Friday, February 8, 2013

हरिविजय - अध्याय २९

अध्याय २९
 श्रीगणेशाय नमः ॥  श्रीकुलदेवतायै नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ 
शोधितां त्रिभुवन समग्र ॥ जें जें दिसे तें मायाविकार ॥ तितुकियासी भय असे साचार ॥ नाशवंत म्हणोनिया ॥१॥
भोग बहुत भोगितां ॥ तेथें रोगाचें भय तत्त्वतां ॥ सौख्य बहुवस वाढतां ॥ दुःख सवेंचि उद्भवे ॥२॥
बहुसाल सांचितां धन ॥ राजचोरभय त्यालागून ॥ विद्या होतां परिपूर्ण ॥ वादक येऊन छळती हो ॥३॥
तपासी विघ्न करी शचीनाथ ॥ रुपवंता योषिता छळित ॥ मित्रत्व जाहलें बहु तेथ ॥ भय होत अर्थसंबंधें ॥४॥
ज्ञान जों संपूर्ण होय ॥ तेथें अभिमानाचें भय ॥ सकळांमाजी निर्भय ॥ हरीचे पाय असती ॥५॥
यालागीं अच्युतचरणउपासन ॥ निर्भय असे परिपूर्ण ॥ जें सकळ दुःखदरिद्रभंजन ॥ निर्वाणपददायक ॥६॥

अठ्ठाविसाव्या अध्यायीं कथा सुबुद्ध ॥ उखेनें वरिला अनिरुद्ध ॥ बोहरें घेऊनि गोविंद ॥ द्वारकेसी पावला ॥७॥
आधि व्याधि दुःख दरिद्र ॥ दूर करनार यादवेंद्र ॥ त्याचें भजनीं जे तत्पर ॥ त्यांसी साचार नुपेक्षी तो ॥८॥
कालयवनाच्या राज्याभीतरी ॥ हरिचरणोद्भव गंगेच्या तीरीं ॥ कपिलानाम नगरीं ॥ अवनीवरी विख्यात ॥९॥

तेथें सुदामदेव ब्राह्मण ॥ अत्यंत दरिद्री अकिंचन ॥ ज्यांचें घरीं मुष्टिभर कण ॥ संग्रह नाहीं सर्वथा ॥१०॥
नित्य करुनि कोरान्न ॥ मेळवूनि आणि कण ॥ त्यांमाजी अतिथिपूजा पंचांगग्रासकरुन ॥ यथान्याय करीतसे ॥११॥
ब्रह्मचारी यतीश्वर ॥ उपवासी किंवा निराहार ॥ नित्य दोन प्रहरां घेऊनि समाचार ॥ सुदामा विप्र भोजन करी ॥१२॥

दुसरिया दिवसालागून ॥ न उरे मुष्टिभर अन्न ॥ बाळें पीडती क्षुधेंकरुन ॥ न उरे अन्न तयांसी ॥१३॥
सुदामदेवाची गृहिणी ॥ परम पतिव्रताशिरोमणी ॥ सदा सादर पतिभजनीं ॥ शुचिष्मंत सर्वदा ॥१४॥
उभयतांचें एक चित्त ॥ गृहस्थाश्रमीं वर्तत ॥ दोघांचें अंतरीं दया बहुत ॥ सदा हेत धर्मावरी ॥१५॥
ऐसी जे स्त्री धर्मानुकूल ॥ तेचि पतिव्रता सती निर्मळ ॥ त्या घरीं राहे घननीळ ॥ लक्ष्मीसहित सर्वदा ॥१६॥

भ्रताराचें भाग्य देखती ॥ लटकीच प्रीति वरिवरी दाविती ॥ ज्या ओढाळी अत्यंत करिती ॥ भ्रताराशीं वंचनार्थ ॥१७॥
एक तोंडाळ अत्यंत ॥ एक खटयाळ मलिन बहुत ॥ भ्रतार देखतां क्षोभे मनांत ॥ तिचा त्याग अवश्य कीजे ॥१८॥
अखंड जे क्रोधमुखी ॥ दुर्भगा दुःशीला एकी ॥ घरीं सर्व असोनि ते दैन्य भाकी ॥ तिचा त्याग अवश्य कीजे ॥१९॥
दर्पण घेऊनि हातीं ॥ सदा दांत दाढा सोलिती ॥ पतिआधीं ज्या अन्न भक्षिती ॥ त्यांचा त्याग अवश्य कीजे ॥२०॥
करिती पतीची निंदा ॥ परघरीं ज्या वसती सदा ॥ ज्यांच्या बोलासी नाहीं मर्यादा ॥ त्यांचा त्याग अवश्य कीजे ॥२१॥
जारजारिणींची संगती धरी ॥ मना आवडे तेथें निद्रा करी ॥ एकली ग्रामा चाले दुराचारी ॥ तिचा त्याग अवश्य कीजे ॥२२॥
चीरें आणि अलंकार ॥ घेऊनि वेळोंवेळां करी श्रृंगार ॥ उदकीं रुप पाहे वारंवार ॥ तिचा त्याग अवश्य कीजे ॥२३॥
भलत्याशीं एकांतगोष्टी ॥ जार न्याहाळी सदा दृष्टीं ॥ सुख मानी पति होतां कष्टी ॥ तिचा त्याग अवश्य कीजे ॥२४॥
सदा उघडे पयोधर ॥ सवेंचि हांसे झांकी पदर ॥ निरिया सरसावी वारंवार ॥ तिचा त्याग अवश्य कीजे ॥२५॥
दुष्ट स्त्रियेसीं करणें संसार ॥ अज्ञान गुरु आणि मूर्ख पुत्र ॥ यजमान कृपण कपटी मित्र ॥ सुख अणुमात्र नसे तेथें ॥२६॥
धनी निर्धन षंढ भ्रतार ॥ वक्ता तामसी श्रोता पामर ॥ अंध सांगाती पंथ दूर ॥ सुख अणुमात्र नसे तेथें ॥२७॥
राजा कोपिष्ठ अविचारी प्रधान ॥ भांडारी तस्कर मोडकें सदन ॥ शिष्य अभाविक गुरु मलिन ॥ मग दुःख न्यून काय तेथें ॥२८॥
पैशुन्यवादियाचा विश्वास ॥ पोंहणाराविण धरी त्याची कांस ॥ रोगिष्ट वैद्याचे औषधास ॥ न ये यश कल्पांतीं ॥२९॥
खोटें नाणें मोडकें शस्त्र ॥ अबद्ध पुस्तक अशुचि दानपात्र ॥ पढला परी समयीं नाठवे शास्त्र ॥ त्यासी यश न ये कल्पांतीं ॥३०॥
असो सुदामदेवाची गृहिणी ॥ परम पवित्र सर्वगुणी ॥ दरिद्री पति निशिदिनीं ॥ आज्ञा नुल्लंघी तयाची ॥३१॥
आधीच दरिद्रें पीडिलीं सबळ ॥ त्यावरी पडिला दुष्काळ ॥ सत्त्व टाकिती भाग्यवंत सकळ ॥ चोर पुष्कळ सूटले ॥३२॥
लोक देशधडी जाहले ॥ दुष्काळें राष्ट्र वोस पडिलें ॥ सदनें टाकूनि लोक गेले ॥ मार्ग न चले कोठेंही ॥३३॥
वोस पडिल्या आळ्या सकळिक ॥ भरले आळीस जाती लोक ॥ आपुली झोंपडी सोडूनि देख ॥ सुदामाही चालिला ॥३४॥
तंव दरिद्रियासी ठाव तत्वतां ॥ कोणीच न देती सर्वथा जेथें जेथें घरपांग पाहतां ॥ बाहेर घालिती पिटोनी ॥३५॥
एकाचिया अंगणांत ॥ राहिला स्त्रीपुत्रांसमवेत ॥ अपत्यें अन्नाविण पीडती बहुत ॥ कोरान्न न मिळे कोठेंही ॥३६॥
जरी तृणबीज मिळे किंचित ॥ वैश्वदेवऔपासन करीत ॥ त्याहींमाजीं आला अतिथ ॥ त्यासही देत विभाग पैं ॥३७॥
लेंकरें सुंदर सगुण ॥ कृश जाहलीं दिसती दीन ॥ डोळां उरलासे प्राण ॥ पतिव्रतेचा तेधवां ॥३८॥
म्हणे मज जरी असतें माहेर ॥ तरी लेंकरें धाडितें सत्बर ॥ पतीस म्हणे तुमचा मित्र ॥ द्वारकाधीश असे कीं ॥३९॥
सुदामा म्हणे बाळपणीं ॥ परम प्रीति करी चक्रपाणी ॥ कृतांतभगिनीतीरीं जाऊनी ॥ गोरक्षण करीतसे ॥४०॥
त्याहीवरी गुरुगृहीं विद्याभ्यास ॥ मी आणि राम हृषीकेश ॥ लीलावतारी जगन्निवास ॥ कर्तव्य अद्‌भुत तयाचें ॥४१॥
गुरुपुत्र मृत्यु पावला ॥ कमलपत्राक्षें ते वेळां ॥ तात्काळ माघारा आणिला ॥ यमलोकासी जाऊनियां ॥४२॥
गृहींहूनि न जावा वैकुंठराणा ॥ सांदीपनें जाऊनि तत्क्षणा ॥ मागीतली गुरुदक्षिणा ॥ न मिळे कोणा सर्वथा ॥४३॥
मृत्यु पावला दिवस बहुत ॥ तो आणिला गुरुसुत ॥ आज्ञा घेतां रमानाथ ॥ गुरु सद्गद जाहला ॥४४॥
अवंतीनगरीं होता सांदीपन ॥ तेथें कृष्णपदांकतीर्थाभिधान ॥ अद्यापि असे सकळजन ॥ करितां स्नान मुक्त होती ॥४५॥
त्या तीर्थासमीप उत्तम ॥ अद्यापि आहे गुरुचा आश्रम ॥ तेथें श्रीकृष्णमूर्ति सप्रेम ॥ सांदीपनें स्थापिली ॥४६॥

तैंचा मित्र माझा जगज्जीवन ॥ तों पतिव्रता बोले वचन ॥ स्वामी अवश्य घ्यावें दर्शन ॥ द्वारकेसी जाऊनियां ॥४७॥
विप्र म्हणे रिक्तहस्तें ॥ कैसा भेटूं जगद्गुरुतें ॥ देवाधिदेवा नृपश्रेष्ठातें ॥ उणें तेथें काय असे ॥४८॥
मग पतिव्रता उठली ते क्षणीं ॥ शेजारिणीचे येथें जाऊनी ॥ मुष्टिभर पोहे उसणे आणूनी ॥ विप्राहातीं देतसे ॥४९॥
स्वामी हाचि शकुन होये ॥ उसणे मिळाले मुष्टि पोहे ॥ ब्राह्मण उठिला लवलाहें ॥ हर्ष न माये पोटांत ॥५०॥
मुष्टि पोहे बांधावयासी ॥ वस्त्र धड नाहीं त्यापाशीं ॥ जीर्ण चिंध्या पांघरावयासी ॥ विप्राचे मानसीं लाज वाटे ॥५१॥
ठायीं ठायीं गांठोडिया करुनी ॥ पोहे बांधिले तेचि क्षणीं ॥ जातां पतिव्रतेचिया नयनीं ॥ अश्रु आले तेधवां ॥५२॥
म्हणे स्वामी तुम्हांविण ॥ मी केवळ परदेशी अनाथ दीन ॥ लवकरी यावें परतोन ॥ म्हणोनि चरण धरियेले ॥५३॥
तृणबीज उसनें मागोनी ॥ अपत्यें जगवीन दिवस दोनी ॥ आपण हरिदर्शन घेऊनी ॥ सत्वरचि परतावें ॥५४॥
असो वेगें निघाला ब्राह्मण ॥ स्त्रियेचें समाधान करुन ॥ तों पुढें जाहलें उत्तम शकुन ॥ सव्य जाती वायस ॥५५॥

पूर्ण कलश माथां घेऊनी ॥ पुढें भेटल्या दिव्य कामिनी ॥ असो चिंध्यांचे भार पांघरोनी ॥ विप्र जात त्वरेनें ॥५६॥
मार्गीं जातां द्विजवर ॥ मनीं करी नाना विचार ॥ कृष्णाच्या द्वारीं देव समग्र ॥ जोडोनि कर उभे राहती ॥५७॥
भर्ग मित्र विधि रोहिणीवर ॥ गीष्पति धनपति त्रिदशेश्वर ॥ हे हरीच्या द्वारीं तिष्ठती निरंतर ॥ दाटी अपार राजयांची ॥५८॥

जातां कृष्णाच्या दर्शना ॥ मुकुटीं मुकुट आदळती खणखणां ॥ तेथें मज दीना ब्राह्मणा ॥ प्रवेश कैसा होईल ॥५९॥
श्रीकृष्णललना चतुरा बहुत ॥ माझा विनोद करितील समस्त ॥ मी दुर्बळ तेथें बहुत ॥ ब्राह्मण ऐसें चिंतीतसे ॥६०॥
वाटे जातां घडीघडी ॥ पाहे पोह्यांची गांठोडी ॥ मनांत म्हणे घरीं बाळें रोकडीं ॥ उपवासी मरतील ॥६१॥
ऐसा त्वरेनें जातां विप्र ॥ तंव समीप देखिलें द्वारकापुर ॥ जें विरिंचीनें रचिलें नगर ॥ ऐका सादर चतुर हो ॥६२॥
चोवीस योजनें सविस्तर ॥ रमणीय दिसे द्वारकानगर ॥ सप्त दुर्गें भोंवतीं परिकर ॥ महाविशाळ प्रचंड ॥६३॥
सुवर्णमय दुर्गें दिसती ॥ चरव्या झळकती शेषफणाकृती ॥ रजनीमाजी वाटती ॥ नक्षत्रें वरी जडियेलीं ॥६४॥
रत्‍नजडित चक्रें दिसती ॥ जैसे पंक्तीनें बैसले गभस्ती ॥ भोंवता खंदक सरितापती ॥ असंभाव्य उचंबळे ॥६५॥

जैसे कनकाद्रीचे पुत्र पाहीं ॥ तैसे हुडे झकळती ठायीं ठायीं ॥ वरवरते सर्वदाही ॥ गर्जताती कृष्णनामें ॥६६॥
वरी ठेविलीं उल्हाटयंत्रें ॥ शस्त्रें झळकताती अपारें ॥ हुडोहुडीं मंगळतुरें ॥ रात्रंदिवस गर्जती ॥६७॥
तंत वितंत घन सुस्वर ॥ वाद्यें वाजती मनोहर ॥ त्या नादें गोपुरें समग्र ॥ दुमदुमती सर्वदा ॥६८॥
दुर्गावरुनि एक पंक्ती ॥ कल्पवृक्ष दिव्य झळकती ॥ चपळेऐसे ध्वज निश्चिती ॥ लखलखती अपार ॥६९॥
महाद्वारें विशाळ झळकती ॥ नवरत्‍नांचीं चक्रें वोप देती ॥ ऐरावतारुढ अमरपती ॥ येत जात संभ्रमेसीं ॥७०॥ मठ मंडप चौबार झळकती ॥ मदालसाजडित विराजती ॥ दामोदरें उंच लखलखती ॥ सोळा सहस्त्र गोपिकांचीं ॥७१॥

शतखणी दामोदरें विशाळें ॥ वाटे आकाशासी टेंकण दिधलें ॥ कीं मित्ररथ अडखळे ॥ निराळपंथ क्रमितां हो ॥७२॥

हिरेपाचूंचीं सोपानें ॥ एकावरी एक विराजमानें ॥ अवतारचरित्रें ओळीनें ॥ भिंतीवरी जडियेलीं ॥७३॥
चर्यांवरी द्विज आणि श्वापदें ॥ रत्‍नजडित नानाविधें ॥ पाचूचे रावे विविध शब्दें ॥ कृष्णलीला गर्जती ॥७४॥
रत्‍नजडित कळस वरी ॥ अपार दिसती एकसरी ॥ खणोखणीं पुतळ्या सुस्वरी ॥ गाती नाचती संगीत ॥७५॥
त्या सर्व अंगोळिका धरुनियां ॥ गिरक्या घेती पुतळिया ॥ सर्व अलंकारीं डौरलिया ॥ सजीव त्या भासती ॥७६॥
घरोघरीं सजीव सरोवर ॥ नाना तीर्थांची कारंजीं अपार ॥ नीळरत्‍नांचे मयुर ॥ धांवताती स्वइच्छें ॥७७॥
एकाहूनि एक विचित्रें ॥ आळोआळीं सुंदर घरें ॥ गृहीं गृहीं दामोदरें ॥ प्रभाकरें लखलखती ॥७८॥
दामोदरांप्रति कळस ॥ कळसांप्रति रत्‍नकुंभ विशेष ॥ कुंभांप्रति रत्‍नें राजस ॥ त्यांवरी हंस खेळती ॥७९॥
हंसाप्रति मुखीं मुक्तमाळा ॥ भक्त भोगिती मुक्तसोहळा ॥ सोहळा हाचि होत आगळा ॥ कीर्तनीं लीला वर्णिर्ती ॥८०॥
कीर्तन ऐकतां होती सप्रेम ॥ प्रेमरंगीं उभा मेघश्याम ॥ मेघश्याम तेथें विश्राम ॥ संतजन पावती ॥८१॥
संत तेथें पूर्णज्ञान ॥ ज्ञान तेथें आनंदघन ॥ आनंद तेथें समाधान ॥ समाधानीं सुख असे ॥८२॥
सुख तेथेंचि समाधि ॥ समाधि तेथें तुटे आधि ॥ आधि तुटतां जीवउपाधि ॥ न उरेचि कोठें शोधितां ॥८३॥
उपाधि तुटतां होइजे अभेद ॥ अभेद तेथेंचि पूर्णबोध ॥ बोध तेथें ब्रह्मानंद ॥ परिपूर्ण ठसावला ॥८४॥
ऐसी द्वारका अद्‌भुत ॥ विप्र जातसे विलोकित ॥ घरोघरीं वेदध्वनीं बहुत शास्त्रचर्चा करिताती ॥८५॥
न्याय मीमांसा सांख्य अद्‌भुत ॥ पातंजल व्याकरण वेदांत ॥ घरोघरीं अष्टमहासिद्धि तिष्ठत ॥ नवनिधींसहित पैं ॥८६॥
आळोआळीं देवालयें सुरंगें ॥ दिव्य हिर्‍यांचीं विशाळ लिंगें ॥ माणिकांचे गणेश आरक्तरंगें ॥ बाळसूर्यवत दिसती ॥८७॥
दोन्हीं सुरेख हाटवटिया ॥ रत्‍ननिबद्ध वोवरिया ॥ व्यवहारिक कस्तूरी घेऊनियां ॥ यथान्यायें विकिती ॥८८॥
घरोघरीं वृंदावनें ॥ हिरियांचीं प्रकाशमानें ॥ वरी तुलसी शोभे हिरवीं पानें ॥ गरुडपाचूंचीं जेवीं जडलीं ॥८९॥
ऐसें तें द्वारकानगर ॥ सर्वलक्षणयुक्त सुंदर ॥ श्रीकृष्णसभेचें मणिमय द्वार ॥ पावला विप्र तेथवरी ॥९०॥
द्वारपाळ पुसती तूं कोण ॥ ब्राह्मण अवचितां बोले भिऊन ॥ मी कृष्णाचा बंधु पूर्ण ॥ ऐकोनि सर्व हांसती ॥९१॥
एक म्हणती आर्ष ब्राह्मण ॥ एक म्हणती सत्य वचन ॥ जगब्दंधु रमारमण ॥ आश्चर्य यांत कोणतें ॥९२॥
आडकाठी नाहीं हरीचे द्वारीं ॥ विप्र आंत गेला झडकरी ॥ तों सुधर्मसभा देखिली एकसरी ॥ जेथें मुरारी बैसला ॥९३॥
तेथें शुद्ध पाचूंचीं जोतीं ॥ वरी हिरियांचे स्तंभ झळकती ॥ माणिकांचीं उथाळीं शोभती ॥ पाहतां भूलती शशिसूर्य ॥९४॥
शातकुंभाचीं तुळवट ॥ गरुडपाचूंच्या किलच्या सदट ॥ ते सभेसी वैकुंठपीठ ॥ प्रसन्नवदन बैसला ॥९५॥
किरीटकुंडलेंमंडित पूर्ण ॥ सरळ नासिक आकर्णनयन ॥ मुख सुहास्य विराजमान ॥ पाहतांमन तन्मय ॥९६॥
कौस्तुभ वैजयंती वनमाळा ॥ चतुर्भुज मेघसांवळा ॥ पीतांबर झळके जैसी चपळा ॥ कटीं मेखळा वरी दिलसे ॥९७॥
चरणीं वांकी तोडर ॥ जो दितिजदर्पहरणसमरधीर ॥ सनकसनंदनसनत्कुमार ॥ भक्तसभाशोभित जो ॥९८॥
नारदतुंबरादि प्रमुख ॥ गाती सुस्वर अतिरसिक ॥ उद्धव अक्‍रुर द्वयभागीं देख ॥ लघु चीर उडविती ॥९९॥
वरुनि ओंवाळिजे कोटि कंदर्प ॥ तैसें दिसे हरीचें जाज्वल्य स्वरुप ॥ कीं अनंत चपळा सांडूनि तीव्र ताप ॥ ऐक्यासी आलिया ॥१००॥
ऐसा सभामंडपीं द्वारकाधीश ॥ विप्रें देखिला पुराणपुरुष ॥ द्विजाच्या अंतरीं न माये हर्ष ॥ सप्रेम पुढें चालिला ॥१॥
हरीनें द्विज देखिला नयनीं ॥ आसन सांडूनि चक्रपाणी ॥ पुढें धांविन्नला ते क्षणीं ॥ विप्राचे चरणीं मिठी घातली ॥२॥
द्विजें धरिले दोन्ही कर ॥ आलिंगनीं मिसळला सत्वर ॥ उभयतांचें नेत्रीं प्रेमपूर ॥ न धरत लोटले तेधवां ॥३॥
सुदामा बाळपणींचा मित्र ॥ अत्यंत हरीचे प्रीतिपात्र ॥ म्हणूनि हृदयीं राजीवनेत्र ॥ दृढ धरी न सोडीच पैं ॥४॥
ऐसें आलिंगन दोघांजणीं ॥ दिधलें परी न पुरे धणी ॥ मग हरीनें विप्र हातीं धरुनी ॥ आपुलें आसनीं बैसविला ॥५॥
विप्राचें चरणप्रक्षालन ॥ करी रुक्मिणीमनमोहन ॥ म्हणे वाटेनें चालतां चरण ॥ बहुत तुमचे भागले ॥६॥
पूजा करुनि सकळ ॥ वाद्यगजरेंसीं घननीळ ॥ विप्राचा हस्त धरुनि तत्काळ ॥ सभा विसर्जूनि चालिला ॥७॥
रुक्मिणीच्या गृहाप्रति देख ॥ चालिला जलजोद्भवाचा जनक ॥ रत्‍नजडित डोल्हारा सुरेख ॥ त्यावरी बैसती दोघेही ॥८॥
सुदामदेव ते अवसरीं ॥ चिंध्यांचे भार सांवरी ॥ पोह्याची गांठोडी झडकरी ॥ चांचपोनि पाहतसे ॥९॥
दूतीप्रति म्हणे चक्रपाणी ॥ सत्वर बोलावीं रुक्मिणी ॥ येरी निघोनि तेचि क्षणीं ॥ त्रिभुवनजननीजवळी आली ॥११०॥

तंव भ्रूसंकेतेंकरुनी ॥ दूतीप्रति पुसे रुक्मिणी ॥ येरी म्हणे शारंगपाणीं ॥ बोलाविती आपणातें ॥११॥
पुसे हरीजवळी आहे कोण ॥ येरी म्हणे एक दीन ब्राह्मण ॥ चिंध्यांचे भार दरिद्री पूर्ण ॥ त्यासी जगज्जीवन भेटले ॥१२॥
त्यासी न विसंबती क्षणभरी ॥ बैसविला डोल्हारियावरी ॥ ऐसें ऐकतां भीमककुमारी ॥ उठे झडकरी तेधवां ॥१३॥
विद्युल्लता जैसी झळकत ॥ तैसा अंचळ भूमीवर रुळत ॥ हंसगती चमकत ॥ हरीजवली पातली ॥१४॥
हरिपदीं करुनि नमन ॥ सवेंचि वंदिला तो ब्राह्मण ॥ येरु देत आशीर्वचन ॥ अनंत कल्याण तुजलागीं हो ॥१५॥
श्रीरंग म्हणे रुक्मिणीसी ॥ जैसा बळिभद्र बंधु आम्हांसी ॥ तैसाचि गुरुबंधु निश्चयेंसीं ॥ सुदामदेव जाणिंजे ॥१६॥
येरी म्हणे जैसा गोरक्षक ॥ तैसेंचि दिसतें याचें मुख ॥ आपुला बंधु होय निःशंक ॥ बाळपणींचा वाटतसे ॥१७॥
आजिपर्यंत हें रत्‍न ॥ होतें कोठें ठेविलें झांकून ॥ हरि म्हणे करीं पूजन ॥ आपुल्या हस्तेंकरुनियां ॥१८॥
येरी म्हणे द्वारपाळांनीं येतां ॥ पूजा केली असेल तत्त्वतां ॥ हांसें आलें जगन्नाथा ॥ म्हणे विनोद सर्वथा न कीजे ॥१९॥  रुक्मिणीनें उदक आणूनि ॥ विप्रपद धुतले ते क्षणीं ॥ म्हणे गुरें राखिलीं बाळपणीं ॥ हिंडतां वनीं उलल्या टांचा ॥१२०॥ मग नापित आणूनी ॥ श्मश्रुकर्म करविले ते क्षणीं ॥ नेसावया उत्तम पडदाणी ॥ देती आणूनी तेधवां ॥२१॥
त्याच्या चिंध्या गोळा करुन ॥ ग्रंथि बांधी जगज्जीवन ॥ रुक्मिणीसी म्हणे मनमोहन ॥ बहुत जतन करुन ठेवी ॥२२॥
मार्जन जाहलिया सत्वर ॥ द्विजासी दिधलीं वस्त्रें अलंकार ॥ यादव भोजना बोलाविले समग्र ॥ श्रीकरधरें तेधवां ॥२३॥
सोळा सहस्त्र गोपी नारी ॥ बोलाविल्या त्या अवसरीं ॥ ब्राह्मणाची वार्ता घरोघरीं ॥ श्रुत जाहली तेधवां ॥२४॥
आश्चर्य करिती गोपिका ॥ थोर लहान नाहीं वैकुंठनायका ॥ दीनजनांचा पाठिराखा ॥ ब्रीद साच हरीचें ॥२५॥
तत्काळ रुक्मिणीच्या सदना ॥ आल्या सोळा सहस्त्र ललना ॥ नमस्कारिती ब्राह्मणा ॥ एक मृगनयना हांसती ॥२६॥
आशीर्वाद देतां भागला विप्र ॥ गोपींची दाटी जाहली थोर ॥ म्हणती भावोजी सत्वर ॥ कंचुक्या आणा आम्हांतें ॥२७॥
एक म्हणती आशीर्वाद पाहीं ॥ यांनीं फुकाचा दिधला नाहीं ॥ येथें कुंचक्या कैंच्या कांहीं ॥ पुरवितील तें कळेना ॥२८॥
छपन्न कोटी यादवांसहित ॥ भोजना बैसला रमानाथ ॥ तितुक्यांसी रुक्मिणी वाढीत ॥ जैसी तळपत चपळा ते ॥२९॥
जैसें आंसांत चक्र फिरे ॥ तैसी भीमकी वाढी त्वरें ॥ चुडे झळकती एकसरें ॥ उजेड पडे सर्वांवरी ॥१३०॥
जेथें वाढीत जगन्माता ॥ देवांसी दुर्लभ तें अन्न तत्त्वतां ॥ वर्णावें कासया आतां ॥ व्यर्थ ग्रंथ कां वाढवूं ॥३१॥
असो भोजन झालिया ते क्षणीं ॥ विडे दिधले त्रयोदशगुणी ॥ मग श्रीकृष्ण म्हणे विप्रालागुनी ॥ आम्हांसी वहिनीनें काय धाडिलें ॥३२॥
अष्ट नायिका जेवूनि सर्वही ॥ हरीपाशीं आल्या पाहीं ॥ भावोजीनें आणिलें असेल कांहीं ॥ गांठोडें लवलाहीं आणिलें ॥३३॥
रुक्मिणी खूणगांठी दावीत ॥ म्हणे बंधूची संपत्ति पहा त्वरित ॥ श्रीकृष्ण स्वहस्तें सोडीत ॥ गोपी पाहती भोंवत्या ॥३४॥
मग गांठोडिया सोडून सकळिक ॥ पोहे घेत जगन्नायक ॥ एक ग्रास मुखीं घेतला देख ॥ तंव हस्त धरी रुक्मिणी ॥३५॥
मनांत तर्क करी रुक्मिणी ॥ तीन ग्रास पोहे भक्षूनी ॥ त्रिभुवनांचें राज्य यालागूनी ॥ देईल आतां परमात्मा ॥३६॥
म्हणवूनि एक ग्रास घेतां गोविंदें ॥ रुक्मिणीनें हस्त धरिला विनोदें ॥ म्हणे भोंवतीं ललनांचीं वृंदें ॥ त्यांसी प्रसाद देइंजे ॥३७॥
तों सत्यभामा म्हणे ते क्षणीं ॥ आहों सोळा सहस्त्र जणी ॥ एक एक दाणा मोडूनी ॥ वांटितांही पुरेना ॥३८॥
म्हणे वो द्विजवरा एक ऐकावें ॥ पुनरपि गांवासी परतोनि जावें ॥ अवघ्यांपुरते पोहे आणावे ॥ ऐशाचि ग्रंथी बांधोनियां ॥३९॥
पोहे न देतां निवाडें ॥ नेदूं तुमचें गांठोडें ॥ कालिंदी म्हणे कासया कोडें ॥ इतुकें यांसी घालितां ॥१४०॥
इतुकेंचि करा सुदामदेवा ॥ कंचुक्यांचा विचार पहावा ॥ आम्हां अवघियां गौरवा ॥ नाहींतरी गांवा जाऊं नेदूं ॥४१॥
तों जाबुवंती म्हणे ते क्षणीं ॥ या चिंध्यांच्या तारा वेगळ्या करुनी ॥ घ्या वांटूनि अवघ्याजणी ॥ कांहीं मनीं रुसूं नका ॥४२॥
तों लक्ष्मणा म्हणे विप्रातें ॥ कुंकुमचि द्यावें आम्हांतें ॥ तों मित्रविंदा म्हणे द्विजातें ॥ पहा वरतें आम्हांकडे ॥४३॥
आजिचा दिवस क्षमा केली जाणा ॥ उदयीक पहा चोळ्यांची विचारणा ॥ याज्ञजिती म्हणे वो ब्राह्मणा ॥ गांठोडें ठेवा मजपाशीं ॥४४॥
भद्रावती म्हणे चोरुनी ॥ धोतराच्या तारा जाईल घेऊनी ॥ म्हणे भावोजी गांठोडयासी खूणगांठ देऊनी ॥ माझ्याचि आधीन करावें ॥४५॥
तंव रेवती म्हणे यादवेंद्रा ॥ या गांठोडयावरी करावी खूणमुद्रा ॥ बंधूचें ठेवणें जतन करा ॥ ऐकतां श्रीधरा हास्य आलें ॥४६॥
मग श्रीकृष्णें गांठोडें बांधिलें ॥ रुक्मिणीच्या स्वाधीन केलें ॥ सत्यभामा म्हणे तंतु मोजिले ॥ आहेत किती ते श्रीरंगा ॥४७॥
लज्जित खालीं पाहे विप्र ॥ कोणासी नेदी प्रत्युत्तर ॥ सत्यभामेसी म्हणे दामोदर ॥ किती विनोद कराल गे ॥४८॥
हा बळिरामापरीस अधिक ॥ सुदामा बंधु माझा देख ॥ सभे बैसला जगन्नायक ॥ सुदाम्यासी घेऊनियां ॥४९॥
वस्त्रें करोनि केशरी ॥ मृगमदाचे ठसे त्यावरी ॥ नेसल्या सोळा सहस्त्र नारी ॥ वास अंबरीं न समाये ॥१५०॥
तों सभेसी आलीं कळापात्रें ॥ श्रीची लीला वर्णिती विचित्रें ॥ त्या गौरविल्या राजीवनेत्रें ॥ वस्त्रें भूषणें देवोनियां ॥५१॥
सभारंग झालिया वरि ॥ सुदामदेवा धरुनि करीं ॥ श्रीहरि प्रवेशले मंदिरीं ॥ मंचकावरी निजविला ॥५२॥
ब्राह्मणासी आपुले हातें ॥ रगडिलें श्रीकृष्णनाथें ॥ हृदयीं धरिलें द्विजपदांतें ॥ श्रीवत्सलांछन मिरवी जो ॥५३॥
ब्राह्मणसेवा नारायण ॥ स्वयें करीतसे आपण ॥ जो ब्राह्मणाचा करी अपमान ॥ तो अनेक पतनें भोगील ॥५४॥
ब्राह्मणतीर्थ नित्य घेतां ॥ महारोग जाती तत्त्वतां ॥ जो पुरवी ब्राह्मणमनोरथां ॥ रमानाथा आवडे तो ॥५५॥
धन धान्य वस्त्रें अलंकार ॥ देवोनि सुखी करिती विप्र ॥ त्यांचे मंदिरीं श्रीधर ॥ राहे सदा सर्वदा ॥५६॥
समयीं आलिया ब्राह्मण ॥ त्यासी अगत्य द्यावें भोजन ॥ यथाशक्ति द्यावें दान ॥ तेणें जगज्जीवन संतोषे ॥५७॥
नेणे कांहीं आचारविचार ॥ एक ब्राह्मणभक्ति उदार ॥ कंसारि त्याचा संसार ॥ आपण अंगें गोड करी ॥५८॥
ब्राह्मनाचा अपमान ॥ सत्पात्रीं नेदी कदा दान ॥ वेश्येसी अर्पी अर्थ प्राण ॥ तो वैरी पूर्ण श्रीहरीचा ॥५९॥
जयाचे मुखीं तृप्त जगन्नाथ ॥ आणि हृदयीं मिरवी पदांकित ॥ त्याचा जो अव्हेर करीत ॥ तो वैरी पूर्ण श्रीहरीचा ॥१६०॥
नावडे श्रवण कीर्तन ॥ सत्यमागम द्विजपूजन ॥ ब्राह्मण देखतांचि विटे मन ॥ तो वैरी पूर्ण श्रीहरीचा ॥६१॥
कीर्तनीं जाय तों निद्रा येत ॥ सदा सर्वदा व्यसनासक्त ॥ सत्यपात्र देखतांचि विन्मुख होत ॥ तो वैरी पूर्ण श्रीहरीचा ॥६२॥
मी एक विष्णुभक्त बहुत ॥ म्हणोनि शिवाची निंदा करीत ॥ शिवभक्त येतां तिरस्कारीत ॥ तो वैरी पूर्ण श्रीहरीचा ॥६३॥
मी शिवभक्त सदाचारी ॥ म्हणोनि विष्णूची निंदा करीं ॥ जो गुरुवचनीं विश्वास न धरी ॥ तो वैरी पूर्ण श्रीहरीचा ॥६४॥
हें असो बोलणें बहुत ॥ श्रीहरि सुदाम देवाचे पाय चुरीत ॥ विप्र धरी हरीचे हस्त ॥ म्हणे तूं रमानाथ जगद्‌गुरु ॥६५॥
हरि पहुडला मंदिरीं ॥ मन्मथजननीचे सेजेवरी ॥ निद्रा न येचि मुरारी ॥ चिंता करी तेधवां ॥६६॥
म्हणे रुक्मिणी परियेसीं ॥ सुदामयाचें कुटुंब उपवासी ॥ अन्नाविण अहर्निशीं ॥ पीडताती अपत्यें ॥६७॥
सेजे उठोनि गोविंद ॥ जो जगद्‌गुरु मूलकंद ॥ विश्वकर्म्यासी परमानंद ॥ आज्ञा करीत तेधवां ॥६८॥
म्हणे द्वारकपुरी सुंदर ॥ तसेंचि करीं सुदामपुर ॥ सर्व संपदा भरोनि सत्वर ॥ शीघ्र येईं रजनीमाजी ॥६९॥

ऐसें सुवर्णनगर चांगलें ॥ तत्काळ तेणें रचिलें ॥ सर्व संपदा भरिल्या ते वेळे ॥ विचित्र केलें तेधवां ॥१७०॥
असो एक मासपर्यंत ॥ सुदाम्यासी राहविलें तेथ ॥ घरोघरीं विप्रासी नेत ॥ पाहुणेर करावया ॥७१॥
सत्यभामादि समस्त नारी ॥ नित्य सोहळा करिती घरोघरीं ॥ विप्र अत्यंत चिंता करी ॥ कुटुंबाची तेधवां ॥७२॥
हरीसी विनवी सुदामा ॥ आतां आज्ञा द्यावी जी आम्हां ॥ हरि म्हणे विप्रोत्तमा ॥ अवश्य जावें आतांचि ॥७३॥
परी एक ऐका जी सुदामदेवा ॥ हे अलंकार वस्त्रें फेडूनि ठेवा ॥ चिंध्यांचें गांठोडें तेधवां ॥ जवळी ठेविलें विप्राचे ॥७४॥
ब्राह्मणें चिंध्या घेऊनी ॥ वस्त्रें अलंकार ठेविले तेचि क्षणीं ॥ परम शीण पावला मनीं ॥ म्हणे कर्माची करणी दुर्धर ॥७५॥
आम्हांसी भोगणें पूर्ण दरिद्र ॥ त्यासी काय करील यादेवेंद्र ॥ शिवाआंगीं जडले फणिवर ॥ परी समीर आहार चुकेना ॥७६॥
कीं शिवमस्तकीं मृगांक ॥ परी न जाय त्याचा कलंक ॥ माझें अदृष्ट पाठमोरें देख ॥ कमलानायक काय करी ॥७७॥
घेऊनि चिंध्यांचे भार ॥ दडदडां चाले विप्र ॥ बाळवीत आला यदुवीर ॥ नगराबाहेर बंधूसी ॥७८॥
विप्र सद्गद होऊनी ॥ म्हणे जी रहावें आतां शारंगपाणी ॥ मग श्रीकृष्णमूर्ति विलोकनी ॥ अश्रु नयनीं आणिले ॥७९॥
आज्ञा घेऊनि त्वरित ॥ वेगें विप्र असे जात ॥ म्हणे जाहला असेल कुटुंबघात ॥ एक मास लोटला ॥१८०॥
नगराजवळीं आला त्वरित ॥ तों द्वारकावती समीप आली वाटत ॥ दिव्य दामोदरें लखलखत ॥ कळस झळकत चहूंकडे ॥८१॥
म्हणे रे जगदीशा चुकलों पंथ ॥ कीं दृष्टि तरळते निश्चित ॥ अहा कृष्णा मी जाहलों भ्रमित ॥ आपआपणातें विसरलो ॥८२॥
वेडावला पाहे ब्राह्मण ॥ कां मी द्वारकेसी आलों परतोन ॥ तंव लोक येती गांवांतून ॥ त्यांसी विप्र पुसतसे ॥८३॥
ग्रामाचें नाम सांगा झडकरी ॥ लोक म्हणती हे सुदामपुरी ॥ ब्राह्मण म्हणे अंतरीं ॥ विनोद करिती माझा हे ॥८४॥
तों भेटले गोरक्षक समोर ॥ त्यांसी पुसे हें कोणाचें खिल्लार ॥ येरु म्हणती सुदामदेव विप्र ॥ त्याचीं साचार गोधनें हीं ॥८५॥
मग ब्राह्मण चहूंकडे पाहे स्तब्ध ॥ म्हणे हे अवघेचि करिती विनोद ॥ तंव दळभार करुनि सिद्ध ॥ प्रधान येती सामोरे ॥८६॥

गज तुरंग महारथ ॥ देखोनि ब्राह्मण भयभीत ॥ म्हणे माझें कुटुंब समस्त ॥ काय जाहलें कळेना ॥८७॥
माझी झोंपडी होती ये स्थळीं ॥ ती कोणीं मोडूनि टाकिली ॥ माझी बाळें बहुतेक मेलीं ॥ महादुष्काळेंकरुनियां ॥८८॥

तंव जवळीं आले प्रधान ॥ करिती साष्टांग नमन ॥ दिव्य देह पावला ब्राह्मण ॥ जाहला सुलक्षण नृपवर ॥८९॥
दिव्य वस्त्रें अलंकार ॥ प्रधान लेवविती सत्वर ॥ पुढें होत वाद्यांचा गजर ॥ तंव प्रजा समस्त नमस्कारिती ॥१९०॥
गजस्कंधीं बैसविला विप्र ॥ मागें पुढें वेष्टित दळभार ॥ मिरवित चालिला निजमंदिर ॥ तंव पुढें पुत्र देखिले ॥९१॥
सुलक्षण अतिसुंदर ॥ लेवविलीं वस्त्रें अलंकार ॥ मनांत आनंदला विप्र ॥ म्हणे श्रीधर तुष्टला ॥९२॥
तंव बाहेर आली ती ललना ॥ जैसी स्वर्गाहूनि उतरली देवांगना ॥ वेगें करी निंबलोणा ॥ लागे चरणां पतीच्या ॥९३॥
प्रधानीं मुहूर्त पाहोनी ॥ विप्र बैसविला सिंहासनीं ॥ वरी छत्र धरियेलें ते क्षणीं ॥ तो उत्साह पाहती जन ॥९४॥
जैसा परीस झगटतां तत्काळीं ॥ लोह सुवर्ण होय ते वेळीं ॥ तैसी सुदाम्याची दशा जाहली ॥ पूर्ण वनमाळी तुष्टला ॥९५॥
ऐका नवल केलें गोपाळें ॥ मुष्टिभर पोहे भक्षिले ॥ इंद्रपदतुल्य राज्य दिधलें ॥ सुदामयासी प्रीतीनें ॥९६॥
हरिविजयग्रंथ समग्र ॥ हेंचि केवळ द्वारकापूर ॥ रुक्मिणीसहित यादवेंद्र ॥ नांदे तेथें सर्वदा ॥९७॥
नाना दृष्टांत परिकर ॥ हेचि केवळ यादवभार ॥ पूर्ण ब्रह्मानंद अतिउदार ॥ श्रीधरवरद अभंग सदा ॥९८॥
HP Officejet Pro 8600 e-All-in-One CM749A#B1H (Google Affiliate Ad) इति श्रीहरिविजयग्रंथ ॥ संमत हरिवंशभागवत ॥ प्रेमळ भक्त सदा परिसोत ॥ एकोनत्रिंशतितमाध्याय गोड हा ॥१९९॥
अध्याय॥२९॥ओंव्या॥१९९॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

No comments:

Post a Comment