Tuesday, September 30, 2014

भोंडल्याची ( हादग्याची ) गाणी - ६

महिला वर्गाची देवावरची श्रद्धा, बाळहट्टापुढे होणारी अगतिकता, घाईत धांदलीत गडबडलेली गोष्ट हुशारीने सावरून घेण्याची हातोटी - हे सगळे ह्या खालील गाण्यांमध्ये दिसून येते.


आज कोण वार बाई । आज कोण वार?
आज आहे सोमवार । शंकराला नमस्कार ।
आज कोण वार बाई । आज कोण वार?
आज आहे मंगळवार । देवीला नमस्कार ।
आज कोण वार बाई । आज कोण वार?
आज आहे बुधवार । बृहस्पतीला नमस्कार ।
आज कोण वार बाई । आज कोण वार?
आज आहे गुरुवार । दत्ताला नमस्कार।
आज कोण वार बाई । आज कोण वार?
आज आहे शुक्रवार । अंबाबाईला नमस्कार ।
आज कोण वार बाई । आज कोण वार?
आज आहे शनिवार । शनिला नमस्कार ।
आज कोण वार बाई । आज कोण वार ?
आज आहे रविवार । सुर्याला नमस्कार ।

==============================================


कृष्ण घालीतो लोळण, आली यशोदा धावून
काय रे मागतोस बाळा, तुला देते मी आणून

आई मला चंद्र दे आणून त्याचा चेंडू दे करुन
असलं रे कसलं मागणं तुझं जगाच्या वेगळं

आई मला विंचू दे आणून त्याची अंगठी दे करुन
असलं रे कसलं मागणं तुझं जगाच्या वेगळं

आई मला साप दे आणून त्याचा चाबूक दे करुन
असलं रे कसलं मागणं तुझं जगाच्या वेगळं

कृष्ण घालीतो लोळण, आली यशोदा धावून


==============================================


हरीच्या नैवेद्याला केली, जिलबी बिघडली
त्यातलं उरलं थोडं पीठं त्याचं केलं थालीपीठं
नेऊनी वाढीलं पानातं

जिलबी बिघडली
त्यातला उरला थोडा पाक त्याचा केला साखरभातं
नेऊनी वाढीला पानातं

जिलबी बिघडली
त्यातलं उरलं थोडं तूप त्याच्या केल्या पुर्‍या छानं
नेऊनी वाढील्या पानातं
हरीच्या नैवेद्याला केली, जिलबी बिघडली. 

Monday, September 29, 2014

भोंडल्याची ( हादग्याची ) गाणी - ५

ह्या सासुरवाशिणी मुली मार ही खायच्या. सासरी मिळणाऱ्या ह्या प्रसादाचे उल्लेख असणारी ही काही गाणी :-


नणंदा भावजया दोघीजणी । घरात नव्हतं तिसरं कोणी ।
'शिंक्यावरचं लोणी । खाल्लं कोणी ?
'मी नाही खाल्लं । वहिनीनं खाल्लं ।
आतां माझा दादा येईल ग । दादाच्या मांडिवर बसेन ॥'
'दादा तुझी बायको चोरटी ।'
'असु दे माझी बायको चोरटी ।'
'घे काठी लाग पाठीं ।'
'घेत नाही काठी । लागत नाही पाठी ।
घरादाराची लक्ष्मी मोठीं ॥'

 ===========================================


'कोथिंबीरी बाई ग, आता कधी येशील ग?'
'आता येईन चैत्रमासी', चैत्रा चैत्रा लौकर ये,
हस्त घालीन हस्ताला, देव बसवीन देव्हारा,
देव्हार्‍याच्या चौकटी, उठता  बसता लाथा बुक्की

============================================



कमळे कमळे दिवा लाव
दिवा गेला वार्‍यानं
कमळीला नेलं चोरानं
चोराच्या हातातुन सुटली
बाजेखाली लपली
सासुबाईंनी देखली
मामांजीनी ठोकली...

Sunday, September 28, 2014

भोंडल्याची ( हादग्याची ) गाणी - ४

सासरकडचे कोणी पाहूणे आले माहेरवासीणीला न्यायला की सासरी जावेसे वाटायचे नाही म्हणून त्यांच्यावर  झिपरे कुत्रे सोडा असे गाणे होते...

अरडी गं बाई परडी, परडी एवढं काय गं
परडी एवढं फूल गं, दारी मूल कोण गं?
दारी मूल सासरा
सासर्‍याने काय आणलं ग बाई ?
सासर्‍यानं आणल्या पाटल्या
पाटल्या मी घेत नाही, सांगा मी येत नाही,
चारी दरवाजे लावा ग बाई, झिप्रं कुत्र सोडा ग बाई ॥१॥

अरडी गं बाई परडी, परडी एवढं काय गं
परडी एवढं फूल गं, दारी मूल कोण गं?
दारी मूल सासू
सासूने काय आणलंय गं?
सासुने आणले गोट
गोट मी घेत नाही, सांगा मी येत नाही,
चारी दरवाजे लावा ग बाई, झिप्रं कुत्र सोडा ग बाई ॥२॥

अरडी गं बाई परडी, परडी एवढं काय गं
परडी एवढं फूल गं, दारी मूल कोण गं?
दारी मूल दीर
दीरानं काय आणलं ग बाई ?
दीरानं आणल्या बांगड्या
बांगड्या मी घेत नाही, सांगा मी येत नाही,
चारी दरवाजे लावा ग बाई, झिप्रं कुत्र सोडा ग बाई ॥३॥

अरडी गं बाई परडी, परडी एवढं काय गं
परडी एवढं फूल गं, दारी मूल कोण गं?
दारी मूल जाऊबाई
जावेनं काय आणलं ग बाई ?
जावेनं आणली नथ
नथ मी घेत नाहीं, सांगा मी येत नाही,
चारी दरवाजे लावा ग बाई, झिप्रं कुत्र सोडा ग बाई ॥४॥


अरडी गं बाई परडी, परडी एवढं काय गं
परडी एवढं फूल गं, दारी मूल कोण गं?
दारी मूल नणंद
नणदेने काय आणलंय गं?
नणदेने आणल्या तोरड्या
तोरड्या मी घेत नाही, सांगा मी येत नाही
चारी दरवाजे लावा गं बाई, झिप्रं कुत्र सोडा ग बाई ॥५॥

असेच सासरकडचे विविध नातेवाईक (सासरा, दीर, जाऊ वगैरे) आणि प्रत्येकाने आणलेले वेगवेगळे दागिने घेऊन अशीच कडवी म्हणायची. सगळ्यात शेवटचे कडवे असे -

अरडी गं बाई परडी, परडी एवढं काय गं
परडी एवढं फूल गं, दारी मूल कोण गं?
दारी मूल नवरा
नवर्‍याने काय आणलंय गं?
नवर्‍याने आणलं मंगळसूत्र
मंगळसूत्र मी घेते, सांगा मी येते
चारी दरवाजे उघडा गं बाई, उघडा गं बाई
झिपर्‍या कुत्र्याला बांधा गं बाई, बांधा गं बाई ॥६॥

=====================================================

नणंद भावजया खेळत होत्या, भावजयीवर आला डाव, भावजय बसली रुसुन,
सासुरवासी सुन रुसुन बसली कैसी, यादवराया, राणी घरासी येईल कैसी ॥१॥
सासरा गेला समजावयाला ।
'ऊठ ऊठ मुली चल ग घरला, माझी दौत लेखणी देतो तुला'
'तुमची दौत लेखणी नको मला । मी नाही यायची तुमच्या घराला'॥२॥

सासु गेलीं समजावयाला ।
'ऊठ ऊठ मुली चल घराला, माझा डेरा रवी देते तुला'
'तुमचा डेरा रवी नको मजला । मी नाही यायची तुमच्या घराला' ॥३॥
दीर गेला समजावयाला ।
'ऊठा ऊठा वहिनी चला घराला, माझा विटी दांडू देतो तुम्हाला'
'तुमचा विटी दांडु नको मला । मी नाही यायची तुमच्या घराला' ॥४॥
जाऊ गेली समजावयाला ।
'ऊठा ऊठा बाई चला घराला, माझा फणी करंडा देते तुम्हाला'
'तुमची फणी करंडा नको मला । मी नाही यायचे तुमच्या घराला' ॥५॥
नणंद गेली समजावयाला ।
'ऊठा ऊठा वहिनी चला घराला, माझा खेळ देते तुम्हाला'
'तुमचा खेळ नको मला । मी नाही यायचे तुमच्या घराला' ॥६॥
पतिदेव गेले समजावयाला ।
'ऊठ ऊठ राणी चल घराला, माझा लाल चाबुक देतो तुला'
'तुमचा लाल चाबूक हवा मला । मी येते तुमच्या घराला' ॥७॥
सासुरवासी सुन घरासी आली ऎसी। यादवराया, राणी घरासी आली ऎसी ॥


Saturday, September 27, 2014

भोंडल्याची ( हादग्याची ) गाणी - ३

भोंडल्याच्या ह्या गाण्यांमधे माहेरचे कोडकौतुक सांगणाऱ्या मुली सासरचा जाच ही सांगायच्या

अक्कण माती चिक्कण माती
अश्शी माती सुरेख बाई
खड्डा तो खणावा ।
अस्सा खड्डा सुरेख बाई
जातं ते रोवावं ।
अस्सं जातं सुरेख बाई
सपीठी दळावी ।
अश्शी सपिठी सुरेख बाई
करंज्या कराव्या ।
अश्श्या करंज्या सुरेख बाई
तबकी ठेवाव्या ।
अस्सं तबक सुरेख बाई
शेल्याने झाकावं ।
अस्सा शेला सुरेख बाई
माहेरी धाडावा ।
अस्सं माहेर सुरेख बाई
खेळाया मिळतं…
अस्सं सासर द्वाड बाई
कोंडोनी मारितं… ।।

================================================

आपल्या माहेरचा बडेजाव सांगणारे हे गाणे :- 

आणा माझ्या सासरचा वैद्य
अंगात अंगरखा फाटकातुटका डोक्याला पागोटं फाटकंतुटकं
हातात काठी जळकं लाकूड
कपाळाला टीळा शेणाचा
तोंडात विडा पादरा कीडा
कसा बाई दिसतो भिका-यावाणी बाई भिका-यावाणी ।।

आणा माझ्या माहेरचा वैद्य
अंगात अंगरखा भरजरी डोक्याला पागोटं भरजरी
हातात काठी चंदनाची
कपाळाला टीळा चंदनाचा
तोंडात विडा केशराचा
कसा बाई दिसतो राजावाणी बाई राजावाणी ।।

=================================================

माहेरचा बडेजाव सांगणाऱ्या स्त्रीला मुद्दाम हिणवणारे हे गाणे :-

'तुझ्या ग माहेरच्यांनी काय काय दिलं ?'
'माझ्या ग माहेरच्यांनी दिल्या मला साखळ्या ।'
'असल्या कसल्या साखळ्या बाई फुलाच्या पाकळ्या ॥'

'तुझ्या ग माहेरच्यांनी काय काय दिलं ?'
'माझ्या ग माहेरच्यांनी दिल्या मला पाटल्या ।'
'असल्या कसल्या पाटल्या बाई हाताल्या दाटल्या ॥'

'तुझ्या ग माहेरच्यांनी काय काय दिलं ?'
'माझ्या ग माहेरच्यांनी दिले मला गोट ।'
'असले कसले गोट बाई हत्तीचे रोट॥'


'तुझ्या ग माहेरच्यांनी काय काय दिलं ?'
'माझ्या ग माहेरच्यांनी दिली मला बिंदी ।'
'असली कसली बिंदी बाई कपाळाला चिंधी ॥'

'तुझ्या ग माहेरच्यांनी काय काय दिलं ?'
'माझा ग माहेरच्यांनी दिला मला हत्ती ।'
'असला कसला हत्ती बाई उधळतो माती ॥'

'तुझ्या ग माहेरच्यांनी काय काय दिलं ?
'माझ्या ग माहेरच्यांनी दिला मला गडी ।'
'असला कसला गडी बाई, मिजास बडी ॥'

'तुझ्या ग माहेरच्यांनी काय काय दिलं ?'
'माझ्या ग माहेरच्यांनी दिली मला बाई ।'
असली कसली बाई तिला रीतच न्हाई ॥'

Friday, September 26, 2014

भोंडल्याची ( हादग्याची ) गाणी - २

भोंडल्याची गाणी आणि उत्सव म्हणजे सासुरवाशिणी स्त्रियांचा किंबहुना लहान वयात लग्न होवून सासरी गेलेल्या मुलींचा मन रमवण्याचा, रोजची दुःखे विसरण्याचा, कल्पना विलासात रमण्याचा सण.
मुलींच्या खेळाची आणि कल्पना विलासाचे प्रतिबिंब दाखवणारी ही काही गाणी :-

एक लिंबु झेलू बाई, दोन लिंबं झेलूं ।
दोन लिंब झेलूं बाई, तीन लिंबं झेलूं ।
तीन लिंबं झेलूं बाई, चार लिंबं झेलू ।
चार लिंब झेलू बाई, पाच लिंबं झेलूं ।
पाचा लिंबांचा पानवडा , माळ घाली हनुमंताला ।
हनुमंताची निळी घोडी. येतां जातां कमळं तोडी ।
कमळाच्या पाठीमागं होती राणी ॥
अगं अगं राणी इथं कुठं पाणी ?
पाणी नव्हे यमुना जमुना,
यमुना जमुनेची बारिक वाळू, तिथं खेळे चिलारि बाळू ।
चिलारि बाळाला भूक लागली ।
सोन्याच्या शिंपेनं दूध पाजीलं, पाटावरच्या घडीवर निजवलं ।
नीज रे चिलारि बाळा, मी तर जाते सोनारवाड्‍या ।
सोनारदादा सोनारभाई, गौरीचे मोती झाले कां नाहीं ?
गौरीच्या घरीं तांब्याच्या चुली, मांडव घातला मखमख पुरी ।
लगीन लागलं सूर्योंदयीं, भोजन झालं आवळीखालीं ।
उष्ट्या पत्रावळी चिंचेखालीं, शेणगोळा आंब्याखालीं ।
पानसुपारी तुळशीवरी, वरात निघाली हत्तीवरी ।


====================================



आला चेंडू, गेला चेंडू, लाल चेंडू झुगारिला ।
आपण चाले हत्ती घोडे, राम चाले पायीं ।
एवढा डोंगर शोधिला, राम कोठें नाहीं ।
राम ग वेचीतो कळ्या, सीता ग गुंफीती जाळ्या ।
आली ग लगीन वेळा, आकाशीं घातिला मंडप ।
मंडप मंडप बसते पोती, पोती पोती तिरुबाई राळा ।
जरतारी घातलं बोहलं, नवरा नवरी बसली पाटीं ।
पोशीन पायी तिरुबाई राळा, तिरुबाई राळा मुंजा बाळा ।
मुंजाबाळाची मुंजक दोरी, तीच दोरी सावध करी ।
सावध सावध सर्वकाळ, सर्वकाळाचा उत्तम दोर ।
दोर बांधा झाडासी, झाड झबका फुल टपका ।
तें बाई फूल तोडावं, बहिणी माथां खोवावं ।
बहिणी तुझे केस ग, मोतीयाचे घोस ग ।
बहिणी तुझी वेणी ग , केतकीची फणी ग ।
बहिणी तुझा भांग ग, पौर्णिमेचा चांद ग ।
बहिणी तुझा खोपा ग, उंदिर घेतो झोपा ग ।

========================================

शिवाजी आमुचा राजा, 
त्याचा तो तोरणा किल्ला ।
किल्ल्यामधे सात विहिरी,
विहिरीमधे सात कमळे ।
एक एक कमळ तोडिलं,
भवानी मातेला अर्पण केलं ।
भवानी माता प्रसन्न झाली,
शिवाजी राजाला तलवार दिली ।
तलवाऽऽरंऽऽ घेऊनी आला,
हिंदूंचाऽऽ राजा तो झाला ।
हिंदुनी त्याचे स्मरण करावे,
हादग्यापुढे गाणे गावें ।। 
हादगा देव मी पूजिते,
सख्यांना बोलाविते ।
हादगा देव मी पूजिते ।।
लवंगा, सुपार्‍या, वेलदोडे,
करून ठेवले विडे,
आणिक दुधाचे दुध पेढे,
वाहून हादग्या पुढे ।।
हादगा देव मी पूजिते
सख्यांना बोलाविते
हादगा देव मी पूजिते ।।

Thursday, September 25, 2014

भोंडल्याची ( हादग्याची ) गाणी - १

भोंडल्याची सुरुवात सहसा खालील गाण्याने होते…. गणेशाला वंदना करून मुली भोंडल्याचा खेळ सुरु करतात.

ऐलमा पैलमा गणेश देवा ।
माझा खेळ मांडुदे करीन तुझी सेवा ।
माझा खेळ मांडिला वेशीच्या दारी,
पारवे घुमती बुरजावरी ।
गुंजवाणि डोळ्याच्या सारविल्या टिका,
आमच्या गावच्या भुलोजी नायका ।
एवि निघा तेवि निघा, कांडा तीळ बाई तांदुळ घ्या ।
आमच्या आया, तुमच्या आया, खातील काय दुधोंडे ।
दुधोंड्याची लागली टाळी, आयुष्य दे रे  बा वनमाळी ।
माळी गेला शेती भाता, पाऊस पडला येता जाता ।
पड पड पावसा थेंबो थेंबी, थेंबो थेंबीच्या आळव्या लोंबी ।
आळव्या तुझी सात कणसं, भोंडल्या तुझी सोळा वर्षं ।
अतुला तुझी सात कणसं, भोंडल्या तुझी सोळा वर्षं ।
अतुला मातुला चरणी घातूला, चरणीचे सोंडे हातपाय खणखणीत गोंडे ।
एक एक गोंडा विसा विसाचा, साडे नांगर नेसायचा ।
नेसा ग नेसा बाहुल्यांनो, वरीस वर्ष पावल्यांनो ॥१॥


काही ठिकाणी गणेश वंदना खालील गाण्याने होते. तसे हे गाणे फार ऐकिवात नाही, पण गाण्याचे शब्द पाहता हे गाणे लोकसंगीताचाच एक नमुना वाटते.
आधी नमुया श्री गणराया
मंगलमुर्ती विघ्न हराया
मंगलमुर्ती उंदरावरी
सत्ता त्याची इंद्रावरी
इंद्र हा स्वर्गीचा राजा ( चाल बदल)
झुलती हत्तीच्या फौजा
वरुण चाकर इंद्राचा
पाऊस पाडील हस्ताचा
पड पड पावसा थेंबोथेंबी
थेंबोथेंबीच्या हळव्या लोंबी
हळव्या लोंबी आणुया, तांदुळ त्याचे कांडुया
मोदक्-लाडु बनवुया
गणरायाला अर्पुया....

Wednesday, September 24, 2014

भोंडला

भोंडला - महाराष्ट्रातील मुलींचे हे एक लौकिक व्रत. याला हादगा / हदगा असेही म्हणतात.

आश्विन महिन्यात हस्त नक्षत्राला सुरवात झाली, कि त्या दिवसापासून पुढे सोळा दिवस किंवा नवरात्राच्या पहिल्या दिवसापासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत मुली भोंडला खेळतात. त्यासाठी घराच्या भिंतीवर सोंडेत माळ धरलेल्या व समोरासमोर तोंड केलेल्या दोन हत्तींचे रंगीत चित्र टांगतात. त्याच्यावर लाकडाची मंडपी टांगून तिला निरनिराळ्या फळांच्या व फुलांच्या माळा घालतात. शिवाय घरोघरी मुली जमिनीवर किंवा पाटावर रांगोळीने किंवा धान्याने हत्ती काढतात. या हत्तीला रांगोळीच्या ठिपक्यांची झूल काढून किंवा त्याच्या अंगावर रंगीबेरंगी फुलांच्या माळा घालून सजवतात. नंतर आसपासच्या मुली एकत्र जमून पाटाभोवती फेर धरतात व भोंडल्याची गाणी गातात. पहिल्या दिवशी एक, दुसर्या दिवशी दोन याप्रमाणे रोज एकेका गाण्याची भर पडून शेवटच्या दिवशी सोळा गाणी म्हणतात. गाणी दिवसेंदिवस जसजशी वाढू लागतात, तसतसा ती म्हणायला अधिक वेळ लागतो. त्यामुळे पुढे पुढे मुली एकमेकींच्या घरी आळीपाळीने जमून गाणी गातात. गाणी संपल्यावर जिच्या घरी भोंडला असतो, ती मुलगी सर्वांना खिरापत वाटते. पण ती वाटण्यापूर्वी इतर मुलींना तो खिरापत ओळखायला सांगतात. त्यावेळी मुलींची होणारी प्रश्नोत्तरे मोठी मनोरंजक असतात. खिरापतीचा पदार्थ रोज वेगळा असतो. काही वेळा वाढत्या गाण्यांप्रमाणे खिरापतीही वाढत्या असतात. अशा रीतीने सोळाव्या दिवशी सोळा खिरापती करतात.

या भोंडल्या प्रमाणे भुलाबाईचा सोहळा असतो. खानदेशात व विदर्भात भुलाबाईचा विशेष प्रचार आहे.
भिल्लीणीचा वेष घेवून भिल्लरूपी शंकराला भुलवायला आलेल्या पार्वतीला भुलाबाई हे नाव पडले आहे. पार्वती भुलाबाई झाली म्हणून शंकराला भुलोबा म्हणू लागले.
भाद्रपद पौर्णिमेला घरोघरी भुलोबा व भुलाबाई या दोघांच्या मातीच्या मूर्ती करून त्या सजवलेल्या मखरात किंवा कोनाड्यात बसवतात आणि कोजागिरी पौर्णिमेला रात्रभर जागवून वद्य प्रतिपदेला त्याचे पाण्यात विसर्जन करतात. दररोज संध्याकाळी मुली भुलाबाईपुढे फेर धरून गाणी म्हणतात व कसली तरी खिरापत करून तिला तिचा नैवेद्य दाखवतात. यांच्या पूजेला शिव - शक्तीची पूजा म्हटले जाते. भुलाबाईचा हा सोहळा भोंडल्याप्रमाणे सोळा दिवस चालतो व आश्विन मासातच होतो. या वेळी वाढत्या दिवसाप्रमाणे गाण्यांचा व खिरापतींचा वाढता क्रम असतो.

मराठी लोकसाहित्यात भोंडला किंवा हदगा याची गाणी अस्सल जुन्या मराठी लोकगीतांचा नमुना म्हणून ओळखली जातात. त्यांच्या चाली अगदी प्राथमिक स्वरूपाच्या असून गाण्यांची मूळची संख्या सोळा आहे. प्रांत परत्वे त्यांत सातांची भर पडली आहे. पण काही ठिकाणी ती सोळाही नाहीत.

आज पासून भोंडला हे सदर आपण रोज पाहू त्यःच्या विविध गाण्यांसह.

Thursday, September 18, 2014

केसरी प्रसिद्धीपत्रक

केसरी पत्र प्रसिद्ध होण्यापूर्वी त्यासंबंधी प्रसिद्ध करण्यात आलेले पत्रक...

केसरी
स्थितिं नो रे दध्या: क्षणमपि मदांधेक्षण सखे
गजश्रेणीनाथ त्वमिह जटिलायां वनभुवि
असौ कुंभिभ्रांत्या खननरवरविद्रावितमहा:
गुरूग्पावग्राम: स्वपिति गिरिगर्भे हरिपति:
- जगन्नाथराय

वरील केसरी नावाचे वर्मानपत्र निव्वळ महाराष्ट्र भाषेत येत्या १८८१ सालच्या आरंभापासून दर मंगळवारी काढण्याचा विचार खालील मंडळीने केला आहे. या पत्रात एरवीच्या वर्तमानपत्राप्रमाणे बातम्या, राजकीय प्रकरणे, व्यापारासंबंधी माहिती वगैरे नेहमीचे विषय तर येतीलच, पण याखेरीज लोकस्थितीवर निबंध, नवीन ग्रंथावर टीका वगैरे विषयांचाही त्यात समावेश केला जाईल. तसेच विलायतेत ज्या राज्यप्रकरणांची वाटाघाट होते ती इकडील लोकांस समजणे अवश्य असल्यामुळे त्यांचाही सारांश रूपाने यात संग्रह करण्याचा बेत केला आहे. आजपर्यंत वरील तीन विषयांवर म्हणजे देशस्थिती, देशभाषेतील ग्रंथ व विलायतेतील राजकाण या विषयांच्या संबंधाने जसे यथास्थित उद््घाटन व्हावयास पाहिजे होते, तसे कोणत्याही वर्तामापत्रात झाले नाही असे म्हणणय्ास हरत नाही. तर ही मोठी उणीव नाहिशी करून टाकण्याचे आम्ही मनात आणले आहे.
वरील वर्तमानपत्रात प्रत्येक विषयाचे विवेचन जे करावयाचे, ते केवळ निप:क्षपात बुद्धीने व आम्हास जे खरे वाटेल त्याल अनुसरून करावयाचे असा आमचा कृतसंकल्प आहे. अलीकडे बादशाही अमलाच्या सुरवातीपासू तोंडपुजेपणाचा प्रकार बराच वाढत चालला आहे यात संशय नाही. हा प्रकार अत्यंत अश्र्लाघ्य असून देशाच्या हितास अपायकारक होय, हे कोणीही प्रांजल मनुष्य कबूल करील. तर सदरील पत्रातील लेख त्यास ठएविलेल्या नावाप्रमाणे येतील असे समजावे.
या पत्राचा साचा सुबोध पत्रिकेसारखा धरण्यात येईल. किंमतही त्याच मानाने अगदी थोडी ठेविली आहे. ती सालीना आगाऊ एक रुपया दहा आणे इतकी आहे. मागाहून दर मुदलीचा ठेवला नाही. सरते शेवटी आमच्या आर्यबंधूंस एवढीच विज्ञापना करण्यात येते की, त्यांनी या लोकहिताच्या नवीन कृत्यास आपला उदार आश्रय द्यावा. तो जसजसा मिळेल तसतशी आम्हास उमेद येऊन, हे पत्करलेले काम यशाशक्ती तडीस नेण्यास आम्हांकडून बिलकूल कसूर होणार नाही.
- विष्णू कृष्ण चिपळूणकर बी. ए.
- बाळ गंगाधर टिळक बी. ए., एलएल. बी.
- वामन शिवराम आपटे एम. ए.
- गणेश कृष्ण गर्दे एल्. एम्. अँड एस्.
- गोपाळ गणेश आगरकर बी. ए.
- महादेव बल्लाळ नामजोशी
साभार : मराठी वृत्तपत्रांचा इतिहास, रा. के. लेले, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, प्रथमावृत्ती १९८४, पान २७९-२८०