चरणांबुजें प्रक्षाळीन ॥ आणि उच्छिष्ट पात्रें काढीन ॥ इतुकें कारण मज दीजे ॥३८॥
ऋषींसी लागतील जे जे उपचार ॥ ते ते पुरवावे समग्र ॥ द्रोणआज्ञेनें द्रोणपुत्र ॥ अश्वत्थामा करो हें ॥३९॥
द्रव्य लागेल जें अपार ॥ तें विदुरें द्यावें समग्र ॥ राजपूजनासी चतुर ॥ संजय शिष्य व्यासाचा ॥१४०॥
अपार आल्या राजसेना ॥ त्यांसी भक्ष्यभोज्याची विचारणा ॥ हें कार्य सांगा दुःशासना ॥ अवश्य म्हणे धर्मराज ॥४१॥
ब्राह्मणांसी दक्षिणा सहज ॥ देईल द्रोणाचार्य महाराज ॥ जो प्रतापसूर्य तेजःपुंज ॥ वेदज्ञ आणि रणपंडित ॥४२॥
आणिताती राजे बहु धनें ॥ तीं दृष्टीसी पाहोनि दुर्योधनें ॥ मग भांडारीं ठेविजे यत्‍नें ॥ अवश्य म्हणे पंडुपुत्र ॥४३॥
यज्ञासी येतील नाना विघ्नें ॥ तितुकीं निवारावीं अर्जुनें ॥ ब्राह्मणांची प्रार्थना भीमसेनें ॥ भोजनवेळे करावी ॥४४॥
सुमनमाळा गंधाक्षता ॥ धूपादि परिमळद्रव्य तत्त्वतां ॥ हीं अर्पावीं समस्तां ॥ नकुळालागीं सांगितलें ॥४५॥
घृत मधु दधि पंचामृतें ॥ हीं सहदेवें वाढिजें एकचित्तें ॥ न्यून पूर्ण होईल तेथें ॥ गंगात्मजें विलोकिजे ॥४६॥
विप्रराजयांच्या बैसती पंक्ती ॥ त्यांसी वाढील द्रौपदी सती ॥ अन्नपूर्णा केवळ भगवती ॥ करील तृप्त समस्तां ॥४७॥
प्रतिविंध्यादि राजकुमर ॥ अत्यंत सुगंध करुनि नीर ॥ भोजनकर्त्यांसी वारंवार ॥ पुरविजे तयांनीं ॥४८॥
त्रयोदशगुणी विडे विचित्र ॥ एक तांबूल सहस्त्रपत्र ॥ हें धृष्टद्युम्नासी सांगा साचार ॥ युधिष्ठिर अवश्य म्हणे ॥४९॥
धर्मराया तूं यजमान ॥ भोंवते घेऊनि दिव्य ब्राह्मण ॥ यथासांग करीं यज्ञ ॥ जेणें त्रिभुवन धन्य म्हणे ॥१५०॥
ऋत्विज नेमिले चौघेजण ॥ कमलोद्भव मुख्य पूर्ण ॥ दुजा सत्यवतीहृदयरत्‍न ॥ वेदाब्जसूर्य केवळ जो ॥५१॥
तिजा ब्रह्मनंदन वसिष्ठ ॥ चौथा याज्ञवल्क्य वरिष्ठ ॥ हे चौघे ऋत्विज स्पष्ट ॥ धर्मराया योजीं कां ॥५२॥
राजा आणि भणंग दीन ॥ सर्वांसी अन्न समान ॥ हें मुख्य प्रभूचें लक्षण ॥ यज्ञ पूर्ण होय तेणें ॥५३॥
ऐसी आज्ञा देऊनि सकळां ॥ मग यज्ञासी आरंभ केला ॥ दीक्षाग्रहणीं धर्म बैसला ॥ विप्रांसहित मखाजवळी ॥५४॥
एक संवत्सरपर्यंत ॥ वसुधारा अखंड चालत ॥ जातवेद जाहला तृप्त ॥ न्यून पदार्थ एकही न दिसे ॥५५॥
विभाग पावोनि समस्त ॥ जयजयकारें देव गर्जत ॥ असंभाव्य पुष्पवृष्टि होत ॥ शक्रप्रस्थावरी पैं ॥५६॥
ऋषि राजे थोरलहान ॥ रत्‍नताटीं करिती भोजन ॥ षड्रस अन्न जेविती पूर्ण ॥ जें दुर्लभ सुरांतें ॥५७॥
तों विप्रांसी प्रार्थना करी भीमसेन ॥ बोले परम कठोर वचन ॥ म्हणे टाकाल जरी अन्न ॥ तरी बांधीन शेंडीसी ॥५८॥
उदरापुरतें मागोनि घ्यावें ॥ पात्रीं सांडितां बरें नव्हे ॥ म्हणे माझे स्वभाव ठावे ॥ तुम्हां आहेत सर्वही ॥५९॥
भीमाच्या धाकेंकरुन ॥ ब्राह्मण जेविती किंचित अन्न ॥ विप्र गेले शुष्क होऊन ॥ तें जगज्जीवनें जाणिलें ॥१६०॥
भीमासी म्हणे जगज्जीवन ॥ गंधमादनऋषि निपुण ॥ त्यासी सत्वर आणा बोलावून ॥ अगत्य कारण आहे त्याचें ॥६१॥
भीमाचे ठायीं अभिमान ॥ मीच एक बळें आगळा पूर्ण ॥ वृकोदर जात वेगेंकरुन ॥ गंधमादन आणावया ॥६२॥
तों वाटेसी जैसा महापर्वत ॥ वृद्धवेष धरुनि बहुत ॥ बैसला असे हनुमंत ॥ पुच्छ आडवें टाकूनियां ॥६३॥
त्यासी भीम बोले प्रौढी ॥ वानरा वाटेचें पुच्छ काढीं ॥ मज जाणें आहे तांतडी ॥ ऋषिदर्शनाकारणें ॥६४॥
तों हनुमंत बोले नम्र वचन ॥ भीमा मज आलें वृद्धपण ॥ हें पुच्छ जड जाहलें पूर्ण ॥ आतां माझेनी उचलेना ॥६५॥
तरी तूं बळिया भीमसेन ॥ एकीकडे ठेवीं पुच्छ उचलून ॥ अवश्य म्हणे कुंतीनंदन ॥ पुच्छ उचलूं पाहतसे ॥६६॥
नव सहस्त्र वारणांचें बळ ॥ तें भीमसेनें वेंचिलें सकळ ॥ परी पुच्छ न ढळे अढळ ॥ जैसा अचल पडियेला ॥६७॥
बळहत जाहला भीमसेन ॥ गदगदां हांसे वायुनंदन ॥ म्हणे धर्मानुजा गर्व सांडोन ॥ कृष्णभजनीं राहें तूं ॥६८॥
मग भीमें स्तवूनि हनुमंता ॥ म्हणे तूं आवडसी रघुनाथा ॥ दशास्यबळदर्पहंता ॥ सीताशोकहर्ता तूंचि पैं ॥६९॥
निरभिमानी भीमासी देखिलें ॥ मग पुच्छ हनुमंतें काढिलें ॥ गंधमादन पर्वतासी ते वेळे ॥ धर्मानुज पातला ॥१७०॥
दृष्टीं देखिला गंधमादन ॥ अंग जैसें दिव्य सुवर्ण ॥ परी तयासी सूकराचें वदन ॥ दुर्गंध पूर्ण येतसे ॥७१॥
भीमें केला नमस्कार ॥ उभा राहिला जोडूनि कर ॥ म्हणे तुम्हांसी पाचारी यादवेंद्र ॥ याग होत धर्मसदनीं ॥७२॥
मग बोले गंधमादन ॥ हें परमदुर्गंधि सूकरवदन ॥ मी तेथें न ये घेऊन ॥ उपहासिती सर्वही ॥७३॥
भीम म्हणे महाऋषी ॥ तुमची कांति सुवर्णाऐसी ॥ ऐसें तुमचें मुख व्हावयासी ॥ काय कारण सांग पां ॥७४॥
येरु म्हणे ऐक सावधान ॥ पूर्वीं मी होतो बहुत सधन ॥ सर्व दानें केलीं पूर्ण ॥ यथाविधीकरुनियां ॥७५॥
परी ब्राह्मणाचा जाय प्राण ॥ ऐसें बोलिलों कठोर वचन ॥ त्यालागीं जाहलें ऐसें वदन ॥ पंडुनंदना जाण पां ॥७६॥
भीमा तूं तरी सावधान ॥ नको बोलूं कठोर वचन ॥ मनांत दचकला भीमसेन ॥ आला परतोन इंद्रप्रस्था ॥७७॥
मग विप्रासी म्हणे तो तेव्हां ॥ स्वामी सावकाश जी जेवा ॥ न रुचे त्याचा त्याग करावा ॥ प्रसाद ठेवावा निजपात्रीं ॥७८॥
विप्र म्हणती नवल जाहलें ॥ यासी हे गुण कोणीं लाविले ॥ प्रार्थना करितो नम्र बोलें ॥ आमुचें फळलें भाग्य वाटे ॥७९॥
असो धर्माची संपदा बहुत ॥ देखतां दुर्योधन संतापत ॥ म्हणे याचा सहाकारी कृष्णनाथ ॥ याचेनि पूर्ण सर्व होय ॥१८०॥
श्रीकृष्णासी म्हणे दुर्योधन ॥ तुझें पांडवांवरी बहुत मन ॥ तूं एवढा देव होऊन ॥ समता नसे तुझे ठायीं ॥८१॥
पांडवांकडे धरिसी प्रीती ॥ तैसी आम्हांकडे नाहीं वृत्ती ॥ तूझे ठायीं द्वैत श्रीपती ॥ नवल मज वाटतसे ॥८२॥
हरि म्हणे दुर्योधना ॥ मी समसमान अवघियांसी जाणा ॥ एकासी अधिक एकासी उणा ॥ सर्वथा नाहीं विचारीं ॥८३॥
दरिद्री राजा हो कां रंक ॥ सर्वांसी समान जैसा अर्क ॥ किंवा गंगेचें उदक ॥ सर्वांसही सम जैसें ॥८४॥
की सर्वां धटीं समान अंबर ॥ कीं समान जैसा समीर ॥ कीं गगनीं उगवतां रोहिणीवर ॥ शीतळ जैसा सर्वांतें ॥८५॥
तैसा मी दुर्योधना जाण ॥ परी जे कां कुटिल जन ॥ ते सम विषम पूर्ण ॥ माझ्या ठायीं भाविती ॥८६॥
भक्त धरिती अत्यादर ॥ त्यांसी जवळी वाटें मी यादवेंद्र ॥ मी समीप असोनि साचार ॥ अभक्त दूरी भाविती ॥८७॥
त्याची पावावया प्रचीती ॥ दुर्योधनासी म्हणे यदुपती ॥ एक कारण आहे निश्चितीं ॥ तें तूं ऐक सुयोधना ॥८८॥
इतुके बैसले ब्राह्मण ॥ यांत एक सत्पात्र निवडोन ॥ लवकरी आणीं उत्तम दान ॥ देणें असे तयातें ॥८९॥
दुर्योधन चालिला पाहावया ॥ मग बोलाविलें धर्मराया ॥ द्विजांत एक नष्ट निवडूनियां ॥ वेगें आणीं आतांचि ॥१९०॥
धर्म पाहे जो ब्राह्मण ॥ तो केवळ दिसे सूर्यनारायण ॥ महातपस्वी पुण्यपरापण ॥ नष्ट एकही दिसेना ॥९१॥
परतोनि आला हरीपाशीं ॥ म्हणे हे अवघेचि पुण्यराशी ॥ अपवित्र गुण एकापाशीं ॥ न दिसे कोठें सर्वथा ॥९२॥
इकडे दुर्योधन शोधीत ॥ अवघी ऋषिमंडळी न्याहाळीत ॥ म्हणे एकही धड नाहीं त्यांत ॥ दूषणें बहुत दीसती ॥९३॥
हरीजवळी आला सत्वर ॥ म्हणे हे अवघेचि अपवित्र ॥ एकही न दिसे सत्पात्र ॥ दोषी सर्वत्र असती पैं ॥९४॥
दुर्योधनासी म्हणे जगज्जीवन ॥ तुझें हृदय कपटमलिन ॥ सदोषिया निर्दोष जाण ॥ त्रिभुवनीं दिसेना ॥९५॥
दुरात्मा जो दुर्बुद्धि खळ ॥ त्यासी अवघे दिसती अमंगळ ॥ दृष्टीं कोणी न दिसे निर्मळ ॥ पापें समूळ वेष्टिला ॥९६॥
वेश्येचिये नयनीं ॥ सकळ स्त्रिया दिसती जारिणी ॥ तैसा तूं दुरात्मा पापखाणी ॥ मलिन मनीं सर्वदा ॥९७॥
धर्मासी अवघे दिसती पुण्यवंत ॥ तेचि तुज दोषी भासत ॥ दुर्योधन न बोले तटस्थ ॥ जो अति उन्मत्त विषयांध ॥९८॥
असो एक वर्षपर्यंत ॥ राजसूययज्ञोत्साह होत ॥ तों नवल वर्तलें एक तेथ ॥ श्रोते सावचित्त ऐका पां ॥९९॥
जान्हवीचे तीरीं जाण ॥ कोणी एक तपस्वी ब्राह्मण ॥ अरण्यामाजी गुंफा बांधोन ॥ स्त्रियेसहित राहतसे ॥२००॥
परम तेजस्वी देदीप्यमान ॥ सदा करी शिवउपासन ॥ नित्य कैलासाहूनि विमान ॥ माध्यान्हसमयीं देत तया ॥१॥
तया विमानीं बैसोनि दोघें ॥ नित्य कैलासासी जाती वेगें ॥ शिवार्चन करिती निजांगें ॥ येती परतोनि आश्रमा ॥२॥
ऐसें असतां एकेकाळीं ॥ दोघें हिंडती वनस्थळीं ॥ विमान यावयाची वेळ जाहली ॥ पुष्पें तोडिलीं सवेग ॥३॥
तों एकांत वन देखोन ॥ कामातुर जाहला ब्राह्मण ॥ स्त्रियेसी म्हणे भोगदान ॥ देईं मज येथेंचि ॥४॥
तंव ते म्हणे भ्रतारासी ॥ चंडांशु आला माध्यान्हासी ॥ पुढें जाणें शिवपूजेसी ॥ हे गोष्टी मनीं धरुं नका ॥५॥
तुम्ही सर्व शास्त्रीं निपुण ॥ बरवें पहा विचारुन ॥ तंव तो कामें व्यापिला पूर्ण ॥ धूर्णित नयन जाहले ॥६॥
अंतर भरलें अनंगें ॥ पंथ सोडूनि जाय आडमार्गें ॥ तों काळसर्पें डंखिला वेगें ॥ प्राण गेला तत्काळ ॥७॥
अचेतन पडिलें शरीर प्रेत ॥ जवळी स्त्री आली धांवत ॥ अट्टहासें शोक करीत ॥ तों नारद तेथें पातला ॥८॥
नारद पुसे काय जाहलें ॥ येरीनें जें जाहलें तेंचि कथिलें ॥ नारद म्हणे काय केलें ॥ कां वचन मोडिलें भ्रताराचें ॥९॥
तंव ती म्हणे नारदमुनी ॥ कांहीं उपाय सांगा ये क्षणीं ॥ येरु म्हणे शक्रप्रस्थासी घेऊनी ॥ प्रेत जाईं सवेग ॥२१०॥
पुढें चाले नारदमुनी ॥ मागे येत प्रेत घेऊनी ॥ यज्ञमंडपांत आणूनी ॥ अकस्मात टाकिलें ॥११॥
यज्ञापाशीं टाकिलें प्रेत ॥ तेथें मिळाले श्रेष्ठ समस्त ॥ म्हणती पैल तें इंद्रप्रस्थ ॥ उचलीं कुणप वेगेंसी ॥१२॥
म्हणे सर्पदंश जाहला भ्रतारासी ॥ कोणी उठवा सत्वर यासी ॥ तरीच मख सुफळ पुण्यराशी ॥ देखोनि युधिष्ठिर घाबरला ॥१३॥
म्हणे यज्ञासी विघ्न ओढवलें ॥ जैसें दुग्धामाजी सैंधव पडलें ॥ स्वाहाकार खोळंबले ॥ हस्त आंखडिले ब्राह्मणीं ॥१४॥
धर्मराज झाला दीनवदन ॥ समस्तां विनवी कर जोडून ॥ कोणी तपस्तेज वेंचून ॥ उठवा शीघ्र कुणप हें ॥१५॥
तटस्थ पाहती सभाजन ॥ कोणी न बोलती वचन ॥ धर्मराज उदकें भरुनि नयन ॥ जगद्वंद्याकडे पाहे ॥१६॥
म्हणे कैवारिया भक्तवत्सला ॥ शेवटीं हा अनर्थ ओढवला ॥ जैसा विदेशाहूनि गांवा आला ॥ वेशींत नागविला तस्करीं ॥१७॥
हातासी जों लागावें निधान ॥ तों तेथें विवशी पडे येऊन ॥ मायबाप तूं जगज्जीवन ॥ तुझा यज्ञ तूं सांभाळीं ॥१८॥
मी किंकर तुझें दीन ॥ तूं सांभाळी आपुला यज्ञ ॥ मी यज्ञकर्ता म्हणवीन ॥ तरी जिव्हा झडो हे ॥१९॥
ऐकोनि धर्माचें करुणावचन ॥ गहिंवरले भक्तजन ॥ शिशुपाळादि कौरव दुर्जन ॥ हर्ष पूर्ण मानिती ॥२२०॥
खुणाविती एकासी एक ॥ बरें म्हणती झालें कौतुक ॥ चांडाळ दुरात्मे देख ॥ उणें पाहती भक्तांचें ॥२१॥
परी धर्माचा पाठिराखा थोर ॥ वैकुंठपुरींचा सुकुमार ॥ तो उणें पडों नेदी अणुमात्र ॥ कमलनेत्र कमलापति ॥२२॥
मेघ गंभीर गिरा गर्जोन ॥ बोले रुक्मिणीप्राणजीवन ॥ मन्मथजनक जनार्दन ॥ पांडवजनरक्षक ॥२३॥
म्हणे वेंचावें कांहीं निजतप ॥ तरीच उठेल हें कुपण ॥ यावरी विरिंचीचा बाप ॥ काय करिता जाहला ॥२४॥
पीतवसन श्रीकरधर ॥ सुरंग रुळे उत्तरीय वस्त्र ॥ मंदहास्य वारिज नेत्र ॥ प्रेताजवळी पातला ॥२५॥
हातीं घेतली रत्‍नजडित झारी ॥ सव्य करीं ओती पुण्यवारी ॥ कृष्णद्वेषी जे पापकारी ॥ हांसो लागले गदगदां ॥२६॥
शिशुपाळादि कौरव दुर्जन ॥ म्हणती हा काय आचरला पुण्य ॥ कौतुक तप केलें निर्वाण ॥ जन्मादारभ्य आजिवरी ॥२७॥
महाकपटी चोर जार ॥ गोवळ्यांचीं उच्छिष्टें खाणार ॥ एक म्हणती धरा धीर ॥ कौतुक पाहों उगेचि ॥२८॥
तों काय बोले मधुकैटभारी ॥ मी आजिपर्यंत ब्रह्मचारी ॥ तों अवघे हांसती दुराचारी ॥ हस्त हस्ती हाणोनियां ॥२९॥
ब्रह्मचर्यसंकल्प करुन ॥ ब्राह्मणाचे मुखीं जीवन ॥ कृष्णें घालितांचि खडबडून ॥ उठिला विप्र ते वेळीं ॥२३०॥
जाहला एकचि जयजयकार ॥ देव वर्षति सुमनसंभार ॥ प्रेमें दाटला युधिष्ठिर ॥ भक्त अपार स्तविती तेव्हां ॥३१॥
सकळ दुर्जन ते वेळीं ॥ अधोवदन जाहले सकळी ॥ आनंदली भक्तमंडळी ॥ पिटिली टाळी सकळिकीं ॥३२॥
असो उठिला तो ब्राह्मण ॥ धर्मे केलें त्याचें पूजन ॥ स्त्रीसहित गौरवून ॥ वस्त्रें भूषणें अर्पिली ॥३३॥
तों यज्ञामधूनि एक जंबुक ॥ अकस्मात निघाला एकाएक ॥ कुंडवेदिकेवरी बैसोनि देख ॥ पुढील भविष्य वाखाणी ॥३४॥
गर्जोनि बोले शब्द ॥ येथें एकाचा होईल शिरच्छेद ॥ पुढें दिसतो मोठा विरोध ॥ कलह अगाध माजेल ॥३५॥
येथूनि तेरा वर्षें अवधारा ॥ निर्वीर होईल वसुंधरा ॥ जितुके नृप आले धर्ममंदिरा ॥ तितुके पुढें आटती ॥३६॥
ऐसें तो जंबुक्र बोलिला ॥ तेथेंचि मग अदृश्य जाहला ॥ असो पुढें स्वाहाकार चालिला ॥ ब्राह्मण हस्तेंकरुनियां ॥३७॥
हें जैमिनिभारतींचें संमत ॥ श्रोतीं पाहिजे ऐसें यथार्थ ॥ श्रीकृष्णें उठविलें प्रेत ॥ हें कथानक तेथेंचि ॥३८॥
कथा हे गोड ऐकिली ॥ म्हणवूनि हरिविजयीं ॥ पुढें शिशुपाळाचें शिर वनमाळी ॥ छेदील तें परिसा आतां ॥३९॥
पुढिले अध्यायीं कथा सुरस ॥ द्रौपदी वाढील समस्तांस ॥ तेथें कौतुक एक विशेष ॥ जगन्निवास दाखवील ॥२४०॥
हरिविजय करितां श्रवण ॥ सर्वदा विजयी होईल पूर्ण ॥ एक ग्रंथासी करितां आवर्तन ॥ सकळ मनोरथ पुरतील ॥४१॥
संपत्ति विद्या पुत्र धन ॥ कामिक पावती करितां श्रवण ॥ हें श्रीविठ्ठलें वरदान ॥ पंढरियेसी दीधलें ॥४२॥
पंढरीनगरींच यथार्थ ॥ प्रकट जाहला हरिविजयग्रंथ ॥ श्रवणें सकळ संकट वारीत ॥ सत्य सत्य श्रोते हो ॥४३॥
श्रीधरवरदा अभंगा ॥ रुक्मिणीवल्लभा पांडुरंगा ॥ पांडवरक्षका भक्तभवभंगा ॥ अव्यय निःसंगा सुखाब्धि ॥४४॥
इति श्रीहरिविजयग्रंथ ॥ संमत हरिवंशभागवत ॥ परिसोत प्रेमळ पंडित ॥ त्रयस्त्रिंशतितमाध्याय गोड हा ॥२४५॥
श्रीकृष्णार्पणमस्तु॥अध्याय॥३३॥ओंव्या॥२४५॥