Sunday, December 18, 2011

RamVijay Adhyay - 37

 श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
जयजय राघवा करुणाकरा ॥ अवनिजाकुलभूषणा मनविहारा ॥ रावणानुजपाळका समरधीरा ॥ मित्रपुत्रहितप्रिया ॥१॥
प्रतापसूर्यवंशिविवर्धना ॥ मयजामातकुलकाननच्छेदना ॥ सकळवृंदारकबंधमोचना ॥ आनंदसदना अक्षया ॥२॥
कौसल्याहृदयारविंदभ्रमरा ॥ भरतनयनपद्मदिवाकरा ॥ सौमित्रप्राणआधारा ॥ अतिउदारा अयोध्याप्रभो ॥३॥
ब्रह्मानंदा रघुनंदना ॥ वदवीं पुढें ग्रंथरचना ॥ तुझी लीला जगन्मोहना ॥ तूंचि बोलें यथार्थ ॥४॥
पंडितीं ऐकावें सावधान ॥ छत्तिसावे अध्यायीं जाण ॥ राजाधिराज रघुनंदन ॥ राज्यासनीं बैसला ॥५॥
एकादशसहस्र वर्षें ॥ निर्विघ्न राज्य पुराणपुरुषें ॥ अयोध्येचें केलें संतोषें ॥ विश्व सकळ कोंदलें ॥६॥
तों विदेहराजनंदिनी ॥ जगन्माता प्रणवरूपिणी ॥ ते अयोध्यापतीची राणी ॥ झाली गर्भिणी पहिल्यानेंं ॥७॥
शास्त्रसंख्या मास भरतां जाण ॥ वोंटभरण करी रघुनंदन ॥ तो सोहळा वर्णितां पूर्ण ॥ भागे वदन शेषाचें ॥८॥
वसंतकाळीं क्रीडावनांत ॥ राघव प्रवेशला सीतेसहित ॥ अत्यंत वन तें शोभिवंत ॥ नंदनवनाहूनियां ॥९॥
वृक्ष सदाफळ आणि सघन ॥ माजी न दिसे सूर्यकिरण ॥ तेथें सीतेची अंगुली धरून ॥ राजीवनयन विचरतसे ॥१०॥
नानावृक्षांचिया जाती ॥ सीतेस दावी त्रिभुवनपती ॥ एकांत देखोन सीतेप्रति ॥ पुसत राघव प्रीतीनें ॥११॥
म्हणे सुकुमारे जनकबाळे ॥ तुज काय होताती अंतरीं डोहळे ॥ मना आवडे ते यें वेळे ॥ सांग सर्वही पुरवीन ॥१२॥
मग इच्छित हास्यवदन ॥ जानकी देत प्रतिवचन ॥ म्हणे एक आवडे रघुनंदन ॥ नलगे आन पदार्थ ॥१३॥
राजीवाक्ष म्हणे लाज सोडोनी ॥ डोहळे सांग काय ते मनीं ॥ जें म्हणशील ते यें क्षणी ॥ पुरवीन जाण राजसे ॥१४॥
जनकजा बोले याउपरी ॥ म्हणे जन्हकुमारीचिये तीरीं ॥ पवित्र ऋषिपत्न्यांमाझारीं ॥ पंचरात्रीं राहावें ॥१५॥
घालोनियां तृणासन ॥ करावें भूमीवरी शयन ॥ कंदमुळें भक्षून ॥ शुचिर्भूत असावे ॥१६॥
मनांत म्हणे रघुनंदन ॥ पूर्वी वनवास भोगिले दारुण ॥ अजूनि न धायेचि मन ॥ आवडे कानन इयेते ॥१७॥
पुढील भविष्यार्थ जाणोन ॥ अवश्य म्हणे रघुनंदन ॥ मनकामना पूर्ण करीन ॥ तुझी जाण सुकुमारें ॥१८॥
याउपरी एकदां रघुवीर ॥ पुरींचे रक्षक जे हेर ॥ त्यांसी पुसतसे श्रीधर ॥ दृढभावे निर्धारें ॥१९॥
तुम्ही नगरीं हिंडतां निरंतर ॥ आकर्णितां जनवार्ता समग्र ॥ तरी तें सांगावें साचार ॥ लोक काय म्हणती आम्हां ॥२०॥
वंदिती किंवा निंदिती ॥ यश किंवा अपयश स्थापिती ॥ अभय असे तुम्हांप्रती ॥ सांगा निश्चिती काय तें ॥२१॥
हेर म्हणती नगरांत ॥ राघवा तुझे सर्व भक्त ॥ सकळ लोक पुण्यवंत ॥ यश वर्णिती सर्वदा ॥२२॥
पर रजक एक दुर्जन ॥ तेणें स्त्रीस केलें ताडन ॥ त्या रागें ती स्त्री रुसोन ॥ पितृसदनाप्रति गेली ॥२३॥
माहेरी होती बहुदिन ॥ मग पित्यानें हातीं धरून ॥ जामातगृहाप्रति नेऊन ॥ घालिता जाहला ते काळीं ॥२४॥
तंव तो रजक क्रोधायमान ॥ श्वशुराप्रति बोले वचन ॥ म्हणे ईस माझें सदन ॥ प्रवेशों नेदीं सर्वथा ॥२५॥
मी तों राम नव्हे निर्धारी ॥ रावणें नेली त्याची अंतुरीं ॥ षण्मास होती असुरघरीं ॥ तेणें माघारी आणिली ॥२६॥
आम्ही रजक शुद्ध साचार ॥ जगाचे डाग काढणार ॥ आमुचे जातींत निर्धार ॥ विपरीत ऐसें सोसेना ॥२७॥
हे अनुचित केले रघुनाथें ॥ मागुती नांदवितो सीतेतें ॥ तैसा लंपट मी नव्हे येथें ॥ वदन इचें न पाहेंचि ॥२८॥
ऐसा चांडाळ तो रजक ॥ बोलिला लावून कलंक ॥ ऐसें ऐकतां रघुनाथ ॥ परम संतप्त जाहला ॥२९॥
पाचारूनिया लक्ष्मण ॥ त्यास सांगे सकळ वर्तमान ॥ म्हणे रजक निंदिलें मजलागून ॥ जानकी त्यागीन सौमित्रा ॥३०॥
दशमुख मारूनि सहकुळीं ॥ सुवेळीं आणिली जनकबाळी ॥ विधि पुरंदर चंद्रमौळी ॥ देवमंडळी सर्व होती ॥३१॥
सकळां देखत ते वेळें ॥ जानकीनें दिव्य दाविलें ॥ अजूनि रजक लांछन बोले ॥ तें मज सोसवे निर्धारे ॥३२॥
तनु त्यागी जैसे प्राण ॥ कोप टाकी रेणुकारमण ॥ कीं संसारसंकल्प तपोधन ॥ त्यागी जैसा साक्षेपें ॥३३॥
संसारभय तत्वतां ॥ योगी टाकी जैसी ममता ॥ तैसीच त्यागीन मी सीता ॥ सुमित्रासुता सत्य हें ॥३४॥
अहिंसक हिंसा सांडिती पूर्ण ॥ कीं मौनी त्यागी वाचाळपण ॥ सत्पुरुष मनांतून ॥ परनिंदा त्यागी जैसा ॥३५॥
श्रोत्रिय त्यागी दुष्टाचार ॥ तैसी सीता त्यागीन साचार ॥ यावरी सुमित्राकुमार ॥ काय बोलता जाहला ॥३६॥
पाखांडी म्लेंच्छ दुर्मती ॥ सदा निंदती वेदश्रुती ॥ परी पंडित काय त्यागिती ॥ जनकजापती सांगे हें ॥३७॥
मुक्तांस निंदिती वायस ॥ परी टाकिती काय राजहंस ॥ दर्दुर निंदती भ्रमरास ॥ परी तो पद्मिमीस टाकीना ॥३८॥
निंदक निंदिती संतांस ॥ परी विवेकीं पूजी रात्रंदिवस ॥ तस्कर निंदिती इंदूस ॥ परी चकोर विटेना ॥३९॥
याकारणें जनकजामाता ॥ सहसा न त्यागीं गुणसरिता ॥ त्या रजकाची सत्वतां ॥ जिव्हां आतां छेदीन ॥४०॥
श्रीराम म्हणे विशेष ॥ तरी लोक निंदितील रात्रंदिवस ॥ म्हणती दंडिले रजकास ॥ अंगीं दोष म्हणोनियां ॥४१॥
आतां सौमित्रा हेंचि जाण ॥ सीता टाकीं वनीं नेऊन ॥ नाहीं तरी आपुला प्राण ॥ मी त्यागीन आतांचि ॥४२॥
ऐसें बोलतां निर्वाण ॥ तत्काळ उठिला लक्ष्मण ॥ ब्राह्मी मुहूर्ती तेव्हां सदन ॥ जानकीचें प्रवेशला ॥४३॥
परम विव्हळ होऊन ॥ जगन्मातेचे वंदिले चरण ॥ म्हणे पहावया तापसारण्य ॥ आज्ञा दीधली रघूत्तमें ॥४४॥
ऐसें ऐकतांचि श्रवणी ॥ मनी हर्षली विदेहनंदिनी ॥ म्हणे जे डोहाळे पुरवीन चापपाणी ॥ मागे वचन बोलिले ॥४५॥
साच करावया तया वचन ॥ ॥ तुम्हांसी पाठविलें लक्ष्मणा ॥ तरी पंचरात्री क्रमोन जाणा ॥ सत्वर येऊं माघारें ॥४६॥
ऐसें सौमित्रें ऐकतां कर्णीं ॥ अश्रु सांडी नयनींहूनि ॥ मनीं म्हणे आता परतोनि ॥ कैंचे येणें माउलीये ॥४७॥
असो जानकी हर्षयुक्त ॥ वस्त्राभरणें वस्तु बहुत ॥ सौभाग्येद्रव्यें सवें घेत ॥ ऋषीअंगना पूजावया ॥४८॥
मंगळभगिनी सौभाग्यसरिता ॥ रथी बैसली क्षण न लागतां ॥ लक्ष्मणें रथ झांकून तत्वतां ॥ धुरेस आपण बैसला ॥४९॥
कोणास वार्ता न कळत ॥ जान्हवीतीरा आणिला रथ ॥ तेव्हां अपशकुन बहुत ॥ जगन्मातेस जाणवती ॥५०॥


आडवे महाउरग धांवती ॥ पतिवियोग पिंगळे वदती ॥ वायस वामभागें जाती ॥ शोक सांगती अत्यंत ॥५१॥
ऐसें अपशकून देखतां ॥ मनी दचके जनकदुहिता ॥ देवराप्रति पुसे तत्वतां ॥ चिन्हें विपरीत कां दिसती ॥५२॥
तंव तो भूधरावतार ॥ सहसा नेदी प्रत्युत्तर ॥ नयनीं वहातसे नीर ॥ कंठ सद्दित जाहला ॥५३॥
सीता म्हणे बंधुसहित ॥ सुखरूप असो जनकजामात ॥ त्याचें अशुभ दुःख समस्त ॥ ते मजवरी पडो कां ॥५४॥
मग म्हणे देवरा सुमती ॥ विलोकून वन आणी भागीरथी ॥ सत्वर जाऊं अयोध्याप्रती ॥ रघुपतीस पहावया ॥५५॥
परी तो न बोलेचि सर्वथा ॥ तटस्थ पाहे रघुवीरकांता ॥ पुढें नौकेमाजी जनकदुहिता ॥ रथासहित बैसविली ॥५६॥
सुरनदी उतरूनि ते वेळीं ॥ सत्वरपैल पार नेली ॥ मागुती रथ भूमंडळी ॥ पवनवेगें चालविला ॥५७॥
परम भयंकर कानन ॥ नाहीं मनुष्याचें दर्शन ॥ सिंह सर्प व्याघ्र पूर्ण ॥ वास्तव्य करिती त्या स्थळीं ॥५८॥
सीता म्हणे वो ऊर्मिलापती ॥ कां येथें ऋषिआश्रम न दिसती ॥ कोणीकडे राहिली भागीरथी ॥ नेतां निश्चिंतीं मज कोठें ॥५९॥
विप्रवेदघोष कानीं ॥ कां ऐकूं न येती अजूनी ॥ स्वाहास्वधावषट्कारध्वनीं ॥ यागसदनीं कां न उठतीं ॥६०॥
तों गहनवनीं नेऊनि रथ ॥ सौमित्र तृणशेज करित ॥ जानकीस उतरूनि त्वरित ॥ बैसविली तये ठायीं ॥६१॥
तों भूगर्भीचें दिव्य रत्न ॥ वनिताचक्रांत मुख्य मंडण ॥ की लावण्यभूमीचें निधान ॥ वनीं लक्ष्मण टाकित ॥६२॥
तें सौंदर्यनभींचे नक्षत्र ॥ कीं त्रिभुवनींचे कृपापात्र ॥ अंगींच्या तेजे अपार ॥ वन तेव्हां उजळले ॥६३॥
चंद्री वसे सदा कलंक ॥ त्याहूनि सुंदर जानकीचे मुख ॥ चपळेहूनि अधिक ॥ अलंकार शोभती ॥६४॥
असो तृणशेजेसी सीता बैसवून ॥ सौमित्र करी साष्टांग नमन ॥ खालतें करूनियां वदन ॥ स्फुंदत उभा ठाकला ॥६५॥
प्रदिक्षणा करून लक्ष्मण ॥ पुढती दृढ धरी चरण ॥ देवराचें शुभ वचन ॥ तटस्थ ऐके जानकी ॥६६॥
सौमित्र म्हणे जगन्माते ॥ तुज वनीं सोडिलें रघुनाथें ॥ त्याची आज्ञा अलोट मातें ॥ घेऊनि आलों म्हणोनी ॥६७॥
रजकें निंदा केली म्हणोनी ॥ तुज सोडविलें घोर वनी ॥ आतां रघुपतीचे चरण मनीं ॥ आठवीत राहें सुखेंचि ॥६८॥
कमळिणी सुकुमार बहुत ॥ तयेवरी वीज पडे अकस्मात ॥ मग पद्मिणीचा होय अंत ॥ तेवीं मूर्च्छित पडे सीता ॥६९॥
रुदन करी भूधरावतार ॥ रथारूढ झाला सत्वर ॥ तेथोनि परतला ऊर्मिलावर ॥ कठिण मन करूनियां ॥७०॥
वनदेवतां वृक्ष पाषाण ॥ वारण उरग पंचानन ॥ तयांसी विनवी लक्ष्मण ॥ जानकी जतन करा हे ॥७१॥
पृथ्वी आप तेज समीर ॥ अवघियांनो जनत करा सुकुमार ॥ असो पवनवेगें सौमित्र ॥ अयोध्यापुरा पातला ॥७२॥
इकडे सीता मूर्च्छना सांवरून ॥ उघडोन पाहे पद्मनयन ॥ तों दूरी गेला लक्ष्मण ॥ उभी ठाकून हांक फोडी ॥७३॥
बाह्या उभारून तत्वतां ॥ म्हणे परत वेगें सुमित्रासुता ॥ माझा अन्याय कांही नसतां ॥ कां हो जातां टाकूनि मज ॥७४॥
सत्वर माझा वध तरी करोनी ॥ सांगा रघुपतीस जाऊनी ॥ मी एकली दुस्तर वनीं ॥ कवण्या ठाया जाऊं आतां ॥७५॥
म्हणे धांव धांव रघुनाथा ॥ म्हणोनि हांक देत जगन्माता ॥ वनीं श्वापदें वृक्ष लता ॥ तयांस गहिंवर दाटला ॥७६॥
थरथरां कांपत मेदिनी ॥ पर्वत पक्षी रडती वनीं ॥ गज व्याघ्र मूर्च्छना येऊनी ॥ दुःखेकरून पडताती ॥७७॥
हंस मुक्तहार सांडोनी ॥ सीता देखतां रडती वनीं ॥ नृत्यकला विसरोनी ॥ शिखी शोक करिताती ॥७८॥
पक्षी स्वपदें ते वेळीं ॥ सीतेवरी करिती साउली ॥ जळें चंचू भरूनि सकळी ॥ जनकजेवरी शिंपिती ॥७९॥
वनगाई पुच्छेकरून ॥ सीतेवरी घालिती पवन ॥ वनदेवता करिती रुदन ॥ सीतादेवी देखोनियां ॥८०॥
वनचरकळप कांतारीं ॥ रुदन करित दीर्घस्वरीं ॥ वैरभाव ते अवसरीं ॥ विसरती मोहशोकें ॥८१॥
हे राम हे राम म्हणोन ॥ सीता विलापें अतिगहन ॥ गुल्मलता वापी कूप जाण ॥ सरिता शोकें कांपिन्नल्या ॥८२॥
हे रामा राजीवनेत्रा ॥ मज कां त्यागिलें पवित्रा ॥ तूं दीनदयाळा पवित्रा ॥ विसरलासी ये काळीं ॥८३॥
कांहो मोकलिले एकलीतें ॥ आतां सांभाळील कोण मातें ॥ कोठें थ्ज्ञारा न दिसेचि येथ ॥ तुजविण मज राघवा ॥८४॥
काय अन्याय जाहला मजपासूनी ॥ मज टाकिलें घोरवनीं ॥ कृपासागरा चापपाणी ॥ श्रुत मज त्वां न केले ॥८५॥
जन्मोनि नेणें दोषांते ॥ स्वप्नी नातळे दुर्बुद्धीते ॥ परी जन्मांतर न कळे मातें ॥ तें कां ठाकोनि आलें भोगावया ॥८६॥
तूं अनाथबंधु करुणाकर ॥ मी दासी हीन पामर ॥ माझा न कीजे अव्हेर ॥ सकळ गण -गोत तूं माझे ॥८७॥
अगा हे श्रीदशरथी ॥ माझी करुणा नुपजे चित्तीं ॥ कैसा स्नेह सांडोनि रघुपती ॥ निष्ठुर जाहलासी मजवरी ॥८८॥
मी अज्ञान बाळ भोळें ॥ सहज पुसिलें कृपा कल्होळें ॥ त्याचें फळ कीं त्यागिले ॥ महावनी एकटें ॥८९॥
आतां जाऊं कोणीकडे ॥ कवण जिवलग येथें सांपडे ॥ जें माझें जन्मसांकडे ॥ निवारील दर्शनी ॥९०॥
रामा तूंचि बापमाय ॥ बंधु सुहृद गोत होय ॥ मम अपराध विसरून जाय ॥ अभय देईं मज आतां ॥९१॥
करुणासागरा रघुवीरा ॥ मातें उद्धरी दयासमुद्रा ॥ तुझें ध्यान असंख्यमुद्रा ॥ चित्तीं वसो माझिया ॥९२॥
तंव अयोध्यापुराा लक्ष्मण ॥ पावला तेव्हां म्लानवदन ॥ तो गुणसिंधु रघुनंदन ॥ एकांतसदनीं बैसला असे ॥९३॥
तेथें ऊर्मिलावरें जाऊनी ॥ भाळ ठेविलें रामचरणीं ॥ करुणार्णवे सीता आठवूनी ॥ अश्रु नयनीं आणिले ॥९४॥
सौमित्र म्हणे रघुराया ॥ चित्रींच्या वृक्षाची छाया ॥ स्वप्नवत् संसारमाया ॥ लटकी जैसी मुळींहूनी ॥९५॥
नावरे अत्यंत शोकसागर ॥ परी कलशोद्भव जाहला रघुवीर ॥ आचमन करूनि समग्र ॥ उगाचि मौने बैसला ॥९६॥
असो इकडे जनकनंदिनी ॥ निघाली चालत दुःखें वनीं ॥ मूर्च्छना येऊनि क्षणक्षणीं ॥ जमिनीवरी पडतसे ॥९७॥
मागुती उठे हस्त टेंकूनी ॥ रुदन करी धाय मोकलूनी ॥ म्हणे कोण्या ठायां जाऊनी ॥ राहूं आता राघवेंद्रा ॥९८॥
मी अनाथ अत्यंत दीन ॥ जरी देऊं येथे प्राण ॥ तरी आत्महत्त्या पाप गहन ॥ दुजी गर्भहत्त्या घडेल ॥९९॥
कळपांतून धेनू चुकली ॥ कीं हरिणी एकटी वनी पडली ॥ जीवनेंविण मासोळी ॥ तळमळीत जैसी कां ॥१००॥


कीं नैषधरायाची राणी ॥ पूर्वीं पडिली घोरवनीं ॥ कीं भिल्लीवेषें भवानी ॥ एकटी काननी जेवीं हिंडे ॥१॥
एक मार्ग न दिसे तेथ ॥ सव्य अपसव्य वनीं हिंडत ॥ दीर्घस्वरें रुदन करित ॥ तों नवल एक वर्तले ॥२॥
तेथें कंदमुळें न्यावयासी ॥ वना आले वाल्मीक ऋषी ॥ तो त्रिकाळज्ञानी तेजोराशी ॥ ज्याचे ज्ञानासी सीमा नाहीं ॥३॥
अवतारादि जन्मपत्र ॥ जेणें रामकथा केली विचित्र ॥ तेणें जगन्मातेचा शोकस्वर ॥ कर्णीं ऐकिला हिंडता ॥४॥
सीता देखिली दुरोनी ॥ जवळी येत वाल्मिक मुनी ॥ म्हणे आमची तपःश्रेणी ॥ प्रकट जाहली येणें रूपें ॥५॥
म्हणे कोण हे शुभकल्याणी ॥ कीं मूळ प्रकृती प्रणवरूपिणी ॥ कीं अनादिपीठनिवासिनी ॥ दर्शन द्यावया प्रकटली हे ॥६॥
मग म्हणे जवळी येऊन ॥ सांग माते आहेस तू कोण ॥ कां सेविलें घोरवन ॥ कोणें दुःख दिधले ॥७॥
मग बोले जगन्माता ॥ मी मिथिलेश्वराची दुहिता ॥ रावणांतकाची असें कांता ॥ सौमित्रें आणोनि सोडिलें वनी ॥८॥
अन्याय नसतां किंचित ॥ टाकिलें घोर अरण्यांत ॥ परदेशी आहे मी अनाथ ॥ तरी माझा तात केवळ तूं ॥९॥
मग ऋषी म्हणे वो जननी ॥ माझें नाम वाल्मिक मुनी ॥ अयोध्यानाथ कोदंडपाणी ॥ मज बरवें जाणतसे ॥११०॥
त्याचें भाष्य मी करी निरंतर ॥ मज जाणतसे मिथिलेश्वर ॥ तुझा पिता आमुचा मित्र ॥ कन्या साचार तूं माझी ॥११॥
तुज होतील दोन पुत्र पित्याहून पराक्रमी थोर ॥ तुज घातलें जेणें बाहेर ॥ त्याचा सूड घेतील ते ॥१२॥
मग जानकीस हातीं धरून ॥ गेला आश्रमा घेऊन ॥ भोंवते मिळाले ऋषिजन ॥ काय वचन बोलिले ॥१३॥
म्हणती हे कोण आहे ताता ॥ येरु म्हणती जानकी जगन्माता ॥ ऋषि म्हणती अनर्थ तत्वतां ॥ घरासी आणिला साक्षेपें ॥१४॥
आम्ही अत्यंत भोळे ब्राह्मण ॥ टाकोनि ग्राम कुटिल जन ॥ वसविलें घोर कानन ॥ येथेंही विघ्न आणिलें ॥१५॥
इचें सुंदरपण अत्यंत ॥ इजवरी अपवाद बहुत ॥ इचे पायीं आम्हांसी घात ॥ होऊं शके एखादा ॥१६॥
एक म्हणती सीता सती ॥ जरी हे असेल निश्चिती ॥ तरी येथें वळोनि भागीरथी ॥ अकस्मात आणील ॥१७॥
हे जरी नव्हे इचेनी ॥ तरी दवडावी येच क्षणीं ॥ ऐसें ऐकतां जनकनंदिनी ॥ भागीरथीस पाचारीत ॥१८॥
म्हणे सगरकुलतारक माये ॥ हरिचरणोद्भव जन्हुतनये ॥ ब्रह्मकटाह फोडून स्वयें ॥ प्रकट होसी अद्भुत ॥१९॥
कमलोद्भव कमलावर ॥ शिव इंद्रादि सकळ निर्जर ॥ सप्तऋषि मुख्य सनत्कुमार ॥ निरंतर तुज स्तविती ॥१२०॥
तुझें अणुमात्र स्पर्शतां नीर ॥ भस्म होती पापें अपार ॥ शुभ्र समुनांचा दिव्य हार ॥ हा मुकुटीं शुभ्र तेवीं दिसे ॥२१॥
हिमनग भेदोनि साचार ॥ एकसरें भरला सागर ॥ तरी मजकारणें वेगवक्र ॥ जननी धांव या पंथे ॥२२॥
ऋषी सकळ झाले भयभीत ॥ ऐसा ओघ लोटला अद्भुत ॥ आश्रम सांडोनि ऋषी पळत ॥ चित्त उद्विग्न सर्वांचे ॥२३॥
एक सीतेस करी नमन ॥ माते आश्रम जाती बुडोन ॥ आम्हांसी रक्षावया तुजविण ॥ कोणी दुजें दिसेना ॥२४॥
मग सीतेनें प्रार्थूनी ते वेळां ॥ ओघ निश्चळ चालविला ॥ सत्य सती जनकबाळा ॥ ऋषी गर्जती सर्वही ॥२५॥
सकळ ऋषी मिळोन ॥ करिती जानकीचें स्तवन ॥ म्हणती माते तुज छळून ॥ जवळी आणिली भागीरथी ॥२६॥
असो वाल्मीकें आपुले आश्रमांत ॥ जानकीतें ठेविलें तेव्हां गुप्त ॥ सकळ ऋषींचे एक मत ॥ अणुमात्र मात फुटेना ॥२७॥
नव मास भरतां पूर्ण ॥ शुभ नक्षत्र शुभ दिन ॥ माध्यान्हीं आला चंडकिरण ॥ तों प्रसूत जाहली जानकी ॥२८॥
वृद्ध ऋषिपत्न्या धांवोनि ॥ जवळी आल्या ते क्षणीं ॥ तो दोघे पुत्र देखिले नयनीं ॥ शशी तरणीं ज्यांपरी ॥२९॥
प्रथम उपजे तो धाकुटा केवळ ॥ मागुती उपजे तो वडील ॥ असो दोघे जन्मले बाळ ॥ सांवळे जावळे ते क्षणीं ॥१३०॥
वाल्मीक गेले होते स्नानासी ॥ शिष्य धांवत गेले तयांपासीं ॥ दोघे पुत्र जानकीसी ॥ जाहले म्हणून सांगती ॥३१॥
ऐसें ऐकतांच वचन ॥ येरें कुशलहू हातीं घेऊन ॥ जानकीजवळी येऊन ॥ केलें विधान शास्त्ररीतीं ॥३२॥
कुशेंकरून अभिषेकिला बाळ ॥ त्याचें नाव ठेविला कुश निर्मळ ॥ आकर्णनेत्र घननीळ ॥ प्रतिमा केवळ रामाची ॥३३॥
लवावरी निजवूनी ॥ धाकुटा अभिषेकिला तये क्षणीं ॥ त्यासी नाम लहू ठेउनी ॥ सोहळा केला वाल्मीकें ॥३४॥
शुक्ल पक्षीं वाढे चंद्र ॥ की पळोपळीं वाढे दिनकर ॥ तेवीं दोघे राघवेय सुंदर ॥ वाढूं लागले तैसेचि ॥३५॥
दोघांचे लालन पालन ॥ वाल्मीक करी अनुदिन ॥ ऋषिबाळकांत दोघेजण ॥ क्रीडा करिती निरंतर ॥३६॥
सप्त संवत्सर होतां पूर्ण ॥ वाल्मीकें सुरभी आणोन ॥ आरंभिले मौंजीबंधन ॥ मेळवूनि ऋषी बहुत ॥३७॥
चारी दिवसपर्यंत ॥ जो जो पाहिजे पदार्थ ॥ तो सर्वही कामधेनु पुरवित ॥ जाहले तृप्त अवघे ऋषी ॥३८॥
बाळ सुंदर देखोन ॥ बहु ऋषी देती वरदान ॥ वाल्मीकें वेदाध्ययन ॥ दोघांकडून करविलें ॥३९॥
षट्शास्त्री प्रवीण जाहले ॥ सकळ पुराणें करतलामलें ॥ मग रामचरित्र पढविले ॥ शतकोटी ग्रंथ केला जो ॥१४०॥
बाळांचे ज्ञान अत्यद्भत ॥ अधिकाधिक तर्क फुटत ॥ मग मंत्रशास्त्र समस्त ॥ वाल्मीकमुनि सांगे तयां ॥४१॥
मग धनुर्वेद पढवून ॥ हातीं देत धनुष्य बाण ॥ युद्धगति सांगे पूर्ण ॥ दोघेजण धरिती मनीं ॥४२॥
असो चर्तुदश विद्या चौसष्टी कळा ॥ वाल्मीक शिकवी दोघा बाळां ॥ ऋषिपुत्रांचा सवें मेळा ॥ घेऊनि दोघे हिंडती ॥४३॥
नानागोष्टी कौतुकें बोलून ॥ रंजविती जानकीचे मन ॥ कंद मुळें आणून ॥ जगन्मातेपुढें ठेविती ॥४४॥
सत्संग घडता देख ॥ प्राणी विसरे संसारदुःख ॥ तैसें जानकी विसरे सकळिक ॥ खेद मागील त्याचेनी ॥४५॥
दश वर्षें होतां पूर्ण ॥ मृगयेस जाती दोघेजण ॥ नाना श्वापदें मारून ॥ आणिती ओढून दावावया ॥४६॥
एकें दिवशी वनीं हिंडत ॥ तों पर्वतमस्तकीं ध्यानस्थ ॥ एक श़ृंगी तप करित ॥ वाल्मीकाचा बंधु तो ॥४७॥
तो मृगवेष देखोनि पूर्ण ॥ कुशें विंधिला टाकूनि बाण ॥ तत्काळ गेला त्याचा प्राण ॥ प्रेत ओढून दोघे नेती ॥४८॥
वाल्मीक पुसे जवळी येऊन ॥ काय तें आणितां ओढून ॥ येरू म्हणती मृग वधून ॥ आणिला तुम्हांकारणें ॥४९॥
त्याचें आता चर्म काढून ॥ करूं तुम्हांकारणें आसन ॥ वाल्मीक पाहे विलोकून ॥ तंव तो बंधु वधियेला ॥१५०॥

वाल्मीक म्हणे हे दोघेजण ॥ अनिवार जाहले पूर्ण ॥ बह्महत्त्या करून ॥ कैसे आलां वनांतरी ॥५१॥
बंधूचें उत्तरकार्य सकळिक ॥ विधियुक्त करोनि वाल्मीक ॥ जानकीजवळ तात्काळिक ॥ वर्तमान सांगितलें ॥५२॥
तंव बोले जानकी हांसोन ॥ ताता सूर्यवंश अतितीक्ष्ण ॥ त्यावरी सकळकळाप्रवीण ॥ तुम्हींच केलीं बाळके ॥५३॥
परम धीट अनिवार ॥ तुमचा तुम्हां फळला मंत्र ॥ आतां याच्या दोषास परिहार ॥ करावा जी समर्था ॥५४॥
तों वाल्मीक बोलें वचन ॥ सुवर्णकमळें सहस्र आणून ॥ भावें अर्चावा उमारमण ॥ तरीच जाईल ब्रह्महत्त्या ॥५५॥
तंव ते दोघे तये वेळे ॥ ताता कोठें तीं सुवर्णकमळें ॥ तीं सांगिजे येचि वेळे ॥ घेऊन येतों दोघेही ॥५६॥
मग बोले मुनीश्वर ॥ अयोध्येसमीप ब्रह्मसरोवर ॥ तेथें कमळें अपार ॥ परी रक्षिती वीर रामाचे ॥५७॥
ती ब्रह्मकमळें नेऊन ॥ राघव करितो शिवार्चन ॥ महाबळी रक्षिती पूर्ण ॥ रात्रंदिवस सभोंवते ॥५८॥
गदागदां हांसती दोघेजण ॥ कमळें आणूं न लागता क्षण ॥ तरीच तुमचे शिष्य जाण ॥ निश्चयेसीं मुनिराया ॥५९॥
तेथें कृतांत असेल रक्षण ॥ त्यासीही शिक्षा लावूं पूर्ण ॥ जरी स्वयें आला रघुनंदन ॥ त्यासही धरून आणूं येथें ॥१६०॥
धनुष्यासी लावूनि बाण ॥ चपळ चालिले दोघेजण ॥ जैसें सिंह दिसती लहान ॥ परी प्रताप अतिविशेष ॥६१॥
कीं शशी सूर्य लघु दिसती ॥ परी प्रकाशें उजळे क्षिती ॥ लहान दिसे विप्र अगस्ति ॥ परी सरितापति प्राशिला ॥६२॥
तैसे ते धाकुटे वीर ॥ वेगें पावले ब्रह्मसरोवर ॥ कुश प्रवेशोनि समग्र ॥ कमळें तेव्हां तोडीतसे ॥६३॥
तंव ते वीर खवळले ॥ लहूनें तेव्हां शर सोडिले ॥ रक्षक बहुत प्रेत केले ॥ उरले पळाले अयोध्येसी ॥६४॥
रामासी सांगती वर्तमान ॥ ऋषिबाळ आले दोघेजण ॥ ते सबळ युद्ध करूनि जाण ॥ कमळें घेऊन गेलें पैं ॥६५॥
आश्चर्य करी रघुपती ॥ पाहा केवढी बाळांची शक्ती ॥ असो इकडे दोघे निघती ॥ कमळें घेऊनि त्वरेनें ॥६६॥
वाल्मीकापुढें कमळें ठेविती ॥ ऋषि आश्चर्य करी चित्तीं ॥ तटस्थ पाहे सीता सती ॥ अद्भुत कर्तव्य बाळकांचे ॥६७॥
मग नूतन शिवलिंग निर्मून ॥ सहस्रकमळीं केले पूजन ॥ ब्रह्महत्त्येचे पाप पूर्ण ॥ निरसोन गेले तेधवां ॥६८॥
एके दिवशी दोघे जण ॥ चुरीत जो जानकीचे चरण ॥ तंव तो कुश काय वचन ॥ बोलता जाहला ते काळीं ॥६९॥
आम्ही जन्मलों कोणें देशीं ॥ कोण ग्राम कोणे वंशीं ॥ आमुचा पिता निश्चयेसीं ॥ सांगे कोण तो आमुतें ॥१७०॥
सीता म्हणे अयोध्यानगर ॥ सूर्यवंशी अजराजपुत्र ॥ दशरथनामें नृपवर ॥ प्रचंड प्रताप तयाचा ॥७१॥
त्यासी राम लक्ष्मण भरत ॥ चौथा शत्रुघ्न विख्यात ॥ त्यांत रावणांतक प्रतापवंत ॥ तो तुमचा पिता जाणिजे ॥७२॥
रजकें निंदिलें म्हणोनी ॥ बा रे मज सोडिलें घोरवनीं ॥ तेव्हां जगन्मातेचें नयनीं ॥ अश्रु आले बोलतां ॥७३॥
वर्तमान ऐकोनि समस्त ॥ दोघेही परम तप्त ॥ मग सीतेचे समाधान बहुत ॥ करिते जाहले ते काळीं ॥७४॥
तों द्वादशवर्षेपर्यंत ॥ अवर्षण पडिलें अयोध्येंत ॥ सीता सती क्षोभली अद्भुत ॥ श्री समस्त गेली पैं ॥७५॥
जैसें उद्वस कां दग्ध कांतार ॥ तैसें कलाहीन अयोध्यानगर ॥ घन न वर्षेच अणुमात्र ॥ गाई विप्र गांजले ॥७६॥
वसिष्ठास पुसे रघुनंदन ॥ कां हो पडिले अवर्षण ॥ येरू म्हणे अपराधाविण ॥ सीता बाहेर घातली ॥७७॥
जानकीऐसें चिद्ररत्न ॥ सकळ प्रतिव्रतांचें मंडण ॥ लक्ष्मी गेली निघोन ॥ तरीच अवर्षण पडियेलें ॥७८॥
तरी अश्वमेघ महायज्ञ ॥ राघवा करावा संपूर्ण ॥ घोडा पाहून श्यामकर्ण ॥ पृथ्वीवरी सोडावा ॥७९॥
मग शरयूतीरीं एक योजन ॥ मंडप घातला विस्तीर्ण ॥ दूत पाठवून संपूर्ण ॥ मुनीश्वर मेळविले ॥१८०॥
बिभीषणा आणि सुग्रीवास ॥ बोलावूं पाठवी राघवेश ॥ ते दळासहित अयोध्येस ॥ येते जाहले ते काळीं ॥८१॥
नळ नीळ अंगद जांबुवंत ॥ शरभ गवाक्ष बळ अद्भुत ॥ वानर पातले समस्त ॥ अष्टादश पद्में पैं ॥८२॥
सर्व सामग्री केली पूर्ण ॥ मग वसिष्ठ रघुनंदन ॥ अश्वशाळेंतूनि श्यामकर्ण ॥ निवडिती पूर्ण सुलक्षणी ॥८३॥
सुवर्णपत्रिका ते वेळी ॥ बांधिली श्यामकर्णाचे भाळीं ॥ वसिष्ठें त्यावरी लिहिल्या ओळी ॥ ऐका सकळ श्रोते हो ॥८४॥
अयोध्याप्रभु दशरथनंदन ॥ रावणांतक सुरबंधमोचन ॥ सकळनृपश्रेष्ठ रविकुळामंडन ॥ श्यामकर्ण सोडिला तेणें ॥८५॥
जो कोणी असेल बळवंत ॥ तेणें हा घोडा धरावा यथार्थ ॥ षोडशपद्में दळांसहित ॥ शत्रुघ्न राखित पाठीसीं ॥८६॥
घोडा पूजोनि राजीवनेत्र ॥ मस्तकीं बांधिलें दिव्य पत्र ॥ शत्रुघ्न करून नमस्कार ॥ दळभारेंसीं निघाला ॥८७॥
शत्रुघ्नासी म्हणे रघुनंदन ॥ सोळावे दिवशीं यावें परतोन ॥ सकळ पृथ्वी जिंकून ॥ नृप सांगातीं आणिजे ॥८८॥
मग सुवर्णप्रतिमा सुंदर ॥ जानकीची निर्मिली परिकर ॥ मग ते प्रतिमेसहित रघुवीर ॥ यज्ञदीक्षा घेत पैं ॥८९॥
जैसा किरणचक्रांत दिवाकर ॥ कीं निर्जरांत अमरेश्वर ॥ तैसा यज्ञमंडपीं रघुवीर ॥ ऋषींसहित शोभला ॥१९०॥
सुग्रीव बिभीषण मारुती ॥ यज्ञमंडपाभोंवते रक्षिती ॥ सुमंत भरत ऊर्मिलापती ॥ सदा तिष्ठत राघवापाशीं ॥९१॥
जे जे साम्रगी लागेल पूर्ण ॥ ते ते तत्काळ देती आणून ॥ तो सोहळा देवगण ॥ विमानी बैसोन पाहाती ॥९२॥
इकडे छप्पन्न देश जिंकित पूर्ण ॥ जात महावीर शत्रुघ्न ॥ सकळ राजे येती शरण ॥ करभार देऊनि सांगातें ॥९३॥
तेच काळीं पाताळी वरुण ॥ आरंभिता जाहला महायज्ञ ॥ तेणें वाल्मीक बोलावून ॥ नेला होता आधींच ॥९४॥
पाताळास गेला जेव्हां ऋृषी ॥ तेणें आज्ञा केली लहूसी ॥ बा रे माझिया उपवनासी ॥ रक्षावें तुवां निरंतर ॥९५॥
ऐसें बोलूनि पाताळा ॥ वाल्मीक गेले तये वेळां ॥ कुशही दूर वना प्रवेशला ॥ कंद मुळें आणावया ॥९६॥
लहू उपवन रक्षित ॥ सवें बटु बाळें बहुत ॥ नानाक्रीडा विनोद करित ॥ वृक्षछायेस बैसली ॥९७॥
अष्टवर्षीं दशवर्षीं कुमर ॥ कटी मौंजी कौपीन सुंदर ॥ मस्तकीं शिखा परिकर ॥ खेळतां उडती तयांच्या ॥९८॥
तो श्यामकर्ण धांवत । आता त्याचा पंथें अकस्मात ॥ ऋषिपुत्रास लहू दावित ॥ पाहा रे येथें घोडा कैसा हा ॥९९॥
मग सीतेसुतें धांवून ॥शेंडीसी धरिला श्यामकर्ण ॥ कपाळींचें पत्र तोडून ॥ वाचिता जाहला तात्काळीं ॥२००॥
पत्रार्थ पाहूनि समस्त ॥ लहू गदगदां हांसत ॥ बळिया काय रघुनाथ ॥ त्रिभुवनीं थोर जाहला ॥१॥
काय त्यासीच व्याली जननी ॥ काय निर्वीर जाहली अवनी ॥ तरी कैसा घोडा सोडोनी ॥ नेईल आतां पाहूं पां ॥२॥
माझी प्रतिज्ञा हेच आतां ॥ धरिला घोडा न सोडीं मागुता ॥ नातरी सीतेउदरीं तत्वतां ॥ जंत होऊनि जन्मलों ॥३॥
अश्वोत्तमाचे नेत्र पुसोन ॥ कौतुकेंकरून थापटी मान ॥ उत्तरीय चीर गळां घालून ॥ बांधोन ठेविला केळीसी ॥४॥
ऋषिपुत्रांस तेव्हा म्हणत ॥ पाहा रे घोडा कैसा नाचत ॥ तों ऋषिबाळें समस्त ॥ पोट बडविती भयेंकरूनी ॥५॥
कोण्या राजाचा घोडा आला ॥ तो तुवां बळेंचि धरिला ॥ तरी आम्ही सांगूं तयाला ॥ लहूनें बांधिला म्हणोनी ॥६॥
लहू तयांप्रति बोलत ॥ आमुचीच निश्चयें हे वस्त ॥ आपुली आपण घेतां यत्य ॥ शंका येथें कायसी ॥७॥
काळासी शिक्षा करूनियां ॥ लया पाववीन सर्व क्षत्रियां ॥ तों वीर आले धांवूनियां ॥ अश्वरक्षक पुढील जे ॥८॥
विप्रकुमर देखोन ॥ वीर पुसती दटावून ॥ कोणी रे हा श्यामकर्ण ॥ कर्दळीसीं बांधिला ॥९॥
लेकुरें बोलती भिऊन ॥ पैल किशोर आरक्तनयन ॥ आम्ही वारितांही ठेवीत बांधून ॥ त्याचेच कान कापा हो ॥२१०॥
रामविजय ग्रंथ पावन ॥ त्यामाजी लहूकुशआख्यान ॥ कथा गोड अमृताहून ॥ भक्तचतुरीं परिसावी ॥११॥
ब्रह्मानंद श्रीधरवर ॥ जानकीहृदयकमलभ्रमर ॥ अगाध तयाचें चरित्र ॥ सविस्तर संख्या शतकोटी ॥१२॥
स्वस्ति श्रीरामविजयग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकनाटकाधार ॥ सदा परिसोत भक्त चतुर ॥ सप्तत्रिंशत्तमोध्याय गोड हा ॥२१३॥
॥श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु॥  

No comments:

Post a Comment