Monday, August 26, 2013

महाराष्ट्रीयन मुलींचे खेळ - 1

कोंबडा :-

कोंबड्याचा खेळ म्हणून मुली एक खेळ खेळतात. यात मुली डाव्या पायाच्या गुडघ्यावर उजवा पाय चढवून उकिडव्या बसतात. दोन्ही तळात जुळवून गुडघ्यावर ठेवतात व कोंबड्यासारख्या उड्या मारता मारता गाणे म्हणतात.
सईबाईचा कोंबडा आला माझ्या दरी,
घालीन चारा, पाजीन पाणी,
हाकालीन वारा बिलमोगरा,
बिलाचे काटे सागर गोटे सासरच्या वाटे कुचकुच काटे,
माहेरच्या वाटे हरिख दाटे.


किकीचे पान :-

महाराष्ट्रातील लहान मुलींचा हा एक खेळ आहे. यात खेळणाऱ्या मुली एकमेकींपासून समान अंतरावर उभ्या रह्तात. नंतर सर्वजणी टाळी वाजवून दोन्ही हातांच्या टिचा कानाच्या बाजूंना लाव्तत. तसे करून त्या पाच किंवा सहा हात पुढे जातात व पुन्हा तितक्याच मागे येतात. हा खेळ खेळताना मुली जे गाणे म्हणतात ते असे-

किकीचे पान बाई की की
सागर मासा सू सू
आल्या ग बाई गुजरणी
कापुस घ्या ग पिंजरणी

केतकीचे पान बाई की की असाही एक दुसऱ्या प्रकारचा खेळ आहे. यात दोन मुली समोरासमोर एक हात डोक्यावर व दुसरा हात कमरेवर ठेवून उभ्या रह्तात. नंतर गिरकी घेवून आपल्या जागांची अदलाबदल करतात. एक बसते व दुसरी उभी रहते. त्या वेळी त्या 'केतकीचे पान बाई की की' हे गाणे म्हणतात.

आंधळी कोशिंबीर :-

लहान  मुला-मुलींचा हा एक खेळ आहे. फार पूर्वी हा खेळ केवळ मुलीच खेळत. आता मुले, मुली एकत्र किंवा वेगळे ही हा खेळ खेळतात.
यात कमीत कमी दहा खेळाडूंची आवश्यकता असते. खेळाडू प्रथम चकतात व एकावर राज्य देतत. राज्य आलेल्या मुलाचे डोळे बांधतात आणि इतर मुले त्याच्या अवतीभोवती पळतात. डोळे बांधून आंधळा झालेला मुलगा ज्याला शिवेल त्याच्यावर राज्य येते. मग त्याचे डोळे बांधून त्याला आंधळा केले जते. पहिल्या डोळे बांधलेल्या मुलाचे डोळे सोडले जातात व तो मुलगा बाकीच्या खेळाडूंप्रमाणे या नव्या आंधळ्या मुलाच्या भोवती पळू लागतो. पळताना कुणालाही मैदानाबाहेर जाता येत नाही, असा नियम असतो.

आपडी थापडी :-

महाराष्ट्रातील लहान मुलींचा हा एक खेळ आहे. मुले एकमेकिंच्या मांडीला मांडी लावून वाटोळी बसतात  आणि हातावर हात उलथे पालथे करीत व डावी उजवीकडे झुलत पुढील गाणे म्हणतात -

आपडी थापडी गुळाची पापडी
धम्मक लाडू तेल काढू
तेलंगीच एकच पान
दोन्ही हाती धरले कान / धर ग बिब्बे हाच कान .

शेवटची ओळ म्हणताच मुले एकदम बाजूच्या मुलीचा कान धरून खूप हसतात. दुसऱ्या कोणी आपला कान पकडू नये म्हणून मुले खूप खबरदारी घेतात .

No comments:

Post a Comment