Sunday, June 19, 2016

वटपौर्णिमा

वटपौर्णिमा आहे म्हणून वडाच्या झाडाबदल लिहावं  की नाही ? अशा मनस्थितीत असताना अनेक स्त्री वाचकांनी वडाबद्दल लिहिणार आहात ना?  अशी विचारणा केली. वडाची फ़ांदी आणुन पुजा करण्यापेक्षा, वडाची माहिती वाचेन, नी एखादा वटवृक्ष लावेन ह्या मेसेजने मला कामाला लावलं. नेमिची येतो पावसाळा च्या आधी वटपौर्णिमा येते नी वडाच्या झाडांना घाबरवते. कुणातरी नवऱ्याचा जीव वाचवण्यासाठी दरवर्षी मरणाऱ्या वडासाठी आजचा लेख.

वटपौर्णिमेला पारंपरिक सावित्री बनुन वडाची पुजा करायची आणि कुंकवाच्या धन्याला,अर्थात आपल्या सत्यवानाला भक्कम आयुष्य दे म्हणत वडाला दोरे गुंडाळाण्याचं  वाण पिढ्यानपिढ्या समस्त स्त्रीवर्ग पुढच्या स्त्री पिढीला देत असतो. फ़ायकस बेंगालिन्सिस - Ficus benghalensis - असं साधंस वनस्पतीशास्त्रिय नाव धरण केलेलं वड, अर्थात वटवृक्ष माहित नसलेली व्यक्ती विरळाच.१००% भारतिय असलेलं हे सर्वांगसुंदर झाड भारतिय संस्कृतीचा मानबिंदूच. ६/८ मिटर्स पासून चक्क २०/२२ मिटर्स एवढी उंची गाठणारा हा सदापर्णी महावृक्ष देशात बहुतेक सर्वत्र आढळतो. मोरेसी कुलातल्या फ़ायकस प्रजातीतल्या ज्या सदस्यांनी आपलं जिवन समृद्ध केलय, त्यात वडाचा अगदी वरचा क्रमांक आहे.ह्या फ़ायकसच्या साधारण १००० जाती जगभर असून आपल्या देशात सुमारे ७० जाती आढळतात. यातील बहुतेक सर्व नैसर्गिक व्हेन्टीलेटर्सच, अर्थात जास्तीतजास्त प्राणवायु सोडण्याच काम करत असतात.ज्या सवित्रीने तिच्या सत्यवानाला या झाडाखाली झोपवलं होतं, ती नक्कीच अभ्यासू स्त्री असणार जिला हे द्न्यात होतं की हे झाड प्राणावायु सोडतं ज्याची आपल्या नवऱ्याला नितांत गरज आहे.

भारतिय संस्कृतीत अगदी वेदांपासून वडाच्या झाडाला महत्व दिले गेले आहे. आपल्या पुर्वजांनाही या झाडाचे उपयोग ठावुक होते. या झाडाची पानं, फ़ळं, फ़ुलं, मुळं, पारंब्या,साल, लाकडं तसेच त्यातून निघणारा चीक या सगळ्याचा उपयोग होतो. वडाची पानं ही वरुन चमकदार व खालून काहीशी रखरखीत असतात. काळपट हिरवट रंगाची ही पानं निसर्गात अत्यंत महत्वाचा प्राणवायु सोडण्याचं काम करतात. ही पानं कोवळी असताना बहुतेक सर्व दुभत्या जनावरांचं आवडतं खाद्य असतात. केरळमध्ये हत्तींना ही पानं खायला देतात. ही पानं आकाराने थोडी मोठी असल्याने त्यातून उन्हे खाली झिरपत नाहीत आणि उत्तम सावली निर्माण होते. हवेतील प्रदुषण, कर्बकण पानांवर अडल्याने वातावरणातील प्रदुषण कमी होते. याच कारणासाठी पुर्वी ही झाडं राष्ट्रीय महामार्गांवर लावली जायची. वडाची ही पानं दररोज हवेत मुबलक प्रमाणात आर्द्रता सोडण्याच काम करत असतात ज्यामुळे या झाडाच्या परिघात आल्यावर शितल अनुभव येतो.लहानपणी झालेल्या गळवावर याच्या पानांच पोटीस बांधल्याची आठवण अनेकांना नक्कीच येइल. ही पानं तोडल्यावर येणारा चीक सुद्धा उपयोगाचा असतो. दातदुखी, संधीवात यावर त्याचा वापर जाणते वैद्य करतात. तळपायाच्या भेगांवर याचा लेप देउन त्या कमी करण्याची पद्धत अजुनही गावांमध्ये प्रचलित आहे.

वडाची लाकडं त्याला असलेल्या धार्मिक महत्वामुळे तोडली जात नाहीत.परंतू याच्या काटक्यांना समिधा म्हणुन यद्न्यकर्मात वापरले जाते. मुळातच हे लाकूड चिव्वट व बळकट असल्याने बैलगाडीचा दांडा,जू,नांगर बनवण्याच्या कामासाठी हे मुख्यत: वापरले जाते.याच जोडीला खोडाचा मधला भाग शोभेच्या वस्तू व लहानसहान लाकूडकामासाठी वापरला जातो. या झाडाचा अजुन एक उपयोग म्हणजे याच्यापासून चांगला कागद बनवला जातो. याच्या लाकडाची निघणारी साल, चिव्वट असल्याने दोरी बनवण्यासाठी वापरली जाते. याच सालीच्या रसाचे अनेकाविध उपयोग आयुर्वेदात केले जातात. स्तंभक व पौष्टिक असणारा रस यातून निघतो जो अतिसार आमांश यावर वापरला जातो. माझी आजी याच्या सालीचा काढा तिच्या मधुमेहावर वापरायची. पुर्वीच्या पिढीचा झटपट औषधांशी परिचय न झाल्याने आयुर्वेदाकडे त्यांचा कल असायचा. निसर्गातल्या प्रत्येक घटकाचा वापर ह्या पिढीकडून दैनदिन जिवनात केला जायचा.मी स्वत: आयुर्वेदाचा अभ्यास न केल्याने या झाडाच्या आयुर्वेदाच्या अंगाने उपयोग ह्यावर लिहायचे टाळले आहे.

आपल्यापैकी अनेकांना माहितच नसतं की वडाला फ़ळं येतात. फ़ांदीच्या पानांच्या बेचक्यात पानांच्या आड मांसल कपासारखी स्तंभ फ़ळं येतात. एकाच ठिकाणी नर व मादी फ़ुलं येतात. फ़ायकस कुटुंबातल्या पिंपळाप्रमाणेच, वडाची परागवहन करणारी एक काळपट पिवळट माशी असते. ही माशी आणि वड एकमेकांवर पुर्णत: अवलंबुन असतात. झाडाला येणारी फ़ळं औदुंबरी फ़ळं आतल्या किड्यांमुळे मानवी खाण्यासाठी खुप योग्य समजली जात नाहीत पण पक्षी, माकडं, किडे, खारी आवडीने यावर ताव मारतात.यांच्या विष्ठेतून झाडाच्या बिया दूर दूर पोहोचतात व पटकन रुजतात.दुष्काळात लोकांनी ह्या फ़ळांवर पोट भरल्याचे उल्लेख अनेक ग्याझेट्स मध्ये आढळतात. वडाच्या पारंब्या म्हणजे दुसरं तिसरं काही नसून त्याची फ़ांद्यांमधुन निघालेली मुळंच असतात. ही मुळं विस्तारणाऱ्या झाडाला चहुबाजूनी आधार देण्याचं काम करत असतात. या पारंब्यांमुळे झाडाचा आकार काही किलोमिटर परिसरात पसरला जातो. कलकत्त्याच बोट्यानिकल उद्यानातलं झाड, गुजरातमधलं भडोच जवळच नर्मदेच्या पात्राजवळचं झाड, मद्रास जवळच अड्यार मधलं जुनं वडाच झाड ही मी पाहिलेली काही ठळक उदाहरणं आहेत. या पारंब्यांपासून व मुळांपासून मानवी उपयोगाचे केशतेल, अर्क बनवला जातो जो अनेक प्रसिद्ध नावांनी आपण वापरत असतो.

 मला अनेकांनी लिहिलं की "वडाबद्दल तसं खुप काही नाहिये पण तुम्ही जरूर लिहा". या विधानाने मला खुप अस्वस्थ केलय. निसर्गातलं प्रत्येक झाड आपल्याला काहीतरी महत्व असल्याखेरीज जाणून घ्यावसं वाटू नये का? पुर्वी सण साजरे करताना , परिसरातील प्रत्येक सजीव घटकाचा विचार आपले पुर्वज दैनंदिन जिवनात करायचे. प्रत्येक घटकाला आपला सखा समजुन त्याचा तोल राखण्याचा प्रयत्न करणारी अशी जाणती पिढी क्वचितच अन्य कुठल्या देशाला लाभली असेल. दैनंदिन जिवनात पर्यावरणाची सांगड संवर्धन आणि संरक्षण घालणारा माझा समाज आज आधुनिक काळात, सणाच्या नावाखाली निव्वळ पाटी टाकण्यात हरवत चाललाय हेच खरं. मला अनेक स्त्री वाचकांनी विचारलय की "डिस्कव्हरीताई, तू वटपौर्णिमेचा सण करते का? उपास करते का?" माझं यावर उत्तर आहे, "अजिबात नाही". बाजारात जाऊन चढ्या भावाने कुठुन तरी ओरबडुन /चोरुन तोडून आणलेल्या वडाच्या फ़ांदीची पुजा करुन, उपास करुन माझ्या अनिरुद्धचे प्राण अजिबात वाचणार नाहीतच पण त्या झाडाचे शाप नक्कीच मला लाभतील. माझ्या नवरोजच्या जिवाला वाचवण्यासाठी, शीतल सावली नी  शुद्ध प्राण वायु हवा असेल तर आम्ही दोघांनी मिळून एकतरी वटवृक्ष लावणं गरजेचं आहे. ते नुसतं लावून फ़ायदा नाही तर त्याला मोठं करणं सुद्धा तितकंच गरजेच आहे. माझ्या आईने गेल्या ४७ वर्षांमध्ये कधीच असले उपासतापास केले नाहीत पण ४७  झाडं लावुन जगवली आहेत. ह्याच विचाराच वाण तिने आमच्या मनात कृतीने रुजवलय. "जन्मोजन्मी हाच पती लाभो" असं मी अजिबात म्हणत नाही. मात्र हाच जन्म सातवा, आणि त्या सातव्या जन्मात निसर्गाची जपणूक जोडीने करायला मिळो ही प्रार्थना नक्कीच निसर्गाला करते. माझे विचार कदाचीत वाचकांना आवडणार नाहीत, पण आज वडाची पुजा ही त्याचं संवर्धन करुनच होणार आहे. त्याचं संवर्धन झालं तर आपल्या सत्यवानांच्या जोडीला येणाऱ्या पिढीचाही फ़ायदा पाहिला जाईल. नाहितर आपण निव्वळ ’वटवट सावित्री’ बनू....वडाच्या झाडाची खूप काही माहिती नसते असा गैरसमज दूर करण्यासाठी , हा लेख जरूर शेअर करा . एका दिवसापुरतं का होईना, त्याला १००% महत्व देउयात. आणि हो, हात जोडून विनंती, वडाचं एकतरी झाड सत्यवानाच्या जोडीने, उद्या, सुट्टी असेल तेव्हा लावा, त्याला आपलं अपत्य म्हणून वाढवा. त्याच्या वार्षीक वाढीबरोबर तुमचं आणि सत्यवानाच नातंही वडासारखच दीर्घायू म्हणून जोपासलं जाईल.  
...थेट निसर्गातुन या fb पेजवरुन.लेखक-डिस्कव्हरी ताई

No comments:

Post a Comment