Tuesday, January 25, 2011

Gurucharitra - Adhyay 30

Chapter 30 A woman who has lost her husband is condoled and is explained the impermanence of life.

CHAPTER 30

The Death of a Young Brahmin Husband.

When Shri Guru lived at Ganagapur, his name and fame spread all over the country. The desires of all were fulfilled by the favour of Shri Guru.

Gopinath a rich Brahmin lived at Mahur. His issues did not sruvive. Both the Brahmin and his wife were devotees of Shri Datta. They had a son. When he was of 5 years, his thread ceremony was celebrated. When he became twelve years old, his mariage was celebrated. When he was of 16 years, the couple looked very charming. Both loved each other intensely.

Unfortunately the youth fell ill. Many medicines were given. His wife served him devotedly. He could not take full meals. So she also did not take meals. After 3 years he developed consumption. His body emitted foul odour. Even physicians did not like to go near him. But his wife served and nurses him with great devotion. She took only as much food as her husband took. The medicines given to him were also taken by hr. She gave up rich garments and lived a very simple life.

The parents of the couple were rich. Thery were pained to see the sufferings of their son and daughter-in-law. Jap,vrat,charity,sacrifices,feeding of the Brahmins and the poor had been done;but all was futile. All were passing days in grief, relying on the Almighty God.

The youth tried to console his parents and wife in various ways. The wife requested her father and mother-in-law to send then to some good holy place. She said,"My husband would recoup his health ther. Shri Guru Narsinha Saraswati lives at Ganagapur. His name and fame have spread all over the country. Hence send us to him."

The parents managed for their journey to Ganagaour and bade them good bye with heavy hearts. One the way, the youth had tridosh and when they reached Ganagapur, the youth died. The wife wept bitterly. She dashed her head on the ground. The local persons tried to console her but it was in vain. She exclaimed, 'I brought you away from your parents and have been the cause of your death. I have committed a great sin. How can I show my face to them now?" She fell on the dead body and wept. She decided to observe 'sati' and burn herself with the body of her husband.

In the mean while, there arrived a bright looking sanyasi with ash(bhasma) marks on his body, with a wreath of Rudraksh round the neck and locks of hari on his head. Knowing the cause of her mourning, he began to advise her saying, 'Every one gets the fruit of his actions in the past. You need not mourn on the death of this youth. Every one who is born has to die one day or the other. when Ganga is flooded, logs of wood from different places come together and again part. Several birds come for shelter on a tree in the night and fly away in the morning. Similar is a family life. Due to affection, we say my father,mother, husband, son,daughter etc. but just as foam or bubbles in water do not last long, so is the life on this earth. Life is like a dream, so do not mourn.'

श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः

नामधारक शिष्यराणा लागे सिद्धाचिया चरणा विनवीतसे कर जोडून भक्तिभावेकरूनिया ॥१॥

जय जया सिद्धमुनि तूचि तारक भवार्णी अज्ञानतिमिर नासोनि ज्योतिःस्वरूप तूचि होसी ॥२॥

अविद्यामायासागरी बुडालो होतो महापुरी तुझी कृपा जाहली तरी तारिले माते स्वामिया ॥३॥

तुवा दाविला निज-पंथ जेणे जोडे परमार्थ विश्वपालक गुरुनाथ तूचि होसी स्वामिया ॥४॥

गुरुचरित्र सुधारस तुवा पाजिला आम्हांस तृप्त होय गा मानस तृषा आणिक होतसे ॥५॥

तुवा केलिया उपकारासी उत्तीर्ण नव्हे मी वंशोवंशी निजस्वरूप आम्हांसी दाविले तुम्ही सिद्धमुनि ॥६॥

मागे कथा निरोपिलीसी अभिनव जाहले सृष्टीसी पतिताकरवी ख्यातीसी वेद चारी म्हणविले ॥७॥

त्रिविक्रम महामुनेश्वरासी बोधिले ज्ञान प्रकाशी पुढे कथा वर्तली कैशी विस्तारावे दातारा ॥८॥

ऐकोनि शिष्याचे वचन संतोषला सिद्ध आपण प्रेमभावे आलिंगोन आश्वासीतसे तये वेळी ॥९॥

धन्य धन्य शिष्यमौळी तुज लाधले अभीष्ट सकळी गुरूची कृपा तात्काळी जाहली आता परियेसा ॥१०॥

धन्य धन्य तुझी वाणी वेध लागला श्रीगुरुचरणी तूचि तरलासी भवार्णी सकळाभीष्टे साधतील ॥११॥

तुवा पुसिला वृत्तांत संतोष झाला आजि बहुत श्रीगुरुमहिमा असे ख्यात अगम्य असे सांगता ॥१२॥

एकेक महिमा सांगता विस्तार होईल बहु कथा संकेतमार्गे तुज आता निरोपीतसे परियेसी ॥१३॥

पुढे असता वर्तमानी तया गाणगग्रामभुवनी महिमा होतसे नित्यनूतनी प्रख्यातरूप होऊनिया ॥१४॥

त्रयमूर्तीचा अवतार झाला नृसिंहसरस्वती नर महिमा त्याची अपरंपारु सांगता अगम्य परियेसा ॥१५॥

महिमा तया त्रयमूर्तीची सांगता शक्ति आम्हा कैची काया धरूनि मानवाची चरित्र केले भूमीवरी ॥१६॥

तया स्थानी असता गुरु ख्याति झाली अपरांपरु प्रकाशत्व चारी राष्ट्र समस्त येती दर्शना ॥१७॥

येती भक्त यात्रेसी एकोभावे भक्तीसी श्रीगुरुदर्शनमात्रेसी सकळाभीष्ट पावती ॥१८॥

दैन्य पुरुष होती श्रियायुक्त वांझेसी पुत्र होय त्वरित कुष्ठे असेल जो पीडित सुवर्ण होय देह त्याचा ॥१९॥

अक्षहीना अक्ष येती बधिर कर्णी ऐकती अपस्मारादि रोग जाती श्रीगुरुचरणदर्शनमात्रे ॥२०॥

परीस लागता लोहासी सुवर्ण होय नवल कायसी श्रीगुरुकृपा होय ज्यासी सकळाभीष्ट पाविजे ॥२१॥

ऐसे असता वर्तमानी उत्तर दिशे माहुरस्थानी होता विप्र महाघनी नाम तयागोपीनाथ॥२२॥

तया पुत्र होऊनि मरती करी दुःख अनेक रीती दत्तात्रेया आराधिती स्त्रीपुरुष दोघेजण ॥२३॥

पुढे जाहला आणिक सुत तया नाम ठेवितीदत्त असती आपण धनवंत अति प्रीती वाढविले ॥२४॥

एकचि पुत्र तया घरी अति प्रीति तयावरी झाला पाच संवत्सरी व्रतबंध केला तयासी ॥२५॥

वर्षे बारा होता तयासी विवाह करिती प्रीतीसी अतिसुंदर नोवरीसी विचारूनि प्रीतिकरे ॥२६॥

मदनाचे रतीसरसी रूप दिसे नोवरीसी अति प्रीति सासूश्वशुरासी महाप्रेमे प्रतिपाळिती ॥२७॥

दंपती एकचि वयेसी अति प्रिय महा हर्षी वर्धता झाली षोडशी वर्षे तया पुत्रासी ॥२८॥

दोघे सुंदर सुलक्षण एकापरीस एक प्राण विसंबिती क्षण क्षण अतिप्रिय परियेसा ॥२९॥

ऐसी प्रेमे असता देखा व्याधि आली त्या पुरुषा अनेक औषधे देता ऐका आरोग्य नोहे तयासी ॥३०॥

नवचे अन्न तयासी सदा राहे उपवासी त्याची भार्या प्रीतीसी आपण घे सदा अन्न ॥३१॥

पुरुषावरी आपुला प्राण करी नित्य उपोषण पतीस देता औषधे जाण प्राशन करी परियेसा ॥३२॥

येणेपरी तीन वर्षी झाली व्याधि-क्षयासी पतिव्रता स्त्री कैसी पुरुषासवे कष्टतसे ॥३३॥

पुरुषदेह क्षीण झाला आपण तयासरसी अबला तीर्थ घेऊनि चरणकमळा काळ क्रमी तयाजवळी ॥३४॥

दुर्गंधि झाले देह त्याचे जवळी येती वैद्य साचे पतिव्रता सुमन तिचे विसंबेचि क्षणभरी ॥३५॥

जितुके अन्न पतीसी तितुकेचि ग्रास आपणासी जैसे औषध देती त्यासी आपण घेतसे परियेसा ॥३६॥

मातापिता दायाद गोती समस्त तिसी वारिती पतिव्रता ज्ञानवंती ऐके बोल कवणाचे ॥३७॥

दिव्यवस्त्रादि आभरणे त्यजिली समस्त भूषणे पुरुषावरी आपुला प्राण काय सुख म्हणतसे ॥३८॥

उभयतांची मातापिता महाधनिक श्रीमंता पुत्रकन्येसी पाहता दुःख करिती परियेसा ॥३९॥

अनेक जपानुष्ठान मंत्रविद्या महाहवन अपरिमित ब्राह्मणभोजन करविताति अवधारा ॥४०॥

अनेक परीचे वैद्य येती दिव्य रस-औषधे देती शमन नव्हे कवणे रीती महाव्याधीने व्यापिले ॥४१॥

पुसती जाणत्या ज्योतिष्यासि पूजा करिती कुळदेवतांसी काही केलिया पुत्रासी आरोग्य नोहे सर्वथा ॥४२॥

वैद्य म्हणती तये वेळी नव्हे बरवे त्यासी अढळी राखील जरी चंद्रमौळी मनुष्ययत् नव्हे आता ॥४३॥

ऐसे ऐकोनि मातापिता दुःखे दाटली करिती चिंता जय जया जगन्नाथा दत्तात्रेया गुरुमूर्ति ॥४४॥

आराधोनिया तुम्हांसी पुत्र लाधलो संतोषी पापरूप आपणासी निधान केवी राहो पाहे ॥४५॥

एकचि पुत्र आमचे वंशी त्याते जरी राखिसी प्राण देऊ तयासरसी दत्तात्रेया स्वामिया ॥४६॥

ऐसे नानापरी देखा दुःख करिती जननीजनका वारीतसे पुत्र ऐका मातापिता आलिंगोनि ॥४७॥

म्हणे आपुले भोग सरले जितुके ऋण तुम्हा दिधले अधिक कैचे घेऊ भले ऋणानुबंध चुकेचि ॥४८॥

ऐसे ऐकोनि मातापिता दोघे जाहली मूर्च्छागता पुत्रावरी लोळता महादुःखे दाटोनिया ॥४९॥

म्हणती ताता पुत्रराया आमुचीआशा झाली वाया पोषिसी आम्हा म्हणोनिया निश्चय केला होता आपण ॥५०॥

उबगोनिया आम्हांसी सोडूनि केवी जाऊ पाहसी वृद्धाप्यपणी आपणांसी धर्म घडे केवी तुज ॥५१॥

ऐकोनि मातापितावचन विनवीतसे आक्रंदोन करणी ईश्वराधीन मनुष्ययत् काय चाले ॥५२॥

मातापित्यांचे ऋण पुत्रे करावे उत्तीर्ण तरीच पुत्रत्व पावणे नाही तरी दगडापरी ॥५३॥

मातेने केले मज पोषण एके घडीचे स्तनपान उत्तीर्ण नव्हे भवार्ण जन्मांतरी येऊनिया ॥५४॥

आपण जन्मलो तुमचे उदरी कष्ट दाविले अतिभारी सौख्य देखा कवणेपरी ऐसा आपण पापी देखा ॥५५॥

आता तुम्ही दुःख करणे परमार्थी दृष्टी देणे जैसे काही असेल होणे ब्रह्मादिका सुटेचि ॥५६॥

येणेपरी जननीजनका संभाषीतसे पुत्र निका तेणेपरी स्त्रियेसी देखा सांगतसे परियेसा ॥५७॥

म्हणे ऐक प्राणेश्वरी झाले आमुचे दिवस सरी मजनिमित्ते कष्टलीस भारी वृथा गेले कष्ट तुझे ॥५८॥

पूर्वजन्मीचे वैरपण तुजसी होता माझा शीण म्हणोनि तूते दिधले जाण जन्मांतरीचे कष्ट देखा ॥५९॥

तू जरी रहासी आमुचे घरी तुज पोशितील परिकरी तुज वाटेल कष्ट भारी जाई आपुले माहेरा ॥६०॥

ऐसे तुझे सुंदरीपण लाधे आपण दैवहीन राहे तुझे अहेवपण माझे अंग स्पर्शता ॥६१॥

ऐकोनि पतीचे वचन मूर्च्छा आली तत्क्षण माथा लावूनिया चरणा दुःख करी तये वेळी ॥६२॥

म्हणे स्वामी प्राणेश्वरा तुम्ही मज अव्हेरा तुहांसरी दातारा आणिक नाही गति आपणा ॥६३॥

जेथे असे तुमचा देह सवेचि असे आपण पाहे मनी करा संदेह समागमी तुमची आपण ॥६४॥

ऐसे दोघांचिया वचनी ऐकोनिया जनकजननी देह टाकोनिया धरणी दुःख करिती तयेवेळी ॥६५॥

उठवूनिया श्वशुरासी संबोखीतसे सासूसी करा चिंता, हो भरवसी पति आपुला वाचेल ॥६६॥

विनवीतसे तये वेळी आम्हा राखेल चंद्रमौळी पाठवा एखाद्या स्थळी पति आपुला वाचेल ॥६७॥

सांगती लोक महिमा ख्याति नरसिंहसरस्वती श्रीगुरुमूर्ति गाणगापुरी वास करिती तया स्वामी पहावे ॥६८॥

त्याचे दर्शनमात्रेसी आरोग्य होईल पतीसी आम्हा पाठवा त्वरितेसी म्हणोनि चरणा लागली ॥६९॥

मानवली गोष्ट समस्तांसी मातापिताश्वशुरांसी निरोप घेऊनि सकळिकांसी निघती झाली तये वेळी ॥७०॥

तया रोगिया करोनि डोली घेवोनि निघाली ते बाळी विनवीतसे तये वेळी आपले सासूश्वशुरांसी ॥७१॥

स्थिर करूनि अंतःकरण सुखे रहावे दोघेजण पति असे माझा प्राण राखील माझे कुळदैवत ॥७२॥

म्हणोनि सासूश्वशुरांसी नमन करी प्रीतीसी आशीर्वाद देती हर्षी अहेवपण स्थिर होय ॥७३॥

तुझे दैवे तरी आता आमुचा पुत्र वाचो वो माता म्हणोनि निघाले बोळवीत आशीर्वाद देताति ॥७४॥

येणेपरी पतीसहित निघती झाली पतिव्रता क्वचित्काळ मार्ग क्रमिता आली गाणगापुरासी ॥७५॥

मार्ग क्रमिता रोगियासी अधिक जाहला त्रिदोषी उतरता ग्रामप्रदेशी अतिसंकट जाहले पै ॥७६॥

विचारिता श्रीगुरूसी गेले होते संगमासी जावे म्हणोनि दर्शनासी निघती झाली तये वेळी ॥७७॥

पतिव्रता तये वेळ आली आपुले पतीजवळ पहाता जाहला अंतकाळ प्राण गेला तत्क्षणी ॥७८॥

आकांत करी ते नारी लोळतसे धरणीवरी भोसकूनि घ्यावया घेता सुरी वारिती तियेसी ग्राम लोक ॥७९॥

आफळी शिरे भूमीसी हाणी उरी पाषाणेसी केश मोकळे आक्रोशी प्रलापीतसे परियेसा ॥८०॥

हा हा देवा काय केले का मज गाईसी गांजिले आशा करूनि आल्ये राखिसी प्राण म्हणोनि ॥८१॥

पूजेसी जाता देउळात पडे देऊळ करी घात ऐशी कानी ऐको मात दृष्टांत झाला आपणासी ॥८२॥

उष्णकाळी तापोनि नरु ठाकोनि जाय एखादा तरु वृक्षचि पडे आघात थोरु तयापरी झाले मज ॥८३॥

तृषेकरूनि पीडित जाय मनुष्य गंगेत संधी सुसरी करी घात तयापरी मज झाले ॥८४॥

व्याघ्रभये पळे धेनु जाय आधार म्हणोनु तेथेचि वधिती यवनु तयापरी झाले मज ॥८५॥

ऐसी पापी दैवहीन आपुले पतीचा घेतला प्राण मातापितरांसी त्यजून घेवोनि आल्ये विदेशी ॥८६॥

येणेपरी दुःख करीत पाहू आले जन समस्त संभाषिताति दुःखशमता अनेकपरीकरूनिया ॥८७॥

वारिताति नारी सुवासिनी का वो दुःख करिसी कामिनी विचार करी अंतःकरणी होणार चुके सकळिकांसी ॥८८॥

ऐसे म्हणता नगरनारी तिसी दुःख झाले भारी आठवीतसे परोपरी आपुले जन्मकर्म सकळ ॥८९॥

ऐका तुम्ही मायबहिणी आता कैची वाचू प्राणी पतीसी आल्ये घेऊनि याची आशा करोनिया ॥९०॥

आता कवणा शरण जावे राखेल कोण मज जीवे प्राणेश्वरा त्यजूनि जीवे केवी वाचू म्हणतसे ॥९१॥

बाळपणी गौरीसी पूजा केली शंकरासी विवाह होता परियेसी पूजा केली मंगळागौरी ॥९२॥

अहेवपणाचे आशेनी पूजा केली म्या भवानी सांगती माते सुवासिनी अनेकपरी व्रतादिके ॥९३॥

जे जे सांगती माते व्रत केली पूजा अखंडित समस्त जाहले आता व्यर्थ रुसली गौरी आपणावरी ॥९४॥

आता माझिये हळदीसी चोर पडले गळेसरीसी सर्वस्व दिधले वन्हीसी कंकण-कंचुकी परियेसा ॥९५॥

कोठे गेले माझे पुण्य वृथा पूजिला गौरीरमण कैसे केले मज निर्वाण ऐका मायबहिणी हो ॥९६॥

केवी राहू आता आपण पति होता माझा प्राण लोकांसरिसा नोहे जाण प्राणेश्वर परियेसा ॥९७॥

ऐसे नानापरी देखा करी पतिव्रता दुःखा पतीच्या पाहूनिया मुखा आणिक दुःख अधिक करी ॥९८॥

आलिंगोनि प्रेतासि रोदन करी बहुवसी आठवी आपुले पूर्व दिवसी पूर्वस्नेह तये वेळी ॥९९॥

म्हणे पुरुषा प्राणेश्वरा कैसे माझे त्यजिले करा उबग आला तुम्हा थोरा म्हणोनि माते उपेक्षिले ॥१००॥

कैसी आपण दैवहीन तटाकी खापर लागता भिन्न होतासि तू निधान आयुष्य तुझे उणे जहाले ॥१॥

तुमचे मातापितयांसी सांडूनि आणिले परदेशी जेणेपरी श्रावणासी वधिले राये दशरथे ॥२॥

तैसी तुमची जनकजननी तुम्हा आणिले त्यजूनि तुमची वार्ता ऐकोनि प्राण त्यजितील दोघेजण ॥३॥

तीन हत्या भरवसी घडल्या मज पापिणीसी वैरिणी होय मी तुम्हांसी पतिघातकी आपण सत्य ॥४॥

ऐशी पापिणी चांडाळी निंदा करिती लोक सकळी प्राणे घेतला मीचि बळी प्राणेश्वरा दातारा ॥५॥

स्त्री नव्हे मी तुमची वैरी जैसी तिखट शस्त्र सुरी वेधिली तुमचे शरीरी घेतला प्राण आपणचि ॥६॥

मातापिता बंधु सकळी जरी असती तुम्हाजवळी मुख पाहती अंतकाळी त्यांसि विघ्न आपण केले ॥७॥

माझ्या वृद्ध सासूसासर्यात होती तुमची आस पुरला नाही त्यांचा सोस त्याते सांडोनि केवी जाता ॥८॥

एकचि उदरी तुम्ही त्यासी उबगलेति पोसावयासी आम्हा कोठे ठेवूनि जासी प्राणेश्वरा दातारा ॥९॥

आता आपण कोठे जावे कवण माते पोसील जीवे सांगता आम्हांसी बरवे निघोनि गेलासी प्राणेश्वरा ॥११०॥

तू माझा प्राणेश्वरु तुझे ममत्व केवी विसरू लोकासमान नव्हसी नरु प्रतिपाळिले प्रीतिभावे ॥११॥

कधी नेणे पृथक्शयन वामहस्त-उसेवीण फुटतसे अंतःकरण केवी वाचो प्राणेश्वरा ॥१२॥

किती आठवू तुझे गुण पति नव्हसी माझा प्राण सोडोनि जातोसि निर्वाण कवणेपरी वाचू मी ॥१३॥

आता कवण थार् जाणे कवण घेतील मज पोसणे बालविधवाम्हणोनि जन निंदापवाद ठेविती ॥१४॥

एकही बुद्धि मज सांगता त्यजिला आत्मा प्राणनाथा कोठे जावे आपण आता केशवपन करूनि ॥१५॥

तुझे प्रेम होते भरल्ये मातापितयाते विसरल्ये त्यांचे घरा नाही गेल्ये बोलावनी नित्य येती ॥१६॥

केवी जाऊ त्यांच्या घरा उपेक्षितील प्राणेश्वरा दैन्यवृत्ती दातारा चित्तवृत्ति केवी धरू ॥१७॥

जववरी होतासी तू छत्र सर्वा ठायी मी पवित्र मानिती सकळ इष्टमित्र आता निंदा करतील ॥१८॥

सासूश्वशुरापाशी जाणे मज देखता त्याही मरणे गृह जहाले अरण्य तुम्हाविणे प्राणेश्वरा ॥१९॥

घेवोनि आल्ये आरोग्यासी येथे ठेवूनि तुम्हांसी केवी जाऊ घरासी राक्षसी मी पापीण ॥१२०॥

ऐसे नानापरी ते नारी दुःख करी अपरांपरी इतुके होता अवसरी आला तेथे सिद्ध एक ॥२१॥

भस्मांकित जटाधारी रुद्राक्षमाळाभूषण-अळंकारी त्रिशूळ धरिला असे करी येऊनि जवळी उभा ठेला ॥२२॥

संभाषीतसे तया वेळी का वो प्रलापिसी स्थूळी जैसे लिहिले कपाळी तयापरी होतसे ॥२३॥

पूर्वजन्मीचे तपफळ भोगणे आपण हे अढळ वाया रडसी निर्फळ शोक आता करू नको ॥२४॥

दिवस आठ जरी तू रडसी ये प्राण प्रेतासी जैसे लिहिले ललाटेसी तयापरी घडेल जाण ॥२५॥

मूढपणे दुःख करिसी समस्ता मरण तू जाणसी कवण वाचला असे धरित्रीसी सांग आम्हा म्हणतसे ॥२६॥

आपुला म्हणसी प्राणेश्वरु कोठे उपजला तो नरु तुझा जन्म झाला येरु कवण तुझी मातापिता ॥२७॥

पूर येता गंगेत नानापरीची काष्ठे वाहत येऊनि एके ठायी मिळत फाकती आणिक चहूकडे ॥२८॥

पाहे पा एका वृक्षावरी येती पक्षी अपरांपरी क्रमोनि प्रहर चारी जाती मागुती चहूकडे ॥२९॥

तैसा हा संसार जाण नारी कवण वाचला असे स्थिरी मायामोहे कलत्रपुत्री पति म्हणसी आपुला ॥१३०॥

गंगेमध्ये जैसा फेन तेणेपरी देह जाण स्थिर नोहे याचि कारण शोक वृथा करू नको ॥३१॥

पंचभूतात्मक देह तत्संबंधी गुण पाहे आपुले कर्म कैसे आहे तैसा गुण उद्भवे ॥३२॥

गुणानुबंधे कर्मे घडती कर्मासारिखी दुःख-प्राप्ति मायामोहाचिया रीती मायामयसंबंधे ॥३३॥

मायासंबंधे मायागुण उपजे सत्त्व-रज-तमोगुण येणेचि तीन्हि देह जाण त्रिगुणात्मक देह हा ॥३४॥

हा संसार वर्तमान समस्त कर्माचे अधीन सुखदुःख आपुले गुण भोगिजे आपुले आर्जव ॥३५॥

कल्पकोटी दिवसवरी देवास आयुष्य आहे जरी त्यासी काळ चुके सरी मनुष्याचा कवण पाड ॥३६॥

काळ समस्तांसी कारण कर्माधीन देह-गुण स्थिर कल्पिता साधारण पंचभूत देहासी ॥३७॥

काळ-कर्म-गुणाधीन पंचभूतात्मक देह जाण उपजता संतोष नको मना मेलिया दुःख करावे ॥३८॥

जधी गर्भ होता नरु जाणिजे नश्य म्हणोनि प्रख्यात थोरु त्याचे जैसे गुणकर्म-विवरु तैसे मरण जन्म परियेसा ॥३९॥

कोणा मृत्यु पूर्ववयसी कवणा मृत्यु वृद्धाप्येसी जैसे आर्जव असे ज्यासी तयापरी घडे जाणा ॥१४०॥

पूर्वजन्मार्जवासरसी भोगणे होय सुखदुःखअंशी कलत्र-पुत्र-पति हर्षी पापपुण्यांशे जाणा ॥४१॥

आयुष्य सुखदुःख जाणा समस्त पापवश्य-पुण्य ललाटी लिहिले असे ब्रह्माने अढळ जाण विद्वज्जना ॥४२॥

एखादे समयी कर्मासी लंघिजेल पुण्यवशी देवदानवमनुष्यांसी काळ चुके भरवसे ॥४३॥

संसार म्हणजे स्वप्नापरी इंद्रजाल-गारुडीसरी मिथ्या जाण तयापरी दुःख आपण करू नये ॥४४॥

शतसहस्त्रकोटि जन्मी तू कवणाची कोण होतीस गृहिणी वाया दुःख करिसी झणी मूर्खपणेकरूनिया ॥४५॥

पंचभूतात्मक शरीर त्वचा मांस शिरा रुधिर मेद मज्जा अस्थि नर विष्ठा-मूत्र-श्र्लेष्मसंबंधी ॥४६॥

ऐशा शरीरअघोरात पाहता काय असे स्वार्थ मल मूत्र भरले रक्त तयाकारणे शोक का करिसी ॥४७॥

विचार पाहे पुढे आपुला कोणेपरी मार्ग असे भला संसारसागर पाहिजे तरला तैसा मार्ग पाहे बाळे ॥४८॥

येणेपरी तियेसी बोधिता झाला तापसी ज्ञान झाले तियेसी सांडी शोक तयावेळी ॥४९॥

कर जोडोनि तये वेळी माथा ठेविनि चरणकमळी विनवीतसे करुनाबहाळी उद्धरी स्वामी म्हणोनिया ॥१५०॥

कवण मार्ग आपणासी जैसा स्वामी निरोप देसी जनक जननी तू आम्हासी तारी तारी म्हणतसे ॥५१॥

कवणेपरी तरेन आपण हा संसार भवार्ण तुझा निरोप करीन म्हणोनि चरणा लागली ॥५२॥

ऐकोनि तियेचे वचन सांगे योगी प्रसन्नवदन बोलतसे विस्तारून आचरण स्त्रियांचे ॥५३॥

म्हणोनि सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्रविस्तार ऐकता समस्त पाप दूर सकळाभीष्टे साधती ॥१५४॥

इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे प्रेतांगनाशोको नाम त्रिंशत्तमोऽध्यायः ॥३०॥
ओवीसंख्या १५४
श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु

1 comment:

  1. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete