Sunday, February 28, 2021

Majeshir Anupras Alankar


मराठी भाषा सौंदर्याने नटलेली आहे. तिला अनेक अलंकार प्राप्त आहेत. त्यापैकी अनुप्रास हा एक शब्दालंकार. 
एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणामध्ये जेव्हा एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्या चरणाला नादयुक्त सौंदर्य प्राप्त होते, तेव्हा अनुप्रास अलंकार आहे असे म्हणतात. अनुप्रासात विशिष्ट वर्णांची पुनरावृत्ती केली जाते आणि ती साधण्यासाठी विशिष्ट शब्द वापरले जातात.
आज आपण अनुप्रास अलंकाराची काही उदाहरणे जाणून घेणार आहोत. 

कडकडा फोड नभ, उढव उडुमक्षिका

खडखडवी दिग्गजां, तुडव रविमालिका

मांड वादळ, उधळ गिरि जशी मृत्तिका 

खवळवी चहुंकडे या समुद्रा

- कविवर्य भा. रा. तांबे 

या ओळींत ‘ड्’ ‌या वर्णाची पुनरावृत्ती आहे.


वंशी नादनटी तिला कटितटीं खोवोनी पोटीं पटीं।

 कक्षे वामपुटीं स्वशृंगनिकटीं वेताटिही गोमटी।।

 जेवी नीरतटीं तरू तळवटीं श्रीश्यामदेहीं उटी।

 दाटी व्योमघटीं सुरां सुखलुटी घेती जटी धूर्जटी।।

- कवी वामन पंडित 

या रचनेतील ‘ट्’ या वर्णाची पुनरावृत्ती आहे.


पुढे दिलेले समर्थ रामदासस्वामीकृत 'नृसिंह पंचक स्तोत्र' हे लाटानुप्रासाचे उत्तम उदाहरण आहे. :

नरहरी नरपाळें भक्तपाळें भुपाळें। प्रगट रुप विशाळें दाविलें लोकपाळें। खवळत रिपुकाळें काळकाळें कळाळें। तट तट तट स्तंभि व्यापिलें वन्हिजाळें।।

झळझळीत झळाळीं ज्वाळलोळें झळाळी। लळलळीत लळाळीं लाळ लाळित लाळी। हळहळीत हळाळीं गोळमाळा हळाळी। कळकळीत कळाळीं व्योम पोळीत जाळीं।।

कडकडित कडाडीं कडकडाटें कडाडीं। घडघडित घडाडीं घडघडाटें घडाडीं। तडतडित तडाडीं तडतडाटें तडाडीं। धडधडित धडाडीं धडधडाटें धडाडीं।।

भरभरित भरारी भर्भराटे भरारी। थरथरित थरारी थर्रथराटे थरारी। तरतरित तरारी तर्तराटे तरारी। चर्चरित चरारी चर्चराटे चरारी।।

रजनिचर विभांडी दो करें पोट फोडी। गडगडित गडाडी आंतडी सर्व काढी। न धरित जन मानें लोक गेलें निदानें। हरिजन भजनानें शांत केलें दयेनें।।

- श्रीसमर्थ रामदासस्वामी



अशीच एक बा. भ. बोरकरांची कविता. खाली दिलेली ह्या कवितेतील काही चरणांमधे छान अनुप्रास अलंकार साधला गेला आहे. 


            गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले 

            शीतलतनु चपलचरण अनिल गण निघाले

                     दिन लंघुनी जाय गिरी, पद उमटे क्षितिजावरि 

                    पद्मरागवृष्टि  होय माड भव्य न्हाले 

                    गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले 

            धुंद सजल हसित दिशा, तृणपर्णी सज्ज तृषा 

            तृप्तीचे धन घनांत बघुनि मन निवालें 

            गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले 

                    उतट बघुनि हरिकरुणा, हरित धरा हो गहना 

                    मंदाकिनी वरुनि धवल विहगवृंद डोले 

                    गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले 

            रजतनील, ताम्रनील स्थिर पल जल, पल सलील 

            हिरव्या तटिं नावांचा कृष्ण मेळ खेळे 

            गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले 

                    मीन चमकुनी उसळें, जलवलयीं रव मिसळें 

                    नवथर रसरंग गहन करिति नयन ओले 

                    गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले 

            धूसर हो क्षितिज त्वरित, ढोर पथी अचल चकित 

            तृण विसरुनि जवळील ते खिळवि गगनीं डोळे 

            गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले 

                    टप टप टप पडती थेंब मनी वनिंचे विझती डोंब 

                    वत्सल ये वास, भूमी आशीर्वच बोले 

                    गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले  


अनुप्रास अलंकाराचा एक मोठा परिच्छेद मध्यंतरी वाचनात आला.  प्रत्येक शब्द ‘क’ पासून सुरु करुन परिच्छेद लिहिला आहे. हा नुसता परिच्छेद नाही, तर एक छोटीशी पूर्ण कथा आहे. जगातल्या कोणत्या इतर भाषेत अशी ताकद असेल? मराठी भाषेचे सामर्थ्य खालील परिच्छेदात पहा. 


"केव्हातरी कोल्हापूरच्या कर्तव्यतत्पर केळकर काकांबद्दल काकांच्याच कचेरीतल्या केशवने काकूंसमोर कागाळी केली. काकू कावल्या. काकूंनी कपाटातून कात्री काढून काकांच्या कामाचे कोरे करकरीत कागद कचाकचा कापले. काकांचे कापलेले कागद केशवानेच कचऱ्यात कोंबून काकांच्याच किचनमध्ये ‘कजरारे-कजरारे’ कवितेवर कोळीनृत्य केले. 
काकूंनी कागद कापल्याचे कळताच काका कळवळले. काकांनीही कमालच केली. काकांनी काकूंचे काळे कुळकुळीत केस कात्रीने कराकरा कापले. काका काय करताहेत काकूंना कळेनाच! काकूंनी कर्कश्श किंचाळून कलकलाट केला. काका काकूंची कसली काळजी करणार! काकांना कामाची काळजी. काकूंच्या कर्णकर्कश्श कोलाहलातही, केशवाने कचऱ्यात कोंबलेले कागदाचे कपटेन कपटे काढून काकांनी कचेरीकडे कूच केले.
कचेरीच्या कामासाठी काकांनी कंबर कसली. कागदाच्या कापलेल्या कपट्यांचे काकांनी ‘कोलाज’ करून कामकाज कार्यान्वयित केले. केशवाचे कारनामे कळताच काकांनी काट्यानेच काटा काढला. काकांनी केशवालाच कोलाजचे काम करण्यासाठी कुथवला. कपटी केशवने काकांवरच कामचुकारपणाचा कांगावा करून कामाचा कंटाळा केला. काकांनी कठोरपणे केशवाला कामावरून काढले. 
कासावीस काकूंनी कालच्या कडू कारल्याची कोशिंबीर कटाप करून काकांसाठी कच्च्या कैरीचे कोय काढून कालवण केले. काकांनीही करुणेने काकूंचे कृत्रिम केस कुरवाळले. 
केळकरांच्या कोकणस्थ कुटुंबात कर्तव्यापुढे कर्मकांड केव्हाही कनिष्ठच. कर्तव्यदक्ष काकांच्या कार्यकाळात कचेरीने कर्मरूपी किल्ल्याचे कीर्तिशिखर काबीज केले. कामावरून काढलेल्या केशवाने कितीतरी काबाडकष्ट काढल्यावर कोल्हापूरच्या कॉम्रेड कणेकर कॉलेजने केशवाला कबड्डीचा कर्णधार केला. क्रिडापटू केशवाने कबड्डीतच करियर केले. कालच्या कागाळीखोर केशवाला काळानेच केला ‘कबड्डीतल्या किचकट कसरतींचा कर्ता’! 

कथासार - क्रियेविण करिता कथन, किंवा कोरडेची कीर्तन, कितीक किताब कष्टाविण, काय कामाचे... !!!"

3 comments:

  1. We are one of India's Top Betting ID Providers, offering Online Cricket ID right away. In this, you can spend money, win big, and make many times more. As we are guiding you, there is no risk of losing in this situation, so call right away to speak with our online betting ID provider and take pleasure in the game.
    Online Cricket Id, Cricket Id

    ReplyDelete
  2. Thanks for Your article...it gives us immense knowledge. Get 24x7 Customer Support by Krishnabook . Abki Baar IPL Sirf Krishnabook.in . Par Join Most Secured Best IPL Online betting Id by Krishnabook 24x7 Customer Service.

    ReplyDelete
  3. Nice Article We are one of the best Online betting sites in India | How To Do Betting ON IPL | Number one betting id . We have many online games like casino, cricket , poker etc. Contact for more information about Betting id - +91 76648 48795

    ReplyDelete