CHAPTER 35
Kach-Devayani.
The young wife asked Shri Guru, `What is our future? How should I live hereafter? Please favour me with a mantra'
Shri Guru said, `A wife should serve her husband devotedly. She needs no other advice or mantra. If a mantra is given to a woman some calamity falls. This is evident from the tale of Kach-Devayani.
`In olden days the gods and demons were often at war. Shukracharya, the Guru of the demons, would recite Mrityunjaya mantra and the dead demons would be made alive. Therefore it was rather difficult for the gods to win the war. Indra, the king of the gods went to Shri Shankar and told him this fact. Shri Shankar was very angry and he asked to call Shukra. Nandi, Shri Shiva's bull, went to Shukra, who was in meditation at that time. Nandi therefore held him in his mouth and brought him to Shri Shankar. Shri Shankar at once devoured him. After some days, Shukra came out of the body of shri shankar through his urine. He again started reciting Mrityunjaya mantra and brought the demons to life.
Indra told brihaspati, Guru of Gods, about amrit Sanjivani mantra of Shukracharya and said, `The guru of the demons makes them alive with the help of this mantra. You being the Guru of the gods why should you not protect the gods?'
Brihaspati said, `If Sanjivani mantra is heard by six ears, it will lose its importance. So it would be better to send someone as a pupil to learn the mantra from Shukracharya. Let my son Kacha be sent to him. He will learn the mantra and return.'
Kacha took leave of the gods and came to Shukracharya. He bowed to him and stood before him. Shukracharya inquired who he wasp and why he had come to him. Kacha replied `I am a Brahmin-Kumar. Hearing your fame, I have come to learn at your feet. shukracharya's only daughter Devayani was standing by her father. She liked the Brahmin youth and requested her father, Shukracharya to accept him as his pupil. Shukracharya agreed and Kacha startd staying with him.
The demons did not approve of this as they suspected that the gods would learn the Sanjivani mantra from Shukracharya and then it would be impossible for them to win a victory over them. Therefore, when Kacha had been to the forests for bringing darba (a kind of grass), the demons killed him. In the evening, when Kacha did not return home, Devayani requested her father to bring him home soon.
Shukra, by intution knew that was dead so he recited Sanjivani mantra and brought him to life. Kacha then came home. Once again when Kacha had been to the forest, the demons killed him and the pieces of his body were thown in all directions. Devayani gain showed anxiety for Kacha. Shukra again recited Sanjivani mantra and brought him to life, as Devayani was his only daughter and Shukracharya had great affection for her.
The demons now contrived to kill Kacha on Ekadashi fast day. They then mixed his flesh in wine and offered it to Shukracharya for drinking. For the third time when Kacha was missing, Devayani wept and requested him to bring him to life. Shukracharya realised that Kacha was not seen anywhere but he was in his belly. He told Davayani that Kacha was in his belly and if he is taken out, he himself would die.
Devayani said, `You are bringing to life all people and saying that you would die. How is this? Kacha is my soul. If he does not come back, I will give up my life.'
Shukracharya: `Besides myself none else knows Sanjivani mantra. There is a condition that this mantra should not be divulged to anyone. If it is heard by six ears (three persons) it will loose its effect. This is a problem with me'
Devayani said, `Teach me the mantra. I shall recite it and make you alive.'
Shukracharya: `The Shastras prohibit telling a mantra to a woman.
Devayani who was greatly dejected said, `Then you may live with your mantra happily. I will give up my life.' Saying so she fell on the ground senseless. Shukracharya brought her to consciousness and gave her the Sanjivani mantra. While he was reciting the mantra, Kacha, who was in Shukra's belly, also heard it. Shukra recited the mantra and Kacha came out of his body tearing his belly. Consequently Shukracharya fell dead. Then Devayani recited the mantra third time and Shukra became alive. Thus Kacha heard the mantra thrice and made it by heart.
Now Kacha folded his hands and said to Shukracharya, 'I have studied at your house so far. The demons do not allow me to live here peacefully. Kindly therefore allow me to go home now.'
Devayani interrupted, 'I have made you alive thrice. I love you You should marry me.'
Kacha : 'Being the daughter of my guru, you are my sister. You made me alive from time to time and so you are like my mother. If I marry you people will blame me.'
Hearing this, Devayani felt sorry and at the same time she was enraged. She cursed him, 'Your learning will be futile. You will forget all that you have learnt.'
Kacha said, 'You have cursed me in vain. You will marry a person other than a Brahmin. Your father has taught you Sanjivani mantra against the rules of Shastras. Hence it will not work now.' Saying this Kacha went away.
Seeing that Kacha had returned, Indra and other gods were delighted,
Shri Guru said, 'For a woman, service of her husband is the principal mantra. She should obey him and observe vrat, etc. with his consent only.'
Chandrangad - Simantini
The young wife then requested Shri Guru to suggest some vrat.
Shri Guru: "I will tell you a vrat by which you `soubhagya' will be perpetual and your husband will get prosperity. This vrat was told by Soot to Rishis in former days. In this vrat you have to worship Shri Shiva every Monday, observe fast on that day and keep control over your senses. This vrat can be observed by the married women (having husband). Kumaries (unmarried girls), widows, young and old persons of both sexes.
"Chaitravarma was a pious king in former times. He had a daughter named Simantini, who was beautiful and good-natured. One astrologer had said that all the stars in her horoscope were good, but she would be a widow at the age of 14. The king and others were extremely pained to hear this.
"Once Maitrayani, wife of Yadnyavalkya, came to the king. Simantini requested her `kindly tell me a means, by which my soubhagya will be perpetual.' Maitrayani then told her to observe Monday vrat and said, `by observance of this vrat. Your desires will be fulfilled and you will get all prosperity. Simantini therefore began to observe this vrat devotedly.
"Simantini was married to Chandrangad, son of Indrasen of the famous `Nal' family, with due festivities. Chandrangad stayed at Chitrayarma for some days. Once he went to Kalindi (Yamuna) river with some friends. They were travelling in a ferry-boat. All of a sudden the boat sank in the river. Even after deligent search no trace of Chandrangad was fund.
Simantini and her parents were greatly shocked to know this. Indrasen and his wife were deeply greieved. He lost interest in the affairs of his kingdom. Talking this opportunity, his enemies usurped the throne and put Indrasen and his wife in jail.
Simantini resolved to observe `sat' as per the religious rule of a devoted wife. But as the dead body of her husband was not found, she could not observe the sati-rite as per Shastras. So she was prevented from the observance of sati.
Simantini continued her Monday fast and worship of Shri Shiva.
When Chandrangad was drowned, he was taken by the Nagkanyas to Vasuki in Patal, in a beautiful city with buildings glittering with precious stones. The gate of the city was golden and all persons in it were like serpents. Takshak the king wwith 1000 hoods, was sitting on a bright throne. Chandrangad was brought before him. Takshak enquired about him with affection and assured him about his safety and asked him to live there happily.
After some days Chandrangad requested Takshak, "I am the only son of my parents. I am recently married and my wife simantini is only 14 years of age. My parents, wife and mother and father-in-law must be mouring deeply for me. So kindly arrange to send me to them very soon."
Takshak gave him nectar to drink and offered him costly clothes, ornaments and precious stones. He also gave him a swift horse and a Nagkumar to accompany him. They instantly appear on the bank of Kalindi, where accidently, it being Monday, Simantini also had come with her female attendents for bath. It was the very place where Chandrangad had drowned.
Looking at him, Simantini said to her attendents, "Who is this celestial person coming out the water? I remember to have seen him before. Please enquire."
Chandrangad looked at Simantini and began to think, `she appears like my dear wife. But how is it that she has to mangalsutra around her neck and kumkum on her forehead'?
He descended from the horse, came near Simantini and inquired about her with affection.
Simantini was ashamed to see him come near. She told her attendents to narrate her account. The attendants told him, `Three years before, her husband was drowned here in this river. She is continuing her Monday vrat in greif and today being Monday, she has come here for bath. Her husband's kingdom has been usurped by his enemies and they have put her mother and father-in-law in jain.
Simantini then asked, `May I know who you are? God or gandharva? Why are you enquiring about me? ' She recollected the face of her husband and began to mourn. Seeing her dejected, Chandrangad held her hand in affection and told in her ears in a low voice, `you need not mounrn. Your husband will meet you on the third day. But do not disclose this to anybody.'
He rode the horse and went away with the Nagkumar to see his parents. When he reached the outskirts of the city, and Nagkumar entered the city and told the then ruler, `Chandrangad has returned from patal with an assurance of assistance from Takshak. Re-instal Indrasen on the throne with honour, otherwise you are doomed.'
The ruler was alarmed. He released Indrasen from jail and seated him on the throne with honour.
Indersen embraced Chandrangad with affection. A message of joy was sent to Chitravarma, who with Simantini and others, was greatly rejoiced to hear the news. Indrasen started with his paraphernelia to meet Chitravarma ceremoniously. Again a ceremony like wedding was celebrated and Chandrangad and Simantini met each other.
Chandrangad offered the ornaments, precious stones, fruits of Kalpataru, etc. brought from takshak to Simantini. She attained all this glory due to observing the Monday vrat with great devotion.
As advised by Shri Guru the young couple started observing Mondary vrat. Their parents also came there, bowed to Shri Guru and were glad to see the good health of the couple by the grace of Shri Guru. They gave much in charity. Then all returned to their place. The couple later on had some issues. They used to come to see Shri Guru every year and had all propsperity.
Contd....
श्रीगणेशाय नमः ।
नामधारक सिद्धासी । विनवीतसे परियेसी । रुद्राध्याय विस्तारेसी । दंपतीसी सांगितला ॥१॥
पुढे काय वर्तले । विस्तारोनि सांगा वहिले । मन माझे वेधले । गुरुचरित्र ऐकावया ॥२॥
सिद्ध म्हणे ऐक ताता । अपूर्व असे पुढे कथा । तेचि जाण पतिव्रता । श्रीगुरूते विनवीत ॥३॥
कर जोडोनि गुरूसी । विनवीतसे भक्तीसी । आम्हा गति पुढे कैसी । कवणेपरी असावे ॥४॥
या कारणे आपणासी । एखादा मंत्र उपदेशी । जेणे होय स्थिर जीवासी । चरणस्मरण सनातन ॥५॥
श्रीगुरु म्हणती तियेसी । स्त्रियांसी मंत्र उपदेशी । पतिभक्तीविणे त्यांसी । उपदेशासी देऊ नये ॥६॥
देता उपदेश स्त्रियांसी । विघ्न असे मंत्रासी । पूवी शुक्राचार्यासी । झाले असे परियेसा ॥७॥
ऐसे ऐकता गुरुवचन । विनवीतसे कर जोडून । स्त्रिया केवी मंत्रहीन । शुक्राचार्या कैसे झाले ॥८॥
विस्तारोनि आम्हासी । सांगा स्वामी कृपेसी । म्हणोनि लागली चरणासी । करुणावचनेकरोनिया ॥९॥
श्रीगुरु सांगती तियेसी । पूर्वकथा आहे ऐसी । युद्ध देवदैत्यांसी । सदैव होय अवधारा ॥१०॥
दैत्यसैन्य पडे रणी । शुक्र जपे संजीवनी । सकळ सैन्य उठवूनि । पुनरपि युद्धा पाठवीत ॥११॥
इंद्र वज्रे असुर मारी । शुक्र अमृत जप करी । सवेचि येती निशाचरी । देवसैन्य मारावया ॥१२॥
ऐसे होता एके दिवसी । इंद्र गेला कैलासासी । सांगे स्थिति शिवासी । शुक्राचार्याची मंत्रकरणी ॥१३॥
कोपोनिया ईश्वर । नंदीस सांगे उत्तर । तुवा जावोनि वेगवक्त्र । शुक्राचार्या धरोनि आणी ॥१४॥
स्वामीचे वचन ऐकोनि । नंदी गेला ठाकोनि । होता शुक्र तपध्यानी । मुखी धरिला नंदीने ॥१५॥
नंदी नेत शिवापासी । आकांत वर्तला दैत्यांसी । ईश्वरे प्राशिले शुक्रासी । अगस्ती सिंधूचियापरी ॥१६॥
ऐसा कित्येक दिवसांवरी । होता शुक्र शिवाचे उदरी । निघूनि गेला मूत्रद्वारी । विसर पडला शिवासी ॥१७॥
पूर्वी होते शुक्र नाव । ईश्वर-उदरी झाला उद्भव । नाव पावला भार्गव । पुनः संजीवनी जपे तो ॥१८॥
इंद्र मनी विचारी । पुरोहितासी पाचारी । कैसा शुक्र जिवंत करी । पुनः दैत्यजनांसी ॥१९॥
त्यासी विघ्न करावे एक । तू पुरोहित विवेकयुक्त । बुद्धि विचारी अनेक । बृहस्पति गुरुराया ॥२०॥
पाहे पा दैत्यांचे दैव कैसे । शुक्रासारिखा गुरु विशेषे । देतो जीवासी भरवसे । दैत्य येती युद्धासी ॥२१॥
तैसा तू नव्हेस आम्हांसी । आम्हाते का उपेक्षिसी । देवगुरु तू म्हणविसी । बुद्धि करी शीघ्र आता ॥२२॥
तू पूज्य सकळ देवांसी । जरी आम्हा कृपा करिसी । शुक्राचार्य काय विशेषी । तुजसमान नव्हे जाणा ॥२३॥
ऐसे नानापरी देख । इंद्र अमरनायक । पूजा करी उपचारिक । बृहस्पति संतोषला ॥२४॥
गुरु म्हणे इंद्रासी । यासी ऐक तू उपायासी । षट्कर्णी करावे मंत्रासी । सामर्थ्य राहील शुक्राचे ॥२५॥
एखादा पाठवावा शुक्रापासी । विद्यार्थी करून त्वरेसी । मंत्र शिकेल भरवसी । विद्यार्थिरूपेकरूनिया ॥२६॥
आपुला पुत्र कच असे । त्याते पाठवू विद्याभ्यासे । मंत्र शिकेल आहे कैसी । संजीवनी अवधारा ॥२७॥
कचाते आणूनि बुद्धियुक्ति । सांगतसे बृहस्पति । तुवा जावे शुक्राप्रती । विद्यार्थिरूप धरोनि ॥२८॥
आमुची निंदा तेथे करी । मनोभावे सेवा करी । संजीवनी कवणेपरी । मंत्र शिके पुत्रराया ॥२९॥
इंद्रादिक देवतांचा । निरोप घेऊनि पितयाचा । शुक्राप्रति गेला कचा । विद्यार्थिरूप धरोनि ॥३०॥
नमन केले साष्टांगी । उभा राहिला करुणांगी । शुक्र पुसतसे वेगी । कवण कोठूनि आलासी ॥३१॥
बोले आपण द्विजकुमार । तुझी कीर्ति ऐकिली थोर । विद्याभ्यासीन मनोहर । म्हणोन आलो सेवेसी ॥३२॥
सेवक होईन तुमचे चरणी । आलो इच्छेसी धरूनि । तू भक्तवत्सलशिरोमणि । अनाथांचा प्रतिपालक ॥३३॥
बोलोनि ऐसे कचवचन । विनवीतसे कर जोडून । शुक्रकन्या जवळी येऊन । पितयालागी विनवित ॥३४॥
पितयासी म्हणे देवयानी । विप्र भला दिसे नयनी । याते तुम्ही शिष्य करूनि । विद्याभ्यास सांगावा ॥३५॥
कच सुंदर सुलक्षण । जैसा दिसे की मदन । देवयानी करी चिंतन । ऐसा पति व्हावा म्हणे ॥३६॥
ऐसी वासना धरुनी । पितयाते विनवुनी । शिष्य केला कच सगुणी । शुक्राचार्य विद्या सांगे ॥३७॥
ऐसा विद्याभ्यास करीत । दैत्यकुळी म्हणती निश्चित । देवगणी आले सत्य । कपटवेषे करूनि ॥३८॥
शिकूनिया विद्येसी । जाऊनि शिकवील देवांसी । कुडे होईल आम्हांसी । तेणे मनी चिंतावले ॥३९॥
काळ क्रमिता एके दिवसी । कच पाठविला समिधांसी । दैत्य जाती साह्येसी । तया कचाचे अवधारा ॥४०॥
रानी जाउनी समागमेसी । दैत्य मारिले कचासी । समिधा घेवोनि घरासी । दैत्य आपण येते झाले ॥४१॥
शुक्राचार्यांची कन्या । पितयासी परम मान्या । पितयासी विनवी धन्या । कच कैसा नाही आला ॥४२॥
कच आलियावाचूनी । भोजन न करी देवयानी । ऐसे ऐकता निर्वाणी । शुक्राचार्य चिंतावला ॥४३॥
ज्ञानी पाहे मानसी । मृत्यु झाला असे तयासी । मंत्र जपूनि संजीवनीसी । त्वरित घरी आणिला ॥४४॥
आणिक होता बहुत दिवस । दैत्य करिती अतिद्वेष । गेला होता वनवास । पुनरपि तयासी वधियेले ॥४५॥
मागुती वाचेल म्हणोनि । चूर्ण करिती छेदोनि । दाही दिशा टाकुनी । आले घरा पुनरपि ॥४६॥
दिवस गेला अस्तमानी । पुसतसे देवयानी । कच न दिसे म्हणोनि । पितयाते विनवीत ॥४७॥
कच माझा प्राणसखा । ना आणिशी जरी खाईन विखा । दावी मज तयाचे मुखा । म्हणोनि प्रलाप करीतसे ॥४८॥
कन्येवरी ममत्व बहुत । तेणे शुक्र ज्ञाने पहात । छिन्नभिन्न केले म्हणत । मंत्र जपला संजीवनी ॥४९॥
धन्य मंत्राचे सामर्थ्य । कच आला घरा त्वरित । देवयानी संतोषत । पितयाने आलिंगिली ॥५०॥
दैत्य मनी विचार करिती । काय केल्या न मरे म्हणती । गुरुकन्येसी याची प्रीति । म्हणुनि गुरु वाचवितो ॥५१॥
आता उपाय करू यासी । उदईक येईल एकादशी । मारूनि मिळवू पानेसी । गुरुमुखी पाजावे ॥५२॥
ऐशी निगुती करोनि । आली एकादशी दिनी । कचाते बाहेर नेवोनि । मारते जहाले दैत्य शिष्य ॥५३॥
प्राशन करविती गुरूसी । मिळवूनिया मद्यरसी । स्निग्ध मिळवूनिया बहुवसी । शुक्रगुरूसी देत झाले ॥५४॥
मागुती पुसे देवयानी । पितयाते विनवुनी । कचासी आणी म्हणोनि । रुदन करी आक्रोशे ॥५५॥
शुक्र पहातसे ज्ञानी न दिसे कच त्रिभुवनी । खेद करीतसे मनी । कन्यालोभेकरोनिया ॥५६॥
विचार करिता सर्वा ठायी । दिसू लागला आपुले देही । संदेह पडला शक्रासी पाही । कैसे करावे म्हणोनि ॥५७॥
कन्येसी म्हणे शुक्र देखा । कच न ये आता ऐका । माझे उदरी असे निका । कैसा काढू तयासी ॥५८॥
यासी काढिता आपणासी । मृत्यु होईल परियेसी । काय अभिलाष असे त्यासी । म्हणोनि कन्येसी पुसतसे ॥५९॥
पितया विनवी देवयानी । अभिलाष होता माझे मनी । भार्या त्याची होउनी । दोघे राहू तुजपासी ॥६०॥
हाचि व्हावा माझा पति । ऐसे संकल्पिले चित्ती । न उठे जरी पुढती । तरी प्राण त्यागीन ॥६१॥
संदेह पडला शुक्रासी । बोधिता झाला कन्येसी । त्यास उठविता आपणासी । मृत्यू होईल अवधारी ॥६२॥
कन्या म्हणे पितयासी । सकळा तू वाचविसी । आपुला प्राण जाईल म्हणसी । हे आश्चर्य वाटतसे ॥६३॥
शुक्र म्हणे देवयानी । मंत्र असे संजीवनी । मजवाचोनि नेणे कोणी । माते कोण उठवील ॥६४॥
मंत्र सांगो नये कवणा । षट्कर्णी होता जाईल गुणा । कचाकरिता माझा प्राण । जाईल देखा अवधारी ॥६५॥
न ऐके कन्या देवयानी । पित्याचे चरण धरोनि । विनवीतसे कर जोडोनि । मंत्र आपणाते शिकवावा ॥६६॥
कचासी तू सजीव करी । तुज येईल मृत्यू जरी । मी मंत्र जपोनि निर्धारी । सजीव करीन तुजलागी ॥६७॥
शुक्र म्हणे कन्येसी । मंत्र सांगू नये स्त्रियांसी । दोष असता परियेसी । वेदशास्त्रसंमत असे ॥६८॥
स्त्रियांसी मंत्र पतिभक्ति । जपू नये मंत्रयुक्ति । सांगता दोष आम्हा घडती । मंत्रसामर्थ्य जाईल ॥६९॥
पितयासी म्हणे देवयानी । सुखे असा मंत्र जपोनि । प्राण जातो म्हणोन । मूर्च्छागत पडली ते ॥७०॥
शुक्राची कन्येवरी प्रीति । उठवूनि तिसी आलिंगिती । मंत्र तिसी सांगती । संजिवनी अवधारा ॥७१॥
आपुल्या पोटी कच होता । तोही होय ऐकता । मंत्र जहाला षट्कर्णता । मग जपला कचानिमित्त ॥७२॥
शुक्राचे पोटातुनी । कच निघाला फोडुनी । मंत्र जपे ती देवयानी । पितयाते उठविले ॥७३॥
तीन वेळा मंत्र जपता । कचे पाठ केला तत्त्वता । संतोष करी मनी बहुता । कार्य साधले म्हणोनि ॥७४॥
शुक्राचार्याते नमुनी । कच विनवी कर जोडुनी । माते दैत्य मारिती म्हणोनि । निरोप द्यावा मजलागी ॥७५॥
स्वामीचेनि विद्या शिकलो । तुझे कृपेने पूर्ण जहालो । देवकार्यार्थ संतोषलो । म्हणूनि चरणी लागला ॥७६॥
शुक्राचार्ये हर्षोनि । निरोप दिधला त्यालागोनी । पदर धरी देवयानी । पति व्हावे म्हणोनिया ॥७७॥
तूते मारिले तीन वेळी । मी वाचविले त्या काळी । विद्या शिकलासी पित्याजवळी । अवश्य वरावे मजलागी ॥७८॥
कच म्हणे ऐक बाळे । गुरुकन्या भगिनी बोले । तुवा आमुते वाचविले । माता होसी निर्धारी ॥७९॥
वरिता दोष आपणासी । दूषण ठेवितील सर्व ऋषि । भगिनी तू आमुची होसी । कैसी वरू म्हणे तो ॥८०॥
देवयानी कोपोनि । शाप दिधला ते क्षणी । वृथा विद्या होईल मानी । समस्त विसरे तात्काळी ॥८१॥
माझे अंतःकरणीची आशा । वृथा केली निराशा । विद्या न ये तुज लवलेशा । म्हणूनि शाप दिधला ॥८२॥
कच म्हणे तियेसी । वाया शापिले आम्हांसी । पुरुष वरील तुजसी । ब्रह्मकुळाव्यतिरिक्त ॥८३॥
तुझा पिता ब्रह्मज्ञानी । जाणे अमृतसंजीवनी । तुज शिकविले म्हणोनि । पुढे मंत्र न चाले ॥८४॥
ऐसा शाप देउनी । कच गेला निघुनी । संतोष झाला इंद्रभुवनी । दैत्यजीवन नव्हेची ॥८५॥
शुक्राचा संजीवनी मंत्र । कामा न ये झाला अपात्र । स्त्रियांसी न सांगावा मंत्र । म्हणोनि श्रीगुरु निरूपिती ॥८६॥
स्त्रियांलागी पतिसेवा । याची कारणे मंत्र न द्यावा । व्रतोपवास करावा । गुरु-पुरुष-निरोपाने ॥८७॥
सावित्री विनवी श्रीगुरूसी । व्रत आचरले बहुवसी । तुझे वाक्य आम्हांसी । व्रत एखादे निरोपावे ॥८८॥
तुजवरी माझा विश्वास । तुजवाचोनि नेणू आणिकास । व्रत तूचि आम्हांस । व्रत तुझी चरणसेवा ॥८९॥
भक्ति राहे तुझे चरणी । ऐसा निरोप द्यावा मुनि । म्हणुनी लागली चरणी । कृपा करी म्हणोनिया ॥९०॥
श्रीगुरु म्हणती तियेसी । सांगेन तुज व्रत ऐसी । स्थिर होय अहेवपणासी । राज्य पावे तुझा पति ॥९१॥
दंपत्य विनवी श्रीगुरूसी । तुझे वाक्य कारण आम्हासी । जैसा तू निरोप देसी । तेणे रीती रहाटू ॥९२॥
जो गुरुवाक्य न करी । तो पडे रौरवघोरी । तुझे वाक्य आम्हा शिरी । म्हणूनि चरणी लागली ॥९३॥
भक्तवत्सल श्रीगुरुनाथ । सांगता जहाला अतिप्रीत । विस्तारोनि समर्थ । व्रत तिसी सांगतसे ॥९४॥
सिद्ध म्हणे नामधारका । श्रीगुरु म्हणती कौतुका । ऐकताती दंपती निका । अतिप्रीतिकरोनिया ॥९५॥
श्रीगुरु म्हणती तयांसी । सांगेन व्रत इतिहासी । ऋषि पुसती सूतासी । व्रत बरवे निरोपावे ॥९६॥
सूत म्हणे ऋषीश्वरा । व्रत सांगेन मनोहरा । स्त्रिया अथवा पुरुषा बरा । व्रत असे अवधारा ॥९७॥
नित्यानंद असे शांत । निर्विकल्प विख्यात । ऐसा ईश्वर अर्चिता त्वरित । सकळाभीष्टे पाविजे ॥९८॥
संसारसागरात । विषयातुर आचरत । तेही पूजिता पूर्ण भक्त । त्यासी ईश्वर प्रसन्न होय ॥९९॥
विरक्त अथवा संसाररत । विषयातुर आसक्त । जे पूजिती पूर्ण भक्त । त्यासी ईश्वर प्रसन्न होय ॥१००॥
तेणे पाविजे पैलपार । ऐसे बोलती वेदशास्त्र । स्वर्गापवर्गा अधिकार । त्यासी होय परियेसा ॥१॥
विशेष व्रत असे ऐक । सोमवार व्रतनायक । ईश्वरार्चन करा विवेक । सकळाभीष्टे पाविजे ॥२॥
नक्त भोजन उपवासी । जितेंद्रिय करा विशेषी । वैदिक तांत्रिक पूजेसी । विधिपूर्वक सकळिक ॥३॥
गृहस्थ अथवा ब्रह्मचारी । सुवासिनी कन्याकुमारी । भर्तृविण विधवा नारी । व्रत करावे अवधारा ॥४॥
याचे पूर्वील आख्यान । सांगेन ऐका अतिगहन । ऐकता करी पावन । सकळासही परियेसा ॥५॥
स्कंदपुराणींची कथा । सर्व साद्यंत ऐका । पूर्वयुगी आर्यावर्तका । राजा एक अवधारा ॥६॥
चित्रवर्मा नाम त्यासी । धर्मात्मा राजा परियेसी । धर्ममार्ग आचरे हर्षी । अधर्माते शिक्षा करी ॥७॥
अखिल पुण्ये त्याणे केली । सकल संपत्ति वाढविली । समस्त पृथ्वी जिंकिली । पराक्रमेकरूनिया ॥८॥
सहपत्नी धर्म करिती । पुत्रकाम्ये शिवाप्रती । ऐसा किती काळ क्रमिती । कन्या झाली तयाते ॥९॥
अतिसुंदर सुलक्षण । पार्वतीरूपासमान । तेज फाके सूर्यकिरण । अतिलावण्य न वर्णवे ॥११०॥
वर्तावया जातकासी । बोलाविले ज्योतिषी । द्विज मिळाले अपारेसी । वर्तविती जातक ॥११॥
म्हणती कन्या सुलक्षण । नामे सीमंतिनी जाण । उमेसारखे मांगल्यपण । किंवा दमयंतीस्वरूप होय ॥१२॥
भागीरथीऐसी रूपासी । लक्ष्मीसारिखी गुणराशी । ज्ञाने देवमतासरसी । जानकीसमान पतिव्रता ॥१३॥
सूर्यासारिखी होईल कांति । चंद्रासमान मनशांति । दहा सहस्त्र वरुषे ख्याति । पतीसह राज्य करील ॥१४॥
जातक वर्तवले तिसी । राव पावला अतिहर्षी । अखिल दाने विप्रांसी । देता जाहला अवधारा ॥१५॥
असता राव सभेसी । द्विज एक परियेसी । भय न धरिता वाक्यासी । बोलतसे अवधारा ॥१६॥
ऐक राया माझे वचन । कन्यालक्षण मी सांगेन । चवदावे वर्षी विधवापण । होईल इयेसी जाण पा ॥१७॥
ऐसे वाक्य परिसोनि । राव पडिला मूर्छा येवोनि । चिंता वर्तलि बहु मनी । विप्रवाक्य परिसता ॥१८॥
ऐसे सांगोनि ब्राह्मण । गेला निघोनि तत्क्षण । सर्व दुःखाते पावून । तळमळीत तेधवा ॥१९॥
ऐसे बालपण क्रमिता । सप्त वर्षे जाती तत्त्वता । चिंतीत होती मातापिता । वर्हाड केवी करावे ॥१२०॥
चवदावे वर्षी विधवापण । म्हणोनि बोलिला ब्राह्मण । तेणे व्याकुळ अंतःकरण । राजा-राजपत्नीचे ॥२१॥
कन्या खेळे राजांगणी । सवे सखयाते घेवोनि । बोलता ऐकिले विप्रवचनी । चौदावे वर्षी विधवत्व ॥२२॥
ऐसे ऐकोनि वचन । कन्या करीतसे चिंतन । वर्तता आली एक दिन । तया घरी ब्रह्मस्त्री देखा ॥२३॥
याज्ञवल्क्याचिया पत्नी । मैत्रेयी म्हणोनि । घरी आली देखोनि । चरण धरीत तेधवा ॥२४॥
भावे साष्टांग नमूनि । करसंपुट जोडोनि । विनवी करुणावचनी । माते प्रतिपाळी म्हणतसे ॥२५॥
सौभाग्य स्थिर होय जेणे । उपाय सांगे मजकारणे । चंचळ असे अंतःकरणे । म्हणूनि चरणी लागली ॥२६॥
कन्या विनवी तियेसी । ऐसे व्रत सांग आम्हांसी । आम्हा जननी तूचि होसी । व्रत सांग म्हणतसे ॥२७॥
ऐकोनि कन्येच्या वचना । बोले मैत्रेयी जाणा । शरण रिघावे उमारमणा । अहेवपण स्थिर होय ॥२८॥
सोमवार परियेसी । व्रत आचरी नेमेसी । पूजा करावी शिवासी । उपवास करुनी अवधारा ॥२९॥
बरवे सुस्नात होवोनि । पीतांबर नेसोनि । मन स्थिर करोनि । पूजा करावी गौरीहरा ॥१३०॥
अभिषेके पापक्षय । पीठ पूजिता साम्राज्य । गंधाक्षता पुष्पमाल्य । सौभाग्यसौख्य पाविजे ॥३१॥
सौगंध होय धूपाने । कांति पाविजे दीपदाने । भोग नैवेद्यार्पणे । तांबूलदाने लक्ष्मी स्थिर ॥३२॥
चतुर्विध पुरुषार्थ । नमस्कारिता त्वरित । अष्टैश्वर्यै नांदत । ईश्वरजप केलिया ॥३३॥
होमे सर्व कोश पूर्ण । समृद्धि होतसे जाण । करिता ब्राह्मणभोजन । सर्व देवता तृप्त होती ॥३४॥
ऐसे सोमवार व्रत । कन्ये करी वो निश्चित । भव आलिया दुरित । परिहरती महाक्लेश ॥३५॥
गौरीहरपूजा करिता । समस्त दुरिते जाती तत्त्वता । ऐकोनि सीमंतिनी तत्त्वता । अंगिकारिले व्रत देखा ॥३६॥
सोमवारचे व्रत । आचरे सीमंतिनी त्वरित । पिता देखोनि निश्चित । विवाहायोग्य म्हणोनि ॥३७॥
राजा विचारी मानसी । वर्हाड करावे कन्येसी । जैसे प्राक्तन असेल तिसी । तैसे घडो म्हणतसे ॥३८॥
विचारोनि मंत्रियांसी । पाठविता झाला राष्ट्रांसी । दमयंतीनळवंशी । इंद्रसेनाचा कुमारक ॥३९॥
चंद्रांगद वर बरवा । जैसा तेज चंद्रप्रभा । बोलाविले विवाहशोभा । कन्या दिधली संतोषे ॥१४०॥
राजे भूमांडलिक देखा । समस्त आले वर्हाडिका । वर्हाड झाले अतिकौतुका । महोत्साह नानापरी ॥४१॥
नाना द्रव्यालंकार । वर्हाडिका देई नृपवर । अखिल दाने देकार । विप्रालागी देता झाला ॥४२॥
पाठवणी केली सकळिका । जामात ठेविला कौतुका । कन्यास्नेह अनेका । म्हणोनि राहविले राजपुत्रा ॥४३॥
राजपुत्र श्वशुरगृही । स्त्रिया प्रीति अतिस्नेही । काळ क्रमिता एके समयी । जलक्रीडेसी निघाला ॥४४॥
कालिंदी म्हणिजे नदीसी । राजपुत्र परियेसी । सर्व दळ समागमेसी । गेला नदीसी विनोदे ॥४५॥
राजपुत्र निघे नदीत । सवे निघाले लोक बहुत । विनोदे असे पोहत । अतिहर्षे जलक्रीडा ॥४६॥
पोहता राजकुमार देखा । बुडाला मध्ये गंगोदका । आकांत झाला सकळिका । काढा काढा म्हणताती ॥४७॥
सवे सैन्य लोक सकळ । होते नावेकरी प्रबळ । उदकी पाहताती तये वेळ । न दिसे कोठे बुडाला ॥४८॥
उभय तटी सैन्यातून । धावत गेले राजसदना । व्यवस्था सांगती संपूर्ण । जामात तुमचा बुडाला ॥४९॥
कालिंदी नदीच्या डोहात । संगतीने होते पोहत । अदृश्य झाला त्वरित । न दिसे कुमार बुडाला ॥१५०॥
ऐकोनि राजा पडे धरणी । मूर्च्छना येऊनि तत्क्षणी । कन्या ऐकताच श्रवणी । त्यजू पाहे प्राणाते ॥५१॥
राजा कन्येसी संबोखित । आपण गेला धावत । राजस्त्रिया शोक करीत । कन्यादुःखे अतिबहु ॥५२॥
सीमंतिनी करी शोका । म्हणे देवा त्रिपुरांतका । शरण रिघालिया देखा । मरण कैसे न आले मज ॥५३॥
मृत्यु चवदा वर्षी जाण । म्हणोनि धरिले तुमचे चरण । वृथा गेले व्रताचरण । सोमवार शिवाचे ॥५४॥
तव देणे अढळ सकळा । मज उपेक्षिले जाश्वनीळा । अपकीर्ति तुज केवळा । शरणागता रक्षिसी ॥५५॥
स्मरण करी श्रीगुरूसी । याज्ञवल्क्यपत्नीसी । सांगितले व्रत आम्हांसी । सौभाग्य स्थिर म्हणोनिया ॥५६॥
तिचिया वाक्ये करूनि । पूजिली शिवभवानी । वृथा झाली माझे मनी । शीघ्र विनवी शिवासी ॥५७॥
ऐसे दुःखे प्रलापत । सीमंतिनी जाय रडत । गंगाप्रवेश करीन म्हणत । निघाली वेगे गंगेसी ॥५८॥
पिता देखोनि नयनी । धरावया गेला धावोनी । कन्येते आलिंगोनी । दुःख करी अत्यंत ॥५९॥
सकळ मंत्री पुरोहित । सर्व सैन्य दुःख करीत । बोलाविले नावेकरी त्वरित । पहा म्हणती गंगेत ॥१६०॥
गंगा सकळ शोधिती । न दिसे कुमार कवणे गती । शोक करीतसे सीमंती । राजा संबोखी तियेसी ॥६१॥
राजकुमाराचे सेवक । करू लागले बहु दुःख । सांगो गेले पुत्रशोक । इंद्रसेनाकारणे ॥६२॥
ऐकोनिया इंद्रसेन । दुःख करी अतिगहन । भार्येसहित धावून । आला तया मृत्युस्थळा ॥६३॥
दोघे राव मिळोन । शोक करिती दारुण । हा हा कुमारा म्हणोन । ऊर शिर पिटताती ॥६४॥
हा हा पुत्रा ताता म्हणत । राजा गडबडा असे लोळत । मंत्री राजकुळ समस्त । नगरलोक दुःख करिती ॥६५॥
कोठे गेला राजसुत । म्हणोनि सीमंतिनी रडत । खिन्न झाले समस्त । मातापितर श्वशुरादि ॥६६॥
कोणे स्थानी पति गेले । म्हणोनि सीमंतिनी लोळे । ललाट हस्ते पिटिले । पार नाही शोकासी ॥६७॥
सीमंतिनी म्हणे पितयासी । प्राण त्यजीन पतिसरसी । वाचूनिया संसारासी । वैधव्य कोण भोगील ॥६८॥
पुसे सकळ द्विजासी । करावे की सहगमनासि । विप्र सांगती रायासी । प्रेतावेगळे करू नये ॥६९॥
प्रेत शोधावे नदीत । दहन करावे कन्येसहित । न दिसे बुडाला गंगेत । केवी सहगमन होईल ॥१७०॥
आता इसी ऐसे करणे । प्रेत सापडे तववरी राखणे । ऐकोनिया द्विजवचने । राजा कन्ये विनवीतसे ॥७१॥
ऐसे व्याकुळ दुःखे करिती । मंत्री पुरोहित म्हणती । जे असेल होणार गती । ब्रह्मादिका चुकेना ॥७२॥
होणार जहाली देवकरणी । काय कराल दुःख करोनी । ऐसे मंत्री संबोखुनी । रायाते चला म्हणती ॥७३॥
निघाले राजे उभयता । मंदिरा पावले दुःख करिता । इंद्रसेन अति दुःखिता । न विसरे कधी पुत्रशोक ॥७४॥
राज्य-व्यापार सोडूनि । दुःख करी पुत्रचिंतनी । गोत्रजी राज्य हिरूनी । कपटे घेतले तयाचेच ॥७५॥
सहभार्या रायासी । ठेविते झाले कारागृहासी । पुत्रशोके बहु त्यासी । राज्यभोग चाड नाही ॥७६॥
चित्रवर्मा राव देखा । कन्या ठेविली ममत्विका । प्राण त्यजू पाहे निका । लोक निंदितील म्हणोनि ॥७७॥
राव म्हणे कन्येसी । पुत्र नाही आमुचे वंशी । कन्या एक तू आम्हांसी । पुत्रापरी रहाटावे ॥७८॥
लोक निंदितील आम्हांसी । वैधव्य आले परियेसी । वर्ष एक क्रमिलियासी । पुढे आचार करी वो बाळे ॥७९॥
पित्याचे वचन ऐकोनी । करीतसे बहु चिंतनी । म्हणे देवा शूळपाणि । केवी माते गांजिले ॥१८०॥
ऐसे विचारुनी मानसी । व्रत आचरे तत्परेसी । सोमवार उपवासासी । ईश्वरपूजा करीतसे ॥८१॥
इकडे तो राजकुमार । बुडाला होता गंगापूर । गेला जेथे पाताळनगर । वासुकी जेथे राज्य करी ॥८२॥
नागलोकीचिया नारी । आल्या होत्या नदीतीरी । राजकुमार आला पुरी । नदीतटाकी वहातसे ॥८३॥
देखोनिया नागकन्या । काढिती संतोषे करोनिया । अमृता शिंपिती आणुनिया । सावध केला तयाते ॥८४॥
कन्या मिळूनि त्यासी । घेवोनि जाती तक्षकापासी । विचित्र नगर परियेसी । राजपुत्र पहात असे ॥८५॥
पाहे पाताळनगर-रचना । जैसी शोभा इंद्रभुवना । गोपुरे दिसती महारत्ना । विद्युल्लतेपरी ॥८६॥
इंद्रनीळ वैडुर्यैसी । मानिके मुक्ताफळांसी । महारम्य पुरी जैसी । सूर्यकांति मिरवत ॥८७॥
चंद्रकांतिसरसी भूमि । महाद्वारे कपाट हेमी । अनेक रत्ने नाही उपमी । ऐशा मंदिरा प्रवेशला ॥८८॥
पुढे देखिली सभा थोर । समस्त बैसले सर्पाकार । आश्चर्य करी राजकुमार । असंख्य सर्प दिसताती ॥८९॥
सभेमध्ये अतिशोभित । मध्ये बैसला पन्नगनाथ । जैशी सूर्यकांति फाकत । अति उन्नत बैसला ॥१९०॥
अनेक शत फणा दिसती । जैशी वीज लखलखती । पीतांबरे सज्योती । रत्नकुंडलमंडित ॥९१॥
अनेकरत्नखचित देखा । मुकुट मिरवती सहस्त्र एका । सहस्त्रफणी मिरवे तक्षका । ऐसा सभे बैसला असे ॥९२॥
रूपयौवन नागकन्या । नानापरी भरणे लेवोनिया । अनेक सहस्त्र येवोनिया । सेवा करिती तक्षकाची ॥९३॥
ऐशा सभास्थानी देख । राव बैसला तक्षक । देखोनिया राजकुमारक । नमन करी साष्टांगी ॥९४॥
तक्षक पुसे नागकन्यांसी । कैचा कुमार आणिलासी । सुलक्षण दिसतो कैसी । कोठे होता म्हणे तया ॥९५॥
नागकन्या म्हणती त्यासी । नेणो नाम याचे वंशी । वहात आला यमुनेसी । घेऊन आलो तुम्हांजवळी ॥९६॥
तक्षक पुसे राजकुमारासी । नाम कवण कवणे वंशी । काय कारणे आलासी । कवण देशी वास तुझा ॥९७॥
सांगे राजकुमार देख । आम्ही भूमंडळनायका । नैषध राजपति ऐका । नळनामे पुण्यश्लोक ॥९८॥
त्याचा पुत्र इंद्रसेन । जन्म आमुचा त्यापासून । चंद्रांगद नामे आपण । गेलो होतो श्वशुरागृहा ॥९९॥
जलक्रीडा करावयासी । गेलो होतो यमुनेसी । विधिवशे आम्हांसी । बुडालो नदी अवधारा ॥२००॥
वहात आलो नदीत । नागकन्या मज देखत । घेवोनि आल्या तुम्हांप्रत । पूर्वभाग्ये करूनि ॥१॥
पूर्वार्जित पुण्यवंशी । भेटी झाली चरणांसी । धन्य माझे जीवित्वासी । कृतार्थ झालो म्हणतसे ॥२॥
करुणावचन ऐकोनि । तक्षक बोले संतोषोनि । नको भिऊ म्हणोनि । धैर्य तया दिधले ॥३॥
शेष म्हणे रे बाळा । तू आहेसी मन निर्मळा । तुमचे घरी सर्वकाळा । दैवत कोण पूजितसा ॥४॥
ऐसे ऐकोनि राजकुमार । हर्षे जहाला निर्भर । सांगतसे विस्तार । आपुला देव शंकर ॥५॥
सकळ देवांचा देव । नाम ज्याचे सदाशिव । वामांगी उमा अपूर्व । त्यालागी पूजू निरंतर ॥६॥
ज्यापासोनि जनित ब्रह्मा । सृष्टि सृजितो अनुपमा । तो सदाशिव आम्हा । निज दैवत निर्धारे ॥७॥
तयाच्या सत्त्वगुणेसी । विष्णु उपजला परियेसी । प्रतिपाळक लोकांसी । तो सदाशिव आराधितो ॥८॥
ज्याच्या तामसगुणे जाण । एकादश रुद्रगण । उपजले असती याकारण । प्रलयकर्ता या नाव ॥९॥
धाता विधाता आपण । उत्पत्तिस्थितिलयाकारण । तेजासी तेज असे जाण । तैसा ईश्वर पूजितसो ॥२१०॥
पृथ्वी आप तेजासी । जो पूर्ण वायु आकाशी । तैसा पूजितसो शिवासी । म्हणे राजकुमार देखा ॥११॥
सर्वां भूती असे संपूर्ण । चिन्मय आपण निरंजन । जो रूपे असे अचिंतन । तो ईश्वर पूजितसो ॥१२॥
ज्याची कथा वेद जहाले । तक्षक शेष ज्याची कुंडले । त्रिनेत्री असे चंद्र मोळे । तैसा शंकर पूजितसो ॥१३॥
ऐसे ऐकोनि वचन । तक्षक संतोषला अतिगहन । राजकुमारा आलिंगोन । तुष्टलो तुष्टलो म्हणतसे ॥१४॥
तक्षक बोले तये वेळी । तुज देईन राज्य सकळी । तुवा रहावे पाताळी । आनंदे भाग्य भोगीत ॥१५॥
माझ्या लोकी जे जे रत्न । ते ते देईन तुजकारण । पावोनिया समाधान । सुखे येथे रहावे ॥१६॥
पाताळ लोकीची रचना । पहावी तुवा अनुपमा । कल्पवृक्ष मनोरमा । आहेत माझ्या नगरात ॥१७॥
अमृत न देखती स्वप्नी कोणी । ते भरले असे जैसे पाणी । तळी बावी पोखरणी । अमृताच्या माझ्या घरात ॥१८॥
नाही मरण तव येथे । रोगपीडादि समस्ते । नेणती कोणी स्वप्नावस्थे । ऐसे नगर माझे असे ॥१९॥
सुखे रहावे येथे स्वस्थ । तक्षक कुमारक सांगत । राजपुत्र असे विनवीत । करुणावचने ॥२२०॥
राजपुत्र विनवी तक्षकासी । मी एकलाची पितयाचे कुशी । भार्या चतुर्दश वर्षी । शिवपूजनी रत सदा ॥२१॥
नूतन झाले माझे पाणिग्रहण । गुंतले तेथे अंतःकरण । पाहीन मातापिताचरण । तेणे सर्वस्व पावलो ॥२२॥
आपण बुडालो नदीत । पिता माता दुःख करीत । पत्नी जीव त्यागील सत्य । हत्या पडे मस्तकी ॥२३॥
देखिले तव चरण आपण । तेणे झालो धन्य धन्य । रक्षिला आपण माझा प्राण । दर्शन करा मातापिता ॥२४॥
तक्षक झाला संतोषित । नाना रत्ने त्यासी देत । अमृत पाजिले बहुत । आण्क दिधले स्त्रियेसी ॥२५॥
कल्पवृक्षफळे देती । अपूर्व वस्तु आभरणे त्यासी । जे अपूर्व असे क्षिती । अमोल्य वस्तु देता जहाला ॥२६॥
इतुके देवोनि कुमारकासी । तक्षक बोले परियेसी । जे जे काळी आम्हा स्मरसी । तव कार्य सिद्धि पावेल ॥२७॥
आणिक संतोषोनि चित्ती । वस्त्रे वाहने मागुती । तुरंग दिधले मनोगती । सवे दे कुमार आपुला ॥२८॥
चंद्रांगदकुमारासी । इतके दिधले आनंदेसी । निरोप दिधला परियेसी । वाहन तुरंग मनोहर ॥२९॥
तक्षका नमूनि त्वरित । वारूवरी आरूढ राजसुत । मनोवेगे मार्ग क्रमित । नागकुमार सवे जाणा ॥२३०॥
जिये स्थानी बुडाला होता । तेथे पावला क्षण न लागता । निघाला बाहेर वारूसहिता । नदीतटाकी उभा असे ॥३१॥
सोमवार त्या दिवशी । सीमंतिनी आली स्नानासी । सवे होत्या सखी सेवेसी । नदीतीरी उभी असे ॥३२॥
सीमंतिनी म्हणे सखियासी । आश्चर्य वाटे मानसी । उदकातुनी निघाला परियेसी । सवे असे नागपुत्र ॥३३॥
राक्षस होई की वेषधरू । रूप धरिले असे नरू । दिसतसे मनोहरू । तुरंगारूढ जाहला असे ॥३४॥
कैसे पहा हो रूप यासी । जेवी सूर्य प्रकाशी । दिव्यमालांबरे कैसी । सुगंध असे परिमळा ॥३५॥
दश योजनेपर्यंत । सुवास येतसे अमित । पूर्वी देखिला असे रूपवंत । भासे त्यासी पाहिला ॥३६॥
स्थिर स्थिर भयभीता । त्याचिया पहाती स्वरूपता । आपुला पतीसादृश्य म्हणता । रूप आठवी तये वेळी ॥३७॥
राजपुत्र पाहे तियेसी । म्हणे स्वरूपे माझी स्त्री ऐसी । गळसरी न दिसे कंठासी । हार नसे मुक्ताफळ ॥३८॥
अवलोकितसे अंगखूण । न दिसे हळदी करी कंकण । चित्ती व्याकुळ रूपहीन । सदृश दिसे प्राणेश्वरी ॥३९॥
मनी विचरी मागुता । रूप तिचे आठविता । तुरंगावरूनि उतरता । नदीतीरी बैसला असे ॥२४०॥
बोलावोनि तियेसी । पुसतसे अति प्रेमेसी । तुझा जन्म कवणे वंशी । पुरुष तुझा कोण सांगे ॥४१॥
का कोमाइलीस बाळपणी । दिससी शोके म्लान लक्षणी । सांगावे मज विस्तारोनि । अति स्नेहे पुसतसे ॥४२॥
ऐकोनि सीमंतिनी देखा । आपण न बोले लज्जे ऐका । सखियांसी म्हणे बालिका । वृत्तान्त सांगा समस्त ॥४३॥
सखिया सांगती तयासी । हे सीमंतिनी नाम परियेसी । चंद्रांगदाची महिषी । चित्रवर्म्याची हे कन्या ॥४४॥
इचा पति अतिसुंदर । चंद्रांगद नामे थोर । जळक्रीडा करिता फार । येथे बुडाला नदीत ॥४५॥
तेणे शोक करिता इसी । वैधव्य आले परियेसी । दुःख करीत तीन वर्षी । लावण्य इचे हरपले ॥४६॥
सोमवारव्रत करीत । उपवास पूजादि आचरत । आज स्नानानिमित्त । आली असे नदीसी ॥४७॥
इच्या श्वशुराची स्थिति देखा । पुत्रशोके विकळ ऐका । राज्य घेतले दायादिका । कारागृही घातले ॥४८॥
या कारणे सीमंतिनी । नित्य पूजी शूलपाणि । सोमवार उपोषणी । म्हणोनि करिती परियेसा ॥४९॥
इतके सख्या सांगती । मग बोले आपण सीमंती । किमर्थ पुसता आम्हांप्रती । आपण कोण कंदर्परूपी ॥२५०॥
गंधर्व किंवा तुम्ही देव । किन्नर अथवा सिद्ध गंधर्व । नररूप दिसता मानव । आमुते पुसता कवण कार्या ॥५१॥
स्नेह्भावे करोनी । पुसता तुम्ही अति गहनी । पूर्वी देखिले होते नयनी । न कळे खूण म्हणतसे ॥५२॥
आप्तभाव माझ्या मनी । स्वजन तसे दिसता नयनी । नाम सांगा म्हणोनि । आठवी रूप पतीचे ॥५३॥
आठवोनि पतीचे रूप । करू लागली अति प्रलाप । धरणी पडली रुदितबाष्प । महादुःख करीतसे ॥५४॥
तियेचे दुःख देखोनि नयनी । कुमार विलोकी तटस्थपणी । मुहूर्त एक सावरोनि । आपण दुःख करीतसे ॥५५॥
दुःख करोनिया देखा । प्रक्षाळिले आपुल्या मुखा । उगी राहे म्हणे ऐका । आमुचे नाम सिद्ध म्हणे ॥५६॥
सीमंतिनी करिता शोक अपार । जवळी आला राजकुमार । हाती धरली सत्वर । संबोखीतसे प्रेमभावे ॥५७॥
एकांती सांगे तियेसी । म्हणे तुझ्या भ्रतारासी । देखिले आम्ही दृष्टीसी । सुखी आता असावे ॥५८॥
तव व्रतपुण्ये करोनी । पति शीघ्र पहासी नयनी । चिंता करून नको म्हणोनी । तृतीय दिनी भेटेल ॥५९॥
तव पति माझा सखा । प्राण तोचि ऐका । संदेह न करी वो बालिका । आण शिवचरणाची ॥२६०॥
ऐसे एकांती सांगून । प्रगट न करी म्हणून । दुःख आठवले ऐकून । सीमंतिनी बाळिकेसी ॥६१॥
सुटल्या धारा लोचनी । प्रेमे रडे स्फुंदोनी । विचार करी सीमंतिनी । हाचि होय मम पति ॥६२॥
पतीसारिखे मुखकमळ । नयन सुंदर अति कोमळ । ध्वनि बोलता ज्याची मंजुळ । अति गंभीर बोलतसे ॥६३॥
मृदु वाणी पतीसरसी । तैसाची बोले तो हर्षी । धरिता माझिया करासी । अति मृदु लागले ॥६४॥
माझे पतीचे लक्षण । मी जाणे सर्व खूण । हाचि होय माझा प्राण । समस्त चिन्हे असती ॥६५॥
यास देखोनि नयनी । धारा सुटल्या प्रेमे जीवनी । नवलपरी विचारूनी । मागुती अनुमान करीत ॥६६॥
दैवहीन असे आपण । कैसा पति येईल म्हणोन । बुडाला नदीत जाऊन । मागुती कैसी भ्रांति म्हणे ॥६७॥
मेला पति मागुती येता । ऐशी न ऐकिली कानी कथा । स्वप्न देखिले की भ्रांता । काय कळते माझे मना ॥६८॥
धूर्त होय की वेषधारा । राक्षस यक्ष किंवा किन्नरी । कपटे प्रगटला नदीतीरी । म्हणोनि कल्पना करीतसे ॥६९॥
किंवा पावला शिवव्रते । की धाडिला गिरिजानाथे । संकट जाणोनि आमुच्या येथे । मैत्रेयीकारणे धाडिला ॥२७०॥
ज्यास प्रसन्न शंकर । त्यास कैचा दुःखविकार । चिंतिले पाहिजे निर्धारे । ऐसे चिंती सीमंतिनी ॥७१॥
ऐसे होता राजकुमार । आरूढला वारूवर । निरोप मागे प्रीतिकर । सीमंतिनी नारीसी ॥७२॥
निघाला अश्व मनोवेगे । पातला नगरा अतिशीघ्रे । वासुकीपुत्र होता संगे । तया पाठवी नगरांत ॥७३॥
त्वा जावोनि वैरियांसी । इष्टती सांगा वादीयासी । न ऐकता तव बोलासी । संहारीन बोलावे ॥७४॥
ऐसे वचन ऐकोनि । त्वरित पावला राजभुवनी । उभा राहोनि कठोर वचनी । बोलतसे नगराधिपतीसी ॥७५॥
चला शीघ्र कुटुंबेसी । चंद्रांगदाचे भेटीसी । तक्षकाचे दर्शनासी । गेला होता पाताळी ॥७६॥
कालिंदीये नदीत । बुडाला हे ऐकोनिया मात । तुम्ही केला स्वामीघात । राज्य घेतले इंद्रसेनाचे ॥७७॥
आता सांगेन तुम्हांसी । चाड असे जरी प्राणासी । शरण जावे तयासी । इंद्रसेना स्थापोनी ॥७८॥
तक्षकासारखा मैत्र जोडला । दिधले नवनागसहस्त्रबळा । शीघ्र लागा चरणकमळा । चंद्रांगदाचे जाऊनी ॥७९॥
न ऐकाल माझ्या वचना । तरी आताचि घेतो प्राणा । तक्षके पाठविले आपणा । पारिपत्याकारणे हो ॥२८०॥
ऐसे वचन ऐकोनी । शत्रु भयाभीत मनी । हीन बुद्धि केली जाणोनी । आता शरण रिघावे ॥८१॥
जरी करू बलात्कार । तक्षक करील संहार । लोकात होई निंदा फार । प्राण जाईल आपुला ॥८२॥
ऐसे विचारूनि मानसी । बाहेर आणिती इंद्रसेनासी । नाना वस्त्रे आभरणेसी । सिंहासनी बैसविला ॥८३॥
सकळ विनविती त्यासी । अपराध घडला आम्हांसी । प्राण राखा वेगेसी । म्हणोनि चरणी लागले ॥८४॥
राया इंद्रसेनासी । तक्षकपुत्र सांगे त्यासी । तुमचा पुत्र आला परियेसी । वासुकी भेटी गेला होता ॥८५॥
ऐकोनि राव संतोषी त्यासी । आठवोनि अधिक दुःखासी । मूर्छा येवोनि धरणीसी । पत्नीसहित पडियेला ॥८५॥
नागकुमरे उठविले त्यासी । दुःख कासया करावे हर्षी । येईल पुत्र भेटीसी । त्वरे करोनि आतांची ॥८६॥
मग राव अतिहर्षी । बोलावित मंत्रियांसी । नगर श्रृंगारावयासी । निरोप दिधला तये वेळी ॥८७॥
ऐसा निरोप देऊन । भेटी निघाला आपण । सकळ दायाद स्वजन । राणीवसा आदिकरूनि ॥८९॥
मंत्रीपुरोहितासहित । निघाले लोक समस्त । कौतुक पाहो म्हणत । मेला पुत्र कैसा आला ॥२९०॥
आनंद झाला सकळिका । राव मानि महाहरिखा । पाहीन म्हणे पुत्रमुखा । अति आवडीने अवधारा ॥९१॥
सवे वाजंत्र्यांचे गजर । नगरलोका संतोष थोर । करिताती जयजयकार अति उल्हास करिताती ॥९२॥
ऐसे जाऊनि पुत्रासी । भेटी झाली रायासी । चंद्रांगद पितयासी । नमस्कारी साष्टांगे ॥९३॥
अति प्रेमे पुत्रासी । आलिंगी राव त्वरेसी । सद्गदित कंठेसी । नेत्री सुटल्या अश्रुधारा ॥९४॥
पुत्रासी म्हणे इंद्रसेन । आलासी बाळा माझा प्राण । श्रमलो होतो तुजविण । म्हणोनि सांगे दुःख आपुले ॥९५॥
मातेते आलिंगोन । दुःख करी ती अतिगहन । विनवीत तिये संबोखोन । मजनिमित्त कष्टलिसी ॥९६॥
पुत्र नव्हे मी तुमचा शत्रु । जाऊनि आपुले सुखार्थु । तुम्हा दुखविले की बहुतु । नेदीच सुख तुम्हाते ॥९७॥
आपण जावोनि पाताळी । राहिलो सुखे शेषाजवळी । तुम्ही कष्टलीत बहुतकाळी । मजनिमित्त अहोरात्र ॥९८॥
काष्ठासरी अंतःकरण । माझे असे की सत्य जाण । माताजीव जैसे मेण । पुत्रानिमित्त कष्ट बहुत ॥९९॥
मातापितयांचे दुःख । जो नेणे तोचि शतमूर्ख । उत्तीर्ण व्हावया अशक्य । स्तनपान एक घडीचे ॥३००॥
मातेवीण देव देखा । पुत्रासि नाही विशेखा । कवण उत्तीर्ण नव्हे ऐका । माता केवळ मृडानी ॥१॥
दुःख देत जननीसी । तो जाय यमपुरासी । पुत्र नव्हे त्याचे वंशी । सप्तजन्मी दरिद्री ॥२॥
ऐसे मातेसि विनवूनी । भेटतसे तो भाऊबहिणी । इष्ट सोयरे अखिल जनी । प्रधानासमवेत नागरिका ॥३॥
इतुकिया अवसरी । प्रवेश केला नगराभीतरी । समारंभ केला अति थोरी । पावले निजमंदिरा ॥४॥
तक्षकाचे पुत्रासी । गौरविले सन्मानेसी । वस्त्रे भूषणे रत्नेसी । इंद्रसेने अतिप्रीती ॥५॥
चंद्रांगद सांगे पितयासी । तक्षक उपकार विस्तारेसी । प्राण वाचविला आम्हासी । द्रव्य दिधले अपार ॥६॥
सुंदर वस्त्रे आभरणे । दिधली होती तक्षकाने । पिता देखोनि संतोषाने । म्हणे धन्य तक्षक ॥७॥
निरोप दिधला नागपुत्रासी । बोळविले तयासी । भृत्य पाठविले वेगेसी । चित्रवर्म्याचे नगरात ॥८॥
राव म्हणे तये वेळी । सून माझी दैवे आगळी । तिचे धर्मै वाचला बळी । पुत्र माझा अवधारा ॥९॥
तिणे आराधिला शंकर । तेणे कंकण चुडे स्थिर । तेणे वाचला माझा कुमर । सौभाग्यवती सून माझी ॥३१०॥
म्हणोनि पाठविले वेगेसी । लिहोनिया वर्तमानासी । चित्रवर्मरायासी । इंद्रसेन रायाने ॥११॥
हेर निघाले सत्वरी । चित्रवर्म्याचिये नगरी । व्यवस्था सांगितली कुसरी । चंद्रांगदशुभवार्ता ॥१२॥
संतोषे राजा ऐकोनि देखा । करिता झाला महासुखा । दाने दिधली अपार ऐका । रत्ने भूषणे हेरांसी ॥१३॥
इंद्रसेन राजा सत्वर । पुनरपि करावया वर्हाड थोर । चंद्रांगद बडिवार । सेना घेवूनि निघाला ॥१४॥
महोत्साह झाला थोर । वर्हाड केले धुरंधर । चंद्रांगद प्रीतिकर । सीमंतिनीसी भेटला ॥१५॥
पाताळींची अमोल्य वस्तु । प्राणेश्वरीसी अर्पित । पाजिता झाला अमृत । महानंद प्रवर्तला ॥१६॥
कल्पवृक्षफळ देखा । देवोनि तोषविला नायका । अमोल्य वस्त्राभरणी देखा । दश योजने तेज फाके ॥१७॥
ऐसा उत्साह विवाह केला । आपुले पुरीसी निघाला । सीमंतिनीचे वैभवाला । जोडा नसे त्रिभुवनी ॥१८॥
मग जावोनि नगरासी । राज्यी स्थापिला पुत्रासी । दहा सहस्त्र पूर्ण वर्षी । राज्य केले चद्रांगदे ॥१९॥
सीमंतिनी करी व्रतासी । उपवास सोमवारासी । पूजिले गौरीहरासी । म्हणोनि पावली इष्टार्थ ॥३२०॥
ऐसे विचित्र असे व्रत । म्हणोनि सांगे श्रीगुरुनाथ । ऐक सुवासिनी म्हणत । अति प्रीती निरूपिले ॥२१॥
ऐसे करी वो आता व्रत । चुडे कंकणे अखंडित । कन्या पुत्र होती बहुत । आमुचे वाक्य अवधारी ॥२२॥
दंपत्य विनवी श्रीगुरूसी । तुमची चरणसेवा आम्हांसी । पुरविती मनोरथासी । आम्हा व्रत कायसे ॥२३॥
आमचा तू प्राणनायक । तुजवाचोनि नेणो आणिक । तव स्मरणमात्रे असे निक । म्हणोनि चरणी लागली ॥२४॥
श्रीगुरु म्हणती तयासी । आमुचे निरोपे करा ऐसी । व्रत आचरा सोमवारासी । तेचि सेवा आम्हा पावे ॥२५॥
निरोप घेऊनि श्रीगुरूचा । नेम धरिला सोमवाराचा । भेटीलागी तयाच्या । मातापिता पावली ॥२६॥
ऐकोनिया कन्यापुत्रवार्ता । संतोषली त्याची माता । द्रव्य वेचिले अपरिमिता । समाराधना ब्राह्मणांसी ॥२७॥
पूजा करिती श्रीगुरूसी । आनंद अति मानसी । समारंभ दिवानिशी । बहुत करिती भक्तीने ॥२८॥
ऐशापरी वंदोनी । श्रीगुरूचा निरोप घेउनी । गेली ग्रामा परतोनी । ख्याती झाली चहू राष्ट्री ॥२९॥
पुढे त्या दंपतीसी । पाच पुत्र शतायुषी । झाले आशीर्वादेसी । श्रीगुरूरायाच्या ॥३३०॥
प्रतिवर्षी दर्शनासी । दंपती येती भक्तीसी । ऐसे शिष्य परियेसी । श्रीगुरूचे माहात्म्य ॥३१॥
ऐसे श्रीगुरुचरित्र । सिद्ध सांगे पवित्र । नामधारक अतिप्रीती । ऐकतसे अवधारा ॥३२॥
गंगाधराचा कुमर । सरस्वती विनवी गुरुकिंकर । स्वामी माझा पारंपार । श्रीनृसिंहसरस्वती ॥३३॥
ऐसा वरदमूर्ति देखा । सकळ जन तुम्ही ऐका । प्रसन्न होईल तात्काळिका । न धरावा संदेह मानसी ॥३४॥
साखर स्वादु म्हणावयासी । उपमा द्यावी कायसी । मनगटीचे कंकणासी । आरसा कासया पाहिजे ॥३५॥
प्रत्यक्ष पाहता दृष्टान्तेसी । प्रमाण कासया परियेसी ।ख्याती असे भूमंडळासी । कीर्ति श्रीगुरुयतीची ॥३६॥
ऐका हो जन समस्त । सांगतो मी उत्तम होत । सेवा करिता श्रीगुरुनाथ । त्वरित होय मनकामना ॥३७॥
अमृताची आरवटी । घातली असे गोमटी । पान करा हो तुम्ही घोटी । धणीवरी सकळिक ॥३८॥
श्रीगुरुचरित्र कामधेनु । ऐकता होय पतित पावनु । नाम ज्याचे कामधेनु । तो चिंतिले पुरवित ॥३९॥
इति श्रीगुरुचरित्रामृत । सीमंतिनी आख्यान विख्यात । पंचत्रिशत् अध्यायात । कथासार सांगितली ॥३४०॥
इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे सीमंतिन्याख्यानं नाम पंचत्रिंशोऽध्यायः ।
ओवीसंख्या ३४० ॥
श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
क्रमशः
No comments:
Post a Comment