Thursday, February 3, 2011

Gurucharitra - Adhyay 37

Chapter 37 This is the last chapter to explain the KarmaKand. In this chapter, Guruji continues to explain and elaborate on many more karmas to be performed by a Brahmin. Till now we have seen the courses of conduct.

CHAPTER 37

Dharma of a Brahmin.

Sri Guru explained the customs that Brahmins should follow. He said, "You should use Krishnajina in the house and keep the house clean. The prayer room should be clean and decorated with Rangoli. Meditate in silence and worship God. Wooden and stone idols may be worshipped, as they are forms and abodes of God. Sit on a good , clean seat and do Pranayama, worship God with flowers, and with faith worship Vishnu with Tulsi, as He loves Tulsi, worship Shiva with Bel-pathra. Ganapathi loves Durva. In the afternoon feed guests and visitors, whether touchable or untouchable. Lotus leaf and banana leaf are good to use for eating. You must not eat in lead or copper plates. Bronze plates are the best for eating. Eat sweet dishes first. Rice should not be eaten first. It will not get digested. Eating left-over food is forbidden. After food you may have Thambula, betel leaf and nut with lime. There is no harm if one eats food with ghee or oil. After food you should study the Vedas."

"One must not sleep on the cremation ground, in a dilapidated temple, on the riverbank, near an ant-hill or a crossroad. Parashara Rishi has laid down these customs and Dharma. There is no difficulty for him who practises these customs as directed by the scriptures. He is revered even by the gods. Kamadhenu will come to his house.Lakshmi will live in such a house forever. Such a person will become a Brahmajnani."

The Brahmin was happy to receive this guidance on Dharma and said, "Oh, ocean of mercy, you have taken this incarnation to redeem devotees. You are like the lamp of knowledge and you have removed the darkness."

Saying so the Brahmin bowed at Sri Guru's lotus feet. Guru blessed him. This is the story of Guru Charithra. Whoever listens to it will gain great knowledge. It is a source of light for the ignorant.

Contd...

श्रीगणेशाय नमः ।

नामधारक विनवी सिद्धासी । पुढे कथा वर्तली कैसी । श्रीगुरु सांगती विस्तारेसी । काय निरूपिले यानंतर ॥१॥

ऐक नामधारका सगुणा । श्रीगुरु अवतार नारायणा । जाणे सर्व आचारखुणा । सांगतसे कृपेसी ॥२॥

त्रैमूर्तीच्या अवतारास । आचार सांगता काय प्रयास । ज्ञान देउनी पतितास । वेद म्हणविले कवणेपरी ॥३॥

ऐसे गुरुमूर्ति दातारु । भक्तजनकल्पतरु । सांगते झाले आचारु । कृपा करोनि विप्रासी ॥४॥

श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी । गृहरक्षणार्थ कारणासी अग्निमंथनकाष्ठासी । संपादावे कृष्णामार्जार ॥५॥

श्रीखंडादि मणिघृते । तिळ कृष्णाजिन छागवस्त्रे । इतुकी असावी पवित्रे । दुरिते बाधा करू न शकती ॥६॥

शुक्लपक्ष सारसासी । पोसावे घरी परियेसी । समस्तपापविनाशी । धेनु असावी आपुले घरी ॥७॥

देवपूजेचे विधान । सांगेन ऐका एक मन । गृह बरवे संमार्जन । देवगुह असावे ॥८॥

हिरण्य रौप्य ताम्रेसी । अथवा मृत्तिका पात्रेसी । संमार्जन करावे विधींसी । निषिद्ध पात्रे सांगेन ॥९॥

कास्यपात्री कन्यकाहस्ती । नोवरी अथवा शूद्र जाती । न करावे वस्त्र धरोनि वामहस्ती । दक्षिण हस्ती सारवावे ॥१०॥

प्रारंभ करावा नैऋत्यकोनी । रात्री न करावे उदक घेउनी । अगत्य करणे घडे मनी । भस्मे करोनि सारवावे ॥११॥

रंगमाळिका घालोनि निर्मळ । असावे देवताभुवनी । मग बैसोनि शुभासनी । देवपूजा करावी ॥१२॥

जैसी संध्या ब्राह्मणासी । देवपूजा करावी तैसी । त्रिकाल करावे अर्चनासी । एकचित्ते मनोभावे ॥१३॥

त्रिकाळी न घडे ज्यासी । प्रातःकाळी करावी हर्षी । तेही न साधे परियेसी । माध्याह्नकाळी करावे ॥१४॥

सायंकाळी मंत्रेसी । पुष्पे वाहोनि भक्तीसी । ऐसे न साधे जयासी । भोजनकाळी करावे ॥१५॥

देवपूजा न करी नर । पावे त्वरित यमपुर । नरक भोगी निरंतर । ऐक ब्राह्मणा एकचित्ते ॥१६॥

विप्रकुळी जन्म जयासी । पूजा न करिता जेवी हर्षी । तोचि होय यमग्रासी । वैश्वदेव न करी नर ॥१७॥

देवपूजा करावयासी । सहा प्रकार परियेसी । उदकनारायण विशेषी । पूजिता तृप्ति जगन्नाथा ॥१८॥

दुसरा प्रकार सांगेन ऐका । अग्निदेवपूजा अधिका । मानसपूजा अतिविशेखा । एकचित्ते परियेसा ॥१९॥

सूर्यपूजा करिता जाण । संतुष्ट होय नारायण । सामान्यपक्षे स्थंडिली जाण । प्रतिमापूजा स्वल्पबुद्धि ॥२०॥

ज्ञाता असेल बुद्धिमंत । यज्ञपुरुषपूजा त्वरित । स्वर्गापवर्गा पूजा देत । यज्ञपुरुषपूजा मुख्य जाण ॥२१॥

अथवा पूजावे धेनूसी । ब्राह्मणपूजा विशेषी । गुरुपूजा मनोभावेसी । प्रत्यक्ष तुष्टे गुरुमूर्ति ॥२२॥

गुरु त्रैमूर्ति म्हणोनि । बोलती समस्त श्रुतिवचनी । सकळाभीष्टे तयापासूनी । पाविजे चारी पुरुषार्थ ॥२३॥

कलिप्रवेश होता नरू । न करिता अंतःकरण स्थिरू । उत्पत्ति केली शाङर्गधरू । समस्त कलि उद्धारावया ॥२४॥

शालिग्रामचक्रांकितेसी । प्रकाश केला ह्रषीकेशी । तीर्थ घेता परियेसी । समस्त पापे नासती ॥२५॥

आज्ञा घेऊनि श्रीगुरूची । पूजा करावी प्रतिमेची । वेदोक्त मंत्र करोनी वाची । विधिपूर्वक पूजावे ॥२६॥

स्त्रीजनादि शूद्रांसी । न म्हणावे वेदमंत्रेसी । आगमोक्तमार्गैसी गुरुनिरोपे करावे ॥२७॥

श्रीगुरूचे निरोपाने । पूजिजे काष्ठे पाषाणे । तेचि होती देव जाणे । होती प्रसन्न परियेसा ॥२८॥

शुचि आसनी बैसोनी । करावे प्राणायाम तिन्ही । येभ्योमाता म्हणोनि । चेतन करावा परमात्मा ॥२९॥

प्रणव मंत्रोनि द्वादशी । उदक प्रोक्षावे आपुल्या शिरसी । संकल्प करोनि अंगन्यासी । कलशपूजा करावी ॥३०॥

देवाच्या दक्षिण भागेसी । कलश ठेवावा परियेसी । पूजा करोनि भक्तीसी । शंखपूजा करावी ॥३१॥

निर्माल्य काढोनि विनयेसी । टाकावे ते नैऋत्यदिशी । धौत वस्त्र हांतरोनि हर्षी । दीप प्रज्वलित करावा ॥३२॥

स्मरावे मनी श्रीगुरूसी । मनोवाक्कायकर्मैसी । अर्चन करावे पीठासी । विधिपूर्वक अवधारा ॥३३॥

चारी द्वारे पूजोनि । दिशा पूजाव्या अर्चुनी । शांताकार करा ध्यानी । मग आवाहनावे मंत्रोक्त ॥३४॥

सहस्त्रशीर्षेति आवाहनोनि । पुरुषएवेदं आसनी । एतावानस्य म्हणोनि । पाद्य द्यावे अवधारा ॥३५॥

मंत्र म्हणोनि त्रिपादूर्ध्व ऐसा । अर्घ्य द्यावे परियेसा । तस्माद्विराड म्हणा ऐसा । देवासी आचमन समर्पावे ॥३६॥

यत्पुरुषेण मंत्रेसी । स्नपन करा देवासी । दुग्धादि पंचामृतासी । स्नपनपूजा करावी ॥३७॥

पुरुषसूक्तादि रुद्रेसी । श्रुतिमार्गै करोनि न्यासासी । स्नपन करावे परियेसी । एकचित्ते अवधारा ॥३८॥

स्नपन करूनि देवासी । बैसवावे शूभासनेसी । तयज्ञमिति मंत्रेसी । वस्त्रे द्यावी परियेसा ॥३९॥

तस्माद्यज्ञेति मंत्रेसी । यज्ञोपवीत द्यावे देवासी । येणेचि मंत्रे गंधाक्षतेसी । वहावे अनन्यभक्तीने ॥४०॥

तस्मादश्वा अजायन्त । ऐसा तुम्ही मंत्र म्हणत । पुष्पे वहावी एकचित्त । मनःपूर्वक देवासी ॥४१॥

पुष्पे वहावयाचे विधान । सांगेन ऐका ऋषिजन । आपण पेरिली कुसुमे सगुण । उत्तम पक्ष परियेसा ॥४२॥

पुष्पे असती अरण्यात । ती मध्यम प्रकार बोलिजेत । क्रय करूनि घेता विकत । अधम पुष्पे जाणिजे ॥४३॥

उत्तम न मिळता घ्यावी विकत । उत्तम पक्ष पुष्पे श्वेत । रक्त मध्यम अधम पीत । कृष्णचित्र अधमाधम ॥४४॥

वर्जावी शिळी पुष्पे देख । सच्छिद्र अथवा कृमिभक्षक । भूमीवरी पडे ऐक । पुष्प त्यजावे देवासी ॥४५॥

शिळी नव्हेती द्रव्ये जाणा । बिल्वपत्रे तुळसी आणा । सहस्त्रपत्रे कमळे नाना । सदा ग्राह्य देवांसी ॥४६॥

शतपत्रे बकुलचंपकासी । पाटले कमले पुन्नागेसी । मल्लिका जाती करवीरेसी । कल्हारपुष्पे अर्पावी ॥४७॥

विष्णुपूजा करावयासी । वर्जावी पुष्पे तुम्ही ऐसी । धत्तूर अर्क करवीरेसी । रक्त पुष्पे वर्जावी ॥४८॥

गिरिकर्णिका निर्गुडेसी । सेवगा कपित्थ करंजेसी । अमलपत्र कुष्मांडेसी । पुष्पे विष्णूसी वर्जावी ॥४९॥

ही वाहिल्या होय दोषी । सांगेन ऐका समस्त ऋषि । पुजा करिती विष्णुसी । त्यजावी याचि कारणे ॥५०॥

अर्कपुष्प वाहिल्यासी । विनाश होय आपणासी । धत्तूरपुष्पे प्रज्ञानासी । कोविदारे दरिद्रता ॥५१॥

श्रीकर्णिकापुष्पे वाहता । कुळक्षय होय त्वरिता । कंटुकारीपुष्पे वाहता । शोक होय परियेसा ॥५२॥

कंदपुष्पे होय दुःख । शाल्मलीपुष्पे रोग ऐक । त्याची कारणे करूनि विवेक । पुष्पे वहावी विष्णूसी ॥५३॥

वर्जा पुष्पे ईश्वरासी । सांगेन नावे परियेसी । कपित्थ केतकी शशांकेसी । श्यामपुष्पे वर्जावी ॥५४॥

काष्ठ पिंपळ करंज देखा । बकुल दाडिंब केतका । घातकी निंबादि पंचका । माधवीपुष्पे वर्जावी ॥५५॥

चूत कुंद यूथिका जाती । रक्त पुष्पे वर्जावी निरुती । ईश्वरार्चने दोष घडती । श्वेतपुष्पे मुख्य देखा ॥५६॥

पूजा करिता गणेशासी । वर्ज करा तुम्ही तुलसी । नित्यपूजा करा दूर्वैसी । दूर्वा वर्ज शक्तिदेवीते ॥५७॥

येणे विधी पुष्पे वाहता । काम्य होय तुम्हा त्वरिता । चतुर्विध पुरुषार्था । लाधाल तुम्ही अवधारा ॥५८॥

यत्पुरुषेति मंत्रेसी । सुगंध धूपादि परिमळेसी । ब्राह्मणोस्येति मंत्रेसी । एकार्तिक्य करावे ॥५९॥

चंद्रमामनसो इति मंत्रेसी । नैवेद्य अर्पावा देवासी । तांबूल अर्पिता म्हणा मंत्रासी । नाभ्याआसीदिति ऐसा ॥६०॥

सुवर्णपुष्पे नीरांजन । सप्तास्येति मंत्रे करून । पुष्पांजलि घेऊन । देवा यज्ञेति मंत्रे अर्पावी ॥६१॥

धातापुरस्तात्‍ मंत्रेसी । नमस्कारावे देवासी । अति संमुख पृष्ठदेशी । गर्भगृही करू नये ॥६२॥

नमस्काराचे विधान । सांगेन ऐका विद्वज्जन । सव्य देवप्रदक्षिणा । करूनि नमन करावे ॥६३॥

आपुला गुरु माता पिता । संमुख जावे बाहेरूनि येता । अथवा उत्तम द्विज देखता । संमुख जावोनि वंदावे ॥६४॥

सभा असेल द्विजांची । नमस्कार करा तुम्ही एकची । देवार्चनी तैसेची । नमस्कार पावे समस्ता ॥६५॥

माता पिता श्रीगुरूसी । नमस्काराची रीति ऐसी । उभय हस्ते कर्णस्पर्शी । एकभावे वंदावे ॥६६॥

सव्य पादावरी देखा । सव्य हस्त स्पर्शोनि निका । वामहस्ती वामपादुका । धरूनि नमन करावे ॥६७॥

गुरुस्थानांची नावे । सांगेन ऐका भावे । विचारोनिया बरवे । नमस्कारावे येणे विधी ॥६८॥

माता पिता गुरु धाता । भयहर्ता अन्नदाता । व्रतबंध केल्या पुरोहिता । सापत्‍नी ते गुरुस्थानी ॥६९॥

ज्येष्ठ भ्राता अथवा चुलता । सापत्‍न असेल ज्याची माता । वय अधिक इष्टमित्रा । नमस्कारावे तयांसी ॥७०॥

निषिद्ध स्थाने नमावयासी । सांगेन ऐका तुम्हासी । उणे असेल वय ज्यासी । नमू नये विद्वज्जनी ॥७१॥

अग्नि समिधा पुष्पे कुशा । धरिला असेल अक्षतांकुशा । स्वहस्ती परहस्ती असता दोषा । अशस्त्रवध होईजे नमस्कारिता ॥७२॥

जप अथवा होम करिता । दूर देखिला द्विज येता । स्नान करिता जळी असता । नमन करिता दोष घडे ॥७३॥

एखादा विप्र असे धावत । नेणता अथवा धनगर्वित । क्रोधवंत किंवा मंगलस्नान करित । नमस्कार करू नये ॥७४॥

एकहस्ते ब्राह्मणासी । नमू नये परियेसी । सूतकिया मूर्ख जनांसी । करू नये नमस्कार ॥७५॥

गीतवाद्यादि नृत्येसी । संतुष्टावे देवासी । प्रार्थना करावी भक्तीसी । मग अर्चावे सनकादिका ॥७६॥

पूजा अपूर्व देवासी । हस्त ठेवूनि पीठेसी । उत्तरपूजा करावी हर्षी । मग करावे उद्वासन ॥७७॥

ऐसेपरी देवपूजा । करावी भक्तीने ऐका द्विजा । संस्कृत अन्न व्हावया काजा । वैश्वदेव करावा ॥७८॥

अग्नि अलंकार करूनि । अन्न अग्निकुंडी दाखवूनि । घृतसंमिश्रित करूनि । पंच भाग करावे ॥७९॥

एक भागाच्या दहा आहुति । दुसरा बळिहरणी योजिती । अग्रदान तिसरा करिती । चौथ्या मागे पितृयज्ञ ॥८०॥

मनुष्ययज्ञ पांचव्यासी । वैश्वदेव करावा मंत्रेसी । अन्न नाही ज्या दिवसी । तंदुलांनी करावा ॥८१॥

वैश्वदेव समयासी । अतिथि आलिया घरासी । चोर चांडाल होय हर्षी । पूजा करावी मनोभावे ॥८२॥

यम सांगे दूतासी । वैश्वदेव करिता नरासी । जाऊ नको तयापासी । विष्णुआज्ञा आम्हा असे ॥८३॥

मातापिताघातकियांसी । शुनि श्वपचचांडासांसी । अतिथि आलिया घरासी अन्न द्यावे परियेसा ॥८४॥

न विचारावे गोत्रकुळ । अन्न घालावे तात्काळ । विन्मुख झालिया पितृकुळ । वर्षै सोळा न येती घरासी ॥८५॥

प्रवासी असेल आपण जरी । औषधि घृत दधि क्षीरी । कंदमूळे फळे तरी । देवयज्ञ करावा ॥८६॥

अन्नाविणे अग्रदान । करू नये साधुजन । पंचमहायज्ञ करू ब्राह्मण । चांद्रायण आचरावे ॥८७॥

न होता वैश्वदेव आपुल्या घरी । भिक्षेसि आला नर जरी । भिक्षा घालिता पाप दूरी । वैश्वदेवफल असे ॥८८॥

बळिहरण घालोनि काडःई आपण । त्याणे आचरावे चांद्रायण । आपं काढिता दोष जाण । आणिकाकरवी काढवावे ॥८९॥

बळिहरण न काढिता जेवी जरी । सहा प्राणायाम त्वरित करी । तेणे होय पाप दूरी । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी ॥९०॥

गृहपूजा करूनि देखा । गोग्रास द्यावा विशेखा । नित्य श्राद्ध करणे ऐका । करूनि अन्न समर्पावे ॥९१॥

स्वधाकार पिंडदान । करू नये अग्नौकरण । ब्रह्मचारियासी तांबूलदान । दक्षिणा वर्ज परियेसा ॥९२॥

वैश्वदेव झालियावरी । उभा राहोनि आपुल्या द्वारी । अतिथिमार्ग पहावा निर्धारी । आलिया पूजन करावे ॥९३॥

श्रमोनि आलिया अतिथिसी । पूजा करावी भक्तीसी । अथवा अस्तमानसमयासी । आलिया पूजन करावे ॥९४॥

वर्णाना ब्राह्मणो गुरुः । ऐसे बोलती वेदशास्त्रु । अतिथि जाण सर्व गुरु । वैश्वदेवसमयासी ॥९५॥

वैश्वदेवसमयी अतिथिसी । पूजा करिता परियेसी । ती पावे देवांसी । तुष्टे ब्रह्मा इंद्र वह्नि ॥९६॥

वायुगण अर्यमादि देव । तृप्ति पावे सदाशिव । पूजा करावी एकभाव । सर्व देवता संतुष्टती ॥९७॥

अतिथीपाद प्रक्षाळिती । पितर सकळ तृप्त होती । अन्नदाने ब्रह्मा तृप्ति । विष्णुमहेश्वरा अवधारा ॥९८॥

यतीश्वरादि ब्रह्मचारी । जे समयी येती आपुल्या घरी । अन्न द्यावे निर्धारी । महापुण्य असे देखा ॥९९॥

ग्रासमात्र दिधला एक । मेरूसमान पुण्य अधिक । बरवे द्यावे त्यासी उदक । समुद्रासमान दान असे ॥१००॥

अतिथि आलिया घरासी । जेवी आपण त्यजूनी त्यासी । श्वानयोनी पावे हर्षी । गर्दभयोनी पुढे उपजे ॥१॥

ऐसे अतिथि पूजोन । मग करावे भोजन आपण । सर्वथा न करावे अन्न भिन्न । प्रपंच करिता दोष असे ॥२॥

सायंप्रातर्गृहस्थासी । भोजन करणे संतोषी । प्रक्षालन करोनि पादांसी । ओले पायी असावे ॥३॥

ओली असावी पाच स्थाने । हस्त पाद उभय जाणे । मुख ओले पंचम स्थाने । शतायुषी पुरुष होय ॥४॥

पूर्वाभिमुख बैसोन । भोजनसमयी धरा मौन । पाद उभय जोडोन । बैसावे ऐका एकचित्ते ॥५॥

मंडल करावे चतुष्कोनी । वरी भस्म प्रोक्षोनि । क्षत्रियास मंडल त्रिकोनी । वर्तुळ वैश्यासी परियेसा ॥६॥

शूद्रे अर्धचंद्राकार । मंडल करावे परिकर । आवाहनावे सुरवर । आदित्य वसु रुद ब्रह्मा ॥७॥

पितामहादि देवता । तया मंडली उपजविता । याचि कारणे तत्त्वता । मंडलाविणे जेवू नये ॥८॥

न करिता मंडल जेवी जरी । अन्न नेती निशाचरी । पिशाच असुर राक्षस परी । अन्नरस नेती अवधारा ॥९॥

उत्तम पूर्वाभिमुखी देख । पश्चिम मध्यम ऐक । पितृकार्या उत्तरमुख । सदा दक्षिण वर्जावी ॥११०॥

धरावे पात्र सुवर्ण रजत ताम्रपात्र । पद्मअपात्र पालाशपात्र । पुण्यपात्र परियेसा ॥११॥

जेविता वर्जावे गृहस्थांनी ताम्रपात्र । यतींनी सुवर्ण अथवा रजत । ताम्रशुक्तिशंखज पात्र । स्फटिक पाषाण यतीसी ॥१२॥

कर्दलीगर्भपत्रेसी । पद्मपत्रजळे स्पर्शी । वल्लीपालाशपत्रेसी । जेविता चांद्रायण आचरावे ॥१३॥

वट अश्वत्थ अर्क पटोल । कदंब कोविदारपर्णे कोमळ । भोजन करिता तात्काळ । चांद्रायण आचरावे ॥१४॥

लोहपात्र आपुले करी । ताम्र मृण्मय पृष्ठपर्णावरी । कार्पासपत्री वस्त्रावरी । जेविता नरकाप्रती जाय ॥१५॥

कास्यपात्री जेविल्यासी । यश बळ प्रज्ञा आयुष्यासी । वढे नित्य अधिकेसी । गृहस्थांनी नित्य कास्यपात्र ॥१६॥

असावे पात्र पाच शेर । नसावे उने अधिक थोर । उत्तमोत्तम षट्‍ शेर । सुवर्णपात्रासमान देखा ॥१७॥

कास्यपात्रीचे भोजन । तांबूलासहित अभ्यंगन । यती ब्रह्मचारी जाण । विधवा स्त्रियांनी वर्जावे ॥१८॥

श्वानाच्या चर्माहुनी । निषेध असे एरंडपानी । निषेध अधिक त्याहुनी । आणिक जेविल्या भिन्नताटी ॥१९॥

फुटके कास्यपात्रेसी । जेविता होय महादोषी । संध्याकाळी जेविता हर्षी । महापातकी होय जाणा ॥१२०॥

जवळी असता पतित जरी । जेवू नये अवधारी । शूद्र जेविल्या शेषावरी । जेवू नये ब्राह्मणाने ॥२१॥

सवे घेउनी बाळासी । जेवू नये श्राद्धदिवसी । आसन आपुले आपणासी । घालू नये ब्राह्मणाने ॥२२॥

आपोशन आपुले हाती । घेऊ नये मंदमती । तैल घालुनी स्वहस्ती । आपण अभ्यंग करू नये ॥२३॥

भोजनकाळी मंडळ देखा । करू नये स्वहस्तका । आयुष्यक्षय पुत्रघातका । म्हणिजे नाम तयासी ॥२४॥

नमस्कारावे वाढिता अन्न । अभिधारावे पहिलेचि जाण । प्राणाहुति घेता क्षण । घृत घालावे स्वहस्ताने ॥२५॥

उदक घेऊनि व्याह्रति मंत्री । प्रोक्षोनि अन्न करा पवित्री । परिषिंचावे तेचि रीती । मग नमावे चित्रगुप्ता ॥२६॥

बळी घालोनि चित्रगुप्तासी । काढवावे सवेचि परियेसी । वाम हस्तक धुवोनि सरसी । पात्र दृढ धरावे ॥२७॥

अंगुष्ठतर्जनीमध्यमांगुलीसी । धरावे पात्र वामहस्तेसी । आपोशन करावे सव्यकरेसी । आणिकाकरवी घालावे ॥२८॥

आपोशन उदक सोडोनि जरी । आणिक घेती उदक तरी । श्वानमूत्र घेतल्यापरी । एकचित्ते परियेसा ॥२९॥

धरिले आपोशन ब्राह्मणासी । नमस्कारिता महादोषी । आशीर्वाद घेऊ नये तयापासी । उभयतांसी दोष घडे ॥१३०॥

मौन असावे ब्राअह्मणे देख । बोलू नये शब्दादिक । आपोशन घ्यावे मंत्रपूर्वक । मग घ्याव्या प्राणाहुति ॥३१॥

आपोशनाविण भोजन करी । पापविमोचन करा तरी । अष्टोत्तरशत मंत्र गायत्री । जपता दोष परिहरे ॥३२॥

प्राणाहुतीचे विधान । सांगेन ऐकिजे ब्राह्मण । प्राणाग्निहोत्र करिता जाण । समस्त पापे जाती देखा ॥३३॥

जैसा कार्पासराशीची । अग्नि लागता परियेसी । जळोनि जाय त्वरितेसी । तैसी पापे नासती ॥३४॥

प्राणाहुतीचे लक्षण । चतुर्विध पुरुषार्थ जाण । अन्न स्पर्शोनि मंत्र म्हणे । गीताश्लोक प्रख्यात ॥३५॥

श्लोक ॥ अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः । प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम्‍ ॥३६॥

टीका ॥ अन्नं ब्रह्म रसो विष्णु । भोक्ता देव गिरिजारमणु । ऐसा तुम्ही मंत्र म्हणोनु । अग्निरस्मि मंत्र जपावा ॥३७॥

मग घ्याव्या प्राणाहुति । आहेति पंच मंत्र प्रख्याति । तर्जनी मध्यम अंगुष्ठधृती । प्राणाय स्वाहा म्हणावे ॥३८॥

मध्यम अनामिका अंगुष्ठेसी । अपानाय स्वाहा म्हणा हर्षी । व्यानाय स्वाहा म्हणा यांसी । कनिष्ठिकाअनामिकाअंगुष्ठेसी ॥३९॥

अंगुष्ठतर्जनीकनिष्ठिकेसी । उदानाय स्वाहा म्हणा हर्षी । पंचांगुलीने परियेसी । समानाय स्वाहा म्हणावे ॥१४०॥

प्राणाहुती घेतल्या अन्न । दंता स्पर्शो नये जाण । जिव्हे गिळावे तक्षण । मग धरावे मौन देखा ॥४१॥

मौन धरावयाची स्थाने । सांगेन ऐका अतिउत्तमे । स्नानासमयी धरा निर्गुणे । न धरिता फल असेना ॥४२॥

होम करिता न धरी मौन । लक्ष्मी जाय तत्क्षण । जेविता मौन न धरिता आपण । अपमृत्यु घडे त्यासी ॥४३॥

अशक्य असेल मौन जरी । प्राणाहुति घेई तववरी । मौन धरावे अवधारी । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी ॥४४॥

पिता जिवंत असे ज्यासी । अथवा ज्येष्ठ बंधु परियेसी । धरू नये मौनासी । श्राद्धान्न जेविता धरावे ॥४५॥

पंच प्राणाहुति देता । सर्वांसी मौन ग्राह्यता । असेल पिता वडील भ्राता । मौन धरिल्या अधःपात ॥४६॥

जेविता प्रथम मधुरान्न । भोजन करावे नरे जाण । भक्षून पूर्वी द्रवान्न । कठिणांश परियेसा ॥४७॥

भोजनांती समयासी । जेवू नये द्रवान्नांसी । बळ जाय परियेसी । शीघ्र भोजन करावे ॥४८॥

धेनूसी उदक प्यावयासी । जितुका वेळ होय त्यासी । भोजन करावे परियेसी । शीघ्र भोजन मुख्य जाणा ॥४९॥

भोजन करावयाची स्थिति । सांगेन ऐका ग्रासमिति । संन्यासी-मुनि-यती । अष्ट ग्रास ध्यावे जाण ॥१५०॥

षोडश ग्रास अरण्यवासी । द्वात्रिशत गृहस्थासी । मिति नाही ब्रह्मचार्‍यासी । एकचित्ते परियेसा ॥५१॥

जितुका मावेल आपुल्या मुखी । तितुका ग्रास घ्यावा विशेखी । अधिक घेता ग्रास मुखी । उच्छिष्ठ भक्षिले फळ देखा ॥५२॥

अर्धा ग्रास भक्षूनि । उरले ठेविती आपुल्या भाणी । चांद्रायण आचरावे त्यांनी । उच्छिष्ठ भोजन तया नाव ॥५३॥

न बैसावे सहभोजनासी । इष्टसोयरे इत्यादिकांसी । व्रतबंधाविणे पुत्रासी । कन्याकुमारांसी दोष नाही ॥५४॥

सांडू नये अन्न देखा । घृत पायस विशेष ऐका । सांडावे थोडे ग्रास एका । जेवू नये सर्व अन्न ॥५५॥

भोजन संपेपर्यंत । पात्री धरावा वामहस्त । जरी सोडील अजाणत । अन्न वर्जोनि उठावे ॥५६॥

या कारणे द्विजजना । सोडू नये पात्र जाणा । अथवा न धरावे पूर्वीच जाणा । दोष नाही परियेसा ॥५७॥

वस्त्र गुंडाळोनि डोयीसी । अथवा संमुख दक्षिणेसी । वामपादावरी हस्तेसी । जेविता अन्न राक्षस नेती ॥५८॥

वामहस्त भूमीवरी । ठेवूनि नर भोजन करी । रोग होय शरीरी । अंगुली सोडोनि जेवू नये ॥५९॥

अंगुली सोडूनि जेवी जरी । दोष गोमांस भक्षिल्यापरी । दोष असती नानापरी । स्थाने असती भोजनासी ॥१६०॥

अश्वगजारूढ होऊनि । अथवा बैसोनि स्मशानी । देवालयी शयनस्थानी । जेवू नये परियेसा ॥६१॥

निषिद्ध जेवण करपात्रेसी । ओले नेसोनि आर्द्रकेशी । बहिर्हस्त बहिःकेशी । जेविता दोष परियेसी ॥६२॥

यज्ञोपविताच्या उपवीतीसी । भोजन करावे परियेसी । जेविता आपुल्या संमुखेसी । पादरक्षा असू नये ॥६३॥

ग्रास उदक कंद मूळ । इक्षुदंडादि केवळ । भक्षोनि पात्री ठेविता सकळ । उच्छिष्ट होय अवधारा ॥६४॥

भोजन करी स्नानाविणे । न करिता होम जेवी कवणे । अन्न नव्हे कृमि जाणे । म्हणे पराशर ऋषि ॥६५॥

पर्णपृष्ठावरी रात्रीसी । दीपेविण जेविल्यासी । महादोष असे तयासी । कृमि भक्षिल्यासमान होय ॥६६॥

दीप जाय भोजन करिता । पात्र धरावे स्मरोनि सविता । पुनरपि आणोनि लाविता । मग भोजन करावे ॥६७॥

पात्री असेल जितुके अन्न । तितुकेचि जेवावे परिपूर्ण । आणिक घेता दोष जाण । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी ॥६८॥

स्पर्शो नये जेविता केश । कथा सांगता महादोष । दिसू नये व्योम आकाश । अंधकारी जेवू नये ॥६९॥

न ठेविता शेष स्त्रियेसी । जेविता होय अत्यंत दोषी । ठेविले न जेविता स्त्रिया दोषी । महापातके घडती जाणा ॥१७०॥

शून्यदेवदेवालयी । देवस्थान आपुले गृही । जलसमीप संध्यासमयी । जेवू नये परियेसा ॥७१॥

पात्रे ठेवूनि दगडावरी । जेवू नये अवधारी । अवलोकू नये मुखावरी । स्त्रीजनाचे परियेसी ॥७२॥

न करावे सहभोजन । जेविता होय उच्छिष्टभक्षण । कुलस्त्रियेसी करिता भोजन । निर्दोष असे परियेसा ॥७३॥

प्राशन शेष उदकासी । घेऊ नये उच्छिष्टासी । अगत्य घडे संधीसी । किंचित्‍ सांडूनि घेईजे ॥७४॥

वस्त्रोदक घेतल्यासी । अपार दोष घडती तयासी । जन्म पावे श्वानयोनीसी । पडे मागुती नरकात ॥७५॥

शब्द होय उदक घेता । अथवा क्षीर घृत सेविता । आपोशनोदक प्राशिता । सुरापानसमान असे ॥७६॥

महाजळी रिघोनि । उदक घेती मुखांतुनी । अथवा जे घेती उभ्यानी । सुरापानसमान जाणा ॥७७॥

द्वयहस्तांजुळि करूनि । घेऊ नये उदक ज्ञानी । घ्यावे एक हस्ते करूनि । वाम हस्त लावू नये ॥७८॥

सभे बैसोनि एकासनी । अथवा आपुले हातुरणी । प्राशन करू नये पाणी । महादोष परियेसा ॥७९॥

वाढावे भिन्न पात्रेसी । पाहू नये आणिक यातीसी । रजस्वला स्त्रियांसी । चांडाळ श्वान पाहू नये ॥१८०॥

दृष्टि पडे इतुकियासी । ध्वनि ऐकता कर्णासी । त्यजावे अन्न त्वरितेसी । जेविता दोष परियेसी ॥८१॥

कलहशब्द कांडण दळण । ऐकता जेवू नये अन्न । अपशब्द स्पृष्टास्पृष्ट जाण । त्यजावे अन्न परियेसा ॥८२॥

नेणते लोक पंक्तीसी । घेऊ नये परियेसी । अगत्य घडे संधीसी । उदके भस्मे करा पृथक ॥८३॥

अथवा स्तंभ असेल मध्य । द्वारमार्ग असेल शुद्ध । उदके वेष्टिता आपुले परिघ । दोष नाही परियेसा ॥८४॥

कृष्ण वस्त्र नेसोनि आपण । जेविता दोष अपार जाण । स्त्रीजन वाढिती कांसेविण । उच्छिष्टसमान परियेसा ॥८५॥

ऐसा विचार करूनि मनी । करावे भोजन द्विजजनी । विकिरिद विलोहित म्हणोनि । अभिमंत्रावे शेष अन्न ॥८६॥

विकिरीदे इति मंत्रासी । म्हणावा अघोर ऋषि । रुद्रदेवता परियेसी । अन्नाभिमंत्रणे विनियोग ॥८७॥

ऐसा मंत्र जपोन । हाती घ्यावे शेषान्न । यमाच्या नावे बळी घालोन । उत्तरापोशन मग घ्यावे ॥८८॥

उच्छिष्ट सर्व पात्रीचे । घेऊनि हाती म्हणा वाचे । रौरवमंत्र असे त्याचे । पात्राजवळी ठेवावे ॥८९॥

उठोनि जावे प्रक्षालनासी । गंडूष करोनि मग हस्त स्पर्शी । न करित गंडूष प्रक्षाली हस्तासी । आत्मघातकी तोचि जाणा ॥१९०॥

मुख प्रक्षाळिता परियेसी । मध्यमांगुली दात घासी । तर्जनी अंगुष्ठे महादोषी । रौरव नरकी परियेसा ॥९१॥

बरवे हस्तप्रक्षालन । करावे दंतशोधन । हातीचे पवित्र सोडून । टाकावे नैऋत्य दिशे ॥९२॥

अंगुष्ठमात्र पुरुषा । म्हणावा मंत्र परियेसा । हस्त घासोनि चक्षुषा । उदक लावावे अवधारा ॥९३॥

ऐसा जरी न म्हणा मंत्र । चक्षुरोग होय त्वरित । या कारणे करा निश्चित हस्तोदके आरोग्यता ॥९४॥

द्विराचमन करोनि । आयंगौ मंत्र म्हणोनि । दुपदादिवेन्मुमुचा म्हणोनि । पादप्रक्षालन करावे ॥९५॥

ऐसा तुम्ही मंत्र जपता । भोजनठायी जाऊनि बैसता । द्विराचमन करूनि निगुता । नासिकास्पर्श मग करावा ॥९६॥

स्मरावे मग अगस्त्यासी । कुंभकर्ण वडवाग्नीसी । वृकोदर शनैश्चरासी । इल्वल वातापि जीर्य म्हणावे ॥९७॥

हस्त दाखवावे अग्निसी । आणिक सांगेन परियेसी । बंधुवर्ग असती जयासी । पुसू नये वस्त्रे कर ॥९८॥

मग स्मरावे श्रीगुरूसी । आणिक स्मरावे कुळदेवतेसी । येणेपरी विधीसी । भोजन करावे द्विजोत्तमे ॥९९॥

विप्र विनवी श्रीगुरूसी । भोजनप्रकार सांगितला आम्हासी । विधिनिषिद्ध अन्नै कैसी । निरोपावी दातारा ॥२००॥

विप्रवचन ऐकोनि । निरोपिती श्रीगुरु संतोषोनि । ऐक ब्राह्मणा म्हणोनि । अतिप्रेमे निरोपिती ॥१॥

म्हणे सरस्वती गंगाधरु । ब्राह्मणपणाचा आचारु । निरोपिला गुरुनाथे समग्रु । म्हणोनि विनवी संतोषे ॥२॥

वैश्वदेवाविणे अन्न । अथवा गणान्न परिपुर्ण । घातले असेल बहु लवण । बहुमिश्रितान्न जेऊ नये ॥३॥

लशुन गाजर कंद मुळा । वृंताक श्वेत जो असे भोपळा । छत्राकार शाखा सकळा । वर्जाव्या तुम्ही परियेसा ॥४॥

धेनुअजामहिषीक्षीर । प्रसूतीचे । वर्जावे । दशरात्र । नूतनोदक पर्जन्य पूर । त्रिरात्रीचे वर्जावे ॥५॥

कूष्मांड डोरली पडवळेसी । मुळा बेल आवळेसी । न भक्षावे प्रतिपदेसी । भक्षिता पाप परियेसा ॥६॥

स्वर्गापवर्ग चाड ज्यासी । अष्टमी वर्जावी औदुंबरासी । अमलकफळ रात्रीसी । वर्जावे भानुवासर सप्तमी ॥७॥

बेलफळ वर्ज शुक्रवारी । शमीफळ मंदवारी । भक्षिता लक्ष्मी जाय दुरी । वर्जावे ते दिवसी परियेस ॥८॥

धात्रीफळ रात्रीसी । भक्षिता हानि प्रज्ञेसी । नाश करी वीर्यासी । धात्रीफळ वर्जावे ॥९॥

नख केश पडिलिया अन्ना । स्पर्श केलिया मार्जार जाणा । वायस घारी कुक्कुट जाणा । स्पर्श केलिया अन्न त्यजावे ॥२१०॥

धेनुमूषक मुखस्पर्शे । अथवा स्पर्शे अधःकेशे । त्यजावे अन्न भरवसे । असेल उच्छिष्ट अन्नाजवळी ॥११॥

एक हाती वाढले अन्न । शिळे असेल शीत जाण । वर्जावे तुम्ही ब्राह्मण । निषिद्ध बोलिले आचार्य ॥१२॥

घृततैलमिश्रित । शिळे अन्न अपवित्र । तळिले असेल सर्वत्र । शिळे नव्हे सर्वथा ॥१३॥

विप्र विकिती गोरस । घृत क्षीर परियेस । घेता घडती महादोष । साक्षात वह्निपक्व जेवू नये ॥१४॥

माषान्नाचे वटक देखा । शिळे न होती कधी ऐका । जैसे लाह्यापीठ देखा । शिळे नव्हे परियेसा ॥१५॥

कंदमूळादि सुरान्न । जवांचे असेल परमान्न । गुडयुक्त असेल अन्न । शिळे नव्हे परियेसा ॥१६॥

ऐशा शिळ्या अन्नासी । दोष नाही परियेसी । विटाळ होता महादोषी । शुचि स्थानी असावे ॥१७॥

भोजन केलिया नंतर । तांबूल घ्यावे परिकर । क्रमुकचूर्ण पर्ण सत्वर । घ्यावे द्यावे ब्राह्मणी ॥१८॥

तिळमिश्रित भक्ष्यासी । जेवु नये रात्रीसी । जेविता होय महादोषी । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणाते ॥१९॥

क्रमुक एक सुखारोग्य । द्वय देता निश्चळ आरोग्य । त्रीणि द्यावी महा भाग्य । चतुर्थे दुःख होय जाणा ॥२२०॥

पाच क्रमुक देता जरी । आयुष्य प्रज्ञा वाढे भारी । देऊ नये सहा सुपारी । मरण सांगे परियेसा ॥२१॥

पर्ण अग्र मूल न काढी जरी । व्याधि संभवे अवधारी । अग्र भक्षिता पाप भारी । चूर्णपर्णे आयुष्य क्षीण ॥२२॥

पर्णपृष्ठी बुद्धिनाश । द्विपर्ण खाता महादोष । ऐश्वर्याचा होय विनाश । ऋषिसंमत असे जाणा ॥२३॥

पर्णैविण क्रमुक मुखी । घालिता आपण होय असुखी । सप्त जन्म दरिद्री दुःखी । अज्ञानी होय अंतकाळी ॥२४॥

यतीश्वरादिब्रह्मचारी । रजस्वला स्त्री विधवा जरी । तांबूल भक्षिता मांसपरी । रस त्याचा सुरापानसम ॥२५॥

तांबूल भक्षिल्यानंतर । सायंसंध्या करावी विप्रे । सूर्यअर्धमंडळ उतरे । अर्घ्यै द्यावी परियेसा ॥२६॥

बैसोनि द्यावी अर्घ्यै तिन्ही । चारी द्यावी काळ क्रमूनि । गायत्री मंत्र जपूनि । इमंमेवरुण म्हणावा ॥२७॥

गोत्रप्रवर उच्चारोन । मग करावे औपासन । करावे निशि भोजन । क्षीरमिश्रित मुख्य असे ॥२८॥

रात्री करिता परिसिंचना । ऋतंत्वा सत्यं मंत्र म्हणा । येणे विधी करा भोजना । पूर्वी जैसे बोलिले असे ॥२९॥

भोजन झालियानंतर । वेदाभ्यास एक प्रहर । मग जावे शयनावर । येणे विधी आचरावे ॥२३०॥

शयन करावयाचे विधान । सांगेन ऐका विद्वज्जन । पराशर सांगे वचन । तेचि विधान सांगतसे ॥३१॥

खट्‍वा असावी निर्मळ जाण । वर्जावी त्रिपाद भिन्न दूषण । औदुंबर अश्वत्थ पिंपरी निर्गुण । न करावी खट्‍वा परियेसा ॥३२॥

निषिद्ध जांबूळ काष्ठाची । वर्जावी प्रेतगजदंताची । भिन्नकाष्ठ त्यजावी साची । बरवी असावी खट्‍वा देखा ॥३३॥

सुमुहूर्तै विणावी खट्‍वा देखा । धनिष्ठा भरणी मृगशीर्षी दूषका । वार सांगेन विशेखा । शूभाशुभफळ असे ॥३४॥

आदित्यवारी लाभ देखा । चंद्रवारी महामुखा । भौमवारी पाविजे दुःखा । बुधवारी सांगे महापीडा ॥३५॥

गुरुवारी विणल्यासी । सहा पुत्र होती त्यासी । शुक्रवारी अतिविशेषी । मृत्यु पावे मंदवारी ॥३६॥

स्वगृही शयन पूर्वशिरेंसी । श्वशुरालयी दक्षिणेसी । प्रवासकाळी पश्चिमेसी । शयन करावे परियेसा ॥३७॥

सदा निषिद्ध उत्तर दिशा । वर्जले फळ सांगितली दिशा । विप्रे आचरावा ऐसा । ऋषिमार्ग शुभाचार ॥३८॥

पूर्ण कुंभ ठेऊनि उशी । मंगळ द्रव्य घालावे बहुवशी । रात्रिसूक्त म्हणावे हर्षी । विष्णुस्मरण करावे ॥३९॥

मग स्मरावा अगस्त्यऋषि । माधव मुचुकुंद परियेसी । आस्तिक कपिल महाऋषि । सर्पस्तुति करावी ॥२४०॥

निषिद्ध स्थाने निजावयासी । सांगेन सर्व परियेसी । जीर्ण देवालयी स्मशानासी । एक वृक्षातळी वर्जावे ॥४१॥

चारी बिदी चोहाटेसी । ईश्वरस्थान परियेसी । मातापिता निजले स्थळासी । निजू नये परियेसा ॥४२॥

वर्जावे वारुळाजवळी । आणि तळ्याचे पाळी । नदीतीरी नसता जवळी । घोर स्थळी निजू नये ॥४३॥

वर्जावे शयन धान्यावरी । निजू नये मोडके घरी । वडील खाली निजतील तरी । खट्‍वा वर्जावी त्यापुढे ॥४४॥

नेसून ओले अथवा नग्न । निजू नये शिर वेष्टून । आकाशाखाली वर्जावे शयन । दीप असता निजू नये ॥४५॥

पूर्वरात्री अपरात्रीसी । निजू नये परियेसी । असू नये स्त्रियेपासी । रजस्वला चतुर्थदिनी ॥४६॥

असावे जानवे उपवीतीसी । दृष्टी न पडावी योनीसी । आयुष्य क्षीण परियेसी । दीप वर्जावा या कारणे ॥४७॥

नीळ वस्त्र नेसले स्त्रियेसी । करिता संग परियेसी । पुत्र उपजे चांडाळेसी । शुभ्र वस्त्र विशेष ॥४८॥

रजस्वला न होता स्त्रियेसी । न करावा संग परियेसी । संग करिता महादोषी । आणिक प्रकार एक असे ॥४९॥

दश वर्षे होता कन्येसी । रजस्वला सर्वत्रांसी । ऐका तुम्ही सर्व ऋषि पराशर सांगतसे ॥२५०॥

ऋतुकाळ असता स्त्रियेसी । गावासी जाता परियेसी । भ्रूणहत्या होय दोषी । प्रख्यात असे परियेसा ॥५१॥

वृद्ध अथवा वांझेसी ।असती पुत्र जिसी । बहु कन्या होती जियेसी । चुकता ऋतुकाळ दोष नाही ॥५२॥

ऋतु देता चतुर्थ दिवसी । पुत्र उपजे अल्पायुषी । कन्या होय पाचवे दिवसी । सहावे दिनी पुत्र परियेसा ॥५३॥

विषम दिवसी कन्या जाण । सम दिवसी पुत्र सगुण । दहा दिवस ऋतुकाळ खूण । चंद्रबळ असावे ॥५४॥

मूळ मघा रेवती दिवसी । संग न करावा परियेसी । कोप नसावा उभयतांसी । संतोषरूपे असावे ॥५५॥

ऋतुकाळी स्त्रीपुरुषांसी । जे जे असेल मानसी । सत्त्वरजतमोगुणेसी । तैसा पिंड उपजे देखा ॥५६॥

ऐसा ब्राह्मणाचा आचार । सांगता झाला पराशर । ऐकोनि समस्त ऋषीश्वर । येणेपरी आचरती ॥५७॥

श्रीगुरु म्हणती ब्राह्मणांसी । ऐसा आचार परियेसी । जे आचरती विधींसी । दैन्य कैचे तया घरी ॥५८॥

ते वंद्य होत देवांसी । कामधेनु येईल घरासी । लक्ष्मी राहे अखंडेसी । पुत्रपौत्री नांदती ॥५९॥

होय आपण शतायुषी । न घडती दोष काही त्यासी । तो न भिई कळिकाळासी । ब्रह्मज्ञानी होय जाणा ॥२६०॥

काळमृत्यु चुके देखा । अपमृत्यु घडे कैचा ऐका । ऐसा आचार आहे निका । नित्य रहाटावे येणेपरी ॥६१॥

ऐसे ऐकोनिया वचना । विप्र लागे श्रीगुरुचरणा । झाला उपदेश उद्धारणा । कृपासागर गुरुमूर्ति ॥६२॥

भक्तजन तारावयासी । अवतरलासी ह्रषीकेशी । परिहरिले अंधकारासी । ज्ञानज्योती प्रकाशली ॥६३॥

ऐसे विनवोनि ब्राह्मण । पुनरपि धरिले श्रीगुरुचरण । श्रीगुरुमुर्ति संतोषोन । प्रसन्न झाले तये वेळी ॥६४॥

म्हणती श्रीगुरु तयासी । आचार सांगितला तुज हर्षी । नव जावे आता भिक्षेसी । आचार करूनि सुखी असे ॥६५॥

जे जे इच्छिसी कामना । होईल निरुती सत्य जाणा । कन्या पुत्र नांदती सगुणा । संदेह न धरावा मानसी ॥६६॥

ऐसा वर लाधोनि । विप्र गेला संतोषोनि । होता तैसा आचरोनि । सकळाभीष्टे लाधला ॥६७॥

सिद्ध म्हणे नामधारकासी । श्रीगुरुचरित्र ऐसे परियेसी । ऐकता ज्ञान समस्तांसी । मूढ होय ब्रह्मज्ञानी ॥६८॥

अज्ञानतिमिरअंधकारासी । ज्योतिप्रकाश कथा सुरसी । जे जे इच्छिले मानसी । पाविजे त्वरित अवधारा ॥६९॥

म्हणे सरस्वतीगंगाधरु । श्रीगुरुचरित्र असे सुरतरु । ऐकता होय संतोष फारु । सकळाभीष्टे साधती ॥२७०॥

इति श्रीगुरुचरित्र । नामधारका शिष्य सांगत । आचार जो का समस्त । निरोपिला श्रीगुरुनाथे ॥२७१॥

इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे आह्निककर्मनिरूपणं नाम सप्तत्रिंशोऽध्यायः ॥३७॥
ओवीसंख्या ॥२७१॥

श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु

क्रमशः

No comments:

Post a Comment