Sunday, February 6, 2011

Gurucharitra - Adhyay 39

Chapter 39 Ganga, wife of a Brahmin named Somnath, who was 60 years old and did not have children is blessed with a daughter and a son.

CHAPTER 39

60 Year Old Sterile Woman Begets Children.

There lived one Shounak Gotri, Apastamb Brahmin named Somanath. His wife Ganga was a devoted wife, pious by nature. She was 60 years old, but she had no issue. She used to come to Shri Guru and bow to him devotedly every day.

Shri Guru being pleased, one day asked her, `Why are you worshiping me daily? What do you desire? God will fulfill your desire.

She said, `gurudeo, a woman's life is futile without an issue. Without a son the home is like a forest. Issue less persons go to hell. Please give me a boon so that I will have a son at least in next life.'

Shri Guru smiled and said, `Service to the Ashwattha will not be futile. There is an Ashwattha tree at the Bhima Amarja sangam. I am present there after the bath in the river. Therefore worship the Ashwattha devotedly. The greatness of Ashwattha is narrated in the Puranas. Brahmadeo is at its root, Vishnu is in its middle portion and the Rudra is on its top and the Agni (fire god) lies in the interior of this tree.

In the months of Ashadha, Poush or Chaitra, when Guru and Shukra are not set, when the moon is favourable on an auspicious day, observe fast and start worshiping the Ashwattha. Do not touch the tree on Sunday, Sankranti and in the evening. The floor at the root should be smeared by cow-dung and have rangolee designs. Worship the Ashwattha thinking it as a Trimurti, with 16 upchars, then saying Purushsukta and observing `moun' take rounds of the tree. Two lac rounds destroy even the sin of Brahmahatya. The Ashwattha gives four purusharthas. The desire of a son is also fulfilled by him.

Recitation of Mrityunjaya sitting at the Ashwattha on Saturday, avoids accidental death and gives long life. One gets credit of feeding several Brahmins, if one Brahmin is fed under this tree. If one Ashwattha tree is grown, 42 generations are liberated; but if one Ashwattha is cut, it is a great sin performed. Home performed under the tree gives credit of a great sacrifice. Do Homa of one tenth of the number of rounds and feed Brahmins and give golden Ashwattha in charity.

She started worshiping Ashwattha as advised by Shri Guru. On the third day, she had a dream. A Brahmin told her to go to Shri Guru at Ganagapur, have seven rounds of Shri Guru and take the prasad that is given to her and that her desire will be fulfilled. She awoke. On the fourth day she went to Shri Guru and had 7 rounds. Shri Guru gave her 2 fruits and said, `Eat these fruits. Your desire will be fulfilled.'

She then completed her vrat of the worship of Ashwattha. During meals she ate the fruits given by Shri Guru. In the evening she started menses. On the fourth day after bath she went to Shri Guru and bowed to him. She had sex act on he fifth day. She became pregnant, In the seventh month she was given `Oti' and she gave `vayan' to married women. `Seemant' was performed in the 8th month. After 9 months she begot a daughter.

After 10 days she came to Shri Guru with the baby. Shri Guru smiled and blessed her baby and said, `You will have one more son, what do you prefer? A well-behaved son of 30 years of age or a fool having 100 years' life?'

The woman said, `I would like to have a well-behaved son, who should have 5 sons.' Shri Guru blessed her as she desired. Later on she had a son who became learned and won fame. He had 5 sons in course of time. The daughter's husband performed sacrifices and was well-known as `Dixit.'

Contd....

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥
सिद्ध म्हणे नामधारका । पुढें अपूर्व वर्तलें ऐका । साठी वर्षे वांझेसी एका । पुत्र झाला परियेसा ॥१॥
आपस्तंब-शाखेसी । ब्राह्मण एक परियेसीं । शौनकगोत्र -प्रवरेसी । नाम तया 'सोमनाथ' ॥२॥
'गंगा' नामें त्याची पत्‍नी । पतिव्रताशिरोमणि । वेदशास्त्रें आचरणी । आपण करी परियेसा ॥३॥
वर्षें साठी झालीं तिसी । पुत्र नाहीं तिचे कुशीं । वांझ म्हणोनि ख्यातेसी । होती तया गाणगापुरीं ॥४॥
पतिसेवा निरंतर । करी भक्तिपुरस्सर । नित्य नेम असे थोर । गुरुदर्शना येत असे ॥५॥
नीरांजन प्रतिदिवसीं । आणोनि करी श्रीगुरुसी । येणेंपरी बहुत दिवसीं । वर्तत होती परियेसा ॥६॥
ऐसें असतां वर्तमानीं । संतुष्‍ट झाले श्रीगुरुमुनि । पृच्छा करिती हांसोनि । तया द्विजस्त्रियेसी ॥७॥
श्रीगुरु म्हणती तियेसी । काय अभीष्‍ट असे मानसीं । आणित्येसी प्रतिदिवसीं । नीरांजन परोपरी ॥८॥
तुझ्या मनींची वासना । सांगे त्वरित विस्तारुन । सिद्धि पाववील नारायण । गौरीरमण गुरुप्रसादें ॥९॥
ऐकोनि श्रीगुरुचें वचन । करी साष्‍टांगीं नमन । विनवीतसे कर जोडून । ' अपुत्रस्य लोको नास्ति' ॥१०॥
पुत्राविणें स्त्रियांसी । पाहों नये मुखासी । पापरुपी महादोषी । म्हणती मातें स्वामिया ॥११॥
जिचे पोटीं नाहीं बाळ । तिचा जन्म निर्फळ । वाट पाहती उभयकुळ । बेचाळीस पितृलोकीं ॥१२॥
पितृ चिंतिती मनांत । म्हणती एखादी सती वंशांत । पुत्र व्यालिया आम्हां हित । तो उद्धरील सकळांतें ॥१३॥
पुत्राविणें जें घर । तें सदा असे अघोर । अरण्य नाहीं त्यासी दूर । 'यथारण्य तथा गृह' ॥१४॥
नित्य गंगास्नानासी । आपण जात्यें परियेसीं । घेऊनि येती बाळकांसी । समस्त स्त्रिया कवतुकें ॥१५॥
कडे घेऊनियां बाळा । खेळविताति स्त्रिया सकळा । तैसें नाहीं माझे कपाळा । मंदभाग्य असें देखा ॥१६॥
जळो माझें वक्षस्थळ । कडे घ्यावया नाहीं बाळ । जन्मोनियां संसारीं निष्फळ । नव्हें पुरुष अथवा सती ॥१७॥
पुत्रपौत्र असती जयांसी । परलोक साधे तयांसी । अधोगति निपुत्रिकासी । लुप्तपिंड होय स्वामिया ॥१८॥
आतां पुरे जन्म मज । साठी वर्षें जाहलीं सहज । आम्हां आतां वर दीजे । पुढें उत्तम जन्म होय ॥१९॥
पुत्रवंती व्हावें आपण । अंतःकरण होय पूर्ण । ऐसा वर देणें म्हणोन । विनवीतसे तये वेळीं ॥२०॥
ऐकोनि तियेचें वचन । श्रीगुरु म्हणती हांसोन । पुढील जन्म जाणेल कवण । तूतें स्मरण कैंचें सांग ॥२१॥
नित्य आरति आम्हांसी । भक्तिपूर्वक भावेंसीं । करितां जाहलों संतोषी । कन्या-पुत्र होतील तुज ॥२२॥
इहजन्मीं तूतें जाण । कन्या पुत्र सुलक्षण । होतील निगुतीं म्हणोन । श्रीगुरु म्हणती तियेसी ॥२३॥
श्रीगुरुवचन ऐकोनि । पालवीं गांठी बांधी ज्ञानी । विनवीतसे कर जोडूनि । ऐका स्वामी कृपासिंधु ॥२४॥
साठी वर्षें जन्मासी । जाहलीं स्वामी परियेसीं । होत नाहीं विटाळसी । मातें कैंचे पुत्र होती ॥२५॥
नाना व्रत नाना तीर्थ । हिंडिन्नल्यें पुत्रार्थ । अनेक ठायीं अश्वत्थ- । पूजा केली स्वामिया ॥२६॥
मज म्हणती सकळै जन । करीं वो अश्वत्थप्रदक्षिणा । तेणें पुरतील मनकामना । होतील पुत्र म्हणोनि ॥२७॥
अश्वत्थसेवा बहुकाळ । करितां माझा जन्म गेला । विश्वास म्यां बहु केला । होतील पुत्र म्हणोनि ॥२८॥
साठी वर्षें येणेंपरी । कष्‍ट केले अपरांपरी । सेवा करित्यें अद्यापिवरी । अश्वत्थाची प्रदक्षिणा ॥२९॥
पुत्र न होती इह जन्मीं । पुढें होतील ऐसे कामीं । सेवा करितसें स्वामी । अश्वत्थाची परियेसा ॥३०॥
आतां स्वामी प्रसन्न होसी । इहजन्मीं पुत्र देसी । अन्यथा नोहे बोलासी । तुमच्या स्वामी नरहरी ॥३१॥
स्वामींनीं दिधला मातें वर । माझे मनीं हा निर्धार । हास्य न करी स्वामी गुरु । शकुनगांठी बांधिली म्यां ॥३२॥
पुढील जन्म-काम्यासी । करित्यें सेवा अश्वत्थासी । स्वामी आतांचि वर देसी । इहजन्मीं कन्या-पुत्र ॥३३॥
अश्वत्थसेवा बहु दिवस । करितां झाले मज प्रयास । काय देईल आम्हांस । अश्वत्थ सेवित्यें मूर्खपणें ॥३४॥
ऐकोनि तियेचें वचन । श्रीगुरु म्हणती हांसोन । अश्वत्थसेवा महापुण्य । वृथा नोहे परियेसा ॥३५॥
निंदा न करीं अश्वत्थासी । अनंत पुण्य परियेसीं । सेवा करीं वो आम्हांसरसी । तूतें पुत्र होतील ॥३६॥
आतां आमचे वाक्येंकरी । नित्य जावें संगमातीरीं । अमरजा वाहे निरंतरीं । भीमरथीसमागमांत ॥३७॥
तेथें अश्वत्थ असे गहन । जातों आम्ही अनुष्‍ठाना । सेवा करीं वो एकमनें । आम्हांसहित अश्वत्थाची ॥३८॥
अश्वत्थाचें महिमान । सांगतसें परिपूर्ण । अश्वत्थनाम-नारायण । आमुचा वास तेथें असे ॥३९॥
ऐकोनि श्रीगुरुचें वचन । विनवीतसे ते अंगना । अश्वत्थवृक्षाचें महिमान । स्वामी मातें निरोपावें ॥४०॥
कैसी महिमा असे त्यासी । स्वामी सांगावें मजसी । स्थिर होईल माझें मानसी । सेवा करीन भक्तीनें ॥४१॥
श्रीगुरु म्हणती तियेसी । अश्वत्थवृक्षासी निंदा करिसी । महिमा असे अपार त्यासी । समस्त देव तेथें वसती ॥४२॥
अश्वत्थाचें महिमान । असे ब्रह्मांडपुराणीं निरुपण । नारदमुनीस विस्तारोन । ब्रह्मदेवानें सांगितलें ॥४३॥
ब्रह्मकुमर नारदमुनि । नित्य गमन त्रिभुवनीं । ब्रह्मयासी पुसोनि । आला ऋषि-आश्रमासी ॥४४॥
नारदातें देखोनि । अर्घ्यपाद्य देवोनि । पूजा केली उपचारोनि । पुसते झाले तयेवेळीं ॥४५॥
ऋषि म्हणती नारदासी । विनंति एक परियेसीं । अश्वत्थमहिमा असे कैसी । विस्तारावें स्वामिया ॥४६॥
ऋषिवचन ऐकोनि । सांगता जाहला नारदमुनि । गेलों होतों आजिचे दिनीं । ब्रह्मलोकीं हिंडत ॥४७॥
आपण पुसे स्वभावेंसीं । अश्वत्थमहिमा असे कैसी । समस्त मानिती तयासी । विष्णुस्वरुप म्हणोनियां ॥४८॥
ऐसा वृक्ष असे जरी । सेवा करणें कवणेपरी । कैसा महिमा सविस्तारीं । निरोपावें स्वामिया ॥४९॥
ब्रह्मा सांगे आम्हांसी । अश्वत्थमुळीं आपण वासी । मध्यें वास ह्रुषीकेशी । अग्रीं रुद्र वसे जाणा ॥५०॥
शाखापल्लवीं अधिष्‍ठानीं । दक्षिण शाखे शूलपाणि । पश्चिम शाखे विष्णु निर्गुणी । आपण उत्तरे वसतसें ॥५१॥
इंद्रादि देव परियेसीं । वसती पूर्वशाखेसी । इत्यादि देव अहर्निशीं । समस्त शाखेसी वसती जाणा ॥५२॥
गोब्राह्मण समस्त ऋषि । वेदादि यज्ञ परियेसीं । समस्त मूळांकुरेसी । असती देखा निरंतर ॥५३॥
समस्त नदीतीर्थें देखा । सप्त-सागर लवणादिका । वसती जाणा पूर्व शाखा । ऐसा अश्वत्थ वृक्ष जाणा ॥५४॥
अ-कारशब्द मूळस्थान । स्कंध शाखा उ-कार जाण । फळ पुष्प म-कारवर्ण । अश्वत्थमुख अग्निकोणीं असे ॥५५॥
एकादश रुद्रादिक । अष्‍ट वसु आहेत जे का । जे स्थानीं त्रैमूर्तिका । समस्त देव तेथें वसती ॥५६॥
ऐसा अश्वत्थनारायण । महिमा वर्णावया शक्त कवण । कल्पवृक्ष याचि कारण । ब्रह्मा म्हणे नारदासी ॥५७॥
नारद सांगे ऋषेश्वरांसी । त्रयमूर्ति वास ज्या वृक्षाशीं । काय महिमा सांगों त्यासी । भजतां काय सिद्धि नोहे ? ॥५८॥
ऐसें ऐकोनि समस्त ऋषि । विनविताति नारदासी । आचारावया विधि कैसी । कवणें रीतीनें भजावें ॥५९॥
पूर्वीं आम्हीं एके दिवसीं । पुसिलें होतें आथर्वणासी । त्याणें सांगितलें आम्हांसी । अश्वत्थसेवा एक रीतीं ॥६०॥
तूं नारद ब्रह्मऋषि । समस्त धर्म ओळखसी । विस्तार करोनि आम्हांसी । विधिपूर्वक निरोपावें ॥६१॥
नारद म्हणे मुनिवरा । त्या व्रताचिया विस्तारा । सांगेन ऐका तत्परा । विधान असे ब्रह्मवचनीं ॥६२॥
आषाढ-पौष-चैत्रमासीं । अस्तंगत गुरुशुक्रेसीं । चंद्रबळ नसते दिवसीं । करुं नये प्रारंभ ॥६३॥
याव्यतिरिक्त आणिक मासीं । बरवे पाहोनियां दिवसीं । प्रारंभ करावा उपवासीं । शुचिर्भूत होऊनि ॥६४॥
भानुभौमवारेसीं । आतळूं नये अश्वत्थासी । भृगुवारीं संक्रांतिदिवसीं । स्पर्शूं नये परियेसा ॥६५॥
संधिरात्रीं रिक्तातिथीं । पर्वणीसी व्यतीपातीं । दुर्दिनादि वैधृतीं । अपराण्हसमयीं स्पर्शूं नये ॥६६॥
अनृत-द्यूतकर्मभेषीं । निंदा-पाखांड-वर्जेसीं । प्रातर्मौनी होवोनि हर्षीं । आरंभावें परियेसा ॥६७॥
सचैल स्नान करुनि । निर्मळ वस्त्र नेसोनि । वृक्षाखालीं जाऊनि । गोमयलिप्त करावें ॥६८॥
स्वस्तिकादि शंखपद्मेसीं । घालावी रंगमाळा परियेसीं । पंचवर्ण चूर्णेसीं । भरावें तेथें पद्मांत ॥६९॥
मागुती स्नान करुनि । श्वेत वस्त्र नेसोनि । गंगा यमुना कलश दोनी । आणोनि ठेवणें पद्मांवरी ॥७०॥
पूजा करावी कलशांसी । पुण्याहवाचनकर्मेंसीं । संकल्पावें विधींसीं । काम्यार्थ आपुलें उच्चारावें ॥७१॥
मग कलश घेवोनि । सात वेळां उदक आणोनि । स्नपन करावें जाणोनि । अश्वत्थ वृक्षासी अवधारा ॥७२॥
पुनरपि करुनियां स्नान । मग करावें वृक्षपूजन । पुरुषसूक्त म्हणोन । पूजा करावी षोडशोपचारें ॥७३॥
मनीं ध्यावी विष्णुमूर्ति । अष्‍टभुजा आहेति ख्याती । शंख-चक्र-वरद-हस्तीं । अभय-हस्त असे जाणा ॥७४॥
खड्ग-खेटक एके करीं । धनुष्य-बाण सविस्तारीं । अष्‍टभुजी येणेंपरी । ध्यावा विष्णु नारायण ॥७५॥
पीतांबर पांघरुण । सदा लक्ष्मी-सन्निधान । ऐसी मूर्ति ध्याऊन । पूजा करणें वृक्षासी ॥७६॥
त्रैमूर्तीचें असें स्थान । शिवशक्तीविणें नाहीं जाण । समस्तांतें आवाहनोन । षोडशोपचारें पूजावें ॥७७॥
वस्त्रें अथवा सुतेसीं । वेष्टावें तया वृक्षासी । पुनरपि संकल्पेसीं । प्रदक्षिणा कराव्या ॥७८॥
मनसा-वाचा-कर्मणेसीं । भक्तिपूर्वक भावेंसीं । प्रदक्षिणा कराव्या हर्षीं । पुरुषसूक्त म्हणत देखा ॥७९॥
अथवा सहस्त्रनामेंसीं । कराव्या प्रदक्षिणा हर्षीं । अथवा कराव्या मौन्येंसीं । त्याचें फळ अमित असे ॥८०॥
चाले जैसी स्त्री गर्भिणी । उदककुंभ घेउनी । तैसे मंद गतींनीं । प्रदक्षिणा कराव्या शुद्धभावें ॥८१॥
पदोपदीं अश्वमेध । पुण्य जोडे फळप्रद । प्रदक्षिणासमाप्तमध्य । नमस्कार करावा ॥८२॥
ब्रह्महत्यादि पापांसी । प्रायश्चित्त नाहीं परियेसीं । प्रदक्षिणा द्विलक्षांसीं । ब्रह्महत्या पाप जाय ॥८३॥
त्रिमूर्ति वसती जया स्थानीं । फल काय सांगूं प्रदक्षिणीं । समस्त पापा होय धुणी । गुरुतल्पादि पाप जाय ॥८४॥
नाना व्याधि हरती दोष । प्रदक्षिणा करितां होय सुरस । कोटि ऋण असे ज्यास । परिहरत परियेसा ॥८५॥
जन्म मृत्यु जरा जाती । संसारभय नाश होती । ग्रहदोष बाधों न शकती । सहस्त्र प्रदक्षिणा केलिया ॥८६॥
पुत्रकाम्य असे ज्यासी । त्यातें फल होय भरंवसीं । मनोवाक्कायकर्मेंसीं । एकोभावें करावें ॥८७॥
चतुर्विध पुरुषार्थ । देता होय तो अश्वत्थ । पुत्रकाम्य होय त्वरित । न करा अनुमान ऋषी हो ॥८८॥
शनिवारीं वृक्ष धरोनि । जपावें मृत्युंजय-मंत्रानीं । काळमृत्यु जिंकोनि । राहती नर अवधारा ॥८९॥
त्यासी अपमृत्यु न बाधती । पूर्णायुषी होती निश्चितीं । शनिग्रह न पीडिती । प्रार्थावें अश्वत्थासी ॥९०॥
शनिनाम घेवोनि । उच्चारावें आपुले जिव्हेनीं । बभ्रु-पिंगळ म्हणोनि । कोणस्थ-कृष्ण म्हणावें ॥९१॥
अंतक-यम-महारौद्री । मंद-शनैश्वर-सौरि । जप करावा येणेंपरी । शनिपीडा न होय ॥९२॥
ऐसें दृढ करोनि मना । अश्वत्थ सेवितां होय कामना । पुत्रकाम्य तत्क्षणा । होय निरुतें अवधारा ॥९३॥
अमावस्या-गुरुवारेंसी । अश्वत्थछाया-जळेंसीं । स्नान करितां नरासी । ब्रह्महत्या पाप जाय ॥९४॥
अश्वत्थतळीं ब्राह्मणासी । अन्न देतां एकासी । कोटि ब्राह्मणां परियेसीं । भोजन दिल्हें फळ असे ॥९५॥
अश्वत्थतळीं बैसोन । एकदां मंत्र जपतां क्षण । फळें होतील अनेकगुण । वेदपठण केलियाचें ॥९६॥
नर एखादा अश्वत्थासीं । स्थापना करी भक्तींसीं । आपुले पितृ-बेचाळिसी । स्वर्गीं स्थापी परियेसा ॥९७॥
छेदितां अश्वत्थवृक्षासी । महापाप परियेसीं । पितृसहित नरकासी । जाय देखा तो नर ॥९८॥
अश्वत्थातळीं बैसोन । होम करितां महायज्ञ । अक्षय सुकृत असे जाण । पुत्रकाम्य त्वरित होय ॥९९॥
ऐसा अश्वत्थमहिमा । नारदाप्रति सांगे ब्रह्मा । म्हणोनि ऐकती ऋषिस्तोम । तया नारदापासोनि ॥१००॥
नारद म्हणे ऋषेश्वरासी । प्रदक्षिणेच्या दहावे अंशीं । हवन करावें विशेषीं । आगमोक्त विधानपूर्वक ॥१॥
हवनाचे दहावे अंशीं । ब्राह्मणभोजन करावें हर्षीं । ब्रह्मचर्य हविष्यान्नेंसीं । व्रत आपण करावें ॥२॥
येणेंपरी आचरोन । मग करावें उद्यापन । शक्त्यनुसार सौवर्ण । अश्वत्थवृक्ष करावा ॥३॥
तो द्यावा ब्राह्मणासी । विधिपूर्वक परियेसीं । श्वेतधेनु सवत्सेंसीं । ब्राह्मणातें दान द्यावी ॥४॥
वृक्षातळीं तिळराशी । करावी यथानुशक्तीसीं । श्वेतवस्त्र झांकोनि हर्षीं । सुक्षीण ब्राह्मणासी दान द्यावें ॥५॥
ऐसें अश्वत्थविधान । सांगे नारद ऋषिजना । येणेंपरी आचरोन । सकळाभीष्‍ट लाधले ॥६॥
श्रीगुरु म्हणती वांझ सतीसी । अश्वत्थमहिमा आहे ऐसी । भावभक्ति असे ज्यासी । त्यातें होय फलश्रुति ॥७॥
आचार करीं वो येणेंपरी । संशय अंतःकरणीं न धरीं । वृक्ष असे भीमातीरीं । जेथें अमरजासंगम ॥८॥
तेंचि आमुचें असे स्थान । सेवा करीं वो एकोमनें । होईल तुझी मनकामना । कन्या पुत्र तुज होतील ॥९॥
ऐकोनि श्रीगुरुचें वचन । नमन करी ते अंगना । विनवीतसे कर जोडूनि । भावभक्तीकरोनियां ॥११०॥
आपण वांझ वर्षें साठी । कैंचे पुत्र आपुले पोटीं । वाक्य असे तुमचें शेवटीं । म्हणोनि आपण अंगीकारीन ॥११॥
गुरुवाक्य म्हणजे कामधेनु । ऐसें बोलती वेदपुराण । आतां नाहीं अनुमान । करीन सेवा स्वामिया ॥१२॥
चाड नाहीं अश्वत्थासी । निर्धार तुमचे बोलासी । सेवा करीन तुमची ऐसी । म्हणोनि चरणीं लागली ॥१३॥
ऐसा निरोप घेवोनि । जावोनि वनिता संगमस्थानीं । षट्‌कूलांत न्हाऊनि । सेवा करी अश्वत्थाची ॥१४॥
श्रीगुरुनिरोप जेणेंपरी । तैसी सेवा करी ते नारी । येणेंपरी तीन रात्रीं । आराधिलें परियेसा ॥१५॥
श्रीगुरुसहित अश्वत्थासी । पूजा करितां तिसरे दिवसीं । स्वप्न जाहलें तियेसी । सांगेन ऐका एकचित्तें ॥१६॥
स्वप्नामध्यें विप्र एक । येवोनि देतो तिसी भाक । काम्य झालें तुझें ऐक । सांगेन एक करीं म्हणे ॥१७॥
जाऊनि गाणगापुरांत । तेथें असे श्रीगुरुनाथ । प्रदक्षिणा करीं हो सात । नमन करीं तूं भक्तींसीं ॥१८॥
जें काय देतील तुजसी । भक्षण करीं वो वेगेंसीं । निर्धार धरुनि मानसीं । त्वरित जावें म्हणे विप्र ॥१९॥
ऐसें देखोनि सुषुप्तींत । सवेंचि झाली ते जागृत । कल्पवृक्ष असे अश्वत्थ । कल्पिलें फळ त्वरित होय ॥१२०॥
सेवा करुनि चवथे दिवशीं । आली आपण मठासी । प्रदक्षिणा करुनि हर्षीं । नमन केलें तये वेळीं ॥२१॥
हांसोनियां श्रीगुरुमुनि । फळें देती तिसी दोनी । भक्षण करीं वो संतोषोनि । काम्य झालें आतां तुझें ॥२२॥
भोजन करीं वो तूं आतां त्वरित । काम्य होईल तुझें सत्य । कन्या-पुत्र दोघे तूतें । दिल्हे आजि परियेसा ॥२३॥
पारणें करोनि विधीसीं । मग भक्षावें या फलांसी । दान द्यावें ब्राह्मणांसी । जें काय पूर्वीं निरोपिलें ॥२४॥
व्रत संपूर्ण करोनि । केलें दान ते भामिनीं । तेचि दिवशीं अस्तमानी । झाली आपण विटाळशी ॥२५॥
मौन दिवस तीनवरी । भोजन करी हिरवे खापरीं । श्वेत वस्त्र नेसोनि नारी । कवणाकडे न पाहेचि ॥२६॥
येणेंपरी तिन्ही निशी । क्रमिल्या नारीनें परियेसीं । सुस्नात होवोनि चवथे दिवशीं । आली श्रीगुरुचे दर्शना ॥३७॥
पतीसमवेत येऊनि । पूजा करी ती एकाग्रमनीं । श्रीगुरु म्हणती संतोषोनि । पुत्रवंती व्हावें तुम्हीं ॥२८॥
ऐसें नमूनि श्रीगुरुसी । आली आपुल्या मंदिरासी । ऋतु दिधला पांचवे दिवसीं । म्हणोनि कन्या परियेसा ॥२९॥
येणेंपरी ते नारी । जाहली ऐका गरोदरी । ग्राम सकळ विस्मय करी । काय नवल म्हणतसे ॥१३०॥
म्हणती पहा नवल वर्तलें । वांझेसी गर्भधारण केवीं झालें । सोमनाथ विप्र भले । करीतसे आनंद ॥३१॥
सातवे मासीं ओटी भरिती । अक्षय वाणें ओंवाळिती । श्रीगुरुसी विनोदावरी प्रीति । वाणें देवविती कौतुकें ॥३२॥
आठवे मासीं तो ब्राह्मण । करी सीमंतविधान । गुरुनिरोपें संतोषोन । देती वाणें ग्रामांत ॥३३॥
अभिनव करिती सकळही जन । म्हणती वांझेसी गर्भधारण । पांढरे केश म्हातारपण वाणें देती कौतुकें ॥३४॥
एक म्हणती श्रीगुरुप्रसाद । श्रीनृसिंहमूर्ति भक्तवरद । त्याची सेवा करितां आनंद । लाधे चारी पुरुषार्थ ॥३५॥
त्रैमूर्तींचा अवतार । झाला नृसिंहसरस्वती नर । भक्तजनां मनोहर प्रगटला भूमंडळीं ॥३६॥
ऐसें नानापरी देखा । स्तोत्र करिती गुरुनायका । वाणें देत ते बालिका । अत्योल्हास तिच्या मनीं ॥३७॥
वाणें देऊनि समस्तांसी । येऊनि नमी ती श्रीगुरुसी । भक्तवत्सल परियेसीं । अशीर्वचन देतसे ॥३८॥
संतोषोनि विप्रवनिता । करी साष्‍टांग दंडवता । नानापरी स्तोत्र करितां । विनवीतसे परियेसा ॥३९॥
जय जया परमपुरुषा । तूंचि ब्रह्मा विष्णुमहेशा । तुझें वाक्य जाहलें परीस । सुवर्ण केला माझा देह ॥१४०॥
तूं तारावया विश्वासी । म्हणोनि भूमीं अवतरलासी । त्रैमूर्ति तूंचि होसी । अन्यथा नव्हे स्वामिया ॥४१॥
तुझी स्तुति करावयासी । अशक्य आपुले जिव्हेसी । अपार तुझ्या महिमेसी । नाहीं साम्य कृपासिंधु ॥४२॥
येणेंपरी स्तोत्र करुनि । श्रीगुरुचरण वंदूनि । गेली निरोप घेऊनि । आपुले गृहा परियेसा ॥४३॥
ऐसे नवमास क्रमोनि । प्रसूत जाहली शुभदिनीं । समस्त ज्योतिषी येवोनि । वर्तविती जातकातें ॥४४॥
ज्योतिषी म्हणती तये वेळीं । होईल कन्या मन निर्मळी । अष्‍टपुत्रा वाढेल कुळी । पुत्रपौत्रीं नांदेल ॥४५॥
येणेंपरी ज्योतिषीं । जातक वर्तविलें परियेसीं । सोमनाथ आनंदेंसीं । दानधर्म करिता जाहला ॥४६॥
दहा दिवस क्रमोनि । सुस्नात झाली ते भामिनी । कडिये बाळक घेवोनि । आली श्रीगुरुदर्शनासी ॥४७॥
बाळक आणोनि भक्तींसीं । ठेविलें श्रीगुरुचरणापाशीं । नमन करी साष्‍टांगेंसीं । एकभावेंकरोनियां ॥४८॥
आश्वासोनि श्रीगुरुमूर्ति । उठीं बाळे पुत्रवंती । बहुतपरी संतोषविती । प्रेमभावेंकरोनियां ॥४९॥
उठोनि विनवी ती श्रीगुरुसी । पुत्र नाहीं आमुचे कुशीं । सरस्वती आली घरासी । बोल आपुला सांभाळावा ॥१५०॥
ऐकोनि तियेचें वचन । श्रीगुरु म्हणती हांसोन । न करीं मनीं अनमान । तूतें पुत्र होईल ॥५१॥
म्हणोनि तिये कुमारीसी । कडिये घेती प्रीतींसीं । सांगताति समस्तांसी । तये कन्येचें लक्षण ॥५२॥
पुत्र होतील बहु इसी । होईल आपण शतायुषी । पुत्राचे पौत्र नयनेंसीं । पाहील आपण अहेवपणें ॥५३॥
होईल इसी ज्ञानी पति । त्यातें चारी वेद येती । अष्‍टैश्चर्यें नांदती । प्रख्यात होवोनि भूमंडळीं ॥५४॥
आपण होईल पतिव्रता । पुण्यशील धर्मरता । इची ख्याति होईल बहुता । समस्ता इसी वंदिती ॥५५॥
दक्षिणदेशीं महाराजा । येईल इचे दर्शनकाजा । आणिक पुत्र होईल तुज । म्हणोनि श्रीगुरु बोलती ॥५६॥
येणेंपरी श्रीगुरुमूर्ति । कन्यालक्षण सांगती । विप्रवनिता विनयवृत्तीं । म्हणे पुत्र व्हावा मज ॥५७॥
श्रीगुरु म्हणती तियेसी । पुत्र व्हावा तुज कैसी । योग्य पाहिजे वर्षें तीसी । अथवा शतायुषी मूर्ख पैं ॥५८॥
ऐकोनि श्रीगुरुच्या वचना । विनवीतसे ते अंगना । योग्य पाहिजे पुत्र आपणा । तयासी पांच पुत्र व्हावे ॥५९॥
भक्तवत्सल श्रीगुरुमूर्ति । वर देती तेणें रीतीं । संतोषोनि घरा जाती । महानंद दंपतीसी ॥१६०॥
पुढें तिसी पुत्र झाला । वेदशास्त्रीं विख्यात भला । पांच पुत्र तो लाधला । नामकरणी श्रीगुरुचा ॥६१॥
कन्यालक्षण श्रीगुरुमूर्ती । निरोपिलें होतें जेणें रीतीं । प्रख्यात झाली सरस्वती । महानंद प्रवर्तला ॥६२॥
यज्ञ करी तिचा पति । प्रख्यात नाम 'दीक्षिती' । चहूं राष्‍ट्रीं त्याची ख्याती । म्हणोनि सांगे सिद्धमुनि ॥६३॥
साठी वर्षें वांझेसी । पुत्र जाहला परियेसीं । सिद्ध म्हणे नामधारकासी । ऐसी कृपा श्रीगुरुची ॥६४॥
निर्धार असे ज्याचे मनीं । त्यासी वर देती तत्क्षणीं । एकोभावें याकारणीं । भक्ति करावी श्रीगुरुची ॥६५॥
म्हणोनि सरस्वती-गंगाधर । सांगे गुरुचरित्रविस्तार । भजा भजा हो श्रीगुरु । सकळाभीष्‍ट लाधे तुम्हां ॥६६॥
जो भजेल श्रीगुरुसी । एकोभावें भक्तींसीं । त्यासी दैन्य कायसी । जें जें मागेल तें देईल सत्य ॥६७॥
गुरुभक्ति म्हणजे कामधेनु । अंतःकरणीं नको अनुमानु । जें जें इच्छीत भक्तजनु । समस्त देईल परियेसा ॥१६८॥
इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे वृद्धवंध्यासंतानप्राप्ति नाम एकोनचत्वारिंशत्तमोऽध्यायः ॥३९॥
ओंवीसंख्या १६८ ॥
श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
क्रमशः

No comments:

Post a Comment