अध्याय ३२
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकुलदेवतायै नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥
जय जय क्षीरसागरविहारा ॥ मत्स्यरूपिया वेदोद्धारा ॥ महाकपटिया शंखासुरा ॥ वधूनि धर्म वाढविला ॥१॥श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकुलदेवतायै नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥
मंदराचळ धरूनि पृष्ठीवरी ॥ चौदा रत्ने काढिली सागरी ॥ कूर्मवेष मधुकैटभारी ॥ भक्तकैवारी तू साच ॥२॥
रसातळा पृथ्वी जाता ॥ सकळ देवी धावा करिता ॥ वराहवेषे रमानाथा ॥ उर्वी दाढेवरी धरियेली ॥३॥
स्तंभ भेदूनि एकसरा ॥ विदारूनि टाकिले महासुरा ॥ प्रल्हादरक्षका सर्वेश्वरा ॥ नरहरिवेषधारका ॥४॥
दाने तपे व्रते बळी ॥ त्यापाशी याचक तू वनमाळी ॥ त्रिभुवन दाटले पायातळी ॥ वामनवेषा कमलेशा ॥५॥
नाही सेवक सदन पृतना काही ॥ तीन सप्तके निर्वीर मही ॥ करूनीया चिरंजीव विजयी ॥ अद्यापि पाही विचरत ॥६॥
वैश्रवणबंधु दशास्य ॥ तेणे बंदी घातले त्रिदश ॥ मग तुवा धरूनिया श्रीरामवेष ॥ अदितिपुत्र सोडविले ॥७॥
तोचि तू आनकदंदुभिसुत ॥ द्वारकाध्श मन्मथतात ॥ तांडव करूनि अद्भुत ॥ पांडव रक्षिले निजबळे ॥८॥
कलियुगी लोक परम धनांध ॥ जिंहीं जवळी रक्षिले कामक्रोध ॥ तयासी तू बोलसी बोध ॥ लीला अगाध दाविसी ॥९॥
पुढे म्लेच्छ माजती दारुण ॥ टाकिती सत्कर्मे मोडून ॥ मग तू कलंकीवेष भगवान ॥ तुरंगवहनी धावसी॥१०॥
तोचि तू सर्वेशा भीमातीरी ॥ दोन्ही कर ठेवूनि कटांवरी ॥ प्रत्यक्ष नांदसी पंढरी ॥ ब्रह्मानंदा जगद्गुरो ॥११॥
एकतिसावे अध्यायी कथन ॥ सत्यभामा आणि प्रद्युम्न ॥ सर्व यादव आणि सुपर्ण ॥ गर्वहरण केले त्यांचे ॥१२॥
यावरी एके दिवशी नारदमुनी ॥ स्नान करिता सुरनदीजीवनी ॥ तो मत्स्य आणि मत्स्यिणी ॥ रमता दृष्टी देखिली ॥१३॥
काय संसार स्त्रीविण ॥ नाही देखिले पुत्रवदन ॥ आता विवाह करावा येथून ॥ तरी स्त्री कधी वाढेल ॥१४॥
तरी आता घेऊ कृष्णदर्शन ॥ सोळा सहस्त्र रामा त्यालागून ॥ एक घ्यावी आता मागून ॥ करू संतानवृद्धि काही ॥१५॥
विसरला जप तप अनुष्ठान ॥ जवळी घेतला कमंडलु जीवन ॥ हाती ब्रह्मवीणा घेऊन ॥ मुक्तिपुरीसी पावला ॥१६॥
जे अनंतशक्तीची स्वामिनी ॥ ते आदिमाया मन्मथजननी ॥ तिचे मंदिरी शारंगपाणी ॥ बैसला होता तेधवा ॥१७॥
तेथेचि आला नारदमुनी ॥ तो दृष्टी देखिला मोक्षदानी ॥ हाती चामर घेऊनी ॥ नारी रुक्मिणी वारीतसे ॥१८॥
नारद देखता जगज्जीवने ॥ क्षेमलिंगन दिधले प्रीतीने ॥ जवळी बैसवूनि मधुसूदने ॥ पूजा केली यथाविधि ॥१९॥
हरि म्हणे जलजोद्भवनंदना ॥ काही मज करावी आज्ञा ॥ आजि स्वामींची वासना ॥ परम चंचळ दिसतसे ॥२०॥
नारद म्हणे घननीळा ॥ व्यर्थ आमुचा काळ गेला ॥ गृहस्थाश्रम नाही केला ॥ पुत्र कलत्र न देखो ॥२१॥
तरी तुज बहुत स्त्रिया जगन्मोहना ॥ मज एक देई अंगना ॥ स्त्रीदान करी त्याचिया पुण्या ॥ पार नाही सर्वथा ॥२२॥
हास्यवदन जगन्नायक ॥ म्हणे नारद मांडिले कौतुक ॥ ते समयी यादवकुळटिळक ॥ काय बोलिला ऐका ते ॥२३॥
म्हणे जे गृही नसे मी ब्रह्मनंदना ॥ तेथूनि अवश्य न्यावी ललना ॥ बरे म्हणोनि ते क्षणा ॥ सांवरोनि वीणा ऊठिला ॥२४॥
गेला दुसरिया गृहाप्रती ॥ तो तेथे बैसलासे जगत्पती ॥ उद्धव अक्रूर उभे असती ॥ विंझणे हाती घेऊनिया ॥२५॥
हरि म्हणे यावे नारदमुनी ॥ आलिंगन दिधले प्रीतीकरून ॥ म्हणे येणे जाहले कोठूनी ॥ काही आज्ञा करावी मज ॥२६॥
नारद विचारी अंतरी ॥ परम लाघवी कपटी मुरारी ॥ आता होता रुक्मिणीचे घरी ॥ आला लवकरी विवरद्वारे ॥२७॥
तेथूनि उठे नारदमुनी ॥ प्रवेशे दुसरे सदनी ॥ तो फांसे हाती घेऊनी ॥ सारीपट खेळतसे ॥२८॥
हरि म्हणे यावे नारदमुनी ॥ म्हणोनि उभा ठाके चक्रपाणी ॥ पूर्ववत पूजा करूनि ॥ क्षेमवार्ता पुसतसे ॥२९॥
नारद म्हणे नाटकी पूर्ण ॥ येथेही बैसला त्वरे येऊन ॥ मग प्रवेशे आणिक सदन ॥ तो मनमोहन निजलासे ॥३०॥
नारद प्रवेशला सदनांतरी म्हणे ॥ कोण निजला मंचकावरी ॥ येरी म्हणे स्वामी मुरारी ॥ बैसा क्षणभरी नारदमुनि ॥३१॥
तो तेथे खेळती लेकुरे ॥ दृष्टी देखिली मुनिवरे ॥ एक सदनी यादवेंद्र ॥ मंगळस्नान करीतसे ॥३२॥
एके घरी घेतले अग्निहोत्र ॥ स्वये होम देत वारिजनेत्र ॥ एके गृही वेदांतशास्त्र ॥ काढूनि वाची जगदात्मा ॥३३॥
एके घरी करीत कन्यादान ॥ कोठे करीत पुत्राचे लग्न ॥ कोठे सुना माहेरा पाठवून ॥ लेकी आणीत गोपाळ ॥३४॥
कोठे कन्या सासुरी बोळवीत ॥ सद्गद जाहलासे जगन्नाथ ॥ कोठे शास्त्रांचे मतितार्थ ॥ काढूनि सांगत भक्तांसी ॥३५॥
कोठे असे गात नाचत ॥ कोठे प्रेमे श्रवण करीत ॥ कोठे विद्याभ्यास दावीत ॥ विद्या शिकवीत पुत्रांते ॥३६॥
चतुर्दश विद्या चौसष्ट कळा ॥ गृही गृही दावीत लीला ॥ कोठे वेदघोष आगळा ॥ करी सावळा आदरे ॥३७॥
कोठे बैसला उगाचि शांत ॥ कोठे उदास विरक्त ॥ कोठे राजयोग दावीत ॥ हठनिग्रह टाकूनिया ॥३८॥
कोठे यम नियम प्राणायाम ॥ प्रत्याहार करी पुरुषोत्तम ॥ कोठे कृपण कोठे उदारपण ॥ पूर्णकाम जाहलासे ॥३९॥
कोठे आचरे कर्मकांड ॥ कोठे उपासना दावी प्रचंड ॥ कोठे ज्ञान कथी वितंड ॥ परम मूढां जीवांसी ॥४०॥
ऐसा जे गृही रिघे नारद ॥ तिकडे व्यापलासे गोविंद ॥ म्हणे विश्वव्यापक ब्रह्मानंद ॥ रिता ठाव न दिसेचि ॥४१॥
मग लज्जित जाहला ब्रह्मनंदन ॥ म्हणे विश्वव्यापक जगज्जीवन ॥ मज कर्मे नाडले पूर्ण ॥ अज्ञानआवरण पडियेले ॥४२॥
मग तैसाचि वेगे निघाला ॥ भागीरथीतीरासी आला ॥ अनुतापे तप्त जाहला ॥ स्नानासी चालिला ब्रह्मपुत्र ॥४३॥
जळी करिती अघमर्षण ॥ तो मायेने दाविले विंदाण ॥ स्त्रीस्वरूप आपण ॥ नारद जाहला तेधवा ॥४४॥
रंभेऐसे रूप सुंदर ॥ नारदी जाहला मुनीश्वर ॥ तेथे एक पुरुष आला साचार ॥ कामातुर होऊनिया ॥४५॥
तेणे संग देतांचि तत्काळ ॥ गरोदर झाली वेल्हाळ ॥ नव मास भरता समूळ ॥ प्रसूत जाहली तेधवा ॥४६॥
तत्काळ जाहले साठी पुत्र ॥ प्रभवविभवादि संवत्सर ॥ नारदमुनि करी विचार ॥ म्हणे अनर्थ थोर जाहला ॥४७॥
मज लागले स्त्रियेचे ध्यान ॥ तेचि मी जाहलो नलगता क्षण ॥ मग करीत हरिस्मरण ॥ सोडवी येथूनि दयाळुवा ॥४८॥
करितांचि कृष्णचिंतन ॥ पूर्ववत जाहला ब्रह्मनंदन ॥ बाहेर आला स्नान करून ॥ मग तप दारुण आचरला ॥४९॥
यम नियम प्राणायाम करून ॥ पावला स्वरूपी समाधान ॥ ज्ञानाग्नि धडधडीत पूर्ण ॥ दोषतृण दग्ध जाहले ॥५०॥
जैसा पर्वत संदीप्त होय ॥ मग मृगपक्षी न धरिती आश्रय ॥ तैसाचि ब्रह्मविद पाहे ॥ निःसंदेह ब्रह्मपुत्र ॥५१॥
जैसे स्वप्नींचे दोष अपार ॥ जागा होता होती संहार ॥ तैसा तो नारद ज्ञानसागर ॥ कैचा विकार उरेल पै ॥५२॥
कैसा कलंक रविमंडळी ॥ पाप नुरेचि जान्हवीजळी ॥ सदा पवित्र ज्वाळामाळी ॥ त्यासी ओवळे कोण म्हणेल ॥५३॥
धुळीने कदा न मळे अंबर ॥ की सर्वत्र फिरता निर्मळ समीर ॥ की ढेकुळ पडतां सागर ॥ न डहुळेचि कदापि ॥५४॥
नारद तोचि श्रीकृष्ण ॥ दोघांसी नाही भेदभान ॥ सावध करावया जन ॥ कौतुक पूर्ण दाविले ॥५५॥
आता ऐका सावधान ॥ द्वारकेसी काय जाहले वर्तमान ॥ रुक्मिणीचा बंधु रुक्मिया जाण ॥ भोजकटनगरी वसे पै ॥५६॥
त्याची कन्या परम सुकुमार ॥ लावण्यवल्ली नामे चतुर ॥ ते प्रद्युम्नासी दिधली सुंदर ॥ यथाविधीकरूनिया ॥५७॥
श्रीकृष्ण बळिराम रुक्मिणी ॥ छप्पन्न कोटी यादवश्रेणी ॥ रुक्मियाने नगरासी नेऊनी ॥ सोहळा केला अपार ॥५८॥
भगिनीपुत्र प्रद्युम्न ॥ त्याहीवरी तो साक्षात मदन ॥ जामात सुंदर देखोन ॥ अपार आंदणे दीधली ॥५९॥
वोहरे सांगती घेऊनी ॥ द्वारकेसी आले चक्रपाणी ॥ जो आदिपुरुषी कैवल्यदानी ॥ वेदपुराणी वंद्य जो ॥६०॥
पुढे रुक्मियाचा पुत्र ॥ रुक्मध्वज नामे शूर ॥ त्याची कन्या पद्माक्षी चतुर ॥ अनिरुद्धासी दीधली ॥६१॥
सकळ यादव आणि दळभार ॥ श्रीकृष्ण प्रद्युम्न आणि रोहिणीकुमार ॥ रुक्मिणी रेवती उखा समग्र ॥ लग्नालागी आणिल्या ॥६२॥
आनि देशोदेशीचे नृपवर भले ॥ रुक्मियाने लग्नासी आणिले ॥ यथाविधि लग्न लाविले ॥ द्रव्य वेचिले अपार ॥६३॥
वस्त्रे मंडप शोभिवंत ॥ ठायी ठायीरजतस्तंभ विराजित ॥ ते सभेसी राजे समस्त ॥ कौतुकार्थ बैसले ॥६४॥
बळिराम आणि यादव बैसले ॥ तो रुक्मिया तेव्हा काय बोले ॥ या जी द्यूत खेळो वहिले ॥ अवश्य म्हणे कृणाग्रज ॥६५॥
रुक्मिया आणि बळिराम खेळती ॥ भोवते नृप पाहती ॥ रुक्मिया म्हणे पण करा निश्चिती ॥ तरीच रंग खेळाच ॥६६॥
प्रथम केला सहस्त्राचा पण ॥ अवश्य म्हणे संकर्षण ॥ पहिला डाव भीमकनंदन ॥ जिंकिला जाहला तेधवा ॥६७॥
सहस्त्र द्रव्य ते वेळा ॥ बळिराम देता जाहला ॥ मग लक्षाचा पण घातला ॥ तो डाव जिंकिला बळिभद्रे ॥६८॥
तो रुक्मिया असत्य स्वार्थ बोले ॥ म्हणे ये वेळे म्या जिंकिले ॥ तो रेवतीवर म्हणे आगळे ॥ असत्य न बोले कपटिया ॥६९॥
रुक्मिया म्हणे तूचि असत्य ॥ म्यां डाव जिंकिला यथार्थ ॥ परम क्षोभला रोहिणीसुत ॥ मग पुसे समस्त रायांसी ॥७०॥
तेही रुक्मिया ऐसे बोलत ॥ असत्य साक्ष देती समस्त ॥ म्हणती रुक्मियाने जिंकिले यथार्थ ॥ आम्ही भोवते पाहतसो ॥७१॥
रुक्मिया म्हणे असत्य बोलता ॥ तुमचा जन्म गेला तत्त्वतां ॥ तुम्ही गोकुळी गुरे राखिता ॥ असत्य तेथे शिकलेती ॥७२॥
तुम्ही दोघे असत्याची घरे ॥ परम कपटी चोर जार ॥ कपटेंचि घेतले मथुरानगर ॥ कंसासुर वधूनिया ॥७३॥
मग कालयवनभेणे देखा ॥ समुद्रांत रचिली द्वारका ॥ कपटेंकरूनि भीमककन्यका ॥ चोरूनि नेली तस्कर हो ॥७४॥
तैसे तुम्ही पाहता येथे ॥ परी मी शिक्षा लावीन तुम्हांते ॥ द्वारका उचलूनि स्वहस्ते ॥ समुद्रामाजी टाकीन ॥७५॥
म्यां जिंकिला आता डाव ॥ साक्ष देती अवघे राव ॥ तो देववाणि अंबरी अपूर्व ॥ एकाएकी गर्जली ॥७६॥
म्हणे बळिरामे जिंकिला यथार्थ ॥ समस्त राजे पाहती चकित ॥ तव क्रोधावला रेवतीकांत ॥ परी आयुध जवळी दिसेना ॥७७॥
रुक्मिया घेऊनि खड्ग वोडण ॥ उभा ठाकला सरसावून ॥ बळिरामे मंडपाचा स्तंभ भवंडून ॥ तत्काळ हाती सरसाविला ॥७८॥
बळे भवंडून ते वेळा ॥ रुक्मियाचे मस्तकी घातला ॥ शतचूर्ण मस्तक जाहला ॥ प्राणासी मुकला तत्काळ ॥७९॥
जाहला एकचि हाहाकार ॥ राजे पळो पाहती सत्वर ॥ बळिरामे त्यांचे मुखी मुष्टिप्रहार ॥ बळेकरूनि दीधले ॥८०॥
समस्तांचे पाडिले दांत ॥ भडभडां अशुद्ध वाहत ॥ तैसेचि नृप पळाले समस्त ॥ महा अनर्थ देखोनिया ॥८१॥
निजमंडपी होता रुक्मिणीवर ॥ जो त्रिभुवनचाळक सूत्रधार ॥ तेथे धावोनि आला सत्वर ॥ तो रुक्मियाचे प्रेत देखिले ॥८२॥
मग अग्नीत शरीर घातले ॥ त्याच्या पुत्रावरी छत्र धरिले ॥ वोहरे घेऊनि ते वेळे ॥ द्वारकेसी आले रामकृष्ण ॥८३॥
यावरी जांबुवंतीचा कुमर ॥ सांब नामे परम विर ॥ महायोद्धाअनिवार ॥ तेणे विचित्र एक केले ॥८४॥
दुर्योधन हस्तिनापुरी ॥ त्याची कन्या रूपवती सुंदरी ॥ तिचेस्वयंवर होते ते अवसरी ॥ राजे समस्त मिळाले ॥८५॥
दिव्य सभा परिकर ॥ तेथे बैसले समस्त नृपवर ॥ रथारूढ होऊनि कृष्णकुमर ॥ सांब तेथे पातला ॥८६॥
तोही बैसला सबेभीतरी ॥ तंव श्रृंगारूनि आणिली नोवरी ॥ दुर्योधन म्हणे कुमारी ॥ पाहे राजे निर्धारी हे ॥८७॥
यांमाजी आवडेल जो सुंदर ॥ त्यासीच माळ घाली सत्वर ॥ ती राजे विलोकीत समग्र ॥ स्थिर स्थिर जातसे ॥८८॥
त्यातूनि सांब तत्काळ ॥ म्हणे कोणासी न कळे घालील माळ ॥ सत्वर धांवला तो चपळ ॥ उतावीळ होऊनिया ॥८९॥
तत्काळ नोवरी उचलली ॥ निमिषार्धे रथावरी घातली ॥ द्वारकापंथे ते वेळी ॥ पवनवेगे जातसे ॥९०॥
जंबुकांचे सभेमधून ॥ भाग आपुला नेत पंचानन ॥ की सुधारसघट घेऊन ॥ जात सुवर्ण अकस्मात ॥९१॥
जाहला एकचि हाहाकार ॥ आत्मदळेसी धांवती नृपवर ॥ शतबंधूंशी दुर्योधन सत्वर॥ पाठिलागा धाविन्नला ॥९२॥
कौरव म्हणती हा एवढा धीट ॥ ऐसा वंश त्याचा तिखट ॥ चोर जार परम नष्ट ॥ असत्य कपट सर्ववेषे ॥९३॥
तो अवघे राजे धांवती ॥ सांब आटोपिला समस्ती ॥ ऐसे जाणोनि त्वरितगती ॥ रथ मुरडिला कृष्णसुते ॥९४॥
क्षण नलगता धनुष्य चढविले ॥ असंभाव्य बाण सोडिले ॥ प्रेतांचे पर्वत पाडिले ॥ नवल केले तेधवा ॥९५॥
धन्य धन्य रजे म्हणत ॥ बहुतांशी एकला झुंजत ॥ मग मुख्य मिळाले समस्त ॥ अस्त्रे घालिती चहुकडोनि ॥९६॥
अंगी रुतले बहुत शर ॥ तेव्हा विकळ जाहला कृष्णकुमर ॥ मग पाश घालूनि सत्वर ॥ दुर्योधन धरियेला ॥९७॥
हस्तिनापुरासी आणूनी ॥ बंदी घातला ते क्षणी ॥ आपुलिया स्वस्थळालागूनी ॥ राजे गेले तेधवा ॥९८॥
कन्या तैसीच ठेवी घरी ॥ तो नारद गेला द्वारकापुरी ॥ हरिसी म्हणे ते अवसरी ॥ सांब पुत्र कोठे तुझा ॥९९॥
तो श्रीरंग म्हणे ते वेळे ॥ कोठे गेला आहे ते न कळे ॥ नारद म्हणे बंदिशाळे ॥ दुर्योधने रक्षिला ॥१००॥
सांगितला समस्त समाचार ॥ परम कोपला यादवेंद्र ॥ वेगे सिद्ध केला दळभार ॥ वाद्यांचे गजर लागले ॥१॥
तो पुढे कर जोडूनि प्रद्युम्न ॥ विनवी श्रीकृष्णालागून ॥ काय मशक दुर्योधन ॥ त्यावरी आपण नव जावे ॥२॥
जंबुकावरी पंचानन ॥ की अळिकेवरी सुपर्ण ॥ खद्योतावरी चंडकिरण ॥ युद्धा संपूर्ण निघाले ॥३॥
मी आता जातो जी त्वरे ॥ घेऊनि येईन दोघे वोहरे ॥ समस्त कौरवांची शिरे ॥ बंधूच्या कैवारे छेदीन ॥४॥
ऐसे बोलता मीनकेतन ॥ तो जवळी आला संकर्षण ॥ म्हणे कायसा पाठविता प्रद्युम्न ॥ मी जाऊन आणितो ॥५॥
कौरवपांडव आप्तवर्ग ॥ त्यांशी न करावा युद्धप्रसंग ॥ मग काय बोले रमारंग ॥ भोगींद्रासी तेधवा ॥६॥
जरी ते तुमचे न मानिती वचन ॥ तरी आम्ही यावे की धावोन ॥ हांसोनि बोले रेवतीरमण ॥ ऐसे जाण नव्हेचि ॥७॥
माझे वचन न मानिती पामर ॥ तरी पालथे घालीन हस्तिनापुर ॥ मग रथारूढ झाला शेषावतार ॥ उद्धव अक्रूरांसहित पै ॥८॥
मग गजपुरासमीप येउनी ॥ बळिराम राहिला उपवनी ॥ दुर्योधनासी धाडिले सांगोनी ॥ आम्हांसी भेटोनि जाइजे ॥९॥
मग समस्त बंधु घेऊन ॥ बाहेर आला दुर्योधन ॥ बळिराम भेटला उठोन ॥ सन्मान देऊन बैसविला ॥११०॥
म्हणे नेणतपणे आमुचा कुमर ॥ पाहो आला येथे स्वयंवर ॥ कन्या घेऊनि गेला सत्वर ॥ परी तुम्ही विचार नाही केला ॥११॥
समस्त मिळोनि बाळ धरिला ॥ आकर्षोनि बंदी घातला ॥ हे ऐकोनि बहुत कोपला ॥ रुक्मिणीवर तुम्हांवरी ॥१२॥
दळभार सिद्ध करून ॥ पाठवित होता तुम्हांवरी मदन ॥ मग आम्ही तयाते वारून ॥ दर्शना आलो तुमच्या ॥१३॥
तव दुर्योधन क्रोधावला बहुत ॥ तुम्ही बहुत झालेत रे उन्मत्त ॥ आमुच्या धर्मे द्वारकेआंत ॥ नांदता सुखे ते नेणा ॥१४॥
बळे करूनि न्यावी नोवरी ॥ हा कुळधर्म तुमचे घरी ॥ आम्हांसी दाविता ते परी ॥ द्वारकापुरी राहू नेदू ॥१५॥
तुमचा कृष्ण आणि प्रद्युम्न ॥ येऊ द्या युद्धालागून ॥ एक्याचि बाणेंकरून ॥ करीन कंदन समस्तांसी ॥१६॥
ऐसे बोलोनि दुर्योधन ॥ बंधूसहित गेला उठोन ॥ म्हणे दळभार सिद्ध करून ॥ द्वारकापट्टण घेऊ आता ॥१७॥
येरीकडे शेषावतार ॥ निजबळे फिरवी नांगर ॥ हस्तिनापुरासी सत्वर ॥ मध्यभागी रोविला ॥१८॥
हालविता निजबळे ॥ सकळ नगर डळमळिले ॥ सदने खचती ते वेळे ॥ लोक पळती बाहेर ॥१९॥
बाळे घेऊनि कडियेवरी ॥ नगराबाहेर धावती नारी ॥ म्हणती रसातळा जाते धरित्री ॥ कल्पांतकाळ ओढवला ॥१२०॥
मग भीष्म आणि द्रोण ॥ दुर्योधन धरी त्यांचे चरण ॥ म्हणे कोपला रेवतीरमण ॥ तो आता शांत करा जी ॥२१॥
गंगात्मज बोले उत्तर ॥ व्यर्थ धरिला त्याचा कुमर ॥ कैचा शांत होईल भोगींद्र ॥ अनिवार क्रोध तयाचा ॥२२॥
मग भीष्म द्रोण विदुर ॥ दुर्योधनादिक कौरव समग्र ॥ नगराबाहेर आले सत्वर ॥ करिती नमस्कार रामाते ॥२३॥
दुर्योधन लागे चरणी ॥ क्षमा करावी ये क्षणी ॥ राम म्हणे समुद्री नेऊनी ॥ नगर पालथे घालीन ॥२४॥
तो कौरव म्हणती तुमचा नंदन ॥ तोही आत पावेल मरण ॥ मग बोले वसुदेवनंदन ॥ रेवतीरमण तेधवा ॥२५॥
आमुचा कुमर पावता मरण ॥ तरी समुद्रचि देईल आणून ॥ कृष्णे गुरुपुत्र देऊन ॥ सांदीपन तोषविला ॥२६॥
गोकुळी असता जगज्जीवन ॥ नंद यमुनेसी करी स्नान ॥ घेउनि गेला जळी वरुण ॥ कृष्णे माघारा आणिला ॥२७॥
नंद शक्तिवनी सर्पे गिळील ॥ तो हरीने तत्काळ सोडविला ॥ द्वादश गावे अग्नि गिळिला ॥ गौळी सकळ रक्षिले ॥२८॥
अघासुर मुख पसरून ॥ म्हणे गोकुळ अवघेचि गिळीन ॥ तो कृष्णे उभा चिरोन ॥ गोपाळ अवघे रक्षिले ॥२९॥
कालियाविषोदककल्लोळे ॥ नव लक्ष गोपाळ मृत्यु पावले ॥ कृपाकटाक्षे हरीने उठविले ॥ मग दवडिले कालियाते ॥१३०॥
सातवे वर्षी गोवर्धन ॥ आंगोळियेवरी सप्त दिन ॥ त्यासी आणावया नंदन ॥ उशीर काय लागेल पा ॥३१॥
निकर देखोनि बहुत ॥ चरणी लागे गंगासुत ॥ म्हणे अन्याय जाहला तो समस्त ॥ घाली पोटात ते वेळे ॥३२॥
मग संतोषोनि बळिभद्र ॥ तत्काळ उपटिला नांगर ॥ तव बंदीचा सोडून कुमर ॥ विवाह केला यथाविधि ॥३३॥
वोहरे घेऊनि सांगाते ॥ बळिराम आला द्वारकेते ॥ वर्तमान सांगितले हरीते ॥ उद्धवअक्रूरे तेधवा ॥३४॥
यावरी धर्मराज इंद्रप्रस्थी असता ॥ अपूर्व वर्तली एक कथा ॥ द्रौपदीस पांच पति तत्त्वता ॥ पूर्वी निर्मिले श्रीव्यासे ॥३५॥
ते कथा सांगता समस्त ॥ तरी वर्णावे लागेल भारत ॥ पसरेल असंभाव्य ग्रंथ ॥ यालागी ध्वनितार्थ बोलिलो ॥३६॥
असो दौपदी वरिली पांचा जणी ॥ नारदे दिवस दिधले वाटूनी ॥ दोन मास बारा दिन सदनी ॥ एकएकाच्या वर्तत ॥३७॥
एकाचे होता पूर्ण दिन ॥ मग अग्निमाजी करी स्नान ॥ दिव्य शुचिर्भूत होऊन ॥ मग जाय दुजियाकडे ॥३८॥
जे का येती धर्माचे दिन ॥ त्यात चौघा मातेसमान ॥ असो द्विज आला धांवोन ॥ अर्जुनाजवळी सांगावया ॥३९॥
म्हणे माझ्या गाई वळूनी ॥ आता नेल्या दैत्यांनी ॥ कोण कोण सोडवील तुजवांचूनी ॥ पंडुनंदना सांग पां ॥१४०॥
गोब्राह्मण प्रतिपाळका ॥ धांवे धांवे रणपंडिता ॥ तो आवेश न धरवे कुंतीसुता ॥ सेवका शस्त्रे मागतसे ॥४१॥
सेवक म्हणती पार्थाप्रती ॥ धर्मद्रौपदी आहेत एकांती ॥ संकट पडले निश्चिती ॥ पार्थवीरास तेधवा ॥४२॥
मनामाजी विचारीत अर्जुन ॥ दैत्य करितील गोहनन ॥ आपण जाऊनि धनुष्यबाण ॥ सदनांतून आणावे ॥४३॥
पार्थ प्रवेशला सदनी ॥ ती गुंतली संभोग्यव्यसनी ॥ तो दचकली याज्ञसेनी ॥ लज्जित मनी जाहली ॥४४॥
शस्त्र घेऊनि गेला पार्थवीर ॥ रथारूढ धांवे प्रतापशूर ॥ दैत्य संहारूनि समग्र ॥ गाई सोडविल्या द्विजाच्या ॥४५॥
परतोनि आला कुंतीसुत ॥ पंडितांसी सांगे वृत्तांत ॥ स्त्रीपुरुषांचा एकांत ॥ देखता दोष काय असे ॥४६॥
तव ते विचारूनि सांगती ॥ बाळहत्या घडली त्याप्रती ॥ त्यासी प्रायश्चित्त निश्चिती ॥ तीर्थक्षेत्री हिंडावी ॥४७॥
घेऊनि धर्माची आज्ञा ॥ पार्थ चालिला तीर्थाटणा ॥ तापसी होऊनिया जाणा ॥ पार्थवीर हिंडतसे ॥४८॥
वने तपोवने शैले सरिता ॥ महानद्या जान्हवी आदि समस्ता ॥ शिवविष्णुक्षेत्रे पाहता ॥ तन्मय होय अर्जुन ॥४९॥
केदार हरिद्वार बदरी ॥ द्वादश ज्योतिर्लिंगे पृथ्वीवरी ॥ तितुकी पार्थ अनुक्रमे करी ॥ स्नाने दाने विधियुक्त ॥१५०॥
काम्यकवनी प्रवेशला पार्थ ॥ तो शिवाचे अनुष्ठानस्थल तेथ ॥ शिव नसता कुंतीसुत ॥ जावोनि बैसे ते ठायी ॥५१॥
अर्जुन बैसला ध्यानस्थ ॥ तो उमाधव पातला तेथ ॥ तापसिया देखोनि म्हणत ॥ तू कोण येथे बैसलासी ॥५२॥
मग बोले अर्जुन ॥ तुज बोलावया काय कारण ॥ शिव म्हणे माझे हे स्थान ॥ तू कोण बैसावया ॥५३॥
अर्जुन म्हणे ते वेळा ॥ काय ठाव तुझा आंखिला ॥ ऐकता विषकंठ क्षोभला ॥ म्हणे तुजलागी मारीन ॥५४॥
अर्जुने गांडीव चढविले ॥ निर्वाण बाण वरी योजिले ॥ शिवे पिनाक सांभाळिले ॥ युद्ध मांडिले निर्वाण ॥५५॥
शिवे अग्निअस्त्र टाकिले ॥ पार्थे पर्जन्यास्त्र सोडिले ॥ शिवे शक्तिअस्त्र प्रेरिले ॥ पार्थ कार्तवीर्यास सोदी ॥५६॥
असो अस्त्रे होती बहुते ॥ तितुकी घातली हिमनगजामाते ॥ अवघी निवारिली पार्थे ॥ निजसामर्थ्येकरूनिया ॥५७॥
मग संतोषला अपर्णावर ॥ म्हणे धन्य धन्य तू महावीर ॥ प्रसन्न जाहलो मागे वर ॥ नाम खूण सांग तुझे ॥५८॥
येरू म्हणे मी पंडुनंदन ॥ श्रीकृष्णदास नाम अर्जुन ॥ मग शिवे कवच किरीट कुंडले जाण ॥ प्रसाद दीधला अर्जुना ॥५९॥
मग शिवासी करूनि नमस्कार ॥ पुढे तीर्थे पाहे पंडुकुमर ॥ तव आला जेथे रामेश्वर ॥ दक्षिणसमुद्रतीराकडे ॥१६०॥
करूनिया स्नानदान ॥ घेतले रामेश्वराचे दर्शन ॥ तो तेथे अंजनीनंदन ॥ महावीर देखिला ॥६१॥
पुढे सेतु पाहिला अद्भुत ॥ शत योजने लंकेपर्यंत ॥ हनुमंतासी पुसे पार्थ ॥ कोणी सेतु बांधिला ॥६२॥
मारुति सांगे पूर्ववर्तमान ॥ या मार्गे गेला रघुनंदन ॥ तो प्रतापी रविकुळभूषण ॥ तेणे सेतु बांधिला ॥६३॥
हांसोनि बोले वीर पार्थ ॥ अहो जी रामाचे एवढे सामर्थ्य ॥ निजबाणे कां न बांधिला सेत ॥ शिळा किंनिमित्त घातल्या ॥६४॥
हनुमंत म्हणे बाणांचा सेत ॥ भंगेल हे जाणोनि रघुनाथ ॥ एकएक वानर जैसा पर्वत ॥ कैसा सेतु तगेल पै ॥६५॥
पार्थ म्हणे मज ऐसा असता ॥ तरी शरांचा सेतु बांधिता ॥ तो क्रोध आला हनुमंता ॥ बांधी तत्त्वता सेतु आता ॥६६॥
मी जरी एकला चढेन ॥ तरी तुझ्या शरांचा सेतु मोडीन ॥ पार्थ थोडासा सेतुबंधन ॥ करिता जाहला तेधवा ॥६७॥
प्रचीत पाहावया पूर्ण ॥ सेतु बांधिला एक योजन ॥ म्हणे उडी घाली बळेकरून ॥ कैसा मोडोनि पडे पाहू ॥६८॥
अर्जुन म्हणे हेचि शपथ ॥ जरी मोडोनि पडेल सेत ॥ तरी मी अग्निकाष्ठे भक्षीन सत्य ॥ तूही निश्चित बोल पा ॥६९॥
हनुमंत म्हणे मज तो नाही मरण ॥ जरी सेतु न मोडे माझेन ॥ तरी मी तुझे ध्वजी बैसेन ॥ तुजआधीन होऊनिया ॥१७०॥
मग पार्थे धनुष्य चढवूनी ॥ बाण सोडिला अभिमंत्रूनि ॥ अभंग सेतु केला ते क्षणी ॥ म्हणे मोडूनि टाकी आता ॥७१॥
हनुमंत उडोनि गगना गेला ॥ सेतुवरी येऊनि पडियेला ॥ सेतु मोडूनि चूर्ण केला ॥ मारुति गर्जला भुभुःकारे ॥७२॥
मोडिला सेतु देखोनी ॥ पार्थे धनुष्य ठेविले धरणी ॥ बहुत काष्ठे मेळवूनी ॥ ढीग केला असंभाव्य ॥७३॥
जातवेद चेतविला तत्काळ ॥ आकाशपंथे जाती ज्वाळ ॥ पार्थे स्नान करूनि सकळ ॥ नेम आपुला सारिला ॥७४॥
करूनि अग्नीसी प्रदक्षिणा ॥ ह्रदयी आठविले कृष्णध्याना ॥ किरीटकुंडलमंडितवदना ॥ पीतवसना चतुर्भुजा ॥७५॥
म्हणे श्रीकृष्णा द्वारकाधीशा ॥ हे मधुकैटभारे जगन्निवासा ॥ हे माधवा क्षीराब्धिवासा ॥ शेषशायी मुरहरा ॥७६॥
हे रुक्मिणीवल्लभा जनार्दना ॥ हे कंसारे नरकमर्दना ॥ हे मधुसूदना सुखवर्धना ॥ मन्मथजनका श्रीरंगा ॥७७॥
हे भक्तवत्सला यादवेंद्रा ॥ हे केशवा दुरितकाननवैश्वानरा ॥ हे दानवारि समरधीरा ॥ इंदिरावरा श्रीहरि ॥७८॥
हे माधवा नवपंकजपत्राक्षा ॥ अनंगदहनह्रदयसाक्षा ॥ वेदवंद्या कर्माध्यक्षा ॥ कोणा परीक्षा नव्हे तुझी ॥७९॥
तो द्वारकेसी जगन्नाथ ॥ कळले संकटी पडिला पार्थ ॥ भक्तकैवारी रमाकांत ॥ आला धावत सेतुबंधी ॥१८०॥
द्विजवेष धरिला सर्वेशे ॥ हनुमंतालागी साक्षेपे पुसे ॥ हा कोण अग्निप्रवेश करीतसे ॥ वर्तमान कैसे सांगा हे ॥८१॥
हनुमंते सांगितले वर्तमान ॥ याउपरी बोले ब्राह्मण ॥ या गोष्टीसी साक्ष कोण ॥ मजलागून सांगा ते ॥८२॥
मारुति म्हणे साक्ष नाही ॥ द्विज म्हणे असत्य सर्वही ॥ साक्ष नसता व्यर्थ पाही ॥ वेदवचन ऐसे बोले ॥८३॥
तरी मजदेखता रचा सेतु ॥ वरी उडी घाली अकस्मातु ॥ मग पार्थाहाती त्वरितु ॥ मागुता सेतु रचविला ॥८४॥
गुप्तरूपे जगज्जीवन ॥ खाली घाली सुदर्शन ॥ मग ऊर्ध्व उडे अंजनीनंदन ॥ निराळपंथे तेधवा ॥८५॥
उडी घातली अकस्मात ॥ परी तैसाचि अभंग असे सेत ॥ वरी आदळोनि हनुमंत ॥ एकीकडे पडियेला ॥८६॥
जैसा शिळेवरी गोटा पडे ॥ तो उसळोनि जाय एकीकडे ॥ पार्थ निरखूनि पाहे ब्राह्मणाकडे ॥ तो द्वारकाधीश ओळखिला ॥८७॥
ब्राह्मण म्हणे वायुसुता ॥ याचे ध्वजस्तंभी बैसे आता ॥ तेव्हा आपुले स्वरूप तत्त्वता ॥ प्रकट केले गोविंदे ॥८८॥
अर्जुनासी धरूनि वनमाळी ॥ मारुतीचे हाती देत ते वेळी ॥ म्हणे यासी तू सांभाळी ॥ कृपा करूनि सर्वदा ॥८९॥
जाहला पृथ्वीसी दैत्यभार ॥ तुम्ही आम्ही पार्थवीर ॥ करू दुष्टांचा संहार ॥ अकर्मकार सर्वही ॥१९०॥
रामावतारी तुवा सेवा करून ॥ मजवरी केला उपकार पूर्ण ॥ आता सांभाळी अर्जुन ॥ ध्वजी बैसोनि पाठी राखी ॥९१॥
तुज जिंकी ऐसा कोणी ॥ वीर नसे या त्रिभुवनी ॥ हनुमंत लागला हरिचरणी ॥ म्हणे आज्ञा प्रमाण तुझी हे ॥९२॥
गुप्त जाहला भगवान ॥ आला द्वारकावतीलागून ॥ हनुमंताची आज्ञा घेऊन ॥ चालिला अर्जुन तेथोनिया ॥९३॥
तो सुभद्रा श्रीकृष्णाची भगिनी ॥ देऊ केली होती अर्जुनालागुनी ॥ पार्थ तीर्थे करावया मेदिनी ॥ बहुत दिवस गेला असे ॥९४॥
त्यावरी बळिभद्रे केली विचारणा ॥ की सुभद्रा द्यावी दुर्योधना ॥ परी ते न ये श्रीरंगाच्या मना ॥ अंतरी वासना पार्थाकडे ॥९५॥
बळिभद्रे निश्चय केला सत्य ॥ जो आला नाही वीर पार्थ ॥ तो दुर्योधनासि द्यावी त्वरित ॥ निश्चयार्थ पूर्ण केला ॥९६॥
इच्छित श्रीकृष्णाचे मन ॥ ऐशा समयी यावा अर्जुन ॥ तो वैकुंठनाथ ब्रह्मसनातन ॥ इच्छामात्रे सर्व करी ॥९७॥
तो तीर्थे करीत पार्थे ॥ द्वारावतीसी आला अकस्मात ॥ महातापसी वल्कले वेष्टित ॥ नोळखे निश्चित कोणीही ॥९८॥
श्रीकृष्णासी हेर सांगत ॥ नगराबाहेरी एक महंत ॥ महातपोधन प्रतापवंत ॥ तीर्थे करीत पातला ॥९९॥
ऐसे ऐकता जगज्जीवन ॥ घेऊ महंताचे दर्शन ॥ द्वारकेबाहेर येऊन ॥ भेटता जाहला तापसियासी ॥२००॥
अंतरी कळली खूण ॥ आला प्राणसखा अर्जुन ॥ बाहेर पुसे तुम्ही कोण ॥ कोणे आश्रमी राहता ॥१॥
पार्थ म्हणे आम्ही ब्रह्मचारी ॥ स्वइच्छे क्रीडतो धरणीवरी ॥ हरी म्हणे आमुचे नगरी ॥ चार मास क्रमिजे पै ॥२॥
तापसी राहिला चारी मास ॥ श्रीकृष्ण आले मंदिरास ॥ सांगे वसुदेवदेकीबळिरामांस ॥ महातापसी आला असे ॥३॥
बळिराम आणि यादववीर ॥ तापसिया भेटले समग्र ॥ परी हा भगिनीचा पुत्र ॥ न जाणे कोणीही ॥४॥
प्रार्थूनिया देवकीनाथे ॥ गृहासी आणिले महंताते ॥ सर्वही भजती भावार्थे ॥ नवल तेथे वर्तले ॥५॥
रैवतकपर्वती महाशक्ती ॥ तिचे यात्रे यादव जाती ॥ संकर्षण आणि रमापती ॥ निघती उग्रसेन वसुदेव ॥६॥
श्रृंगारिला चतुरंग दळभार ॥ बळिये यादव संपत्तिसागर ॥ वाद्ये वाजति अपार ॥ सनया सुस्वर वाजती ॥७॥
देवकी मुख्य यादववनिता ॥ चातुर्यराशी सौभाग्यसरिता ॥ श्रृंगारनभींच्या विद्युल्लता ॥ दिव्ययानारूढ जाती ॥८॥
त्यामाजी श्रीरंगभगिनी ॥ सुभद्रा देखिली लावण्यखाणी ॥ देवांगना पद्मिनी नागिणी ॥ स्वरूपावरूनि ओवाळिजे ॥९॥
दमयंती सुलोचना पंचशरदारा ॥ मयकन्या रूपवती तारा ॥ जिच्या विलोकिता मुखचंद्रा ॥ लाजोनि जाती तत्काळ ॥२१०॥
ब्रह्मांडमंडप शोधिता ॥ सुंदर नाही कृष्णापरता ॥ त्याची भगिनी वसुदेवदुहिता ॥ तिचे स्वरूप अद्भुत ॥११॥
सघन नक्षत्रे नभमंडळी ॥ तैसी मस्तकी मुक्ताजाळी ॥ बिजवरा मिरवे भाळी ॥ आकर्णनेत्री सुभद्रा ॥१२॥
कविगुरुतेजांसी उणे आणी ॥ तेवी मुक्ते डोलती कर्णी ॥ उघडी आदित्यखाणी ॥ तैशी दशनी प्रभा फांके ॥१३॥
नेत्री सोगयाचे अंजन ॥ नाचे शफरीध्वज देखोन ॥ चपळेहूनि झळके वदन ॥ पायी पैंजण नेपुरे ॥१४॥
असो ऐसा चालिला दळभार ॥ यादवललना चालिल्या सुंदर ॥ सुवर्णशिबिकेत सुकुमार ॥ आरूढ होऊनि जातसे ॥१५॥
तो उभयता पार्थ कृष्ण एके रथी ॥ चमूमाजी मिरवत जाती ॥ जेवी पुरंदर आणि वाचस्पती ॥ एकासनी बैसले ॥१६॥
सुवर्णयानी सुभद्रारत्न ॥ कपिध्वज लक्षीत दुरून ॥ मजसिजेचि व्यापिले मन ॥ वेधले नयन तिकडेचि ॥१७॥
देखोनिया हास्यवदन ॥ मन्मथजनक बोले वचन ॥ अजा तटस्थ काद्रवेय देखोन ॥ तैसे पाहता कोणीकडे ॥१८॥
ब्रह्मचारी तुम्ही महंत ॥ भलतेकडे गुंतले चित्त ॥ मग म्हणे वीर पार्थ ॥ स्थिर होय ऐसे करी ॥१९॥
राजकोशींची रत्ने तत्त्वता ॥ ती केवी येती दुर्बळाच्या हाता ॥ यावरी कमलोद्भवपिता ॥ कर्णी सांगे पार्थाच्या ॥२२०॥
यात्रेहूनि परतता जाण ॥ माझिया दिव्य स्यंदनी बैसोन ॥ हरूनिया सुभद्रारत्न ॥ पवनाहून जाय त्वरे ॥२१॥
किरीटी डोलवी मान ॥ यावरी रैवताचळा जाऊन ॥ शक्ती पूजोनि वनभोजन ॥ लहानथोरी संपादिले ॥२२॥
समय पाहोनि क्षीराब्धिजानाथ ॥ धनंजयासी दावी भ्रूसंकेत ॥ तो सुभद्रेचेही चित्त ॥ पार्थस्रूपी वेधले ॥२३॥
सुभद्रा भावी मनात ॥ पार्थाऐसा दिसतो महंत ॥ नोवरी नेऊनि अकस्मात ॥ स्यंदनावरी घातली ॥२४॥
त्रुटी न वाजता अर्जुन ॥ जात सुरेशप्रस्थमार्ग लक्षून ॥ अश्व जाती मनोवेगेकरून ॥ शैव्यसुग्रीवादि चारी ॥२५॥
मागे हाक जाहली एकसरसी ॥ सुभद्रा घेऊनि गेला तापसी ॥ पुढे प्रळयजळराशी ॥ तैसे यादव धांवले ॥२६॥
प्रद्युम्नसांबादिक कृष्णकुमर ॥ म्हणती धरा धरा पळतो तस्कर ॥ देखोनि यादवांचा भार ॥ मुरडिला रहंवर अर्जुने ॥२७॥
पार्थे आपुले स्वरूप प्रकटिले ॥ जे वस्त्रभरणी मिरविले ॥ सीतासंतापहरण ते वेळे ॥ ध्वजी येऊनि बैसला ॥२८॥
गांडीवचाप टणत्कारोन ॥ सोडिले बाणापाठी बाण ॥ जैसा धारा वर्षे धन ॥ गेले भुलोन यादव ॥२९॥
दारुण अर्जुनाचा मार ॥ कोणी उभे न राहती समोर ॥ रेवतीवल्लभासी समाचार ॥ श्रुत जाहला सर्वही ॥२३०॥
तापसी नव्हे श्वेतवाहन ॥ समोर नाटोपे कोणालागून ॥ रणपंडित सुजाण ॥ यादवसैन्य मोडिले ॥३१॥
परम कोपला बळीभद्र ॥ सांवरी मुसळ नांगर ॥ मनांत हांसे श्रीधर ॥ यासी तो वीर नाटोपे ॥३२॥
परम कोपला रेवतीरमण ॥ म्हणे निष्पांडवी पृथ्वी करीन ॥ शक्रप्रस्थासी उचलून ॥ पालथे घालीन सागरि ॥३३॥
वीर क्रोधावले समस्त ॥ परी निवांतरूप पाहे अच्युत ॥ मग हलधर बोलत ॥ काय मनांत योजीतसा ॥३४॥
हरि म्हणे पूर्वीचा संकल्प होता ॥ की सुभद्रा द्यावी वीर पार्था ॥ संकर्षण म्हणे अच्युता ॥ सर्वही करणे तुझेचि हे ॥३५॥
हांसोनि बोले क्षीराब्धिजारमण ॥ किरीटीहूनि वरिष्ठ कोण ॥ सुभद्रेसारिखे रत्न ॥ आणोनि द्यावे कोणासी ॥३६॥
निंदूनिया राजहंसा ॥ मुक्ताफळे काय अर्पावी वायसा ॥ उपेक्षूनि परीक्षक डोळसा ॥ जन्मांधाहाती रत्न द्यावे ॥३७॥
पंडित सत्पात्र दवडून ॥ शतमूर्खा द्यावे अर्घ्यदान ॥ कोंदणी पाच शोभायमान ॥ चिखली रोवून व्यर्थचि ॥३८॥
सांडूनि पार्थवीर नरेश ॥ कोणता लक्षणयुक्त आहे पुरुष ॥ शक्राहूनि विशेष ॥ धैर्य वीर्य जयाचे ॥३९॥
भार्गव किंवा उमारमण ॥ तेवी धनुर्धरपंडित सुजाण ॥ तेजस्वी जैसा चंडकिरण ॥ खळदंडणी कृतांत ॥२४०॥
सौंदर्य तारुण्य देखोन ॥ खाली पाहे मीनकेतन ॥ सर्व विषयी सुलक्षण ॥ तृतीय तनय पंडूचा ॥४१॥
त्यावरी आनकदंदुभिभगिनीसुत ॥ धीर उदार प्रतापवंत ॥ ऐसा आप्त टाकूनि पार्थ ॥ कोणासी देता सुभद्रा ॥४२॥
हासोनि बोले जनार्दन ॥ जरी यासी भिडावे जाऊन ॥ अनिवार तो पंडुनंदन ॥ मजला कदा नाटोपे ॥४३॥
यादव मोडिले सकळ ॥ मज तत्काळ धरूनि नेईल ॥ मग तुम्हांसी संकट पडेल ॥ सोडवावयाचे पुढती ॥४४॥
ऐसे ऐकता वचन ॥ उगा राहिला संकर्षण ॥ वीरश्रीअनल गेला विझोन ॥ हरिवचनमेघ वर्षता ॥४५॥
तो वसुदेव देवकी येऊन ॥ करिती बळिरामाचे समाधान ॥ आम्ही सुभद्रा दिधली पार्थालागून ॥ यथाविधि लग्न करावे ॥४६॥
ऐसे समाधान केले ॥ किरीटीसी बोलावू पाठविले ॥ राम वसुदेव पुढे गेले ॥ मिरवीत आणिले पार्थासी ॥४७॥
यथासांग लग्न लाविले ॥ उग्रसेने भांडार फोडिले ॥ चारी दिवस गोड जाहले ॥ आंदण दिधले अपार ॥४८॥
मग बोळविला श्वेतवाहन ॥ निघे सवे सुभद्रा घेऊन ॥ एक संवत्सर पूर्ण ॥ पुष्करक्षेत्री क्रमियेला ॥४९॥
द्वादश वर्षे पूर्ण होता ॥ शक्रात्मज आला शक्रप्रस्था ॥ धर्मभीममाद्रीसुता ॥ ब्रह्मानंद उचंबळे ॥२५०॥
धर्मासी साष्टांग नमून ॥ आदरे दिधले आलिंगन ॥ जैसे भरत आणि रघुनंदन ॥ चतुर्दश वर्षी भेटले ॥५१॥
मघवा आलिंगी अंगिरासुत ॥ तेवी भीमें धरिला पार्थ ॥ कंठ जाहला सद्गदित ॥ एकासी एक भेटती ॥५२॥
गजास्य आणि षडास्य ॥ यांसी आलिंगी व्योमकेश ॥ तैसा नकुळसहदेवांस ॥ पार्थ भेटे प्रीतीने ॥५३॥
कृष्णजनकभगिनी ॥ साष्टांगी नमी पाकशासनी ॥ सुभद्रा समस्तांचे चरणी ॥ मस्तक ठेवी आदरे ॥५४॥
वर्तमान सर्व सांगोन ॥ सुभद्रेसी हाती धरोन ॥ पांचाळीकडे गेला अर्जुन ॥ बोले हांसोनि तेधवा ॥५५॥
अंतरी संतोष अद्भुत ॥ वरी रुसोनि द्रौपदी बोलत ॥ आता इकडे यावयाचा कार्यार्थ ॥ कांहीच नाही जाणिजे ॥५६॥
सद्यस्तप्त घृत सांडून ॥ जुनयाचे काय कारण ॥ नूतन केले परिधान ॥ राहिले जीर्ण सहजचि ॥५७॥
तो कृष्णेचिये चरणी ॥ सुभद्रा लागे प्रेमेकरूनी ॥ पांचाळीने ह्रदयी धरूनी ॥ आलिंगिली सप्रेम ॥५८॥
म्हणे माझ्या भाग्यासी नाही अंत ॥ आम्ही कृष्णभगिनी दोघी विख्यात ॥ आनंदला वीर पार्थ ॥ हर्ष गगनी न समाये ॥५९॥
ब्रह्मानंदमहाराजदिनमणी ॥ उदय पावला ह्रदयचिद्गगगनी ॥ श्रीधरसूर्यकांतवनी ॥ तो उन्मेषअग्नि प्रकटला ॥२६०॥
तेणे जाळिले दुरितकानन ॥ तो रुक्मिणीचित्तचालकघन ॥ वर्षला स्वानंदजीवन ॥ शीतळ केले सर्वत्र ॥६१॥
पांडवपाळका पांडुरंगा ॥ ब्रह्मानंदा अभंगा ॥ श्रीधरवरदायका निःसंगा ॥ कथा रसिक चालवी पुढे ॥६२॥
इति श्रीहरिविजयग्रंथ ॥ संमत हरिवंशभागवत ॥ चतुर परिसोत प्रेमळ पंडित ॥ द्वात्रिंशत्तमाध्याय गोड हा ॥२६३॥
श्रीकृष्णार्पणमस्तु॥
उत्तम उपक्रम आहे
ReplyDelete