Monday, March 14, 2011

स्मरण - कै. सुरेश भटांचे


पुर्तता माझ्या व्यथेची माझिया मृत्युत व्हावी
जीवनापासून माझ्या ह्या मला मुक्ती मिळावी.....

माझ्या सर्व साहित्यप्रेमी मित्रांनो,
आज १४ मार्च; गझल-सम्राट कै. सुरेश भट (१९३२ - २००३) ह्यांचा आज स्मृतीदिन आहे. त्यानिमित्त त्यांना भावपूर्ण श्रधांजली म्हणून त्यांचीच गझल सर्व काव्य-प्रेमींसाठी येथे सादर आहे...


जगत मी आलो असा की, मी जसा जगलोच नाही,
एकदा तुटलो असा की, मग पुन्हा जुळलोच नाही |

जन्मभर अश्रुस माझ्या शिकविलेस नाना बहाणे,
सोंग पण फ़सव्या जीण्याचे, शेवटी शिकलोच नाही |

कैकदा कैफात माझ्या मी विजांचे घोट प्यालो,
पण प्रकाशाला तरीही हाय, मी पटलोच नाही |

सारखे माझ्या स्मितांचे हुंदके सांभाळीले मी,
एकदा हसलो जरासा, मग पुन्हा हसलोच नाही |

स्मरतही नाहीत मजला चेहरे माझ्या व्यथांचे,
एवढे स्मरते मला की, मी मला स्मरलोच नाही |

वाटले मज गुणगुणावे ओठही पण जाहले तिऱ्हाईत,
सुचत गेली रोज गीते, मी मला सुचलोच नाही |

संपल्यावर खेळ माझ्या आंधळ्या कोशिंबिरीचा,
लोक मज दिसले अचानक, मी कुठे दिसलोच नाही |

जगत मी आलो असा की, मी जसा जगलोच नाही,
एकदा तुटलो असा की, मग पुन्हा जुळलोच नाही |

-- सुरेश भट

अजुन एक दुसरी गझल ...

रुणझुणत राहिलो, किणकिणत राहिलो
जन्मभर मी तुला, 'ये' म्हणत राहिलो

सांत्वनाला तरी, हृदय होते कुठे?
रोज माझेच मी, मन चिणत राहिलो

ऐकणारे तिथे, दगड होते जरी
मीच वेड्यापरी, गुणगुणत राहिलो

शेवटी राहिले, घर सुनेच्या सुने
उंबऱ्यावरच मी, तणतणत राहिलो

ऐनवेळी उभे, गाव झाले मुके
मीच रस्त्यावरी, खणखणत राहिलो

विझत होते जरी, दीप भवतालचे,
आतल्या आत मी, मिणमिणत राहिलो

दूर गेल्या पुन्हा, जवळच्या सावल्या
मी जसाच्या तसा, रणरणत राहिलो

मज ताराच तो, गवसला नेमका
अंबरापार मी, वणवणत राहिलो

- कै.सुरेश भट

No comments:

Post a Comment