Chapter 16 Shri Narsinh Sarawati discribes greatness of Shri Guru by story of Dhoumyarishi & his three disciplines Aruni, Baid and Upmanyu. In former times, the Guru used to test his disciples before giving knowledge to them.
CHAPTER 16
Greatness of Shri Guru.
Namdharak- when all the disciples went away on the pilgrimage who served Shri Guru?
Siddha- I was in a swoon of delusion. But your question has given rise to the Sun of knowledge. Shri Guru's life is like Kamdhenu. Shri Guru lived secretly at Arogya Bhavani near Vajnath. I was with him this time. A Brahmin came to Shri Guru, praised him and said humbly, 'I am doing penance, but my mind has not become still. I am greatly appeased to see you, kindly tell me means to attain knowledge and liberate me.'
The Brahmin further said, ' Gurudeo, I had a Guru, He used harsh words and asked me to do undesirable service. He did not teach me logic, grammer, bhashya etc. He said that my mind is not still, so I left him in anger.'
Shri Guru-'You are a fool, harming yourself and treacherous to Guru. You speak ill of Guru, how can you have knowledge? Why did you come to me leaving Guru, who is a Kamdhenu. By pleasing the Guru by service and giving respect to him one can know Vedas, Shastras and eight Siddhis (a boon to do particular miracles).'
The Brahmin placed his head on the feet of Shriguru and asked, `gurudeo, kindly tell me who is a Guru and how to serve him?' Shri Guru- Mother and father are Gurus. Brahma, Vishnu, Maheswhar are
Gurus. One serve his Guru with devotion. I narrate to you a tale in this connection.
Dhoumyarishi lived at Dhwarawati. He had three disciples; Aruni, Baid and Upmanyu. In former times, the Guru tested his disciples before giving knowledge to them. Dhoumys said to Aruni, `go to my field and fill it with canal water.' Aruni went to the field. The canal water was flowing with great force. Paddy was sown in the field which was on higher land than the level of the water. He placed stones to divert the water to the field. He then laid his body across the canal and thus half the flow of
water entered the field. Even by sunset, as Aruni did not return, Dhoumya went to his field and called him loudly. He feared a serpent might have bitten or a tiger might have attacked him. Hearing the Guru's voice, Aruni came out of the canal and bowed to the Guru, and stood near him Dhoumya embraced with pleasure and blessed him saying 'You will know all Vidyas. Go home get married and live happily'. Dhoumya then said to Baid, `Go to the field, keep watch on the crop and when it is reaped, bring it hime. Baid accordingly went to the field, and kept the watch day and night. When the crop was reaped, a cart with one buffalo was given to him. Baid placed the corn in the cart, yoked the buffalo on one side of the yoke and he himself pulled the cart on the other side. He could not draw the cart with the buffalo, still he drew it with much strain. The buffalow got stuckup in the mud and could not go
forward. So he alone drew the heavy cart. Subsequenly his neck was strangled and he had to face great strain. In the meantime, Dhoumya came there and released him from the yoke. He embraced Baid an said, `you know Vedas and Shastras well.'
The third disciple Upmanyu was fat and dull Dhoumya asked him to take the cattle for grazing the forest. Upmanyu took the cattle to graze. At times, being hungry he would return early from the forest. The Guru told him not to come from the forest till sunset.
The cattle would graze on the bank of a river Upmanyu would bathe, take alms from the Brahmins living nearby. Thus he satisfied his hunger. One day the Guru asked him, `How are you living?'
He said that he took alms and dined. Guru said, `How to you dine without us? Give the alms in the Ashram and again go to the forest.' Upmanyu acted as directed by the Guru. He would give the alms in the
Ashram. But as he did not get full meals at the Ashram he again took alms from some Brahmin houses and satisfied his hunger. When the Guru knew this. He angrily said, `Give both the alms in the Ashram.'
As directed, he gave both the alms in the Ashram. Hee was anxious now how to satisfy his hunger. He saw calves drinking milk of cows and much milk fell on the ground and was wasted. He held that milk in his hands and drank it.
After some days the Guru asked him how he was fat, He said that he drank the milk that fell while the calvees drank the milk from the cows.
The guru said, `you should not drink milk tasted by calves as this milk makes you dill.'
While remaining in the forest, he saw milk like pastee coming out of the "rui" plant. He held the milk in leaves and while hee was drinking it, some drops thereof entered his eyes. Subsequently hee lost his eye-sight and became blind. Now he thought the Guru would be angry with him. He began to collect the cattle; but as he could not see, he fell in a well.
When Dhoumys knew that Upmanyu did not return by the evening, hee went to the forest and called him loudly. Upmanyu responded from the well and informed him about his wehreabouts.
Dhoumya came near the well and said to him with sympathy `Recitee Ashwinikumar mantra'. After doing that, he got back his eye-sight. He came out of the well, bowed to his Guru and stood by him. Dhoumya placed his palm on his head and instantly he had all thee knowledge.
Dhoumya said to him, "Go home, get married and live happily. You will be wellknown. One of your disciples, Uttank will bring Kundal (ear ornament) and win the Shesh. He will advise King Janme jaya to perform sacrifice of the serpents and kill all the serpents in the sacrifice"
As stated, Uttank caused Janmejaya to perform the sacrifice in which even Indra had to come down along with Takshak (the king of serpents). This is all due to the greatness of Guru. He will liberate you. You should try to please him.
The Brahmin said, `gurudeo, you have given me thee right advice. As I have offended my Guru, how can I please him now? It is very difficult to appease the wounded heart. I would, therefore, leave this worthless body of mine,' saying this, he bowwed to Shri Guru. Shri Guru realised his repentence and knowing his desires, Shri Guru said, `All your sins are wiped off now. Remember your Guru.'
The Brahmin folded his hands and prayed, `You are the Guru of all the world and incarnation of three great Gods. How can there be darkness after the rise of the Sun? You please protect me.'
Hearing this Shri Guru was kind to place his right palm on his head and instantly he had knowledge of Vedas, Shastras, Mantras etc. By the touch of the philosophers's stone, iron is changed into goid, similarly the Brahmin became learned. Shri Guru again asked him to go to his Guru.
Contd...
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥
विनवी शिष्य नामांकित । सिद्धासी असे पुसत । सांगा स्वामी वृत्तांत । गुरुचरित्र विस्तारुनि ॥१॥
शिष्य समस्त गेले यात्रेसी । राहिले कोण गुरुपाशीं । पुढें कथा वर्तली कैसी । विस्तारावें दातारा ॥२॥
ऐकोनि शिष्याची वाणी । संतोषी झाले सिद्ध मुनि । धन्य धन्य शिष्या शिरोमणि । गुरुभक्ता नामधारका ॥३॥
अविद्यामायासुषुप्तींत । निजलें होतें माझें चित्त । तुजकरितां जाहलें चेत । ज्ञानज्योति-उदय मज ॥४॥
तूंचि माझा प्राणसखा । ऐक शिष्या नामधारका । तुजकरितां जोडलों सुखा । गुरुचरित्र आठवलें ॥५॥
अज्ञानतिमिरउष्णांत । पीडोनि आलों कष्टत । सुधामृतसागरांत । तुवां मातें लोटिलें ॥६॥
तुवां केले उपकारासी । संतुष्ट झालों मानसीं । पुत्रपौत्रीं तूं नांदसी । दैन्य नाहीं तुझे घरीं ॥७॥
गुरुकृपेचा तूं बाळक । तुज मानिती सकळ लोक । संदेह न करीं घे भाक । अष्टैश्चर्ये नांदसी ॥८॥
गुरुचरित्रकामधेनु । सांगेन तुज विस्तारुनु । श्रीगुरू राहिले गौप्य होऊन । वैजनाथसंनिधेसीं ॥९॥
समस्त शिष्य तीर्थेसी । स्वामीनिरोपें गेले परियेसीं । होतों आपण गुरुपाशीं । सेवा करीत अनुक्रमें ॥१०॥
संवत्सर एक तया स्थानीं । होते गौप्य श्रीगुरु मुनि । अंबा आरोग्यभवानी । स्नान बरवें मनोहर ॥११॥
असतां तेथें वर्तमानीं । आला ब्राह्मण एक मुनि । श्रीगुरुतें देखोनि । नमन करी भक्तिभावें ॥१२॥
माथा ठेवूनि चरणांवरी । स्तोत्र करी परोपरी । स्वामी मातें तारीं तारीं । अज्ञानसागरीं बुडालों ॥१३॥
तप करतों बहु दिवस । स्थिर नव्हे गा मानस । याचि कारणें ज्ञानास । न दिसे मार्ग आपणातें ॥१४॥
ज्ञानाविणें तापसा । वृथा होती सायास । तुम्हां देखतां मानसा । हर्ष जाहला आजि मज ॥१५॥
गुरुची सेवा बहुत दिवस । केली नाहीं सायासें । याचिकारणें मानस । स्थिर नव्हे स्वामिया ॥१६॥
तूं तारक विश्वासी । जगद्गुरू तूंचि होसी । उपदेश करावा आम्हांसी । ज्ञान होय त्वरितेसीं ॥१७॥
ऐकोनि मुनीचें वचन । श्रीगुरू पुसती हांसोन । जाहलासी तूं केवीं मुनि । गुरुविणें सांग मज ॥१८॥
ऐसें म्हणतां श्रीगुरुमूर्ति । मुनीच्या डोळां अश्रुपाती । दुःख दाटलें अपरमिति । ऐक स्वामी गुरुराया ॥१९॥
गुरु होता आपणासी एक । अतिनिष्ठुर त्याचें वाक्य । मातें गांजिलें अनेक । अकृत्य सेवा सांगे मज ॥२०॥
न सांगे वेदशास्त्र आपण । तर्कभाष्यादि व्याकरण । म्हणे तुझें अंतःकरण । स्थिर नव्हे अद्यापि ॥२१॥
म्हणोनि सांगे आणिक कांहीं । आपुलें मन स्थिर नाहीं । करी त्याचे बोल वायी । आणिक कोप करी मज ॥२२॥
येणेंपरी बहुत दिवशीं । होतों तया गुरुपाशीं । बोले मातें निष्ठुरेसीं । कोपोनि आलों तयावरी ॥२३॥
ऐकोनि तयाचें वचन । श्रीगुरुमूर्ति हास्यवदन । म्हणती ऐकें ब्राह्मणा । आत्मघातकी तूंचि होसी ॥२४॥
एखादा मूर्ख आपुले घरीं । मळ विसर्जी देव्हारीं । आपुलें अदृष्ट ऐसेपरी । म्हणोनि सांगे सकळिकां ॥२५॥
तैसें तुझें अंतःकरण । आपुलें नासिक छेदून । पुढिल्यातें अपशकुन । करुनि रहासी तूंचि एक ॥२६॥
न विचारिसी आपुले गुण । तूतें कैंचें होय ज्ञान । गुरुद्रोही तूंचि जाण । अल्पबुद्धि परियेसा ॥२७॥
आपुले गुरूचे गुणदोष । सदा उच्चार करिसी हर्षे । ज्ञान कैंचें होय मानस । स्थिर होय केवीं आतां ॥२८॥
जवळी असतां निधानु । कां हिंडावें रानोरानु । गुरु असतां कामधेनू । वंचूनि आलासी आम्हांजवळी ॥२९॥
गुरुद्रोही कवण नर । त्यासी नाहीं इह पर । ज्ञान कैंचें होय पुरें । तया दिवांधकासी ॥३०॥
जो जाणे गुरुची सोय । त्यासी सर्व ज्ञान होय । वेदशास्त्र सर्व होये । गुरु संतुष्ट होतांचि ॥३१॥
संतुष्टवितां श्रीगुरुसी । अष्टसिद्धि आपुले वशी । क्षण न लागतां परियेसीं । वेदशास्त्र त्यासी साध्य ॥३२॥
ऐकोनि श्रीगुरूचें वचन । माथा श्रीगुरुचरणीं ठेवून । विनवीतसे कर जोडून । करुणावचनेंकरुनियां ॥३३॥
जय जया जगद्गुरु । निर्गुण तूं निर्विकारु । ज्ञानसागर अपरांपरु । उद्धरावें आपणातें ॥३४॥
अज्ञानमाया वेष्टोन । नेणे गुरु कैसा कवण । सांगा स्वामी प्रकाशोन । ज्ञान होय आपणासी ॥३५॥
कैसा गुरु ओळखावा । कोणेपरी आहे सेवा । प्रकाश करोनि सांगावा । विश्ववंद्य गुरुमूर्ति ॥३६॥
जेणें माझें मन स्थिरु । होऊनि ओळखे सोयगुरु । तैसा करणें उपकारु । म्हणोनि चरणीं लागला ॥३७॥
करुणावचन ऐकोनि । श्रीगुरुनाथ संतोषोनि । सांगताति विस्तारोनि । गुरुसेवाविधान ॥३८॥
श्रीगुरु म्हणती ऐक मुनि । गुरु म्हणजे जनकजननी । उपदेशकर्ता आहे कोणी । तोचि जाण परम गुरु ॥३९॥
गुरु विरिंचि हर जाण । स्वरुप तोचि नारायण । मन करुनि निर्वाण । सेवा करावी भक्तीनें ॥४०॥
यदर्थी कथा एक । सांगों आम्ही तत्पर ऐक । आदिपर्वी असे निक । गुरुसेवा भक्तिभावें ॥४१॥
द्वापारांतीं परियेसीं । विप्र एक धौम्यऋषी । तिघे शिष्य होते त्यासी । वेदाभ्यास करावया ॥४२॥
एक 'आरुणी' पांचाळ । दुसरा 'बैद' केवळ । तिसरा 'उपमन्यु' बाळ । सेवा करिती विद्येलागीं ॥४३॥
पूर्वी गुरुची ऐसी रीति । शिष्याकरवीं सेवा घेती । अंतःकरण त्याचें पहाती । निर्वाणवरी शिष्याचें ॥४४॥
पाहोनियां अंतःकरण । असे भक्ति निर्वाण । कृपा करिती तत्क्षण । मनकामना पुरविती ॥४५॥
ऐसा धौम्यमुनि भला । तया आरूणी-पांचाळा । एके दिवशीं निरोप दिल्हा । ऐक द्विजा एकचित्तें ॥४६॥
शिष्यासी म्हणे धौम्यमुनि । आजि तुवां जावोनि रानीं । वृत्तीसी न्यावें तटाकपाणी । जंववरी होय तृप्त भूमि ॥४७॥
असे वृत्ति तळें खालीं । तेथें पेरिली असे साळी । तेथें नेवोनि उदक घालीं । शीघ्र म्हणे शिष्यासी ॥४८॥
ऐसा गुरुचा निरोप होतां । गेला शिष्य धांवत । तटाक असे पाहतां । कालवा थोर वहातसे ॥४९॥
जेथें उदक असे वहात । अतिदरारा गर्जत । वृत्तिभूमि उन्नत । उदक केवीं चढों पाहे ॥५०॥
म्हणे आतां काय करुं । कोपतील मातें श्रीगुरु । उदक जातसे दरारू । केवीं बांधूं म्हणतसे ॥५१॥
आणूनियां शिळा दगड । बांधिता जाहला उदका आड । पाणी जातसे धडाड । जाती पाषाण वाहोनियां ॥५२॥
प्रयत्न करी नानापरी । कांहीं केलिया न चढे वारी । म्हणे देवा श्रीहरि । काय करुं म्हणतसे ॥५३॥
मग मनीं विचार करी । गुरूचे शेतीं न चढे वारी । प्राण त्यजीन निर्धारीं । गुरुचे वृत्तीनिमित्त ॥५४॥
निश्चय करुनि मानसीं । मनीं ध्याई श्रीगुरुसी । म्हणे आतां उपाय यासी । योजूनि यत्न करावा ॥५५॥
घालितां उदकप्रवाहांत । जाती पाषाण वहात । आपण आड पडों म्हणत । निर्धारिलें तया वेळीं ॥५६॥
दोन्ही हातीं धरीं दरडी । पाय टेकी दुसरेकडी । झाला आपण उदकाआड । मनीं श्रीगुरुसी ध्यातसे ॥५७॥
ऐसा शिष्यशिरोमणि । निर्वाण मन करितांक्षणीं । वृत्तीकडे गेलें पाणी । प्रवाहाचें अर्ध देखा ॥५८॥
अर्ध पाणी जैसें तैसें । वाहतसे नित्यसरिसें । तयामध्यें शिष्य संतोषें । बुडाला असे अवधारा ॥५९॥
ऐसा शिष्य तया स्थानीं । बुडाला असे प्रवाहपाणीं । गुरुची वृत्ति जाहली धणी । उदकपूर्ण परियेसा ॥६०॥
त्याचा गुरु धौम्यमुनि । विचार करी आपुले मनीं । दिवस गेला अस्तमानीं । अद्यापि शिष्य न ये म्हणे ॥६१॥
ऐसें आपण विचारीत । गेला आपुले वृत्तींत । जाहलें असे उदक बहुत । न देखे शिष्य तया स्थानीं ॥६२॥
म्हणे शिष्या काय जाहलें । किंवा भक्षिलें व्याघ्रव्याळें । उदकानिमित्त कष्ट केले । कोठें असे म्हणतसे ॥६३॥
ऐसें मनीं विचारीत । उंच स्वरें पाचारीत । अरे शिष्या सखया म्हणत । प्रेमभावें बोलावी ॥६४॥
येणेंपरी करुणावचनीं । पाचारीतसे धौम्यमुनि । शब्द पडे शिष्यकानीं । तेथूनि मग निघाला ॥६५॥
येवोनियां श्रीगुरुसी । नमन केलें भावेसीं । धौम्यमुनीं महाहर्षी । आलिंगोनि आश्वासिलें ॥६६॥
वर दिधला तया वेळीं । ऐक शिष्या स्तोममौळी । तूतें विद्या आली सकळी । वेदशास्त्रादि व्याकरण ॥६७॥
ऐसें म्हणतां तत्क्षणीं । झाला विद्यावंत ज्ञानी । लागतसे गुरुचरणीं । भक्तिभावेंकरुनियां ॥६८॥
कृपानिधि धौम्यमुनि । आपुले आश्रमा नेऊनि । निरोप दिल्हा संतोषोनि । विवाहादि आतां करीं म्हणे ॥६९॥
निरोप घेऊनि शिष्यराणा । गेला आपुले स्थाना । आणिक दोघे शिष्य जाणा । होते तया गुरुजवळी ॥७०॥
दुसरा शिष्य 'बैद' जाणा । गुरुची करी शुश्रूषणा । त्याचे पहावया अंतःकरणा । धौम्य गुरु म्हणतसे ॥७१॥
धौम्य म्हणे शिष्यासी । सांगेन एक तुजसी । तुवां जाऊनि अहर्निशीं । वृत्ति आमुची रक्षिजे ॥७२॥
रक्षूनियां वृत्तीसी । आणावें धान्य घरासी । ऐसें म्हणतां महाहर्षी । गेला तया वृत्तीकडे ॥७३॥
वृत्ति पिके जंववरी । अहोरात्रीं कष्ट करी । राशी होतां अवसरीं । आला आपुले गुरुपाशीं ॥७४॥
सांगता जाहला श्रीगुरुसी । म्हणे व्रीही भरले राशीं । आतां आणावें घरासी । काय निरोप म्हणतसे ॥७५॥
मग म्हणे धौम्यमुनि । बा रे शिष्या शिरोमणि । कष्ट केले बहुत रानीं । आतां धान्य आणावें ॥७६॥
म्हणोनि देती एक गाडा । तया जुंपोनि एक रेडा । गुरु म्हणे जावें पुढा । शीघ्र यावें म्हणतसे ॥७७॥
एकीकडे जुंपी रेडा । आपण ओढी दुसरीकडा । येणेंपरी घेवोनि गाडा । आला तया वृत्तीजवळी ॥७८॥
दोनी खंडी साळीसी । भरी शिष्य गाडियासी । एकीकडे रेडियासी । जुंपोनि ओढी आपण देखा ॥७९॥
रेडा चाले शीघ्रेंसीं । आपण न ये तयासरसी । मग आपुले कंठासी । बांधिता झाला जूं देखा ॥८०॥
सत्राणें तयासरसी । चालत आला मार्गासी । रुतला रेडा चिखलेंसीं । आपुले गळां ओढीतसे ॥८१॥
चिखलीं रुतला रेडा म्हणोनि । चिंता करी बहु मनीं । आपण ओढी सत्राणीं । गळां फांस पडे जैसा ॥८२॥
सोडूनियां रेडियासी । काढिलें शिष्यें गाडियासी । ओढितां आपुले गळां फांसी । पडूनि प्राण त्यजूं पाहे ॥८३॥
इतुकें होतां निर्वाणीं । सन्मुख पातला धौम्यमुनि । त्या शिष्यातें पाहोनि नयनीं । कृपा अधिक उपजली ॥८४॥
सोडूनियां शिष्यातें । आलिंगोनि करूणाभरितें । वर दिधला अभिमतें । संपन्न होसी वेदशास्त्रीं ॥८५॥
वर देतां तत्क्षणेसीं । सर्व विद्या आली त्यासी । निरोप घेऊनियां घरासी । गेला शिष्य परियेसा ॥८६॥
तिसरा शिष्य उपमन्यु । सेवेविषयीं महानिपुण । गुरुची सेवा-शुश्रूषण । बहु करी परियेसा ॥८७॥
त्यासी व्हावा बहुत आहार । म्हणोनि विद्या नोहे स्थिर । त्यासी विचार करीत तो गुरु । यातें करावा उपाय एक ॥८८॥
त्यासी म्हणे धौम्यमुनि । तुज सांगतों म्हणोनि । नित्य गुरें नेऊनि रानीं । रक्षण करीं तृणचारें ॥८९॥
ऐसें म्हणतां गुरुमुनि । नमन करी त्याचे चरणीं । गुरें नेऊनियां रानीं । चारवीत बहुवस ॥९०॥
क्षुधा लागतां आपणासी । शीघ्र आणिलीं घरासी । कोपें गुरु तयासी । म्हणे शीघ्र येतोसि कां रे ॥९१॥
सूर्य जाय अस्तमानीं । तंववरी राखीं गुरें रानीं । येणेंपरी प्रतिदिनीं । वर्तावें तुवां म्हणतसे ॥९२॥
अंगीकारोनि शिष्यराणा । गुरें घेवोनि गेला राना । क्षुधाक्रांत होऊनि जाणा । चिंतीतसे श्रीगुरुसी ॥९३॥
चरती गुरें नदीतीरीं । आपण तेथें स्नान करी । तयाजवळी घरें चारी । असती विप्रआश्रम तेथें ॥९४॥
जाऊनियां तया स्थाना । भिक्षा मागे परिपूर्ण । भोजन करी सावधान । गोधन रक्षी येणेंपरी ॥९५॥
येणेंपरी प्रतिदिवशीं । रक्षूनि आणी गुरें निशीं । वर्ततां ऐसें येरे दिवशीं । पुसता झाला धौम्यमुनि ॥९६॥
गुरु म्हणे शिष्यासी । तूं नित्य उपवासी । तुझा देह पुष्टीसी । कवणेपरी होतसे ॥९७॥
ऐकोनि श्रीगुरुचें वचन । सांगे शिष्य उपमन्य । भिक्षा करितों प्रतिदिन । विप्रांघरीं तेथें देखा ॥९८॥
भोजन करुनि प्रतिदिवसीं । गुरें घेवोनि येतों निशीं । श्रीगुरु म्हणती तयासी । आम्हां सांडूनि केवीं भुक्ती ॥९९॥
भिक्षा मागोनि घरासी । आणोनि द्यावी प्रतिदिवसीं । मागुती जावें गुरांपाशीं । घेऊन यावें निशिकाळीं ॥१००॥
गुरुनिरोपें येरे दिवशीं । गुरें नेऊनि रानासी । मागे भिक्षा नित्य जैसी । नेऊनि दिधली घरांत ॥१॥
घरीं त्यासी भोजन । कधीं नव्हे परिपूर्ण । पुनरपि जाई तया स्थाना । भिक्षा करुनि जेवीतसे ॥२॥
नित्य भिक्षा वेळां दोनी । पहिली भिक्षा देवोनि सदनीं । दुसरी आपण भक्षूनि । काळ ऐसा कंठीतसे ॥३॥
येणेंपरी किंचित्काळ । वर्ततां जाहला महास्थूळ । एके दिवशीं गुरु कृपाळ । पुसतसे शिष्यातें ॥४॥
शिष्य सांगे वृत्तांत । जेणें आपुली क्षुधा शमत । नित्य भिक्षा मागत । वेळ दोनी म्हणतसे ॥५॥
एक वेळ घरासी । आणोनि देतों प्रतिदिवसीं । भिक्षा दुसरे खेपेसी । करितों भोजन आपण ॥६॥
ऐसें म्हणतां धौम्यमुनि । तया शिष्यावरी कोपोनि । म्हणे भिक्षा वेळ दोनी । आणूनि घरीं देईं पां ॥७॥
गुरुनिरोप जेणेंपरी । दोनी भिक्षा आणूनि घरीं । देता जाहला प्रीतिकरीं । मनीं क्लेश न करीच ॥८॥
गुरेंसहित रानांत । असे शिष्य क्षुधाक्रांत । गोवत्स होतें स्तन पीत । देखता जाहला तयासी ॥९॥
स्तन पीतां वांसुरासी । उच्छिष्ट गळे संधींसी । वायां जातें भूमीसी । म्हणोनि आपण जवळी गेला ॥११०॥
आपण असे क्षुधाक्रांत । म्हणोनि गेला धांवत । पसरुनिया दोनी हात । धरी उच्छिष्ट क्षीर देखा ॥११॥
ऐसें क्षीरपान करीं । घेऊनि आपुलें उदर भरी । दोनी वेळ भिक्षा घरीं । देतसे भावभक्तीनें ॥१२॥
अधिक पुष्ट जाहला त्याणें । म्हणे गुरु अवलोकून । पहा हो याचें शरीरलक्षण । कैसा स्थूळ होतसे ॥१३॥
मागुती पुसे तयासी । कवणेपरी पुष्ट होसी । सांगे आपुले वृत्तांतासी । उच्छिष्ट क्षीर पान करितों ॥१४॥
ऐकोनि म्हणे शिष्यासी । मतिहीन होय उच्छिष्टेसीं । दोष असे बहुवसी । भक्षूं नको आजिचेनी ॥१५॥
भक्षूं नको म्हणे गुरू । नित्य नाहीं तया आहारु । दुसरे दिवशीं म्हणे येरु । काय करुं म्हणतसे ॥१६॥
येणेंपरी गुरेंसहित । जात होता रानांत । गळत होतें क्षीर बहुत । एका रुईचे झाडासी ॥१७॥
म्हणे बरवें असे क्षीर । उच्छिष्ट नव्हे निर्धार । पान करूं धणीवर । म्हणोनि तेथें बैसला ॥१८॥
पानें तोडूनि कुसरीं । तयामध्यें क्षीर भरी । घेत होता धणीवरी । तंव भरिलें अक्षियांत ॥१९॥
तेणें गेले नेत्र दोनी । हिंडतसे रानोवनीं । गुरें न दिसती नयनीं । म्हणोनि चिंता करीतसे ॥१२०॥
काष्ट नाहीं अक्षिहीन । करीतसे चिंता गोधना । गुरें पाहों जातां राना । पडिला एका आडांत ॥२१॥
पडोनियां आडांत । चिंता करी तो अत्यंत । आतां गुरें गेलीं सत्य । बोल गुरुचा आला मज ॥२२॥
पडिला शिष्य तया स्थानीं । दिवस गेला अस्तमानीं । चिंता करी धौम्यमुनि। अजूनि शिष्य न येचि कां ॥२३॥
म्हणोनि गेला रानासी । देखे तेथें गोधनासी । शिष्य नाहीं म्हणोनि क्लेशीं । दीर्घस्वरें पाचारी ॥२४॥
पाचारितां धौम्यमुनि। ध्वनि पडला शिष्यकानीं । प्रत्योत्तर देतांक्षणीं । जवळी गेला कृपाळू ॥२५॥
ऐकोनियां वृत्तांत । उपजे कृपा अत्यंत । अश्विनी देवा स्तवीं म्हणत । निरोप दिधला तये वेळीं ॥२६॥
निरोप देतां तये क्षणीं । अश्विनी देवता ध्याय मनीं । दृष्टि आली दोनी नयनीं । आला श्रीगुरुसन्मुखेसीं ॥२७॥
येवोनि श्रीगुरुसी । नमन केलें भक्तीसीं । स्तुति केली बहुवसी । शिष्योत्तमें तये वेळीं ॥२८॥
संतोषोनि धौम्यमुनी । तया शिष्या आलिंगोनि । म्हणे शिष्या शिरोमणी । तुष्टलों तुझ्या भक्तीसी ॥२९॥
प्रसन्न होऊनि शिष्यासी । हस्त स्पर्शी मस्तकेसी । वेदशास्त्रादि तत्क्षणेसीं । आलीं तया शिष्यातें ॥१३०॥
गुरु म्हणे शिष्यासी । जावें आपुले घरासी । विवाहादि करुनि सुखेसीं । नांदत ऐस म्हणतसे ॥३१॥
होईल तुझी बहु कीर्ति । शिष्य होतील तुज अत्यंती । 'उत्तंक' नाम विख्याति । शिष्य तुझा परियेसीं ॥३२॥
तोचि तुझ्या दक्षिणेसी । आणील कुंडलें परियेसीं । जिंकोनियां शेषासी । कीर्तिवंत होईल ॥३३॥
जन्मेजय रायासी । तोच करील उपदेशी । मारवील समस्त सर्पांसी । याग करुनि परियेसा ॥३४॥
तोचि उत्तंक जाऊन । पुढें केला सर्पयज्ञ । जन्मेजयातें प्रेरुन । समस्त सर्प मारविले ॥३५॥
ख्याति जाहली त्रिभुवनांत । तक्षक आणिला इंद्रासहित । गुरुकृपेचें सामर्थ्य । ऐसें असे परियेसा ॥३६॥
जो नर असेल गुरुदूषक । त्यासी कैंचा परलोक । अंतीं होय कुंभीपाक । गुरुद्रोह-पातक्यासी ॥३७॥
संतुष्ट करितां गुरुसी । काय न साधे तयासी । वेदशास्त्र तयासी । लाघे क्षण न लागतां ॥३८॥
ऐसें तूं जाणोनि मानसीं । वृथा हिंडसी अविद्येसीं । जावें आपुले गुरुपाशीं । तोचि तुज तारील सत्य ॥३९॥
त्याचें मन संतुष्टवितां । तुज मंत्र साध्य तत्त्वता । मन करुनि सुनिश्चिता । त्वरित जाईं म्हणितलें ॥१४०॥
ऐसा श्रीगुरू निरोप देतां । विप्र जाहला अतिज्ञाता । चरणांवरी ठेवूनि माथा । विनवीतसे तया वेळीं ॥४१॥
जय जया गुरुमूर्ति । तूंचि साधन परमार्थी । मातें निरोपिलें प्रीतीं । तत्त्वबोध कृपेनें ॥४२॥
गुरुद्रोही आपण सत्य । अपराध घडले मज बहुत । गुरुचें दुखविलें चित्त । आतां केवीं संतुष्टवावें ॥४३॥
सुवर्णादि लोह सकळ । भिन्न होतां सांधवेल । भिन्न होतां मुक्ताफळ । केवीं पुन्हा ऐक्य होय ॥४४॥
अंतःकरण भिन्न होतां । प्रयास असे ऐक्य करितां । ऐसें माझें मन पतित । काय उपयोग जीवूनि ॥४५॥
ऐसें शरीर माझें द्रोही । काय उपयोग वांचून पाहीं । जीवित्वाची वासना नाहीं । प्राण त्यजीन गुरुप्रति ॥४६॥
ऐसेपरी श्रीगुरुसी । विनवितो ब्राह्मण हर्षी । नमूनि निघे वैराग्येसीं । निश्चय केला प्राण त्यजूं ॥४७॥
अनुतप्त जाहला तो ब्राह्मण । निर्मळ जाहलें अंतःकरण । अग्नि लागतां जैसें तृण । भस्म होय तत्क्षणीं ॥४८॥
जैसा कापूरराशीसी । वन्हि लागतां परियेसीं । जळोनि जाय त्वरितेसीं । तैसें तयासी जहालें ॥४९॥
याकारणें पापासी । अनुतप्त होतां मानसीं । क्षालण होय त्वरितेसीं । शतजन्मींचें पाप जाय ॥१५०॥
निर्वाणरुपें द्विजवर । निघाला त्यजूं कलेवर । ओळखोनियां जगद्गुरु । पाचारिती तयावेळीं ॥५१॥
बोलावोनि ब्राह्मणासी । निरोप देती कृपेसीं । न करीं चिंता तूं मानसीं । गेले तुझे दुरितदोष ॥५२॥
वैराग्य उपजलें तुझ्या मनीं । दुष्कृतें गेलीं जळोनि । एकचित्त करुनि मनीं । स्मरें आपुले गुरुचरण ॥५३॥
तये वेळीं श्रीगुरुसी । नमन केलें चरणासी । जगद्गुरु तूंचि होसी । त्रिमूर्तीचा अवतार ॥५४॥
तुझी कृपा होय जरी । पापें कैंचीं या शरीरीं । उदय होतां भास्करीं । अंधकार राहे केवीं ॥५५॥
ऐसेपरी श्रीगुरुसी । स्तुति करी तो भक्तीसीं । रोमांचळ उठती हर्षी । सददित कंठा जाहला ॥५६॥
निर्मळ मानसीं तयावेळीं । माथा ठेवी चरणकमळीं । विनवीतसे करुणाबहाळीं । म्हणे तारीं तारीं श्रीगुरुमूर्ति ॥५७॥
निर्वाण देखोनि अंतःकरण । प्रसन्न जाहला श्रीगुरु आपण । मस्तकीं ठेविती कर दक्षिण । तया ब्राह्मणासी परियेसा ॥५८॥
परीस लागतां लोहासी । सुवर्ण होय बावनकसी । तैसें तया द्विजवरासी । ज्ञान जहालें परियेसा ॥५९॥
वेदशास्त्रादि तात्काळी । मंत्रशास्त्रें आलीं सकळीं । प्रसन्न जहाला चंद्रमौळी । काय सांगूं दैव त्या द्विजाचें ॥१६०॥
आनंद जाहला ब्राह्मणासी । श्रीगुरु निरोपिती तयासी । आमुचें वाक्य तूं परियेसीं । जाय त्वरित आपुले गुरुपाशीं ॥६१॥
जावोनियां गुरुपाशीं । नमन करीं भावेसीं । संतोषी होईल भरंवसीं । तोचि आपण सत्य मानीं ॥६२॥
ऐसेपरी श्रीगुरुमूर्ति । तया ब्राह्मणा संभाषिती । निरोप घेऊनियां त्वरिती । गेला आपल्या गुरुपाशीं ॥६३॥
निरोप देऊनि ब्राह्मणासी । श्रीगुरु निघाले परियेसीं । 'भिल्लवडी' ग्रामासी । आले भुवनेश्वरी-संनिध ॥६४॥
कृष्णापश्चिमतटाकेसी । औदुंबर वृक्ष परियेसीं । श्रीगुरु राहिले गुप्तेसीं । एकचित्तें परियेसा ॥६५॥
सिद्ध म्हणे नामधारकासी । राहिले श्रीगुरु भिल्लवडीसी । महिमा जाहली बहुवसी । प्रख्यात तुज सांगेन ॥६६॥
म्हणोनि सरस्वतीगंगाधर । सांगे गुरुचरित्रविस्तार । ऐकतां होय मनोहर । सकळाभीष्टें साधती ॥१६७॥
इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे गुरुशुश्रूषणमाहात्म्यवर्णनं नाम षोडशोऽध्यायः ॥१६॥
ओंवीसंख्या १६७
श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
Binaca Geet Mala - 1953 Finals!!!
10 years ago
No comments:
Post a Comment