Monday, February 14, 2011

Gurucharitra - Adhyay 44

Chapter 44 A Brahmin named Nandi is cured of leprosy.

CHAPTER 44

Nandi Brahmin relieved of Leprosy : He became a Poet.

Nandi was a Brahmin suffering from Leprosy. He worshipped Tuljapur Bhavani for 3 years. He observed fast. He stayed near Bhuvaneshwari at Bhilavadi for 7 months and worshipped the deity devotedly. He was told in a dream to go to Shri Guru at Gangapur and that he would then be relieved of the disease.

Nandi said, 'You are Goddess yourself, how do you ask me to go to a human being. I shall be here, no matter if I have to lose my life.'

The pujari also had similar dream. He and some others told Nandi, 'Do not trouble the Goddess hereafter and if you do not mingle, we shall not allow you enter this mandir.'

Being helpless he came to Gangapur and went to the Math and bowed to Shri Guru. Shri Guru asked him 'Leaving the Goddess, why did you come to a human being? When you doubt, how can you be relieved of the disease?'

Realising that Shri Guru knew what was in his mind, he said, 'I am a dullard. Kindly forgive me. I have come for your shelter. Kindly protect me. I am very much harassed due to this disease. My wife also left me and went to her parents. Chandla Devi has sent me to you. Kindly do not drive me away.'

Shri Guru asked Somnath to take Nandi to the Sangam and said, "Let him bathe at the Shatkul and have rounds of the Ashwattha. Give him new clothes, throwing away his old ones and then bring him here for meals."

As advised by Shri Guru, Somnath took DNandi to the Sangam for bath. After bath his body became free from lerosy. After taking rounds of the Ashwattha, Somnath brought him back to the Math. Nandi bowed to Shri Guru and began to pray Him.

Shri Guru asked him, 'See if all your body has been free from the disease. He looked to his body and found that some patches had remained on his thigh. Being afraid he asked 'After having your blessings why these patches should be here?'

Shri Guru said, 'You came with a suspicion that what a man could do and so a little disease is there. You should stay here praying God, the little disease that is there will also be wiped off soon.'

Nandi said, 'I am illiterate. How can I compose poems of praise?'

Shri Guru asked him to draw out his tongue. When he did so, Shri Guru put little bhasma on the tip of his tongue.

Instantly he became wise. He bowed to Shri Guru and began to compose poems in praise of Shri Guru. The summary of those poems is as follows :-

'I was sinking in the wordly ocean, being deluded by the affection for my family members. I was roaming through different species as swedaj, Andaj, Udbhija and Jaraj i.e. animal life. Human life is the best of all. I had no knowledge in the Shudra birth. The birth of a Brahmin is the best amongst the human beings. But if a Brahmin is also a dullard, how can he have knowledge of Shri Guru?

The blood of the mother and the semen of the father unite and a fetus comes into existence as a bubble. After 15 days it becomes liquid. Within a month a small solid fetus is formed. I the second month the head and the limbs take shape. When the five great elements i.e. the earth, the water, the luster, the wind and the sky unite, the soul enters the fetus. In the fifth month the skin and the hair are formed. In the sixth month the fetus starts respiration. In the seventh month, the ear, the tongue, the brain and the marrow become solid. In this way I was growing in the mother's uterus. The mother would eat hot, salt, sour, pungent and acidic articles, due to which I was greatly troubled.

I then took birth. My span of life was fixed. Half of the time i.e. the nights were spent in sleep in vain. The remaining half is divided in the three stages, childhood, youth and old age. In the childhood, I had to suffer much. I wept due to pain in the stomach, but my mother thought that I was hungry and took me to her breast. And when I was hungry, she thought I was ailing and gave me bitter medicines. At times due to scorpion bite, in the cradle I would cry. She would then sing lullaby and move the cradle to and fro and tried to lure me to sleep or she would think that I am affected by some spirit and so try Mantra - Tantra and tied a black string on my wrist. My mother would take pungent and sour articles and I had to suffer from diarrhea, cough etc.

In the youth, I was influenced by passion. I disregarded the parents and the guru and always thought about the female-sex. Due to vanity, I despised sadhus, saints and old persons. How could have I adored Shri Guru during this periods?

In the old age I was affected by cough, gases and other troubles. My hair became white while taking care of my family and children. I lost my teeth, I could not hear well and see properly. even in this state I did not serve Shri Guru. You are the protector and liberator of the universe. Please liberate me.'

Illiterate Nandi composed such poems. All wondered to see his feat Nandi further said, 'Vedas say that the feet of Shri Guru are holy there is no other way than the feet of Shri Guru, to be free from the worldly sea. By the favour of Shri Guru, all my sins are wiped off. Shri Guru Narsimha Saraswati is like Kamdhenu. So people should adore him and get liberated.

Nandi was later called 'Kavishwar' due to his poetry. The patches of leprosy on his thigh also disappeared in course of time. Nandi greatly rejoiced at the cure. He began to serve Shri Guru with more devotion.

Contd...

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥

नामधारक म्हणे सिद्धमुनि । श्रीगुरुचरित्र तुम्ही देखिलें नयनीं । तुमचें भाग्य काय वानूं वदनीं । परब्रह्म देखिलें असे ॥१॥

तुमचेनि प्रसादेंसीं । अमृतपान झालें आम्हांसी । आतां कष्‍ट आम्हां कायसी । सकळाभीष्‍ट लाधलों ॥२॥

तुम्ही भेटलेति मज तारका । दैन्य गेलें सकळ दुःख । सर्वाभीष्‍ट लाधलों सुख । गुरुचरित्र ऐकतां ॥३॥

मागें कथानक सांगितलें । श्रीगुरु संगमीं राहिले । पुढें काय अपूर्व वर्तलें । निरोपावें दातारा ॥४॥

सिद्ध सांगे नामधारकासी । ऐक वत्सा विस्तारेंसीं । विचित्र झालें येरे दिवसीं । एकचित्तें परियेसा ॥५॥

'नंदी' नाम एक ब्राह्मण । सर्वांगीं कुष्‍ट श्वेतवर्ण । तुळजापुरा जाऊन । वर्षें तीन आराधिलें ॥६॥

तीन संवत्सर उपवास । द्विज कष्‍टला बहुवस । निरोप झाला सायासें । चंदलापरमेश्वरीजवळी जाणें ॥७॥

जगदंबेचा निरोप घेऊनि । आला चंदलापरमेश्वरीस्थानीं । मास सात पुरश्चरणीं । पुनरपि केले उपवास ॥८॥

नानापरी कष्‍टतां । स्वप्‍न जाहलें अवचिता । तुवां जावें त्वरिता । गाणगग्रामस्थानासी ॥९॥

तेथें असती श्रीगुरु । त्रयमूर्तीचा अवतारु । वेष धरिला असे नरु । तेथें होसील उत्तमांगी ॥१०॥

ऐसे निरोप त्यासी जाहले । विप्र म्हणे भलें केलें । मास सात कां चुकर केलें । जरी तुझे हातीं नोहेचि ॥११॥

जगन्माता तुळजा भवानी । तिचा निरोप घेऊनि । आलों तुजपाशीं ठाकोनि । तूं दैवत म्हणोनियां ॥१२॥

दैवतपण ठाउकें जाहलें । आम्हांसी निरोप दिधलें । मनुष्यापाशीं जा म्हणितलें । तुझे हातीं नोहेचि कांहीं ॥१३॥

तूं जगद्दैवत जगदंबा म्हणविसी । आम्हां मनुष्यापाशीं पाठविसी । नांव जाहलें दैवतपणासी । भाग्य माझें म्हणतसे ॥१४॥

मनुष्यापाशीं जा म्हणावयासी । लाज नये कैसी तुम्हांसी । ओळख जाहली दैवतपणासी । उपवासी सात महिने ॥१५॥

पहिलेंचि जरी निरोप देत । इतुके कष्‍ट आम्हां न होत । दुराशा केली मी परदैवत । म्हणोनि, दुःख करी नानापरी ॥१६॥

ऐसें अनेकपरीनें । दुःख करीतसे तो ब्राह्मण । पुन्हा मागुती पुरश्चरण । करीन म्हणे तो द्विजवर ॥१७॥

म्हणे मज बरवें होणें । अथवा आपुला प्राण देणें । ऐसें बोलोनि निर्वाणें । विप्र धरणें बैसला ॥१८॥

पुनरपि स्वप्न तयासी । तैसेंचि होय परियेसीं । आणिक समस्त भोपियांसी । तेणेंचिपरी स्वप्न होय ॥१९॥

सकळ भोपे म्हणती तयासी । आजि स्वप्न झालें आम्हांसी । छळण न करीं गा देवीसी । निरोपासरसा जाईं वेगीं ॥२०॥

तूं तरी आतां नव जासी । आम्हां निरोप झाला ऐसी । बाहेर घालूं तुम्हांसी । देवळांत येऊं नेदूं ॥२१॥

इतुकें जाहलियावरी । पारणें केलें द्विजवरीं । पूजा करी नानापरी । निरोप घेऊनि निघाला ॥२२॥

गाणगाग्रामासी आला । मठीं जाऊनि पुसों लागला । भक्तजन सांगती त्याला । संगमीं आहेत गुरुमूर्ति ॥२३॥

भक्त म्हणती तयासी । श्रीगुरु येतील पारणेसी । काल शिवरात्री-उपवासी । आतां येतील परियेसीं ॥२४॥

इतुकिया अवसरीं । श्रीगुरु आले साक्षात्कारी । ग्रामलोक द्विजातें वारी । राहें दूरी नको सन्मुख ॥२५॥

श्रीगुरु आले मठांत । द्विज उभा होता चिंतीत । भक्तजन सांगती मात । विप्र एक आला असे ॥२६॥

सर्वांगीं असे श्वेत । स्वामिदर्शना आलों म्हणत । श्रीगुरु म्हणती आपण जाणत । संदेहरुपें आला असे ॥२७॥

म्हणती बोलावा मठांत । भक्त गेले धांवत । तया द्विजातें पाचारीत । आला विप्र आंगणा ॥२८॥

दुरोनि देखिलें श्रीगुरुसी । नमन करीत लोळे भूमीसी । श्रीगुरु म्हणती तयासी । संदेहरुपें आलासि कां ॥२९॥

देवीपासूनि मनुष्यापाशीं । येणें झालें काय कार्येंसी । संदेह करोनि मानसीं । कैसा आलासि द्विजवरा ॥३०॥

ऐसें वचन ऐकोनि । आपुले मनींचें जाणिलें म्हणोनि । क्षमा करीं गा स्वामी म्हणोनि । लोटांगणीं येतसे ॥३१॥

म्हणे स्वामी आपण तमांध । तुझे दर्शनें झालों सुबुद्ध । अज्ञानें वेष्‍टिलों होतों मंद । नेणें सोय परब्रह्मा ॥३२॥

तूं साक्षात्‌ वस्तु म्हणोनि । नेणों आपण तमोगुणी । आजि माझा सुदिन । दर्शनें झालों पुनीत ॥३३॥

पापकर्मी पापी आपण । पापात्मा नेणें निज खूण । पापें संभवलों पूर्ण । आलों शरण तुजपाशीं ॥३४॥

तूं भक्तजनां आधार । शरणागता वज्रपंजर । ब्रीद वानिती सचराचर । श्रीगुरु नृसिंहसरस्वतीचें ॥३५॥

आजि माझें कुकर्म गेलें । परब्रह्मचरण देखिलें । मनोरथ माझे पुरले । कृपासागरा यतिराया ॥३६॥

तूं भक्तजनाची कामधेनु । मनुष्यवेषीं आलासि अवतरोनु । तुझा पार जाणे कवणु । त्रैमूर्ति तूंचि होसी ॥३७॥

जैसी सगरांवरी गंगा । पावन करावया आली जगा । तैसा तूं भक्तसेवकवर्गा । तारावया अवतरलासी ॥३८॥

का अहिल्या झाली पाषाण । दिव्यदेही झाली लागतां चरण । तैसें मज आजि निर्गुण । झालें स्वामी गुरुनाथा ॥३९॥

व्रतबंध विवाह झालियावरी । व्याधि उद्भवली आपुले शरीरीं । स्त्री राहिली माहेरीं । स्पर्शों नये शरीर म्हणे ॥४०॥

आपुले असती मातापिता । सकळ म्हणती जाईं परता । दुःख जाहलें अपरिमिता । संसार त्यजूनि निघालों ॥४१॥

गेलों होतों तुळजापुरा । उपवास केले अपारा । मज म्हणती तूं पापभारा । नव्हे तुज बरवें आतां ॥४२॥

निरोप दे जा सन्नतीं । जेथें चंदलापरमेश्वरी वसती । तेथें होईल निवृत्ति । पाप जाईल म्हणोनि ॥४३॥

तेथेंही कष्‍ट केले बहुत । नव्हेचि कांहीं, देवी उबगत । निरोप झाला जा म्हणत । कृपामूर्ति तुजपाशीं ॥४४॥

ऐसें माझें दैव हीन । उबगताति देव आपण । मज देखोनि निर्वाण । बाहेर घाला म्हणताति ॥४५॥

देवता आपण उबगताति । मनुष्य कैसे मज देखती । निर्वाणीं आलों तुम्हांप्रती । निर्धार केला मरणाचा ॥४६॥

ऐसा पापी असोनि आपण । काय करावें अंग हीन । तोंड न पाहती कुष्‍ठी म्हणोन । मरण बरवें यापरतें ॥४७॥

आतां असे एक विनंति । होय अथवा नव्हे निश्चितीं । शीघ्र निरोपावें यति । दैवतें चाळवितीं आशाबद्धें ॥४८॥

मज चाड नाहीं शरीराची । प्राण देईन सुखेंचि । तूं रक्षक माउली शरणागताची । निरोपावें दातारा ॥४९॥

ऐसें करुणावचन ऐकोन । श्रीगुरु बोलती हांसोन । सोमनाथ ब्राह्मण बोलावून । निरोप देती न्याया संगमासी ॥५०॥

बरवा संकल्प सांगोनि । स्नान करवा षट्‌कूळभुवनीं । अश्वत्थप्रदक्षिणा करवूनि । वस्त्रें टाका दूर त्याचीं ॥५१॥

नवीं वस्त्रें द्या यासी । शीघ्र आणा पारणेसी । ऐसा निरोप देती त्यांसी । दोघे गेले झडकरी ॥५२॥

स्नान करुनि बाहेर आला । शरीरवर्ण पालटला । अश्वत्थप्रदक्षिणा करूं लागला । सु-वर्ण जाहलें सर्वांग ॥५३॥

वस्त्रें देती ब्राह्मणासी । जीर्ण वस्त्रें टाकिती दूरेंसी । जेथें टाकिती ते भूमीसी । क्षार भूमि होय त्वरित ॥५४॥

सांगातें घेऊनि द्विजासी । सोमनाथ आला मठासी । चरणीं घातलें तयासी । लोक सर्व विस्मित ॥५५॥

नंदीनामें केला नमस्कार । संतोषें स्तोत्र करी अपार । हर्षें जाहला निर्भर । लोळतसे पादुकावरी ॥५६॥

श्रीगुरु म्हणती तयासी । तुझी कामना झाली परियेसीं । सर्वांग आहे कैसी । अवलोकोनि पाहें म्हणती ॥५७॥

पाहतां सर्वांग बरवें जाहलें । तावन्मात्र जंघेसी राहिलें । पाहतां मन त्याचें भ्यालें । म्हणे स्वामी असे थोडें ॥५८॥

तुझी कृपादृष्‍टि झाली असतां । थोडें राहिलें म्हणे केवीं आतां । करीतसे दंडवता । कृपा करीं गा परमात्मा ॥५९॥

श्रीगुरुमूर्ति निरोपिती तयासी । तूं संशय करोनि आलासी । मनुष्य काय करील म्हणोनि मानसीं । तेणें गुणें राहिलेंथोडें॥६०॥

त्यासी असे एक प्रतीकार । तुवां कवित्व सांगावें अपार । आमुची स्तुति करावी निरंतर । बरवें होईल तुज मग ॥६१॥

नंदीनामा म्हणे स्वामीसी । लिखित नेणें वाचायासी । कैसें करुं मी कवित्वासी । मंदमति असे आपण ॥६२॥

काय जाणें कवित्वस्थिति । मज नाहीं काव्यव्युत्पत्ति । स्वामी ऐसा निरोप देती । म्हणोनि चरणीं लागला ॥६३॥

श्रीगुरु म्हणती द्विजासी । मुख उघडीं काढीं जिव्हेसी । विभूति शिंपिती तयासी । ज्ञान उपजलें ब्राह्मणा ॥६४॥

चरणांवरी ठेविला माथा । उभा ठेला स्तोत्र करितां । म्हणे स्वामी मी नेणता । सेवेसी नव्हे अराणुक ॥६५॥

मायापाशीं वेष्‍टोनि । बुडत होतों संसारगहनीं । आठवण न करीं कधीं मनीं । तुझे चरणा विसरलों ॥६६॥

संसार-सागर मायाजाळ । योनीं जन्मोनि चौर्‍यांशीं लक्षकुळ । आठवण नव्हे तुझें नाम केवळ । मंदमति जाहली मज ॥६७॥

स्वेदज अंडज उद्भिज्जेंसी । जन्मा आलों पशुयोनीसी । तव ज्ञान कैंचें आम्हांसी । स्थावर जंगम जैं होतों ॥६८॥

नानायोनींत मनुष्य विशेष । शूद्रादि याती बहुवस । जधीं होतों त्या जन्मास । काय जाणें तुझी सोय ॥६९॥

समस्त जन्मांत एक । ब्राह्मनजन्म विशेख । काय करावें होऊनि मूर्ख । गुरुसोय नेणे नर ॥७०॥

मातेचें शोणित पित्याचें रेत । संपर्क जहाला जननीगर्भांत । जैसें सुवर्ण मुशीं असे कढत । दिवस पांच बुद्‌बुदाकार ॥७१॥

पंधरा दिवसा होय स्थिर । एक रस होऊनि निर्धार । तधीं मी काय जाणें गुरु । नाहीं पंचतत्त्वें मज ॥७२॥

मासें एक पिंड होय । द्वय मासीं शिर पाय । तिसरे मासीं सर्व अवयव । नवद्वारें झालीं मग ॥७३॥

पंचतत्त्वे होतीं एक । वायु-आप-पृथ्वी-तेज-ख । प्राण आला तात्काळिक । तधीं स्मरण कैंचें मज ॥७४॥

पांचवे मासीं त्वचा रोम । सहावे मासीं उच्छ्वास आम्हां । सातवे मासीं श्रोत्र जिव्हा । मेद मज्जा दृढ जाहली ॥७५॥

ऐसे नव मास कष्‍टत । होतों जननिये-गर्भांत । रुधिर-विष्‍ठा-मूत्रांत । कष्‍टलों भारी स्वामिया ॥७६॥

माता भक्षी उष्ण क्षार । तेणें तीक्ष्णें कष्‍टलों अपार । पडे लोळे अनेक प्रकार । दुःख तेव्हां सांगूं कोणा ॥७७॥

मना आलें भक्षण करीं । दुःख होय मज अपारी । ऐसें नवमासवरी । मातागर्भीं कष्‍टलों ॥७८॥

तधीं कैचें तुझें स्मरण । वेष्टिलों होतों मायावरणें । स्मरलों नाहीं तुझे चरण । मग योनिमुखीं जन्मलों ॥७९॥

उपजतांचि आपणासी । आयुष्य लिहिलें लल्लाटेसी । अर्घ गेलें वृथा निशीं । रात्रीं निद्रा मानवा ॥८०॥

उरले आयुष्यांत देखा । तीन भाग केले विशेखा । बाल यौवन वृद्धाप्य ऐका । निर्माण झाले तये वेळीं ॥८१॥

बाळपणीं आपणासी । कष्‍ट झाले असमसाहसी । मज घालिती पाळणेसी । मूळमूत्रांत लोळतसें ॥८२॥

बाळपणींचें दुःख आठवितां । शोक होय मज अपरिमिता । काय सांगूं गुरुनाथा । नाना आपदा भोगिल्या ॥८३॥

शयनस्थानीं मलमूत्रांत । निरंतर असें लोळत । आपली विष्‍ठा आपण खात । अज्ञानतिमिरें वेष्टिलों ॥८४॥

एकादे समयीं आपणासी । पोटशूळ उठे बहुवसीं । रोदन करितां परियेसीं । स्तनपान मला करविती ॥८५॥

क्षुधाक्रांत होय बहुत । मज म्हणती पोट दुखत । अंगुली घालूनि मुखांत । वोखद मज पाजविती ॥८६॥

ऐसें क्षुधेनें पीडितां बहुत । मज घालिती पाळण्यांत । हालविती पर्यंदें गात । क्षुधाक्रांत रुदन करीं ॥८७॥

म्हणती रुदन करितो बाळ । मुखीं शिंपिती कांजीतेल । रक्षा बांधिती मंत्रें केवळ । नेणे माता भूक माझी ॥८८॥

पाळण्यांत घालिती कौतुकें । प्रावरणांत असतां वृश्चिकें । मारीतसे पाठीं डंक । प्रलाप मी करीतसें ॥८९॥

आणिक पाळणा हालविती । राहें राहें उगा म्हणती । स्तनपान मागुती करविती । वृश्चिकविष नेणतां ॥९०॥

तेणें दुःखें स्तनपान न करीं । मागुती घालिती पाळण्याभीतरीं । वृश्चिक मज डंक मारी । प्राणांतिक मज होय ॥९१॥

माता खाय अंबट तिखट । स्तनपानें मज अपार वोखट । अति मधुर क्षीर अंबट । तेणें खोकतसें सर्वकाळीं ॥९२॥

नाना औषधें मज देती । तेणें माझे डोळे दुखती । कुंकुम लवणक्षार भरिती । डोळे आले म्हणोनियां ॥९३॥

ऐसे कष्‍ट धुरंधर । बाळपणीं जाहले अपार । वाढलों कष्‍ट भोगीत फार । वर्षें बारा लोटलीं ॥९४॥

तधीं तुझे चरणस्मरणा । मज कैंचें गा देवराणा । कष्‍टलों मी याचिगुणा । पूर्वजन्म नाठवेचि ॥९५॥

दोन भाग उरले आपणासी । मदनें व्यापिलें शरीरासी । जैसा पतंग दीपासी । भ्रमिजेत उन्मत्त ॥९६॥

नेणें मी गुरु माता पिता । समस्तांतें करी निंदा वार्ता । परस्त्रीवरी करीं चिंता । कुळाकुळ न विचारीं ॥९७॥

ब्राह्मणातें निंदा करी । वृद्धाच्या चेष्‍टा करी अपारी । मदें व्यापिलें असे भारी । नाठवती तुझे चरण मज ॥९८॥

मांसाचे कवळाकारणें । मत्स्य जाय जेवीं प्राणें । तैसा आपण मदनबाणें । वश्य जाहलों इंद्रियांसी ॥९९॥

नानावर्ण स्त्रियां भोगिलें । परद्रव्य अपहारिलें । सिद्धमहंतांतें निंदिलें । दृष्‍टीं न दिसे माझे कांहीं ॥१००॥

ऐसा मदनें व्यापूनि । मागें पुढें न पाहें नयनीं । पतंग जाय धांवोनि । दीपावरी पडे जैसा ॥१॥

ऐसा वेष्‍टोनि मदनबाणीं । न ऐके सुबुद्धि कधीं श्रवणीं । सोय न धरीं तुझे चरणीं । यौवनपण गेलें ऐसें ॥२॥

मग वृद्धाप्य आले शरीरासी । उबग होय स्त्रीपुत्रांसी । श्वासोच्छ्वास कफेसीं । सदा खोकला होय मज ॥३॥

अवयव सर्वही गलित होती । केश पांढरे होती त्वरिती । दंतहीन, श्रवणें न ऐकिजेति । दृष्‍टीं न दिसे, नासिक गळतें ॥४॥

ऐसा नाना रोगें कष्‍टतां । तुमची सेवा कधीं घडणें आतां । स्वामी तारका श्रीगुरुनाथा । संसारसागरा कडे करीं ॥५॥

ऐसा मंदमति आपण । न ओळखेचि तुझे चरण । तूंचि केवळ नारायण । अवतार तूं श्रीगुरुमूर्ति ॥६॥

तूंचि विश्वाचा तारक । धरोनियां नरवेष । त्रयमूर्ति तूंचि एक । परब्रह्म श्रीगुरुनाथा ॥७॥

दिवांध नेणती तुज लोक । तूंचि विश्वाचा पाळक । मी किंकर तुझा सेवक । संसार-धुरंधरीं तारीं मज ॥८॥

ऐसें नानापरी स्तोत्र । करीतसे नंदीनामा पवित्र । जन पाहताति विचित्र । त्यांसी म्हणे नंदीनामा ॥९॥

ऐका हो जन समस्त । श्रीगुरू जाणा परब्रह्मवस्तु । आपण पाप केलें बहुत । दर्शनमात्रें सर्व गलें ॥११०॥

जैसें तृणाचे बणवीसी । अग्नि लागतां क्षणें कैसी । गुरुकृपा होय ज्यासी । पाप जळे तयापरी ॥११॥

'चरणं पवित्रं विततं पुराणं' । ऐसें बोले वेद आपण । सेवा सेवा हो गुरुचरण । गुरुवेगळा देव नाहीं ॥१२॥

ब्रह्मदेवें आपण देखा । दुष्टाक्षरें लिहिलीं कपाळिका । तैसेही होय निका । श्रीगुरुचरणीं लागतां ॥१३॥

जवळी असतां निधान । कां नोळखा हो तुम्ही जन । नृसिंहसरस्वती कामधेनु । भजा भजा हो सकळिक ॥१४॥

इहसौख्य ज्ञान ऐका । अंतीं पावे वैकुंठलोका । संदेह नाहीं होईल सुखा । सत्य जाणा हो बोल माझा ॥१५॥

नंदीनामा स्तोत्र करितां । श्रीगुरु संतोषी अत्यंता । भक्तांसी ऐसा निरोप देत । 'कवीश्वर' म्हणा यासी ॥१६॥

कवि 'बसवरस' नाम तयासी । निर्धार केला आम्हीं भरंवसीं । ऐसें कृपेनें बोलती त्यासी । ऐकोनि चरणीं लागला ॥१७॥

जें कां शेष होतें जंघेवरी । तें तात्काळ गेलें दूरी । नंदीनामा आनंद करी । राहिला सेवा करीत देखा ॥१८॥

सिद्ध म्हणे नामधारकासी । श्रीगुरुचरित्र ऐसें परियेसीं । कथा करीत कवि बसवरसी । श्रीगुरुसेवेसी राहिला ॥१९॥

नामधारक म्हणे सिद्धमुनि । दुसरा कवि 'नरहरि' म्हणोनि । तो केवीं झाला शिष्य सुगुणी । कवेश्वर भक्त जाहला ॥१२०॥

तें विस्तारोनि आम्हांसी । सांगा स्वामी कृपेंसी । वांछा असे मानसीं । गुरुचरित्र ऐकावें ॥२१॥

म्हणे सरस्वती-गंगाधर । पुढील कथेचा विस्तार । ऐकतां होय मनोहर । नामस्मरण कामधेनु ॥१२२॥

इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे द्विजकुष्‍टपरिहारो नाम चतुश्चत्वारिंशोऽध्यायः ॥४४॥
ओंवीसंख्या १२२ ॥

श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
क्रमशः

No comments:

Post a Comment